लहानपणी आम्ही कोपीनेश्वरच्या देवळात देवदर्शनाला जात असू.ठाण्यातलं हे प्रसिदध मंदीर. भव्य, रम्य परिसर..समोर सुरेख तलाव..
देवळातला ऐसपैस चौक..देखणा नंदी आणि गाभार्यातली ती ऊंच शंकाराची पिंड..
देवळात शिरताशिरताच,प्रथम घंटा वाजवायची.
तेव्हां माझा हात घंटे पर्यंत पुरायचा नाही. मग आजीच्या कडेवर बसुन छान दणदण घंटा वाजवायची…मग नंदीचेआणि पिंडीचे दर्शन..
देवळातून परततानाही मला घंटा वाजवावीशी वाटे. पण आजी सांगायची ,”परतताना घंटा नसते वाजवायची…”
तेव्हां मनात हे प्रश्न कधी आलेच नाहीत. देव दर्शनाआधीच घंटा का वाजवायची.परतताना का वाजवायची नाही…
पण नंतर माझ्या थोड्याशा खेळकर, मिस्कील स्वभावानुसार मी काही संदर्भ लावले.
म्हणजे शाळेत असताना वर्गात शिरताना, नोकरी विषयक मुलाखतीच्या वेळी ,नंतर बाॅसच्या केबीन मधे जाताना ,”मे आय कम ईन सर..!!”अशी परवानगी घेउनच जायचे असते.
किंवा कुणाच्या खोलीत शिरताना दार ठोठावायचे.. दारावरची बेल वाजवायची.. हे सारे शिष्टाचार पाळताना देवळातल्या घंटेचा अर्थच उलगडला…दर्शनापूर्वी देवाचीही परवानगी घ्यावी लागते..किंवा घंटा वाजवून भक्ताने देवाला सांगायचे असते!”देवा मी तुझ्या दर्शनासाठी आलोय बरं का…
“घंटेच्या माध्यामातून देवाशी केलेला हा संवादच असतो.
अशा पद्धतीने देवाची अपाॅईंटमेंट घ्यावी लागते, किंवा असे तर नाही ना, घंटा बडवून, देवाला आपल्यासाठी जागे करायचे, म्हणायचे, “परमेश्वरा ,आता तरी डोळे उघड. तुझी कृपा दृष्टी आम्हावर सदैव राहू दे,…!!!
मात्र गंमतीचा भाग सोडला तर… घंटानाद म्हणजे ब्रह्मनाद असतो. त्या नादातून जी कंपनं निर्माण होतात त्यामुळे वातावरण मंगलमय, शुद्ध होते.
सर्व नकारात्मकता नष्ट होते.आपल्या मनात विचारांचा कल्लोळ असतो.मन अशांत असते.
घंटानादामुळे चित्त शांत, एकाग्र होते. आणि देवरुपाशी एक प्रकारचे तादात्म्य अनुभवास येते.
☆ व्हॅलेन्टाइन… डॉ सुनिता दोशी ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
कॉलेजमधील निरोप समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाने चांगला रंगला …अचानक वक्त्याने प्रश्न विचारला,” मुलांनो तुमच्या जीवनात ‘व्हॅलेंटाईन’ या शब्दाला किती महत्त्व आहे? तुमचं ‘व्हॅलेंटाइन’ कोण आहे …. असा कधी विचार केलाय का?”… मुलांमध्ये खसखस पिकली .अरे हा काय प्रश्न झाला ?….आणि असेल कोणी व्हॅलेंटाईन …..तरी यांना सांगायचं की काय ?
……आणि तेही या व्यासपीठावर ?
एका वात्रट मुलाने मोठ्याने विचारले,” सर ,तुमचा व्हॅलेंटाइन कोण ?”
आता मात्र चांगलाच हशा पिकला… पाहुणे हसले…
“अगदी खरं सांगायच तर कोणीतरी मलाही विचारावं म्हणूनच मी हा प्रश्न विचारला होता …!”
पुन्हा जोरदार हशा….!
“आता सांगतो ,माझं जीवन हेच माझं ‘व्हॅलेंटाईन’ ज्यावर मी मनापासून प्रेम करतो….. नव्हेतर मी त्याच्या प्रेमातच पडलो आहे ….!जी आपली ‘व्हॅलेंटाईन’ , तिला जर आपण गुणदोषांसहित स्वीकारले तरच जीवन सुंदर होतं …अन्यथा ‘अर्ध्यावरती डाव मोडला ‘हे ठरलेलंच ….!तसेच जीवनातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी , घटना ,व्यक्ती ह्यांच्यासहित मी माझ्या जीवनाला स्वीकारलं आहे… मी जणू माझ्याच जीवनाच्या गळ्यात गळा घालुन गातो , नाचतो आणि रडतो देखील….!”
‘वाह क्या बात है….!
प्रत्येकाने मनापासून दाद दिली. व्हॅलेंटाईन म्हटले, की डोळ्यापुढे येते ती एखादी व्यक्ती …..जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो… विषेशतः प्रियकर… प्रेयसी किंवा पती-पत्नी… आयुष्याचा जोडीदार… वगैरे…! फारच विशाल मन असेल तर एखादी आदर्श व्यक्ती….
पण हे उत्तर मात्र अनपेक्षित होतं… विचार करायला लावणारं आणि तितकंच सुंदर होतं….!
खरंच आपण आपल्या जीवनावर प्रेम करतो का ?किंवा असं म्हणूया की आपण आपल्या जीवनाच्या प्रेमात पडतो का?…. प्रेमात पडणं तर दूरच…! पण मला यापेक्षा कितीतरी जास्त मिळायला हवं होतं ,ते मी डिझर्व करतो….! पण नशिबापुढे काय ?..असं म्हणत जीवनाचं जणू एकओझं ओढत असतो आपण….! ‘आयुष्य ओघळुनी मी रिक्त हस्त आहे …!’अशीच अनेकांची स्थिती….!
आपल्या जीवनाच्या प्रेमात पडणारे जीवनाला सुख दुःखा सहीत स्वीकारणारे किती जण असतील बरं….?
विचार करता करता मला एक व्यक्ती आठवली ,ती म्हणजे लहानपणी आमच्या घरी झाडलोट करणारी आवडाबाई! ही आवडाबाई एक रस्ता झाडणारी बदली कामगार होती रोज पहाटे हजेरीला जायचं.कोणी रजा घेतली तर, तिला काम मिळायचं …!नाही तर पुन्हा घरी येऊन इतरांची धुणी-भांडी झाडलोट अशी काम करायची..! महिन्यात सहा -सात बदल्या मिळायच्या ..! पण त्यासाठी दररोज हजेरीला मात्र जावं लागायचं …तेही सहा किलोमीटर चालत..! नवरा दारुड्या ,त्यामुळे “पैसे दे” म्हणून बायकोला मारहाण वगैरे नित्याचंच झालेलं…!पण अशा परिस्थितीतही आवडाबाई खूपच आनंदी असायची. तिचं आणि माझ्या आईचं चांगलं जमायचं !आवडाबाईला तिच्या नोकरीचा फार अभिमान…! अभिमान म्हणण्यापेक्षा भारी कौतुक..!
तिची नोकरी आणि त्याचं वर्णन ऐकणारा एकमेव श्रोता म्हणजे माझी आई! ती सगळं वर्णन करून सांगायची ,”साहेबानी ‘आवडाबाई ‘म्हटलं, की आपण म्हणायचं ‘हाजिर साहेब’म्हणायचं अशी आमची हजेरी असते..!” सरकारकडून मिळणारं साबण, झाडू ,पाटी वगैरे सगळं तपशिलासह आईला ऐकवायची ती….! पगाराच्या दिवशी नवरा मारहाण करायचा, पैसे मागायचा… पण तो दिवस संपला की दुसर्या दिवशी मारहाणीच्या खुणा अंगावर एखाद्या दागिन्याप्रमाणे मिरवत गाणं गुणगुणत कामावर हजर….!
एकदा असंच नवऱ्याने मारलं… बिचारी रडत रडत कामावर आली… मंगळसूत्र काढून टाकलं , पांढरं कपाळ…खूप शिव्या दिल्या नवऱ्याला….!खूप रडली..!
दुसऱ्या दिवशी आमच्या घरी हळदीकुंकू होतं …ही पठ्ठी सगळं विसरून हजर..! छान ठेवणीतलं लुगडं.. कपाळभर कुंकू…डोरलं…. असा थाट !उखाणाही घेतला तिने…’आजघरात माजघर माजघरात पलंग पलंगावर सुरी…सुरी गेली सरकुन…रंगरावच्या हाताखाली पाचशे कारकून…’
‘अरे बाप रे इतके…?’ आम्ही मुलं फिदीफिदी हसायला लागलो…! आई डोळ्यानेच दटावलं. “कसाही असला तरी कुंकवाचा धनी आहे माझ्या…!”ती गोड अशी लाजली….
असाच एक प्रसंग… आईबरोबर बाजारात जायचं होतं, बरंच सामान आणायचंअसल्याने आवडाबाई बरोबर होतीच .रिक्षातुन आमची वरात निघाली… नेमकी रिक्षा ज्या भागातून जात होती ,तो आवडाबाईचा झाडायचा प्रभाग होता ..!आवडाबाईला कोण आनंद…”अगं बया.. हा तर माझाच ‘वेरिया’ हे बघा वहिनी या झाडापासून माझी हद्द सुरू होते ..पार त्या शाळेपर्यंत माझीच हद्द …हा भाग पण माझाच….!
एखाद्या राजाने आपल्या राज्याच्या सीमा दाखवाव्या त्या थाटात आवडाबाई तिचा ‘वेरिया’अर्थात ‘एरिया’ दाखवत होती.आई पण कौतुकाने “अगोबाई ,हो का ?”म्हणत तिच्या आनंदात सहभागी झाली होती .मला भारी गंमत वाटत होती. घरी आल्यावर मी आईला चिडवत होते.., “काय म्हणते तुझी मैत्रीण? चांगलीच मैत्री आहे का तुझी आवडाबाईशी…”
तशी आई म्हणाली,” अगं त्या आवडाबाईकडून शिकण्यासारखी एक गोष्ट लक्षात ठेव… जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि जीवनावर प्रेम करण्याची वृत्ती…! जीवनाच्या सारीपाटावर पडलेलं दान माझ्या मनासारखं नाही म्हणून जीवनाला नावं ठेवणारे बरेच असतात… पण जे दान पडलं तेच माझं आहे…असं म्हणून त्या चांगल्या वाईट दानासह जीवनाला आनंदाने कवटाळणारे आवडाबाई सारखे थोडेच असतात…!
व्हॅलेंटाईन म्हणजे काय हे आवडाबाईला माहीत नव्हतं आणि आईलाही…! पण जीवनाला व्हॅलेंटाईन कसं बनवायचं हे त्यांना माहीत होतं…! आपलं जीवन हेच आपलं व्हॅलेंटाईन हे मला नव्याने प्रत्ययाला येत होतं…!
डॉ सुनिता दोशी✍️
संग्राहक — ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
महाभारत वाचताना अनेक अनुकंपनीय दुर्दैवी स्त्रिया भेटल्या. पण माधवीच्या जीवनाचा संघर्ष, त्याग, आणि परवड पाहून हृदय हेलावून गेलं.
ययाती आणि देवयानी यांची अत्यंत सुस्वरूप आणि सद्गुणी कन्या माधवी. ही कथा महर्षी नारदांनी दुर्योधनाला सांगितलेली आहे.
विश्वामित्र ऋषींचा पट्टशिष्य गालव. त्याचे शिक्षण पूर्ण होताच गुरुदक्षिणा देण्याचा त्याने हट्ट धरला. विश्वामित्रांना गालव किती गरीब आहे हे माहीत होते म्हणून ते म्हणाले मला काही नको पण गालव आपला हट्ट सोडायला तयार नव्हता म्हणून विश्वामित्रांनी चिडून त्याला सांगितले की तुला द्यायचेच असेल तर मला श्यामकर्णी आणि शशिकिरणा सारखे आठशे घोडे दे. गालवाने आपला मित्र गरुड यांच्याकडे मदत मागितली. गरुड त्याला ययाती राजाकडे घेऊन गेला.
ययातिकडे तसे घोडे नव्हते पण आपल्या दारी आलेल्या याचकाला विन्मुख पाठवणे त्याला योग्य वाटले नाही म्हणून त्याने त्यावर तोडगा काढला की माझी अप्सरे सारखी सुंदर अशी उपवर कन्या आहे तिला हुंडा म्हणून कुणीही आठशे घोडे देऊ शकतो तू तिला घेऊन जा.
गालव अयोध्येचा राजा इश्वाकुकुलिन राजाकडे तिला घेऊन गेला. तो राजा म्हणाला ही कन्या खुप सुंदर व सुलक्षणी आहे ती महापराक्रमी पुत्राला जन्म देईल. तिला माझ्याकडे एक वर्षे ठेव एक मुलगा झाला की दोनशे घोडे आणि ही मुलगी मी तुला परत देतो. असहाय माधवीने मान्य केले. तिला वसु मानस नावाचा पुत्र झाला 200 घोडे घेऊन ती परत ययातिकडे आली. त्यानंतर तिला काशीचा राजा दिवोदास यांच्याकडे पाठवण्यात आले. त्यानेही एक वर्ष तिला ठेवून घेतले प्रतार्दन नावाचा मुलगा त्याला तिच्यापासून झाला. आणि दोनशे घोडे देऊन त्याने तिला परत पाठवले. नंतर तिला भोजराजा उशिनरकडे पाठवण्यात आले. त्याच्यापासून तिला सिवी नावाचा पुत्र झाला आणि त्याने ही दोनशे घोडे देऊन तिला परत पाठवले. सहाशे घोडे घेऊन माधवी सह गालव गरुडाकडे पुढील दोनशे घोड्यांसाठी आला. गरुडाने सांगितले आता तुला उरलेले 200 घोडे मिळणारच नाहीत कारण पूर्वी फक्त वरुणाकडे एक हजार घोडे होते. वरूणाला गाधी राजाच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा होती. गांधी राजाने ऋचिक ऋषींना सांगितले तुम्ही मला ते 1000 घोडे मिळवून दिलेत तर मी माझ्या मुलीचे लग्न वरुणाशी लावून देईन. वरुणाच्या यज्ञाचे ऋचिक ऋषीनी पौरोहित्य केले. वरुणाने खूश होऊन 1000 घोडे त्यांना दान केले. गाधी राजाने वरील3 राजांना दोन दोनशे प्रमाणे सहाशे घोडे दान दिले आणि उरलेले 400 घोडे नदीत वाहून गेले. विश्वामित्र हे गाधीचे पुत्र आहेत. आत्तापर्यंत प्रत्येकाने तिची किंमत 200 घोडे केली तर तू विश्वामित्रांना तिला अर्पण कर म्हणजे त्यांना दोनशे घोडे मिळाल्या सारखे आहेत. विश्वामित्रांनी ते मान्य केले व त्यांना माधवी पासून अष्टक नावाचा पुत्र झाला. त्यांनी ते सहाशे घोडे कुरणात चरायला सोडून दिले व माधवीला परत पाठवले. पुत्र जन्मानंतर परत कुमारिका होण्याचे वरदान माधवीला असल्यामुळे ती अजूनही कुमारिका म्हणूनच पित्याकडे परत आली.ययातिने गंगा यमुना संगमा वर तिचे स्वयंवर मांडले. पण स्वाभिमानी माधवीला वैराग्य आले. आपल्या देहाची झाली इतकी विटंबना पूर्ण झाली असे समजून ती वनवासात निघून गेली.अनेक वर्ष वनात हिंडत होती.
माधवी चे चारी पुत्र मोठे झाले .वसु मानस अतिशय सच्छील व धर्माचा रक्षण कर्ता होता. सिवी अत्यंत दानशूर होता. प्रतार्दन महापराक्रमी झाला. आणि अष्टक अनेक यज्ञ करून पुण्यवान झाला.
इकडे ययाती स्वर्गवासी झाला पण त्याच्या अहंकारी स्वभावामुळे इंद्रादी देवांनी त्याला पृथ्वीतलावर ढकलून दिले .ययातिने त्यांना इच्छा सांगितली जिथे सच्छील माणसे जमली असतील तिथेच मला पडू द्या. त्याच वेळी नैमिषारण्यात माधवीचे चारी पुत्र यज्ञ करत होते .ययाती त्या पवित्र ठिकाणी पडला. नेमकी माधवी पण त्या ठिकाणी हजर होती. तिने आपल्या पित्यास ओळखले. मुलांनी पण आईला ओळखले पण ययातीला त्यांनी ओळखले नाही. माधवीने आपली सर्व मानखंडना विसरून चारी पुत्रांना सांगितले की तुमचे व माझे पुण्य आपण माझ्या पित्याला अर्पण करून त्याला सन्मानाने स्वर्गात परत पाठवू या. त्या पुण्याईच्या जोरावर ययाती परत स्वर्गात गेला पण माधवी मात्र पुन्हा निर्विकारपणे तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेली. अशी ही पितृभक्त माधवी. डोकं सुन्न करणारी तिची कथा.
वेद व पुराण काळातील महत्वाच्या स्त्रिया : पतिव्रता सुलोचना
रामायणातील बरेच प्रसंग नैमिषारण्यात घडले आहेत. नैमिषारण्य सुरम्य कथा या माझ्या पुस्तकासाठी मला बरेच ग्रंथ वाचायला मिळाले. त्यात मला सगळ्यात आवडलेली व्यक्ती म्हणजे मेघनाद ची पतिव्रता पत्नी सुलोचना. ती वासुकी नागाची कन्या व रावणाची स्नुषा होती. मेघनाद चे तिच्यावर अत्यंत प्रेम होते. तो एक पत्नी व्रती होता. मेघनाद महापराक्रमी होता. त्याने दैत्य गुरु शुक्राचार्य यांच्याकडून मायावी विद्या शिकून घेतली होती. त्याने इंद्राशी युद्ध करून इंद्राला जिंकले होते म्हणून त्याचे नाव इंद्रजीत असे पडले होते. राम रावण युद्धा मध्ये फक्त लक्ष्मणच त्याचा वध करू शकत होता. लक्ष्मणाने तशी प्रतिज्ञा केली . त्यावेळी रामाने त्याला सांगितले की तू नक्की त्याचा वध करशील पण त्याचे मस्तक जमिनीवर पडू देऊ नको कारण सुलोचना सारख्या साध्वी च्या पतीचे मस्तक जमिनीवर पडले तर आपल्या संपूर्ण सेनेचा नाश होईल. लक्ष्मणाने ते लक्षात ठेवले व त्याचे शीर उडवले ते हनुमंताच्या हाती पडले. हनुमंताने ते रामाजवळ आणले. त्याच वेळेस मेघनाद चा एक हात उडाला व सुलोचना जवळ ये ऊन पडला. सुलोचना ला खूप दुःख झालं पण तिला त्या हाताला स्पर्श करण्याचे धैर्य होईना कारण कदाचित जर परपुरुषाचा हात असेल तर आपण पापिणी ठरू. सुलोचनाने त्या हाताला विचारलं ” प्राणप्रिय स्वामी हा हात तुमचा असेल तर आणि जर मी खरी पतीव्रता असेन तर तुम्ही या हाताने युद्धाचा सारा वृत्तांत मला लिहून दाखवा.” आणि तिने एक लेखणी त्या हातात दिली. तो हात लिहू लागला” प्रिये सुलोचने, हा माझाच हात आहे. लक्ष्मणा बरोबर माझं तुंबळ युद्ध झालं. लक्ष्मणा सारखा अत्यंत तेजस्वी व दैवी गुणसंपन्न प्रतिस्पर्धी मला मिळाला. त्याने गेली 14 वर्षे पत्नी निद्रा आणि अन्न यांचा त्याग करून फक्त श्रीरामांची सेवा केली आहे. त्यामुळे त्याच्या अंगात अमोघ शक्ती निर्माण झाली त्यापुढे मी हरलो. हा माझा हात आणि माझे मस्तक मात्र प्रभु श्रीरामांच्या जवळ आहे.” सुलोचना ने सती जायचं ठरवलं पण त्यासाठी मांडीवर पतीचे मस्तक हवे होते. तिने रावणाला सांगितले माझ्या पतीचे मस्तक आणा. तेव्हा रावण म्हणाला,
सुलोचना त्यासाठी तुलाच रामा कडे जावे लागेल. तू बिनधास्त जा कारण तिथे बालब्रह्मचारी हनुमान जितेंद्रिय लक्ष्मण आणि एक पत्नी व्रती प्रभू रामचंद्र आहेत. तुला कसलीही भीति नाही. ते तुझा उचित सन्मान करतील. श्वशुरांची आज्ञा शिरसावंद्य मानून ती पतिव्रता रामाकडे गेली. सर्वांना प्रश्न पडला मेघनाद चं मस्तक रामा कडे आहे हे तिला कसं कळलं? ती एवढी ताकदवान असेल तर हे मस्तक सुद्धा हसेल. सुलोचना ला अंतर्ज्ञानाने हे भाव कळले आणि हात जोडून तिने विनंती केली,” पती देवा मी कायावाचामने तुम्हाला परमेश्वर मानत आहे हे तुम्हाला मान्य असेल तर हसून दाखवा”. आणि अहो आश्चर्यम! मेघनाद च्या निर्जीव मस्तकातून हास्याचे फवारे उडू लागले. श्रीरामाने ते मस्तक तिच्या हाती सोपवले. तिने रामाला विनंती केली आज माझ्या पतीचे अंतिम संस्कार आहेत म्हणून आज युद्ध बंद ठेवाल का? रामाने हो सांगितले. जाता जाता ती लक्ष्मणा समोर आली व म्हणाली” माझे पती अजिंक्य होते. पण त्यांची बाजू सत्याची नव्हती. ज्या सीतेचे अपहरण आपल्या पित्यान केलं त्यांच्या बाजून ते लढले. उर्मिला आणि मी दोघी पतिव्रता आहोत. तुम्हा उभयतांची बाजू सत्याने चालणारी आहे. म्हणून तू जिंकलास.”
पतीचं मस्तक घेऊन ती पतिव्रता लंकेला परत गेली आणि समुद्र किनाऱ्यावर चंदनाच्या चितेवर आपल्या पतीचे मस्तक मांडीवर घेऊन सती गेली.
अशी ही महापतिव्रता सुलोचना. तिच्या तेजाला, धैर्याला, आत्मसमर्पणाला कोटी कोटी प्रणाम.
☆ मोडेन, पण वाकणार नाही. ☆ सौ. राधिका माजगांवकर पंडित ☆
आमचे काका ती. स्व. दामोदर सखाराम माजगांवकर देहू रोड येथे मिलीट्रीत होते. आर्मीतल्या, ब्रिटीश राजवटीत हुतात्मा झालेल्या शूरवीरांची कथा सांगण्यांत त्यांचा हातखंडा होता. ऐकतांना प्रसंग डोळ्यांसमोर उभा रहायचा. लहानपणी मनावर ठसलेली, कोरलेली अंगावर शहारे आणणारी ही कथा आहे – श्री.कर्णिकांची.
पुण्यातल्या श्री जोगेश्वरीवरून बुधवार चौकाकडे जाणाऱा सरळ रस्ता – थोडक्यात म्हणजे हल्लीचं श्रीदगडूशेट गणपती मंदिर, श्री गणेश वास्तव्य आहे ना, तोच तो रस्ता. त्याच्या डावीकडे फरासखाना पोलीस चौकी आहे. तिथेच एक दीपस्तंभ अजूनही कित्येक वर्षांचा, जुना झाला तरी भक्कमपणे उभा आहे आणि त्यावर नाव कोरलंय – “भास्करदा कर्णिक”.
कर्णिकांनी आपल्या देशासाठी फार मोठ्ठं बलिदान केलं आहे. पण आज पुणेकर त्यांना विसरले आहेत. हा स्तंभ म्हणजे कसलं प्रतिक आहे? कुणाच्या नावाची ही निशाणी आहे? त्याबद्दल कसलीच, काहीच माहिती नसलेली अशी ही वास्तु सध्या उपेक्षित ठरलीय. कारण श्री. कर्णिकांच्या बरोबरच त्यांची निशाणी, काळाच्या पडद्याआड गेलीय. पण त्यांचा आदर्श, त्यांचं बलिदान, त्यांचं नाव आपण मनात जागवूया.
श्री.भास्करदा कर्णिक ऑर्डिनन्स फॅक्टरित नोकरीला होते. हुषार आणि अत्यंत धाडसी होते. त्या काळचे १९४०-४२ सालचे उच्चपदवी विभूषित असे असलेले हे धडाडीचे तरुण! देशासाठी काहीतरी करण्याची त्यांच्या मनात विलक्षण उर्मी होती. ऑर्डिनन्स फॅक्टरीतच नोकरीला असल्याने तेथील सामग्री जमवून धाडसाने यांनी हातबॉम्ब तयार केले. थोडे थोडके नाही, तर अर्धा ट्रकभरून बॉम्बची सज्जता झाली आणि हा बॉम्बहल्ला करण्यासाठी कर्णिकांना देशप्रेमी साथीदारही मिळाले. त्यांची नांवे सांगायलाही अभिमान वाटतो, श्री. गोरे, श्री दीक्षित, श्री काळे, श्री जोगेश्वरी मंदिरातील’ व्यवस्थापक गुरव श्री भाऊ बेंद्रेही त्यांना सामील होते. इतकंच काय, देवीच्या मंदिरातच हे बॉम्ब लपवले होते. अखेर धाडसी खलबत होऊन निर्णय ठरला. आणि कॅपिटॉलवर बॉम्ब टाकण्यांत ते यशस्वी झाले. पण हाय रे देवा! कसा कोण जाणे दुर्दैवाने ब्रिटीशांना सुगावा लागला आणि साथीदारांसह श्री. कर्णिक पकडले गेले.
फरासखान्यात ह्या देशप्रेमींना आणण्यांत आलं. आजचा सध्याचा मजूर अड्डा आहे ना?तीच ती जागा. पुराव्याअभावी बाकीचे साथीदार सुटले. पण श्री.कर्णिक मुख्य आरोपी म्हणून, डाव फसल्यामुळे अडकले. पण ते डगमगले नाहीत. परिस्थितीचं भान त्यांना आलं. लघुशंकेसाठी परवानगी मागून ते बाजूला गेले. क्षणार्धात खिशातली विषारी पुडी त्यांनी गिळून घेतली. चार पावलं चालल्यावर फरासखान्याच्या पहिल्या पायरीवरच ते कोसळले आणि तिथेच त्या क्षणीच त्यांनी देशासाठी देहत्याग केला.
तर मंडळी असा आहे त्या पायरीचा इतिहास. मोडेन पण वाकणार नाही, हे ब्रीदवाक्य स्मरुन तो देशप्रेमी हुतात्मा झाला. त्यांची आठवण स्मृतिचिन्ह म्हणून उभा केलेला स्तंभ आता जुना झालाय. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय. मध्यंतरी बराच काळ गेला. भास्करदा कर्णिक ही अक्षरेही आता पुसट झालीत. आणि आता ह्या हुतात्म्याचाही दुर्दैवाने पुणेकरांना विसर पडलाय.
संपली श्री भास्कर दा. कर्णिक ह्यांची कथा. ज्यांना ही कथा माहित आहे, ते दगडूशेट गणपती मंदिरातून बाहेर पडतात, डावीकडे वळून स्तंभापुढे उभे रहातात, क्षणभर विसावतात आणि नतमस्तक होतात.
तर मंडळी आपणही या थोर हुतात्म्याला मनोभावे श्रध्दांजली देऊयात. ??
भारतमाताकी जय!
मित्र मैत्रिणींनो, एक गोष्ट नमूद करून, आवर्जून सांगाविशी वाटते. माझे ती.स्व.काका मिलिट्रीत असल्यामुळे त्या हुताम्याचं हौतात्म्य ते जाणत होते. अजूनही इतिहासकालीन दोन दीपमाळा श्रीजोगेश्वरीसमोर भक्कमपणे उभ्या आहेत. तिथे आम्ही रहात होतो. फरासखाना तिथून आम्हाला अगदी जवळच होता. काका थकले होते. काठी टेकत टेकत मला सोबत घेऊन “श्री.कर्णिक स्तंभा”जवळ जाऊन नतमस्तक होऊन मानाची सलामी, मानवन्दना हुतात्मा श्री. कर्णिकांना ते द्यायचे.
धन्य ते हुतात्मा – श्री. कर्णिक आणि धन्य ते माझे देशप्रेमी काका. त्या दोघांना आपण कडक सॅल्यूट करूया. तर अशी होती ही श्री. कर्णिकांची गौरवपूर्ण धाडसी गाथा.
ऋग्वेद काळात अनेक ऋषिका होऊन गेल्या. त्यातील घोषा या विदुषी ची कथा आपण ऐकूया.
घोषा ही दीर्घतामस ऋषींची नात व कक्षीवान ऋषींची कन्या. ऋषींच्या आश्रमात ती सगळ्यांची लाडकी होती पण दुर्दैवाने लहानपणीच तिच्या सर्व अंगावर कोड उठले. त्यामुळे तिने लग्नच केले नाही. अध्यात्मिक साधनेत तिने स्वतःला गुंतवून टाकले. तिला अनेक मंत्रांचा साक्षात्कार झाला. तिने स्वतः अनेक मंत्र आणि वैदिक सूक्ते रचली. ऋग्वेदाच्या दशम मंडलात तिने दोन पूर्ण अध्याय लिहिले आहेत. प्रत्येक अध्यायात 14/ 14 श्लोक आहेत. आणि सामवेदामध्ये सुद्धा तिचे मंत्र आहेत.
ती साठ वर्षांची झाली. त्यावेळेला तिच्या एकदम लक्षात आले की आपल्या पित्याने अश्विनीकुमारांच्या कृपेमुळे आयुष्य, शक्ती आणि आरोग्य प्राप्त केले होते. आपणही अश्विनीकुमार यांना साकडे घालू.
अश्विनी कुमार यांना प्रसन्न करून घेण्यासाठी घोषाने उग्र तप केले.”अभूतं गोपा मिथुना शुभस्पती प्रिया
अर्यम्णो दुर्या अशीमहि ” अश्विनीकुमार प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. तिच्या इच्छेनुसार त्यांनी तिचे कोड नाहीसे केले व ती रूपसंपन्न यौवना बनली. त्यानंतर तिचा विवाह झाला. तिला दोन पुत्र झाले. त्यांची नावे तिने घोषेय आणि सुहस्त्य अशी ठेवली. दोघांना तिने विद्वान बनवले. युद्ध कौशल्यात देखील ते निपुण होते.
घोषाने जी सूक्ते रचली याचा अर्थ असा आहे की,”हे अश्विनी देवा आपण
अनेकांना रोगमुक्त करता.आपण अनेक रोगी लोकांना आणि दुर्बलांना नवीन जीवन देऊन त्यांचे रक्षण करता. मी तुमचे गुणगान करते .आपण माझ्यावर कृपा करून माझे रक्षण करा आणि मला समर्थ बनवा. पिता आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देतो तसे उत्तम शिक्षण, आणि ज्ञान तुम्ही मला द्या. मी एक ज्ञानी आणि बुद्धिमान स्त्री आहे. तुमचे आशीर्वाद मला दुर्दैवा पासून वाचवतील. तुमच्या आशीर्वादाने माझ्या मुलांनी आणि नातवांनी चांगले जीवन जगावे. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन अश्विनी कुमारांनी तिला मधुविद्या दिली . वैदिक अध्यापन शिकवले. रुग्णांना रोगमुक्त करण्यासाठी , अनुभव, ज्ञान मिळवण्यासाठी, त्वचेच्या आजारापासून बरे होण्यासाठी गुप्त शिक्षण विज्ञान शिकवले.
अशाप्रकारे कोडा सारख्या दुर्धर रोगाने त्रासलेल्या या घोषाने वेदांचे रहस्य उलगडून दाखवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. तिने एकाग्रतेने अभ्यास केला आणि तिला वैदिक युगातील धर्मप्रचारिका ब्रह्मवादिनी घोषा हे स्थान प्राप्त झाले. अशा या बुद्धिमान, धडाडीच्या वैदिक स्त्रीला शतशत नमन.
एकदा आजीने मला माहेराहून परतताना तिच्या जुन्या लुगड्याच्या तुकड्यात एक वस्तु बांधून दिली होती. ती वस्तु माझ्याकडे नाहीय् पण आजीच्या लुगड्याचा तुकडा मात्र मी जपून ठेवलाय. छान घडी घालून. त्या तुकड्याचा वास, मऊ स्पर्श ,त्यावरचं ते चांदण्यांचं डीझाईन म्हणजे माझ्या ह्रदयातलं आजीचं वास्तव्य आहे.
प्रेम, माया, एक हवीशी वाटणारी, सदैव धीर देणारी अशी अनामिक उब आहे…
शंभर वर्षाचं लांबलचक आयुष्य जगून ती गेली तेव्हां जाणवलं, जीवनातला एक प्रेमाचा कोनाडा रिकामा झाला…
अवतीभवती अनेक प्रियजन आहेत…ज्यांना खरोखरच माझ्याविषयी प्रेमभावना आहेत..आपुलकी आहे…पण आजीच्या प्रेमाचा रंग कुठेच नाही…तिनं जे माझ्यावर प्रेम केलं
त्याची जातच निराळी..ती गेल्यानंतर त्या प्रेमाला मी पूर्णपणे पारखी झाले…तसं प्रेम मला कुणीच दिलं नाही ..आणि देउही शकणार नाही…
ती तशी खूप हट्टी होती.तिचं ऐकावच लागायचं..
एकदा आठवतंय्..पावसाळा सरला होता..
छान उन पडलं होतं.. म्हणून काॅलेजात जाताना मी छत्री न घेताच निघाले.. जाताना तिने अडवलं.. छत्री घेच म्हणाली.. पण मी ऐकलंच नाही… संध्याकाळी परतताना, आकाशात गच्च ढग.. विजांचा कडकडाट आणि धो धो पाउस..!!
पण काय सांगू..?बस स्टाॅपवर ही माझी वृद्ध आजी उभी..एक छत्री माथ्यावर अन एक माझ्यासाठी बगलेत…
घरी पोहचेपर्यंत अखंड बडबड..चीड राग..
सांगत होते तुला मी संध्याकाळी पाउस येईल ..छत्री असूदे..ऐकत नाहीस..किती भिजली आहेस..परीक्षा जवळ आली आहे..
घरात गेल्याबरोबर टाॅवेलने खसाखसा अंग पुसले ..अन् पटकन् गरम पाण्यात चमचाभर ब्रांडीही पाजली…
खरं सांगू तेव्हां तिचा राग यायचा..पण आता जेव्हां असा धुवाधार पाऊस पडतोना तेव्हां तिचीच आठवण येते..तिच्या अनेक मायेच्या छब्या आठवतात..तिच्या चेहर्यावरची रेष नि रेष दिसते..त्या रेषांची स्निग्ध लाट होते..आणि तो प्रेमाचा शीतल गारवा आजही जाणवतो..
मला कुणी काळी म्हणून हिणवलं तर ,पदरात लपेटून घ्यायची .. असंख्य पापे घ्यायची..
आणि सदैव मला काट्टे, पोट्टे, वानर म्हणणारी तेव्हां मात्र,
“अग!माझी विठू माऊली .. माझी रुक्मीणी ग तू..” म्हणून गोंजारायची..
तिच्या प्रेमानं मला बळ दिलं .. आत्मविश्वास दिला..आत्मसन्मान ठेवायला शिकवलं..
एक सुरक्षित भिंत होती ती आमच्यासाठी..
लग्नानंतर मी माहेरी यायची.. माझी गाडी पहाटेच पोहचायची.. पण त्या अंधार्या पहाटे दार उघडून स्वागताला तीच उभी असायची..
तिच्या विझत चाललेल्या डोळ्यांत माझ्या भेटीसाठी किती आतुरता असायची…
तिने मारलेल्या घट्ट मिठीत प्रेमाचा धबधबा जाणवायचा…
त्याच दारावर त्यादिवशी आजीच्या अस्थींचे गाठोडे दिसले आणि खूप काही हरवल्याची जाणीव झाली…
मग जेव्हा मन पोकळते,उदास होते तेव्हां तिच्याच लुगड्याचा हा तुकडा मला हरवलेलं सगळं काही परत देतो…
व्हॅलेंटाईन डे ला मी पहिलं गुलाबाचं फुल माझ्या प्रेमळ आजीच्या…जीजीच्या स्मृतींनांच अर्पण करते….???
शून्याला हेटाळणार्या सगळ्या अंकांना शून्यानेच एकदा उत्तर दिले.प्रत्येक अंकाच्या शेजारी जाउन तो उभा राहिला.आणि मोठ्याने म्हणाला,बघा आता तुमची किंमत किती वाढली ते…केवळ माझ्यामुळे…
खरंच की ,शून्यामुळे एकाचे दहा ,दोनाचे वीस, …सत्तर ऐंशी नव्वद..लाख करोड अब्ज…
वा!!वा!! मग सगळे जणं शून्याला खूपच भाव देऊ लागले..
शून्य ही संकल्पना,गणितशास्त्रात एक संख्या, स्थानमूल्य दर्शक म्हणून वापरली जाते.शून्य आणि दशमान पद्धती ही भारतीयांनी ,जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे.त्यापूर्वी,मोठ्या संख्या लिहीणे व त्यांची गणिते मांडणे फार किचकट असे.
पण त्यापलिकडेही जाऊन शून्याविषयी काही विचार मांडावेसे वाटतात.
अंकाला शून्याने गुणले ,भागले तरी उत्तर शून्यच येते. कोणत्याही अंकात शून्य मिळवा नाहीतर वजा करा अंक तोच राहतो …यामधे मला एक दडलेले आध्यात्मिक तत्वच दिसतं…कुठल्याही बाह्य परिस्थितीचा परिणाम न होणारा एक स्थितप्रज्ञच मला या शून्यात दिसतो…
शून्य म्हणजे गोल.पृथ्वी तारे ग्रह सूर्य चंद्र सारेच गोल…एक संपूर्ण अवकाश.एक पोकळी. ब्रह्मांड…
सार्या विश्वाचीच निर्मीती एका शून्यातून झाली…
शून्य म्हणजे काही नसणे.शून्य म्हणजे निराधार.
शून्य म्हणजे निर्बंध .मुक्त.कोरे. शांत…
म्हणूनच शून्य मला नेहमीच निर्मीतीचे भांडवल वाटते.आणि शून्यातून जे निर्माण होते ते स्वयंप्रकाशी ,लखलखते असते.अधिक प्रभावी आणि प्रेरणादायी असते….
महर्षी अत्री ऋषी यांना एकच मुलगी होती तिचे नाव अपाला.ती अत्यंत सुंदर, बुद्धिमान व एकपाठी होती. अत्रि ऋषी आपल्या शिष्यांना शिकवत त्यावेळी ती त्यांच्याजवळ बसे व त्यांनी एकदा सांगितलेले ज्ञान लगेच अवगत करत असे. तिला चारही वेद आणि त्यांचे अर्थ मुखोद्गत होते. वेदांतील ऋचांच्या अर्थाविषयी आपल्या पित्याशी संवाद साधत असे. चर्चा करत असे. त्यावेळी तिची असामान्य प्रतिभा पाहून अत्रीऋषी सुद्धा अचंबित होत असत. अर्थातच ती त्यांची अत्यंत लाडकी होती. पण अपालाला त्वचारोग होता. तिच्या अंगावर कोडाचे डाग होते. अत्रीऋषींनी तिच्यावर खूप उपचार केले पण काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे तिच्या लग्नाची त्यांना सतत चिंता वाटत होती.
एक दिवस त्यांच्या आश्रमात वृत्ताशव(यांना कृष्णस्व किंवा ब्रह्मवेत्ताऋषी असेही म्हणतात)ऋषी आले. अपालाने त्यांची खूप सेवा केली. तिच्या सौंदर्यावर भाळून त्यांनी तिला मागणी घातली. तिच्याशी विवाह करुन ते तिला घेऊन आपल्या आश्रमात गेले.
काही दिवसांनी वृत्ताशव ऋषींना तिच्या कोडाचा संशय आला व त्यांनी तिचा त्याग केला. अपमानित होऊन ती परत आपल्या पित्याकडे आली.
अत्री ऋषीना खूप वाईट वाटले. त्यांनी तिला आधार दिला व पूर्वीप्रमाणे अभ्यास, अध्यापन, योग, उपचार सुरू कर असे सांगितले व इंद्राची पूजा करण्यास
सांगितले. अपाला मनोभावे इंद्राची आराधना करू लागली. इंद्र देव प्रसन्न झाले. त्यांना सोमरस आवडतो म्हणून तिने शेजारचा सोमवेल तोडलापण त्याचा रस काढण्यासाठी तिच्याकडे काहीच साधन नव्हते मग तिने आपल्या दातांनी तो वेल चर्वण केला व एका भांड्यात रस काढून इंद्र देवांना प्यायला दिला. इंद्रदेव संतुष्ट झाले व त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. तिने आपला रोग बरा व्हावा , सतेज कांती मिळावी व पित्याची आणि पतीची भरपूर सेवा करता यावी असे वरदान मागितले. इंद्र म्हणाले तथास्तु. त्यांनी आपले सर्व ज्ञान पणाला लावले आणि तिची त्वचा तीन वेळा स्वच्छ केली. अपाला पूर्णपणे रोगमुक्त झाली.
इकडे वृत्ताशव ऋषींना पण आपल्या वागण्याचा पश्चात्ताप झाला. माफी मागण्यासाठी ते अत्री ऋषींकडे आले.त्यांनी अपाला ची आणि तिच्या वडिलांची मनापासून माफी मागितली व तिला बरोबर येण्यास सांगितले.
अत्रीऋषींना खूप आनंद झाला .खूप भेटवस्तू देऊन त्यांनी आपली मुलगी व जावई यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या घरी परत धाडले. अपाला पतीसह आनंदात राहू लागली.
अशी ही विद्वान, धर्मपरायण व सामर्थ्यशाली अपाला. तिला कोटी कोटी कोटी नमन
सत्य हे कल्पिता पेक्षा अद्भुत असते, याचा अनुभव आम्ही डॉक्टर मंडळी, रोजच्या आयुष्यात घेतच असतो.
काहीवेळा छातीठोकपणे सांगितलेले अंदाज सपशेल चुकतात आणि काहीवेळा हताश होऊन सोडून दिलेले निदान साफ चुकते आणि रुग्ण खडखडीत बरे होतात.
माझ्या हॉस्पिटलमध्ये एक रात्री अचानक एक patient प्रसूतीसाठी आली. तिने नावनोंदणीही केलेली नव्हती.
दुसरीच माझी patient तिला घेऊन आली होती.
मी patient ला टेबलवर घेतले,तपासले.
तरुण मुलगी होती ती.
खूप रक्तस्त्राव झाला होता आणि जेमतेम सातवा महिना असेल नसेल.
प्रश्न विचारत बसण्याची ती वेळच नव्हती.
मी सर्व उपचार लगेच सुरू केले तिच्या नवऱ्याला रक्तपेढीत रक्त आणायला पाठवले.पैसेही मीच दिलेत्याला. होते कुठे त्याच्या जवळ काहीच.
तिला saline लावले,योग्य ते उपचार सुरू केले.तोपर्यन्त त्याने रक्ताची बाटलीही आणली होती.
तिला चांगल्या वेदना सुरू झाल्या आणि ती सुखरूप प्रसूत झाली.
मी ते मूल जेमतेम बघितले आणि त्या बाईंचे bp नीट आहे ना,रक्तस्त्राव कमी झालाय ना यात गुंतले ते मूल आमच्या नर्सबाईने नीट गुंडाळून ठेवले. क्षीण आवाजात त्याने आपण आहोत ही ग्वाही दिली मीत्याच्या कडे वळले मुलगा होता तो.वजन 1000 ग्रॅम.
अगदी अपुरी,,वाढ आणि बिचारे ते बाळ धाप लागली म्हणून कण्हत होते.
मी बाहेर आले,तिच्या नवऱ्याला म्हटले तुमची बायको वाचलीय पण हे एव्हढेसे अपुऱ्या दिवसाचे बाळ जगणे फार अवघड आहे हो तुम्ही त्याला आमच्या बाळाच्या डॉक्टर च्या हॉस्पिटल मध्ये दाखल करा तरच काही आशा आहे याची.
त्यांनी आपापसात चर्चा केली.
बाई आमच्याकडे एवढे पैसे नाहीत त्याला काचेच्या पेटीत ठेवावं लागंल ना.
मी आता मात्र चिडले आणि म्हणाले या मुलीची हेळसांड केलीतच पण आता हे बाळ तरी वाचवायचा प्रयत्न नको का करायला.
कसली हो माणसे आहात तुम्ही आत्ता लगेच दाखल करा याला ते जगायची शक्यता अगदी थोडी आहे पण तरीही न्या त्याला मग ते त्याला घेऊन गेले आणि बाळाच्या हॉस्पिटल मध्ये ते मूल भरती झाले मला लगेच आमच्या बालरोगतज्ञांचा फोन.
अग बाई, हे किती गंभीर स्थितीतले बाळ आहे कल्पना दिली आहेस ना, की हे वाचण्याचे चान्सेस 10 टक्के पण नाहीत.
मी हो म्हणाले,त्यांनीही सर्व परिस्थितीची कल्पना नातेवाईकांना दिली, आणि उपचार सुरु झाले.
ते मूल 3 आठवडे तिकडे होते.आमचे बाळाचे डॉक्टर म्हणाले जगणार बर का ते मूल पण मंद बुद्धी होतेय की काय अशीही भीती असतेच ,या केसेस मध्ये
तशी स्पष्ट कल्पना दिलीय मी त्याच्या आईवडिलांना.
या गोष्टीला खूप वर्षे झाली.निदान पंचवीस तरी.
किती तरी घडामोडी झाल्या आमच्याही आयुष्यात.
माझी मोठी मुलगी लग्न होऊन परदेशी गेली बाळाच्या डॉक्टरांचा मुलगाही डॉक्टर झाला.
एक दिवस माझ्या दवाखान्यात, एक पोलीस जीप थांबली झाले..दवाखान्यासमोर गर्दीच झाली.
बाईंच्या दवाखान्यात पोलीस कसे?
मीही घाबरूनच गेले, की काय बुवा भानगड झाली.. जीप मधून एक उमदा पोलीस इन्स्पेक्टर उतरला.
आत येऊ का बाई?
होहो या ना. मी म्हटले बसा, बसा.
माझ्याकडे काय काम काढले.
हे बघा,भीतीच वाटते बर का पोलिस बघितले की.
आम्ही डॉक्टर असलो तरी,एक ठोका चुकतोच.
तो हसला,आणि बाहेर जमलेल्या गर्दीला क्षणात पिटाळून लावले. आत आला आणि चक्क माझ्या पाया पडला. अहो अहो, हे काय करताय प्लीज असे नका करू, मी ओळखत नाही तुम्हाला.
बाई ,तुमचा पत्ता शोधत आलोय बघा माझ्या आईने मला पाठवलंय तुम्हाला आठवतंय का, त्या एका तरुण मुलीला तुम्ही वाचवले आणि ते बाळ दुसऱ्या दवाखान्यात पाठवले?
आता मला आठवले,होय हो,आठवले तर.
काय हो ते मूल. कोबीच्या गड्ड्या एवढे होते हो चिमुकले.पण त्याचे,आता काय?
तो हसला आणि म्हणाला,तोच कोबीचा गड्डा तुमच्या समोर उभा आहे.
तुम्ही आणि त्या डॉक्टर साहेबानी वाचवलेले ते मूल म्हणजे मीच.
तुम्ही मला जीवदान दिलेत बाई.
माझी आई रोज तुमची आठवण काढते म्हणते, तुझा बाप तयारच नव्हता तुला ऍडमिट करायला.
ती बाई देवासारखी उभी राहिली खूप रागावली तुझ्या आजीला,बापाला मग केले तुला ऍडमिट नाहीतर कसला जगणार होतास रे तू बाळा.
बाई,तुमचा पत्ता शोधत आलो.
खूप हाल काढले हो आम्ही मी आणि आईनी.
बाप मी लहान असताना शेतात साप चावून वारला.
माझ्या आईने लोकांची धुणीभांडी करून मला मोठाकेला.
मी बीकॉम झालो,आणि मग mpsc पास केली तुमच्या कृपेने पोलीस इन्स्पेक्टर झालो मी तर अवाकच झाले हे ऐकून.
म्हटले,अहो,मी काय केलेय सगळे कष्ट तुम्हा माय लेकराचे आहेत हो आणि बाळा,तूजगलास, ती त्या परमेश्वराचीच कृपा.
माझ्या डोळ्यातून आणि त्याच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले म्हणाला,माझे लग्न आहे पुढच्या महिन्यात आई म्हणाली बाईना आणि बाळाच्या डॉक्टरांना अवश्य बोलवायचे.
त्यांनी दुनिया दाखवली तुला बाबा.
बाई,गावाला लग्न आहे.
मी जीप पाठवीन तुम्ही ,आणि ते डॉक्टर यायलाच पाहिजे माझ्या हातात मोठी पेढ्याची बॉक्स आणि एक भारी साडी ठेवून तो निघून गेला.
मी आणि आमचे मुलांचे डॉक्टर, मुद्दाम त्याच्या लग्नाला,आवर्जून गेलो.
त्याच्या आईला ,आम्हाला बघून आभाळ ठेंगणे झाले .
आम्हालाही खूप आनंद झाला ते लक्ष्मी नारायणा सारखे जोडपे बघून आम्हाला गहिवरूनच आले.
मुलांचे डॉक्टर मला म्हणाले, अग, या पोरा बरोबरच एक चांगले 8 पौंडी मूल ऍडमिट झाले होते.
ते काहीही कारण नसताना दगावले बघ.
आणि देवाचे तरी आश्चर्य बघ हे आपण आशा सोडलेले पोर, आज किती मोठे झाले.
देवाची लीला अगाध आहे हेच खरे ग बाई. त्या दोघांना आशीर्वाद देऊन, ते नकोनको म्हणत असतानाही भरपूर आहेर,करून आम्ही परतलो.