मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – विळखा ऑनलाइन गेम्सचा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

🔅 विविधा 🔅

☆ उगवतीचे रंग – विळखा ऑनलाइन गेम्सचा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

परवा एका मित्राच्या घरी गेलो. तो एकटाच होता. वहिनी दिसत नव्हत्या. त्याला म्हटलं, ” काय रे, वहिनी गावाला गेल्या आहेत का? ” तो म्हणाला, ” हो अरे, ती मयुरीकडे गेली आहे. आता तीन महिने तिकडेच राहणार. ” मयुरी म्हणजे माझ्या मित्राची मुलगी पुण्यात असते. आता तिचा मुलगा दहावीला आहे. मार्चमध्ये त्याची परीक्षा आहे. परंतु तो मुलगा अभ्यास करण्यापेक्षा मोबाईल जास्त पाहतो, सतत ऑनलाईन गेम्स खेळत असतो. मित्राच्या मुलीला आणि जावयाला असे वाटते की या सगळ्याचा परिणाम त्याच्या परीक्षेतील गुणवत्तेवर होऊ नये म्हणून त्यांनी त्याच्या आजीला दोन-तीन महिने बोलावून घेतले आहे. कारण ते दोघे नोकरी निमित्ताने बाहेर असतात. मग घरी त्याच्यावर लक्ष कोण ठेवणार? ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. मुलांचे ऑनलाईन गेम्सच्या आहारी जाणे खरोखरच काळजी वाटावी इतके वाढले आहे.

अगदी लहान मुलांपासून तरुणांपर्यंत आणि काही मोठी माणसे सुद्धा या व्हिडिओ गेम्स आणि ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेली आहेत. कुठेही गेले तरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो आणि कोणीतरी काहीतरी ऑनलाईन गेम किंवा व्हिडिओ गेम खेळताना दिसतो. सुरुवातीला करमणूक म्हणून काही वेळ त्यात घालवल्यानंतर त्याचे सवयीत कधी रुपांतर होते ते आपल्याला कळत नाही आणि मग त्याशिवाय जर राहवत नसले तर त्या सवयीचे रूपांतर व्यसनात झाले असे समजायला हरकत नाही.

हल्ली आई वडील आपल्या कामात खूप व्यस्त असतात. त्यामुळे मुलांसाठी त्याला वेळ देता येत नाही. अशावेळी विरंगुळा म्हणून किंवा करमणूक म्हणून ते त्याच्या हातात मोबाईल देतात आणि मग त्याला हळूहळू व्हिडिओ गेम्स किंवा ऑनलाईन गेम्सचे व्यसन लागते. २०२३ च्या आकडेवारीनुसार भारतात जवळपास सहा कोटी लोक ऑनलाईन गेम्स खेळतात. त्यातही लहान मुलांचे आणि तरुणांचे प्रमाण मोठे आहे.

हे आभासी जग एवढे आकर्षक आहे की त्यामुळे प्रत्यक्षातील आपल्यासमोर असलेल्या चांगल्या गोष्टींकडे आपले लक्ष जात नाही. या गेम्समधील ग्राफिक्स एवढे आकर्षक असतात की लहान मुलांबरोबरच मोठ्यांना देखील त्याचा मोह पडतो. एकदा खेळायला सुरुवात केली की पॉईंट्स वाढत जातात आणि त्याचे वेडच लागते. मग पुढील पायरी, त्याच्या पुढील पायरी असे करत करत मुले या अजगराच्या विळख्यात अडकत जातात. हा विळखा त्यांना इतका करकचून आवळतो की त्यातून बाहेर पडणे अशक्य होते. अशावेळी जर पालकांनी मुलांच्या हातातील मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला तर मुलं चिडचिड करतात, प्रसंगी हिंसक बनतात आणि कधी कधी तर त्याच्या पुढची म्हणजे आत्महत्येची पायरी गाठण्यापर्यंत त्यांची मजल जाते. या खेळांचे व्यसन लागल्यामुळे मुले एकलकोंडी बनतात. घरात असलेल्या आई-वडिलांशी देखील बोलण्याची त्यांची इच्छा होत नाही. ते आपल्याच आभासी जगात रमलेले असतात. ही एक प्रकारची नशाच असते. यालाच डिजिटल ड्रग्स असेही म्हटले जाते. हेडफोन लावून जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांशी बोलण्याची सोय पालकांशी बोलण्यापेक्षा त्यांना अधिक मजेशीर वाटते. कुटुंबातील सदस्यांपासून मुले अशा रीतीने लांब जातात.

काही ऑनलाईन गेम्स हे पेड असतात. अशावेळी मुले पालकांच्या ऑनलाइन कार्डाचे डिटेल्स वापरून हे गेम्स डाउनलोड करून घेतात. तसेच त्यात वेळोवेळी होणारी पैशाची मागणी देखील पुरवतात. हे गेम्स खेळत असताना बऱ्याच वेळा अनेक जाहिराती किंवा व्हिडिओ क्लिप्स पॉप अप होतात. अशा व्हिडिओ क्लिप मध्ये बऱ्याच वेळा संवेदनशील किंवा मुलांनी पाहू नये अशा प्रकारचा अडल्ट कंटेंट असतो. त्यामुळे मुलांच्या भावना नको त्या वयात उद्दीपित होतात, मुले भरकटतात आणि अभ्यासापासून दूर जातात.

या खेळामुळे मुलांचे आर्थिक आणि शारीरिक असे दोन्ही प्रकारचे नुकसान होत असते. मोबाईलकडे सतत टक लावून बघत राहिल्यामुळे डोळ्यांचे विकार होतात, सतत एकाच जागी बसून राहिल्यामुळे आणि शारीरिक हालचालीचा अभाव असल्यामुळे लठ्ठपणामध्ये वाढ होते आणि त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढते. या ऑनलाईन गेम्स चा अतिवापर मानसिक आरोग्य बिघडवणारा सुद्धा ठरतो. चिडचिडेपणा, एकाग्रतेचा अभाव, अभ्यासातील रुची कमी होणे आणि हिंसक प्रवृत्ती वाढणे यासारखे दुष्परिणाम होतात. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता असते तसेच संवेदनशील किंवा गोपनीय माहिती फसवणूक करणाऱ्यांच्या हाती लागल्यास ते त्याचा गैरवापर करण्याची शक्यता असते.

एक काळ असा होता की मुले ग्राउंडवर खेळण्यात रमून जात. निरनिराळे मैदानी खेळ खेळत. बऱ्याच वेळा पालकांना त्यांना ओढून आणावे लागत असे. पण आता मात्र ते व्हिडिओ गेम्स किंवा ऑनलाइन गेम्समध्ये एवढे अडकले आहेत की त्यातून त्यांना बाहेर काढणे आणि पुन्हा मैदानी खेळांकडे वळवणे कठीण झाले आहे.

याचा अर्थ मुलांनी ऑनलाईन गेम्स खेळूच नयेत असा नाही. पण त्यांना स्क्रीन टाईम ठरवून द्यावा. अनेक देशांमध्ये मुलांच्या मोबाईल वापरावर आणि इंटरनेटच्या वापरावर कठोर बंधने आहेत. अमेरिकेसारख्या देशात सहा ते बारा वयोगटातील मुलांना फक्त एक तास मोबाईलवरील गेम्स खेळण्याची तर सहा वर्षाखालील मुलांना फक्त अर्धा तास गेम्स खेळण्यासाठी परवानगी आहे.

या सगळ्यात पालकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. पालकांनी मुलांसाठी वेळ तर द्यायलाच हवा परंतु त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधायला हवा. ऑनलाइन फसवणूक कशी होऊ शकते आणि त्यातील धोके कोणकोणते आहेत याची माहिती त्यांना द्यायला हवी. आणि यदाकदाचित त्यांच्याकडून एखादी चूक झाली तरी त्यांना न रागावता त्यातून बाहेर कसे काढता येईल यासाठी डोके शांत ठेवून मार्गदर्शन करायला हवे.

शक्य झाल्यास त्यांना स्वतः मैदानावर घेऊन जावे. मुलांच्या गर्दीने जर मैदानी गजबजली तर रुग्णालयातील गर्दी कमी होईल हे लक्षात ठेवावे आणि त्यांना पटवून द्यावे. मैदानावरील खेळामुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक निकोप वाढ होते, त्यांची शक्ती वाढते, एकाग्रता वाढते, नेतृत्व गुणांचा विकास होतो हे त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे. एकदा मुलांना त्याची आवड लागली की मग मुले स्वतःहूनच मैदानावर खेळायला पसंती देतील.

मुलांचा मोबाईल एकदम काढून घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने त्यांना त्याच्याशिवाय राहण्याची सवय लावा. त्याने तुमचे ऐकल्यानंतर त्याला छोटेसे बक्षीस द्या किंवा त्याचे कौतुक करा. जेवणाच्या टेबलावर किंवा अभ्यासाच्या खोलीत मोबाईल घेऊन जाऊ देऊ नका. त्याचप्रमाणे मुलांना गाणी म्हणणे, चित्रे काढणे, वाचन करणे, बागकाम करणे यासारख्या गोष्टींची आवड लावता येईल. पण त्यासाठी पालकांना देखील स्वतःचे काम किंवा मोबाईल बाजूला ठेवून मुलांसाठी वेळ द्यावा लागेल. तरच भावी पिढीचे भविष्य उज्ज्वल होईल.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावित्रीबाई खानोलकर ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ सावित्रीबाई खानोलकर ☆ शालिनी जोशी ☆

(८ मार्च —- ‌महिला दिनानिमित्त, परदेशी असून भारतासाठी कार्य करणाऱ्या महिलांची ओळख –)

(साभार – यूट्यूब चैनल >> IMC Business Official)

जन्मभूमी निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नसते. तरीही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपली कर्मभूमी आपण निवडू शकतो आणि आपल्या कर्माचा ठसा तिथे उमटवूं शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजेच सावित्रीबाई खानोलकर.

सावित्रीबाई म्हणजे एखाद्या मराठमोळ्या स्त्रीचे नाव वाटते. पण त्यांचे मूळचे नाव ‘इव्हा युओन लिंडा’. असे होते. जन्म २० जुलै १९१३ रोजी स्वित्झर्लंड मध्ये झाला. आई रशियन व वडील हंगेरीचे होते. आई लहानपणीच वारली. वडील समाजशास्त्राचे प्राध्यापक तसेच ग्रंथपालही होते. त्यामुळे इव्हाना लहानपणापासून विविध प्रकारची पुस्तके वाचायला मिळाली. त्यातून भारत व भारताचा इतिहास कळला. भारताविषयी ओढ निर्माण झाली.

मेजर विक्रम खानोलकर हे भारतीय लष्कर अधिकारी मुळचे महाराष्ट्रातील सावंतवाडीचे रहिवासी होते. रॉयल मिलिटरी अकॅडमी, सॅंडहस्ट येथे त्यांचे शिक्षण झाले. तेव्हा ते स्विझर्लंडला गेले असताना त्यांची व इव्हा यांची भेट झाली. १६ वर्षाची इव्हा २७ वर्षांच्या भारतीय तरुणांच्या प्रेमात पडली. आई-वडिलांचा विरोध पत्करून १९३२साली, आपल्या निर्णयावर ठाम असलेली ही मुलगी, भारतात आली. त्यावेळी त्या अठरा वर्षाच्या होत्या. २९ वर्षांच्या मेजर विक्रम यांचे बरोबर त्यांनी लग्न केले. हिंदू धर्म स्वीकारला. इव्हाच्या सावित्रीबाई खानोलकर झाल्या.

त्या पूर्णपणे बदलल्या. भारतीय संस्कृतीचा त्यांनी पूर्णपणे अंगिकार केला. साडी, कुंकू, साध्या चपला, शाकाहारी जेवण यांचा स्वीकार केला. भारतीय भाषा, वेद, उपनिषदे, संस्कृत काव्य यांचा अभ्यास सुरू केला. पाटणा विद्यापीठात प्रवेश घेतला व पदवी मिळवली. रामकृष्ण मिशनचा भाग बनल्या. चित्रकला, संगीत व नृत्याची आवड होती. त्यात प्राविण्य मिळवण्यासाठी उस्ताद पंडित उदयशंकर यांची शिष्या झाल्या. हे सर्व करून ‘सेंटस् ऑफ महाराष्ट्र’ आणि ‘संस्कृत डिक्शनरी ऑफ नेम्स’ ही पुस्तके त्यांनी लिहिली. ती खूप गाजली. हिंदी, मराठी, संस्कृत बोलू शकत. भारतीय संस्कृती आणि परंपरा यात त्या समरसून गेल्या.

देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि लगेचच भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले. देशाच्या शुरानी बलिदान केलं. तेव्हा युद्धात प्राण्याची आहुती देणाऱ्या वीरांच्या सन्मानार्थ नवीन पदकांची रचना करण्याचे काम मेजर जनरल हिरालाल अटल यांच्याकडे आले. त्यासाठी त्यांनी सावित्रीबाईंची निवड केली. सावित्रीबाईंनी हे आव्हान स्वीकारले. भारतीय संस्कृती आणि वेद पुराणांच्या अभ्यासाचा उपयोग केला. काही दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पदकांची रचना मे. ज. अटल यांच्याकडे त्यांनी पाठवली. सर्वाना ती पसंत पडली. हे बनवत असताना इंद्राचे शस्त्र वज्राची प्रेरणा मिळाली. महर्षी दधिचीनी वृत्रासुराला मारण्यासाठी लागणारे अमोघ शस्त्र (वज्र) बनविता यावे म्हणून त्यांचे शरीर त्यागले होते. त्यांच्या अस्थी पासून बनवलेले वज्र हे समर्पणाचे प्रतीक. म्हणून परमवीर चक्राच्या मध्यभागी भारताची राजमुद्रा आणि त्या भोवती इंद्राच्या वज्राची चार चिन्हे कोरलेली आहेत. हे गोलाकार चिन्ह ३. ५ सेंटीमीटर व्यासाचे कास्य धातूचे आहे. दुसऱ्या बाजूला हिंदी व इंग्रजी मध्ये परमवीर चक्र असे कोरले आहे. या दोन शब्दांच्या मध्ये कमळ आहे. सैनिकाची शक्ती आणि बलिदान राष्ट्राचे रक्षण कसे करेल याचं ते चिन्ह म्हणजे प्रतीक. त्याग आणि शक्तीचे हे प्रतीक, यातून युगानुयुगे चालत आलेल्या संस्कृतीचा धागा मजबूत केला.

पहिलं परमवीर चक्र पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या मेजर सोमनाथ शर्मा यांना देऊन सन्मानित करण्यात आले. हे मेजर शर्मा सावित्रीबाई खानोलकर यांची कन्या कुमुदिनी हिचे दिर होते. परमवीर चक्रा प्रमाणेच अशोकचक्र, महावीरचक्र, कीर्तीचक्र, वीरचक्र, शौर्यचक्र अशा प्रमुख चक्रांची रचना सावित्रीबाईंनी केली. ही देशाला त्यांनी दिलेली देणगी. त्यामुळे भारताच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल.

१९२९ मध्ये किंग्स कमिशन मध्ये जॉईन झालेल्या खानवीलकरानी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावर काम केले. पाच ऑगस्ट १९४९ रोजी दिल्ली क्षेत्राचे जी ओ सी नंतर १९५२ मध्ये कलकत्ता पायदळ तुकडीचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. ते कठोर, शिस्तप्रिय प्रशासक म्हणून ओळखले जात. पत्नीसह ट्रेन ने कलकत्त्याला परतत असताना २९ ऑगस्ट १९९२ रोजी सकाळी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मरणोत्तर मेजर जनरल पदावर त्यांना बढती देण्यात आली. त्याना दोन मुली व एक मुलगा होता.

विक्रम खानवीलकरांच्या मृत्यू नंतर सावित्रीबाईंनी पूर्णपणे अध्यात्माला समर्पित केले. हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबासाठी आणि निर्वासितांसाठी त्यांनी भरपूर काम केले. १९९० मध्ये त्यांचे निधन झाले. अशी ही निसर्गाची आवड असणारी, स्वित्झर्लंडची कन्या पूर्ण भारतीय होऊन राहिली. आपल्या कार्याने अजरामर झाली.

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ३ – कंदील -☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ३ – कंदील – ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

परवा रस्त्याने जाताना एक सुंदर सजावट दिसली. बाहेर ओळीने कंदील लावलेले होते. ते बघून मी एकदम बालपणात पोहोचले. माझे बालपण ज्या ठिकाणी गेले त्या गावात वीज नव्हती. त्यामुळे हे कंदीलच सर्वत्र उजेड करायचे. अगदी रस्त्याने जाताना सुद्धा रस्ता दिसण्यासाठी हातात कंदील असायचा. कारण बंदिस्त काच असल्याने त्याला वाऱ्यापासून संरक्षण मिळायचे. आणि उजेड पडायचा. घरात तर प्रत्येक खोलीत असा कंदील असायचा. आणि तो भिंतीवर खुंटीला अडकवला की सगळ्या घरात उजेड पडायचा. ज्याला अंगणात जायचे असेल त्याने तो वरच्या कडीला धरून आपल्या सोबत घेऊन जायचा. आणि आपल्या पुरता अंधार गायब व्हायचा. मला तर खूप मज्जा वाटायची. तो उजेडाचा गोल आपल्या बरोबर प्रवास करायचा. आणि लांबून येणाऱ्याला माणूस दिसायचाच नाही. फक्त उजेड आपल्या दिशेने येताना दिसायचा.

हा कंदील घेताना घरातून बजावून सांगितले जायचे, “प्रभाकर कंदीलच घ्या”. काच नीट बघून घ्या. काच ओगले यांची असेल तोच घ्या. त्यातही दोन, तीन रंग मिळायचे. हा कंदील मिळायचे पुण्यात दत्ताच्या देवळा जवळ दुकान होते. तेथूनच आणा असेही सांगितले जायचे. घरात कंदील आला की मोठेच कौतुक वाटायचे. त्याला हळदी कुंकू लावले जायचे आणि सुरक्षित ठिकाणी ठेवले जायचे. दुपार नंतर तो कंदील घेऊन त्यात चपटी वात घातली जायची. आणि रॉकेल भरायचे. त्याच्या काचेच्या खालची किल्ली वर खाली करुन ती वात रॉकेल मध्ये भिजली आहे का बघितले जायचे. मग त्यावर काच चढवली जायची.

आणि कडेचा स्टॅन्ड (आम्ही त्याला घोडा म्हणत होतो) वर खाली करुन मगच ही कंदील उजळण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायची.

दुसऱ्या दिवसा पासून संध्याकाळी कंदीलची काच साफ करणे हे जोखमीचे पण आवडते काम रोज करावे लागे. आणि ती काच चमकवण्या साठी आमच्या लहान मुलांची स्पर्धा लागायची. त्या साठी विविध प्रयोग चालायचे. नुसत्या मऊ कपड्याने काच पुसणे. चुलीतली राख चाळून त्याने काच घासणे. मऊ कापडाने पुसणे. पाणी व साबण याने साफ करणे. पण त्यात हातातून निसटून पडून फुटण्याचा धोका असे. अशा काचा चकचकित केल्या की आम्ही शेजारी ठेवून कोणाची काच जास्त स्वच्छ झाली याचे निरीक्षण करत असू. विशेष म्हणजे तो उजळलेला कंदील चुकून पडला तरी आग लागत नसे.

याच्या उजेडात घरातली कामे व्हायचीच पण आमचे भविष्य पण उजळत होते. हा कंदील मध्ये ठेवून त्याच्या भोवती मी व माझ्या मैत्रिणी अभ्यास करत होतो. कारण दिवसभर शाळा आणि रात्री अभ्यास करावा लागायचा.

त्या कंदीलाचा वरचा भाग गरम व्हायचा. आणि त्याच्या उष्णतेने माझे माथ्यावरचे केस कायम जळायचे. पण बुद्धी मात्र उजळायची आणि अभ्यासाचा उजेड डोक्यात पडायचा.

मी असा कंदील खूप वर्षे जपून ठेवला होता. आणि लाईट गेल्यावर मेणबत्ती ऐवजी त्याचा वापर करत होते. तो बघून शेजाऱ्यांना खूप आश्चर्य वाटायचे. आणि मुलाला आकर्षण वाटायचे.

नंतर सगळीकडे विजेचे खांब उभे राहिले. घरात बल्बचा उजेड पडला आणि अत्यावश्यक कंदील माळ्यावर रवाना झाला. पण त्याच्या आठवणी मात्र अजून मनात आहेत.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री कालची आणि आजची… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

?  विविधा ?

☆ स्त्री कालची आणि आजची…  ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

रामायण आणि महाभारत ही आपली महाकाव्ये. या दोन पौराणिक कथानकातून स्त्री ची विविध रूपे समोर आली. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या

लेखक स्त्रिया महान पतिव्रता म्हणून जनमानसात रूजल्या गेल्या. यांचे केवळ स्मरण केल्याने महापातकांचा नाश होतो असे संस्कार या काळात केले गेले.

संत वाङमय, पंत वाड़मय आणि शाहिरी फड यातून वर्णिलेली स्त्री लोकसाहित्याचा विशेष भाग ठरली. जनमानसात खोलवर रूजलेली ही स्त्री, समस्त नारीशक्ती समाजाशी संवाद साधत गेली. माया, ममता आणि करूणा या भावनांच्या मुशीतून घडलेली ही स्त्री त्याग, समर्पण आणि विश्वास या त्रिसूत्रीतून स्वतःला, कुटुंबाला, समाजाला घडवीत गेली.

पौराणिक काळातील स्त्री पातिव्रत्य, हे अस्त्र समजून स्वसंरक्षण करीत गेली. सत्यवती, माद्री, कुंती गांधारी, सुनिती, सुरूची, आदिती, छाया, अनुसया, लक्ष्मी, सरस्वती, पार्वती, यशोदा, देवकी, रूक्मिणी सुभद्रा या, सर्व स्त्रियांनी उत्पत्ती, स्थितीआणि लय यांचा समतोल राखण्यासाठी वेळीवेळी सत्व परीक्षा दिली. पुरुष प्रधान संस्कृती चा संघर्ष त्या काळापासून आज तागायत ही स्त्री करीत आहे.

कालची स्त्री जेव्हा जेव्हा बंड पुकारून जागृत झाली तेव्हा तेव्हा ती समाजासाठी आदर्श ठरली. पण हे आदर्श पण टिकवायला तिला स्वतःला अतोनात कष्ट सहन करावे लागले. संत मीराबाई, संत जनाबाई, संत सखू, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई यांचा जीवन प्रवास अत्यंत कष्टमय होता. यांच्या शब्द सुमनांची वैजयंती माळा विठ्ठलाच्या गळ्यात पडली पण त्यासाठी समाजकंटकाची वासनांध नजर, कर्मठ रूढी परंपरांची तीक्ष्ण धारधार सुई काळजात आरपार टोचून घ्यावी लागली.

ऐतिहासिक कालखंडात स्त्री ने पौराणिक काळातील शस्त्र विद्येचा अभ्यास करून न्यायासाठी, संघर्षासाठी रणांगणात उतरली. छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मदात्री एकमेव ठरली. यानंतर अशी स्त्री जन्मली नाही असे खेदाने म्हणावे लागेल. कारण आजतागायत प्रति शिवाजी जन्माला आलेला नाही. शिवाजी महाराजांनंतर शिवशाहीतील दोन स्त्रीयांनी वर्षानुवर्षे तुरूंग वास भोगला. महाराणी येसूबाई, आणि ताराबाई या दोन स्त्रिया होत. एकीने स्वराज्यासाठी यवनी कैद स्विकारली तर ताराबाई सवती सुभ्यामुळे स्वराज्यातच कैदेत होत्या. महाराणी जोधाबाई, झाशीची राणी, राणी चन्नमा, चांदबिबी, मुमताज, रमाबाई, आनंदी बाई या स्त्रिया शेवटपर्यंत लढा देत गेल्या.

या सर्व इतिहासाचा मागोवा घेत सावित्री, रमाई, अहिल्याबाई, आनंदी जोशी, रमाबाई रानडे या स्त्रिया स्वतः साक्षर झाल्या. मुलगी शिकली प्रगती झाली हे ब्रीदवाक्य इतिहासात कोरले गेले ते यांनी केलेल्या समाज कायामुळे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला अत्यंत विश्वासाने मोठ मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. कला, उद्यम आणि संस्कृती या क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. पण चार भिंतीच्या आत आजची स्त्री अजूनही असुरक्षित आहे. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणार्‍या स्त्रिया त्यांच्या वेदना आजही कुठेतरी धुमसत आहेत.

कालची स्त्री आणि आजची स्त्री रूपे आणि स्वरूप बदलले आहे. पण त्याग, समर्पण, अवहेलना स्री ला आजही चुकलेली नाही. आजची स्त्री समाजात अर्थार्जनासाठी बाहेर पडताना आजही सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून पुरूषी अहंकाराचा सामना करीत कुटुंबाला सावरीत आहे. सत्ता, पैसा आणि वासना यांचा उपभोग घेण्यासाठी आजही स्त्री वापरली जाते, विकली जाते, रूढी परंपरांच्या नावाखाली नागवली जाते.

विभक्त कुटुंबाची वाढत जाणारी संख्या सासू सून संघर्ष, माहेरचे अती लाड, इगो प्राॅब्लेम, पैशाची गुर्मी यात अजूनही स्त्री प्रमुख पात्र म्हणून खेळवली जाते.

अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, पाळणाघर या समस्येला सामोरे जाणारी स्त्री समाजाकडून आजही दोषी ठरवली जाते. माता, भगिनी, पत्नी, सखी या रूपात समोर येणारी स्री आजही पुरूषी अत्याचाराला बळी पडत आहेत.

काळ बदललाय, माणूस बदललाय, जमाना बदललाय. . .असः नेहमी ऐकतो आपण. कोणी घडवले हे बदल? माणसानच आपली विचारसरणी बदलली आणि दोष बदलत्या काळाला आणि स्त्री ला पुरूष वर्ग परस्पर देऊन मोकळा झाला. आपण समाजात रहातो. . . समाजाचे देणे लागतो. . . ही संकल्पना प्रत्येकाने सोइस्कर अर्थ लावून बदलून घेतली. स्वतःची जीवनसंहिता ठरवताना प्रत्येकाने माणसापेक्षा पैशाला अधिक महत्त्व दिले अन तिथेच नात्यात परकेपणा आला.

चार पायाच्या प्राण्यांना

 हौसेने पाळतात माणसं

 दोन पायाच्या आप्तांना

 मोलानं सांभाळतात माणसं .

हे आजचं वास्तव आहे. विभक्त कुटुंब पद्धतीतून जन्माला आलेली ही विचार सरणी. आज ”हम दो हमारा एक” चा नारा लावणारे सुशिक्षित पाळीव, मुक्या प्राण्यांवर अतोनात भूतदया दाखवतात. अन जन्मदात्या आईवडिलांना मात्र वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. मी मी म्हणणारे सुशिक्षित पतीपत्नी दिवसरात्र घराबाहेर रहातात. नवी पिढी सोशल मिडिया नेटवर्किंग मधून स्वतःचे भविष्य साकारताना दिसते. एकविसाव्या शतकातील घर संवाद साधताना कमी पण वाद घालताना जास्त दिसतात. वाद वाढले की माणस माणसांना टाळायला लागतात. अशी नात्यातली अंतरेच नात्यात विसंवाद आणि दरी निर्माण करतात.

नवीन पिढीला आता संस्कारापेक्षा व्यवहार जास्त महत्वाचा वाटतो. पैसा असेल तर माणूस ताठ मानेने जगू शकतो हा अनुभव त्याला आपल्या माणसात दुरावा निर्माण करायला भाग पाडतो. जुन्या पिढीतील नातवंडे सांभाळणारी जुनी पिढी, त्यांचे विचार, नव्या पिढीला नकोसे वाटतात. ”पैसा फेको तमाशा देखो ” हे ब्रीद वाक्य घेऊन नवीन पिढी माणुसकी पेक्षा मतलबी पणाला प्राधान्य देताना दिसते.

वृद्धापकाळी हवा असलेला मायेचा ओलावा, समदुःखी, समवयस्क व्यक्ती कडून मिळाल्यावर एकटा जीव वृद्धाश्रमात आपोआप रुळतो. स्वतःच दुःख विसरायला शिकतो. प्रत्येक व्यक्ती आपला राग आपल्या व्यक्ती वर किंवा पगारी नोकरावर काढू शकते. .वृद्धाश्रमात या दोन्ही गोष्टी शक्य नसल्याने माणूस नव्याने जगायला शिकतो. स्वतःच्या विश्वात रममाण होण्यासाठी स्वतःच्या भावनांना आवर घालतो आणि हा नवा घरोबा स्विकारतो.

नवीन पिढीला घडविण्यात आजची स्त्री कुठेतरी कमी पडत आहे का? याचा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

आपण कुणाचा आदर्श घ्यायचा? कुणाचा आदर्श समोर ठेवायचा? आपली जबाबदारी, आपली कर्तव्ये हे सारे जर आपण आपल्या आर्थिक परिस्थितीशी निगडीत केले तर हा गुंता सोडवायला अतिशय कठीण जाईल.

आपण आणि आपली जबाबदारी यात जोपर्यंत ”आई बाबा ‘, यांचा समावेश होत नाही तोपर्यंत ही पळवाट आडवाटेन या समाजव्यवस्थेला, कुटुंब व्यवस्थाला दुर्बल करीत रहाणार यात शंका नाही.

मी माणसाचा आहे, घरातील बाई माणूस माझ्या कुटुंबाचा घटक आहे त्याच मन जपणे ही माझी जबाबदारी आद्यर्तव्य आहे हे जोपर्यंत पुरुष प्रधान संस्कृती मान्य करीत नाही तोपर्यंत ही पळवाट अशीच निघत रहाणार. आपण घडायचं की आपण बिघडायचं स्री ला आधार द्यायचा की भार व्हायचं हे आता ज्याचं त्यानचं ठरवायचं.

कालची स्त्री आणि आजची स्त्री हा विचार करताना मन‌ मात्र खालील काव्यपंक्तीवर स्थिर होते.

थोर महात्मे होऊन गेले, चरीत्र त्यांचे पहा जरा

आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा

या नररत्नांना जन्मणारी ही माऊली आज समाजात सुरक्षित आहे का? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 या देशाच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती पदावर राहण्याचा मान एका‌‌ स्त्री ला मिळूनही आजची स्त्री उपभोग्य वस्तू समजली जाते हे आपले दुर्दैव आहे. विश्वबंधुतेचा आणि समानतेच्या नारा देऊन आपण ही नारीशक्ती आद्य ईश्वराचे रूप मानून स्त्रीला संघटीत आणि सुरक्षित करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. तरच आपण अभिमानाने म्हणू शकू.

भारत माता की जय!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “स्वयंपाक घर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “स्वयंपाक घर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

 स्वयंपाक घरात होणारी चर्चा काहि ठराविक मुद्यांवरच होते. त्या मुद्यांचा जागतिक मुद्यांशी तसा संबंध नसतो. तसा असायचं कारणही नाही. कारण आज भाजी कोणती करु?… या प्रश्नाशी जागतिक बाजारातपेेठेेत मिळणार्‍या भाज्या कोणत्या. त्या पालेभाज्या आहेत का फळभाज्या. त्या करायच्या कशा… म्हणजे.  तेलावर का शिजवून.  पातळ भाजी का दाण्याचा कुट लावायचा. किंवा त्यांचे असलेले बाजारभाव याचा आपल्याशी काहीही संबंध नाही. अगदी खोबरं किंवा मिर्ची याचा ऊल्लेख आला तरी खोबर्याच्या बाबतीत राजापुरी खोबरं आणि मिर्ची बाबत सिमला मिर्ची अथवा लवंगी मिर्ची या पनवेेल किंवा सिमल्याची.  नाहीतर कोल्हापुरची सीमा ओलांडून पलिकडे आम्ही गेलो नाही.

 फारतर दिवाळी जवळ आली की फराळाचे पदार्थ करायचे का… कोणते… का विकत आणायचे… यावर चर्चा होते.  किंवा थांबते. तिथे काही दिवाळीत विकत घ्यायच्या फटाक्यांचे प्रकार किंवा बाण आणि संरक्षण क्षेत्राकडे असणारे अग्निबाण.  किंवा फटाक्यातले बाॅम्ब आणि सैन्याकडे असणारे बाॅम्ब यांंचा या र्चेचत संबंध नसतो.

 अधुुनमधूून कामवाली येणार नाही.  किंवा पाणी येणार नाही याचवेळी थोडी आणिबाणी जाणवायची. पण ती सुध्दा घरगुती. त्याचा जागतिक घडामोडींशी किंवा निर्माण झालेल्या आणिबाणी सद्रुष्य परिस्थितीशी संबंध नसायचा. त्यामुळे स्वयंपाक घरात जागतिक चर्चा होतच नव्हती. थोडक्यात स्वयंपाकघर आणि जागतिक घडामोडी यांच्या सीमा सुरक्षित ठेवल्या होत्या. कोणत्याही प्रकारे सिमोल्लंघन किंवा घुसखोरी नव्हती.

 दोन देशात काही बाबतीत शीतयुद्ध असत. पण आमची चर्चा शितकपाट म्हणजेच फ्रिज यात काय भरलंय याच विषयावर फ्रिज व्हायची. त्यामुळे तिथेही असणारा आंतरराष्ट्रीय प्रभाव तसा थंडच होता. पण आता मात्र त्या चर्चा बदलल्या होत्या.

 रशिया.  युक्रेन.  इस्रायल.  चिन.  अमेरिका आणि विशेषकरून डोनाल्ड ट्रंप यांचा विषय येतोच. म्हणजे भंंगार किंंवा रद्दी घेणारा.  भाजीवाला जस सहजपणे दोनचार वेळा दारावरून ओरडत जातो.  तितक्याच सहजपणे यांचा विषय होतो. कारण काय तर या सगळ्यांमुळे वाढत जाणारे सोन्या चांदिचे भाव. हमास या शब्दाचा वापर तर हमाम साबण जितक्या सहजतेने आणि सारखा सारखा वापरतो तेवढ्या सहजतेने वापरला जात होता.

 आता टमाटा आणि डोनाल्ड ट्रंप यांचा काहीच संबंध नाही. तरीही डोनाल्ड ची धोरणंतर टमाट्याच्या भावासारखी रोज बदलतात असा सूर लावत त्याच्या धोरणांना आम्ही सहज टमाट्याच्या बरोबर तोंडीलावायला घेतो. डोनाल्ड या नावाचाच राग आहे.

 मी मोबाईल वर ॲलन डोनाल्ड या क्रिकेट खेळाडूची एक ध्वनीचित्रफित बघत होतो. त्याच्या आवाजाने घरात विचारलं.  काय पाहताय येवढं. मी सहज म्हंटल.  ङोनाल्डचा व्हिडीओ आहे छोटासा.  छान आहे.

 झालं… डोनाल्डचा व्हिडीओ.  आणि चांगला.  यावरच आवाज इतका वाढला कि कदाचित ॲलन किंवा ट्रंप पैकी कोणताही डोनाल्ड जवळ असता.  किंवा दोघेही असते तर ते सुध्दा थोडावेळ गप्प बसले असते…

 काय म्हणतोय तो आता.. आता काय वाढवतोय… मग मला सांगाव लागलं कि हा वेगळा डोनाल्ड आहे. हा फास्ट बॉलर होता… तरीही डोनाल्ड या नावाचा राग काही गेला नव्हता…

 असेल फास्ट बॉलर… याची धोरणं डोक्यावरुन जातात. त्याचे बाॅल जात असतील. पण सगळं डोक्यावरुनच जात नं… त्याचा बॉल डोक्याला लागू नये म्हणून निदान हेल्मेट तरी वापरता येतं. याच्या डोक्यावरुन जाणाऱ्या गोष्टींसाठी काय वापरणार… डोक्यावरुन जाणारा चेंडू कसा टाकायचा.  यासाठी तरी तो तुुमचा डोनाल्ड डोकं वापरत असेल. पण या डोनाल्डच्या डोक्याच काय… आता या युक्तीवादावर मी काय बोलणार… मी आपलं अंपायर्स काॅल सारखा निर्णय मान्य केला.

 हा राग काहि येवढ्यावरच थांबला नाही. पुढे सुरुच होतं.

 याचा राग कशावर.  तर आम्ही दुसरीकडून घेत असलेल्या तेलावर. अरे तुला काय त्याच्याशी. तुला विकायच तर आम्हाला परवडेल त्या किमतीला विक… आम्ही पाच किलो तेल घ्यायला बाजारात गेलो तरी दोन ठिकाणी तेलाचे भाव पाहतो… तुला जमत असेल तर दे.  नाहीतर जा तेल लावत… हे याचं म्हणजे वडाच तेल वांग्यावर काढण्यासारख आहे. यावर तेलाचा आंतरराष्ट्रीय विचार थांबतो. नाहीतर हे तेल प्रकरण इतक गरम झालं असत कि भक्त प्रल्हाद सारखं यालाही गरम तेलात टाकण्याची शिक्षा दिली असती.

 हा संताप किंवा राग थांबला अस वाटत होत. तेवढ्यात एक मित्र सपत्नीक आला. त्याचा दात दुखत असल्याने संध्याकाळी तो दाताच्या डाॅक्टरांकडे जाऊन आला होता.

 तो म्हणाला.  डाॅक्टरांनी त्याचे सहज दिसणारे दात त्यांच्या भिंगाच्या सहाय्याने पाहिले. दोनचार प्रश्न विचारले आणि म्हणाले.  फार काहि नाही.  थोडी मोकळी जागा आहे तिथे फक्त थोडी चांदी भरावी लागेल. इतकच. झालं… त्यावरून परत चर्चा सुरु झाली…

 काय भाव वाढत चाललेत चांदिचे. यांना काय लागत फक्त थोडी चांदी भरा म्हणून सांगायला. अगोदर ब्लड रिपोर्ट करणारे यांच्या संबंधातले असतात अस म्हणत होतो. आतातर चांदिवालेपण मिळालेले वाटतात. आणि जी चांदी वरुन दिसणारच नाही ती भरुन करायचं काय.. चाटायची आहे… चाटायची म्हंटली तरी दाताच्या खालीच असणार… कशी पुरणार जिभ…

 माझ्या पायातली साखळी किंवा अंगठी केली तर दिसेल किंवा दाखवता येईल. पण दातातल्या चांदिच काय करणार… ते काही हत्तीचे दात आहेत दिसायला.

असं म्हणत मित्राची बायको माझ्या बायकोबरोबर स्वयंपाक घरात गेली… आणि परत स्वयंपाक घरातल्या चर्चेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ आला…

 

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नमस्कार… ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ नमस्कार… ☆ सौ शालिनी जोशी ☆

☆

नमस्कार

भारतीय संस्कृतीचे एक विलोभनीय वैशिष्ट्य म्हणजे नमस्कार. नमस्कारायची सुरुवात सकाळी उठल्यापासूनच होते.

‘समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले l विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे’

समुद्र, पर्वत यांना धारण करणाऱ्या विष्णुपती लक्ष्मीला पदस्पर्श करण्याआधी तिला नमस्कार करून तिची क्षमा मागणारी आपली संस्कृती आहे. भूमी विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आदर व्यक्त करण्याचा भाव यात आहे. नंतर स्नान झाल्यावर देवाला, आई-वडिलांना, घरातील जेष्टाना, गुरुना नमस्कार करणे व त्यांचे आशीर्वाद घेणे दोन्ही तितकेच महत्त्वाचे. नमस्कारात प्रेम, आदर, नम्रता, सद्भाव आहे.त्यानंतर मिळणारा आशीर्वाद दिवसभराच्या कार्याला यश देणारा,सत्कार्याची प्रेरणा देणारा असतो.

नमस्काराला वंदन,नमन, प्रणाम, प्रणिपात, अभिवादन, असे प्रतिशब्द आहेत. विनय हे नमस्काराचे मूळ आहे. दोन्ही तळवे एकमेकांना चिकटून सरळ छातीवर, आणि मस्तक श्रद्धेने वाकलं की नमस्कार होतो. तेथे अहंकार नाही. नम्रता, आदर, प्रेमभाव असावा. वंदन म्हणजे नमस्कारच पण श्रद्धा जास्त. ‘वंदे मातरम्’ म्हणून मातृभूमीला तसेच ध्वजवंदन म्हणजे ध्वजाला वंदन करतात. नवविधाभक्ती मध्ये वंदन भक्ती आहे.

देव, गुरु,आचार्य, सत्पुरुष यांना साष्टांग नमस्कार करतात. साष्टांग म्हणजे स अष्टांग, आठ अंगे जमिनीला टेकून केलेला नमस्कार. दोन पाय, दोन गुडघे, दोन हात, नाक व कपाळ. यात पूर्ण शरणागती व्यक्त होते. हाच प्रणिपात ऋजुता, नम्रता सांगणारा.

सूर्यनमस्कार ही भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ नमस्कार पद्धती आहे.हे बारा भागात घातले जातात. याचे शारीरिक व मानसिक फायदे आहेत. व्यायाम व आसने दोन्ही साधतात. कोणत्याही साधनाशिवाय करायची ही भारतीय पद्धत आता जगन्मान्य झाली आहे.

आपली संस्कृती सर्वाभूती परमेश्वर पाहणारी आहे.त्यामुळे ‘दीपज्योती नमोस्तुते’ म्हणून साऱ्या तेज तत्वाला नमस्कार. नदीतही मनुष्यत्व बघून तिची ओटी भरून नमस्कार केला जातो. समुद्राला नारळ आपण करून जलतत्त्वाची पूजा असते. वृक्ष पूजा तर सर्वांना माहीतच आहे. एकंदरीत नमस्कार भारतीय संस्कृतीचे सौंदर्य आहे. चूक झाल्यास नमस्कार करून माफी मागितली म्हणजे तोच नमस्कार संरक्षक कवच होतो. भारतात धर्म,भाषा, वेशभूषा यात विविधता असली तरी नमस्कार सगळ्यात आहे. प्रपंच्यात, परमार्थात, स्वागत आणि निरोपातही नमस्काराला स्थान आहे. समोरच्या व्यक्तीला रामराम म्हणून नमस्कार करणे म्हणजे स्वतःच्या व दुसऱ्याच्या हृदयस्थ रामाला नमस्कार होतो. सर्वात तोच आत्मा हा भाव समानता प्रस्थापित करतो. आपोआप राग, द्वेष दूर होतात. दोषरहीत दृष्टीने सर्वत्र भगवंत पाहणे हीच नमन भक्ती.

ग्रंथारंभी किंवा शुभकार्याच्या आरंभी संबंधित सर्वांना नमस्कार करण्याची प्रथा आहे. यातून कार्यपूर्तीसाठी त्यांचे आशीर्वाद मिळतात. ग्रंथाची सुरुवात ‘श्री गणेशाय नमः’ने करतात.‘नमस्ते नमस्ते’ असे दोनदा म्हणल्याने त्याची तीव्रता वाढते.’ सर्वदेव नमस्कार: केशवं प्रतिगच्छति l’हा विश्वात्मक भाव नमस्कारातून व्यक्त होतो. गुरु हा नेहमी वयाने मोठा असतो असे नाही. तेव्हा आपल्यापेक्षा लहान गुरु असतात तरी त्याला नमस्कार करावा. हा त्या गुरुतत्त्वाचा मान असतो. कन्या पूजनाच्या वेळी कुमारीकेला व बटू पूजनाच्या वेळी बटूला नमस्कार करतात. डोळे मिटून देवतेला नमस्कार करताना देवतेचे ध्यान होऊन सुख समाधान प्राप्त होते.मानसिक आरोग्य चांगले राहते.

नमस्काराचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. हाताने पायाला स्पर्श करून मस्तक खाली वाकवतात. काहीजण चरणावर मस्तक ठेवतात. काहीजण हस्तालोंदन करतात. कोणी आलींगन देतात. कोणी नुसतेच कमरेत वाकतात. तर कोणी टोपी, पागोटे काढतात. पत्रातही ज्याला आपण पत्र लिहितो, त्याला नमस्कार लिहून मग लिखाणाला सुरुवात केली जाते. अशा प्रकारे नमस्कार हा साधा, सोपा, बिन कष्टाचा पण लाभदायक आहे.

 या कारणें नमस्कार श्रेष्ठ l नमस्कारें वोळती वरिष्ठ ll

(दा.४/६/२५)

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १० … ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अभंगातून समजलेले संत तुकाराम

गाथेतील एकेक अभंगांचे वाचन करत असताना संत तुकारामांचे पांडुरंगाशी असलेले भक्तीचे नाते आपल्याला हळु. हळू उलगडत चालले आहे. हे भक्तीचे नाते कायम तसेच राहावे एवढेच त्यांचे देवाकडे मागणे आहे. म्हणून ते म्हणतात, “अनेक जन्मात माझे आचरण चांगले नव्हते. म्हणून हे देवा मला तुमच्या पायांचा वियोग झाला. मात्र या जन्मात काहीतरी चांगले कर्म माझ्या हातून घडले असावे, आणि म्हणूनच तुमची माझी भेट झाली. आता तुम्ही कृपा करा. मी अपराधी, दुराचारी आहे. संसाराच्या तापाने त्रस्त झालो आहे. माझ्या अंतरंगातील काम, क्रोध, कल्पना विक्षेप यामुळे मी तुमच्या पर्यंत पोहोचत नाही असे झाले आहे. इकडे संसार धड नाही, तिकडे परमार्थात गती नाही, अशी माझी कुचंबणा झाली आहे मी निरुपयोगी ठरलो आहे”

 हा न तोसा ठाव झाला पांडुरंगा/

 नयेची उपेगा काय करू/

 आपुलिया नावा धावुनिया धावे/ लवकर यावे तुका म्हणे//

 अशा परिस्थितीत हे पतितपावना, तुझे नाव सार्थ कर आणि माझ्याकरता धावत ये.

 आता या अभंगात तुकाराम बुवा काय म्हणतात?

 कारे तुम्ही ठेवा बहुतानिमित्ते/

 माझीया संचिते वोढवले/

 भक्ती प्रेम गोडी बैसली जिव्हारी/

 आनंद अंतरी येणे झाला/

 पुसले पडळ तिमिर विठ्ठले/

 जगती भरले ब्रह्मानंदे//

 तुका म्हणे केलो कामने वेगळा/

 आवडी गोपाळा असे वरी//

तुकाराम लोकांना सांगत आहेत की जन हो, मी संसाराचा त्याग केला म्हणून तुम्ही माझ्यावर आरोप करता, पण खरं सांगायचं तर हेच माझं संचित आहे. माझ्या अंतःकरणातील विठूच्या प्रेमामुळे माझ्या दृष्टीतील अज्ञानाचा अंधार दूर झाला आहे, आणि मला सर्व जग ब्रह्मानंदाने भरलेले दिसत आहे. मी कामनाशून्य होऊन माझ्या मनात फक्त एका कृष्णाची प्रीती आहे.

या ठिकाणी संत तुकारामांची देह बुद्धी पूर्णतया  विनाश पावली आहे.

 आमुची विश्रांती/ तुमचे चरण कमळापती/

 हेचि एक जाणे/ काया वाचा आणि मने/

 नीच जना लोका/ तळील पायरीस तुका//

या ठिकाणी तुकाराम महाराज स्वतःस सर्वांहून नीच म्हणजे खालच्या पातळीवरचा असे संबोधित आहेत. देवा, तुमच्या चरणांवर अनेक भक्त लोटांगण घालतात, त्या सर्व भक्तात मी खालच्या तळाच्या पायरीवर आहे.

खरा भक्त हा नेहमी लीन असतो, विनम्र असतो हेच आपल्याला तुकारामांचे रूप या अभंगात पहावयास मिळते.

 संत प्रवृत्तीचे तुकाराम महाराज कसे होते यासंबंधी अधिक माहिती या खालील अभंगातून आपल्याला मिळते.

  होईल तो भोग/ भोगीन आपुला/

 न घालीन विठ्ठला/ भार तुज//

 तुम्हा पासाव हे / इच्छितसे दान/

 अंतरीचे ध्यान/ मुखी नाम//

 नये काकुळती/ गर्भवासासाठी/

 न धरी हे पोटी/ भय काही//

 तुका म्हणे मज/ उदंड एवढे/

 नाचेन मी पुढे/ मायबापा//

“विठ्ठला, प्रारब्धाने मला जे भोग भोगायचे असतील, ते मी आनंदाने भोगीन. तुझ्यावर त्याचा जराही भार टाकणार नाही. मला तुझ्याकडून हेच दान हवे आहे. तुझे ध्यान माझ्या अंतरंगात सदैव राहो आणि तुझे नाम माझ्या मुखी अखंड राहो. मला गर्भवासाचे भय नाही.

अनेक जन्म मला मिळाले तरी हरकत नाही, फक्त माझी एकच मागणी तू पूर्ण केलीस तर तुझ्यापुढे मी प्रेमभराने सदैव नाचत राहीन. “

सदैव भगवंताची भक्ती आणि प्रीती अंतरंगात राहावी एवढी एकच इच्छा तुकाराम त्यांच्या अनेक अभंगांतून वेळोवेळी व्यक्त करतात. परमेश्वराच्या दर्शनासाठी कितीही जन्म घेण्याची त्यांची तयारी आहे. ते देवाकडे मोक्षाची याचना करत नाहीत.

कधी कधी तुकाराम महाराज लहान होऊन आपल्या मायबापांकडे बाल हट्ट करतात.

 भोगलो मी आता/ आपुल्या स्वभावे/

 कृपा करून देवे/आस्वासीजे//

मी सांसारिक नित्य कर्म करून फार थकलो आहे, तेव्हा कृपा करून तुम्ही मला असे आश्वासन द्या की,

 देऊनी आलिंगन/ प्रीतीच्या पडीभरे/

 अंगेही दातारे/ निववावी//

 उदार अंतकरणाने हे देवा, तुम्ही मला आलिंगन देऊन माझ्या थकलेल्या शरीराला शांत कराल.

 अमृताची दृष्टी/ घालूनिया वरी/

 शीतळ हा करी/ जीव माझा//

 तुमच्या अमृतरुपी कृपादृष्टीचा वर्षाव करून माझ्या जीवाची तळमळ शांत कराल.

 घेई उचलोनी /पुसे तहानभूक/

 पुसी माझे मुख/ पितांबरे//

माझी तहानभूक जाणून मला कडेवर उचलून घ्याल, आणि माझे मुख आपल्या पितांबराने स्वच्छ कराल.

 बैसोनिया माझी धरी हनुवटी/

 ओवाळूनी दिठी करुनी सांडी//

  तुका म्हणे बापा अहो विश्वंभरा/

 आता कृपा करा ऐसी काही//

मला आपल्या मांडीवर घेऊन माझी हनवटी धराल, माझी दृष्ट काढाल, अशा प्रकारे विश्वंभरा तुम्ही माझ्यावर कृपा कराल. मला असे आश्वासन द्या.

काय हा तुकारामांचा बालहट्ट! भक्ताचे व देवाचे नाते कसे अधिकाराचे होऊ शकते हे आपल्याला या अभंगातून अगदी सहज समजते.

सतत पांडुरंगाचा धावा केल्याने तुकाराम महाराजांना पंढरीच्या विठोबाचे आता दर्शन घडलेले आहे आणि त्यामुळे धन्यता पावलेले तुकाराम ब्रह्मानंद अवस्थेत बेधुंद होऊन गात आहेत.

 पावलो पंढरी वैकुंठ भुवन/

 धन्य आजी दिन सोनियाचा//

 पावलो पंढरी आनंद गजरे/

 वाजतील तुरे शंखभेरी//

पावलो पंढरी क्षेम आळिंगणी/

 संत या सज्जनी निवविलो//

 पावलो पंढरी पार नाही सुखा/

 भेटला हा सखा मायबाप//

 पावलो पंढरी येरझार खुंटली/

 माऊली वोळली प्रेम पान्हा//

 पावलो पंढरी आपुले माहेर/

 नाही संसार तुका म्हणे//

भू वरचे वैकुंठ म्हणजे पंढरपूर, या ठिकाणी तुकाराम महाराज येऊन पोहोचले आहेत आणि त्यांचा दिवस धन्य धन्य झाला आहे. पंढरीत संत जनांनी त्यांना प्रेमाने आलिंगन दिल्यामुळे त्यांचे सर्व श्रम निमाले आहेत. मायबाप पांडुरंगाच्या भेटीने त्यांच्या आनंदाला पारावार नाही. आता जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्यांची कायमची सुटका झाली आहे. विठाईच्या प्रेम पान्ह्याने त्यांना आता संसाराचे बंधन राहिले नाही. या ठिकाणी परमेश्वराशी ते संपूर्णपणे एकरूप झाले आहेत.

 जय जय विठ्ठल/ श्री हरी विठ्ठल/

 विठ्ठल विठ्ठल/ पांडुरंग//

 क्रमशः… १०  

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- सगळं सुरळीत पार पडणार हेच मी गृहीत धरलं होतं आणि ते गृहितच असं चुकीचं ठरू पहात होतं. त्यामुळेच सहजसाध्य वाटणारंच आता अप्राप्य होऊन बसलं. म्हणूनच माझी चलबिचल सुरू झाली आपल्या हक्काचं कांहीतरी नाकारलं जात असल्याची रुखरुख माझं मन पोखरू लागली.

 अखेर काय निष्पन्न होणार हे नेहमीप्रमाणे ‘तो’च तर ठरवणार होता!)

मी स्वतःचीच अशी समजूत घातली खरी पण तरीही त्या रात्री अंथरुणाला पाठ टेकली तेव्हा पुन्हा हेच सगळे विचार मनात गर्दी करू लागले.

“आपण नंतर बोलू यावर, ठरवू काय करायचं ते.. “असं वखरेसाहेब म्हणाले होते. पण ठरवू म्हणजे कधी? अर्ज करायची मुदत तर एक एक दिवस संपत चालली होती. आणि ‘ठरवू काय ते’ म्हणजे काय? त्यांनीच ठरवायचं कां? की मी? मीच जर ठरवायचं असेल तर मी ते ठरवलं होतंच ना? पण हायर मॅनेजमेंटला फक्त

अनप्रॉडक्टिव्ह स्टाफच कमी करायचा होता म्हणे. पण उर्वरित स्टाफपैकी ज्यांचे हितसंबंध अडचणीत येतील ते लिटिगेशन्स सुरू करण्याची शक्यता गृहित धरून सदर योजनेच्या नियमावलीत ही योजना सर्वांसाठीच खुली ठेवली गेली होती. हायर ऑथाॅरिटीज् कडून त्यामुळेच सर्व झोनल व रीजनल हेडस् ना बँकेतील संपूर्ण कारकीर्द चांगली असणाऱ्या स्टाफ मेंबर्सना सदर योजनेचा लाभ घेण्यापासून परावृत्त करण्याच्या तोंडी तरीही स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या होत्या!!

अशा सगळ्या पार्श्वभूमीवर सदर योजनेचा लाभ घेणे कायद्यानुसार मला शक्य असूनही, वखरेसाहेबांना दुखवून कांही करण्याची माझी इच्छा नव्हती. पूर्ण विचारांती मला जाणवले ते हेच की आपल्याला या संधीचा लाभ घेता येणार नाही या विचाराने नव्हे, तर वखरे साहेबांना दुखवून तो लाभ मला घ्यावा लागेल या शक्यतेचा मला त्रास होतोय. हे जाणवलं आणि मन थोडं शांत झालं. आपण फार घाई गडबड न करता एक-दोन दिवस वाट बघून, त्यांचा कल पाहून त्यांच्याशी बोलू. आपली नेमकी बाजू त्यांना पटवून देऊ. पुढं काय करायचं ते ते वेळ येईल तेव्हा ठरवू असा विचार केला आणि मी निश्चिंत झालो.

याबाबतचे विचार आणि चलबिचल वखरेसाहेबांच्या मनातही होतीच हे मला दुसऱ्या दिवशी बँकेत गेल्यानंतर लगेचच जाणवलं. कारण मी कांही कामानिमित्त त्यांच्या केबिनमधे गेलो तेव्हा माझं नेमकं काय काम आहे हे जाणून न घेता त्यांनी मी या विषयाबद्दलच बोलायला आलोय हे गृहितच धरलं असावं तसं मला विचारलं,

” मग काय ठरलं तुमचं? “

प्रश्न अनपेक्षित होता. त्यामुळे पटकन् मला काय बोलावं सुचेना. पण तरीही मला हा निर्णय घेण्यामागची कांहीतरी वेगळीच खोटी कारणं पुढे करणं किंवा अगदी हिशोबीपणाने बोलून माझ्या निर्णयाचं समर्थन करणं नको होतं. मला या निर्णयापर्यंत येण्यामागची माझी खरी भूमिका अतिशय मोकळेपणाने त्यांना सांगायची होती आणि त्यासाठी हीच वेळ योग्य आहे हे लक्षात आलं. तरीही, त्यांनी मला विचारलं म्हणून लगेच उतावीळपणाने कांही बोलण्यापेक्षा मला थोडं थांबावंसं वाटलं म्हणून मी म्हंटलं,…

“आपण नंतर सविस्तर बोलू असं म्हणाला होतात ना तसं आत्ता तुम्ही बिझी असाल तर एक-दोन दिवसांनी हवंतर बोलूया कां? “

” तसं तर कामं कधीच संपणार नाहीयत. केव्हातरी बोलायला हवंच. बसा. आधी तुम्ही कशासाठी आला होतात ते काम आवरू, मग बोलू. ” ते मनापासून म्हणाले.

” ते महत्त्वाचं असलं तरी तसं खूप अर्जंट नाहीय. आॅडिट रिपोर्टवरील क्वेरीजच्या रिप्लायचा ड्राफ्ट मी बनवलाय. तो दाखवायला आलो होतो. तुम्ही एकदा बघून घेतलात तर… “

मी पुढे केलेली फाईल त्यांनी हातात घेतली आणि टेबलवर बाजूला ठेवून दिली.

” ते मी नंतर वाचून बघतो. मग? काय ठरलं तुमचं? ” त्यांनी थेट विषयालाच हात घातला.

“या स्वेच्छानिवृत्ती योजनेकडे मी मला उमेदीच्या वयात मिळणारं १० वर्षांचं ‘बोनस लाईफ’ म्हणून बघतो. ” मी सांगू लागलो. या निर्णय प्रोसेसमधे माझ्या मनात येऊन गेलेले उलटसुलट विचारच निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी स्वत:शीच एकदा तपासून पहावेत तशा प्रामाणिकपणाने मी बोलत राहिलो. माझं आर्थिक नियोजन, इतकी वर्षं मला मनासारखे जोपासता न आलेले माझे आवडते छंद, करायची तीव्र इच्छा असूनही केवळ वेळेअभावी करता न आलेल्या आणि दहा वर्षानंतर कदाचित सगळी उमेद/उत्साह संपून गेल्यानंतर इतक्या असोशीने पुढे कधी करता यायची शक्यताच नसलेल्या अशा कितीतरी गोष्टी, सगळं त्यांना अगदी मोकळेपणानं सांगून टाकलं.

“घरी बोललायत हे सगळं? “

” नाही. कारण बायको आणि मुलगा दोघांनाही हे सगळं माहिती आहे. आर्थिक नियोजनाबद्दल मात्र मी त्यांच्याशी मोकळेपणाने बोललोय. संपूर्ण घरखर्च आणि संसारातल्या माझ्या इतरही सगळ्याच जबाबदाऱ्या या स्वेच्छानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या अतिरिक्त आर्थिक लाभातूनच व्यवस्थित मॅनेज होऊ शकतायत याचीही त्यांना कल्पना दिलीय. माझा मुलगा हुशार आहे. तो सी. ए. ची तयारी करतोय. इंजीनियरिंग किंवा मेडिकलला न गेल्यामुळे त्याच्या शिक्षणाचा खर्च तसा कांहीच नाहीय. उलट त्याने ‘स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतर तुम्ही पैसे कमावण्यासाठी दुसरीकडे कुठेही नोकरी करायची नाही’ अशी अटच घातलीय. या निवृत्तीमुळे मला न मिळू शकणारी एकच गोष्ट म्हणजे एरवी मिळण्याची शक्यता असलेली पुढची प्रमोशन्स! पण त्याचा हव्यास मला यापूर्वीही कधी नव्हताच. आजपर्यंत त्या त्या वेळी मला सगळं मिळत गेलंय आणि जे मिळालं त्यात मला समाधान आहे. एरवीही यापुढच्या उच्चाधिकार पदांपासून मिळणारं समाधान किती फसवं आहे याचा अनुभव आपल्यापैकी सर्वजण घेत आहोतच ना साहेब? त्यापेक्षा स्वेच्छानिवृत्ती नंतर मी आधी सांगितलेल्या सर्व गोष्टींमधून मला मिळणारं समाधान माझ्यासाठी अधिक मोलाचं असेल. “

वखरेसाहेब शांतपणे ऐकत होते.

” हे खरंतर योग्यच आहे, पण एम्. डीं च्या सूचनांचं काय करायचं? ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत असणं शक्यच नाही.. ” त्यांच्या बोलण्यातली असहायता मलाही अस्वस्थ करून गेली.

” एक मार्ग आहे सर.. ” मी म्हणालो आणि अगदी ऐनवेळी आपल्याला हे नेमकं सुचलंच कसं याचं मलाच आश्चर्य वाटू लागलं.

“कोणता मार्ग? ” त्यांनी उत्सुकतेने विचारलं.

“मी सर्क्युलरनुसार योग्य मुदतीत माझा अर्ज सबमिट करतो. त्याखेरीज बँकेचं हित लक्षात घेऊन माझा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज

मॅनेजमेंटने नाकारला, तर मी बँकेचा निर्णय विनातक्रार स्वीकारेन आणि त्याविरुद्ध कोणतीही लिटिगेशन्स सुरू करणार नाही असं लेखी आश्वासनही मी तुमच्याकडे देऊन ठेवीन. “

“त्याने काय होईल? “

“मॅनेजमेंटला लिटिगेशन्सचीच भीती आहे ना? माझ्याबाबतीत तरी ती रहाणार नाही. आणि त्याचा मला फायदा एकच. उद्या माझ्यापुढे कशी वेळ येईल आज सांगता येणार नाही. कोणत्याही प्रकारचे मतभेद निर्माण झाले तर तेव्हाचे माझे वरिष्ठ “तुम्हाला बँकेने बाहेर पडायचा मार्ग खुला करून दिला होता ना? जबाबदाऱ्या झेपणार नव्हत्या तर तेव्हाच बाहेर पडायला हवं होतंत” असं मला म्हणाले तर मला मिळालेलं स्वेच्छानिवृत्ती नाकारल्याचं पत्र एखाद्या ‘सन्मानपूर्वक सर्टिफिकेट’ सारखं मी त्यांना दाखवू तरी शकेन. साहेब, इथे काही दिवसांपूर्वीच झालेल्या तुमच्या केबिनमधल्या एम्. डी. मीटिंग मधली, तुमचा कांहीही दोष नसताना तुम्हाला दिली गेलेली अपमानास्पद वागणूक आणि त्यावेळी तुमची झालेली मनोवस्था मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली तेव्हाच आपण जसजसे वर जाऊ तसतशी तिथली हवाही कशी विरळ होत जाणाराय याचं प्रत्यंतर आपल्यापैकी सर्वांना आलेलं आहेच. आणि आज तेच मला योग्य दिशा दाखवून गेलंय. ही स्वेच्छानिवृत्ती त्यामुळेच मला आयुष्यात फक्त एकदाच उपलब्ध होणारी अमूल्य संधी वाटतेय एवढंच. “

वखरेसाहेब मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. माझं बोलणं संपलं तसं ते भानावर आले. समोरच्या ग्लासमधलं घोटभर पाणी पिऊन ते शांतपणे म्हणाले,

” खरं आहे तुमचं. माझ्याकडून तुम्हाला कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. आणि ते लेखी पत्र वगैरे द्यायचीही कांही गरज नाहीय. वरून कुणी कांही विचारलंच तर त्यांना काय सांगायचं ते मी बघेन. यू गो अहेड.. “

अतिशय अनपेक्षितपणे माझ्या डोक्यावरचं ओझं त्यांनी किती अलगद उतरवून घेतलं होतं! त्यांचे आभार मानून मी जायला वळणार एवढयांत त्यांनी मला थांबवलं.

“लिमये, माझ्या घरच्या जबाबदाऱ्या अजून पूर्ण व्हायच्यात. त्या झाल्या असत्या तर आज मीही हाच निर्णय घेतला असता. सोs… यू आर आॅन राईट ट्रॅक. आॅल द बेस्ट. एंजाॅय अॅण्ड बी हॅप्पी…! “

त्याचं बोलणं हे माझ्यासाठी सदिच्छाच नव्हत्या फक्त तर त्यांच्या तोंडून ‘तो’ च देत असावा असा शभाशीर्वादही होता…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ यंत्र आणि मानव… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ यंत्र आणि मानव… ☆ सौ शालिनी जोशी ☆

☆

यंत्र हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. यंत्रामुळेच आपले जीवन सहज, सुलभ, कमी कष्टाचे व आनंददायी झाले आहे. आपण कोणतेही नवीन यंत्र घेतो, तेव्हा त्याची पूजा करून त्याचे स्वागत करतो. यात आनंद असतो. पण ज्यावेळी जुन्या, कार्यक्षमता संपलेल्या यंत्राला निरोप द्यायची वेळ येते, तेव्हाही आपले मन तेवढेच हळवे होते. इतके दिवस त्या यंत्राने केलेल्या मदतीच्या ऋणाची भावना त्यात असते.

मिग २१ विमानांच्या निरोपाची बातमी वाचली. आपल्या संरक्षण व्यवस्थेचे महत्त्वाचे अंग असलेले, सहा दशके हवाई दलात सेवा दिलेली ही विमाने चंदीगड हवाई दलावर समारंभपूर्वक निवृत्त झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अखेरच्या उड्डाणाचे वैमानिक हवाई दलप्रमुख एअरचिफ मार्शल अमरप्रीतसिंग हे सहभागी झाले होते. निरोप देताना सर्व वायूवीरांचे मन दाटून आले. सर्वच सैनिकांची भिस्त शेवटी यंत्रावर असते. त्यामुळे यंत्राशी त्यांचे भावनिक नाते निर्माण होते. प्रत्येक यंत्राला त्याच्या स्वरूपा नुसार एक प्रथा, परंपरा, विशिष्ट कार्य संस्कृती प्राप्त झालेली असते. त्याचा अंगीकार वीर सैनिक करतात. त्याचे त्यांना सवय होते. व्यवहारातही हाच आपला अनुभव असतो.

विहित कालावधी पलीकडे माणूसही जगत नाही. तेथे यंत्राचे काय? हीच गोष्ट इतर सर्व क्षेत्रातील यंत्रांच्या बाबतीत घडत असते. जुने जाणे ही नवनिर्मितीला प्रेरणा ठरते. जुने मागे पडून, नवीन तयार होणारी यंत्रे जास्त सुधारित, उपयुक्त व वापरायला सोपी असतात.

अश्मयुगात माणसाकडे काहीच नव्हते. मग आपल्या संरक्षणासाठी व इतर कामासाठी माणसाला साधनांची गरज भासू लागली. त्यावेळी संरक्षणासाठी टोकदार दगड वापरत. त्यात सुधारणा होत भाले, बरच्या, तलवारी, बंदुका,——- रणगाडे अशी प्रणाली निर्माण होत गेली. पदार्थ कुटण्यासाठी घेतलेल्या दोन दगडातून——- जाती, गिरण्या, मिक्सर अशी यंत्रे निर्माण झाली. सर्वच क्षेत्रात अशी प्रगती झाली आणि होत आहे. शेतकऱ्यांसाठी खुरपे, कुदळ, नांगर—- ट्रॅक्टर आले. लिहिण्यासाठी बोरु, टाक, पेन— लॅपटॉप, स्मार्टफोन ने तीही गरज संपली. बैलगाड्या—- विमाने अशी  वाहने बदलली. सर्वच क्षेत्रातील साधनात विविधता आली .आणि ही सारी यंत्रेच.

खरंतर आपली संस्कृती निसर्गाशी निगडित, त्यावर अवलंबून. म्हणून पशु,पक्षी, चंद्रासारखे ग्रह, सूर्यासारखे तारे, समुद्र,भूमी यांना आपण सणात मान देतो. देवतारूप देऊन त्यांची पूजा करतो. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. तीच गोष्ट यंत्रांची. यंत्रे आपण निर्माण केली. पण त्यांच्यामुळे आपले जीवन सुलभ, सोपे, कमी कष्टाचे आनंददायी व सुखकर झाले. त्याची आठवण ठेवून, नवरात्रात अश्विन शुद्ध नवमीला यंत्र पूजा केली जाते. यंत्राची स्वच्छता करून त्याची पूजा करणे म्हणजे त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. त्या जड यंत्रातही आपण देव पहातो. झेंडूच्या फुलांनी त्याची सजावट करतो. मोठ्या कारखान्यापासून घरगुती स्वरूपापर्यंत हे पूजा होते. मात्र मध्य युगात लढायांचे प्रमाण वाढले. त्यामुळे यंत्र पूजा ही शस्त्रपूजा झाली. आणि त्याला खंडेनवमी म्हणून लागले. कारण खड्ग म्हणजे तलवार, त्याचे खंडे झाले. अशीही आपली संस्कृती गुढ आहे.उदार आहे.निसर्गा सकट सर्व उपयोगी वस्तूंची  काळजी घेऊन माणसाने सुखाने जगावे हा हेतू.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माती भिडली आभाळा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ माती भिडली आभाळा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘गारंबीचा बापू ‘ या चित्रपटात शांता शेळके यांचं एक सुरेख आणि अर्थपूर्ण गाणं आहे.

‘अजब सोहळा, माती भिडली आभाळा… ‘

रवींद्र साठे यांनी असं काही भावपूर्ण आवाजात गायिलं आहे की मला हे गीत नेहमी गूढ, गंभीर आणि रहस्यमय वाटत आलं आहे. पण त्यातील अर्थ जाणवावा, त्याचा प्रत्यय यावा असाच काहीसा अनुभव परवाच्या दिवशी आला. मी पुण्याहून गावाकडे परत येत असताना नगर-औरंगाबाद रस्त्यावर नेवासे फाटा लागतो. अनेकदा येताना जाताना या गावावरून गेलो आहे. पण परवा सहज मनात आलं की हेच ते नेवासा ना जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली? आपण कधी गेलो का तिथे? मग ठरवलंच की परत जायला कितीही वेळ होवो, आज आपण तिथे जायचंच आणि त्या पवित्र ठिकाणाचं दर्शन घ्यायचं.

मुख्य रस्त्यापासून आणि नेवासे फाट्यापासून नेवासे गाव साधारणपणे पाच किमी आत आहे. जाताना मध्ये थोडाफार कच्चा रस्ता लागतो. पण माऊलींचं दर्शन घ्यायचं एकदा मनानं घेतलं की रस्ता कच्चा असो की चांगला, सहज पार होतो. गावात शिरता शिरता एकाला विचारलं, ‘ माऊली? ‘ एवढा एकच शब्द पुरेसा होता. त्याने लगेच मंदिराच्या दिशेकडे बोट दाखवलं. माऊली म्हटलं की झालं. कोण माऊली असा प्रश्न पडत नाही एवढी थोरवी त्या एकाच माऊलीची. मंदिराकडे जाताना सुंदर हिरवीगार शेतं मन आकर्षून घेत होती. माऊलींच्या मंदिरासमोरचा परिसर निसर्गरम्य, शांत आणि प्रसन्न भासत होता. मंदिरासमोर चिंचा लगडलेली छान चिंचेची झाडं. झाडाखालीच एक माऊली हार आणि प्रसाद विक्रीसाठी घेऊन बसलेली. तिच्याकडून दोन हार आणि प्रसाद घेतला. कमानीतून मंदिराच्या आवारात प्रवेश केला. मंदिराचे आवार प्रशस्त, शांत, स्वच्छ अन प्रसन्न.

थोड्याशा पायऱ्या चढून मंदिरात पोहोचलो तो भव्य सभामंडप दिसला. पाहतो तो त्यात पंचवीस तीस स्त्री पुरुष ज्ञानेश्वरीचं पारायण करतानाचे सूर कानी आले. त्यामुळे मंदिराचं वातावरण आणखीनच प्रसन्न वाटत होतं. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील ओव्या कानावर पडत होत्या.

उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।

हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥

ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें ।

हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥

जे जे उपजते किंवा जन्म घेते ते ते नाश पावते. नाश पावलेले पुन्हा दुसऱ्या रूपाने प्रत्ययास येते. सूर्य आणि चंद्राचा उदय अस्त हे अखंडित सुरूच असतात. त्याचप्रमाणे जन्ममरणाचे हे चक्र अविरत सुरु राहते. तेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल आसक्ती मनात धरणे आणि तिच्या नष्ट होण्याने शोक करणे व्यर्थ आहे. ‘ या अर्थाच्या या सुंदर ओव्या कानी पडल्या. ज्या ठिकाणी साक्षात माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्याच ठिकाणी तिचे मनन, पठण किंवा पारायण करणारी ही मंडळी किती भाग्यवान आहेत असा विचार मनात आला.

मंदिरात प्रवेश केला की उजव्या बाजूला प्रथम दर्शन घडते ते शिवलिंगाचे. नंतर ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला (पैस) टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तो पैसाचा पवित्र खांब. आणि त्याच्या शेजारी असलेल्या भागात संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी उतरवून घेतली ते सच्चिदानंदबाबा यांच्या सुंदर मूर्ती आहेत.

पूर्वी ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हा या ठिकाणी करवीरेश्वराचे मंदिर होते. तेथील खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली.

शके बाराशे बारोत्तरे । तैं टीका केली ज्ञानेश्वरे ।

सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ॥

अशी ही तेराव्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी. काळाच्या ओघात ते करवीरेश्वराचे मंदिर नष्ट झाले पण माऊलींनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, तो खांब मात्र तसाच राहिला. त्या खांबानं जणू आभाळ पेललं. आभाळ पेलण्याइतका तो उंच झाला. माऊलींनी त्याला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वर म्हणजे आभाळच. ज्ञानेश्वरी म्हणजे सुद्धा आभाळ. इथला खांब हा पृथ्वीवरल्या मातीचेच प्रतीक. पण ही माती ज्ञानदेवांच्या पावन स्पर्शाने एवढी पुनीत, एवढी विशाल झाली की ती आभाळाला भिडली. म्हणून मला शांताबाईंच्या ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा ‘ या गाण्याच्या ओळी आठवल्या.

तो खांब तरी किती भाग्यवान म्हणायचा! अखिल विश्वाला वंदनीय असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचा आधार घेतला. तो त्यांच्या स्पर्शानं पावन झाला. आपली कठोरता त्यानं त्यागली आणि माऊलींच्या व्यक्तिमत्वातली शीतलता, पावित्र्य धारण केलं. महाराष्ट्र ही संतांची भूमी. इथल्या मातीचा कण न कण त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. इथल्या शिळा सुद्धा पवित्र आहेत. उगीच नाही गोविंदाग्रजांनी उगीच नाही

मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा

नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा

असे सुंदर महाराष्ट्राचे वर्णन केले! इथले दगडही पावन आहेत. हा खांब तर एवढा पवित्र की पुढे त्याच्याभोवती मंदिर उभारले गेले. एरव्ही मंदिरात खांब असतात, पण खांबासाठी मंदिर उभारले जावे हा ही एक ‘ अजब सोहळा ‘. त्याचं कारणच तसं आहे. ज्या ज्ञानेश्वरांची पाठ समाधीस्थानीही जमिनीला टेकली नाही, त्याची पाठ या खांबाला टेकली. प्रख्यात लेखिका दुर्गा भागवत आपल्या ‘ पैस ‘ या पुस्तकात त्याबद्दल बोलताना म्हणतात, ‘ ख्रिस्ती धर्म जसा जगभर पसरला, तसा वारकरी पंथ पसरला असता, तर ख्रिस्ताच्या क्रुसाप्रमाणे हा स्तंभही जगभर गेला असता. पण बरे झाले तसे नाही झाले ते. तो इथेच राहिला. वारकऱ्यांना त्याचे दर्शन घ्यायला इथेच यावे लागते. ‘ ज्ञानेश्वरी इथे सांगितली गेली म्हणून वारकरी संप्रदायाचे हे आद्य पीठ आहे.

पण माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर साधारणपणे तेरा ते एकोणिसाव्या शतकापर्यंत हे अत्यंत पवित्र असे स्थान विपन्नावस्थेत होते. संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेले हे स्थान! या स्थानाची लोकांना विस्मृती झाली होती. या स्थानाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी एखाद्या समर्पित त्यागी साधकाची आवश्यकता होती. आज हे स्थान आपल्याला आपल्याला ऐश्वर्यसंपन्न भासते त्यामागे वारकरी संप्रदायाचे महान उपासक वै. सोनोपंत दांडेकर मामांचे शिष्य ह. भ. प. बन्सी महाराज तांबे यांचे मोठे योगदान आहे.

पैठणहून आळंदीला जाताना ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाईंनी या ठिकाणी काही दिवस मुक्काम केला. असे म्हणतात की पैठणला ज्या रेड्याकडून ज्ञानेश्वर माऊलींनी वेद वदवून घेतले, तो रेडा देखील या ठिकाणी त्यांच्या सोबत होता. इथेच निवृत्तीनाथांनी ज्ञानोबा माऊलींना ज्ञानेश्वरी लिहिण्याची आज्ञा दिली. इथेच त्यांना तसे का वाटावं? तर या स्थानाचा महिमाच तसा होता. या ठिकाणी साक्षात श्री विष्णूंनी मोहिनीरूपात दहा दिवस निवास केला होता. त्यांनी निवास केला म्हणून हे ‘ नेवासे ‘ असे म्हटले जाते. त्या मोहिनीराजांचं सुंदर हेमाडपंती मंदिर इथे आहे.

समुद्रमंथनातून जेव्हा चौदा रत्ने बाहेर पडली, तेव्हा त्यात अमृताचा कलश हाती घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. अमृत हे अमरत्व प्रदान करणारे होते. म्हणून देव आणि दानव यांच्यात अमृत वाटपावरून भांडणे सुरु झाली. त्यात भगवान विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून देवांना अमृत आणि दानवांना सुरा म्हणजे मदिरा वाटप केली. हे राहू आणि केतूच्या लक्षात आले. राहू अमृत प्राशन करण्यासाठी आपले रूप बदलून देवांमध्ये जाऊन बसला. श्री विष्णूंच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राच्या साहाय्याने राहुचा शिरच्छेद केला. त्याचे शीर उडून ज्या ठिकाणी पडले त्या गावाला राहुरी असे नाव प्राप्त झाले तर त्याचा देह म्हणजे काया ज्या ठिकाणी पडली, ते कायगाव म्हणून प्रसिद्ध झाले अशी दंतकथा आहे.

तात्पर्य हे इतके पवित्र ठिकाण आहे. इथे एकदा श्री विष्णूंनी अमृत वाटप केले. दुसऱ्यांदा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपात साऱ्या जगाला अमृत प्रदान केले. ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी सारस्वताचे सौभाग्यलेणे. काव्य आणि तत्वज्ञान यांचा सुरेख संगम. यानंतर त्याठिकाणी अमृतासमान अनुभव देणारा अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला. ज्या प्रवरा नदीच्या काठावर हे तीर्थक्षेत्र वसले आहे, त्या प्रेवरेला ‘ अमृतवाहिनी ‘ असे संबोधले जाते. येथून जवळच गोदावरी आणि प्रवरेचा संगम आहे. या संगमावर देवगड हे पवित्र स्थान आहे. जवळच शनी शिंगणापूर आहे. असा हा रम्य आणि पवित्र परिसर. या पवित्र, शांत आणि रम्य स्थळी खरोखरच वेळ काढून जायलाच हवं.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares