मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “वाट…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? मनमंजुषेतून ?

☆ “वाट…” ☆ प्रा. भरत खैरकर 

मुख्य रस्ता सोडून आपल्याच धुंदित एकटी एकटी भटकत चालल्यागत वाटणारी ती वाट आठवली की आपण जणू याच रस्त्यानं नेहमी जात येत राहावं असं वाटायचं. मामाच्या गावाच्या त्या वाटेचं मला

बालपणापासून विलक्षण वेड. मी आत्ताही जेव्हा केव्हा मामाच्या गावी जातो ना तर मुख्य रस्ता सोडून ह्या वाटेकडे वळलोच म्हणून समजायचं. या रस्त्यानं कोण जादू केली कोणास ठाऊक?

रस्ता सोडला रे सोडला की लगेच येणारा ओहळ… त्याचं झुळझुळ वाहणारं पाणी… त्या स्वच्छ नितळ पाण्याखालच्या गारगोट्या… बारीक रेती…. मोठ्या दगडांवर जमा झालेली हिरवीगार लव्हाळी. साऱ्यांना एकवार नव्हे, पुन्हा पुन्हा बघितल्याशिवाय पुढे न जाण्याचा जणू माझा नियम. गोट्यांवरून तोल सांभाळत अगदी जोडा न भिजविता पलिकडे जाण्याइतकं पाणी असूनही मला मात्र पाय भिजविल्याशिवाय बरं वाटत

नाही! मामा सांगायचा, ‘जेव्हा आम्ही तुमच्या एवढाले होतो, तवा येथे लाल्या माहाराचं राज्य होतं. येणाऱ्या जाणाऱ्याले तो ह्याच नाल्यामंदी मुद्देमालासकट लुटत होता. पण जीव मात्र कोणाचा घेत नव्हता.

“लहानपणी पोटासाठी लाल्या म्हार लुटालूट करतो असे वाटायचे. “तो चांगला हाय कारण कोणास्नी जीवान मारत नाय”. असं मामाचं ऐकलं की लाल्या म्हारास्नी पाची लयी विच्छा व्हायाची, पण लाल्या म्हाराची भीती आता मुळीच वाटेना ही हुरहुरही पिच्छा सोडीत नाही. उगीच मोठेपणातलं अपराधीपण जाणवतं.

नाल्याशी जुळलेल्या अशा अनके कथा आहेत. पाहणारा माणूस एवढ्याशा नाल्यानं कधीकाळी ह्या बोरीचा सत्यानाश केला होता ह्यावर विश्वास कसा ठेवणार? अख्खं बोरी वाहून नेणाऱ्या ह्याच नाल्यावर सालभर बोरीवाल्यांचा पाण्याचा बिकट प्रश्न सोडविला जातो. रस्त्यावरचं घुटनाभर पाणी अख्ख साल पुरून उरतं! म्हणूनच की काय बोरीवाल्यांच्या ठायी ह्या नाल्याचं महत्त्व “कपीलागाई” च आहे. असा नाला ‘पायाखालून सोडता सोडवत नाही. पायात मोजे घातल्याप्रमाणे गुडघ्याच्या थोडसं खाली म्हणजे पोटऱ्यापर्यंत ओले झालेले पाय सुकेस्तोवर हातात जोडे घेऊन पुढे चालायचं. बरोबर हे ओले पाय टावर लाईनची ती लांबच लांब लाईन आडवी जाते त्या तिथवर सुकतातच. तिथं मग भल्या मोठ्या काळ्या शिळेवर बसून कुणीतरी

त्यावर कधीकाळी कोरलेलं “शाम विमल” वाचायचं नि मोजे उतरवून खरे मोजे चढवायचे. त्यामागून जोडे धरून वरून आलेला हात झटकून टाकायचा. तोवर तरतरी आलेली. कोणी बाईमाणूस आपल्या वयाचं जेव्हा इथून आपल्यासंग असतं तेव्हा उगीचच ती विमल असावी असं वाटतं अन्‌ आपण शाम.. उगीचच.!! “’शाम विमल” कोरण्या मागची पुरी कल्पना काय हे माहित नसूनही ते प्रेमिकांच जुळलेपण असावं असंच वाटतं. त्या शिळेमार्फत सत्य ते काय जाणून घेण्याची इच्छा होते. पण दगडच तो!! तो काय बोलणार? एखादा हिंदी चित्रपट आठवून जातो पुनर्जन्माच्या कथानकाचा. कदाचीत ह्या शिळेखाली शाम-विमल दोघेही गाडले देखील… हा विचार मनी आला न आला तोच अंगावर शहारे येतात. भीतीपोटी रेंगाळलेले पाय झपाझप चालू लागतात. सोबत असली तर गती किंचित कमी. मात्र इथून गती वाढते. आपल्याला

लवकर पोहचायचं हा दबलेला विचार उसळी मारून पायात येतो नि गतीत परावर्तित होतो.

आपण नुसतं चालायच यंत्रवत. मागून कुणी अद्भूत शक्ती ढकलत असल्यासारखं एखाद किलोमीटर पावेतोचा तो चढाव न थकता आपण पूर्ण करणार. न्युटनची गुरूत्वाकर्षण शक्ती ह्या ठिकाणी आपल्याला वर वर नेणारी.! चढावांवर असलेली नर्सरी त्यातील ते गेस्ट हाऊस अगदी ऑस्ट्रेलियन पद्धतीच्या घरांची

आठवण करून देणारं. आपले पाय नर्सरीकडे वळतात. बऱ्याच जणांना नर्सरीतल्या झाडांची ठेवण चांगल्या नावाजलेल्या बगीच्यांना लाजविणारी आहे ह्याची माहिती नाही. नर्सरीतला परसराम मामाच्याच गावचा. पहिल्या पहिली तो मामाकडे माझ्या लहानपणी शेती करायचा. आम्ही सगळे त्याला परशागडी म्हणायचो. लहानपणी तोतरा असलेल्या माझ्या तोंडून “परसाकडे” असं व्हायचं आणि सारे हसायचे. असं खुद्द परसराम सांगतो. परसराम आता मला “सायेब” म्हणतो. पण मला आवडत नाही. त्याचं “बाबा’ म्हणणंच मला लहानपणासारखं आताही आवडतं.

पण तो म्हणत नाही. सोबत माझी बायको असतांना त्यानं “बाबा” म्हणावं हे मला आवडतं पण तिला नाही! बायको सोबत नसली की परसरामकडून मनसोक्त “बाबा… बाबा… “ म्हणवून घ्यायचं. बालपणात लोळायचं. परसराम मंग चोरीचा आरोप लावून मामीनं मला कामावरुन कसं कमी केलं. हे रडू रडू सांगायचा. खूपच हळवा माणूस. तो इथे फुलाफळात नोकरी करतोय हे इथल्या झाडांचं भाग्य आहे. तेव्हाच तर त्यानं एका चांगल्या बगीच्याचं रूप ह्या नर्सरीला दिलं. परसरामनं जोपासलेली फुलझाडं मला माझी भावंड वाटतात. कारण दोघांनाही जपणारा परसरामचं!! ह्या फुलावरुन त्या फुलांवर हात फिरवीत अख्खी नर्सरी हिंडायची. नवीन आलेल्या कलमांची, झाडांची माहिती परसराम न मागताच द्यायचा. बालपणी प्रश्‍न विचारून भंडावून सोडणारा मी उगीचच आपल्याला हे सगळं ठाऊक असल्याचा आव मिरवितो नि पुन्हा शांत झालेल्या माझ्या स्वभावाला प्रश्नांच्या सरबत्तीची आठवण होऊन परसराम थकेस्तोवरच त्याच्यावर प्रश्‍नांचा मारा करतो.

मागे आलो तेव्हा मी परसरामला चित्तमपलीचं “पक्षी जाय दिगंतरा” दिलं होतं. तो ते सगळं वाचल्याच

सांगतो. काही चुका आहेत कां परसराम? म्हटल्यावर उगीचच लाजतो. परसरामला वाचनाचा भारी नाद. त्यासाठी तो येणाऱ्या जाणाऱ्या सायबांकडून दुसरी तिसरी काही भेट न घेता “मला फक्त तुमच्या आवडीचं

पुस्तक पुढल्या भेटीत जरूर आणा. ” हे सांगणार. पुस्तक आणि फुलझाडं हेच जणू आता परसरामचं जग! नर्सरीतली फळं थैली आन् गुलाब बाईसायबांसाठी देणारं. परसरामची ही भेट मायेच्या ओलाव्याने भिजलेली.. ओहळाच्या पाण्यासारखी नितळ स्वच्छ… नि त्या शिलेवरच्या ‘शामविमल’ सारखी चिरकाल स्मरणात राहणारी असणार. मग इच्छा नसूनही दुनियादारीत फसलेल्या आपणांस परसराम ला निरोप

द्यावा लागतो. अंगात नवचैतन्य, जगण्याची उमेद भरणारा परसराम नर्सरीच्या गेटवर आपण नजरेआड होईस्तोवर उजवा हात उंचावून निरोप देतच असतो. नर्सरीपासून मामाचा गाव तसा दूर नसतोच. पण आपलं माणूस आपण मागे सोडून पुढे चालल्याची जाणीव गाव खूप दूर असल्याचा भास मनी भरवितो.

गावाकडे जाता जाता रस्त्यातच पडणारं मामाच वावर टाच उंच करून बघावं, कुणी शेतात असलं तर तिकडे पाय वळवावे, शेतातील विहीर, ट्रॅक्टर, थ्रेसर, आऊट हाऊस.. आदी.. आदी सारं प्रतिष्ठितपणाची

जाणीव देणारी मामाची सुखसाधनं न्याहाळावीत. लांबलांब पसरलेलं मामाचं हिरवगार शेत अख्ख्या शिवाराचं भूषण. मामा शेतात असला तर मग संध्याकाळ होईस्तोवर पाहुणे सगळे शेतातच. गडी मात्र गावाकडे निघालेला. वाड्यात निरोप देण्यासाठी “पाहुणचार करायचा नाप्पुरवाल्या पावण्यांसाठी, म्हणून आणि ती वाट त्याला घेऊन जाणारी मामाच्या घरापर्यंत… तिथून पुढे जाणं तिला ठाऊकच नाय.

मामाच्या संगतीत संध्याकाळी गप्पागोष्टीत मस्त पाहुणचार फस्त करायचा नि पुन्हा परत त्याच वाटेनं दुसऱ्या दिवशी… मामाचं शेत… नर्सरी… परसराम… शिळा… शामविमल… टॉवर लाईन… ओहळ…

आणि मुख्य रस्ता आणि आपलं नाप्पुर!!

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देव जेव्हा आजारी पडतो… – भाग-२ लेखक  : श्री रवि वालेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? मनमंजुषेतून ?

 ☆ देव जेव्हा आजारी पडतो… भाग-२ – लेखक  : श्री रवि वालेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे

(सगळे उत्साहात चाललेले असताना, एक नवा पेच निर्माण होतो!) — इथून पुढे —– 

मोकळ्या हवेत, सकाळी सकाळी, विहिरीच्या थंड पाण्याने (ते सुद्धा १०८ हंडे किंवा कलश!) स्नान केल्याने त्याच दिवशी तिघाही भावंडाना ज्वर चढतो! ताप येतो! संपूर्ण शरीर दुखू लागते! बाहेरच्या गार वाऱ्याने ताप अजून चढू नये म्हणून तिघाही भावंडांना सफेद सुती वस्त्र गुंडाळून परत मंदिराच्या आत आणले जाते. मात्र आजारी असल्याने त्यांना परत त्यांच्या मूळ गाभाऱ्यात न नेता अधिक शुश्रूषेसाठी `अनासार घर किंवा अनासार पिंडी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट दालनात नेले जाते. आता बरे होईपर्यंत – म्हणजे पुढचे १५ दिवस) महाप्रभूंचा भाऊ बहिणीबरोबर मुक्काम इथेच!

तातडीने राजवैद्यांना पाचारण केले जाते. भगवंतांना आणि त्यांच्या भावंडांना `आल्या-गेल्या पाहुण्यांचा’ तसेच भक्तमंडळींचा व्यत्यय होऊ नये म्हणून `अनासार घर’ या दालनाबाहेर बांबूच्या चटयांची तात्पुरती भिंत बांधली जाते. अर्थात या तात्पुरत्या भिंतीला एक फट सोडली जाते, ती राजवैद्य आणि `दैत्यपती’ या आदिवासी समूहातील काही विशिष्ट व्यक्तींच्या जाण्या-येण्यासाठी. हे `दैत्यपती’ भगवंतांना बरे वाटावे म्हणून काहीतरी गुप्त विधी करत असतात! इतर कोणालाही `अनासार घरा’त १५ दिवस प्रवेश नाही! पुजाऱ्यांना सुद्धा नाही! या १५ दिवसांच्या `महाप्रभूंच्या `आजारपणाच्या’ कालखंडाला `अनासार पर्व’ असे संबोधतात.

उपचार सुरु होतात. बाहेर भक्तमंडळींमध्ये चलबिचल चालू असते! त्यांच्या समाधानासाठी राजवैद्य दररोज सायंकाळी मंदिराच्या पायऱ्यांवरून तब्येतीची खुशाली कळवत असतात. हे म्हणजे आपल्याकडे पत्रकारांसाठी VIP लोकांचे ‘Medical Bulletin’ असते, तसे झाले!

मी मागची दोन वर्षे हे अनुभवलेय. भक्तमंडळी अतिशय उत्सुकतेने राजवैद्यांची वाट बघत असतात. राजवैद्य ओडिया भाषेत काहीतरी बोलतात, आणि भक्तांच्या उत्साहाला उधाण येते. आरत्या सुरू होतात, काही जण अगदी ढोल वगैरे घेऊन येतात! खरे तर ते राजवैद्य वर्षानुवर्षे तेच तेच सांगत असतात! ते तरी नवीन काय सांगणार? `आज देवांच्या तब्येतीत चांगली सुधारणा जाणवली’ असे सांगितले की इकडे ढोल ताशे सुरु! काय तो जयघोष, काय तो जयजयकार! मंदिरात, मंदिराच्या आवारात, आवाराबाहेर फक्त आणि फक्त ‘जोय जगन्नाथ, ज्योय जगन्नाथ’ एवढेच ऐकू येते!

त्या लाकडी मूर्तींमध्ये देव आहे, हा प्रचंड विश्वास! इतका की आपण घरच्या मंडळींना आजार असताना कसे सुरुवातीचे काही दिवस जड अन्न देत नाही, तसेच इथेही. पहिले चार दिवस जगन्नाथांना `अनासार पाना’ नामक गोड दुधाचे द्रव्य (पंचामृत सदृश्य) दिले जाते! दुसरा काही घन-स्वरूप प्रसाद दिला आणि अपचन झाले तर काय घ्या? चार दिवस झाले की पाचव्या दिवशी देवांच्या अंगाला `फुलेरी तेला’ने मसाज केला जातो! तिळाच्या तेलात सुगंधी द्रव्ये, औषधी मुळ्या वगैरे टाकून या `फुलारी तेला’चे बुधले एक वर्ष आधीच जमिनीत पुरलेले असतात! (पुढच्या वर्षीसाठी – २०२६ साठी – हे `फुलेरी तेला’चे बुधले जमिनीत पुरण्याचा कार्यक्रम मागच्याच आठवड्यात इकडे झाला). वर्षभर जमिनीखाली ठेवल्याने तिळाच्या तेलातील औषधी मुळ्या व्यवस्थित मुरतात. त्यातले सगळे सत्व तेलात उतरले की मगच ते तेल वापरायचे! देवाच्या तब्येतीची एवढी काळजी, की एकदा (पाचव्या दिवसापासून) देवांना थोडे थोडे बरे वाटायला सुरुवात झाल्यानंतर त्यांना इतर काही प्रसाद अर्पण करण्याऐवजी, `दशमूला मोदकां’चा भोग चढवतात! या `मोदका’त दहा वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची मुळे सुकवून केलेली भुकटी, इतर काही आयुर्वैदिक औषधे, मध, साखर, दूध आणि बरेच पौष्टिक पदार्थ असतात. राजवैद्य स्वतःच्या हाताने हा `मोदक’ बनवतात. हे मोदक बनवण्याचा वंशपरंपरागत अधिकार राजवैद्यांचा असतो! असा दररोज १२० `मोदकांचा’ प्रसाद भगवंतांना अर्पण केला जातो. या `पौष्टिक, स्वादिष्ट आणि औषधी मोदका’ मुळे महाप्रभु आणि त्यांच्या भावंडांची तब्येत झपाट्याने सुधारू लागते. उपचार सुरु झाल्यानंतर खरेतर १२ व्या दिवशीच जगन्नाथाची तब्येत सुधारते, पण डॉक्टरी धर्माला जागून राजवैद्य अजून २-३ दिवस आराम करण्यास सांगतात! ‘घरी जायची घाई करू नका. अजून थोड्या टेस्ट करू आणि दोन तिन दिवसांनी डिस्चार्जचे बघू! ‘

१३व्या दिवशी राजाला सांगावा धाडला जातो आणि कळवले जाते की महाप्रभू, बलभद्र आणि सुभद्रा यांची तब्येत ठणठणीत झाली आहे. पुरीचे महाराज तब्येतीची हालचाल विचारण्यासाठी मंदिराला भेट देतात. आजचा प्रसाद खास महाराजांतर्फे असतो!

स्वतंत्र दालन, ते १५ दिवस सगळ्यांपासून अलग ठेवणे (कोवीडची आठवण येते ना?), औषधांचा मारा, तेलाने मालिश, औषधी मोदक …. हे सगळे कशासाठी? तर एका लाकडी मूर्तीसाठी! हा विचार आपल्यासारख्या (परक्या) लोकांच्या डोक्यात येतो, पण ओडिया लोक त्याला जुमानत नाहीत. बरं, हे कोणा ओडिया व्यक्तीला सांगायला गेलो, तरी तो चिडत नाही. `असे बोलण्यास भगवान जगन्नाथच तुला उद्युक्त करत आहेत’ असा सरळ साधा युक्तिवाद करतात! विषयच बंद!

देवाला किती माणसात आणलेय यांनी! देव हा देव आहेच, पण त्याला मानवाप्रमाणे भाव भावना, पीडा, दुःख, आजारपण आहे, हे अगदी आतपर्यंत झिरपले आहे. हा देव भामटेपणा करतो, बायकोला न कळवता बहिण आणि भावाला घेऊन गुपचुप ट्रिपला जातो, बायकोला (लक्ष्मी) हे कळल्यानंतर तिची माफी मागतो, गयावया करतो..

सगळे काही सर्वसामान्य माणसासारखे. ट्रिप वरून परतताना ‘माय मरो, मावशी जगो’ म्हणत मिठाई खाण्यासाठी मावशीच्या घरी एक दिवस मुक्काम ठोकतो, घरी परतल्यानंतर, घरात पाय ठेवण्याआधी बायकोचा रूसवा काढण्यासाठी तिला गोडधोड खाऊ घालतो! सगळी गंमतच आहे!

दोन वर्षांपूर्वी याच `अनासार पर्व’ असतानाच्या काळात मी मित्रांसह जगन्नाथाच्या मंदिरात गेलो होतो. बाहेर आवारात घोळक्याने काही आदिवासी बायका रडत होत्या, ओडिया भाषेत काही ओरडत होत्या. काहीतरी अघटीत घडले की काय अशा शंकेने मी माझ्या एका ओडिया मित्राला विचारले. त्याने जे सांगितले, ते ऐकून मी थक्कच झालो! त्या ज्या बोलत होत्या त्याचे त्याने जे भाषांतर केले, त्याचा मतितार्थ, `माझा ग सोन्या, माझा ग बबड्या, कधी बरा होणार रे तू? ’ असा होता! जगन्नाथ आजारी पडले, म्हणून त्या रडत होत्या! जणू जगन्नाथ त्यांचं बाळ होता! आता याला काय म्हणावे? रथयात्रा सुरु व्हायच्या आदल्या दिवशी भगवान खडखडीत बरे होऊन सगळ्यांना दर्शन देतात, हा वर्षानुवर्षे काय, शतकानुशतके चाललेला प्रघात आहे. सगळ्या जगाला हे माहिती आहे, तरी एवढे दुःख?

`काही वाईट झाले तर जगन्नाथाने आपल्याला आपल्या अपकृत्यांची शिक्षा दिलीय आणि काही चांगले झाले, तर जगन्नाथाने कृपा केलीय’ एवढ्या साध्या विचाराने जगन्नाथाचे भक्त जगन्नाथाशी तादात्म्य पावलेत, एकरूप झालेत. जगन्नाथाला ते देवस्वरूप मानतातच, पण कुटुंबातील एक घटकही मानतात! जगन्नाथ मंदिराच्या आवारात फिरताना बरेच (फुटकळ) पुजारी आपणास भेटतात. जगन्नाथाचे थेट जवळून दर्शन करून देतो सांगून भोळ्या भाविकांकडून पाचशे रुपये उकळतात. या व्यतिरिक्त देवाच्या अंगावरची फुलांची माळ वा एखादे फुल, कळसावरील झेंडा (इथे दररोज शेकडो झेंडे मंदिरावर चढवतात. कळसावरील मुख्य ध्वज वेगळा.) शास्त्रोक्त पूजा, जगन्नाथाच्या पायाजवळील ओरिजनल’ प्रसाद याचे वेगवेगळे चार्ज असतात! यात अजून एक (सशुल्क) सेवा असते, ती म्हणजे, देवाला आपले गाऱ्हाणे कळवणे! तो भामटा पुजारी आपण तुमचे गाऱ्हाणे देवाला रात्री नक्की ऐकवू, असे सांगून शंभर रुपये खिशात टाकतो. मला आश्चर्य वाटते, की हा धडधडीत खोटेपणा लोकांच्या लक्षात कसा येत नाही? असे असूनही थोडा कानोसा घेतला, तर आवारात बरेच लोक अशा भामट्या पुजाऱ्यांना आपले घराचे गाऱ्हाणे, अडचणी, त्रास, दुःख सांगताना दिसतील. किती तो विश्वास!

शेवटी, भक्तीचा मूळ पायाच विश्वास आहे.

नाही का?

……. जोय जगन्नाथ!

– समाप्त – 

लेखक : श्री रवी वाळेकर

प्रस्तुती : सुश्री सुनिता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परमेश्वराचे दर्शन… लेख क्र. ७ – प्रेम बंध – एक अक्षय्य बँक-बॅलन्स ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ परमेश्वराचे दर्शन… लेख क्र. ७ – प्रेम बंध – एक अक्षय्य बँक-बॅलन्स ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

विक्रांत मोरेचा (नाव बदललेले), माझ्या माजी विद्यार्थ्याचा फोन आला होता. “बाई, लग्नाची पत्रिका द्यायची आहे, जरा पत्ता पाठवता का? ” 

मी म्हटलं, “अरे, मी पुण्यातल्या घरी आहे. तू फोनवर आमंत्रण दे. ” 

“नाही, मी घरी येऊनच पत्रिका देणार आहे. तुमचा पत्ता एसएमएस करा, ” हे त्याचे उत्तर ऐकून मी त्याला खूप समजावलं, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. दुसरा विषय संध्याकाळी येतो असं सांगून त्यांनी फोन ठेवून दिला.

दुसऱ्या दिवशी आपल्या होणाऱ्या बायकोला घेऊन तो आला. कितीतरी वर्षाने मी त्याला बघत होते. गोरापान, सुंदर, फॅन्सी ड्रेसमध्ये पूजा सांगणारा गुरुजी झालेला विक्रांत माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्याला पाहणारे सगळेच म्हणायचे, “काय सुंदर दिसतो! कोणाचीही दृष्ट लागेल. ” खरंच, पळी पंचपात्र घेऊन पूजा सांगणारा हा गोड मुलगा सर्वांचाच लाडका होता. अत्यंत हुशार. पहिला दुसरा नंबर त्याने कधीच सोडला नाही. आता सीए झालेला माझा हा गुणी विद्यार्थी लग्नाचे आमंत्रण घेऊन, मुंबईहून इतक्या लांब केवळ आमंत्रण करण्यासाठी आला होता.

त्याची होणारी बायकोसुद्धा शिक्षिकाच होती. आमच्या दोघांचे सूर लगेच जुळले. खूप वर्षांनी भेटत असल्यामुळे त्याचा आतापर्यंतचा प्रवास याविषयी, तसेच त्याच्या आई-बाबांविषयी खूप गप्पा झाल्या.

त्याची बायको खूपच समंजस वाटली. दिसायलातर सुंदर होतीच, पण वागण्या बोलण्यातून नम्रता दिसून येत होती.

गप्पांच्या नादात रात्रीच्या दहा कधी वाजले कळलंच नाही. त्याला म्हटलं, “अरे, मुंबईत एक काम निघालं आहे. मला उद्या मुंबईला घरी जायचं आहे. ” 

विक्रांत लगेच म्हणाला, “मी आज कोथरूडलाच वस्तीला आहे. आणि उद्या मीही सकाळी मुंबईला जाणार आहे. तुम्हाला किती वाजता घ्यायला येऊ? ते सांगा. ” 

त्याला म्हटलं, “अरे, कोथरूडपासून डीएसके विश्व खूपच लांब आहे. तू उगाच उलटा कशाला येतोस? “

“बाई, तुमच्या लेकाची गाडी आहे. थोडं उलटं यायला लागलं तर काय होतं? फक्त तुम्ही वेळ सांगा. मी तुम्हाला घ्यायला येतो. ” 

कितीही समजावलं तरी तो ऐकेचना. त्याची बायकोही म्हणाली, “हा तुमचा हक्क आहे, बाई. तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही मुलं मानता ना? मग मुलांचं आणि सुनांचं ऐकायचं असतं. “

म्हटलं, “विचार करून सांगते. ” 

रात्री अकरा वाजता विक्रांतच्या आईचा फोन! “सकाळची तुमची वेळ सांगा, आम्ही सगळेच तुम्हाला घ्यायला येतोय. आधी गोरेगावच्या आपल्या नवीन घरी यायचं, तिथे जेवायचं आणि मग सर्वेश तुम्हाला घरी सोडायला येईल. ” 

नाईलाजाने मला वेळ सांगावी लागली कारण त्या काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. सकाळी बरोबर नऊ वाजता गाडी घेऊन विक्रांत दारात उभा होता.

गाडीत त्याच्या आईच्या आणि माझ्या गप्पा रंगल्या. “मुलं तुम्हाला लक्षात ठेवून मुद्दाम घरी पत्रिका द्यायला येतात कारण तुम्ही त्यांच्यावर केलेलं प्रेम, संस्कार ते विसरली नाहीयेत. आमच्या घरात कायम तुमच्या आठवणी निघते. खरंच, माझी मुलं खूप भाग्यवान आहेत, त्यांना तुमच्यासारख्या शिक्षिका लाभल्या. ” 

असं त्यांनी म्हटल्यावर मी म्हटलं, “आम्ही जास्त भाग्यवान. मला असे विद्यार्थी आणि असे पालक लाभले. ” 

गप्पांमध्ये गोरेगाव कधी आलं कळलंच नाही. विक्रांतनी नवीन थ्री बीएचके फ्लॅट घेतला होता. नुकतीच वास्तुशांत झाली होती. त्याच्या घरी जेवण झाल्यावर मी म्हटलं, “चला आता मी जाईन घरी. ” 

पण माझे काहीही न ऐकता त्याने गाडी काढली. त्याची आई म्हणाली, “बाई, डोअर टू डोअर सेवा आहे, त्याचा आनंद घ्या. ” 

खरंच, किती प्रेम करतात ही मुलं!

इतकी वर्ष झाली, तरीही प्राथमिकच्या बाईंना विसरली नाहीत.

हीच आमची खरी कमाई आणि हाच आमचा कधीही कमी न होणारा बँक बॅलन्स!!

क्रमशः दर गुरुवारी… 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देव जेव्हा आजारी पडतो… – भाग-१ लेखक  : श्री रवि वालेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? मनमंजुषेतून ?

 ☆ देव जेव्हा आजारी पडतो… भाग-१ – लेखक  : श्री रवि वालेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे

चार – साडेचार वर्षांपूर्वी नोकरी निमित्ताने ओडिशाला आलो, तेव्हा इथल्या प्रत्येक गोष्टीचे अप्रूप वाटायचे. नवे राज्य, वेगळी भाषा, आगळे लोक, अजब चालीरीती, सगळेच हिंदू सण साजरे करण्याचा अट्टाहास, सगळे आकर्षित करणारे होते. माझ्या नोकरीशी संबंधित असलेल्या महाकाय कोळशाच्या खाणी, तिथून कोळसा घेऊन एकामागून एक निघणारे हजारो ट्रक्स, वरून पहिले तर मुंगीपेक्षाही लहान दिसणारी खोदकाम करणारी अजस्त्र यंत्रे, इथली घनदाट जंगले, नितळ नद्या, रस्त्यांवर निर्वेध फिरणारे हत्ती या सगळ्यांमुळे मी हरखून जात होतो. त्यात इथली विरळ लोकसंख्या आणि `ट्रॅफिक जॅम’चा शाप न लाभलेले डोंगरा-डोंगरातून फिरणारे रस्ते. या सर्वांवर मात करणारी गावागावातील असंख्य पुरातन मंदिरे! ओडिशात बंद किंवा ओसाड पडलेले एकही मंदिर मला तरी सापडले नाही. कुठेही अगदी निर्मनुष्य जंगलात एखादे पडझड झालेले पुरातन मंदिर सापडले तरी तिथे पण गाभाऱ्यात दिवा तेवत असलेला दिसतोच दिसतो! कोण लावतो, कधी लावतो, लाऊन कुठे गायब होतो, काही कळत नाही!

दर रविवारी कुठल्या तरी जंगलात फिरायला जा, कधी एखाद्या खेडूताने चहाच्या टपरीवर दिलेल्या माहितीच्या आधारे जंगलातील पुरातन मंदिर धुंडाळ, कधी गुपचूप गाडीत बसून रस्ता ओलांडणाऱ्या हत्तींच्या कळपाचे निरीक्षण कर, कधी जंगलातल्या एखाद्या टेकडीवर चढाई करून शिखरावर चटई पसरून गुलजार ऐकत ढगांचे क्षणाक्षणाला बदलणारे आकार बघत बघत संपूर्ण दिवस घालव, असा मजेचा बहारदार कार्यक्रम चालला होता. या काळात मी रविवारची जेवढ्या आतुरतेने, उत्कटतेने वाट बघायचो, तेवढी शाळेत असतानाही बघितली नसेल!

काही दिवसांनी याला कंटाळलो. ओडिशात येऊन एव्हाना ५ – ६ महिने झाले होते. एकदा रविवारला जोडून एक सुट्टी आली. कुटुंब पुण्यात. मी इकडे एकटाच. दोन दिवस घरात करायचे काय? सहज मनात आले की या वेळी जगन्नाथ पुरीला जाऊन मंदिर बघून यावे. तसेही बायकोने `एकदा जगन्नाथाचे दर्शन करून या, करून या’, असे टुमणे गेले २-३ महिने लावलेच होते. दोन महिन्यांपूर्वी मी कोनार्कला एकदा जाऊन आलो होतो, पण कोनार्क मंदिराच्या अगदी जवळ असूनही जगन्नाथ पुरीला जायला जमले नव्हते. कोनार्क मंदिराने पूर्ण दिवस घेतला आणि दुसऱ्या दिवशी मला ऑफिसला जाणे अतिशय आवश्यक होते.

एका ओडिया सहकर्मचाऱ्याला म्हंटले, `चल रे, उद्या जगन्नाथ पुरीला जाऊ’.

जगन्नाथ म्हणजे ओडिशाचे आराध्य दैवत. घरात, घराबाहेर, गाडीत, भिंतीवर, ऑफिसमध्ये सगळीकडे जगन्नाथाचे चित्र असतेच. जगन्नाथाचा फोटो वा मूर्ती नाही असे घर आणि जगन्नाथाचे मंदिर नाही असे गाव संपूर्ण ओडिशात नसेल. यामुळेच, जगन्नाथ पुरीला जायला मिळतेय म्हणून माझा हा ओडियावासी सहकारी हरखून जाईल, एवढीच माझी अपेक्षा होती. त्याने नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता.

पण त्याने चेहरा एकदम गडद दुःखी केला आणि म्हणाला,

“ जाऊन काही उपयोग नाही. महाप्रभू (जगन्नाथ) आजारी आहेत ! “

मला काही समजलेच नाही ! थक्कच झालो. माणसे आजारी पडतात, ते ठिक आहे, पण चक्क भगवान आजारी?

जगन्नाथाच्या वार्षिक यात्रेविषयी माहिती होते. पुण्यात वर्तमानपत्रात दरवर्षी त्या यात्रेचे फोटो बघायचोच. गणेशोत्सवाच्या मोठमोठ्या मिरवणूक पाहिलेल्या डोळयांना त्या `या वर्षी जगन्नाथाच्या यात्रेला मागच्या वर्षीपेक्षा ३ लाख जास्त भाविक आले’ अशा बातम्यांमध्ये काही स्वारस्य नसायचे. जगन्नाथ यात्रेविषयी माझी अक्कल, `दरवर्षी जगन्नाथाची मूर्ती गाभाऱ्याबाहेर काढून मिरवणूक काढतात’ एवढीच मर्यादित होती.

`भगवान आजारी पडलेत? काय झालेय त्यांना?’ मी हसत विचारले.

दक्षिण भारतातील बऱ्याच मंदिरांमध्ये मी दुपारी गेलो असताना, गाभारा बंद असायचा. विचारले, तर तिथले ढेरपोटे पुजारी मख्खपणे सांगायचे, `बगवान सो रहेला है!’ 

यामुळे भगवान तिथल्या भटजींबुवांसारखेच दुपारची डुलकी काढतात, हे माहिती होते. पण विश्वाचा पालनकर्ता असलेले भगवान विष्णू जगन्नाथ रूपात ओडिशात चक्क आजारी पडत असतील, असे कधी वाटले नव्हते.

`महाप्रभूंना ताप आलाय !’

माझा सहकर्मचारी अतिशय गंभीरपणे मला सांगत होता. खोटेपणाचा लवलेशही त्याच्या बोलण्यात नव्हता.

मी पण गंभीर झालो.

`ताप आलाय म्हणतोस, तर कधी बरे होतील? आपल्याला कधी जाता येईल?’

`रथयात्रा सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी महाप्रभू बरे होतील. ते बरे झाले की रथयात्रा निघेल. तेव्हाच भगवान आपल्याला दर्शन देतील’

मला त्याच्या बोलण्याची गंमत वाटत होती, पण त्याच्या त्या गंभीरपणे दिलेल्या उत्तरांमुळे उत्सुकता अजून चाळवली.

`तू एवढ्या ठामपणे सांगतो आहेस की रथयात्रेच्या आदल्या दिवशी बरे होतील, तर मग काही उपचार चालू आहेत, की असेच आपोआप बरे होतील?’

`छे, छे. राजवैद्य आहेत ना दिमतीला! दररोज उपचार चालू आहेत!’

मी सर्दच झालो! अरे देव आहे ना तो! त्याला माणसाचे उपचार कसे चालतील?

हळू हळू माहिती मिळवत गेलो, माहिती मिळत गेली. माझी उत्सुकता बघून ओडिया सहकारी उत्साहाने स्वतःहून माहिती देत गेले. क्षणोक्षणी अचंबित होत गेलो. चालीरीती, रीती रिवाज वगैरे कळले, पण महत्वाची होती ती या रितीरिवाजांमागची प्रेरणा आणि कारणमीमांसा.

चैत्र – वैशाखाच्या कडकडीत उन्हाच्या तडाख्याने सगळे ओडिशा त्रस्त झालेले असते. समुद्राच्या किनारी असलेले पुरी शहर त्याला कसे अपवाद असणार? या काळात घामाच्या धारा निघत असतात. वातावरणात एक चिडचिडेपणा आलेले असते. गार वाऱ्याची एक झुळूकही सुखाची अनुभूती देऊन जाते. नागरीकांचे आणि भक्तांचे ठीक आहे. ते बाहेर मोकळे फिरत असतात. कधी कधी वाऱ्याची झुळूक अनुभवू शकतात.

बंदिस्त मंदिरातील बंदिस्त गाभाऱ्यात वर्षभरापासून जखडून असलेल्या भगवंताच्या नशिबी मोकळेपणाचे हे सुख नाही! 

प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेले महाप्रभू शेवटी पुरीच्या राजाला पुजाऱ्यांकरवी (पंड्यांकरवी) निरोप पाठवतात, `मला थंड पाण्याने स्नान करायची इच्छा आहे!’

(पुरी मध्ये आजही राजा आहे! `गजपती महाराजा दिब्यसिंग देब’ असे भारदस्त नाव असलेले हे महाराज पुरीतच रहातात. अतिशय साधे जीवन जगतात. मंदिराचा सर्व कारभार त्यांच्याच अखत्यारीत आणि हुकूमानुसार चालतो. जगन्नाथाच्या सर्व पूजांमध्ये, विधींमध्ये महाराजांचा मान खूप मोठा असतो. सर्व पूजा करण्याचा पहिला मान त्यांचाच. वर्षभर पुरीच्या रस्त्यांवर सामान्य नागरीकासारखे फिरतात, तेव्हा ओळखू सुद्धा येत नाहीत. मात्र रथयात्रेच्या कालखंडात राजमुकुट वा फेटा, भरजरी राजेशाही भारतीय परिधान यात हा माणूस अतिशय तेजस्वी दिसतो! मुळातच देखणे गृहस्थ आहेत हे. किती साधे असावे हे महाराज? पुरीत एक दुमजली घर हा त्यांचा `राजमहाल’ आहे. त्याच `महालाच्या’अर्ध्या भागात ते शुद्ध शाकाहारी – कांदा, लसूण सुद्धा नाही – उपहारगृह चालवतात! कोणी जाणार असेल आणि महाराजांना भेटायची इच्छा असेल, तर कळवा. पत्ता देतो) 

देवाचीच इच्छा ती, राजा कशाला नाही म्हणेल? मग राजाज्ञेप्रमाणे मंदिराच्या आवारातलाच एक उंच चौथरा सजवला जातो, फुलांची तोरणे बांधली जातात. इथे देवांचे स्नान होणार. ही स्नानवेदी! आता ही स्नानवेदी कायमस्वरूपी बनवली आहे. यथावकाश ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला (महाराष्ट्रात वटपौर्णिमा, ओडिशात स्नानपौर्णिमा किंवा देबस्नान पौर्णिमा) या स्नानवेदीवर महाप्रभूंचे स्नान आपल्या जेष्ठ बंधू बलभद्र, धाकटी बहीण सुभद्रा यांच्यासह मंत्र घोषात संपन्न होते… 

सगळे उत्साहात चाललेले असताना, एक नवा पेच निर्माण होतो !

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री रवी वाळेकर

प्रस्तुती : सुश्री सुनिता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लोकमान्य आणि आम्ही… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ लोकमान्य आणि आम्ही… ☆ श्री सुनील देशपांडे

… आज २३ जुलै – लोकमान्य टिळक यांचा जन्मदिन.. त्यानिमित्त हे प्रकट चिंतन.

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे लोकमान्य टिळकांनी सरकारला बजावून सांगितले होते असे आम्ही अनेक वर्ष बालपणापासून ऐकत आहोत.

23 जुलै आणि एक ऑगस्टला लोकमान्यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या निमित्ताने शाळेमध्ये होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रत्येक वक्ता माझ्यासकट हे वाक्य जोशात ओरडून बोलत असे.

याव्यतिरिक्त लोकमान्य टिळकांनी काय केले हे माहीत असणाऱ्या फारच थोड्या व्यक्ती सध्या हयात असाव्यात याबद्दल आमची खात्री आहे. या वाक्याचा अर्थ सुद्धा किती लोकांना समजला असेल याबाबत आम्ही साशंक आहोत.

आता आमचेच पहाना – सर्वात आधी आमचा जन्म झाला हे सरकार दरबारी सिद्ध करता करता आम्हाला नाकी नऊ आले. स्वराज्य म्हणजे काय हे आम्हाला मागील 75 वर्षात अजूनही समजले नाही. स्वातंत्र्यानंतर जे राज्य येते त्याला स्वराज्य म्हणतात किंवा म्हणावे असे काहीसे आम्ही लहानपणापासून ऐकत आहोत. अर्थात लहानपणी स्वराज्य नावाचे एक वर्तमानपत्र होते त्यातील विनोद वाचून आम्ही कधीतरी खोटे खोटे हसायला शिकलो. पण तेही नंतर बंद पडले. अरे स्वराज्य नावाचे वर्तमानपत्र सुद्धा जास्त वर्ष चालू शकत नाही तर स्वराज्य म्हणजे काय हा प्रश्न कसा सुटणार? असे आमच्या बालबुद्धीला वाटत असे. त्यानंतर स्वराज्य म्हणजे काय हे समजून घेण्याच्या आम्ही कधी फंदात पडलो नाही. आमच्या स्वतःच्या घरात सुद्धा आमचे राज्य कधी नव्हते त्यामुळे स्वराज्य म्हणजे काय हे समजण्याची शक्यता आणि पात्रता आमच्यात नव्हतीच. म्हणजे एक तर स्वराज्य म्हणजे काय हे कधी समजले नाही. जन्मसिद्धता याबाबतीत मात्र सरकार दरबारी हेलपाटे घालून जन्म कसा सिद्ध करायचा याचा पुरेपूर अनुभव आम्ही घेतला. आता आधार कार्ड जवळ असल्याने जन्मसिद्धतेसाठी फारसा आटापिटा करावा लागत नाही याबाबत सरकारचे आभार. त्यानंतर हक्क म्हणजे काय हे मात्र आजतागायत आम्हाला कधीच समजले नाही. ‘हक्क मागून मिळत नाही तो हिसकावून घ्यावा लागतो’ असे कोणीतरी पुढारी म्हटल्याचे ऐकिवात आहे. ‘आमचा लढा हक्कासाठी आहे’ असेही कुणी कुणी पुढारी अधून मधून म्हणत असतात म्हणे! ‘संविधानाने हा हक्क आम्हाला दिला आहे’ असेही कोणीतरी अधून मधून म्हणत असतात. संविधान ही काय भानगड आहे हे समजून घेण्यासाठी आम्हाला या आयुष्याच्या राम रगाड्यात कधी वेळच मिळाला नाही. “अहो, भाजी सांगितल्यावर नुसती भाजी काय घेऊन आलात ? प्रत्येक भाजीचा भाव काय आहे हे समजून घेणे हा आपला हक्क आहे. ” 

असे पत्नीने सांगितल्यानंतर हक्काची थोडीफार जाणीव होऊ लागली. आयुष्यात हक्काबाबत जागृत असलेल्या अनेक समित्या ऐकिवात होत्या. ‘ग्राहक हक्क समिती’ ‘विद्यार्थी हक्क समिती’ ‘सामाजिक हक्क समिती’ ‘संविधानिक हक्क समिती’ अशा अनेक हक्क समित्या आम्ही आधी पेपर मध्ये वाचत असू नंतर दूरदर्शनवर किंवा अनेक दुर्दशादर्शन वाहिन्यांवर पहात असू. परंतु यातील कोणत्याही समितीला त्यांचे हक्क मिळाले किंवा किमान पक्षी नीट समजले असे अजून तरी ऐकू येत नाही. स्वराज्य, हक्क आणि जन्मसिद्ध या तीनही शब्दांची अशी दुर्दशा आमच्या जीवनात घडल्यानंतर फक्त एकच शब्द राहिला तो म्हणजे माझा. माझा हे मी या शब्दाचे एक रूप आहे असे कोणीतरी शाळेत सांगितले होते. परंतु ‘मी मराठी’ आणि ‘माझा मराठी’ या दोन अत्यंत भिन्न गोष्टी असून त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही असे समजल्यानंतर मी आणि माझा यामध्ये काही संबंध असेल यावरचा आमचा विश्वास उडाला. आमच्या घरात मात्र हा माझा शर्ट, हा माझा पेन, हा माझा बनियन अशा फुटकळ गोष्टींच्या स्वामित्वाचे हे एक रूप आहे याची खात्री पटून गेली होती. त्यामुळे माझा या गोष्टीचा अर्थ म्हणजे काही फुटकळ गोष्टींचे स्वामित्व यापुढे आमच्या बुद्धीची झेप कधी केली नाही.

या वाक्यातील आता ‘हा’ आणि ‘आहे’ हे दोनच शब्द शिल्लक राहिले. लहानपणी आमच्या आईने “कोण त्रास देतो आमच्या बाळाला ‘हा’त रे!” या वाक्यातून हा या शब्दाशी प्रथम संबंध आला. परंतु आयुष्यात नोकरी, व्यवसाय आणि लग्न या घटनांमुळे ‘हां जी’ याच शब्दातून हा या शब्दाशी संबंध आला. त्यामुळे ‘हा’ या शब्दात वीरश्री पूर्ण काय आहे? याचा अजून आम्ही विचार करतो आहोत. त्याशिवाय ‘थोडी तरी अक्कल देवाने दिली आहे काय!’ हे वाक्य आधी आईकडून आणि नंतर पत्नीकडून इतक्या वेळेला ऐकलं आहे की ‘आहे’ या शब्दाचा एवढाच मर्यादित अर्थ आमच्या डोक्यात बसला आहे.

त्यापुढे ‘आणि तो मी मिळवणारच’ असेही लोकमान्यांनी म्हटल्याचे बोलले जाते. परंतु आयुष्यात मागील ७५ वर्षांमध्ये आपण काय मिळवले याचा हिशोब लावता येणे शक्य न झाल्याने, अजून काही ‘मिळवणे’ याचा अन्वयार्थ लावण्याची यातायात करण्यासाठी डोके शिणवणे शक्य होईल असे वाटत नाही.

त्यामुळे आता मला सांगा ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ याचा अर्थ समजून घेण्याऐवजी त्या आदरणीय लोकमान्यां समोर नतमस्तक होण्याशिवाय आम्ही दुसरे काय करू शकतो?

‘शिक्षण दारी आले रे, अवघड सोपे झाले रे’ असे काहीतरी गाणे ऐकल्याचे स्मरते. अर्थ समजून घेणे हे अवघड. त्यापेक्षा नतमस्तक होणे हे सोपे. असाच सध्याच्या शिक्षणाचा अर्थ असावा आणि त्यातूनच हे गाणे निर्माण झाले असावे अशी आता आमची खात्री पटली आहे.

त्यामुळे अवघड गोष्ट सोडून द्या पण सोपे तरी करूया की! 

म्हणूनच पुन्हा एकदा – – 

– – लोकमान्यांपुढे नतमस्तक !!!

© श्री सुनील देशपांडे 

(पुणेरी नाशिककर)

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : sunil68deshpande@outlook.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ५० – पपा ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ५० – पपा ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

पपा

मी लहान असतानाची एक गोष्ट. .

त्या दिवशी रविवार होता. पपा सकाळी दूध घेउन राजाभाऊ भागवतांकडे थीआॉसाॅफीच्या मीटींगला गेले.

पपा गेले अन् काही वेळाने आईने दूधाचं भांडं पुन्हा काढलं आणि ती एकदम ओरडली. आम्ही सारे आईभोवती जमलो तेव्हां कळलं, दूधात पाल पडली होती.

मी तशीच धावत रा. स. भागवतांकडे गेले. तिथे विचारवंतांची चर्चा बरीच रंगली होती. मी दरवाजातून डोकावून पाहिले. मला पपा दिसले. पपांनीही मला पाहिले अन् ते थोडे त्रासिक वाटले. मी त्यांना तरीही खुणावलं तेव्हां ते बाहेर आले.

“पपा तुम्ही दूध घेतलं त्या भांड्यात पाल पडली होती. तुम्ही बरे आहात ना? “

पपा शांतच होते.

“हे बघ! मृत्यु यायचा असेल तर तो येईलच पण आता इथे ही सारी विद्वान मंडळी बसली आहेत. एका गहन विषयावर चर्चा रंगलेली आहे. तेव्हां तू घरी जा. नंतर पाहू. . “

मी निमुट घरी आले. आम्ही सारे इतके अस्वस्थ होतो!

पपा नेहमीच्या वेळेवर घरी आले. अमंगल, अशुभ असं काही घडलं नाही. पपांनीही त्या गोष्टीला फारसे महत्व दिले नाही. कदाचित दैवयोगाने दुधात पाल पडण्यापूर्वीच पपांने दूध प्यायले असेल.

असे बेडर, मृत्युला न घाबरणारे पपा. सतत कार्यरत राहणारे, कामात रमणारे, कष्टांत आनंद मानणारे.

आळशी माणसं त्यांना आवडायची नाहीत. उगीचच गॅलरीत कुणी नखं कुरतडत उभी असलेली व्यक्ती पाहिली की ते विनोदाने म्हणत,

“या माणसाने निदान समोर पसरलेले डोंगर तरी पहावेत. आकाशातले तारे मोजावेत. डोळे असून ही माणसं डोळे उघडे ठेवून पहात नाहीत. नुसता नखं कुरतडत बसलाय्! “

पपांची हळहळ अगदी आंतरिक असायची.

असे आमचे पपा. श्री. ज. ना. ढगे. गाढे तत्त्वचिंतक, कलाप्रेमी, रसिक व्यासंगी.

हाडाचे शिक्षक आणि ढगे मास्तर ही त्यांची जनमानसातली आदरणीय ओळख.

आम्ही त्यांच्या पाच मुली. मुलगा नाही म्हणून त्यांना कधी दु:खी कष्टी झालेलं पाह्यलं नाही. आम्ही मात्र खूप शिकावं असं त्यांना वाटायचं. त्याकरिता ते स्वत: कष्ट घेत. नाना तर्‍हेची पुस्तकं आम्हाला वाचायला लावत.

एकदा आठवतंय्, पाठ्यपुस्तकातल्या मोरोपंतांच्या आर्यांचा अर्थ मी विचारला. तर ते संपूर्ण मोरोपंत घेऊन माझ्याजवळ बसले. त्यातले पृथ्वी वृत्त, यमकं, अवघड अलंकार त्यांनी मला शिकवले.

“परिक्षेपुरताच अभ्यास करु नकोस. संपूर्ण मोरोपंत वाच कधीतरी. त्यातली गोडी अवीट आहे. “

त्यांना असा तेव्हढ्यापुरताच गाईड वापरून, मार्कांसाठी केलेला अभ्यास आवडायचा नाही. त्यांचा अभ्यास, व्यासंग खूप होता आणि आम्हीही कुठलाही विषय खोलात जाउन आत्मसात करावा अशी त्यांची इच्छा असायची.

जीवनाबद्दल त्यांना अपार श्रद्धा होती. ते सारं जीवनच तन्मयतेनं जगले. आयुष्यातला प्रत्येक क्षण त्यांनी रसिकतेनं टिपला. खरं म्हणजे तसं एकरंगी आयुष्य नव्हतंच त्यांचं. . इंद्रधनुष्यासारखं सात रंगी जीवन होतं त्यांचं. ते उत्तम उद्योजक होते, गणितज्ञ, संगीतप्रेमी निसर्गप्रेमी, कवी, लेखक, उत्कृष्ट वक्ते होते. अभ्यासक आणि बुद्धीवादी होते पण रुक्षता त्यांच्यात नव्हतीच.

साहित्य हा नुसता छंदच नव्हता तर उत्तम साहित्यिक म्हणून त्यांची प्रतिमा होती. ते हाडाचे शिक्षक होते.

. इंग्रजी आणि संस्कृतवर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांना ज्योतिषविद्या अवगत होती. गणित या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता. ”जरा डोके चालवा” आणि “मेंदुला खुराक” ही त्यांची पुस्तके आजही उत्कृष्ट पुस्तके म्हणून उल्लेखली जातात.

ते विद्यार्थ्यांमधे खूप रमायचे. हु शार विद्यार्थ्यांना ते नेहमी अहो जाहो संबोधायचे.

मात्र बुद्धीमंद मुलाला गंमतीने म्हणायचे,

“तुला टांगा तरी हाकता येईल का रे.? “पण तरीही

शिक्षणाच्या प्रवाहात त्याला आणण्यासाठी त्यांची धडपड असायची.

त्यांच्या व्यक्तीमत्वांत जशी विविधता होती तसे काही विरोधाभासही होते. त्यांना पुस्तकं वाचताना टिपणं करायची सवय होती. आम्हालाही ते काही नाविन्यपूर्ण वाचलं की लिहून ठेवायला सांगत. त्यांच्याजवळ ज्ञानाचा असा मौलीक साठा होता पण व्यावहारिक दृष्टीने ते संचयी वृत्तीचे नव्हते. हिशोब ठेवणे, आलेला पैसा काटकसरीने वापरुन गंगाजळी सांठवून ठेवणे वगैरे गोष्टीत त्यांना मनापासून रस नसायचा. ते नेहमी म्हणत,

“गेली ती गंगा अन् राहिलं ते तीर्थ. . . “

काही हरवलं फुटलं तर म्हणत,

“आनंद आहे! आपल्याला दुसरे नवे मिळेल. . . “

आता आठवलं की मनात येतं, पपा प्रपंचातही विरक्त वृत्तीने वावरले. फारसं गुंतवून नाही घेतलं त्यांनी.

आमचायावर त्यांनी सुंदर संस्कार केले.

पपा पहाटे लवकर उठत. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या गात. त्यांचा आवाज मधुर होता. वाणी स्पष्ट होती. संत तुकारामाचे अभंग ते लयीत गात. लहानपणापासून आमच्या कानावर पडलेल्या या संतवाणीने कळत नकळत आमची वृत्ती घडवली. ते आम्हाला बायबल कुराणातल्या गोष्टी सांगत. शेवटी म्हणत,

“धर्माची शिकवण एकच असते. संपूर्ण मानवजातीचा

धर्म म्हणजे सत्य. तुम्ही सत्याची चाड राखा. म्हणजे जीवनात निर्भय व्हाल. “

आणि आता वाटतं, खरोखरच आमच्या अंगी जी निर्भीडता, जो आत्मविश्वास, आवश्यक असलेला बेडरपणा आहे तो केवळ पपांच्या शिकवणीमुळेच.

त्यांना अंधश्रद्धाळु माणसांचा फार तिटकारा होता.

मनुष्यानेच निर्माण केलेल्या, वर्णभेदांवर ते संतापाने बोलत.

त्यांना स्वत:लाही कुणी,

“तुमची जात कोणती? “हे विचारलं तर मनस्वी चीड यायची. ते ताडकन् उत्तर द्यायचे. ,

“या देहाला मानव म्हणतात. माझी जात माणूस. . . . “

पपा जितके रागीट, परखड बोलणारे होते, तितकेच ते हळवेही होते. त्यांचं मन फार संवेदनशील अन् कोमल होतं. रामायण महाभारतातल्या कथा सांगताना, कधीकधी अक्षरश: ते गहीवरुन जात.

सीतात्यागाचा प्रसंग सांगताना त्यांच्या डोळ्यात आसवांची नदी वहायची.

कृष्ण हे त्यांचं आवडतं कॅरॅक्टर होते.

आम्ही माहेरी आलो की त्यांना विलक्षण आनंद होई. पण परततांना त्यांचे डोळे डबडबायचे.

“चिमण्या आल्या चिमण्या गेल्या. ” असं म्हणायचे.

प्राण्यांवरही ते प्रेम करत. आमच्याकडे एक मांजर होतं.

आम्ही ते पाळलेलं नव्हतं तरीही त्याचं वास्तव्य आमच्याकडेच असायचं. पपा ऑफीसमधून आले की ते त्यांच्या पायात घुटमळायचं. पपाही पायानेच त्याला हलके हलके गोंजारायचे. ते मांजर चोरुन दूध प्यायचं पण पपांनी कधीही त्याच्या पाठीत काठी घातली नाही.

झाडापानांचंही त्यांना विलक्षण वेड होतं. १९७०साली पपांनी ठाण्यात बंगला बांधला. बंगल्यात रहायला गेल्यावर आम्ही सारे तर्‍हेतर्‍हेचे फर्नीचर करुन बंगला सजवण्याचा विचार करत असू पण पपांनी मात्र नवीन बंगल्यात रहायला गेल्यावर प्रथम खरेदी केली ती, कुदळ, फावडं, खुरपणी, नाना तर्‍हेची खतं यांची.

अनेक झाडांच्या फांद्या जमवल्या. ते स्वत: कुदळीने खड्डे खणून झाडे लावत. आईचा अन् त्यांचा त्यावरुन खूप वाद व्हायचा. आईचे म्हणणे, पपांनी स्वत: कष्ट न करता माळ्याकडून ही कामं करुन घ्यावीत. . 

पण पपा म्हणायचे,

“माझी बाग मीच फुलवेन. “त्यांना कष्टाचं वावडं नव्हतच. तो तर त्यांचा महान आनंद होता.

शिवाय ज्या विषयात रस घेतला, त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करण्याकडे कल होता. स्वत:ची बाग सुंदर असावी म्हणून त्यांनी झाडे लावण्यावरची अनेक पुस्तकं विकत घेउन वाचली. बागायतीचं तंत्र शिस्त मात्र त्यांना फारसं नाही जमलं तरी त्यांतूनही त्यांना मिळालेला आनंद खूप मोठा होता. त्यांनी लावलेल्या जांभुळ, फणसाची मधुर फळे जेव्हांआम्ही खात असू तेव्हा, घामाने निथळलेले हाफ पँटमधले, मातीने पाय लडबडलेले उघडेबंब पपा नजरेसमोर येत.

पण त्यांनी लावलेल्या प्रत्येक झाडांनी भरपूर फुलं. , फळं दिली. तो त्यांचा परमानंद होता. एक प्रकारे निसर्गाशी जडलेलं ते नातं होतं.

ते गेले तेव्हां बागेतलं प्रत्येक झाड फळाफुलांनी बहरलं होतं. . जणू त्या वृक्षवल्लींनी आपल्या कष्टाळु माळ्याला दिलेली ती भावपूर्ण श्रद्धांजली होती.

पपांबरोबर आम्ही अनेक प्रवास केले. त्यांच्याबरोबर प्रवास करणे म्हणजे पर्वणीच असायची.

त्यांनी कथन केलेल्या कथा, किस्से, विनोद कोट्या सहप्रवाशांची मनं रमवत. शिवाय जिथे जाऊ तिथे नैसर्गिक सौंदर्याचा आकंठ ऊपभोग घेण्याची त्यांची वृत्ती होती. . त्यांना मंदीरात जाऊन रांगेत उभं राहून, काही ठिकाणी तर ड्रेस कोडही असायचा. . अशा पद्धतीनं देवदर्शन घेणं कधीच मान्य नव्हतं. . . त्याऐवजी ते भोवतालच्या परिसरांत रमत. देवळाच्या बाहेर बसलेल्या शहाळी विक्रेत्याशी गप्पा मारण्यात आणि भरपूर शहाळी पिण्यांत त्यांना आनंद वाटायचा. डोंगर माथ्यावरुन पलीकडच्या क्षितीजावर डुबणार्‍या सूर्याच्या दर्शनात त्यांना त्यांचा देव दिसायचा. मंदीरातल्या देवापेक्षा त्यांना या नैसर्गिक शक्ती अधिक प्रबल अधिक पवित्र, मंगलमय वाटायच्या.

त्यांच्याबरोबर आम्हीही धुक्यातून चाललो. आकाशातले अगणित तारे पाहिले. अनेक सूर्योदय, अनेक सूर्यास्त पाहिले. प्रत्येक सूर्योदय नवा असतो हा विचार त्यांनीच आमच्यात रुजवला.

खळखळत्या धबधब्यात भिजलो. काश्मीरसारख्या ठिकाणी फेसाळ, अथांग वाहणार्‍या नद्यांत पाय डुंबून बसलो. जीवनात पपांनी आम्हाला अपार सौंदर्यदृष्टी दिली.

निसर्ग हा माणसाचा सोबती असतो. ढोंगी, व्यवहारी जगापासून सावरणारा हा भोवतालचा अफाट निसर्गच खराखुरा परमेश्वर आहे हे त्यांनी आमच्यावर फार लहानपणीच बिंबवलं.

 आता निळ्याशार आकाशात विरत जाणारे ढग पाहिले की, पपांची आठवण येते. ते अनंतात विलीन झाले.

ते आमचे पिता होते, गुरु होते. ते आमचे मित्र होते. ते मित्रत्वाच्या नात्याने आमच्याशी गप्पा मारत. आमच्या अडीअडचणी, आमची विवीध प्रकारची सुखदु:ख ते आस्थेवाईकपणे ऐकत. त्यांत समरस होत.

आमच्या सुखात ते हसले. आमच्या दु:खात त्यांनी सोबत केली. आमच्या चुका त्यांनी सांभाळून घेतल्या. त्याबद्दल त्यांनी पितृत्वाच्या अधिकाराने शिक्षा केल्या नाहीत.

पपा जे. कृष्णमूर्तींचे अनुयायी होते. त्यांच्या तत्वज्ञानाचा पपांच्या मनावर पगडा होता. त्यामुळेच असेल, पपांनी त्यांची मते आमच्यावर कधीच लादली नाहीत. उलट भरपूर स्वातंत्र्य देउन चांगलं वाईट स्वत:च ठरवण्याचं एक आत्मिक बळ आमच्यात निर्माण केलं. .

पपांची थोर शिकवण हीच आमची शिदोरी.

आणि त्याचा योग्य वापर हीच त्यांना वाहिलेली 

खरीखुरी श्रद्धांजली. . . . . .!!!!!

 ३१ मे १९८२ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आमच्या जगण्यातल्या ऐकेका क्षणावर त्यांच्या अस्तित्वाचा ठसा मात्र कधीही न पुसून जाणारा आहे.

 – क्रमशः भाग ५०.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “परदेशातील भारतीय स्त्रियांची तारेवरची कसरत…” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

 

??

☆ “परदेशातील भारतीय स्त्रियांची तारेवरची कसरत…” ☆ सौ. अंजोर चाफेकर

स्त्री भारतातील असो वा परदेशातील, आजच्या करिअर करणा-या स्त्रीला खूप आव्हाने पेलावी लागतात.

परदेशातील माझ्या परिचयातील, नात्यातील स्त्रियांना मी जवळून पाहिलं, त्यांची जीवनशैली बघितली आणि मला त्यांचं खूप कौतुक वाटलं….. त्यांची सजगता,त्यांचा कामसूपणा, झटपटपणा, हुषारी, आनंदी वृत्ती, कुटुंबासाठी झटण्याची तळमळ, जीवनाला वेग असला तरी जपलेली संस्कृती, अतिथ्यशीलता, स्वतःची करिअर सांभाळत मुलांच्या विकासाकडे जागरूकतेने लक्ष ठेवणे, ही सर्व तारेवरची कसरत त्या किती सक्षमतेने आणि आनंदाने करतात. 

वाढत्या महागाईमुळे व उच्च शिक्षण घेतल्यावर स्त्रीला तिचं करिअर करणे, नोकरी करणे हे जरूरीचे आहे. भारतातील मुली लग्न करून जेव्हा परदेशात जातात तेव्हा त्यांच्याकडे भारतातील पदवी असते. परंतु त्या पदवीच्या दाखल्यावरून नोकरी मिळत नाही. तिथला एखादा कोर्स किंवा तिथली पदवी (डिग्री) ही घ्यावी लागते. म्हणजे सुखी संसाराची स्वप्ने बघताना हातात पुस्तके घेऊन रात्री जागावे लागते.मग आपोआप मूल होणे ही लांबणीवर टाकावे लागते. त्याचाही मानसिक ताण होतोच. शिवाय उशीरा मातृत्व आले की गरोदरपण आणि प्रसवतानाही त्रास होतो. 

अमिता एम्.बी.बी.एस् होऊन अमेरिकेला गेली. तिला एक मुलगी होती. नवरा शिकत होता. त्याच्या असिस्टंटशिपच्या पैशातून घराचे भाडे, मुलीचा खर्च. तिला एम एल ई च्या तीन परीक्षा दिल्याशिवाय रेसिडन्सीही करता येत नव्हती. ती दिवसभर काम करायची. मुलीला सांभाळायची. घरकामाला नोकर नसल्यामुळे स्वयंपाक, धुणीभांडी, कचरा काढणे, फर्निचर पुसणे वगैरे सर्व आटपून रात्री जागून अभ्यास करायची.त्यावेळी वालमार्ट मधून स्वतःसाठी दहा डाॅलरचे लिपस्टिक सुद्धा खरेदी करू की नको असा विचार करायची… बरं ,अमेरिकेत साधे दूध आणायचे झाले तरी गाडी घेऊन जावे लागते. (भारतात दूधवाला घरी दूध आणून देतो) रिक्शा, टॅक्सीही नाही. म्हणजे गाडी विकत घ्यावी लागते. आणि शिकण्याचा परवानाही लागतो. म्हणजे आणखी खर्च. 

बरं, भारतात ड्रायव्हर ठेवता येतो. इथे स्वतःच गाडी चालवायची. म्हणजे नियम माहीत हवेत. रस्ते समजायला हवेत. रस्त्यात कुणाला गाडी थांबवून पत्ता विचारायची सोय नाही.रस्त्याचा मॅप समजला पाहिजे. 

माझी मैत्रिण नेहा वयाच्या ४०व्या वर्षी अमेरिकेला गेली. तोपर्यंत तिने कधी गाडी चालवली नव्हती. सुरुवातीला ती इतकी भांबावायची.पार्किंग लाॅटमधे गाडी लावताना तिथे लिहीलेले असते “पुश द कार्ड” तिला प्रथम त्याचा संबंधच समजायचा नाही. प्रत्येक वेळी क्रेडिट कार्ड आत घुसवताना तिला भीती वाटायची, कार्ड बाहेरच आले नाही तर.! (आता भारतातही क्रेडिट कार्ड चा उपयोग सर्रास होतो म्हणा )

ज्योती चार्टर्ड अकाउंटंट आहे. अमेरिकेत गेल्यावर तिला पुन्हा परीक्षा द्याव्या लागल्या.नोकरी मिळेपर्यंत एक वर्षं गेले.त्या काळात ती घरात फक्त गृहिणी. शिवाय नोकरी मिळेल की नाही याचा मानसिक ताण होताच. 

मी तिला विचारलं, “तू भारतात हिंदुस्तान पेट्रोलियममधे इतक्या मोठ्या पदावर होतीस. तुझ्या हाताखाली इतकी माणसं काम करायची. आणि तू शिकागोत आल्यावर तुझं आयूष्यच बदलून गेले ग. तू कसं स्वतःला या परिस्थितीत जुळवून घेतलेस.? “

ती म्हणाली, “त्या वेळी माझा नवरा नवीन नोकरीत स्वतःला जुळवून घेत होता.दोन्ही मुली इथल्या शाळेत जायला लागल्या. त्यांचे आजूबाजूचे वातावरण बदलले. त्याही नवीन मित्र मैत्रीणींशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत होत्या.मी घरी असल्यामुळे माझ्या कुटुंबीयांच्या भावना समजू शकले.त्यांना धीर देऊ शकले. “

….. तिचा हा निस्वार्थपणा मला खूप भावला. स्वतःपेक्षा ती तिच्या मुलींचा, नवऱ्याचा विचार प्राधान्याने करत होती.त्यांची या नवीन वातावरणात सामावून घेण्याची धडपड जवळून पहात होती आणि हे सर्व करताना तिची करिअर मात्र मागे पडत होती.

प्रियांकाचे लग्न झाले.नवरा सुटी संपताच अमेरिकेला गेला.परंतु प्रियांकाला व्हिसा मिळाला नाही.

नवी नवरी… खूप रडली. आता नवऱ्याकडे जाता येणार नाही ही भीती. तिच्या सासऱ्यांनी तिला खूप धीर दिला. पुन्हा व्हिसा साठी अर्ज भरला. तिला मुलाखतीसाठी बोलावले तेव्हा तिच्या छातीत धडधड. हातपाय लटपटत होते.कारण दोनदा जर व्हिसा नाकारला गेला तर ३ वर्षं अर्ज भरता येत नाही. परंतु तिला व्हिसा दुसऱ्या वेळी मिळाला. व ती नवऱ्याकडे गेली. तिने बी.एस. सी केले होते. तिथे तिला परत शिकावे लागले. तिने कॉम्प्युटरचा कोर्स केला. इंशुरन्स कंपनीत जाॅब मिळवला. या दरम्यान तिला दोन मुलेही झाली.ती गाडी घेऊन नोकरीच्या पहिल्या दिवशी डाऊनटाऊन मधे गेली. पार्किंग चार्ज २५डाॅलर्स. तिने विचार केला मी जर रोज गाडी घेऊन गेले तर माझा सर्व पगार पार्किंग मधेच खर्च होईल. मग गाडी जवळच्या स्टेशनात पार्क करायची व ट्रेनने जायचे.कारण तेव्हा गाडी कुठेही उभी केली तर ५०डाॅलर दंड भरावा लागणार. 

…… प्रियांका सकाळी ५वाजता उठून डबे बनवायची. मुलांना डे केअरला सोडून ऑफीस गाठायची. 

परत येताना मुलांना डान्स क्लास, बास्केट बाॅल क्लास ला न्यायचे, आणायचे. त्यांचा अभ्यास घ्यायचा. 

एकीकडे कुकर लावायचा. मग कपडे बदलायचे आणि पोळ्या करायच्या. हाताशी मदतीला कुणी कामवाली नाही.मागचं आवरायचंही आपणच. नवराही मदत करायचा. जिभेचे चोचले पुरवायला वेळ कुठे?

तरी नशीब, इंडियन स्टोअर मधे रेडीमेड पुरणपोळ्या, अळूवड्या मिळतात. तरी प्रियांका लाडू,श्रीखंड मोदक सगळं स्वतः बनवते. केक बनवते. मायक्रोवेव, ओव्हन आणि फ्रीज हे स्त्रीचे जवळचे मित्र. 

इथल्या सर्वच स्त्रिया, भारतीय पदार्थांबरोबर मेक्सिकन,थाय, इटालियन वगैरे जगातले विविध प्रकार आवडीने बनवतात.पाहुण्यांना आग्रहाने खाऊ घालतात. इथले पाहुणेही समंजस. स्वतःचे ताट डिश वाॅशर मधे स्वतः ठेवतात. नवरा बायकोमधे इतके सामंजस्य असते. प्रत्येक कामात नवऱ्याची मदत असते. 

नवऱ्याचा सहकार हे तिचे बलस्थान आहे. कारण स्वीगी, झोमॅटो दिमतीला नाहीत. 

माझ्या दोन्ही मुली व माझ्या बहिणीची मुलगी, घरातले सर्व आटपून,स्वतःची करिअर सांभाळत, ऑफिसच्या कामाचा प्रचंड ताण सांभाळत भारतीय कलेचा वारसा जपतात. एक भरतनाट्यम् मधे निपुण आहे.दुसरी ओडिसी नृत्यप्रकारात पारंगत आहे. तिसरी कथकमधे प्रवीण आहे. शिवाय हिंदुस्तानी रागसंगीतही त्या शिकत आहेत.

मला या स्त्रियांचा अभिमान वाटतो. त्यांचे भावनिक ताण हलके करायला आपण जवळ नसतो. त्यामुळे त्यांना खूप कणखर व्हावे लागते. त्यांचा कामसुपणा, त्यांची जिद्द, त्यांची मेहनत … यासाठी त्यांना प्रणाम. 

©  सौ.अंजोर चाफेकर

मुंबई

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आलवणीतल्या त्या…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “आलवणीतल्या त्या …” ☆ सुश्री शीला पतकी 

गुरुपौर्णिमेच्या दरम्यान अनेक ग्रुपवरती अनेक शिक्षकांबद्दल, गुरुबद्दल माहिती सांगणाऱ्या बऱ्याच पोस्ट मी वाचत होते आणि मला माझ्याही अनेक शिक्षकांचे स्मरण त्या काळात झाले. काही शिक्षकांबद्दल मी लिहिलेही होते. त्यामध्ये एक शिक्षिका मला त्या दिवशी प्रकर्शाने आठवल्या.. एरवी त्यांच्याबद्दल माझ्या डोक्यात काहीच नसायचे पण आपण जसे जसे मोठे होतो.. परिपक्व होतो …विचाराने आणि वयाने …तसे तसे त्या त्या गोष्टींची जाणीव अधिक प्रकर्षाने होत राहते. अगदी तसेच झाले….. 

मी दुसरीत सेवासदन मध्ये प्रवेश घेतला तेव्हा आठवड्यातून दोन दिवस एक तास आम्हाला शिवण हा विषय शिकवला जाई. शिवण शिकवणाऱ्या बाईंच्या एका खोलीमध्ये आम्ही आमचा वर्ग सोडून तिथे जात असू. शिवण शिकवणाऱ्या बाई एका चौरंगवजा टेबलवर बसलेल्या असत आणि इतर सर्व शिक्षकांपेक्षा त्यांचा पोशाख वेगळा होता. त्या कायम लाल रंगाच्या साडीत असायच्या. साडी नेसल्या म्हणण्यापेक्षा साडी लपेटलेली असायची… फक्त त्यांचा चेहरा आणि हात आम्हाला दिसत. डोक्यावरूनही घट्ट पदर असे. इतर बऱ्याच शिक्षिका त्या काळात नऊवारी साडी नेसत असत. सहावारी साडी नेसणार्‍या कमी होत्या. त्यामध्ये पाठक बाई, दातार बाई, चिंगु ताई कुलकर्णी, बडे बाई, आणि काही तरुण शिक्षिका या सहावारी साडी मध्ये असत. नऊवारी साडीतल्या शिक्षिका आम्हाला गंभीर वाटायच्या . सहावारी साडीतल्या शिक्षिका जरा जवळच्या वाटायच्या. पण या ज्या बाई होत्या यांचं रसायन वेगळंच होतं … एक तर त्या खोलीबाहेर पडत नव्हत्या. आम्ही मुलीच त्यांच्या खोलीत जाऊन शिकत होतो. फार कमी बोलत होत्या आणि आम्ही त्यांच्यासमोर शांतपणे बसत असू. प्रत्येक मुलीला वैयक्तिक हेम, टीप, धावदोरा, रुमालाच्या कडा शिवणे,बटण लावणे, छोटी पिशवी शिवणे, हे टप्प्याटप्प्यानुसार त्या शिकवीत असत. खरं तर मला शिवण या विषयात फारसा रस नव्हता…पण फक्त उत्सुकता होती .. त्या बाई एकाच रंगाचे लुगडे का नेसतात? आणि त्यांचे डोके उघडे का नाही? मग त्याच्यावरच चर्चा. सगळ्याच मुली लहान..कुणीतरी म्हणालं त्यांच्या डोक्यावर केस नसतात, त्यांचे केस कापलेले आहेत कारण त्यांचा नवरा मेलेला आहे … मग पुढे कुणीतरी सांगितलं त्या विधवा आहेत… अशी हळूहळू माहिती आमच्या ज्ञानकोशात भरती होत गेली… पण कोणाला विचारण्याचे धाडस झाले नाही की ह्या बाई अशा वेगळ्या का?

नंतर हळूहळू शिकताना याच्या उत्तरांची आमची गाठ पडली .इतर शिक्षकांच्या वयाबरोबरीच्याच या बाई .. पण त्या फारशा कोणात मिसळत नसत, त्यांचा वर्ग स्वतंत्र .वर्ग म्हणजे काय एक छोटी खोली होती. व्हरांड्यात थोड्या मुली बसायच्या आणि ज्या शिकत असायच्या त्या थोड्या आत बसायच्या. मग त्यांच शिकून झालं की आम्ही व्हरांड्यात बाहेरच्या मुली आत.. अशी ती कसरत होत असे. 

नंतर मी शिक्षीका म्हणून सेवासदन मध्ये लागले तेव्हा त्या खोलीकडे बघून मला नेहमी त्यांची आठवण यायची .आता त्यांच्या आलवणीतले रहस्य मला कळाले होते. नवरा वारल्यामुळे त्यांचे केशवपन केले गेले होते आणि त्या सोवळ्या झाल्या होत्या.. म्हणजे त्यांची जीवनशैलीच टोकाची वेगळी होती. कोणता मोह नाही ..मोह होईल असं वागायचं नाही ..त्या तांबड्या रंगाव्यतिरिक्त कोणत्याही रंगाशी त्यांचे नाते नव्हते …डोक्याला केस नाहीत… म्हणजे केस होते पण ते दर महिन्याला कापायचे पार मुळापासून.. किती भयानक होतं हे! आम्हाला उसवलेल्या कापडाला चार टाके घालून ते सांधावे कसे हे शिकवणाऱ्या त्या बाईंचे अख्खे जीवनच उसवले होते आणि ते सांधण्याचे,ते जोडण्याचे, शिवण्याचे कोणतेही साधन त्यांच्याकडे नव्हते. रमाबाई रानडे यांची कृपा म्हणा की नानासाहेब पाठक.. जे सेवासदनचे सचिव होते त्यांचा समाज- परिवर्तनाचा दृष्टिकोन म्हणा .. त्या बाईला आमच्या शाळेत छोटीशी का होईना पण नोकरी लागली होती. दोन तास चार माणसात मिसळायची तिला मुभा मिळाली होती. दोन पैसे हातात पडत असतील त्यामुळे कदाचित ती थोडीशी स्वावलंबी झाली असेल…. पण आता मला नेहमी वाटतं की सणावाराला नटून येणाऱ्या… डोक्यात फुलं माळणाऱ्या.. गजरे माळणाऱ्या…. 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला आपल्या मुलाबाळांना हाताला धरून शाळेत घेऊन येणाऱ्या इतर शिक्षिकांना पाहून त्या बाईला काय वाटत असावे? … तिचे मन अक्रंदून उठत असावे.. ‘ हे सारं माझ्या नशिबालाच का? ? माझा नवरा मेला ह्यात माझा काय दोष आहे? ..’ पण हे म्हणण्याची मुभा त्या वेळेला बायकांना नव्हती. केवढे दुर्दैव ना? …. त्या शिक्षिकेला मी कधी फार बोलताना ऐकलं नव्हतं, त्या कधी हसल्याच मला आठवत नाही. 

अकाली प्रौढत्व आलेली ती तरुण बाई समाजाच्या रितीरिवाजाच्या ओझ्याखाली चेपून गेली होती. त्यांनाही कधी वाटलं असेल केस वाढवावेत ..कदाचित ते खूप सुंदर असतील …छान रंगीबेरंगी फुलाफुलांच्या साड्या नेसाव्यात… स्नो पावडर लावावी.. केसात गजरे माळावेत …जगात अनेक रंग आहेत .. मग फक्त तो लाल आलवणीचा रंगच त्यांच्या वाट्याला का यावा? नेहमी मला हे प्रश्न पडायचे. 

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परवा त्यांची प्रकर्षाने आठवण आली आणि त्या क्षणाला मी राजा राममोहन राय, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, आणि हो .. लोकसंख्येला आळा घालण्याची युक्ती सांगणारे रघुनाथराव कर्वे सुद्धा …या सगळ्यांच्या प्रतिमा डोळ्यासमोर आणल्या आणि मी त्यांचे आभार मानले. ‘ तुम्ही होतात म्हणून आज आम्ही सुंदर जीवन जगतो आहोत ‘ .. मनापासून त्यांना नमस्कार केला.

केवळ परंपरा आणि पुरुषांना स्वतःच्या मोहाला आवर घालता येत नाही म्हणून समोरच्या छोट्या छोट्या विधवा मुलींना अल्वणी नेसवणाऱ्या त्या पुरुष प्रधान संस्कृतीचा विलक्षण तिटकारा आला. आज स्त्रीमुक्त होत आहे हे पाहताना खूप टीका होतात पण आता कोणी त्यांना जुमानत नाही. स्त्रिया थोड्या वरचढही होत आहेत. कदाचित तत्कालीन पुरुषप्रधान संस्कृतीवरचा हा रागही असेल, संतापही असेल… सगळं त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला आठवलं. मनात असंख्य विचार आले .. आणि आलवणीतल्या त्या बाईंना मी मनापासून नमस्कार केला. मनात म्हटलं .. ‘बाई तत्कालीन समाज हा तुमचा मारेकरी ठरला होता .सेवा सदन शाळेने जमेल तेवढा हात तुम्हाला दिला. हेच तर आमच्या शाळेचे कार्य होते ना ….? ‘ 

पुढे कित्येक दिवस अशा अनेक गरजू महिलांना आमच्या या शाळेमध्ये आवर्जून नोकऱ्या दिल्या जात. आता सगळे सरकारीकरण झाले आणि आता त्या गरजाही उरल्या नाहीत. या कथा अजून पंचवीस वर्षांनी कोणाला खऱ्या वाटणार नाहीत. हे सगळे आता कपोल कल्पित वाटावे .. पण तो काळ असाच होता.

– – – शिक्षणाने माणूस घडला की नाही ठाऊक नाही, पण स्त्री मात्र उभी राहिली हे नक्की. आलवणातल्या त्या माझ्या शिवण- शिक्षकेला आज मनापासून माझे अभिवादन आहे.

आजही त्या बाईंचे नाव मला माहित नाही, तेव्हाही नव्हते .. फक्त आम्ही लाल साडीवाल्या बाईंचा तास असे म्हणत असू. 

शब्दांकन : सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “घंटा…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “घंटा…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

घंटा हा शब्द उच्चारल्या बरोबर आपल्या नजरेसमोर प्रथम देवळांमधील घंटा येते. देवळात गेल्यावर आपण घंटा वाजवतो.

तो नाद मनात घेऊनच देवासमोर उभे राहतो. त्या नादाच्या तरंग लहरी आसमंतात उठत असतात. त्याचा आपल्या मनावर सकारात्मक परिणाम होत असतो. म्हणूनच देवळात घंटा टांगलेली असते.

प्रत्येक घरात एक तरी घंटा असते. आरती करताना ती वाजवली की तिच्या नादामधूर स्वरांनी वातावरण प्रसन्न होते.

डाव्या हातात घंटा धरून वाजवायची.. आणि उजव्या हाताने आरतीचे तबक गोल फिरवायच.. हे सरावानीच जमतं.

एका देवळात मी भली मोठी घंटा पाहिली होती. दोरीने ओढून ती वाजवावी लागत होती. त्या घंटेवरून इतरत्र कुठे कुठे घंटेचा उपयोग केला जातो हे मला आठवायला लागले.

प्रथम आठवले ते नाटक. नाटकातली पहिली आणि दूसरी घंटा फक्त मोजण्यासाठी असते. लोक आतुर असतात ते तिसऱ्या घंटे साठी. ती वाजली की पडदा उघडतो. नाटक सुरू होते. काही काळ आपण सगळं काही विसरून समोर जे चाललंय त्यात गुंग होऊन जातो. जे घडतंय ते नाट्य आहे हे कळत असूनही आपण त्या पात्रांच्या सुखदुःखात समरस होऊन जातो. म्हणूनच एखाद्या गोष्टीला उशीर झाला तर तिसरी घंटा वाजू दे… असं म्हटले जाते.

एका राजाने त्याच्या राज्यात लावलेल्या घंटेची आठवण झाली. ज्याला न्याय हवा असेल त्याने त्या घंटेची लांब दोरी ओढून घंटा वाजवायची. त्याची फिर्याद ऐकून राजा त्याला न्याय देईल असे सांगून ठेवले होते.

ती दोरी एकदा चुकून एकदा… मालकाने सोडून दिलेल्या हडकुळ्या गाईने ओढली होती. तर राजाने त्या गाईला देखील न्याय दिला होता. मालकाला बोलवून त्याला समज दिली होती.

गेले ते दिवस…. तेव्हा मुक्या प्राण्यालाही न्याय मिळायचा. आता अशी घंटा नाही… तसा न्याय नाही.. आणि तसा राजा ही नाही…

शाळेच्या घंटेचा आवाज शिस्तीची आठवण करून देणारा असतो. घंटा वाजायच्या आत शाळेत पोहोचायला हवं. नाहीतर शिक्षा होणार… शाळेचं दार बंद होईल ही भीती…

शाळा सुरू झाल्यानंतर तासा तासाने घंटा वाजत राहते. पहिला, दुसरा, पाचवा तास… याचं काही विशेष वाटत नाही. शेवटच्या तासाची घंटा मात्र सुखावून जाते. गडबडीने शाळे बाहेर पडताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असतो.

कॉलेजमध्येही घंटा असते. तिथे शेवटच्या घंटेचा आनंद वाटत नाही. कॉलेजचे दिवस कधीच कंटाळवाणे वाटत नाहीत. उलट मैत्रिणी.. मित्रांबरोबर दिवस कसे जातात कळत नाही. कॉलेज सुटायची घंटा झाली तरी पटकन घरी जावंसं वाटत नाही. पाय तिथेच रेंगाळतात.

त्यातून एखादी ” खास मैत्री ” जमलेली असेल तर त्या शेवटच्या घंटेचा रागही येतो. घंटा जरा लवकरच वाजली असे वाटते.

ऑफिसातली साहेबांच्या टेबलावरची घंटा अधिकाराची जाणीव करून देणारी असते. घंटा वाजवली की शिपाई धावत येतो आणि “येस सर” म्हणतो. पहिल्या घंटेला तो आला नाही तर साहेब परत एकदा घंटा वाजवतात. यावेळेस घंटेच्या आवाजात फरक असतो. त्यात जरब असते. शिपायाच्या ते लक्षात येते.

साहेबांच्या मूड प्रमाणे तो बोलतो.

रस्त्याने आपण निवांतपणे चालत असतो. आणि अचानक टण टण टण असा घंटेचा आवाज करीत आग विझवणारा तो लाल भडक बंब रस्त्यावरून जातो. वाहने पटापट बाजूला होऊन त्याला जागा करून देतात. बंब पुढे जातो….

पण त्या घंटेचा आवाज आपल्या कानात वाजतच राहतो…

आग कुठे लागली असेल? किती नुकसान झालं असेल? कुणाला काही लागलं तर नसेल? असले प्रश्न आपल्या मनात ऊमटु लागतात. आपण सुन्न होऊन उभेच राहतो.

अजून अशी एक घंटा आहे की तिचा आवाज कानांना ऐकू येत नाही..

पण तिचा अनुभव येतो…

अशी घंटा म्हणजे ” नकारघंटा “

काही वेळेस सगळीकडून हिचाच आवाज ऐकू येतो. आपण खचून जातो. निराश होतो. पण तेव्हा लक्षात ठेवायचं असतं की हेही दिवस जाणार आहेत. कुठेतरी आशेचा किरण असतोच.. परिस्थिती नेहमी बदलत असते.. नकार पचवून नव्या उमेदीने कामाला लागायचं असतं.

नेहमी बाहेर ऐकू येणारी घंटा कधी कधी आपल्या मनातूनही ऐकू येते. ती असते” धोक्याची घंटा” काहीतरी विपरीत घडणारं असलं की आपलं अंतर्मन घंटा वाजवून आपल्याला सूचना देत असतं. कधी आपण ती ऐकतो कधी ऐकूनही तिकडे दुर्लक्ष करत असतो.

वेळेवर ती घंटा न ऐकल्याने नंतर आपल्याला पश्चाताप होतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्या घंटेचा आवाज आल्या क्षणीच सावध व्हायचं. नीट लक्ष द्यायचं.

घंटा सांगत असते…

इकडे लक्ष द्या.. जरा ऐका…

त्यामुळे ज्याच्यासाठी ती वाजवली जाते त्याने ती ऐकावी अशी आपल्याकडून अपेक्षा असते.

मग भले ती सायकल वाल्याची घंटा असू दे नाहीतर देवाची घंटा असू दे…..

रस्त्यावरच्या लोकांनी वाटेतून दूर व्हावं असं सायकलवाला सांगत असतो. आमच्या आयुष्याच्या वाटेवरची दुःख दूर कर… असं घंटा वाजवून आम्ही परमेश्वराला सांगत असतो.

अशी ही आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग असलेली घंटा…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जागृत देवस्थान नावाचा झकास धंदा!… – लेखक :  श्री रवि वाळेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

??

जागृत देवस्थान नावाचा झकास धंदा! – लेखक :  श्री रवि वाळेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

 

परवाच तिरूपतीला जाऊन आलो. खुद्द देवाचे मनसोक्त म्हणजे एक दशांश सेकंदापर्यंत दर्शन झाले. कॅलेंडरात दिसतो ना अगदी तस्साच खराखुरा देव आहे! (तिथे खराखुरा देव आहे, हे मला कित्येक मित्रांनी कित्येक वेळा सांगितलयं) प्रत्यक्ष देवापर्यंत पोहोचणे एवढे सोपे झालेय, हे मला वेड्याला माहितीच नव्हतं. माझ्या विमान-प्रवास, हॉटेल, कारभाड्याच्या पन्नास-एक हजाराच्या खर्चाचे चिज झाले! मी तसा आस्तिक नाही, पण पूर्णपणे नास्तिक बनण्याएवढी हिमंतही नाही. देवाचे दर्शन घेतल्याने मला वा देवाला बरे वाटो ना वाटो, पुर्वी आईला आणि आता बायकोला बरे वाटते हे मात्र पक्के माहिती आहे!

देव आहे किंवा नाही, या विषयावर बोलण्याएवढा माझा आवाका नाही, ना पात्रता! त्यामुळेच तिरूपतीला लाखो लोकांचा समुदाय बघून मी थक्क झालो! कर्ज मंजुर झाले म्हणुन आलेल्यांपासून ते पार मुलाला अमेरीकेत जॉब मिळाला म्हणुन आलेले असंख्य लोक त्या गर्दीत होते! घटस्फोट मिळावा या पासून प्रेमप्रकरणी यश मिळावे, कोर्टात केस आपल्याच बाजूने निकाली निघावी वा विशिष्ट काॅलेजात अँडमिशन मिळावी यासाठी देवाला नवस बोलण्यासाठी आलेले हजारो, लाखो त्यात होते. संध्याकाळपर्यंत ATM मोकळे व्हावे आणि थोडी अजून थोडी रोकड हाती मिळावी, अशी माफक इच्छा बाळगणारा त्या भाऊगर्दीत बहुधा मी एकटाच होतो! सगळेच काही ना काही इच्छा घेऊन आले होते. मनगटातली धमक वा व्यवस्थेवरचा विश्वास कुठेतरी कमी पडतं होता. १० तले ८ जणं नवस बोलत होते. किंबहुना त्यासाठीच तर ते आले होते. त्या नवसात एक प्रकारची दयनीयता होती. फुले वाहतो, प्रसाद वाहतो, पैसे वाहतो, सोने वाहतो, ‘मागण्या मान्य करं, देवा, तुला मी माझे केस वाहतो! ‘ लाच काय द्यावी हे सुद्धा ना कळणारी हतबलं जनता! भलेभले देखणे पुरूष केस गेल्यावर बघवत नाहीत, इथे तर टक्कल करुन घेणाऱ्या जवळपास ४० टक्के बायका! टक्कल केलेला पुरूषच जिथे ओंगळवाणा वाटतो, तिथे बायंकाबद्दल तर बोलणंच नको. टक्कल केलेल्या या बायका, मुली तर अक्षरश: बघवत नाहीत. बीभत्स हा शब्द सुद्धा सुंदर वाटावा! लोकं हौसेने केशवपन करून घेत होते, शेकड्यांनी असणारे ‘केशकर्तनकार’ (हो! उगा अँट्रासिटी नको!) ५-५ मिनिटातं प्रत्येकाला आनंदाने विद्रूप करतं होते! एवढा मुर्खपणा जगाच्या पाठीवर कुठे होत नसावा! बरं, केस वाहून मग दर्शन करावे कि दर्शन करून केस वाहावे, याबद्दल कुठेही एकवाक्यता नव्हती!

तुम्ही इंटरनेटवर शोधले तर असे समजेल, की तिरूपतीला सर्व काही मोफत आहे. राहुल गांधीला ४००० रुपयांची गरज पडते आणि मोदींमुळे गांधी खानदानातल्या या भल्या गरिबाकडे खर्चाला पैसेच नाही, एवढेच हेही सत्य आहे! सर्वच अमान्य नाही. सगळे फुकट आहे, पण तुमच्याकडे २-४ दिवस वेळ पाहिजे! पैसे नसतील तरं एकाच दिवसात भगवंताची कृपा शक्य नोहे! तुमच्याकडे पैसे असतील तर (आणि तरच) देव तुम्हाला लवकर दर्शन देईल. गरिबांचा हा देवच नाही. जेवढे जास्त पैसे टेकवाल, तेवढे लवकर ‘दर्शन’. ‘काय? पैसे द्यायचे नाहीत? लायनीत लांब ऊभे रहा… माझ्या बायकोचे (लक्ष्मीचे) नातेवाईक आलेत! त्यांना अगोदर भेटावे लागेल! ‘ देव खरतरं अस बोलणार नाही, असे मला वाटते. करणार काय बिच्चारा? तिथे अक्षरश: गुलाम झालाय! घरी आलेल्या पाहुण्याला, ‘सकाळच्या चहाचे ७ रूपये झाले बरं का! नाष्ट्याचे मिळून तुमचे अजुन ५६ होतील! ‘ म्हणनारे तुम्ही असाल, तर देवाचा ‘प्रसाद’ म्हणुन एका ‘लाडू’ साठी २५ रुपये मोजण्यासाठी तुम्हाला काहीच वाटणार नाही! बरं, हे लाडु वाटणारे (आपल्यावर उपकार! ) आणि ते ज्या दगडी प्लॅटफॉर्मवर ते ‘लाडू’ ठेवतात, ते बघितले तरं, ज्या भल्या माता आपल्या मुलांना Hygienic चे महत्वं सांगतात, त्यांना फेफर आल्याशिवाय राहणार नाही!

तसा, एक ‘प्रसाद’ मोफत मिळतो, पिवळा भात वा मराठी ‘साधी खिचडी’ समान… १००-१२५ ग्रँम असावा, गरमागरम असतो, पण चमच्याशिवाय! भाजलेल्या बोटांनी खा अथवा गरमागरम घशात ढकला. एका पानांच्या द्रोणात तो देतात, पण तुम्ही भिकारी वा भिकारी सदृष्य वागलात / वाटलात तरच तो मिळेल!

‘स्वच्छ भारत’ मुळे लोक द्रोण शक्यतो इतस्तत: फेकत नाही, पण तो ‘प्रसाद’ सांडतोच. पण हा प्रसाद खा, सांडला तरी हरकत नाही, चपलेला चिकटणार नाही याची गॅरंटी! कारण, चपला दुरवर कुठेतरी न सापडणाऱ्या स्टॉलवर ठेवायच्या असतात आणि पायाला चिकटणारा भात दुर्लक्षित करायचा असतो! मोबाईल लांब २ किलोमिटर दूर जमा करायचा! का? माहिती नाही अन विचारायची सोय नाही. नंतर मंदिराच्या परीसरात जेव्हा पन्नास-एक फोटोग्राफर ‘सरजी, बेष्ट फोटू, वन्ली हंड्रेड रूपीज’ म्हणतं अंगावर येतात, तेव्हा ‘सोय’ कळते!

अजुन एक नवे फॅड म्हणजे पुरूषांनी ‘धोती’च घातली पाहीजे! हा तसा नवा नियम आहे. नियम का? कारण मंदिराचे म्हणे, ‘पावित्र्य’ जपायचेय! गेटजवळचे शेकडो धोतीवाले (लुंगीवाले) व्यापारी या ‘पावित्र्य जपण्या’ला मनापासून साथ देतात! किंबहूना त्यांचा धंदा व्हावा, याच साठी हा अट्टाहास आहे! अंतवस्त्र दिसेपर्यंत वर ओढून धोती घालून वा तीन फुटी डेनिम जिन्सवर फुटभराची लुंगी बांधून ‘पावित्र्य’ जपणारे हजारोत सापडतात! एकदा (एकदाचं!) दर्शन झाले की तुमचे हाल कुत्र्ं खाणारं नाही! कमवायचे तेव्हढे कमावलेले असते, आता तुम्हाला विचारतोच कोण? बाहेर कसे पडायचे याचीच विवंचना असते! आत येताना शेकडो सुचना फलक आणि (३००, ५०० च्या लायनीत) हजारो पंखे! बाहेर काहीच नाही! या चक्रव्युहातून बाहेर कसे पडायचे हाच गहनं प्रश्न! आपल्या चपला कुठे मिळतील, मोबाईल कुठे परत मिळेल हे आपले आपण शोधायचे! कसेबसे सापडलेच तर प्रत्येकाचे हात पुढे! ‘आप्पका दस्स हज्जार का मोबैल संभ्भाल्ला, कुछ्छ त्तो दो! ‘ (बहुधा माझ्या फोनची डेप्रेसियेशन कॉस्ट कमी करून बोलतं असावा!) याला ‘मोफत सेवा’ म्हणायचे! पैसे… पैसे… पैसे! मंदिराच्या मांडवात हुंडीत पैसे टाकायला शेकडोंची रांग! मुळ हुंडीपासून थोडी दुर पण मंदिराबाहेर असणाऱ्या हुंडीकडे कोणी ढुंकून बघेना! जणु हा देव त्या बाहेरच्या हुंडीतली देणगी मान्यच करंत नाही! तिरूमलाला हुंडीत टाकायला लाखो / करोडो आणलेले पण खाली तिरूपतीला काकडी घेताना अर्ध्या किलोमागे गरीब बाईशी ५ रूपयासाठी हुज्जत घालनारे, मुलांसाठी ६०० रूपयाचे पिझ्झा घेऊन ड्रायव्हरला ५० रूपये देऊन ‘ खाना खाके, एक घंटे मे इधरही खडा रेहना’ म्हणनारे, ‘पांच क्या सात देता, जल़्दी दरशन करवा दे, साले’ म्हणुन एजंटांच्या अंगावर नोटांची गड्डी फेकणारे, टिळा लाऊन ५-१० रूपये कमावणाऱ्या लहान लहान गरीब पोरांना हुडूत करणारे, महामुर गर्दीचा ”मनसोक्त’ फायदा घेणारे, या देवाला दिसत नाही काय?

….. का रे बाबा, डोळ्यावरं कातडं ओढलयं?

……. किंबहूना तू खरंच आहेस की नाही तिथे?

लेखक :  श्री रवि वाळेकर

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares