मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ थ्रिलर… भाग – १ ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? मनमंजुषेतून ?

☆ थ्रिलर… भाग – १ ☆ तृप्ती देव ☆

“अभिनंदन! यंदाच्या राज्यस्तरीय भव्य कथालेखन स्पर्धेसाठी तुमची मुख्य अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.” सकाळी सकाळी मोबाईलच्या स्क्रीनवर चमकलेला तो अनपेक्षित संदेश वाचून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.

… चहाचा गरम कप तसाच हातात धरून मी तो संदेश एकामागून एक दोन-तीनदा वाचला. चेहऱ्यावरचं हसू ओसंडून वाहत होतं आणि कित्येक दिवसांची माझी कठोर मेहनत आज फळाला आली असं मला वाटत होतं. मी मनातून खूप सुखावले,  पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही,  कारण पुढच्याच मिनिटाला कमिटीकडून दुसरा एक सविस्तर मेसेज आला. त्या नव्या संदेशात पुढची अट आणि नियम लिहिले होते. त्यात लिहिलं होतं,  “यंदाच्या अंतिम फेरीचा मुख्य विषय – मर्डर मिस्ट्री म्हणजेच क्राइम थ्रिलर. कथेमध्ये खून,  संशय,  गुंतागुंतीचा तपास,  रहस्य,  थरार आणि एक अनपेक्षित शेवट असणे अनिवार्य आहे.”

तो मेसेज वाचून मी जागच्या जागी अक्षरशः थिजून गेले. हातातील चहाचा कप थरथरला आणि टेबलवर वाजत स्थिरावला. अंगावर एक सरसरून काटा आला आणि कपाळावर आठ्या पडल्या. “काय झालं गं?  एवढी का गोठली आहेस सकाळी सकाळी? “

स्वयंपाकघरातून पोहे बनवत असलेल्या नवऱ्याने माझा पडलेला आणि गंभीर चेहरा पाहून विचारलं. मी काही न बोलता फक्त मोबाईल त्याच्या हातात दिला. त्याने तो मेसेज शांतपणे वाचला आणि तो घरात घुमणारा मोठा हसू हसला. “अरे वा! बस,  आता तुझं काम झालं तर! तू तर रोज नवनवीन विषयांवर सुंदर कथा लिहीत असतेस. हा विषय तर खूपच मस्त आणि थ्रिलिंग आहे. लिही की एखादी कडक थ्रिलर,  तुला नक्की जमेल! ” तो म्हणाला.

मी त्याच्याकडे अत्यंत रागाने आणि असहाय्यतेने पाहिलं. “अरे,  तुला थट्टा वाटतेय का?  माझ्या आजवरच्या कथा आठव जरा. माझ्या कथेत दोन पात्रांमध्ये साधं कडाक्याचं भांडण झालं,  तरी शेवटी मी दोघांची मनं वळवून त्यांची प्रेमाने समेट घडवून आणते. इथे सरळ जिवंत माणूस मारायचा आहे! रक्त,  चाकू,  खून… हे सगळं माझ्या संवेदनशील मनाला कसं पटणार आणि माझ्याकडून कसं होणार? ” माझं हे बोलणं ऐकून तो अजूनच जोरात हसायला लागला. तितक्यात आमचा कॉलेजला जाणारा मुलगा बेडरूममधून बाहेर आला आणि हसत म्हणाला,  “बाबा,  बरोबर आहे तिचं. आईच्या कथेतला खुनी आधी पीडित माणसाला प्रेमाने चहा पाजेल,  मग त्याची मनधरणी करेल,  ‘मला माफ कर’ म्हणून डोळ्यात पाणी आणेल आणि शेवटी दोघे गळ्यात गळे घालून पक्के मित्र होतील! ” सगळं घर माझ्यावर हसत होतं. त्या हसण्याने घरातलं वातावरण हलकं झालं असलं,  तरी माझी मात्र धाकधूक वाढली होती. मी अत्यंत गंभीर झाले होते,  कारण प्रश्न माझ्या लेखणीच्या प्रतिष्ठेचा होता.

दुपारी घरची सगळी कामं आटोपली. घरात शांतता पसरली होती. मी अभ्यासाच्या टेबलावर माझी आवडती वही आणि पेन घेऊन बसले. वहीच्या कोऱ्या पानाच्या अगदी मध्यभागी मी मोठ्या आणि ठळक अक्षरात शीर्षक लिहिलं,  “मर्डर मिस्ट्री.” थोडं थांबून,  खूप विचार करून मी कथेचं पहिलं वाक्य लिहिलं,  “मध्यरात्रीचे बारा वाजले होते. सर्वत्र किर्रर्र अंधार आणि भयानक शांतता पसरली होती. काळ्या कपड्यांमधील एक संशयास्पद माणूस हातात धारदार चाकू घेऊन बंगल्याच्या मागच्या दरवाजाने आत शिरला…” मी ते वाक्य लिहिलं आणि स्वतःच दोनदा वाचलं. ते वाचताच माझ्या आतल्या संवेदनशील मनाने लगेच मान डोलवली आणि आतून आवाज आला,  “धारदार चाकू?  अगं,  एवढा धारदार कशाला?  चुकून जास्त लागलं तर?  चाकू थोडा बोथट ठेव.” मी कपाळावर हात मारला,  पण मनाचं ऐकून मी ‘धारदार’ हा शब्द खोडला आणि तिथे ‘बोथट’ असं लिहिलं.

मी पुढे लिहायला सुरुवात केली,  “त्याने खोलीत झोपलेल्या माणसावर बोथट चाकूने जोरात वार केला…” पुन्हा माझं मन मध्येच ओरडलं,  “जोरात नको गं बाई! खूप रक्त येईल आणि त्याला खूप वेदना होतील. त्यापेक्षा हलकासा वार कर.” मी ‘जोरात’ पुसलं आणि ‘हलकासा’ केलं. आता वाक्य झालं,  “त्याने हलकासा वार केला.” पण क्षणभर विचार केल्यावर मलाच हसू आलं. हलकासा वार करून काय उपयोग?  त्याने माणूस कसा मरेल?  त्याला तर फक्त किरकोळ खरचटलं असेल. मग मर्डर कसा होणार?  मी चिडून ते पूर्ण वाक्यच पुसून टाकलं. यावेळी मी चाकूच बाजूला ठेवला. मनात विचार केला की मारामारी दाखवू. मी लिहिलं,  “त्याने मागून येऊन त्या माणसाला जोरात ढकललं…” लगेच मनातून दुसरी शंका उपस्थित झाली,  “अरे,  पण तो खाली पडल्यावर तिथे फरशी असेल आणि डोक्याला लागलं तर?  खाली एखादी मऊ गादी किंवा सोफा असेल तर किती छान होईल! ” मी कथेतील त्या पडणाऱ्या पात्राच्या खाली सुरक्षित गादी ठेवली. पुन्हा सगळं पुसलं. असा करत करत अर्धा तास उलटून गेला होता. कागदावर शब्दांची खाडाखोड झाली होती,  पण माझ्या कथेतला तो बिचारा माणूस अजून जिवंतच होता आणि खुनीसुद्धा दारात उभा राहून थकला होता.

इतक्यात नवरा खोलीत डोकावला आणि खोचकपणे म्हणाला,  “काय लेखिकाबाई,  झाला का मर्डर?  की पोलीस तपास सुरू झाला? ” मी वैतागून पेन खाली ठेवलं आणि म्हणाले,  “नाही रे… अजून खुनी दारातच उभा आहे. आत यायला तयार नाही.” तो हसत म्हणाला,  “अशी दारात उभी ठेवून त्याची काय खातीरदारी करतेस?  आत पाठव त्याला लवकर आणि उरकून टाक.” मी अत्यंत प्रामाणिकपणे उत्तर दिलं,  “अरे,  तो आत गेला तर घरातले लोक त्याला चहा-पाणी विचारतील. मग चहा द्यावा लागेल. चहा दिला की मर्डर कॅन्सल होईल आणि दोघे गप्पा मारत बसतील! ” तो डोक्याला हात लावून हसत हसत निघून गेला. मी हार मानणार नव्हते. यावेळी मी हिंसेचा मार्ग सोडायचा ठरवला. रक्तपात नको,  म्हणून मी ‘विषाचा’ पर्याय निवडला. मी नवीन पानावर लिहायला घेतलं,  “खुन्याने स्वयंपाकघरात जाऊन दुधाच्या कपात अत्यंत जहाल विष मिसळलं…” तेवढ्यात माझं गृहिणीचं मन जागं झालं. ते म्हणालं,  “अगं बाई! विष मिसळलेलं दूध तो पिणार नाही आणि ते दूध वाया जाईल. आजकाल दुधाचे आणि चहाच्या पावडरचे भाव किती वाढलेत माहिती आहे ना?  एवढी नासाडी कशाला? ” मी कपाळावर हात मारला. विष प्रयोग रद्द!

– क्रमशः भाग पहिला 

┉❀꧁꧂❀┉

© तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गुलाबभाई… ☆ डॉ. नेहा भटकर ☆

डॉ. नेहा भटकर

अल्प परिचय

‘मन अंकुरे अंकुरे’ या नावाचा ललित लेख संग्रह ज्ञानपथ पब्लिकेशन्स अमरावती द्वारा प्रकाशित.

साहित्य संमेलनांमधून कथाकथन, कविता वाचन केलेले आहे.

वृत्तपत्रामधून सातत्याने विविध विषयांवर लिखाण.

? मनमंजुषेतून ?

☆ गुलाबभाई… ☆ डॉ. नेहा भटकर ☆

त्याच ‍झालं असं,  की परवा स्वयंपाकघरातील काळी नॉनस्टीक भांडी आरोग्यास किती व कशी बाधक आहेत वा नाहीत याबद्दलच लेखन वाचनात आलं. तसंही अलीकडे सर्वत्र केवळ स्टीलची भांडी अन्न शिजवण्यासाठी वापरावीत असा प्रचार होतोयं पण गैरसोय अशी होते की,  स्टील उष्णतेचा चांगला वाहक नसल्याने,  भांड्याला सर्वत्र सारखा जाळ लागत नाही त्यामुळे पदार्थ लगेच करपतो. हे सगळं मनाशी घोळत असतानांच मला दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडी गुलाबभाई घरी येऊन सर्व स्वयंपाकघरातील शिजवण्याची,  खाण्याची वा अन्न काढून ठेवण्याची सगळी पितळी भांडी; उष्णतेची उत्तम वाहक असलेली,  कल्हई करून अगदी चांदीसारखी चकचकीत करून द्यायचे,  जेणेकरून कुठलाही पदार्थ कळकून त्याची बाधा होऊ नये आणि आम्ही कसे निर्धास्त व्हायचो हे आठवलं

कंदील भडकतोयं, गुलाबभाई. पावसाळ्याच्या तोंडी भाड्यांना कल्हई करायचीयं, गुलाबभाई. तेल संपलेल्या डब्यांची झाकणं कापून घ्यायचीयं व त्यापासून वापरायला सोयीचे डबे बनवायचेतं तर गुलाबभाई. बादलीला वाळा बसवायचायं,  कुठल्या गळक्या जुनाट गुंड वा कळशीला डाग द्यायचायं,  गुलाबभाई. धान्याचा हंगाम जवळ आलायं धान्य साठवायच्या कणग्या ठिकठाक करून घ्यायच्यायं तर गुलाबभाई. उन्हाळ्यात गावच्या कुंभारवाड्यातून नुकत्याच आणलेल्या नव्या कोऱ्या मातीच्या माठासाठी अडणी करायची तरी गुलाबभाई. तर एकंदरीत कुठलंही तांबा पितळ, लोखंडी वा टपरी पत्र्यांचं आणि कल्हई वगैरे कामं करायचं तर अशा कित्येक कामांसाठी आमची भिस्त केवळ गुलाबभाईवरच. अशा प्रकारची कामे करणारा आसपासच्या खेड्यांसकट एकमेव माणूस गुलाबभाई. आज ही असली कामे कुणी करवून घेत नाहीत. त्याची गरजही नाही किंवा ती कालबाह्य झालेली आहेत. आजच्या वापरा आणि फेका वा युज अँड थ्रो जमान्यात,  वर्षानुवर्षे एकच,  वारंवार भडकणारा कंदील पुन्हा पुन्हा दुरुस्त करून वापरणाऱ्या लोकांचं जग कालौघात केव्हाच मागे पडलेलं. कंदीलाच्या धुरकट काचेतून पडणाऱ्या अंधुक उजेडासारखं हळूहळू धुसर होऊन पडद्याआड दिसेनासं झालयं व आज बहुतेकांसाठी तितकंच ते अनोळखीचही आहे. आजची पन्नाशीच्या पलीकडची,  खेडेगावांशी बऱ्यापैकी परिचीत असलेली पिढी, कोणे एकेकाळी त्या जगाचा भाग होती. जसजसा काळ सरकत गेला तसतशा लहानपणीच्या दुनियेतील अगदी रोज भेटणाऱ्या खुणा एक एक करून दिसेनाशा होताहेत. तो निसर्गाचा नियमच आहे; त्याचे काय विशेष. कालपरत्वे स्थित्यंतरे ही घडणारच. गतकाळात भेटलेली कितीतरी माणसे,  घडलेल्या घटना,  विस्मृतीत गडप होतात. पण कधी कधी,  कुणास ठाऊक कशी,  अत्यंत साधी वाटणारी माणसं किंवा तेव्हा तितक्याशा महत्वाच्या नसणाऱ्या आजुबाजूला घडणाऱ्या घटना,  कुठेतरी मनाच्या पार आतल्या कप्प्यात जपलेल्या असतात,  इतक्या की त्यांना पाठीशी घालत आपण कितीतरी काळ पुढे चालत आलेलो आहोत याचाही विसर पडतो, इतक्या त्या ताज्या असतात.अगदी कसं सगळं परवाच भेटल्या वा घडल्या सारखं लख्ख. त्यापैकीच एक भांड्यांना कल्हई करुन चकचकीत करणारे गुलाबभाई. 

सहा फुटाच्या जवळपास उंची आणि सडपातळ शरीरयष्टी,  कुठलेही भाव नसलेला उभट चेहरा, कुणी काय सांगतोय हे त्यांचे डोळेच ऐकायचे किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. पांढरा ढगळ पायजमा शर्ट व डोईवर कायम काळी साधी टोपी. टोपी न घातलेले गुलाबभाई मी बघितले नाहीत. भ्रमण वा स्थिर यापैकी कुठलीही दूरध्वनी सुविधा हाताशी नव्हती व तसल्या सोयीची पुसटशीही कल्पना त्याकाळी गावामध्ये कोणाच्याही मनीमानसी असण्याचे काही कारणही नव्हते. गावात कोणालाही काही सांगायचे झाल्यास प्रत्यक्ष भेटणे हीच पद्धत. यामुळे घरात गुलाबभाईसाठी कुठलेही काम निघाले असेल तर गुलाबभाईंच्या थेट घरीच थडकावे लागे आणि हमखास ती कामगिरी घरात लहान असल्याने माझ्याकडेच यायची. हो घरीच,  त्याकाळी घर आणि व्यवसाय हे दोन्ही बहुतेक एकाच ठिकाणी असायचे किंवा कारागीर,  ज्यांचे कोणाचे काम असेल त्यांच्या,  घरी जाऊन ते काम करून द्यायचे. आजच्यासारखे वेगळे वर्कशॉप किंवा वेगळे दुकान अशी पद्धत नव्हतीच. गुलाबभाईंचे स्वतःचे घर नव्हते. ते राहायचे गावाला अगदी लागून असलेल्या शेतामधील डॉ. अशोक यांच्या वाड्याच्या परिसरात, दर्शनी भागातील डाव्या कोपऱ्यातील ओसरीत. अर्थातच तोच त्यांचा निवारा आणि वर्कशॉपही. त्यांचे छोटेसे कुटुंब मीयॉं,  बिबी आणि दोन मुली अत्यंत उद्यमशील असा हम दो और हमारे दो असा चौकोनी संसार. वाड्याच्या समोरच्या भागात गुलाबभाई तर मागच्या बाजूला आणखी एक का दोन कुटुंब राहायला असल्याचे आठवतं. पण एकुणच सर्व गावाचा संबंध यायचा तो गुलाबभाईंशी आणि आजारी पडल्यास डॉक्टरांशी.

डॉक्टरांच्या शेतामध्ये अगदी कुंपणाला लागून,  गुलाबभाईंच्या ओसरीच्या जरा डाव्या बाजूला मोठाल्या चिंचेच्या झाडांची रांग होती. वाऱ्याच्या झुळुकेसरशी डुलणारे चिंचांचे झुपके मनाला नेहमी खुणावत असत. शेताच्या कुंपणापलीकडील एका कार्यालयामध्ये शिपाई असणाऱ्या सदाभाऊंचा मात्र आमच्या चिंचा गोळा करण्याला कडाडून विरोध असे. अर्थात त्याला कारणही तसंच असायचं म्हणा. आम्हा शाळकऱ्यांचा घोळका चिंचेखाली एकदाचा जमला की इतका गोंधळ नि गोगांट करायचा की बाजूच्या कार्यालयीन कामात अडथळा यायचा पण आम्ही आपले सदाभाऊंच्या नावाने सदा बोटं मोडायचो. अशावेळी आम्ही गुलाबभाईच्या मुलींना हाक मारायचो आणि त्या आम्हाला चिंचेखालची चार-दोन बोटूकं अगदी सहज द्यायच्या आणि आमची बोळवण करायच्या. चिंचेच्या झाडांची रांग जेव्हा माकडांनी गजबजायची तेव्हा झाडावरची माकडं आणि आम्ही खालची माकडं यांच्यात करार होऊन गुलाबभाई आणि सदाभाऊ यांची चांगलीच कोंडी करत असू. माकडांच्या गोंधळात आमचाही गोंधळ मिसळून जायचा. तेव्हा माकडं गावात बाराही महिने मुक्कामाला नसायची. काही दिवसांची ही पाहुणी माकडं आमची फार आवडती होती.

वाड्यात शिरण्यासाठी,  पहिले तर वाड्याच्या भल्या मोठ्या लोखंडी पत्र्याच्या फाटकाशी झुंजाव लागायचं. फाटक ढकलून आत मध्ये पाऊल पडल्याशिवाय वाड्याचा आतला परिसर काही दृष्टीपथात यायचा नाही कारण फाटक एकसंघ पत्र्याचं. त्याला मध्ये कुठलीही खिडकी वा फट नसल्याने फाटकाशी उभे राहून आत मधील कोणाला बाहेरून आवाज देणे अशक्यच म्हणून लहान मुलांसाठी ती झुंजच,  पण अनिवार्य. त्यातल्या त्यात सोयीचा भाग म्हणजे फाटकाला वर किंवा खाली कडीकोंडा लागलेला नसायचा फक्त ते ढकलायचे अन् त्याचा कर्र… असा होणारा आवाज कानात घेऊन आतील ऐसपैस पटांगणात शिरायचे. फाटकाचं कर्र…एकदाच बंद झाल्यावरही जर का करकर,  खडखड, ठकठक असे आवाज जर आपल्या डावीककडून येत असतील तर गुलाबभाई घरीच आहेत अन्यथा ते कुठे गावामध्ये कोणाकडे काहीशा असल्याच कामासाठी गेलेले असावेत हा अंदाज फाटकातच यायचा. गुलाबभाईंशी संवाद साधने म्हणजे अत्यंत जिकिरीचं काम. त्यांची कामानिमीत्त चाललेली ठोकपिट आणि भरीत भर गुलाबभाई दोन्ही कानाने ठार बहिरे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी गत व्हायची. मी फक्त त्यांना एवढं सांगून घराकडे येत असे,  ते म्हणजे तुम्हाला काही कामासाठी आईने बोलावले आहे आणि बहुतेक हा संवाद हातवारे जास्त आणि शब्द कमी असाच व्हायचा. यावर गुलाबभाई फक्त मानेने होकार द्यायचे.

गुलाबभाईंचे कामातील कसब व सफाईदारपणा आणि माझ्या आईच्या संसारोपयोगी नवनवीन कल्पनांच्या समन्वयाची परिणीती व्हायची ती नाविन्यपूर्ण घरगुती वापरातील सुलभ उपकरणांच्या निर्मितीमध्ये. चिळ्या कंदीलांमध्ये रॉकेल भरायच्या डब्याला तोटी लावून घेऊन काम अधिक सोपे करणे तर कधी दिवालगिरीच्या वातीच्या पुंगळी भवती खबरदारी म्हणून आधीच आणखी एक जास्तीची पुंगळी बसवून घेऊन तिच्या कधी काळी भडकाण्यावर उपाय करावा. कित्येकदा बनवलेले झाकण बाहेरून नीट बसत नाही तर अशावेळी ते आत मधून बसवावे म्हणजे अधिक नीट बसेल का, असले प्रयोग करायला कधी गुलाबभाई थकत नसतं. घरोघरी दिवाळीच्या आधी होणाऱ्या वार्षिक साफसफाईच्या वेळी तर कित्येक अडगळीतल्या सामानांची दुरुस्ती करावी आणि त्यांना उपयोगात आणावे अशा विचाराने आणि इतर अनेक नियमित वापरातल्या सामानाच्या दुरुस्तीचा चेव बऱ्याच जणांना यायचा.त्यामुळे या सुमारास गुलाबभाईंच्या घराबाहेर बराच मोठा वैविध्यपूर्ण मोडक्या वा नादुरुस्त वस्तूंचे ढीग,  किंवा ढीगभर काम त्यांना पडायचे. अशावेळी ते सारखे लगबगीत, प्रत्येकाची डेडलाईन सांभाळायचे. “हा हा दिवाली के पहेलेही बना दूंगा” असं पुटपुटल्यागत बोलायचे पण त्यांचा कामाचा झपाटा आणि ठोकपिटीचा आवाज त्या काळात फार वाढायचा.

कुणाच्याही कधी अध्यात मध्यात नसणारे, आपलं काम भलं आणि आपण भले या नियमाने चालणारे. सदैव कामाचीच भाषा बोलणारे व आवाजाचा एकच पोत ठाऊक असलेले. भोवतालच्या जगाला त्यांच्या व्यक्त्तीमत्वाचा केवळ गुलाबभाई डागवाला वा कल्हईवाला एवढा एकच पदर ठाऊक असलेले,  कामात अत्यंत प्रामाणिक आणि तितकेच हरहुन्नरी. कधीही कुठली तक्रार नसणारे, माणुसकीचा वसा घेतलेले. कधीही कामा पलीकडे न बोलणारे, आजूबाजूच्याच काय तर कधी स्वत:बाबतही व्यक्त न होणारे गुलाबभाई; आज मात्र मला फार गूढ वाटतात.

