मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परतफेड ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ परतफेड… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

शाळा सुटल्यावर घरी यायचे म्हणजे सर्वात जवळचा रस्ता मारुतीच्या देवळाजवळचा होता. पण अलीकडे त्या रस्त्याने यायचे म्हणजे घरी परतत असल्याचा मोकळा आनंद महेशला कधी वाटला नाही. कारण, घरी जाऊन दप्तर टाकताच त्याला बाटली घेऊन पुन्हा दवाखान्याकडे जावे लागे.

घरी तो चहा घेत असतानाच आई बाटली घेऊन उभी असे. मग मीठ-मिरची लावलेले पोहे एका कागदात ठेवून ती ते त्याच्या खिशात ठेवून सांगे, “आता लौकर पळ, नाही तर डॉक्टर जातील. ” दवाखान्यात डॉक्टर सहा वाजेपर्यंत असत. तेवढ्या वेळात गेले नाही तर मग दूर बाजारातल्या दवाखान्यात जावे लागे.

मग रस्त्यातच पोह्यांचा एकेक घास खात जायला बरे असे. पण कट्ट्यावर बसून खाण्यासारखी त्यात गंमत नव्हती, आणि शाळा सुटल्यावर अजूनही गरम असलेल्या कट्ट्याच्या फरशीवर बसायला तर त्याला एकदाही मिळाले नव्हते.

महेश देवळापाशी आला. त्या ठिकाणी सूमंत पाठकचे किराणा मालाचे दुकान होते. महेश जवळ आल्यावर सुमंत पाठकने त्याला हाक मारली, व म्हटले “अरे शिंच्या, काय सामान घेऊन जाताना धाड होत नाही. पैसे कोण? तुझा बाप देणार आहे की काय ?”

महेश एकदम शरमला. तो खालच्या मानेने म्हणाला, “बाबा तर आजारी आहेत. आईला विचारुन सांगतो. “

पाठक खाली उतरून आला. त्याने जाड मिशा ठेवल्या होत्या, आणि तो फार दारू पितो अन गांजा ओढतो हे सगळ्यांना माहीत तर होतेच. पण त्याची बायकोच सगळ्यांना तसे सांगत असे. तो म्हणाला, “काय खेळ चालवलात की काय ? उद्यापर्यंत नऊ रुपये घेऊन ये, नाही तर पुन्हा या रस्त्याने आलास तर पाय मोडून देईन. “

पाठकने नंतर हात उगारला व महेशच्या सणसणीत थोबाडीत दिली. त्याच्या हातातील दप्तर खाली पडले, व त्याचा गाल पेटल्याप्रमाणे जळू लागला. त्याने दप्तर कसेबसे उचलले व ओल्या डोळ्यांनी तो घरी आला.

आई त्याची वाट बघत होती. पण आता तिच्या हातात बाटली नव्हती. त्याचा चेहरा पाहून तिने विचारले, “काय झालं… ? सगळं सांग मला. “

महेशने सगळे सांगितल्यावर ती क्षणभर बसली. मग तिने चहा व पोहे त्याच्यापुढे ठेवले व म्हटले, “आज दवाखाना नको. मघाशीच डॉक्टर आले होते. उद्या औषध बदलून देतो म्हणाले. मी जरा जाऊन येते, तोपर्यंत तू पोहे खात कट्ट्यावर बस. ” ती कपाटाकडे गेली व एक-दोन डबे उघडून तिने पाहिले. एका डब्यातून तिने काही तरी मुठीत घेतले व बाहेर जाताना ती म्हणाली, “मी येथेच गाडगीळां कडे जाऊन येते. “

महेशने समोरच्या चहा-पोह्यांकडे पाहिले. किती तरी दिवसांनी त्याला कट्यावर बसून पोहे खायची संधी मिळाली होती. पण त्याची भूकच मेली होती आणि त्याला चेंगरुन गेल्यासारखे वाटत होते. तो तसाच येऊन बाहेर बसला.

गाडगीळांचे घर समोरच होते. घराला मोठी माडी होती. तेथल्या सोप्यावर मोठमोठे आरसे होते आणि तेथल्या खुर्च्यांना फुलाफुलांच्या मऊ गाद्या होत्या.

थोड्या वेळाने आई परत आली. चहा-पोहे तसेच पाहून तिने महेशकडे पाहिले. पण ती काही बोलली नाही. तिने बशी कपावर टाकली आणि बाबा झोपले होते त्या खोलीकडे पाहत म्हटले, “अहो, मी दहा मिनिटांत परत येते मारुतीला जाऊन”. तिने बाहेरच्या दाराला नुकतीच कडी लावली व महेशला म्हटले, “चल माझ्याबरोबर. ” 

महेशने तिच्या पायांकडे पाहत म्हटले, “तुझी जोडवी राहिलीच की गंऽऽ… ” जोडवी घातल्याखेरीज आई कधी बाहेर जात नसे आणि तिच्याबरोबर जाताना तिच्या जोडव्यांचा रस्त्यावर होणारा आवाज त्याला फार आवडे.

मग आईने पुन्हा कडी काढली, देवाच्या कोनाड्यांतील जोडवी गोळा करून पायांच्या बोटात अडकवली व त्याला बाजूला घेऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, “हं… आता चल. “

आई पाठकाच्या दुकानात आली. पाठक रस्त्यावर खाली वाकून साबणाची पेटी उघडत होता. आई दुकानाच्या फळीवर जाऊन उभी राहताच त्याने पेटी उघडण्याचे काम थांबवले व तो उभा राहिला. आई फळीवर उभी होती, तरी पाठक तिच्या एवढा उंच दिसत होता.

“पाठक ऽऽ… तुमचे किती पैसे द्यायचे आहेत ?” तिने शांतपणे विचारले. “पैसे द्यायला आणखी एक महिना तरी लागेल, असं मी गेल्या शनिवारीच सांगितलं होतं ना ? त्याला तुम्ही बरं म्हणाला होता ना ?”

“म्हणालो म्हणून काय झालं… ? मऊ लागलं म्हणून काय कोपरानं खणायचं काय… ?”

पाठक छद्मीपणे म्हणाला,

“तुमची बाकी नऊ रुपये आहे ?” आईने नोटा काढल्या व एकेक पुन्हा मोजून त्या पाठकला दिल्या. त्याने त्या हातात घेतल्या व गुर्मीने म्हटले, “बाकी चुकती झाली. आता यापुढं उधार मिळणार नाही. ” 

“सगळी बाकी अद्याप चुकती झाली नाही” आई म्हणाली. तिने झटकन हात वर केला व फाडकन सूमंत पाठकाच्या मुस्काटात दिली. काडऽऽक्कन आवाज आला.

पाठक खुळ्यासारखा पाहतच राहिला. रस्त्यावर दोन बायका शाल पांघरून मारूतीला चालल्या होत्या, त्या तेथेच थबकल्या. एक माणूस सायकली वरून उतरून पाहू लागला. दुकानातील गिऱ्हाईके तर एकदम गप्पच झाली, आणि साखरेचा पुडा बांधत असलेला सखाराम तो तसाच हातात धरून वेंधळ्यासारखा पाहत उगाच दोरा फिरवू लागला.

“अरे हरामखोरा, तू एक चपराक याला दिली होतीस ना, ती देखील फेडायचीच होती. आता सगळी बाकी चुकती झाली. ” आई कडाडली, “आणखी एक लक्षात ठेव. पुन्हा जर मूलाच्या अंगाला हात लावशील तर मारुतीच्या चौकात तुझं मढं पाडीन आडवं मूर्दाडा… लग्नाआधीपासूनच मी ब्लॅकबेल्ट चँम्पियन होते लक्षात ठेव. माझा एक तडाखा म्हणजे तू मेला समज. “

आई तितक्याच शांतपणे फळी वरून खाली उतरली व महेशच्या खांद्यावर हात ठेवून त्याला ढकलत चालू लागली. “आता घरी जाऊन चहा तापवून देते. मग कट्ट्यावर बसून पोहे खा. “

महेश त्या विचाराने फार सुखावला व झपझप चालू लागला. शेजारी चालत असलेल्या जोडव्यांच्या चटचट आवाजाची त्याला विशेषच ऐट वाटली…

**

लेखक : अज्ञात.

प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “देणगी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “देणगी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

देणगी लंच ब्रेकनंतरच्या सुस्तावलेल्या वेळेत ऑफिसचा लँडलाईन वाजायला लागला… कुणीच जागचं हललं नाही म्हणून मग नाईलाजानं फोन घेतला.

“नमस्कार!! ”_

“हॅलो, xxx xxx सामाजिक संस्थेत फोन लागलाय का? ”

“हो, बोला… काय काम होतं? ”

“संस्थेला देणगी द्यायचीय. कुणी घरी येऊ शकेल का?”

“सर, तुम्ही ऑनलाईन देऊ शकता. डिटेल्स पाठवतो.”

“अहो, मी म्हातारा माणूसयं. ऑनलाइन-फिनलाईन काही समजत नाही. घरी येत असाल तर देतो, नाहीतर सोडून द्या…”

“ओके, सर… मी स्वतः येतो. पत्ता सांगा…” 

दुपारी चार वाजता दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. बेल वाजवल्यावर दोन दारांपैकी एक उघडलं. ओळख सांगितल्यावर आजोबांनी दुसरं लोखंडी दार उघडून घरात घेतलं.

“बसा… माफ करा तुम्हांला त्रास झाला. ” पाण्याचा ग्लास पुढं करत आजोबा म्हणाले.

“असं काही नाही. इट्स ओके. आमचं कामच आहे. तुम्ही मदत करताय हे महत्त्वाचं!”

“संस्थेच्या कामाविषयी थोडी माहिती देता येईल का?”

“अवश्य…” मी माहिती सांगायला सुरुवात केल्यावर आजोबांचे प्रश्न सुरू झाले… पुढचा अर्धा-पाऊण तास यातच गेला. आजोबांचं समाधान झाल्यासारखं वाटलं. तोपर्यंत चहा आला.

“तुमच्या कार्यात खारीचा वाटा म्हणून आजपासून दर महिन्याच्या याच तारखेला देणगी द्यायचीय. एकच विनंती की इथं येऊन चेक घ्यावा लागेल. ”

रेग्युलर डोनेशन मिळणार म्हणून खूश झालो.

“काळजी नको. दरवेळेला मीच येईन. प्रॉमिस” चेक हातात घेत म्हणालो.

नवीन डोनर आणला म्हणून ऑफीसात आपला भाव वाढणार. कौतुक होणार, अशा कल्पनेच्या भराऱ्या मारणारं माझं विमान चेकवरची रक्कम पाहून धाडकन जमिनीवर येऊन पंक्चर झालेला टायरसारखा चेहरा झाला… आजोबांनी फक्त अकरा रुपयाचा चेक दिला होता!  खूप चिडचिड झाली तरी नॉर्मल रहायचा प्रयत्न करत होतो.

“देणगीची पावती?” आजोबांनी विचारलं.

“पोस्टानं पाठवतो. ”

“कशाला उगीच खर्च करता? पुढच्या महिन्यात चेक न्यायला याल तेव्हा दिली तरी चालेल. तुमचा मोबाईल नंबर द्या. दर महिन्याला आठवणीसाठी फोन करेन.” 

इच्छा नसताना मी मान डोलावली. पंधरा किलोमीटर अंतर तुडवत आलो. तासभर तोंड वाजवलं आणि हातात काय पडलं तर अकरा रुपये! मनात विचित्र असं फिलिंग होतं. निघताना आजोबांनी तोंडभर हसून निरोप दिला.

पुन्हा तासभर ड्रायव्हिंग करत ऑफिसला पोचलो. झालेला प्रकार कळल्यावर सगळे खो खो हसायला लागले. त्यानंतर दोन दिवस ‘माझं डोनेशन’ हा ऑफिसमध्ये चर्चेचा विषय होता. त्यावरून चिडवाचिडवी सुरू होती. प्रत्येकी अकरा रुपये काढून चहा-बिस्किटची पार्टी झाली. नंतर कामाच्या गडबडीत डोनेशनचा विषय मागे पडला. सगळे आपापल्या कामात गुंतलो.

काही दिवसानंतर कामात असताना मोबाईल वाजला… अनोळखी नंबर पाहून दुर्लक्ष केलं पण त्याच नंबरवरुन पुन्हा पुन्हा कॉल येत होता म्हणून फोन रिसिव्ह केला.

“मी xxx xxxx बोलतोय. ओळखलं का? मागच्या महिन्यात देणगीसाठी आला होतात.”

“हं, बोला आजोबा…” तुटकपणे म्हणालो.

“आपलं बोलणं झाल्याप्रमाणं आठवणीसाठी फोन केलाय… उद्या चेक घ्यायला आलात तर बरं होईल.”

दुसऱ्या दिवशी तीच परवड सहन करत अकरा रुपयांचा चेक घेऊन आलो. पुन्हा ऑफिसमध्ये मनोरंजनाचा भाग झालो. प्रत्येक महिन्याला हा प्रकार सुरू झाला. आजोबांचा फोन आला की जाऊन अकरा रुपयांचा चेक आणायचा, हे नवीन रुटीन झालं. नंतर नंतर तर चेक न बघताच बॅगेत ठेवायला लागलो.

आठ महिने हाच प्रकार चालू होता. ऑफिसमधल्यांनी जाऊ नको सांगितलं. खूपदा वाटलं की आजोबांना स्पष्ट सांगावं की परवडत नाही, परंतु स्वतःला आवरलं, कारण सामाजिक कामात डोनेशनचा एक रूपयासुद्धा अमूल्य असतो.

मोठी रक्कम देत नसले, तरी आजोबांचा संस्थेवरचा विश्वास बहुमोलाचा होता. म्हणूनच कितीही त्रास झाला तरी महिन्यातून एकदा होणारी भेट चुकवायची नाही हे मनाशी पक्कं केलं. चिडचिड कमी झाली. दर महिन्याला होणाऱ्या भेटीत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारताना आजोबांशी छान स्नेह जुळला.

—*—

ऑक्टोबर महिना… धो धो पाऊस पडत होता. आजोबांचा चेकसाठी फोन आल्यावर घरी गेलो.

“माफ करा, माझ्यामुळे तुम्हांला एवढ्या पावसात यावं लागलं.”

“काही प्रॉब्लेम नाही.”

थोडंफार बोलणं झाल्यावर आजोबांनी चेक दिला. न पाहता बॅगेत ठेवून मागच्या देणगीची पावती दिली. पुन्हा पावसात गाडी दामटत ऑफिसला आलो. अकाऊंटला चेक देऊन लॅपटॉपवर काम करत बसलो. तितक्यात मित्र धावत आला… 

“मित्रा, अभिनंदन, पार्टी पाहिजे! ”

“कशाबद्दल? ”

“जसं की तुला माहीतच नाही! ”

आमचं बोलणं ऐकून बाकीचे टेबलाभोवती जमा झाले.

“काय आणि कशाबद्दल बोलतोयेस. काही कळत नाही. जरा नीट सांग. ”

“म्हणजे आजोबांनी दिलेला चेक बघितला नाहीस? ”

“त्यात काय बघायचंय. सगळं तर माहितेय. ”

“धन्य आहे तुझी… हे बघ! ”

चेक हातात घेतला आणि डोळेच विस्फारले… आश्चर्याचा प्रचंड मोठा धक्का बसला. चेकवर रक्कम होती अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये!  

सगळ्यांनी मोठा जल्लोष केला. जो तो माझं अभिनंदन करत होता. मी फक्त चेककडे एकटक पाहत होतो. अनपेक्षितपणे भला मोठा आनंद मिळतो तेव्हा शब्द मुके होतात. माझीही अवस्था तशीच झालेली. खूप भावुक झालो. टचकन डोळ्यात पाणी आलं. ताबडतोब आजोबांना फोन केला पण उचलला नाही म्हणून डायरेक्ट घरी गेलो.

“अरे वा, तुम्ही परत…? ” नेहमीप्रमाणं प्रसन्न हसत आजोबांनी स्वागत केलं.

आधी वाकून नमस्कार केला.

“एवढं मोठी रक्कम…!! खूप, खूप खूपच धन्यवाद! ”

“उलट मीच तुमचे आभार मानतो आणि माफ करा. ”

“कशाबद्दल? ”

“तुम्हांला खूप छळलं. माझ्याविषयी आलेला राग कधी दाखवला नाहीत. इतरांपेक्षा वेगळे आहात. ”

“थॅंक्यू! ”

“मोठी देणगी द्यायचीच होती, पण कुणावरही पटकन भरवसा ठेवता येत नाही. खरं काम करणारे कोण अन् नुसता देखावा करणारे कोण, हे ओळखणं फार अवघड झालंय! आजकाल प्रत्यक्ष कामापेक्षा चकाचक प्रेझेंटेशन करून डोनेशन मिळवायचं हा नवीन ट्रेंड आलाय. ”

“शंभर टक्के बरोबरयं. यात प्रामाणिकपणे काम करणारे बाजूला पडतात. ”

“पण चांगलं काम कितीही प्रयत्न केला तरी दुर्लक्षित करता येत नाही. गरजेच्या वेळी तळमळीनं काम करणारेच उपयोगाला येतात. ”

“मनातलं बोललात.”

“सामाजिक काम अजिबात सोप्पं नाहीये. गरीब, गरजूसाठी काम करताना स्वभावात लवचिकपणा आणि प्रचंड संयम असावा लागतो. तो तुमच्याकडे आहे. तो तपासण्यासाठी परीक्षा घेतली, त्यात पहिल्या नंबरनं पास झालात. म्हणून हे बक्षीस. शाबास! ”

आजोबांच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नव्हतं. फक्त “थँक्यू, थॅंक्यु” म्हणत राहिलो.

निरोप घेताना पुन्हा एकदा आजोबांना नमस्कार केला.

“खूप खूप आशीर्वाद! असंच छान काम करण्यासाठी दीर्घायुष्य लाभो…!! आणि हो, दर महिन्याला नेहमीचा चेक घ्यायला यायचं… ती प्रथा बंद करायची नाही.” अकरा रुपयाचा अजून एक चेक पुढे करत आजोबा मिश्किलपणे हसले.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एक साधं कौतुक…” ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? जीवनरंग ?

☆ “एक साधं कौतुक…“ ☆ तृप्ती देव ☆

 – – एक जादुई शब्द…

“अगं सुनबाई, तांदूळ थोडे कमी घे, कालचा भात उरलाय अजून, ” सासूबाई म्हणाल्या, ओट्यावर भांडी आहॆ ते पण लावून ठेव.

“हो आई, लक्षात ठेवलंय. “

सुनबाईने सौम्य हसून उत्तर दिलं.

ती अजूनही स्वयंपाकघरात फुरसतीनं स्थिरावत नव्हती. चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. नवीन घर, नवीन माणसं, आणि त्या सगळ्यांच्या सवयी समजून घेताना ती आपल्याच विचारात हरवून जात होती.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ती स्वतःसाठी थांबत नसे. स्वयंपाक, आवराआवरी, सासूचं सासऱ्याचं वेळवर जेवण, नवऱ्याची तयारी, सगळं सुरळीतपणे व्हावं म्हणून ती धडपडत राहायची.

पण ह्या सगळ्यात एक गोष्ट कायम जाणवत राहायची — कोणीच तिचं कौतुक करत नव्हतं.

नविन जवाबदाऱ्या. नविन घर सगळ व्यवस्थित सांभाळाचा प्रयत्न करत होती. तिच्यासाठी सगळ नवन.

त्या दिवशी सकाळी चहा करताना, गॅसजवळ उभी असताना तिला आईच्या शब्दांची आठवण झाली —

“मुली, घरच्यांचं कौतुक शोधायचं नसतं. स्वतःचं समाधान महत्त्वाचं. “

ती हसली. पण मनात काही तरी चुटपुटत राहिलं.

तितक्यात सासूबाई मागून आल्या आणि म्हणाल्या,

“सुनबाई, कालची आमटी अगदी छान झाली होती… मी म्हटलं, सांगावं जरा. “

सुनबाईचे डोळे क्षणभर विस्फारले.

“म्हणजे… खरंच? “

“हो गं! हलकीशी तिखट पण मस्त, अगदी माझ्या आईसारखी चव होती. “तूझ्या हाताला चव आहॆ. तुझी आई सुगरणच आहे ना?

ती काही बोलली नाही, फक्त गालातलं हसू लपवत राहिली.

पहिल्यांदा, एवढ्या दिवसांत पहिल्यांदा, कुणीतरी तिच्या केलेल्या गोष्टीचं कौतुक केलं होतं.

त्या एका वाक्यानं तिला काहीतरी शिकवलं.

“माझं काम कुणीच ओळखत नाही, ” ही तक्रार एका क्षणात विरून गेली. कारण, आज ज्या एका छोट्याशा वाक्यानं तिचा दिवस सुंदर झाला, तेच दुसऱ्यालाही द्यावं, हे तिला जाणवलं.

त्या दिवशी दुपारी, सासूबाई घराच्या ओट्यावर माठातून पाणी भरत होत्या. त्यांच्या पाठ थोडी वाकली होती, सुनबाईने लगेच धावत येऊन त्या पाण्याचे घागर स्वतः उचलली.

“आई, किती सुंदर पद्धतीनं तुम्ही ओटा स्वच्छ करता! माझा तर दमछाक होतो, पण तुमचं हातपाय चाललेत बघा, हे खरंच कौतुकास्पद आहे. “

सासूबाई एक क्षण स्तब्ध झाल्या. मग त्या हसल्या.

“अगं, मी ते काय विशेष करते, इतकी वर्षं केलंय म्हणून सवय झालीये. “

“सवय म्हणून केली तरी त्यात मेहनत आहे ना, आई? मी दररोज पाहते तुम्हाला – तुम्ही थकत नाही, कुरकुर करत नाही. तुमचं बघून मला शिकावं वाटतं. “

सासूबाईंच्या चेहऱ्यावर लाजलेलं हसू आणि डोळ्यांत चमक स्पष्ट दिसली.

त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी स्वतःहून चहा करून सुनबाईसमोर ठेवला.

“घे गं, तुझ्यासाठी. आज तू मला माझंच काम वेगळ्या डोळ्यांनी दाखवलंस. “

कौतुकाचा हा खेळ दोघींमध्ये सुरू झाला. सुनबाईने एक दिवसशेजराच्या मुलाला गणित शिकवणाऱ्या नवऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाली,

“इतकं संयम ठेऊन शिकवतोस तू… खरंच, माझ्यासारखं घाईघाईनं ओरडून काही झालं नसतं. मुलाच्या आयुष्यात तू शिक्षकासारखं वागतोस! “

तो थोडा गोंधळला. पण हसला. आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात कौतुकामुळे चमक होती.

दुसऱ्याच दिवशी, सासूबाईंनी तिच्या सुनबाईच्या हस्तकलेच्या कुंड्या पाहिल्या.

मातीच्या एका भांड्यात तिनं क्ले वर्क केलं होतं.

सासूबाईंनी भांडं हातात घेत म्हणाल्या,

“तुझ्या हातात जादू आहे गं! माझ्या आईसारखी नक्षी आहे ह्या रंगांत. “

ते ऐकून सुनबाईचं मन फुलून आलं.

ती एक क्षण मागे गेली — लहानपणी रंगकाम केलं की आई गोड बोलायची, “तुझं रंगसंगतीचं कौतुक करावं असं आहे! “

आणि एक संध्याकाळ…

सासरे जुन्या वहीत एक कविता शोधत होते.

अर्धवट लिहिलेलं होतं काहीसं…

सुनबाईच्या एका वाक्याने —

“बाबा, तुमची कविता किती गोड आहे! शेवट पूर्ण केलात, तर ती खरंच सुंदर वाटेल! “

त्यांनी खळखळून हसत पेन उचलला,

ती कविता त्यांनी त्या रात्री पूर्ण केली.

हळूहळू घरात एक नवीन वळण आलं होतं…

जिथं टीका नव्हे, तर प्रोत्साहन ऐकू येत होतं.

जिथं चुकांवर नाही, तर प्रयत्नांवर लक्ष दिलं जात होतं.

जिथं प्रत्येक वाक्यात “मी सांगितलं होतं” ऐवजी, “मस्त केलं! ” असं ऐकायला यायचं.

घरात एक नवीन वळण आलं होतं.

घरातलं वातावरण जरा जास्त जिव्हाळ्याचं झालं होतं.

एका संध्याकाळी दोघी गच्चीत बसल्या होत्या. सायंकाळी गुलाबी ऊन आणि गार वारा.

सासूबाई म्हणाल्या,

“सुनबाई, मी तुला एक गोष्ट सांगते का? “

“सांगा ना आई! “

“मी लग्न होऊन ह्या घरात आले, तेव्हा तुझी आजचे सासू म्हणजे माझ्या सासूबाई, फार कठोर होत्या. मी काहीही केलं, ते कधीच योग्य वाटलं नाही त्यांना. मी कितीदा आमटी चांगली केली, घर स्वच्छ ठेवलं, सण सजवले… पण कधीच त्यांनी एक शब्दही कौतुकाचं नाही म्हटलं. “

“मग तुम्ही काही बोललात नाही त्यांना? “

“नाही गं. तेव्हा असं वाटायचं – ‘आपलं काम हे आपलं कर्तव्य आहे, त्याचं कौतुक नको. ‘ पण आताशा वाटतं, त्या जर एकदाच म्हटलं असतं – ‘छान केलंय गं’ – तर माझ्या थकव्यात जरा जीव मिळाला असता. “

सुनबाई शांत झाली.

सासूबाई पुढे म्हणाल्या,

“म्हणून मी ठरवलं, मी माझ्या सुनेचं कौतुक करणार. कारण ‘कौतुक’ हा शब्द नाही… तो आधार आहे. हक्काचं असावं, पण अचानक मिळालं की जास्त गोड लागतं. “

त्या रात्री, सुनबाईनं आपल्या डायरीत लिहिलं:

“कौतुक ही भावना नसून ती संस्कृती आहे…

ती पुढच्या पिढीकडे देणं ही माझी जबाबदारी आहे. “

काही दिवसांनी, शेजारच्या वहिनी त्यांच्या मुलीला घेऊन आल्या.

“ताई, माझी गोजिरी कॉलेजात पहिल्यांदाच कविता लिहिलीये. ऐका ना. “

गोजिरी थोडीशी घाबरत होती. पण सुनबाई हसून म्हणाली,

“अगं बाई, कविता करायला धाडस लागतं. तू आधीच कौतुकास पात्र आहेस. “

मग गोजिरीने कविता वाचली, थोडी वळणदार, थोडीशी चाचपडलेली.

सुनबाईने तिला जवळ घेतलं.

“अगदी मनापासून लिहिलंयस गं! शब्द थोडे अजून वळणावर येतील, पण तुझी भावना स्पष्ट पोचते. खरंच, छान वाटली. “

गोजिरीचे डोळे चमकले.

सासूबाई आतून हसत बाहेर आल्या –

“बघ, आता तुझं कौतुक दुसऱ्यांचं आयुष्य उजळवतंय. “

त्या घरात आता रोज काही तरी छोटंसं कौतुक ऐकू यायचं –

“तू छान केलंस…”

“अगदी बरोबर वेळेवर आलास…”

“आजच्या जेवणात प्रेमाची चव होती…”

“तू हसलीस, म्हणून दिवस उजळला…”

कौतुकाचं ते वातावरण…

कुठलीच मोठी गोष्ट नव्हती, पण माणसं जरा जास्त सजग, प्रेमळ आणि एकमेकांमध्ये गुंतलेली वाटायची.

कारण त्या घरात आता “कौतुक” ही नित्यनेमाची परंपरा झाली होती. “कौतुक – एक जादुई शब्द…”

कौतुक म्हणजे केवळ एखाद्याच्या कामावरची स्तुती नाही.

कौतुक म्हणजे समजून घेतलेली नजर, ओळखलेली भावना, आणि दिलेलं एक हलकंसं थोपटणं.

एक साधं “वा! “, “छान केलं! “, “तुझ्यामुळे जमलं! ” असं म्हणणंही, कधी कधी एखाद्याच्या थकलेल्या जीवाला नवा श्वास देतं.

ते शब्द नसतात… ते आश्वासक साक्षी असतात —

म्हणून जमलं तर कौतुक करा. कौतुक करायला पैसे लागत नाही. फक्त दोन शब्द लागतात. ते दोनच शब्द. जगणं बदलतं.

माणूस फुलतो.

कारण कौतुकाचा तो क्षण…

तो कुणाच्या आयुष्यात वळण घालतो — हलकासा, पण खोलवर उमटणारा क्षण असतो.

 

© तृप्ती देव

भिलाई( छत्तीसगड)

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सार्थक… भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ?

☆ सार्थक… भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

(मुली म्हणून, मुलगा म्हणून कोणती कर्तव्ये केली बाकीच्यांनी?अर्थात आमची अपेक्षाच नाहीये रे. पण मग या जगात तू एकटा पडशील. नाही मांडलास संसार की नाही केलंस लग्न. कोण घेईल तुझी काळजी बाबा पुढे?काही नाही तर तू वाडा विकून टाक आणि बदली घे करून शहरात. तुझं तू ठरव. पण आता यात बदल होणार नाही. मी याच्या चार कॉपी काढून घेईन आणि आमच्या पश्चातच तू तुझ्या भावंडाना त्या दे. ”, नाना थकून बोलायचे थांबले. ) – इथून पुढे – – 

माई जवळ आल्या. ” हे बघ माधवा. नाना बरोबर बोलत आहेत. आम्ही खरोखरच उताराला लागलेली माणसे. काही भरवसा नाही आमचा. हे मृत्युपत्र माझ्याही संमतीनेच केलंय.

माधव हसला. ” माई, नुकतीच पासष्टी झाली तुझी. काही म्हातारी नाही झालात दोघे. मी तर म्हणतो आता तुम्ही छोट्या छोट्या यात्रेला जात जा. लहान, आठ दिवसाच्या. कधी कुठेच जायला नाही मिळालं तुम्हाला. माझा मित्र काढतो अशा छान ट्रिप्स. ”

माधवने हट्ट करून नाना माईना अष्टविनायक सारख्या छोट्या ट्रीपला पाठवलं. केवढा आनंद झाला त्या दोघांना. बाहेरचे जगच न पाहिलेल्या त्यांना फार अप्रूप वाटलं त्या ट्रिपचं.

भेटेल त्याला सांगत बसले माई नाना. काय सुंदर हो ती ट्रिप. काय व्यवस्था, जेवण चहा नाश्ता सगळं हातात.

आमच्या माधवामुळे घडलं हो अष्टविनायक दर्शन. ”

– – आता नाना माई अशा आठ दहा दिवसांच्या सहलीला जाऊ लागले. कधीकधी शेजारचे काका काकू पण त्यांच्या बरोबर जात. खूप आवडे त्यांना सगळ्याना हा बदल.

यावेळी आता केदारनाथची मोठी ट्रिप होती. शेजारच्या काका काकूंना काही अडचणीमुळे जमणार नव्हतं.

“ त्या केदारनाथच्या मनात मला बोलवायचं नाहीये. ” काकू हळहळून म्हणाल्या

अगदी आनंदात सगळे वीस यात्रेकरू निघाले. ग्रुप लीडर म्हणाला, ”काही काळजी करू नका. आम्ही आहोत. कळवत राहू सगळा वृतांत. ”

दुर्दैवाने केदारनाथजवळ भयंकर पाऊस पडला, कडे कोसळले आणि ही बस दरीत कोसळली. एकही माणूस वाचला नाही. हे वृत्त टीव्ही वर दाखवले. हीच बस जी नाना माईना घेऊन जात होती. नाना माईंचे मृतदेह सुद्धा दुर्दैवाने सापडले नाहीत. सगळेच्या सगळे बसमधले लोक वाहून गेले आणि दगावले.

माधवच्या शोकाला पारावार राहिला नाही. त्याने ताबडतोब बहिणींना बोलावलं. भावाला परदेशी फोन करून येण्यास सांगितलं. सुरेश आला नाही पण बहिणी मेव्हणे आले. सगळे संस्कार झाल्यावर चार दिवसांनी गेले आणि म्हणाले आता बारावा तेराव्यालाच येऊ. सुरेश पण येतोय ना? “

माधव काहीच बोलला नाही. तेराव्या दिवशी पुन्हा सगळे जमले. सर्व पार पडलं आणि सुरेश म्हणाला,

“ माधव हे बोलायची ही वेळ नाही पण मला इतक्या लांबून पुन्हा पुन्हा यायला जमणार नाही.

आम्ही तिघांनी असं ठरवलं आहे की हा वाडा विकून टाकायचा. आणि शेत सुद्धा. पैसे वाटून घ्यायचे आणि मोकळं व्हायचं. तू दुसरीकडे फ्लॅट बघ आणि शिफ्ट हो. गिऱ्हाईक पण तयार आहे लगेचच व्यवहार करायला. ”

माधवने बहिणी आणि दोन्ही मेव्हण्याकडे बघितलं. बेरकीपणे ते बघत होते. हे सगळे आधी भेटले आहेत आणि सगळं ठरवूनच सुरेश बोलतोय हे माधवच्या लक्षात आलं.

तो म्हणाला, “ हरकत नाही. पण आपले जोशी वकील आत्ता येतीलच. बघूया ते काय म्हणतात. ”

“ ते कशाला हवेत?काय संबंध त्यांचा? “ सुरेश म्हणाला.

“ समजेल, ते आले की. ” माधव शांतपणे बोलला.

 जोशी वकील आले.

”बसा बसा. ”

“ झालं ते वाईट झालं. नाना माझे फार जवळचे मित्र हो. शहाणा माणूस बरं. ” बोलता बोलता त्यांनी चार कॉप्या प्रत्येकाच्या हातात ठेवल्या.

“ हे माई नानांचे मृत्युपत्र. तुम्ही हे माझ्यासमोर वाचा. हे अर्थात रजिस्टर केलंय त्यामुळे संशयाला जागाच नाही. सुरेश, तू मोठ्याने वाच. ” 

“काय?माई नानांनी मृत्युपत्र केलं होतं?आम्हाला कसं माहीत नाही?”

– – जोशी शांतपणे म्हणाले, ”तुम्हाला कळवायला तुम्ही इथे फिरकत तरी होतात का?किती वर्षात तू आला नाहीयेस भारतात?आणि काय ग कुमुद कुसुम, कितीवेळा आले माईंनाना तुमच्या घरी? कधी सांगणार ते तुम्हाला?” – जोशी शांतपणे म्हणाले. “ ते सोडा. आत्ता तर समजतंय ना?”

सुरेश मृत्युपत्र वाचत गेला. वाचता वाचता त्याचा चेहरा लालबुंद झाला. या माधवला सगळा वाडा आणि शेत पण? मला फक्त पन्नास हजार? वर लिहिलंय की डॉलर्समध्ये कमावणाऱ्या मुलाला याची काय गरज असणार?पण आईबापांची भेट असू दे… आणि निम्मे निम्मे दागिने कुमे तुला आणि कुस्मे तुला. वावा. काय ही वाटणी आहे. मी कोर्टात जाईन. ”

जोशी वकील हसले. ” जरूर जा कोर्टात. नानाला ही सगळी कल्पना होतीच म्हणून त्याने अगदी कायदेशीररीत्या हे कागदपत्र केले आहेत. जायचे तर जा कोर्टात. फक्त वेळ आणि पैसा वाया जाईल आणि हाती काहीही येणार नाही. आणि काय तुम्ही मुलं रे?आईवडिलांवर जराही प्रेम माया नसणारी मुलं काय उपयोगाची? मी बघत होतो ना.. एकट्या माधवने निरपेक्षपणे माई नानांना संभाळलं. त्यांच्यापासून दूर जावं लागेल म्हणून त्याने प्रमोशन्स नाकारली. भाग्यानेच मिळतो असा मुलगा… आणि काय ग मुलींनो, आज आईबाप गेल्यावर आलात हो?सगळं हक्काने घेतलेत की पुष्कळ. कुठे कमी पडले आईबाप ? केली की रीतसर बाळंतपणे सोने नाणे देऊन त्या त्या वेळी. आणि हा माधव कमी राबला नव्हता त्याही वेळी. पण समजून घ्यायचंच नाही ठरवल्यावर मी तरी काय बोलणार?.. हे बघा, माझं काम झालंय. माधव, तू निर्णय घे. हे सगळं तुला तुझ्या आईवडिलांनी प्रेमाने दिलंय. त्याचा विनियोग तू तुला हवा तसा कर. ”

– – जोशी वकील निघून गेले. न बोलता सगळी भावंडे उठून चालती झाली.

माधवला अतिशय वाईट वाटलं. आपले माई नाना किती हुशार होते आणि आपल्या मुलांना ते किती नीट ओळखून होते हे पुन्हा जाणवलं त्याला.

याही गोष्टीला चार वर्षे झाली. भावंडे पुन्हा फिरकली नाहीत. आता हे संबंध तुटल्यातच जमा होते.

माधवने वाडा शेती विकून टाकली. त्या भरभक्कम रकमेत त्याला पुण्यात सुंदर फ्लॅट विकत घेता आला त्याने आपली बदली पुण्यात करून घेतली.. शिवाय त्याने बँकेत बरीच रक्कम गुंतवली.

जोशी वकील त्याच्या सतत संपर्कात होते.

” जोशीकाका, येत जा पुण्याला. मला तुमच्याशिवाय कोणी नाही आता जवळचं. ”

.. काका हसले. ” थांब. येईलही कोणी जवळचं. तुला आपलं म्हणणारं. सरळच विचारतो. करतोस का लग्न?आहे एक छान तुला योग्य मुलगी… थांब हं.. निशा अगं ये आत.. ही निशा. माझी मानलेली मुलगी. तुझ्याइतकीच मला जवळची आणि प्रिय आहे. हिचेही आईवडील फार लवकर गेले. एकटी पोर आहे बरं जगात. आणि मोठी जिद्दीची आहे बरं. माझ्या मित्राचीच मुलगी आहे ही. पुण्यात नामवंत शाळेत शिक्षिका आहे. पण बघणारं कोणीच नसल्याने लग्न राहून गेलं पोरीचं. बघा.. भेटा एकमेकांना चार वेळा. हेही व्हायचं असलं तर होऊ दे माझ्या हातून. ”

माधव बघतच राहिला. निशा छान हसत होती त्याच्याकडे बघून.

“ हे बघ माधव.. आपण आता पन्नाशीला आलोय. मला तू आवडलास. तुला मी पसंत असले तर लग्न करायला माझी हरकत नाही. ”

.. ही छान स्मार्ट हसरी मुलगी माधवला एकदम आवडूनच गेली.

निशा म्हणाली, ” हवी तर माझी सगळी चौकशी तू माझ्या प्रिन्सिपल मॅडमकडे करू शकतोस. ”

माधव म्हणाला, “ जोशीकाकानी तुला आणलीय ना, मग बास. ते मला नानांच्या जागीच आहेत निशा.

हे माई नाना असताना व्हायचे योग नव्हते ग. किती आनंद झाला असता त्यांना. ” 

” हो. ते दोघे असतांना खूप पूर्वी मला जोशीकाकांनी तुझ्याबद्दल विचारलं होतं रे. पण मीच नाही म्हणाले. माझं पुण्यातलं घर आणि नोकरी सोडून मला तुमच्या गावाला यायचं नव्हतं. मग जोशीकाकांनी तुम्हाला पुढे विचारलं नाही. तेव्हा आपले योग नव्हते असं म्हणूया. आता होतोय उशीर म्हणा, पण तुझी हरकत नसेल तर आपण करूया लग्न. ” निशा म्हणाली

माधव आणि निशा खूप वेळा भेटले. आपलं एकमेकांशी नक्की पटेल, आपले विचार आवडीनिवडी खूप जुळतात हेही लक्षात आलं माधवच्या. तिच्या सहवासात वेळ कसा मजेत जातो आणि तिलाही आपण आवडतो हे लक्षात येऊन सुखावला माधव.

…. चार महिन्यांनी निशा आणि माधवने रजिस्टर लग्न केलं. जोशीकाका आणि निशाच्या शाळेच्या प्रिंसिपल मॅडम साक्षीदार म्हणून उपस्थित होतेच.

“माधव, फार सुरेख कर्तृत्ववान बायको मिळालीय हो तुम्हाला. माझी सगळ्यात आवडती शिक्षिका आहे निशा. तुमचा संसार अगदी सुखाचा होऊ दे. ” डोळे पुसत मॅडम म्हणाल्या.

“ काका “ म्हणत गहिवरून माधवने जोशींकाकांना मिठीच मारली.

“ माझं सगळं भलं तुमच्याच हातून व्हावं असंच नियतीने ठरवलंय काका. आशीर्वाद द्या”. दोघे काकांच्या पायाशी वाकले.

“ लक्ष असू द्या काका. आणि हक्काने तुमच्या या मुलांकडे येत जा. ”

.. डोळे पुसून जोशींकाकांनी त्यांना जवळ घेतले आणि तोंडभर आशीर्वाद दिला… “ नांदा सौख्यभरे. ”

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सार्थक… भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग  ?

☆ सार्थक… भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

माधव खिन्नपणे वाड्याच्या पायरीवर बसून होता. यात्रेला गेलेले नाना माई दुर्दैवाने घरी परतलेच नाहीत. हौसेने माधव त्यांना यात्रा कंपनीबरोबर पाठवतो काय आणि गाडीला अपघात होऊन सगळेच्या सगळे प्रवासी दगावतात काय… माधवला अतिशय वाईट वाटलं. माझ्याच हाताला यश कसं नाही म्हणत तो उदास झाला.

शेजारच्या जानकीकाकू त्याच्याजवळ येऊन बसल्या. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या,

“अरे माधवा, या गोष्टी दैवाधीन असतात. तू कुठेही कमी पडला नाहीस बरं पुत्रकर्तव्यात. घे हा चहा, बरं वाटेल तुला. “ मायेने चहाचा कप त्याच्या हातात ठेवत काकू म्हणाल्या.. “ आणि आता जेवायला ये आमच्याकडे थोडे दिवस. का डबा पाठवू? ” माधवने मान हलवली.

“ काकू, आज चार दिवस झाले माईनाना जाऊन. कुसुम कुमुद आल्या आणि लगेच गेल्या. अमेरिकेला असलेला सुरेश उद्या पोचेल. तो म्हणाला होता, माझ्यासाठी थांबू नका. तू सगळे अंत्यसंस्कार करून घे. बरोबर आहे त्याचंही. माझ्या परीने मी सगळं नीट केलं हो. ” 

“अरे अगदी बरोबर केलंस माधव. मोठा मुलगा म्हणून सगळी कर्तव्ये पुरी केलीस हो. बघतोय ना आम्ही सगळे… चार मुलं तुम्ही नाना माईना. कुसुम कुमुद तर पक्क्या स्वार्थी. नवरे तसलेच त्यांचे.. हावरट. धाकटा सुरेश गेला परदेशात. कधी काय केलं कोणी आईबापांचं?  कधी नेलं का कौतुकानं परदेशात, का घर दाखवलं स्वतःचं?  मोठं कौतुक सांगते कुमी पण कधी आईबापांना नाही न्यावंसं वाटलं आपल्या शेतावर?

का कधी मूठभर धान्य नाही आलं माहेरी आईवडिलांसाठी. आम्ही काय बघत नाही का?  मी आणि माई घट्ट मैत्रिणी. त्या सगळं सांगायच्या हो मनातलं मला. त्यांना वाईट वाटायचं. एवढे न पेलवणारे खर्च करून लग्न करून दिली पण पोरींना कधी चुकूनसुद्धा बोलवावंसं वाटत नाही आईबापांना असं म्हणायच्या. जाऊ दे झालं.. पण तू काळजी घे हो स्वतःची “.

माई निघून गेल्या आणि माधव घरात आला. एवढ्या मोठ्या घरात आता अगदी एकटा उरला होटा तो. आठवणींनी फेर धरला माधवभोवती.

… लहानपणीचे दिवस आठवले माधवला. ही चार भावंडं त्या घरात. माधव सगळ्यात मोठा. पाठोपाठच्या बहिणी कुसुम कुमुद आणि धाकटा सुरेश… खूप सख्य होतं सगळ्या भावंडांचं. माधव मोठा म्हणून दादा दादा करत सगळी धाकटी त्याच्या मागे मागे असत. माधव अभ्यासात खूप हुशार नव्हता पण मेहनती होता.. प्रामाणिकपणे प्रयत्न करून नेहमी उत्तम गुण मिळवायचा. धाकटा सुरेश सगळ्यात हुशार आणि माई नानांचा लाडका. हे पोर आपले पांग फेडेल बघा नाना, असं माई नेहमी म्हणायच्या. कुमुद कुसुम डोक्याने अगदी बेताच्या.

नानांची साधी कारकुनाची नोकरी आणि एवढा मोठा प्रपंच. पण सुदैवाने स्वतःचा वाडा आणि चार भाडेकरू भाडे देत म्हणून त्यांचं नीट भागत असे. धान्य शेतावरून येत असे भरीला. मुलांचे लाड करणं फारसं शक्य नसलं तरी व्यवस्थित खायला प्यायला आणि कपडालत्ता कमी नाही पडू देत नाना.

या सगळ्या मुलात स्वभावाने अत्यंत लाघवी आणि गुणी होता तो माधव. आपल्या आईवडिलांवर त्याचं विलक्षण प्रेम. सगळ्या चारही मुलात माधव उंचापुरा आणि देखणा दिसायला लागला होता.

एक दिवस ही मुलं त्यांच्या गावाबाहेरच्या शेतात दिवसभर हिंडायला, गंमत करायला म्हणून त्यांच्या खंडकऱ्याबरोबर गेली. दिवसभर खूप खेळली, विहिरीत मनसोक्त पोहली. मनसोक्त चिंचा खाल्ल्या, पिठलं भाकरी ठेचा खाल्ला. येताना चारी भावंडे रमत गमत शेतातून येत असताना अचानक शेतकऱ्याचा बैल उधळला. बघेबघेपर्यंत तो या मुलांच्या जवळ आलाच. मुलं घाबरली. माधवने तिघांना आपल्याजवळ ओढले आणि तो पुढे उभा राहिला. जोरात येणाऱ्या बैलाने माधवला जोरात धडक दिली आणि तो वेगाने पुढे सुसाट धावत गेला. त्याच्या धडकेने माधव जोरात कोसळला आणि त्याच्या पायाला जबरदस्त मार लागला.

शेतकऱ्याने त्याला बसवलं, पाणी दिलं आणि गाडीत बसवलं. सगळ्यांना घरी आणून सोडले.

काय घडलं ते सांगितलं. माधवमुळे आज सगळी मुलं सुखरूप राहिली आणि त्याने बैल आपल्या अंगावर घेऊन मुलांना वाचवलं हेही त्याने नानांना सांगितलं.

नाना माधवला डॉक्टरकडे घेऊन गेले. माधवचे मांडीचे हाड दुखावले गेले होते. आणि बारीक चीर गेलेली दिसली एक्सरेत. डॉक्टरांनी त्याला हलकं प्लास्टर घातले. महिन्याने प्लास्टर काढले. माधवच्या वेदना पूर्ण थांबल्या होत्या. पण चालताना तो थोडा लंगडू लागला. त्या पायावर भार त्याला सहन होईना. जरी फ़िजिओ थेरपी घेतली तरी माधवच्या पायात दोष राहिलाच. तो जरा लंगडतच चालायला लागला.

नानांना वाईट वाटे की काहीही कारण नसताना माधवला हे व्यंग आले पण त्याहून जास्त वाईट त्यांना याचे वाटायचे की ज्या भावंडांसाठी त्याने हे केलं त्यांना त्याचं काहीच सोयरसुतक नव्हतं की नव्हती कृतज्ञता.

… नाना आपल्या मुलांना पुरते ओळखून होते.

दिवस भरभर निघून गेले. सुरेश शहरात निघून गेला. स्कॉलरशिपवर शिकला. कमी पडणारे पैसे न्यायला फक्त तो नानांकडे येई. इतकाच संबंध त्याचा घराशी. त्याला घराची, भावंडांची नाना माईंची ओढ कधीच नव्हती.

… कुसुम कुमुद दोघी लागोपाठच्या. दिसायला साधारण. जेमतेम मॅट्रिक झाल्या आणि म्हणाल्या..

” माईआम्हाला नाही पुढे शिकायचं. ” 

नानांनी निमूट स्थळं बघायला सुरुवात केली. या फक्त मॅट्रिक आणि दिसायला बेताच्या. मुलींना लांब गावचे कमी शिकलेले पण परिस्थितीने भक्कम, शेतीवाडी असलेले मुलगे मिळाले.

पार लांब बऱ्हाणपूर आणि अमरावती जवळचे. नाना माईनी रीतसर हुंडे मानपान करून लग्न लावून दिली.

सुरेश इंजिनिअर झाला आणि अमेरिकेला निघून गेला. माधवला आधीच बँकेत नोकरी लागली होती. ,

आता त्या वाड्यात उरले फक्त तीन जीव… म्हातारे नाना माई आणि माधव.

“अरे माधवा, सगळे आपला आपला मार्ग शोधून निघून गेले. तू का असा एकटा रहातोस?  अजूनही लग्नाचं वय गेलं नाही तुझं. किती मुली बघितल्या पण तू तयारच होत नाहीस. काय कमी आहे तुझ्यात माधव? देखणा तर अजूनही दिसतोस, बँकेत चांगली नोकरी आहे. आमच्यासाठी म्हणूनच केवळ प्रमोशन्स घेत नाहीस. काय म्हणावं तुला?  अरे, त्या सुरेशने तिकडे गोऱ्या मुलीशी लग्न केलेसुद्धा. कधी आईवडिलांना नाही, की भावाला नाही बोलवावेसे वाटले रे त्याला तिकडे?  गेलो असतो की आमचा खर्च करून. स्वार्थीच रे सगळे. ” 

“ त्या दोघी पोरी तसल्याच. ” माई उसासून म्हणाल्या. ” मध्ये नाना किती आजारी होते. मुलींना म्हटलं अग माधवला फार पडतेय ग एकट्याला. त्यांना हॉस्पिटलला ठेवलंय. माधवची फार तारांबळ होतेय. निदान दोघी आठ दिवस तरी या. ” माईनी डोळ्याला पदर लावला. “ पण नाही आल्या. निरोप आले फक्त की ‘ नाही ग जमत माई. मुलांच्या परीक्षा, सासरची कामे. किती म्हणून सांगू? तुम्हाला कल्पनाच नाही यायची तिकडे बसून. आहे ना तिथे माधव?  माई दोन नोकर आणखी ठेव की ग. सुट्टीत बघतो जमलं तर. ’ – असल्या या कार्ट्या. माधवा, तुझ्यासाठी जीव तुटतो रे बाळा. छानशी मुलगी बघ आणि कर लग्न. किती अडकशील आता आमच्यात? ”

नाना त्या दिवशी झोपाळ्यावर एकटेच बसले होते.

“ येरे माधवा. हे बघ. ” 

“ काय आहे हे नाना? ”

“अरे आम्ही आता पिकली पानं. माझ्या जोशी वकिलांकडून आमचे हे मृत्युपत्र तयार करून घेतलं आहे.

उद्या सरकारी कचेरीत रजिस्ट्रेशन आहे. बघून घे एकदा. ” 

माधवने बघण्यास नकार दिला पण नाना ठाम होते.

– – या मृत्युपत्राद्वारे नानांचा हा भला मोठा वाडा फक्त माधवला दिला होता. शेत माधवच्या नावे केलं होतं. मुलींना माईंचे अर्धे अर्धे दागिने वाटून घ्या असं लिहिलं होतं. आणि सुरेशला बँकेतल्या पन्नास हजारच्या एफ डी.. बस्स.

“ नाना, हे काय?  मला हे काही नको. मला हे काय करायचंय एकट्याला?  अशी चुकीची वाटणी नका करू. ”

नाना म्हणाले, “ बरोबरच करतोय आम्ही. मुली म्हणून, मुलगा म्हणून कोणती कर्तव्ये केली बाकीच्यांनी? अर्थात आमची अपेक्षाच नाहीये रे. पण मग या जगात तू एकटा पडशील. नाही मांडलास संसार की नाही केलंस लग्न. कोण घेईल तुझी काळजी बाबा पुढे? काही नाही तर तू वाडा विकून टाक आणि बदली घे करून शहरात. तुझं तू ठरव. पण आता यात बदल होणार नाही. मी याच्या चार कॉपी काढून घेईन आणि आमच्या पश्चातच तू तुझ्या भावंडाना त्या दे. ”, नाना थकून बोलायचे थांबले.

– क्रमशः भाग पहिला

***

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ झेप.. ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? जीवनरंग 🌸

☆ झेप.. ☆ शालिनी जोशी ☆

 (मारुती चितमपल्ली यांच्या ‘पक्षी जाय दिगंतरा ‘ या कथेवर आधारित)

निळा विशाल सागर. बाजूला एक कडा आणि त्याच्या शेजारी एक डोंगर. कड्याला एक कपार. एक छोटेसे पिल्लू त्या कपारीत येरझाऱ्या करीत होते. बरोबर कोणीच नाही. खायला काही नाही. रोज मासे आणून प्रेमाने भरवणारी आई, प्रेमाने पाठीवरून चोच फिरवणारे वडील, मजेत खेळणारी तीन भावंडे सर्व कालच त्याला सगळे सोडून गेले.

… समोर डोंगरावर ती सगळी विहरताना दिसत होती. पण पिल्लू तिथे पोहोचू शकत नव्हतं. कडेला येऊन समुद्राकडे लक्ष दिले की त्याच्या पोटात गोळा येई. पाय लटपटू लागत. समोर मासा तोंडात घेतलेली आई दिसे. ती प्रेमाने आपल्याला पहाते आहे. हे कळे पण–

काल जाताना सर्वांनी त्याला बरोबर येण्याचा खूप आग्रह केला. पण भीतीने देह हवेत सोडून देण्याचा धीर पिल्लूला झाला नाही. वडील शेवटी रागावते, असे केलेस तर उपाशी मरशील. बहीणही ओढत होती. शेवटी नाईलाजाने सर्व सोडून गेले. तो पिल्लू विचार करून थकला. भूक भागवण्यासाठी घरट्यातील अंड्याची टरफले चाटण्याचा प्रयत्न केला. जणूं स्वतः स्वतःला खाल्ले. शेवटी निराशेने बाहेर बघू लागला.

वडील हवेत गिरक्या घेत होते. तीनही भावंडे खालीवर करीत होती. कधी पाण्याकडे झेपावत होती. इतक्यात आई तोंडात मासा घेऊन त्याच्याकडे येताना दिसली. खूप आनंदाने तो चोच उघडूनच बसला. पण आई जवळ आली नाही. लांबूनच खाली वर उडत मासा दाखवत होती. कधी मासा तोंडात जातो असे त्याला झाले होते. आईचा त्याला राग आला. त्या भरात त्याने डोळे मिटले, तो पुढे सरकला. आणि काय झाले त्याचे त्यालाच कळले नाही. खूप हलके हलके वाटत होते. त्याचे पंख उघडले होते आणि तो वरवर जात होता. नकळत तो खाली झेपावला. समुद्राच्या पाण्यातल्या माशांकडे लक्ष वेधले. पाण्याचा पायाला स्पर्श झाला. पण तो पाण्यात खाली गेला नाही. अलगत त्याने माशाला चोचीत धरले. वरवर जाऊ लागला. उडण्याची कला त्याला साधली.

सर्वांना आनंद झाला. भावंड आजूबाजूला, वडील वरती, आई खालती. सर्व कुटुंबाने सुखाने हवेत रिंगण घेतलं. पिल्लूचा पराक्रम सर्व साजरा करत होते. आईच्या नजरेत वेगळच समाधान होतं. पिल्लू स्वावलंबी झालं. वडिलांना कृतार्थ वाटलं. जगाच्या पसाऱ्यात वावरण्यास ते लायक झालं. आनंदाने वर निळ्या आकाशात, खाली निळ्या सागरात विहरू लागलं. आई-वडिलांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. भित्र्या मुलाला पंख फुटले. अनंत आकाश त्याचं घर झालं.

अशी ही छोट्या समुद्रपक्षाची कथा. मुलासाठी आई-वडील काहीही करायला तयार असतात. त्यांचे हित हाच हेतू असतो. जगात त्याला ताठ मानेने स्वकर्तुत्वावर जगता यावे हीच इच्छा असते. त्यासाठी रागालोभाचे मार्ग आचरावे लागतात.

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दहावी पास… (अनुवादित कथा) — भाग २  मूळ हिन्दी लेखिका : पूजा मिश्रा  ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ दहावी पास… (अनुवादित कथा) — भाग २  मूळ हिन्दी लेखिका : पूजा मिश्रा  ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

(आणि सोबतच त्यांनी एक डायरी उघडली ज्यात बैंकेचे काही मुदत ठेवी (फिक्स्ड डिपॉजिट) (FD) च्या पावत्या आणि पोस्टाचे सेविंग्स सर्टिफिकेट्स ठेवलेले होते.  माजघरात शांतता पसरली.  रोहित आणि मोहित चे डोळे विस्फारले गेले.) इथून पुढे – – 

“हे…  हे सर्व काय आहे, सुमित्रा? ” मिस्टर खन्ना अडखळत बोलले.

सुमित्रा देवी सोफ्यावर बसत म्हणाल्या, “हे ते ‘जेवण बनवणं’ आहे जे मला येतं.  ही ती ‘किटी पार्टी’ ची बचत आहे ज्याची तुम्ही लोकं चेष्टा करत होते.  हा त्या भाजीपाल्याचा हिशोब आहे ज्याला तुम्ही लोक साधारण समजत होते. “

त्यांनी एक-एक करून वस्तू मोजायला सुरू केलं.

“रोहित आठवतं, जेव्हा दहा वर्षांपूर्वी तुमच्या कारखान्यात आग लागली होती आणि पप्पांना पैश्यांची गरज होती, परंतू त्यांनी मला सांगीतलं नव्हतं? तेव्हा मीच माझ्या माहेरून मिळालेला खानदानी हार विकून पैशांची व्यवस्था केली होती, विम्याचे पैसे आल्यावर पप्पांनी ते मला दिलेत पण मी ते पैसे माझ्यासाठी कधीच वापरले नाहीत.  त्यांची मी पोस्ट ऑफिस च्या योजनेत गुंतवणुक केली होती.  आज ती रकम पंधरा लाख झाली आहे. “

त्यांनी सोन्याची नाणी उचलली.

“मोहित, जेव्हा तू लहान होतास आणि आजारी पडला होतास, डॉक्टर ने ऑपरेशन साठी पैसे मागीतले होते.  तुझ्या पप्पांकडे रक्कम नव्हती.  मी घरातील जुनी तांबा आणि पितळेची भांडी विकून, आणि आपल्या साड्यांमधून पैसे वाचवून ही छोटी-छोटी नाणी विकत घेतली होती.  दर वर्षी दिवाळी साठी जेव्हा तुम्ही लोकं फटाके वाजवत होते, मी सोन्याचं एक नाणं विकत घेऊन या पेटीत ठेवत असे.  आज सोन्याचा भाव आकाशाला भिडला आहे.  ही नाणी कमीत कमी वीस लाखांची आहेत “

मग त्यांनी ते वजनदार कंगन दाखवले.

“आणि हे कंगन…  हे माझ्या सासूबाई, तुमच्या आजींनी मला दिले होते.  त्यांनी म्हटलं होतं, ‘सुमित्रा, स्री हा घराचा पाया असते.  जेव्हा भिंती हलू लागतात, तेव्हा पायाच घराला वाचवतो’ मी आजपर्यंत हे कंगन घातले नाहीत, कारण आज हे कामात येऊ शकावेत.  यांचं वजन पंधरा तोळे आहे.  आजच्या हिशोबात यांची किंमत पण भरपूर असेल. “

सुमित्रा देवींनी एक वही पुढे केली.

“आणि हे बघा, मागील तीस वर्षांत, तुमच्या पप्पांनी मला घर खर्चासाठी जे पैसे दिले होते, त्यांतील मी प्रत्येक महिन्यात थोडे थोडे वाचवले होते, कधी भाजीवाल्याशी घासाघीस करून, कधी माझी औषधं घेणं टाळून, कधी नवी साड़ी खरेदी न करून.  मी त्या पैशांना ‘महिला बचत गटात’ टाकले होते.  तेथून मला व्याजासह जवळपास दहा लाख रुपये मिळतील.  “

माजघरात सुई पडली तरी ऐकू येईल इतकी शांतता पसरली होती.  रोहित ची मान लज्जेने खाली झुकली होती.  मोहित आपल्या आईच्या नजरेला नजर देवू शकत नव्हता.  मिस्टर खन्नांच्या डोळ्यातून अश्रू पाझरत होते.

“सर्व मिळून… ” सुमित्रा देवी हिशोब लावत म्हणाल्या, “ही जवळपास साठ लाख रुपयांची व्यवस्था आहे.  पन्नास लाख बँकेला द्या, आणि बाकीच्या दहा लाखांचा कारखान्यासाठी कच्चा माल मागवून घ्या.  घर विकायची गरज नाही. “

रोहित ने थरथरत्या हातांनी वही उचलली.  त्यात एक एक पैशाचा हिशोब लिहिलेला होता – ‘दूधाचे पैसे वाचवले’, ‘जूनी रद्दी विकली’, ‘लोणचं बनवून विकलं. ‘

त्याला आठवलं की तो आईला सतत ‘कंजूस’ म्हणत असे.  त्याला आठवलं की कसं तो आईच्या जून्या कपडे वापरण्याची टर उडवायचा.  आज त्याच ‘कंजूसपणा’ने त्यांची अब्रु, त्यांचं घर आणि त्यांचं भविष्य वाचवलं होतं.

रोहित ने पळत जाऊन सुमित्रा देवींच्या पायावर लोळण घेऊन हमसून हमसून रडू लागला.  “आई…  मला माफ कर.  मी आंधळा झालो होतो.  मी तुला अशिक्षित समजत होतो, पण तू तर ते अर्थशास्त्र (Economics) शिकलेली आहेस जे जगातील कोणत्याच विद्यापीठात शिकवले जात नाही.  मी तुझा गुन्हेगार आहे आई. “

सुमित्रा देवींनी रोहितला खांद्याला धरून उठवून आलिंगन दिले.  “वेड्या, आई ची माफी नाही मागू, आणि बाळा, स्री कधी रिकामी नाही बसत.  जेव्हा ती स्वयंपाकघरात पोळ्या लाटते, त्यासोबत आपल्या परिवाराचं भविष्य पण लाटत असते.  जेव्हा ती दाळ ला फोडणी देते, तर त्यात सुरक्षा आणि बचतीची फोडणी पण लावत असते.  फक्त आम्हाला श्रेय (क्रेडिट) घेता येत नाही, याचा अर्थ असा नाही की आम्हाला काही येतच नाही. “

मिस्टर खन्नांनी पुढे येऊन सुमित्रा चे हात हातात घेतले, “सुमित्रा, आज तू सिद्ध करून दाखवलेस की या घराचा खरा प्रमुख मी नाही तू आहेस.  मला तर फक्त पैसे कमावणे माहीत होते, त्याला सांभाळणे व वाढवणे तर तू शिकवलेस.  आज हे छत आमच्या डोक्यावर शाबूत आहे ते फक्त तुझ्यामुळे. “

मोहित पण आई ला मिठी मारत म्हणाला, “आई, तू तर घराची अर्थ मंत्री (Finance Minister) निघालीस.  आम्ही तर उगीच एमबीए ची पदवी घेऊन फिरत आहोत. “

त्या दिवशी घर विकलं गेलं नाही.  बँकेचं कर्ज फेडलं गेलं.  कारखान्यात पुन्हा काम सुरू झालं.  परंतू त्या दिवशी सगळ्यात मोठा बदल जो झाला, तो हा होता की आता सुमित्रा देवी फक्त ‘स्वयंपाकघरा’ पर्यंत मर्यादित नव्हत्या.  आता व्यवसायाच्या प्रत्येक बैठकी मध्ये, प्रत्येक मोठ्या निर्णयात त्यांचं मत विचारात घेतलं जात होतं.

रोहित ने आपल्या कारखान्यातील नवीन उत्पादनाचं नाव ‘सुमित्रा’ ठेवलं.

सायंकाळी जेव्हा ते सर्व चहा पीत होते, रोहित ने हसत म्हटले, “आई, आता तरी ऐक, तुला फक्त स्वयंपाक करण्यापेक्षा इतरही बरंच काही येतं.”

सुमित्रा देवी हसल्या, “हो, मला बुडणारं जहाज किनाऱ्यावर लावता येतं.”

ही कहाणी त्या सर्व आईंना व गृहिणींना समर्पित आहे ज्यांना समाज हमेशा ‘फक्त गृहिणी’ म्हणत कमी लेखत असतो.  त्या घराच्या चार भिंतींमध्ये राहून ही ते करून जातात जे मोठेमोठे धुरंधर नाही करु शकत.  त्यांची हळूवार बचत आणि त्याग हीच कुटुंबाची खरी मिळकत आहे.

– समाप्त –

मूळ हिंदी कथा लेखिका : पूजा मिश्रा

मराठी अनुवाद : मेघःशाम सोनवणे

नाशिक.

मो 9325927222

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दहावी पास… (अनुवादित कथा) — भाग १  मूळ हिन्दी लेखिका : पूजा मिश्रा  ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ दहावी पास… (अनुवादित कथा) — भाग १  मूळ हिन्दी लेखिका : पूजा मिश्रा  ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

ढचे दोन दिवस घरात स्मशानशांतता पसरली होती.  घर विकण्याचे नक्की झाले होते.  दलाल येणार होता.  रोहित आणी मोहित कागजी कारवाईत व्यस्त होते.  सुमित्रा देवींनी बघितलं की त्यांच्या पतींना रात्री झोप येत नव्हती.  त्यांना माहित होतं की हे घर म्हणजे त्यांचा आत्मा आहे.

सायंकाळ च्या चहाची वेळ होती.  माजघरात सोफ्यावर बसलेले मिस्टर खन्ना आणि त्यांची दोन्ही मुलं – रोहित आणि मोहित – चिंताग्रस्त होते.  घरातील वातावरण तनावग्रस्त होते.  खन्ना टेक्सटाइल्स, जे कधी शहराचा अभिमान म्हणून ओळखले जात होते, आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती.  मागील सहा महिन्यांपासून बाजारातील मंदी आणि एक मोठी ऑर्डर रद्द झाल्याने परिस्थिती अजून खराब झाली होती.  बँकेची नोटिस आलेली होती – जर पुढच्या पंधरा दिवसांत पन्नास लाख रुपये जमा नाही केले, तर त्यांचे वडिलोपार्जित घर आणि कारखाना, दोघांचा लिलाव केला जाईल.

स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता.  55 वर्षांच्या सुमित्रा देवी, मिस्टर खन्नांच्या पत्नी, नेहमीप्रमाणे रात्रीच्या जेवणाची तयारी करण्यात व्यस्त होत्या.  त्या अधूनमधून माजघराकडे बघत होत्या, परंतु तेथे सुरू असलेल्या गंभीर विचारविनीमयात दखल देण्याची त्यांची हिम्मत होत नव्हती.

“पप्पा, आता दूसरा काही रस्ता दिसत नाही.  आपल्याला हे घर विकावेच लागेल, ” रोहित डोकं गच्च धरत म्हणाला.  त्याने एमबीए करून आता व्यवसाय सांभाळत होता, पण आज त्याच्या सर्व पदव्या त्याला फोल वाटत होत्या.

मोहित, जो अजून कॉलेज मध्ये शिकत होता आणि व्यवसायात ही हातभार लावत होता, त्यानेही भावाचीच री ओढली.  “दादा बरोबर बोलत आहे.  कारखाना वाचवण्यासाठी घर तर विकावेच लागेल.  आणि असंही, आता एवढ्या मोठ्या बंगल्याचं आपण करणार तरी काय? एखाद्या भाड्याच्या फ्लॅट मध्ये रहायला जाऊ “

मिस्टर खन्ना यांच्या डोळ्यात अश्रू होते.  हे घर त्यांच्या वडिलांची आठवण होती.  “रोहित, बाजारातून काही उसने पैसे मिळू शकत नाहीत का? किंवा कुणी गुंतवणुकदार?”

“पप्पा, मार्केट मध्ये आधीच बातमी पसरली आहे की आपण धंद्यात बुडत आहोत.  कोणी पैसा लावण्यास ईच्छुक नाही.  आणि नातेवाईक? त्यांनी तर फोन उचलणंही बंद केलं आहे, ” रोहित वैतागून म्हणाला.

तेव्हड्यात सुमित्रा देवी ट्रे मध्ये चहा आणि नाश्ता घेऊन तेथे आल्या.  टेबलावर कप ठेवत त्यांनी हळू आवाजात विचारले, “अहो काय झालंय? तुम्ही लोकं एवढे चिंतित का दिसतात? बँक वाले पुन्हा आले होते का? “

रोहित ने चिडून आपल्या आई कडे बघितलं.  “आई, कृपया! तू चहा ठेव आणि स्वयंपाकघरात जा.  या बिजनेस च्या गोष्टी आहेत, तुला नाही समजणार.  तूला फक्त घरातील किराणा आणि भाजीपाल्याचा हिशोब समजतो, हा करोड़ोंचा विषय आहे. “

सुमित्रा देवींचा हात क्षणभर थरथरला, पण त्यांनी स्वतःला सावरलं.  ही काही पहिली वेळ नव्हती की त्यांना ‘फक्त गृहिणी’ असल्याची जाणिव करून दिली गेली होती.  “बाळा, मी फक्त विचारत होती.  जर माझी काही मदत… “

“मदत? ” मोहित चेष्टेत हसत म्हणाला, “आई, तू काय मदत करशील? तुझ्या किटी पार्टी च्या मैत्रिणींना पैसे मागशील? की पप्पांची जुनी स्वेटरं उधडून विकशील? बघ, आम्ही आधीच खूप तनावात आहोत.  तू फक्त जेवण बनव.  तेवढंच येतं तुला. “

मिस्टर खन्नांनी पण मुलांना टोकलं नाही.  बहुतेक त्यांनाही असंच वाटत असावं की सुमित्रा, ज्या दहावी पास होत्या आणि ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त चुल आणि मुल सांभाळण्यातच धन्यता मानली होती, त्या या आर्थिक संकटात काय मदत करू शकणार?

सुमित्रा देवी तेथून शांतपणे निघून गेल्या.  त्यांच्या डोळ्यांत अश्रू नव्हते परंतू हृदयात एक विचित्र बोच होती.  त्यांना याचं दुःख नव्हतं की मुलं त्यांचा अवमान करीत होते, परंतू याचं होतं की आपल्या आई ला ते इतकं नगण्य समजत होते.

पुढचे दोन दिवस घरात स्मशानशांतता पसरली होती.  घर विकण्याचे नक्की झाले होते.  दलाल येणार होता.  रोहित आणी मोहित कागजी कारवाईत व्यस्त होते.  सुमित्रा देवींनी बघितलं की त्यांच्या पतींना रात्री झोप येत नव्हती.  त्यांना माहित होतं की हे घर त्यांचा आत्मा आहे.

तिसर्‍या दिवशी सकाळी, जेव्हा रोहित दलाल ला फोन करणारच होता की, सुमित्रा देवींनी त्याला थांबवलं.  “रोहित, एक मिनिट थांब.  मला तुम्हा सर्वांशी काही बोलायचं आहे. “

रोहित ने घड्याळात पाहीलं, “आई, आता नाही, दलाल इतक्यात येईलच.  घराचा व्यवहार करायचा आहे. “

“घर विकलं जाणार नाही, ” सुमित्रा देवींच्या आवाजात एक अशी दृढ़ता होती जी आधि कधी कुणी ऐकली नव्हती.

मिस्टर खन्ना, रोहित और मोहित- तिघं चमकून त्यांचेकडे बघू लागले.

“घर विकलं जाणार नाही म्हणजे? आई, तू भावनिक होत आहेस, जरा व्यावहारिक विचार कर.  पन्नास लाख रुपये आकाशातून टपकनार नाहीत, ” रोहित चढ्या आवाजात बोलला.

सुमित्रा देवी काहीच बोलल्या नाहीत.  त्या आपल्या खोलीत गेल्या आणि तेथून एक जूनी, लोखंडाची गंजलेली पेटी ओढत घेऊन आल्या.  ही तीच पेटी होती जिला मोहित नेहमी भंगारात फेकण्याविषयी बोलत असे.

त्यांनी आपल्या साडीच्या पदरात बांधलेल्या चावीने त्या पेटीचं कुलूप उघडलं.  आत जुणे कपडे घड्या करून ठेवलेले होते.  सुमित्रा देवींनी कपडे बाजूला केले आणि खालून एक मखमली कपड्याचं बोचकं आणि काही जुन्या वह्या काढल्या.

त्यांनी ते बोचकं सोफ्यावर रिकामं केलं.  छन-छन आवाज करत काही सोन्याची नाणी, जुन्या घडणीचे जाड कंगन, आणि काही महागडे रत्न सोफ्यावर पसरले.  आणि सोबतच त्यांनी एक डायरी उघडली ज्यात बैंकेचे काही मुदत ठेवी (फिक्स्ड डिपॉजिट) (FD) च्या पावत्या आणि पोस्टाचे सेविंग्स सर्टिफिकेट्स ठेवलेले होते.

माजघरात शांतता पसरली.  रोहित आणि मोहित चे डोळे विस्फारले गेले.

– क्रमशः भाग पहिला  

मूळ हिंदी कथा लेखिका : पूजा मिश्रा

मराठी अनुवाद : मेघःशाम सोनवणे

नाशिक.

मो 9325927222

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
2

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “‘फादर्स डे’ ला बापाचा बदला – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

☆ “‘फादर्स डे’ ला बापाचा बदला – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर ☆

फादर्स डेच्या दिवशी सकाळी-सकाळी मी फेसबुक उघडलं.

मित्रमंडळी त्यांच्या वडिलांसोबतचे फोटो टाकत होती.

कोणी लिहित होतं—

“माझे बाबा माझे हिरो आहेत… ” 

कोणी लिहित होतं—

“माझे बाबा माझे सुपरमॅन आहेत… ” 

मीही जोशात येऊन पोस्ट टाकली—

“माझे बाबा कोणत्याही फादर्स डेचे मोहताज नाहीत. त्यांना जेव्हा वाटतं, तेव्हा चप्पल उचलून आठवण करून देतात की बाप म्हणजे बापच असतो!” 

पोस्ट व्हायरल झाली.

हजारो लाईक्स.

शेकडो कमेंट्स.

मी आनंदाने फुलून गेलो होतो.

तेवढ्यात दारावरून आवाज आला—

“अरे लेखक साहेब!” 

मी बाहेर पाहिलं…

बाबा हातात मोबाईल घेऊन उभे होते.

आणि त्यांच्या चेहऱ्यावर असं हसू होतं, जे पाहून माझा आत्माच थरथरला.

त्यांनी विचारलं—

“खूप मोठा कॉमेडियन झाला आहेस का रे?” 

मी समजलो…

पोस्ट त्यांच्या हाती लागली होती.

मी पळायला लागलो.

पण यावेळी काहीतरी वेगळंच झालं.

बाबांनी चप्पल उचलली नाही.

ते म्हणाले—

“आज नाही मारणार. ” 

मी सुटकेचा निःश्वास टाकला.

पण मला काय माहिती…

खरं संकट तर आता सुरू होणार होतं.

संध्याकाळी घरी नातेवाईक आले.

काका, मामा, मावशी, आत्या…

संपूर्ण परिवार.

मी विचार करत होतो, काही पूजा-वगैरे असेल.

तेवढ्यात बाबा खुर्चीवर उभे राहिले.

आणि म्हणाले—

“आज फादर्स डे आहे. आणि माझ्या मुलाने फेसबुकवर माझ्याबद्दल खूप काही लिहिलं आहे. आता माझीही पाळी. ” 

माझ्या पायाखालची जमीन सरकली.

त्यांनी मोबाईल काढला.

आणि माझे लहानपणीचे फोटो दाखवायला सुरुवात केली.

पहिला फोटो…

मी नागडा बसलो होतो आणि समोरच्या स्टीलच्या ताटातली माती खात होतो.

सगळं घर हसायला लागलं.

मी म्हणालो—

“बाबा, हे काढा!” 

ते म्हणाले—

“अरे, ही तर फक्त सुरुवात आहे बेटा. ” 

दुसरा फोटो…

मी पाच वर्षांचा होतो.

शेजारच्या पिंकीसोबत लग्न-लग्न खेळत होतो.

कपाळावर लाल टिळा.

गळ्यात हार.

बाबा म्हणाले—

“हा आमचा मुलगा. पाचव्या वर्षीच प्रेमविवाह करून बसला होता. ” 

सगळे खळखळून हसू लागले.

मी घामाघूम झालो.

मग त्यांनी एक जुनी वही काढली.

म्हणाले—

“आता याच्या लहानपणीच्या कविता ऐका. ” 

मला वाटलं काहीतरी चांगली कविता असेल.

पण त्यांनी वाचायला सुरुवात केली—

“चांदोबा चांदोबा भागलास का, भजी करून पळालास का… ” 

सगळे हसून-हसून लोळायला लागले.

मी लाजेने मेलोच होतो.

मग अचानक बाबा शांत झाले.

त्यांनी वही बंद केली.

आणि म्हणाले—

“मस्करी खूप झाली. “

खोलीत शांतता पसरली.

मी पहिल्यांदाच पाहिलं…

त्यांच्या डोळ्यांत हलकंसं पाणी आलं होतं.

ते माझ्याकडे पाहत म्हणाले—

“आज हे सगळे हसत आहेत ना… पण त्यांना एक गोष्ट माहिती नाही. “

“जेव्हा हा जन्मला होता, तेव्हा हॉस्पिटलचं बिल फक्त १७०० रुपये होतं… आणि माझ्या खिशात ९०० रुपये होते. “

सगळे शांत.

“मी माझं घड्याळ विकलं होतं. ” 

खोलीतील शांतता आणखी गडद झाली.

ते पुढे म्हणाले—

“जेव्हा हा पाचवीत नापास झाला होता… तेव्हा संपूर्ण कॉलनी याला मूर्ख म्हणत होती. “

“पण मी कोणालाही काही बोललो नाही. “

“रात्री गच्चीवर जाऊन एकटाच रडलो होतो. ” 

माझ्या घशात काहीतरी अडकलं.

ते माझ्याकडे पाहून हसले.

आणि म्हणाले—

“जेव्हा हा पहिल्यांदा नोकरीसाठी शहरात गेला होता… तेव्हा स्टेशनवरून परतताना मी बसने आलो नव्हतो. “

“पूर्ण दहा किलोमीटर पायी चाललो होतो. ” 

“कारण बसमध्ये बसलो असतो तर लोक विचारले असते—”

“इतका उदास का आहेस?”

“आणि मी रडायला लागलो असतो. ” 

आता संपूर्ण घराच्या डोळ्यांत पाणी होतं.

मग त्यांनी खिशातून काहीतरी काढलं.

एक छोटंसं तुटलेलं प्लास्टिकचं खेळणं.

मी ओळखलं.

माझी लहानपणीची लाल गाडी.

जी मी पाचव्या वर्षी हरवली होती.

मी आश्चर्यचकित झालो.

“ही तुमच्याकडे कशी?”

बाबा हसले.

म्हणाले—

“ज्या दिवशी तू रडत-रडत तिला शोधत होतास… त्या दिवशी ती मला शेतात सापडली होती. “

“मोठा झाल्यावर देईन असं ठरवलं होतं. “

“पण तू मोठा झालास… आणि मी विसरलो. ” 

आता मी स्वतःला रोखू शकलो नाही.

मी उठलो आणि त्यांच्या गळ्यात पडून रडलो.

सगळ्यांसमोर.

पहिल्यांदाच.

तेवढ्यात बाबांनी हळूच माझ्या कानात म्हटलं—

“आणि ऐक… “

मी म्हणालो—

“हो बाबा?”

ते हसून म्हणाले—

“फेसबुकवर लिही… “

“बाप फक्त चप्पल उचलत नाही. “

“कधी-कधी तो संपूर्ण आयुष्य उचलून चालतो… फक्त मुलगा पडू नये म्हणून. ” 

बस…

त्या दिवशी मला समजलं की लहानपणी ज्या चपलांची मला भीती वाटायची…

तीच चप्पल उन्हात भाजलेल्या पायांनी चालत माझ्यासाठी भाकर कमवायला जात होती.

आणि ज्या माणसाची मी मस्करी करत होतो…

तो माणूस शांतपणे त्याचं संपूर्ण आयुष्य माझ्या आनंदाच्या नावावर लिहून गेला होता.

त्या रात्री मी फेसबुकवर फक्त एकच ओळ लिहिली—

“लहानपणी वाटायचं बाबा मला चपलीने चालवतात… आज समजलं, ते स्वतः झिजले म्हणून मी चालू शकलो. ” 

आणि विश्वास ठेवा…

त्या पोस्टवर सर्वात पहिला लाईक माझ्या बाबांचाच होता.

 “तुमच्या बाबांनी तुमच्यासाठी केलेली अशी कोणती गोष्ट आहे, जी तुम्ही कधीच विसरू शकत नाही?” 

– समाप्त –

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुटकी पेन्सिल – भाग ३ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ तुटकी पेन्सिल – भाग ३ (भावानुवाद) – हिन्दी कथाकार : डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डॉ. हंसा दीप

(पण आता या क्षणी परिस्थिती वेगळी होती. मरणाच्या दारात असलेल्याने कुणास शिव्या-श्राप देणे योग्य नव्हते.) 

इथून पुढे – – 

माझा रक्तदाब मोजला गेला, तर तो १६० च्या वर होता. काल रात्रीपासूनच माझ्या हृदयाची धडधड मर्यादा ओलांडून सैरभैर झाली होती. घराचा विचार मनांत येताच आधीच माझे काळीज दुःखातिरेकाने काळवंडले होते. अशातच त्यात माझ्या मनांत असंबद्ध विचार डोकावू लागले, “माझ्या अंशूच्या आयुष्यात दुसरी कुणी आली तर? नाही… तो तर माझा एकाधिकार आहे. ” जर एखाद्या मरणासन्न महिलेला दुसऱ्या स्त्रीचा असा जोरदार झटका लागला तर तिचा रक्तदाब कसा वाढणार नाही? एकामागून एक असे झटके बसत होते की काय सांगू अन कसं सांगू!

आराम-कक्षात थोडा वेळ राहिल्यानंतर, आता माझ्या समोर एक नवीन चेहरा होता, त्यासोबतच एक नवीन खोली होती. मला एका विशालकाय इमेजिंग मशीनमध्ये झोपवण्यात आले होते. मशीन सुरु झाली, अधूनमधून कामाला लागत तिने नियत वेळी प्रत्येक कोनातून आतील शिरांच्या अगणित प्रतिमा घेतल्या. मी त्या मशीनच्या बोगद्यात सुमारे पंधरा ते वीस मिनिटे होते. मशीन माझ्या अंगप्रत्यंगावरून फिरत राहिली. डावीकडे, उजवीकडे, पुढे, मागे, सर्वत्र, फोटोच फोटो घेतल्या जात होते. प्रत्येक वेळी ते अजस्त्र यंत्र माझ्याजवळ येताच माझी भीतीने गाळण उडायची. असे वाटत होते की जणू बदामाचा शिरा, गुलाबजाम आणि जिलेबीसारख्या चविष्ट मिष्टान्नांचेच फोटो काढल्या जात आहेत.

इकडून तिकडून धावत आणि चालत हकनाक फेऱ्या मारल्यावर परतलेला एकच विचार माझ्या मनात येत होता, “कुठलेही लक्षण नसतानाही, मी इतकी आजारी कशी काय असू शकते?” आशंकेच्या निव्वळ कल्पनेनेच सशासारख्या बावरलेल्या मनाला अंशूचा अदृश्य आवाज ऐकू यायला लागला, “आता भोग आपल्या कर्माची फळे!”

ते अवाढव्य यंत्र आता वर्तुळाकार फिरत होते, माझ्या शरीरातील असल्या-नसल्या प्रत्येक लहान-मोठ्या आतड्याचा आणि रक्ताच्या एक-एक थेंबाचा हिशोब करत होते. मी त्याच्या कार्यशैलीने भलतीच प्रभावित झाले होते. कुणास ठाऊक कोण्या डोकेबाज माणसाने ती निर्माण केली होती. लोकांचा मेंदू किती कुशाग्रतेने चालतो! वैद्यकीय शास्त्रातील कित्येक चमत्कार मानवाच्या अनवट कल्पनाशक्तीतून अवतरले आहेत. शेवटी हा टप्पाही मी यशस्वीरित्या पूर्ण केला.

काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर माझी बहुप्रतिक्षित ट्रेडमिल वर धावण्याची चाचणी झाली. घरी मला असंख्य वेळा समजावण्यात आले होते की जर मी धावू शकत नसेन तर तिथल्या लोकांना लगेच सांगावे. तिथे हजर असलेल्या तंत्रज्ञांनी त्याचीच पुनरावृत्ती केली, ती ही अनेक वेळा! माझा रक्तदाब मोजण्यात आला. आता तर तो १७० पर्यंत पोहोचला होता. माझ्या दंडाभोवती रक्तदाबमापक यंत्राचा पट्टा आवळलेला होता. त्यात भर घालीत छातीवर तारांना जोडलेले अनेक चिकट पॅचेस लावल्या गेले.

धावण्याचे यंत्र सुरू झाले. ट्रेडमिलवर धावत असताना, मी कधी शिकवता-शिकवता माझ्या वर्गात चकरा मारीत होते, तर कधी युवी या माझ्या नातवासोबत विडिओ गेममधील माझ्या पात्राला वाचवण्यासाठी शर्थीचा प्रयत्न करीत होते. ट्रेड मिलच्या मार्गिकेवर चालतांना या सर्व आनंददायक क्षणांची मी प्रत्यक्षात गळा भेट घेत होते. हे सर्व आनंदाचे क्षण माझ्या मार्गावर येत राहिले.

“तुम्ही बऱ्या आहात कां?”

“हो. “

“मी वेग वाढवत आहे. “

“हो. “

“जर तुम्हाला बरे वाटत नसेल तर मला लगेच कळवा. “

“हो. “

“जर तुम्हाला किंचितही छातीत दुखायला लागले तर मला लगेच सांगा. “

“हो, मी ठीक आहे. “

या वळणावर मी अगदी आरामात जणू गुलाबी झोपेच्या तंद्रीत असल्यागत माझ्या जीवनातील सुखद क्षणांच्या आठवणी जागवायला लागले. ते आनंदाचे क्षण स्मरले जेव्हा एका प्रतिष्ठित नियतकालिकाने माझी कथा त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट कथा म्हणून घोषित केली होती. वाचकांकडून अभिनंदनपर संदेशांचा ओघ सुरु होता. त्या अनावर आनंदाच्या प्रवाहात तेव्हाही माझा रक्तदाब नक्कीच वाढला असावा. आम्ही सर्वजण माझ्या यशाचा क्षण साजरा करण्यासाठी एका हॉटेलात गेलो होतो. त्या रात्रीचा पनीर कोफ्ता इतका चविष्ट होता की त्याच्या चवदार चवीने माझ्या जिभेचा लगेच ताबा घेतला. त्या भावुक क्षणांनी भारलेल्या स्मृतींच्या धुक्यात ट्रेडमिलचा वाढता वेग, छातीचे दुखणे इत्यादी प्रश्न मागच्या मागे कुठे तरी हरवून गेले.

“मी तुम्हाला सर्वोच्च वेगवान बिंदूवर घेऊन जात आहे. कृपया मला सांगा की तुम्ही ठीक आहात की नाही. “

“हो, मी अगदी व्यवस्थित आहे. ” ती देखील माझ्या चेहऱ्यावरील संपूर्ण समाधानाचे भाव पाहून आश्चर्यचकित झाली होती. त्या सुरेख क्षणी, हॉटेलमधील मिष्टान्न माझ्या डोळ्यांसमोर होते आणि मी अत्यानंदाने रबडीत न्हायलेल्या गुलाबजामचा आस्वाद घेत होते.

वेगाने, अति वेगाने… त्याच गतीच्या ओघात मला आणखी एक इंजेक्शन देण्यात आले. मी बेफिकीरपणे आपल्याच जगात हरवून गेले होते, आणि त्याच वेगाने पुढे पुढे धावत राहिले. तेव्हां मी विचार करत होते, “मी आता पडेन, नंतर पडेन. पडण्याआधीच अंशू येऊन मला सावरतील. ” त्यांच्या आश्वस्त करणाऱ्या हातांचा स्पर्श जाणवण्यापूर्वीच, अचानक मशीनची गती कमी झाली आणि त्यासोबत माझे विचारही मंदावले. माझ्या मेंदूत एक प्रश्न उगवला, “एवढ्या धिम्या गतीने चालणाऱ्या मशीनमधून मी कशी काय पडू शकेन?” हळू हळू मशीनचा वेग कमी होऊन ती पूर्णपणे थांबली.

“खाली उतरा! या. ”

“कां, काय झालंय?” मी हतप्रभ होऊन गोंधळलेल्या नजरेने विचारलं.

“आटपली चाचणी!”

मला वाटलं, कदाचित ते मला थोडा वेळ विश्रांती घ्यायला बसवतील आणि नंतर पुन्हा धावायला लावतील. माझा रक्तदाब परत एकवार मोजण्यात आला. आश्चर्य म्हणजे तो १५५ पर्यंत घसरला होता. अरे देवा! इतक्या झटपट कसा काय कमी झाला? मी पहिल्यांदा मेले नाही, मात्र दुसऱ्यांदा धावता-धावता मी नक्की मरणार! माझ्या समोरची तंत्रज्ञ आपले चार्ट भरत होती. मी धाडस करून विचारले, “किती वेळ विश्रांती घेतल्यावर मला पुन्हा धावायला लावणार आहात?”

“तुमची चाचणी संपली. “

“तुम्हाला काय म्हणायचंय?”

“म्हणजे तुमची परीक्षा चांगल्या तऱ्हेने पार पडली. “

“हो कां?” मी स्तब्ध होऊन तिचे बोलणे ऐकत होते.

तितक्यात मागून एक आवाज आला, “तुम्हाला रेडिओ ट्रेसरच्या फोटोजचा आणखी एक सेट द्यावा लागेल. “

 त्या यंत्राने संपूर्ण प्रक्रियेची पुन्हा पुनरावृत्ती केली. तेच वीस मिनिटांचे चक्र फिरले. मात्र या चक्रादरम्यान, मला झोप येऊ लागली होती. कालची रात्र अस्वस्थ अवस्थेत अक्षरशः जागूनच काढली होती. म्हणून आता ही निद्रा! या अनिवार झोपेपायी “तुमच्या जीविताला खूपच धोका आहे, ” या डॉक्टरांच्या शब्दांना जणू कुजबुजण्याची देखील परवानगी नव्हती.

घरी परतल्यानंतरही अंशू काळजीतच असलेले दिसले. येणाऱ्या चाचण्यांच्या रिपोर्टबद्दल त्यांची ही बेचैनी मला जाणवत होती. तीन दिवसांतच फॅमिली डॉक्टरांनी आम्हाला फोन करून बोलावून घेतले. आम्ही अर्धा तास लवकरच पोहोचलो. आता आम्ही तिघेही समोरासमोर होतो: मी, अंशू आणि डॉक्टर.

विखुरलेल्या कागदपत्रांकडे पाहून डॉक्टर स्मित करीत म्हणाले, “तुम्हाला A+ मिळाले आहे, श्रीमती रेमी. “

“डॉक्टर, मी समजले नाही!”

“तुमच्या सर्व चाचण्यांचे अहवाल सामान्य आहेत. “

मी क्षणभर सुन्नच झाले. पुढच्याच क्षणी मला सत्य उमगले – “पण डॉक्टरसाहेब, मला नेमकं काय झालं होतं? तुम्ही इतक्या चाचण्या केल्या माझ्या!”

डॉक्टर उद्गारले, “तुमच्या कुटुंबाचा इतिहास! तुमचे स्वतःचे टेस्ट रिपोर्ट सामान्य आहेत पण तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या हृदयरोगामुळे होत गेलेल्या मृत्यूसह, तुमचे हे अंक वाढतच राहिले. आणि आता तर तुम्ही पासष्ट वर्षांच्या आहात, म्हणून तुम्ही आपसूकच ‘अति धोका’ असलेल्या श्रेणीत येऊन पोचलात. “

“म्हणजे हे जे सगळे रामायण घडले ते कुटुंबाच्या इतिहासामुळे?”

“होय!”

माझ्या कुटुंबातील सदस्य एक एक करून माझ्यासमोर हजर होऊ लागले. त्यांनी स्वतःहून सर्व काही सहन केले होते. त्याची धग त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचू दिली नव्हती. समोर उभे असलेले अंशू माझ्यावर ओढवलेल्या या भीषण अनुभवाने खूपच हादरून गेले होते. आम्ही क्लिनिकमधून बाहेर पडताच, बराच वेळ माझा हात घट्ट पकडून ठेवीत ते माझ्या डोळ्यांत खोलवर पाहत राहिले. यावेळी, त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांचे डोके पुन्हा हलले. पण आता ते समाधानाने होते. माझ्या खांद्याला हळुवारपणे स्पर्शाने थोपटीत ते बोलले, “माफ कर मला, मी खूप कांही बोललो तुला! आता पुरे झाले डाएट. चल, तुला जे हवे ते खाऊन घे बरं!”

माझ्या तोंडून निरागस शब्द बाहेर पडले, “मी नऊ दिवसांपासून चहा घेतलेला नाही!” आमच्या दोघांचेही डोळे पाणावले होते. कदाचित संभावित विरहवेदनेच्या निव्वळ कल्पनेपुढे आम्ही असहाय होत गुढघे टेकले होते.

घरी पोहोचताच मी सर्वात आधी काय केले असेल तर मला केविलवाण्या नजरेने बघणाऱ्या पेंसिलीचे टोक सुबकतेने तीक्ष्ण केले! लगोलग त्याच टोकदार पेंसिलीने दवाखान्यातून नुकत्याच आणलेल्या कागदपत्रांच्या भेंडोळ्यावर लिहिले: “कौटुंबिक इतिहास!” या घाटदार अक्षरांचे सौंदर्य अतुलनीय होते, कारण पेंसिलीला नवतीचे धारदार टोक प्राप्त झाले होते!

– समाप्त – 

मूळ हिन्दी कथा : ‘ टूटी पेन्सिल ‘.

मूळ हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप 

अधिव्याख्याता, टोरोंटो विद्यापीठ, कॅनडा

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817, ई-मेल – hansadeep8@gmail.com

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

ठाणे (पश्चिम)

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares