२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर १४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत २१ जून हा योग दिन म्हणून साजरा करायचा प्रस्ताव मांडला. १९३ पैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. २१ जून २०१५ हा पहिला योगदिन ठरला. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली.
भारतीय संस्कृतीतील योग संकल्पनेचा याला आधार आहे. यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक उन्नती साधते. यामध्ये योगासने, प्राणायाम आणि ध्यान व पातंजल योग यांचा समावेश होतो. सूर्यनमस्कारानेही सर्व साध्य होते म्हणून सूर्यनमस्काराना विशेष महत्त्व आहे. सर्व लोक एकत्र येऊन योग करतात. यातून विविधतेत एकता आणि जागतिक शांततेचा संदेश मिळतो. योग (युज्) जोडणे किंवा एकत्र येणे. जीवा शिवाचे ऐक्यही साधता येते.
योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी जगभर हा दिवस साजरा केला जातो. ही चळवळ एका दिवसापूर्वी न राहता कायमची झाली पाहिजे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद आहे.
२१ जून या दिवसाचे महत्त्व म्हणजे उत्तर गोलार्धातील हा सर्वात मोठा दिवस. या दिवशी रात्र लहान असते. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिण दिशेकडे मार्गस्थ होतो. या दिवसाला उन्हाळा अयन दिन असेही म्हणतात.सुर्याचे भासमान भ्रमण आणि पृथ्वीचा आस साडेतेवीस अंशांनी कललेला असल्यामुळे दिवस-रात्र असमान होतात.या विशेषामुळे २१जूनला योग दिनाचा मान मिळाला.
भारतीय विचारधारा खूप प्राचीन आहे. निव्वळ प्राचीन नसून ती तितकीच महान देखील आहे. शून्य ही संख्या भारताने विश्वाला दिलेली सर्वात महान देणगी आहे असे म्हटले तर वावगे होऊ नये.
शून्य म्हणजे शून्य. पण हे शून्य जेव्हा एखाद्या संख्येच्या मागे लागते तेव्हा ते त्या संख्येचे मूल्य वाढवित असते. आपल्याकडे शून्याला पूज्य म्हणण्याची पद्धत आहे. मूल्य वाढविणारे शून्याला पूज्य म्हटले जाते असे आपल्या लक्षात येईल. थोडा अधिक विचार करता, किंवा थोडी अतिशयोक्ती करून असे म्हणता येईल की ज्याला आपले मूल्य वाढवायचे आहे त्याने आधी शून्य व्हावं आणि आपल्या आधी सद्गुरू, आराध्य देवता अथवा भगवंताला ठेवावे, म्हणजे तो मनुष्य खात्रीने पूज्य होऊ शकतो. आपल्याकडील अनेक संतांची चरित्रे पाहिली तर आपल्याला याची साक्ष पटू शकेल.
संत तुकाराम महाराज हे प्रापंचिक लोकांसाठी महान असे आदर्श म्हणता येईल. आधी सावकारी आणि नंतर कफल्लक झालेले तुकाराम महाराज जगद्गुरू झाले, ते त्यांनी स्वतःला शून्य केले म्हणूनच, नाही का?
मनुष्याचा जीवन प्रवास सुद्धा शून्यापासून सुरुवात होऊन शून्यापर्यंत येऊन थांबतो असे आपल्याला म्हणता येईल. बाळ जन्माला येताना ते शून्य असते आणि त्या बालकाचा जेव्हा म्हातारा होऊन मृत्यू होतो, तेव्हा तो एकप्रकारे शून्यच होत असतो…! सर्व संत असे सांगतात की शून्यापासून सुरू होणारा प्रवास शून्यापर्यंत येऊन न थांबता, तो पूज्या पर्यंत येऊन ठेपला तर त्या मनुष्याचे, जिवांचे सार्थक झालं असे नक्कीच म्हणता येईल.
शून्य ते शून्य नव्हे शून्य ते पूज्य हा प्रवास वाचायला अगदी सहज, पण आचरण करायला, क्रमण करायला तितकाच खडतर…
सर्व संतांनी हा मार्ग स्वतः आचरून दाखवला आहे. अपवाद सोडले तर अनेक संतांनी अनेक प्रकाराची सुखदुःखे सहन केली, अनंत यातना सोसल्या, उपेक्षा, मानहानी, किती सांगावे…?
पण या संतांनी कायम प्रतिसाद दिला…!
प्रत्येक मनुष्याला संत होणे जमेलच असे नाही, पण त्याला पूज्य (शून्य) होणे नक्कीच जमू शकेल…! यासाठी काही विशेष करायला लागेल असे नाही…
काही गोष्टी मनाशी दृढ करून करण्याचा प्रयत्न केला तर शून्य ते पूज्य हा प्रवास शक होईल.
बाळ जन्मते तेव्हा ते कोणाचेच नसते, त्यामुळे सर्वांचे असते. त्या बालकाची काळजी अगदी परके वाटणारे लोकं सुद्धा स्वयंस्फूर्तीने घेत असतात असे आपल्या लक्षात येईल. बाळ. जसजसे मोठे होऊ लागते, तसतसा त्याचा अहंकार मोठा होऊ लागतो. तो कोणी होत जातो, त्याच्या असण्याला, होण्याला समाज कमीअधिक प्रमाणात खतपाणी घालत असतो.
पन्नाशी पर्यंतचे आपण पाच टप्पे ठरवता येतील.
दहाव्या वर्षी त्याला सगळे आपले आहेत असे कळायला लागते…?
विसाव्या वर्षी त्याला आपल्याला काय हवे हे कळायला लागते…?
तिसाव्या वर्षी त्याला आपले नक्की कोण आहे कळायला लागते…?
चाळीसाव्या वर्षी त्याला आपले आणि परके यातील सूक्ष्म रेषा कळू लागते…
पन्नाशीला त्याला जग काय आहे कळते असे म्हणता येईल… (कदाचित जग काय आहे हे त्याने समजून घ्यावे अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी…)
“एका वाक्यात सांगायचे झाल्यास मनुष्याचा अहंकार पन्नास वर्षाचा होतो…!! “
“पूर्व सुकृत उदयास आले आणि त्याला संताची संगत लाभली तर त्याचा विवेक जागृत होतो, पण सत्संगती लाभली नाही तर त्याचा विवेक जागृत होत नाही आणि मनुष्य अहंकाराचे टोक गाठतो…! “
काही कारणाने सत्संग लाभलेला नाही, पण शून्य होण्याची मनाची तयारी आहे, त्याने अहंकार दूर करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी संताचे ग्रंथ (संतांनी लिहिलेलं…) वाचावेत, त्यांचा अभ्यास करावा, आणि त्याच्या जोडीला नामस्मरण करावे…
मनुष्याचे आयुष्य शंभर वर्षाचे मानले तर पन्नास हा मध्यबिंदू म्हणता येईल…! चढत्या भाजणीने वाढत गेलेला अहंकार उतरत्या भाजणीने पन्नास ते शंभर पर्यंत शून्यावर आला तर मनुष्य पूज्य होणे सहज सोपे…!
पन्नाशी पर्यंत वाढवलेला प्रपंचाचा पसारा पुढील पन्नास वर्षात आवरता आला तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने जिंकला असे म्हणता येईल…!! शून्य ते पूज्य या प्रवासाला सुरूवात करू इच्छिणाऱ्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा!!!
मनुष्य सुरुवात तरी नक्की करू शकतो… , प्रयत्न करू शकतो…! यश देणे न देणे रामाची इच्छा!!
☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २५ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
नीती आणि धर्म
आत्तापर्यंतच्या चोवीस भागातून आपण संत तुकारामांच्या अनेक विषयांवरील अभंगांचा अभ्यास केला. या भागात त्यांनी माणसाच्या नीती आणि धर्माविषयी रचलेले काही अभंग आपण पाहू.
रडोनिया मान/ कोण मागता भूषण/
देवे दिले तरी गोड/ राही रुची आणि कोड//
लाविता लावणी/ विके भिके केज्या दानी//
तुका म्हणे धीरा/ विण कैसा होतो हिरा//
या अभंगात माणसाने खरेपणाने आणि धीराने वागावे असे महाराजांना लोकांना सांगायचे आहे. मला मान द्या असे रडगाणे लावून जर कोणी मान देत असेल तर त्यात काय मोठे भूषण आहे? लहान मुलाने रडावे आणि आपला हट्ट पुरा करावा तसाच हा प्रकार आहे. न मागता मिळतो तो खरा मान, मोठेपणा. म्हणून माणसाची वृत्ती समाधानी असावी. परमेश्वराने माझ्या पदरात जे दान टाकले आहे, ते गोड मानले आणि त्यात समाधान ठेवले तर ते खरे सुख आहे. उदाहरणादाखल महाराज पुढे सांगतात की, शेतात स्वतः राबून पिकवलेले धान्य दान केले तर त्यात खरे समाधान आहे. भीक मागून किंवा दुसऱ्याचे ओरबाडून घेतले आणि दानात दिले तर त्या दानाला काही अर्थ नाही. कोणत्याही प्रकारच्या उतावळेपणाने मोठेपणा मिळत नाही. जो धैर्यवंत असतो त्यालाच हिऱ्याची योग्यता लाभते.
पुढे ते सांगतात, ज्याला स्वहित साधायचे आहे त्याने नीती धर्माच्या खुणा, संकेत पाळणे अत्यंत जरुरीचे आहे.
पूज्या एकासनी आसनी आसन/
बैसता गमन मातेशी ते//
सांगतो ते धर्म नितीचा संकेत/
सावधान हित व्हावे तरी//
संता ठाया ठाव पूजनाची इच्छा/
जीवनीच वळसा सापडला//
तुका म्हणे एकाएकी वरासने/
दुजे तेथे भिन्न अशोभ ते//
प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून वागावे. ज्या आसनावर पूज्य अशा देवांची मूर्ती असेल किंवा गुरु बसलेले असतील, त्या आसनावर आपण बसू नये. ते पाप आहे. स्वतःची योग्यता नसताना, संतांप्रमाणे आपली ही पूजा व्हावी असे ज्याला वाटते, तो भवसागरात गटांगळ्या खातो आहे असे समजावे. श्रेष्ठ आसनावावर संत बसले असताना आपण तेथे जाऊन बसणे म्हणजे स्वतःची शोभा करून घेण्यासारखे आहे.
यासी कोणी म्हणे नींदेची उत्तरे/
नागवला खरे तोचि एक//
आडवाट जाता लावी नीट सोयी/
धर्मनिती तेही ऐसी आहे//
नाइका सुखे करावे ताडण/
पाप नाही पुण्य असे फार//
जन्मव्याधी फार चुकतील दुःखे/
खंडावा हा सुखे मान त्याचा//
तुका म्हणे निंब दिधल्यावाचून/
अंतरीचा शीण कसा जाय//
महाराजांना या अभंगात मुख्यतः काय सांगायचे आहे? तर ते म्हणजे दुर्जनाला शासन झालेच पाहिजे. कोणाला माझे हे भाषण निंदा वाटेल, पण ही निंदा नाही. कोणी आड मार्गाला जात असला तर त्याला सुयोग्य मार्गाला लावणे ही खरी धर्मनिती आहे. चांगल्या नीतीची गोष्ट सांगत असता जर कोणी ती ऐकली नाही तर त्याला खरपूस मार द्यावा. (शब्दांचा) त्यात पाप नसून ते पुण्यकर्मच ठरेल. असे केल्याने जन्मरूपी व्याधी आणि इतर अनेक दुःखातून त्याची सुटका होईल. म्हणून त्याची मानखंडना सुखाने करावी. अंग तापाने फणफणल्यावर त्याला कडुलिंबा सारखे कडू औषध द्यावे लागते ना? दुर्जनाला सुधारण्यासाठी शिक्षा करणे क्रमप्राप्त आहे.
एका विठ्ठलाच्या चरणाशी सर्व नीती, धर्म शास्त्र आहे. म्हणून तुकाराम महाराज सर्व लोकांना विठ्ठलापाशी भक्ती भाव ठेवण्यास सांगतात.
पृथक मी सांगो किती/ धर्म नीती सकळ/
अवघीयांचा एक ठाव/ शुद्ध भाव विठ्ठली//
क्षरा अक्षराचा भाग/ करा लाग पंढरीये/
तुका म्हणे आगामीचे/ मथिले साचे नवनीत//
महाराज म्हणतात की ते प्रत्येकाला धर्म आणि नीती विषयी वारंवार किती सांगणार? एकच करा, सर्वांनी विठ्ठलाच्या चरणी शुद्ध भाव ठेवावा. हेच धर्म आणि नीतीचे तात्पर्य आहे. तो क्षर ( सगुण) आणि अक्षररूप ( निर्गुण) पंढरपुरात आहे, त्या ठिकाणी सगळ्यांनी अवश्य जावे. सर्व शास्त्ररुपी दही घुसळून काढलेले लोणी म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठल हे दैवत तेथे आहे. भगवंताचे ध्यान अंतःकरणांमध्ये करणे हीच त्याची पूजा आहे. या वाचून सर्व वेगवेगळ्या उपाधी पापमूलक आहेत. त्या उपाधींचा संकल्प सुद्धा करू नये. लोकहो, भगवंताने श्रुती आणि स्मृती मध्ये ज्या आज्ञा दिल्या आहेत, त्याप्रमाणे आचरण ठेवणे, हाच खरा धर्म आहे. हा धर्म पाळल्याने सहज स्थिती प्राप्त होईल, ज्या स्थितीचा तुम्हाला कधी वीट येणार नाही. मनाची स्थितप्रज्ञता ही सहज स्थिती आहे. त्यामुळे सुखाने अति आनंद होणार नाही किंवा दुःखाने अतीव दुःख होणार नाही.
नीतिमत्तेबद्दल तुकाराम महाराज आणखी काय सांगतात ते पाहूया.
नये पाहो मुख मात्रागमन्याचे/
तैसे अभक्त्याचे गुरुपुत्रा//
म्हणउनी बरे धरिता एकांत/
तेणे नवे घात भजनासी//
नये होऊ कदा निंदकाची भेटी/
जया द्वैतपोटी चांडाळाच्या//
*तुका म्हणे नको बोलो त्यासी गोष्टी/
जयाचिया दृष्टी पापवाढे/
त्यांचे म्हणणे असे आहे की, जो विकृत वृत्तीचा आहे, (मात्रागमन्या )- मातेशी गैर वृत्तिने वागणार्याचे तोंड कधी पाहू नये. गुरुची निंदा करणाऱ्या शिष्याचे, हरीची निंदा करणाऱ्याचे मुखही पाहू नये. आपल्या भक्तीत, भजन कीर्तनात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी एकांतात राहणे सर्वोत्तम! निंदकाची भेट घेणे टाळावे, कारण त्याच्या तोंडात गोडवा असला तरी पोटात कपट असते. अशा माणसांना नुसत्या पाहण्याने सुद्धा पाप वाढते. नीती धर्माच्या कल्पना जनसामान्यांच्या मनात रुजविण्यासाठी तुकाराम महाराज काही दृष्टांत देतात.
अग्निमाजी पडे धातू/ लीन होऊनी राहे आंतु/
होय शुद्ध न पावे धातू/ पटतंतूप्रमाणे//
बाह्य रंगाचे कारण/ मिथ्या अवघेची भूषण/
गर्व ताठा हे अज्ञान/ मरण सवे वाहतसे//
पुरे मातलिया नदी/ लव्हाळा नांदे जीवनसंधी*/
वृक्ष उन्मळोनी भेदी/ परी तो कधी भंगे ना//
हस्ती परदळ जो भंगी/ तया पायी न मरे मुंगी/
कोण जाय संगी/ पाणोवाणी तयाच्या//
पिटीता घणेवरी सैरा/ तया पोटी राहे हिरा/
तैशा काय तगती गारा/ तया थोरा होऊनी//
लीन दीन हेचि सार/ भव उतरावया पार/
पुढे माथा भार/ तुका म्हणे वाहोनी*//
माणसाने नेहमी दीन असावे. हा गुण किती चांगला आहे त्याची उदाहरणे महाराज देतात.
१) अग्नीमध्ये पडलेले सोने न जळता शुद्ध होते, परंतु वस्त्र किंवा धागा आगीत पडला तर त्याचा नाश होतो. बाह्यात्कारी भूषणे हा केवळ दिखावा असतो.
२) गर्व किंवा ताठा हे केवळ अज्ञान आहे. जीव गेला तरी अज्ञान तसेच राहते.
३) महापूर आला तर वृक्ष उन्मळून पडतात आणि लव्हाळी मात्र तशीच टिकून राहतात. * वृक्षवल्ली जाती तेथे लव्हाळे वाचती ज्ञानेश्वरांनी सुद्धा हेच सांगितले आहे.
४) हत्ती शत्रूचा विध्वंस करतो, परंतु त्याच्या पायाखाली मुंगी मरत नाही. म्हणून हत्तीच्या मागोमाग झुंज खेळायला कोण जाणार?
५) हिरा घणाने फुटत नाही, पण गारा हिर्या पेक्षा मोठ्या असल्या तरी त्या घणाखाली टिकतात का?
या सर्व उदाहरणांचा अर्थ एकच की, सर्वांनी दीन पणाने नम्र होऊन रहावे. मोठेपणाची ऐट कधी, कशाने गळून पडेल हे सांगता येत नाही. नम्रता, लीनता हे भवसागर पार करण्याचे फार मोठे साधन आहे. ज्याला मोठेपणाचा गर्व असेल
तो या भवसमुद्रात बुडून जाईल.
पुढील लेखात तुकाराम महाराजांनी रचलेल्या व्यवहार ज्ञानाविषयीच्या अभंगांचा आपण परामर्श घेऊ.
बालकवींची ‘औदुंबर‘ कविता शाळेत शिकताना आणि नंतरही ‘ पायवाट पांढरी तयातून आडवी-तिडवी पडे.. ’ ही ओळ आली की मन तिथेच थबकायचे, आजही थबकते..
ग्रामीण भागात, गाव-खेड्यात, वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्यांसाठी तर पाय चालायला लागले की रस्त्यापेक्षा पायवाटा याच चालणाऱ्या पायांच्या सोबती असतात. अगदी बालपणापासूनची ही सोबत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या कारणांसाठी हवीशी वाटत राहते.
आमच्या शाळेच्या परीक्षा झाल्या की खऱ्या अर्थाने आमची उन्हाळ्याची सुट्टी सुरू व्हायची. या सुट्टीचे वेध खूप आधीपासून लागलेले असायचे. ही सुट्टी म्हणजे नुसती धमाल असायची. बांधलेल्या खोंडाचे दावं सोडल्यावर जसे खोंड उधळतं तशीच सर्वांची स्थिती असायची.. वार्षिक परीक्षांची दावी सुटलेली असायची.. दावणीत उभा राहून कंटाळलेले पाय उड्या मारत उधळायला आतुरलेले असावेत तशी अवस्था व्हायची. काहींच्या घरातल्यांनी ‘झाल्या एकदाच्या परीक्षा ‘ म्हणत निश्वास सोडलेला असायचा.. सगळी बंधने सैल केली जायची. काहींच्या घरात तर परीक्षा होत्या हे ही ठाऊक नसायचे.. पोट भरण्यासाठी येरवाळी जाऊन सांजंला परत येण्यावाचून त्याच्याकडे पर्यायच नसायचा.. पण गल्लीतल्या कुणा वडीलधाऱ्याचं सगळ्यांकडे बारीक लक्ष असायचे.. शाळेच्या वेळात एखादे पोरगं दिसले तर “ काय रं, शाळंला गेला न्हाईस ? “ लगेच विचारलं जायचं. दोन-चार दिवस पोरं उंडारताना दिसली की कुणीतरी विचारायचं, “ झाल्या व्हय रं परीक्षा ? “
परीक्षा एकदाची झाली की ओढ असायची ती पोहायला जायची. सकाळ म्हणू नका, दुपार म्हणू नका, पोहण्यासाठी गुरवांच्या विहिरीवर पोरांची झुंबड असायची.. विहीरवर जाण्याची प्रत्येकालाच एवढी आतुरता असायची की जो तो पायवाटा शोधायचा, काहीजण तर सांदी-कुपाडीतून नव्याच पायवाटा तयार करायचे.. अंतर कमी करून आपल्या आपल्या इप्सितापर्यंत, ध्येयापर्यंत लवकरात लवकर नेणाऱ्या या पायवाटा किंवा पाऊलवाटा सर्वांनाच प्रिय असतात. रस्ते, राजमार्ग तयार करावे लागतात पण पायवाटा कुणी बनवत नाही किंवा तयार करत नाही.. जिथून, माणूस असो किंवा जनावरे अनेकांचे पाय गेले की त्या आपोआप बनतात. गुरवांच्या विहिराला बक्कळ पाणी असल्याने आम्ही मठातून ओघळीत उतरून कधी बांधावरून तर कधी रानातून पोहोण्यासाठी पळतच जायचो..
येताना मात्र कडकडून भूक लागली असली तरी रमत गमत, गप्पा मारत पायवाटेवरून यायचो. आम्हां पोरांना त्यावेळी पायवाट ही प्रियच असायची आणि कुठेही जायचे यायचे झाले तरी पायवाटाच हव्याशा वाटायच्या.
माणूस गावातील असो किंवा शहरातील, प्रत्येकाचा फिरण्याचा, वावरण्याचा, जाण्या-येण्याचा एक क्षेत्रपरीघ असतो. खेडेगावात प्रत्येकाचा तो क्षेत्रपरिघ जवळपास सर्वांना, त्यातल्या त्यात मोठ्यांना ठाऊक असायचाच.. त्या बाहेर, आडवाटेलासुदधा कुणी पोरगं दिसलं तर “ काय रं, हिकडं कुणीकडं निगालायस ? “ म्हणून हटकलं जायचं. सांगितलेलं कारण पटलं नाही तर माघारी घराकडं पिटाळालं जायचं.. मोठ्या माणसांनासुद्धा “ आज हिकडं आडवाटंला कुणीकडं ? “ विचारलं जायचं.
आडवाटा या पायवाटा किंवा पाऊलवाटाच.. पण न गेलेल्यासाठी आणि क्वचित कधीतरी जाणाऱ्यासाठी त्या आडवाटा. तसेच काही कारण असल्याशिवाय कुणी आडवाटेला आढळायचं नाही. नाहीतरी सरळमार्गी माणसं आडमार्गाला जातीलच कशाला ?
एकदा मित्राच्या मावशीकडे, पेरिडला गेलो होतो.. डोंगरातल्या गावातली जनावरे चरायला डोंगरात जातात ती पायवाटेनच.. डोंगरातल्या पायवाटा तशा खडतर.. त्या सगळ्याच जनावरांच्या जाण्यायेण्याने तयार झालेल्या.. डोंगर चढण्या-उतण्याचे जनावरांचे ज्ञान आश्चर्य वाटण्याजोगे असते. जनावरे वर डोंगरात ज्या पायवाटेने जातात त्याच पायवाटेने उतरतात असे नाही. काही ठिकाणी त्यांची उतरताना घसरून पडू नये अशा विचाराने घसरणीच्या जागी उतरणीच्या पायवाटा जरा लांबून आलेल्या दिसतात.
पायवाटा वेड्या-वाकड्या, राना-वनातून जाणाऱ्या, उंच सखल असल्या तरी पावलांना त्या रस्त्यांपेक्षाही प्रिय.. प्रवासाचे आणि भवतालाशी, निसर्गाशी असणारे अंतर कमी करणाऱ्या.. पूर्वसुरीच्या पावलावर पाऊल टाकून वाट चालत रहावी असे अप्रत्यक्षरित्या सांगणाऱ्या.. शिकवणाऱ्या. पूर्वसुरीच्या पावलांनी आणि वहिवाटीने तयार झालेल्या पायवाटा.. वहिवाट थांबली की काही काळातच भवतालाशी एकरूप होऊन जातात. जीवनातली इतिकर्तव्यता संपली.. जीवनकार्य संपले याची जाणीव झाल्यावर आदितत्वाची एकरूप होऊन जाणाऱ्या, पंचमहाभूतात स्वतःला विलीन करणाऱ्या एखाद्या साधू-संतासारख्याच. पायवाटा तशाच असतात निरपेक्ष भावाने आपले कार्य करणाऱ्या.. त्यांना पायाखाली तुडवत जाणारा महापुरुष असो किंवा एखादा चोर-दरोडेखोर त्यांच्यालेखी सारे सारखेच असतात.
दिवसभर डोंगरात चरायला जाणारी जनावरे सांज उतरू लागली की पायवाटेने गोठयाकडे परततात.. कधी गोधुळ उडवीत तर कधी आतुर पावलांनी चालताना गळ्यातल्या घंटीच्या मंजुळ नादाने भोवतालाला सुखावत.. आमच्या तिळगंगेकडे जाणाऱ्या अनेक पायवाटा, एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्याने या तीरावर पाण्यात डुबकी मारून पुढच्या तीरावर प्रकट व्हावे तशा, पाण्यात डुबकी मारायच्या ते पुढच्या काठालाच नदीबाहेर यायच्या.. दिवसभर रानात कष्ट करणारे शेतकरी डोईवर वैरणीचा भारा घेऊन पायवाटेने नदीत उतरून दुसऱ्या काठावर येईपर्यंत पाण्याच्या स्पर्शाने शीण हरवून ओलेत्या पायांनी घरी परतायचे तशीच पायवाट सुस्नात होऊन दुसऱ्या काठावर यायची..
आयुष्यातील सुख-दुःखाचे कितीतरी सांगावे इकडून तिकडे, तिकडून इकडे येता-जाताना पायवाटेने पाहिलेले असतात.. कधी ती मनातून सुखावत असेलही. कधी ती कष्टीही होत असेल पण वरून मात्र ती असते एखाद्या स्थितप्रज्ञासारखी ! ‘ ‘ सुख-दुःख समे कृत्वा !’ म्हणत असल्यासारखी…. पांथस्थाचे मुक्कामापर्यंतचे अंतर कमी करायचे.. जवळची वाट होऊन त्याची वाट जवळ करायचे हे पायवाटेचे जीवनकार्य.. माहेराच्या ओढीने येणाऱ्या माहेरवाशिणीसाठी, पाडसाच्या ओढीने येणाऱ्या गाईंसाठी ती उरकती होते तर अनिच्छेने जड पावलांनी जाणाऱ्यासाठी ती उरकता उरकत नाही.
आता काळ बदलत गेलाय. माणूस वाहनांनी प्रवास करायला लागलाय. रस्त्यावरसुद्धा पाऊलांपेक्षा वाहनांची चाकेच जिथं जास्त धावायला लागलीत तिथं पायवाटांवर पाऊले कुठुन पडणार ? पायवाटांवरून पाऊलेच पडत नसल्याने कितीतरी पायवाटा, आडवाटा निर्सगात, भावतालात विरून गेल्यात.. तरी अजूनही रानावनात, डोंगरखोऱ्यात पायावाटा भेटतात तेंव्हा मन सुखावते.. त्यावरून चार पावले तरी चालावे असे वाटते.. कधी कधी या पायवाटा उदास असल्यासारख्या वाटतात.. एखादी माऊली सासुरवाशीण लेकीच्या आठवणीने उदास व्हावी तशा.
पायावाट पाहिली की वाटते, कितीतरी पावलांनी या पायवाटेवरून आपले घर जवळ केले असेल, कितीतरी माहेरवाशीणी, सासूरवाशींणी याच पायवाटांवरून आल्या-गेल्या असतील. कुणातरी एखाद्या सासुरवाशीणीला कधीतरी माहेर जवळ करणाऱ्या पायवाटेची आठवण येत असेल आणि ती मनात म्हणत असेल,
☆ – नकार पचविता आला पाहिजे… – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆
रोज न्यूज पेपर उघडला की अगदी सहज दोन चार तरी बातम्या सहज वाचायला मिळतात.. प्रेमात नकार.. आयुष्य संपवले.. , परिक्षेमध्ये मिळालेल्या अपयशा मुळे विद्यार्थांनी उचलले टोकाचे पाऊल.. , मुलाना हवे ते खेळणे न मिळाल्यामुळे अल्पवयीन मुलाने जीवन संपवले.. , आयुष्यात मिळालेला नकार आणि प्रेमिकाचे टोकाचे पाऊल.. आपल्या मित्राची मैत्रिणीची हत्या.. अशा अनेक बातम्या वाचल्या की मन सुन्न होत.. नकार, अपयश न स्वीकारता आल्यामुळे टोकाची भूमिका घेतली जाते.. यातून येणारे नैराश्य स्वतःचे किंवा समोरच्याच्या मृत्यूचे कारण बनते, अपयश, नैराश्य ह्याने अहंकार दुखावतो आणि त्याचे परिणाम समाजाला, कुटुंबाला भोगावे लागतात.. छोट्या छोट्या नकारांमुळे मनावर परिणाम होतो आणि टोकाची पाऊले उचलली जातात.. आजकाल सगळ्यानाच इन्स्टंट सुख यश हव असत वाट बघण कोणालाच मंजूर नाही आणि याच मानसिकतेमुके अनेक अपराध घडतात अशा बातम्या विचार करायला भाग पाडतात.. काय चूक काय बरोबर ह्यातला फरक न कळल्यामुळे अहंकार निर्माण होतो आणि आयुष्याची गाडी वळणावरून कधी घसरते आणि चुकीच्या मार्गावर कधी जाते हे कळत सुद्धा नाही.. हे सगळं टाळण्यासाठी आपल्या मनावर असणारा संयम आणि स्वतःवरील विश्वास फार महत्वाचा असतो.. नकार, अपयश ह्याकडे एक संधी म्हणून पाहिले तर आयुष्याच्या गाडीला योग्य दिशा मिळते आणि ही गाडी आपोआप ध्येयापर्यंत पोहचतेच गरज असते ती संयम आणि विश्वासाची..
नकार पचविता आला पाहिजे…
जीवनात प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं घडतंच असं नाही. कधी नोकरीत, कधी व्यवसायात, कधी नात्यांमध्ये तर कधी आपल्या स्वप्नांच्या वाटेवर आपल्याला नकाराचा सामना करावा लागतो. नकार मिळाला की मन दुखावतं, आत्मविश्वास डळमळतो आणि आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो. पण खरं तर नकार हा अपयश नसतो; तो पुढे जाण्याचा आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा एक टप्पा असतो.
नकार स्वीकारण्याची क्षमता माणसाला अधिक परिपक्व बनवते. प्रत्येक नकार आपल्याला काहीतरी शिकवून जातो—आपल्या चुका दाखवतो, सुधारण्याची संधी देतो आणि नवीन मार्ग शोधायला प्रेरित करतो. ज्याला नकार पचविता येतो, तोच संकटांवर मात करून यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतो.
जीवनातील अनेक यशस्वी व्यक्तींना सुरुवातीला अनेकदा नकार मिळाले होते. पण त्यांनी त्या नकारांना शेवट न समजता नव्या सुरुवातीची संधी मानली. म्हणूनच नकार मिळाला तर खचून न जाता त्यातून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे..
नकार हा आपल्या किमतीचा मापदंड नसतो. तो फक्त त्या क्षणी मिळालेला एक प्रतिसाद असतो. त्यामुळे नकार स्स्वीकारून त्यातून धडा घेतला पाहिजे आणि नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत कारण कधी कधी एक नकारच आपल्याला अधिक मोठ्या यशाकडे घेऊन जात असतो.
नकार हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा अपरिहार्य अनुभव आहे. परंतु नकार मिळणे जितके महत्त्वाचे आहे, त्यापेक्षा तो कसा स्वीकारला जातो हे अधिक महत्त्वाचे असते. अनेकदा आपण नकाराला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, कर्तृत्वाचा किंवा अस्तित्वाचा नकार समजतो. त्यामुळे मन दुखावते, अहंकार जखमी होतो आणि आत्मविश्वास कमी होतो. पण वास्तवात नकार हा व्यक्तीचा नसतो; तो एखाद्या परिस्थितीचा, निर्णयाचा किंवा त्या क्षणाच्या गरजेचा असतो.
नकार स्वीकारणे म्हणजे पराभव मान्य करणे नव्हे. उलट, वास्तव स्वीकारण्याचे धैर्य दाखवणे असते.. जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार घडेल, अशी अपेक्षा ठेवणे हेच दुःखाचे मूळ आहे. जेव्हा आपण आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवायला शिकतो, तेव्हा नकाराचे दुःखही कमी होते. कारण आपल्याला समजते की प्रत्येक गोष्ट मिळवणे हेच यश नाही; काही गोष्टी न मिळणेही आपल्या भल्यासाठी असू शक तात..
नकार माणसाला अंतर्मुख करतो. यशाच्या क्षणी आपण स्वतःकडे फारसे पाहत नाही; पण नकार मिळाल्यावर आपण स्वतःला प्रश्न विचारतो. माझ्यात काय कमी पडले? मी आणखी काय सुधारू शकतो? हा आत्मपरीक्षणाचा प्रवास माणसाला अधिक सक्षम आणि प्रगल्भ बनवतो. म्हणूनच नकार हा अनेकदा व्यक्तिमत्त्व घडवणारा सर्वोत्तम शिक्षक असतो.
अहंकाराला नकार सहन होत नाही. कारण अहंकाराला नेहमी स्वीकार, कौतुक आणि मान्यता हवी असते. परंतु जीवन प्रत्येक वेळी आपल्याला मान्यता देईलच असे नाही. ज्याने स्वतःची किंमत इतरांच्या स्वीकारावर अवलंबून ठेवली आहे, तो प्रत्येक नकाराने तुटत जातो. पण ज्याला स्वतःची ओळख आणि स्वतःवरील विश्वास आहे, तो नकाराने ढासळत नाही. कारण त्याला माहीत असते की इतरांचा निर्णय माझ्या यशाची व्याख्या असू शकत नाही.
नकार पचविणे म्हणजे मनातील कटुता सोडणे असते अस मला वाटतं. अनेक जण नकार मिळाल्यानंतर राग, द्वेष किंवा सूडभावना बाळगतात. पण अशा भावना सर्वात जास्त नुकसान स्वतःचेच करतात. ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्या स्वीकारणे आणि पुढे जाणे हीच खरी मानसिक ताकद आहे. नदीला दगड आडवा आला म्हणून ती थांबत नाही; ती नवीन मार्ग शोधते. तसेच जीवनातही अडथळे आणि नकार यांच्यावर अडकून न पडता पुढे वाहत राहणे गरजेचे असते.
खरे तर प्रत्येक नकारामध्ये एक संदेश दडलेला असतो. काही नकार आपल्याला अधिक मेहनत करण्याची आठवण करून देतात. काही नकार चुकीच्या दिशेने जाण्यापासून वाचवतात. तर काही नकार आपल्या संयमाची परीक्षा घेतात. त्या संदेशाला समजून घेतले तर नकार ओझे राहत नाही; तो मार्गदर्शक बनतो.
ज्याला नकार स्वीकारता येतो, त्यालाच खऱ्या अर्थाने स्वीकार मिळतो. कारण नकारातूनच सहनशीलता, नम्रता, संयम आणि आत्मविश्वास यांचा जन्म होतो. यश माणसाला प्रसिद्धी देऊ शकते, पण नकार माणसाला गहन विचार करायला मदत करतो. यश तुमची ओळख निर्माण करते; नकार तुमचे व्यक्तिमत्त्व घडवतो.
म्हणून आयुष्यात जेव्हा नकार भेटेल तेव्हा त्याला शत्रू समजू नका. त्याच्याकडे शिक्षक म्हणून पाहा. कारण प्रत्येक नकार हा तुमच्या प्रवासाचा शेवट नसतो; तो तुम्हाला अधिक सक्षम, अधिक शहाणा आणि अधिक मजबूत बनवणारा एक महत्त्वाचा टप्पा असतो.
“ज्याला नकार पचविता येतो, त्याला जीवनातील कोणतीही परिस्थिती पचविता येते. कारण नकार स्वीकारणे म्हणजे वास्तवाशी मैत्री करणे होय. ”
“नकार हा शेवट नसतो; तो नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो.”
☆ “पॉपकॉर्न ब्रेन : डिजिटल युगातील मनाची नवी व्याधी…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
मानवी मेंदू हा जगातील सर्वात गुंतागुंतीचा आणि अद्भुत अवयव मानला जातो. त्यानेच माणसाला इतर सर्व प्राण्यांपेक्षा वेगळे ठरवले आहे. हजारो वर्षांच्या उत्क्रांतीनंतरही हा मेंदू बदलत्या जगाशी जुळवून घेत राहतो. परंतु गेल्या दोन दशकांत झालेल्या तंत्रज्ञानक्रांतीने या मेंदूवर इतका वेगाने आणि तीव्रपणे परिणाम केला आहे की आता मेंदूच्या नैसर्गिक कार्यप्रणालीवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडिया, मोबाईल फोन, इंटरनेट आणि सतत वाहणारी माहिती या सगळ्यामुळे आजचा माणूस एका नव्या मानसिक स्थितीचा अनुभव घेत आहे. ही स्थिती म्हणजेच “पॉपकॉर्न ब्रेन” — एक असा मेंदू जो सतत उडणाऱ्या, फुटणाऱ्या, चमकणाऱ्या माहितीच्या फटकाऱ्यांना इतका सरावलेला आहे की शांतता, एकाग्रता आणि स्थिरता यांची क्षमता हरवू लागली आहे.
“पॉपकॉर्न ब्रेन” हा शब्द प्रथम सुमारे २०११ च्या सुमारास अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ डॉ. डेव्हिड लेव्हिन यांनी वापरला. त्या काळात स्मार्टफोनचा प्रसार झपाट्याने होत होता, आणि लोक सतत ऑनलाइन राहण्याची सवय लावत होते. लेव्हिन यांनी निरीक्षण केले की डिजिटल साधनांचा अतिरेकी वापर करणाऱ्यांचा मेंदू जणू पॉपकॉर्नच्या दाण्यासारखा सतत उड्या मारत असतो. एका क्षणात एका विचारातून दुसऱ्या विचारात, एका माहितीपासून दुसऱ्या सूचना, एका व्हिडिओपासून दुसऱ्या पोस्टमध्ये उडी घेणारा हा मेंदू स्थिर राहू शकत नाही. जसे गरम तेलात टाकलेले दाणे फुटत राहतात, तसेच या युगातील मेंदूही सतत “फुटत” आणि “उडत” राहतो. म्हणूनच या अवस्थेला “पॉपकॉर्न ब्रेन” असे नाव देण्यात आले.
या संकल्पनेचा वैज्ञानिक पाया मेंदूतील न्यूरोट्रांसमिटर “डोपामिन”मध्ये आहे. डोपामिन हे ‘रिवॉर्ड केमिकल’ मानले जाते. जेव्हा आपण काही सुखद अनुभव घेतो, काही नवीन माहिती मिळवतो, लाइक किंवा नोटिफिकेशन पाहतो, तेव्हा डोपामिनची पातळी वाढते आणि आपल्याला आनंदाची लहर जाणवते. या आनंदाचा शोध मेंदू पुन्हा पुन्हा घेत राहतो, त्यामुळे आपण वारंवार फोन तपासतो, सोशल मीडिया स्क्रोल करतो, व्हिडिओवरून व्हिडिओकडे जात राहतो. कालांतराने ही सवय इतकी दृढ होते की मेंदू सतत नवीनतेची मागणी करू लागतो. त्यामुळे जेव्हा एखाद्या शांत वातावरणात बसावे लागते, जसे की पुस्तक वाचणे, संवाद साधणे, किंवा फक्त शांतपणे विचार करणे इ. तेव्हा मेंदू अस्वस्थ होतो, लक्ष केंद्रित करणे अवघड जाते, आणि आपोआप हात पुन्हा मोबाईलकडे जातो. हीच “पॉपकॉर्न ब्रेन”ची मूळ मानसिक यंत्रणा आहे.
मानसशास्त्रज्ञांच्या मते, या स्थितीत मेंदूतील “अटेंशन नेटवर्क” आणि “डीफॉल्ट मोड नेटवर्क” या दोन भागांमधील समतोल बिघडतो. अटेंशन नेटवर्क हे कामावर लक्ष केंद्रीत ठेवते, तर डीफॉल्ट मोड नेटवर्क हे विश्रांतीच्या अवस्थेत कार्यरत असते, जिथे कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि आत्मचिंतन घडते. सततच्या डिजिटल उत्तेजनामुळे अटेंशन नेटवर्क थकते आणि डीफॉल्ट मोड नेटवर्कला पुरेशी संधी मिळत नाही. परिणामी, माणूस सतत काहीतरी करण्याच्या धावपळीत असतो पण प्रत्यक्षात काही खोल विचार करू शकत नाही. ही स्थिती एखाद्या संगणकावर हजारो टॅब उघडे ठेवून एकाच वेळी सर्व वापरण्याच्या प्रयत्नासारखी आहे. शेवटी संपूर्ण प्रणाली हळूहळू अडकते, मंदावते आणि क्रॅश होते.
पॉपकॉर्न ब्रेनचा सर्वाधिक परिणाम तरुण पिढीवर होत आहे. इंटरनेटसह वाढलेली ही पिढी सतत बदलणाऱ्या डिजिटल जगाशी इतकी जुळलेली आहे की वास्तव जग त्यांना बोअर वाटते. वर्गात शिकवले जाणारे धडे, लांब व्याख्याने, किंवा पुस्तकातील मोठे परिच्छेद वाचणे त्यांना कठीण जाते कारण त्यांच्या मेंदूला १० सेकंदांच्या रील्स, २० शब्दांच्या ट्विट्स आणि सततच्या नोटिफिकेशनच्या जगाशी सवय झाली आहे. परिणामी, एकाग्रतेचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. अमेरिकन नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीने केलेल्या संशोधनानुसार २००० साली मानवाची सरासरी एकाग्रता सुमारे १२ सेकंदांची होती, तर २०२० पर्यंत ती फक्त ८ सेकंदांवर आली, म्हणजेच सोनमाश्याच्या एकाग्रतेपेक्षा कमी.
पॉपकॉर्न ब्रेन केवळ लक्ष केंद्रीत होण्यावर परिणाम करत नाही, तर भावनिक आणि सामाजिक आयुष्यावरही खोल परिणाम घडवतो. जेव्हा मेंदू सतत उत्तेजनांना सरावतो, तेव्हा तो शांततेत असहाय होतो. अशा व्यक्तींना एकांतात राहणे, एखाद्या मित्राशी खोल संवाद साधणे, किंवा दीर्घ काळ एकाच कामावर लक्ष ठेवणे जड जाते. त्यांना लगेच कंटाळा येतो आणि नवीन उत्तेजनाची भूक लागते. या प्रक्रियेला मानसशास्त्रात “डिजिटल रिवॉर्ड सर्किट” म्हणतात. जणू मेंदूला सतत साखर मिळत आहे आणि एकदा साखरेचा पुरवठा थांबला की तो थरथर कापतो. म्हणूनच लोक मोबाईल हातात नसला तरी नकळत तो हातात शोधतात, नोटिफिकेशनचा आवाज नसतानाही “फँटम वायब्रेशन” अनुभवतात.
पॉपकॉर्न ब्रेनचे शारीरिक परिणामही लक्षणीय आहेत. झोपेची गुणवत्ता घटते, डोळ्यांवर ताण येतो, मेंदू सतत सतर्क राहिल्यामुळे शरीराचा जैविक घड्याळ बिघडतो. सततच्या स्क्रीन एक्स्पोजरमुळे मेलाटोनिनचे स्राव कमी होते, त्यामुळे झोप येण्यास उशीर होतो आणि सकाळी थकवा जाणवतो. या स्थितीला “डिजिटल इनसॉम्निया” म्हटले जाते. दीर्घकाळात ही समस्या नैराश्य, चिंता, आणि आत्मसन्मानाच्या कमीपणाशी जोडली जाते कारण सोशल मीडियावरील सततची तुलना, लाईक्स आणि फॉलोअर्सची गणना मेंदूवर दडपण आणते. व्यक्तीला स्वतःचे अस्तित्व इतरांच्या मान्यतेवर अवलंबून असल्यासारखे वाटते.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, पॉपकॉर्न ब्रेन ही एका प्रकारची “न्यूरोप्लॅस्टिक ऍडॅप्टेशन” आहे. म्हणजेच मेंदू स्वतःला नवीन परिस्थितीशी जुळवून घेतो. परंतु ही जुळवणूक नैसर्गिक नाही, तर तात्पुरती आणि कृत्रिम आहे. मेंदूतील “सिनॅप्सेस” म्हणजे न्यूरॉन्समधील जोडणी सतत बदलणाऱ्या उत्तेजनांशी जुळवून घेतात, त्यामुळे हळूहळू “डीप फोकस” करणे कठीण बनते. संशोधन दर्शवते की ज्यांच्या जीवनात स्क्रीन टाइम जास्त आहे त्यांच्यात “प्रि-फ्रंटल कॉर्टेक्स” (निर्णय घेण्याचा भाग) आणि “हिप्पोकॅम्पस” (स्मरणशक्तीचा भाग) यांची क्रियाशीलता कमी होत जाते. त्यामुळे दीर्घकाळात विचारशक्ती, तार्किक निर्णय क्षमता आणि आत्मनियंत्रण या सर्व गोष्टींवर परिणाम होतो.
इतिहासाच्या दृष्टीने बघितले तर प्रत्येक तांत्रिक क्रांतीने मेंदूवर परिणाम केला आहे. मुद्रणयंत्राच्या काळात वाचनसवयींनी मेंदूच्या भाषिक भागाचा विकास केला, औद्योगिक क्रांतीने यांत्रिक विचार वाढवला, पण डिजिटल क्रांतीने पहिल्यांदाच मेंदूला बाह्य जगाशी सतत जोडून ठेवले आहे. हा जोड अखंड आहे, त्यामुळे मेंदूला विश्रांती मिळत नाही. आधीच्या युगात एक दिवस संपला की संवाद थांबत असत, परंतु आता रात्री झोपेतही नोटिफिकेशन येत राहतात. अशा परिस्थितीत मेंदूचा “रेस्ट मोड” जवळजवळ नाहीसा झाला आहे. काही न्यूरोसायंटिस्ट्स तर म्हणतात की आजचा माणूस “पॉज” बटण विसरला आहे.
औद्योगिक युगाने शरीरावर परिणाम केला, तर डिजिटल युगाने मेंदूवर. पण माणसात आत्मपरीक्षण करण्याची एक विलक्षण क्षमता आहे. हीच क्षमता आज पुन्हा जागवण्याची वेळ आली आहे. मेंदूला पुन्हा शांततेचा, शून्यतेचा, आणि विचाराच्या गाभ्याचा अनुभव द्यावा लागेल. जेव्हा आपण स्वतःच्या विचारांवर पुन्हा नियंत्रण मिळवू, तेव्हाच आपण “पॉपकॉर्न ब्रेन”मधून मुक्त होऊ. मानवाच्या उत्क्रांतीचा पुढचा टप्पा कृत्रिम बुद्धिमत्तेशी एकरूप होण्याचा नसून — सजग बुद्धिमत्तेशी परत एकरूप होण्याचा आहे. माहितीचा ओघ थांबवणे शक्य नाही, पण त्यात वाहून जाणे टाळणे शक्य आहे. म्हणूनच, या युगात सर्वात क्रांतिकारी कृती म्हणजे थांबणे. थांबून विचार करणे आणि थांबून स्वतःला पुन्हा शोधणे. “पॉपकॉर्न ब्रेन” आपल्याला शिकवतो की सतत उडत राहणारा मेंदू चमकदार असू शकतो, पण विचारशील मेंदूच खऱ्या अर्थाने प्रकाशमान असतो.
पैसे देऊन वस्तू व काही प्रमाणात सेवा विकत मिळण्याचं ठिकाण असंच बाजार या बद्दल सांगता येईल. पण तरीही वेगवेगळा अर्थ बाजार या शब्दात असतो. ज्या वस्तू पैसे देऊन उघडपणे मिळतात व जिथे व्यवहार सरळ, व सचोटिने होतात असे कितीतरी बाजार आहेत.
भाजी बाजार, सराफ बाजार, मासळी बाजार, धान्य बाजार, कापड बाजार, अजूनही काही प्रमाणात बर्याच ठिकाणी भरला जाणारा आठवडे बाजार असे नेहमीचे व सगळ्यांना माहित असणारे अनेेक बाजार आहेत. या बाजारात मिळणार्या वस्तूंचे भाव सगळ्यांसाठी, सगळ्यावेळी सारखेच असतात अस नाही.
पण शाळेत वर्गावर शिक्षक येण्याआधी आमचा वाढलेला गोंधळ, गोंगाट ऐकून शिक्षक आल्यावर म्हणायचे, काय बाजार भरवला आहे. याचा अर्थ बाजार म्हणजे गोंधळ, गोंगाट, आणि बेशिस्तपणा असाच असायचा.
गुरांचा बाजार पण असतो. नावावरुन या बाजाराच स्वरूप काय असेल ते लक्षात येतच. पण निवडणूक झाल्यानंतर मात्र काहीवेळा वारंवार घोडेबाजार हा शब्द वापरला जातो. तेव्हा मात्र शब्द जरी घोडेबाजार असा असला तरी तो वापरतांना त्यात घोड्याचा नाहीतर कोणाचा उल्लेख असतो हे सहज लक्षात येतं. पण तो शब्द उघडपणे वापरला जातो. आणि नकळत आपण प्राण्यांच्या रांगेत एका बुध्दीजीवी समजल्या जाणाऱ्या प्राण्याला बसवतो. एकिकडे बुध्दीमुळेच आपल्यात व प्राण्यात भेद आहेत हे सांगतो. आणि दुसरीकडे या घोडेबाजाराचा उल्लेख करत परत बुध्दीवरच शंका घेतो. एखाद्याला समजत नसेल तर त्याला गाढव म्हंणण समजून घेउ. पण…
या शिवाय ‘बाजार’ नावाचा एक चित्रपट पण काढला होता. यात काय दाखवलं होत ते सांगणार नाही, पण बाजार हा शब्द फक्त चांगल्या, किंवा फक्त वाईट गोष्टींसाठीच वापरला जातो अस नाही. तर त्यावेळी भावना कोणत्या असतात त्यावरून चांगल का वाईट हे ठरवाव लागतं. आता चोरबाजारही असतो. पण तिथे वस्तू विकत घेणारे चोरच असतात अस नाही. शेअर बाजार पण आहे. याबद्दल सांगायची गरज आहे असही नाही.
शारिरीक दुखणं, अपघात, डाॅक्टर, हाॅॅस्पिटल, ऑपरेशन या गोष्टींची देखील आता काहीप्रमाणात सवय झाली आहे. पण आता अशा ठिकाणी देखील पाॅलीसी आहे का? … अशी विचारणा पहिल्यांदा होतेच. हा विचारण्याचा हेतू वाईटच असतो अस नाही. पण काहिवेळा याचा अनुभव चांगला सुध्दा नसतो. अशा पाॅलीसी देणारे अनेक आहेत. पण यापैकी एकाचा पाॅलीसी बाजार असाच उल्लेख करतात. आणि मग खरच बाजार या शब्दाबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही विचार मनात येतातच.
या सगळ्या बाजाराचा विचार मनात आला तो सध्या सुरु असलेली सिलेंडरच्या काळ्याबाजाराच्या चर्चेवरून. वरचे सगळे बाजार हे दिसतात, खूपदा त्यांची ठिकाणही ठरलेली असतात. पण काळाबाजार हा असा बाजार आहे जो असतो, भरतो पण दिसत नाही. किंवा दिसणार नाही याचीच दक्षता या बाजारात घेतली जाते. हा प्रत्येकवेळी एकाच गोष्टीचा, एकाच ठिकाणी, एकाच वेळी नसतो. परिस्थिती आणि काळ यानुसार याची सगळी गणितं बदलतात. स्वस्त दरात पुरवठा होणारं धान्य. खतं, ज्या गोष्टी अनधिकृतपणे विकल्या जातात अशा गोष्टी. अशा सगळ्या गोष्टींचा मग काळाबाजार भरतो.
या शिवाय सिनेसृष्टीला माया बाजार अस म्हणणारे आहेत. याची पण अनेक कारणं असतील. शिवाय भंगार बाजार, कोंबडी बाजार असेही बाजार असतात. पण सगळ्या बद्दल लिहिल तर शब्दांचा बाजार भरवला अस वाटेल.
बाजार या शब्दामुळे विचारांचा बाजार भरला होता. तो थोडा थोडा कमी करतोय, बाकी काही नाही.
☆ “पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
मृतवत झालेल्या संस्कृत भाषेतील एका वाक्याचाही धड अर्थ न सांगता येणारे म्हणतात की संस्कृत भाषा ही राष्ट्रभाषा व्हावी. त्या दांभिकोत्तमांना पु ल देशपांडे यांनी इचलकरंजी येथील अखिल भारतीय सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनात केलेल्या भाषणातून जे सणसणीत आणि खणखणीत उत्तर दिले आहे ते असे…
‘भाषेच्या बाबतीतसुद्धा काही संकेत ठरून गेले. तुकोबांची मराठी चेपली गेली आणि पंतकाव्याचा मराठी गद्य आणि पद्य अवतार मान्य झाला. सभ्यतेचं नातं आशयाशी न जुळता संस्कृतप्रचुर भाषेशी जुळलं! आजही आपल्या भारदस्तपणाची सांगड मराठीत आलेल्या संस्कृत शब्दांशीच घातली गेली आहे. खेड्यापाड्यातला नव्याने शिकलेला वर्ग तर उगीचच चांगले चांगले मराठी शब्द टाकून वर्तमानपत्रवाल्यांनी पुरवलेले संस्कृत शब्द वापरतो. आमचे पुढारी चुकलो, नेते सभेला ‘येत’ नाहीत, ‘उपस्थित’ राहतात. एके काळी इंग्रजी भाषेच्या दराऱ्यामुळे बायकोची मिसेस् झाली. तत्कालीन पांढरपेशा समाजात इंग्रजीला जे सामाजिक मोठेपण लाभलं ते आता पुन्हा नवशिक्षित बहुजन समाजातल्या प्रतिष्ठितांत संस्कृतप्रचुर मराठीला लाभायला लागलं आहे. संस्कृतवर माझा राग नाही. रेडिओवरून मी संस्कृतमधल्या बातम्या ऐकतो. इतका विनोदी कार्यक्रम मला लिहिता आला नसता. ‘डॉक्टर किसिंजरेण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्चे अभिभाषणम् कृतम्’ वगैरे ऐकताना इंग्रजी आणि संस्कृतचा हा व्रात्यस्तोम पद्धतीने लागलेला विवाह पाहून मीदेखील ‘अहो ब्यूटिफुलम् एतद्! ‘ असं म्हणतो. पण हे संस्कृतचं प्रकरण इतकं साधं नाही. तिच्यामागे कोठेतरी ही देववाणी आहे या कल्पनेशी जुळलेलं नातं आहे. उर्दूच्या आग्रहात मुसलमानांचा जसा धर्माभिमान दडला आहे, तसाच संस्कृतच्या मागे आमचा संस्कृतिविषयक कल्पनांचा अभिमान दडला आहे. ‘
‘कोठेतरी आपण ह्या भाषेचं अतिमानवी शक्तीशी नातं जुळवलं आहे. त्यातून आमचे राष्ट्रवादी पुढारी संस्कृतचे अभिमानी. आश्चर्य असं की, स्वतः लोकमान्य टिळक हे संस्कृतचे पंडित असून साध्या मराठीचे पुरस्कर्ते होते. मंडालेहून सुटून आल्यावर त्यांच्यावर संपादक मंडळापैकी कोणीतरी अग्रलेख लिहिला, त्याचा मथळा होता ‘लोकमान्यांची बंधमुक्तता’! लोकमान्यांनी त्याच्यावर काट मारली आणि लिहिलं, ‘टिळक सुटले’! पण असा एखादा अपवाद सोडला तर मराठी साहित्यातल्या संस्कृतच्या ह्या जन्मसिद्ध बडेजावामुळे पुन्हा एकदा जनसामान्यांची भाषा निराळी आणि मराठी साहित्याची भाषा निराळी व्हायला लागली. पुढे इंग्लिश हे मोठेपणाचं लक्षण झालं. आजही आमच्या नवसुशिक्षित श्रीमंत मराठी समाजात आपल्या पोराच्या सुंदर मराठीचं कौतुक करण्याऐवजी तो ‘ज्याक् अॅण्ड जिल्’ किती छान म्हणतो याचंच कौतुक अधिक होतं. फुल्यांची मराठी भाषा तथाकथित सुसंस्कृत समाजाच्या मताने वाचण्याच्याही योग्यतेची नव्हती! शेतकऱ्याच्या दारिद्रयाचं फुल्यांनी आपल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ ह्या पुस्तकात काढलेलं शब्दचित्र केवळ भाषेच्या शैलीच्या दृष्टीनं पाहिलं तरी किती प्रभावी आहे! पण आमच्यापुढे आदर्श शैली होती चिपळूणकरांची. ‘
☆ ‘श्यामलतेची दिव्यता’ – भारतीय काव्यातील वर्णसौंदर्य☆ श्री दिवाकर बुरसे ☆
प्रस्तावना
भारतीय काव्यपरंपरेत काही रूपं अशी आहेत, की त्यांचं वर्णन करताना शब्दही शहारतात. कारण तिथे केवळ देह नसतो, तर देहापलीकडची कांती असते; केवळ रंग नसतो, तर अनुभूतींचं अथांग विश्व दडलेलं असतं.
“श्याम”, “श्यामल”, “मेघश्याम”, “नीलमेघवर्ण”, “हिरण्यवर्ण”, “स्वर्णमय”, “कर्पूरगौर” — हे शब्द त्वचेच्या रंगाचं वर्णन करणारे नाहीत; ते करुणा, माधुर्य, गूढता, शांती आणि दिव्य तेजाचे स्वर आहेत. म्हणूनच भारतीय कवींनी श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीलक्ष्मी किंवा श्रीमहादेव यांचं वर्णन करताना रंग नव्हे, तर आपल्या दर्शनानुभूती रंगवल्या.
राम : शांत निळाईचा करुणासागर
“नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गम्” ही ओळ उच्चारताच मनात एक गंभीर, दयार्द्र आणि प्रसन्न निळाई उतरते.
रामांचं श्यामल रूप म्हणजे स्थैर्याची कांती. त्यांच्या वर्णात आकर्षण आहे; पण त्याहून अधिक संयम आहे. मुखावर तेज आहे; पण नेत्रांत त्याहून अधिक करुणा आहे. जणू ऋषींच्या तपश्चर्येतून सांजवेळचं नील आकाश आकार घेत गेलं आणि त्यातून रामांचं रूप प्रकट झालं.
“रामं दूर्वादलश्यामम्… ” — दूर्वेच्या कोवळ्या हिरवट-निळसर छटेसारखी त्यांची कांती : शीतल, सौम्य आणि डोळ्यांना निववणारी.
“नीलमेघश्याम” ही उपमा सहज जन्मलेली नाही. मेघ गडद असतो, पण भयावह नसतो; तो जीवनदाता असतो. त्याच्या कुशीत वीज असते, पण वर्षावात शीतलता असते. रामांची श्यामलता अशीच — सामर्थ्य आणि सौम्यता यांचा अद्वैत संगम.
त्यांच्या वर्णात श्रावणसंध्येची गंभीर प्रसन्नता आहे. जसा दिवस मावळताना आकाश अधिक गहिरं, अधिक शांत आणि अधिक सुंदर होत जातं, तशी रामांची कांती मनात उतरते.
कृष्ण : पावरीत विरघळलेली श्यामलता
“मेघश्यामं पीतकौशेयवासम्… ” ही ओळ ऐकताच श्रीकृष्ण जणू यमुनेच्या तीरावर उभे राहतात.
कृष्णांची श्यामलता ही गूढतेची माधुरी आहे. त्यांच्या वर्णात चपलता आहे, संगीत आहे आणि अंतःकरणाला मोहून टाकणारं आकर्षण आहे. मोरपिसांनी अलंकृत ते सावळं रूप म्हणजे जणू श्रावणमेघांनी बासरीचा स्वर धारण केला आहे.
तो अंधार नाही; तो चंद्रप्रकाशाला अधिक सुंदर करणारा निळसर गहिरा पडदा आहे. त्यांच्या श्यामल कांतीवर मोरपीस अधिक खुलतं, पीतांबर अधिक उजळतो आणि बासरीचा स्वर अधिक विरघळतो.
जशी काळ्या नभामुळं तारकांची शोभा वाढते, तशी कृष्णांच्या श्यामलतेमुळं भक्ती अधिक उजळते. म्हणूनच संत तुकाराम सहज उद्गारतात :
“सावळे सुंदर रूप मनोहर… ”
या एका ओळीत भारतीय सौंदर्यदृष्टीचा आत्माच दडलेला आहे.
श्यामरंग : गूढ प्रकाशाची सावली
राम आणि कृष्ण यांचा श्यामल वर्ण सामान्य अनुवंशिक देहवर्णाच्या चौकटीत मावणारा नव्हता. “श्यामल” म्हणजे केवळ सावळेपणा नव्हे; ती सावळेपणातून झिरपणारी दिव्य कांती आहे.
भारतीय कवींनी रंगांना त्वचेच्या मर्यादेत बंदिस्त केलं नाही. त्यांनी रंगांत स्वभाव पाहिला, करुणा पाहिली, माधुर्य पाहिलं, तेज पाहिलं. म्हणून इथं श्यामवर्णही राजस आहे आणि सावळेपणातही दिव्यता आहे.
श्याम रंग म्हणजे अंधार नव्हे; तो प्रकाशाचा अधिक गूढ झालेला स्वर आहे. जसा रात्रीच्या नभात चंद्र अधिक सुंदर दिसतो, तशीच श्यामलतेच्या पार्श्वभूमीवर करुणा अधिक उजळते.
स्वर्णमयतेचे सूर्यस्पर्शी तेज
भारतीय वाङ्मयानं केवळ श्यामलतेलाच दिव्यता दिली नाही; त्यानं स्वर्णमय तेजालाही तितक्याच आदरानं गौरवलं.
वैदिक श्रीसूक्तात श्रीलक्ष्मीचं वर्णन “हिरण्यवर्णां”, “पद्मवर्णां”, “चन्द्रां प्रभासाम्” असं येतं. महाभारतात कर्णाचं, तर बौद्ध साहित्यात भगवान गौतम बुद्ध यांच्या वर्णाचं वर्णन “स्वर्णमय” असं आढळतं.
हे केवळ गोरेपण नव्हतं; ते वितळलेल्या सुवर्णासारखं तेजस्वी अस्तित्व होतं. त्वचेवर कमलदलासारखी कोमल गुलाबी छटा आणि व्यक्तिमत्त्वात सूर्यकिरणांची प्रभा होती. जणू पहाटेच्या बालरवीकिरणांनी मानवी रूप धारण केलं होतं.
भारतीय कवींनी व्यक्तिमत्त्वातील तेजाला रंगांची उपमा दिली — कुणी मेघश्याम झालं, कुणी हिरण्यवर्ण.
कर्पूरगौर शिव
श्रीराम आणि श्रीकृष्ण दोघेही श्यामवर्णी असले, तरी त्यांच्या वर्णात सूक्ष्म भेद आहे. रामांचा वर्ण निरभ्र आकाशासारखा शांत निळसर आहे; तर कृष्णांचा वर्ण वर्षाऋतूतील सजल मेघासारखा गडद नील.
महादेवांचा वर्ण मात्र याहून भिन्न आहे. कैलासनिवासी शिव “कर्पूरगौर” आहेत — हिमालयाच्या शुभ्रतेसारखे, “रजतगिरीसम” धवल आणि तेजस्वी.
त्यांच्या गौरवर्णात वैराग्याची शांतता आहे; जणू हिमशिखरांनीच मानवी रूप धारण केलं आहे.
काही रंग अनुभवावे लागतात
आज विज्ञान रंग मोजू शकतं, छटा ठरवू शकतं; पण “मेघश्याम” मोजू शकत नाही. कारण तो रंग त्वचेवर नव्हता — तो अनुभूतीत होता.
रामांचा श्याम वर्ण म्हणजे शांत प्रार्थना. कृष्णांची निळाई म्हणजे यमुनेवर तरंगणारी पावरी. श्रीलक्ष्मीची स्वर्णमय प्रभा म्हणजे समृद्धीचं मंगल तेज.
हे रंग चित्रांत रेखाटता येतात, शब्दांत मांडता येतात; पण पूर्णपणे उलगडता येत नाहीत. कारण काही रंग डोळ्यांनी दिसत नाहीत — ते अंतःकरणानं अनुभवावे लागतात.
आकाशाचा रंग हातात पकडता येत नाही; तो फक्त डोळ्यांत उतरतो. तशीच रामांची गंभीर श्यामलता, कृष्णांची मधुर निळाई आणि शिवांची कर्पूरगौर प्रभा भारतीय मनाच्या आकाशात आजही तरंगत आहे — श्रावणातील पहिल्या मेघासारखी… शांत, गूढ आणि चिरंतन.
☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २४ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
समाज स्थितीचे वर्णन (२)
जनसामान्यांची साधारण अशी रीत असते की स्वतःतील दोषांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांचे दोष दाखवत फिरायचे. म्हणतात ना स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ मात्र चटकन दिसते. अशी माणसे सर्वकाळ असतात. तुकाराम महाराजांच्या काळातही समाजात असे भरपूर लोक होते. त्यांना उद्देशून महाराजांनी ही अभंग रचना केली आहे.
तेचि करो मात/ जेणे होईल तुझे हित//
काय बडबड निमित्य / सुख जिव्हारी सिणवीसी//
जो मूळव्याधी पिडिला/ त्यासी देखोन हसे खरजुला//
अरथ करी सोसी/ त्यासी हसे तो आळशी//
क्षयरोगी म्हणे परता/ सरळ रोगीया कुष्ठिता//
वडस दोन्ही डोळा वाढले/ आणिका *काने कोचे बोले
तुका लागे पाया/ शुद्ध करा आपणिया//
महाराज सामान्य जनाना सांगत आहेत, अरे माणसा उगीच जास्त वटवट करणे थांबव. तुझे हित कशात आहे तेवढे बघ, उगीच जास्त बडबड करून लोकांना त्रास का देतोस? सामान्य परिस्थिती अशी आहे की, जो कोणी मुळव्याधीच्या आजाराने त्रस्त आहे त्याला पाहून खरूज झालेला मनुष्य हसतो. अति श्रम करणाऱ्यांना आळशी मनुष्य नावे ठेवतो. कुष्ठरोग्यास पाहून क्षयरोगी त्याला दूर राहण्यास सांगतो. ज्याच्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंब पडली आहेत तो दुसऱ्याला चकणा म्हणतो.
महाराजांचे म्हणणे असे आहे की जन हो तुम्ही स्वतःतील दोष, दुर्गुण ओळखून आधी स्वतः शुद्ध व्हा. दुसऱ्याचा धिक्कार करू नका. समाजातील स्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.
तुकाराम महाराजांच्या वेळी समाजातील दांभिकता फार वाढली होती. महाराजांच्या हे लक्षात आल्यामुळे देवाला विनंती करणारा असा हा अभंग आहे.
बोल नाही तुझ्या/ दातृत्वपणासी/
आम्ही अविश्वासी/ सर्वभावे//
दम्भे करू भक्ती/ सोंग दावू जना/
अंतरी भावना/ वेगळीया//
चित्ताचा तू साक्षी/ तुज कळे सर्व/
किती करू गर्व/ आता पुढे//
तुका म्हणे देवा/ तू काय करीसी/
कर्मा दुस्तरासी/ आमुचिया//
हे देवा तू उदार आहेस. दाता आहेस. यात काहीच शंका नाही. खरंतर आम्ही दोषी आहोत.
(तुकाराम स्वतःलाही या जनसामान्यातील एक समजतात.) आमचाच तुझ्यावर विश्वास नाही. दांभिकपणे लोकांना दाखवण्यासाठी आम्ही तुझी भक्ती करतो. मनात काहीतरी वेगळेच विचार चालू असतात. तू चित्ताचा साक्षी आहेस, म्हणून सर्व जाणतोस. तुझ्याकडे आम्ही गर्व तरी काय करणार? आणि आमच्या या दुस्तर कर्माला तू तरी काय करणार?
कावळ्याच्या गळा/ मुक्ताफळ माळा/
तरी काय त्याला/ भूषण शोभे//
गजा लागी केला/ कस्तुरीचा लेप/
तिचे तो स्वरूप/ काय जाणे//
बकापुढे सांगे /भावार्थ वचन/
वा उगाची सीण /होय त्यासी//
तुका म्हणे तैसे/ अभाविक जन/
त्यासी वाया सीण / करू नये//
समाजातील अज्ञानी, अभाविक जनांसाठी तुकाराम महाराजांनी या अभंगात जनावरे, पक्षी यांची उदाहरणे देऊन अशा लोकांना भक्तीचे महात्म्य काय सांगावे असा विचार मांडला आहे.
कावळ्याच्या गळ्यात मोत्याचे हार घालून काय शोभा? हत्तीच्या अंगाला कस्तुरीचा लेप लावला तरी त्याचा सुगंध हत्तीला काय कळणार? बगळ्यापुढे आयुष्याचे महत्त्व वाचून, भक्तीचा महिमा सांगून काही फायदा आहे का? विनाकारण त्या प्रवचनकाराला थकवा यायचा. तेव्हा भक्त म्हणून मिरवणारे पण मनात मुळीच भाव नसलेले, अशा लोकांना कोणताही उपदेश करू नये असे महाराज सांगतात.
तुकाराम बुवाना त्यावेळच्या समाजातील मंबाजीबुवांसारख्या लोकांनी खूप त्रास दिला होता. त्यांची गाथा इंद्रायणीत बुडवण्यापर्यंत मजल गेली होती. या संदर्भात हे अभंग महाराजांनी रचले असावेत.
ब्राह्मण म्हणजे वेदोक्त कर्म करणारे. तो त्यांचा अधिकार. तुकाराम महाराजांना भोजनाला बोलविणाऱ्या एका विद्वान ब्राह्मणाला उद्देशून तुकाराम बुवा म्हणतात,
नये माझा तुम्हा होऊ शब्द स्पर्श/
विप्र तुम्ही विद्वांस ब्राह्मणांसी//
म्हणून या तुम्हा करितो विनंती/
धावे शेष हाती उरले ते//
वेदी कर्म जैसे बोलीले विहित/
करावी ते नित विचारूनी/
तुमचा स्वधर्म माझा अधिकार/
भोजन उत्तर तुका म्हणे//
माझा तुम्हाला शरीराने किंवा शब्दानेही स्पर्श होऊ नये, कारण तुम्ही विद्वान, विद्यावंत ब्राह्मण आहात. वेदांमध्ये तुमचे जैविक कर्म सांगितले आहे त्याप्रमाणे आपण करावे. तुमच्या पंक्तीला न बसता तुमच्या भोजनानंतर जे काही उच्छिष्ठ उरले असेल तेवढेच खाण्याचा माझा अधिकार आहे. आणि वेदोक्त कर्म करणे हा तुमचा स्वधर्म आहे. उपरोधिक असे हे वरील अभंग आहेत.
माणसातील चांगले गुण बघावे, जात- कुळीला अवास्तव महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. समाजातील उच्चनीचता भाव दूर व्हावा यासाठी रोजच्या जीवनातील दृष्टांत देऊन या अभंगात महाराज काय सांगतात?
आपणा लागे काम वाण्या घरी गुळ/
त्याचे याती कुळ काय कीजे//
उकीरड्यावरी वाढली तुळसी/
गाईचा टाकावी ते कैसी ठाया गुणे//
गाईचा जो भक्ष अमंगळ खाय/
तिचे दूध काय सेवू नये//
तुका म्हणे काय सालपटाशी काज/
फणसातील बीज काढुनी घ्यावे//
वाण्याच्या घरचा गुळ आपल्याला हवा आहे, तर त्यासाठी त्याची जात कुळी का विचारावी? तुळस उकिरड्यावर उगवली तरी ती पवित्रच असते. गाय अशुद्ध वस्तू खाते, पण आपण तिचे दूध पितो ना? फणसाचे साल काटेरी असले तरी आपला मतलब आतील गोड गरे खाण्याचाच! थोडक्यात काय तर गुणदोष युक्त कोणत्याही वस्तूतील दोषांकडे दुर्लक्ष करून त्यातील गुण तेवढे घ्यावे हेच खरे.
ब्राह्मणांसारख्या श्रेष्ठ कुळात जन्म घेऊन कुळ भ्रष्ट करणारेही असतात.
अंगी ब्रह्म क्रिया/ ख्रिस्ती चा व्यापार/
हिंडे घरोघर / चांडाळाचे//
अंतेजाची खिचडी/ घेता ती मागून/
गाळीया प्रदान/ माय बहिणी//
उत्तम कुळी जन्म/ क्रिया अमंगळ/
बुडविले कुळ/ उभयता//
तुका म्हणे ऐसी /कलियुगाची चाली/
स्वार्थी बुडवली/ आचरणे//
काही ब्राह्मण असे असतात की, ब्रह्मकर्म न करता सावकारी करतात, आणि वसुलीसाठी चांडाळांच्या घरी जातात. महारांकडून कधीकधी पोट भरण्यासाठी खिचडी आणतात आणि व्यापारा निमित्त माय बहिणींवरून शिव्या देतात. असे ते उत्तम कुळात जन्मलेले असूनही त्यांचे कर्म अमंगळ असते. या कलियुगात अशी वागणूक सर्वत्र दिसून येते. स्वार्थ वाढला आहे, त्यामुळे शुद्ध आचरण भ्रष्ट झाले आहे.
पापाचीया मुळे/ झाले सत्याचे वाटोळे/
दोष झाले बळीवंत/ नाही ऐसी झाली नीत//
मेघ पडो भीती/ पिके सांडीयेली क्षीती/
तुका म्हणे काही/ वेदा वीर्य शक्ती नाही//
या कलियुगात पापे फार वाढली. सत्याचा ऱ्हास झाला. नीती भ्रष्ट झाली, दोष वाढले. दुष्काळ पडू लागले, निसर्ग कोपला. अधर्मामुळे वेदमंत्रातील बळ नष्ट झाले.
आज आपण अशाच परिस्थितीला सामोरे जात आहोत. आतंकवाद वाढला आहे. मुलगा वडिलांना विचारेनासा झाला आहे. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार चालू आहे. माणसातले माणूसपण हरवते आहे…
परिस्थिती सुधारणे आपल्याच हातात आहे, याचा आपण विचार केला पाहिजे.