मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पूर्तता” –  लेखक : श्री पराग दामले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “पूर्तता” –  लेखक : श्री पराग दामले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित 

आज काकू चकचकीत तयार झाल्या, ठरवून ठेवलेली साडी, चपला, पर्स, हातात घड्याळ… घरात सांगून ठेवलं, येते जेवणाच्या वेळेपर्यंत… खाली उतरल्यावर रिक्षाला हात केला, रिक्षावाल्याला सारसबाग सांगितलं… कोथरुडधून, नळ स्टॉप, म्हात्रे पूल, शास्त्री रोड, निलायमचा चौक, आणि मग सारसबाग… रस्त्यावर थांबून लांबून दर्शन घेतलं… सणस ग्राऊंडला एक फेरी मारली… एक भेळ बांधून घेतली… आता पार्वती पायथा… पायथ्याशी गेल्यावर एक क्षणभर थांबून वरच्या देवळाकडे बघितलं आणि पुन्हा म्हणाल्या आता संभाजी बाग… रिक्षावाला थोडा प्रश्नार्थक नजरेने आरशात बघत होता… काकू रिक्षातून उतरल्या सुद्धा नाहीत आणि आता दुसरी बाग… संभाजी बागेतल्या एका गेटमधून आत जाऊन दुसऱ्या गेटमधून बाहेर पडले… आता शनिवार वाडा, रिक्षावाला बुचकळ्यात पडला होता… बर गि-हाईक तर चांगलं मिळालं आहे, मग तक्रार तरी कसली करायची? … जायचंय तर नेऊ…

शनीवारवाड्याशी आल्यावर दरवाजासमोर गेल्या, पटांगणाकडे एकदा बघितलं.. खारेदाणेवाल्याकडे जाऊन एक पुडी घेतली, पुन्हा रिक्षात बसल्या… आता मात्र रिक्षावाल्याच कुतूहल प्रचंड वाढलं.. विषय काढायचा म्हणून विचारलं, “काकू तुम्ही पुण्यातल्याच का? “, , , , , , ,

“हो, का रे? “…

“सहज विचारलं. “, , , , , ,

“अगदी लहानपणापासून की लग्न झाल्यावर आलात? “, , , , ,

“अरे, मी जन्मापासून पुण्यात आहे…

आता तू ५४६ नारायण पेठेत चल… ”

काय बरं असेल तिकडे? रिक्षावाला मनात म्हणत होता.. अगदी बाहेर ऐकू येईल इतकं जोरात मन बोलत होतं, , , , , ,

काकू पुढे बोलायला लागल्या, “अरे माझं माहेर तिथे होतं पूर्वी… ”

“ओहहहह, तिकडे सीताफळबाग कॉलनीमध्ये नदीत आम्ही मासे पकडायला यायचो… ”

“हो, तिथे एक गोठा आहे, मुलं दिसायची आम्हाला मासे पकडताना… माती गणपतीपाशी दीपमाळ होती, त्यावर दिवे लावले जायचे… कबीर बागेत खेळायची सगळी मुलं… ”

बोलता बोलता माती गणपती आला… ५४६ नारायण पेठ आली, काकू उतरल्या, नवीन बिल्डिंग झाली होती, त्याच्या भिंतीला हात लावला… क्षणभर डोळे ओले झाले, म्हणाल्या, “चल आता पुन्हा कोथरूडला.. ” रिक्षावाल्याला आता प्रकाश पडला.. …. काकूंच्या जुन्या आठवणी ताज्या करायला म्हणून इतकी फिरस्ती झाली…

कोथरूडमध्ये घराशी उतरल्यावर मीटरकडे बघत पैसे सांगितले काकूंनी नोट काढून दिली… त्याने साहजिकच विचारलं, “मला चांगलं गि-हाईक मिळालं, चांगला धंदा झाला, हे सर्व ठीक आहे, , , , , पण इतकं आठवणीसाठी कोणी फिरत नाही हो.. ”

“तस नाहीये रे… लहानपणी आमचे बाबा आम्हाला या सगळ्या ठिकाणी सायकलवर घेऊन जायचे, काहीवेळा तर आम्ही चालत जायचो… तेव्हा मी हट्ट करायचे, रिक्षातून जाऊ… बाबा म्हणायचे, चालल्यामुळे तब्येत छान राहते, भूक छान लागते… दोघात खाल्लेली एक भेळ सहज पचून जाते… पण कळत्या वयात समजलं की रिक्षाला खूप पैसे लागायचे, म्हणून बाबा चालत किंवा सायकलवर न्यायचे… आता यजमान स्कुटरवर नेतात, मुलं मोठी झाली, ती पण नेतात, यात माझं रिक्षात बसून फिरायचं स्वप्न तसच राहून गेलं होतं… ते म्हणतात ती काय ती ” बकेट लिस्ट ” ओसंडून वाहात होती… होईल रिकामी हळू हळू, पुन्हा भरण्यासाठी… ”

… ऐकून रिक्षावाला स्तब्ध झाला… म्हणाला, “खरंय हो. ” त्याचं स्वप्न आठवून म्हणाला, “आकाशात विमान दिसलं की मला पण वाटतं, कधीतरी विमानात बसून, उंचावरून पुणं बघता येईल… बघू कधी स्वप्न पूर्ण होईल.. स्वप्नाचा पाठलाग मी नक्की करीन… स्वप्नपूर्तीला वय नसतं… ”

 

लेखक : श्री पराग दामले 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सप्तसोपान… लेखक : श्री विश्वास बीडकर ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

श्री मिलिंद जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सप्तसोपान… लेखक : श्री विश्वास बीडकर ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

मध्यंतरी एक मस्त जुगलबंदी अनुभवता आली.

डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि मंगला खाडिलकर यांची शाब्दिक जुगलबंदी होती ती.

सोहळा होता ‘सप्तसोपान’ या वेगळ्या उपक्रमाच्या उद्घाटनाचा.

