मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हातातोंडाशी आलेला घास ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

सुश्री गायत्री हेर्लेकर

☆ जीवन रंग ☆ हातातोंडाशी आलेला घास ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

आठवडाभर पाठपुजा, रुद्राभिषेक आणि आज समाप्तीचे होमहवन, उत्तम प्रसाद, ब्राह्मणभोजन सर्व काही अगदी मनासारखे यथासांग पार पडले. सदाशिवने कशात काहीच उणीव भासू दिली नाही. यामुळे तृप्त झालेल्या यजमानांनी भरघोस दक्षिणा, त्याला धोतर उपरणे, त्याची बायको आणि आईला साडी चोळी असा घसघशीत आहेर केला. दक्षिणेचे पैसे तृप्त भावनेने, सदाशिवने देवळात महादेवापुढे ठेवले. डोके ठेवून मनोभावे दंडवत घातला…

“देवाधिदेवा महादेवा तुझीच कृपा. माझ्यासारख्या सामान्य भक्ताची तुलाच काळजी. मोठ्या विवंचनेतुन सोडवलेस देवा.. कोटी कोटी प्रणाम केले तरी पुरणार नाहीत एवढे उपकार केलेस.” डोळे मिटून शांतपणे प्रार्थना केली.

दुर्गम भागातील डोंगरावर असलेले ते देऊळ -महादेवाचे जागृत स्थान होते. फार जाहिरातबाजी नाही आणि येणे जाणे तसे कष्टाचे म्हणुन भक्तांची वर्दळ तशी मर्यादित. या वर्षी तर तीही रोडावली.

आता पावसाळा तोंडावर आल्याने भक्तांचे येणे केंव्हाही बंद होईल अशीच परिस्थिती होती. दर वर्षीच्या मानाने यावर्षी मिळकत तर खुपच कमी झाली. वर्षभर कसे निभावायचे ही विवंचना. शहरात शिक्षणासाठी रहाणार्‍या दोन मुलांची फी – रहाण्याचा खर्च, देवळाच्या सुधारणेसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते. आईच्या औषधपाण्याचा खर्च. घराची थोडी डागडुजी करावी लागणार तो खर्च. सदाशिवच्या तब्येतीची पण

अधूनमधून तक्रार असायची पण पैशासाठी तपासणी करुन घेणे तो टाळत होता. सगळे कसे काय भागवायचे हीच काळजी सदाशिवच्या मनात सतत होती. जमिन गहाण ठेवुन आणखी कर्ज काढले तरी भरमसाठ व्याजामुळे फुगणारे हप्ते कसे द्यायचे?आणि जमिनीचा तुकडा विकून पैसे उभे करायचे तर म्हातारपणी काय खाणार? २, ४ यजमान येऊन जरा काम मिळाले तर ठीक. नाहीतर काही खरे नाही.

पाठपुजा, अभिषेक, प्रसाद नैवेद्य —सगळे काही अगदी शास्त्रशुद्ध विधीवत सोवळ्यात करायचे ही पारंपारिक प्रथा काटेकोरपणे करणे, यजमानांचे समाधान करणे या बाबतीत सदाशिव कधीच हयगय करत नव्हता. पदराला खार पडली तरी चालेल पण शास्त्रोक्त विधीत तडजोड तो कधीच करत नसे.

त्यामुळे त्याच्याकडे येणारे यजमानही तसे धार्मिक, कर्मठ असायचे. हातातोंडाची गाठ पडण्यास एवढी मिळकत होत असे. पण या वर्षी जरा नव्हे तर चांगलीच ओढग्रस्त परिस्थिती त्याच्यापुढे उभी होती. महादेवच निभावून नेईल असे त्याला वाटत होते.

आणि महादेवाच्या कृपेने एक चांगले यजमान आले. ७ दिवस लघुरुद्र, रोज दुग्धाभिषेक, रोज ब्राह्मण भोजन, होमहवनाने समाप्ती. –सर्व काही शास्त्रशुद्ध पध्दतीने यथासांग पार पडल्यामुळे यजमान संतुष्ट झाले. मिळकतही चांगली झाली. सदाशिवची थोडी का होईना काळजी कमी झाली आणि नेहमीच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याने याचे श्रेय महादेवाला दिले. त्याच्या डोळ्यातुन घळघळ वहाणार्‍या पाण्याने त्याने जणु महादेवाला अभिषेक घातला.

शांतपणे, डोळे मिटून, नतमस्तक होऊन नमस्कार करणारी त्याची आई आणि भांबावलेल्या नजरेने त्या दोघांकडे बघणारी, काहीशी कावरीबावरी झालेली त्याची बायको –उमा-मागे उभ्या होत्या. उभे राहुन, डोळे पुसत सदाशिवने वळुन पाहिले. आईच्या पायावर डोके टेकुन नमस्कार केला. उमाकडे बघत, “उमा, तुमची अडचण आली नाही म्हणुन हे सर्व सुखरुप पार पडले. नाहीतर शक्यच नव्हते. हातातोंडाशी आलेला घास गेला असता. महादेवाची कृपाच. “

हातातोंडाशी आलेला घास गेला असता हे ऐकल्यावर उमाने भरल्या डोळ्याने सासूकडे बघितले. तिला जे पाप वाटत होते ते करायला लावताना काल रात्री सासू हेच म्हणाली होती. “हातातोंडाशी आलेला घास जायला नको. ” सदाशिवने ७ दिवसांचा हा कार्यक्रम पत्करला तेंव्हाच उमाला धाकधुक वाटत होती. पाळी जाण्याचे वय झाल्यामुळे आताशा ती नियमित होत नव्हती. ऐनवेळी अडचण नको म्हणुन सदाशिवच्या कानावर घालुया असे उमा सासुला म्हणाली. पण सासूने, “अग, पैशाची आपल्याला किती गरज आहे माहित आहे ना. तु गप्प रहा. महादेव आहे पाठीराखा. अडचण आली तर पुढचे पुढे बघु, ” म्हणुन सासूने तिला काही बोलु दिले नाही.

सासु-सुन दोघीही “आजचा दिवस पार पडु दे रे देवा, ” म्हणुन रोज देवाला साकडे घालत, देवावर श्रध्दा ठेवुन सर्व करत होत्या. रोजची पुजापाठाची, अभिषेकाची तयारी, १०, १५ माणसांचे चहापाणी, नाष्टा, फराळाचे, जेवणाचे –त्यासाठी सामानाची, धान्याची, दुधातुपाची जुळवाजुळव –एकंदरीत बरेच काम-त्यात दिवस कसे गेले हे समजले नाही. होता होता ६वा दिवस उजाडला. उमाला जरा थकल्यासारखे वाटत होते. तरी दुपारपर्यंत सगळे काही रेटले. पण संध्याकाळी ज्याची भिती होती तेच झाले.

सासूबाईंना सांगितल्यावर त्या आधी थोड्या चिडल्या. पण सुनेवर चिडुन उपयोग नाही. हे त्यांनी जाणले. संध्याकाळचे फारसे सोवळे नव्हते म्हणुन जे काही करायचे ते करुन त्यांनी ढकलून नेले. “उमा कुठे आहेत? “म्हणुन सदाशिवने विचारल्यावर “उद्याची तयारी करते” म्हणुन वेळ मारुन नेली.

नंतर सायंप्रार्थनेसाठी देवळात गेल्या. सायंकाळी तशा त्या गाभाऱ्यात जात नसत. पण आज जाऊन महादेवाच्या पिंडीच्या बाजुला जरा लांब बसल्या. डोके शांत ठेवुन बराच वेळ विचार केला. त्यांचे सनातन मन हो-नाहीच्या चक्रात फिरत होते. पुढील वर्षभराचे दारुण चित्र डोळ्यापुढे उभे राहिले, मुख्य म्हणजे सदाशिवची वरचेवर बिघडणारी तब्येत. पैशासाठी तो चालढकल करतो. पण त्याची तपासणी होऊन वेळेवर औषधपाणी व्हायला पाहिजे. आता उद्याची समाप्ती व्यवस्थित झाली नाही तर तो यजमानांकडुन एक पैसाही घेणार नाही. उलट प्रायश्चित्त घेणार.. त्याचा त्रास करुन घेणार. मदतीसाठी कुणाला बोलावणे त्याच्या तत्वात बसणार नाही. हा सर्व विचार त्यांनी केला. डोके टेकुन नमस्कार करुन झटक्यात उठून घाईघाईने, पण निश्चयी मनाने, त्या घराकडे परतल्या.

“उमा, उमा, तिकडली कामे पुरेत. इकडे ये — विरजण घालायचे, डाळी भिजत टाकायच्या –मीठमसाला काढून ठेवायचा, विडे करायचे – किती कामे पडलीत, आत ये आणि भराभर आवर. पाच पंचवीस माणसांचा पुरणावरणाचा स्वयंपाक म्हणजे सोपे काम नाही. लवकर उठुन कामाला लागायला पाहिजे. नैवेद्याचे ताट घेऊन तुलाच देवळात वेळेवर जायला पाहिजे. “

आत आलेल्या उमाच्या मनात सदाशिवचा विचार आला. भांबावलेल्या उमा काही बोलणार विचारणार, त्याआधीच सासू दबक्या आवाजात, “हे बघ महादेवाला मी सांगीतले, आता तुझे आढेवेढे नकोत, हातातोंडाशी आलेला घास थोडक्यासाठी घालवु नकोस. “

आता सदाशिव तेच म्हणाला –“हाता तोंडाशी आलेला घास”.

— तो आपण वाचवला खरा. पण हे बरे केले का? का पाप घडले आपल्याकडून?याची देव शिक्षा देतील. याचे प्रायश्चित्त कसे करुन घ्यावे. ? हा विचार करत ती खाली मान घालुन घराकडे निघुन गेली.

सासूने ते पाहिले, तिच्या डोळ्यात आता मात्र पाणी आले. भरले डोळे मिटून, महादेवाला नमस्कार करत ती, ” देवा महादेवा, तु सर्वज्ञ.. तुझ्यापासून काय लपून रहाणार? तिने या परिस्थितीत आज शेवटच्या दिवशी तुझ्या प्रसादाचे भोजन तयार केले. म्हणुन ती भांबावलीआहे. पण यात तिची काहीच चुक नाही. सदाशिवला चालणार नाही म्हणुन ती करायला तयारच नव्हती. पण मीच तिला हे करायला भाग पाडले. या पापाची जी काय शिक्षा असेल ती मला दे. आता निदान माझ्या मुलाला औषधोपचार करता येईल, माझ्या नातवंडांचे शिक्षण थांबणार नाही. मुलाची विवंचना थोडीफार तरी कमी होईल, यातच मला समाधान आहे”

मनातील विचार बाजुला सारून, सदाशिवच्या आईने डोळे पुसले. स्थिर मनाने देवळातून घराकडे गेली. ओटीवर रडत बसलेल्या सुनेकडे – उमाकडे कपड्याचे गाठोडे टाकत, ” हे घे,. जा आता परसदारी. घरातले बाकीचे मी आवरते. महादेवाची माफी मागुन आले. आता काळजी करु नकोस. डोळे पुस आता. ” म्हणून स्वतःचे डोळेही हळूच पुसले.

– – आपल्या सनातनी पण तितक्याच व्यवहारी, करारी सासूकडे पहात तिने भरल्या डोळ्यांना पदर लावला…. दोघीनी मंद हसत एकमेकींकडे बघितले.

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आष्टा – इस्लामपूर… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

? जीवनरंग ?

☆ आष्टा – इस्लामपूर… ☆ प्रस्तुती – सुश्री नीला महाबळ गोडबोले

“ए ,ते बघ आष्टा-इस्लामपूर ” .. बाळीनं मला कोपरानं ढोसलं.. आम्ही  दोघी त्यांना  पाहून हसू  लागलो..

बाळी माझी जवळची मैत्रीण.. अतिशय खोडकर, मिश्कील.. “सा-या दुनियेची मस्करी करण्यासाठी त्या आकाशातल्या देवानं आपल्याला भूतलावर पाठवलय”.. अशी पक्की खात्री असणारी. शाळा नि कॉलेजातले आदरणीय गुरूजनही तिच्या तावडीतून सुटले नव्हते.. मग हे “आष्टा-इस्लामपूर” कसं सुटावं?

झालं होतं असं की… मे महिना संपत आलेला होता.. आमची परीक्षा नुकतीच संपली होती. माझ्या ताईनं महाबळेश्वरची टूम काढली.. MTDC चं बुकिंगही केलं. त्यामुळे आम्ही महाबळेश्वरला आलेलो.. आम्ही बहिणी.. आमच्या आया-काकवा.. वगैरे..वगैरे. बाळीही आमच्या कुटुंबातलीच.

संध्याकाळी बॉम्बे पॉईंटला पोहोचलो.. सूर्यास्त पहायला.. सगळे सूर्यास्त पहात होते.. पण तारुण्याच्या बहरात असलेल्या माझं नि बाळीचं लक्ष मात्र तिसरीकडेच होतं… नुकतच् लग्न झालेली जोडपी हातात हात घालून, एकमेकांना खेटून फिरताना पहाताना मजा वाटत होती.. नि कुठेतरी पोटात गुदगुल्याही होत होत्या..

हातभर बांगड्या, मेंदीने रंगलेले तळवे, खरंतर वेणीची सवय असणारे पण हनीमूनला आल्याने मोकळे सोडलेले केस.. तेलाच्या सोबतीनं वेणीच्याच वळणाला जाणारे… मुद्दाम मधुचंद्रासाठी नवरोबानं खरीदलेली जीन्स नि त्यावरचा भडक रंगाचा टॉप.. तिला या असल्या कपड्याची सवय नसल्यानं खांद्यावरून ओघळणा-या टॉपला सतत जागेवर आणण्यात गुंतलेली ती, लग्नासाठी विकत घेतलेल्या उंच टाचेच्या वेलवेटच्या चपला नि तंग पॅंट यात अवघडून चालणारी .. हनिमूनला आलोय तर बायकोच्या अंगचटीला येणं हे कर्तव्य समजणारा तिचा गुलाबी शर्टातला नवरा.. नि या सगळ्यानं कसनुसा झालेला  फेअर अँड लवली लावून पांढरा केलेला तिचा चेहरा..!!

हे “आष्टा- इस्लामपूर “… खेडवळपणाचं नि इनोसन्सचं बाळीने ठेवलेलं नाव.. आमचं मिरजही काही मोठं गाव नव्हे… पुण्या-मुंबईसारखं.. तशा आम्हीही खेड्यातल्याच.. पण अंगचा आगाऊपणा स्वत:ला फार ग्रेट समजणारा.

त्या जोडप्यांची यथेच्छ  टर उडवून झाली..

“आपण  नाही हं असलं नव-याबरोबर हनीमूनला जायचं..” प्रतिज्ञाही करून झाली..!!

त्या बॉंबेपॉईंटवरच्या भेळ, आईस्क्रीमवर ताव मारून हॉटेलवर परतलो.. महाराष्ट्र वीज मंडळाच्या कृपेने कॅंडल लाईट डिनरचा आनंद उपभोगला..

दुसर्‍या दिवशी सकाळी विल्सन पॉईंटचा सूर्योदय.. इथे मात्र “आष्टा-इस्लामपूर”ची अनुपस्थिती.. सकाळच्या गुलाबी थंडीतला एकमेकांचा एकान्त सोडून ते त्या रोज उगवणा-या सूर्याला बघायला कशाला मरायला येतायत !!

पण आम्हा दोघींना मात्रं चुकल्या सारखं झालं..!!

त्या दिवशी इतरही अनेक पॉईंट्स पाहिले.. प्रत्येक ठिकाणी माकडांचे नि “लवबर्ड्सचे थवे”… फार मजा आली.. दुपारी दोनला पोटात ओरडणा-या कावळ्यांना गिरीविहार हॉटेलमधे शांत केलं..

हॉटेलमधे गेल्यावर समस्त मंडळी “आता आज कुठेही बाहेर पडायचं नाही” ..म्हणत मेल्यासारखी  झोपली..

मला नि बाळीला काही झोप येईना.. बाहेर पडलो.. नि वाट फुटेल तिकडे चालू लागलो.. “लॉडविक पॉईंट” बोर्ड दिसला.. पावलं तिकडे वळली.. नाहीतरी सकाळी हा पॉईंट पाहिला नव्हताच..

मातीची अरूंद पायवाट.. डोंगराच्या उंच सुळक्याकडे नेणारी.. दोन्ही बाजूला द-या.. सारं काही हिरवंगार.. मन नि डोळे तृप्त करणारं.. हिरवीगार जमीन, हिरवेगार डोंगर-द-या नि काळ्याभोर ढगांनी  भरलेलं निळं-काळं आभाळं… रंगाची नुसती उधळण..!

“निले, आष्टा-इस्लामपूर ” ..बाळी ओरडली..

खरच एक नाजुकसं, नवथर जोडपं जितकं बिलगता येईल तेवढं एकमेकांना बिलगून चालत असलेलं.. तिचा लालबुंद टॉप नि त्याचा पिवळा शर्ट.. हळदीकुंकवाला लाजवेल असा.. एवढे दिवस फक्त सिनेमात पाहिलेलं  प्रणयदृश्य असं लाईव्ह पहायला मिळाल्यावर आम्हाला वेड लागायची पाळी आली.

एवढ्यात टपटप आवाज येऊ लागला..नि त्यामागोमाग  खरपूस मृद्गंधानं लावलेली हजेरी.. थेंबांचं रूपांतर धारांत झालं तसं ती त्याच्या कुशीत शिरली.. नि .. बाळीनं  जोरदार आवाजात सुरू केलं..

“बरसातमें हमसे मिले तुमभी सनम तुमसे मिले हम.. बरसातमे..”

“ताक धिना धिन..”. .मी ही री ओढली..

त्या जोडप्यानं चमकून मागे वळून पाहिलं.. नि ते दोघेही लाजरं- बावरं हसले नि थोडे दूर झाले.. आमची हसून हसून पुरेवाट..

“रिमझिम गिरे सावन”, “गेला मोहन कुणीकडे” असली येत होती नव्हती तितकी आमची पावसाची युगुलगीते  म्हणून झाली .. नि त्यांचं पावसात नि लाजेत नखशिखांत भिजून झालं..

त्यांचं ठीक होतं.. पण आमचं आपलं  कोरडचं भिजणं.. त्यातून मला प्रचंड सर्दी-खोकला झालेला.. शिवाय अशा निर्मनुष्य ठिकाणी दोघींनी पावसात थांबणं सुरक्षित वाटेना..

“बाळे, चल परत जाऊया..”

“अगं पण अजून पॉईंटवर कुठे पोहोचलो ? तिथून प्रतापगड छान दिसतो म्हणे.. जाऊया गं पुढे !!” बाभळीच्या शब्दकोशात भीतीतला “भ” ही नसलेला.. नि भीतीशी माझी गट्टी !!

“मी चालले” .. आकाशात चमकणा-या विजांकडे पहात मी वळले..

“दुसरे दिवशी पुन्हा इथे यायचं” असा तहनामा करून आम्ही परत निघालो नि हॉटेलवर येऊन सा-यांच्या शिव्या पोटभर खाल्ल्या..

“चला, लॉडविक पॉईंटला जायचंय” रात्रीच्या वाक्यज्ञानाला न जुमानता बाळीनं फर्मान काढलं.. सगळे तयार होतेच.. लॉडविक पॉईंट गाठला.. फारच गर्दी होती आज.. भरभर सुळक्यावर पोहोचलो.. सुळका पोलिसांनी भरलेला..

पंचनामा सुरू होता.. 

आदले दिवशी  संध्याकाळी वीज पडून एक जोडपं जागीच गेलं होतं.. मरणानंतरही  एकमेकांच्या कुशीत विसावलेलं ते जोडपं  कालचं “अष्टा-इस्लामपूर”चं होतं..!! 

दरवर्षी मे महिना येतो.. आकाश भरून येतं.. पावसाबरोबरच विजांचं तांडव सुरू होतं..

                          नि..

“आष्टा-इस्लामपूर” डोळ्यांसमोरून  हालता हलत नाही…!! 

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “व्ही आय पी…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? जीवनरंग ?

☆ “व्ही आय पी…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

मी आणि व्ही. आय. पी…. कुछ भी… सालं आपल्याला फक्त, व्ही. आय. पी. अंडरवेअर आणि बनियान माहिती. व्ही. आय. पी. ट्रीटमेंट आपल्याला कोण देणार ?

औकात में रहो यार…

हं… फिर भी. एक जगह है ! जिथं आपल्याला व्ही. आय. पी. ट्रीटमेंट मिळते. तुम्ही कधी त्या बाजूला गेलात तर, तिथं जरूर जा. माझं नाव सांगा. फिर देखो, क्या फर्क पडता है !

काहीही फरक पडणार नाही. पहिल्यापासूनच तुम्हाला इतकी छान सर्विस मिळणार. आणखीन स्पेशल काय देणार ?

हं… माझं नाव सांगितलं तर गुलशनदा खुष होईल. हातभर लांब ग्लासातून, स्पेशल लस्सी पाजेल. त्याच्यातर्फे. वर ” कौस्तुभपाजी के दोस्त, वो मेरे दोस्त ” म्हणत तुम्हाला डोक्यावर घेईल. नको नको म्हणलं, तरी पोरांना खाऊ देईल. बिलात डिस्काऊंट देईल. धाब्यामागच्या घरी घेवून जाईल. भाभी, त्याची आई, त्याचा लेक यांच्याशी ओळख करून देईल. फिकर नाॅट. सरदारजी फॅमिली असली, तरी सगळे छान मराठी बोलतात. तुम्ही बिनधास्त मराठीत बोला.

गाडी चालवून दमला असाल, तर निवांत पडा. गुलशनदा सगळी सोय करेल. फ्रेश होवून, चहा पिवून मग पुढे जा. तिथून बाहेर पडताना, त्याच्या दिलखुलास अगत्यानं तुम्ही गुदमरून जाल. पर एक बात याद रखो.

गुलशनदाचं सगळं मनापासून असतं. वरवरचं नाही. जाताना तो तुम्हाला सांगणारच.

” ये पचास किलोमीटर की रेंज में, कोई भी प्राॅब्लेम आया तो मुझे काॅल करो पाजी, बंदा हाजीर हो जायेगा. ” असं म्हणत, तुमच्या हातात स्वतःचं कार्ड देईल. तुम्हाला खरंच आनंद होईल. कदाचित तुम्हीही त्याला तुमचं कार्ड द्याल… 

“पुण्यात आलात तर, आमच्याकडे नक्की या.. ” असं सांगालही. अन् तो खरंच आला तर ?….

काळजी नको. गुलशनदाने दुनिया देखी है.. तो नाही येणार तुमच्याकडे. पुणे सातारा रोड. सुरूरपाशी हायवे सोडला आणि, तुम्ही वाईच्या दिशेने वळलात की, लगेचच गुलशनदा धाबा लागेल. गल्ल्यावर गुलशनदाचा अगडबंब देह अर्धाच दिसेल.

मला तिथलं काय आवडतं सांगू ? तिथली स्वच्छता. पार्किंगला भरपूर जागा. मुलांना खेळण्यासाठी राईडस्.

छान चव. आणि भरघोस अगत्य… आपण कुठंतरी मुंजीला गेलोय. मुंज लागते. बुफे सुरू होतो. आपण खुर्च्या पकडून जेवायला लागतो. जेवण रूचकर असतंच. पण बटूच्या आईबाबांनी आग्रह करकरून,

पानात जिलब्यांची परात ऊभी केली की… जेवणाची गोडी आणखीनच वाढते… गुलशनदाचं तस्सच आहे.

तुम्ही जेवायला सुरवात केली की, तो स्वतः त्याच्या बिळातून बाहेर येणार. तुम्हाला काय हवं, काय नको ते बघणार.. आग्रह करकरून वाढणार. लहान पोरांशी त्याची पटकन गट्टी होते. त्यांना हळूच दटावणार… 

” पानात टाकलं की बाप्पा रागवतो.. ” अगदी अस्सल मराठीत. पोरगं प्रचंड गुलशनकाकाला बघून, आधीच घाबरलेलं असतं. काय बिशाद, पानात काही टाकेल ? तुमची जेवणं होईपर्यंत तो पोरांशी क्रिकेट खेळायला लागेल. बॅट बाॅल आणि प्लेयर्स.. तो सगळं पुरवतो. तुम्ही जेवा निवांत.

एकदा… एकदा चुकून पनीर टिक्का जरा खारट झालेला. मी गुलशनदाला फक्त सांगितलं तसं…

” हो जाता है कभी कभी.. दादा तुम्ही थांबा, पाच मिनटात मी तुम्हाला नवीन सब्जी आणून देतो…

स्वतः बनवलेली. ” तो झरकन भटारखान्यात शिरतो. पाच मिनिटात पनीर टिक्का घेवून हजर..

हा हा हा…. लाजवाब. काय चव होती.. अल्टीमेट.

माझी एक सवय आहे. आजीनं लावलेली. जेवण झाल्यावर, नेहमी करणाऱ्याचं कौतुक करावं. मी जाताना भटारखान्यात शिरायचो. तिथं कृपालसिंग असायचा. त्याला हाताचा मोर करून दाखवायचो.

” खाना बढिया ” तो खुश व्हायचा. गुलशनदालाही “मजा आ गया” असं सांगायचो.

आमच्या वेव्हलेंग्थस् सहज जुळल्या. दरवेळी महाबळेश्वरला जाताना आणि येताना… “गुलशनदा धाबा जिंदाबाद. ” तिथली सगळी माणसं ओळखीची. “कैसे हो ?” असं विचारलं की, भूक वाढायची. मजा यायची.

सहा महिन्यापूर्वीची गोष्ट. घरातून आॅफिसला चाललेलो. अभिषेक हाॅटेलजवळचा सिग्नल. हिरव्याची वाट बघत थांबलेलो. पलीकडनं एक अॅम्ब्युलन्स घोंघावत चाललेली. बहुधा दीनानाथच्या दिशेने. गाडीत बसलेला गुलशनदा ओझरता दिसला. टेन्शनवाला गुलशनदा… मी पहिल्यांदाच पाहिला. मी विचार करूच शकलो नाही. गाडी आपोआप दीनानाथच्या दिशेने वळली. मी पोचेपर्यंत स्ट्रेचर आलेलं. त्याची आई. तो स्टेचरबरोबर पळत निघालेला. मागोमाग त्याची बायको. त्याचा छोटा मुलगा. ईमर्जन्सीचा दरवाजा, क्षणभर उघडला. त्याच्या आईला पोटात घेवून बंद.

मी हळूच गुलशनदाच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानं मागं वळून बघितलं. कडकडून मिठी मारली. माझा खांदा ओलाचिंब. पाच मिनटं, मी आपला त्याला थोपटत होतो. पुढच्या गोष्टी पटापट झाल्या. मी फार्मा लाईनमधला. एका कंपनीचा जी. एम. मार्केंटींग. ओळखी होत्या. माहिती होती. अटॅक येवून गेलेला.

अॅन्जीओप्लास्टी करावी लागणार होती.

“मी पैसे घेवून येवू का घरनं ?”

गुलशनदानं एक बंडल पुढं केलं.

“कितीही लागू देत… मेरी माँको चंगा कर दो “

मी हिला बोलवून घेतली.

नको नको म्हणत होती ती मंडळी… ही वहिनींना आणि छोट्याला घेवून घरी. पुढचे आठ दिवस. आमच्या वाऱ्या चालू. गुलशनदा नाहीतर वहिनी. कुणीतरी एक आलटून पालटून, हाॅस्पीटलमध्ये थांबायचं. माझं घर दीनानाथपासून अगदी जवळ. गुलशनदाचा मुलगा घरी रमला. माझ्या लेकीशी छान जमायचं त्याचं. मस्त खेळायचे. नवव्या दिवशी डिस्चार्ज. सुदैवानं बायपास करावी लागली नाही.

भरल्या डोळ्यांनी गुलशनदा घरी गेला. आमचं मैत्रीचं नातं आणखीन घट्ट करून. मी मात्र श्रीमंत झालेलो.

मी… माझं घर… कुणाच्या तरी उपयोगी पडलं.. खरी श्रीमंती हीच. बाप्पांना थँक्स म्हणलं. नशीबवान आहे मी. माझ्यासारखीच वेडी बायको दिलीस मला. आल्यागेल्यांचं मनापासून करणारी.

.. सगळ्यात सुंदर बायको कोणती ? पाहुणे दारात बघून, जिच्या कपाळावर आठी उमटत नाही ती. खरंच मला, जगातली सगळ्यात सुंदर बायको मिळालेली.

मागच्याच आठवड्यात हिची किटी पार्टी होती. आऊटींग थीमवाली… महाबळेश्वरला. सोसायटीतल्या पंधरा वीस बायका. तीस पस्तीस पोरं. आख्खी व्हाॅल्वो केलेली.

जाता येता गुलशनदा धाबा. तिथली व्ही. आय. पी. ट्रीटमेंट. हिची गँग शाॅक्ड. सगळ्यांना, इसके पीछे का राज जानना था..

बायको गालातल्या गालात हसली. और बोली.. त्यासाठी “वेड्याची बायको” व्हावं लागतं.

बाजूला बसलेल्या माझ्या लेकीला, एकदम काहीतरी आठव्या.

तिनं भोंडल्यातलं गाणं सुरू केलं.

” वेड्याची बायको करीत होती लाडू.. “

गुलशनदा धाबा हसून हसून थरथरला म्हणे.

हीनं फोनवर सगळं सांगितलं.

मला एकदम व्ही. व्ही. आय. पी. झाल्यासारखं वाटलं.

 (कथा काल्पनिक आहे) 

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रघुनायका, मागणे हेचि आता… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ रघुनायका, मागणे हेचि आता… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

मंदिराची पायरी उतरून ताई भयंकर चिडीने, त्राग्याने मुख्य दरवाजापाशी आल्या. स्वत:शीच पण मोठ्याने बडबडत होत्या. स्वत:शीच बडबडण्याच्या नादात शेजारी एक मोरपीस विकणारा दादा दिसला त्याच्याशी बोलू लागल्या :

“पुन्हा इथे दर्शनाला यायचं नाही. इतक्या लांबून माणसं येतात पण देवाला धड पाहूही देत नाहीत हे लोक. लांब रांगेतून देवासमोर पोचलो नाही तोच पुढे ढकलतात.”

तो दादा : “पहिल्यांदा येताय का ?”

ताई : “नाही हो. नेहमी हे असंच असतं.”

तो : “अहो ताई, इथे असंच होतं याची कल्पना होती तरी आलात ना ? मग आता जाऊ द्या की. नावं का ठेवत आहात ?

ताई : “अहो दादा, आशा वाटतेच ना की जरा नीट दर्शन होईल म्हणून ? देवापुढे मागणे मागता येईल, तोपर्यंत देवासमोर उभे राहता येईल. मागच्या दर्शनानंतर मुलाला चांगला जॉब लागला. आता जावयाच्या घराचा व्यवहार पक्का होऊ घातला आहे, त्यामुळे देवाचे दर्शन घेऊन येऊ म्हणून आले. पण इथे साधे दहा सेकंदही देवासमोर नीट उभे राहता येत नाही. आजही जेमतेम पाहिले देवाला.”

तो : “रांगेत किती वेळ गेला हो ?”

ताई : “तब्बल पाऊण तास होते रांगेत. तरी बरे पुढच्या एक ताई छान गप्पा मारत होत्या म्हणून बरे झाले.”

तो : “हाsss. हे बरे. एकट्या असता तर उगीच नामस्मरण वगैरे करत रांगेत उभे राहावे लागले असते.”

ताई (त्याच्या बोलण्याचा अर्थ न कळून) : “म्हणजे?”

तो (विषय टाळत) : “म्हणजे काही नाही हो. पाऊण तास नामस्मरण करायचे आणि प्रत्यक्ष देवासमोर दहा सेकंदही उभे राहता आले नाही तर सामान्य माणसाला राग येणारंच ना. साहजिकच आहे.”

ताई (एक भुवई वर करत) : “सामान्य माणूस म्हणजे?”

तो (विषय टाळत) : “काही नाही हो. जनरल बोललो.”

ताई : “नाही. सांग नीट.”

मनातली चीड जराशी व्यक्त झाली असल्याने एव्हाना ताई किंचित शांत होत होत्या.

तो : “ताई, समजा एक दिवस असे झाले की सबंध गाभारा. गाभाराच कशाला ? सबंध देऊळच लोकांसाठी बंद ठेवून फक्त तुम्हालाच आत प्रवेश दिला तर ? अख्खाच्या अख्खा दिवस देव फक्त तुमच्यासाठी. मोबाईल फक्त बाहेर ठेवायचा. तो सोबत न्यायचा नाही. बाकी सगळे देऊळ तुम्हाला. तर काय कराल ?”

ताई (तोंडाचा आ वासून, विचारांत गर्क) : ….

तो : “आहेत की अशीही पुरातन देवळे अजून, जिथे माणसे फार नसतातच. आणि ते राहू द्या बाजूला. पण समजा खरेच असे झाले तर ?”

ताई विचारातच पडल्या होत्या.

तो : “सांगा.”

ताई : “अहो, थांबा हो. विचार करतेय.”

तो : “जास्त ताण देऊ नका. मी सांगतो काय कराल ते. फक्त माझे म्हणणे बरोबर की चूक ते सांगा.”

“तुम्हाला देवाचे शांततेत दर्शन हवे आहे, देवाशी संवाद हवा आहे, त्याला मनातल्या अनेक गोष्टी सांगायच्या आहेत, यासाठी सबंध देऊळ फक्त तुम्हाला देऊ केले. संपूर्ण देवळात फक्त देव आणि तुम्ही. तर तुम्ही आत जाल, नमस्कार कराल, देवाकडे मागण्या मागाल. हे असलं सगळं कराल आणि मग पाच मिनिटांत पहिला प्रश्न मनात येईल. ‘आता काय करायचे दिवसभर ? मोबाईल पण नाही सोबत. स्तोत्रे बित्रे किती म्हणणार.? जप तरी किती करणार.? इतर वेळेस सगळे सांभाळून आपण तोंडी लावल्यासारखे देवाचे करतो ते वेगळे. पण अख्खा दिवस देवळात करायचे तरी काय ? आणि देवाशी आपण बोलून बोलणार तरी किती? तो तर काहीच बोलत नाही. बापरे.’ होईल ना असे ?”

हे बोलणे ताईंसाठी अनपेक्षित होते असे त्यांचा चेहराच सांगू लागला.

“अहो ताई, आपल्याला देव भेटायला हवा असतो तो आपल्या टर्म्स वर! आपल्याला हवा तसा ! आपल्याला हवा तेव्हा ! हो की नाही ? आपल्याला नको असताना तर देवही नको असतो. हो ना ? 

‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ श्लोक शाळेत मराठी शिकवण्यासाठी शिकवलेला असतो आपल्याला, नाही ? आणि आपण स्वत: ठरवून देवाच्या दर्शनाला जायचे म्हणजे सगळे कसे सुखावह, आरामात व्हायला हवे म्हणजे ‘देवदर्शन छान झाले’ असे वाटते. आपल्या अपेक्षा अगदी इथपासूनच सुरु होतात, नाही ? ‘तुझे कारणीं देह माझा पडावा’ श्लोक तर केवळ चाल शिकवण्यासाठी शाळेत शिकवलेला असतो, नाही ?

ताईंना आता धक्क्यावर धक्के बसत होते.

“ताई, तुम्ही देवदर्शन करता ना ! ते तुमच्या मागण्या मी पुरवीन या आशेने. संतांनी देवदर्शनाला महत्व दिले ते आत्मज्ञानानंतर. ते आत्मज्ञान-बित्मज्ञान राहू द्या बाजूला. पण काही त्रास झाला नाही, काही भीती नसेल, कुठली धास्ती नसेल तर मी आठवतो का तरी तुम्हाला ? माझ्याकडे आल्यावर पहिले काय करायचे तर नमस्कार आणि लगेचच दुसरे काय करायचे तर आधीच मनात लिस्ट आऊट करून आणलेल्या मागण्या मागायच्या. एकापुढे एक. हो की नाही ? खरे सांगा ? तुम्ही देवळात मला भेटायला येता की तुमची स्वप्ने पूर्ण करणाऱ्याला लाच द्यायला येता ? पाव किलो पेढ्यांत मी ऐश्वर्य द्यायला तयार होतो ते केवळ ‘करुणा’ हा माझा स्थायीभाव आहे म्हणून. मी वेडा आहे म्हणून नव्हे. नाहीतर, कर्माचा सिद्धांत मला तुमच्यापेक्षा चांगला कळतो. माझे अनुसंधान नित्य टिकवा म्हणून नाम घ्या, असे संतांनी सांगितले. त्यांचे फोटो तुम्ही घरात टांगता. पण रांगेत पाऊण तास उभे राहावे लागले तर गप्पा मारायला तुम्हाला माणूस लागते, नाहीतर डोके खुपसायला मोबाईल लागतो. त्याऐवजी नाम घेणे होत नाही. खरे की नाही ? आणि काय हो, ‘जे होते ते त्याच्या इच्छेने’ यावर मुलांना – नातवंडांना मोठे लेक्चर देणारे तुम्ही – तुम्हाला इतकेही वाटत नाही का की माझ्या दर्शनाला येण्यासाठी समजा कधी कष्ट पडलेच तरी ते एक प्रकारचे तप आहे ? आपले तितके भोग सरले असा का नाही हो विचार करत तुम्ही ?.”

– – – आणि तो आणखी काही बोलून गेला आणि अचानक गर्दीत मिसळून दिसेनासा झाला.

ताई त्याच्या मधाळ पण डोळे उघडणाऱ्या शब्दांत इतक्या गुंगल्या होत्या की सुरुवातीला ‘देवाला’, ‘देवाचे’ असे देवाबद्दल बोलणारा तो मोरपिसवाला शेवटी शेवटी ‘मी’, ‘मला’, ‘माझ्या’ असे प्रथम वचनात बोलत होता हेच त्यांच्या वेळेवर लक्षात आले नाही आणि जेव्हा हे भान आले तेव्हा तो मोरपीसवाला समोर दिसत नव्हता. फक्त तो उभा होता त्या जागी एक मोरपीस मात्र पडलेले होते.

हे उमगले आणि ताईंच्या पायांतील त्राणच गेले. त्या तशाच खाली बसल्या. आजूबाजूची माणसे आणि आवाज त्यांच्या जाणिवेतच उरले नव्हते. त्यांच्या डोळ्यांसमोर होता तो तोच सावळा मोरपीसवाला ! आणि कानात गुंजत होता तो त्याचा मधाळ आवाज !

मग डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी ते मोरपीस उचलले आणि कपाळाला लावले. तो उभा होता तिथली धूळ कपाळी लावली. मग मंदिरातील गाभाऱ्याकडे वळून पाहू लागल्या. जणू त्यांची नजर मंदिराची भिंत भेदून भिंतीपल्याडच्या देवाला पाहात होती. तिथे पाहात दाटल्या गळ्याने त्या इतकेच म्हणाल्या :

.. .. “पुन्हा अशी तक्रार करणार नाही रे ! पुन्हा तुला वेगळा मानणार नाही रे ! आता अनुसंधान सोडून राहणार नाही रे ! फक्त…

.. .. उपेक्षू नको गुणवंता अनंताsss, रघुनायका, मागणे हेचिं आता.”

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “सुन्या आणि सुन्याची बायको…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “सुन्या आणि सुन्याची बायको…” ☆ श्री मंगेश मधुकर

साडेसहा-सातची वेळ, आल्हाददायक वातावरण, ऊन तापलं नसल्यानं अनेकजण फिरायला, व्यायामाला बाहेर पडलेले. रस्त्यावर गाड्यांची फार वर्दळ नव्हती. एवढ्या सकाळी एका ठिकाणी मात्र गर्दी जमलेली. दुकान उघडायची वाट पाहण्याऱ्या आसुसलेल्या नजरा. हे रोजचचं दृश्य. दिवस उगवला की अनेक पावलं आपसूक देशीच्या दुकानाकडं वळायची.. त्यांच्यापैकीच एक होता ‘सुन्या’.

चाळीशीच्या आसपास वय, बिगारी काम करायचा. वाटलं तर कामावर जायचं नाहीतर चौकातल्या रिकामटेकड्यांबरोबर टाईमपास हेच रुटीन. बायको चार घरची धुणी-भांडी करून घर चालवायची. सुन्या बेफाम प्यायचा. त्याच सवयीनं तब्येतीची वाट लागली तरी नाद सुटला नाही. दोन मुली बायकोच्या पदरात टाकून अकाली गेला.

देशीच्या दुकानासमोरच चार दिवसांपूर्वी सुन्यानं जीव सोडला तेव्हा सगळ्यांना धक्का बसला. रोजच्या बैठकीतल्या मित्राच्या जाण्यानं जो तो हादरला. दुकानात भरलेला ग्लास हातात घेऊन त्याचीच चर्चा.

– – “आमचे परमस्नेही, हितचिंतक, नित्यनियमाने भेटणारे, अल्पभाषी, कायम स्वतःच्या तंद्रीत असणारे, आमचे सन्मानीय ग्राहक “सुन्या”(पूर्ण नाव माहीती नाही) यांची उणीव कायम भासणार. आमच्या भरभराटीत, त्यांचाही खारीचा वाटा आहेच. सकाळ, दुपार, संध्याकाळ असं वेळेचं कोणतचं बंधन न पाळता, त्यांनी आमच्या सेवेचा लाभ घेतला. कधीच भेट चुकवली नाही. साथ सोडली नाही. आता कायमचे दूर गेले. वाईट एवढंचं वाटते की, रोजचं गिर्हाइक कमी झालं… त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली”

– दुकान मालकानं सुन्यासाठी लावलेला हा फ्लेक्स सर्वांच्या चर्चेचा विषय झाला. सुन्याची बायको पोरींना घेऊन दुकानाजवळ आली. अक्षरं जुळवत जमेल तसं वाचताना भावनांचा उद्रेक होतं होता. त्याभरात कडेवर बसलेल्या रडणाऱ्या मुलीवर खेकसलीसुद्धा. फ्लेक्स वाचल्यावर नवऱ्याच्या आठवणीनं तिला खूप भरून आलं. डोळे घळाघळा वहायला लागले आणि खूप संताप झाला. रंग उडालेल्या साडीच्या पदरानं डोळे पुसत दुकानाकडं पाहत तिनं करकचून शिव्या हासडल्या आणि पचकन थुंकली. एकदा नाहीतर तीनदा. वाटोळं होवो, किडे पडो म्हणत मोठ्या पोरीच्या हाताला धरून तरातरा चालायला लागली. पोरगी मात्र मागे वळून वळून फ्लेक्सवरचा बापाचा हसरा फोटो कौतुकानं पाहत होती. त्याचवेळी दुकानात घरादाराला वाऱ्यावर सोडून, प्रॉब्लेम्सपासून पळणारे अनेक “सुन्या” जमा झाले होते.

– – पाच दिवसांपूर्वी मला ही बातमी समजली होती. तेव्हा खूप वाईट वाटलं. माझ्याकडं घरकाम करणाऱ्या संगीताचा नवरा सुन्या गेला. कित्येकदा पैसे मागायला यायचा. तोंडओळख होती. परिचयातला माणूस तडकाफडकी गेला की पुढचे काही दिवस अस्वस्थेत जातात. माझंही तसंच झालेलं. डोक्यातून ‘सुन्या’ जात नव्हता. बेल वाजल्यावर मी दार उघडलं. समोर संगीताला पाहून धक्काच बसला.

“संगीता तू…. ”

“हा कामाला आलीय”

“अगं पण.. ”

“नवरा जाऊन पाचच दिवस झालेत ह्येच ना”

“हो, पंधरा-वीस दिवस तरी घरी थांबायचं. ”

“तो जिवंत असताना तरी काय कामाचा होता. म्हणून आता त्याच्यासाठी घरी बसू. ”

नवऱ्याबद्दलचा संताप, राग संगीताच्या चेहऱ्यावरून, बोलण्यातून जाणवला. उगीच विषय वाढवायला नको म्हणून जास्त काही बोलले नाही. कामं झाल्यावर निघताना संगीता म्हणाली

“ताई, मगा बोल्ले त्याचा राग आला का? “

“नाही गं… पण जरा… “

“डोक्यावर परिणाम झालाय वाटलं असलं पण जे घडलं त्ये व्हणारच व्हतं. जरा लवकर झालं इतकंच. त्या बेवड्याइषयी काही वाटत नाही. फक्त पोरींचा ईचार करतेय. दोघींना लई शिकवायचयं. तुमची मदत पाहिजे. ”

“नक्की, काय मदत पाहीजे ते सांग. किती पैसे? ”

“पैसे नको. तुमच्या वळखीनं एखादी नोकरी मिळाली तर उपकार व्हतील. धुणी भांडीची कामं अन नोकरी दोनी करलं. ” परिस्थिती माणसाला घडवते अन बिघडवते सुद्धा. परिस्थितीला आपण सामोरं कसं जातो यावर सगळं अवलंबून असतं. संगीताच्या धैर्याचं, हिंमतीचं, दूरदृष्टीचं फार कौतुक वाटलं.

दहावीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ. गर्दीनं हॉल भरलेला. त्यातच रंजना, रूपाली आई संगीतासोबत बसलेल्या. स्टेजवर एकेकाचं कौतुकसोहळा सुरू असताना निवेदक म्हणाला “आणि आता सर्वात महत्वाचा सत्कारासाठी कुमारी रंजनाला स्टेजवर आमंत्रित करतो. रंजना फक्त शाळेतच नाहीतर आपल्या जिल्ह्यात पहिली आलीये. जल्लोषात तिचं स्वागत करा. ”निवेदकाचं बोलणं संपायच्या आता टाळ्या सुरू झाल्या. सगळे रंजनाकडे पहायला लागले ती बावरली. वर्गशिक्षिका स्टेजवर घेऊन गेल्या तेव्हा रंजनाचे हातपाय लटपटत होते. सत्कार करताना गोल्ड मेडल दिल्यावर भावूक झालेली रंजना डोळ्यातलं पाणी रोखू शकली नाही. माईक हातात होता पण शब्द फुटत नव्हते. पाण्याचा घोट घेऊन रंजनानं सुरवात केली. “सर्वांना नमस्कार, खरं सांगायचं तर हे सगळं स्वप्न वाटतय. या यशाचं श्रेय हे माझी शाळा, शिक्षक, मित्र-मैत्रिणी या सर्वांचं आहे. मला खूप सांभाळून घेतलं आणि वेळोवेळी मदत केली हे उपकार जन्मभर विसरणार नाही. सर्वांना मनापासून धन्यवाद! ! ”स्टेजवर डोकं टेकवत सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून रंजनानं पुढे बोलायला सुरवात केली “या मेडलवर सगळ्यात मोठा हक्क माझ्या आईचा आहे. काही वर्षापूर्वी वडील गेले. घरची परिस्थिती हलाखीची. आजी, काका यांनी जबाबदारी टाळण्यासाठी आईला बोल लावत हात झटकले. घराबाहेर काढलं. पुढे सगळाच अंधार. अशा परिस्थितीत आईनं हिंमत सोडली नाही उलट ती डबल आत्मविश्वासानं कामाला लागली. नोकरी आणि धुण्याभांड्याची कामं करत आम्हांला शिकवलं. मुलींचं शिक्षण एवढं एकच ध्येय उराशी बाळगून ती जगतेय. तिला शिकायचं होतं पण परिस्थितीमुळे शिकता आलं नाही आणि लग्नानंतर सगळंच बदललं पण आवड कायम होती. म्हणूनच यंदा आईनं माझ्याबरोबर दहवीची परीक्षा दिली. दोघींनी सोबत अभ्यास केला आणि ४९% टक्के मिळवून आई पास झाली. आईच्या जिद्दीचा, कष्टाचा, लढाऊ वृत्तीचा खूप अभिमान आहे. घरदार, नोकरी सगळं सांभाळून आईनं मिळवलेलं यश माझ्यापेक्षा फार फार मोठयं. जास्त काही बोलत नाही, आईला स्टेजवर बोलवते. मम्मे स्टेजवर ये. ”आईकडे पाहत रंजनानं म्हणाली. सगळे पहायला लागल्यावर बावरलेल्या संगीतानं पदरामागे चेहरा लपवला.

धाकट्या रुपालीनं आईला स्टेजवर नेलं. पुढे येत रंजनानं मेडल आईच्या गळ्यात घातलं आणि वाकून नमस्कार केला तेव्हा संगीताचा बांध फुटला. लेकीला कुशीत घेऊन डोळ्यातल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली. वातावरण एकदम भावुक. सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवत संगीताला मानवंदना दिली.

“मम्मे, बोल. ”

“कोण मी? नाय वो”संगीतानं माइक मागे ढकलला.

“असं काय करते. बोल ना. ” रंजनानं आईचा हात घट्ट पकडला तेव्हा थरथरत्या हातानं संगीतानं माइक घेतला “नमस्ते. काय अन कसं बोलायचं ते माहीत नाय पण आज भारी वाटतयं. समदयांना ‘थेंकू’. माज्यासाठी लई आनंदाचा दिस हाये. पोरींचा बाप पक्का दारुडा त्यातच संपला. बायकोच्या जिवावर जगत होता. पैसे दिले नाहीतर मारायचा. बारा वर्षापूर्वी गेला आणि आम्ही सुटलो. जे झालं ते चांगलंच झालं”भरून आल्यानं संगीता बोलायची थांबली. तिचं बोलणं ऐकून सर्वांना धक्का बसला. हॉलमध्ये शांतता.

“नवरा गेला अन चांगलं झालं ह्ये ऐकून जरा ईचीत्र वाटलं असेल पण माज्या बाजूनं ईचार करा. त्याच्या जाण्यानं नावापुरता असलेला आधार संपला आणि आमचं नवीन आयुक्ष सुरू झालं, लई संकट आली. येकापेक्षा येक अनुभव आले. एकटी बाई सोबत दोन पोरी बघून फायदा घेण्यासाठी टपलेली माणसातील जनावरं जवळून बघितली तरी सर्वांना पुरून उरले. काही चांगली माणसं सुद्धा भेटली त्यांनीच आधार दिला मदत केली मणून तर आत्ता इतं तुमच्यासमोर बोलतेय. नवरा असता तर अजूनही मार खात बसले असते अन माज्या पोरी.. ” माइक बाजूला ठेवून संगीता डोळे मिटून उभी राहिली. पुन्हा एकदा शांतता. सर्वांना नमस्कार करून संगीता, रंजना, रूपाली स्टेजवरून उतरल्या. कार्यक्रम संपल्यावर संगीता भोवती गर्दी झाली. सगळे अभिनंदन, कौतुक करत होते, सेल्फी काढत होते. संगीताचा पार गोंधळ उडाला. मला पाहून कावरीबावरी संगीता घोळक्यातून सुटका करत धावत आली.

“बरं झालं ताई, तुम्ही भेटलात. पार कसंतरीच वाटत होतं”

“अभिनंदन! ! संगीता. तू खरंच ग्रेट आहेस”

“रंजीनं नावं काढलं. शिकायची जुनी ईचा व्हती पोरींनी आग्रह केला अन तुम्ही शिकवणी घेतली म्हणून”

पाया पडण्यासाठी वाकलेल्या संगीताला कडकडून मिठी मारली. चेहरा ओंजळीत धरून एकटक पाहत राहिले.

“ताई, काय झालं. असं का पाहताय. ”

“तू भारियेस! ! खूप भोगलसं. सहन केलंस पण हार मानली नाहीस. शेवटी जिंकलीस. ”

“पोरीना लई शिकवणार, मोठं हापिसर करणार. ”

“नक्की करशील. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि हो अजून एक.. आता बारावी…. ”

“हा नक्की……. ”नेहमीच्या उत्साहानं संगीता म्हणाली.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘तो….’ – भाग – 2 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘तो….’ – भाग – 2 ☆ श्री आनंदहरी 

थोडा वेळ थांबून तो आज्जीचा निरोप घेऊन पुढं निघाला तेंव्हा आज्जी म्हणाली,

“ हायंस तवर येत जा.. अनमान नगं करुस..

ही समदं गाव, हितली मान्सं आप्पानी कवा येगळी मानली न्हाईत…. आप्पांचा नातू हायस तू. … समदी तुजीचं हायती बग.. ”

आज्जीच्या पोटातली माया तिच्या स्पर्शातून आणि चेहऱ्यावरील खुशीतून त्याच्या मनापर्यंत पाझरली होती.

तो मनापासून ‘हो’ म्हणाला.

आई-बाबा अचानक गेले अन तो एकटा पडला.. चार दिवस सगळेच नातेवाईक, परिचित परिचित हळहळले.. त्यांनी त्याच्यावर आधाराचा, मायेचा पांघर घातला होता.. हळूहळू सारे पातळ होत गेले.. कुणासाठी कुणाचे जगणं थांबून राहत नाही.. हे खरं.. पण माया? मामी मात्र येत होती, बोलवत होती.. माया करत होती.. नाहीतरी लहानपणापासून मामा-मामीचा ओढा असतोच.. एके दिवशी मामीने त्याच्या लग्नाचा विषय काढला आणि तिच्या भावाच्या मुलीचा प्रस्ताव पुढे ठेवला.. तो त्या मुलीला कळत्या वयापासून पहात होता… त्याच्या मनाने पहिल्या झटक्यात नकार दिला होता.. पण मामीला सांगायचं कसं?

त्याने एकेदिवशी मामाला सांगितले. नंतर मामी काही बोलली नाही.. पण तिची माया पातळ होत गेली.. महिन्याभरातच येणे, बोलावणे कमी होत गेले. स्वार्थ मनात ठेऊन पांघरलेली मायेची चादर लवकर विरून जाते..

आपण नाही म्हणालो ते आपले चुकले का? तो पुढचे काही दिवस अंतर्मुख होऊन विचार करत होता. त्याची आई म्हणायची, ‘ आपण दुसऱ्याकडे बोट दाखवताना एक बोट त्याच्याकडे असते पण त्याच वेळी चार बोटं आपल्याकडे असतात हे कधीच विसरू नकोस. दुसऱ्याला दोष देताना, आरोप करताना आधी अंतर्मुख होऊन, त्रयस्थपणे स्वतःच्या वागण्याचा विचार करावा. आपले काय चुकलंय? , आपला दोष किती आहे? हे आधी तपासावे. ’

मामीच्या बाबतीत त्याने स्वतःला तपासले होते..

मनातल्या विचारांची सोबत घेऊन चालत तो गावात पोहोचला होता. वाटेकऱ्याचे घर माहीत नव्हते.. झाडाच्या सावलीत भर दुपारचा बैदुलाचा डाव मांडलेल्या छोट्या मुलांपैकी एकाला त्याने वाटेकऱ्याचे घर विचारले. ‘ चला दावतो.. ‘ म्हणत बारक्या त्याला थेट घराजवळ घेऊन गेला आणि अंगणातूनच.. ‘ओ आत्ती, तुमाकडं पावनं आल्यात बगा.. ’ म्हणून ओरडून सांगून ‘जातो खेळाय ‘ म्हणत त्याचा निरोप घेऊन पळत गेलासुद्धा..

बंद असणाऱ्या घराची साफसफाई करवून घेऊन तो आपल्या घरात मुक्कामालासुद्धा गेला होता. आप्पा खोतांचा नातू आलाय म्हणल्यावर कुणी कुणी येऊन भेटत होते.. तिन्हीसांजेला चार लोकं गप्पा मारायला सोप्यात गोळा झाली होती.

तो वाटेकऱ्यासोबत दिवसभर रानात गेला होता. आपली रानं तो पहिल्यांदा पहात होता.. रानभर मोकळेपणाने फिरत होता. त्याचे निद्रिस्त घर ही जागते झाले होतं.. लबकात असणाऱ्या गावात मोबाईला रेंज नव्हती.. रानात गेल्यावर मात्र रेंज मिळायची.. पण त्याला फोन तरी कुणाला करायचा होता? आवर्जून फोन करून कुणाशी बोलावे असं त्याला अलीकडे वाटतंच नव्हते. मामीची माया आटली होती पण मामा अधून मधून फोनवर त्याची चौकशी करत होता. त्याने मामाला फोन करून तो गावी आल्याचे सांगितले होतं…

दुपारचा रानातल्या आंब्याच्या झाडाखाली सावलीला बसला असताना कार्यालयातील सहकाऱ्याचा फोन आला.

‘अरे, कुठं आहेस मित्रा? तुझा फोन किती ट्राय करत होतो.. लागतंच नव्हता.. गुड न्यूज आहे. तुझे सस्पेंशन उठवलंय.. लवकर हजर हो.. आणि पार्टी पाहिजे बरं का… चल, गडबडीत आहे ठेवतो. ‘ तो एक शब्द ही बोलला नाही. त्याला बोलवसंच वाटलं नव्हतं.

कंपनीत कामाला लागल्यापासून समवयस्क असल्याने चार-पाच जणांची चांगली मैत्री झाली होती.. सुट्टीच्या दिवशी एकत्र सहलीला जाणे, चित्रपट पाहणे, अनेकदा सगळे मिळून एकत्र जेवायला जाणे.. गप्पा, मौज, मस्ती.. नुसती धमाल. पण कंपनीत समस्या निर्माण झाली तेंव्हा स्वतःच्या सोईसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी सारा दोष त्याच्यावर थोपवून रिकामे.. तेंव्हा त्यांनी खऱ्या खोट्याचा विचार ही केला नव्हता.. त्याचा, त्याच्या मनाचा, आजवरच्या मैत्रीचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नव्हता.. त्यांना स्वतःला त्यातून मुक्तता पाहिजे होती ती तेवढी त्यांनी मिळवली होती.. आणि मानभावी पणे त्याच्याशी बोललेही होते. पण त्यात वास्तवतेची किचिंतशी सावलीसुद्धा नव्हती… त्यानंतर इतके दिवसात त्याची साधी चौकशीही केली नव्हती.. आणि आता कंपनीने निलंबन उठवल्यावर लगेच… किती हा मानभावीपणा.. ते नाटकी, खोटे खोटे वागणे, बोलणे, आपुलकी, आपलेपणा दाखवणे..

बाबा म्हणायचे ‘ नात्याची, मैत्रीची खरी पारख ही आपण संकटात असताना, अडचणीत, अभावात असताना होते.. ’ अडी-नडीला पाठीशी उभी राहणारी माणसे कमीच.. बाकी सारे सुखाचे सोबती.. गरज सरली की सरळ फेकून देणारेच…. त्याच्या मनातले विचारांचे वावटळ वाटेकरी आला त्यामुळे निमाले.

वाटेकरी चांगलाच अनुभवी.. रानातल्या कामातही आणि माणसात वावरण्यातही. रानात जाता-येता, फुरसतीच्या वेळी काही-बाही सांगत रहायचा. “ माणसाला काय लागतं वं जगाय? भुकेला कोंडा न निजेला धोंडा असला म्हंजी बास. अवो, तुकडोबांचं भजन म्हंत्यात न्हवका, ‘राजास जी महाली.. ‘ तशातली गत असती. सुखाला दुसरं काय बी लागत न्हाय बगा. पर

माणसाची हाव त्येला तिच्या मागनं पळवत ऱ्हाती बगा.. मरंस्तवर.. ” वाटेकरी त्याच्याशी असेच काहीतरी बोलत राहायचा.. काही आठवणी सांगत राहायचा.

आप्पांच्या माघारीसुद्धा वाटेकऱ्याने नियमित झाड-लोट ठेवल्याने, उभेकडी- भुई सारवण करत असल्याने, कोणी राहत नसूनसुद्धा घर व्यवस्थित राहिले होते. घरातल्या साऱ्या वस्तू पोत्यात बांधून ठेवल्या होत्या. घरातल्या फडताळात त्याला काही पुस्तके आढळली.. धूळ साठलेली, काहींच्या पानांना कसर लागली होती.. त्याने धूळ झटकून पुस्तके पुसून घेतली.. दोनतीन धार्मिक ग्रंथ, आणि इतर काही पुस्तके होती. तिन्हीसांजेला सोप्यात भरणारी शेजाऱ्यांची गप्पांची मैफल संपली की जेवण झाल्यावर, पडल्या पडल्या तो त्यातील पुस्तक वाचत असे. पुस्तक वाचायला सुरुवात केल्यापासून घरात मोबाईलला रेंज, नेट नसल्यामुळे त्याची जराही चिडचिड झाली नव्हती. उलट त्याला पहिल्यांदाच बरं वाटलं होतं, आनंद झाला होता.

‘माणूस सुखापाठी, संपत्तीपाठी कितीही पळत राहिला तरी कधीतरी, कुठंतरी त्याला थांबावं लागतेच.. पण कधी आणि कुठं थांबायचे ज्याला कळतं तोच खरा सुखी होऊ शकतो.. ‘

त्याने फडताळातलं पुस्तक वाचायला घेतलं होतं.. त्यातील वाक्य त्याला आठवले.

“ गावात कधी भांडणं होत नाहीत काय? ”

त्याने एकदा वाटेकऱ्याला प्रश्न विचारला होता तेंव्हा वाटेकरी हसत म्हणाला होता,

“ घर हाय आन भांड्याला भांडं लागलं न्हाय आसं कवा हुईल काय? दोन माणसं संगती ऱ्हायली का कवा ना कवा भांडान ही हुयाचंच.. ‘मी’ असतो का न्हाय.. त्यो ‘मी’ च भांडान लावीत आसतो.. पर त्ये भांडान किस्तं दिस चालू ठ्येवायचं ह्येचा ईचार ज्येचा त्येनं कराय पायजेल.. गावातंबी कवा कवा भांडान हुतं पर ती भांडान दुसरा दिस काय बगीत न्हाय बगा.. ”

निवृत्तीच्या वयाच्या पुढं गेलेला वाटेकरी दिवसभर रानात जोमानं राबत होता.. त्याला माहिती देत होता. सांगत- शिकवत होता. शहरी जीवनातल्या, नोकरीतल्या ताण-तणावांनी तो गावात आल्यापासून त्याच्या मनाला स्पर्शही केला नव्हता. गावातली प्रदूषण नसलेली मुक्त मोकळी हवा आणि प्रदूषित मनं नसलेली, मोकळ्या-ढाकळ्या मनाची, काहीशी फटकळ तरीही पोटभर माया असणारी माणसं त्याला आवडू लागली होती. आई-वडील गेल्यावर एक प्रकारचे एकाकीपण, एकटेपण त्याच्या मनाला पोखरत असायचे.. आई-वडिलांची आठवण येत असली तरी गावाकडे त्याला ते एकटेपण जाणवत नव्हते.

“ मी तुमास्नी भेटाय येणारच होतो.. आपलं आप्पा हुतं तवापासनं समदं रान वाट्यानं करतुय.. आता वय झालं, पैल्यागत नेटानं हुईना झालंय.. येक येळ आशी येत आस्ती.. निसतं करतो करतो म्हनून होत न्हाय बगा.. त्या आगुदरच मानसानं थांबाय पायजेल.. आन पोरंबी नोकरीला भाईर गेल्यात.. त्यासनी माघारी इवू वाटत न्हाय.. तवा दुसरा कुनी वाटेकरी बगा आन मला मोकळं करा.. आसं सांगाय याचा हुतो.. तवर तुमीच आलासा.. लई ब्येस झालं बगा. आता तुमीच काय ती येवस्ता बगा.. ”

फुरसतीच्या वेळी वाटेकऱ्याने त्याला सांगितले. त्याने वाटेकऱ्याकडं पाहिले. वार्धक्याच्या खुणा अंगभर पसरल्या होत्या.. त्याला पहिल्या दिवशी भेटलेली आज्जी आठवली.. ऐंशी पार केलेली.. तरीही वस्तीवर काही ना काही कामं करत असलेली.. ‘कर्मयोग याहून वेगळा काय असतो? ‘ त्याच्या मनात येऊन गेले..

काहीसा विचार करून निश्चयी स्वरात तो म्हणाला,

“ दुसरं कोण नाही.. यापुढे तुमीच वाट्यानं करायचं.. मी आहे तुमच्या सोबत.. आणि एक.. मला सगळे शिकवायचं.. शिकवाल ना? ”

वाटेकऱ्याने काहीसे अविश्वासाने विचारले,

“ तुमी हितंच ऱ्हानार हायसा.. खरंच सांगतायसा? मंग तर द्येवच पावला म्हनायचा.. “

वाटेकऱ्याच्या चेहऱ्यावर आगळं- वेगळं खुशीचं, प्रसन्नतेचं आभाळ दाटून आलं होतं..

“ हो.. अगदी खरं.. “

तो निश्चयाने म्हणाला आणि त्याने मोबाईल हातात घेवून कंपनीला पाठवण्यासाठी ‘राजीनाम्याचा’ मेल टाईप करायला सुरवात केली.

– समाप्त –

 © श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘तो….’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘तो….’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी 

एस. टी. तून फाट्यावर उतरून तो गाडीवाटेने चालायला लागला. तसा तो खूप वर्षांपूर्वी, त्याच्या लहानपणी, तो चार-पाच वर्षाचा असताना इकडे आला होता पण त्यावेळी त्याचे आई-वडील त्याच्या सोबत होते. त्यावेळी ते एस. टी. तून उतरले होते, तेंव्हा फाट्यावरच्या आंब्याच्या झाडाखाली बैलगाडी त्यांची वाटच पहात होती. बॅगा घेऊन वडील उतरले तेंव्हा वाट बघत असणाऱ्या गाडीवानाने पुढं होऊन वडिलांना ‘रामराम ‘ करून त्यांच्या हातातील सामान घेतलं होतं.

“ शंकर कसा आहेस? “

वडिलांनी त्याला विचारले.

“ ब्येस हाय जी “ 

त्यांने उत्तर दिले आणि आंब्याखाली येताच तो गाडी जुंपू लागला होता. गाडी जुंपेपर्यंत सावलीत बसून चार घोट पाणी पिऊन त्यानं अवती-भवती नजर टाकली होती. गाडी जुंपल्यावर वडिलांनी त्याला उचलून गाडीत ठेवलं तसा तो पुढं सरकून गाडीवानाशेजारी बसला होता.. पहिल्यांदाच बैलगाडीत बसल्यामुळे त्याला सगळे नवीन वाटत होतं.. तो पुढं सरकून बसल्या बसल्या

‘ जरा मागं सरकून बस.. काकांना त्रास देऊ नको.. ’ नेहमीप्रमाणे आईने त्याला दटावले होते.

गाडीवान म्हणाला होता,

“ न्हाय वो वैनी.. पोराचा तरास कशाचा..? “ 

खरंतर त्याला बैलांचा कासरा हातात घ्यावा, आपण पण रुबाबात बैलगाडी चालवावी असे मनातून खूप वाटत होते.. पण त्याने आईकडे पाहून जरासे मागे सरकल्यासारखे केले होते. गाडी दुडक्या चालीने चालली होती.

बैलगाडी डोंगराजवळ येताच काहीशी खडी चढण लागली तसे मागे बसलेले वडील खाली उतरले.

“ कशापायी उतरतायसा.. बसा.. ” 

“ नको.. खडी चढण आहे.. ”

“ अवो दादा, बैलं लय दमाची हायती.. कराडास्नं गाडीभर सामान असल्याली गाडी घाटात्नं वडत्यात.. “

“ हूं.. असू दे चल… अरे त्यांनाही जीव आहेच की.. त्यात उन्हाची रणरण, डोंगरातली गाडीवाट.. ”

खिंडीतील पूर्ण चढण चढून गाडी उताराला लागेपर्यंत वडील गाडीमागून पायी चालत येत होते. उतार लागल्यावर गाडीवानाने गाडी थांबवली तसे वडील परत बैलगाडीत बसले होते..

बैलगाडीतच नव्हे तर साऱ्या प्रवासातच, वातावरणात एक प्रकारची गंभिरता होती.. वडील आई दोघेही तसे मोजकेच बोलत होते.

 “ तुझे आजोबा देव बाप्पाकडे गेलेत.. तिथं गेल्यावर हट्टीपणा, आगाऊपणा करायचा नाही. ”

असे निघताना आईने त्याला सांगितले होते. तेंव्हा त्याला काही महिन्यांपूर्वी आलेले आजोबा आठवले होते.. कसंबसं महिनाभर राहिल्यावर आजोबा बाबांच्या मागं लागले होते.

“ गावाकडे जातो.. एसटीत बसवून दे. ” 

तेंव्हा बाबा त्यांना म्हणाले होते..

“ रहा की इथंच आमच्या जवळ.. इथं आम्ही आहोत.. लागलं सवरलं तर डॉक्टर आहेत जवळ.. कशाला जाताय गावाकडे. तिथं डॉक्टर पण नाही.. मी एवढ्या लांब.. तिथं एकटं कशासाठी राहताय? काय लागलं, सवरलं तर कोण बघणार तिथं तुमच्याकडं..? “

“ आरे, आपलं गाव आहे ते.. आपली माणसं आहेत.. इथं शहरात मन नाही लागत.. आणि खरं सांगू का.. असे किती दिवस राहिलेत आता..

त्या पांढरीनं पोसलेला देह.. त्या पांढरीला परत द्यावा वाटतोय.. सारं आयुष्य तिथं गेले.. शेवटचा श्वास तिथंच सोडावा वाटतं रे…वाईट वाटून घेऊ नको पण पिकलं पान कधीतरी गळून पडायचंच.. ते त्याच मातीत गळून पडावं वाटते रे.. आणि काळजी करू नको तिथं सारी आपलीच तर माणसं आहेत.. ”

वटी बाबांनी नाईलाजाने आजोबांना गावी नेऊन सोडलं होतं…

“ महिन्या-दीड महिन्यातून मी येऊन जात जाईन.. काळजी घ्या.. ”

“ काय बी काळजी करू नगा दादा. आमी हावोत समदे… सवड घावंल तवा येत जावा…”

बाबा निघणार म्हणून भेटायला आलेल्या गावच्या पाटलांनी आजोबांच्या ऐवजी उत्तर दिले होते. त्यांनीच सकाळी शेजारच्या गावातील पोस्टातून फोन करून आजोबा गेल्याचे कळवले होते..

गाडीवाटेने त्याने चालायला सुरुवात केली तसे त्याला हे सारे आठवले. काही आठवणीतले.. काही आई-बाबांनी नंतर कधीतरी सांगितलेले..

तो चालत होता. वरून ऊन तावत होतं. गाडीवाटेचा फुफुटा तापला होता. चालून चालून तो दमला होता.. कुठंतरी सावलीला थांबावं असं त्याला वाटत होतं. त्याची नजर सावली शोधत राहिली..

त्याच्या शाळेतील विज्ञानाच्या सरांच्या तोंडात नेहमी एक वाक्य असायचे ‘ गरज ही शोधाची जननी आहे.. ‘ त्याच्या मनात आले विज्ञानतच कशाला दैनंदिन जीवनातही गरजच शोध घ्यायला भाग पाडते.. आपण सावलीची गरज आहे म्हणून तर झाड शोधतोय.. एवढं रणरणतं ऊन नसते.. तर झाड शोधले असते का? शोधायचे राहू दे..

समोर असतं तरी आपल्याला त्याची जाणीवही झाली नसती.. आपण तसेच पुढे गेलो असतो.. ’

आधी तो विचारांना पकडण्यासाठी धावायचा. आताशा विचार अनाहूतपणे येऊन त्याला पकडत होते.. विचारांबरोबर पाठशिवणी खेळत तो पुढे जात होता.

रस्त्याकडेला झुडपं होती पण त्यांची सावली त्यांच्यातच विरुन गेली होती. दूर खिंडीच्या चढावाला मोठं डेरेदार झाड दिसत होतं.. सावलीसाठी तिथंपर्यंत जाणं भाग होतं.. ‘अभावाशिवाय कुणाचे, कशाचे महत्व उमगत नाही हेच खरं.. ’ दूरच्या झाडाकडे पहात असताना त्याच्या मनात आले. तो स्वतःशीच हसला.. आणि सावलीत लवकर पोहोचण्यासाठी जरा वेगाने चालू लागला. सावलीत आल्यावर तो सुखावला. खांद्याला अडकवलेली बॅग काढून त्यातून पाण्याची बाटली काढली.. थोडेच पाणी शिल्लक होते.. ‘अजून अंदाजे दोन मैल तरी चालावं लागणार आहे.. ’ बाटलीतील पाणी पाहताच त्याच्या मनात विचार आला. पाणी काहीसे उबळ झाले होते. त्याने पाण्याचे दोन घोट घेतले आणि थोडे पाणी बाटलीत शिल्लक ठेवून बाटली बॅगेत ठेवली.. ‘आपण घरी असतो किंवा दुसरे पाणी उपलब्ध असते तर असे उबळ पाणी प्यालो असतो का? ‘ त्याच्या मनाने स्वतःलाच प्रश्न विचारला.

थोडा वेळ सावलीत काढून तो पुढे निघाला…थोडेसेच अंतर गेल्यावर घशाला परत कोरड पडली.. पण तो तसाच चालत राहिला.. गावाची शिव अली तसा तो थांबला बाटलीतले उरलेले सर्व पाणी प्याला आणि चालू लागला. तहान भागली तर नव्हतीच उलट जास्तच लागली होती. वाटेत रानातली वस्ती लागली तसा तो थबकला.. वस्तीजवळच्या झाडाच्या सावलीत बसलेल्या म्हातारीनं त्याला थबकेलेलं पाहिले आणि डोळ्यावर आडवा पंजा धरून त्याला ओळखण्याचा प्रयत्न करीत विचारले,

“ कोण हाय रं? “

“ आज्जी, पाणी मिळेल का प्यायला..? ” 

“ ये बाळा. “ 

तिनं उठून वस्तीच्या बाहेर दांडीवर असणारे बसायचे पटकुर आणून सावलीत अंथरलं.. तोवर तो तिथं पोहोचला होता. ‘ बस बाळा.. ‘ म्हणत तिने आतून आणून रांजणातल्या थंडगार पाण्याचा तांब्या त्याच्यापुढे धरला. तो घटाघटा पाणी पिणार तेवढयात तिने त्याला थांबवले..

“ लेकरा, उनातनं आल्याव असे घटाघटा पाणी पिऊने… आदी बस वाईच…”

तो निमूट बसला.

“ कवा बघितलं न्हाय तुला गावात.. पावणा आलायस व्हय? कुनाकडं? “

“ आज्जी, पाहुणा नाही गावचाच आहे मी? ”

“ गावचा? आन कवा दिसलाबी न्हाईस की,? कुनाचा ल्योक रं? “

 त्याला खरंतर आज्जीच्या चौकस वृत्तीच आश्चर्यही वाटलं होतं आणि ती ज्या पद्धतीने विचारत होती त्याचे हसूही आले होते. पण तो हसला नाही. जाणता झाल्यापासून खेडेगावात असा तो पहिल्यांदाच आला होता. शहरात अडचणीच्या वेळीसुद्धा कोण कुणाची चौकशीही करत नाही आणि इथं या वस्तीवर अनोळखी माणसाबद्दल आपुलकीने भरलेले आणि भारलेले वातावरण… ।

 “ आज्जी, मी इथं नसतो.. आप्पा खोतांचा नातू मी.. ”

 “आप्पांचा नातू व्हय..? आप्पा म्हंजी देवमानुस.. लै उपकार हायती बग गावावं त्यांचं..

आमच्यावं बी. “

 वीस, बावीस वर्षापूर्वी गेलेल्या आजोबांचे अजूनही इतकं नाव निघतंय याचे त्याला आश्चर्य वाटले.

 “ आप्पांचा ल्योक आन सून आक्शीडंटमंदी ग्येलं.. लै वाईट झालं बग.. त्येंचाच पोरगा नव्हका तू,? ”

 वर्षाभरापूर्वी अपघातात गेलेल्या आई-, वडिलांची आठवण येऊन त्याचे डोळे भरून आले..

 “ गप लेकरा.. गप. जलमाला घालणारा आन न्हेणारा त्यो वर बसलाय… त्येच्या म्होरं कुनाचं काय बी चालत न्हाय बग.. ”

 आज्जीने पुढं होऊन पदराच्या शेवानं त्याचे डोळे पुसले. आई-बाबा गेल्याचे समजल्यावर वाटेकरी येऊन गेला होता. गावात तेवढा एकच माणूस त्याच्या ओळखीचा होता. अचानक गावी यायला निघाल्यावर ‘काही कारणाने वाटेकरी भेटला नाही तर आपलं कसं होईल? ’ असा प्रश्न त्याला पडला होता.. आज्जी भेटल्यावर त्याला स्वतःला पडलेल्या प्रश्नाचे ही हसू आले होते.

 “ दुपारचा वखत हाय. दोन घास खाऊन घे.. ”

आज्जी वस्तीवरच्या घरात जाता जाता म्हणाली. खरंतर त्याला भूक लागली होती पण ओळख ना पाळख कसं जेवायचे? तो ‘नको आज्जी.. ’ म्हणाला पण त्याचे ते शब्द आज्जीच्या कानापर्यंत गेले असले तरी मनापर्यंत गेले नव्हते.

 जर्मनच्या थाळीत तो पहिल्यांदाच जेवत होता. आज्जीनं घरातून बांधून आणलेलं जेवण.. तेल चटणी, कांदा, भाकरी आन उसळ.

 ‘खा लेकरा.. ’

ते जेवण आज्जीसाठी बांधून आणलेलं आहे हे त्याच्या लक्षात आले होतं.. पुढं आलेल्या अन्नाचा आणि आज्जीच्या मायेचा मान म्हणून त्याने अर्धी भाकरी खाल्ली..

 “ आरं, लाजू नगं.. प्वाटभर खा.. ”

 “वाटेत भरपेट खाणं झालंय आज्जी.. ”

 तो उठून हात धुता धुता आज्जीला म्हणाला.

क्रमशः भाग पहिला 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पटावरची प्यादी… भाग २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ पटावरची प्यादी… भाग २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

(इन्स्पेक्टरने फोनवरचं नाव पाहिलं, कपाळाला आठ्या घातल्या आणि फोनवर बोलू लागला. त्याने फोन ठेवला आणि त्यानंतर मात्र नाईलाजाने त्याने आमच्याविरुद्ध तक्रार लिहून घेतली.) – इथून पुढे – 

गुन्हा नोंदवला गेला तरीसुद्धा दोन-तीन तास तो सगळा तमाशा चालूच होता. शेवटी संध्याकाळच्या सुमारास एकदाचे ते गावकरी सगळे निघून गेले.

ते गेल्यानंतर मग पोलिस आम्हाला म्हणाले, “आम्हाला कल्पना आहे की तुम्ही यात विनाकारण गोवले जात आहात परंतु आमच्यावरती वरून राजकारणी लोकांचा दबाव असल्यामुळे आम्हाला नाईलाजाने तुमच्याविरुद्ध तक्रार दाखल करून घ्यावी लागली आहे. आत्ता जो फोन होता, तो इथल्या स्थानिक नेत्याचा होता, सरकारी पक्षाचा आहे. त्यामुळे आमचे हात बांधले जातात.

तुम्हाला कल्पना नसेल, ” तो इन्स्पेक्टर सांगत होता, “पण इथल्या स्थानिक लोकांच्या मनात NGOबद्दल राग आहे. या जंगलाच्या जवळच खनिज मिळवण्यासाठी एक खाण कार्यरत होती, त्या खाणीमध्ये या गावातल्या आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतले अनेक गावकरी कामाला होते. परंतु त्या खाणीमुळे तिथल्या पर्यावरणाला जंगलाला नुकसान होत आहे हे काही पर्यावरणप्रेमी एनजीओनी सप्रमाण सिद्ध केलं. त्यामुळे ती खाण बंद केली गेली होती. खाण बंद झाल्यामुळे तिथल्या लोकांचा रोजगार गेला होता. हे या रागाचं एक मोठं कारण होतं.

तुम्ही या जंगलामध्ये वाघ आहेत का हे शोधत आहात. जर इथे वाघ मिळाले तर हे व्याघ्र अभयारण्य म्हणून घोषित होईल. जर असं झालं तर इथल्या सर्व गावकऱ्यांना इथून विस्थापित व्हावं लागेल. आणि ते ना गावकऱ्यांच्या पचनी पडणार आहे, ना ते येथील नक्षलवाद्यांच्या सोयीचे आहे.

आणि तुम्हाला अडकवण्याचं तात्कालिक कारण वेगळंच आहे. ” निरगाठ उकल तंत्राने तो अधिकारी सांगत होता. “काही आठवड्यांपूर्वी इथल्या एका तलावात काही गावकरी ब्लास्ट फिशिंगने (dynamite – विस्फोटकांनी) मासेमारी करत होते…. जंगलातच नव्हे, तर भारतात कुठेही, अशा पद्धतीने मासेमारी करणं हे पूर्णतः बेकायदेशीर आहे. “… तर तुमच्या NGO ने त्या गावकऱ्यांना पुराव्यासकट पकडलं आणि वनखात्याच्या स्वाधीन केलं. वनखात्याने त्यांच्यावर खटला भरला आणि त्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास झाला.

आणि आता इथल्या स्थानिक नेत्याने या गावकऱ्यांना चिथावलं आहे, तुम्हाला अडकवयाचं आणि तुमच्या बदल्यात त्या गावकऱ्यांना सोडवायचं असा हा डाव आहे. “

आम्ही सगळे सुन्न झालो होतो. दरम्यान पोलिसांनी आम्हाला आमची ओळखपत्रे, परवानग्या दाखवायला सांगितली. आम्ही आमच्या कामासाठीच्या आमच्या एनजीओने घेतलेल्या परवानग्या, आमची ओळखपत्रे वगैरे सर्व गोष्टी त्यांना दाखवल्या. ते सर्व पाहून, इन्स्पेक्टरने हवालदारांना सूचना दिल्या आणि आरोपपत्र नोंदवले.

पोलिसांना आमच्या सच्चेपणाची खात्री पटली होती, परंतु त्यांनाही कायदेशीर प्रक्रिया पाळणे बंधनकारक होतं. त्या रात्री त्यांनी आम्हाला तिथेच पोलीस स्टेशनमध्ये ठेवून घेतलं. ते म्हणाले, आज आत्ता इथून बाहेर पडणं तुमच्यासाठी सुरक्षेचं नाही. त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकले नव्हते, परंतु रात्रभर आम्हाला पोलीस स्टेशनमध्येच राहावं लागलं. तोपर्यंत आमच्या एनजीओच्या ऑफिसला ही बातमी पोचली होती आणि मग तिथून सूत्रं हलवायला सुरुवात झाली.

कोर्टात खटला उभा राहणार होता, आमच्यातर्फे आमचे टीम लीडर हजर राहणार होते. आम्हाला सोडून देण्यात आलं. मी पुण्याला परत यायला निघालो. तालुक्याला बसस्थानकावर आलो तर तिथल्या वर्तमानपत्रात आम्हा सगळ्यांच्या फोटोंसकट आमची बातमी पहिल्याच पानावर ठळकपणे छापली होती. मी तोंड लपवत प्रवास केला.

मी घरी आलो. आई वडील अर्थातच घाबरलेले होते. वडिलांनी तर अल्टिमेटच दिला होता की ‘बास झाली तुझी समाजसेवा. अन्य चार मित्रांप्रमाणे कुठेतरी खर्डेघाशी कर पण यातून बाहेर पड. ‘

तिकडे कोर्टाच्या तारखा पडत होत्या. सुदैवाने मला स्वतःला तिथे उपस्थित राहावे लागत नव्हतं. आमच्या संस्थेचे अधिकारी आमच्यातर्फे आमच्या वतीने कोर्टात उभे राहत होते. ते क्षेत्र सोडून अन्य ठिकाणी आमची काही ना काही काम चालूच होती.

दीड वर्षानंतर मला पोलिसांकडून रजिस्टर पोस्टाने एक पत्र आलं. त्याच्यावरती बी फॉर्म असं काहीतरी लिहिलं होतं. पोलिसांनी कोर्टाला कळवलं होतं त्यांचा प्राथमिक तपास पूर्ण झाला होता आणि आमच्याविरुद्ध सकृतदर्शनी कोणतेही पुरावे नव्हते.

That was a great relief. आता आम्हा सर्वांवर कायद्याची कोणतीही लटकती तलवार नव्हती. पण त्यातलं मुख्य वाक्य मला कळलं नाही, त्या बी फॉर्ममध्ये लिहिलं होतं की “प्रकाश यादव” याच्याविरुद्ध आता कोणताही गुन्हा दाखल नाही, तो कोणत्याही प्रकारच्या गुन्हामध्ये आरोपी नाही किंवा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा सिद्ध झालेला नाही.

ही मला clean chit होती, पण त्याच्यावरती नाव भलतंच होतं. माझं नाव तर प्रसाद जाधव आहे आणि ही क्लीनचीट कोणा प्रकाश यादवला दिलेली होती.

मी त्या पोलीस स्टेशनला फोन केला, त्यांना सांगितलं की मला बी फॉर्मचे पत्र आलं आहे पण त्यात वेगळंच नाव आहे. हा काय प्रकार आहे? “

तो पोलीस अधिकारी हसला आणि म्हणाला, “साहेब, खरं कोण आणि खोटं कोण याची थोडीफार तरी समज आम्हाला असते. तुमच्याविरुद्ध बनाव रचला गेला होता हे आम्हाला त्याच दिवशी कळलेलं होतं. तुमच्याप्रमाणेच आम्हीही पटावरची प्यादी होतो हे आम्हालाही ठाऊक होतं. आणि म्हणून आम्ही तुम्हा चौघांचीही नाव लिहिताना जाणून-बुजून गफलत केली होती. उद्या दुर्दैवाने तुम्ही दोषी सिद्ध जरी झाला असतात तरी कागदोपत्री प्रकाश यादवला शिक्षा झाली असती, प्रसाद जाधवच्याविरुद्ध कोणताही कागद मिळाला नसता. उद्या तुम्ही पासपोर्ट काढायला गेला असतात, अन्य कुठल्या ठिकाणी नोकरीवरती जायचं असतं तर तुमच्या (खऱ्या) नावावर कोणताही गुन्हा नोंदवलेला मिळाला नसता, एवढी खबरदारी आम्ही घेतली होती. त्यामुळे जरी तुमच्याकडे आता बी फॉर्म आला असला तरी मुळात तुमच्या “प्रसाद जाधव” नावावरती कुठला गुन्हा दाखलच झालेला नव्हता. त्यामुळे तुम्हाला असंही चिंतेच कारण नव्हतं. ती सगळी घटना तुम्ही पूर्णपणे एक दु:स्वप्न समजून विसरून जा. ” इन्स्पेक्टर मला आश्र्वस्त करत होते.

“तिथल्या स्थानिक नेत्याचं काय झालं हो? ” मी पुन्हा आयुष्यात कधीही तिथे जाणार नव्हतो पण तरी माझी उत्कंठा मला गप्प बसू देईना.

तो पोलीस अधिकारी हसला आणि म्हणाला, “साहेब, ते आता आमदार झाले आहेत आणि कदाचित पुढच्यावेळी मंत्री सुद्धा होतील. ” 

माझ्या अंगावर सरसरून काटा आला. “तुला सांगतो, ” तलावाकाठी सूर्यास्त बघताना प्रसाद त्याच्या भावी वधूला सांगत होता, “त्या दिवशी, फक्त त्या दिवशी एकदाच, मला असं वाटलं होतं की उगाच आलो आपण या क्षेत्रात. पण नाही, दुसऱ्या दिवशी मी ती मरगळ झटकली आणि आजही मी आणि आमची NGO जंगल परिसर आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना जंगलांचं पर्यावरणाचे महत्त्व शिकवण्याच्या आमच्या कामावर रुजू आहे. “

मळभ दूर झालं होतं, प्रसादच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हलकं स्मितहास्य झळकू लागलं होतं. पटावराचे प्यादं आपलं निसर्ग रक्षणाचं काम इमाने इतबारे बजावत होतं.

(सत्यकथा – नाव बदलेलेले)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पटावरची प्यादी… भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ पटावरची प्यादी… भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

तिचा हात हातात धरून प्रसाद जाधव तलावाकिनारी बसला होता. त्यांचं लग्न ठरलं होतं, साखरपुडा झाला होता आणि आज शनिवारी संध्याकाळी निवांतपणे फिरण्यासाठी ते दोघं तलावावर आले होते. त्यांचं arranged marriage होतं. त्यामुळे या अशा भेटीतूनच एकमेकांच्या विषयीची छापील बायोडाटामध्ये न छापलेली माहिती एकमेकांना होत होती.

मावळत्या सूर्यनारायणाकडे बघत तिने त्याला विचारलं, “शहरातले तुम्ही, मग या जंगलांचे वेड तुम्हाला कसं काय लागलं? “

खरंच होतं ते. त्याच्या अनेक मित्रांना हाच प्रश्न पडला होता. जन्मापासूनच तो अस्सल पुणेरी. पण त्याला आवड होती ती जंगलांची. त्याने वनशास्त्र (forestry) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. आजही तो एका पर्यावरण विषयक सामाजिक कार्य करणाऱ्या नॉन-गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन (NGO) मध्ये कार्यरत होता.

तिच्या प्रश्नावर तो नुसताच हसला, त्याने काहीच उत्तर दिलं नाही.

“असे कधी झालं का हो, ” तिनं अजून विषयाचा पिच्छा सोडला नव्हता, “की तुम्हाला वाटलं, की आपलं चुकलंच. आपण या असल्या विषयात यायलाच नको होतं. ” 

हा प्रश्न तसा अनपेक्षित होता, पण या प्रश्नाने कुठेतरी त्याच्या मनाची तार आर्तपणे छेडली गेली. इतका वेळ मोकळाचाकळा बसलेला तो, आता अचानक सावरून बसला. इतका वेळ त्याच्या ओठावरती अलगद विलसत असलेलं स्मितहास्य गायब झालं, कपाळावर आठ्या पडल्या आणि तो म्हणाला, “मी तुला एक गोष्ट सांगतो. एक आटपाट जंगल होतं”, आटपाट नगर होतं या चालीवर त्याने गोष्टीला सुरुवात केली,

“खूप मोठ्ठं जंगल! आणि या जंगलात वाघोबा सापडतात का हे बघण्यासाठी आमच्या NGO तर्फे, वनखात्याची रीतसर परवानगी वगैरे घेऊन, मी आणि माझे सहकारी गेलो होतो. जर वाघोबा सापडले असते, तर हे जंगल व्याघ्र अभयारण्य म्हणून घोषित झालं असतं.

वाघ शोधण्यासाठी आम्ही जंगलात ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले होते. या कॅमेरांचं वैशिष्ट्य असं असतं, की त्या कॅमेऱ्याच्या टप्प्यात हालचाल झाली की आपोआप तिथे फोटो काढला जातो. रात्रीच्या अंधारात पाणी पिण्यासाठी ज्या वेळेला श्वापदं बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्या हालचालीने हे कॅमेरा ऍक्टिव्हेट होतात आणि फोटो काढले जातात.

आमचं कामच हे होतं की रोज सकाळी जंगलात जिथे जिथे कॅमेरे लावले आहेत तिथे जायचं, तिथल्या मेमरी कार्डमध्ये काही फोटो निघाले आहेत का, त्याच्यात वाघ दिसतोय का हे बघायचं, ते मेमरी कार्ड काढून घ्यायचं, नवीन रिकामं मेमरी कार्ड कॅमेरामध्ये ठेवायचं आणि मुक्कामी परत येऊन लॅपटॉपवरती तो डेटा कॉपी करून घ्यायचा, त्याची नोंद करायची.

एका दिवशी आम्ही चौघेजण नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळेला जंगलात फिरत होतो. आमचं सकाळचं काम संपलं, सोबत आणलेले डबे खाल्ले आणि दुपारी एकच्या सुमारास आम्ही तिथून बाहेर पडलो. जंगलाची हद्द जिथे संपते, तिथवर आलो, मी गेट उघडलं आणि गाडी गेटमधून बाहेर आल्यावर गेट बंद करत असताना माझ्या लक्षात आलं की जंगल हद्दीच्या बाहेर, गेट समोर ३०-४० जण उभे होते. मी गेट बंद करण्याच्या नादात होतो, त्यामुळे एवढं लक्ष दिलं नाही, पण नंतर पाहिलं, तर त्यांच्यातला एक जण येऊन आमच्या टीम लीडरशी हुज्जत घालत होता.

तिथली स्थानिक भाषा मला येत नव्हती त्यामुळे तो काय बोलत आहे हे मला सगळं नीट कळत नव्हतं पण त्याचे हातवारे, देहबोली हे बघता काहीतरी भांडण चालू होतं एवढं नक्की. बघता बघता त्या गर्दीतून दोन बायका पुढे आल्या, आमच्या लीडरला काहीतरी अद्वातद्वा बोलू लागल्या आणि एकीने तर पुढे येऊन सरळ त्यांच्या मुस्कटात भडकवली. हे काहीतरी भलतंच घडतंय हे लक्षात येऊन आम्ही सगळेचजण पुढे सरसावलो आणि त्यांच्याशी वाद घालू लागलो. अचानक त्यांच्यातले पाच सातजण आले आणि त्यांनी आम्हाला मारहाण करायलाच सुरुवात केली.

मी आमच्या जीपच्या पलीकडे होतो, त्या सगळ्यांपासून थोडासा दूर. मला ठाऊक होतं की इथून एक किलोमीटर अंतरावरती वनखात्याचं ऑफिस होतं आणि तिथेच जवळ पोलीस स्टेशन होतं. मी त्या दिशेने धावू लागलो, पण ती माणसं प्लॅनिंग करून पूर्ण तयारीतच आली होती. कोणीतरी पोलिसांकडे धावेल हे लक्षात घेऊन, त्या रस्त्यावरही दबा धरून त्यांची माणसं बसली होती.

त्यांनी मला पकडलं, आणि इतरांजवळ आणलं. आता आम्हा चौघांची साग्रसंगीत धुलाई चालू झाली होती. त्यांच्याकडे लाठ्याकाठ्या होत्या, त्याने ते आम्हाला धोपटून काढत होते. आम्ही पुरते घाबरलो होतो, कारण या जंगलामध्ये नक्षलवादीसुद्धा आहेत हे आम्हाला ठाऊक होतं, त्यामुळे आम्हाला कोण मारतंय? का मारतंय? हे मारणारे नक्षलवादी तर नाहीत ना? आणि आता आमचं पुढे काय होणार? अशी प्रश्नांची मालिकाच आमच्या डोळ्यासमोर नाचू लागली होती.

अर्धा एक तास मारहाण करून झाल्यावरती त्यांनी आम्हाला बांधलं आणि आमची वरात चालत चालत त्या पोलीस स्टेशनकडे आणली. जसे ते पोलीस स्टेशनकडे आले, तसं थोडंसं आम्हाला हायसं वाटलं, कारण हे जर नक्षलवादी असते तर ते आम्हाला पोलिसांकडे नक्कीच घेऊन आले नसते.

तिथल्या स्थानिक भाषेत त्यांनी पोलिसांकडे आमची तक्रार केली. आतापावेतो तिथे चांगलाच जमाव गोळा झाला होता. आम्हा चौघांना हाताला काढण्या बांधून गुन्हेगार म्हणून उभं केलं होतं.

त्या गावकऱ्यांची तक्रार होती की तिथल्या आदिवासी वनवासी बायका, ज्या जंगलामध्ये लाकूडफाटा गोळा करायला जात असत, त्यांची आम्ही छेड काढली, त्यांचा विनयभंग केला, त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

हे समजताच आम्ही आश्चर्यचकित झालो, हे काहीतरी भयंकर कुभांड रचून आम्हाला त्यात गोवलं जात होतं.

स्वत:ची बुद्धी आणि शक्ती नसलेली – कोणाच्यातरी कुठल्यातरी अतर्क्य खेळातील पटावरची प्यादी झाल्याचं सपशेल जाणवत होतं. आता हे गावकरी आणखी काय करणार आणि पोलीस काय करणार – सगळाच भविष्यकाळ अनिश्चित आणि अंध:कारमय होता. गावकरी पोलिसांदेखत आमच्यावर भडास काढत होते, मारहाण करत होते, बायका आमच्या नावानं बोटं मोडत होत्या.

आश्चर्य म्हणजे पोलिसांची देहबोली बघून ते बहुधा या सगळ्या आरोपांशी सहमत वाटत नव्हते, ना ते आम्हाला मारहाण करत होते, ना आमच्याविरुद्ध काही लेखी तक्रार लिहून घेत होते. मराठी हिंदी चित्रपट बघून आपल्या मनात पोलिसांबद्दल खूप वेगवेगळे समज झालेले असतात, पण इथे जे काही जाणवत होतो ते असं की पोलीस कुठेतरी आम्हा चौघांच्या बाजूने आहेत.

बहुधा गावकऱ्यांच्याही हे ध्यानात आलं असावं. त्यांनी कोणाला तरी फोन लावला आणि तो फोन पोलीस इन्स्पेक्टरकडे दिला. इन्स्पेक्टरने फोनवरचं नाव पाहिलं, कपाळाला आठ्या घातल्या आणि फोनवर बोलू लागला. त्याने फोन ठेवला आणि त्यानंतर मात्र नाईलाजाने त्याने आमच्याविरुद्ध तक्रार लिहून घेतली.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वैरी… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ वैरी… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(आता निदान तीन आठवडे तिला फक्त काठी घेऊन घरातल्या घरात चालायचं होतं. केतकी दुपारी पुस्तक वाचायला लागली की तिचं मन लागत नसे वाचनात.) – इथून पुढे —

चार दिवसांनी अचानक केतकीला डॉ निखिलचा फोन आला. ”हॅलो, कशा आहात तुम्ही? बरं वाटतंय ना आता? ”

“हो डॉ. मी उत्तम आहे. थँक्स. पण प्लीज केतकीच म्हणा मला. ” डॉ हसले आणि फोन बंद झाला.

केतकीला फार गंमत वाटली. आपल्यालाही या डॉक्टरची आठवण का यावी तिला समजेना. कुठे ते इतके शिकलेले नावाजलेले डॉक्टर आणि कुठे आपण.

तीन आठवड्यानी केतकीला घेऊन आई परत हॉस्पिटल मध्ये आली. आज तिचं प्लास्टर काढणार होते. केतकीचं प्लास्टर डॉक्टर निखिलने हळुवारपणे काढलं. एक्सरे मध्ये हाडे जुळलेली दिसत होती.

“ वावा छान. आता तुम्ही हळूहळू चालू शकता आणि इथे निदान दोन आठवडे तुम्हाला फिजिओ थेरपी साठी यावं लागेल. तुम्ही हॉस्टेल वर खुशाल राहू शकता आता.”, डॉ निखिल म्हणाले.

केतकीची आई डॉक्टरांना विचारून गावी गेली. केतकी आता काठी घेऊन कॉलेजला जाऊ शकत होती. परीक्षा जवळ आली होती.

रोज सकाळी केतकी हॉस्पिटलमध्ये फिजिओला जाऊ लागली. तिचं पाय दुखणं खूप कमी झालं आणि लंगडणं सुद्धा. त्यादिवशी रविवारी ती खरेदी करायला जवळच्या मॉलमध्ये गेली.

”हॅलो मिस केतकी. कशी आहेस तू? माईंड फॉर अ कप ऑफ कॉफी? ”डॉ निखिल हसत तिला विचारत होते. केतकी त्यांच्या बरोबर कॉफी कॉर्नरला गेली.

“बाय द वे, तू अंजनगावला रहातेस का? ” केतकी आश्चर्याने म्हणाली “ हो. तुम्हाला कसं माहीत? ”

“अगं तुझ्या केसपेपरवर पत्ता नव्हता का? मग मला नाही का समजणार? ”,

केतकीला हसू आलं. “ खरंच की. ” ती म्हणाली.

“ तुझा पत्ता वाचताक्षणीच माझ्या लक्षात आलं, तू केतकी कर्वे म्हणजे आमच्या शेजारच्या बंगल्यातली असणार. मन द्विधा झालं, की पिढ्या न पिढ्या वैर जपलेल्या शेजाऱ्यांच्या या मुलीला आपण ट्रीटमेंट द्यावी का नाही? पण तुझा वेदनेने व्याकुळ चेहरा बघितला आणि माझ्यातला डॉक्टर जागा झाला. मी लगेचच कोणताही विचार न करता तुझ्यावर उपचार केले. मी तुला त्याच क्षणी ओळखलं केतकी. आता माझी ओळख…मी डॉ निखिल पोतदार. तुमच्याशेजारचा, तुमच्या आजोबांचे वैरी असलेल्या पोतदारांचा मुलगा.”

केतकीच्या डोळ्यात अश्रू आले.

“असं म्हणू नका डॉ निखिल. अहो कसलं ते वैर आणि काय हो? किती अहम् या जुन्या लोकांना. मी आभारी आहे तुमची फार. तुम्ही देवासारखे धावून आलात आणि मला बरं केलंत. ” केतकी डोळे पुसून निघूनच गेली.

त्यानंतर नकळत केतकी निखिलची वाट बघू लागली. पुन्हा एकदा दोघे ठरवून भेटले.

“ निखिल, एक विचारू? तुम्ही अजून लग्न का नाही केलं? तुमच्याचसारखी एखादी डॉक्टरमुलगी तुम्हाला अजून सापडली नाही का? ” केतकीने थट्टेने विचारलं.

निखिल गंभीर झाला. ” नाही केतकी. मला डॉक्टर बायको नकोय. मला माझ्या आईसारखी कर्तबगार आणि तितकीच हुशार बायको हवीय. मी काही वर्षांनी अंजनगावला हॉस्पिटल काढणार आहे. मला शहरी मुलगी नकोच आहे… केतकी, लग्न करशील माझ्याशी? ”

“अरे, पण मग ते आपल्या लोकांचं वैर? ते कदापि परवानगी देणार नाहीत निखिल ” नकळत केतकीने एकेरी हाक मारली निखिलला.

“ हो ग. ते आहेच. बघतो मी. पण तुला आवडेल का लग्न करायला माझ्याशी? ”

मनापासून हसत केतकी म्हणाली, ” तुला नकार देणारी महामूर्खच म्हणायची. असं दारी आलेलं भाग्य कोणी दूर लोटेल का? एका पायावर तयार आहे मी निखिल.. पण साप भी मरे लाठी भी न टूटे असं काहीतरी करावं लागेल रे. कोणाची मनं न दुखवता ”.

“ ते माझ्यावर सोड. ” 

नंतरच्या आठवड्यात निखिल आणि केतकी एकदम बरोबरच अंजनगावाला गेले.

निखिल आधी कर्व्यांच्या घरी गेला. या डॉक्टरला इथे बघून तर केतकीचे आईबाबा आश्चर्यचकितच झाले. निखिल त्यांना नमस्कार करून कर्वेआजोबांच्या पायाशीच बसला.

“ आजोबा मला तुमच्या नातीशी, केतकीशी लग्न करायचंय. पण अडचण अशी आहे की मी आहे निखिल पोतदार. तुमच्या शेजाऱ्याचा मुलगा… आजोबा, खरं सांगतो, मला तुमच्या त्या जमिनी नकोत, ते वाद नकोत. तुमची जमीन मी तुम्हाला परत करून टाकतो. काय करायची ती जमीन? मला तुम्ही सगळे हवे आहात. मी उद्याच ते कागद घेऊन येतो. मला कोणतेही कटुत्व मागे ठेवायचे नाहीये. I really don’t want to carry forward all these stupid feuds and quarrels. माझे आजोबा बाबा तयार आहेत जमीन परत द्यायला. बास झाली ही खुळ्यासारखी भांडणे आणि तुमचे इगो. आणि आमचा काय दोष आहे यात आजोबा? गुन्हा करतोय का मी आणि केतकी? प्रेमात पडणं गुन्हा झाला का सांगा? ”

निखिलच्या डोळयांत पाणी होतं. केतकी धावत येऊन त्याच्या शेजारी बसली. ”आजोबा, हो म्हणा ना. ”

आजोबा आईबाबा थक्क होऊन हे बघत होते. आजोबा गहिवरले. त्यांनी निखिल आणि केतकीला जवळ घेतले.

“ निखिल, किती शहाणा मुलगा आहेस रे तू.. आमचं खूप चुकलं रे बाबा. ”

आजोबांनी दाराकडे बघितलं… निखिलचे आईवडील आणि वृद्ध आजोबाही दारात उभे होते.

कर्वे आजोबा उठले आणि त्यांनी “ चिंत्या.. “ म्हणत पोतदार आजोबांना मिठी मारली.

दोघांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. “ किती किती पिढ्यानंतर ही दरी दूर झाली रे चिंतू ” कर्वे आजोबा म्हणाले.

“हो रे बाळकृष्णा. पोरं शहाणी म्हणायची आपली रे. ” पोतदार आजोबा म्हणाले.

“ निखिल, खुशाल करा हो लग्न. आमच्या केतकीला तू शंभर टक्के नीट संभाळशील याची खात्रीच झाली माझी. ” केतकीचे आजोबा डोळे पुसत म्हणाले.

निखिलचे आईवडील आत आले. बाबांनी कर्वे आजोबांच्या हातात पेपर्स ठेवले.

“कर्वे आजोबा, पूर्वी झालं ते गंगार्पण. हे तुमचे जमिनीचे कागद. उद्या कचेरीत जाऊन तुमच्या नावावर ट्रान्सफर करून देतो. ” निखिलचे बाबा म्हणाले.

आता केतकीचे बाबा म्हणाले, ”अहो काय हे. असं करू नका. आमची केतकी तुमच्या घरात जाणार आहे ना.. तर ही जमीन तिला राहू दे आजोबांची आठवण. निखिल, त्या जमिनीचा उपयोग पुढे मागे तुला हॉस्पिटल काढायला होईल बरं. ”

.. सगळ्यांचे डोळे पाणावले.

चारच दिवसात सकाळी उठून बघतात तर इतके वर्ष असलेली मधली भिंत पोतदारांनी पाडून टाकली होती. कित्ती वर्षांनी दोन्ही घरांचे दर्शन एकमेकांना झाले.

दोन्ही ओसरीवर झुलणारे झोपाळे आणि त्यावर बसलेले कर्वे आजोबा आणि तिकडून पोतदार आजोबा गप्पा मारू लागले.

एका चांगल्या मुहूर्तावर केतकी आणि निखिलचं शुभमंगल झालं.. या शुभ कार्याला आशीर्वाद द्यायला सगळं गाव आनंदानं लोटलं होतं… 

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares