☆ Being alive is a special occasion. – डॉ संजय मंगेश सावंत ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
Being alive is a special occasion !!!
काल सकाळी सकाळीच माझ्या एका मित्राने, डॉक्टर दीपकने एक मेसेज पाठविला, Stop keeping your clothes & shoes for special occasion, Wear them whenever you can,, Now a days being alive is a special occasion !!!
आजच्या परिस्थितीत लागू पडेल असा किती सुंदर आणि अर्थपूर्ण मेसेज आहे बघा,,,
सणासुदीला किंवा लग्नसमारंभासाठी घालता येतील म्हणून तुमचे मौल्यवान कपडे आणि शूज नुसते कपाटात ठेवून देऊ नका. आजचा दिवस तुम्ही जिवंत आहात हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा सण व क्षण आहे,,,
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका वृद्ध दाम्पत्याकडे व्हिजिट साठी गेलो होतो. दोघेही ८० च्या आसपास असावे. राहणीमान, कपडालत्ता यावरून अत्यंत गरीब वाटायचे. फी देतानासुद्धा घासाघीस करायचे. औषधे लिहून दिली तरी अर्धीअधिक आणायचे. कसली चैन नाही, कोणा नातेवाईकांचं येणं जाणं नाही, कधी चांगलंचुंगल खाणं नाही, की कपडा नाही. परंतू असते एखाद्याची परिस्थिती नाजूक, असं म्हणून मी दुर्लक्ष करायचो.
एक दिवस माझ्या व्हिजिट बॅगमधला प्लास्टिकचा एक मोठा बॉक्स होता रिकामा होत आला होता. ते बाबा मला म्हणाले, “ डॉक्टर साहेब मला तो बॉक्स द्याल का ?” मी लगेच त्यांना तो देऊन टाकला,,, कशासाठी पाहिजे असं विचारताच थोडं गडबडून गेले, पण बायको पटकन बोलून गेली, “ त्यांना 1000 च्या नोटा ठेवण्यासाठी पाहिजे, “– मी अचंबित –निघताना पुन्हा म्हणाले,” अजून एखादा असेल तर पुढच्या वेळी द्या मला. यात बसणार नाहीत.“ त्यावेळी माझी व्हिजिट फी दहा रुपये होती, ती देण्यासदेखील ते नाखुश असायचे. विचारांचं काहूर डोक्यात घोंघावत असतानाच गाडीला किक मारून घरी आलो,,,
दुसऱ्या दिवशी सकाळीच ओपीडी मध्ये शिरतो न शिरतो तोच कंपाउंडर म्हणाला, “ सर काल सकाळी तुम्ही व्हिजिटला गेला होतात, ते आजोबा सकाळीच गेले,,,” पटकन माझ्यासमोर नोटांनी गच्च भरलेला त्यांचा तो प्लास्टिकचा बॉक्स आला,,, ‘ ना खुद खाऊंगा, ना खाने दुंगा ‘ असं आयुष्य जगतच, कसलाही उपभोग न घेता, नोटांचा बॉक्स खाली ठेवून बाबा वर गेले होते— आपण अमर आहोत किंवा अजून खूप जगणार आहोत या भ्रमातच ते गेले.
मागच्या महिन्यात आईचे वर्ष श्राद्ध झाले. तिच्याकडे भरपूर किमती साड्या होत्या. मोठी बॅग भरली होती. काहींच्या तर घड्यादेखील मोडल्या नव्हत्या. परंतू ती नेहमी साध्याच साड्या वापरायची. अर्थात वयोमानाने विरक्ती आल्यामुळे असेल कदाचित, पण या साड्यांमुळे नीताचा व तिचा नेहमी वाद व्हायचा,” कशाला नुसत्या ठेवून दिल्या आहेत बॅगेत,,, कुणी बघितलं तर म्हणतील डॉक्टरांची आई असून कसल्या साड्या घालते “ –वगैरे वगैरे. “ मला कोण बघणार
आहे ?”, तिचे नेहमीचे उत्तर. जेवढ्या चांगल्या साड्या होत्या त्या गरजूंना देऊन टाकल्या, बाकीच्या साड्यांची बॅग तशीच पडून आहे !!
आपल्या वॉर्डरोबमध्ये अनेक नवीन साड्या, पॅन्ट शर्ट पडून असतात. एवढ्या भारी साड्या, शर्ट, पॅन्ट रोज कशाला वापरायच्या, म्हणून तशाच पडून असतात. कधीकधी त्या घालायचा मुहूर्तही उजाडत नाही. आणि समजा लग्न समारंभ किंवा इतर सणासुदीला घालायच्या म्हटल्या तर त्याची फॅशन आउटडेटेड झालेली असते. त्या योग्य वेळी वापरल्या असत्या तर त्याचा उपयोग झाला असता. कपड्यांच्या बाबतीतच नव्हे, तर घरामध्ये अशा अनेक गोष्टी आपण ‘ नंतर वापरू ’ असं म्हणत म्हणत कालबाह्य होऊन जातात व तशाच लोळत पडतात,,,
आपल्या आयुष्यामध्ये वस्तूंच्या बाबतीत जी गोष्ट घडत असते तीच आपल्या मनातील चांगल्या-वाईट विचारांच्या बाबतीत देखील घडत असते. बरेचदा आपल्या आयुष्यात येणारे मित्र, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य, यांच्याबद्दल आपल्या मनात असणारा स्नेह, प्रेम, आपुलकी, आपण आपल्या इगो किंवा संकुचित वृत्तीमुळे बोलून दाखवत नाही. मग बरेचदा वेळ निघून जाते, कारण बोलण्यासाठी ती व्यक्तीच उरलेली नसते. संचय वस्तूंचा असो वा मनातील विचारांचा, त्याचा योग्य विनियोग, वापर झाला नाही तर त्यांची किंमत शून्य होऊन जाते. तेव्हा मित्रांनो आजचा उगवलेला दिवस हाच आपल्यासाठी occasion असतो– त्याच्यावरच आपला अधिकार असतो.—म्हणून तुमच्याजवळ असलेले मौल्यवान–मग त्या वस्तू असोत वा विचार— आजच वापरून टाका– त्या ‘ आउटडेटेड ‘ होण्याअगोदर !!!
डॉ संजय मंगेश सावंत
संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ पुण्य करताना पाप… ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर☆
पशुपक्षांना खायला, पाणी प्यायला देणे चांगलेच आहे. पण त्याने त्यांच्या नैसर्गिक सवयींमध्ये फरक पडतो. त्या विषयाची दुसरी बाजू मांडणारा हा लेख. लेखक माहीत नाही पण मते मात्र पटली.********
पुण्य करताना पाप होतंय-……महापाप…..
प्राण्यांना किंवा पक्षांना (कबुतरांना,माकडांना,पोपटांना वगैरे वगैरे) अन्न धान्य खाऊ घालणाऱ्यांच्या बातम्या पाहून आपल्यातला भाबडेपणा जागा होतो ! आणि कौतुक करतो आपण !!!!
प्रथमदर्शनी आपण स्वतःवरच खूश होतो की आपल्या मनात किती पवित्र आणि सहानुभूतीचे विचार आहेत–
थोडी उसंत घ्या—आधी पुढचे शेवटपर्यंत वाचा :—
निसर्ग, या सर्व जीवांना आपल्या जन्मापूर्वीपासून पोसतोय;
त्यासाठी त्यांच्या आहार विहार आणि प्रयत्नवादाचे प्रोग्रामिंग त्यांच्या मेंदूत by default निसर्गाने टाकले आहे !
वन्य जीवांना आपण आपल्या आवडीचे -सोयीचे पदार्थ, आयते भरवून, त्यांच्या मेंदूतले सेटिंग नष्ट करतोय, त्यांच्या पुढील पिढ्यांना आयतं आणि अनैसर्गिक खाण्याची (ज्याने त्यांना, खाल्ल्यावर वेदना होतात बऱ्याचदा — हे सिद्ध झालंय) सवय लावतोय ! त्यामुळे ते त्यांचे नैसर्गिक अन्न मिळवण्याची क्षमता गमावतात कालांतराने ! त्यांची पिल्लेही अक्षम जन्मतात.
खंडाळा घाटातल्या माकडांना आयत्या वेफर कुरकुरे च्या सवयी आपण लावल्या;
त्यामुळे त्यांची वजने वाढली.–झाडांवरून उड्या मारताना बॅलन्स न झेपल्याने अपंगत्व आले. हाल होत तळमळत मेले शेवटी.
त्यांच्या पिल्लांना मानवाच्या मदतीशिवाय रानावनातून अन्न मिळवण्याची कला मिळालीच नाही.
परिणामी रस्त्यावरचे भिकारी होण्यापलीकडे भवितव्य उरले नाही.
या वन्यजीवांच्या, नैसर्गिक जीवनचक्रात ढवळाढवळ करण्याचे ;खूप वाईट दूरगामी परिणाम त्यांच्यावर होतात-!!!—– आणि हे पाप आपल्या हातून होते !!
—आपल्याला वाटते की आपण किती चांगले काम करतोय–पण आपण त्या जीवांना एकप्रकारे अपंग ( किंवा adict) बनवतो !
आपल्या मुलांना कोणी फ्री मघे 2 पेग दिले, किंवा रोज कोणी 500 ची नोट बक्षीस दिली तर काही दिवसात मुले बिघडतील— आणि त्यात त्यांचा दोष नसेल.
असेच झालेय बऱ्याच ठिकाणी!!!
मग हे वन्यजीव सवयीमुळे आक्रमक–कधी हल्लेखोरही होतात–आयत्या चमचमीत अन्नासाठी!!
अष्टविनायकातल्या लेण्याद्री गणपतीच्या डोंगरावर गेलो होतो.
विपुल वनसंपदा अजूनही आहे तिथे. तिथली माकडे छान नॉर्मल जगू शकली असती.
पण मानवाने हस्तक्षेप करून त्यांच्या सवयी बिघडवल्या !!
आता ती माकडे धाक दाखवून हातातल्या पिशव्या राजरोस लुटतात. फोपशी पण झाली आहेत-
हे पाप कोणाचे?
परदेशात वन्यजीवांना खाऊ घालण्यावर बंदी आहे. त्यामुळे तिथल्या वन्यजीवांच्या नैसर्गिक आहारात आणि जीवन पद्धतीत बदल होत नाही. पुढील पिढी निकोप निपजते.
आपल्या कबुतरांना आता घरटेही बांधता येत नाही, कारण अनेक पिढ्यांना आपण आयते दाणे टाकले. कबुतरे इतकी वाढली की त्यांनी चिमण्यांची आणि इतर पक्षांची जागा व्यापली. म्हणजे
इतर पक्षांवर अन्याय.
कबुतरांमुळे अस्थमा ब्रॉंकायटीस होतो हल्ली लोकांना!!!!
कबुतरखान्याजवळच्या लोकांशी बोला—आपल्या बेगडी पक्षीप्रेमापायी त्यांच्या लेकराबाळांना आपल्यामुळे मोठे आजार झाले आहेत.
दुधासाठी पाळल्या जाणाऱ्या गायीला तिच्या मालकाने तिचा आहार देणे अपेक्षित आहे.
मानवी आहाराने गायींना पोटाचे त्रास होतात-पोट फुगते- अपचन होते हे सिद्ध झाले आहे.
या सर्व जीवांना नैसर्गिकपणे जगता येईल अशी नैसर्गिक वनसंपदा जपू या- -देशी झाडांनी ती वाढवूया.
जुन्या काळातल्या ‘ पुण्य ‘ या विषयीच्या संकल्पना तपासून योग्य तिथे विधायक बदल करूयात.
संतांनी हेच सांगितलंय !
कबुतरांना दाणे टाकणे थांबवूया…..
तडकाफडकी प्रत्युत्तर देण्याची घाई करू नका—मीही तुमच्याइतकाच प्राणिप्रेमी आहे.
पक्षी प्राण्यांना मानवी आहाराची किंवा दानाची गरज नाही —त्यांचा अधिवास (झाडे, जंगले) राखू या. सखोल अभ्यासातून निघालेले निष्कर्ष समजावून घेतलेत तर आपल्या आवडत्या प्राणी-पक्षांसाठी ते खूप फायद्याचे आहे.
(सदरहू विषयातील तज्ज्ञांच्या अभ्यासावर मते मांडली आहेत. त्यामुळे फॉरवर्ड करून आपले प्राणी- पक्षी प्रेम व्यक्त करा.)
संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ शांतपणाने केवळ अलिप्त व्हा..☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
ताज्या फुलांचे आपल्याला कोण कौतुक असते. आणि ती देवाच्या पायांवर वाहिली की आणखी आनंद होतो. फुले घेताना ती ‘माझी’ असतात. पण देवाला वाहिली की ‘त्याची’ होतात…… किती शांतपणे आपण हे स्वीकारतो. अगदी अलिप्त होतो….. ‘ज्याचे होते त्याला दिले’…. फक्त हा भाव मनात असतो. त्या फुलांची ओढ संपलेली असते.
काल वाहिलेली फुले आज शिळी होतात. निर्माल्य होऊन जातात. मग निरिच्छ मनाने, ती उचलून आपण गंगार्पण करतो…….त्यांच्याप्रती आपल्याला कोणताही मोह नसतो. अपेक्षा नसते. हे कसे सोडू? हा प्रश्न नसतो. पुन्हा त्यांची आठवणही येत नाही.
अगदी तसेच, आपली दु:खे ‘त्याच्या’ चरणावर वहायची आणि शांत होऊन जायचे….
त्यांच्याप्रती कोणतीही भावना बांधून ठेवायची नाही…….. आतापर्यंत जी ‘माझी’ दु:खे होती, ती आता ‘त्याची’ झाली. त्यांचा कसला विचार करायचा…..आणि कालची दु:खे तर, आज निर्माल्य झाली. त्यांचा मोह नाहीच धरायचा. त्यांना कवटाळून बसण्याचा काहीच उपयोग नसतो.
शिळ्या फुलांप्रमाणे, मग ती सडायला लागतात. आणि मग मनाला पोखरायला लागतात….म्हणूनच जोपर्यंत ती निर्माल्य आहेत, तोपर्यंतच गंगार्पण करून मोकळे व्हायचे.
आज पेरण्यासाठी आपण आनंद आणू ना. धान्याची पेरणी करताना, जशी जमिनीची मशागत करतात…..तशी मनाची साफ-सफाई करु…. आणि तिथे आनंद पेरु या. तो शतपटीने उगवून येतो…. त्याची जोपासना करु….. त्याचा परतावा जीवन समृद्ध करतो. म्हणूनच …..
“दु:ख सोडून द्यावे,
निर्माल्य बनून जाते.
आनंद पेरत जावा,
समाधान बनून रहाते.”
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
(बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांनी केलेले सह्याद्रीचे वर्णन … हे वाचून छातीच दडपून गेली.)
अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्रि जन्मास आला. अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा अविष्कारहि तितकाच उग्र आहे! पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्रि!
त्याच्या आवडीनिवडी आणि खोडी पुरूषी आहेत, त्याचे खेळणे-खिदळणेहि पुरूषी आहे, त्यांत बायकी नाजूकपणाला जागाच नाही. कारण सह्याद्री हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे. अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट अन् काळा कभिन्न. रामोशा सारखा. पण मनाने मात्र दिलदार राजा आहे तो! आडदांड सामर्थ्य हेच त्याचे सौंदर्य! तरीपण कधीकाळी कुणा शिल्पसोनारांनी सह्याद्रीच्या कानात सुंदर आणि नाजूक लेणी घातली, त्याच्या घोटीव अन् पिळदार देहाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून मराठी मुलुखाने त्याच्या दंडावर जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव पेट्या बांधल्या, त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग भवानीचा टाक घातला, मनगटात किल्ले कोटांचे कडीतोडे घातले…
सह्याद्रीला इतके नटवले सजवले, तरीपण तो दिसायचा तसाच दिसतो– रामोशासारखा ! तालमीच्या मातीत अंग घुसळून बाहेर आलेल्या रामोशासारखा ! सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे, तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे. त्याच्या घट्ट खांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले आहेत की, तेथून खाली डोकावत नाही, डोळेच फिरतात! मुसळधार पावसात तो न्हाऊ लागला की, त्याच्या खांद्यावरून धो धो धारा खालच्या काळदरीत कोसळू लागतात आणि मग जो आवाज घुमतो, तो ऐकावा. सह्याद्रीचे हसणे, खिदळणे ते ! बेहोश खिदळत असतो.
पावसाळ्यात शतसहस्त्र धारांखाली सह्याद्री सतत निथळत असतो. चार महिने त्याचे हे महास्नान चालू असते. काळ्यासावळ्या असंख्य मेघमाला, त्याच्या राकट गालावरून अन् भालावरून आपले नाजूक हात फिरवित, घागरी घागरींनी त्याच्या मस्तकावर धारा धरून त्याला स्नान घालीत असतात. हे त्याचे स्नानोदक खळखळ उड्या मारीत त्याच्या अंगावरून खाली येत असते. त्याच्या अंगावरची तालमीची तांबडी माती या महास्नानात धूऊन निघते. तरी सगळी साफ नाहीच. बरीचशी. दिवाळी संपली की सह्याद्रीचा हा स्नानसोहळा संपतो. त्या हसर्या मेघमाला सह्याद्रीच्या अंगावर हिरवागार शेला पांघरतात. त्याच्या आडव्या भरदार छातीवर तो हिरवा गर्द शेला फारच शोभतो. कांचनाच्या, शंखासुराच्या, सोनचाफ्याच्या व बिट्टीच्या पिवळ्या जर्द फुलांची भरजरी किनार त्या शेल्यावर खुलत असते. हा थाटाचा शेला सह्याद्रीला पांघरून त्या मेघमाला त्याचा निरोप घेतात. मात्र जातांना त्या त्याच्या कानांत हळूच कुजबुजतात, “आता पुढच्या ज्येष्ठांत मृगावर बसून माघारी येऊ हं ! तोपर्यंत वाट पहा !”
रिकामे झालेले कुंभ घेऊन मेघमाला निघून जातात. दाट दाट झाडी, खोल खोल दर्या, भयाण घळी, अति प्रचंड शिखरे, उंचच उंच सरळ सुळके, भयंकर तुटलेले ताठ कडे, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, भीषण अन् अवघड लवणे, घातकी वाकणे, आडवळणी घाट, अडचणीच्या खिंडी, दुर्लंघ्य चढाव, आधारशून्य घसरडे उतार, फसव्या खोंगळ्या, लांबच लांब सोंडा, भयाण कपार्या, काळ्याकभिन्न दरडी आणि मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा ! —–
असे आहे सह्याद्रीचे रूप. सह्याद्री बिकट, हेकट अन् हिरवट आहे. त्याच्या कुशी-खांद्यावर रहायची हिम्मत फक्त मराठ्यांत आहे. वाघांतही आहे. कारण तेही मराठ्यांच्याइतकेच शूर
आहेत ! सह्याद्रीच्या असंख्य रांगा पसरलेल्या आहेत. उभ्या आणि आडव्याही. सह्याद्रीच्या पूर्वांगास पसरलेल्या डोंगरामधील गल्ल्या फार मोठमोठ्या आहेत. कृष्णा आणि प्रवरा यांच्या दरम्यान असलेल्या गल्ल्यांतच चोवीस मावळे बसली आहेत. दोन डोंगर- रांगांच्या मधल्या खोर्याला म्हणतात मावळ. एकेका मावळांत पन्नास-पन्नास ते शंभर-शंभर अशी खेडी नांदत आहेत. प्रत्येक मावळामधून एक तरी अवखळ नदी वाहतेच. सह्याद्रीवरून खळखळणारे तीर्थ ओढ्या-नाल्यांना सामील होते. ओढेनाले ते या मावळगंगांच्या स्वाधीन करतात. सगळ्या मावळगंगा हे माहेरचे पाणी ओंजळीत घेऊन सासरी जातात. या नद्यांची नावे त्यांच्या माहेरपणच्या अल्लडपणाला शोभतील अशीच मोठी लाडिक आहेत. एकीचे नाव कानंदी, दुसरीचे नाव गुंजवणी, तिसरीचे कोयना. पण काही जणींची नावे त्यांच्या माहेरच्या मंडळींनी फारच लाडिक ठेवलेली आहेत. एकीला म्हणतात कुकडी, तर दुसरीला म्हणतात घोडी ! तिसरीला म्हणतात मुठा, तर चौथीला वेलवंडी ! काय ही नावे ठेवण्याची रीत ? चार चौघीत अशा नावांनी हाक मारली की, मुलींना लाजल्यासारखे नाही का होत ? कित्येक मावळांना या नद्यांचीच नांवे मिळाली आहेत. कानंदी जेथून वाहते ते कानद खोरे. मुठेचे मुठे खोरे. गुंजवणीचे गुंजणमावळ, पवनेचे पवन मावळ, आंद्रेचे आंदरमावळ आणि अशीच काही. मावळच्या नद्या फार लहान. इथून तितक्या. पण त्यांना थोरवी लाभली आहे, ती गंगा यमुनांची. सह्याद्री हा सहस्त्रगंगाधर आहे. मावळांत सह्याद्रीच्या उतरणीवर नाचणी उर्फ नागली पिकते. नाचणीची लाल लाल भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा हे मावळचे आवडते पक्वान्न आहे. हे पक्वान्न खाल्ले की बंड करायचे बळ येते ! भात हे मावळचे राजस अन्न आहे. आंबेमोहोर भाताने मावळी जमीन घमघमत असते. अपार तांदूळ पिकतो. काही मावळांत तर असा कसदार तांदूळ पिकतो की, शिजणार्या भाताच्या पेजेवर तुपाळ थर जमतो. खुशाल वात भिजवून ज्योत लावा. नाजूक व सोन्यासारखा उजेड पडेल. महाराष्ट्राच्या खडकाळ काळजातून अशी ही स्निग्ध प्रीत द्रवते. मावळे एकूण चोवीस आहेत. पुण्याखाली बारा आहेत व जुन्नर-शिवनेरीखाली बारा आहेत.
मोठा अवघड मुलूख आहे हा. इथे वावरावे वार्याने, मराठ्यांनी नि वाघांनीच.
—शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात…
मुंबई, १० एप्रिल – जगात फार कमी लोकांमध्ये माणूसकी आहे असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे मुंबईच्या ट्रेनमध्येही अशी फार कमी माणसं आहेत ज्यांच्या चांगुलपणामुळे आपण कळत-नकळत खूप काही शिकत असतो. मी गौरव गद्रे आज तुम्हाला माझ्यासमोर घडलेल्या घटनेबद्दल सांगणार आहे. अगदी एका छोट्याशा कृतीमधूनही तुम्ही कसा बदल घडवू शकता हे मी त्या अनुभवातून शिकलो.
नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी मी वांद्रे स्टेशनला थांबलो होतो. सकाळची वेळ असल्यामुळे अर्थातच पूर्ण स्टेशन माणसांशी भरून गेलं होतं. ऑफिसला उतरण्यासाठी मला मधल्या डब्यात बसणं सोयीस्कर असल्यामुळे मी लेडीज डब्याच्या मागे असणाऱ्या डब्याकडे ट्रेनची वाट पाहत उभा होतो.
इतक्यात माझ्या बाजूला काही अंतरावर उभ्या असलेल्या एका महिलेचं तान्हं बाळ रडायला लागलं. बाळाच्या रडण्याच्या आवाजामुळे साहजिकच सगळ्यांचं लक्ष तिकडे गेले. बाळाकडे एक कटाक्ष टाकून सगळेजण आपल्या मोबाइलमध्ये, पेपरमध्ये पाहू लागले. थोड्यावेळाने ते बाळ रडण्याचं काही थांबत नव्हतं. आजूबाजूच्या महिलांनीही त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ते शांत होण्यापेक्षा जास्तच रडत होते. त्या आईची परिस्थिती तर पाहण्यासारखी होती. तिने बॅगेतली दुधाची बाटली काढली आणि बाळाच्या तोंडात दिली. पण ते बाळ दूधही पीत नव्हतं.
अखेर तिथल्या महिलांच्या घोळक्यातल्या एका आजीने तिला अंगावरचं दूध पाजायला सांगितलं. तिने सुरुवातीला फक्त हो हो म्हटलं, पण बाळ रडण्याचं शांत होत नाही हे लक्षात येता ती बाळाला घेऊन स्टेशनवरच्याच एका बाकडावर बसली आणि बाळाला पाजू लागली. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी महिलेला बाळाला पाजताना पाहिलं की तिला मॅनर्स नाहीत, अशिक्षित आहे.. एवढ्या लहान बाळाला ट्रेनमधून फिरवतातच का असे अनेक प्रश्न विचारून हैराण करतात. ही घटना घडेपर्यंत मीही त्यांच्यापैकीच एक होतो.
ती महिला शिक्षित होती की अशिक्षित.. सुसंस्कृत होती की नव्हती या नको त्या प्रश्नात अडकण्यापेक्षा ती एक स्त्री होती आणि पाच ते सहा महिन्याच्या बाळाची आई होती हेच महत्त्वाचं आहे. ती बाकड्याच्या कडेला बसून बाळाला पाजत होती. आता आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी बाळाला पाजायला बसल्यावर जे होतं तेच वांद्र्याच्या स्टेशनवर होत होतं. काही अपवाद वगळता येणारा जाणारा त्या बाईकडे कटाक्ष टाकून जातच होता. माझं त्या महिलेकडे कमी आणि तिच्याकडे पाहणाऱ्या पुरुषांकडे लक्ष जास्त होतं. आपल्या समाजाची मानसिकता कधी बदलणार हाच एक प्रश्न माझ्या मनात राहून राहून येत होता.
काहींनी तर तिच्याकडे अश्लिल नजरेने पाहायलाही कमी केलं नाही. आपला देश कधीच सुधारणार नाही या मतावर मी येतच होतो, इतक्यात २५ ते २७ वर्षांचा एक मुलगा माझ्यासमोर आला. हाही त्यांच्यापैकीच एक असं मला वाटत होतं. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांपैकी तो एक वाटत होता. जीन्स, टी-शर्ट, कानात इअरफोन्स आणि पाठीला बॅग लावून तो स्टेशनवर उभा होता. त्याने बॅगमधून पेपर काढला आणि तो अगदी सहजपणे त्या महिलेच्या समोर जाऊन उभा राहिला. मी त्याच्याकडेच पाहत होतो, तो नक्की काय करतोय हे माझ्या लक्षात येत नव्हतं.
तो पेपर महिलेला कव्हर करेल अशा पद्धतीने पूर्ण उघडला आणि तो अगदी सहजपणे पेपर वाचायला लागला. एका क्षणासाठी त्या महिलेलाही कळलं नाही की ही व्यक्ती कोण आणि ती अचानक माझ्यासमोर का आली.. पण नंतर काही सेकंदांमध्येच तिला त्या मुलाचा हेतू लक्षात आल्यावर ती फार रिलॅक्स झाली. त्याच्या या कृतीने ती बाई आता पटकन कोणाच्या डोळ्यात येत नव्हती आणि शांतपणे आपल्या मुलाला पाजू शकत होती. त्याची ही काही मिनिटांची कृती पाहून मला खरंच धक्का बसला. ही गोष्ट माझ्या का लक्षात आली नाही… मी अशा पद्धतीने का विचार केला नाही…??? याचाच मला प्रश्न पडला. त्याच्या त्या दोन-तीन पावलांच्या कृतीने माझी विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली.
प्रत्येक द्रौपदीला असा एखादा कृष्ण भेटायलाच हवा..!!
– गौरव गद्रे
संग्राहक – सुश्री मीनल केळकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
प्रार्थना म्हणजे ती नाही. जी आपण हात जोडून, गुढघ्यावर बसून देवाकडं काहीतरी मागण्यासाठी केलेली असते…!
प्रार्थना तीच असते, जी सकारात्मक विचार करून लोकांसाठी काहीतरी चांगली इच्छा करते–, ही खरी प्रार्थना…!!
जेव्हां तुम्ही कुटुंबाच्या पोषणासाठी अत्यंत चांगल्या मनानं स्वयंपाक करता, ती प्रार्थना असते…!!
जेंव्हा आपण लोकांना निरोप देताना, त्यांच्या चांगल्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो, ती प्रार्थना असते…!!
जेंव्हा आपण आपली ऊर्जा आणि वेळ देऊन एखाद्याला मदत करतो, ती प्रार्थना असते…!!
जेव्हा आपण कोणाला तरी मनापासून माफ करतो, ती प्रार्थना असते.
प्रार्थना म्हणजे कंपनं असतात. एक भाव असतो. एक भावना असते. एक विचार असतो. प्रार्थना म्हणजे प्रेमाचा आवाज असतो. मैत्री, निखळ नाती, हे सगळं म्हणजे प्रार्थनाच तर असते…!!
? श्री स्वामी समर्थ ?
सग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