मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “ऐकावं ते नवलच…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “ऐकावं ते नवलच…” ☆ सौ राधिका भांडारकर 

खूप दिवसांपूर्वी वृत्तपत्रात एक बातमी वाचनात आली होती. मथळा असा होता..

एका तरुण दांपत्याची आत्महत्या सविस्तर बातमीत  लिहिले होते,

“हे दांपत्य तरुण आणि संगणक क्षेत्रात उच्च शिक्षित होते. दोघंही नामांकित कंपनीत उच्च पदाधिकारी होते. वर्षाचे भरभक्कम आर्थिक पॅकेज होते. मुंबईसारख्या शहरात उच्चस्थांच्या वस्तीत त्यांचा अद्ययावत, सुसज्ज असा ऐसपैस फ्लॅट होता. दोघांच्याही ब्रँडेड महागड्या गाड्या होत्या. ”

पोलीस तपास चालू आहे. आत्महत्येपूर्वी दोघांचीही सही असलेली त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्यात लिहिले होते,

“आमच्या आत्महत्येस फक्त आम्हीच जबाबदार आहोत. अल्पवयातच आम्ही जीवनात जे मिळवायचं ते सारं मिळवलं. आता पुढे काय हा प्रश्न आम्हाला सतत सतावायचा आणि या प्रश्नानेच आम्हाला खूप नैराश्य आले. असे वाटू लागले की जगण्यासाठी आता काही लक्ष्यच उरले नाही. मुले— बाळे —संसार या आमच्या जगण्याच्या संकल्पना होऊच शकत नाही. म्हणून आम्ही इथेच थांबायचं ठरवलं. जीवनच संपवून टाकायचं ठरवलं. या विचारापाशी आमचे अत्यंत आनंदाने एकमत झाले. म्हणून आमच्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये. जगाचा निरोप घेताना आम्ही खूप आनंदात आहोत. ”

ही बातमी वाचून आजच्या तरुण पिढी विषयी, त्यांच्या मानसिकतेविषयी सखोलपणे विचार करायला लागण्यापूर्वी माझ्या मनात इतकेच आले, ” खरंच ऐकावे ते नवलच. ”

सुदर्शन नावाचा माझा एक जुनियर मित्र अनेक वर्षे मस्कतला होता. त्या दिवशी अचानक आमची एका कार्यक्रमात भेट झाली. मी त्याला विचारले, ” किती दिवस आहेस भारतात?”

तो म्हणाला, ” अगं मी आता भारतात परत आलोय. मी निवृत्त झालोय्. ”

“निवृत्त? तुझं निवृत्तीचं वय तरी झालं का?”

“नसेल. पण आता मला काम करायचं नाही. मला माझे साहित्यिक आणि इतर छंद जपायचे आहेत. ”

तशी हरकत काहीच नव्हती पण तरीही मी थोडी संभ्रमित झाले. मग तोच सांगू लागला,

“कसं असतं ना? मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि एका घड्याळाच्या दुकानात मी एक सुंदर घड्याळ पाहिले होते. खूप महागडे आणि त्यावेळी मला ते विकत घेणे परवडण्यासारखे नव्हतेच. पण मी ठरवले, आयुष्यात कधीतरी याच ब्रँडचं हे महागडे घड्याळ घ्यायचं. पैसे मिळवण्यासाठी मी दुबई, मस्कत येथे नोकऱ्या केल्या. बायको आणि मुले भारतातच होती. बायकोला बँकेत चांगला जॉब होता. आजही आहे. मी खूप पैसा कमावला आणि एक दिवस मी माझे घड्याळ घेण्याचे स्वप्नही पूर्ण केले. मी खूपच आनंदात होतो. स्वतःला यशस्वी समजत होतो आणि नंतर एकदमच माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. एका बिझ्नेस कॉन्फरन्स मध्ये एका परदेशी  व्यक्तीशी माझा छान परिचय झाला आणि गंमत म्हणजे त्याच्या मनगटावरच्या घड्याळाने मी फारच प्रभावित झालो. मी त्याला सहज किंमत विचारली आणि ती ऐकून मी पार उडालो. माझ्या स्वप्नातल्या घड्याळापेक्षा पाचपट ते महाग होते आणि तेव्हांच जाणीव झाली याला काहीही अर्थ नाही. या पैशाच्या पाठी धावण्यात आपलं आयुष्य वाया जात आहे. ही प्रलोभनं न संपणारी आहेत. त्याच दिवशी मी राजीनामा दिला आणि भारतात परतलो. आता फक्त स्वतःचे छंद जोपासायचे. ” असे सांगत त्याने सहज माझ्या हातावर टाळी दिली. माझा संभ्रम वाढलाच होता. खरं म्हणजे मला माहित होतं, हा माझा मित्र सुंदर कविता लिहितो, तो अजिबात कलंदर वृत्तीचा माणूस नाही, जबाबदार कुटुंब वत्सल आहे.. ”

तरीही?  असो! ऐकावे ते नवलच.

माझी मुलगी अमेरिकेहून फोनवर बोलत होती. बोलता बोलता तिने मला सांगितले, ” मम्मी! अगं कृष्णाचे आणि शिवानी चे ब्रेकअप झाले. ”

“काय सांगतेस काय? किती छान दांपत्य होते ते! सदैव एकमेकांच्या प्रेमात असायचे. ”

माझ्या अमेरिकेच्या वास्तव्यात मी त्यांना अनेक वेळा भेटले होते. मला फार आवडायचे ते दोघे. ”

“अग! पण असं झालं काय?”

“फारसे डिटेल्स मला माहित नाहीत पण कुठल्यातरी एका क्षणी त्यांना वाटायला लागले की ती दोघं दोन भिन्न व्यक्ती आहेत आणि यापुढे एकत्र राहणं शक्य नाही. दोघांनी स्वतंत्रपणे जगण्याचा निर्णय घेतला आहे. They have just moved on. ”

मला इतकंच वाटत होतं की हे काही माझ्या संस्कृतीच्या पठडीतलं नक्कीच नाही.

पण यापुढे मुलीने आणखी एक धक्का दिला.

“आज त्यांच्या ब्रेकप पार्टीला आम्हाला जायचं आहे. ”

ब्रेकअप ही काय साजरी करण्याची बाब आहे का? मी पार चक्रावून गेले होते.

माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीच्या पतीचे नुकतेच निधन झाले होते. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा मला जायला जमलं नव्हतं म्हणून मी काही दिवसानंतर तिला भेटायला गेले. माझं मन खूप जड झालं होतं. कशी असेल माझी मैत्रीण? एकाकी पडली असेल. इतक्या वर्षांचा त्यांचा संसार! काय बोलायचं तिच्याशी? कसं सांत्वन करायचं तिचं?

मी तिच्याकडे गेले तेव्हा ती एकटीच घरात होती. तिनेच दार उघडलं.

“ये बैस. ” म्हणाली.

खूप सावरलेली वाटली. गप्पांच्या दरम्यान ती म्हणाली,

“अगं! दिनेश नेहमी म्हणायचा ‘ मला ना असा झोपेतच मृत्यू यावा. यातना, वेदना आजारपण काहीही नको. सकाळ व्हावी, तू चहासाठी मला उठवायला यावंस आणि मी उठत नाही म्हणून मला हलवावस आणि तेव्हाच तुला कळावं की मी आता हे जग सोडून गेलो आहे. ’ आणि तुला सांगते, अगदी तसंच घडलं. दिनूला जसा मृत्यू यावा वाटत होते तसाच त्याचा मृत्यू आला. किती भाग्यवान ना तो! त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यात नक्कीच पोकळी निर्माण झाली आहे पण दिनेशच्या मनासारखे झाले म्हणून मला समाधानही  वाटते. ” जीवनात कुणी कसा विचार करावा हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न नाही का?

आणि आता आणखी एक मजेदार किस्सा सांगते. तत्पूर्वी एकच सांगते की हा किस्सा वाचल्यानंतर केंद्रस्थानी असलेल्या त्या व्यक्तीविषयी आपण मुळीच गैरसमज करून घेणार नाही.

तेव्हा मी शाळेत होते. असेन आठवी नववीत. त्यावेळी काळ— काम —वेगाच्या गणितांनी मला अगदी बेजार केले होते. ते हौद, त्या तोट्या, ते पाणी नाहीतर भिंतीचे बांधकाम, कामगार, दिवस यांची गणितं मांडताना माझी दमछाक व्हायची. माझे वडीलच मला गणित शिकवायचे. खूप सुंदर पद्धतीने, सुलभ करून शिकवायचे. छान आकृत्या काढून समजावायचे.

एक दिवस असेच एक कठीण गणित मी महाप्रयत्नाने सोडवले. अगदी बरोबर उत्तरापर्यंत पोहोचले. तरीही वडील झटकन म्हणाले, ” चूक. शून्य गुण. मांडणी विस्कळीत..”

मला इतका राग आला त्यांचा! इतका वेळ झटापट करून मी गणिताचं बरोबर उत्तर मिळवलं आणि वडील म्हणतात, “चूक?” त्या क्षणी माझे भानच सुटले जणू! तीव्र क्रोधाचे भूत माझ्या मानगुटीवर बसले जणूं! आणि त्या तिरीमीरीत  मी वडिलांच्या गालावर जोरदार थप्पडच मारली.

मंडळी! या क्षणी तुमच्या मनातला माझ्याविषयीचा उरला सुरला आदर पार संपुष्टात आला आहे हे मला जाणवतेय्. पण थांबा! नंतरचे ऐका. दुसऱ्याच क्षणी माझे मन अपार गोंधळले. हे काय केले मी?

पण वडील शांत होते. त्यांचे टपोरे, पाणीदार, तेजस्वी, मोठे डोळे माझ्यावर त्यांनी रोखले. मी पुटपुटत होते. “पप्पा! मी चुकले हो! मी पुन्हा नाही अशी वागणार. ”

“ थांब बाबी. ”

वडील म्हणत होते, ” तुझ्या रागाच्या निचऱ्यासाठी माझा गाल हे तुझ्यासाठी सहज उपलब्ध असलेलं एक माध्यम होतं फक्त. तू माझी अत्यंत लाडकी, चांगली, आणि हुशार मुलगी आहेस. या क्षणी मला तुझा अभिमान वाटतो आणि विश्वासही वाटतो. तुझ्या आयुष्यात तू कधीही तुझ्यावर अन्याय झाला तर सहन करणार नाहीस. बेटा! शुभास्ते पंथान:सन्तु।।”

आजही या प्रसंगाकडे मागे वळून बघताना माझे मन अनेक भावनांनी उचंबळून येते. मी कुठलंही समर्थन देऊच शकत नाही. आणि तुम्हालाही हे नवलाचं वाटलं तर त्यात काहीच नवल नाही.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “हिंदोळ्यावर…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

परिचय

शिक्षण: एम ए मराठी-

व्यवसाय: मैत्री गंधर्व फॅमिली रेस्टॉरंट, उमरगा-पार्टनर आणि गृहिणी. कॉलेज जीवनापासून लेखनाची आवड. कॉलेजमध्ये विद्यार्थी संसदेत सहभाग LR (लेडीज रिप्रेझेंटिटीव) पदाची मानकरी. 

