चिंचवडहून जवळच पिंपरीला सहकुटुंब सहपरिवार जाण्याचा अनिल देशमुखांचा बेत ठरला होता.
सरकारी खात्यातील अधिकारी अनिल देशमुख हे त्यांच्या प्रामाणिकपणासाठी आणि कायद्याचे काटेकोर पालन करण्यासाठी वाखाणले जात. ऑफिसमध्ये तर लोक त्यांना “नियमपुस्तक”च म्हणायचे.
त्या दिवशी, पत्नी स्वाती, आठ वर्षांचा मुलगा अथर्व आणि पाच वर्षांची मुलगी गौरी यांना घेऊन ते घराबाहेर पडले.
घरापासून अंतर फार नव्हते. “अरे, एवढ्याशा अंतरासाठी कार कशाला? शिवाय मित्राकडे पार्किंगचाही प्रश्न असतो. ” असा विचार करून अनिल यांनी स्कूटर काढली.
स्वाती मागे बसली. तिच्या मांडीवर गौरी. आणि अनिल यांच्यासमोर अथर्व.
रस्त्यावर वाहतूक तुलनेने कमी होती.
एकीकडे गप्पा, मुलांचा गोंधळ आणि बडबड सुरू होती आणि स्कूटर पुढे जात होती.
समोर थोड्या अंतरावर रस्त्याच्या कडेला एक पांढरी कार उभी होती. कारमध्ये चालक बसलेला होता.
अनिल स्कूटरने कारला ओलांडत होते, इतक्यात…
धाडकन्! – – कारच्या चालकाने कोणतीही सूचना न देता अचानक दरवाजा उघडला आणि तोंडातील तंबाखूची पिचकारी मारली.
दरवाजा स्कूटरवर आदळला, स्कूटरचा तोल गेला.
अनिल, स्वाती, अथर्व आणि गौरी चौघेही रस्त्यावर आपटले.
सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही, पण मुलं घाबरून रडू लागली.
अनिल संतापाने उठले.
“हे काय केलं तुम्ही? दरवाजा उघडण्यापूर्वी मागे बघायचं नसतं का? “
कार चालक निवांतपणे खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता.
“त्यात एवढं काय झालं? “
“तुमच्यामुळे आम्ही पडलो! “
“तुम्ही जरा सांभाळून चालवायला हवं होतं. “
“म्हणजे चूक तुमची आणि दोष आमचा? “
“रस्त्यावर चालताना खबरदारी घ्यायची असते. “
– – हे ऐकताच अनिल यांच्या रागाचा पारा चढला.
“मी आता थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करतो. “
“जा ना. कुणी अडवलंय? ” चालकाने खांदे उडवले, त्याला काहीच फिकीर नव्हती.
अनिल यांनी गाडीचा नंबर लिहून घेतला, गाडीचा, दाराबाहेर मारलेल्या तंबाखूच्या पिचकारीचा आणि पडलेल्या स्कूटरचा फोटो काढला. हे फोटो काढताना आतल्या ड्रायव्हरचा फोटो येईल याचीही काळजी त्यांनी घेतली.
पंधरा मिनिटांत अनिल पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले.
कपाळाला खरचटलं होतं. शर्ट कोपऱ्यावर फाटला होता. मुलं अजूनही घाबरलेली होती.
ड्युटीवरील कॉन्स्टेबलने खुर्ची पुढे केली.
अनिल यांनी आपले सरकारी ओळखपत्र (आय कार्ड) दाखवले. राज्य शासनात वर्ग-एक अधिकारी. आय कार्ड पाहताच कॉन्स्टेबलने लगेच उभं राहून कडक सलाम ठोकला.
“काय झालं साहेब? “
अनिल यांनी संपूर्ण घटना सांगितली. कॉन्स्टेबलने मान डोलावली.
“हो, दरवाजा बेफिकिरीने उघडणं हा गंभीर प्रकार आहे. तुमची तक्रार लिहून घेतो. “
– – अनिल यांना हायसं वाटलं.
कॉन्स्टेबलने वही उघडली. देशमुखांचे नाव, हुद्दा लिहिला आणि पुढील माहिती विचारू लागला.
“घटना कशी घडली? “
अनिल तपशीलवार सांगू लागले.
– कॉन्स्टेबल लिहीत होता. अचानक त्याने पेन खाली ठेवलं. डोकं वर केलं. आणि शांतपणे विचारलं,
“साहेब, स्कूटरवर कोण कोण होतं? “
“आम्ही चौघे. “
“म्हणजे तुम्ही, पत्नी आणि दोन मुलं? “
“हो. “
कॉन्स्टेबल पुन्हा शांत झाला.
“साहेब, तुमची तक्रार खरी आहे. कार चालकाची चूकही दिसते आहे. “
“मग एफआयआर नोंदवा. “
कॉन्स्टेबल किंचित हसला.
“एफआयआर नोंदवण्याआधी मला आधी एक दुसरी नोंद करावी लागेल. “
“कुठली? “
“चार जणांना दुचाकीवर बसवून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची. “
अनिल गप्प.
कॉन्स्टेबल पुढे म्हणाला,
“तुम्ही स्वतः सरकारी अधिकारी आहात. “
“हो. “
“कायद्याचं ज्ञान आहे? “
“अर्थात. “
“मग दुचाकीवर फक्त दोन जणांना परवानगी असताना चौघे का बसलात? “
… अनिल यांच्या तोंडून शब्द फुटेना. काही क्षण शांतता पसरली.
आत्तापर्यंत त्यांना वाटत होतं की ते फक्त पीडित आहेत. पण आता चित्र वेगळं दिसू लागलं.
– – कार चालकाची बेफिकिरी चुकीची होतीच. पण स्वतःची चूकही ते नाकारू शकत नव्हते.
कॉन्स्टेबल म्हणाला,
“साहेब, कायदा हा फक्त इतरांनी पाळावा म्हणून नसतो. तो सगळ्यांसाठी सारखाच असतो. तुमची तक्रार आम्ही नक्की घेऊ. पण त्याचबरोबर तुमच्यावर झालेल्या नियमभंगाची नोंदही करावी लागेल. “
अनिल काही क्षण खाली मान घालून बसले.
नंतर त्यांनी खोल श्वास घेतला.
“तुम्ही बरोबर आहात. “
कॉन्स्टेबल आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला.
“माझी तक्रार नोंदवा. आणि माझ्यावरचा दंडही करा. “
– – पोलिस स्टेशनबाहेर पडताना अनिल यांच्या मनात अनेक विचार चालले होते.
कार चालकाची चूक त्यांना न्यायालयात सिद्ध करता आली असती.
पण त्या दिवसाने त्यांना आणखी मोठा धडा दिला होता…..
… कायद्याचा आधार मागण्याचा नैतिक अधिकार तेव्हाच मिळतो, जेव्हा आपण स्वतःही तोच कायदा पाळत असतो.
रस्त्यावरची जखम काही दिवसांत भरून निघाली.
… पण त्या दिवसाचा धडा कायमचा मनावर कोरला गेला—
“इतरांच्या चुकीकडे बोट दाखवताना उरलेली तीन बोटं अनेकदा स्वतःकडेच वळलेली असतात. “
जन्माचा किनारा सोडून आयुष्याची नौका पैलतीराकडे मार्गाक्रमण करीत निघते तेंव्हा आपण जिथपर्यंत येऊन ठेपलेलो असतो, तिथून एैलतीर तसा फार दूर आहे, असं वाटत नाही! मध्यावर आलो असता ना अलीकडचा ना पलीकडचा.. कोणताच तीर दृष्टीस पडत नाही.
दिवसांच्या लाटा आपल्याही नकळत पैलतीर गाठण्याच्या तजविजीमध्ये गुंतलेल्या असतात… या जलाशयातला वारा नेहमीच पैलतीराकडे जाण्यासाठी अनुकूल असतो. आपल्या शेजारून, बाजूने आणि पुढे अशा कित्येक नौका निघालेल्या आपण नित्य पाहात असतो… आणि मग मनाच्या खोल तळाशी रुतून बसलेला मरणविचार पृष्ठभागावर येऊ पाहतो… आपणही तिकडेच निघालो आहोत… प्रश्न केवळ काळाचा आहे. एक मरे त्याचा दुजा शोक वाहे.. अकस्मात तोही पुढा जात आहे… ह्या भारांच्या पंक्ती आपण कैकदा ऐकलेल्या, उच्चारलेल्या असतात… त्यांतील एक एक शब्द मन:पटलासमोर येऊन नाचू लागतो.
आता जगण्याच्या काळजीपेक्षा मरण्याची चिंता चित्तास अधिक भिवविते. कुठे जन्म व्हावा, हे सर्वस्वी ईश्वराधीन. पण मग मृत्यूचं ठिकाण तरी आपल्या हाती असावं की नाही? पण हीही सवलत दैवानं मानवाला दिलेली नाही, हेही खरंच. पण अनेक हृदयांचं त्या जन्मदात्या परमेश्वराकडे ही मागणी मात्र असते… जिस जगह पैदा हुए… उस जगह ही निकले दम!
१९६१ मध्ये आलेल्या ‘काबुलीवाला’ या हिंदी चित्रपटात नायकाच्या तोंडी प्रेम धवन यांनी लिहिलेलं आणि सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं मन्ना डे यांच्या आवाजातील एक अजरामर गीत आहे…
… “ऐ मेरे वतन, ऐ मेरे बिछडे चमन… तुझ पे दिल कुर्बान. ” – – या गाण्यात एक ओळ आहे…
छोड़ कर तेरी ज़मीं को दूर आ पहुँचे हैं हम…
फिर भी है ये ही तमन्ना तेरे ज़र्रों की क़सम
हम जहाँ पैदा हुए उस जगह ही निकले दम
ज्या मातीतून आपण उगवलो, त्याच मातीत अंतिमत:मिसळून जाण्याची इच्छा असणं हे माणसाच्या ओल्या मनाचं आणि स्निग्ध काळजाचं एक अतिनाजूक लक्षण म्हणावं. देहातून आत्म्याने प्रस्थान केल्यावर देह कणाकणाने आणि क्षणाक्षणाने मातीशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेत घाईघाईने सहभागी होतो. आणि मग शेवटी उरते ते मातीच. पण ही माती जगात कोणत्या मातीशी एकरूप व्हावी ही इच्छा माणूस का बरं करीत असावा? याचं कारण आहे… प्रत्येक मातीचा गंध, पोत निराळा असतो! मृदगंध बालपणीपासूनच रंध्रारंध्रात पेरला जातो आणि देह व्यापून उरतो.
म्हणूनच रूग्णालयात मृत्यूची प्रतीक्षा करणारा जीव घरी, मुला-बाळांच्या संगतीत शेवटचे क्षण जावेत, असा ध्यास धरतो. व्यवहारातील अडचणी काहीवेळा असं होऊ देत नाहीत. मग किमान अंत्यसंस्कार तरी गावाच्या मातीत व्हावेत, अशी इच्छा निर्माण होते… ही इच्छा काळ, परिस्थिती पूर्णत्वास नेईल की नाही… हे आपल्या हातात नसते!
जन्माला आलेल्या बालकाला जसं आरंभी गर्भातला काळ स्मरत राहतो… तसं म्हातारपणी माणसाचं होत असावं का? आईच्या गर्भात ज्या स्थितीत बाळ तरंगत असतं, अगदी त्याच अवस्थेत मुलं पाय पोटाशी घेऊन, अंगठा तोंडात घेऊन निजलेली दिसतात बरेच दिवस! जन्मभूमीचं असंच आहे का?
कोन्द्रागुंटा महालक्ष्मीअम्मा या आज ९४ वर्षांच्या आहेत. २००१ मध्ये त्या पतीसोबत अमेरिकेत गेल्या आणि तिथले नागरिकत्व घेऊन तिथे स्थिरावल्या. त्यांच्या पतींचे नुकतेच निधन झाले. दोन वर्षांपूर्वी त्या आंध्रप्रदेशातील चिंथागम्पाला या गावी राहायला आल्या आहेत. त्यांनी आता भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे… त्या म्हणतात… माझ्या जीवनाची अखेर आता आली आहे… मला भारतीय म्हणून मरण यावे, अशी माझी अंतिम इच्छा असून माझे अंतिम संस्कार माझ्या गावीच व्हावेत!
माणसाची जगण्याची उर्मी आणि मरणाची इच्छा मानवी भावजगतातील एक अतिशय गुंतागुंतीची भावना आहे… किमान प्रत्येकाची ही अंतिम इच्छा तरी पूर्ण व्हावी! जगण्याच्या विचारापेक्षा मरणाचा विचार आपल्या संस्कृतीत खूप गांभीर्याने केला जातो, हे खरेच!
श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशीवट हो
मेरा सांवरा निकट हो, जब प्राण तन से निकले… ही मागणी सुद्धा त्यामुळेच मनाला भावते!
सर्व माझ्याच ताब्यात राहिलं पाहिजे. हा विचार बरोबर आहे का? Life is like a Relay Race.
ताईने आपला संसार छान सांभाळला. आधी सासूबाईंच्या तालमीत, नंतर स्वतंत्र. आजच्या पन्नास वर्षांपूर्वी जेमतेम पगार, एका परिवारात चार मुलं असणे सामान्य गोष्ट होती. काही काही तर संयुक्त परिवार, बरोबर गावातून आलेला एखादा चुलत / मामे भाऊ घरात असणे ही सहज घडणारी/ दिसणारी गोष्ट असे.
काही उच्चभ्रू परिवारात पंडित स्वयंपाक करायला असे. बाकी सर्व मिडिल क्लास काम घरी करत असत. फोन करून येणे अशी पद्धत नव्हतीच. फोन नव्हतेच. एवढी औपचारिकता नव्हती. आलेला पाहुणा जेवूनच जाणार. असा अलिखित नियमच होता.
ताईने लग्नानंतर अशाच परिवारात सुरुवातीचे बरीच वर्ष काढली. घरात हळुहळु मुल मोठी झाली, नोकरीला लागली।, सर्वांनी आपापली घर घेतली.
एका सरळरेषेत आयुष्याची पन्नास वर्षे संपली. त्यातील नंतरचा काळ म्हणजे तर ताई साठी हम करे सो कायदा असा होता.
आधी सासूबाईंचा, नंतर स्वतःच्या घरात ताईचा. असा हिशेब होता.
ताई ला दोन्ही मुलगेच.
घरी ताईला जे ठीक वाटेल, जे आवडेल, जस माहित असेल, ते ती करणार. तिला का? कशाला? अस का नाही, तसच का? असे प्रश्न विचारणारे कोणी नव्हतेच. सासूबाईंच्या राज्यात ज्या काही इच्छा राहून गेल्या होत्या, त्या पूर्ण करायचा चांन्स मिळाला होता.
आता तर एका हाती कारभार. One in all. सर्व Deparments ताईच्या हातात. तिच्याच ताब्यात. एका हाती पूर्ण राज्य.
घर व्यवस्थित चालू होत. ताईबाई खूष होत्या.
आता मोठ्या मुलाचे लग्न झाल. सून घरात आली.
पुन्हा दोन बायका घरात. आणि मुख्य म्हणजे अनितालाही स्वयंपाक करण्याची भयंकर आवड. आजच्या काळात ऐकायला थोडी विशेषच गोष्ट आहे ही नाही का? . पण अनिताला नोकरी करून घरकामाची आवड.
खरतर ताईसाठी ही आनंदाची गोष्ट असायला हवी, पण तस घडत नव्हत.
ताईची अस्वस्थ्यता भाऊजीं च्या लक्षात येत होती, पण exactly कारण कळत नव्हत.
आज अनिता आॅफिस ला गेल्यानंतर लगेचच ताई उठली आणि…
भराभरा स्वयंपाक घरात जाऊन बडबड करत काही तरी आवरा आवरी करत होती. हे सामान इथे ठेव ते तिथे, हे पूस, ते पूस. भाऊजी दरवाज्यात ऊभे राहून सर्व ऐकत होते बघत होते..
भाऊंजीनी विचारल… काय झाल?
तुला अनिताच काम आवडलेल दिसत नाहिये. खूप पसारा होता का?
चहाच्या डब्याच्या जागेवर साखरेचा डबा ठेवला का? आपल्या या लहानशा स्वयंपाक घरात असा काय तो किती बदल होईल ग?
एवढ बडबड करण्यासारख काही झाल आहे, अस मला वाटत नाही.
अग!! परवाच तू सांगत होती ना त्या कुलकर्णीं च्या घरची गोष्ट, की त्यांची सून अजिबात काही काम करत नाही. सारख बाहेरून मागवत असते. स्विगी आणि झोमॅटो त्यांच्या दाराशी उभेच असतात. आता तुझी सुन काम करते तरी बडबड. म्हणजे काहीच तर पटत नाही तुम्हा बायकांना.
तुझे काम एकदम perfect असत. हे तूझ तुच ठरवलय. कारण आम्ही कधी तुझ्या मध्ये आलोच नाही.
अर्थात तुला या स्वयंपाक घराची सवय आहे. वस्तुंना जागेवर ठेवण तुझ्या सवयीत आहे. तुझ्या कामाची एक पध्दत आहे. आतापर्यंत त्यात कधी ढवळाढवळ झाली नाही. कारण आपल्याला मुलगी नाही.
आणि आता जी आली आहे, ती तुझ्या लाडक्याची लाडकी आहे.
अग! एवढ्या लहान सहान गोष्टींवर लक्ष देऊ नको. स्वतः चे मनस्वास्थ्य आणि घरचे वातावरण जपायची जबाबदारी आपली आहे. आता पूढे अशी अनेक वळण येतील, जेंव्हा आपल्याला संयम ठेवण गरजेचे असेल. नवीन जनरेशन ची विचारसरणी आणि आपली, मॅच होण कठीण काम आहे.
अनिताला घरची ओढ आहे, कामाची आवड आहे, मुख्य म्हणजे स्वयंपाकघरात रमते ती.
करू दे ना तिला.
सुन आणायला एवढी उत्सुक होतीस ना तू. आता नवीन बदल accept कर.
तुमच्यात स्पर्धा थोडी आहे.
Life does not always go in straight line.
Accept Change.
तू तर तुझ्याच घरात आहेस, अनिताला तर सगळच नवीन आहे.
Stop axepcting and start accepting.
अग! No one is Perfect, that is why pencils have erasers.
Don’t complaint just rebuild your life.
एक हाथ पूढे करून तर बघ.
मला भाऊजींच नेहमीच कौतुक वाटत. एकतर लक्ष असत. प्रोब्लेम समोर दिसला की दुर्लक्ष न करता वेळेवर स्पष्ट पण सौम्य शब्दात बोलून ते समोरच्या व्यक्तीच्या लक्षात आणून देतात.
आजही ताईच वागण म्हणजे पूढे उद्भवणार्या अनेक प्रश्नांची सुरवातच होती. एकदा का *धुसफूस* वाढली की ती कोणत्या स्तरा पर्यंत जाईल सांगता येत नाही. म्हणून वेळेवर इलाज व्हायलाच हवा.
भाऊजी म्हणाले,… अग! Life is a. Relay Race.
आता अनिताच्या हातात झेंडा दे.
ताईला भाऊजींचे म्हणण नेहमी पटतच अस नाही. पण तिला हे माहित आहे की चूक गोष्टीत ते साथ कधीच देत नाही. हे नक्की.
आज अजय अनिता आॅफिस मधून घरी आले. आम्ही तीन दिवसांसाठी महाबळेश्वरला जातोय. अस म्हणाले.
अनिता म्हणाली,.. आई! ही नाटकाची तिकट ठेवा. उद्या दुपारी आहे.
आणि दोन दिवस तुम्ही घरी स्वयंपाक करायचा नाही.. मी तुमच्या आणि बाबांच्या आवडीचे जेवण online पाठवणार आहे.
दोन दिवस ड्राइवरला यायला सांगितले आहे. दोघे फिरायला जा. तुम्ही पण ब्रेक घ्या.
खरच नवीन जनरेशन वेगळाच विचार करते. आज तर अनिताने winning six च मारला. *
ताई बघतच राहीली.
भाऊजी गालातल्या गालात हसत होते.
खरय
You can not have one foot in old life and one foot in new life.
☆ ‘फक्त वधू आणि पालक मेळावा…’ ☆ राधिका -माजगावकर- पंडित ☆
सामाजिक कार्य करण्याची उर्मी मनात होती. एकटेपण खायला उठत होतं. भला मोठा बंगला माझ्या नावावर असला तरी, ह्या मोठ्या वास्तूत मी एकटीच होते. निसर्ग सौंदर्य न्याहळत, वाफाळता चहा घेऊन पेपर चाळतांना नेहमीची सदरे बघितली. रोज येणारी वधु वर सूचक मेळाव्याची जाहीरात लक्ष वेधून घेत होती. पूर्वी वडिलधारी माणसं म्हणायची परमेश्वराने जन्माआधीच लग्नाच्या जोड्या ठरवलेल्या असतात. पण ह्या घडीला परमेश्वरी संकेतापेक्षाही जबरदस्त असलेली, मुला मुलींच्या अपेक्षांची गाडी पुढे सरकतचं नव्हती. मुलांपेक्षाही मुलींच्या अपेक्षांचा पारडं वरचढ होतं.
मी विचार केला त्यांनाही स्वतंत्र मतं आहेतं, त्यांची बाजू ऐकून घेऊन ब्रेन वॉश करणारी कुणी तरी समंजस व्यक्तीची आत्ता, आवश्यकता आहे.
माझ्या रिकाम्या मनात सैतानाला घुसवण्यापेक्षा सामोपचाराच्या विचारांना मी आव्हान केलं, आणि कल्पना डोक्यात शिरली आपण वेगळं काहीतरी करायचं. ईतरांनी वधू वर सूचक मंडळ काढलय नां, आपण वधू पालक सूचक मंडळ काढायचं.
झटपट पाटी लावली. पटापट् आई-वडील आणि कन्या, माझी वेगळी पाटी वाचून हजेरी लावू लागलं. माझ्या रिक्त, उदास मनात उत्साहाचं वारं वाहू लागलं.
आणि काय सांगू तुम्हाला,! बोलबोलता माझा हॉल गजबजला. मेळाव्यात सगळे जण हजर झाले.
त्यातली धीट दामिनी बोलायला उभी राहयली. तिला मी विसाव्या वर्षी बघितलं होतं त्या वयातलं कोवळेपण हरपून ती राकट वाटली मला. बरोबर आहे हो! आता ती 35 च्या उंबरठ्यावर उभी होती.
भरपूर आत्मविश्वास थोडासा गर्विष्ठपणा, बोलण्यातील परखड भाषा आणि अहंकार शब्दातून जाणवत होता.
तिच्या आई-बाबांना मी म्हणाले, “आपण ही मीटिंग खाजगी न ठेवता अगदी खुल्या दिलानें खुलऊया. काही तुमचं काही आमचंचा मध्य साधून मुला-मुलींची गाडी रुळावर आणून मार्गाला लावायचीय आपल्याला. व्यक्तीस्वातंत्रिय स्वतंत्र् जगात आपण या मुलींच्या विचाराला, त्यांच्या मताला प्राधान्य देऊया. त्यांची गाडी रुळावरून घसरायला लागली तर आहोतच की आपण आपलं अनुभवाचं निशाण फडकवायला. हो ना?
माझा मिस्कील प्रश्न ऐकून हॉलभर हास्याची लकेर उमटली.
संवादाची सुरुवातच मोकळ्या मनाने झाली होती. पालकांच्या आणि बालिकेंच्याही चेहऱ्यावर खुशीची पावती उमटली.
पालकांकडे वळून मी म्हणाले, “दादा मला असं सांगा, वाढतं वय लक्षात घेता आपल्या मुला-मुलींच्या लग्नाला उशीर होतोय असं नाही का वाटत तुम्हाला?
चारी बाजूंनी एकदम कोरस उत्तर आलं, “आम्हाला खूप वाटतंय हो, आत्ताच मुलींनी तयारी दाखवावी. तशी पैशाची तयारी पणआम्ही केली आहे. फिक्स डिपॉझिट तर मुलींच्या जन्मापासूनच, म्हणजे लग्नाच्या वेळेला, तिच्या 21व्या वर्षी मिळावं, अशी पुढची तरतूद आम्ही केव्हाच करून ठेवलीय पण आता तर हीने पस्तीशी गाठलीय. शिक्षण, अपेक्षा, गुणमिलन कशा कशाचा मेळचं बसत नाहीय्ये. नको इतकं व्यक्ती स्वातंत्र्य मिळाल्यामुळे ही पिढी आमच्या डोक्यावर बसून आम्हालाच गप्प करतेय. ऐलतीर ना पैलतीर असं या पोरांचं भविष्य डोळ्यासमोर आणताना आमचे डोक्यावरचे केस काळजीनें, आत्ताच पांढरे झालेत. आमची वय वाढताहेत, आमची आयुष्याची होडी पैलतीराकडे जाण्याच्या मार्गावर आहे. त्याआधी ही मुलं मुली मार्गाला लागली तर बरं होईल हो!
एक अगतिक पिता पोटतिडीकेनी बोलत होता त्यांचं कन्यारत्न फणकारून म्हणालं, ” एवढं काय बाबा! करू की, करणारच आहोत आम्ही वेळ आल्यावर लग्न”.
तिच्या ताठ्यातल्या उत्तराने मला तिलाच प्रश्न विचारावासा वाटला, “अगं महाभागे! मग ती वेळ कधी येणार आहे? चाळीशी उलटल्यानंतर भविष्याचा सगळं गणितच चुकेल, ” मनाला आवर घालून मी तिला शान्त करत म्हणाले, “मला एक सांग तुम्ही लग्नाचं वय कां वाढवता आहात? काही कारण? की काही अपेक्षा? आता मात्र मुलींच्या घोळक्यातल्या म्होरक्या म्हणजे नीलांबरीने पुढे होऊन उत्तर दिलं, “हो मॅडम आहेतच मुळी आमच्या मागण्या आणि अपेक्षा. तेवढं स्वातंत्र्य आम्हाला लहानपणापासूनच मिळालय. आमची मतं मांडण्याचा, स्वतंत्रपणे वागण्याचा आम्हाला हक्क आणि अधिकार आहेचं. तुमच्या आधीच्या पिढीने दबाव आणून तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य आढ्याला टांगलं. मन मारून इच्छेविरुद्ध तुम्हीही ते स्विकारलंत पण आम्ही नाही सहन करणार. आम्ही आमच्या मनाप्रमाणे मुक्तस्वच्छंद आयुष्य जगणार. आम्हालाही अपेक्षा आहेतच की आणि कां नसाव्या? नीलांबरीच्या लाह्या ताड्ताड् फुटत होत्या. तिचं बघून शर्मिलालाही स्फुरण चढलं, ती म्हणाली, “मॅडम पूर्वी हुंडाबळी, सासुरवास एकत्र कुटुंबात मन मारून राहणं, आणि मोठ्या माणसांनी ठरवलेल्या मुलाला माळ घालणं हे असलं सगळं, इच्छा मारून केलं जात होतं, त्यावेळच्या लग्नाच्या मुलींनी ते सहनं केलं. पण आम्ही नाही ते सहनकरणार. आमच्या अपेक्षा मत मांडण्याचा हक्कच आहे आम्हाला”.
मुलींचं आवेशाचं बोलणं, पालक हताशपणे ऐकत होते.
काही वेळेला सोनाराने कान टोचलेलेचं चांगले असतात. म्हणूनच मी ह्या उपक्रमाचा श्रीगणेशा करायचं ठरवलं होतं. मुली तशा प्रेमळ होत्या पण तितक्याच आक्रमकही होत्या. मी विचारलं, ” सांगा बरं! काय आहेतं तुमच्या अपेक्षा?
गलका वाढला पण मी एकावेळी एकेकीलाच बोलायची संधी दिली. समीरा म्हणाली, “आमची पहिली अट, मुलाला पगार चांगला हवा. तो स्मार्ट हवा. व्हेज नॉनव्हेज खाण्यापिण्यात, पार्टीत सराईतपणे वावरणारा आणि आम्हालाही संशयाचं भूत मानेवर न ठेवता वावरू देणारा हवा. अशी कां वागलीस?
असं कां? असा कां कशाला? असे प्रश्न विचारणारा गावठी मुलगा नसावा. तो बिनापाश असावा. ”
तिचा धबधबा मध्ये थांबवत मी म्हणाले, “बिनापाश म्हणजे काय गं? ह्याचा अर्थ मला सांगशील?
मॅडम बिनापाश म्हणजे त्याच्याजवळ त्याचे आई-वडील, बहिण भाऊ आजीआजोबा इतर नातेवाईक कोणीच नकोत. आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य हवय”.
तिला अडवत मी म्हणाले, विभक्त कुटुंबामुळे एकत्र कुटुंब पद्धती पार लयाला गेलीय आम्ही सासरची आजेसासूबाई, आतेसासुबाई अशी पण नाती जपली आहेत त्यांचा आशीर्वाद दुवा अजूनही आम्हाला मिळतोय. आजचे सासू-सासरे खूप समंजस आहेत. सासुरवास हा शब्द अगदी कडेपार झालाय त्यामुळे हवं तिथे हवं तेव्हा जाण्या येण्याची, करण्याची तुमच्या हक्काची जाणीव त्यांना आहे तशी मोकळीकही तुम्हाला मिळाली आहे आयुष्याच्या संध्याकाळी तुमची सोबत त्यांना हवी असते तुमचं वय झाल्यावर तुमच्यावरही अशी वेळ येणार आहे. मुलांसाठी आयुष्य वेचलयं त्यांनी. मग ती कां नकोत त्यांनी कुठे जायचं?
उद्धट नीलिमा म्हणाली, “आहेत की वृद्धाश्रम तिथे आनंदात रहाव यांनी. मुलांच्या संसारात कशाला हवी आहे त्यांची लुडबुड?
“हो वृद्धाश्रम गल्लोगल्ली आहेत पण तिथे रक्ताची माणसं नाहीत. आधाराची मायेची सावली देणारी घरटी नाहीत. तडजोड मोठ्यांनी पण करायला हवी. हे मान्य आहे. एकमेकात सुसंवाद असले तर वादाला प्रवेशच नसतो
आणि बरका नीलिमा तुम्ही मुलांसमोर चांगल्या वातावरणाचा एकमेकांना समजून घेण्याचा आदर्श ठेवलात की तुमच्या म्हातारपणी तुमचं जीवनही सुखाचं होईल. तुमच्या अपेक्षा कळतात मला. कारण पूर्वी पुरुषप्रधान संस्कृती होती, हुकूमत होती पण आता तसं नाहीये. पालक मंडळी पण सुधारक आधुनिक विचारांची झाली आहेत. तेही तुमचे मित्र व्हायला तयार आहेत. पण कुठल्याही विचारांचा अतिरेक नसावा. काही तुझं काही माझं अशी सामोपचाराची भाषा सगळ्यांचाच आनंद वाढवते. तशा दृष्टीने तुम्ही सुवर्णमध्ये साधून आई-वडिलांचा मानसिक भार हलका करावा असं मला वाटतं समृद्धी म्हणाली, “करू की आम्ही लग्न पण..
तिलाअडवत मी म्हणाले, “समृद्धी हे बघ बाळ करायचं आहे लग्न तर मग हा पण कशाला? 45 व्या वर्षी लग्न त्यानंतर मुलंबाळं, नैसर्गिक दृष्ट्या स्रिची शारीरिक क्षमता नंतर कमी होते. तुम्ही तुमची मुलं वाढवताना त्यांचं शिक्षण पूर्ण करता करता थकून जाणार. मनाची उमेद असली तरी शरीर साथ द्यायला नकार देणारचं “
अनुजा बोट नाचवत म्हणाली, “पण मॅडम आम्ही लग्नच नाही केलं तर कशाला हवीय ही भानगड आणि लग्नाची बेडी?
तिला प्रेमाने समजावत मी म्हणाले, “अनुजा तुझ्या आई बाबांकडे बघ तुझ्या काळजीने ते आत्ताच थकलेत. तुला चांगला जोडीदार मिळालाय, तुझं लग्न होऊन तुझा संसार सुखाचा चाललाय हे बघून तेही कृतार्थ होतील कर्तव्यपूर्तीचा आनंद त्यांनाही मिळेल
आपलंच घोडं पुढं दामटत ती म्हणाली, ” पण मग त्यासाठी लग्नचं कशाला करायला हवं? आम्ही एकट्याही राहू शकतो की. हे लग्नाचं बंधन कशाला?
मान्य आहे मला, तेवढ्या तुम्ही धीटही आहात, कमावत्याही आहात पण सगळ्याच गोष्टी पैशानी होत नाहीत आत्ता तारुण्याची उर्मी आहे पण कधीतरी एकटेपणा बोचायलाच लागतो. वडीलकीच्या नात्याने आणि अनुभवानी सांगते आयुष्याच्या संध्याकाळी सोबतीची गरज असते. म्हातारपण अटळच आहे तेव्हा हातपाय थकणारच शेवटी शरीर आहे हे, कुठलातरी आजार, अपंगत्व शरीराला आणि मनाला येणारच. पण मग तेव्हा वेळ निघून गेलेली असेल शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही कमकुवत झालेल्या असणार अशावेळी आई-वडीलही दूरच्या प्रवासाला गेलेले असतात. म्हणूनच वेळीच सुखदुःखाला साथ देण्यासाठी, एकमेकांना आधार देण्यासाठी नवऱ्यासारखा जवळचा मित्र दुसरा कुणीच नसतो
“पण हा विचार मुलांनी पण करायला हवाय. “अधिरानी अधिरपणे, मुद्दा मांडला. तिला साथ देताना मी म्हणाले, ” अर्थातच संसार दोघांचा आहे तडजोड हा कानमंत्र दोघांनीही सांभाळायला हवा. फक्त दुसऱ्याकडून अपेक्षा न ठेवता सुवर्णमध्य साधावा लागतो. तरच आयुष्याचं गणित सोप्प होतं. तुम्हाला सल्ला देताना, विचारांच्या दोन टोकांची जुळवणी करताना आम्ही पण सगळ्या बाजूने विचार करायला हवा हे मान्य आहे मला. पुढच्या वेळी आपण मुलांना आणि त्यांच्या पालकांना पण बोलवूया. म्हणजे त्यांचेही विचार आपल्याला कळतील. ” माझ्या विचारांच स्वागत झालं आणि भरभरून होकार मिळाला.
वेळ संपत आली. मुलींच्या चेहऱ्यावर सकारात्मक विचारचक्र सुरू झाली होती. ती बघून आई-वडिलांच्या चेहऱ्यावर सोनाराकडून कान टोचले गेल्यामुळे समाधान दिसत होतं. मलाही, हा आगळावेगळा मेळावा घेतल्याचा आनंद झाला. सामंज्यसतेचा निम्मा गड तर, ‘सर’ झाला होता. आता लवकरच मला वधू पालक मेळाव्याच्या ह्या मैत्रीमुळे मुला मुलींच्या विचारात नक्कीच बदल होईल आणि लवकरच त्यांच्या लग्नाची आमंत्रणे येतील अशी आशा करते.
तर मैत्रिणींनो आता भेटूया पुढच्या मेळाव्यात. तोपर्यंत तुम्हाला राम राम.. जय श्री साई राम
☆ “पुस्तक म्हणजे काय गं आई?” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
पुस्तक म्हणजे काय गं आई?
अरे पुस्तक हे गुरू असतात
म्हणजे माझे टिचर का गं आई?
नाही रे पुस्तक हेच टिचर असतात. पण हे टिचर कोणीतरी अनुभवातून लिहून ठेवलेले ज्ञान देत असतात. ज्ञान देणारे लिखीत टिचर म्हणजे पुस्तक!!
म्हणजे आपले NEWS PAPER का गं आई?
अरे अरे तसे नाही. NEWS PAPER आजूबाजूला जे घडलेले असते ते सांगत असते. पण पुस्तक म्हणजे तुम्ही शाळा शिकताना तुमच्या वेगवेगळ्या विषयाची माहिती एकत्रीत असते त्यातून बघून टिचर तुम्हाला शिकवतात ना ते म्हणजे पुस्तक!!!
म्हणजे टिचरचा लॅपटॉप का गं आई?
अरे बाबा ते पण नाही!! कसे सांगू तुला? अरे पुस्तक म्हणजे अशी गोष्ट आहे जी बघून तुम्ही शिकत असता केव्हाही कशीही कोणतीही माहिती पाहिजे असेल तर त्या त्या विषयीची लिहिलेली माहिती तुम्हाला देत असते.
म्हणजे टिचरचा स्मार्ट फोन का गं आई?
अरे बाबा तुझ्यापुढे तर मी आता हातच टेकले. कसं सांगू तुला? पुस्तक ••• पुस्तक•••म्हणजे बुक बुक•••
अगं आई तेच की मग. टिचरच्या स्मार्ट फोन मधे eBook असते त्यातूनच तर आम्ही learn करतो ना?
अरे राजा ते नाही रेऽऽऽऽऽ
आईने बरीच शोधाशोध करून रद्दीतून एक पुस्तक काढून आणले आणि दाखवले. बघ बाळा याला म्हणतात पुस्तक•••
ईऽऽऽऽऽऽऽ असले पुस्तक? किती हेवी ना? असले घेऊन फिरायचे? यातून रीड करायचे? त्यापेक्षा माझा मोबाईलच चांगलाय की. काही वजन नको ओझं नको आणि कॅरी करायला इझी. शोधायला इझी रिफर करायला इझी.
अरे बाळा पण अशी पुस्तके हे वैभव असतात. पिढ्यानुपिढ्या हा खजिना राहू शकतो.
आई राहू दे गं तुझा मोठेपणा तुझ्यापाशीच. तुम्ही पुस्तक पुस्तक केलं आणी आता पुस्तक डे साजरा करता. आता आम्ही पण मोबाईल डे साजरा करणार!!
काय करायचं? हा प्रश्नच असला तरी बदलणार्या युगातही पुस्तक दिनाच्या शुभेच्छा!!
☆ भेटी वेगवेगळ्या.. पण आयुष्य बदलवणाऱ्या… ☆ शीला पतकी☆
☆
भेट देणे भेट घेणे पहिली भेट शेवटची भेट ऊरा ऊरी भेटणे परमेश्वराला! हल्ली मिळणे या शब्दाला सर्रास.. मला पेन भेटला असं म्हणतात. ते भेटणे. लग्नामध्ये भेट बकरा… कदाचित हा शब्द काही वेगळा असावा… तिथे सर्व नातेवाईकांच्या गाठीभेटी होतात ते भेट ठीक आहे पण बकरा काय माहित नाही तो विडंबित बेड सुद्धा झाला आहे.. भेटीत तृष्टता मोठी ते वेगळच.. ती तृष्ठाता ऋणानुबंधाच्या गाठीशी संबंधित आहे…
मतदार संघात भेटीगाठीवर भर देण्यात आला ते प्रकरण वेगळे आहे तिथल्या भेटींना वेगळा अर्थ आहे. विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांना भेटले.. त्यांची बंद खोलीत भेट झाली हे वेगळच आहे इथे सगळे राजकारणच बदलतं…!
व्यावसायिक भेट तिथे करार ठरतात. वेळेवर डॉक्टर भेटले म्हणून तो वाचला या भेटीला तर वेगळाच अर्थ आणि अनन्य साधारण महत्त्व आहे.
हल्ली सर्वात चर्चेचा विषय पंतप्रधान, ट्रम्प तात्यांना भेटले… जागतिक खळबळ सुरू होते… खळबळजनक भेट…
अहो कुणीतरी आपल्याला भेटायला आले आहे आनंददायी घटना असते किंवा हल्ली कोणी येतच नाही किंवा फोन येतो मी भेटायला येऊ का वेळ घेऊन येणारे शिस्तबद्ध लोक… इकडून चाललो होतो म्हणलं भेटून जाऊ… संधी साधू माणसं. आवर्जून भेटायला आले आदर आणि प्रेम! परमेश्वरा कंटाळा आला एकदाचाये खाली भेट मला… वैतागल्यावर येणारे वाक्य!
भरत भेट… हा तर लहानपणापासून कोरला गेलेला धडा कारण रामाची त्याच्याशी भेट झाल्यावर रामाच्या पादुका डोक्यावर घेऊन तो आपल्या गावी गेला आणि त्या सिंहासनावर ठेवून त्याने 14 वर्षे राज्य केले हा भेटीतला व बंधू प्रेमाचा आदर्श.
रिकामे ढग दिसले की धरती फाटून जाते तिला ओढ लागते त्याच्या भेटीची… साहित्यिक भेट…! म्हणजे दुष्काळ पडणार पण डायरेक्ट सांगत नाहीत.
बापाबरोबर जन्मभर राहिलो
बाप कधीच भेटला नाही
तो गेल्यावर कळलं
माझ्याशिवाय कोणासाठीच तो आयुष्यभर झटला नाही…!
नवकवींची काव्यमय भेट
येथे सागरा धरणी मिळते
तेथे तुझी मी वाट पाहते.
गुगल मीट म्हणजे पत्ता!
दोन ओंडक्यांची होते भेट सागरात एक लाटतोडी दोघा पुन्हा नाही भेट
तत्वज्ञानी भेट!
के की मुसाची चाळीसगाव स्टेशन वरची भेट आपल्या प्रेयसी साठी रोज दोन माणसांचा स्वयंपाक करून तिच्यासाठी गुच्छ तयार करून येऊन एका विशिष्ट गाडीची वाट पाहत भेटीची अपेक्षा करणारा केकी… भारतातील महान चित्रकार ज्याची आपल्या प्रेयसीची कधीच भेट झाली नाही ही सत्य कथा आहे… ती हळवी भेट!
पंडित जवाहरलाल नेहरू आपली पत्नी कमला नेहरू हिला टी बी झाल्यामुळे शेवटच्या आठ वर्ष भेटले नाहीत त्यांचा अंतिम संस्कार सुभाष चंद्र बोस यांनी केला अत्यंत संताप जनक… न झालेली भेट
शबरीची रामाची झालेली भेट अपारंपार भक्ती आणि भक्तीची खात्री असलेली भेट याला श्रद्धा म्हणतात ही श्रद्धा भेट आहे.
रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांची भेट… तरुणांमध्ये भारतीय विचार रुजवणाऱ्या महान वैचारिक वारशाची भेट!
जंगलातल्या ओसाड आश्रमाशी आल्यावर तिथे पडलेल्या शिलेला स्पर्श होताच अहल्या शाप मुक्त झाली ती राम भेट शाप मुक्तीची भेट आहे.
सावकार बापान ऋणमुक्तीसाठी लग्न करून आणलेली सून शोभण्याचा वयाची मुलगी… तो हाक मारतो आई… आणि मान वर करून पाहतो ती त्याचे प्रेयसी असते… शारदा सिनेमातील मीनाकुमारी, राज कपूर यांची भेट… तत्कालीन समाज व्यवस्थेवर कोरडे ओढणारी… महिलांवर अन्याय करणारी… मीनाकुमारी अगतिक पण निश्चयी नजर आणि राज कपूर ची धक्का बसलेली असाह्य दृष्टी दिग्दर्शकाची कमाल दाखवणारी भेट!
अशा असंख्य भेटी आजही स्मरणात आहेत. कितीतरी लिहिता येईल पण कामवाली आली आहे ती पुन्हा भेटत नाही ना… म्हणून लेखणीला विराम..
… “जोडीदाराला आयुष्यभर साथ देणारी पत्नी म्हणजे आदिशक्तीच नाही का ??”
आज बऱ्याच वर्षांनंतर माझी मैत्रिण ‘रिया’ भेटली. मधल्या काळात कधी तरी फोन वर बोलणं होतं असे. जून्या आठवणी ताज्या झाल्या. माझ्या चेहऱ्यावर चे भाव बघून ती लगेच म्हणालीच, “ओळखलं नाहीस ना मला. “
अग !! मी पण तुला ओळखल नाही, आम्ही दोघी मनमोकळेपणाने हसलो.
दोघींमध्ये आमूलाग्र बदल झाला होता. क्षणभर व्यक्तिमत्वांची अदलाबदल झाली की काय ?? असं वाटलं
रियाला बघून, “हीच का ती स्टाइलिश रिया जाधव ?? “असा प्रश्न मनात आला.
त्यावेळेस आमच्या मैत्रिणींमध्ये ‘रिया ‘ म्हणजे सर्वात स्टायलिश, स्वतः भोवती गरगर फिरणारी. फॅशन, योग, जॉगिंग, फिटनेस, प्रोटीन शेक, diet यावर लक्ष देणारी. त्यातच ‘चेरी ऑन केक ‘म्हणजे छान इंग्लिश बोलणारी. आमच्या सगळ्यांच्या मध्ये वेगळीच उठून दिसणारी. आमच्याच वयाची असली तरी सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असायची ती. कधी कधी हेवाही वाटायचा.
प्रत्येक भेटीत तिचा काही तरी नवीन फंडा असायचा. आता काय म्हणे ?? मी पहाटे चारला उठते व व्यायाम करते.
आता काय तर, मी प्रत्येक वार प्रमाणे त्या त्या रंगाचे कपडे घालते. म्हणजे सोमवारी पांढरा तर गुरवारी पिवळा. शनिवारी काळया रंगाचा ड्रेस घालणार. रंग तोच असला तरी प्रत्येक वारी ड्रेस वेगळा असायचा. आमच्या गृप मध्ये रिया म्हणजे सर्वात स्मार्ट, वेगळीच दिसायची. तिचा ड्रेसिंग सेन्स खूप छान. व ती स्वतःला छान कॅरी करायची. एकदम ” smart impressive, fashionable, modern ” वजनावर कटाक्षाने लक्ष देणारी. तिला बघून असं वाटायचं जीवन जगावं तर असं.
स्वतः जशी टिपटॉप रहायची, तसंच तिच घरही असायचं. घर व इतर गोष्टी चां बॅलन्स तिला छान सांभाळता यायचा. मला तिचं नेहमीच कौतुक वाटायचं.
सर्व गोष्टींची एकानंतर एक आठवण आली. फॅशनमध्ये आम्ही कोणी तिच्या जवळपास ही नसायचो. खास करून मी तर अजिबात नव्हतेच.
तिच्या नवनवीन गोष्टी ऐकुन मला आश्चर्यच वाटायचे, आपल्याला कसं काहीच सुचत नाही, जमतं नाही. आपण घर, स्वयंपाक, मुल, त्यांचे डबे, परीक्षा, नवऱ्याची काळजी यातच गुंतलेलो असतो.
यातले एखादे काम कमी केले तर वेळ मिळेल का ? ? खरंतर मी अगदी चारला पहाटे वगैरे काही उठू शकत नाही, हे मला नक्की माहित होतं. पण गुरवारी पिवळी साडी किंवा ड्रेस घालणे ही साधी गोष्ट ही आपल्याला जमत नाही. मला तिच्या सारखं रहावं, फॅशन करावी असं वाटायचं, पण जमायच नाही. मनात खूप विचार यायचे. आपण बरोबर की चूक ? याचा गुंता सोडविण्यात मी बिझी असायचे.
जसं फोन मध्ये अनावश्यक डेटा सेव्ह झाला की फोन कसा हॅन्ग होतो ना, तसंच काहीसं माझ्या मनाचं व्हायच. आपल्याच वेळापत्रकाची उलट सुलट तपासणी करत रहायची. फॅशन तर काही कधी जमली नाही पण डिस्टर्ब मात्र नक्की व्हायची. कधी अगदी खूप ठरवून काही केलं तर बरं दिसतय का ?? लिपस्टिक खूप डार्क लावलं का ?? असंही वाटतं रहायचं. म्हणजे आत्मविश्वास असा नव्हताच.
फॅशन करायला एकतर मनापासून आवड असावी लागते, ती समज, तो सेन्स असावा लागतो. फॅशन तुमच्या पर्सनालिटी ला साजेशी असावी लागते. प्रसंगानुरूप, वेळेनुसार कपड्यांची, रंगाची निवड करता आली पाहिजे. फॅशन म्हणजे काही दुसऱ्यांची काॅपी करायची गोष्ट नाही. हे सर्व कळत होतं. तरी सुप्त इच्छा मात्र होती. रिया सारख कोणाला बघीतल की ती इच्छा पुन्हा पुन्हा जागृत व्हायची.
वयाप्रमाणे सर्व च बदलत गेले. मुलं मोठी झाली. अनघा कॉलेज मध्ये जाऊ लागली. अनघाला छान सुंदर तयार झालेलं बघताना मला छान वाटायचे. तिने खूप स्मार्ट रहाव असं मला नेहमी वाटायचे. माझी अपूर्ण इच्छा अनघा पूर्ण करत होती.
एकदिवस अनघा म्हणाली, आई !! माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या, “तुझी आई छान दिसते. She is very well maintained and looks young. “
आई तुझा व्यायाम व योग वर्ग बंद करू नकोस हं. अशीच छान रहा.
बाबा लगेच म्हणाले, अगं !!! अनघा एकदा आईला बाजारात घेऊन जा. तिच्या personality ला साजेसे नवीन कपडे घे. गरज वाटल्यास प्रोफेशनल हेल्प घे. तिलाही खूप आवड आहे या सर्वांची.
ब्युटिशियन ‘ मालविका ‘. अनघाची मैत्रिणी ने माझे ‘makeover ‘करून दिले. माझा हेअर कट केला. म्हणाली,
काकू हा ‘ salt n paper hair cut ‘ तुम्हाला छान दिसतोय. वेगवेगळे comfortable dresses घेतले. , make up चे प्रशिक्षण दिले. थोडक्यात मी पण फॅशन जगात / संस्थेत प्रवेश घेतला.
आपल्या वयाची मर्यादा सांभाळून मी पण उत्साहाने नवनवीन कल्पना आत्मसात करत होते. आता बऱ्यापैकी समाधान ही झाले आहे. स्वतः ला बदलणे म्हणजे आपल्या’ comfort zone ‘ मधून थोडे बाहेर निघावे लागते. हे कळले.
आता,
काकू छान दिसताय. हेअर कट छान दिसतोय. असे रिमार्क मिळताहेत.
चला, उशिरा का होईना, एक इच्छा पूर्ण झाली.
आज रिया पण म्हणाली, अग !! छान दिसतेस. Very Smart.
पूढे रिया म्हणाली, एक जमाना था, ” When I was very perticular about my looks. “
मधल्या काळात आयुष्याने एवढे रंग दाखविले की, आता रंगांचे तारतम्य विसरलेच बघ मी. रिया म्हणाली
रिया ची मुलगी ऋतुजा म्हणाली,
“मावशी !!! मागची पूर्ण बारा वर्षे बाबा आजारी होते. आईने बाबांची खूप सेवा केली. आम्हाला सांभाळले. घराकडे लक्ष दिले. “
मावशी !! मला आईला पुन्हा पुर्वी सारखं बघायचंय. तिने पुन्हा तसंच जगाव असं मला वाटतं. बाबांची पण हीच इच्छा होती.
रिया ची मागच्या बारा वर्षांची कहाणी ऐकून तिने तिच्या वर आलेल्या कठीण प्रसंगाला तिने ज्या धैर्याने तोंड दिले ते ऐकून पुर्वीची स्टाइलिश रिया नव्याने दिसली. “
आज वेगळीच रिया समोर होती. कणखर, कर्तव्यदक्ष, संयमाने आपली जबाबदारी पार पाडणारी. न डगमगता एकानंतर एक येणाऱ्या समस्यांना तोंड देणारी.
एक वेळेस आपल्या स्त्रीत्वाचा सजून धजून जगण्याचा हक्क बजावणारी, आयुष्याचा पूर्णपणे आनंद घेणारी.
आज कर्तव्याला तेवढ्याच जबाबदारी ने पार पाडणारी.
खरंच,
आयुष्याच्या प्रवासात सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेक गोष्टी घडतात. परिस्थिती नेहमी एकसारखी नसते.
“न डगमगता जोडीदाराला आयुष्यभर साथ देणारी पत्नी म्हणजे आदीशक्तीच नाही कां ?? “
म्हणतात ना,
“उस नारी का कोई मुकाबला नहीं, जिसके पास शक्ति के साथ सहनशक्ति भी हो।”
रिया म्हणाली, पूर्ण एक तप ग !!!
बहुतेक मागच्या जन्माची काही तरी परतफेड असावी. मला समाधान आहे की मी माझे कर्तव्य /सेवा मनापासून केली.
मी विचारलं, कस manage केलंस ग हे सर्व ???
रिया म्हणाली, अग म्हणतात ना,
“Mind is nothing but traffic of thoughts. Select your route carefully. “
मी संयमाने गरजेप्रमाणे वागत गेले.
या अवधीत मी फक्त एकच प्रार्थना करत होते,
हे देवा,
जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया.
जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया.
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय
माझे मला कळाया, देई रे बुद्धी रामराया.
आज पुन्हा एकदा रिया ला बघून मी तिच्या आदरयुक्त प्रेमात पडले. काही लोकांच्या संगतीत आपलं आयुष्य घडत असतं. हे नक्की.
न्युटन ने अगर गिरे हुए सेब की जगह गिरे हुए लोग देखे होते तो *gravity *की जगह *Humanity* की पढाई हो रही होती.
श्रावण महिना म्हणजे विशेष महिना. श्रावण सोमवार, नागपंचमी, गोकुळाष्टमी, असे अनेक सणवार आणि १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय सण. त्यानंतर लगेच नवरात्र, दसरा, दिवाळी
महिने केंव्हा सुरू होतात ? आणि केंव्हा संपतात, कळतच नाही. नवीन लग्न झालेल्यांच्या घरी अजून एक भर म्हणजे मंगळागौर पूजन. एकंदरीत उत्साही वातावरण.
आमच्या भजन मंडळीला अनेक ठिकाणी भजनासाठी आमंत्रण असते.
दरवर्षी आम्ही दोनदा तरी भजन आनंदवन आणि आसरा या वृद्धाश्रमात करतोच.
तेथील लोकांना पण आता आमची सवय झाली आहे.
तेथे गेल्यावर मात्र आयुष्याची अनेक छायाचित्रे प्रकर्षाने जाणवतात. रंगीन असं एकही चित्र दिसत नाही. म्हणजे मला नेहमी वाटतं ज्यांना आयुष्यात लहान सहान कारणांवरून तक्रार असते ना त्यांनी मधून मधून वृद्धाश्रमाला भेट द्यावी. अशा सर्वांचे डोळे उघडतील आणि डोकं ठिकाणावर येईल.
बरे असो,
वृद्धाश्रमाचे नाव जरी आनंदवन असले तरी आनंदाचा अभाव स्पष्ट जाणवतो. प्रत्येक चेहर्यावर नकळत नजर थांबते, चेहऱ्यावरील भाव वाचायचा मी प्रयत्न करते. त्यांच्या डोळ्यातील स्तब्ध भाव त्यांच्या दुःखाची, पण स्पष्ट न दिसणारी अनेक कारणं मनात धुमाकूळ घालतात.
येथे स्वइच्छेने कोणी येत असेल का ?
या लोकांचे कोणी नातेवाईक नाहीत का ? यांची मुल कुठे आहेत ? यांनी कोणती नोकरी केली असेल ? यांचे येथे येण्याआधीच आयुष्य कसे असेल ? यांना कोणी भेटायला येत असेल का ? घरच्यांनी पण नाइलाजाने यांना इथे ठेवले असेल का ?
त्यांचा पण आयुष्याचा काही काळ मजेत गेला असेलच ना. खटृटी मीठी यादें असतीलच ना. त्यावेळी आयुष्य नावाच्या पुस्तकाचे पूढचे पान त्यावर काही तरी भारी लिहिलं असेल या आशेने / विचाराने पलटवत असतीलच ते. आता ते पुस्तक बंदच करून ठेवलं असेल का त्यांनी ?
एका खोलीत चार अनोळखी माणसं एकत्र राहतात. सर्व जेष्ठ, एकटे, मनाने खचलेले,
एकमेकांना बघून यांच्या दुखात भरच पडत असणार. कदाचित समदुःखी असल्याने आपापल्या भावना एकमेकांजवळ व्यक्त करणं जमत असेल का त्यांना ?
शहरात अनेक वृद्धाश्रम आहेत. काही तर अगदी फाइव स्टार आहेत. तेथे गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर बिचारा भाव दिसत नाही. पण येथे मात्र त्यांना बघून जीव कासावीस होतो.
प्रत्येक वर्षी दोन चार नवीन चेहरे दिसतात, तर जूने चेहरे गायब असतात. ते कुठे गेले ? आपल्या घरी गेले का ? असा विचार मनात येतो पण विचारायची हिम्मत होत नाही.
आज कार्यक्रम चालू असताना एक गृहस्थ उमाताईंजवळ आले आणि म्हणाले,
“तुमची काही हरकत नसेल तर त्या तिथे बसलेल्या ताई आहेत ना, त्या छान गाणं म्हणतात. त्यांना एक भजन म्हणू देत का ? “
उमाताईंनी लगेच हो म्हंटल आणि लगेच पेटीची साथ दिली. थोड्या वेळ का होईना त्या ताईंच्या चेहऱ्यावर आनंदी भाव बघून आम्हाला बरं वाटलं
आज भजन झाल्यावर, संस्थेचे संस्थापक बरोबर चहा घेत असताना त्यांनी आपले अनुभव सांगितले. सध्या सामाजिक परिस्थिती कशी खालावली आहे त्याबद्दल ते बोलत होते. एकेक *खरी गोष्ट * ऐकून जीव खालीवर होत होता.
सध्या लोकांची वैचारिक समीकरण चूकत आहेत. संवेदना जणू मेल्या आहेत. लोक माणूस घाणे झाले आहेत. बाकीचे जाऊ दे स्वतः चे आई वडील पण नकोसे झाले आहेत.
सामाजिक परिस्थिती भयावह आहे.
अस प्रत्येक घरी आहे, असं म्हणता येणार नाही. पण प्रमाण वाढत चाललंय. सामाजिक आरोग्य ढासाळलय. हा रोग तीव्र गतीने वाढतोय. कॅंसर सारख्या रोगांवर रामबाण औषध शोधणं सुरू आहे. पण या रोगांवर औषध काय ?
म्हणूनच की काय,
काल आसाम सरकार ने या दिशेने एक पाऊल उचलले आहे. त्यांनी आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दर वर्षी ७ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर सुट्टी जाहीर केली आहे.
ती कशाला ?
तर तुम्ही तुमच्या आणि तुमच्या बायकोच्या आईवडिलांबरोबर ही सुट्टी घालवावी यासाठी.
म्हणजे आता परिस्थिती ही आहे की हे सांगावं लागतंय. कुठून तरी सुरुवात करणं पण गरजेचे आहे.
संस्थापक जे सांगत होते,
त्यात नटसम्राट चे उदाहरण होते. तर मुलांनी वृद्धाश्रमात आईला किंवा वडिलांना आणून सोडलेली अनेक व्यक्ती होत्या. त्यानंतर त्यांना भेटायला सुद्धा येत नाहीत. त्यांची तब्येत खराब आहे हे सांगायला फोन केला, तर तो सुद्धा उचलत नाहीत. आपण कोणालाही नकोसे आहोत ही भावना च माणसाला अर्ध अधिक संपवते. हे असे लोक जीवन जगत नाही तर दिवस काढतायेत. श्वास चालू असेपर्यंत जगणार आहेत नाईलाजाने.
मी सहज त्यांना मला तेथे ओळखीचे वाटणाऱ्या एका गृहस्थांबददल विचारले तर ते म्हणाले,
अहो!! ते सहकार नगर मध्ये राहणारे श्री देशमुख आहेत. बायको मागच्या वर्षी गेली. मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे. एका मोठया कंपनीत वैज्ञानिक आहे.
Gravitational force संबंधित काही तरी research करतोय म्हणे.
आई गेली तेंव्हा किंवा त्यानंतरही *त्याला* भारतात येणे जमले नाही.
मोठा माणूस तो. म्हणून वेळ मिळाला नाही.
संस्थापकांचा राग लक्षात आला.
देशमुख येथे रहात नाही पण आठवड्यातून दोन तीन दा येतात. छान इंग्रजी बोलतात. खूप पुस्तकं वाचतात. सर्वांशी गप्पा मारतात, सर्वांना बरोबर घेऊन बाग काम करतात. त्यांच्या येण्याने येथील वातावरण थोडं बदललंय.
तेवढ्यात श्री देशमुख तेथे आले. आमच्या बरोबर गप्पा मारत होते.
चेहऱ्यावर, बोलण्यात आत्मविश्वास होता.
जे झालं ते झालं. त्यावर विचार करत बसण्यापेक्षा पूढे काय करायचे ? हे बघावे. या मताचे असावे.
असे त्यांच्या बोलण्यावरून वाटल. श्री देशमुख म्हणाले,
मी पण त्यांच्यातलाच एक आहे. त्यांचा एकटेपणा, दुःख मी समजू शकतो. मी येथे रहात नाही पण मधून मधून येतो.
स्वतः ला किती ही समजवा, किती ही बहादुर बनायचा प्रयत्न करा, शेवटी कुठे तरी हृदयात दबलेले दुःख, ती जखम आपल डोकं वर काढतेच ना.
सहजच देशमुख साहेब बोलून गेले.
माझा मुलगा अमेरिकेत वैज्ञानिक आहे. Gravitational force च्या संदर्भात Reaserch करतोय.
थोडं हसून (?) म्हणाले,
ज्यावेळी न्युटनने सफरचंद खाली पडताना बघीतले आणि gravity चां शोध लावला. त्यावेळी जर त्याने माणसाला खाली पडताना बघीतल असतं तर बर झालं असतं. आज लोकांनी gravity च्या ऐवजी Humanity चां अभ्यास केला असता.
नाही का ?
सर्व स्तब्ध होते. जग पूढे चाललंय, पण आपण ? प्रत्येकाच्या चेहर्यावर अनेक प्रश्न होते.