‘वरिष्ठ आणि जेष्ठ’ यामधलं अंतर समजावून सांगणं हा मूळ उद्देश.

 

समोरच्याचं मन मोकळं करून त्याला बोलतं करणं, यात हे दोघेही सचिन तेंडुलकर.

 

डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी सुरुवातीलाच सांगितलं, “आपण जमलो आहोत ते एकाच गोष्टीसाठी, ‘Healthy Aging. ‘

आपल्या नियंत्रित आजाराची फारशी काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सगळे ती घेत असणारच. प्रश्न आहे तो, बौध्दिक क्षमता वाढविण्याचा.

जे आजपर्यंत आयुष्यात केलं आहे, त्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं की तुम्ही वृध्दत्व विसरणार.

जे शिकलो आहोत, जे आजपर्यंत केलं आहे, तो मार्ग आपल्या मेंदूला पूर्ण परिचयाचा आहे. तो वापरून वापरून थोडा खड्डेमयही झाला आहे.

नवीन रस्ते मेंदूला दाखवले, तर तो परत एकदा उत्साहित होतो, अधिक कार्यक्षम होतो.

म्हणूनच हा ‘सप्तसोपान’चा उपक्रम.

 

वयानं वरिष्ठ होऊ लागलं की प्रथम जाणवतं ते नाते संबंध. इतरांशी आपलं वागणं. या संदर्भात डॉ. नाडकर्णी यांनी सूर्यमालेचा संदर्भ सांगितला. आपण स्वतः म्हणजे सूर्य आणि आपली नाती म्हणजे सूर्यमालेतले ग्रह.

आपण एवढचं लक्षात ठेवायचं, कोणत्या नात्याचा ग्रह आणि त्यातलं अंतर समजून घेणं.

 

वय वाढलं की सगळ्यात कमी होतं जातं ते नवीन शिकणं.

तेचं सप्तसोपानमध्ये करायचं.

 

आमच्यासारख्या बॅंकेत आयुष्य घालवलेल्यांनी संख्या, अकाउंट्स सोडून नवीन काही शिकायचं. काय शिकायचं,

तर, गाणं, ब्रिज असे छंद जोपासण्याचा प्रयत्न. यात फक्त शिकण्याचा आनंद घ्यायचा.

नो परीक्षा. नो नैपुण्य चाचणी.

 

भाजी टवटवीत राहण्यासाठी मध्येमध्ये पाणी शिंपडतात, तसं आपला मेंदू टवटवीत राहण्यासाठी हे नवीन शिकण्याचे शिंतोडे.

 

हे सगळं डॉक्टर समजावून देताना,

मंगला खाडिलकर यांनी एका शब्दात सांगितलं, ‘स्वानंद ‘.

 

पुढे मंगलाताईंचं एक वाक्य मला तरी खूप भावलं,

” प्रत्येक नात्याला एक शेल्फ लाईफ असतं.

जशी पदार्थांची चव बदलते तशी नात्यांचीही. “

या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट.

 

तो विरत असतानाच,

डॉक्टरांचं पुढचं वाक्य,

” म्हणूनच त्या नात्यात कृतीचं preservatives टाकायचं! “

परत तेवढाच कडकडाट.

आहे की नाही मस्त जुगलबंदी.

 

अजून एक करायचं वरिष्ठांनी जेष्ठत्वाकडे जातांना, आपल्या नकळत आपल्या बाबतीत चार गोष्टी घडतात,

शिंक, खोकला, उचकी

आणि

सल्ला!

 

हा सल्ला देणं थांबवायचं.

त्या आधी समोरच्या व्यक्तीची भावना ओळखायची आणि मग ठरवायचं सल्ला द्यायचा का नाही ते.

” You Mirror My Emotions “

हे वाक्य सतत लक्षात ठेवायचं.

 

डॉक्टरांचं पुढचं विवेचन फार महत्त्वाचं होतं.

” नॉस्टॅल्जिया हा अविभाज्य भाग आहे या वाढत्या वयात. पण हा Nostalgia Process of Cheering असा असावा.

कसा नसावा,

तर Toxic Nostalgia म्हणजे,

वाक्याची सुरूवातच,आमच्या वेळी…

आणि,

” तुम्हाला काय त्याचं “

अशी नसावी.

 

ज्ञानेश्वर महाराजांचा एक

शब्द, ‘ सहनसिध्दी ‘ हा अखंड लक्षात ठेवायचा म्हणजे जेष्ठत्व मुरतं आणि वृध्दत्व परिपक्व होत जातं.

 

कार्यक्रम संपता संपता एका भारतीय फिलॉसॉफर यांचं वाक्य डॉ. आनंद यांनी सांगितलं, ‘ Only Body has DOB & DOD, otherwise it is all Legacy! ‘

 

या वाक्याला अनुसरून मंगला खाडीलकरांनी शांता शेळके यांच्या कवितेच्या ओळी जुगलबंदीत गुणगुणल्या..

 

त्या आठवण्यासाठी आता मंगलाताईंचा फोन नंबर शोधणं किंवा शांता शेळके यांचा कविता संग्रह, हा नवीन अभ्यास सुरू करायचा आहे.

 

डॉक्टरांचं ऐकलं पाहिजे. मला ही पोचायचं आहे, वरिष्ठ नागरिक ते जेष्ठ नागरिक या पदापर्यंत अभ्यास करत करत!

लेखक: श्री. विश्वास बीडकर

प्रस्तुती: श्री मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “निदान एक तरी झाड…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “निदान एक तरी झाड…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

पहाटेच जाग आली

कोणी टकटक करीत होते,

दार उघडून पाहिले बाहेर

तर कुणीच उभे नव्हते…

*

आवाजाच्या दिशेने बघताच

खिडकीवर दिसला एक पक्षी,

चोचीने टकटक करीत तावदानावर

उमटवीत होता नक्षी…

*

“का रे बाबा? ” विचारले तर म्हणाला,

“भाड्याने मिळेल का एखादे झाड

घरटे बांधण्यासाठी?

एकटा कुठेही कसाही राहिलो असतो

पण जागा हवी

पिल्लांसाठी…

*

तुमच्या भाऊबंदांनी लुटले

आमचे रान केले निर्वासित,

बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी

असतो आता फिरस्तीत…

*

वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत

थोडे दाणे अन पाणी,

पण निवाऱ्याचे काय?

हे लक्षात घेतच नाही कुणी…

*

पोटाला हवेच, खातो ती भीक

अन् नेतो थोडे घरी,

खायला तर हवंच,

जरी डोक्यावर छप्पर नसले तरी…

*

कधीकधी वाटते करावी आत्महत्या

बसून विजेच्या तारेवर,

किंवा द्यावा जीव लोटून

त्या उंच मोबाईल टाॅवरवर…

*

जसे मग आत्महत्येनंतर

सरकार काही देते शेतक-याला,

तसेच मिळेल का एखादं झाड

माझ्या पिल्लांना तरी आस-याला? “

*

ऐकून मी चक्रावलो, खरंच

एवढा विचार मी नव्हता केला,

जंगलतोडीत त्यांच्या घरांचा

विचार कुठेच नाही झाला…

*

मी हात जोडून म्हटले,

“त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो,

पण आत्महत्या करू नको

खरंच मनापासून सांगतो…

*

तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर

बांध वनरुम किचन खोपा,

अडचण होईल पण आत्ता तरी

एवढाच उपाय आहे सोपा… “

*

तो म्हणाला, “खूप उपकार होतील,

पण भाडे कसे देणार? “,

“रोज त्रिकाळ मंजुळ गाणी ऐकव,

बाकी काही नाही मागणार… “

*

तो म्हणाला, “मला तुम्ही भेटलात

पण बाकी नातलगांचं काय? ,

त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी,

कुठे ठेवतील पाय…? “

*

“अरे लावताहेत आता झाडे

अन जगवतात आता कुणी कुणी,

बदलतेय चित्र हळू हळू, त्यांना सांग

आत्महत्या करू नका कुणी… “

*

ऐकून तो पक्षी उडाला

काड्या जमवायला घरट्यासाठी,

अन मी पण मोबाइल उचलला

तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी…

*

त्याची खिडकीवरची टकटक

माझ्या मनाचे उघडले कवाड,

वाचून तुम्ही पण लावाल ना

कुंडीत वा अंगणात एकतरी झाड…

निदान एक तरी झाड!

* * * *

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शांत मन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

सौ. मीनल केळकर

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ शांत मन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

एकदा एका शेतकऱ्याला जाणवले

की त्याचे हातातील घड्याळ धान्याच्या

कोठारात हरवले आहे.

जरी ते एक सामान्य घड्याळ होते, तरी त्याचे लेखी त्याला अफाट भावनिक मूल्य होते.

बराच वेळ गवतात सर्वत्र

शोधल्यावरही त्याला ते सापडेना.

 

 मग त्यांनी कोठाराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलांच्या गटाला घड्याळ शोधण्यासाठी बोलावले. त्याने त्या मुलांना वचन दिले की जो कोण त्याचे घड्याळ शोधून देईल, त्याला बक्षीस मिळेल.

बक्षीस मिळेल, हे ऐकून सगळी मुले

कोठारात लगबगीने गेली, गवताच्या चारी बाजूने शोधायला लागली. पण त्यांना घड्याळ कुठेही सापडेना.

नेमके जेव्हा त्या शेतकऱ्याने घड्याळाचा शोध घेण्याचे थांबवायचे ठरवले, तेव्हा एक मुलगा त्याच्या जवळ जाऊन

शेतकऱ्याकडे घड्याळ शोधण्याची एक संधी मागू लागला.

शेतकरी त्याच्याकडे बघून विचार करू लागला की ‘बिघडले कुठे…!

हा मुलगा प्रामाणिक दिसतोय.

देऊ या त्याला एक संधी……. ‘

शेतकऱ्याने त्या छोट्या मुलाला घड्याळाचा

शोध घेण्यासाठी कोठारात पाठवले.

 

थोड्याच वेळात तो मुलगा हातात घड्याळ

घेऊन नाचत नाचतच बाहेर आला.

शेतकऱ्याला आनंद झाला

आणि आश्चर्यही वाटले………!

त्याने त्या मुलाला विचारले

की जिथे बाकीच्यांना अपयश आले,

तिथे त्याला हे यश कसे काय प्राप्त झाले?

 

मुलगा म्हणाला, “मी काहीच नाही केलं,

फक्त जमिनीवर शांत बसून राहिलो आणि ऐकू लागलो.

त्या शांततेत मला घड्याळाची टिक-टिक ऐकू आली आणि मी त्या दिशेने शोधू लागलो. ”

 

एक शांत मन त्रासलेल्या मनापेक्षा चांगलं विचार करू शकते.

तुमच्या मनाला रोज काही क्षणांसाठी तरी शांतता द्या आणि मग पहा,

तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमचे मन तीक्ष्णपणाने काम करून तुमचं जीवन कसं सजवेल!

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: सौ. मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नियंत्रण सोडा… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

श्री मंगेश जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ नियंत्रण सोडा… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

एका संध्याकाळी, नवरा दरवाजातूनच सहज म्हणाला, “ऐक ना, मी थोडा वेळ मित्रांसोबत बाहेर जातोय. ”

कपडे घड्या घालत बसलेली त्याची पत्नी फक्त वर पाहत म्हणाली, “ठीक आहे. मजा करा. ”

तो थोडा चकित झाला. नेहमी ती त्याला “लवकर परत ये, सावधपणे गाडी चालव, उशीर करू नको”—असे काहीतरी सांगायची. पण त्या दिवशी काहीच नाही — ना सुस्कारा, ना प्रश्न, फक्त शांत “ठीक आहे. ”

काही तासांनी त्यांचा किशोरवयीन मुलगा किचनमध्ये आला. हातात एक कागद आणि चेहरा फिक्का.

आई, ” तो हळू आवाजात म्हणाला, “माझे मॉक परीक्षेचे निकाल आले… आणि ते खूप वाईट आहेत. ”

तो थिजून उभा राहिला, कारण त्याला नेहमीप्रमाणे ओरडा होईल, अशी खात्री होती. आईला त्याच्या अभ्यासाची खूप काळजी, म्हणून आज पुन्हा ‘वेळ वाया घालवला’, ‘क्षमता वाया घालवत आहेस’ अशी भाषणे ऐकायला मिळतील — अशी त्याची तयारी होती.

पण त्याऐवजी ती शांतपणे म्हणाली, “ठीक आहे. ”

तो विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हणाला, “फक्त… ठीक आहे? ”

“हो, ” ती प्रेमाने म्हणाली. “जास्त अभ्यास केलास, तर पुढच्या वेळी चांगले होईल. नाही केला तर सेमिस्टर रिपीट करावा लागेल. तुझा निर्णय. मी दोन्ही परिस्थितीत तुझ्या पाठीशी आहे.”

तो हैराण झाला. आई एवढी शांत कधी झाली?

दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांची मुलगी घाबरतच घरात आली. हॉलमध्ये थोडं थबकून ती म्हणाली, “आई… मी… मी कारला धडक दिली. फार मोठं नाही, पण डेंट पडलाय.”

आई ना ओरडली, ना रागावली, काहीच नाही. ती फक्त म्हणाली, “ठीक आहे. उद्या गाडी वर्कशॉपमध्ये देऊन टाक. ”

मुलगी थिजलीच. “तुला… राग नाही? ”

आईने मंद स्मित केले. “नाही. रागावल्यानं कार परत नीट होणार नाही. पुढच्या वेळी जपून चालव. ”

आता घरातील सगळेच चिंतित झाले. ही स्त्री — त्यांची पत्नी, त्यांची आई — पूर्वीसारखी राहिली नव्हती. ती कधी तापट, पटकन तणावात येणारी, पटकन बोलून जाणारी होती. आता मात्र शांत, स्थिर, अगदी प्रसन्न दिसत होती.

ते एकमेकांत कुजबुजायला लागले — काही बिनसले आहे का? तब्येत बरी नाही का? काही घडले आहे का?

शेवटी त्या संध्याकाळी, सगळ्यांनी तिला किचनच्या टेबलाजवळ बसवले.

“ऐक, ” नवरा म्हणाला, “तू अलीकडे खूप बदलली आहेस. काहीही होतंय, तरी तुझा राग येत नाही, तू प्रतिक्रिया देत नाहीस. सगळं ठीक आहे ना? ”

ती त्यांच्या चेहऱ्यांकडे पाहत हसली.

“काहीच बिनसलं नाही, ” ती म्हणाली, “सगळं अगदी योग्य चाललंय. मला फक्त एक गोष्ट समजली आहे. ”

ते सगळे शांत झाले.

“खूप वर्षांनी लक्षात आलं, ” ती म्हणाली, “की प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यासाठी स्वतःच जबाबदार असतो.

नवऱ्याने भुवया उंचावल्या. “काय म्हणायचंय तुला? ”

ती हात जोडून म्हणाली, “मी आधी प्रत्येक गोष्टीची चिंता करायची. तू उशीर केलास तर काळजी, मुलांचे मार्क कमी आले तर अपराधीपणा, काही तुटलं तर राग, कुणी नाराज झालं तर ते ठीक करण्याची धडपड. मी सगळ्यांच्या समस्या माझ्या मानायचे. पण एक दिवस लक्षात आलं — माझ्या काळजीने त्यांची समस्या सुटत नाहीत. फक्त माझी शांतता नष्ट होते. ”

मुलगी शांतपणे ऐकत होती.

ती पुढे म्हणाली, “माझ्या तणावाने तुम्हाला काही फायदा होत नाही. माझी धडपड तुमचं आयुष्य सोपं करत नाही — फक्त माझं कठीण करते. मी तुम्हाला सल्ला देऊ शकते, प्रेम देऊ शकते, साथ देऊ शकते. पण तुमचं आयुष्य मी तुमच्यासाठी जगू शकत नाही. तुम्ही घेतलेल्या निर्णयांचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात — चांगले असोत वा वाईट. ”

ती क्षणभर थांबली आणि पुन्हा हसली. “म्हणून मी ठरवलं — जे माझ्या नियंत्रणात नाही ते नियंत्रित करण्याचा प्रयत्नच मी करणार नाही. ”

मुलगा पुढे झुकत विचारला, “म्हणजे… तुला आमच्याबद्दल काहीच वाटत नाही? ”

ती डोके हलवत म्हणाली, “अगदी वाटतं. पण चिंता करणे आणि नियंत्रण ठेवणे यात फरक असतो. मी तुमच्यावर माया करू शकते, पण त्यासाठी माझी शांतता हरवू नये.”

घरात शांतता पसरली.

ती तिघांकडे प्रेमाने पाहत म्हणाली, “माझं काम — तुम्हांला प्रेम देणं, मार्गदर्शन करणं, आणि गरज पडली की तुमच्या पाठीशी उभं राहणं. पण तुमचं काम — स्वतःचं आयुष्य स्वतः हाताळणं. निर्णय घेणं. त्यांचे परिणाम भोगणं. तसंच, प्रत्येकजण मोठा होतो. ”

ती शांतपणे मागे रेलून म्हणाली, “म्हणून आता काही चुकीचं झालं, तरी मी स्वतःला आठवण देते — हे मी दुरुस्त करण्यासारखं नाही. मी शांत राहीन. तुम्ही यातून शिकाल यावर विश्वास ठेवेन. कारण जीवन असंच असतं — धडे शिकवतं. ”

थोडा वेळ घरात संपूर्ण शांतता होती. वातावरण मात्र बदललं होतं.

नवऱ्याने तिचा हात हातात घेत म्हटलं, “तू आज आम्हा सगळ्यांना काहीतरी शिकवलंस. ”

ती हसली. “आसेल कदाचित. पण हे मला स्वतःलाच आधी शिकावं लागलं. ”

त्या रात्री सगळ्यांनी तिच्या शब्दांवर विचार केला.

मुलगा पुन्हा अभ्यासाला बसला — आई ओरडली म्हणून नाही, पण जबाबदारी त्याची आहे, हे त्याला जाणवलं म्हणून. मुलीने स्वतःच कारची दुरुस्ती ठरवली आणि इन्शुरन्सची प्रक्रिया समजून घेतली. नवरा पुढच्या वेळी बाहेर जाताना स्वतःहून फोन करून सांगू लागला — कारण ती सक्ती करत होती म्हणून नाही, तर त्याला तसं करावंसं वाटलं म्हणून.

आणि हळूहळू घर हलकं वाटू लागलं.

कोणीही भीतीने नाही तर समजुतीने वागू लागले. कोणीही कशावर ओरडा होईल, या कल्पनेने दडपून राहत नव्हते.

कारण घरातला एका जरी माणसाने शांतता स्वीकारतो, तरी ती शांतता सगळ्यांत पसरत जाते.

एक जण नियंत्रण सोडतो, आणि बाकी लोक स्वतःला नियंत्रित करायला शिकतात.

आणि अशा प्रकारे — शांतता संसर्गासारखी पसरते.

 ☆ ☆ ☆ ☆

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘सत्संग म्हणजे काय?’ –- लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

सौ. शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘सत्संग म्हणजे काय?’ – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

एकदा नारद मुनींनी भगवान विष्णूंना सहज विचारले-

“देवा सत्संग सत्संग म्हणतात

त्याचा एवढा काय हो महिमा”?

यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर न देता एका कीटकाचा निर्देश करून सांगितले की, “तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. “

नारद मुनी त्या कीटकाला शोधत

नरकापर्यंत गेले आणि त्यांनी त्या कीटकाला विचारले-

“सत्संगाचे काय फळ आहे, तुला माहीत आहे का? “

कीटकाने त्यांचेकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला.

प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ते पुन्हा भगवान श्रीविष्णूंकडे आले आणि म्हणाले,

“देवा तो कीटक तर काही बोलल्याविनाच मृत झाला. आता तुम्हीच उत्तर सांगा. “

देवांनी नारदांचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले,

“तेथे पहा. त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले पोपटाचे पिलू आहे. ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. “

नारदमुनी त्या पोपटाचे पिलाजवळ गेले आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला.

पोपटाचे पिलाने एकदा डोळे उघडून त्यांचेकडे पाहिले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचेच.

नारद मुनी मनाशीच विचार करू लागले, काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे? कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला ते मृत्यू पावले.

अत्यंत दुःखी होऊन ते पुन्हा भगवान श्रीविष्णूंपाशी आले. म्हणाले,

“देवा आपल्याला सांगायचे नसेल तर नका सांगू. पण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय ते मृत होत आहेत.

अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचे धनी मला करणार आहात? “

तेव्हा देव त्यांना म्हणाले,

“त्याची चिंता तू करू नकोस. तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल, तर ते पहा. नुकत्याच तिथे एका गाईने बछड्याला जन्म दिलाय. तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. “

दुःखी अंतःकरणाने नारदांनी तेथे जाऊन त्या बछड्याच्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न केला.

त्यानेही दृष्टी वळवून त्यांचेकडे पाहिले आणि ते तेथेच लुढकले.

नारद मुनी घाबरून देवांकडे परत आले. तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून भगवान श्रीविष्णु म्हणाले,

“एका राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आहे. त्याचेकडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल. “

नारदांनी विचार केला, आता पर्यंत कीटक, पोपट व गाईच्या बछड्याचे मृत्यूने माझ्यावर काही आपत्ती आली नाही, पण राजकुमाराचे जर काही बरेवाईट झाले तर माझे प्राणही संकटात येऊ शकतात.

तथापि देवाचे विश्वासावर ते राजकुमाराकडे गेले आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले आणि पापा घेण्याचे निमित्त करून हळूच त्याचे कानात विचारले-

“सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो? “

प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला,

“मुनिश्रेष्ठ, आपण अजून नाही समजलात का?

अहो, आपण पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मी कीटक होतो. आपण मला हा प्रश्न विचारला आणि मी मेलो आणि पोपट झालो.

नंतर आपल्या दर्शनाने मी घरट्यात मेलो आणि मला गाईच्या बछड्याचा देह प्राप्त झाला.

पुन्हा आपले दर्शन घडले आणि बछड्याचा देह पडून सर्व देहांमध्ये श्रेष्ठ असा हा मनुष्यदेह प्राप्त झाला आणि पुन्हा आपल्या दर्शनाने मला पूर्णत्व प्राप्त झाले.

हे सर्व आपल्यासारख्या संतांचे दर्शनाचेच फळ आहे. ज्यांना आपल्यासारख्या संतांचा सहवास मिळतो ते धन्य आहेत. “

नारदांना त्यांचे प्रश्नाचे उत्तर मिळाले

व सत्संगाचा महिमाही कळला.

“नारायण, नारायण, ” प्रेमाने म्हणत ते देवांकडे आले आणि म्हणाले,

“देवा, जशी आपली लीला अगाध आहे, तशीच आपली समजावून देण्याची पद्धतही दिव्य आहे. “

म्हणून मित्रांनो,

जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची आहे.

बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर,

बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात.

याउलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर,

लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो.

ज्याप्रमाणे श्रीरामांच्या सहवासात हनुमान धन्य झाले,

श्रीकृष्णांच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला,

याउलट दुर्योधनाच्या सहवासाने कर्ण श्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला.

आपण ज्यासोबत राहतो त्याच्या विचारांचा, रहाणीचा, वागणीचा, अंमल हा आपल्यावर होत असतो.

संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात

संगत कशी हवी याचा विचार करावा…

!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रगतिपथावरचं तारतम्य… लेखिका: श्रीमती नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रगतिपथावरचं तारतम्य… लेखिका: श्रीमती नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

पंधरा दिवस मुंबईतल्या मुंबईत मुलाकडे राहायला गेलो होतो.

एका दिवसातच ऑनलाईन दिली जाणारी order आणि कमीतकमी चारतरी घरपोच येणारी पार्सल हा माझ्या चिंतेचा आणि रागाचा विषय झाला.

नवरा नेहमीप्रमाणे स्थित प्रज्ञ….

“पंधरा दिवसात काय तू मागे पडून यांची ‘सिस्टिम’ बदलायच्या भानगडीत पडतेस?”

सुनावलंच मला.

पण भाज्या, फळं, आणि त्या त्या दिवशी लागणारं सामान मी स्वतः बाजारात जाऊन आणणार. ही गोष्ट मुलाच्या आणि सुनेच्या गळी उतरवण्यात मात्र मी यशस्वी झाले.

दोघंही पटवून देतच होते,

“आई हे घरपोच येणं खूप सोयीचं आहे.

स्वस्त ही पडतं.

त्यावर कित्ती तरी “ऑफर्स “असतात.

सुट्ट्या पैशांची कटकट नाही.

माल परत ही घेतला जातो.

वगैरे वगैरे…….”

त्यांच्या व्यस्त जीवन शैलीमुळे त्यांना हे फायदे वाटतात.

 ज्येष्ठ नागरिकांकडे वेळच वेळ आहे म्हणून तुम्हाला हे पटत नाही हा आजच्या पिढीचा ठळक मुद्दा.

“अगदी बरोबर “असं म्हणून वाद टाळलाच मी.

पंधरा दिवस नातवंडांबरोबर घालवून पुढे दोन तीन महिने पुरेल इतकी आनंदाची शिदोरी भरून घेण्यासाठी तर येतो आपण.

त्यात  वादाच्या मिठाचा खडा   कशाला?

 

पण मनच ते..उघड बोलले नाही तरी अनेक गोष्टी  डाचत होत्याच.

 

घरपोच येतं, पण तुमच्या सोयीच्या वेळेनुसार येतं का?

कधी भाजी फोडणीला टाकत असतो, कधी wash room मध्ये असतो, कधी वाचत असतो, आणि सामान येतं. दार उघडा,

OTP दिल्याशिवाय मिळत नाही

मग फोन शोधा.

लिस्ट प्रमाणे चेक करा.

यात वेळ तर जातोच ना.

तोसुद्धा तुमच्या मनाविरुद्ध आणि गैरसोयीचा.

मग आपल्या सोयीने, वेळ काढून का नाही बाजारातून आणायचं.?

 

स्वस्त असतं का हे मी काही पडताळून बघितलं नाहीये.

पण अवाढव्य  कोबी, “(अर्धा बाईंना द्यावा लागतो.. हरकत नाही पण गरजही नसते. )

मलूल  पालेभाजी, ताजी नसलेली फळं हे चालवून घ्यावं लागतं.

ऑफर्स म्हणाल तर त्यासाठी ठराविक किमतीचं सामान घ्यावंच लागतं. मग 2000 rs ला 200 rs कमी पडतायत, काही तरी मागव म्हणजे ती ऑफर मिळेल म्हणून 200 rs गरज नसताना खर्च करायचे.

आज ‘सेवा उद्योग’ इतका मोठा झालाय, तत्पर झालाय की आजची पिढी नकळत त्याच्या आहारी गेलीय.

 आपल्या घरी काम करणाऱ्या मावशीने सणवाराला, किंवा आपल्या अडचणीला आपल्याला मदत (सेवा) केली तर आपण त्यांना काहीतरी प्रेमाने बक्षीस देतो.

इथे उलटी गंगा आहे. ज्यांची सेवा ‘घेतो’ तेच आपल्याला काही तरी देतात.

कुरिअर घेऊन येणारा असो, किराणा घेऊन येणारा असो, दुधाचं, वर्तमानपत्रांचं bill घ्यायला येणारा असो, इस्त्रीवाला असो, फुलपूडी टाकणारा असो, या सगळ्यांशी एक जवळीक असते. एक आपुलकीचं नातं तयार होतं.एकमेकांची विचारपूस केली जाते.या विचारांच्या आपल्या पिढीला हा सगळा ऑनलाईन  रोखठोक मामला नाही पसंतीस येत.

 

कपडे, खेळणी, अगदी कुकर, induction, क्रोकरी, चादरी, पडदे,सगळं फोटो पाहून मागवायचं आणि पसंत पडलं नाही, साईझ चुकली तर परत करायचं.हा यांचा उलटा कारभार माझ्या तरी आकलनाच्या पलीकडे आहे.

आणि पर्यावरणाचा विचार केला तर संताप आणणारा आहे.

एकदा एक छोटा box आला. तो एका कागदाच्या पिशवीत( सर्विस provider चं नाव मिरवणाऱ्या) आपला पत्ता असलेली चिट्ठी चिकटवलेला होता.

सीलची tape चिकटवलेली होतीच.

इतकी कागदाची वेष्टनं दूर करून boxच्या आतल्या प्लास्टिक पिशवीत काय वस्तू सापडावी?थर्मोमीटर ..

माझ्या रागाचा पारा प्रचंड चढलाच.

डोक्याला इतका ताप झाला

की मुलगा सून घरी आल्यावर माझा संताप मी व्यक्त केलाच..

अशा सहज खरेदी करता येणाऱ्या वस्तू मागवून कागदाची किती नासाडी होते याचं भान नसतं यांना.

स्वयंपाकाच्या मावशी आल्या, आणि लागणारी एखादी वस्तू नसेल तर

Blink itवरून पापणी लवायच्या आत ती दारात हजर होते.

सोय म्हणून ठीकच आहे पण kichen मॅनेजमेंटचा बट्याबोळ  झालाय.

त्याची सवय लागली, काही अडतच नाही ना.

पण शिस्त हरवत चालली याची खंत वाटतेच.

सात वर्षांची नात रात्री काही तरी मागत होती माझ्याकडे. मी म्हटलं, दुकान बंद झालं आता. तर तिनेच सांगितलं ऑनलाईन मागवून ठेव ना आत्ता. उद्या मिळेल मला.

आत्ताच्या आत्ता’ हा रोग, ‘संयम  नसल्याचं लक्षण’ किती घातक आहे.

नकळत पोहोचतंय, झिरपतंय  ते लहान मुलात.

माझ्याकडे आत्ता पैसे नाहीयेत, हेही तिला पटलं नाही.

 

GPay कर म्हणून सल्ला दिला तिने.

तिच्या हजारजबाबीपणाचं कौतुक करू,तिच्या  हुशारीची दाद देऊ की, तिला किती माहिती आहे याचं नवल वाटून घेऊ

या बुचकळ्यात पडले मी.

का इतकी माहिती असली पाहिजे या वयात?

आत्ता ही वस्तू देणार नाही, मिळणार नाही हे साधं सोपं गृहीतक पटवायचे दिवस संपले का?

तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. त्याचे अनेक फायदे आहेत. अनेक सोयी उपलब्ध झाल्यात.

या कुठल्याही प्रगतीला माझा विरोध नाही

मी ही bill भरणे, किराणा, औषधं मागवणे, तिकिटं काढणे ही ऑनलाईन  पण सावध, सुरक्षित अशी transactions करते.

माझं म्हणणं एवढंच… की प्रगतीपथावर चालताना ‘तारतम्य’ बाळगा.

कुठल्याही मार्गात खाच खळगे असतात, खड्डे असतात, उतार चढाव असतात.

त्यामार्गांवरचं ‘कुठपर्यंत पोहोचायचं’ हे ‘आपलं स्थान’ आपण पक्कं करून  मार्गक्रमणा  करावी.

प्रगतीच्या दिशेने जाणारा मार्ग ‘एकदिशा’ मार्ग नसतो.

भरकटलात तर ‘Uturn’ घ्यावा लागू शकतो.

त्यामुळे ‘तारतम्य’ बाळगून प्रगतिपथावर नक्की घोडदौड करावी, या बाबत माझं दुमत नाहीच मुळी.

 

विचारात  गढून गेले.मी….इतक्यात बेल वाजली.

काही तरी ‘पार्सल’ आलं बहुधा.’

लेखिका: श्रीमती नीलिमा जोशी.

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कृष्णाची गूढ शिकवण – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कृष्णाची गूढ शिकवण – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

कृष्ण अंधारात जन्मला. ह्याचा प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर सावधचित्त राहायला हवं.

कृष्ण खोडकर आहे. केव्हा आधार काढून पळून जाईल, भरवसा नाही…!

अभिमन्यू चक्रव्यूहात फसला. कशामुळे, तर श्रीकृष्णामुळेच…

चक्रव्यूह कसा भेदायचा, हे कृष्णाने सांगितलं होतं. पण त्यातून बाहेर कसं पडायचं, हे कृष्णाने सांगितलं नाही.

कृष्ण आहेच असा अजब. आपल्याला फसवतो. गंमत बघतो. फुकटात काही देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो. रस्ता थोडासा उघडतो. पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत काही नाही.

चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नाही. काढू शकतो, पण काढत नाही. फार चलाख आहे. ‘चालू’ आहे असंच म्हणा हवं तर… चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसलात. फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पहात बसाल, तर फक्त सौम्य हसतो.

फार अर्थ आहे ह्या हसण्यामागे…

तो फक्त एक नाजूक स्मितहास्य करून सांगतो, जे करायचे, ते स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या. आत्मसात करा…

अर्जुनाला असंच अडकवलं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाहीत. युद्धाचा निकाल तिथेच लागला होता.

श्रीकृष्ण “न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार” अशी शप्पथ घेऊन रथावर चढला. काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुनही घाबरला. साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता, पण नि:शस्त्र! वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन…

विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था

कर्तव्याने घडतो माणुस जाणुन पुरुषार्था

भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था

कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो. कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला, नाही आचरणात आणला, तर कृष्णाचा काही भरवसा नाही. मैदान सोडून पळून जाईल. अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील, तर मी रथ सोडलाच म्हणून समज…

अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला. अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. कृष्णाला हे पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसऱ्याने लढून द्यावी, असे वाटते. अशावेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो…

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: ।

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥

जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे. का नसणार…? तो सोबतीला उभा राहतो. थोडी फार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे. जो लढेल, तो निश्चितच जिंकेल…

असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा, तिथेही आहे. दारूचा गुत्ता, जुगारचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो, कोण येतो, हे तो बघत बसतो…

रंगहीन मी, या विश्वाच्या रंगाने रंगलो… कौरवांत मी, पांडवांत मी. अणुरेणुत भरलो…

तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवांतही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनीतीच्याही. त्याला नीती – अनीतीच्या तराजूत तोलता येत नाही. कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो. आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरवसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो, की आपण कोणत्या रंगात रंगतो.

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन…

म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे. फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल.

कृष्ण सरळ नाही, पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे.

श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या, तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत.

श्रीकृष्णाने आपली आई-वडील सोडले, त्यानंतर नंद-यशोदेला. मित्र निघून गेले. राधा निघून गेली. गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली.

आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला. आपली आजची पिढी, जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते, त्याने कृष्णाला गुरु बनवावे. ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदासिन्यात (depression) जात नाही.

कृष्ण आनंदाचा देव आहे. एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे रहावे, हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही…!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :  श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मदत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “मदत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

एखाद्याला मदत करण्याची कृती आपण स्वतः करतो… की ती आपल्याकडून करवून घेतली जाते?

दोन्ही प्रश्नाचे उत्तर’ हो’ असेच असेल, नाही का? तर मदतीच्या कृतीबाबतचा एक किस्सा असा.

