मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रिक्त मरण (Die Empty) ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ रिक्त मरण (Die Empty) ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

वाचण्यासाठी आणि त्यातून काहीतरी शिकण्यासाठी अनेक पुस्तकं आहेत त्यातलंच एक सर्वोत्तम पुस्तक म्हणजे टॉड हेनरी यांचे “Die Empty”

हे पुस्तक लिहण्याची प्रेरणा आणि कल्पना लेखकाला एका बिझनेस मिटींग मध्ये मिळाली…

मिटींगमध्ये डायरेक्टरने तेथे उपस्थित लोकांना प्रश्न विचारला. की “जगातील सर्वात श्रीमंत जमीन कोठे आहे?”

प्रेक्षकांपैकी एकाने उत्तर दिले : “तेलाने समृद्ध गल्फ राज्ये.”

तर दूसर्‍याने उत्तर दिले : “आफ्रिकेतील डायमंड खाणी.”

त्यांची उत्तरं ऐकल्यानंतर डायरेक्टर म्हणाले : नाही, जगातील सर्वात श्रीमंत जमीन म्हणजे स्मशानभूमी. कारण असे लाखो लोक मरण पावले आहेत ज्यांच्याजवळ अनेक मौल्यवान कल्पना होत्या पण त्या कधीच प्रकाशात येऊ शकल्या नाहीत आणि इतरांना त्याचा काहीच फायदा सुध्दा झाला नाही. त्यांच्या या सर्व मौल्यवान कल्पना त्यांच्याबरोबर या दफनभूमीत पुरण्यात आल्या आहेत.

याच उत्तराने प्रेरीत होऊन लेखक टॉड हेनरी यांनी “Die Empty” हे पुस्तक लिहले.

सर्वात सुंदर जर त्यांनी काही या पुस्तकात म्हटलं असेल तर ते म्हणजे “तुमच्या आतमध्ये जे सर्वात बेस्ट आहे जे तुम्ही करु शकता ते आतमध्येच ठेवुन मरु नका. निवडण्यासाठी आपल्याकडे नेहमीच पर्याय असतो त्यामुळे नेहमी रिक्त मरण निवडा…

रिक्त मरण किंवा Die Empty या शब्दाचा इथे अर्थ असा आहे की तुमच्यामध्ये जो काही चांगुलपणा आहे, जे काही चांगले तुम्ही या जगाला देऊ शकता ते सर्व मरण्यापूर्वी या जगाला देऊन जा…

जर तुमच्याकडे एखादी कल्पना असेल तर ती सादर करा…

जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर ते इतरांना द्या…

जर तुमच्याकडे एखादे ध्येय असेल तर ते साध्य करा…

तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम करा, इतरांचा सांगा आणि इतरांमध्ये वाटा आतमध्येच दडवून ठेवू नका…

चला तर मग, द्यायला सुरुवात करुया. आपल्यामध्ये जे काही चांगले आणि आपण जे काही चांगले या जगाला देऊ शकतो ते सर्व  आपल्यामधून काढून या जगामध्ये पसरवा….

शर्यत सुरु झाली आहे…

चला, हे जग सोडण्याआधी रिक्त होऊया…

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दिदी ssss… (कविता)….प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ दिदी ssss…  (कविता)….प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

अशोकाच्या वाटेवर,

कुणी पसरला शोक?

टोचे देठानाच आता,

पाकळ्यांचे तीक्ष्ण टोक!

 

तुझे जाणे ना सामान्य,

आनंदाचा हा युगांत!

संवादिनीला असह्य,

तिच्या भात्याचा आकांत!

 

मंगेशाच्या मंदिरात,

देई हुंदका ओंकार!

घंटा बडवूनसुद्धा,

तिचा गोठला झंकार!

 

कुणी कुणाचे सांत्वन,

आता करायाचे सांग?

आसवांच्या पाठीमागे,

उभी हुंदक्यांची रांग!

 

कोणताही भाव नाही,

तुझ्या गाण्यातून वर्ज!

पिढ्यापिढ्याना हवेसे,

तुझे सप्तसुरी कर्ज!

 

दुस्वासाने “लता” शब्द,

उलटाही केला तरी!

तोही “ताल होतो आणि,

येई संगिताच्या घरी!

 

भैरवीचा फुटे बांध,

हमसून रडे नांदी!

साती स्वर वेडेपिसे,

शोधतात त्यांची दिदी!

 

मंगेशीच्या गाभाऱ्यात,

ज्योत स्फुंदे समईत!

अभिषेकही तुटक,

धार विसरली रीत!

 

वाट पाही दिनानाथ,

त्यांच्या लेकीची स्वर्गात!

तीही चालली तृप्तीत,

अलौकिक स्वर गात!

 

आज क्षितिजावरती,

सूर्य उगवला नाही!

गेल्या तमात बुडून,

आंधळ्याच दिशा दाही!

 

 -प्रमोद जोशी, देवगड.

9423513604

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३४ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३४– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[१५३]

जेव्हा पान प्रेम करतं

तेव्हा फूल  होतं त्याचं

आणि

जेव्हा फूल पूजा करतं

तेव्हा फळ होतं त्याचं.

 

[१५४]

साचून आहे तुझ्यावर

धूळच धूळ…

नीरव शांततेच्या

शुद्ध प्रवाहात 

धुवायलाच हवा एकदा

तुझा आत्मा

 

[१५५]

हळुवार झुळूक येते

आणि किती स्पष्टपणे

जाणवून जातो

ईश्वरी शक्तीचा परमस्पर्श

वादळामधून

कधीही न जाणवणारा.

 

[१५६]

साधंसुधं शुभ्रपांढरं

प्रकाशवस्त्र

लेऊन येतो सूर्य

आणि हे वेडे ढगच कसे

लगडून जातात

रंगारंगाच्या

भपकेदार दिमाखानं 

 

 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आधीच आलिंगन द्या…. कवी : प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

आधीच आलिंगन द्या…. कवी : प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

बॉडी डेड होण्या आधीच आलिंगन द्या

कवी : प्रा.विजय पोहनेरकर

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू

डोक्यात राख भरल्यावर

फुटणार कसं हसू ?

 

अहंकार बाळगू नका

भेटा बसा बोला

मेल्यावर रडण्यापेक्षा

जिवंतपणी बोला

 

नातं आपलं कोणतं आहे

महत्वाचे नाही

प्रश्न आहे कधीतरी

गोड बोलतो का नाही ?

 

चुकाच शोधत बसाल तर

सुख मिळणार नाही

चूक काय बरोबर काय

कधीच कळणार नाही

 

दारात पाय ठेऊ नको

तोंड नाही पहाणार

खरं सांगा असं वागून

कोण सुखी होणार ?

 

तू तिकडे आम्ही इकडे

म्हणणं सोपं असतं

पोखरलेलं मन कधीच

सुखी होत नसतं

 

सुखाचा अभास म्हणजे

खरं सुख नाही

आपलं माणूस आपलं नसणे

यासारखे दुःख नाही

 

नातं टिकलं पाहिजे असं

दोघांनाही वाटावं

कधी गायीने कधी वासराने

एकमेकाला चाटावं

 

तुमची काहीच चूक नाही

असं कसं असेल

पारा शांत झाल्यावरच

सत्य काय ते दिसेल

 

ठीक आहे चूक नाही

तरीही जुळतं घ्या

बॉडी डेड होण्या आधीच

आलिंगन द्या

 

स्मशानभूमीत चांगलं बोलून

काय उपयोग आहे

जिवंतपणी कसे वागलात

जास्त महत्वाचं आहे

 

माझ्या कवितेत कोणतंही

तत्वज्ञान नाही

तुम्ही खुशाल म्हणू शकता

कवीला भान नाही

 

ठीक आहे तुमचा आरोप

मान्य आहे मला

माझं म्हणणं एवढंच आहे

वाद नको बोला

 

कवी : प्रा.विजय पोहनेरकर

प्रस्तुती  श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आता उतार….अनिल अवचट ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

आता उतार….अनिल अवचट ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

आता उतार सुरू

किती छान

चढणे ही भानगड नाही

कुठलं शिखर जिंकायचं नाही

आता नुस्ता उतार

समोरचं झाडीनं गच्च  भरलेलं दृश्य,

दरीतून अंगावर येणारा

आल्हाददायक वारा,

कधी धुकं, तर कधी ढगही..

टेकावं वाटलं तर टेकावं

एखाद्या दगडावर..

बसलेल्या छोट्या पक्ष्याशी

गप्पा माराव्यात,

सुरात सूर मिसळून…

अरे, हे सगळं इथंच होतं?

मग हे चढताना का नाही दिसलं?

पण असू दे

आता तर दिसतंय ना

मजेत बघत

उतरू हळूहळू

मस्त मस्त उतार

 

 – श्री अनिल अवचट

प्रस्तुती  श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३३ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३३– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

 

[१४९]

बुरखा पांघरून

ही सावली

किती नकळत

प्रकाशाच्या मागून

जातच रहाते

प्रेमाच्या पावलांचा

आवाजाही न करता

 

[१५०]

ईश्वर अजूनही

निराश झालेला नाही

माणसाच्या बाबतीत

हाच संदेश घेऊन येतं

प्रत्येक नवजात बालक…

 

[१५१]

मावळत्या दिवसाचं

प्रेमानं चुंबन घेत

रात्र म्हणाली,

’महानिद्रा’

म्हणजे मृत्यू म्हणतात मला

पण माता आहे मी तुझी

मीच तुला पुन्हा

नवा जन्म देईन

 

[१५२]

पक्षी जेव्हा

विचार करतो

पुण्य करायचा.

तेव्हा ठरवतो ,

पाण्यातल्या माशाला

हवेत आणून   

उद्धार करावा त्याचा.

 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अनिल गेला… अच्युत गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

अनिल गेला… ✒️ अच्युत गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

अनिल गेला ! तशी त्याची प्रकृती काही दिवसांपासून बिघडतच चालली होती. आता तर हॉस्पिटलमधूनही त्याला घरी आणल्यापासून आंनंद नाडकर्णीकडून त्याच्या प्रकृतीविषयीची बातमीपत्रं रोज मिळत असत. पण आनंदनं परवाच एक काळीज कापत जाणारी कविता लिहिली. त्यात लिहिलं होतं –

‘डोळे मिटत जातात

त्यापेक्षाही कठीण ..

त्यांना कोरडे निर्विकार

होताना पहाणे

.

.

वाटते आपणच हळूवार

मिटून टाकावे त्यांना

आणि मोकळे करावं

त्यातल्या प्रकाशाला

अथांग यात्रेसाठी’

अनिल अर्धवट शुद्धीवर असताना त्याच्या शेजारी रात्रंदिवस बसून त्याची काळजी घेणाऱ्या आनंदनं या ओळी लिहिल्या होत्या. त्या वाचून मनात चर्र झालं. आता काय घडणार आहे याची चाहूल सगळ्यांना लागलीच होती. मी न राहून आनंदला फोन लावला. ‘अनिल क्वचित माणसं ओळखतोय, पण काहीच चेतना नाही; क्वचित तोंडानं अन्न घेतोय, एकदम काहीतरी बोलतोय, पण ऑक्सिजन लेव्हल खाली जातेय; तो फारसं रिस्पॉन्ड करत नाहीये ….’ आनंद बोलत होता आणि मी ऐकतच राहिलो. त्यावेळी आमच्या मैत्रीचा बोलपट माझ्या डोळ्यासमोर उलगडायला लागला.

१९७० च्या आसपासचं कुठलंतरी वर्ष असावं. त्यावेळी मी ‘मागोवा’ नावाच्या एका गटात सामील झालो होतो. एका बाजूला विवेकवाद, विज्ञानवाद आणि मानवतावाद याचबरोबर समाजवाद आणि मार्क्सवाद या सगळ्याच विचारांनी मी भारावून गेलो होतो. अनिल त्यावेळी ‘युक्रांद’ नावाच्या संस्थेत कार्यरत होता. कुमार सप्तर्षी आणि अनिल अवचट हे युक्रांदचे खंदे वीर होते. आनंद करंदीकर आणि इतरही आमचे लढवय्ये मित्र त्यात सामील झाले होते. आमच्यात वैचारिक मतभेद असूनही आमच्यामध्ये मैत्री मात्र होती. एकदा परळला कामगारवस्तीत मी अनिलचं भाषण ऐकायला गेलो होतो. त्यावेळी तो आवेषात बोलत होता हे चांगलंच आठवतंय. अगदी काल परवा घडल्यासारखं. 

पण मग मध्ये बरीच वर्षं गेली. मी कॉम्प्युटरच्या जगात रमलो आणि सक्रीय चळवळीतून बाहेर पडलो. अनिलही कालांतरानं सक्रीय चळवळीतून बाहेर पडला होता. आनंदकडून अनिलविषयी बातम्या कळत होत्या. १५-१६ वर्षांपासून पुन्हा आमचं येणं जाणं वाढलं. त्यानं अनेक पुस्तकं लिहिली होती आणि मीही लिखाणात रमायला लागलो होतो.

अनिलनं आनंदबरोबर ‘मुक्तांगण’ हे व्यसनमुक्तीकेंद्र चालू केलं होतं. त्याचं बांधकाम चालू असताना मला एकदा तो तिथे घेऊन गेला होता. पु. लं.ना स्कूटरवर मागे बसवून त्यानं त्यांना ते कसं दाखवलं होतं, पु.लं.नी मग त्याला मदत कशी केली होती याविषयी तो मला सांगायचा.

मुक्तांगणमुळे अनिलनं आणि आनंदनं शेकडो घरांना आधार मिळवून दिला होता. एक उत्कृष्ट लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्याचं नाव गाजत होतं.

एकदा आमची मैत्रीण अभिनेत्री रीमानं अनिलकडे घेऊन जाण्याबद्दल माझ्याकडे आग्रह धरला. मी तिला अनिलकडे घेऊन गेलो होतो. मग बऱ्याच गप्पा झाल्या.

मला आठवतंय एकदा ईटीव्हीवर आनंद अवधानीनं अनिल अवचट, मी आणि इतरही काही लोकांच्या मुलाखती ठेवल्या होत्या. त्यावेळी आम्ही एकत्रच गप्पा मारत परतलो होतो. एकदा त्याला मौजेच्या श्री. पु. भागवतांना भेटायचं होतं. श्री. पु. हे माझे मामेसासरे. मग मौजेचा आणि श्री. पुंचा विषय निघाला आणि बऱ्याच गप्पा झाल्या. 

यानंतर गेल्या दहा वर्षांत आमच्या वारंवार गाठीभेटी होत राहिल्या. दर काही महिन्यांनी माझी पत्रकार नगरात चक्कर व्हायचीच. तिथे दुसऱ्या मजल्यावर तो अत्यंत साधेपणानं राही. त्यावेळी त्याची आई त्याच्याबरोबर रहायची. ‘माझ्या आईला तुझी पुस्तकं आणि लेख आवडतात आणि ती तुझ्या टीव्हीवरच्या मुलाखती ऐकते’ असं तो सांगायचा. काही वर्षांपूर्वी त्या वारल्या तेव्हा मात्र अनिल एकाकी पडला होता. पण मी त्याच्याकडे गेलो की गप्पांचा फड रंगायचा.

गंमत म्हणजे अनिलचे हात कागदांच्या वस्तू बनवण्यात सतत गुंग असायचे. त्याला ओरेगॅमीचं एव्हढं वेड होतं, की कुठल्याही कार्यक्रमात स्टेजवर असतानाही तो काहीतरी पक्षी, प्राणी, बोटी, घरं करतच बसायचा. तो ज्या खोलीत बसे, तिथे मागे बरीच पुस्तकं आणि पुढे त्यानंच तयार केलेली शिल्पं, लाकडावर केलेली कार्विन्ग्ज, चित्रं, बासऱ्या असं सगळं पडलेलं असायचं. मग मधूनच तो बासरी काढायचा आणि काहीसं वाजवायचा. मग कित्येकदा वेगवेगळ्या रागातल्या बंदिशी गायचा. मग मीही माझा गळा साफ करायचो. तो मलाही गायचा आग्रह करायचा. एखादी बंदिश आठवली नाही की तो माझ्या सुलभाताईला फोन करायचा. मग ताई फोनवरच त्याला कित्येक बंदिशी गाऊन दाखवत असे. सोलापूरला गेल्यावर तो नेहमी सुलभाताईला भेटायचा आणि काही वेळा तिथे उतरायचाही.

गंमत ही की तांत्रिकदृष्ट्या संगीत न शिकलेला हा माणूस बेसूर मात्र कधीच होत नसे. त्याची सुरांची जाण खूपच चांगली होती आणि माझ्याप्रमाणेच संगीतातल्या व्याकरणापेक्षा त्याच्या भावविश्वावरच प्रेम करणं हे त्याला खूप महत्त्वाचं वाटायचं. त्यालाही गाण्यातलं उच्च-नीच मान्य नव्हतं. कित्येकदा तो गुलाम अलींच्या गझलाही ऐकत आणि गुणगुणत असे.

पण गाणं हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग असला तरी तो एकच भाग होता. एका माणसाच्या अंगात किती कला असाव्यात ! चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी, ओरेगॅमी, कविता, लिखाण हे सगळं एकच माणूस तितक्याच लीलया आणि उत्कृष्टपणे कसं करू शकतो हे मला न उलगडणारं कोडंच होतं.

मला त्याचं लिखाण खूप आवडायचं. आमच्या लिखाणाची स्टाईल आणि विषय वेगळे असायचे. माझे जास्त ज्ञानशाखांविषयी आणि तात्विक होते. मग त्यात अर्थशास्त्र, मानसशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, गणित असे अनेक विषय होते; आणि त्याचं लिखाण मात्र माणुसकीनं आणि विवेकवादानं बहरलेलं होतं. त्याचं ‘माणसं’, ‘प्रश्न आणि प्रश्न’ आणि इतर काही पुस्तकं वाचली आणि मी आतून बाहेरून हादरून गेलो. हमाल, वेश्या, सफाईकामगार, मच्छीमार यांच्यापासून तळागाळातल्या अनेक थरातल्या अनेकांना भेटून त्यांची आयुष्यं बघून ती चितारण्याची एक विलक्षण कसब त्याच्याकडे होती. एका अर्थानं रिपोर्टाजमधलं त्यानं एक वेगळाच मापदंड निर्माण केला होता. एव्हढं रसरशीत पण तरीही त्यांच्याविषयी आत्मीयतेनं असलेलं, समानतेचा आग्रह धरणारं, अन्यायविरुद्ध आणि अंधश्रद्धेविरुद्ध, अविवेकवादाविरुद्ध शांतपणे आरडाओरड करणारं लिखाण मी तरी अजून वाचलेलं नाहीये.

यात कुठेही कटुता नव्हती; कुठेही आग पाखडणं नव्हतं आणि तो स्वत: जात, धर्म यांच्या कुठलीच बंधनं न पाळणारा असला तरी त्याचे सगळ्या जातीत, धर्मात मित्र होते. याचं कारणच मुळी त्याचं लिखाण हे सर्वसमावेशक, समतोल राखणारं तरीही ठाम असणारं होतं.

त्याला माझं आत्मचरित्र ‘मुसाफिर’ खूपच आवडलं होतं. त्यानं त्या पुस्तकासाठी लिहिलेला ब्लर्बही लोकांना खूप आवडला होता. आमच्या ‘कॅनव्हास’ पुस्तकासाठीही त्यानं झकास ब्लर्ब दिला होता; आणि ‘झपूर्झा’चं पुस्तक प्रकाशन त्याच्याच हस्ते झालं होतं.

अनिलच्या डोक्यात सुंदर जगाचं एक स्वप्न होतं. या जगात स्पर्धेपेक्षा सहकार्य होतं; जात, धर्म, रंग, लिंग असे कुठलेच उच्चनीच भेदाभेद त्याच्या जगात नव्हते. सगळे एकमेकांशी प्रेमानं वागताहेत; एकमेकांना मदत करताहेत, या जगात द्वेष नाहीये, युद्धं नाहीयेत; मारामाऱ्या आणि गुन्हेगारी नाहीये असं जग त्याच्या स्वप्नात असावं. त्याच्या भाषणातून मला नेहमी हेच जाणवे. या क्रूर, युद्धखोर, असमान जगानं त्याचं स्वप्न केव्हाच पायदळी तुडवलं असलं, तरी तो स्वप्न बघतच राहिला असावा असं मला नेहमी वाटे. आता त्याच्याबरोबर ते स्वप्नही विरून गेलंय !

आज तो प्रेमाचा, वात्सल्याचा, आपुलकीचा, माणुसकीचा, विवेकवादाचा आणि विज्ञानवादाचा झरा कायमचा आटलाय. मला शब्दच सुचत नाहीयेत. श्रद्धांजली इतकंच !     

 

 – श्री अच्युत गोडबोले

प्रस्तुती  श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३२ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३२– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[1]

पणतीच्या हातून

मोठाच प्रमाद घडला एकदा 

काचदिव्याच्या ज्योतीला

मावसबहिण म्हणण्याचा…

वेडीवाकडी फडफडात

काचदिव्याची ज्योत

धमकावत राहिली तिला

कर्कश करड्या आवाजात

आणि तेवढ्यात

प्रकाशाचा गंध उधळत

चंद्रकोर उगवली

आणि काचदिव्याची ज्योत

नम्रकोमल झाली ,

लाडिक वळणांचे शब्द

लाडे लाडे निसटले-

‘ताई…

माझी लाडकी ताई

 

[2]

संपूर्ण सत्य बोलण्यासाठी

वाट पाहायची तयारी नसेल

तर किती सोपं असतं

परखड बोलणं

 

[3]

किती मौल्यवान असते

फळाची सेवा

आणि किती मधुर

फुलाची सेवा

पण हवी मला

पानाची सेवा

डेरेदार…

नम्र… अर्पित

शांत … शीतल

 

[4]

धुक्याचा आणि पावसाचा पदर

चेहर्‍यावर ओढून

उदास बसलेली

ही परित्यक्त संध्याकाळ …

माझ्या एकाकी हृदयात

जाणवत आहेत मला

तिचे खोल सुस्कारे  

 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खुंट्याजवळचे दाणे ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे

? वाचताना वेचलेले ?

☆ खुंट्याजवळचे दाणे ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆ 

कबाल– कबीराचा मुलगा.  एकदा काशीतून फिरत असता त्याला एका घराचे दार उघडे दिसले. त्याने आत डोकावून पाहिले तर तिथे एक बाई दळण दळत  होती. 

कबाल खूप वेळ उभा राहून ते पाहात होता. दाणे जातात कुठे ???

त्याला रडू आले. त्याचा समज झाला की सर्व दाण्यांचे पीठ झाले व ते मेले. 

त्याने विचार  केला, ‘ आपणही या काळाच्या चक्कीत असेच पिसले जात आहोत.’

कबाल घरी आला, वडलांजवळ जाऊन रडू लागला— 

कबीर महाराज विचारताहेत—-” कबाल अरे काय झाले  रे ? “

कबाल सर्व पाहिलेलं सांगतो, आणि म्हणतो—” जात्यामध्ये सर्व दाणे  मेले . “

कबीर कबालाला घेऊन त्या बाईच्या घरी गेले.  जात्याची वरची पाळी बाजूला करुन  दाखविली. 

खुंट्याजवळ २ , ४ दाणे तसेच चिकटलेले होते—–

ज्या दाण्यांनी त्या खुंट्याचा आधार घेतला होता ते तसेच होते. कबालच्या भाषेत ‘ ते वाचले..’.

 —-आपल्याही संसाराच्या जात्याला एक खुंटा आहे.–

       तो म्हणजे “ सदगुरु.” —-

       त्यांना धरुन ठेवावे — 

        त्यांचा आधार घ्यावा — 

        जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होते —

 —- विनाशाची भिती टाळायची असेल तर अविनाशी खूंटा सदगुरु—

     त्यांचा आधार घ्यावा—-

     तो घट्ट धरुन ठेवावा — 

—-जीवाला निर्भय करणारी एकच विभूति —-

     “ती म्हणजे सदगुरु होय .”

 

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोष्ट छोटी डोंगराएवढी ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ गोष्ट छोटी डोंगराएवढी☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

( ——असे होणार का कधी भारतात..??? ) 

नुकताच मकरंद अनासपुरेने आय.बी.एन.लोकमतला दिलेल्या मुलाखतीत एक किस्सा सांगितला.

तो काही वर्षांपूर्वी सिडनीला गेला होता, तेव्हाची गोष्ट.—

(खरं तर छोटी पण डोंगराएवढी)—-

एअरपोर्टवर ठरल्याप्रमाणे त्याला घ्यायला जोशी आडनावाचा त्याचा एक मित्र गाडी घेऊन आला होता. तो मित्र मूळचा ठाण्यातला. पण गेल्या २५  वर्षांपासून ऑस्ट्रेलियाला स्थायिक झालेला.

रस्त्याने गाडीतून जात असताना मकरंद म्हणाला,

“अरे कसले सुंदर रस्ते आहेत यार इथले. एक खड्डा लागला नाही आतापर्यंत.

नाही झेपणार रे असला प्रवास मला, थोडी तरी आदळआपट झाली पाहीजे राव.”

यावर त्याचा मित्र हसला म्हणाला,

“तुला माहीत आहे हे रस्ते कोणी बनवले?”

मकरंदने विचारलं,

“कोणी?”

“या तुझ्या ड्रायव्हर ने!”

“काय???” मकरंदला खूप आश्चर्य वाटलं.

” तू  बनवलेस हे रस्ते ?—-अरे मग भारतात राहून का नाही बनवलेस असे रस्ते?”

यावर मित्र हसला, आणि फक्त एवढंच म्हणाला पुढे—–

“अरे भारतात रस्ते ‘इंजिनिअर’ नाही तर ‘राजकारणी’ बनवतात.” राजकारण्यांच्या तावडीतून विकासाला मुक्त करा.” 

विजय जोशी हे ठाण्याचे असून त्यांना order of Australia हा भारतरत्नच्या तोडीचा पुरस्कार तेथील सरकारने दिला आहे… कडू आहे पण सत्य आहे. 

संग्राहक : – श्री सुनीत मुळे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares