तू आमचे काम सोडून गेलीस त्याला आता महिना होऊन गेला. तुझी वाट बघून, फोन करून मी थकले पण तू काही परत आली नाहीस की फोन उचलला नाहीस.
आजारी आहे म्हणून सुट्टी घेतलीस ती काम सोडण्यासाठीच. तुझे ते न सांगता काम सोडणे माझ्या मनाला खूप लागले. वाटले काय कमी होते तुला आमच्या घरी?
तू तुझ्या सवडीनुसार कामाला यायचीस, भराभर कामे उरकायचीस, हक्काने रोज चहा आणि जेवण पण मागायचीस, दर रविवारी सुट्टी, दिवाळी बोनस, गरजेला आगाऊ रक्कम देत होतोच. जुने कपडे/ भांडी/ पुस्तके/ वस्तू / रद्दी हे सगळे तुझ्याच स्वाधीन करायचो आम्ही. असे काय कमी पडले म्हणून तू गायब झालीस?
तशी तू हुशार होतीस, हिंदी बरोबर तुला थोडे इंग्रजी पण यायचे म्हणून मला कौतुक वाटायचे. गप्पा मारायला तुला खूप आवडायचे. सगळ्या बातम्या मला तुझ्यामुळेच कळत, एवढेच नाही तर बाजारात काय नव्या गोष्टी आल्या आहेत हे पण तूच सांगायचीस, जसे की साड्या, ड्रेस, बांगड्या, दागिने, भांडी, मशिन वगैरे वगैरे…
तू अगदी हौशी होतीस, स्मार्टफोन पण माझ्या आधी तुझ्याकडे आला होता. तुला त्याचा उपयोग करता येत नव्हता ही गोष्ट निराळी! पण आपल्याकडे सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असाव्यात असा तुझा एक अट्टाहास असायचा.
त्यात काही गैर नव्हते पण या वस्तू तुला माझ्याकडून (किंवा इतरांकडून) मिळाव्यात असे वाटायचे. मग घरात काही नवी वस्तू आणली की लगेच जुनी वस्तू मला द्या म्हणून मागे लागायचीस. नवा लॅपटॉप, टीव्ही आला की जुना तुला पाहिजे म्हणायचीस. नवा मिक्सर आणला, तुला जुना दिला. अशा कित्येक गोष्टी तुला दिल्या.
दर महिना पगार होताच पण तू सतत काहीतरी मागत असायचीस. तुझी नजर सारखी घरातल्या गोष्टींवर भिरभिरत असायची. माझ्या घरी काय काय वस्तू आहेत आणि त्या कोठे ठेवल्या आहेत हे माझ्यापेक्षा तुला जास्त माहिती असायचे.
का कोणास ठाऊक पण मला तुझ्या या सगळ्या गुण दोषांची इतकी सवय झाली होती की मला त्यात काही वावगे वाटायचे नाही. कामवाल्या बायका अशाच असतात अशी माझी एक समजूत!
पण हे सगळे अती होत चालले होते. तुझा अहंकार आजकाल वाढत होता. ‘माझ्याशिवाय’ काही कामे होत नाहीत हे तुला कळून चुकले होते. त्यामुळे तुला ‘नाखुष ‘कोणी करत नव्हते.
अलीकडे तर तू मला कॉफीची ऑर्डर सोडू लागलीस. पाव नको बिस्किट द्या, शिळे नको ताजे द्या. मी समजू शकते हे, पण तू एकदा मला शिरा करून द्या म्हणालीस, आणि लाडू पण बरेच दिवसात दिला नाही खायला असे म्हणालीस, हा धक्काच होता मला.
माझ्या हातचे सांबार तुला खूप आवडायचे. ते केले की मी आधी तुला द्यायचे मग आम्ही खायचो. गोष्टी इतक्या थराला गेल्या.
पण काय करणार, आमचे हात बांधले होते. तुला गमावून चालणार नव्हते म्हणून मुकाट्याने सगळे सहन केले. म्हटले ही सोडून गेली तर रोज भांडी कोण घासणार? झाडू कोण मारणार? फरशी कोण पुसणार? आपल्याला काही झेपणार नाही हे.
आणि कामवाली बाई बदलली तरी हीच तर्हा असणार हे मी अनुभवावरून जाणून होतेच. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय असेच काहीसे झाले होते…
पण कोणत्याही गोष्टीला शेवट असतो. तुझी वाट बघता बघता ७/८ दिवस मी सगळी कामे केली. नाहीतरी मी भांडी स्वछ धुवूनच तुला घासायला ठेवत असे, आता फक्त साबण लावून धुवून टाकायची, आणि लक्षात आले की जमतंय…
सुरुवातीला खूप त्रास झाला, वेळ पण बराच लागला कारण या कष्टाची सवय नव्हती. दुसरी कामवाली बाई पण विचारून गेली पण मी मात्र ठरवले होते आता या कामवाल्या बायकांचे कौतुक बस्स झाले.
माझा पण आता थोडा आत्मविश्वास वाढत होता, आपण ही कामे करू शकतो आणि जास्त चांगली करू शकतो हेही लक्षात आले. नवरा पण मदत करू लागला, मुलाला पण थोडे ट्रेनिंग दिले.
ही कामे करता करता आमच्यातला संवाद वाढला. एवढेच नाही तर आम्ही घरा-दाराशी, भिंतींशी, घरातल्या वस्तू, भांडी-कुंडी, फर्निचर या सार्या गोष्टींशी बोलू लागलो.
साफसफाई करताना अधिक काळजी घेऊ लागलो. घराचा कोपरान् कोपरा लख्ख झाला.
आम्हा बायकांना भांड्यांविषयी जरा जास्त प्रेम असतेच. आता भांडी घासताना ते उतू जाऊ लागले. भांडी जास्त चमकू लागली.
तुला दर पंधरा दिवसांना लिक्विड सोपची मोठी बाटली लागायची. आता तीच बाटली मी दीड महिना वापरते आहे. भांडी घासताना तू खूप पाणी वाया घालवत होतीस, बर्याचदा सांगून पण तू ऐकले नाहीस. एवढे पाणी वापरुन पण भांड्यांवरचा साबण तसाच राहायचा. मला परत परत ते भांडे धुवायला लागायचे.
तुझ्यामुळे आत्तापर्यंत आम्ही किती किलो साबण खाल्ला असेल कोणास ठाऊक?
अजुन बर्याच गोष्टी कळल्या. भांडी मीच घासत असलेने स्वयंपाक घरातील भांड्यांची संख्या कमी झाली. भांड्यांचा एक सेट पुरतो आता. शिवाय भांडी चेपली जात नाहीत, पोचे येत नाहीत अगर हँडल तुटत नाही की काचेची भांडी फुटत नाहीत.
चार मोठ्या खोल्यांचा केर तू ५ मिनिटांत काढायचीस आणि १० मिनिटात फरशी पुसून टाकायचीस.
वाटायचे काय फास्ट बाई आहे, पण आता कळते की तू सोफा, कॉट, खुर्ची, टेबलखाली धुळ ठेवत होतीस. आता मी या सगळ्या वस्तू वेळोवेळी हलवून त्या खालचा केर काढून मग पुसून घेते. आता प्रत्येक वस्तू कशी लखलखते आहे.
तीच गोष्ट बाथ-रूमची. तू प्रचंड प्रमाणात हर्पिक, फिनेल वगैरे केमिकल्स नुसती ओतत होतीस. पण तरीही ते स्वच्छ वाटत नव्हते. कारण तू जोर लावून कामे करत नव्हतीस. ,
आता या सगळ्या सफाईच्या खाचा-खोचा मला माहिती झाल्या आहेत. त्यामुळे कमीत कमी केमिकल्स वापरुन फरशी आणि बाथ-रूम एकदम चकचकीत झाले आहे. अगदी नव्यासारखे. येऊन बघ एकदा!
कोणी तरी म्हटले आहे की माणूस हा सवयीचा गुलाम आहे. कोणतीही सवय अंगवळणी पडायला माणसाला साधारण २१ दिवस लागतात. त्याचा प्रत्यय आला.
ही कामे करायला मला आता जास्त कष्ट किंवा वेळ लागत नाही. अगदी हातासरशी ही कामे होतात.
भांडी घासता घासता मी मोबाइल वर माझी आवडती सिरियल पण बघते. झाडू-पोछा करताना छान गाणी लावते आणि त्या तालावर कामे कधी संपतात ते देखील कळत नाही मला.
अजून एक, हे सारे करताना माझे हात त्या उग्र रसायनांपासून जपतेय. रबरी हातमोजे वापरुन.
आता तुझी वाट बघणे नाही, तू येशील की नाही ही धाकधुक नाही. अचानक पडलेल्या कामांचा ढीग नाही की ते होणार कसे याचे टेन्शन पण नाही.
खरच आता मला जास्त रिलॅक्स वाटताय. स्वावलंबी असण्याचा अर्थ कळतोय. न जाणो अजून काही काळानंतर अमेरिकेसारखी कामवाल्या बायकांची कमतरता भासू शकते आपल्या भारतात सुद्धा… म्हणून आतापासूनच तयार आहे मी.
तू आमचे काम सोडून मला स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून दिलीस. बऱ्याच गोष्टी तुझ्या कडून शिकले. आता मला तू गुरू स्थानी.. म्हणून तुला दंडवत!
एका रविवारी नक्की घरी ये हा बदल पहायला!
तुझी
दीदी
☆
लेखिका : अनामिका.
प्रस्तुती – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “जीभ 👅 👅…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
☆
ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ!
रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ
एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे जीभ
सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ!
तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे जीभ.
प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी जीभ,
भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ!
सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा, पण चुकुन मनात आणलं तर चुकीच्या क्षणी, चुकीचा शब्द, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून, बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचे सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ!
बेधुंदपणे अखंड बडबडण्याचे प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागे ढकलण्याचे काम करणारा, पण हे “काम” करताना, कधीही न दिसणारा अवयव म्हणजे जीभ!
दिसतो तो फक्त “आऽऽ कर” असं म्हटल्यावर, थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ!
काम करताना मात्र कधीही दिसत नाही, असा “कामानिराळा” राहणारा हा बिलंदर अवयव “जीभ”!
दाताशी युती करत त थ द ध, ओठाशी युती करत प फ ब भ, दंतमूलाशी युती करत च छ ज झ, टाळुशी युती करत ट ठ ड ढ, अशा अनेक युत्या, युक्तीने करत ध्वनी निर्मितीत सहाय्य करणारा युतीबाज अवयव म्हणजे जीभ!
पोटात काय चाललंय, याची बित्तंबातमी बाहेर डाॅक्टरांना दाखवणारा, तोंडात बसवलेला पण पोटाचा जणुकाही सीसीटीव्हीच असलेला एक अवलिया अवयव म्हणजे जीभ!
ओठाबाहेरील जगाला वेडावून दाखवून, आपल्या आतल्या मनाचं, तात्पुरते का होईना, समाधान करून देणारा, हा एक हुश्शार अवयव म्हणजे जीभ!
ज्या एका अवयवाला ताब्यात ठेवले तर शंभर वर्षापर्यंत सहज जगता येईल, अशी दिव्य अनुभूती देणारा एक योगी अवयव म्हणजे जीभ!
आजारी पडेपर्यंत खाणाऱ्यानी बरे होईपर्यंत उपवास करावा, असा संयम शिकणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ!
उगाच नाही म्हटलंय__
जेणे जिंकीली रसना ।
तृप्त जयाची वासना ।
जयास नाही कामना ।
तो सत्वगुण ।।
– दासवाणी
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “देवघेव…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
☆
देवघेव – – –
चिटी चावल ले चली,
बीच में मिल गई दाल ।
कहे कबीर दो ना मिले,
इक ले, इक डाल ॥”
– – अतिशय गहन अर्थ आहे..
अर्थात :
“मुंगी” तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, ‘क्या बात है’ देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली. पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली !
तेव्हा कबीर म्हणाले, ‘वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार !
* देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं, यासाठी आहेत. नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.
म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे समतोल तर टिकून राहतोच, माणसाचं समाधान आणि आनंदही त्यामुळे टिकाऊ बनतो !
– – कबीरांच्या या दोह्यात असा मोठा “अर्थ” दडला आहे.
…… चला तर मग आनंदी जीवन जगू या ‼
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ अति सुखाचा ओला दुष्काळ… – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)☆
अति सुखाचा ओला दुष्काळ
– – सुख पर्वताएवढं
सुख ! सुख ! सुख !
सर्व बाजूंनी सुखाचा नुसता पाऊस !
सुखाचा म्हणजे सुखी असल्याच्या आभासाचा !
कारण समाधानाचा तरंग अंतरंगापर्यंत पोचण्याआधीच— सुखाचं नवं रुप— नव्या ढंगात निमंत्रण देतच असतं.
मग ते पूर्ण करण्यासाठी आटापिटा. आपण जे सोसलं ते आपल्या पुढच्या पिढीला ‘अगदी काहीही सोसावं ‘ लागू नये म्हणून बिचारी धावाधाव !
एखाद्या गोष्टीची अधीरतेनं वाट पाहणं, तिच्या अनिश्चिततेबद्दल झोके अनुभवणं… अनपेक्षिततेच्या काठावर जीवाचं काहूर उठणं आणि प्रतीक्षा मिसळलेल्या अश्रूंमध्ये सुखाचं अवचित येणं—यातली गंमत ही केवढी मजेशीर श्रीमंती असं हे सांगणं आवाक्याबाहेरचं आहे.
आता दिवाळीआधीच करंजी, होळीआधीच कुठेही पुरणपोळी— मोहोर येण्याआधीच ताजा आमरस गल्लोगल्ली कुठेही हात जोडून तयार असतो. त्या—:त्या सणाची, रुचीची, गंधाची वाटच पाहावी लागत नाही. सगळं कसं रेडी—मेड !
वस्तूंबाबतचं जे तेच भावनांबाबत. पटकन कुणाशीही संवाद— कधीही, कुठेही दृष्टभेट— आवडतं गाणंही व्याकूळ न करता एका बटनात कानात गुंजतंय. यातून अंत:करणाचे तगमग संघर्ष हरपले न् त्याचा गंधही !
तीच मानसिकता नव्या पालकांची. मुलांच्या भविष्यातील सारा जीवनसंघर्ष आततायी प्रेमानं पालकांनीच संपवून टाकणं यासारखा दुसरा कुठला गुन्हा असेल असं वाटत नाही. भविष्याची काळजी याचा अर्थ जगण्याचा गड चढण्याचे त्याचे मार्ग आपणच चढणं, हा नाही.
त्याला हेलिकाॅप्टरनं किल्ल्यावर सोडलं, तर रानवाटांचा अनवटपणा, खडकांचा रांगडेपणा आणि मधूनच वाहणार्या निर्झरणीची शीतलता त्याला कळणार कशी ?
अतिदारिद्र्याने काही पिढ्या संपल्या, आता अतिअति ऐश्वर्याचं नवंच दारिद्र्य दारात आलंय. ते दारिद्र्य प्रयत्नानं दुर्दम्य ध्यासानं संपवति तरी येत होतं, हे रत्नजडीत दारिद्र्य लाखो आयुष्याचा उष्ण कोवळा घास घेऊन संपणार, असं दिसतंय.
केवळ लग्न झालं न् मूल झालं म्हणून
‘पालक’ झालो, असं समजणार्या कोट्यवधी घरांत पुढे जिद्द हरवलेल्या तरुणाईचं मन ही मोठीच समस्या असणार आहे. अतिसुखाच्या ओल्या दुष्काळाचं सावट वेळीच कळलं तर…..
अनेक घरांत ‘ मागितलं की द्या !’ हा एककलमी कार्यक्रम असतो आणि मग ते नाही मिळालं की क्रौर्य कुठल्या थराला जाईल याचा नेम नसतो.
केवळ ‘ बाईक ‘ एवढ्यात नको ;अठरा वर्षे पूर्ण होऊ दे, ‘ असं सांगणार्या आजीला सतरा वर्षांचा नातू संपवतो, अशी बातमी येते तेव्हा दरदरुन घामच फुटतो. गायत्री मंत्र वहीत लिहीत बसलेली ती मी न पाहिलेली आजी माझ्या डोळ्यांसमोर येते. या आजीनं या नातवासाठी किती वेळा ऊन—ऊन जेवण केलं असेल,
त्याची वाट पाहत ती जेवणासाठी थांबली असेल, आजारपणात रात्र रात्रभर जपमाळ घेऊन नातवाजवळ जागली असेल… त्या आजीला जीवे मारताना या सतरा वर्षांच्या मुलाला हे काहीच आठवलं नसेल?
एवढी हिंस्त्रता एकाएकी येत नाही. आज नव्वद पंच्याण्णव टक्के घरांत या हिंस्त्रतेचा रियाज साग्रसंगीत करुन घेतला जात आहे. *ना घरात प्रार्थना ! ना घरात एखाद्या सामाजिक सेवेची साधना ! ना घरात ग्रंथवाचन ! ना पुस्तकाचं समृध्द कपाट ! ना व्याख्यानांना जाणं ! ना उत्तम संगीत ! फक्त संगणक, मोबाईल, व्हाँटसअप ते एसएमएस आणि रस्त्याच्या कडेला उभं राहून खाणं आणि ही सुध्दा नशा कमी म्हणून की काय,
☆ गाडीचे गिअर्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆
गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक आणि गिअरबरोबर झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली.
गाडी सुरू झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण ‘फर्स्ट गिअर’ टाकतो. हा ‘फर्स्ट गिअर’ म्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई, बाबा, जोडीदार, मुलं, जवळचे मित्र. हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना गाडी न थांबता ‘पुढे’ जात राहिली पाहिजे हा पहिला ‘संस्कार’ फर्स्ट गिअर करतो.
इथे आपल्याला निर्व्याज्य प्रेम मिळतं, सुरक्षितता मिळते. गाडी ‘बंद पडणार नाही’ याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी ‘पळण्यासाठी’ इतका कमी वेग पुरेसा नसतो.
आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर टाकतो. इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व कळू लागतं. शाळा, कॉलेज, पुस्तकं, मिडिया, आपले छंद, विविध कला… बाहेरचं जग किती मोठं आहे आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहे, हे कळतं. समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो.
गाडीचा वेग आणखी वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घर, कपडालत्ता, भांडीकुंडी, पहिला फ्रीज, पहिला टीव्ही, प्रसंगानुरूप हॉटेलिंग, सणासुदीला नवीन कपडे, चांगले मार्क मिळाले तर मुलाला-मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड मधून थर्ड गिअरमध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्य, पण आता तोच वेग कमी वाटू लागतो.
आपण आता ‘फोर्थ गिअर’ टाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं की हॉटेलिंग-शॉपिंग-मल्टीप्लेक्स, गाडी, आकर्षक लेटेस्ट मोबाईल, एक बि. एच. के. मधून दोन बि. एच. के., लॅपटाॅप, ह्याऊ नि त्याऊ. या वेगाची नशाच काही और.
गंमत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही. आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार… लाख… कोटी… खर्व… निखर्व… रुपये नाहीत, गरजा.. हा ‘वेग’खूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कुणी येऊ नये, ‘लाल’सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं आणि… आणि…. आणि…. ‘नियती’ नावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो. गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो.
पाच.. चार.. तीन.. दोन… एक…. खाट खाट
गिअर मागे टाकत आपण आता न्यूट्रलवर येतो. कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो. पाचव्या गिअरमध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअरदेखील टाकला होता याचा विसर पडला होता. वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता होती.. आज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं. गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे. मला सांगा कुठला गिअर टाकाल ?
सुसाट वेगाचा पाचवा गिअर ? की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा ‘फर्स्ट गिअर’ ?
आयुष्यात जेव्हा पराभवाचे, निराशेचे क्षण आले होते, तेव्हा कोण होतं तुमच्या जवळ ? कुणी दिला होता आधार ? आठवून पहा. प्लाज्मा टीव्हीने ? इ. एम. आय. भरत विकत घेतलेल्या क्लासिक बेडरूमने ? नव्या कोऱ्या गाडीने ? ‘ यू आर प्रमोटेड’ असं लिहिलेल्या कागदाने ? मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ. तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने.
आर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे बाबा, निरागस प्रश्न विचारून आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं, ‘होईल सगळं व्यवस्थित’ म्हणत डोक्याला बाम चोळून देणारी ‘बायको’ नावाची मैत्रीण, बाहेरचं खाऊन त्रास होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, ‘त्या’ काळात आपल्या नैराश्यावरचा ‘कान’ होणारे आणि योग्य सल्ला देणारे ‘जिवाभावाचे मित्र’ हे सगळे फर्स्ट गिअर तुमची गाडी ओढत नव्हते कां ?
माझा चवथ्या-पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही. त्या वेगाची धुंदी जरूर अनुभवू या. त्याचा आनंद ही उपभोगू या. फक्त त्यावेळी आपल्या ‘फर्स्ट गिअर्स’ चं स्मरण ठेवू या. आयुष्याचा वेग मधून मधून थोऽऽऽडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.
जिंदगी हसीन है.
☆ ☆ ☆ ☆
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