अध्यात्मिकचा कोर्स करत असताना एकदा आम्हाला सांगितले की आता पुढची 15 मिनिटं या हॉलच्या बाहेर जा आणि कुणाला तरी मदत करून या. वेळ सुरू झाला आणि आम्ही बाहेर पडलो.

आमची मदत घेण्यासाठी कोणी दिसते का, शोधू लागलो. रस्ता रहदारीचा होता. एक आजी हातात जड पिशवी घेऊन चालत होत्या. आमच्यापैकी एक जण धावतच तिथे गेला आणि अगदी विनयाने म्हणाला, “आजी कुठे जायचे तुम्हाला? थोडे अंतर मी पिशवी घेतो, ” त्याच्या या बोलण्यावर आजी संशयाने बाजूला झाल्या आणि चढ्या आवाजात म्हणाल्या, “बाजूला हो…. आला मोठा मदत करणारा! “… एक प्रयत्न तर फसला..

वेळ आता दहाच मिनिटं उरला होता. पुन्हा शोधाशोध सुरू. रस्त्याच्या कडेला मळकटलेल्या कपड्यातली एक गरीब मुलगी दिसली. आम्ही तिकडे धावलो. शेजारीच वडापावचा गाडा होता. तिला म्हणालो, “चल. तुला वडापाव खायला देतो. ” त्यावर ती आमच्याकडे संशयाने पाहू लागली. “नको नको, ” म्हणत दूर पळून गेली.

आता पाच मिनिटे राहिली. शेवटी वडे तळणाऱ्या बाईंना आमच्या टास्कबद्दल सांगितले आणि “तुम्हाला काही मदत करू का? ” असे विचारले. त्यावर तिनेही नकार दिला. “माझे वडे बिघडवून ठेवाल, ” असे म्हणाली. वेळ संपला आणि कुणालाही मदत न करता आम्ही परत आलो.

आल्यावर सरांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर ते म्हणाले, ” आता तुमच्या लक्षात आले असेल. मदत करण्यासाठी तुमची निवड व्हावी लागते. कुणीही मदत करू शकत नाही. मदत तीच व्यक्ती करते, ज्याची परमेश्वराने निवड केलेली असते. त्यामुळे इथून पुढे आयुष्यात जर कुणाला तुमच्या माध्यमातून मदत झाली तर “मी केली” असे म्हणू नका. ती परमेश्वराने केलेली असते. पण कृतीचे माध्यम म्हणून तुम्हाला निवडले आहे, हे विसरू नका. आणि त्याच्या इच्छेशिवाय हे शक्य नाही, हे ध्यानात ठेवा.

ही शिकवण त्यानंतरच्या प्रत्येक मदतीच्या कृतीवेळी मला आठवत राहिली. आणि आपण फक्त माध्यम आहोत, हे सतत जाणवत राहिले. यामुळे ‘अहंकाराचा वारा’ काही प्रमाणात का असेना थोडा दूर राहिला, हे मात्र नक्की.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रंग पाण्याचे… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर ☆

सौ. रेखा जांबवडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रंग पाण्याचे… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर 

‘पाणी’ शब्द हा असे प्रवाही

वळवू तिकडे वळतो हा..

जशी भावना मनात असते

रूप बदलते कसे पहा..!

*

नयनामध्ये येता ‘पाणी’

अश्रू तयाला म्हणती,

कधी सुखाचे, कधी दुःखाचे,

अशी तयांची महती..!

*

चटकदार तो पदार्थ दिसता,

तोंडाला या ‘पाणी’ सुटते,

खाता खाता ठसका लागून

डोळ्यांतून मग ‘पाणी’ येते..!

*

धनाढ्याघरी लक्ष्मी देवी,

म्हणती अविरत भरते ‘पाणी’..

ताकदीहूनी वित्त खर्चिता

डोक्यावरूनी जाते ‘पाणी’..!

*

‘वळणाचे ‘पाणी’ वळणावरती’

म्हण मराठी एक असे,

‘बारा गांवचे ‘पाणी’ प्यालाय’

चतुराई यातुनी दिसे..!

*

लाथ मारूनी ‘पाणी’ काढणे,

लक्षण हे तर कर्तृत्वाचे,

मेहनतीवर ‘पाणी’ पडणे

चीज न होणे कष्टाचे..!

*

उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो,

‘पाण्या’त पाहणे गुण खोटा..

‘पाणी’दार ते नेत्र सांगती,

विद्वत्तेचा गुण मोठा..!

*

शिवरायांनी कितीक वेळा,

शत्रूला त्या ‘पाणी’ पाजले..

नामोहरम करून, अपुले

मराठमोळे ‘पाणी’दाविले..!

*

टपोर मोती दवबिंदूचे

चमचम ‘पाणी’ पानावरती,

क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे,

अळवावरचे अलगद ‘पाणी’..!

*

कळी कोवळी कुणी कुस्करी,

काळजाचे त्या ‘पाणी’ होते..

ओंजळीतूनी ‘पाणी’ सुटता,

कन्यादानाचे पुण्य लाभते..!

*

मायबाप हे आम्हां घडविती,

रक्ताचे ते ‘पाणी’ करूनी..

विनम्र होऊन त्यांच्या ठायी

नकळत दोन्ही जुळती ‘पाणि’

*

आभाळातून पडता ‘पाणी’

तुडुंब, दुथडी नद्या वाहती,

दुष्काळाचे सावट पडतां

सारे ‘पाणी पाणी’ करती..!

*

अंतीम समयी मुखात ‘पाणी’

वेळ जाणवे निघण्याची..

पितरांना मग ‘पाणी’ देऊनी,

स्मृती जागते आप्तांची..!

*

मनामनांतील भावनांचे,

‘पाण्या’मध्ये मिसळा रंग..

प्रतिबिंबीत हे होते जेव्हा,

चेहऱ्यावरती उठे तरंग..!

कवी : अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares