घरातील सर्व कामे तर करायचीच होती, वर उद्या होळीच्या निमित्ताने बरेच पाहुणे जेवायला येणार होते.
या सगळ्या गोष्टींमुळे ती त्रस्त झाली होती.
जवळच तिची १० वर्षांची मुलगी आपल्या वहीत काहीतरी लिहीत होती.
तिने मुलीला विचारले, “काय करतेयस?”
मुलगी म्हणाली,
“आज Teacher नी होमवर्क दिला आहे. विषय आहे ‘Negative thanks giving’ आणि सांगितले आहे की अशा गोष्टींवर निबंध लिहा की ज्या आपल्याला सुरुवातीला आवडत नाहीत, पण नंतर आवडायला लागतात.”
आईनं आश्चर्य व्यक्त करून वही बघायला घेतली.
बघू या आपल्या मुलीने काय लिहीलंय.
मुलीने लिहीलं होतं –
“मी माझ्या वार्षिक परीक्षेला धन्यवाद देते, कारण त्यानंतर उन्हाळी सुट्टी चालू होते.
मी त्या सर्व कडू आणि खराब चवीच्या औषधांना धन्यवाद देते, कारण त्या घेतल्यावरच माझी तब्येत चांगली होते.
मी गजराच्या घड्याळाला धन्यवाद देते, कारण पहाटे पहाटे तेच मला मी अजूनही जिवंत असल्याचे सांगत असते .”
वाचता वाचता आईच्या मनात विचार आला की –
“अरे, माझ्याकडे पण अशा अनेक गोष्टी आहेतच की; ज्यांच्या साठी मी धन्यवाद व्यक्त करू शकते.”
विचार करता करता खूप बाबी समोर आल्या.
“Income Tax द्यावा लागतो याचाच अर्थ सुदैवाने माझ्याकडे चांगल्या पगाराची नोकरी आहे.”
“घरी भरपूर काम करावं लागतं, म्हणजेच माझ्याकडे एक घर, एक हक्काचे आश्रयस्थान आहे.”
” सणासुदीला मला खूप माणसांसाठी जेवण बनवावे लागते, म्हणजेच मला भरपूर नातेवाईक आहेत, जे माझ्या सुख दुःखाचे साथीदार आहेत.”
गोष्टीचे तात्पर्य –
प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा….
चला, आपणही असाच Positive Attitude ठेवून आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सोनेरी बनवूया.
संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डब्यातला श्रीकृष्ण – एक सुंदर दृष्टान्त — लेखक – मनोहर कानिटकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर☆
एक संन्यासी फिरत फिरत एका दुकानावरून जात होता.त्याचे सहज लक्ष गेले.त्या दुकानात बरेच लहान मोठे डबे,बरण्या होत्या.त्या संन्याशाच्या मनात सहज एक विचार आला आणि त्याने त्या दुकानदाराला एक डबा दाखवून विचारले,” यात काय आहे?” दुकानदार म्हणाला – “त्यात मीठ आहे.” संन्यासी बुवांनी आणखी एक डब्याकडे बोट दाखवून विचारले- “यात काय आहे?” दुकानदार म्हणाला- “यात साखर आहे.” असे करत करत बुवांनी शेवटच्या डब्याकडे बोट करून विचारले-“आणि यात काय आहे?” दुकानदार म्हणाला, ” यात श्रीकृष्ण आहे.” संन्यासी अचंबित झाला आणि म्हणाला, “अरे, या नावाची कोणती वस्तू आहे?मी तर कधी ऐकली नाही. हे तर देवाचे नाव आहे.” दुकानदार संशयी बुवांच्या अज्ञानाला हसून म्हणाला,”महाराज तो रिकामा डबा आहे. पण आम्ही व्यापारी रिकाम्या डब्याला रिकामा नाही म्हणत. त्यात श्रीकृष्ण आहे असे म्हणतो.”
बुवांचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले.ते ईश्वराला म्हणाले “अरे कोणत्या कोणत्या रूपाने तू ज्ञान देतोस.ज्या गोष्टीसाठी मी एवढा भटकलो, घरदार सोडून संन्यासी झालो, ती गोष्ट एक दुकानदाराच्या तोंडून मला ऐकवलीस.परमेश्वरा मी तुझा शतशः आभारी आहे”. असे म्हणून त्याने त्या दुकानदाराला साष्टांग नमस्कार केला.
जे मन-बुद्धी- हृदय काम, क्रोध, लोभ, मोह,मद,मत्सर, अहंकार,ईर्षा,द्वेष, चांगले-वाईट आणि सुख-दुःख अशा लौकिक गोष्टींनी भरले आहे, तिथे श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत कसा राहील? जे रिकामे आहे म्हणजेच एकदम स्वच्छ आहे, अशाच ठिकाणी म्हणजे अशाच मन,बुद्धी व हृदयात परमेश्वर वास करतो.
लोकांना दाखवायला गीता व ज्ञानेश्वरी वाचली किंवा एकादशीला आळंदी-पंढरपूरची वारी केली, तरी मन-बुद्धी-हृदय जोपर्यंत रिकामे होत नाही, म्हणजे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत परमेश्वर तिथे वास करणार नाही.
लेखक : श्री मनोहर कानिटकर
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाने प्रसिद्धीस आलेले प्रख्यात नाट्यकलावंत डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा एक किस्सा आज तुमच्यासोबत शेअर करतोय. ते व त्यांची पत्नी विजया जर्मनीला नाटकाच्या दौऱ्यानिमित्त गेले होते. दौरा आटोपून पुढच्या शहरात जाण्यासाठी ते फ्रँकफुर्ट विमानतळावर आले. तेथून त्यांना पुढच्या प्रवासाला जायचे होते. नेमका गडबडीत त्यांचा पासपोर्ट बॅगमध्ये सापडत नव्हता. खूप शोधाशोध सुरु होती. दोन-तीन वेळेस अनाउन्समेंट झाली. शेवटी विमानतळाचे काही अधिकारी त्यांना तुम्हाला जाता येणार नाही, असे म्हणू लागले.
त्यांच्यातील एका अधिकाऱ्याने त्यांना एक फॉर्म भरायला दिला. जर तुम्ही खोटा प्रवास केला असे सिद्ध झाले, तर तुमच्याकडून दंड वसूल केला जाईल, अशा आशयाचा तो फॉर्म होता. त्या फॉर्मवर तुमच्या व्यवसायाचे स्वरूप लिहायचे होते. त्या जागी त्यांनी ‘Teacher’ असा उल्लेख केला.
तो पाहताच क्षणार्धात तेथील वातावरण बदलले. तो अधिकारी कमरेत वाकून म्हणाला, “We Germans, Believe in two things. One is God..Another is Teacher! ते दोघेही खोटं बोलत नसतात.. मी परमेश्वराला दुखावले आहे. तुम्ही तुमच्या वतीने माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे मी पापमुक्त होईन…” अशी अॅपॉलॉजी व्यक्त करीत त्या अधिकाऱ्याने देशपांडे दाम्पत्याला थेट विमानात नेऊन बसविले.
प्रवासाच्या शेवटी देशपांडे दाम्पत्य मुंबईत आले. विमानतळावरील ग्रीन बेल्टमधून बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. तेव्हा एका अधिकाऱ्याने त्यांना टोकले. तर दुसऱ्या अधिकाऱ्याने ते काय करतात, त्यांना विचार, असे फर्मान हाताखालच्या अधिकाऱ्यावर बजावले. यांच्या मनात टीचरची प्रतिमा उजळ झाली होती. त्यांनी ताठ मानेने आम्ही टीचर आहोत, असे सांगितले. त्याच्या दुसऱ्याच क्षणाला तो वरिष्ठ अधिकारी ओरडून म्हणाला, ‘अरे वो फटिचर के पास क्या होगा? जाने दो उसे…’ वऱ्हाडकरांचे टीचर नावाचे विमान झटक्यात जमिनीवर आले.
कालांतराने ते औरंगाबादला गेले. काही दिवसांनी त्यांच्या घरी फ्रैंकफर्ट एअरपोर्टवरून एक टपाल आले. ज्यात आपण टीचर असतानाही आम्ही आपल्याला त्रास दिला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे पत्र होते. देशपांडे यांना ते पाहून हसावे की रडावे ते कळेना.
संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वयाच्या एका टप्प्यावर माणसाला तटस्थता येते. आयुष्यभर माणसांचे, नातेवाईकांचे, मित्रमैत्रिणींचे अनुभव घेऊन प्रगल्भता आलेली असते. प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. घडून गेलेल्या प्रसंगाचे अवलोकन करता येते. हे खरंच घडलं का? मग घडलं तर का घडलं? आपलं काय चुकलं? ह्याचा विचार करण्याची क्षमता वाढते. माफ करण्याची वृत्ती वाढते. साध्या साध्या गोष्टींवरून येणारा राग आता येत नाही. मनःशांती मिळायला सुरुवात होते. कशाचेही काही वाटेनासे होते. आता हे चांगले का वाईट, हे घडत असणाऱ्या गोष्टी ठरवत असतात. येणारा प्रत्येक प्रसंग किंवा घटना मनाला किती लावून घ्यायची, ह्याचे जणू काही प्रात्यक्षिकच आपल्याला मिळालेले असते. एखाद्या घटनेकडे तटस्थपणे बघता येते. आपली ह्यामध्ये काय भूमिका आहे? ती महत्वाची आहे का? आपल्या मताची गरज आहे का? हे सगळे समजून घेता येते. त्याची उत्तरे मिळत राहतात. जी उत्तरे मिळतात, त्याने आपल्याला त्रयस्थपणे वागता येते.
आता वारंवार डोळ्यात येणारे पाणी थोपवण्याची कला अवगत झालेली असते. आपले कोण, परके कोण? किंवा जी आहेत ती खरंच आपली आहेत का? किंवा मग जी होती ती आपली होती का? ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी येत होतं, ती माणसे आता दुरावलेली असतात. आपल्याला हवं तशी माणसे वागतच नाहीत, हे समजायला लागतं. मग अपेक्षांचं ओझं हळूहळू कमी होत जातं आणि एक अंतर आपोआपच तयार होतं . हा आलेला एकटेपणा जास्त सुंदर असतो. कुणाचेही बंधन नाही, अपेक्षा नाहीत आणि त्यामुळे होणारे दुःख नाही. त्यामुळे वागण्यातला ओलावा आपोआपच कमी होतो. बोलणं कमी होते. कर्तव्यभावनेने काही गोष्टी केल्या जातात. पण त्यातील गुंतवणूक कमी होते. त्यामुळे तटस्थता येते.
आपल्या आजूबाजूचा गोतावळा आपोआप कमी होतो. आपले आपण उरत जातो आणि जग जास्त सुंदर होतं. हा एकटेपणा जास्त सुंदर असतो. जग जास्त सुंदर दिसायला लागतं. खरं म्हणजे ते सुंदर होतंच; पण आपण दुसऱ्याच्या नजरेतून बघत होतो. ही आलेली तटस्थता जगायला शिकवते. आजपर्यंत केलेल्या गोष्टी किंवा राहून गेलेल्या गोष्टी करायची एक उमेद देते. कारण आता कसलंही ओझं नसत. कुणाकडून कसलीही अपेक्षा नसते, कोण काय म्हणेल, ह्याची भीती नसते. आपण कुणाला बांधील नसतो. आपल्या कर्तव्यातून आपण मोकळे होऊ शकत नाही; पण दूर राहून ती करू शकतो, हे अनुभवायला येते. ज्या गोष्टींमध्ये विनाकारण गुंतून पडत होतो, त्या गोष्टी किती फोल होत्या, हे कळते. त्यामुळे आत्मपरीक्षण केलं जातं .
नव्या आयुष्याला सुरुवात होते. आता माहीत झालेलं असतं की कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय करू नये. त्यामुळे आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आलेली तटस्थता ही छान वाटू लागते. हे ज्याला कळलं/उमगलं ती व्यक्ती खरंच भाग्यवान.
तर, काहींचे आयुष्य मात्र ‘आम्ही अजूनही शिकतोय !’
आधीच्या पिढीकडून पैसे वाचवायला शिकलो;
नंतरच्या पिढीकडून पैसा वापरायला शिकतोय.
आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकलो;
नंतरच्या पिढीकडून डिजिटली नवीन नाती जोडायला शिकतोय.
आधीच्या पिढीकडून मन मारून जगायला शिकलो;
नंतरच्या पिढीकडून मन भरून जगायला शिकतोय.
आधीच्या पिढीने, Use and use more मधली उपयुक्तता शिकवली;
नंतरच्या पिढीकडून Use and throw मधली नावीन्याची गंमत अनुभवायला शिकतोय.
🌺 “सामान्य ब्राह्मणांची असामान्य दानत…” लेखक : डॉ. नील वाघमारे 🌺 प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
आज संध्याकाळी इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगचे प्रक्षेपण करेल.
आपण सर्वजण या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे साक्षीदार होऊ.
या पार्श्वभूमीवर, इस्रोच्या आर्मीत असलेल्या एका हिऱ्याची गोष्ट शेअर करायची आहे. त्यांचे नाव श्री भरत कुमार के, इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ…
कोळशाच्या खोल खाणीत पडलेला हा हिरा श्री रामदास जोगळेकर आणि त्यांच्या वहिनी सौ वनजा भावे यांनी भिलाई (छत्तीसगड) जवळील चारोडा गावातून 10’x 10’ च्या झोपड्यातून शोधून काढला. गावाच्या आजूबाजूला कोळसा आणि लोखंडाच्या खाणी आहेत आणि तिथे तासभर उभे राहिल्यास कोळशाला हात लावला नाही तरी तुमचे कपडे काळे होतील अशी परिस्थिती आहे….
श्री जोगळेकर आणि श्रीमती भावे यांना कळले की सेंट्रल स्कूल, भिलाई मार्शलिंग यार्डमधील एका मुलाने गणित आणि भौतिकशास्त्रात 99% आणि रसायनशास्त्रात 98% गुण मिळवले आहेत आणि त्याला इंजिनीअरिंग करायचे आहे, तेव्हा ते त्याला भेटण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी गेले. त्यांना त्या मुलामध्ये ‘स्पार्क’ दिसला आणि त्यांनी त्याच्या आयआयटी कोचिंगची फी भरली.
मुलाने आयआयटी धनबादमध्ये प्रवेश मिळवला त्याची फी देखील दोघांनी भरली आणि श्री. भरत कुमार के हा टॉपर होता आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये 8 पैकी 7 सेमिस्टरमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले!!
आयआयटी, धनबादमधून कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये SAIL ने सिलेक्ट केलेला तो एकमेव कॅन्डीडेट होता आणि फायनली 2019 मध्ये इस्रोने त्याची निवड केली.
त्यांचे वडील सुरक्षा रक्षक आहेत आणि आई खाणीतील कामासाठी वाट पाहत असलेल्या रोजंदारी कामगारांना इडली विकते.
.. श्री. भरत कुमार के आणि त्यांच्या पालकांना सलाम. कोळशाच्या खाणीतून हिरा शोधून तो चमकदार बनवण्याचे श्रेय श्री जोगळेकर आणि श्रीमती भावे यांना जाते. त्या दोघांनाही नमन….
लेखक : डॉक्टर नील वाघमारे
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आज दोघंही खूपच आनंदात होते..पुण्याहवाचन करण्याची खूप इच्छा होती पण मुलांच्या रूटिनमध्ये व्यत्यय नको म्हणून एकत्र मानसपूजा केली..लगबगीनी आपल्या वाटणीची कामे आटोपली..मुलांना …नातवंडांना सरप्राईज द्यायचं ठरवून दोघंही संध्याकाळीच घराबाहेर पडले…
“आता कळवू मुलांना” उतावीळपणानी तिनी विचारले..अन् होकाराची वाट न बघताच मोबाईल काढला..
तोच मुलाचा फोन वाजला…टेलिपथी..म्हणतच तिनी आनंदानी फोन घेतला…आणि…काही बोलण्यापुर्वीच तिकडून मुलानी निरोप दिला..
“आई..आज आमचा स्वयंपाक नको करूस हं…हिची मैत्रिण खूप वर्षांनी भारतात आली..तिच्यासोबत डिनरला जायचेय..मुलंही चलणार अाँटीला भेटायला…तुम्ही जेवून घ्या हं…आणि हो..औषध – गोळ्या घ्यायला विसरू नका हं..बाय”…
काहीही न बोलता तिनी फोन ठेवला..
तो किंचीत हसला अन् बोलला..”मुलांचा कार्यक्रम ठरलाय नं”..
तिनी मान हलवली..तो उदासला..म्हणाला..”आता..?..ह्या सरप्राईजचं काय?..”
“आपलंच सरप्राईज..आपणच एंजॉय करायचं..”
त्याचे डोळे भरले…. पण ती शांतच…. “ चल घे…”
रात्री मुलाची व्हॉट्स ऍप पोस्ट आली..” आम्ही पोहोचलो…तुम्ही लवकर या..”
आईनी पोस्ट टाकली..” तुम्ही झोपा..”
मुलानी पुन्हा विचारलं..” तुम्ही कुठे,? “
आईनी दोघांचा हॉटेलमध्ये अरेंज केलेल्या डिनरचा फोटो टाकला..
“त्या” दोघांच्या मागच्या कट-आऊटनी मुलगा दचकलाच…
त्यानी थेट फोन लावला…”आई तुम्ही कोणत्या हॉटेलात आहात..? मी येतोय..”
आई शांतपणे म्हणाली..”असू दे बाळा…आम्ही हॉटेल सोडलंय..आणि हो..आज आम्ही घरी येणार नाही..लोणावळ्यासाठी निघालोय..तुम्ही शांतपणे झोपा..आणि हो..बाबांचं नेहमीचं दरवाजे लावण्याचं काम आजच्या दिवस करून घे हं बेटा..सर्वांना आजच्या विशेष दिवसाचा विशेष आशिर्वाद सांग…बाय..”
मुलानी पुन्हा व्हॉट्स ऍप उघडला..आणि भरल्या डोळ्यानी वाचलं…”50th..Wedding Anniversery”…..
त्यानी हळूच तिचा हात हातात घेतला..डोळ्यांच्या कडा पुसत ती म्हणाली…” जीवन म्हणजे चकवा असतो नाही?…फिरून त्याच जागी आणणारा..?. ..वैवाहिक जीवनाची सुरूवात आपण दोघांनीच केली होती नं?…आजही आपण दोघंच उरलोयत..”
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ गणपती का बसवतात ?… अज्ञात ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
गणपती का बसवतात ? त्याचे विसर्जन अनंत चतुर्दशीला का होते?….
आपल्या धर्मग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषी यांनी महाभारत हे महाकाव्य रचले. परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली व त्यांना महाभारत काव्य लिहिण्याची विनंती केली. मला गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालेल, त्यामुळे गणपतीला थकवा येईल त्यावेळी पाणीही वर्ज्य होते अशावेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास ऋषींनी गणपतीच्या शरीरावर मृतिकेचे लेपन केले. आणि भाद्रपद चतुर्थीला त्याची यथासांग पूजा केली. मातीचे लेपन असल्यामुळे गणपती अडकून पडला. म्हणून यांना पार्थिव गणपती हे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर गणपतीच्या शरीराचे तापमान वाढले आहे आले. हे तापमान कमी व्हावे आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात ठेवले. तेव्हापासून चतुर्थीला गणपती बसवला जातो. त्याला वेगवेगळे पदार्थ खाण्यास दिले जातात आणि अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन होते ही प्रथा पडली.
लेखक : अज्ञात
संग्रहिका : सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ज्यांना ज्यांना आई आहे, मग ती तरुण असो की वृद्ध, त्या सर्वांनी मुद्दाम खालील लेख वाचून तसे आचरण करण्याचा प्रयत्न करावा…!
( पेशाने सर्जन असणाऱ्या मुलाने लिहिलेला अतिशय सुंदर लेख !)
वयोपरत्वे तोल जाऊन पडल्याने आई अंथरुणाला खिळली ती कायमचीच. सर्व अवयव नव्वदीतले.
झिजलेल्या कंबरेवरचा मुकामार तिला कायमचा परावलंबी करून गेला. पाय उचलणं सुद्धा अशक्य झालं.
तिच्या संवेदना कमी झाल्याने सगळे सोपस्कारही कपड्यातच… वृद्धत्व सोडून दुसरा आजार नव्हता.
पण म्हातारपण म्हणजे सुकून जीर्ण झालेलं बालपण. तोच हटवाद आणि वागणंही तसंच लहरी.
सल्ला मसलतींचा पाउस पडला. लाख मोलाच्या आईसाठी काही हजाराची केअरटेकर… मनाला पटेना.
अनेक पर्यायांचा उहापोह झाला. आम्हा दोघांची कामं अत्यावश्यक सेवेतली. सलग सुट्ट्यांचा दुष्काळ.
मग मीच ठरवलं केअरटेकर व्हायचं. चिडक्या, हट्टी म्हातारबाळाची आई व्हायचं.
लाळेरं लावून सकाळी चमच्याने पाजलेला चहा… दमदाटी करत भरवलेलेचे चिऊ काऊचे घास.
कधी ठसका, कधी मळमळ तर कधी उलटी… बहाणेच बहाणे.
पेशाने सर्जन, मलमूत्र रोगांशी जुनी दोस्ती. त्यामुळे संकोच सोडणं सोपं गेलं. डोळे मिटून घेण्याशिवाय तिच्या संकोचाला पर्यायच नव्हता. वेळोवेळी डायपर बदलून, अंग पुसून, पावडर लावून कपडे घालण्यापासून ते तेल लावून वेणी फणी करण्यापर्यंत सगळं.
दिवसातून दोन तीनदा घर ते हॅास्पिटल, हॅास्पिटल ते घर अप-डाऊन. धावपळ होत होती; पण थकवा आला तरी जाणवत नव्हता. तिच्या प्रत्येक हाकेमुळे मनातल्या मनात माझाही पान्हा फुटत असावा.
मनाच्या कुठल्यातरी पातळीवर कधीही न मिळालेलं समाधान अनुभवत होतो. कुठल्याही कळा न सोसता मला तिचं आईपण मिळालं हे माझं किती मोठं भाग्य होतं !
पण फार काळ नाही. काही महिन्यांची सेवा आणि एका प्रसन्न सकाळी माझ्या हिरकणीने गड सोडला.
मी माझं कर्तव्य समजून तिची सेवा केली. कुणीतरी म्हणालं पुण्य कमावलंस.
त्यांचं खरं असेल तर हे छोटंसं पुण्य चित्रगुप्ताच्या डायरीतील माझं पान भरायला पुरेसं होईल.
देव आणि आई एकाच नाण्याच्या दोन बाजू. देव खाली येऊ शकत नाही म्हणून आईला पृथ्वीवर पाठवलं। असं कुठंतरी वाचलेलं. त्या वाक्याचा प्रत्यय यावा अशी आपली आई.
रामची असो की शामची.
कैकयी असो की गांधारी.
आई सगळ्यांची सारखीच.
शरीराने आणि मनाने आपल्या गूढ देवराईतील शक्ती देवता… फक्त आपल्या भल्यासाठीच तिच्या ओंजळीतली माया रिकामी करणारी लक्ष्मी… प्रत्येकाच्या छोट्याशा आकाशातील अढळ स्थानावरील ध्रुवतारा… तिचं गुरुत्वाकर्षण तर पृथ्वीपेक्षाही भारी. खालून वर नेणारं… बिजांडातून ब्रम्हांडात पोहचवणारं.
तिच्या बिजांडात अंकुरलेला सूक्ष्म कोंब म्हणजे आपण… एक दशांश मि.मि.पेक्षाही लहान. गर्भाशयाच्या भिंतीवर मुळं पसरून, तिचंच रक्त शोषून तगणारं बांडगुळ.
मधेच केव्हातरी पारंबी फुटावी तशी नाळ फुटते बेंबीतून. त्यातून मिळणाऱ्या खतावर कोंबाचं रोपटं होण्याची सुरुवात होते… चैत्राच्या पालवीसारखे हळूहळू फुटलेले कोवळे कोवळे अवयव. तिचीच ऊर्जा घेऊन सुरू झालेली इंजिनं… आदिपासून अंतापर्यंत अव्याहत पळणारी.
नव्या फुफ्फुसाचा पहिला श्वास आणि नव्या ह्रदयाचा पहिला ठोका तिच्याच मालकीचा.
नॅनोग्रॅम पासून ते किलोग्राम पर्यंतची वाढही तिच्याच कोठारातील.
कणाकणानं वाढणारं ओझं घेऊन तोल सांभाळणारा कणखर मणका….
कितीही वाकला तरी पोटातल्या गोळ्याला सुरक्षित वाहणारा.