श्री दिवाकर बुरसे
🌸 विविधा 🌸
☆अभिजात मराठीचा नवा प्रवास : प्रमाणीकरण आणि सुलभीकरण आवश्यक! ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. हा प्रत्येक मराठी माणसासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. मात्र, आता केवळ अभिजाततेचा गौरव करून चालणार नाही. मराठी भाषा अधिक सोपी, समृद्ध आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारी बनवणे, ही आपली जबाबदारी आहे.
आज मराठी बोलणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे मराठी बोलताना मोठ्या प्रमाणावर इंग्रजी, हिंदी आणि अन्य भाषांतील शब्द वापरले जातात. इतर भाषांतील शब्दांचा आवश्यक वापर चुकीचा नाही. भाषेचा विकास होताना असे बदल स्वाभाविक असतात. मात्र, मराठीत सहज उपलब्ध असलेले शब्द सोडून विनाकारण परभाषेतील शब्द वापरणे योग्य नाही.
दुसरी चिंतेची गोष्ट म्हणजे इंग्रजी भाषेविषयी वाढणारा अहंगंड आणि मराठीविषयी वाटणारा न्यूनगंड. मराठी बोलणे किंवा लिहिणे कमीपणाचे वाटता कामा नये. उलट, मराठीतूनही उत्तम शिक्षण, व्यवहार, संशोधन आणि ज्ञाननिर्मिती होऊ शकते, असा विश्वास निर्माण झाला पाहिजे.
वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवरील मराठीचे स्वरूप पाहिले, तर शब्दांचे चुकीचे उच्चार, चुकीची वाक्यरचना आणि अनावश्यक परभाषिक शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणावर दिसतो. याचे एक कारण म्हणजे नव्या संकल्पनांसाठी सोपे आणि योग्य मराठी शब्द तयार करण्याचे काम पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यामुळे शब्दनिर्मिती आणि शब्दसंपत्ती वाढवण्यावर भर देणे आवश्यक आहे.
बोलीभाषांचा सन्मान आणि प्रमाणभाषेची गरज
मराठी ही विविध बोलीभाषांनी समृद्ध झालेली भाषा आहे. कोकणी, मालवणी, अहिराणी, वऱ्हाडी, खानदेशी, मराठवाडी अशा अनेक बोलींमधून मराठीचे सौंदर्य आणि वैविध्य वाढले आहे. प्रत्येक बोलीचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कोणतीही बोली श्रेष्ठ किंवा कनिष्ठ मानण्याचे कारण नाही.
मात्र, सर्व महाराष्ट्रात शिक्षण, प्रशासन, साहित्य आणि लिखित व्यवहारासाठी एक सामायिक भाषा असणेही आवश्यक आहे. तिला आपण प्रमाणभाषा म्हणतो.
प्रमाणभाषा म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशाची किंवा समाजघटकाची भाषा नव्हे. ती सर्व मराठी भाषिकांना समजेल, अशा स्वरूपाची असली पाहिजे. तिचे नियम सर्वमान्य आणि सर्वसमावेशक असावेत.
लोकभाषांचा सन्मान करणे आणि प्रमाणभाषेचा आग्रह धरणे या परस्परविरोधी गोष्टी नाहीत. उलट, बोलीभाषांतील चांगले शब्द प्रमाणभाषेत स्वीकारले, तर मराठी अधिक समृद्ध होईल.
प्रमाणभाषा हवी; पण ती सोपीही हवी!
प्रमाणभाषा म्हटले की ती अवघड, संस्कृतप्रचुर आणि सर्वसामान्यांना न समजणारी असावी, असा समज होऊ नये. भाषा जितकी सोपी, सुटसुटीत आणि सहज समजणारी असेल, तितका तिचा वापर वाढेल.
मराठीच्या विविध बोलींमध्ये अनेक सुंदर, अर्थपूर्ण आणि सहज समजणारे शब्द आहेत. त्यांचा अभ्यास करून योग्य शब्द प्रमाणभाषेत आणले पाहिजेत.
विशेषतः शेती, पशुपालन, ग्रामीण जीवन, पारंपरिक साधने, शेतीची अवजारे, बैलगाडी, पाणीव्यवस्था आणि धान्य साठवण यांच्याशी संबंधित असंख्य शब्द आज विस्मृतीत जात आहेत. हे शब्द म्हणजे आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. त्यांचे संकलन, शब्दकोश तयार करणे आणि नोंदी जतन करणे आवश्यक आहे.
नव्या संकल्पनांसाठी केवळ संस्कृतमधून शब्द घेण्याऐवजी बोलीभाषांतील शब्दांचाही शोध घ्यावा. त्यासाठी शासन, विद्यापीठे, भाषातज्ज्ञ आणि साहित्यसंस्थांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे.
तसेच, जगातील विविध भाषांतील साहित्याचे मराठीत अनुवाद झाले पाहिजेत. त्यामुळे नवे विचार, ज्ञान आणि संकल्पना मराठीत येतील. मराठीचे शब्दभांडारही वाढेल.
भाषेत नेमकेपणा आणि सुलभता हवी
भाषा सोपी असावी; पण तिचा अर्थ नेमका असला पाहिजे. उदाहरणार्थ, ‘खूण’ आणि ‘खून’, ‘चिता’ आणि ‘चिंता’, ‘दिन’ आणि ‘दीन’ या शब्दांचे उच्चार किंवा लेखन यांत थोडा फरक असला, तरी अर्थ पूर्णपणे वेगळे आहेत.
अशा शब्दांचा चुकीचा वापर झाल्यास अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. म्हणूनच योग्य शब्दलेखन, उच्चार आणि व्याकरण यांना महत्त्व आहे.
विशेषतः कायदे, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सरकारी व्यवहार यांची भाषा सोपी असण्याबरोबरच अचूकही असली पाहिजे. कायद्याची भाषा इतकी गुंतागुंतीची नसावी की सामान्य माणसाला त्याचा अर्थ समजण्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागेल. ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवायचे असेल, तर त्याची भाषाही सर्वांना समजणारी हवी.
शाळेतूनच व्यवहारोपयोगी मराठी शिकवावी
शाळांमध्ये मराठी व्याकरण आणि साहित्य शिकवले जाते; मात्र दैनंदिन व्यवहारात मराठीचा उपयोग कसा करावा, याचे प्रशिक्षण कमी पडते.
विद्यार्थ्यांना मराठीतून पत्र लिहिणे, अर्ज करणे, संदेश पाठवणे, सूचना तयार करणे, अहवाल लिहिणे आणि आपले विचार स्पष्टपणे मांडणे शिकवले पाहिजे.
केवळ व्याकरणाचे नियम पाठ करून भाषा अवगत होत नाही. बोलणे, वाचणे, लिहिणे आणि ऐकणे यांचा नियमित सराव आवश्यक आहे. शालेय जीवनापासूनच मराठीतून व्यवहार करण्याची सवय लागली, तर पुढील आयुष्यातही मराठीचा वापर सहज वाढेल.
भाषेचे नियम काळानुसार बदलायला हवेत
भाषा ही सतत विकसित होणारी गोष्ट आहे. काळानुसार तिचे शब्द, उच्चार आणि अभिव्यक्ती बदलत असतात. त्यामुळे मराठीच्या प्रमाणभाषेचे नियमही वेळोवेळी तपासले पाहिजेत.
आज लोक सहजपणे वापरत असलेले, अर्थपूर्ण आणि तर्कसंगत शब्दप्रयोग प्रमाणभाषेत स्वीकारण्याचा विचार व्हायला हवा. नियम हे भाषेच्या विकासासाठी असतात; भाषेच्या विकासात अडथळा आणण्यासाठी नाहीत.
अभिजाततेचा मान आणि आपले कर्तव्य
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. आता तिच्या विकासासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे.
ठीच्या विविध बोलींचे शब्दकोश तयार करणे, लुप्त होत चाललेले पारंपरिक शब्द जतन करणे, नव्या संकल्पनांसाठी सोपे मराठी शब्द निर्माण करणे, अनुवादाला प्रोत्साहन देणे, कायदे आणि तांत्रिक विषयांची भाषा सुलभ करणे आणि शालेय शिक्षणात व्यवहारोपयोगी मराठीला महत्त्व देणे, अशी अनेक कामे आपल्याला करता येतील.
वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी, दूरदर्शन आणि समाजमाध्यमांनीही मराठीचा योग्य वापर करण्याबाबत अधिक जागरूक राहिले पाहिजे. साहित्य संमेलने आणि भाषा विषयक चर्चांमध्येही केवळ मराठीचा गौरव न करता तिच्या विकासासाठी ठोस उपाय सुचवले पाहिजेत.
मराठीचा अभिमान केवळ घोषणांमधून व्यक्त होऊन चालणार नाही. ती आपल्या बोलण्यात, लेखनात, शिक्षणात आणि दैनंदिन व्यवहारात दिसली पाहिजे.
मराठी भाषा सोपी झाली पाहिजे, समृद्ध झाली पाहिजे आणि अधिकाधिक लोकांनी ती आत्मीयतेने बोलली व लिहिली पाहिजे.
अभिजाततेचा मुकुट मिळाला आहे; आता या भाषेला लोकांच्या मनात आणि व्यवहारात मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम आपले आहे.
आपल्या माय मराठीच्या पुढील उत्कर्षासाठी आपण स्वतः काय योगदान देणार आहोत?
विशेष आभार : श्री. सुनील देशपांडे आणि डॉ. व्यंकटेश कोलपुके
©️ दिवाकर बुरसे
पुणे संपर्कः ९५५२ ६ २९ २ ४ ५
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






