मराठी साहित्य – विविधा ☆ व्यसनमुक्त तरुण: समृद्ध आणि सुदृढ भारताचा पाया… – भाग – २ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ व्यसनमुक्त तरुण: समृद्ध आणि सुदृढ भारताचा पाया… – भाग – २ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

आजकाल रेव्ह पार्ट्यांच्या बातम्या आपण बघतो. यातून स्वतःला वाचवायचे तर या ड्रगच्या पहिल्या डोसलाच नाकारणे हाच सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. राम गणेश गडकरींचे ‘एकच प्याला’ हे १९१२ सालचे आशयघन नाटक दुर्दैवाने आजच्या घटकेला तितकेच प्रभावी आणि समयोचित वाटते.) 

— इथून पुढे – – 

आजच्या आधुनिक काळामध्ये व्यक्तीला व्यसनाधीन करणाऱ्या ड्रग्सची यादी बरीच मोठी आहे. पण कांही मोजकी कुप्रसिद्ध नांवे म्हणजे दारू, बार्बिच्युरेटस (झोपेच्या गोळ्या), कोकेन, मॉर्फिन, हेरॉइन, अँफिटॅमिन, भांग, चरस, एल. एस. डी, इत्यादी. डायफेनहायड्रामिन या औषधाचे सेवन बहुचर्चित अशा बेनाड्रिल कफ सिरपद्वारे केल्या जात होते. म्हणून त्यावर बंदी घालण्यात आली. या औषधांमुळे रुग्णाला मतिभ्रम आणि वर सांगितलेली लक्षणे दिसतात. धूम्रपान केलेली आणि सरळ नील रक्तवाहिनीत घेतलेली औषधे रक्तात अति वेगाने प्रवेश करतात आणि त्यांचे प्रभाव अतिजलद होतात. म्हणूनच ते पट्टीच्या व्यसनाधीन लोकांच्या पसंतीस उतरतात. या उलट तोंडी औषधे, अगदी शुद्ध पावडर सुद्धा उशिरा परिणाम साधतात. कायद्यानुसार यात समाविष्ट असलेल्या अंमली पदार्थ अर्थात किंवा सायकोट्रॉपिक पदार्थाचे उत्पादन/ निर्मिती /शेती, मालकी, खरेदी, विक्री, वाहतूक, साठवणूक आणि सेवन करणे बेकायदेशीर आहे. गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार तुरुंगवास आणि दंडाच्या तरतूदी आहेत. दुर्दैवाने अशी औषधे डॉक्टर आणि परिचारिकांना उपलब्ध होतात आणि त्यांच्यापैकी थोडके जण या ड्रगसच्या आहारी गेल्याचे दिसून आले आहे.

‘सॉफ्ट टार्गेट’ अथवा ‘कमकुवत लक्ष्य’ असल्याने ड्रग ट्रॅफिकिंग करणाऱ्या टोळ्यांच्या जाळ्यात शालेय विद्यार्थी आणि नवयुवक विनासायास अडकतात. आपला मुलगा किंवा मुलगी ड्रगच्या प्रभावाखाली येत आहे हे कुटुंबियांनी कसे ओळखावे? यासाठी पालकांनी मुलांच्या बाबतीत कठोर निरीक्षण केले पाहिजे. त्यांनी खालील गोष्टी तपासून बघाव्यात.

  • आपला मुलगा दात घासणे, आंघोळ करणे, निसर्गाची हाक (शौच आणि लघवी), या नियमित स्वच्छतेचे पालन करत नाही. ड्रगच्या हँगओव्हरमुळे खूप उशीरा उठतो. त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्या विस्तारलेल्या किंवा खूपच संकुचित असतात, म्हणजेच सामान्य नसतात. यामुळे डोळे लाल आणि सुजलेले असू शकतात.
  • तो बहुतेक वेळा स्वतःला त्याच्या बंद खोलीत कोंडून घेत असतो. खोलीत कांही विचित्र वास येऊ शकतो. त्याच्या खोलीत तुम्हाला अपरिचित पावडर किंवा इंजेकशन दिसू शकते.
  • तो तुमच्यासमोर विशिष्ट लोकांशी फोनवर बोलणे टाळतो, त्याला नवीन मित्र भेटतात.
  • तो जास्तीचे पैसे मागतो, तुमचे पैसे किंवा दागिने नाहीसे होतात.
  • तुमच्या हे लक्षात येते की, तो शाळेत किंवा कॉलेज मध्ये जातो असे सांगतो, पण तिथे पोचत नाही.
  • त्याच्या शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये घसरण होणे ही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही का?
  • त्याच्या जीवनात त्याला रस नसणे ही धोक्याची घंटा आहे, हे त्याच्या वागण्या-बोलण्यातून तुम्हाला जाणवायला लागते.
  • व्यसनाधीन व्यक्तीचे स्वतःशी अन जगाशी असलेले नातेच संपुष्टात येते.

‘उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला’. मंडळी, नल-दमयंतीच्या आख्यानातील ‘औषध मजला नलगे’ अशी शपथ घेणे हाच या समस्येवरील रामबाण उपाय! निरामय मैत्रीपूर्ण वातावरण आणि निरोगी कौटुंबिक जीवन हे निरोगी समाजाचा पाया आहे. कौटुंबिक स्तरावर धूम्रपान, मद्यपान व ओल्या पार्ट्या यासारख्या सवयी अति घातक आहेत. कुटुंबातील आणि समाजातील वडीलधाऱ्या मंडळींनी तरुण पिढीसमोर स्वतःचा आदर्श उभा करायला हवा. आईवडील मुलांचे रोल मॉडेल असतात हे पालकांनी विसरता कामा नये. शुचिर्भूत निरोगी सामाजिक व्यवस्था हा या समस्येवर प्रमुख उपाय आहे. समाजातील घटकांनी ग्लॅमर आणि प्रतिष्ठेच्या नांवाखाली वाईट सवयींना खतपाणी घालू नये आणि जमेल तितक्या स्तरांवर त्यांचा विरोध करावा. तरुणांवर लक्ष ठेवा, जर तुम्हाला या समस्या असलेल्या युवकाविषयी कांही कळले तर त्याच्या पालकांना तसे कळवा. इथे ‘मला काय त्याचे! ‘ हा ऍटिट्यूड नसावा. अंमली पदार्थांच्या व्यसनाशी संबंधित कायदेशीर आणि वैद्यकीय समस्यांबद्दल जागरूक रहा.

  • या सर्वव्यापी समस्येचा सामना करण्यास एकत्रित आणि एकसंघ प्रयास करायला हवेत. कुणा एकाने हा जगन्नाथाचा रथ खेचणे अशक्य! कुटुंब, समाज, वैद्यकीय क्षेत्र, मीडिया, शासन व्यवस्था, पोलीस दल, राजनैतिक व्यक्ती आणि न्यायव्यवस्था हे सर्व आपला अधिकार वापरून ऍडिक्शनच्या भीषण समस्येवर ताबा मिळवू शकतात.
  • हा रोग म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे. म्हणूनच याला ‘मेडिको-सोशल प्रॉब्लेम’ म्हटल्या जाते. अर्थात ही एक वैद्यकीयच नव्हे तर सामाजिक समस्या आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच या व्यसनाधीनतेवर उपचार करणे हे वैद्यकीय आणि सामाजिक संस्थांसाठी एक खूप मोठे आव्हान आहे. रोग्याचे ऍडिक्शन आणि त्यासोबत सुरु झालेल्या संबंधित समस्या, (उदा. इन्फेक्शन, निद्रानाश) आणि विथड्रॉव्हल सिंड्रोम यांसह सर्वसमावेशक उपचार हेच याचे मूलभूत तत्व आहे. मुख्यत्वेकरून व्यसनातून बाहेर येण्यासाठी रुग्णाची १०० टक्के इच्छा असणे अत्यावश्यक आहे. हे जर नसेल तर इतरांच्या प्रयत्नांना यश लाभणे अश्यक्यच आहे.
  • अमली पदार्थांचे व्यसन अचानक थांबवण्याचा कुणीही विचार करू नये. याने विथड्रॉव्हल सिंड्रोम होतो व क्वचित रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. दवाखान्यात दाखल करून ऍडिक्शनचा वैद्यकीय उपचार केल्या जातो. व्यसन निर्माण करणारे अतिप्रभावशाली औषध हळूहळू कमी करून त्या मानाने कमी प्रभाव असलेले व्यसन निर्माण करणारे औषध दिल्या जाते. मग तेही हळूहळू बंद केल्या जाते. याने विथड्रॉव्हल सिंड्रोम होत नाही. निष्णात वैद्यकीय देखरेखीखाली हे उपचार केल्या जावेत. यात संयम आणि सहनशीलता यांची जणू परीक्षाच असते. यासोबत मानसशास्त्रीय समुपदेशन केल्या जाते. इथे रुग्ण आणि नातेवाईकांचा सकारात्मक दृष्टीकोन अत्यंत आवश्यक आहे. व्यसनमुक्त झालेल्या रोग्याला मानसिक आधार देणे, त्याचे कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे ही पायरी अतिशय महत्वाची आहे. हा सर्वंकष आधार नसेल तर रुग्ण परत त्याच काटेरी वाटेने जाऊ शकतो.

पालक, नातेवाईक, मित्र आणि समाज यांची या संदर्भात खूपच महत्वपूर्ण भूमिका असते. मी पालकांना आवाहन करते की, तुम्ही तुमच्या मुलांचे मित्र व्हा, त्याला तुमच्या छत्रछायेखाली सुरक्षिततेची खात्री वाटू द्या. त्याच्याशी सतत प्रत्यक्ष सुसंवाद साधा, जेणेकरून तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या तुमच्याशी शेअर करेल. त्याच्या मित्रमंडळीबद्दल अधिक जाणून घ्या. कुठलाही किरकोळ असो व प्रमुख मुद्दा असो, त्याला टोमणे मारणे किंवा रागे भरणे टाळा, अतिरेकी कठोर शिस्त आणि अतिरेकी सौम्यता, हे दोन्ही धोकादायक आहेत. त्यांचा सुवर्णमध्य तुम्हीच शोधा, म्हणजे तो नक्की सापडेल. त्याच्या दैनंदिन गरजांव्यतिरिक्त पॉकेटमनी देणे टाळा. त्याच्या पैशाच्या मागणीला, विशेषकरून इमोशनल ब्लॅक मेलिंगला बळी पडू नका. तुमच्या मुलाच्या सर्वांगीण वाढीत स्वारस्य असू द्या. आपल्या मुलावर अपेक्षांचे अनावश्यक ओझे टाळा. त्याचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्याचा मानसिक ताण कमी करणे हे आजच्या जगात महत्त्वाचे घटक आहेत. या संगोपनात आजी, आजोबा आणि वडीलधारे नातेवाईक पालकांना सामील होऊ शकतात. खरे मित्र तेच असतात जे रुग्णाच्या समस्या शेअर करू शकतात, त्याचे मनोबल वाढवू शकतात आणि त्याचा गमावलेला आत्मविश्वास वाढवू शकतात. सच्चे जिवाभावाचे निर्व्यसनी मित्र असतील तर सोन्याहून पिवळे!

व्यसनाधीन रोग्यांना दिलासा देणाऱ्या आणि त्यांना यातून बाहेर काढण्याचा वसा घेतलेल्या बऱ्याच गैर-सरकारी संस्था कार्यरत आहेत. या स्वयंसेवी संस्थांपैकी सर्वात जुनी संघटना ‘अल्कोहोल अनॉनिमस’ आहे. ही संस्था मद्यपींना समस्येवर मात करण्यास मदत करते. दिवंगत डॉ. अनिता अवचट आणि डॉ. अनिल अवचट यांनी २९ ऑगस्ट १९८६ रोजी मुक्तांगण पुनर्वसन केंद्राची स्थापना केली. या केंद्राने आज अंमली पदार्थ आणि दारू-व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट संस्थेचा दर्जा प्राप्त केला आहे.

२६ जून, २०२६ च्या जागतिक ड्रग दिनाचे घोषवाक्य “जागतिक ड्रग समस्या: कायमस्वरूपी प्रश्न, नवीन आव्हाने, नाविन्यपूर्ण उपाय” हे होते. या दिनाचे मूळ उद्दिष्ट मादक पदार्थांच्या सेवनाविरुद्धच्या लढ्यात आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवणे आणि सुरक्षित, निरोगी जग निर्माण करणे हे आहे. याची मुख्य उद्दिष्टे आहेत.

  • अमली पदार्थांच्या बाजारात होत असलेले बदल आणि ओपिओइड-कोकेनच्या वाढत्या समस्येचे पुनरावलोकन करणे.
  • नाविन्यपूर्ण उपाय: सायबर तस्करी आणि कृत्रिम ड्रग्सच्या निर्मितीला आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.
  • जागरूकता आणि सहकार्य: मानवी हक्कांवर आधारित धोरणे आखणे आणि जागतिक पातळीवर यंत्रणांना बळकट करणे.

आजचा तरुण समृद्ध भारताचे प्रतिनिधित्व करतो. कालची आणि उद्याची पिढी या आजच्या सशक्त पिढीवर विश्वास ठेऊन आहे, त्याच्याकडून त्यांच्या खूप अपेक्षा आहेत. शारीरिक आणि मानसिक रित्या खंबीर असलेला तरुण हा भारताचा खरा चेहरा असायला हवा.

स्वामी विवेकानंद युवाशक्तीला आवाहन करीत म्हणतात:

“उठा, जागे व्हा आणि ध्येय मिळेपर्यंत अजिबात थांबू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला कधीही कमकुवत समजू नका, जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी तुम्ही करू शकत नाही.”

– समाप्त – 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्यसनमुक्त तरुण: समृद्ध आणि सुदृढ भारताचा पाया… – भाग – १ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ व्यसनमुक्त तरुण: समृद्ध आणि सुदृढ भारताचा पाया… – भाग – १ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

“निष्पाप तारुण्य ही एक अमूल्य संपत्ती आहे, जी तथाकथित सुखाच्या क्षणिक उत्साहासाठी वाया घालवू नये”— महात्मा गांधी

या लेखाच्या संदर्भात तरुण म्हणजे नुसताच मनाने तरुण नव्हे. संयुक्त राष्ट्रसंघानुसार हे वय १५ ते २४ वर्षे आहे, मात्र भारत सरकारच्या राष्ट्रीय युवा धोरणानुसार ते १५ ते २९ वर्षे आहे. हे वय लक्षात घेता तरुणाची शारीरिक क्षमता अत्यंत उर्जावान असते. त्याच्या डोळ्यात जग बदलण्याची स्वप्ने तरळत असतात तर रगारगात चैतन्याचे रक्त उसळत असते. हि अशी आग आहे जिला योग्य दिशेच्या अग्निकुंडात ठेवणे आवश्यक आहे नाही तर ती, जग जाळून टाकेल. समाज तरुण पिढीकडे मोठ्या आशेने बघत असतो कारण आजचा तरुण हा देशाचे भविष्य नव्हे तर वर्तमान आहे. “

आजची युवा पिढी ही आपल्या देशाची संपत्ती आहे. तिचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणे कालच्या पिढीचे परम कर्तव्य आहे. कुठल्याही तरुणाच्या जीवनात सर्वाधिक प्रभाव पडतो तो त्याच्या कुटुंबाचा! , याव्यतिरिक्त शेजारी, समाज, महाविद्यालये आणि इतर शिक्षण संस्था, सामाजिक संस्था, शासकीय व्यवस्था, राजकारणी हे या ना त्या कारणाने त्याला प्रभावित करतात. मात्र मी म्हणेन की याहूनही त्याचे जीवन ढवळून टाकणारी अधिक प्रभावशाली आहेत ती समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमे. नेटफ्लिक्स पासून तर हॉटस्टारपर्यंत समाजमाध्यमांतून तरुणांसाठी करमणुकीचे दरवाजे सताड उघडे आहेत. गुगल गुरुजी, ए आयचे अलाउद्दीनच्या शक्तिशाली जिन्नसारखे सेवक त्यांच्या चरणी बारा महिने आणि तिन्ही त्रिकाळ सेवेसाठी सज्ज आहेत. या स्वप्ननगरीच्या अतिविशाल फुग्यात आजचा तरुण आरामात विहार करतोय. तेच त्याचे जग आहे. या आभासी जगात तो किती वेळ वाया घालवतो त्याचे मोजमाप करायला देखील त्याला वेळ नाही. हळू हळू हेच आभासी जग त्याचे सर्वस्व होऊन बसते. त्यातील समृद्ध नायक नायिका, त्यांचे अनिर्बंध विचार, श्रीमंत जीवन पद्धती आणि स्वैराचार हेच त्याला सामान्य वाटू लागते. मंडळी बहुतांश तरुणांना अमेरिका आणि युरोपसारख्या पाश्चात्य देशांतील जीवनाची भुरळ पडलेली असते ती याच माध्यमस्नेही प्रवृत्तीमुळे. त्यातूनच निर्माण होते ती मदिरा आणि मदिराक्षीची वासना, सोबतीला अभिनव आणि अनवट अनुभव देणारे ड्रग्स. रेव्ह पार्ट्या तर श्रीमंत तरुणांचा जिव्हाळ्याचा विषय. सिगारेट आणि दारू तर सर्वमान्य आणि सामान्य जनांसाठी असल्याने ड्रग्सच्या रूपाने त्या पुढील पायरी गाठणे हे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे प्रदर्शन असते. यासाठी प्रतिष्ठा हेच एक कारण नसून इतर करणे देखील आहेत.

  • स्वतःच्या आणि पालकांच्या अपेक्षेनुसार शैक्षणिक प्रगती न होणे
  • गरिबीमुळे हवे ते शिक्षण घेता न येणे
  • पेपरफुटीसारख्या समस्या आणि शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार
  • शिक्षणाअभावी किंवा योग्य शिक्षण झाल्यावरही बेरोजगारीचा सामना करावा लागणे
  • व्यवसाय किंवा नोकरीत वरिष्ठांशी न पटणे
  • कामाचा योग्य तो मोबदला न मिळणे किंवा त्याची वरिष्ठांकडून दाखल घेतल्या न जाणे
  • प्रेमभंग
  • कौटुंबिक कलह आणि कुटुंबातील व्यसनाधीनता
  • समाजात प्रतिष्ठा न मिळणे

वरील कारणांमुळे आजचा तरुण तणावाखाली आणि नैराश्याने ग्रस्त असू शकतो. अशा वेळी कधीतरी मनाच्या कमकुवत अवस्थेत तो व्यसनांच्या आहारी जातो. आपण याच व्यसनाधीनतेविषयी आणि त्यापासून मुक्तीबद्दल चर्चा करणार आहोत. तरुण अंमली पदार्थांचे सेवन कान करीत आहेत? मंडळी, एरवी माणसाच्या विविध व्याधींकरिता अनुकूल अशा कांही औषधांपैकी कांही मोजकी औषधे रोगांविरुद्ध लढण्याऐवजी स्वतःच अतिभयानक रोगाचे कारण बनतात. तेव्हां या अमृतवेलीची माणसाला कशी अन केव्हां आपला गुलाम बनवणारी विषवल्ली होते हे त्याचे त्यालाच कळत नाही. कळते तेव्हां तो मृत्यूच्या पाशात अडकलेला असतो. हे असे कां आणि कसे होते?

वैद्यकीय व्याख्येनुसार ड्रग अर्थात औषध म्हणजे असा कोणताही रासायनिक पदार्थ, जो आपल्या सामान्य किंवा विकृत शारीरिक प्रक्रियेत बदल करतो. उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी हे रसायन ‘औषधी तत्व’ आहे. मात्र औषध कंपन्यांसाठी ते निव्वळ एक ‘प्रॉडक्ट’ अर्थात उत्पादन आहे. त्यापलीकडेही ‘ड्रग’ या शब्दाचा विस्तारित अर्थ ‘रंग माझा वेगळा’ असा प्रतिध्वनित होतो. समाजासाठी व्यावहारिकरित्या ड्रग म्हणजे व्यसनाधीनता निर्माण करणारे घातक रसायन असते हे सर्वांनी लक्षात असू द्यावे. एकाच रसायनाकरता आपण दोन नावे वापरतो, ड्रग आणि मेडिसिन. या दोहोंतला मूलभूत फरक त्यांच्या वापरातील हेतूचा आहे. डॉक्टर पेशंटला ‘मेडिसिन’ देतांना त्यांचा एकमेव उद्देश रुग्णाला बरे करण्याचा असतो. डॉक्टरांना अर्थातच त्या औषधाचे डोस आणि साईड इफेक्टचे परिपूर्ण ज्ञान असणे अपेक्षित असते.

ऍडिक्शन अथवा अंमली पदार्थांचे सेवन हा एक रोग आहे. यात व्यक्ती मेंदूला घातक उत्तेजना देणारे ड्रग वारंवार वापरते. इथे तीन कळीचे मुद्दे आहेत.

  • त्या व्यक्तीचे एकमेव उद्दिष्ट असते, ड्रग घेत राहणे. त्याला त्या ड्रगचा इतका पराकोटीचा हव्यास असतो की, ‘हवास मज तू, हवास तू’ या विचाराने वेडे होत ते कुठूनही अन कसेही मिळवण्यासाठी तो जिवाचे रान करतो, (भीक मागणे किंवा लाचार होऊन गयावया करणे अथवा चोरी करणे यापैकी कुठल्याही मार्गाचा अवलंब करणे)! आईजवळ हे (अजाण? ? ) लेकरू वाढीव अधिक पॉकेटमनीचा हट्ट करते, तर कधी जवळच्या मित्राकडे दोस्तीचा हवाला देत उधार मागते, हे उपाय अयशस्वी झाल्यावर बिनदिक्कतपणे घरातील पैसे चोरते! या आगंतुक रसायनाविषयी इतकी लालसा का? कारण त्याला वाटत असते, “हे ड्रग मिळाले नाही तर मी मरून जाईन”.
  • कांही दिवसांनी या रासायनिक तत्वाचे त्याचे आवडते परिणाम त्या डोसने येईनासे होतात. मग त्या ड्रगचे तथाकथित ‘गोड’ परिणाम अनुभवण्यासाठी तो स्वतःच निष्णात डॉक्टरचा आव आणत ड्रगचा डोस वाढवत राहतो. मी या तथाकथित ग्वाड परिणामांची फक्त काही उदाहरणे सांगते, मूड मध्ये येणे, परमानंदाचा अनुभव, भ्रम, नसलेली गोष्ट दिसणे किंवा ऐकू येणे, (ध्वनी दिसणे आणि प्रकाश ऐकू येणे) आणि या सर्वांवर वरताण म्हणजे सर्वात आकर्षक अशी जगप्रसिद्ध ‘किक’!
  • अशा व्यक्तीने ड्रग घेणे थांबवले तर गंभीर विथड्रॉव्हल सिंड्रोम (ड्रगपासून वंचित राहण्याचे भयंकर परिणाम अर्थात विरहवेदना) दिसून येतो. यात अस्वस्थपणा, नैराश्य, निद्रानाश, फिट्स येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात तसेच एखाद्या वेळेस मृत्यू देखील होऊ शकतो.

व्यसनाधीनता निर्माण करणारी काही औषधे ही वनस्पतींपासून निर्मित आहेत. उदाहरण द्यायचे तर तंबाखू, अफू, कोकेन इत्यादी घटक सामाजिक संस्कृतीचा भाग म्हणून सामूहिकरीत्या सेवन करण्याची प्रथा बरीच जुनी आहे. आपण म्हणतो ना, देव सोमरसपान करतात, ते बहुधा ‘दैवी मद्य’ असावे. अफूच्या पार्ट्यांची तर लेखी नोंदच उपलब्ध आहे. मागील शतकात अशा पार्ट्यांची आमंत्रणे राजरोस छापली जात होती. अफू आणि मद्य हे ५००० वर्षे किंवा त्याहून आधीपासून प्रचलित असावे. हे ड्रग नैसर्गिक अवस्थेत अशुद्ध रूपात असत. त्यांचे वाईट प्रभाव पण त्या मानाने कमीच असत. पण जेव्हां अफूच्या स्रोतातून आधुनिक पद्धतीने प्रयोगशाळेतून मॉर्फिनसारखे शुद्ध औषध निर्माण केल्या गेले तेव्हा त्याचे चांगले अन वाईट दोन्ही परिणाम तीव्र होते. वैज्ञानिकांनी त्याचे रासायनिक अपत्य शोधले हेरॉइन, सुपर ऍडिक्शन निर्माण करणारे ड्रग. म्हणजेच अवगुणांत बाप से बेटा सवाई! अशी अनेक नवनव्या उचापती करणारी संयोगक्रियेद्वारा प्रयोगशाळेत निर्मित कृत्रिम ड्रगस युवा पिढीला आपला विषाक्त विळखा घालण्यास सज्ज आहेत. हे प्रयोगशाळेतून निघालेले शुद्ध सिंथेटिक ड्रगस खूप विषारी असतात आणि व्यसनी माणसाचा जीव देखील घेऊ शकतात.

धूम्रपान करणे, तंबाखू खाणे आणि दारू पिणे हा अनेक लोकांच्या वैयक्तिकच नव्हे तर सामाजिक जीवनाचा देखील एक अविभाज्य भाग झालेला आहे. माझ्या मते या सर्व व्यसनांचे मूळ कारण आहे त्यांना मिळालेली अवास्तव सामाजिक मान्यता, प्रतिष्ठा आणि स्टेटस सिम्बॉलचे अग्रमानांकित स्थान. अशा अमली पदार्थांचे व्यसन कुठल्याही दृष्टिकोनातून बघावे! शरीर, मन, कुटुंब आणि समाज यांच्याकरता हे व्यसन पूर्णपणे हानिकारक आहे हेच मुळी समाज मान्य करीत नाही. सेलिब्रिटीजचा वरदहस्त असल्यामुळे त्याला लाभलेल्या ग्लॅमरचे वलय तर अनुकरणप्रिय युवा पिढीकरता आणखीच वाईट! यात पहिल्या प्रेमासारखी पहिली सिगारेट, दारूचा पहिला पेग आणि कोकेनचा पहिला झुरका या ‘प्रथम तुज पाहता’ सारखी जी अवस्था होते तिच्यातून बाहेर येणे कठीण. दुर्दैवाने ही पहिली पायरी दाखवणारे कधी कधी पालक, कुटुंबातील अन्य सदस्य, नातेवाईक किंवा जवळचे मित्र असतात. एकदा का ही पहिली पायरी ओलांडली की मग त्या माणसाला कुठे थांबावे हेच कळत नाही. याशिवाय मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवत केलेले अपराध आणि लैंगिक गुन्हे घडतात ते वेगळेच. आजकाल रेव्ह पार्ट्यांच्या बातम्या आपण बघतो. यातून स्वतःला वाचवायचे तर या ड्रगच्या पहिल्या डोसलाच नाकारणे हाच सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. राम गणेश गडकरींचे ‘एकच प्याला’ हे १९१२ सालचे आशयघन नाटक दुर्दैवाने आजच्या घटकेला तितकेच प्रभावी आणि समयोचित वाटते.

– क्रमशः भाग पहिला 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खेळ… ☆ कल्याणी केळकर बापट ☆

कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ खेळ… ☆  कल्याणी केळकर बापट ☆

अमरावतीला दरवर्षी दोन तीन खूप मोठे मोठे दहीहंडीचे इव्हेंट होतात. ती गर्दी, तो डी जे चा कर्णकर्कश आवाज, ती सेलिब्रिटी लोकांची ह्या इव्हेंट मधील हजेरी त्यामुळे ह्याला इव्हेंट च म्हणायचं. पण यंदा अमरावतीला सरकारी दवाखान्याला लागलेल्या आगीमध्ये नवजात बालके दगावली, काही गंभीर जखमी झालीत त्यामुळे हे इव्हेंट रद्द करण्यात आले. दहीहंडी म्हटलं की आठवले ती सामूहिक एकोप्याने केलेला मानवी मनोरा. खरोखरच ह्या सांघिक खेळांमुळे साहस, परस्परांना सांभाळून घेणे, यश अपयश पचवायची ताकद आणि अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात.

खेळावरून आठवल हल्ली बहुतेक घरातील सगळी मुलं आपापल्या व्हरांड्यात हातात मोबाईल घेऊन बसले असतात. एकतर बहुतेक एकटी अपत्य, असले तर एखादे भावंड, संयुक्त कुटुंब जवळपास नाहीच त्यामुळे मग एकटेपणा घालविण्यासाठी एकतर मोबाईल किंवा टीव्ही. सगळी बालचमू, बच्चेकंपनी आपली इटूकली पिटूकली तोंड हिरमुसली करुन आपापल्या गँलरीत, व्हरांड्यात बसतात. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या बरोबरीची समवयस्क व्यक्ती च लागते साथीला.

माझं मनं एकदम 15, 20 वर्षे मागे गेले. डोळ्यांसमोर यवतमाळची छान टुमदार घरांची सोसायटी आठवली. लहानश्या व्यंकटेश ला खेळायला शेजारचे ढीगभर सवंगडी होते. सगळे बरोबरीचे मुलं संध्याकाळी शाळेतून आल्याबरोबर दप्तर कोपऱ्यात ठेऊन बाहेर खेळण्यासाठी धूम ठोकत असत. सगळे मैदानी खेळ कधी गुण्यागोविंदाने तर कधी जुजबी भांडण करीत खेळतं. त्यावेळेस खेळले जाणारे खेळ म्हणजे आबाधूबी, लपाछपी, टिक्करबिल्ला, लंगडी, आंबेफोडणी, डाबडुबली, तळ्यातमळ्यात, मामाचं पत्र, खुपसणी, सागरगोटे, लगोरी, खोखो, कबड्डी, रनिंग, पोतारेस, लिंबूचमचा असे सगळ्यांच्या आवडीचे.

हे सगळे वैभव मला, आणि नंतर माझ्या मुलाच्या पिढीला पण उपभोगायला मिळाले ह्यात आनंद मानायचा की बहुतेक नंतरच्या पिढ्या ह्या आनंदाला मुकणार ह्याचे दुःख करायचे हे कधीकधी कळतच नाही. पण हे बिनखर्चीक खेळ ह्या मुलांना खूप आनंद देऊन गेले आणि एकोपा कसा असतो हे मुलांना शिकवून गेले हे नक्की. खरंच लहानपण, बालपण हा जीवनातील परमोच्च सुखाचा काळ असावा.

मध्ये मात्र एकदा काँलनीतील बच्चे कंपनीला बेधुंदपणे खेळतांना बघून खूप आनंद झाला. खास करुन मुलं मैदानी खेळ खेळतात आहेत आणि ते पण मस्त सामुहिक मोठ्या ग्रुपमध्ये ही आनंदाचीच बाब. त्यामुळे तो खेळ बघतांना तेथे थबकले, घटकाभर निवांत तो खेळ बघण्यात रममाण झाले आणि खूपसारा आनंद मनात भरभरून जमा केला.

ह्या खेळांमध्ये वयोगटानुसार दोन ग्रुप पडले होते. ते दोन्हीही ग्रुप दोन वेगवेगळे खेळ खेळत होते. एका ग्रुप चा खेळ म्हणजे लांब लाईन करायची, पहिल्या मुलाने दुसऱ्या मुलाच्या कानात अगदी हळुवार एक वाक्य सांगायचं, असं क्रमाक्रमाने ते वाक्य पुढे पुढे नेऊन शेवटचा खेळाडू ते वाक्य जाहीर सांगायचा. आता खरी गंमत अशी की मूळ वाक्याचा आणि शेवटच्या जाहीर वाक्यात इतकी जास्त तफावत यायची की तो समुह हास्याने लोटपोट व्हायचा अर्थातच मला पण ते बघून जाम हसू येतं होतं. आता इकडे बाजूला दुसरा समुह दुसरा खेळ मांडुन बसला होता. ह्या दुसऱ्या खेळात एका मुलाच्या डोळ्याला पट्टी बांधल्या जायची. त्याला दुसरा मुलगा एखाद्या आजुबाजुच्या वस्तू चा रंग आकार हे हिंट वा क्ल्यु म्हणून द्यायचा आणि त्यावरून तो ती वस्तू ओळखायचा. ह्या खेळात पण खूप गंमत येत होती. सांगाणारा सांगायचा एक आणि ओळखणारा ओळखायचा भलतच.

ह्या दोन्ही खेळांनी गंमत तर आणलीच पण एक मनात खोल विचार पण रुजवला बरं का. पहिल्या खेळाने सुचविले खरोखरच आपले कान किती हलके असतात की कुणी एकमेकां मार्फत लांब वळून आलेली गोष्ट ही आपले मूळ रुप सोडून भलतेच वेगळे रुप घेऊन आपल्या कानांवर आदळते, मनावर बिंबते आणि मग आपला तसाच भलता ग्रह बनतो, दृष्टिकोन तयार होतो. ही गोष्ट किती हानीकारक नं. म्हणून स्वतः च्या कानांवर आणि नजरेवर विश्वास ठेऊन मगच निर्णय घ्यावेत. त्याक्षणी मनाशी पक्की खूणगाठ बांधली अशा ऐकीव गोष्टी ऐकून आपला तसा दृष्टिकोन तयार करुन एखाद्या निरपराध व्यक्तीवर अन्याय करायचा नाही, कारण असं झालं तर त्याच्या कितीतरी पट जास्त भरपाई आपल्याला इथल्याइथेच भरून द्यावी लागते.

दुसऱ्या खेळातून असा बोध मिळाला की आपली दृष्टी न वापरता दुसऱ्या च्या इंद्रियांचा वापर करुन मनात तयार केलेली प्रतिमा ही वास्तवतेपेक्षा कितीतरी निराळी असते. थोडक्यात काय तर आपले कान, आपली नजर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मनं हे कायम आपल्याशी खरं बोलत असतं. फक्त गरज असते ती दुसऱ्यांच्या कुबड्या न वापरता स्वतःवर आणि फक्त स्वतः वर विश्वास ठेऊन निर्णय घेण्याची.

खूप लहानलहान गोष्टींमधूनही कधीकधी खूप मोठा संदेश मिळतो हे मात्र खरं.

 

©  कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संध्येच्या उंबरठ्यावर… ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ संध्येच्या उंबरठ्यावर… ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆

उंबरठा… सीमारेषेसारखी एक स्पष्ट आणि तरीही ओढाळ रेष.. ही रेष ओलांडून बाहेर जातांनाही मनाला एक नि:शब्द ओढ लावते आणि ओलांडून आत येतांनाही ओढच लावते.. म्हणून ती ‘ओढाळ’… दोन्ही वेळा अशी ओढ लावणाऱ्या मनातल्या भावना जरी वेगळ्या असल्या तरी ओढ तीच असते.. म्हणूनच उंबरठा ही खरोखरच एक ओढाळ रेष…

आणि ही उंबरठ्याची ओढ फक्त माणसालाच असते असं नाही.. तर निसर्गालाही असतेच असते.. आणि ती माणसाने आदर्श घ्यावा अशीच असते..

आता सूर्याचंच उदाहरण घ्या ना! ‘ कधी एकदा रात्र संपते आणि मी तिच्या घराचा उंबरठा ओलांडतो याचीच फार घाई असते त्याला.. आणि मग ऊर्जेची उधळण करणारा सूर्य एकदाचा आकाशात आगमन करतो.. दिवसभर चालत रहातो. त्याच्याही वाटेत अडथळे असतातच की – – कधी राक्षसासारख्या काळ्याभोर ढगांचे.. कधी जणू त्याला चक्क अडवून धोधो कोसळणाऱ्या पावसाचे.. पण म्हणून तो वैतागत नाही.. थांबत नाही.. आणि चालत राहतो पुन्हा रात्रीच्याच उंबरठ्याच्या दिशेने.. पण असं परतत असतांना त्याला ना दु:ख असतं ना खंत, कारण असं परतणंही त्याने मनापासून स्वीकारलेलं असतं.. म्हणूनच तर भा. रा. तांब्यांसारखे संवेदनशील कवी त्या मावळत्या सूर्याला बघून म्हणतात.. ”अर्घ्य तुज जोडुनी दोन्ही करा. ”. परततांनाही तितक्याच शांतपणे.. निर्लेपपणे तो जातो म्हणून त्याला ‘ समदर्शी ‘ अशी उपमा देतात… आणि म्हणूनच रात्रीचा.. पहाटेचा.. सकाळचा.. दुपारचा.. संध्याकाळचा असे सगळे उंबरठे तो रोज तितक्याच उत्साहाने आणि मनापासून पार करतो.

– – प्रत्येक माणूसही त्या सूर्यासारखाच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर असे उंबरठे ओलांडत असतो. आपले काम संपल्यावर अगदी अलिप्तपणाने सहज मावळतीला जाणाऱ्या त्या सूर्याकडून माणसाने हा अलिप्तपणा शिकण्यासारखा. आपल्यालाही संध्यासमयी परतायचंच आहे याचं भान आपल्या कर्तृत्वाच्या धुंदीत रमताना ठेवायलाच हवं.

माणसाच्या आयुष्यात त्याला खुणावत असणाऱ्या उंबरठ्यांबद्दल बोलायचं तर – – –

पहिले बरेच उंबरे कुतुहलाने.. उत्सुकतेने.. उत्साहाने ओलांडण्याची जणू घाईच झालेली असते… आणि तो ओलांडून बाहेर गेल्यावर परत तोच उंबरठा ओलांडून आत येण्याचीही घाईच… पण हे सगळे उंबरठे असा परतून येण्याचा आनंद देतात तो शिशु अवस्थेत.. बाल्यावस्थेत.. कुमारवयात…आणि ‘ विद्यार्थी ‘ या भूमिकेत असेपर्यंत… स्वतःच स्वतःच्या सर्वांगीण क्षमतेची ओळख करून घेईपर्यंत…

… मग एकदा का हा तरुणपणाचा उंबरठा ओलांडत बाहेरच्या जगात पाऊल टाकलं की ती रम्य सुखद सकाळ त्या उंबरठ्याच्या आत सुखरूप.. आणि माणूस बाहेरच्या तापलेल्या आणि बहुशः रखरखीत अशा दुपारसारख्या व्यवहारी.. हिशोबी जगात पाऊल टाकतो. सुरुवातीला सगळं काही नवीन असल्याने उत्साह.. उमेद.. कुतूहल.. आणि स्वतः कमावत असल्याचा.. ‘ आता मी कुणावरही अवलंबून नाही ‘ याचा अभिमानमिश्रित आनंद असतो. मग हळूहळू चटके जाणवायला लागतात.. पण म्हणून आता लगेच परत फिरून येणं शक्य नसतं. ही आयुष्याची दुपार.. मग ज्या वाटेने चालायचं आहे ती वाट स्वतःला आवडणारी असो वा दुसरी वाट दिसत नाही म्हणून स्वीकारलेली असो… अटळ म्हणावी अशी … ही वाट म्हणजे शरीरावरचा आणि त्याहीपेक्षा मनावरचा ताण वाढवणारी.. बरेचदा दुसरा पर्याय नाही म्हणून आणि बरेचदा अहंकाराच्या पोटी … किंवा स्पर्धा जिंकण्याच्या इर्षेपोटी मग स्वतःच स्वतःच्या डोक्यावर घेतलेली ओझी पेलत नसतांनाही पाय ओढत चालायला भाग पाडणारी…

… पण उमेदीचं एकेक वर्ष संपत जातं आणि हळूहळू नकळत ही दुपार कलंडायला लागते.. पाय थकल्याची जाणीव व्हायला लागते.. शरीरावर त्याच्या खुणा दिसायला लागतात. आणि आता हे धावणं पुरे असं मनापासून वाटायला लागतं….

… आणि खुणावायला लागतो तो संध्याकाळचा उंबरठा. नकळत त्याची ओढ वाटायला लागते … आणि माणूस इतक्या वर्षांच्या कामाच्या रहाटगाडग्यातून एकदाचा बाहेर पडतो.. निवृत्त होतो.

…  हा उंबरठा मात्र कितीही ओढ लावत असला.. आकर्षक वाटत असला.. तरी मनाला बुचकळ्यात टाकणारा. रोजची उरस्फोड आता संपणार हे माहित असूनही एकीकडे याचा आनंद आणि एकीकडे एक अनामिक हुरहूर अशी मनाची द्विधावस्था करणारा आणि अशावेळी माणसाची मजा बघायला जणू उत्सुक असणारा हा उंबरठा…

या उंबरठ्याशी पोहोचणं.. तो ओलांडणं.. ही गोष्ट आनंद आणि समाधान देणारी असते, की विनाकारण अस्वस्थ चिडचिड करायला लावणारी असते हे मात्र माणसागणिक बदलणारं गणित – – हे गणित काहीजण सहजपणाने सोडवून टाकतात.. आणि काहीजण मात्र स्वतःच ते इतकं किचकट करून टाकतात की आयुष्यच ओलांडून जायची वेळ आली तरी त्यांना हे गणित सोडवता येत नाही.

– – हा उंबरा ओलांडतांना आयुष्याचा रंगमंच फिरता आहे हे प्रकर्षाने जाणवतं… मंचही बदललेला आणि रंगही हळूहळू पण नक्कीच बदलायला लागलेले.. प्रत्येकाची भूमिकाही about turn केल्यासारखी बदललेली… म्हणजे माणसाची घरातली आधीची भूमिका बरीच वेगळी आणि ठळक होते.. आधीचा रंगमंच दृष्टीआड झालेला असतो… घरातले सदस्य त्यांच्याही नकळत त्याच माणसाला आता वेगळ्या भूमिकेसाठी गृहीत धरायला लागतात.. आणि इथेच आयुष्याची संध्याकाळ जराशी गडद होऊन स्पष्टपणे खुणावायला लागते.

– – अनेक महत्वाच्या गोष्टी मनाला समजावण्याची ही वेळ. कालपर्यंत मिळत असलेला मान.. आदर खुर्चीमुळे मिळालेला होता हे कटू सत्य पचवणं तसं जडच जात असतं. तारेवरची कसरत करण्याची सवय असलेले पाय आता ती कसरत संपल्यावर कुठे वळवावेत हा संभ्रम पडलेला असतो. घड्याळाची बांधिलकी संपल्याने बरं तर वाटत असतं.. पण आता इतका रिकामा वेळ हातात आहे त्याचं काय करायचं हे नेमकं ठरवणं सतत बुचकळ्यात टाकत असतं… सारंच कसं निवांत.. बऱ्याचदा हा ध्येय नसणारा निवांतपणा.. किंवा हे रिकामपण अस्वस्थता.. चिडचिड आणणारं असतं..

पण अशावेळी सगळ्या सृष्टीलाच खुणावणारे संध्येचे प्रसन्न शांत रंग आवर्जून बघायला हवेत.. समजून घ्यायला हवेत. या रंगांमध्ये कुठलीच दाहक छटा नसते हे एकदा लक्षात घेतले की अस्वस्थ मनही शांत व्हायला हवे.. अगदी प्रयत्नपूर्वक ते शांत ठेवणे जमायला हवे……

“श्यामरंगी रंगे जशी ही सृष्टी आतुरतेने..

तन मन मम जणू तीच आर्तता.. बहर तू होऊन ये … “

… असं जर आयुष्याच्या संध्येला विनवता आलं तर ही संध्याकाळही वेगळ्या आणि सौम्य असूनही फार सुखद अशा रंगांमध्ये नक्कीच आनंदी आणि बहारदार होऊ शकते यात शंकाच नाही … आणि अशावेळी मदतीला येतात ते … अनेक वर्षं मनात नाईलाजाने दडपून ठेवावे लागलेले आपले छंद.. नंतर बघू म्हणून मनाच्या कोपऱ्यात ढकलून ठेवलेल्या कितीतरी आवडीनिवडी.. आयुष्यभर कुठल्याही परिस्थितीत आपल्याला साथ देत आलेल्या आपल्या जोडीदाराची आणि आपणही नाईलाजाने नजरेआड केलेली कितीतरी स्वप्ने पूर्ण करण्याची मनात जपलेली आस – – – आयुष्याची संध्याकाळ मजेत आणि मनाजोगती साजरी करण्यासाठी अनेक वर्षं जतन करून ठेवलेले हे खजिने उघडले की दुपारी अभावितपणे अनुभवलेला आयुष्यातला व्यावहारिक कोरडेपणा.. रखरखीतपणा.. नकळत विस्मरणात जायला लागतो. आत्तापर्यंत इतरांबद्दल मनात सांभाळून ठेवलेली कटुता.. तेढ.. द्वेष.. वैर.. अशी मनात साठवलेली अडगळ अजिबातच गरजेची नाही हे मनापासून जाणवलं तर मग अशी अडगळ नकळत मनातून बाहेर टाकली जाते आणि मन लहान मुलांसारखं स्वच्छ आणि हलकं व्हायला लागतं. मित्रांबरोबर कट्ट्यावर मारल्या जाणाऱ्या एरवी फुटकळ वाटणाऱ्या गप्पाही मन ताजंतवानं ठेवायला पुरतात…एखादी लहानशी ट्रीपही मन टवटवीत करून टाकते. स्वतःचं आवडतं गाणं बेसूर म्हणतांनाही मनाला स्वच्छंदपणाचा आगळा आनंद देऊन जातं.. कारण आता फक्त स्वतःसाठी जगायचं आहे ही भावना मनात ठसवता येणं जमवता येतं.. आणि ही संधी आयुष्याच्या संध्येच्या उंबरठ्यावर मनापासून उभं राहिलं तरच मिळते … अनेक वर्षं कळतनकळत किंवा जाणीवपूर्वकही जपलेली ताठर मानसिकता बदलण्याची ही सुवर्णसंधी या उंबरठ्यावर पोहोचल्यावरच मिळते…हो.. पण कुणी सल्ले मागितले तरच द्यावेत ही शहाणी समज मात्र इथे यायला हवी. महत्वाचं म्हणजे कुटुंबासोबत रहातांना आवश्यक ती उदासीनता किंवा अलिप्तता अंगी बाळगता यायलाच हवी.

– – या संदर्भात माऊलींनी भावार्थ दीपिकेत ज्ञानी माणसाचे सुंदर समर्पक वर्णन केले आहे की –

असा माणूस “ गोरुवें बैसली । रुखातळीं । “ असं समजून वागतो.. याचा एक अर्थ असा की संसार हा झाडाखाली बसलेल्या गुरांप्रमाणे क्षणिक वाटसरूसारखा असतो.. झाड त्यांना सावली देते.. खाद्य देते.. पण स्वतः मात्र निरपेक्षपणाने अलिप्त रहाते.. सूज्ञ माणसाने हेच लक्षात घ्यावे आणि संसाराबद्दल.. विशेषतः आपल्या मुलाबाळांबद्दल त्या झाडासारखे अलिप्त रहाण्यास शिकावे.

– – या उंबऱ्याआडून डोकावणाऱ्या आणि चिंतेत पाडणाऱ्याही काही गोष्टी नक्कीच असतात.. जसे की नियमित उत्पन्न बंद होणे किंवा बरेच कमी होणे … इतकी वर्षं शांतपणे सहकार्य करणारे शरीर वेगवेगळ्या प्रकारे कुरकुर करायला लागणे इ… पण या गोष्टी आधीपासून गृहीत धरून, त्यासाठी विचारपूर्वक आणि डोळसपणे योग्य ती तजवीज करण्याचा धोरणीपणा आधीच्या उंबरठ्यापासूनच दाखवण्याची दूरदृष्टी असणाऱ्यांना हे त्रास खूपच सुसह्य करणे अशक्य अजिबात नाही.

… या टप्प्यावर आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे स्वतःची वृत्ती आणि विचार जाणीवपूर्वक सकारात्मक ठेवणे.. सकारात्मकता हे फक्त आजारांवरचेच नाही तर इतर अनेक समस्यांवरचे एक अतिशय प्रभावी औषध आहे, ज्यामुळे भरकटणारे दु:खद आणि त्रासदायक विचार मनात टिकूच शकत नाहीत … आणि मग संध्याकाळचे जरा फिकुटलेले पण शांत.. सौम्य रंग मनापासून आवडायला लागतात.

– मग हे सगळे सखेसोबती आपणहून सोबत घेऊन संध्येच्या उंबरठ्यावर उभं असतांना समोर दिसेल तो फक्त एक आगळा ताजा आनंद.. अंतर्बाह्य शांतता … आणि आयुष्य सार्थकी लागल्याचे अनमोल समाधान…

 

© मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – विविधा ☆ धर्माच्या वाटेवरून अध्यात्माच्या क्षितिजाकडे ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ धर्माच्या वाटेवरून अध्यात्माच्या क्षितिजाकडे ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

‘मी कसे जगावे?’ या प्रश्नापासून ‘मी कोण आहे?’ या अंतर्मुख प्रवासापर्यंत…

मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याच्याकडे नाव नसते, धर्माची जाणीव नसते, विचारांची निश्चित चौकट नसते. तो केवळ एक शक्यता असतो—जगण्याची, जाणण्याची, अनुभवण्याची आणि शोधण्याची.

हळूहळू त्याला शिकविले जाते—हे करावे, हे करू नये; हे पवित्र, ते अपवित्र; हे कर्तव्य, ते अकर्तव्य. तो ईश्वराचे स्मरण करायला शिकतो, प्रार्थना करतो, संस्कार स्वीकारतो, परंपरा शिकतो आणि जपतो.

परंतु या सर्वांच्या पलीकडे एक प्रश्न कधीतरी त्याच्या अंतर्मनाच्या द्वाराशी येऊन उभा राहतो—

“मी नेमका कोण आहे? ”

आणि त्याच क्षणी आणखी एक प्रश्न मनाला अंतर्मुख करतो—

“धार्मिक असणे म्हणजेच अध्यात्मिक असणे का? ”

धर्म ही बाह्य आचरणाची वाट आहे आणि अध्यात्म ही अंतःकरणात उजळत जाणारी यात्रा आहे का?

की या दोन्ही वाटा शेवटी एकाच सत्याकडे घेऊन जातात?

या प्रश्नांपासूनच धर्म आणि अध्यात्म यांच्यातील सूक्ष्म नाते समजून घेण्याचा प्रयत्न सुरू होतो.

दृश्य विश्वाच्या पलीकडे अदृश्याचा शोध

आपण ज्या विश्वात वावरतो ते दृश्य आहे. त्याला आकार आहे, रंग आहे, स्पर्श आहे, गंध आहे. भारतीय तत्त्वज्ञानाच्या विविध परंपरांमध्ये या दृश्य विश्वाचे विवेचन पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या संदर्भात केले जाते. त्याचबरोबर सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचाही विचार केला जातो. या घटकांच्या परस्परसंबंधातून प्रकृतीचे असंख्य आविष्कार प्रकट होतात.

आपले शरीरही याच प्रकृतीचा एक भाग आहे. जन्म, वृद्धी, परिवर्तन, क्षय आणि मृत्यू या सर्व प्रक्रियांना ते बांधील आहे.

परंतु प्रश्न इथेच संपत नाही.

या शरीराला जाणणारे ‘मी’ कोण?

नेत्र पाहतात; परंतु पाहणारा कोण?

कर्ण श्रवण करतात; परंतु ऐकणारा कोण?

मन विचार करते; परंतु त्या विचारांची जाणीव कोणाला होते?

याच शोधयात्रेतून अध्यात्माच्या प्रदेशाचा आरंभ होतो.

परमात्मा, ब्रह्म, ईश्वर किंवा चैतन्य—या संकल्पनांना विविध तत्त्वज्ञानपरंपरांनी निरनिराळी नावे आणि अर्थ दिले आहेत. मात्र त्यामागील मूलभूत जिज्ञासा एकच आहे—

दृश्याच्या पलीकडे अदृश्य काय आहे? आणि बाह्य विश्वाच्या पलीकडे माझ्या अस्तित्वाचे अंतिम स्वरूप काय आहे?

अध्यात्म म्हणजे या प्रश्नांना तयार उत्तरांनी झाकून टाकणे नव्हे; तर त्या प्रश्नांसमोर निःसंकोचपणे उभे राहणे.

अध्यात्म : स्वतःकडे वळलेली दृष्टी

‘अध्यात्म’ हा शब्द व्यापक अर्थाने आत्मतत्त्वाशी संबंधित चिंतन, आत्मशोध आणि अंतर्मुख साधना यांच्याशी जोडला जातो.

परंतु अध्यात्म म्हणजे केवळ नेत्र मिटून ध्यानस्थ होणे नव्हे.

अध्यात्म म्हणजे स्वतःच्या विचारांकडे पाहणे.

स्वतःच्या अहंकाराची जाणीव करून घेणे.

स्वतःच्या भयाचा मागोवा घेणे.

स्वतःच्या लोभाला प्रश्न विचारणे.

स्वतःच्या क्रोधाचे मूळ शोधणे.

आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे—स्वतःविषयीच्या आपल्या समजुतींचीच चिकित्सा करणे.

आपण ईश्वराचे स्मरण किती वेळा करतो यापेक्षा, त्या स्मरणामुळे आपल्यात किती नम्रता निर्माण झाली, हा प्रश्न अध्यात्म विचारते.

आपण किती ग्रंथ वाचले यापेक्षा, त्या वाचनामुळे आपल्या आचरणात काय परिवर्तन झाले, हा प्रश्न अध्यात्म विचारते.

कारण ज्ञान मस्तिष्कात साठविणे आणि ज्ञान जीवनात उतरविणे यात मोठा भेद आहे.

अध्यात्म म्हणजे काही क्षणांचा विधी नसून, संपूर्ण जीवनाकडे पाहण्याची एक अंतर्मुख दृष्टी आहे.

धर्म : केवळ उपासना नव्हे, तर जगण्याचे दायित्व

‘धर्म’ म्हटले की आपल्या मनात ईश्वर, देवालय, पूजा, उपासना, उत्सव, परंपरा, व्रते आणि धार्मिक विधी यांची चित्रे उभी राहतात. परंतु भारतीय विचारपरंपरेत ‘धर्म’ या संकल्पनेचा अर्थ यापेक्षा कितीतरी व्यापक आहे.

धर्म म्हणजे कर्तव्य, नैतिकता, सदाचार आणि जीवनाला व समाजाला धारण करणारी मूल्यव्यवस्था.

“धारयति इति धर्मः” — जे धारण करते, टिकवते, सांभाळते, त्याला धर्म असे म्हणण्याची व्याख्या याच व्यापक अर्थाकडे निर्देश करते.

अग्नीचा धर्म उष्णता देणे; जलाचा धर्म प्रवाहित होणे—अशा उदाहरणांत ‘धर्म’ म्हणजे एखाद्या वस्तूचा स्वभाव किंवा गुणधर्म असाही अर्थ अभिप्रेत असतो.

मग मनुष्याचा धर्म काय? 

सत्य, करुणा, न्याय, संयम, कर्तव्यबुद्धी, प्रामाणिकता आणि अन्य जीवांच्या अस्तित्वाचा आदर—हे मनुष्यत्व टिकविणारे गुण असतील, तर त्यांना आपल्या जीवनात स्थान देणे हीच धर्माची खरी कसोटी ठरते.

म्हणूनच धर्म केवळ देवतेसमोर हात जोडण्यात नसतो.

देवालयातून बाहेर पडल्यानंतर आपण मनुष्यांशी कसे वागतो, यातही धर्म असतो.

धर्म विचारतो— ‘मी कसे जगावे?’

धर्म मनुष्याला जीवनासाठी एक चौकट प्रदान करतो.

काय योग्य?

काय अयोग्य?

माझे कर्तव्य काय?

माझे दायित्व काय?

समाजाशी माझे नाते कसे असावे?

या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न धर्म करतो.

भगवद्गीतेच्या संदर्भात कर्तव्य आणि स्वधर्माचा विचार मध्यवर्ती आहे. आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे, त्यामागील आसक्ती आणि स्वार्थ कमी करणे आणि कर्म अधिक व्यापक भावनेने करणे—हा विचार निष्काम कर्माच्या दिशेने घेऊन जातो.

म्हणजेच  धर्म आपल्याला जगण्याची दिशा देतो. 

परंतु दिशा प्राप्त झाली म्हणून प्रवास पूर्ण होत नाही.

इथेच अध्यात्म पुढे येते.

अध्यात्म विचारते— ‘मी कोण आहे?’

धर्म म्हणतो—कर्तव्य कर.

अध्यात्म विचारते—कर्तेपणाची जाणीव कुणाला आहे?

धर्म म्हणतो—सत्य बोल.

अध्यात्म विचारते—सत्यापासून मी स्वतः का दूर जातो?

धर्म म्हणतो—अहंकार सोड.

अध्यात्म विचारते—हा ‘मी’ नेमका कोण आहे, ज्याला मी अहंकार म्हणतो?

धर्म बाह्य आचरणाला शिस्त देतो; अध्यात्म अंतर्मनाला दर्पण दाखवते.

धर्म समाजाशी असलेले आपले नाते सुसंवादी करण्याचा प्रयत्न करतो; अध्यात्म स्वतःशी असलेले आपले नाते समजून घेण्याचा प्रयत्न करते.

म्हणूनच—

«धर्म कर्तव्य शिकवतो; अध्यात्म कर्त्याचा शोध घेते. »

मग धार्मिक व्यक्ती म्हणजे अध्यात्मिक व्यक्ती का? 

हा प्रश्न टाळून धर्म आणि अध्यात्म यांचे नाते पूर्णपणे समजून घेता येणार नाही.

धार्मिक व्यक्ती अध्यात्मिक असते आणि अध्यात्मिक व्यक्ती धार्मिक असते, असे सरसकट म्हणता येईल का? 

उत्तर आहे—नेहमीच नाही.

एखादी व्यक्ती नियमित पूजा करू शकते, धार्मिक विधी पाळू शकते, तीर्थयात्रा करू शकते, धार्मिक ग्रंथांचे वाचन करू शकते; परंतु त्याच वेळी तिच्यात अहंकार, असहिष्णुता, द्वेष, असत्य किंवा स्वार्थ कायम राहू शकतो.

मग तिच्या धार्मिक आचरणाचा अंतर्मनावर किती परिणाम झाला आहे?

हा प्रश्न विचारावाच लागतो.

त्याउलट एखादी व्यक्ती एखाद्या विशिष्ट धार्मिक परंपरेचे बाह्य आचरण करीत नसली, तरी ती सत्याचा शोध घेत असेल, स्वतःचे परीक्षण करीत असेल, करुणेने वागत असेल, लोभ आणि अहंकारावर संयम ठेवत असेल आणि जीवनाच्या अंतिम अर्थाचा शोध घेत असेल, तर तिच्यात अध्यात्मिक प्रवृत्ती असू शकते.

म्हणून—

धार्मिक असणे ही अध्यात्मिक असण्याची हमी नाही; आणि अध्यात्मिक असणे ही विशिष्ट धर्माचे अनुयायी असण्याची अट नाही. 

मात्र याचा अर्थ धर्म आणि अध्यात्म परस्परविरोधी आहेत, असा अजिबात नाही.

उलट, त्यांच्या श्रेष्ठ स्वरूपात ते एकमेकांना समृद्ध करतात.

धर्म अध्यात्मासाठी भूमी तयार करू शकतो आणि अध्यात्म धर्माला अंतःकरण देऊ शकते. 

विधी आणि अनुभूती यांच्यातील अंतर

भू – आरेखन (नकाशा) म्हणजे प्रवास नव्हे.

दिशा म्हणजे गंतव्य नव्हे.

शब्द म्हणजे अनुभूती नव्हे.

आणि धार्मिक विधी म्हणजे अध्यात्मिक अनुभूती नव्हे.

घंटानाद, मंत्रोच्चार, पूजा, ग्रंथवाचन—या सर्वांचे स्वतःचे महत्त्व असू शकते. ते मनाला एकाग्र करतात, परंपरेशी जोडतात, सांस्कृतिक स्मृती जिवंत ठेवतात.

परंतु पूजा संपल्यानंतरही मनातील क्रोध तसाच राहिला, प्रार्थना संपल्यानंतरही अहंकार तसाच राहिला, देवालयातून बाहेर पडल्यानंतरही मनुष्याबद्दलचा द्वेष तसाच राहिला—तर त्या साधनेचा अंतर्मुख परिणाम किती झाला, हा प्रश्न उरतोच.

धार्मिकतेचे बाह्य प्रदर्शन वाढले, म्हणून धर्माची अंतर्गत खोली वाढतेच असे नाही. प्रचंड ध्वनी, दिखाऊपणा, स्पर्धा, अनावश्यक व्यय आणि गर्दी—हे धर्माचे पर्याय होऊ शकत नाहीत.

ईश्वराच्या नामस्मरणाचा ध्वनी मोठा असण्यापेक्षा अंतःकरणातील कोलाहल शांत होणे अधिक महत्त्वाचे नाही का?

देवालयासाठी मोठी देणगी देणे पुण्यकारक असू शकते; परंतु आपल्या घरातील वृद्धाशी दोन प्रेमळ शब्द बोलणे, गरजू व्यक्तीला साहाय्य करणे, अन्यायाच्या वेळी सत्याच्या बाजूने उभे राहणे—हीसुद्धा धर्माचीच रूपे आहेत.

कारण धर्माची खरी परीक्षा पूजा सुरू असताना होत नाही.

पूजा संपल्यानंतर सुरू होते.

धर्म विभागतो की धर्माच्या नावाचा अहंकार विभागतो? 

धर्माच्या नावाने इतिहासात संघर्ष झाले, भेद निर्माण झाले, मनुष्यसमूह विविध ओळखींमध्ये विभागले गेले—हे वास्तव नाकारता येत नाही. विद्यमान स्थितीही तशीच आहे.

परंतु त्याचा दोष धर्माच्या मूलभूत मूल्यांमध्ये आहे की धर्माच्या नावावर उभ्या केलेल्या अहंकारी ओळखींमध्ये?

धर्म जेव्हा करुणा, सत्य, संयम आणि कर्तव्य शिकवतो, तेव्हा तो मनुष्याला उन्नत करतो.

परंतु धर्म जेव्हा ‘माझेच सत्य अंतिम’ या अहंकारात परिवर्तित होतो, तेव्हा तो भिंत उभी करू शकतो.

अध्यात्माची खरी शक्ती इथेच जाणवते.

कारण आत्मशोध जितका सखोल होत जातो, तितका ‘मी’चा अहंकार विरघळण्याची शक्यता वाढते.

आणि ‘मी’च्या भिंती क्षीण झाल्या की ‘आपण’ची जाणीव विस्तारू शकते.
म्हणून अध्यात्म कोणत्याही धर्माचा विरोध करण्यासाठी नाही; तर धर्माला त्याच्या मानवी आणि नैतिक मुळाशी परत नेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. 

धर्माचा पाया, अध्यात्माची उंची

धर्म आणि अध्यात्म यांच्यात श्रेष्ठ-कनिष्ठ असा संबंध प्रस्थापित करण्याची आवश्यकता नाही.

धर्माविना अध्यात्म कधी कधी दिशाहीन होऊ शकते.

अध्यात्माविना धर्म कधी कधी केवळ बाह्य कर्मकांडात अडकू शकतो.

धर्म म्हणतो—कर्तव्य विसरू नकोस.

अध्यात्म म्हणते—कर्तव्य करताना स्वतःला विसरू नकोस.

धर्म जीवनाला शिस्त देतो.

अध्यात्म जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्न करते.

धर्म मनुष्याला सदाचार शिकवतो.

अध्यात्म त्या सदाचाराच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करते.

म्हणून धर्म आणि अध्यात्म यांच्यात संघर्षापेक्षा संवाद अधिक आवश्यक आहे. 

एक बाहेरून आत जाणारी वाट आहे; दुसरी आतून बाहेर येणारी प्रकाशरेषा.

आणि अखेर…

मनुष्याने आयुष्यभर धर्म पाळला, परंतु मनुष्यत्व गमावले—तर त्याने काय प्राप्त केले?

त्याने असंख्य वेळा प्रार्थना केली, परंतु स्वतःच्या मनातील द्वेष ओळखला नाही—तर त्या प्रार्थनेने त्याच्यात किती परिवर्तन घडविले?

त्याने अध्यात्मावर शतावधी ग्रंथ वाचले, परंतु एखाद्या दुःखी मनुष्याच्या डोळ्यांतील अश्रू समजून घेतले नाहीत—तर त्या ज्ञानाचे प्रयोजन काय?

कदाचित धर्म आणि अध्यात्म यांचा अंतिम अर्थ याच ठिकाणी एकत्र येतो—

माणूस अधिक माणूस होणे.

मन अधिक निर्मळ होणे.

विचार अधिक व्यापक होणे.

कर्तव्य अधिक प्रामाणिक होणे.

अहंकार अधिक क्षीण होणे.

आणि आपल्या अस्तित्वाकडे पाहताना—‘मी’च्या पलीकडे ‘आपण’ची जाणीव जागृत होणे.

धर्माची खरी ओळख देवालयांच्या उंच कळसांत नसून, मनुष्याच्या आचरणात दिसते.

अध्यात्माची खरी ओळख ध्यानाच्या शांत कक्षात नसून, त्या शांततेतून बाहेर पडलेल्या मनुष्याच्या कृतीत दिसते.

शेवटी प्रश्न असा नाही की—

“मी किती धार्मिक आहे?”

किंवा,

“मी किती अध्यात्मिक आहे? ”

खरा प्रश्न कदाचित याहून अधिक साधा आणि अधिक कठीण आहे

“माझ्या धर्मामुळे माझ्यातील मनुष्यत्व वाढले का? ”

“माझ्या अध्यात्मामुळे माझ्यातील ‘मी’ थोडा कमी झाला का? ”

जर या दोन प्रश्नांची उत्तरे आपल्या अंतःकरणातून शांतपणे ‘हो’ म्हणून उमटली, तर कदाचित आपण धर्माच्या वाटेवरून अध्यात्माच्या क्षितिजाकडे निघालो आहोत.

आणि कदाचित ही यात्रा कुठल्यातरी देवालयात, तीर्थक्षेत्री किंवा ग्रंथाच्या पानावर संपणार नाही.

ती संपेल—त्या दिवशी, जेव्हा आपण स्वतःमध्ये डोकावून पाहू आणि जाणवेल की ज्याचा शोध आपण आयुष्यभर बाहेर घेत होतो, त्या शोधाचा आरंभ तर आपल्या स्वतःच्या अंतःकरणापासूनच झाला होता!!

©️ लेखक: दिवाकर बुरसे, पुणे
संपर्कः ९५५२ ६ २९ २ ४ ५
कृष्णाष्टमी ४ सप्टेंबर २०२६
☆

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महावस्त्राचे पदर – भाग ९ : काका (कुटुंबाचा भक्कम आधारस्तंभ) ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ महावस्त्राचे पदर – भाग ९ : काका (कुटुंबाचा भक्कम आधारस्तंभ) ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

(‘या लेखमालेचे आतापर्यंत आठ भाग झाले आहेत. त्यात पहिली सुरुवात अर्थातच विश्वातील सर्वात महत्त्वाचे नाते म्हणजे आईपासून झाली. नंतर क्रमाक्रमाने बाबा, आजी, आजोबा, मामा, मावशी आणि आत्या या नात्यांचा विस्तार आपण पाहिला. हे सगळे नात्यांचे एकेक रेशमी पदर आहेत. ते उलगडण्याचा आणि त्यांची झळाळी दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. असाच एक समृद्ध पदर म्हणजे काका. त्यांच्याबद्दलच आज जाणून घेऊ या.)

‘काका’ म्हटलं की वडिलांसारखीच माया करणारी एक प्रेमळ व्यक्ती डोळ्यांसमोर येते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात अनेक माणसे असत. त्यात वडील, काका आदी मायेची माणसे एकत्र असत. एकत्र शेती करणे, व्यवसाय करणे, आई-वडिलांकडे लक्ष देणे या गोष्टी ते आपुलकीने करीत असत. कधी आवश्यकतेनुसार एखादा भाऊ नोकरीनिमित्त शहरात गेला, तर दुसरा भाऊ शेती किंवा व्यवसाय सांभाळत असे; पण त्यांच्या प्रेमात कधी अंतर पडत नव्हतं. अशा वेळी काकांचं हे नातं रक्ताच्या पलीकडे जाऊन प्रेम, कर्तव्य आणि माणुसकी यांचं सुंदर प्रतीक बनतं. अशी नाती कुटुंबाला समृद्ध बनवतात.

आमची गावाकडे थोडीशी शेती होती. माझे वडील त्यांची शहरातील नोकरी सोडून शेती करण्यासाठी गावाकडे आले आणि तेथेच स्थायिक झाले. माझे दोन्ही काका नोकरीनिमित्त शहरात होते. एक काका मोठे आणि दुसरे लहान; माझे वडील मधले. काका कधी कधी सुट्टी मिळाली की गावी येत असत. काका आले की आम्हाला कोण आनंद व्हायचा! मग काकांबरोबर दोन-चार दिवस मजा असायची. कधी सुट्टीत काकांकडे राहायलाही जायचो.

काकांच्या प्रेमाचे अनेक प्रसंग आजही आठवतात. त्यांनी शहरात राहूनही खेड्यात राहणाऱ्या आणि शेतीत राबणाऱ्या माझ्या वडिलांना वेळोवेळी मदत केली. कारण शेती थोडी असल्याने फार पैसा पदरात पडत नव्हता. कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ! पीक चांगले आले तर बाजारात भाव पडलेले असायचे. अशा वेळी काका पैसे पाठवून मदतीचा हात देत. एकदा तर माझे वडील खूप आजारी झाले होते. आमचं गाव म्हणजे एक छोटं खेडं असल्याने वैद्यकीय उपचारांची सोय नव्हती. तेव्हा काका गावी येऊन वडिलांना आपल्या सोबत घेऊन गेले. त्यांना चांगल्या दवाखान्यात दाखल केले, त्यांची शुश्रूषा केली. असे अनेक प्रसंग आहेत. त्यामुळे काका म्हणजे मदतीचा हात, काका म्हणजे प्रेम या गोष्टी मनात पक्क्या झाल्या. पण काकांनी प्रेम लावले तसेच संस्कारही केले, शिस्तही लावली. त्यांच्याजवळून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणून नात्यांच्या महावस्त्रातील अतिशय महत्त्वाचा असा हा पदर आहे. माझ्या वडिलांनी देखील त्यांच्या पुतण्यांवर जीवापाड प्रेम केलं. त्यांच्या आजारपणात त्यांच्या जवळ राहून सुश्रुषा केली.

मला दोन भाऊ, दोघेही माझ्यापेक्षा लहान. त्यामुळे माझ्या मुलांना लहानपणापासून त्यांचे प्रेम लाभले. त्यामुळे काका म्हणजे त्यांची अतिशय जिव्हाळ्याची व्यक्ती. घरात कुठलेही कार्य असो, काका सगळ्या प्रसंगात खंबीरपणे उभे राहायचे. एखादी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली की मी निश्चिंत असायचो. सायकल शिकवणारे, पहिल्यांदा पोहायला घेऊन जाणारे, जत्रेत फिरवणारे किंवा छोटीशी चूकही समजावून सांगणारे काका माझ्या मुलांच्या बालपणाच्या आठवणींचं केंद्र आहेत. माझी मुलगी जेव्हा जीवावरच्या आजारातून उठली, तेव्हा या दोन्ही भावांच्या डोळ्यातील पाणी मी पाहिले आहे. तिच्या लग्नात माझ्यासारखेच पाणी या दोघांच्या डोळ्यांत तिला सासरी पाठवताना होते. अशा वेळी नात्याची खोली, उबदारपणा आणि महत्त्व जाणवते.

अनेक भारतीय कुटुंबांत काकाला वडिलांप्रमाणेच आदराचे स्थान दिले जाते. काका हे केवळ नातं नसतं, तर ती कुटुंबाची एक भक्कम ढाल असते. दुर्दैवाने ऐनवेळी कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणजे मुलांचे वडील जग सोडून गेले, तर विस्कटलेल्या घराला सावरणारे आणि वडिलांची जागा घेऊन पुतण्या-पुतणीचा स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळ करणारे अनेक काका आपण समाजात पाहिले आहेत. मुलांचे शिक्षण, त्यांचे संस्कार आणि त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत स्वतःचे सुख बाजूला ठेवून कर्तव्य निभावणारे काका हे ‘ पितृतुल्य ‘ असण्याचे खरेखुरे प्रमाण असतात.

आपल्या संस्कृतीत ‘काका’ हे संबोधन रक्ताच्या नात्यापलीकडेही आदराने दिलं गेलं आहे. समाजासाठी आणि राष्ट्रासाठी झटणाऱ्या थोर व्यक्तींना समाजाने प्रेमाने ‘काका’ किंवा ‘काकासाहेब’ म्हणून गौरवले आहे. वारकरी संप्रदायातील थोर संत गोरोबा कुंभार यांना आपण आदराने ‘गोरोबा काका’ म्हणतो, तर संपूर्ण जीवन समाजासाठी अर्पण करून स्वदेशीचा पुरस्कार करणारे गणेश वासुदेव जोशी ‘सार्वजनिक काका’ म्हणून ओळखले जातात. थोर गांधीवादी विचारवंत व लेखक काका कालेलकर, स्वातंत्र्यलढ्यातील नेते व साहित्यिक काकासाहेब गाडगीळ, टिळकांचे विश्वासू सहकारी व झुंजार पत्रकार काकासाहेब खाडिलकर, तसेच बालकांवरील प्रेमापोटी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे ‘चाचा (काका) नेहरू’ म्हणूनच जनमानसात अमर झाले. अगदी आमच्या चाळीसगावमध्येही वैद्यकीय सेवेसोबतच शैक्षणिक कार्य करणारे, अगदी वाघ, सिंहासारख्या वन्य प्राण्यांवर जिवापाड प्रेम करत पुण्याच्या पेशवे पार्कला स्वतः पाळलेली ‘सोनाली सिंहीण’ देणारे डॉ. वा. ग. पूर्णपात्रे यांनाही सर्वजण आदराने ‘काका’ म्हणूनच ओळखत असत.

इतिहासात राघोबादादांसारखी क्वचितच काही व्यक्तिमत्त्वे दिसतात ज्यांनी काकाच्या प्रेमळ नात्याला कलंक लावला आहे; पण सांस्कृतिक परंपरेत काका हे प्रेम, संरक्षण आणि कर्तव्याचं प्रतीकच आहे. आपल्या संस्कृतीत काका म्हणजे नेहमीच कुटुंबाचा आधारवड आणि समाजाचा मार्गदर्शक राहिला आहे. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एकत्र राहणं कमी झालं असलं, तरीही काका या नात्याबद्दलची आत्मीयता, जिव्हाळा आणि आदर तितकाच जिवंत आहे. नात्यांच्या या भरजरी महावस्त्रातील ‘काका’ नावाचा पदर कुटुंबाला सुरक्षिततेची ऊब, एकतेची ताकद आणि प्रेमाचा आधार देतो. हा पदर जेवढा जपला जाईल, तितकीच आपली नाती अधिक घट्ट, समृद्ध आणि सुंदर होत जातील.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लहानपण, बालपण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ लहानपण, बालपण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

कशाचीच फिकीर नसते.

मजा असते सगळी, खेळण्यात,

मित्रांसोबत शिवारभर हुंदडण्यात,

निसर्गाच्या सानिध्यात.

छानछान खायला मिळतं. कोडकौतुक अमाप होतं, म्हणूनच लहानपण सगळ्यांनाच कायमच हवंहवंसं वाटत. पण त्याची मजा लुटता येण्यासाठी तुमच्या जवळ निसर्गाची आवड, मित्रपरिवार, घरच्यांचं पाठबळ, आणि तुमच्या तना मनातलं अमाप चैतन्य असावं लागतं. हे फार उशिरा म्हणजे बालपण निघून गेल्यावर कळतं. तेव्हा मन खट्टू होत. अपराधीपणाची भावना निर्माण होते मनात. एक छानशी संधी हकनाक हुकल्याची. तेव्हा कुठलाच पर्याय हातात नसतो… जुन्या आठवणीं आठवण्या शिवाय.

पण ज्यांनी आपलं बालपण घरच्यांचे पाठ शेकणारे धपाटे खाऊन ही मनसोक्त उपभोगलय, अनुभवलय ते भाग्यशाली ठरलेत.

कारण त्यांच्या जवळ आहे आठवणींचा जादुई पेटारा. तो उघडून ते कुठेही केव्हाही आपला स्वतःचा आनंदी कोश निर्माण करून तल्लीनतेने तेथे समधीस्त होऊन, गेल्या दिवसांच्या चित्रफितींचे अवलोकन करत असतात. अशा अनेकानेक चित्र फिती ज्यांच्या पोतडीत ठासून भरून ठेवल्या आहेत त्यांना एकांतवासाने कधीच छळले नाही. तर आनंदाचा पुनः प्रत्यय घेण्याची संधी वारंवार उपलब्ध करून दिली आहे. म्हणूनच आठवणीच्या इलाख्यातले हे मुसाफिर कायम हसतमुख राहून इतरांना ही हसमुख बनवण्यात तरबेज असतात.

प्रत्येकाला आपलं लहानपण आठवत असेल. त्यातला आपला मोलाचा वाटा त्यांच्यासाठी त्यांनी आपल्या काळजावर कोरून ठेवला असेल. त्यांच्यावर साठलेली वयाची धूळ जराशी झटकली की कुबेराला ही देता येणार नाही असा अविनाशी खजीना त्याच्या पुढ्यात अवतरतो.

मग त्यातला प्रत्येक दस्तऐवज त्याच्या गतकाळातील वैभवाला त्याच्या समोर प्रस्तुत करतो आणि आनंदी बनवून स्वप्नसश्रृष्टीची सफर घडवून आणतो. हे गतवैभव प्रत्यक्षात उपभोगता येणं दुरापास्त असलं तरी त्याला आठवून पंख लावून भुतकाळाची अविस्मरणीय सफर नक्कीच करता येते. म्हणूनच बालपणाला, लहानपणाला आपापल्या पासून कधीच दूर लोटून देवू नका. त्याच सतत चिंतन मनन तुम्हाला एक नवी ऊर्जा बहाल करून नवचैतन्य बहाल करील यात काही शंका नाही.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्रीकृष्णावरील भारुड ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ श्रीकृष्णावरील भारुड ☆ शालिनी जोशी ☆

संत एकनाथांचे श्रीकृष्णावरील भारुड-पाखरू–

कृष्णा एक पाखरू आहे, ते मुखाविण चारा खाय रे l

डोळे नाही तरी ते पाहे, वाचेविण स्वये खाये रे l

सख्या त्यास नाव कान्होबा, कृष्ण म्हणती सर्व रे l

त्याचे वास्तव्य कोठे आहे, पर नाही परी ते उडे रे l

तिहेलोकी हिंडते, त्रिभुन त्याला थोडे रे l

त्याचे नखात आकाश बुडे, तो संमुख चहुंकडे रे l

हो त्याला मायबाप दोन्ही नाही रे l

एकवीण पाहती जनार्दनाचे पायी रे l

हे रूपक एक कोडे आहे. पेंद्याने श्रीकृष्णाला टाकलेला कुट प्रश्न आहे. याचे उत्तर श्रीकृष्णरूपी सगुण निर्गुण परमात्मा आहे. देवभक्त यातील हा विनोदी संवाद. श्रीकृष्णाच्या स्वरूपाचा यथार्थ भाव ‘पाखरू’ मधून व्यक्त होतो.

पेंद्या श्रीकृष्णाला एक कूट प्रश्न टाकतो. कृष्णा एक पाखरू आहे. ते तोंड नसताना चारा खाते. डोळे नसताना पाहते. वाचा नसताना खाते. श्रीकृष्ण समजून उमजून विचारतात, त्या पाखराचे नाव तरी काय?

पेंद्या म्हणतो त्याचे नाव कान्होबा. पण सर्व त्याला कृष्ण म्हणतात. पंख नसताना ते पाखरू उडते. त्रिभुवनही त्याला कमी पडते. आकाशही त्याच्यापुढे थोकडे. ते सर्वत्र असलेले. पण मायबाप नसलेले.

देहरूपाने अवतार कार्यात लीला करणारा श्रीकृष्ण, तसा नसून सर्वगत अद्वैत परमात्मा आहे. येथे पाखराच्या रूपकातून एकनाथ सांगतात, तो चैतन्य रूप त्रिभुवनाला व्यापून आहे.

त्याला रूपच नसल्याने मुख नाही .पण विश्वातील जीवांच्या मुखाने अन्न खातो म्हणून तो विश्वातोमुख आहे. मूळ ब्रह्म स्वरूपाला डोळे नसले तरी चैतन्यामुळे जगाचे डोळे त्याचेच. इतकेच नव्हे तर विश्वाच्या नेत्रांची दृष्टी तो आहे. डोळ्यांचा डोळा आहे. म्हणून तो विश्वातश्चक्षु आहे. चैतन्य रूपाने सर्वत्र आहे. स्थावर जंगमात भरून आहे. सर्वगत आहे. म्हणजेच पंख नसून सर्वत्र उडतो. त्याच्या आधारावर तीनंही लोकांची रचना असून त्याच्या पलीकडेही तोच इतका व्यापून आहे, जणू काही त्याच्या नखात आकाश गडप व्हावे. तिकडे पहावे तिकडे त्याचेच अस्तित्व. रिती जागा नाही. स्वयंभू असल्याने उत्पन्न करणारा कोणी नाही. म्हणून आई-बाप नाही. उलट त्याच्या आधारावरती विश्वाची निर्मिती. म्हणून तोच जगाचा आईबाप. असे हे परमेश्वराच्या निर्गुण रूपाचे वर्णन पाखराच्या रूपकाने एकनाथांनी सुरेख केले आहे. कूट प्रश्न आहे तोही प्रत्यक्ष श्रीकृष्ण- सगुण रूपाला विचारलेला. यातून सगुण कृष्णाचे खरे रूप एकनाथांनी दाखवून दिले. रूपाशी नम्र झाले.

🙏  श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अवखळ श्रावण… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ अवखळ श्रावण… ☆ संगीता कुलकर्णी ☆

आषाढाच्या धूसर पाऊलखुणा मागे टाकत श्रावण जेव्हा अंगणात येतो तेव्हा निसर्गाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता खुलते..आकाशाच्या निळ्या ओठांवर काळ्या मेघांची हळवी कुजबुज सुरू होते आणि क्षितिजावर पावसाच्या रेशमी पडद्याआड हिरवाईचे स्वप्न आकार घेते. श्रावण म्हणजे केवळ निसर्गाने परिधान केलेला हिरवा शालू आहे.. मातीच्या कपाळावर उमटलेले पावसाचे कुंकू आहे आणि मनाच्या कोपऱ्यात अलगद जागवणारी आठवणींची सनई आहे म्हणूनच श्रावण आला की मन नकळत म्हणते

‘हा ऋतू आहे की आनंदाची एखादी अवखळ लहर? ’

श्रावणाच्या आगमनाची चाहूल लागताच वातावरणात जादू भरते. काळेकुट्ट ढग आकाशात जमू लागतात. क्षणभर सूर्य त्यांच्यामागे लपतो आणि पुढच्याच क्षणी पावसाच्या टपोऱ्या थेंबांची रिमझिम सुरू होते.. ते थेंब जणू आभाळाने पृथ्वीच्या कुशीत पाठवलेली मोत्यांची पत्रेच असतात… कोरड्या मातीवर पहिला पाऊस पडतो आणि मातीचा सुगंध चारही दिशांना दरवळतो.. त्या सुगंधात बालपण दडलेले असते, शेतकऱ्याचे स्वप्न असते आणि जगण्याची नवी उमेदही असते.

श्रावणाचा पाऊस कधी शांत, कधी खट्याळ तर कधी धुवांधार असतो.. कधी तो खिडकीच्या काचेवर बोटांनी टपटप वाजवत गुपित सांगतो तर कधी छपरावर ढोल वाजवत बेभान नाचतो… कधी रिमझिम सरींच्या रूपाने तो आकाशातून उतरतो तर कधी मुसळधार धारांनी पृथ्वीला चिंब भिजवून टाकतो.. त्याच्या या लहरी स्वभावामुळेच तो खरा ‘”अवखळ श्रावण’” वाटतो. एखाद्या लहान मुलासारखा तो क्षणात हसतो, क्षणात रडतो आणि पुन्हा क्षणात खळखळून हसवतो.

शेतांच्या बांधावर तर श्रावणाने हिरव्या रंगाची उधळणच केलेली असते… कालपर्यंत उन्हाने करपलेली जमीन आज हिरव्या गालिच्याने नटलेली दिसते… भाताची कोवळी रोपे वाऱ्याच्या तालावर डोलू लागतात.. ज्वारी-बाजरीची पिके पावसाशी कुजबुजतात.. रानफुलांचे रंगीत ठिपके हिरव्या चादरीवर विखुरलेल्या तारकांसारखे भासतात.. झाडांच्या फांद्यांवर नव्या पालवीचे दागिने चमकतात नी वेली झाडांना बिलगून जणू प्रेमाची मिठीच मारतात.. निसर्गाचा हा साज पाहताना डोळे तृप्त होतात आणि मनाला एक अनामिक शांतता लाभते..

श्रावण म्हणजे पक्ष्यांचाही उत्सव.. पावसाच्या सरींमध्ये भिजत कोकिळेचा मधुर स्वर दूरवर ऐकू येतो.. चिमण्या घरट्याच्या उंबरठ्यावर बसून पावसाकडे कुतूहलाने पाहतात. मोर तर श्रावणाचा जणू राजदूतच..! काळ्या ढगांचे दर्शन होताच तो पिसारा फुलवतो आणि निळ्या-हिरव्या रंगांची इंद्रधनुषी आरास करीत नाचू लागतो.. त्याच्या नृत्यात आनंदाचा उन्माद असतो. त्याला पाहून वाटते की जणू काही पृथ्वीनेच आकाशाच्या प्रेमात पडून नृत्य सुरू केले आहे.

श्रावणाच्या दिवसांना धार्मिक आणि सांस्कृतिक रंगही लाभलेला असतो.. मंदिरांच्या घंटानादाने वातावरण मंगलमय होते… सोमवारी शिवमंदिरांत भक्तांची गर्दी होते. हिरव्या बांगड्यांची खणखण, हातांवरील मेंदीचा सुगंध आणि झुल्यांवरील हास्य यामुळे गावोगावचे वातावरण उत्साहाने भरून जाते. नागपंचमी, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन अशा सणांनी श्रावण अधिकच रंगतदार होतो.. प्रत्येक सणामागे निसर्गाशी आणि मानवी जीवनाशी जोडलेले प्रेमाचे, कृतज्ञतेचे आणि नात्यांचे धागे असतात.

मंगळागौरीच्या रात्री तर गावातील अंगणे जागी होतात. पारंपरिक खेळ, फुगड्या, गाणी आणि हास्य यांच्या लयीने रात्र बहरते. कुठे झोका उंच जातो, कुठे बांगड्यांचा नाद घुमतो तर कुठे आजीच्या जुन्या श्रावणी आठवणी नव्या पिढीच्या कानात अलगद उतरतात.. त्या क्षणी काळ जणू थांबतो आणि भूतकाळ व वर्तमान एकाच झुल्यावर झुलू लागतात..

शहरातला श्रावणही तितकाच मोहक असतो फक्त त्याचे रूप वेगळे असते.. रस्त्यांवर छत्र्यांची रंगीबेरंगी गर्दी दिसते.. पावसाने धुतलेल्या इमारती नव्याने उजळून निघतात.. गरमागरम चहाचा कप हातात घेऊन खिडकीतून कोसळणाऱ्या सरींकडे पाहण्यात एक विलक्षण आनंद असतो. कांदा भजी, वाफाळता चहा आणि बाहेर बरसणारा पाऊस

या त्रिवेणी संगमाला कोण नकार देईल?

मात्र श्रावणाचा खरा अर्थ केवळ रोमँटिक पावसात नाही.. या ऋतूमागे शेतकऱ्याच्या आशेची धडधडही आहे. पाऊस वेळेवर पडला तर शेत हिरवेगार होते पाऊस दगा देतो, तर त्या हिरवाईवर काळजीची सावली पडते. त्यामुळे श्रावणातील प्रत्येक थेंब हा शेतकऱ्यासाठी अमृताचा थेंब असतो. त्याच्या डोळ्यांतल्या आशेचे प्रतिबिंब हिरव्या शिवारात दिसते.

श्रावण हा बाहेरच्या निसर्गाला जितका भिजवतो तितकाच तो मनालाही चिंब करून जातो…

श्रावण संपताना मनाला एक हुरहूर लागते. झाडांच्या पानांवरून ओघळणारे थेंब जणू निरोपाचे अश्रू वाटतात.. आकाश स्वच्छ होते, ढग दूर निघून जातात पण श्रावणाने मनात पेरलेली हिरवाई तशीच राहते.. पावसाचा सुगंध, मोराचा नाच, झुल्याची उंच भरारी, सणांची लगबग आणि ओल्या मातीचा गंध

या साऱ्या आठवणी मनाच्या कप्प्यात कायमच्या साठून राहतात…

असा हा अवखळ श्रावण..! कधी सरींच्या रूपाने हसणारा, कधी ढगांच्या रूपाने रुसणारा, कधी मोराच्या पिसाऱ्यात नाचणारा तर कधी मातीच्या सुगंधातून मनाला स्पर्शणारा. तो निसर्गाचा उत्सव आहे… भावनांचा झरा आहे आणि नवजीवनाची चाहूल आहे म्हणूनच श्रावण आला की मनाच्या आकाशातही काळे ढग दाटतात पण त्या ढगांतून बरसतो तो पाऊस नव्हे तर आनंद, आठवणी आणि जगण्याची नवी हिरवी उमेद.!

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मौन… ☆ दीपा नारायण पुजारी ☆

दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ मौन…  ☆ दीपा नारायण पुजारी ☆

मौन म्हणजे चूप राहणं, निशब्द असणं. मौन पाळणं, म्हणजे न बोलणं.

मौन पाळणं जर साधलं तर आपल्या जिभेवर आपला संयम राहतो. मौनात एक विलक्षण सामर्थ्य आहे. न बोलता खूप काही साधता येतं.

मौन राहून एखादं काम करताना एकाग्रता वाढते. वाढलेली एकाग्रता कामातली उत्कटता वाढवते. काम अधिक चांगले होतं.

कधी कधी बोलून सांगून न जमणाऱ्या गोष्टी मौन साधून साधता येतात. मौन साधणारा अंतर्मुख होतो. त्यामुळे तो आत्मपरीक्षण करू शकतो. वरवर सोपी, साधारण वाटणारी क्रिया; आत्मिक उन्नतीचा साधा मार्ग आहे. जसे पैसे वापरले की संपतात. वापर केल्याने वीज संपते, पाणी संपते आणि त्यातील ऊर्जा संपत्ती नष्ट होते. त्याचप्रमाणे आपण बोलून आपली ऊर्जा, आपली शक्ती नष्ट करतो. विजेचा संचय केल्यास ऊर्जा साठून राहते. अगदी त्याचप्रमाणं, मनाचं मौन पाळल्यास आपल्या अंतरीक ऊर्जेचा ऱ्हास थांबतो. आपली शक्ती वाढते.

योग्य वेळी शांत राहणं महत्त्वाचे असतं. मौनामुळं भांडणं, वादविवाद टाळता येतात. शांतता टिकून राहते.

तसं पाहिलं तर, वाणी ही मानवाला मिळालेली देणगी आहे. डोळे, नाक, कान, त्वचा आणि याबरोबरच जीभ हे देखील महत्त्वाचं ज्ञानेन्द्रिय आहे. जिभेचा उपयोग आपण बोलण्यासाठी आणि चव घेण्यासाठी करतो. दोन्हींचा अतिरेक घातकच ठरतो. मौनव्रत म्हणजे मानसिक तपच आहे. परंतु वाणीला विराम देणं इतकं सोपं नाही. सर्वांनाच ते जमत नाही. आपल्यामध्ये काहीजण असे असतात की, त्यांच्या तोंडात तीळही भिजत नाही. न बोलता राहणं अशक्यप्राय असतं बऱ्याच जणांच्यासाठी! त्यांची जीभ सतत चालू असते. विषय कोणताही असो, त्यातील काही माहिती नसली, तरी ते बोलत असतात. बोलण्यासाठी काही असो वा नसो पण त्यांच्या बडबडीत खंड पडत नाही.

समंजस लोक कमी बोलतात.त्यांना त्याचे काही फायदेही मिळतात. काही गोष्टी साध्य होतात.

मौन पाळणं म्हणजे तोंडानं न बोलणं एवढाच मर्यादित अर्थ नाही हं. खाणाखुणा करणं, लिहून दाखवणं, चेहऱ्यावर विविध भाव प्रगट करणं, मान हलवणं यातलं काहीही न करता राहणं म्हणजे खरं मौन. मौनकाळात व्यावहारिक गोष्टींचा विचार करायचा नसतो. कोणते; अगदी कोणतेच विचार मनात आणायचे नसतात. चित्ताची एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न मात्र करत राहायचं असतं. म्हणून चिंतन करण्याची कला मौनव्रतामुळे शिकून घेता येते. त्यामुळे विकारांवर ताबा मिळवता येतो. काम, क्रोध, मोह, लोभ, मद आणि मत्सर असे विकार मनात उत्पन्न होत असतात. मनातील विचारांनी या षड्रिपुंना खतपाणी घातलं जातं. विचारांमुळे शरीराची ऊर्जा खर्ची पडते. अस्वस्थता वाढते. केवळ वाणीनेच नाही तर, मनातल्या मनात बोलणेही बंद करता आलं पाहिजे. मग या षड्रिपुंना जिंकता येईल. म्हणून नेहमी नेहमी नाही तरी, प्रसंग परत्वे मौन पाळायला काय हरकत आहे? कारण मुद्देसूद प्रसन्नता देणारं, आनंद देणारं बोलणं ही एक संवाद कला आहे. शब्द चुकले की गोंधळ होतो.

शब्दामुळे दंगल, शब्दांमुळे मंगल|

शब्दाचे हे जंगल, जागृत रहावं||

जिभेवरी ताबा, सर्व सुखदाता |

पाणी, वाणी, नाणी नासू नये ||

तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या या ओळी किती सार्थ आहेत! जिभेवर ताबा मिळवला पाहिजे हे खरंच आहे.

कधी कधी मौनातही संवाद असतो. म्हणून मौन हे एक असं साधन आहे, जे न बोलता ही सांगण्याचं काम करतं. अर्धा ओरडा करून जे सांगता येत नाही ते मौनात सांगता येतं. मौन म्हणजे स्वतःच्या गोंधळलेल्या भावनांचं संयोजनही असू शकतं. मौन ही एक सकारात्मक, विधानात्मक शैली आहे. शक्तिशाली शैली आहे. कारण, मौन पाळणाऱ्यांच्या आजूबाजूचे लोकही ही व्यक्ती का बोलत नाही, याचा विचार करता करता अंतर्मुख होतात आणि न बोलता प्रश्न सुटतात. म्हणूनच मौन म्हणजे विरोध नाही तर मौन एक परीक्षण आहे.

© दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1