लेखन–

  • मुरुड येथील साप्ताहिक गणतंत्र मध्ये पहिला लेख “एक शाम मस्तानी मदहोश किये जाय”. प्रकाशित. औसा येथील दर्पण मासिकातून कविता प्रकाशित… लातूर येथील “ब्रह्मसमर्पण”, मासिकातून 36 लेख प्रकाशित. फुलोराच्या पंधराव्या काव्य संमेलनात “फुलोरा रत्न” पुरस्काराने सन्मानित.
  • फुलोरा साहित्य समूहाच्या सतराव्या काव्य संमेलनात विशेष साहित्य सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  शुभंकरोती साहित्य समुहाकडून.. नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित.
  • शब्दवेधी बाणाक्षरी समूहाकडून मला साहित्य रागिणी पुरस्कार आणि काव्यरंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • “ काव्यरेणू “ हा पहिला काव्यसंग्रह १ फेब्रुवारी २०२४ धुळे येथे झालेल्या राज्यस्तरीय काव्य संमेलनात प्रकाशित झाला.
  • धुळे येथील काव्य संमेलनात सांजवात कला साहित्य पुरस्काराने सन्मानित
  • शुभंकरोती साहित्य परिवारातर्फे महिला दिनी अष्टभुजा पुरस्काराने सन्मानित

सांजवात हा रांगोळी आणि चारोळी संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर.

राहणार औसा.

? मनमंजुषेतून ?

☆ हिंदोळ्यावर…सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

उंच झोका झाडावर

पाळण्याची सय आली

झोपाळा ओसरीवर

मंद मंद झोका घाली

*

हिंदोळ्यावर सुखदुःखाची

स्वप्ने सारी पाहिली

गतकाळाची आठव पूंजी

झोपाळ्यावर राहिली

*

झोपाळा म्हटलं की ओसरीवर अगदी मधोमध माळवदाच्या कड्यांना बांधलेला झोपाळा आणि त्यावर घातलेली गादी आणि लोड आठवतात. बालपणापासून कितीतरी रूपात हा झोका आपल्याला भेटतो नाही का. अगदी जन्मल्याबरोबर विधिवत बाळाला पाळण्यात घातलं जात. त्याला नामकरण म्हणतात. आणि तिथून हा झोक्याचा प्रवास सुरू होतो. माझ्या घरी अजूनही माझा सागवानी लाकडी पाळणा आहे ज्या पाळण्यामध्ये मी तर खेळलेच, पण माझी मुलं देखील त्याच पाळण्यात खेळली. पाळण्यापासून सुरू झालेला हा प्रवास मग झोक्यापाशी येऊन थांबतो.

माझ्या बालपणी तर आमच्या सरकारी वाड्यामध्ये उंच माळवदाला झोका बांधलेला असायचा आम्ही भावंड नेहमी नंबर लावून झोका खेळायचो.

कोण सर्वात उंच झोका घेऊन चौकटीला पाय लावतो त्याची स्पर्धा लागायची आमची. किती सुंदर काळ होता ना तो बालपणीचा!

झोका आठवला की बालपणीची आठवण येते. आणि

“एक झोका चुके काळजाचा ठोका”अशी काहीशी अवस्था माझी होते त्याला कारणही तसेच आहे. माझ्या माहेरी चिंचेचे मोठं बन आहे. त्याला चिंच मळा म्हणतात. चिंचेची झाडं इतकी जुनी आहेत, उंच आहेत की नागपंचमी आल्यानंतर त्याच उंच झाडांना झोके बांधले जातात. माझ्या शेजारी एक ताई राहायची आणि ती मला झोका खेळायला घेऊन जाण्यासाठी घरी आली.मी तेंव्हा जेमतेम पाचवी सहावीच्या वर्गात असेन. माझ्या आईला सांगून मला ती ताई घेऊन जात होती तेव्हा आई म्हणाली, “तिला जास्त मोठ्या झोक्यावर नको हो बसवूस.”त्या ताईने मला तिच्या पायामध्ये बसवले आणि ती त्या उंच झोक्यावर उभी राहिली झोका उंच उंच गेला. चार-पाच जणांनी दिलेला झोका तो खूपच उंच गेला आणि जणू काही आम्ही आकाशात गेलो की काय असे वाटून मी घाबरून गेले उंच गेलेल्या झोक्यावरून एकदम सटकले, डोळे पांढरे झालेले. मी सटकलेली पाहून खालची सर्व मुलं-मुली मग मोठ्यांनी ओरडू लागली. सर्वजण खूप घाबरले होते पण प्रसंगावधान राखून त्या ताईने झोका थांबेपर्यंत मला तिच्या पायामध्ये आवळून धरले व एका पायावर ती झोक्यावर उभी राहिली व मला खाली पडू दिले नाही. पण तेव्हापासून मी कधीच तितक्या उंच झोक्यावर बसले नाही… अशी ही झोक्याची काळजाचा ठोका चुकवणारी आठवण.

ओसरीवरचा चौफाळा अजून आमच्या घरामध्ये आहे. माझ्या चुलत्यांनी त्याचा फक्त आता पलंगा सारखा वापर सुरू केला आहे. किती आठवणी असतील ना या चौफळ्याच्या. किती जणांची सुखदुःख ऐकली असतील याने. सुखदुःख ऐकवणारी सर्व माणसं काळाच्या पडद्याआड गेली. पण या चौफाळ्याच्या मनात मात्र यांचा शब्द न शब्द रुंजी घालत असणार. खरंच याला जर बोलता आलं असतं ना तर याने पूर्ण घराण्याच्या कथा ऐकवल्या असत्या अगदी पानाचा डबा घेऊन करकर सुपारी कात्रत गावकीचा कारभार पाहणारे घराचे कारभारी झोपाळ्यावर बसूनच तर बोलत असणार. दोन-तीन माणसं आरामशीर बसू शकतील इतका मोठा हा चौफाळा आहे. दुपारच्या वेळेला पुरुष मंडळी नसताना स्त्रियांनी देखील याचा आस्वाद घेतला असणार. कारण पूर्वीच्या काळी पुरुष माणसे घरात असताना, स्त्रिया कधी ओसरीवर येत नसत. पण ते  बाहेर गेल्यानंतर मात्र ह्या स्त्रिया चार सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी नक्की ओसरीवर आणि चौफळ्यावर बसत असणार. नुसतं कुठल्या हो गप्पा मारणार हातात वातीचा कापूस, संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी भाजी नीट करणे, अशी सवडीची काम घेऊन मगच त्या गप्पा मारणार. कितीतरी स्त्रियांची हितगुजं, ऐकली असतील नाही का या झोपाळ्यांने. नाही नाही तो जणू त्यांचा सांगातीच झाला असेल.

घरात कोणी नसताना एखादं तरुण जोडपं देखील नक्कीच विसावलं असणार झोपाळ्यावर. ओसरीवरून अंगणातलं टिपूर चांदणं आणि थंड वाऱ्याची झुळूक घेतली असणार त्यांनी अंगावर. कधी घरातल्या आजी आजोबाही पत्ते खेळत बसले असणार. किंवा त्या काळात सोंगट्या देखील खेळायचे, झोपाळ्यावर बसून.घरातली छोटी मुलं देखील या झोपाळ्यावर दंगामस्ती करायची, आणि मग एखादं डोहाळे जेवण जर घरामध्ये असेल तर मात्र काय थाट वर्णावा या झोपाळ्याचा. त्याच्याकड्यांना छान छान फुलांच्या माळा वेली पाने लावून सुरेख सजवले जायचे. त्या रुबाबदार झोपाळ्यावर बसवून मग त्या पहिलटकरणीचे सर्व लाडकोड करत सोहळे साजरे व्हायचे. घरात माणसांची खूप गर्दी झाली तर एखादं माणूस झोपून जायचं या झोपाळ्यावरचं. कितीतरी जणांच्या परसामध्ये हा चौफाळा असायचा. हिरव्यागार झाडीमध्ये या चौफाळ्यावर बसून मंद मंद झोके घेत सर्वजण आनंद घ्यायची. कितीतरी उपयोग होता या झोपाळ्याचा. आणि भल्या मोठ्या ओसरीची शान होता हा झोपाळा.

काळानुरूप झोपाळ्याचे स्वरूप बदलले. पितळी कडया जाऊन त्या जागी लोखंडी कड्या आल्या. काही ठिकाणी जाड सोल लावूनही झोपाळा बांधला जातो. त्यातही आजकाल आधुनिकीकरण आले आहे. खुर्ची वजा झुला बाल्कनी मध्ये आजकाल आढळतो. शहरांमध्ये मोठमोठ्या उद्यानात झोपाळे असतात.

काळ बदलला तरीही कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये हा झोपाळा आपल्या आयुष्यात अजूनही त्याचे स्थान टिकवून आहे. म्हणून शेवटी झोपाळा, झुला, चौफाळा, झोळी, पाळणा, झोका या सर्व हिंदोळ्याच्या रूपांना उद्देशून मी म्हणेन-

बदललेल्या रूपातून

आजही झोपाळा दिसतो

हिंदोळा सुखाचा देतो

आणि गोड हसतो

 

हितगुज करतात 

त्याच्या सवे वारे

झुल्यावर झुलताना

सुखावती सारे

 

 © सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रंगात रंग तो श्यामरंग… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ रंगात रंग तो श्यामरंग… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे

तुला एक गोष्ट सांगू …..

अगदी मनाच्या गाभ्यात जपलेली …..

 

तू नकळत माझ्या आयुष्यात आलास … अगदी अलगदपणे ….

पण रिकाम्या हाताने नाही … येतांना ओंजळी भरभरून आणलेस ..

कितीतरी सुंदर मोहक रंग ….

…. प्रेमाचा गुलाबी रंग

…. प्रसन्नतेचा हिरवा रंग

….  पावित्र्याचा केशरी रंग

….  मन शांतवणारा आभाळाचा निळा रंग

….  आणि मन उल्हसित करणारा … नव्या आशा मनात जागवणारा …

उगवत्या सूर्यासारखा लाल पिवळा रंग ….

 

आणि बघता बघता मी ……

मी या सगळ्या रंगांमध्ये पूर्णपणे रंगून गेले  ..