┉❀꧁꧂❀┉

©  डॉ. नेहा विनोद भटकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भारत माझा देश आहे 🇮🇳… एक चिंतन ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ भारत माझा देश आहे… एक चिंतन ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

भारत माझा देश आहे! 

पण प्रश्न हा आहे की कोणता भारत माझा देश आहे?

रामायणातल्या उच्च आदर्शांचा लवलेशही नसलेला भारत?

की महाभारतातील कौरवांची परंपरा जतन करणारा भारत?

सिंहासन सोडून पादुकांची पूजा करणाऱ्या भरताचा भारत?

की सर्वस्वाचेही दान करणाऱ्या ‘ व्यवहार शून्य ‘

कर्णाचा भारत?

कोणता भारत माझा देश आहे?

 

‘अतिथी देवो भव ‘ म्हणत शत्रूलाही थारा देणारा भारत? की ‘ खलांची व्यंकटी सांडो ‘ अशी आर्त विनवणी करणारा भारत?

 मर्यादांचा पडदा न ओलांडणाऱ्या महाराणी पद्मिनीचा भारत?

 की वास्तवतेच्या नावाखाली प्रदर्शनाला सोकावलेल्या अभिनेत्रींचा भारत?

कोणता भारत माझा देश आहे?

 

पंचतारांकित पक्वानांच्या जेवणावेळी झोडणारा भारत?

की धारावीच्या उकिरड्यात पत्रावळीतून डोकावणारा भारत?

एक तीळ सात जणात वाटून खाणाऱ्या पांडवांचा भारत?

की चारा असो, कोळसा असो, खात सुटणाऱ्या नेत्यांचा भारत?

कोणता भारत माझा देश आहे?

 

 तलवारीच्या पात्यावर शत्रूला नाचवणाऱ्या बाजीरावाचा भारत?

की बाजीरावालाच नाचणाऱ्या आधुनिक इतिहासकारांचा भारत?

‘ भवितव्याशी करार ‘ करणाऱ्या देशभक्तांचा भारत?

की लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या नतद्रष्टांचा भारत?

कोणता भारत माझा देश आहे?

 

स्वातंत्र्याच्या यज्ञवेदीवर कुटुंबाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचा भारत?

की कुटुंबाच्याच चिंतेत रमणाऱ्या सत्तापिपिसूंचा भारत?

‘ वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम् ‘ म्हणणाऱ्या भूमिपुत्रांचा भारत?

की त्याच मातेच्या पोटी जन्मलेल्या धर्मांधांचा भारत?

कोणता भारत माझा देश आहे?

 

न्यायदेवतेचे डोळे उघडणाऱ्या रामशास्त्रांचा भारत?

की ‘ काय द्यायचं बोला ‘ म्हणत डोळ्यावर पट्टी बांधणा-यांचा भारत?

कोणता भारत माझा देश आहे?

 

प्रश्न माझे खरे आहेत .

पण खरे उत्तर सोपे नसते .

कारण केव्हाच गुंडाळले आहे आम्ही 

‘सत्यमेव जयते‘ 

तरीसुद्धा, तरीसुद्धा… भारत माझा देश आहे .

भारत माझा देश आहे .

कारण तो फक्त देश नाही.

ती एक माता आहे .

ती भारत माता आहे.

भारत माझा देश आहे!

┉❀꧁꧂❀┉

©  श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमची प्रतिज्ञा :: भारत माझा देश आहे! 🇮🇳 ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ आमची प्रतिज्ञा :: भारत माझा देश आहे! ☆ शीला पतकी ☆

☆

सातवीचे पुस्तक नवीन आहे म्हणून मी ते चाळायला घेतलं. पहिल्या पानावर नेहमीप्रमाणे प्रतिज्ञा …

आणि मला त्या पुस्तकातून प्रतिज्ञा बाहेर जाताना दिसायला लागली प्रतिज्ञेतल्या पानावरचा एकेक शब्द नाहीसा व्हायला लागला… सगळे अक्षर पुसट झाली…मी विचारले अग चाललीस कुठे? माझया प्रश्नावर प्रतिज्ञा म्हणाली नुसतं कागदावर राहण्याचा कंटाळा आला ग मला… उगाच ते तोंड हलवून म्हणणं … तो विचार ना मनात माझ्या डोक्यात… मग उपयोग काय माझा…? मी म्हणाले, ” असं का म्हणतेस आम्ही फार निष्ठापूर्वक म्हणून घेतले मुलांकडून” “हो पण मुलांनी कुठे म्हटलं …त्याने ते फक्त पाठ केलं रोज म्हणून अगदी मारुती स्तोत्र रामरक्षा सारखं …अर्थ काहीच ठाऊक नाही पण पाठ मात्र चोख!”

मी म्हणाले, ” असं काय म्हणतेस ग? त्यावर ती म्हणाली, ” बैस येथे मी तुला समजून सांगते हे पहा पहिली ओळ आहे ..भारत माझा देश आहे… ही जाणीव किती जणांना असते? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवशी तुम्हाला वाटतं आपण भारत देशाचे आहोत त्याच्या अलीकडे एक आठवडाभर ही सुरुवात असते. मेरे देश की धरती वगैरे सारखी गाणी लागतात. शहीद, भगतसिंग, देशभक्त, क्रांती, बॉर्डर असले सिनेमे टीव्ही वरती चालू राहतात …आठवडाभरानंतर सगळं संपत…

सारे भारतीय माझे बांधव आहेत अग घरातले भाऊ-बहीण घरातली सदस्य एका चौकोनी खोकड्यात बघत असतात. पलीकडच्या घरात कोण राहतो याची माहिती तुम्हाला नाही .त्याच्या सुखदुःखाशी तुमचं देणंघेणं नाही तुमच्या उंबर्या पलीकडचं जग तुम्हाला माहित नाही… त्यांच्याशी संवाद नाही. पलीकडे उत्तर हिंदुस्तानी आला तर तुम्ही म्हणता तो आपला नाही …सारे भारतीय बांधव कुठले तुमचे…? प्रांतरचनेवर तुमचे भांडण… बर आता ही ओळ बघ… माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे! यातल अर्ध वाक्य बरोबर आहे परंपरा समृद्ध आहेतच पण त्या अधिक समृद्ध करण्याचं काम तुम्ही केलेलं नाही. काही परंपरा तर ओंगळवाण्या केल्यात त्या परंपरांचे आधुनिकीकरण करताना त्याचे इव्हेंट केलेत. ओवाळून करायचे वाढदिवस मेणबत्ती विझवून आणि केक कापून करताय तुम्ही …हे म्हणजे आधुनिकीकरण नाही …गणपती उत्सवात मिरवणुकीत हिडीस प्रकाराने नाचता नृत्य करता… परंपरावादी माणूस तुम्हाला आऊटडेटेड वाटतो… आणि मुख्य म्हणजे परंपरा पाळा ना. आपल्या देवळात जाण्यासाठी काही नियम असतील तर ते पाळले पाहिजेत तिथे एखाद्या बाईने तोकडी पॅन्ट आणि वर एखादा तोकडा शर्ट घालून जाणे योग्य नाही त्याच्यावर तुम्ही आंदोलन करता बायकांनी तर पुरुषी होण्याची स्पर्धाच चालवली आहे बायकांनी पुढे जरूर यावं …सगळं शिकावं… सगळ्या गोष्टीआत्मसात कराव्यात, प्राविण्य मिळवावं पण बाईपण सोडू नये… परमेश्वराने दिलेली देणगी आहे ती!…ममता सामंजस्य ऋजूता वात्सल्य आणि अफाट सहनशक्ती कारण ती सृजनाची शक्ती आहे पण तुम्हाला तसं वाटत नाही पुरुषांशी बरोबरी करण्यात आणि त्यांच्यापुढे जाण्यात धन्यता… त्यामुळे खरंच कोणी सुखी नाही…ना पुरुष ना स्त्री ना कुटुंब आणि खरं सांगू का कुटुंब व्यवस्था ही आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया आहे तो तोच संकुचित होत चालला गाव गाड्या पासून वाड्या आल्या.. वाड्यापासून वस्त्या झाल्या ..गल्ली बोळ …छोट घर मोठ कुटुंब… मोठ्या कुटुंबाचे रूपांतर विभक्त कुटुंबात झाले आणि आता बहुतेक एकल कुटुंब होतील…!

” त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन “असं म्हणणारे तुम्ही त्या परंपरा मोडीत तरी काढताय किंवा त्याच आधुनिकीकरण करण्याच्या नादात विद्रुप पद्धतीने त्या बदलत आहात या परंपरांचे पाईक होण्यासाठी तुम्हाला पाईक या शब्दाचा अर्थ शोधावा लागतो. निष्ठेने एखादी गोष्ट पुढे नेणारा त्यावर श्रद्धा ठेवून एखादी गोष्ट चालू ठेवणारा वारकरी सांप्रदायातली वारी परंपरा,

ती प्रथा पुढे नेत आहेत 700 वर्षाहून अधिक काळ झाला पण त्यात सुद्धा इव्हेंट आलाच. वारी कव्हर करणारे चॅनल, वारीच्या रस्त्यावर जाहिरातीचे बोर्ड लावणारे जाहिरात दार आले वारीत हौसे नवशे गवशे सगळे आले पण मूळ गरीब बिचार्या वारकऱ्यांनी आपली परंपरा सोडली नाही .

आता पुढची ओळ बघ “मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन” जरा पोरं मोठी झाली की पालकांचा चुका करण्यात सॉरी चुका दाखवण्यात ते पटाईत झालेत तुम्हाला हे जमत नाही तुम्हाला हे येतच नाही ते तुमच्या वेळेच आता जुना झालं वगैरे वगैरे… आई वडिलांना वाकून नमस्कार करणारी पिढी संपली, आता गुडघ्याला नमस्कार करतात. गुरुजनांचा तर विचारच नको त्यांना थोबाडीत मारेपर्यंत मजल गेली आहे मुलांची आणि ही दृश्य तुमच्या चित्रपटातही दाखवले जातात मुलांना बळ मिळतं त्यांना वाटतं आपणही असं करावं कारण त्याला कोणती शिक्षा होताना दाखवत नाहीत त्याचा बाप आमदार असतो खासदार असतो पैसा फेकला की पेपर मिळतो ऍडमिशन मिळते डिग्री मिळते त्याला ठाऊक झाले कारण हे असले महापाप करणारे प्रजाजन आपल्या देशात आहेत आणि तरुण मुलांची डोके भडकवणारे परदेशात बसलेत. देशाचा सर्वोच्च मानबिंदू आपले पंतप्रधान त्यांना सुद्धा जगातल्या वाईटात वाईट असलेल्या शब्दाने शिव्या देण्याचे काम करणारी पिढी… त्यांना ही प्रतिज्ञा शाळेत शिकवली नसेल का? ते कोणत सौजन्य दाखवत होते? ते कोणाच्या वयाचा मान नाही कोणाच्या पदाच मान नाही नाही… जेंडर डिफरन्स तर तुम्हाला मान्य नाही ठीक आहे पण तो तुम्ही अमान्य करून उपयोग नाहीये निसर्गाने तो फरक बनवलेला आहे पोर शेवटी बाईलाच होणार आहे आणि आई पण तुमच्याकडेच येणार आहे…! सौजन्याने वागणे यात पहिल्यांदा सौजन्य म्हणजे काय शिकवावे लागेल अशी अवस्था आली आहे. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे कोणती निष्ठा कोणावर दाखवत आहे या देशात राहून दुसऱ्या देशावर निष्ठा आहे तुमची प्रतिज्ञा.. या देशांमध्ये खूप आराजक आहे ..राजकारण फार आहे …पैसे फार मिळत नाहीत… जगण्यासाठी संघर्ष आहे… हे लक्षात घेऊन आपल्या ज्ञानाचा विकास करायचा या उदात्त हेतूने अन्य राष्ट्रात पलायन करणारी पिढी या राष्ट्राच्या मातीला विसरत चाललीये आई बापाला विसरलेली आहे ते दुःखी जीव पैशाचा समृद्ध लाटेवर अगतिकतेने जगताना पाहिल की वाईट वाटतं. बासरी वाजून उंदीर पळून लावणाऱ्या जादूगारासारखी आपली पोर इतर देशात पळवून नेलीत आणि त्यांचे आईबाप त्यांच्या प्रेमाला पारखे झाले… माता पिता गुरुजन वडीलधारी मंडळी हे सर्व शब्द आता डिक्शनरीत राहतील. 

माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे हे प्रतिज्ञाचे शेवटचे वाक्य बघ …!देशभक्त हे शब्द हद्दपार झाले पूर्वी पत्रं यायची लोकांना तर मागे दे.भ. असे ती सर्वात मोठी डिग्री होती दे. भ. म्हणजे देशभक्त अमुक तमुक आता अशी डिग्री माग असणारा कोणी दिसतो का तुला? …डिगऱ्या सगळ्या पुढे आणि माणसं राहिली माग ..!आतंकवादी, चुकीचे काम करणाऱ्या असंख्य लोकांना आपल्या घरात असरा देणारी माणसं, चुकीच्या मार्गाने पैसे कमावणारी माणसं, देशाचा कर बुडवणारी माणसं, फुकट्या सवलती उपटणारी माणसं,

कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करणारे राजकारणी, लोकांची जीवाची पर्वा न करता बिल्डिंग बांधणारे कंत्राटदार, निसर्गाचा ऱ्हास करून बांधकाम उभे करणारे ठेकेदार, नद्याचा नाला करून नद्याच गायब करणारे जादूगार यांनी ही प्रतिज्ञा म्हणली नसेल का ग? हे सगळं विसरायला लावणारे वरवरचे शिक्षण काय उपयोगाचं..? शिक्षण आणि शिस्त रक्तात भिनली पाहिजे… असेल खूप काही चांगले घडत असेल मी नाही म्हणत नाही …पण अलीकडे देशात घडणारे अनेक प्रसंग पाहून उद्विग्नता आली आहे हे मात्र खरे…!

.. प्रतिज्ञे झालं तुझं सांगून… प्रतिज्ञा आता माझं ऐक .. एवढी निराश होऊ नकोस. देशासाठी गोल्ड मेडल मिळाल्यानंतर डोळ्यात घळाघळा पाणी आणणाऱ्या भारतीय महिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जिंकण्याचा जल्लोष मातीवर डोकं टेकवून रडण्यात करणारी हीच मुलं आहेत. नवनवीन शोध लावणारी काळ्या आईत राबवून क***** बे भरवशाची शेती करणारी तरुण पोरं आहेतच की …रस्त्यावर चहाची गाडी लावून चहा विकून आपला उदरनिर्वाह करणारी …अशी स्वतःच्या उद्योगाची निर्मिती करणारी तरुण पोरं आहेतच ना …अनाथ आश्रम स्वतःहून चालवणारे समाजसेवक आहेत …वृद्धाश्रम श्रद्धेने चालवणारे समाजसेवक आहेत… गरिबांच्या पोरांना शिक्षणाबरोबर संस्कार मिळावा म्हणून मोफत शिकवणी घेणारे मास्तर अजून आहेत …अन्नदान करणारे आहेत, देहदान करणारे आहेत, रक्तदानकरणारेआहेत, …दुर्जनांच्या रांगेत जसे आहेत तसेच सज्जनांच्या रांगेतही खूप जण उभे आहेत रस्त्यावरच्या लेकराला उचलून आणून आपलं लेकरू म्हणून सांभाळणारी पाळणाघर आहेत ती चालवणार्या आया आहेत…! काळ्या, शेंबड्या पोराचा मुका घेणारी आई जोपर्यंत या देशात आहे ना तोपर्यंत इथली कुटुंब संपणार नाहीत… माया संपणार नाही …आणि संस्कार ही संपणार नाहीत..! क्लास वाले कितीही उदंड होत देत ज्ञानदान करणाऱ्या आणि संस्कार देणाऱ्या मातृभाषेतल्या शाळा टिकणार आहेत …तर तू अशी तुझं पान सोडून जाऊ नकोस शपथ आहे तुला… तीही एका शिक्षकाची…! तू सोडून गेलीस ना तर ही पिढी घडवणाऱ्या आम्हा सगळ्यांचा विश्वास संपेल!…जा परत जा पुस्तकाच्या पहिल्या पानावर विराजमान हो..तू ही रक्तात भिनशील … लक्षात ठेव… 

मी डोळे पुसले आणि प्रतिज्ञा पुन्हा पानावर होती मी तिचे मोठ्यांदा वाचन करू लागले .. .. .. 

‘भारत माझा देश आहे…!’🇮🇳

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ म्हणोनि ठेविली पायी डोई… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ म्हणोनि ठेविली पायी डोई… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

“माऊलींची माया हाये ओ आमच्यावर. ती तुमास्नी नाय कळायची. ” असं तो म्हणाला अन् डबडबलेल्या डोळ्यांतून अश्रूंचे दोन चार थेंब ओघळले. समोर माऊलींच्या तळावर तंबूचे कळस दिसत होते अन् त्या कळसांकडे पाहून हात जोडून तो आनंदानं रडत होता. नेमकं काय घडलं होतं, ते त्याला अन् माऊलींनाच ठाऊक. त्यांचं नाव घेणाऱ्या प्रत्येकाशी त्यांचं काही ना काहीतरी नातं असतंच.

“त्यांच्यामुळं तरलो बगा यंदा. ” असं म्हणत त्यानं हात जोडले. माझ्याकडं लक्षच नव्हतं. त्याचं आपलं स्वतःशीच बोलणं सुरु होतं. तो इतका भावूक झाला होता की, कुणी नुसता स्पर्श जरी केला असता तरीही त्याच्या भावनांचा बांध फुटला असता.

माऊलींशी आणि तुकोबारायांशी असा भावनिक संवाद साधणारे कितीतरी वारकरी आपल्याला दिसतील. इतक्या सहजतेनं ते माऊलींशी मनातलं सगळं सगळं बोलतात, सुख-दुःखाच्या गूजगोष्टी करतात, त्यांना प्रश्न विचारतात, त्यांचा सल्ला घेतात, कधी कधी त्यांच्यावर रागावतात सुद्धा. पण हेही तितकंच खरं आहे की, त्यांना त्या संवादातून मार्ग सापडतात, प्रश्नांची उत्तरं मिळतात, रस्ते दिसतात, आपल्या हातून जाणते- अजाणतेपणी घडलेल्या चुकांची जाणीव होते. अशावेळी, पटकन क्षमा मागून मोकळेही होतात.

वारी हा स्वतःला अधिकाधिक निर्मळ, अधिकाधिक सात्विक करण्याचा एक प्रवास आहे. शुद्ध सकारात्मक वातावरणात महिनाभर राहण्याचा अनुभव मोठा विलक्षण असतो. अत्यंत साध्या जीवनशैलीत राहायचं, पहाटेपासून ते रात्रीपर्यंत आपल्याला जगण्याचं शहाणपण शिकवणाऱ्या संतांच्या अभंग रचना गात गात चालायचं, निश्चित वेळी मोजकं आवश्यक तितकंच खायचं, आवश्यक तेवढंच पाणी घ्यायचं, संपूर्ण स्वावलंबी आयुष्य जगायचं, आपल्यापासून कुणाला उपद्रव त्रास होऊ नये याची पूर्ण काळजी घ्यायची, तोंडून चुकून सुद्धा एकही अपशब्द येऊ द्यायचा नाही, ऊन- वारा- पाऊस- थंडी जे जे अनुभवाला येईल ते गोड मानून घ्यायचं, कुठल्याही अपेक्षांमध्ये अडकून पडायचं नाही, असं जगणं आपल्या जगण्याचा पाया दिवसेंदिवस भक्कम करत जातं.

रोज संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी थांबलं की, पालखी तळावर कीर्तन असतं. आपण एकटेच असतो. दिवसभर चालून पाय थकलेले असतात. पण मन मात्र थकलेलं नसतं. अशावेळी साध्या पण अत्यंत मार्मिक संतवचनांमधून जगण्याचं प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारांच्या प्रासादिक वाणीचा प्रभाव पडतोच. संतांची चरित्रं उलगडली जातात. पुस्तकी साक्षरता आणि प्रत्यक्ष जगण्यासाठी लागणारी मूल्यं यांच्यात किती फरक असतो, याची जेवढी अनुभूती कीर्तनातून होते, तेवढी अन्य कोणत्याही माध्यमातून होणं कठीण. आपण माणूस म्हणून स्वतःमध्ये आणखी किती सुधारणा करायला हवी, याची फार रोखठोक जाणीव कीर्तनकार करुन देतात. कीर्तनानंतर हरिपाठ झाला की, धरणीवर अंग टाकून द्यायचं. एका क्षणात आपण निद्रादेवीच्या अधीन होतो. वारीच्या वीस दिवसांत जशी गाढ झोप लागते, तशी पुन्हा वर्षभर लागत नाही, असा अनुभव तुम्हाला कित्येकजण सांगतील. म्हणूनच, आपली विस्कटलेली आयुष्यं अन् चुकलेली जीवनशैली ताळ्यावर आणण्यासाठी वारी केली पाहिजे.

“काय झालं माऊली? ” मी अगदी शांतपणे विचारलं.

“काय नाय ओ. माऊलींनी माजं भिजत पडलेलं घोंगडं निस्तारलं बगा. ” तो रडत म्हणाला.

“कसलं घोंगडं? ” मी विचारलं. वारीत मुक्कामाच्या जागी असा संवाद होतोच. पण, एक फार मोलाची आणि आपण शिकण्यासारखी गोष्ट माझ्या लक्षात आली की, खरा वारकरी कधीही रडगाणं गात नाही. तोही माणूस आहे, त्यालाही भावना आहेत. पण समस्या, अडचणी यांना आहे तसं स्वीकारुन पुढं पाऊल टाकण्याची एक विलक्षण क्षमता त्यांच्याकडं आहे.

“अवो, पोरगा गेली तीन वर्षं ऐकतच नव्हता. यंदा तयार झाला. ” असं तो म्हणाला, पण मला काहीच उलगडा झाला नाही.

“जरा विस्कटून सांगा की. ” 

“काय नाय. बारावीला दोनदा नापास झाला. मी त्याला सांगत हुतो, आपल्याला जे जमंल ते करावं. उगं दुसऱ्यानं अमकं केलं म्हंजे आपनही त्येच करायला जाऊ नये. पन ऐकायला तयारच नई. “

“मग? “

“मी लई गोष्टी सांगून बघितल्या. इलेक्ट्रिक काम शिक, मोटार मेकॅनिकी शिक, टेलरिंग शिक. पन ते काय त्येला समजत नव्हतं. त्येच्या डोक्यात एकच खूळ – फॉरेनला जायचं अन् भरपूर पैसा मिळवायचा. ” 

“पण हे फॉरेनचं अचानक कुठून आलं डोक्यात? ” 

“अवो, मोबाईलवर काय ते बघायचं अन् तेच धरुन बसायचं. फॉरेनला जाऊन मोठ्या हॉटेलात काम करतो असं म्हनायचा. आता माजी धा एकर शेती, वीस पंचवीस जनावरं हयेत. एक पिठाची चक्की हाये. एक दुकान गाळा भाड्यानं दिलाय. उन्हाळ्यात ऊसाचं गुऱ्हाळ असतंय. डेअरीला दूध घालतो. थोडीफार तरकारी केली तर ती विकतो. आजून काय पायजेल सांगा. “

एक मिनिटभर मला काही कळलंच नाही. माझ्या शेजारी साध्या प्लॅस्टिकच्या कागदावर बसलेला तो माणूस. पायात साधी चप्पल, शेजारी एक कपड्याची पिशवी. दोन जोड कपडे, एक पंचा, एक पांघरुणाची गुलाबी शाल, एक टाळ एवढ्यावर पंचवीस दिवस पायी प्रवास करणारा एकदम कॉमन मॅन. त्याचं वार्षिक उत्पन्न बारा-चौदा लाख रुपये असेल असं मलाच काय, पण कुणालाच खरं वाटलं नसतं.

“पण मग हा तिढा सुटला कसा? “

“असल्या गोष्टीत घाई करुन उपयोग नसतोय, हे मी आमच्या मंडळीला अगोदरच सांगितलं होतं. त्यामुळं, घरी आमी त्याला काय टोचत बिचत नव्हतो. एक दिवस मी आमच्या चक्कीवर बसलो होतो. मनात विचार आला, हा गुंता माऊलींना सांगाया पायजे. घरी बोललो. दुसऱ्या दिवशीची एसटी धरली अन् पोराला घेऊन आळंदीला गेलो.” 

“मग? “

“देवापाशी डोकं टेकीवलं अन् अजानबागेपाशी सावली धरुन बसलो. मी पोराला म्हनलं, ‘हे काय खरं नाय गड्या. दोन वर्षं झाली, आपन अडकलोय. काई तरी तोड काडली पायजेल. मला काय वाटतं तुला सांगू का? ‘” 

“मग पोरगा काय म्हणाला? ” 

“पोरगा म्हनला ‘सांगा.’

“मी म्हनलं, भायेर जाऊन नोकरी करायची, यापतुर आपलंच कायतरी सुरु करु. हा अभ्यास काय तुला झेपत नई. मग कशाला वेळ काढायचा? मी म्हनलं, ते पोराला पटलं. इचार करु म्हनला. ” 

“मग जमलं का? “

“जमलं तर. दुसऱ्या दिवशी गडी एकटाच कॉलेजात गेला. बारावीला बाहेरुन बसायचा फॉर्म भरला. विषय बदलले. त्येचं तेनीच केलं. कॉलेजातले सर म्हनले, कुठं काय अडलं तर मी सांगतो. कामच झालं. रोज संध्याकाळी मी डेअरीला दूध घालून येईस्तोवर चक्कीवर बसायचा. दुपारी अभ्यास करायचा. “

“व्वा. चांगलं झालं की माऊली. तुमचं टेन्शनच गेलं. ” मी म्हटलं.

“तर ओ. फेब्रुवारीत परीक्षा पार पडली. दुसऱ्या दिवसापासून आमच्या एका मित्राच्या हॉटेलात त्येच्या हाताखाली कामाला जायला लागला. वडे, भजी, पुऱ्या तळायला शिकला. दीड दोन महिन्यात चांगला तयार झाला. लग्नसराई जोरदार सुरु होती. मसालेभात, रस्सा करायला शिकला. चांगला खुश असायचा. रात्री दमून भागून येऊन गाढ झोपायचा. त्येच आमचं सुख. ” 

मी एकदम गहिवरुन गेलो. कुणालाही न लुटता, न लुबाडता, खोटारडेपणा फसवाफसवी न करता, इमाने इतबारे कष्ट करुन, आपलं पोरगं दमून गाढ झोपलंय, यातच सुख मानणारा बाप मी बऱ्याच वर्षांत पहिल्यांदाच बघत होतो. सरळमार्गानं जग अन् हवा तेवढा मोठा हो, एवढीच अपेक्षा होती त्याची. “जिथे राबती हात तेथे हरी” इतकाच त्या वडिलांचा साधा सिद्धांत..!

बऱ्याचदा मुलांच्या त्यांच्या आयुष्याविषयीच्या अवास्तव अपेक्षा तयार होतात, त्याला कारणीभूत असतात पालकच..! पण इथं प्रकरण उलटं होतं.

“बारावी सुटला की नाही? ” माझी उत्सुकता तिथंच घुटमळत होती.

“सुटला? चांगल्या मार्कानी सुटला. साठ टक्के पडले. स्वतःच्या हातानं शिरा केला, सगळ्याना खाऊ घातला. आता दिवसभर हॉटेलात काम करुन नाईट कॉलेजात शिकायचं म्हनतोय. तर आपन कशाला अडवा? चांगलंच ठरवलंय त्यानं. “

“हे सगळ्यात बेस्ट. काम करत करत शिकलेलं चांगलं. त्याचं त्याला जाणवलं, हेच सगळ्यात महत्त्वाचं. पण मग आता डोळ्यात पाणी कशाला आणताय? ” 

“मी तुमाला काय म्हनलं, माऊलींची माया हाये आमच्यावर. इतरांना ती कळायची न्हाई. यंदा वारीला निघालो. आठ तारखेला प्रस्थान. मी तीन दिवस आधीच जात असतो, पन यावर्षी पाऊस जोरदार झाला. आळंदीला कुठनं जानार? पुन्यातच थांबायचं ठरत होतं. तर आमचा लेक आला पुढं अन् म्हनला, मी येतो दिंडीत. आचाऱ्याच्या हाताखाली काम करीन. मी कशाला नाई म्हनतोय? म्हनलं चला. पोरगं मार्गी लागतंय. आज रात्रीचा दीडशे मानसांचा पिठलं भाताचा सैपाक त्येनं एकट्यानं केलाय. सगळी दिंडी जेवून झोपली. नंतरच दोन घास खाऊन झोपलाय बगा तिथं. आता पहाटं तीनाला उठून चहा करंल. ” 

मी मागं वळून बघितलं. सामानाच्या ट्रकबाहेर एक विशितला पोरगा बसल्याजागी गाढ झोपून गेला होता..

“आपन एकदा त्यांना मनातलं सांगितलं की, मार्ग काढायची जबाबदारी त्यांची. ते बरोब्बर वाट दावत्यात. बसल्याजागी काय सुदा मिळत नाई ओ. आता पोरगं फॉरेनला जाईल नायतर नाई जाईल, पन आज घाम गाळाया शिकलं ना.. हुईल की तयार हळूहळू. बाकी काय का असंना, आज मोबाईल मधून भायेर आला, काम कराया लागला. परीक्षा पास झाला. आपनहून वारीला आला. आता देवानं अजून काय द्यावं म्हनता? सांगा.. “

विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । 

रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥ 

*

उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । 

रामकृष्णीं पैठा कैसेनी होय ॥२॥ 

*

द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । 

तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥ 

*

ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । 

नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥

 हा माऊलींचा शब्द त्यांनीच सकळ सिद्ध करुन दाखवला. गुरु आपल्याला आपला हात धरुन योग्य वेळी योग्य मार्गे नेतातच, याची खात्री पटण्यासाठी आणखी दुसरा कुठला दृष्टांत हवा?

“चित्ती असो द्यावे समाधान” चा खरा अर्थ मला माऊलींच्याच तळावर माऊलींच्याच समोर साक्षात अनुभवायला मिळाला होता. शिबी आणि मिडास दोघेही राजेच होते. पण शिबी राजाला त्याचं कर्तव्य पूर्ण समजलं होतं अन् मिडास राजा मात्र सोन्याच्या मोहातून बाहेरच येऊ शकला नाही. जितक्या कमी अपेक्षा, जितक्या कमी महत्त्वाकांक्षा, तितकं समाधान जास्त.. दोघांपैकी कुणाची निवड करायची, याचा निर्णय आपणच घ्यायचा. मी शिबी राजाची निवड केली. माऊलींच्या सहवासात, त्यांच्या प्रकाशात…

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, समुपदेशक, करिअर मार्गदर्शक

संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”कभी हां कभी ना” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “कभी हां कभी ना!” ☆ संध्या बेडेकर ☆

काल ताईकडे नातवाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्य मोठा कार्यक्रम होता. तसा आता थोडक्यात कार्यक्रम करायची पद्धत राहिलेली नाहीच. कार्यक्रम कोणताही असो, कार्यक्रम लहानसा असू शकतो पण तो event म्हणून जोरदार पद्धतीने साजरा होतो.

एकतर आता एकच एक चा जमाना आहे ना. म्हणजे मुलगा एक, त्याचे सर्व कार्यक्रम एकदाच, मग त्या मुलाचा मुलगा.. तो पण एकटाच. म्हणून कोणताही कार्यक्रम एकदाच करायचा, त्यामुळे तो event म्हणून करायचा असतो. पैसा भरपूर आहे, जवळचे मित्र मैत्रिणी High status चे मग… त्यांच्या status प्रमाणे करायचे असते. या अशा कार्यक्रमात कधी बायको, तर कधी नवरा दबक्या आवाजात विरोध करत असतो. पण शेवटी एकदाच तर करायचय… अस म्हणत सर्व तामझाम होतोच.

मित्र मैत्रीणिंच्या गृपमध्ये कार्यक्रम करायचा म्हणजे पाकिटावर जरा जास्त भार पडतो. कारण तेंव्हा स्वतःचे social status चा पण विचार असतो / किंवा दाखवायचे पण असते…

 नातेवाईंकासाठी करायचा असेल तर… त्यावेळेस नातेवाईकांचे status बघून कार्यक्रम होतो. Status प्रमाणे मेन्यू ठरतो. कोणाला बोलवायचे? कोणाला नाही? हे ठरत. status प्रमाणे हाॅटेल ठरत. तेथे उपस्थित असलेल्या सर्वांकडे लक्ष दिलच पाहिजे, अशी जबाबदारी वगैरे नसते. किंवा कधी कधी तर दुर्लक्ष केल तरी चालत.. कभी हां कभी ना कॅटेगरीतील नातेवाईकही असतातच की.

म्हणजे काही नातेवाईक असे असतात, म्हणजे बोलवाव लागतय म्हणून बोलवलय.

बाकी खूप लक्ष वगैरे द्यायची गरज नसतेच. पण असे लोक जेंव्हा नात कस असाव? या विषयावर बोलतात, तेंव्हा आ हा हा!!!. ऐकत रहावस वाटत. म्हणजे एवढी समज असलेले great च नाही का? म्हणजे मला वाटत राज्य स्तरीय स्पर्धेत या भाषणाला पहिल बक्षीस नक्की मळेल.

 हे लोक आयुष्यात कस वागतात? हे त्यांनाही माहित असत आणि आपल्यालाही. ते अगदीच तस वागत नाहीत, अस म्हणता येणार नाही. काही specific मोजक्या लोकांबरोबर तस वागतात. वेळ पडली तर झुकतात. आपला फायदा लक्षात ठेवून चमचेगीरी पण व्यवस्थित करतात.

शेवटी Status हा एक Issue सध्या खूप महत्वाचा झालाच आहे. दुसर्यांच status तेच ठरवतात.

पैसा बोलता है। म्हणतात ना ते खरच आहे.

 status issue म्हणजे पैसा, मोठ्ठ घर rather बंगला, मोठी कार, आणि मुख्य म्हणजे तो कामाचा आहे का? हे सर्व त्या माणसापेक्षा जास्त महत्वपूर्ण असत. अशा माणसाबरोबर काढलेली Selfie म्हणजे पण एक achievemet च असत. त्या माणसाबद्दल रंगवून रंगवून सांगण, हा त्यांचा छंद असतो.

 कधी बोलवून अपमान होणे, किंवा न बोलवून अपमान करणे ही या so called / self proclaimed high status वाल्यांचे common behavior असत. केंव्हा पलटी मारतील ते सांगता येत नाही.

काल एक so called/ self proclaimed श्रीमंत नातेवाईक भेटले. मागच्याच आठवड्यात त्यांच्या मुलाचे लग्न झाले. या वेळेस आम्ही कभी ना या option category त होतो. आम्हाला म्हणाले… तुम्ही आला नाहीत हो लग्नाला.

 खर म्हणजे ही गोष्ट खूप जूनी विसरण्यासारखी नव्हतीच.

मी आणि ताई एकमेकींकडे बघतच राहिलो. अरे! म्हणजे तुम्ही काहीही करा, चूक आमचीच.

अशा लोकांच काय करायच? समजत नाही.

एकदा वाटत स्पष्ट उत्तर द्याव. हे आपल्याला बुद्धु समजतात बहुतेक.

आपली चूक पण दुसर्यांच्या माथी मारायचा प्रयत्न करतात

We r different. असा समज असणारे हे लोक 

Occasion प्रमाणे this time only few dignitaries r invited. Not everyone. अस सहज वागतात…

ही अशी कभी हां कभी ना. वाली नातेवाईकांची category पण असते बर का…

आपण नाही का? काही वस्तू गरजेनुसार वापरतो, गरज संपली की आपण सहज म्हणतो… आता जरा बाजूला, वर माळ्यावर ठेवा. सध्या आपल्याला यांची गरज नाही ना, मग नंतर जर गरज लागली तर, तेंव्हा बघू. असा विचार करून ती वस्तू बाजूला ठेवतो.

ही वस्तुंची कभी हां कभी ना वाली कॅटेगरी झाली.

तसच माणसांच्या बाबतीत पण असत.

कभी हां, कभी ना.

हे असे equations समजायला वेळ लागतो. एकदा समजल्यावर त्रास होतो. रागही येतो. स्वतःशीच खूप वाद/ संवाद होतात. एका दृष्टीने बर होत. आपल्याला आपली पूढची line of action ठरवायला सोप्प होत. आपल्यालाही कुठे लाईन ओढायची हे ठरविता येत.

समोरच्याला आता आपण नकोय हा विचार मानसिक त्रास देणारा नक्कीच आहे.

उद्या या म्हणतील, तेंव्हा आपण नाही गेलो तर तुम्ही आला नाहीत? का बर?

म्हणजे चित भी मेरी, पट भी मेरी.

या अशा परिस्थितचा आनंद घेणारे/ आग लावणारे पण असतातच की. लगेच कधी कधीच फोन करणारे, पण अशा वेळेस नक्कीच फोन करतात…

हो का? अग बाई! तुम्हाला मेसेज नाही मिळाला का? अस नक्कीच म्हणतील…

वाढत्या वयाबरोबर, अनुभवांवरून बरच काही समजू लागल आहे.

नात सांभाळण ही फक्त एकाच पार्टीची जबाबदारी नाही/ नसते.

हे खरय… At the same time…

You cannot force someone to 

respect you. but you can choose to walk away when they don’t. and that decision can change the direction of your life.

हर तकलीफ से इंसान का दिल दूखता बहुत है। पर हर वह तकलीफ से वो सीखता भी बहुत है।

आजकाल दिवसातून शंभरदा फोनवर डिलीट चे बटन दाबतोच ना. आपण unwanted messages delete कतोच ना.. तसच आपले विचार शांतमनाने फिल्टर करायचे, आणि आपली माणसांची लिस्ट Review करायची आणि जिथे आपल्याला

 value नाही, त्यांना महत्व द्यायची गरज नाही. तेथे डिलीट चे बटन दाबायचे. Option कॅटेगरीत स्वःतला ठेवायचे नाही.

तिथे आपला वेळ एनर्जी, वाया घालवायची गरज नाही. लगेचच आपल्या महत्वाच्या कामांची लिस्ट काढायची आणि त्यावर फोकस करायचे.

Distance is the new and only answer for such people.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुम्ही स्वतःचे कौतुक करता का? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

स्मिता सुहास पंडित

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ तुम्ही स्वतःचे कौतुक करता का? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

या धावपळीच्या जगात आपण इतरांच्या यशाचे कौतुक करायला कधीच विसरत नाही. मित्राने पदोन्नती मिळवली की आपण टाळ्या वाजवतो, कुणी छान जेवण बनवले की आपण त्याची स्तुती करतो. पण, कधी आपण आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यांत बघून “शाब्बास! ” म्हटलं आहे का?

… स्वतःचे कौतुक करणे म्हणजे स्वतःला जगापेक्षा श्रेष्ठ समजणे नव्हे, तर स्वतःमधील चांगल्या गुणांची प्रांजळ कबुली देणे होय.

… आपण दिवसभरात कितीतरी लहान-मोठ्या लढाया लढतो. कधी मनातील नैराश्यावर मात करतो, तर कधी थकलेले असतानाही कुटुंबासाठी हसून काम करतो. या प्रत्येक छोट्या विजयासाठी आपण कौतुकास पात्र आहोत.

… आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की;”स्वतःची स्तुती स्वतः करू नये. “

.. पण विचार करा, जर आपणच स्वतःच्या कष्टाची किंमत जाणली नाही, तर जग तरी ती का जाणेल? स्वतःचे कौतुक केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो. जेव्हा आपण स्वतःला सांगतो की;”मी आजचा कठीण प्रसंग धैर्याने हाताळला, “तेव्हा आपल्या मनाला एक वेगळीच उभारी मिळते.

… आज तुम्ही एखादे काम वेळेत पूर्ण केले? स्वतःची पाठ थोपटा.

.. आपण माणूस आहोत, चुका होणारच पण, त्या चुकांमधून शिकून पुढे जाण्याच्या वृत्तीचे कौतुक करा.

.. दिवसातून एकदा आरशात पाहून स्वतःला एक छान स्मितहास्य द्या. म्हणा की;”तू जसा आहेस, तसा उत्तम आहेस. “

… स्वतःचे कौतुक करणे ही एक मानसिक गुंतवणूक आहे. यामुळे आपण केवळ आनंदीच राहत नाही, तर इतरांनाही सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो.

.. लक्षात ठेवा, या जगाच्या रंगमंचावर तुमची भूमिका तुमच्याइतकी उत्तम दुसरं कोणीच साकारू शकत नाही.

.. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा आणि हक्काने स्वतःचे कौतुक करा! कारण….

.. कारण तुम्ही ‘खास ‘आहात.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

सांगली – ४१६ ४१६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गिरणगाव सोलापूर आणि दहा तारीख… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ गिरणगाव सोलापूर आणि दहा तारीख… ☆ शीला पतकी ☆

☆

सोलापूर शहर हे 60 /65 वर्षांपूर्वी गिरणीवर चालणारे गाव होतं. गिरणगाव या नावानेच ते ओळखलं जायचं. सरकारी कार्यालयातील कर्मचारी म्हणजे सरकारी नोकर, एसटीतील कर्मचारी, रेल्वेतील कर्मचारी आणि उरलेली तमाम जनता जुनी गिरणी नरसिंग गिरजी, लक्ष्मी विष्णू मिल जाम मिल आणि फुटाणे गिरणी नावाची गिरणी होती. मला त्याबद्दल फारशी माहिती नाहीये पण तिचं नाव मी ऐकले आहे..

हे संपूर्ण शहर आर्थिक व्यवस्थापनासाठी गिरण्यांवर अवलंबून होते. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार एक तारखेला, एसटी वाल्यांचा पगार सात तारखेला, आणि सर्व गिरण्यांचे पगार मात्र दहा तारखेला होत. त्यामुळे दहा तारखेला सोलापुरात दिवाळी..! 

75 टक्के गाव हे गिरणीवर अवलंबून… वडिल कुठे काम करतात विचारलं तर वर्गातील किमान 30 पोरं तरी सांगायची गिरणीमध्ये काम करतात. गिरणीचा पगार हा दहा तारखेला होत असे त्यामुळे दहा तारीख ही सर्व कामगार वर्गाच्या आयुष्यामध्ये दिवाळीची तारीख असायची… म्हणजे किशोर कुमारच गाणं आहे की खुश है जमाना आज पहिली तारीख है तस आज दस तारीख है.. अशी परिस्थिती होती.

दहा तारखेला सकाळपासूनच घरामध्ये आज वडिलांचा पगार होणार म्हणून मुल आनंदी, नवऱ्याचा पगार होणार म्हणून बायको आनंदी, लेकराचा पगार होणार म्हणून आई बाप आनंदी! त्यादिवशी सगळे गाव आनंदाच्या आगमनाच्या लगबगीत असायचं कारण शेवटचे चार-पाच दिवस हे उसनवारीत गेलेले असायचे. त्यामुळे दहा तारखेचा उत्साह वेगळा असायचा. तो केवळ घरातच नाही तर गावातही वेगळा असायचा. गिरणीत जाणारा प्रत्येक माणूस येताना खिशात पगार घेऊन येत असे त्यामुळे जाताना त्याचे चेहरे आशावादी आणि येताना प्रफुल्लीतच…. असं शहराचं वातावरण…!

अगदि हे तसंच असायचं गिरणीच्या रस्त्यावर…. संध्याकाळी दुतर्फा मिठाईच्या गाड्या लागलेल्या या गाड्यावर रंगीबेरंगी दाणे असलेले बुंदीचे लाडू.. शेवेने भरलेली गच्च ताट… तिच्यातही बारीक शेव जाडी शेव गोडी शेव असे प्रकार…. चिवड्याची टोपली… जिलबीची केशरी परात…. त्या सगळ्यांना रंगीबेरंगी कागद..! गाडीवाल्याच्या गाडीत वजन मापाचा काटा… वर्तमानपत्राची रद्दी आणि सुताचा गुंडा इतकं सामान…! प्रकाशाची फारशी व्यवस्था नसलेल हे गाव त्या दिवशी या गाड्यांवरती पेट्रो मॅक्स म्हणजे बत्त्या किंवा टेंभे यानी झगमगून जायचे. बाजूला असणाऱ्या फाटकावर, मरीआई चौकात, भैया चौकात भरपूर भाज्या घेऊन बसलेले भाजीवाले अस एक फार उत्साही दृश्य असायच. त्याचबरोबर बाहेर उभी असणारी काही दांडगट माणसंही असायची… ते असायचे रोहिले पठाण…. हे या गरीब कामगारांना व्याजाने कर्ज द्यायचे…. कामगाराकडे महिन्याचा पगार जेमतेम कुटुंब भागवणे एवढा असायचा. जुजबी आजारासाठी गिरणी दवाखाने मोफत होते पण मोठ्या आजारावर बाहेरचा औषध उपचार करावा लागायचा त्याला पैसा खर्च व्हायचा असे विमे वगैरे त्या काळात नव्हते. त्यासाठी, पोरबळांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा प्रपंचाला कमी पडतं म्हणून ्या बिचार्‍या गरीब कामगारांना कर्ज काढावच लागायचं… या कर्जाला व्याज असायचा आणि त्या व्याज वसुलीसाठी ही पठाण मंडळी दहा तारखेला गिरणीच्या दारात उभे….! प्रत्येक गिरणीच्या दाराशी असे पठण दिसायचे त्याची नजर चुकवून जाणं केवळ अशक्य..! तिथेच त्या पगारातले व्याजापुरते रक्कम काढून द्यावी लागायची आणि मग उरलेला पगार तो कामगार घरी घेऊन यायचा….!तरीही येताना आपल्या लेकरा बाळांसाठी लाडू चिवडा ते वर्तमानपत्राच्या दोऱ्याने बांधलेल्या पुडयात आनंदाने घेऊन यायचा.

लेकर बाळ दारामध्ये बापाची वाट बघत बसलेली असायची. तिथेच जुन्या गिरणीच्या चाळी नरसिंग गिरजि चाळी आहेत. भैय्या चौकात हीआहेत सगळी गिरणीच्या आसपास राहणारी मंडळी. प्रत्येक घरातलं पोर बापाला लांबून येताना पाहून आनंदित व्हायचं बापाच्या हातातली पिशवी घेण्यासाठी ते आनंदाने धावायचे जगातली सगळी सुख देणारा बाप त्यांना त्या दिवशी खूप मोठा वाटायचा…. कारण त्याच्या हातात जिलबी शेव चिवडा लाडू ही स्वप्नवत वाटणारी खाद्य श्रीमंती असायची…! आज या पदार्थाकडे डुंकुनी न पाहणारी पिढी पाहिली की आमचे दिवस आम्हाला आठवतात. जिलब्यांच्या वेटोळ्या प्रमाणे गोल गोल फिरणार आमचा आयुष्य तिथेच रिंगणात राहणार होतं. बुंदीच्या लाडवातला एकही बुंदीचा कण सांडणार नाही अशी दक्षता घेऊन आणि ते खाद्यपदार्थावर कागदाच्या तुकड्यावर संपवत असू.

प्रत्येक घरातला बाप आणलेला पगार खिशातून काढून म्हाताऱ्या आईच्या हातात ठेवत असे. देवाजवळ दिवा लावून ती सुद्धा पांडुरंगा समोर तो पगार ठेवून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असे आणि मग तो पैसा घर खर्चाला वापरला जायचा. त्या तोकड्या पैशात ते घर समाधानांन भरून जायचं कारण… घरात विठ्ठल रुक्माई सारखे आईबाप आणि श्रीकृष्ण पेंद्या यांच्यासारखाच गोकुळ असायचं. घरात आजीच्या भोवती गोळा झालेली मुलं बापान आणलेला खाऊ आजीने वाटून दिला की आनंदाने खाऊन पसार व्हायची. फार पैसा नसला तरी समाधान होतं आणि त्या समाधानाच सुखही ही मोठं होतं.

त्यादिवशी चाळीतल्या भजनाला मोठी रंगत यायची किती थोड्या पैशात किती समाधानी होती माणसं..! आमच्या घरी त्या दिवशी बेकरीतला मोठा ब्रेड यायचा तो दुसऱ्या दिवशी सकाळी चहा बरोबर खायला मिळायचा त्यामुळे रात्री ब्रेड खाण्याचे स्वप्न उराशी घेऊन आम्ही झोपायचं.. इतकं साधं जीवन होतं पगाराच्या दुसऱ्या दिवशी गिरणीच्या बाजूचे चौक फुललेले असायचे. भैया चौकात कॅन्टीनस सगळी भरलेली असत भजी आणि चहा यांच्यावर ताव मारत… विविध पक्ष संघटना तिथे चर्चा करायच्या.. कामगारांच्या हक्काच्या… त्यांना काय काय मिळालं पाहिजे याच्या. कामगार पुढारी तिथे असायचे ते आपल्या मागण्यांसाठी काही कार्यक्रम आखायचे… आंदोलन व्हायची चळवळी व्हायच्या… चहा पिणारे चहाचे हॉटेलात…. दारू पिणारे दारूच्या गुत्त्यात जायचे पण… दारूबंदीच कार्य प्रभावी असल्यामुळेदारू झोकून माणसअशी राजरोस रस्त्यावरून फिरत नव्हती किंवा त्याला आळा तरी होता. दुकानातून औषधाची बाटली विकत आणावी इतकी सहजासाची दारू उपलब्ध नव्हती आणि दारू प्यायला जाणारा माणसाला समाजात फारसा मान नसायचा त्यामुळे ते सगळं चोरून व्हायचं. एकत्र कुटुंब असल्यामुळे आई बापाचा धाक असायचा. मोठा भाऊ बापाच्या जागी त्यामुळे एक चांगली भीती असायची. गिरणीतली तरुण पोर सहजासहजी चुकीच्या मार्गाला जात नव्हती खरं तर ही गिरणीत काम करणारी मंडळी शेजारच्या खेड्यातन आलेली एक भाऊ थोडी शेती करतोय दुसरा नोकरी करायला आला त्यांन आणखीन आपल्या धाकट्या भावाला बोलवून घेतलं अशी त्यांची कुटुंब शहरात वाढलेली. गिरणीच्या मालकाने त्यांच्यासाठी चाळी बांधून दिलेल्या त्यामुळे जुनी गिरणीच्या चाळी, नरसिंग गिरजीच्या चाळी अशा चाळीने त्यांच्या घराच्या राहण्याचे प्रश्न सोडवूनच टाकले होते पाणी दोन्ही वेळा यायचं कारण गिरण्या तीन पाळ्यात चालायच्या त्यामुळे पाण्याच व्यवस्थापनही त्यांच्या वेळेनुसार असायचे गिरणीच्या भोंग्यानी शहर जागे होत असल्यामुळे शहराला उद्योगाचे वळण होते.

कामगारांच्या विकासासाठी सरकारने स्थापलेली कामगार कल्याण केंद्र असायची ते अशाच गिरण्यांच्या आसपास किंवा कामगारांच्या वसाहतीत होती. ती केंद्र तरुण मुलातून खेळाडू तयार करायचे गिरणीतल्या तरुण मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून वर्तमानपत्र आणि उत्तम पुस्तक ठेवायचे म्हणजे त्यांचे ग्रंथालय होते खेळाचे सामने भरवायचे… नाटकाच्या स्पर्धा व्हायच्या…! दुपारच्या वेळेला हेच केंद्र महिलांसाठी उघडे असायचे. तिथे शिवण वर्ग, विविध कलाकुसर शिकवणारे शिक्षक येऊन शिकवायचे, महिलांच्या विविध विषयावर वेगवेगळ्या व्याख्यातांना बोलवून व्याख्यानं व्हायची, त्यामध्ये मुलाचे संगोपन कसे करावे… गरोदर स्त्रीने कोणती काळजी घ्यावी… यासारख्या असंख्य विषयावर मार्गदर्शन होत असे… शिवण्याच्या मशीन असायच्या त्यामुळे बायका कपडे शिवून घेऊन जायच्या… मुलींची त्यांची नाटकं व्हायची छोट्या मुलांना सिनेमे दाखवले जायचे… सिनेमा म्हणजे ते माहितीपट असायचे.. पण केंद्रात सिनेमा आहे म्हटलं की सगळी पोरं धूम केंद्रात पळायची. केंद्र चालवणारी मंडळी खूप छान होती तळमळीने काम करणारे होती. ह्या कामगार कल्याण केंद्रा संदर्भात एक स्वतंत्र विषय करून लिहीन तेव्हा अशी कामगार कल्याण केंद्र ह्या गिरणीतल्या कामगारांच्या कलागुणांना वर्धिष्णू करीत मनोरंजन करीत आणि संस्कारही करीत होते… त्यावेळी कामगारात गुंड होते गटबाजी करणारे होते पक्ष वाले होते त्यांच्या त्यांच्यात इंटक वगैरे अशी काही संघटनांची आम्ही नाव ऐकत असू व्यंकप्पा मडूर हे चळवळीतलं नाव अशी बरीच नाव त्यावेळेला कानावर येत होती त्यांचे मोर्चे असायचे आंदोलन असायची पण गिरणी पेटवली… गिरणी जाळली… गिरणीत दगडफेक झाली… असे मात्र होत नव्हते. कारण काम करायच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा होती हे हिंसक प्रकार आंदोलनात नव्हते… काय ते रस्त्यावर थोडे व्हायचे… अर्थात हे शहर धाडसी मर्दांच होतं आहे. प्राणाची पर्वा न करता लढणारी माणसं या शहराने दिली. खून व्हायचे मारामाऱ्या व्हायच्या तशी थोडी सोलापूरची दहशत होती लोकांना, अगदी इंग्रजांना सुद्धा…! आम्हाला असं सांगायचे की इंग्रज, वर्तमानपत्रात सोलापूर हे नाव वाचले तर त्यांच्या हातातलं वर्तमानपत्र कापायचं इतकी दहशत नावात होती. इंग्रजांच्या नकाशात लाल रंगाने स्पॉट केलेल आपलं गाव होतं पहिला हुतात्मा या देशाला सोलापूर ने दिलाय तो शंकर शिवदारे… त्यांच्या आत्मसमर्पणाने स्वातंत्र्य चळवळीला ही उधाण आले होते.. अशा झोकून देऊन काम करणाऱ्या कामगारांचे जगत असलेले गाव…. सगळ्या गिरण्या राजकीय निष्क्रियतेमुळे कटकारस्थानामुळे हळूहळू बंद पडल्या.

तीन मोठ्या गिरण्यांची मिळून झालेली एक सोलापूर स्पिनिंग अँड विविंग मिल म्हणजे जुनी गिरणी पहिल्यांदा बंद पडली ती अनेक वेळा बंद पडत होती पण 64 स*** पूर्ण बंद झाली खूप आंदोलन झाली चळवळी झाल्या माणसं 50 दिवस उपोषणाला बसली लोक भाबडे आणि गरीब होते आणि नेते लबाड होते आपलीच गिरणी बंद पाडून स्वस्तात विकत घेणारे मुरारका यांना मदत करून आपलं उखळ पांढरं करून घेणारे नेतेही होते. बघता बघता एक एक गिरणी बंद पडत गेली सोलापूर बेकारीच्या खाईत गेलं… मधले अनेक वर्ष सोलापूरचा विकास थंड झाला… त्याला कारण उद्योग नाही!आजही फरशा उद्योगाची निर्मिती नाहीच आहे…

असो एकेकाळी चारच्या भोंग्याला उठणारे गाव निवांत म्हणून ओळखलं जाऊ लागलं याचं वाईट वाटतं डोळ्यात फक्त समाधानी होण्याचं स्वप्न घेऊन झोपणारा सोलापूरकर गिरणी बंद पडल्यानंतर ना सुखी झाला ना समाधानी राहिला. मधल्या एका पिढीच्या अफाट संघर्षानंतर गिरणगाव ही ओळख संपत आली तिथे काम करणारे आणि गिरणीवर अवलंबून असलेली गिरणीच्या पगारावर मोठी झालेली आणि गिरण्या बंद झाल्यानंतर होरपळून निघालेली तीआमची पिढी आता संपत आली. आता सोलापूर नवनविन उद्योगाने पुन्हा भरारी घेत आहे. चांगले नेते मिळाले तर कदाचित सोलापूरला हे पुनर्वैभव प्राप्त होईल. दुर्दैव हे आहे की आम्हाला मतदानापुरतं वापरलं जातं असो तो आजचा विषय नाही. आता सोलापुरात पगार एक तारखेला होतात विविध चांगल्या वाईट उद्योगातून सोलापूरकर मुलांच्या खिशात पैसे खुळखुळत आहेत तरुणांनी आपापले छोटे छोटे उद्योग शोधले आहेत माणसं पोट भरत आहेत काहीनी पुणे मुंबई जवळ केली तरीही सोलापूरची लोकसंख्या वाढली दोन तीन लाख वस्तीचं गाव बारा लाख वस्तीत रूपांतरित झाले. खूप चांगले बदल झालेत पण दहा तारखेची ती मजा ते पेट्रोल मॅक्स च्या गाडीतले हिरवे पिवळे कागद गुंडाळलेले लाडू जिलबी शेव चिवडा त्याच्या त्या गाड्या… भरगच्च भरलेली भजनी मंडळी हे सारं सार आजही डोळ्यासमोर येतं आणि दर दहा तारखेला वर्तमानपत्राच्या पुड्यात खाऊ बांधून आनंदाने आपल्या लेकरांसाठी हातात घेऊन येणारा बाप डोळ्यासमोर दिसतो… फार छान होते दिवस… सुखाचे नसतील पण समाधान मात्र होते कॅलेंडर वरची दहा तारीख पाहताना आजही गाणं तोंडावर येतं…

‘खुश आहे जमाना आज दसवी तारीख है…!’

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फ्रेंडशिप डे – – लेख क्र. ३ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ फ्रेंडशिप डे – – लेख क्र. ३ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

त्या दिवशी फ्रेंडशिप डे असल्यामुळे भरपूर मित्रांबरोबर शुभेच्छांची देवाण-घेवाण झाली. काही मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा पण झाल्या.

… तुमचे पण मेसेजेस आणि गप्पा नक्कीच झाले असतील.

काल सकाळी नात तन्वी हिचा फोन आला : “ हॅपी फ्रेंडशिप डे. ” 

मी पण तिला हॅपी फ्रेंडशिप डे म्हणालो.

मी : अगं आज फ्रेंडशिप डे आहे, ग्रँड फादर डे नाही.

तन्वी : आबा माहिती आहे. ग्रँड फादर च्या आधी यु आर माय बेस्ट फ्रेंड. तुम्ही माझ्याशी नेहमी मस्त गप्पा मारता. समजावून सांगता. म्हणून यु आर माय फ्रेंड.

… या संवादावर मी सहज विचार केला आणि लक्षात आलं की आजोबा आणि नात या नात्याला मित्र मित्र ही पण जोड दिली तर जास्तच मजा येईल.

आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्या मागे अनेक विशेषणे लावून, स्टेटस लावून वावरत असतो. माझा धर्म, माझी जात, पोटजात वगैरे वगैरे ओळख लावून आपण आपसांमध्ये दुरावा निर्माण करत असतो. घराबाहेर खरंतर फक्त स्वतःचे नाव आणि सगळ्यांचा मित्र एवढीच आपली ओळख असावी.

घरामध्ये असताना नवरा, बायको, आई, वडील वगैरे विशेषणे आपल्या मागे असतात, त्यामुळे आपला अधिकार जागृत होतो. असं करू नका, तसं करू नका, असे आपले उपदेश सुरू होतात.

वयस्कर आई-वडिलांना मुलं असं करू नका, तसं करू नका, असे बजावत असतात. वयस्कर वडील मुलांना/ नातवंडांना सारखे सल्ले देत असतात. नवरा बायको यांच्यामध्ये पण हीच भाषा असते. पुढे त्याचे रूपांतर वादावादी आणि घरामध्ये ताण तणाव यामध्ये होते. घरातले संवाद, हसणं खिदळणं हे सगळचं लोप पावतं. आणि सगळे फेसबूक आणि व्हाट्सअप ला आपला कृत्रिम मित्र करतात. आणि यांचा अतिरेक तब्येती करता कसा त्रासदायक ठरतो हे आपण बघतोच

… म्हणून नातं या विशेषणातून बाहेर काढणारा सोपा मार्ग म्हणजे, आपल्या नात्याच्या बरोबर मित्र हा शब्द सोडायचा….. नवरा मित्र, बायको मित्र, सासु मित्र वगैरे.

… घरची जबाबदारी पार पडताना मी बायको करता नवरा असणार आणि इतर वेळा मित्र असणार.

… घरामध्ये वयस्कर वडील आहेत त्यांची जबाबदारी पार पाडताना मी त्यांचा मुलगा असणार, इतर वेळेला त्यांचा मित्र असणार.

आपण सगळ्यांनीच जर हा विचार अमलात आणला, तर “आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” असेच छान वातावरण घरात आणि बाहेर नेहमीच राहणार हे नक्की.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पिशव्यांची पिशवी!… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ पिशव्यांची पिशवी!… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

☆

मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय घराची काही वैशिष्ट्यं असतात – – – 

.. डब्याला झाकण सापडत नाही, पण झाकण मात्र फेकायचं नसतं.

.. घरात कुठेतरी एक डबा असतो, ज्यात स्क्रू, खिळे, रबरबँड, जुन्या चाव्या आणि कशाचे आहेत हे देवाला ठाऊक असलेले दोन प्लास्टिकचे पार्ट असतात.

आणि स्वयंपाकघराच्या दारामागे असते— पिशव्यांची पिशवी!

तिचा जन्म कधी झाला हे घरात कुणालाच माहीत नसतं.

…… भाजीची पिशवी आली—आत.

मेडिकलची आली—आत.

कपड्यांच्या दुकानातून जरा जाड पिशवी मिळाली की तिचं प्रमोशन—

“ही ठेव हं. चांगली आहे!”

आता आपल्या घरात ‘चांगली पिशवी’ ही फार व्यापक संकल्पना आहे. जिला भोक नाही, ती चांगली!

कधीतरी पिशव्यांची पिशवी इतकी फुगते की दारामागून बाहेर डोकावू लागते.

…. मग घरातला एखादा धाडसी माणूस प्रश्न विचारतो,

“एवढ्या पिशव्या कशाला हव्यात? ”

त्यावर उत्तर येतं,

“तुला काय त्रास होतोय? राहू दे. कधी तरी लागतील!”

मध्यमवर्गीय संसारात ‘कधी तरी’ या दोन शब्दांनी जेवढी जागा व्यापली आहे, तेवढी बहुधा फर्निचरनेही नाही.

दहा वर्षांपूर्वीच्या मोबाईलचा चार्जर आहे. मोबाईल गेला, कंपनी गेली, कदाचित तो चार्जिंग पोर्टसुद्धा इतिहासजमा झाला—पण चार्जर आहे.

दिवाळीत आलेल्या मिठाईचा सुंदर डबा आहे. त्यात मिठाई नाही. सध्या काहीच नाही. पण डबा फेकायचा नाही… कारण? “चांगला आहे!”

आणि एक शर्ट आहे. तो सध्या बसत नाही.

पण त्याला फेकण्याचा प्रश्नच नाही.

“पाच किलो कमी झालं की होईल!”

तो शर्ट कपडा नसतो. तो आशावादाचा पुरावा असतो!

मला कधीकधी वाटतं, आपण वस्तू साठवतच नाही.

आपण ‘कधी तरी’ साठवत असतो.

.. कधी तरी लागेल.

.. कधी तरी उपयोग होईल.

.. कधी तरी वेळ मिळेल.

.. कधी तरी मी पुन्हा तसा होईन.

आणि मग एक दिवस जाणवतं—

आपल्या मनातसुद्धा अशीच एक पिशव्यांची पिशवी आहे.

.. दहा वर्षांपूर्वी कुणीतरी केलेला अपमान अजून आहे.

.. पाच वर्षांपूर्वीचं कौतुकही आहे.

.. एक निर्णय चुकीचा घेतला होता, तो आहे, त्याचं गिल्ट आहे.

.. कुणीतरी आपल्याशी कसं वागायला हवं होतं, त्याची अपेक्षा आहे.

.. आणि त्या भांडणात समोरच्याला द्यायचं राहून गेलेलं भन्नाट उत्तर तर अगदी व्यवस्थित जपून ठेवलंय!

…. कशासाठी?

.. बहुधा…“कधी तरी लागेल!”

भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात—

विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः ।

निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥

“माझं’ म्हणून प्रत्येक गोष्ट घट्ट धरून ठेवण्याची गरज ज्याला उरत नाही, तोच शांततेकडे जातो.

गीता घरातल्या पिशव्या फेकायला सांगत नाही.

…. ती कदाचित मनातल्या पिशव्या तपासायला सांगते.

कारण कपाटातल्या पिशव्यांनी फार तर जागा अडते.

…. मनातल्या पिशव्यांनी आयुष्यच अडतं.

…. जुना अपमान, जुना अहंकार, जुनं यश, जुनी चूक, जुनी अपेक्षा—सगळंच ‘कधी तरी लागेल’ म्हणून जपून ठेवलं, तर नवीन अनुभव ठेवायचे कुठे?

कदाचित अपरिग्रह म्हणजे घर रिकामं करणं नव्हे. तर कालचं किती उद्यापर्यंत वाहून न्यायचं, हे ठरवता येणं.

.. त्यामुळे पुढच्या वेळी पिशव्यांची पिशवी खाली उतरवून आवरायला घेतली, तर एक पिशवी आणखी उघडून पाहूया.

.. मनातली पिशवी |

…. उपयोगाचं असेल ते ठेवू… शिकण्यासारखं असेल तेही ठेवू.

बाकीचं?

सरळ टाकून देऊ.

…… कारण प्रत्येक गोष्टीला—

“कधी तरी लागेल!”.. असं म्हणत राहिलो, तर एक दिवस *आज* ठेवायलाच जागा उरणार नाही.

☆

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares