भारतीयांची पवित्र नदी गंगा. अलकनंदा आणि मंदाकिनी गंगेच्या उपनद्या आहेत. दोन्हींच्या संगमानंतर गंगा म्हणून पुढे वाहते. अलकनंदा आणि मंदाकिनी या बहिणी बहिणी. पृथ्वीवरच्या उत्तरांचलच्या देवभूमीतून वाहणाऱ्या. आता यांच्या नावाना आपल्या आकाशगंगेत स्थान मिळाले आहे. ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सध्या आपण जी आकाशगंगा पाहतो तिला ‘मंदाकिनी’ म्हणतात. आता शास्त्रज्ञांनी नवीन आकाशगंगेचा शोध लावला. तिला ‘अलकनंदा’ नाव दिले आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे हा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावला. आकाशगंगेच्या रचनेवर संशोधन करणारी पीएचडीची विद्यार्थ्यांनी राशी जैन हिने तिचे वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्राध्यापक योगेश वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले. दोन डिसेंबर २५ ला हे प्रसारित झाले.
२७००आकाशगंगा म्हणजेच दीर्घिकांचा अभ्यास करून ही पूर्ण विकसित दीर्घिका शोधली. वैशिष्ट्य म्हणजे विश्वाचे वय फक्त दीड अब्ज कोटी वर्षे असताना ही पूर्ण विकसित झाली होती. ती आपल्यापासून १२. २ अब्ज प्रकाश वर्षे अंतरावर आहे. सर्पिलाकार भुजा आहेत. खरंतर दीर्घिका पूर्ण विकसित होण्यासाठी दीर्घ कालावधी लागत असताना विश्वाचे वय दहा टक्के असतानाच ही विकसित झाली. ही इतक्या कमी कालावधीत तयार कशी झाली, हेच आश्चर्य. त्यात तारे निर्माण झाले आहेत. ही एक प्रभावी वैश्विक केंद्र आहे. तर यांचे वस्तुमान आपल्या सूर्यमालेच्या दहा अब्ज पट आहे. मध्यभाग फुगीर असून व्यास ३०००प्रकाश वर्षे आहे.
आता याचा अभ्यास हे शास्त्रज्ञाना आव्हान आहे. याची रचना मंदाकिनी सारखीच असल्यामुळे शास्त्रज्ञांनी अलकनंदा नाव दिले. विश्वाच्या बाल्यावस्थेतील हा एक अज्ञात पैलू जगासमोर आला. वैशिष्ट्यपूर्ण अशी ही सर्वात दूरवरची आकाशगंगा, राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र, टाटा मूलभूत केंद्र, पुणे येथे हे संशोधन चालू आहे.
भारतीय शास्त्रज्ञांनी खगोल शास्त्रातील या महत्त्वाच्या शोधातून भारतीय बुद्धिमत्ता आणि कौशल्याचे दर्शन जगाला घडवले. प्राचीन काळातील खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट, वराहमिहीर यांची परंपरा पुढे चालू ठेवली.
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ७ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
साधकांना उपदेश
संत तुकाराम महाराजांनी सगुण भक्ती करता करता त्यांच्या समवेत असलेल्या साधकांना परमेश्वराच्या भक्तीसंबंधी आपल्या अभंगांतून अमोलिक उपदेश केला आहे.
तुकारामांच्या गाथेचा अभ्यास करताना या अभंगांचा विचार करणे आवश्यक आहे असे मला वाटते.
भक्तीचा सोपा उपाय ते साधकांना सांगतात.
शांती परते नाही सुख/ येर अवघेची दुःख//
म्हणवुनी शांती धरा / उतराल पैलतीरा//
खवळलीया काम क्रोधी/ अंगी भरती आधि व्याधी//
*तुका म्हणे त्रिविधताप/ मग जाती आपोआप//
शांतीचे महत्त्व सांगताना महाराज म्हणतात, “
या जगात चित्ताची शांती ही श्रेष्ठ सिद्धी आहे. सर्व सुख तेथेच आहे, बाकी सर्वत्र दुःख आहे. म्हणून नेहमी मन शांत ठेवावे. त्यामुळे संसार सागरापासून पैलतीरी जाणे सोपे होते. काम, क्रोध खवळले तर अनेक व्याधींचा उगम होतो. एकदा आपल्या देहात, मनात शांती स्थिर झाली की आध्यात्मिक, आधिभौतीक आणि आधि दैविक हे त्रिविध ताप आपोआप निघून जातात. “
भक्तीचा सोपा उपाय तुकाराम महाराज सामान्यांना सांगतात.
सोपे वर्म आम्हा/ सांगितले संती/
टाळ दिंडी हाती/ घेऊनी नाचा//
समाधी सुख सांडा/ ओवाळूनी//
अशा या कीर्तनी ब्रह्म रस/
तुका म्हणे मन पावोनी विश्रांती/
त्रिविध नासती ताप क्षणी//
हातात टाळ घेऊन आणि दिंडीमध्ये विठ्ठल नामाचा गजर करत तल्लीन होऊन नाचल्याने
तुमचे त्रिविध ताप क्षणार्धात नाहीसे होतील आणि समाधी लागल्याचे समाधान मिळेल.
पुढे जाऊन तुकाराम महाराज भक्तांना सांगतात की देखाव्याच्या तीन जाती/(देवाला पाहण्याचे तीन प्रकार आहेत.
जैसा भाव तैसे फळ
स्वाती तोय एक जळ*
तुमचा देवाप्रती जसा भाव असेल त्याप्रमाणे तो तुम्हाला दिसेल.
जसे, स्वाती नक्षत्रात पडणारे पाणी एकच असते, परंतु ते शिंपल्यात पडले तर त्याचा मोती होतो, कपाशीच्या पिकावर पडले, तर पिकाचा नाश होतो आणि जर ते सापाच्या मुखी पडले तर त्याचे विष होते. म्हणून जसा भाव तसेच फळ मिळते.
तुका म्हणे हिरा/ पारखिया मुढा गारा//
जो रत्नपारखी आहे, त्यालाच हिरा कळतो, जो मूर्ख, अज्ञानी आहे त्याच्या नजरेत हिरा आणि गारा सारख्याच असतात.
साधकांना तुकाराम महाराज भक्तीचा सोपा उपाय सांगतात.
सर्वसाधनांचे सार/ भव सिंधू उतरी पार/
योगायोग तपे/ केली तयाने अमूपे/
तुका म्हणे जपा/ मंत्र त्रि अक्षरी सोपा//
या अभंगात विठ्ठल नामाच्या चिंतनाचे महत्त्व तुकाराम महाराज साधकांना सांगत आहेत. चिंतनाने सर्व काही प्राप्त होते. विठ्ठल चिंतन हे सर्व साधनांचे सार आहे. भवसागर तरुन जाण्यास त्याची मदत होते. असंख्य व्रतवैकल्ये, तप, यज्ञ याग केल्याचे पुण्य या एका चिंतनाने मिळते. म्हणून साधकहो, विठ्ठल हा तीन अक्षरी नामजप तुम्ही श्रद्धेने आणि भक्ती भावाने करा. भक्ती मार्ग कसा अत्यंत सोपा आहे हे साधकांना महाराज सांगतात.
न लगे देश काळ/ मंत्र विधान सकळ/
करुनी करुणा भाकावी//
भक्तीतली आर्तता पाहूनच देव स्वतःहून भक्ताजवळ येतो.
*येतो बैसलिया ठाया/ आसने व्यापी देवराया/
निर्मल ते काया / अधिष्ठान तयाचे//
कल्पनेचा साक्षी/ तरी आदरेची लक्षी/
आवडीने भक्षी/ कोरडे धान्य मटामटा//
भक्ताच्या ठिकाणी भगवंताबद्दल जो आदर असतो, तो देवाला कळतो आणि भक्ताने प्रेमाने दिलेले अन्न तो मटामटा खातो.
घेणे तरी भाव/ लक्ष्मी दासाचा उपाव/
तुका म्हणे जीव/ जीवी मेळवील अनंत//
परमेश्वर दासाचा भक्तीभाव जाणून त्याचे रक्षण करतो आणि शेवटी भक्ताला आपल्या स्वरूपाशी मिळवून घेतो.
वाटा घेई लवकरी/ मागे अंतरसी दूरी/
केली भरोवरी/ सार नेती आणिक//
ऐसी भांबावली किती/ काय जाणो नेणो/
किती समय नेणती/ माता भार वाहुनी//
नाही सरले तोवरी/ धाव घेई वेग करी/
घेतले पदरी/ पावले ते आपुले//
फटलंडी म्हणे तुका/ एक सहावे धक्का/
तरीच या सुखा / मग कैसा पावसी//
सामान्य प्रापंचिकाला महाराज या वरील अभंगातून काय सांगतात? ते म्हणतात की अरे परमार्थाचा वाटा लवकर घे, नाहीतर तुला तो मिळणार नाही. नंतर तू कितीही खटाटोप केलास, तरी दुसरेच लोक सार घेऊन जातील. संसाराच्या भ्रमात अडकलेली अशी किती माणसे आहेत, याची गणतीच नाही. निष्कारण प्रपंचाचा भार डोक्यावर घेऊन नरजन्माची सुसंधी वाया घालवतात, म्हणून आयुष्य असेपर्यंत हे साधका, तू संतांकडे धाव घे. संतांकडून मिळणारे ज्ञान साधनेने लवकर आत्मसात कर.
भगवंताला भक्त किती प्रिय आहे हे तुकाराम महाराज साधकांना पुराणातील कथांचा आधार घेऊन सांगतात.
मानी भक्तांचे उपकार/ ऋणिया म्हणवी निरंतर/
केला निर्गुणी आकार/ कीर्ती मुखे वर्णिता//
म्हणोनी जया जे वासना/ ते पुरवितो पंढरी राणा//
अंबऋषी कारणे/ जन्म घेतले नारायणे/
एवढे भक्तीचे लाहाणे/ दास्य करी दासाचे//
भावभक्तीचा अंकित/ नाम साजे दीनानाथ/
म्हणोनी राहिला निवांत/ तुका चरण धरुनी//
भक्तासाठी भगवंत सगुण रूप घेऊन त्याच्या मागे मागे सतत असतो. भक्ताला सर्वकाळ सर्व दिशा शुभच असतात. अखंड हरिनामाने तो शुचिर्भूत झालेला असतो. ज्या ठिकाणी नारायणाचे अखंड चिंतन चालू असते ते स्थळ
उत्तमच असते, मग तो एकांतवास असो, अथवा घर असो. नारायणाची कृपा हे महद्भाग्य आहे.
या ठिकाणी महाराज एक कथा सांगतात.
महाबळ नावाचा एक भट कृष्णाचे पारिपत्य करण्यासाठी गोकुळात आला होता. त्याला कंसाने पाठवले होते. आपण त्रिकालज्ञ ज्योतिषी आहोत असे भासवून त्याने नंद व यशोदेला मोहित केले होते. जेव्हा यशोदा व नंद यांनी त्याला कृष्णाचे भविष्य विचारले, तेव्हा त्याने मुद्दामच विपरीत भविष्य सांगण्यास सुरुवात केली. त्यावेळी कृष्णाच्या मायेने त्या ब्राह्मणाला बसावयास दिलेला पाटच उडला आणि त्या ब्राह्मणाच्या पाठीत बसला. त्याचा खोटेपणा कृष्णाला सहन झाला नाही. असत्याचे, पापाचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही हे भक्तांना सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी ही कथा त्यांच्या अभंगात वर्णन केली आहे.
भक्तीचे महात्म्य सांगताना वेळोवेळी त्यांनी अशा प्रकारच्या रूपकात्मक कथांचा उपयोग केला आहे. कधी त्यांची भाषा परखड, तर कधी अति रसाळ आणि मधाळ वाणी त्यांच्या अभंगातून आपल्याला दिसून येते.
वेळोवेळी येणाऱ्या अभंगातून आपण याचा परामर्श घेणारच आहोत.
(पूर्वसूत्र- मी तोवर कधी कल्पनाही न केलेल्या एका अनोख्या अशा घटनेच्या पाऊलखुणांचे धागेदोरे सुद्धा या प्रकाशन समारंभाशीच जोडले जाणार आहेत आणि याचा मुख्य दुवा शांतपणे वाचण्यासाठी ऑफिसमधून घरी येताना सोबत आणलेल्या त्या सर्क्युलर मधेच लपलेला आहे हे त्या क्षणी तरी मला जाणवलेलं नव्हतं एवढं खरं! )
नितिन देशपांडे यांच्याशी फोनवर बोलल्यानंतर पूर्णतः निश्चिंत झालेल्या मनाने मी घरी परत आलो. आईने दार उघडलं तेव्हा समोरचं दृश्य बघून माझ्या आनंदाला पारावरच राहिला नाही. आमचा संपूर्ण हॉल माझ्या ‘आपल्या’ माणसांनी गच्च भरून गेलेला होता! मी फोन करण्यासाठी बाहेर पडल्यापासून परत येईपर्यंतच्या फार फार तर दहा-पंधरा मिनिटात घरातलं चित्र पूर्णतः बदलूनच गेलं होतं! आरती/सलिल तर आले होतेच, तसेच माझे सासूसासरे, बहिण, मेहुणे, हे ही सगळे! सर्वांच्या उपस्थितीनेच एरवी फारसा वावर नसलेलं ते घर आनंद आणि उत्साहाने भरूनच गेलं एकदम!
प्रकाशन समारंभ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजता होता. अगदी लवकर म्हटलं तरी दुपारी तीन वाजेपर्यंत मी हॉलवर पोचलो तरी पुरेसं होतं. शं. ना. नवरेंना सकाळी स्टेशनवर उतरून घेऊन लॉजवर पोचवणे, त्यांचा चहा, नाष्टा, आणि दुपारचं जेवण होईपर्यंत अधूनमधून इतर बाहेरची कामं आवरण्यापुरतं थोडा वेळ बाहेर जाऊन एरवी नितिन शं. ना. ना पूर्ण वेळ कंपनी देऊन संध्याकाळी बरोबर पावणेचारला त्यांना घेऊन हाॅलवर येणार होता. फोन उपलब्ध नसल्याने या सर्व कामांमधे एखाद्या वेळी कांही अडचण/ अडथळे आलेच तर आमच्यात कम्युनिकेशन गॅप रहाण्याची शक्यता गृहीत धरून नितिनने आधीच ‘कांही अडचण आलीच तर ती मी परस्पर निभावून नेईन’ असं सांगून मला पूर्णतः निश्चिंत केलेलं होतं. त्यामुळे मी अतिशय मोकळेपणाने समोरच्या माझ्या माणसांमधे आनंदाने मिसळून गेलो!
रात्री अंथरुणाला पाठ टेकली आणि मला अचानक ऑफिसमधून घरी आणलेल्या त्या सर्क्युलरची आठवण झाली! तोवर सर्वांची निजानिज झालेली होती. उद्याच्या कार्यक्रमाचंही माझ्या मनावर कसलंच दडपण नव्हतं. त्यामुळे या निश्चिंततेच त्या सर्क्युलरच्या विचाराने हळूच डोकं वर काढत माझ्या मनाचा ताबा घ्यायला सुरूवात केली. सोमवारी ऑफिसला जाण्यापूर्वी हे सर्क्युलर लक्षपूर्वक वाचून त्यातले महत्त्वाचे मुद्दे डायरीत नोंद करून ठेवणं अत्यावश्यक होतं, पण ते करायचं कधी? उद्याचा पूर्ण दिवस घरातली सर्वांची लगबग, माझ्या मनातली प्रकाशन समारंभाची व्यवधानं आणि दिवसभराच्या दमणुकीनंतर कार्यक्रम संपवून मला घरी परत यायला उशीर झाला तर ते सर्क्युलर वाचणं शांतपणे होणार कधी आणि कसं? … या विचाराने तर मला झोपच लागेना. अखेर कंटाळून मी अंथरूण सोडलं. माझी ब्रिफकेस घेऊन किचनमधे गेलो. डायनिंग टेबल जवळचा लाईट आॅन करून ब्रिफकेसमधलं सर्क्युलर बाहेर काढलं. डायरी आणि पेन सोबत घेऊन ते सर्क्युलर वाचायला सुरुवात केली…! ती आठ-दहा पानं म्हणजे सर्व स्तरावरील बॅंक कर्मचाऱ्यांसाठी सुरू झालेली ‘स्वेच्छानिवृत्ती’ साठीची अतिशय आकर्षक अशी नवीन योजना होती! जे या योजनेच्या विविध नियम आणि अटीत बसत असतील ते या योजनेचा लाभ घेऊ शकणार होते! हे सर्क्युलर वाचल्यानंतर त्यातील मुख्य मुद्द्यांची नोंद मी डायरीत करून ठेवली तेव्हा कुठे मी रिलॅक्स झालो. आता काळजी करण्यासारखं काही नव्हतं. या योजनेबाबत विविध शंका विचारणारे असंख्य फोन्स सोमवारी ब्रॅंचेस् आणि रिजनल आॅफिसकडून दिवसभर येत रहाणार होते पण मला आता त्याचं दडपण वाटेना! तरीही यानंतरचा जवळजवळ महिनाभर ही स्टाफ-मॅटर असल्याने माझं अख्खं डिपार्टमेंट यासंबंधीच्या कामातच पूर्णतः व्यस्त रहाणार होतं पण ती नंतरची गोष्ट! या क्षणी तरी आता पूर्णतः माझ्या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाचा आनंद मला घेता येणार असल्याचं समाधान माझ्यासाठी पुरेसं होतं.
अंथरूणावर पाठ टेकताच हळूहळू झोप येऊ लागली तरी त्या अधांतरी अवस्थेत हे सर्क्युलर, त्यातले विविध मुद्दे, या योजनेव्दारा स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणाऱ्यांसाठी देऊ केलेले अतिरिक्त आर्थिक लाभ, स्वेच्छानिवृत्ती योजना स्वीकारण्यास पात्र असलेल्यांच्या साठी ती स्वीकारणं आणि न स्वीकारणं तो दोन्ही दृष्टीकोनातून आवश्यक असणारा तुलनात्मक अभ्यास अशाच सगळ्या गोष्टींचे
उलटसुलट विचार बॅक आॅफ द माईंड सुरू झाले असल्यासारखं पहाटे पहाटे मला एक स्वप्न पडलं. स्वप्नात मी या योजनांतर्गत स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्विकारल्यानंतर रिलीव्ह होतानाच्या माझ्या सेंडआॅफचं संपूर्ण दृश्य मला दिसलं आणि ते स्वप्न सुरू असतानाच आईनं मला हलवून जागं केलं. माझ्या आधीच सर्वजण उठले होते आणि किचनमधे पहिल्या चहाची गडबड सुरू झालेली होती! ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ म्हणतात, पण माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अद्याप पूर्ण व्हायच्या असताना मी स्वत:साठी ही योजना स्वीकारण्याचा विचार करणं शक्य तरी होतं कां? माझं मलाच हसू आलं आणि प्रसन्न मनानं मी अंथरूण सोडलं तसा त्या सर्क्युलरचा विचार आपोआपच पुसला गेला. त्या क्षणापासून मात्र मी अगदी मनापासून माझ्या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाचा विचार करायला मोकळा झालो!
मी, आरती आणि सलिल ठरल्याप्रमाणे दुपारी तीन वाजता हाॅलवर जाऊन पोचलो. घरची बाकी मंडळी त्या सर्वांचं आवरलं कीं पाठोपाठ येणार होतेच. माझ्या आजोळचे अनेक नातेवाईक पुण्यातच होते. माझ्या मावसभावाने त्या सर्वांकडे आमंत्रण पोचवायची जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारली होती आणि मनापासून पारही पाडली होती. ते सर्वच नातेवाईक अगदी त्यांच्यातले माझा फारसा सहवास नसलेले या पिढीतले ही बरेचजण आवर्जून आले होते. हे सर्वजण बऱ्यापैकी वेळेपूर्वी आल्याने सर्वांशी मला मोकळेपणाने बोलता आल्याचा आनंद कधीच विसरता न येणारं समाधान देणारा होता!
पावणे चारच्या आधीच पाच मिनिटं नितिन शन्नांना घेऊन आला. आत येताच खचाखच भरलेला हाॅल पाहून त्यांना झालेला आनंद त्यांनी त्यांच्या मिष्किल शैलीत व्यक्त करूनच आपल्या भाषणाची सुरूवात केली होती!
अर्थात त्यांच्या आधी प्रकाशक म्हणून राजलक्ष्मी बोलली. तिच्यानंतर मला लेखकाचं मनोगत व्यक्त करायचं होतं. राजलक्ष्मी अतिशय मुद्देसूद आणि समर्पक बोलली. मनोगत व्यक्त करताना आपण काय बोलायचं हे नेमकेपणाने मनाशी ठरवायला मला वेळच मिळाला नव्हता. एरवीही उत्स्फूर्तपणे माझ्या कथालेखन प्रवासा दरम्यान मला आलेल्या अनुभवांबद्दलच मी बोललो असतो, त्याच अनुषंगाने मी माझं मनोगत थोडक्यांत व्यक्त केलं आणि शेवटी माझ्या कथासंग्रहातल्या अर्पणपत्रिकेचा आवर्जून उल्लेख केला.
“माझा ‘जगावेगळी’ हा पहिला कथासंग्रह मी माझ्या बाबांच्या स्मृतींना आणि माझ्या आईला अर्पण केला होता आणि आजचा ‘स्पर्श प्रकाशाचा’ हा कथासंग्रह मी कृतज्ञतापूर्वक अर्पण करीत आहे… ” असं म्हणून मी अर्पणपत्रिका वाचून दाखवली…
‘ पुष्पाताई आणि आनंदास,
तुमच्या कोवळ्या वयापासून या लहान भावासाठी तुम्ही दोघांनी केलेल्या कष्टांना आणि त्यागाला हा ‘स्पर्श प्रकाशाचा’ कृतज्ञतापूर्वक अर्पण… ‘ हे वाचतानाही माझा आवाज भरून आला होता. वाचन संपलं आणि व्यासपीठावरून खाली उतरून पहिल्या रांगेत आईजवळच बसलेल्या माझ्या बहिण आणि भावाला मी कथासंग्रहातील प्रत स्वत: नेऊन दिली तेव्हा आम्हा सर्व कुटुंबियांच्या आजवरच्या प्रवासास साक्षी असलेल्या माझ्या आजोळच्या नातेवाईकांबरोबरच इतरही उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडातांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आईबरोबरच त्या दोघांच्याही डोळ्यांत कृतार्थतेचे अश्रू आणणारा ठरला होता!
शन्नांचं मिष्किल आणि सविस्तर भाषण हे तर त्या संपूर्ण समारंभाचं सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य ठरलं होतं!
उपस्थित सर्वांनीच कथासंग्रहाच्या प्रति विकत घेऊन त्यावर माझ्या सहीचा आग्रह धरणं ही त्यांनी मला कौतुकानं दिलेली शाबासकीच होती!!
उपहार आणि चहाकाॅफी सोबत सर्वांशी झालेल्या मनमोकळ्या गप्पांनी त्या समारंभाची सांगता झाली पण त्या आठवणी मात्र इतकी वर्षं उलटून गेल्यानंतर आजही तितक्याच ताज्या आहेत!
याला कारण ठरलंय ते या कार्यक्रमाचं नियोजन जसं तसंच या समारंभाच्या निमित्ताने माझ्या उर्वरीत आयुष्याला मिळालेलं अनोखं वळण सुध्दा! हे वळण म्हणजे त्या दिवशीच्या पहाटे मला पडलेल्या त्या स्वप्नाचं ‘त्या’च्या कृपेने अकल्पितपणे सत्यात परावर्तित होणंच होतं!!
☆ समर्थ रामदास, दासबोध आणि प्रपंच… ☆ सौ शालिनी जोशी ☆
☆
जगाच्या कल्याणाचा विचार करणारे समर्थ रामदास. बारा वर्षे बालपणीची गेल्यावर, ’ विश्वाचि चिंता वाहणारा’ हा मुलगा, नारायण सूर्याजीपंत ठोसर घर सोडून नाशिक जवळ टाकळीला आला. बारा वर्षे साधना व तपश्चर्या केली. विविध विषयांच्या ग्रंथांचा अभ्यास केल्यावर बारा वर्षे भारत भ्रमण केले. लाखो लोकांचे जीवन जवळून पाहिले. त्यावेळची लोकांची कर्तव्याविषयीची, धर्माविषयीची उदासीनता, परकीय राजांची स्विकारलेली लाचारी, स्त्रियांची होणारी विटंबना पाहून त्यांचे मन कळवळले. मृतप्राय झालेल्या समाजाला आपल्या वाणीने आणि लेखणीने जागृत करण्यात त्यानी आपले आयुष्य पणाला लावले. त्यासाठी विपुल ग्रंथरचना केली. त्यातील श्रेष्ठ ग्रंथ दासबोध.
वीस दशक २०० समास आणि ७७५१ ओव्या असा हा ग्रंथराज दासबोध. इ. स.
१६८१ (शके १६०३) मध्ये सिद्ध झाला. ही रचना समर्थांनी शिवथरघळीत सुंदर मठातील मुक्कामात केली. कल्याणस्वामीनी लिखाणाचे काम केले. याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही ग्रंथावरील टीका नसून स्वतंत्र ग्रंथ आहे. समर्थांच्या दिव्य प्रज्ञा प्रतिभेतून हा ग्रंथ उदयाला आला. स्वानुभव हाच ग्रंथाचा गाभा आहे. मूर्खलक्षणापासून राष्ट्रकारणापर्यंत ग्रंथाची व्याप्ती आहे. मंदबुद्धीपासून धुर्तांपर्यंत सर्वांसाठी हा ग्रंथ असल्याचे समर्थ आत्मविश्वासाने सांगतात. पहिल्याशिवाय दोष देऊ नये, असेही टीकाकाराना सुनावतात. समर्थांचा परखडपणा आणि आत्मविश्वास या ग्रंथात दिसून येतो. तो समाजाविषयीच्या कळवळ्यातून आहे. त्यामुळे वाचत असताना समर्थ आपल्या बरोबर आहेत अशी अनुभूती येते.
परमार्थ मार्गावरील पुरुषांच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे स्त्री व प्रपंच. असा बऱ्याच साधू, संतांचा अभिप्राय होता. त्यांच्या साहित्यात त्यानुसार स्त्रियांची अवहेलना पाहायला मिळते. पण समर्थानी प्रपंच व परमार्थ दोघांना समान पातळीवर आणलं. प्रपंचाला विरोध केला नाही, तर प्रपंच करून परमार्थाचा मार्ग दाखवला. प्रपंच सोडून परमार्थ केला तर केवळ आत्मोन्नती होते. पण प्रपंच करून परमार्थ केला तर राष्ट्रन्नती होते. म्हणून ते म्हणतात,
प्रपंची जो सावधान l तोचि परमार्थ करील जाण l
प्रपंची जो अप्रमाण l तो परमार्थी खोटा ll दा. १२/१/९
व्यक्तिहित व समाजहित यांची सांगड त्यांनी घातली. सद्गुणाच्या आधारे प्रपंच संपन्न केल्यावर, प्रापंचिकाने कुटुंबकेंद्रीत न राहता परोपकाराच्या माध्यमातून समाजाची नाते जोडावे. समाजाचा घटक म्हणून जगावे. यासाठीच ते म्हणतात,
आधीं प्रपंच करावा l नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका l
येथें आळस करूं नका l विवेकी हो ll दा. १२/१/१
एकसंध समाजातून एकसंध राष्ट्र निर्माण होत असते. हे वैचारिक क्रांतीचे काम त्यांनी आपल्या शिष्यामार्फत केले. त्यासाठी महंतांची फळी उभी केली. मठ, मंदिरे स्थापन केली. समाजाला बलवान करण्याचे प्रयत्न केले. प्रपंच सुखी करण्याचा विवेक सांगताना ते म्हणतात,
लेकुरें उदंड झाली l तो ते लक्ष्मी निघोन गेली l
बापडी भिकेस लागली l काही खाया मिळेना ll दा. ३/४/१
समर्थांचा ४०० वर्षांपूर्वीचा हा विचार कुटुंब नियोजनाचे द्रष्टेपण दाखवणारा आहे. समर्थ स्वतः परमार्थी असले तरी सामान्य लोकांना शक्य नाही ते तत्त्वज्ञान त्यांनी सांगितले नाही.
प्रपंच सांडून परमार्थ केला l तरी अन्न मिळेना खायला l
मग त्या करंट्याला l परमार्थ कैचा ll दा. १२/१/३
भुकेल्याला परमार्थाचा विचार मानवणारा नाही. तर
प्रपंची पाहिजे सुवर्ण l परमार्थी पंचीकर्ण l
असे त्यांनी स्पष्ट सांगितले. समर्थानी प्रपंचाला हीन न लेखता त्याचे महत्त्व विशद केले.
नाना वेश नाना आश्रम l सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम l
जेथे पावती विश्राम l त्रैलोकेवासी ll
कारण देव, ऋषी, मुनी, योगी, तपस्वी सर्वांचा मूळ आधार गृहस्थाश्रमाचा आहे. स्वधर्माचरण आणि भूतदया यांनी युक्त गृहस्थाश्रम उत्तमच. धनसंपादन आणि त्याचा उपयोग याला भगवंताचे स्मरण आणि नीतीचे पालन यांची बैठक हवी. याला ते सुकृताचा योग म्हणतात. यामुळे माणूस समर्थ आणि भाग्यवान होतो. अशाप्रकारे प्रपंच आणि परमार्थ यांचा सुवर्णमध्य साधणारा समाज समर्थांना अपेक्षित होता.
संसार त्याग न करिता l प्रपंच उपाधी न सांडिता l
जनामध्ये सार्थकता l विचारेचि होये ll दा. ६/९/२४
प्रपंच अथवा परमार्थ lजाणता तोचि समर्थ l
नेणता जाणिजे वेर्थ l नि: कारण ll दा. ९/४/१९
दासबोध हा व्यापक व शाश्वत समाजहिताचा विचार मराठी भाषेत सांगणारा अलौकिक ग्रंथ आहे. ऐहिक व पारलौकिक उद्धार हा उदार हेतू यामागे आहे. प्रापंचिकांना नेटका प्रपंच, भाविकांना देव प्राप्ती, ज्ञानियांना ज्ञानप्राप्ती आणि योग्याना वैराग्य देणारा हा ग्रंथराज. समर्थांच्या अंतर्यामीचे आर्त पानोपानी प्रगट आहे. प्रत्येक समास हा स्वतंत्र विषय असून सुबोधप्रद आहे. कोणतेही पान उघडावे आणि वाचावे समाधानी व्हावे असा हा वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ.
काही शब्दांची आदरयुक्त भिती असते, वकील हा त्यातलाच एक शब्द. आदरयुक्त भिती म्हणायचं कारण त्यांना लांबून पाहतो तेव्हा त्यांच्या बद्दल आदर असतो. पण जवळीक साधायची म्हटली की मनात भिती वाटते. हे फक्त वकील या शब्दाबद्दलच नाही. याच प्रमाणे काही आडनांवाच्या बाबतीत सुध्दा आदरयुक्त भिती असते. कारण अशी आडनांव असणारे वकील नसले तरी वकीलच वाटतात. आणि अशी आडनांव असणारेच वकील असतील तर… तर मग भित्यापाठी ब्रह्मराक्षस…
(अशी आडनांव, आडनावाचे वकील, व वकील असणारे कृपया हे विनोदाने घ्या. व मला माफ करा.)
यांच्याबद्दल आदर असायला त्यांच ज्ञान, हजरजबाबीपणा, आत्मविश्वास, त्यांच्या कामामुळे मिळणारा सन्मान यासारखी खूप कारणं आहेत. पण भिती असायला कोणतही कारण नाही. किंवा भिती असायला कोणतही कारण चालेल.
यांच्या ज्ञानाबद्दल बोलायचं तर त्यांना जे माहित असतं ते त्यांच्या चेहर्यावर कधीच दिसत नाही. किंंवा ते दाखवत नाहीत. आणि जे चेहर्यावर दिसतं ते त्यांना माहिती आहे का? … असा प्रश्न आपल्या चेहर्यावर असतो.
यांना भेटल्यावर पहिला प्रश्न असतो, की यांच्याशी काय बोलावं… आणि ते काही बोलतील असं वाटतं… तर हं… काय? … काय म्हंणण आहे? … हे खरं आहे का? … किंवा खरंच असच आहे का? … असेच प्रश्न तेच आपल्याला करतात. म्हणजे बोलायचं कसं हा आपल्याला पडलेला प्रश्न तेच प्रश्न विचारून सोडवतात. यांच्याशी बोलतांना बोलणं कमी, आणि पश्नोत्तराचा भाग जास्त वाटतो.
हे सहज रस्त्यात दिसले, व आपण यांच्याशी दोन शब्द बोलतांना चुकून कोणी पाहिलं तर ते पाहणारे आपल्याकडे अशा नजरेने पाहतात, की अशावेळी आपण काहिही अपराध केला नसेल तरी यांच्याशी बोलतांना आपण अपराधी आहोत असं उगाचच वाटतं.
यातले काही खाजगीत विचारतात सुध्दा… काही प्राॅब्लेम आहे का… नाही… रस्त्यात वकीलांशी बोलतांना दिसलात, म्हणून… चांगला सुचवू का… थोडक्यात यांना कोणीही सरळ सरळ वाईट म्हणत नाही. पण यांच्यापेक्षा चांगला असल्याचं सुचवतात… मग आपणच म्हणतो तो चांगलाच आहे. आणि माझा चांगला मित्र आहे. यात आपण वकील नसतांनाही एका वकीलाच वकीलपत्र आपण घेतल्याचं समाधान मिळतं.
यांच्या बाबतीत अजून एक पडणारा प्रश्न म्हणजे हे कामात असतात म्हणून गडबडीत असतात, का काम मिळावं म्हणून गडबडीत असतात हेच लवकर समजत नाही.
तारीख याचा जास्त वापर वकील सोडला तर दुसर्या कोणीही केला नसेल. आपण फक्त मिळणार्या पगाराच्या तारखेचाच विचार केला असेल. आता फारतर जमा होणाऱ्या पेन्शनची तारीख. किंवा सणवारांच्याच तारखा पाहतो. पण यांचा सगळा विचार तारखेशी आणि तारखेभोवतीच फिरत असतो असं वाटतं. आपण सहज म्हणून यांना काही विचारावं तरी यांची पहिला प्रश्न असतो. तारीख सांग.
आपण रोज काम करुन कोणत्यातरी एकाच तारखेला पैसे मिळवतो. आणि हे रोजच्या तारखेवर पैसे मिळवतात.
हातात काम घेतल्यावर बर्याचदा हे पुढची तारीखच देत असतात. पण काहिवेळा यांना भेटण्यासाठीसुध्दा तारीख घ्यावी लागते. तारखेशिवाय यांच पान हालत नाही. पण हातात असलेली पानं (कागद) ते सतत हलवत असतात.
आपल्याकडे काही कार्य असेल तर आपण गुरुजींना सांगतो. लक्षात असूद्या बरं. हे तिथेही म्हणत असतील गुुरुजी… या दिवशी साक्षीला यायला विसरु नका बरं…
शिक्षकाने खडू हातात घेतल्यावर ते मराठीचे शिक्षक असतील तर सुविचार, गणिताचे असतील तर सूत्र लिहीली जात असावित. डाॅक्टरांनी पेन उचलल्यावर त्यांच्याकडून फक्त आणि फक्त औषधांची नांवच कागदावर उतरत असतील असं वाटतं. तसच वकीलाने पेन म्हणजे कलम उचलल्यावर त्यातून फक्त कायद्याची कलमच कागदावर लिहीली जात असतील असं ऊगाचच वाटतं. काट्याने काटा काढावा. या धर्तीवर कलम वापरुन कलम लिहीणारा किंंवा सांगणारा असं वकीलांबद्दल सांगता येईल. याच्यातही पोट कलमाचा ऊल्लेख होईल अस वाटलं तर नकळत आपल पोट ढवळायला लागत.
शहाण्याने कोर्टाची पायरी चढूनये असं म्हणतात. पण इथे पावला पावलावर किंवा पायरी पायरीवर तेच दिसतात. मग परत विचार शहाणे कोण… यांच्या ऑफिसमधे मागे लावलेली कायद्याची मोठीमोठी पुस्तक पाहिली कि यापैकी कोणत्या पुस्तकात कोणत्या पानावर कोणाच्या अटकेचा किंवा सुुटकेेचा उल्लेख आहे हाच प्रश्न असतो. कारण याच पुस्तकांचा आधार घेत दोन वकील आपापली बाजू मांडतात. इतर दोघे (आपसात भांडणारे) बाजूला ऊभे असतात असंच चित्र डोळ्यासमोर येतं.
यांच्या बोलण्यात अर्थ असतो. तर आपल्या दृष्टिने ते अर्थ पूर्ण (किमती) असतं. हे सहज बोलतांना सुध्दा मोजकच बोलतात का.. असं ऊगाचच वाटतं.
एखादा वकील मित्र सहज भेटल्यावर आपण गप्पा मारत असतांना चुकून त्याचा समव्यवसायीक भेटला तर त्यांची एखाद्या केस विषयीच चर्चा होते. आणि त्यांची हि चर्चा संपेपर्यंत आपण शो केस मधल्या पुतळ्यासारखे ऊभे असतो.
(हे फक्त वकील या शब्दाबद्दलच नाही. याच प्रमाणे काही आडनांवाच्या बाबतीत सुध्दा आदरयुक्त भिती असते. आणि अशी आडनांव असणारेच वकील असतील तर… तर मग भित्यापाठी ब्रह्मराक्षस… अशी आडनांव व आडनावाचे वकील असणारे, व वकील कृपया हे विनोदाने घ्या. व मला माफ करा.)
रात्री टीव्हीवर बातम्या पाहत असताना नाशिक आणि नगर भागात बिबट्याने किती थैमान घातले ते दाखवत होते. बिबट्याच्या दहशतीने लोक घाबरले होते. त्या बातम्या पाहतच मी झोपी गेलो. मी गाढ झोपलो असताना अचानक मला एक भीतीदायक डरकाळी ऐकू आली. मी दचकून जागा झालो. पाहतो तर काय समोर चक्क एक बिबट्या! त्याचे डोळे अंधारात चमकत होते. तो अगदी समोर आणि मी त्याच्या शिकारीच्या टप्प्यात. बापरे! आता काही खरं नाही. माझ्या काळजाचा ठोका चुकला. माझ्यात कुठून एवढे बळ आले कुणास ठाऊक, पण भीती वाटण्याऐवजी माझ्या डोक्यात काहीतरी केमिकल लोचा झाला आणि मला थेट ‘शोले’ चित्रपटच आठवला. समोर साक्षात मृत्यू उभा होता आणि माझ्यातला ‘गब्बर सिंग’ जागा झाला होता.
बिबट्याने पुन्हा एकदा गुरगुरत माझ्याकडे पाहिले. मी थरथरत्या हाताने चादर सावरली आणि मनातल्या मनात म्हणालो, “जो डर गया, समझो मर गया! “
बिबट्या एक पाऊल पुढे आला. त्याचा पवित्रा पाहून मला वाटलं तो आता झडप घालणार. पण मी ही काय कच्च्या गुरुचा चेला नव्हतो. मी बेडवर उभा राहिलो आणि पूर्ण ताकदीने ओरडलो, “अरे ओ सांबा! लगा निशाना इस बिबटे पर. अब तेरा क्या होगा बिबट्या? “
माझ्या अशा अनपेक्षित ओरडण्याने बिबट्या सुद्धा दोन मिनिटं कन्फ्युज झाला. तो डोळे विस्फारून माझ्याकडे बघतच राहिला. समोरच्या सावजाकडून त्याला अशा प्रकारच्या प्रतिसादाची अपेक्षा अजिबात नसावी. आतापर्यंत त्याचा अनुभव असा होता की समोरचे सावज त्याला पाहिले की गर्भगळीत होत होते. पण इथे तर वेगळाच प्रकार होता. मनात नक्कीच विचार आला असेल की, “शिकार करायला आलोय की शिकार व्हायला? “
बिबट्याला आतापर्यंत स्वतःबद्दल फार आत्मविश्वास होता. गावोगावच्या माता आपल्या बाळाला झोपवताना त्याची भीती दाखवत होत्या. ” बेटा सो जा नही तो बिबट्या आ जायेगा. ” बिबट्या सुद्धा आपल्या साथीदारांना मोठ्या गर्वाने म्हणत होता, ” कितना इनाम रखा है रे इन फॉरेस्ट वालो ने मुझपर? ” त्याचे साथीदार म्हणायचे, ” पुरे पाच लाख, सरदार. ” आणि मग बिबट्या गडगडाटी हास्य करायचा. पण आता बिबट्याचा हा आत्मविश्वास पार डळमळीत झाला होता.
मी म्हटलं, ” गाववालोने भुखे कुत्तों के सामने रोटी डालना अब बंद कर दिया है. इसलिये यहा कुछ नही मिलेगा. “
बिबट्या बिचारा अजूनच गोंधळला. त्या गोंधळलेल्या अवस्थेत त्याने आणखी एक डरकाळी फोडली. बहुधा त्या परिस्थितीचा निषेध त्याने व्यक्त केला असावा. पण आता त्याच्या डरकाळीत ती पूर्वीची जरब राहिली नव्हती. त्याने एक पाऊल मागे घेतलं. मला वाटलं तो घाबरला. माझा आत्मविश्वास वाढला. मी कोपऱ्यात ठेवलेली काठी उचलली. मी म्हटलं, ” गब्बर से तुम्हे एक ही आदमी बचा सकता, है खुद गब्बर! “
तसं जर बिबट्याने ठरवलं असतं तर समोरच्या भक्ष्याची शिकार करणं त्याला काही अवघड नव्हतं. पण आता त्याच्या डोक्यातही काहीतरी केमिकल लोच्या नक्कीच झाला होता. त्याला आता खात्री पटली होती की हा माणूस खायला योग्य नाही, कारण ह्याला शिकार बनवले तर आपलीच शिकार व्हायची आणि असा माणूस न खाल्लेला चांगला! माणूस जातीचे भवितव्य उज्वल राहण्यासाठी अशी माणसे जगणे आवश्यकच! काही एक न बोलता तो खिडकीकडे चालू लागला. तो पाठ फिरवून जात असताना मी त्याला शेवटचा टोमणा मारलाच, “जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी! “
बिबट्या खिडकीतून उडी मारून पळून गेला.
आता बिबट्याच्या घरी काय परिस्थिती असेल ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळले. त्याचा चेहरा पाहून बिबटीण बाईंनी नक्कीच विचारले असणार. ” काय झाले शिकार मिळाली नाही का? ” बिबट्याचे उत्तर ” नाही. आज माझीच शिकार व्हायची होती पण वाचलो. ” सौ बिबट म्हणाल्या, ” का? पळून आलात? “
बिबट्या म्हणाला ” होय. “
सौ बिबट, ” कितने आदमी थे? “
बिबट्या, ” सिर्फ एक “
सौ बिबट, ” सिर्फ एक आदमी और फिर भी वापस आ गये? “
एवढ्यात कसला तरी आवाज झाला आणि मला जाग आली. सगळं शांत झाल्यावर मी बेडवर धपकन बसलो आणि स्वतःशीच पुटपुटलो, “इतका सन्नाटा क्यूँ है भाई? “
तेवढ्यात बायकोचे उद्गार माझ्या कानावर आले. ” अहो, कसला सन्नाटा आणि झोपेत कसले शोलेचे डायलॉग म्हणत होतात! गब्बर काय, सांबा काय? उठा सकाळचे आठ वाजले आता. “
तेव्हा मला कळलं, बिबट्या वगैरे काही नव्हता. हा सगळा रात्रीच्या बातम्या पाहण्याचा परिणाम होता. पण आता बिबट्या वगैरे काही नव्हता तो खिडकीतून पळून गेला होता आणि माझ्या अंगात रात्रीचा गब्बर अजून जागा होता. मी बायकोला ऑर्डर केली, ” चहा आण. “
भारतात शिक्षणव्यवस्थेची आज जी दुर्दशा दिसून येते, ती केवळ प्रशासकीय अपयशापुरती मर्यादित नसून ती खोलवर रुजलेल्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाचे आणि सामाजिक दांभिकतेचे लक्षण आहे. शिक्षण हे दीर्घकालीन गुंतवणुकीचे क्षेत्र असल्यामुळे त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत, आणि म्हणूनच येनकेन प्रकारेण सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक अल्पकालीन फायद्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या राजकीय व्यवस्थेला शिक्षण कधीच प्राधान्याचे वाटले नाही. परिणामी परीक्षा वेळेवर न होणे, प्रश्नपत्रिका फुटणे, मोठ्या प्रमाणावर कॉपी होणे, निकाल विलंबाने लागणे आणि अभ्यासक्रमाचा आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान व जागतिक ज्ञानव्यवस्थेशी ताळमेळ न बसणे या समस्या दशकानुदशके टिकून आहेत. या सगळ्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर, संशोधनाच्या गुणवत्तेवर आणि देशाच्या बौद्धिक भांडवलावर होतो. या शैक्षणिक अपयशाचा एक महत्त्वाचा राजकीय पैलू म्हणजे शिक्षणावरील सार्वजनिक खर्च. भारतासारख्या तरुण लोकसंख्येच्या देशात वैज्ञानिक संशोधनासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक टक्क्याहून कमी आणि एकूण शिक्षणासाठी अडीच टक्क्यांपेक्षा कमी खर्च होणे हे केवळ आकडेवारीचे अपयश नाही, तर धोरणात्मक दृष्टी अभावाचे द्योतक आहे. ज्या देशांनी ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था उभारल्या, त्यांनी शिक्षण आणि संशोधनाला केंद्रस्थानी ठेवले. भारत मात्र ‘महासत्ता’ होण्याच्या घोषणा देतो, पण त्या घोषणांना आवश्यक असलेली शैक्षणिक पायाभूत गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करतो. त्यामुळेच दर्जेदार संशोधन, नवोन्मेष आणि उच्च दर्जाचे विद्यापीठीय वातावरण परदेशात अधिक उपलब्ध असल्याने लाखो भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जातात आणि अनेकदा तिथेच स्थायिक होतात. ही प्रक्रिया ब्रेनड्रेनला प्रोत्साहन देणारी असून ती बौद्धिकदृष्ट्या देशाला कमकुवत करणारी आहे.
शिक्षणावर सरकारचा वाढता हस्तक्षेप हा या संकटाचा आणखी एक गंभीर पैलू आहे. शिक्षण संस्थांना स्वायत्ततेऐवजी नियंत्रणाखाली ठेवण्याची मानसिकता ही लोकशाही समाजासाठी घातक ठरते. कोणते विषय शिकवायचे, इतिहासाची मांडणी कशी करायची, कोणते ज्ञान ‘भारतीय’ आहे आणि कोणते ‘परकीय’ आहे, अशा राजकीय सूचनांमधून शिक्षणाला वैचारिक चौकटीत बंदिस्त केले जाते. यामुळे प्रश्न विचारण्याची, शंका उपस्थित करण्याची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची क्षमता कमी होते. याच पार्श्वभूमीवर विशिष्ट धर्माशी निगडित पौराणिक संकल्पनांना अभ्यासक्रमात स्थान देणे, पौराहित्याचे अभ्यासक्रम आखणे, गोशाळा किंवा गोमुत्रावरील संशोधनाला मोठ्या प्रमाणात अनुदान देणे, ही पावले वैज्ञानिक संशोधनाच्या मूळ तत्त्वांनाच आव्हान देणारी ठरतात. अशा प्रकारचा छद्म-विज्ञानाचा पुरस्कार हा केवळ शैक्षणिक अधोगतीचा नाही, तर समाजाच्या विवेकबुद्धीच्या ऱ्हासाचाही संकेत आहे.
या सगळ्यात सामाजिक स्तरावर दिसणारी दांभिकता अधिक चिंताजनक आहे. शिक्षणाचे महत्त्व जाणणारा, आर्थिकदृष्ट्या सक्षम वर्ग स्वतःच्या मुलांसाठी परदेशातील उत्तम शिक्षणसंस्था निवडतो, पण देशांतर्गत शिक्षणव्यवस्थेच्या अधोगतीविरोधात ठोस भूमिका घेत नाही. एकीकडे राष्ट्रवाद, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेच्या घोषणा दिल्या जातात, तर दुसरीकडे स्वतःच्या पुढील पिढीसाठी देशातील शिक्षणव्यवस्थेवर विश्वास ठेवला जात नाही. ही विसंगती सामाजिक जबाबदारीच्या अभावाची आणि वैचारिक दारिद्र्याचे प्रतीक आहे. शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी जेव्हा समाजाकडून दबाव येत नाही, तेव्हा राजकीय सत्ताधाऱ्यांनाही बदल करण्याची गरज वाटत नाही. एकूणच पाहता, भारत महासत्ता होण्याच्या आकांक्षा आणि त्याची शैक्षणिक वास्तवता यांच्यात प्रचंड दरी आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणपद्धतीचा समावेश, आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान शिक्षणाला मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ, संशोधन संस्थांना स्वायत्तता आणि शिक्षणाची राजकीय-धार्मिक हस्तक्षेपापासून मुक्ती हे मूलभूत बदल झाले नाहीत, तर ‘ज्ञानाधारित भारत’ ही संकल्पना केवळ भाषणांपुरती मर्यादित राहील. अशा परिस्थितीत महासत्तेचे स्वप्न पाहणे म्हणजे वास्तवाशी फारकत घेऊन कल्पनाविलासात रमण्यासारखेच ठरेल, आणि ही किंमत शेवटी संपूर्ण समाजालाच मोजावी लागेल. पण कोण लक्षात घेतो?
काल धबधब्याचा फोटो पाहिला. तेव्हा आठवण झाली शिवथरघळच्या धबधब्याची. प्रत्यक्ष पाहून बरीच वर्षे झाली असली, तरी मला त्यात समर्थांचे रूप दिसते. समर्थ ज्यांचे वर्णन ‘धबाबा लोटती धारा l धबाबा तोय आदळे l’ असे करतात. त्यांचा ‘धबाबा ‘हा शब्द मनावर ठसतो. यातून धबधबा पाहून वाटणारे आश्चर्य, अखंड ओघ आणि त्याचा जोर सर्वच व्यक्त होते. त्या धबधब्यासारखाच धीर, गंभीर, बळकट, ताठ, कुणापुढे न झुकणारे, उद्योगी समर्थांचे व्यक्तिमत्व आणि त्या जलौघाप्रमाणे त्यांच्या शब्दांचा ओघ.
ही जलाची टांगसाळ, तर समर्थांची वाणी ही शब्दांची टांकसाळ. त्यांच्या साहित्यातील एकाच गोष्टीचे वर्णन करणाऱ्या अर्थपूर्ण व नादयुक्त शब्दांचा ओघ हा धबधब्यातील पाण्यासारखा वाटतो. दासबोधातील प्रत्येक अध्यायात एका शब्दासाठी ५०/६० सुद्धा प्रतिशब्द किंवा त्यासंबंधी शब्द रचना आहेत. उदाहरणार्थ संतांचे वर्णन करताना दासबोधात समर्थ म्हणतात.
संत आनंदाचे स्थळl संत सुखची केवळl नाना संतोषाचे मुळl ते हे संतl संत विश्रांतीची विश्रांतीl संत तृप्तीची नीज तृप्तीl नातरी भक्तीची फलश्रुतीl ते हे संतl संत धर्माचे धर्मक्षेत्रl संत स्वरूपाचे सत्पात्रl ना तरी पुण्याची पवित्रl पुण्यभूमीl संत समाधीचे मंदिरl संत विवेकाचे भांडारl नातरी बोलीजे माहेरl सायोज्यमुक्तीचेl संत सत्याचा निश्चयोl संत सार्थकाचा जयोl संत प्राप्तीचा समयोl सिद्धरूपl मोक्षश्रिया आलंकृतl ऐसे हे संत श्रीमंतl जे समर्थपणे उदारl अत्यंत दानशूरl
असे हे वर्णन समजून घेताना आपलीच दमछाक होते. समर्थांनी दासबोधाची रचना शिवथरघळला केली. कदाचित त्या धबधब्याकडे पाहूनच अशी ओघवती रचना त्यांना सूचली असावी. त्यांची अखंड जागृत प्रतिभा पाहून तो ओघ डोळ्यासमोर येतो.
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ६ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
सगुण भक्ती
परमेश्वर चराचरात व्याप्त असून तो निर्गुण निराकार आहे असे म्हटले जाते, परंतु सर्वसामान्य माणसाला परमेश्वराच्या रूपात काहीतरी वस्तूची आवश्यकता असते. तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे वेड लागलेला एक सर्वसामान्य प्रापंचिक माणूस. त्यामुळे त्यांची भक्ती सगुण भक्ती होती. त्यांचे परमेश्वराच्या रूपाचे वर्णन करणारे कितीतरी अभंग आपल्याला त्यांच्या गाथेत वाचावयास मिळतात.
सुंदरते ध्यान/ उभे विटेवरी/
कर कटावरी/ ठेवोनिया//
तुळशीहार गळा/ कासे पितांबर/
आवडे निरंतर /हेचि ध्यान//
मकर कुंडले /तळपती श्रवणी/
कंठी कौस्तुभ मणी/ विराजित//
तुका म्हणे माझे/ हेचि सर्व सुख/
पाहिन श्रीमुख/आवडीने//
या ओळी वाचल्या की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर विठोबाचे एक काल्पनिक रूप उभे राहते व आपोआपच हात जोडले जातात.
सदा माझे डोळा/ जडो तुझी मूर्ती/
रखुमाईच्या पती सोयरिया//
गोड तुझे रूप/गोड तुझे नाम/
देई मज प्रेम/ सर्वकाळ//
विठू माऊलीये /हाचि वर देई/
संचरोनी राही/ हृदयामाजि//
तुका म्हणे काही/ न मागे आणिक/
तुझे पायी सुख/सर्व आहे//
मनाची अशी अवस्था केवळ तुकारामांचीच नव्हे तर सर्व भक्तांची होते.
वेगवेगळ्या शब्दात महाराज विठ्ठलाचे वर्णन करतात.
राजस सुकुमार /मदनाचा पुतळा/
रवी शशीकळा/लोपलिया//
कस्तुरी मळवट /चंदनाची उटी//
रुळे माळकंठी/ वैजयंती/
मुगुट कुंडले /श्रीमुख शोभले/
सुखाचे ओतीले/ सकळही//
कासे सोनसळा/ पांघरे पाटोळा/
घननिळ सावळा/ बाईयानो//
कर कटावरी / तुळशीच्या माळा/
ऐसे रूप डोळा/ दावी हरी//
*गरुड पारावरी/ उभा राहिलासी/७
आठवी मानसी/ तेची रूप//
झुरोनी पांझरा/ होऊ पाहे आता/
येई पंढरीनाथा /भेटावया//
तुका म्हणे माझी/ पुरवावी आस/
विनंती उदास/ करू नये//
विठोबाची अशी मूर्ती तुकाराम महाराजांच्या कल्पनेत आहे आणि ते रूप पाहण्यासाठी ते अतिशय उतावीळ झाले आहेत. ते गोपींच्या भूमिकेतून आपल्याबरोबरच्या गोपींना (भक्तांना) श्रीकृष्णाच्या(विठ्ठलाच्या) रूपाचे वर्णन करतात. येथे मूळ गोपी म्हणजे त्यांचे मन
आणि सख्या म्हणजे इंद्रियांच्या प्रवृत्ती असे रूपक या वर्णनात आहे.
संत तुकाराम महाराजांनी परमेश्वराचे कनवाळू रूप वर्णन केले आहे. जो खरा भक्त परमेश्वराची सेवा करतो, त्या भक्ताचा परमेश्वर कायम ऋणी असतो, भक्ताचे ऋण परमेश्वर सदा फेडतोच. कसे ते या खालील अभंगातून पहा.
भक्तऋणी देव/ बोलती पुराणे/
निर्धार वचने/ साच करी//
मागे काय जाणो/आईकिली वार्ता/
कबीरासाते जाता/घड्या वाटी//
माघारीया धन/ आणिले घरासी/
मेघे केला त्यासी/ त्याग तेणे//
नामदेवाचीया /घरासी आणिले/
तेणे लुटीयेले/ द्विजा हाती//
प्रत्यक्षासी काय /द्यावे हे प्रमाण/
एकोबाचे ऋण /फेडियेले//
बीज दळूनिया/ केली आराधना/
लागे नारायणा/ परणे ते//
कबीराने जेव्हा ब्राह्मणाच्या रूपात वस्त्रासाठी भीक मागत असलेल्या माणसाला(देव) अर्धे वस्त्र दिले, तेव्हा देवाने कबीराच्या घरी जाऊन ऋण फेडले. नामदेवाने जेव्हा त्याच्या जवळची कापडे उघड्या दगडांवर पांघरली, तेव्हा त्याची किंमत देवाने त्याच्या घरी आणून दिली. एकनाथाचे कर्ज भगवंताने स्वतः फेडले.
या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वर निर्गुण, अव्यक्त असला तरी हातात चक्र, गदा घेऊन तो भक्तांना स्वतःच्या हृदयाशी ठेवतो आणि दुर्जनांचा संहार करतो.
अव्यक्त ते आकारले/ रूपा आले गुणवंत/
तुका म्हणे पुरवी इच्छा/ जया तैसा विठ्ठल//
सगुणाची पूजा म्हणजे, सगुण रूप हे माध्यम आहे. त्या माध्यमाद्वारे भक्त परमेश्वराची पूजा, सेवा करू शकतो.
गाथेतील हा अभंग पहा.
केला मातीचा पशुपती/
परी मातीसी काय महती? //
शिवपुजा सिवासी पावे/
माती मातीमाजि सामावे//
तैसे पूजिती आम्हासी संत/
पूजा घेतो भगवंत//
केला पाषाणाचा विष्णू/
परि पाषाण नव्हे विष्णू//
विष्णु पूजा विष्णूसी अर्पे/
पाषाण राहे पाषाण रूपे//
केली काशाची जगदंबा/
परी कासे नवे अंबा//
पूजा अंबेची अंबेला घेणे/
कासे राहे कासेपणे//
तुकाराम संत आहेत. शास्त्र पंडित नव्हेत. म्हणून ते सगुण पूजा मानतात. ते प्रश्न विचारतात की जर अवघे विश्व ब्रह्मरूप आहे, मग प्रतिमेतही ब्रह्म असायलाच हवे. प्रतिमाही देवच आहे. ब्रह्मा वाचून रिक्त असे काहीच नाही, मग दगडाच्या किंवा धातूच्या मूर्तीत ब्रह्म कसे नसेल.
ते असेही म्हणतात की त्यांना परमेश्वराची खूप स्तुती करायची आहे, परंतु स्तुती करण्यास त्यांची वाणी कमी पडते. कारण परमेश्वराच्या स्वरूपाच्या एकेका केसावर हजारो ब्रम्हांडाची घडामोड होत आहे.
स्तुती करू तरी/ नवे ची या वेदा/
तेथे माझा धंदा /कोणीकडे//
परी हे वैखरी /गोडाली सुखे/
रसना रसमुखे/ इच्छितसे//
परमेश्वराच्या रूपाचे वर्णन करणे अशक्यप्राय आहे. त्याची अनंत रुपे आहेत परंतु ज्याचा जसा भाव असेल तसे त्याच्या इच्छेनुरूप भगवंत सगुण रूप धारण करतो.
तुज वर्णी ऐसा तुजविण नाही/
दुजा कोणी तीही त्रिभुवनी//
सहस्त्रमुखे शेष शिणला बापुडा/
चिरल्या धडा जिंव्हा त्याच्या//
अव्यक्ता अलक्षा अपारा आनंदा/
निर्गुणा सच्चिदानंदा नारायणा//
रूप नाम घेसी आपल्या स्वइच्छा/*
होसी भाव तैसा त्या कारणे//
तुका म्हणे जरी दावीसी आपणा/
तरीच नारायणा कळो येसी//
तुकाराम महाराजांच्या परमेश्वर प्राप्तीच्या तळमळीतून पांडुरंगाचे सगुण रूप त्यांच्यासमोर… साकार झाले आहे.