हरखून गेले .. … स्वतःलाही विसरले  ….

…. आणि नकळत जणू मीही झाले राधा …. सगळं भान हरपून

कृष्णाच्या  श्यामरंगाने माखून गेलेली …. तृप्त झालेली राधा ….

स्वतःला आणि  साऱ्या सृष्टीलाही विसरून गेलेली …. कृष्णमय राधा..  …

 

आणि तू …..

तू झालास माझा कृष्ण ..

माझ्याकडे अतीव प्रेमाने … अनोख्या आपुलकीने बघत ..

स्नेहाचा रंग उधळतच राहिलेला … जगाची पर्वा न करणारा ….

फक्त आणि फक्त माझाच असल्यासारखा  जिवलग कृष्ण ……

 

पण तरीही ….

तरीही का कोण जाणे….  पण जाणवलं … मनापासून जाणवलं ..

….  तू नकळत पूर्णपणे अलिप्त ….

सगळीकडे सगळ्यात असूनही … कशातच नसलेला …

कशातच नसलेला …….. अगदी त्या श्यामरंगातही ……

सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बाई माणूस…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? मनमंजुषेतून ?

☆ बाई माणूस…☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

‘ब्राईट ईन्डिया साॅफ्टसोल्यूशन्स प्राईव्हेट लिमिटेड’.

येस्स… मी इथेच काम करतो. ॲन्ड , आय ॲम प्राऊड ऑफ ईट.

फायनल ईयरला, कॅम्पस मधनं सिलेक्ट झालो. आता दोन वर्ष होत आलीयेत. खरंच.. कळलंच नाही, कधी दोन वर्ष संपलीयेत ती. आय.टी. ईन्डस्ट्रीत राहून सुद्धा, ही कंपनी टोटली वेगळीये. नो पाॅलीटीक्स. हेल्दी वर्क कल्चर. डेडलाईन्सचा अतिरेक नाही. कामाची कदर करणारी लोकं. चांगलं काम केलं की, पटाटा मिळणारी ईन्क्रीमेंटस्.

बाॅस… बाॅस वाटलाच नाही कधी. जस्ट लाईक एल्डर ब्रदर. चांगलं काम करवून घेणारा. चुकलात, धडपडलात, तरी पाठीशी ऊभा राहणारा. सांभाळून घेणारा. स्वतःहून काही चांगल्या टिप्स देणारा. पुढं कसं जायचं ? हार्ड वर्क पेक्षा, स्मार्ट वर्क कसं करायचं ? हातचं न राखता सांगायचा. एखादवेळी रात्र कंपनीत काढायची वेळ आलीच तर आमच्या जोडीला तोही थांबायचा.

प्रोजेक्ट सक्सेसफुली रन झाला की, सेलीब्रेशन. मनापासून. कुठंतरी महाबळेश्वर, नाहीतर लोणावळा, खंडाळा. टाॅपक्लास रिसाॅर्टमधे. सॅटरडे सन्डे. दोन दिवस फूल टू एन्जाॅय. पार्टीत आमच्याबरोबर धमाल नाचायचा सुद्धा. कूऽऽल. मन्डेपासून नव्या दमानं आम्ही नवा प्रोजेक्ट सुरू करायचो.

आमच्या ग्रुपमधे आम्ही चार पोरं आणि दोन पोरी. सगळी बॅचलर्स गँग. रूमवर टाईमपास करण्यापेक्षा, ऑफीस बरं. आम्ही जास्तीजास्त वेळ ऑफीसमधेच पडीक असायचो. खूप शिकायला मिळालं.

खरं सांगू ? मेसपेक्षा कंपनीचं कॅन्टीन बरं वाटायचं. आठवड्यातून तीनदा तरी रात्रीचं जेवण कंपनी कॅन्टीनमधेच व्हायचं. पोरींचं तसं नसायचं. सातच्या ठोक्याला त्या पळायच्या.

काहीही असो. आमचं वर्कोहोलीक असणं, बाॅसचं सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं, त्याचा टॅलेन्ट, आमचं हार्डवर्क. प्रोजेक्ट डेडलाईनच्या आतच, कम्प्लीट व्हायचा. कंपनी खूष होती आमच्या टीमवर्कवर.

अचानकच. मन्डे ईव्हीनींग. बाॅस म्हणाला, “आज रात्री सगळे माझ्या घरी डिनरला या.” गेलो. ग्रुपमधल्या पोरीही होत्या. 

बाॅसची बाॅस. त्याची बायको. तीनं आमच्या गँगला मनापासून एन्टरटेन केलं. जेवण छानच. गप्पा मारल्या.

ती.. बाॅसनं ओळख करून दिली. “म्रिनाल. माय कझिन. आय. बी. एम. यू.ऐस. ला असते. पण कंटाळलीय तिकडे. लवकरच परत येईल इकडे.”

आम्ही पहातच राहिलो. वेड्यासारखं… नो डावूट. ती फेअर होतीच. पण तिचं स्माईल.  जबरा. आमच्या गँगमधल्या पोरांचे, ईसीजी काढावे लागले असते. धकधक..

तीनं हात पुढं केला. प्रत्येकाचा हात हातात घेवून शेक हॅन्ड केलं तीनं. तीचा स्पर्श झाला अन्… 11 के. व्ही.चा शाॅक बसला. कुछ कुछ… बहोत कुछ होने लगा.

ती प्रत्येकाशी बोलली. नेटिव्ह टाऊन, काॅलेज, हाॅबीज, गर्लफ्रेन्ड, बाॅयफ्रेन्ड, फ्युचर प्लॅन्स… सबकुछ. आम्ही हिप्नोटाॅईज्ड झालेलो. सब कुछ ऊगल दिया.

रात्रीचे अकरा वाजत आलेले. आमच्या गँगमधल्या पोरी अस्वस्थ. आम्ही.. आम्हाला वाटत होतं, ये मुलाकात खतमही ना हो.

एकदम बाॅसने बाॅम्ब फेका. मार डाला. “फ्रेन्डस्, आय ॲम रिझायनिंग. शिफ्टींग टू सिंगापोर. फ्राॅम टूमारो आय विल नाॅट बी देअर अराऊंड यूवर डेस्क. बेस्ट लक फाॅर युवर फ्यूचर. स्टे ट्यून्ड गाईज.”

आम्ही बैलासारख्या माना डोलावल्या. बुरा लगा. मनापासून वाईट वाटलं. आम्ही थोडं ईमोशनल झालेलो. बाॅसला हातात हात घेवून बेस्ट विशेस दिल्या. निघालो. खाली आलो.

म्रिनाल तिच्या गाडीपाशी. पोरींना ती ड्राॅप करणार होती. एकदम माझ्याकडे वळून म्हणाली. “तू त्याच एरियात राहतोस ना. चल, तुला ड्राॅप करते.”

मी टुणकन ऊडी मारून तिच्या गाडीत. ड्रायव्हींग सीटशेजारी. तीची मरून होंडा सिटी. कारमधला अफलातून फ्रेग्रन्स. तीचं असणं. मोतीदार दात दाखवत, हसून बोलणं. बॅग्राॅऊंडला जगजीतसिंगाचं गजल गाणं.. अहाहा…

साला, माझं घर फार पटकन् आलं. मी तिला बाय केलं. ईन्फानाईट टाईम्स, तिच्या पाठमोऱ्या गाडीकडे बघत बसलो. 

नेक्स्ट माॅर्नींग. बाॅस की बिदाई. आँखो में आंसू.

व्हेरी नेक्स्ट माॅर्नींग. नये बाॅस की मुँहदिखाई.

अर्थक्वेक झालेला. म्रिनाल ईज आवर न्यू बाॅस.

पुन्हा आँखों में आंसू. खुशी के आंसू. सरप्राईज के आंसू. सगळ्या पोरांचा देवावरचा विश्वास एकदम वाढला. भगवान, तेरी लीला अगाध है ! आणि म्रिनाल भी.

मुद्दामहून बाॅसच्या घरच्या पार्टीला येणं. स्वतःची ओळख लपवणं. आमची कुंडली काढून घेणं.. येस बाॅस.. मान गये.

हल्ली आम्ही जरा ब्युटी काॅन्शस झालेलो. भांगाच्या रेघा काढणं वाढलं. हजामाचं बिल वाढत गेलं. जीन्स पिदाडणं कमी झालेलं. फाॅर्मल्समधे वावरणं वाढलं. काहीही असो.. आमच्या ऑफीसचा स्वर्ग झालेला. तरीही. म्रिनालचं वेगळेपण जाणवायचं.

पहिल्या दिवशीच तीनं सांगितलं. “काॅल मी म्रिनाल. जस्ट म्रिनाल.”

ती प्रचंड हुशार. तितकीच मेहनती. सतत नवीन काहीतरी शिकायच्या मागे. तीचं नाॅलेज नेहमी अपटू डेट असायचं. आमच्याबरोबरही ती ते शेअर करायची. हळूहळू आम्हालाही ती सवय लागली. शक्यतो कुणी ओव्हरटाईम करावा, असं तिला वाटत नसे. एरवीचा टाईमपास बंद झाला. सहा वाजेपर्यंत आमचं काम आवरायचं.

अर्थात पहिल्या बाॅसईतकीच ती हेल्पींग नेचरवाली. व्यवस्थित गाईड करायची. छोटी छोटी टारगेटस् ठेवायची. डे टू डे टार्गेट. आम्ही ते कम्प्लीट करायच्या मागे लागायचो. प्रोजेक्टचा लोड जाणवायचाच नाही.

बाकीचंही ती भरपूर वाचायची. एखादं चांगलं बेस्टसेलर रेफर करायची. आम्ही वाचायचो. फ्रेश वाटायचं.

ती स्वतः खूप हेल्थ काॅन्शस होती.

जिम करायची. भरपूर वाॅक घ्यायची. गिटार वाजवायची. स्वतःला फ्रेश ठेवायची.

आम्ही काय ? काॅपी पेस्ट करायला टपलेलोच. जागरणं कमी झाली. अचरट चरबट खाणं कमी झालं. जिम सुरू झाली. आम्हीही हेल्थ काॅन्शस झालो. ऑफिसमधल्या स्मोकींग झोनच्या वार्या कमी झाल्या. ओव्हरऑल, हळूहळू ॲज अ पर्सन आम्ही डेव्हलप होत गेलो.

म्रिनाॅल वाॅज स्ट्राँग मॅग्नेटिक फिल्ड. आणि … ऑल वुई वेअर अन्डर ईन्फ्ल्युएन्स ऑफ ईट. ती सुंदर होतीच. अजून सुंदर वाटायला लागली.

वाटायचं की, आपण स्वतःला तिच्यासारखं डेव्हलप करायला हवं.

म्रिनाल वाॅज नो मोअर अ ब्युटी क्वीन. बट नाऊ शी हॅज बिकम आयडाॅल. आणि आम्ही सगळे तिला काॅपी करत होतो. तरीही छान वाटत होतं.

प्रोजेक्ट संपत आलेला. यू. ऐस. चा क्लायंट. दिवाळी दोन दिवसावर. म्रिनालनं त्याला ठणकावून सांगितलं. “दिवाळीत जमणार नाही. तुम्ही ख्रिसमसला काम करता का ? हे तसंच आहे.”

काही क्वेरीज होत्या. आज रात्री थांबावंच लागणार. म्रिनाल म्हणाली ,  “सगळे नकोत, कुणीतरी दोघं थांबा.”

मी आणि गार्गी तयार झालो. संध्याकाळी सहाला बाकीची लोकं गेली.

हॅपी दिवाली. आमची नाईट शिफ्ट सुरू.

रात्रीचे दोन वाजत आलेले. मी म्रिनाल आणि गार्गी. तिकडे तो राॅबर्ट. चुन चुन के प्रत्येक क्वेरीचा फडशा पाडला. टेस्टेड ओके. मिशन कम्प्लीटेड.

जरा रिलॅक्सलो. तेवढ्यात म्रिनाल आमच्या दोघांसाठी स्वतः काॅफी घेवून आली. खूपच छान वाटलं. आमच्या दोघांच्या पाठीवर थोपटलं. “वेल डन. नाऊ ईटस् रिअली अ हॅपी दिवाली.”

खरं तर खूप भूक लागलेली. असं वाटेपर्यंत म्रिनालनं तिच्या टिफीनमधली सॅन्डविचेस काढली. और मोतीचूर का लड्डू भी. मजा आली.

आम्ही तिघं निघालो. खाली आलो तर, म्रिनालचा नवरा त्याची कार घेवून आलेला. त्याच्याशी ओळख करून दिली.

तिच्यासारखाच. हुशार, हॅन्डसम. बिलकुल फॅक्टर जे नाही वाटलं. शी रिअली डिझर्व्हस् ईट. 

त्याच्या गाडीतून मी रूमपर्यंत. रूमवर पोचलो. रूमपार्टनरनं विचारलं.

“साल्या, तुझं कामात लक्ष कसं लागलं ?

एवढ्या सुंदर दोन पोरी शेजारी होत्या. मी पागल झालो असतो.”

मला त्याच्या पागलपणाची कीव वाटली. खरंच.. कामात इतकं हरवलेलो. त्यांचं बाईपण कधीच विसरलेलो.

म्रिनाल दोन एक वर्ष आमच्या इथे होती. आता बरीच वर्ष बंगलोरला.

गार्गी. माय कलीग ॲन्ड नाऊ माय वाईफ. आम्हाला नेहमी म्रिनालची आठवण येते. आज जे काही थोडं फार अचिव केलंय, क्रेडिट गोज टू म्रिनाल.

आजही कुठली यंग चार्मींग लेडी दिसली की, काय वाटतं सांगू ? ही म्रिनालसारखी हुशार असेल. ती भरपूर वाचत असेल. नाहीतर गिटार वाजवत असेल. ओव्हरऑल, तिच्या सुंदर दिसण्यापेक्षाही, ती खरंच जास्त सुंदर असेल.

माझी नजर सुधारलीय. सुंदर बाईमाणूस दिसली की हल्ली माझं त्यातल्या माणसाकडे जास्त लक्ष जातं. त्या स्वच्छ नजरेला बाईपणाचा मोतीबिंदू होत नाही.

परवा एकदम म्रिनालची आठवण झाली. आठ मार्च होता. फोन केला. आम्ही दोघंही बोललो. “हॅपी वुमन्स डे, म्रिनाल.”

ती तिकडून हसली. “वीई शुड सेलीब्रेट ह्युमन्स डे. देन विमन्स डे विल बी सेलीब्रेडेड एव्हरी डे !”

काय बोलणार ?

“ओके म्रिनाल , हॅपी ह्युमन्स डे !”

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ होळी — ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

 

??

☆ होळी — ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

आज हुताशनी पौर्णिमा आहे. हिंदू कालगणनेनुसार वर्षातील शेवटचा सण !! सर्वप्रथम सर्वांना होळी निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

आपले सर्व सण सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करणारे आहेत. आजचा सण सर्वसाधारणपणे ‘होळी’ किंवा कोकणांत ‘शिमगा’ या नावाने ओळखला जातो. पण नुसता होळी हा शब्द घेतला तर त्यात अनेक अर्थ लपले आहेत असे दिसून येईल. आपल्या मायबोलमध्ये म्हणी नावाचा एक प्रकार आहे. या म्हणींनी आपली मायबोली अधिक श्रीमंत, समृध्द केली आहे असे आपल्या लक्षात येईल. 

जीवनाची ‘दिवाळी व्हावी, आयुष्यात कायम दसरा असावा, पण आयुष्याचा होळी होऊ नये आणि कोणी आपला ‘शिमगा’ करू नये, असे मानले जाते, तसा प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि असायलाही हवा. पण ‘जाणीवपूर्वक’, विशिष्ट आणि उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आयुष्याची होळी करणाऱ्या असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक यांचेही आजच्या दिवशी कृतज्ञतेने स्मरण करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे नमूद करावेसे वाटते. यात स्वा. सावरकरांचे एक वचन इथे देत आहे. आपल्या संसाराची होळी करून जर उद्या देशाला स्वातंत्र्य मिळणार असेल आणि पुढील अनेक पिढ्या सुखाने जगणार असतील तर माझ्या संसाराची होळी झाली  तरी मला चालेल. सरदार भगत सिंह, चंद्रशेखर आझाद आदींनी हेच केलं, नाही का ?

आजच्या पावन दिवशी आपल्या अंगीच्या अनेक वाईट गुणांची यादी करून आजच्या होळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर त्या दुर्गुणांची होळी करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न  करू. हे वैयक्तिक पातळीवर करण्यासाठी सुचवले आहे. पण समाज म्हणून विचार करताना, राष्ट्र म्हणून विचार करताना जातीपाती, प्रांतभेद, वर्णभेद आणि तनामनातील अनेक भेद या होळीच्या अग्नीत जाळून भस्मसात करणे तितकेच गरजेचे आहे.

आपल्यातील व्यक्तिगत संकुचित स्वार्थ आणि हेवेदावे विसरुन एकदिलाने *’प्रथम राष्ट्र’ हे ब्रीद वाक्य ध्यानात ठेवून ‘विवेका’ने, योग्य उमेदवारास मतदान करू. आपण सर्वांनी शतप्रतिशत मतदान केले तर  देशाला पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचे सरकार प्राप्त होईल. असा संकल्प करू. आपण सर्व  त्यासाठी कटिबद्ध होऊ आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही बळकट करू.*

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घन तमी… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

घन तमी… ☆ डॉ. जयंत गुजराती

शिशिर सरला. वसंतपंचमी ही येऊन गेली. ऋतुबदलाचे संकेत केव्हापासूनचेच. ऊन आता मी म्हणत असलेलं. रात्री तर गारवा अजूनही झोंबणारा. रात्र आली की उदासीनतेची छाया पसरून राहते, मनाच्या कणाकणावर. खिडकीशी येऊन बसलं की थंडावत असलेली रात्र जागी होते. रात्रीला कोलाहल तसा कमीच. रस्त्यावरची वर्दळ कमी कमी होत गेली की शांतता अवतरते. बराच वेळ टिकणारी. त्या शांततेच्या उदरातही बरंच काही लपलेलं असतं. अभोगी,  अव्यक्त, तेही अंतस्थ, म्हणजे ते तसं असतंच सदानकदा, पण रात्रीने दारावर टकटक केले की ते अकारण असलेलं मनातलं बरंच काहीचं अस्तित्व टोकदारपणे जाणवू लागतं, मग स्वस्थ असणं काही होत नाही. तमाचा खेळ पाहत बसण्यापलिकडे काहीसुद्धा होत नाही,  घडत नाही.  एक दीर्घ श्वास, उच्छ्वास निसासा काही म्हणो….

एकेक पान गळून निष्पर्ण झालेलं झाड समोर खिडकीशीच. एकाद्या व्रतस्थ मुनीसारखं उभं असलेलं. बोलेल काही, आताच. लगेच. वाटत राहतं. सारखं निरखणं त्याला. तसा तो एकाकीच. वाटतं की तो बोलला तर सगळ्या जखमा उघड्या करेल. तसं त्यालाही उचंबळून येत असेलच की. कुणीतरी ऐकणारं लाभावं म्हणून तरसून गेलाही असेल. खोलवरच्या, वरवरच्या जखमांचं दालनच असेल. मूळापासून ते टोकापर्यंत. तडतडणाऱ्या साली, भेगाळलेला बुंधा. हिरवं काही नसण्याची निराशा आणि झुंज गारठ्याशी. पाऊसकाळ अजून तसा लांबच, भिजवून टाकायला. जमीन तशी कोरडीच.  हात आकाशाला टेकायचे म्हणून वर वर वाढणं तेव्हढं झालेलं, पण हेमंत व शिशिराने सारे वैभव लुटून नेलेलं. एक साधं इटुकलं पानही राहू दिलं नव्हतं फांद्यांवर. कोण काळाचे वैर उभं राहिलेलं. तग धरणं तेव्हढं हातात. गारठ्याबरोबर असतो वारा तोही अचूक सूड उगवतो. 

कधीकधी उत्तर, मध्य वा पूर्वरात्रीच चंद्र उगवतो, तो काही सूड उगवत नाही. उलट त्याचं असणं हे आश्वासक थोडंफार. तसा तो लांबच, पण शुभ्रधवल किरणांची पखरण करून बापजन्माचा दाह शमवण्याचा त्याचा प्रयत्न, तोही कधीकधी केविलवाणा भासणाराच. तोही किती पुरणार? जेथे शीतलतेचीही धग वाटावी ही परिस्थिती. किती काढावी कळ? किती सोसावं? 

नेहेमी निळंशार असणारं आभाळही राखूडलेलं. एकदा का दिवाकर मावळला की आभाळ रंग बदलतंच.कितीही असोत टिमटिमणारे तारे, ते अनंत असलेलं आभाळ गूढ वाटू लागतं. तेही अनंत. तसं असलं तरी जितकी भूमी हवीशी तितकंच आभाळही. ते परकं नसतंच कधी. दिवसभराची दगदग संपली की एकांतात तेच साथीला. बस न्याहाळत रहावं त्याला. निरूद्देश. काहीच बोलू नये, काही सांगू नये. फक्त एकमेकांपुरतं असण्याचंच नातं! बस तेव्हढंच पुरे!! 

पर्णहीन असलेल्या खोडावर एखादा निशाचर येऊन बसतो सावकाश. विसावा घेऊन झालं की देतो कर्णकर्कश हाळी व पंख फैलावत उडून जातो. काहीक्षण वाटत असतं आहे कुणीतरी सोबतीला, पण ते काहीक्षणच. हवी असते तशी साथ, यावं कुणीतरी, गुजगोष्टी कराव्यात, ख्यालीखुशाली विचारावी, मनमोकळं करावं, रितं व्हावं. आपलंसं होऊन जावं, पण ते तितकसं सोपं नसतं. मोकळं होता येतच नाही. आभासी क्षणिक जवळीक तशी आभासीच. निष्पर्ण वृक्षावर घरटं कधी करतात का पाखरं?

दिवस चटकन निघून जातो. रात्र सरतासरत नाही. ती सरपटत असते हळुहळू गोगलगायीसारखी. दूरसुदूर तमाचं साम्राज्य. दिवा लावो वा निओनसाइन्स. तमाचं राज्य अढळच, एकछत्री. क्षणाक्षणावर अंमल त्याचा. हटता हटत नाही तो काळोख, आत आत झिरपत जात असलेला, जन्मोजन्मीचं नातं असल्यागत. तो काळोखही आवडायला लागतो कधी ते कळतही नाही. मग रात्र होण्याची वाट पहायची सवयच लागते. काळोखाला घट्ट मिठी मारण्यासाठी. काळोखाला नसतात दिशा, काळोखाला नसतात मार्ग. काळोखाला नसतो तळ वा नसते गती. काळोख बऱ्याचदा असतो गोठून जाणारा क्षण. तोही कल्पेच्या कल्पे वाटावा असा. त्या गोठलेल्या काळोखाचं सौंदर्य शिल्पीत करावं अशी एक शलाका क्षणभर चमकून जाणारी. तीही निखळणाऱ्या ताऱ्यागत, उल्कागत. तरीही  तम, काळोख आपला वाटावा तो क्षण मोलाचा! 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एआय – मदतनीस की स्पर्धक… भाग – 2 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ एआय – मदतनीस की स्पर्धक… भाग – 2 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे  ☆

(आर्थिक व्यवहार प्रचंड वाढले. या वाढीव आर्थिक व्यवहारांना सहजपणे तोंड देईल अशी बँकिंग प्रणाली विकसित झाली.) – इथून पुढे 

पूर्वी प्रत्येक व्यवहार बँकेत जाऊन करावा लागे तिथे आता तसे करण्याची गरज उरली नाही. बँकेत कॉम्पुटर आले तशी जॉब जातील अशी ओरड करणाऱ्या युनियन्सचे देखील या ऑटोमेशनच्या रेट्यापुढे काहीही चालले नाही. देशाचे बजेट काही हजार कोटींचे असे ते काही लाखो कोटींचे झाले. ग्राहकाला बँकेत जाण्याची गरज नसल्याने ब्रांच मधील स्टाफ कमी झाला असला तरी बँकांची आणि ब्रांचेसची संख्या वाढल्याने बँक क्षेत्रात बेकारी वाढली नाही. पैसा खेळू लागला त्यामुळे बँकेचा स्टाफ जो कांऊटर बसून व्यवहार करत होता तो कार लोन, होम लोन,बिझनेस लोन देण्यसाठी मार्केटिंग करत फिरू लागला. ऑटोमेशनमुळे बँकेत जाऊन व्यवहार करण्याची गरज संपली तशी कॅश व्यवहार करण्याची गरज देखील संपली. अगदी १० रुपयांची वस्तू घेण्यास पैसे जवळ बाळगण्याची गरज देखील संपली. QR कोड नावाची जादुई गोष्ट प्रत्येक दुकानात फेरीवाल्याकडे आली. आर्थिक देवाणघेवाण गरिबच काय अशिक्षित देखील सहज करून लागला. सुट्या पैशांचा प्रश्न तर सुटलाच. पण उरलेले किती द्यायचे घ्यायचे ही वजाबाकी (होय काही सुशिक्षित तरुणांना देखील ही वजाबाकी अवघड जात असे)  करण्याचा प्रश्न पण संपला. बँकेत एके काळी राजकीय पक्षांच्या लोन वाटपाच्या योजनांसाठी लागणारी झुंड बंद झाली आणि सामान्य व्यावसायिक आत्मनिर्भर होऊ लागला. त्याचा क्रेडीट स्कोर तयार होऊ लागला. लोन देण्यसाठी बँक पुढे येऊ लागली कारण लोन बुडणार नाही याची खात्री बँकेला झाली.

इतके दिवस ऑटोमेशन मानवी कष्ट कमी होतील किंवा कमीत कमी मानवी कष्टात जास्तीत जास्त उत्पादकता मिळावी या साठी होती. उत्पादकतेबरोबरच गुणवत्ता आणि अचूकता हा देखील उद्देश होता. आता हे ऑटोमेशन मानवी क्षमताच्या आणि भावभावनांच्या ताबा घेऊ लागले आहे किंवा त्यावर मात करू लागले आहे. उदा. गाडी चालवणे ही केवळ मानवी क्षमता असे आजवर आपण मानत आलो आहोत. कारण गाडी चालवताना कान आणि डोळे या ज्ञानेंद्रियांकडून जे ज्ञान होते, त्या ज्ञानाचे मेंदूंत अतिशय वेगाने पृथक्करण करून ड्रायव्हरला गाडीचा वेग वाढवणे, कमी करणे,आपत्कालात प्रसंगी क्षणात ब्रेक दाबणे, जरुरी इतके डावीकडे वा उजवीकडे वळणे इत्यादी क्रिया आपला मेंदू इतर अवयावांकडून सहजतेने घडवून आणतो. एकदा गाडी चालवण्याचे तंत्र शिकले की गाडी केव्हाही हातात घ्या आपला मेंदू आणि इतर अवयव एकमेकांशी संवाद साधून आपण अपघातरहित गाडी चालवतो. हे केवळ मानवाला दिलेले ईश्वरी वरदान आहे असा आपला आजवरचा समज. अर्थात गाडी चालवताना मेंदू आणि अवयव यांच्यातील संवाद काही कारणाने वा लक्ष विचलित झाल्याने तुटला तर अपघात हमखास. हे लक्ष विचलित होणे ही चूक मानवाच्या हातून होणे ही सहज प्रवृत्ती आहे. पण ही चूक प्राणांतिक ठरू शकते. ए-आय या मानवी चुकांपलीकडे काम करण्याची क्षमता ठेवते. यात कारला चहू बाजूने कॅमेरे लावलेले असतात. या कॅमेर्यांनी घेतलेल्या फोटो एका कृत्रिम मेंदूकडे पाठवले जातात हा मेंदू (CPU) या इमेजेसचे तत्काळ पृथक्करण करून गाडीत असलेल्या वेगवेगळ्या मोटोर्सना (अवयव) आज्ञा देऊन काय action घ्यायची हे घडवून आणतो. हे काम मानवी मेंदू आणि त्यांचे अवयव ज्या तत्परतेने करतात त्यापेक्षा अधिक वेगाने आणि अचूक घडू शकते. आता ड्रायव्हरची गरजच नाही. ए-आयला मानवी भावभावना नसल्याने चित्त विचलित होण्याचा प्रश्नच नाही. शिकवलेले काम मुकाट्याने करायचे. रस्त्यात सुंदर मुलगी दिसली म्हणून चित्त विचलित झाले. घरी बायकोशी भांडण झाले म्हणून आज गाडी अवास्तव वेगात नेली आणि धडकवली हा प्रश्नच नाही. आता भावभावनांच्या कल्लोळातून अपघात होण्याचा प्रश्न टळला. कोणत्याही नव्या डेव्हलपमेंटनवे प्रश्न उपस्थित नको का व्हायला? मग अशा ए-आय चलित गाड्या आल्या तर ज्या लाखो ड्रायव्हरांना नोकऱ्या मिळतात त्यांच्या बेकारीचे काय. ग्राहकाला नाकारणे, अवास्तव पैसे मागणे, उर्मटपणे बोलणे हे दुर्गुण घेऊन जर ड्रायव्हर ग्राहकाशी वागणार असतील तर उद्या OLA UBER अशा गाड्या घेऊन रस्त्यावर आल्या तर काय हा प्रश्न आहे. अशा गाड्या महाग आहेत आणि फक्त अतिश्रीमंतांना त्या परवडतील त्यामुळे काळजी नाही असा जर आपला समज असेल तर तो खोटा आहे. आज गाडीच्या भोवती लावलेले कॅमेरे गाडी चालवताना चालकाला अपघाताची क्षमता असलेल्या जागेची सूचना देऊ लागल्या आहेत. अगदी ५० फुटावर असलेला स्पीड ब्रेकर गाडीला ओळखता येतो. किंवा रस्त्यावरचे खड्डे ओळखून गाडीतील लोकांना त्रास होणार नाही नाही या नुसार गाडीचा वेग कमी होऊ शकतो अशी वाहने बाजारात सहज उपलब्ध होत आहेत. तेव्हा ए-आय आधारित स्वस्त कार्स फार दूर नाहीत. वर कारचे उदाहरण दिले आहे. अशा अनेक जागा ए-आय माणसाकडून हिसकावून घेते आहे. अनेक रेस्टॉरंटमध्ये वेटर्सची जागा ए-आय रोबोट्सनी घेतली आहे. डिलिव्हरीबॉय डिलिव्हरीड्रोन घेतायत. जगातले अनेक संशोधक नवनव्या कल्पनांना मूर्त स्वरूप देऊन या कामात आपली creativity दाखवत आहेत. ए-आय हे केवळ शाप की वरदान हा निबंध लिहिण्याइतकेच मर्यादित नाही तर त्यापलीकडे मानवी जीवनावर परिणाम साधणारे आहे. यात केवळ ड्रायव्हर, डिलिव्हरीबॉय आणि वेटर्सचे जॉब जाणार नाहीत तर चित्रकार, कलाकार, व्हाईस artist, actors, क्लार्क, शिक्षक, मॅनेजरस् अशा अनेकांना आपले स्कील वा ज्ञान ए-आयच्या पलीकडे अद्ययावत ठेवावे लागणार आहे. हा तंत्रज्ञानाचा रेटा कोणीच रोकु शकणार नाही. रेल्वेत, मेट्रोमध्ये बुकिंग क्लार्क आता लागतच नाहीत. तंत्रज्ञानामुळे मेट्रोमध्ये विदाऊट तिकीट तुम्ही जाऊच शकत नाही. रस्त्यावर ट्राफिक नियमांचे केलेलं उल्लंघन तुमच्या मोबाईलवर त्याचे चलन येते कारण कॅमेरे तुम्हाला गुन्हा करताना ओळखतात. ‘उपरवाला सब देख रहा है’ ही उक्ती आता प्रत्यक्षात आली आहे ती ए-आयमुळे. अमेरिकेत येणाऱ्या परदेशी प्रवाशांना तपासणीमधून जावे लागत नाही ए-आय कॅमेरे तुम्हाची ओळख पटवून घेतात नी तुम्हाला अमेरिकेत प्रवेश द्यायचा की नाही हे ठरवतात. कारण तुमची ओळख ए-आय कॅमेरे ज्या अचूकतेने घेतो ती मानवाच्या दृष्टीतून कधीतरी सुटू शकते.  बेकायदेशीर मानवी तस्करी,गुन्हेगारांचा शोध ए-आय सहज घेऊ शकते. पोलिसांना ए-आय वरदान ठरणार आहे. उद्या ए-आय स्वयंपाकघरात येणार आहे. गृहिणीचा वा गृहस्थाचा सुगरणपणा ए-आय माध्यमातून काय स्वयंपाक करायचा आणि चव कोणती आणायची हा असणार आहे.

ए-आय हा मानवाचा मदतनीस असणार त्यापेक्षा जास्त स्पर्धक असणार हे निश्चित. इतकी वर्षे ऑटोमेशन मशीनपुरते मर्यादित होते. आता एआयमुळे ते मानवापर्यंत येऊन ठेपले आहे.  या स्पर्धाकाशी मुकाबला सोपा नाही. गेली २५ वर्षे softwareक्षेत्राने मध्यम वर्गाला उच्च मध्यम वर्ग अथवा श्रीमंतीचे दिवस आणले. त्यांचा गर्व देखील हे एआय उतरवणार आहे. Software coding आता एआय करू लागले आहे. एके काळी मॅट्रीक पास होण्याच्या जोरावर नोकरी मिळवणे आणि ती रिटायर होईपर्यंत टिकवणे शक्य होई. आता ही मंडळी आता भाग्यवान वाटू लागली आहेत. छोट्याश्या ज्ञानाच्या भांडवलावर संसार ४-४ मुलाबाळांची लग्ने केली. आता आपले आज कमावलेले ज्ञान उद्या निकामी आणि निरुपयोगी ठरणार आहे. ज्ञानाची कुशलतेची expiry date पाच वर्षांच्या आत येते आहे. कशी टक्कर देणार याला हा मोठा प्रश्न आहे.  आपली विनयशीलता,कार्यक्षमता, बुद्धिमत्ता, चातुर्य  या गुणांवर काही प्रमाणात टक्कर देणे शक्य आहे. मत्सर, इर्षा,भांडखोरवृत्ती, उर्मटपणा सोडला आणि एकमेकांना धरून या स्पर्धेवर मात करावी लागेल. नाहीतर बायको/नवऱ्याचा  प्रेयसी/प्रियकराचा स्वभाव फार किरकिरा आहे म्हणून कोणी एआय ड्रिव्हन अलेक्सा अथवा जॉन बरोबर रहाणे पसंत करू लागले तर ही स्पर्धा कुठपर्यंत जाईल हे सांगता येणार नाही. काळजी घेऊयात. नाहीतर…..पस्ताओगे.

असो. ऑटोमेशनविषयी सध्या इतकेच.

– समाप्त – 

© श्री श्रीकांत कुलकर्णी

मो ९८५००३५०३७ 

Shrikaant.blogspot.com;  Shrikantkulkarni5557@gm

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

पुणे

मो – 9657709640 Email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ इटुकली — ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

इटुकली — ☆ डॉ. जयंत गुजराती

घरभर फिरली भिरभिरत्या पंखाने. अक्षरशः नाचतच होती इथून तिथे. पाय म्हणून, ठरतच नव्हते. जणू सगळं घाईचंच होऊन बसलं होतं. सांगावंसं वाटलं, अगं जरा हळू चाल…. पण ती काही ऐकणार नव्हती. तिचं आपलं निरीक्षण चालू होतं दिवसभर बस्तान कुठे बसवायचं ते. तिच्या चिवचिवाटाने कान कावले होते. मधूनच ती गायब होई. पुन्हा काहीवेळात खिडकीच्या गजावर दिसे. मग हॉलभर फिरे.  किचनमधे उडे, व्हरांड्यातून तर सारखी येजा. बेडरूममधे ही चक्कर मारून आली. कधी ट्युबलाईट वर विसावे तर कधी पंख्यावर विसावे. कधी कपाटावरचा कोपरा धुंडाळे तर कधी खोल्यांमधल्या दारांवरून सूर मारे.  शेवटी वैतागून मीच तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवलं. 

दुसऱ्या दिवशी सकाळीस ती लगबगीत असलेली इटुकली दिसेना म्हणून मीच अस्वस्थ झालो. बायको म्हणाली, ‘येईल पुन्हा, ’ मी वर्तमानपत्र हातात घेऊन स्वस्थ होण्याच्या प्रयत्नात. पण थोडंफार वाचून झाल्यावर, वर्तमानपत्र हलकेच खाली सरकलं जाई, मग माझी नजरच भिरभिरायला लागे. ती कुठेच दिसेना तर पुन्हा डोकं वर्तमानात खुपसलं.  तसाच ऑफिसला गेलो. मनात प्रश्नचिन्ह घेऊन, ‘ कुठे गेली असेल? ’ दिवसभर मीच ‘चिवचिव’ला अधीर. संध्याकाळी घरी आलो तरीही घरभर शांतताच. अगदी अचानक आलेली पाहुणी अलोप व्हावी याची रूखरूख मनात. 

सकाळीस जाग आली ती घागर हिंदकळावी खळखळून तसं हिचं  माझे दोन्ही बाहू धरून उठवणं चालू होतं.  काय? माझा प्रश्नचिन्ह असलेला चेहेरा पाहून ती बोलली. चला वरती हे बघा पोटमाळ्यात काय आहे ते!! धडकीच भरली. असं काय असेल सकाळी सकाळी पोटमाळ्यावर? मी तडक पाहिलं तर पोटमाळ्यावर एक कोनाडा रिकामा सुटलेला होता त्यात लगबगीनं ती इटुकली व तो पिटुकला वरच्या कौलांतून  व पोटमाळ्याच्या त्रिकोणी खिडकीतून वाट काढत गवताच्या काड्या व काटक्या गोळा करून आणून टाकत होते. बस्तान बसवायला जागा सापडली तर मी मनात खुश होऊन पुटपुटलो. खाली येताच छानशी शीळही घातली मी. तसं आल्याचा चहा हातात देत बायकोने कोपरखळी मारलीच. ‘ आली ना परत पाहुणी!! झाला ना मनासारखा शेजार!! ’ मीही चहाचा घोट घेत फिरकी टाकलीच, ‘ सखी शेजारिणी!! ’ तसं दोघं हसत सुटलो. 

दोन तीन दिवसात हॉल कम बेडरूम कम सबकुछ छानसं घरटं उभं राहिलं. त्यात कुठूनतरी कापूसही आणून टाकला होता बहुतेक पिटुकल्याने. बोर्ड लावायचं का? हिचं तुणतुणं चालूच. डोळ्यात मिश्कीली. तर माझ्यात पुन्हा प्रश्नचिन्ह. तिनंच खुलासा केला, ‘ छोटंसं बॅनर, नांदा सौख्यभरे! ’ आता माझ्यापेक्षा हीच जास्त गुंतत गेली. मातीचं खापर आणलं बाजारातून त्यात पाणी भरून ठेवलं. रोज वाटीभर मऊसूत भातही पोटमाळ्यावर पोहोचायला लागला. “ आणखी काय काय आवडतं हो खायला त्यांना, मी करत जाईन तेवढं!! ” मला तसं म्हटलं तर पाखरांबद्दलचं ज्ञान अगाधच!!  पोपट असता तर हिरवी मिरची, पिकलेला पेरू वगैरे सांगून तरी टाकलं असतं. मग हिनेच शक्कल लढवत, शिजवलेले तेही वाफाळलेले हिरवे मूग, वाफाळलेलेच मिठातले शेंगदाणे, लालचुटूक डाळिंबाचे दाणे अन् काय काय सुरू केलं!! मी आपला प्रश्नकर्ता नेहेमीचाच…. “ अगं इतकं सगळं लागतं का त्यांना? ” हिनं मान डोलावत चपखल उत्तर दिलं. “ तुम्हाला नाही कळायचं, डोहाळे लागले की लागतंच सगळं!! ” प्रश्नचिन्हा ऐवजी माझे डोळे विस्फारलेले. “ तुला कसं कळलं शुभवर्तमान? ” “ बघाच तुम्ही, मी म्हणतेय ते खरं की नाही? ’ तसं हीचं काहीच चुकत नाही. काही दिवसांतच सहा अंडी प्रकट जाहली मऊसूत कापसावर.  

मग काय इटुकली ठाण मांडून कोनाड्यात तर पिटुकल्याची येजा वाढली आतबाहेर. घरात कोवळे जीव वाढणार याचा कोण आनंद आम्हा दोघांना, त्या दोघांसह.  चैनच पडेना. सारखी उत्सुकता. ऑफिसमधूनही हिला विचारणं व्हायचं, “ एनी प्रोग्रेस? ” दिवसातून दोन तीनदा पोटमाळ्यावर चढणं.  काही हालचाल दिसतेय का? हे पाहणं! अजून काहीच कसं नाही? हा प्रश्न खांबासारखा उभाच. “ सगळं निसर्गनियमा सारखं होईल, धीर धरा. ” हिचा मोलाचा सल्ला. तरीही आतून आमचाच जीव वरखाली!! खरंतर आमचे अगोदर कावलेले कान आतुरलेले कोवळी चिवचिव ऐकण्यासाठी. 

(२०/०३/२०२३ – # जागतिक चिमणी दिवस)  

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ झुळुक… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ झुळुक… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 ‘ वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, 

  घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे ‘

माझ्या बाल्कनीतल्या झोक्यावर संध्याकाळी बसले की मन असे स्वैरपणे फिरत असते. तीन-चार वर्षांपूर्वी लॉकडाऊनच्या काळात बाहेर फिरता तर येत नसे, पण या झोक्यावर बसून मन मात्र भरपूर फिरून येई. दिवसभराच्या उन्हाच्या काहिली नंतर येणारी संध्याकाळची वाऱ्याची झुळूक तन आणि मन दोन्ही शांतवून टाकते. थंडी किंवा पावसाळ्यात या झुळूकेचे तितके महत्त्व नाही ,पण उन्हाळ्यात ही झुळूक खूपच छान वाटते! दु:खानंतर येणार सुख जसं जास्त आनंद देते तसेच आहे हे!

सतत सुखाच्या झुल्यावर झुलणाऱ्याला ती झुळूक कशी आहे हे फारसे जाणवणार नाही, पण खूप काही कष्ट सोसल्यानंतर येणारे सुखाचे क्षण मात्र मनाला गार  वाऱ्याच्या झुळूकीचा आनंद देतात!हीच झुळूक कधी आनंदाची असते, 

कधी मायेची असते. एखाद्याला घरात जे प्रेम मिळत नाही पण दुसऱ्या कुणा कडून तरी, अगदी जवळच्या नात्यातून, शेजारातून किंवा मित्र-मैत्रिणींकडून मिळते तेव्हा तो प्रेमाचा सुखद ओलावा ही त्याच्या मनाला मिळालेली आनंदाची झुळूक असते!

कधी कधी साध्या साध्या गोष्टीतूनही आपण आनंद घेतो. गर्दीने भरलेल्या बसमध्ये कशीबशी जागा मिळून बस जेव्हा सुटते, तेव्हा खिडकीतून येणारी वाऱ्याची झुळूक आपल्याला’ हुश्श’ करायला लावते. कधी अशी झुळूक एखाद्या बातमी तून मिळते. अपेक्षा नसताना एखादी चांगली गोष्ट घडली तर ती सुखद झुळुकीसारखीच असते. माणसाचे आयुष्य सतत बदलत असते. कधी एकापाठोपाठ एक इतकी संकटे येतात की त्या सर्वांना कसे तोंड द्यावे कळतच नाही! पण अशावेळी अचानकपणे एखादी चांगली गोष्ट घडते की, त्यामुळे आयुष्याला कलाटणी मिळते!

माझ्या परिचित एका मैत्रिणीची गोष्ट. तिच्या नवऱ्याचा एक्सीडेंट झाला. जीव वाचला पण हॉस्पिटलमध्ये दोन महिने पडून राहावे लागले. दोन लहान मुली होत्या तिला. नवऱ्याचा व्यवसाय बंद पडलेला.. राहायला घर होते पण बाकी उत्पन्नाचे साधन नव्हते. पण अचानकपणे तिने अर्ज केलेल्या नोकरीचा कॉल आला. ट्रेनिंग साठी एक महिना जावं लागणार होतं, मुलींना आपल्या नातेवाईकांजवळ सोपवून ती ट्रेनिंग पूर्ण करून आली.आणि  नोकरी कायमस्वरूपी झाली आणि आयुष्यात सुखाची झुळूक आली.

वादळ वाऱ्यात झाडं ,घरं, माणसं सारीच कोलमडतात.. वादळ अंगावर घेण्याची कुवत प्रत्येकात असतेच असे नाही. पण ‘झुळूक’ ही सौम्य असते. ती मनाला शांती देते.

लहानपणी अशी झुळूक परीक्षेनंतर मिळायची. भरपूर जागरणे, कष्ट करून अभ्यास करायचा आणि मग पेपर्स चांगले गेले की मिळणारा आनंद असाच झुळूकीसारखा वाटायचा! रिझल्ट ऐकला की मन अगदी हलकं फुलकं पीस व्हायचं आणि वाऱ्यावर तरंगायला लागायचं! अशावेळी कृतकृत्यतेची झुळूक  अनुभवायला मिळायची!

वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या रूपात ही झुळूक आपल्याला साथ देते. कधी कधी आपण संकटाच्या कल्पनेने ही टेन्शन घेतो. प्रत्यक्ष संकट राहत दूर ,पण आपलं मन मात्र जड झालेलं असतं! अचानक कोणीतरी सहाय्य करते , आणि संकट दूर होते. एका आगळ्या झुळुकेचा अनुभव मनाला येतो.

कोरोनाच्या काळात आपण अशाच कठीण परिस्थितीतून जात होतो. मन अस्थिर झालं होतं. जीविताची काळजी, भविष्याची काळजी दिसून येत होती. प्रकृती आणि नियती दोन्ही आपल्या हातात नाहीत! पण तेच कोरोनाचं संकट जसं दूर झालं, तशी मनामध्ये समाधानाची झुळूक येऊन गेली! काही काळातच रोगाचे उच्चाटन झालं आणि निसर्गाने हिरावून घेतलेले आपले स्वातंत्र्य पुन्हा आपल्याला मिळाले! ती ‘सुखाची झुळूक’ अशीच सौम्य आनंद देणारी होती. सोसाट्याचा वारा आणि वादळ माणसाला सोसत नाही, त्याचप्रमाणे संकटांचा माराही झेलताना माणसाला कठीण जाते! पण थोडंसं जरी सुख मिळालं तर ती ‘सुखाची झुळूक’ माणसाला आनंद देऊन जाते.

संकटाच्या काळावर मात करताना कुठून तरी आशाताई स्वर येतात, “दिस येतील, दिस जातील…” या गाण्याचे! कोणत्याही संकटाला कुठेतरी शेवट असतोच, जेव्हा एखादं वादळ परमोच्च क्षमतेवर असतं तेव्हा कधीतरी ते लयाला जाणारच असतं! ते वादळ जाऊन शांत झुळूक येणारच असते.पण तोपर्यंत त्या  वादळाला धीराने, संयमाने तोंड देत वाट पहावी लागते ! …. 

… तेव्हाच त्या वादळाचे झुळुकीत रूपांतर झालेले आपल्याला अनुभवायला मिळते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– तेजस्वी पित्याचे ते वात्सल्याचे हात..! – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – तेजस्वी पित्याचे ते वात्सल्याचे हात..! – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

(सोनेरी संक्रांत)

(आमचे दातार बाबा आता 94 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्यानिमित्त त्यांना अनंत शुभेच्छा…)

१४ जानेवारीची संध्याकाळ. मी आणि सुनील नुकतीच मैत्री झालेल्या आमच्या एका मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त  शुभेच्छा द्यायला स्कूटरवरून, अंधेरीला चाललो होतो. त्यादिवशी मुंबईत प्रथमच इतकं झोंबरं गार वारं वाहत असेल. गार गार वारं खात, शिवाजी पार्कहून अंधेरीला पोहोचेस्तोवर आमचाच बर्फ होऊन गेला होता! 

माझी मैत्रीण अनिताने (वाकलकर) अत्यंत प्रेमानं आमचं स्वागत केलं आणि आम्हाला घराच्या गच्चीत नेलं. तिथं ए.सी.पी. श्री.व सौ.लोखंडे, जयकर काका, अनेक कार्यक्रमांचे आयोजक, अनिताचे आईवडील, बहीण अशी काही मंडळी जमली होती. गप्पाटप्पा झाल्यावर लोखंडेंनी बेंजो वाजवून आणि काही इंग्लिश गाणी गाऊन पार्टीत साजेल अशी धमाल आणली! जयकर काकाही नेहमीप्रमाणे या आनंदात सामील झाले होते. आता माझीही गाण्याची वेळ  येणार, हे मी जाणून होते.

काळा फ्रिलवाला फ्रॉक घातल्याने आधीच पाय गारठून गेले होते. त्यात गावं लागणार, या विचाराने आणखी थंडी वाढत गेली. मित्रमंडळींची धमाल संपल्यावर, मला सर्वांनी गायला सांगितलं. अगदी घरगुती समारंभ असल्याने, मीही लगेच मानेनं होकार दिला. जयकर काकांनी फर्माईश केलेलं ‘मैं मंगल दीप जलाऊँ’ हे भजन मी गायलं. थंडीमुळे हरकतीही सरास्सर येत होत्या! गाणं नेहमीप्रमाणे झालं.

तिथं जमलेल्या मंडळींपैकी, साठीच्या आसपासचे एक सदृहस्थ मला येऊन भेटले. “अहो, तुम्ही गाणं छान म्हटलंत, पण याची कॅसेट मिळू शकेल काय? मी आत्ताच त्याचे पैसे देतो.” मला मनातून खूप हसू आलं, पण चेहऱ्यावर मी दाखवलं नाही. मराठी माणूस आणि ताबडतोब पैसे देऊन कॅसेट घ्यायची स्पष्ट तयारी? मी मनात म्हटलं, ‘असेल बुवा…. !’ आणि त्यांना सांगितलं, “माझी ‘मंगलदीप’ नावाची कॅसेट मी तुम्हाला देऊ शकते. ते म्हणाले, “उद्या सकाळी मी माझ्या माणसाला पाठवतो.”

त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्यांचा ड्रायव्हर दोन्ही हातात लालकंच, टचटचीत  स्ट्रॉबेरीची दोन प्युनेट्स घेऊन आला. “आमच्या दातार साहेबांच्या शेतावरची हायेत.” तो म्हणाला. “दातार साहेबांनी कॅसेट मागितली व त्याचे हे शंभर रुपये!”  मी त्यांना कॅसेट दिली व पैसे नकोत म्हणून खुणेनंच सांगितलं. मला खूपच गंमत वाटली. कितीतरी वेळ  मी त्या स्ट्रॉबेरीकडे पाहात होते आणि मनातल्या मनात हसत होते. मला स्ट्रॉबेरी आवडते म्हणून नाही –  तर कॅसेट दिली म्हणून स्ट्रॉबेरी दिली त्यांनी? असो. पण छान झालं म्हणून मी तो विषय तिथंच सोडला. 

३१ जानेवारी १९९४. माझ्या स्वतंत्र कार्यक्रमाला ‘मंगलदीप’ नावाने अधिष्ठान लाभलं आणि तो दिवस दोन्ही अर्थांनी माझ्या आयुष्याला सुरेल वळण देणारा, सुंदर कलाटणी देणारा ठरला. हा ‘तेजाचा मंगलदीप’ माझ्या आयुष्याला उजाळा देणाराही ठरला. ती माझ्या आयुष्यातली ‘सोनेरी संक्रांत’ होती!

तो कार्यक्रम गोरेगांवच्या अभिनव कला केंद्रातर्फे त्यांच्या शाळेच्या हॉलमध्ये होता. हॉल गच्च भरला होता. राजेश दाभोळकरांची सिस्टिम असल्याने माइक टेस्टिंग करतानाच आज कार्यक्रम सुंदर होणार, रंगणार, हे माझ्या लक्षात आलं. ‘मैं मंगलदीप जलाऊँ, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘काय सांगू शेजीबाई’, ‘लव लव करी पातं’, अशी अनेक गाणी झाली. दातारसाहेब, अनिताच्या वडिलांबरोबर माझ्यासाठी फुलांचा सुंदर गुच्छ घेऊन आले होते. जयकर काकांनीही छान गुच्छ आणला होता. मला आपल्या ओळखीच्या लोकांनी कौतुक केलेलं पाहून खूप बरं वाटलं. कार्यक्रम खूपच रंगला, तसा दुसर्‍या दिवशी सर्वांचा फोनही आला.  आणि आश्चर्य म्हणजे, मला न सांगता, गुपचूप दातार साहेबांनी या कार्यक्रमाची ऑडिओ कॅसेट मोठ्या हिकमती करून मिळवली! हे त्यांनी आमच्या पुढच्याच भेटीत प्रांजळपणे सांगितलंही! 

असे हे नाशिकचे संपूर्ण दातार कुटुंबीय माझ्या गाण्यांचे चाहते! दातार साहेबांची  पत्नी निर्मला, ही माझ्या ‘निवडुंग’ चित्रपटातील ‘केव्हातरी पहाटे’ आणि ‘लवलव करी पातं’ या गाण्यांच्या  जबरदस्त प्रेमात! ‘ही छोटी पद्मजा संगीताच्या क्षेत्रात आणखी पुढे कशी जाईल? त्यासाठी आपल्याला काय करता येईल?’ असा विचार नेहमी निर्मलाकाकूंच्या  मनात असे. 

३१ जानेवारी १९९४ च्या रात्री  उशीरा नाशिकला घरी पोहोचल्यानंतर, दातार साहेबांचा  मुलगा राजन, सून शोभना, आणि नात स्नेहा यांना ती कॅसेट त्यांनी ऐकवली. त्यावर तत्काल या सर्वांच्या प्रतिक्रिया मला देण्यासाठी दुसऱ्या दिवशी फोन केला आणि म्हणाले, “स्नेहा केवळ दहा वर्षांची आहे. तुम्ही सादर केलेल्या ‘मैं मंगलदीप जलाऊँ’ या पहिल्याच गाण्यामध्ये ‘तू प्रेम का सागर बन जा, मैं लहर लहर खो जाऊँ’ या ओळी स्नेहाने ऐकल्या. ते सूर तिच्यापर्यंत पोहोचले आणि त्यात ती हरवून गेली. एका दहा वर्षांच्या मुलीला खिळवून ठेवणारी सुरांमधली ती ताकद बघून, आम्हां सर्व कुटुंबियांचा तुमची काही गाणी रेकॉर्ड करण्याचा निर्णय त्याक्षणी पक्का झाला.”  

दातार परिवाराच्या  या स्नेह आणि आशीर्वादातून ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’, ‘रंग बावरा श्रावण’, ‘घर नाचले नाचले’, ‘गीत नया गाता हूँ’, या ध्वनीफितींचा, तसंच अनेक उर्दू गझला, अभंग, गीते  यांचा जन्म झाला. ही फेणाणी-जोगळेकर आणि संपूर्ण दातार परिवारासाठीही  परम आनंदाची गोष्ट आहे! या सगळ्या ध्वनीफितींच्या रेकॉर्डिंग दरम्यान आम्हां दोन्ही कुटुंबियांच्या गाठी भेटी वाढल्या, आणि हे दातारसाहेब आमच्या संपूर्ण कुटुंबियांचे ‘दातारबाबा’ कधी झाले, ते कळलंच नाही! 

अशा ह्या तीर्थरूप दातारबाबांनी मला वैयक्तिक, सांस्कृतिक, सांगितिकदृष्ट्या सर्वार्थाने घडवलं, त्यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त मी काय गाऊ, काय बोलू, असा प्रश्न मनात असतानाच, नाशिकचं आणि साहित्यातलं आपलं सगळ्याचं दैवत म्हणजे आदरणीय कुसुमाग्रज, अगदी श्रीकृष्णासारखे माझ्या मदतीला स्वप्नात धावून आले आणि कानात कुजबुजले, ‘पद्मजा, ज्यांच्यासाठी संगीत, साहित्य, कला, हाच परमोच्च आनंद आहे, परमेश्वर आहे आणि जीवनाचं हेच वैभव आहे, त्या आपल्या बाबांना तू एकच सांग…’

‘तुझेच अवघे जीवित वैभव काय तुला देऊ?

काय तुला वाहू मी काय तुला वाहू?…’

आज मला आठवते, ती १४ जानेवारी १९९४ची माझी आणि सुनीलची, बाबांशी झालेली पहिली भेट! मकरसंक्रांतीचा दिवस! त्यादिवशी एकदाच त्यांना, “तिळगूळ घ्या आणि गोड बोला” म्हणायची संधी मिळाली. कारण त्यानंतर त्यांच्यासारख्या स्पष्टवक्त्या माणसाला, गोड बोला म्हणणं, फार कठीण होतं! कधी कधी संगीतावरून, कवितेवरून आणि अनेक गोष्टींवरून आम्ही कैकवेळा अगदी कचाकचा भांडलो. अगदी जन्माचे वैरी असल्यासारखे! पाहणाऱ्याला वाटेल की झालं, आता सारं संपलं! पण त्यानंतर फक्त १० मिनिटांतच बाबांचा फोन येतो, “अगं, पद्मजा, आज वृत्तपत्रात वाचलेल्या एका लेखात, पत्रकार टेंबे काकांच्या लेखात इंदिरा संतांच्या कित्ती सुंदर ओळी आल्यात पहा…. अगदी चित्ररूप आहेत !”

*“दारा बांधता तोरण, घर नाचले नाचले,

आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाऊले”*

खरोखरीच अस्साच सोनचाफ्याचा सुगंध घेऊन बाबा आमच्या आयुष्यात आले.आणि  इंदिराबाईंच्या शब्दांप्रमाणे…

“येऊ देत माझ्या घरी किरणांचे झोत ..  तेजस्वी पित्याचे ते वात्सल्याचे हात”….

असे वात्सल्याचे हात अगदी थेट, कधी आईच्या तर कधी वडिलांच्या मायेने आम्हां सर्वांच्या पाठीवरून कौतुकाने फिरले.

जगावं कसं? वागावं कसं? शब्दोच्चार स्पष्ट कसे म्हणावेत? कागदावरील शब्द ‘जिवंत’ करून ‘अर्थपूर्णरित्या’ कागदातून बाहेर कसे काढावेत, याचं भान मला बाबांनीच दिलं. सुरुवातीला वाटायचं दगड, माती, सिमेंट, धोंडे यात बुडालेला बिल्डर मला काय सांगणार? मी हट्टी! कलावंत ना! माझा हेका मी सोडत नव्हते, परंतु हळूहळू लक्षात आलं, या नाशिकच्या मातीत, काश्मीरसारखं जसं प्रत्यक्ष केशर फुलवून त्यांनी यश खेचून आणलं, तसंच माझ्या गाण्यातही, ही जाण वाढवून केशराचा सुगंध पेरला!

‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ रेकॉर्ड करत असताना, कवितेचा प्रत्येक शब्द न् शब्द स्पष्ट नि भावपूर्ण आला पाहिजे, याकडे त्यांचा आवर्जून कटाक्ष असे. सर्वस्व तुजला वाहुनी’ या गझलेतील ‘हुंदका’ हा शब्द, मला हुंदका फुटेस्तोवर माझ्याकडून गावून घेतला.  ही गझल जेव्हा कुसुमाग्रजांनी माझ्याकडून पहिल्यांदा ऐकली, तेव्हा विंदांच्या शब्दांच्या ताकदीमुळे तात्यांचे (कुसुमाग्रजांचे) पाणावलेले, तरीही तृप्त डोळे मला आजही आठवतात.

कोणतीही कविता गाण्यापूर्वी, बाबा त्या कवितेतील प्रत्येक शब्दाच्या अर्थाचा, उच्चारांचा   माझ्याकडून अभ्यास करवून घेत. ‘गीत नया गाता हूँ’ या माजी पंतप्रधान अटलजींच्या कविता ऐकून दुसरे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी, त्यांच्या कविता स्वरबद्ध करायला दिल्या. यातील काही कविता तीन ओळींच्या तर काही साडेसात ओळींच्या……  त्या भावपूर्ण होतील, अशा पद्धतीने बाबांनी मला जोडून दिल्या. इंडस्ट्रीतील सर्वोत्तम सर्व कलाकार, उत्कृष्ट रेकॉर्डिंग स्टुडिओत रेकॉर्ड करून तासन्‌तास बाबा त्यात रस घेऊन संगीताचा, रेकॉर्डिंगचा अभ्यास करायचे, तेही न थकता अत्यंत उत्साहाने! संगीत हे त्यांच्यासाठी कायम ‘S’ Vitamin चं ठरलं. 

माझा मुलगा आदित्यशी, त्याच्याच वयाचा होऊन क्रिकेट खेळणारे, त्याला आईच्या तक्रारी बिनदिक्कत सांगायला हक्काचं स्थान असलेले आजोबा दातारबाबा! सुनीलला, माझा भाऊ विनायकला, महत्त्वाच्या प्रसंगी योग्य मार्गदर्शन करणारे, उषाताईला, अटलजींचे पोर्ट्रेट करताना प्रोत्साहन देणारे बाबा, नाईक, खरे, धारप, सुभेदार इत्यादी सर्व मित्रांशी गप्पा मारताना सात मजली गडगडाटी हास्य करणारे, ‘गीत नया…’ कॅसेटचा सोहळा दहा दिवसांत करा, असा, पी.एम. हाऊसमधून फोन आला असताना, कधीही न घाबरणारे, पण दहा दिवसांत थाटात सर्व काही झालं पाहिजे, या विचाराने थरकापणारे, पण निश्चयाचा महामेरू असणारे, नात स्नेहाचे नृत्य डोळ्यातून प्रेम ओसंडून पहातानाचे बाबा, दगड, विटा, माती, धोंडे यांनी घेरलेले बिल्डर बाबा, त्यातून मला कवितेचे विविध रंग समजावणारे बाबा, लेक राजनच्या अफाट बुद्धिमत्तेविषयी, प्रगतीविषयी ऊर भरून कौतुक करणारे, सून शोभनाचेही कौतुक करणारे, पत्नी निर्मलाने त्यांना कसे विविध विषयांत घडवले, हे अभिमानाने सांगणारे बाबा, तसंच आमच्या  सर्वांचा ‘उंच उंच माझा झोका’ पाहताना उचंबळून येणारे, सर्वांवर प्रेमाचा अतिवर्षाव करणारे बाबा, अशी ही बाबांची अनेक वेगवेगळी रूपं मला वेळोवेळी दिसतात म्हणून म्हणावंसं वाटतं,

‘आई, बाबा, मित्र, गुरू, अन् तुम्ही संगीतसारथी;

तुम्हापुढे फिकेच पडतील, अतिरथी महारथी…!’

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares