मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘Busy’ असलेला आईवर्ग… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘Busy’ असलेला आईवर्ग… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

आजच्या ६५, ७०, ते ७५ वयोगटाचा जो आईवर्ग आहे तो प्रचंड व्यस्त आहे. खरतर हा आनंदाचा भाग आहे तरी चिडचिड होते.

आईचा योगवर्ग, भिशी, मदत सप्ताह, सत्संग, पूजा, महत्वाच्या भेटी गाठी, बँकेच्या फेऱ्या, वाढदिवस, नाटक अशी एक ना अनेक कामं यामध्ये हा आइवर्ग खूप व्यस्त असतो. आईला फोन केला तरीही वेळ बघा, तिला वेळ आहे का विचारा… आईला आपल्या घरी राहायला बोलवलं तरी तिला Time table बघून मगच एखाद दिवस वेळ असतो. इकडे आल्यावर पण मैत्रिणीचा फोन येणार, ” लेकिकडे गेलात का, उद्या येता ना पण, आपलं हळदीकुंकू ठरलं आहे. ग्रुप वर टाकलंय “

झालं.. आईची लगबग सुरू… शेवटी मला म्हणणार, तूच ये गं निवांत तिकडे रहायला..

आईला आता वेळच नाही आपल्यासाठी? हे मनात येऊन जातं. पण दुसऱ्या क्षणी वाटतं. या किती आनंदी राहतात! यांच्या ग्रुपला एकदा भेटायला गेले होते, मस्त धमाल असते. Gossip वैगेरे काही नाही, सूना बिना सगळं विसरून एक एक उपक्रम चालू असतात. हसणं, चिडवणं, गाणी म्हणणं, वाचन चालू असतं. त्यांचे ते काही तास मस्त जातात. आर्थिक स्वातंत्र्य आणि तब्येतीची काळजी घेतल्याने त्यांची सेकंड इनिंग मनासारखी चालू आहे. उगाच कुठल्याही गोष्टीत अडकत नाहीत. समविचारी, समदुःखी आणि सम वयस्कर लोकांमध्ये राहणे जास्त आनंद मिळतो.

मला आठवतं माझ्या आजीला असा ग्रुप नव्हता. मंदिरात वैगेरे थोडा वेळ जायचा. त्यामुळे सूना नणंद नातवंडं मुलं इतकंच जग. घरात तेच तेच विषय.. आर्थिक स्वातंत्र्य ही नव्हतं. पण आता काळ बदलतोय. नवे विचार येत आहेत. मोकळीक मिळत आहे हे पाहून आनंद वाटतो.

आनंदी आणि समाधानी आई पाहणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. त्यामुळे ही बिझी आई स्वीकारायला हवी. तिची वेळ पाळून तिच्या सोबत मिळतील ते आनंदाचे क्षण रहायला हवं. चला आई आता दुपारी फ्री असेल फोन करून घेते पटकन……

लेखक : अज्ञात 

प्रस्तुति : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

गुंडीचं उडुपी हॉटेल –

श्रीवर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या या अन्नदान उपक्रम मुळे माझे मन मागे मागे अगदी जुन्या पुण्यात पोहोचलो आणि डोळ्यासमोर आलं ते गुंडीचं उडुपी हॉटेल सकाळ ऑफिस कडे जाणारा श्री जोगेश्वरी च्या जवळचा बोळ म्हणजे चालू करांचा बोळ. ‘बोळ’ हा त्यावेळचा परवलीचा शब्द होता. कारण तिथून पुढे वेश्यावस्ती लागत होती पानाचा तोबरा काजळ, केसांचे फुगे, रंगीबेरंगी साड्या, लाल भडक ओठ अशा त्या नेहमी नटून खिडकीत बसून असायच्या. आम्हाला तिथे जायला बंदी होती. पण का?हे काही कळायचं नाही, आणि विचारायची प्राज्ञा पण नव्हती शनिवार वाड्यावर किंवा जिजामाता बागे कडे जायला त्या बोळा चा शॉर्टकट होता. एकदा हिम्मत करून आम्ही मैत्रिणी तिथून गेलो आमचे भेदरलेले चेहरे बघून त्या हंसायला लागल्या हातवारे करून डोळे मिचकावून आम्हाला जेव्हा त्या बोलवायला लागल्या नां तेव्हा अहो!आमचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली एका दमात आम्ही तो बोळ ओलांडला. शालू करांच्या बोळ्याच्या तोंडाशी असलेल्या गुंडीच्या हॉटेलमध्ये त्या बायका राजरोस पणे शिरायच्या. जोगेश्वरीच्या खिडकीतून आम्ही चोरून बघायचो. चहा पिऊन बनपाव खाऊन पैसे न देता बेधडक त्या बाहेर पडायच्या. नवलच वाटायचं बाई आम्हांला! पै न पै वसूल करणारे हॉटेल मालक हात चोळत बसायचे. आणि तो तांडा गेल्यावर त्यांचा उद्धार करून डोळे गरागरा फिरवायचे. आमच्याकडून मात्र एका गोळीचे पाच पैसे पण सोडायचे नाहीत असं वाटायचं वाचले तर ते पाच पैसे उद्या उपयोगी पडतील. कधी कधी तर गोळी घेऊन पाच पैशाचं गाणं मुठीत आवळून पैसे न देता पळायचा आमचा विचार असायचा, हे लक्षात आल्यावर मालक ओरडायचे, “ए चाललात कुठे? गोळीचे पैसे टाका. पैसे कुणी द्यायचे तुमच्या काकांनी की मामांनी?त्या बायकांना सूट देणारे मालक आपल्याला गोळ्या फुकट का देत नाही या विचारांनी नाक फुगवून पाय आपटत आम्ही हॉटेलच्या पायऱ्या उतरायचो. गुंडी बारा महिने बंडी (जाकिट) घालायचे. अस्सा राग यायचा त्यांचा. सुरेश माझा भाऊ जरा बंडं होता. तो म्हणाला एक दिवस मी या गुंडी मालकांच्या बंडीचं बटणचं तोडणार आहे त्यावेळच्या पोरकटपणाचे आता हसू येतयं. ज्येष्ठ नागरिकात जमा झालेले आम्ही म्हणजे मी आणि सुरेशपरवा ह्या आठवणीने पोट धरून धरून हसलो. पण बरं का मंडळी! आमच्याकडून पैन पै वसूल करणारे गुंडी तसे सत्पात्री दान देणारेही होते. दुकान उघडल्यावर पहिला चहाचा कप दाराशी आलेल्या भिकाऱ्याला ते द्यायचे आणि नंतर भटक्या कुत्र्यांसाठी पावाची लादी मोकळी करायचे. ते पुढे आणि कुत्री त्यांच्या मागे हा सीन बघितल्यावर आम्ही म् ओरडायचो, ” अरे ते बघ दत्त महाराज चाललेत. त्यांचा हा नेम कधी चुकला नाही. आम्हाला कंजूष वाटणारे श्री गुंडी कुत्र्यांना देवासारखे वाटायचे. जोगेश्वरी च्या परिसरात प्रत्येकाच्या अंगात काही ना काही देण्याची दानत होती. सुवासिनी सणावारी आवर्जून मंदिरात येणाऱ्या गरीब ब्राह्मणांना पोटभर जेवायला घालून वस्त्रदान दक्षिणा देऊन संतुष्ट करायच्या. नवरात्रात माझ्या आईकडे तर नऊ दिवस सवाष्ण असायची. गरिबी असली तरी घासातला घास मुंजा, ब्राह्मणांसाठी गाईसाठी पण बाजूला काढला जायचा. श्रावण, भाद्रपद, अश्विन महिन्यात तर दानशूरतेचा कळस गाठला जायचा, कुमारीका सवाष्णी श्रीजोगेश्वरीच रूप समजून पुजल्या जायच्या आणि मायेची सावली ती जोगेश्वरी माता अनेक रूपातून अनेकांना दर्शन देऊन तृप्त करायची. अगदी खरं आहे हे! जोगेश्वरीची लीला तिचा महिमाच अघाध आहे. जय अंबे जय जोगेश्वरी माता की जय

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उणिवांची जाणीव … लेखिका : सौ. साधना डोंगरे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ उणिवांची जाणीव … लेखिका : सौ. साधना डोंगरे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

ऐक ना…

परवा बोलता बोलता मी तिला म्हणाले….

तू नक्की भाग घे या स्पर्धेत…

तशी ती म्हणाली….

ती म्हणजे ती मुक्ता ग… आपण तिला allrounder म्हणतो…

ती म्हणाली मला…. म्हणजे बघ विचार करावास असे वाक्य होते म्हणजे आहे तिचे.

माझ्यातल्या उणीवांची जाणीव आहे मला. त्यामुळे नको ग सध्या तुला सांगते मी खरचच पुन्हा नव्याने आकर्षित झाले तिच्याकडे…

उणीवांची जाणीव…. या दोन शब्दांचे एकत्र येणे म्हणजे सुधारणेचा प्रगतीचा श्रीगणेशाच नाही का…

उणीवा जाणवणे हाच एक गुण दुर्मिळ झालाय आजकालच्या जगात…. जो तो स्वतः सिध्द असल्यासारखा वागतोय त्यावेळी ही मात्र… जिला खूप काही येतय ती म्हणते…. उणीवांची जाणीव आहे म्हणून… थांबूया सध्या…. आवडलेच मला तिचे असे म्हणणे…

बघ ना…

उणीवांची जाणीव झालीय तर त्या उणीवा कमी करण्यासाठी वेळ हवाय तिला….

उणीवा नेमक्या कशा दूर करता येतील यावर विचार करण्यासाठी वेळ हवाय….

स्वाभाविक शारीरिक मानसिक अशा कुठल्या पातळीवर जाऊन आपण उणीवा दूर करु शकतो हे शोधण्यासाठी ती कामाला लागलीय…

आणि त्या दृष्टीने आत्मचिंतन ही चालू केलय तिने…

खरच उणीवांची जाणीव आपल्याला किती सामृध्दिक मोकळेपण देतेय हे विचारांती कळलय मला…

म्हणजे बघ ना….

उणीवांची जाणीव मला प्रतिक्रियेवर विचार कर सांगते.

एखाद्याच्या असाधारण व्यक्ततेवर किंवा होणाऱ्या टीकांवर भाष्य करताना खिलाडूवृत्तीने स्विकारल्यास तर माणासांना गमावणार नाहीस तू हे सांगते.

आणि मग आचरणातून आपोआप नम्रता डोकावायला लागते. आणि संवादास आवश्यक असे वातावरण ही तयार होते चुकांची जबाबदारी न टाळता उलट ती स्विकारून आत्म भान येतं ही आत्मजागरुकता आनंद देवून जाते….

आणि उणीवांची जाणीव खऱ्या अर्थाने वर्तुळ पुर्ण करते.

उणीवांची जाणीवेवर विचार मंथन करताना मधेच उलटे झालेल्या शब्दानी मी अंतर्बाह्य ढवळून निघाले….

ते शब्द होते…

“जाणीवेची उणीव“…

जाणीवेच्या उणीवेवर ही ऐक ना म्हणणार आहे तुला…

लेखिका : सौ. साधना डोंगरे 

प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “साडी पुराण…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “साडी पुराण…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

साडी हा माझा जरा वीक पॉईंट आहे. तसा तो प्रत्येक बाईचा असतोच…पण माझा जरा वेगळा म्हणजे..इंग्रजीच्या अर्थाने weak आहे. इतकी वर्ष साड्या नेसूनही साडी या विषयावरच माझं ज्ञान अजूनही कच्चचं आहे.

साडीचा पोत बघून तिची किंमत मला कधीच सांगता येत नाही. मैत्रिणी मात्र अगदी परीक्षा घेतल्यासारखे अवघड प्रश्न विचारत असतात.

“नीता सेलमध्ये अगदी स्वस्तात ही निळी साडी घेतली..काय किंमत असेल?”

स्वस्तात म्हणजे दोनशेला घेतली असावी असं समजून मी दोनशे म्हटलं तर ती रागाने नुसती लाल झाली.

“सेल झाला तरी इतक्या कमी किमतीत मिळणार आहे का ?तू आणून दाखव बघू..तुला विचारलं हेच चुकलं..तुला साडीतलं काही म्हणजे काही कळतं नाही. तीनशेला घेतली. बाहेर हीची किंमत पाचशे आहे. ” रागाने ती बोलत होती.

आता या अनुभवावरून मी शहाणी झाले आहे. नंतर एका मैत्रिणीने साडीची किंमत विचारली.

मी लगेच विचारले,

” सातशेला घेतलीस का ग” 

विचारणारीची कळी खुलली. 

ती म्हणाली,

“अग फक्त चारशेला घेतली. तू ही सातशेला घेशील. तुला कोणीही हातोहात फसवेल. तुला साडीतलं ओ का ठो कळत नाही. “

“हो ग काय करू ग..खरचं मला अजूनही लक्षात येत नाही…” मी म्हणाले..

साडीतले लाल, पिवळा, निळा जांभळा, हिरवा हे ठळक रंग मला कळतात. त्या रंगाचे जे उपरंग असतात ते आले की माझा घोटाळा सुरू होतो….

एके दिवशी काॅटनची पिवळी साडी आवडली म्हणून मी ती दुकानातून घेऊन आले. जरा वेळाने सुधाचा फोन आला म्हणून तिला सहज.. साडी घेतली…असे सांगितले.

तिने विचारले,

“पिवळा म्हणजे कुठला पिवळा रंग?”

मला काही अर्थबोध होईना. म्हणून म्हटले,

“अग पिवळा आहे एवढं खरं”

” अग पण..म्हणजे गोल्डन येलो, हळदी का सनफ्लॉवर यलो ?”

समोर साडी असुनही मला काही सांगता येईना…

तोपर्यंत तिचा पुढचा प्रश्न तयार होता….

” मग ब्राऊनिश येलो आहे का?”

साडीकडे निरखून पाहिल्यावर लक्षात आले तो तसाही नव्हता….म्हणून तिला म्हटलं,

” तू प्रत्यक्ष येऊन पहा ग..मला काही समजत नाहीये. “

असं म्हणून मी फोन ठेवून दिला. आणि हुश्श केलं…

दोन दिवसांनी सुधा घरी आली होती. तिनी साडी पाहिली आणि म्हणाली,

“अगं एवढं कसं कळत नाही तुला हा ब्राईट यलो आहे..”

झालं म्हणजे तिसराच रंग होता साडीचा….

मला आवडलेली पटोला मी अठराशेला घेऊन आले. किंमत सांगितल्यावर माझी मैत्रीण किंचाळलीच…

” अगं तुला पटोला घ्यायची होती तर मला सांगायचं नाहीस का ? सेल होता तेव्हा घेतली असतीस..ईतकी घाई का केलीस? बघ आता किती महाग पडली…”

बापरे सुमारे दहा मिनिटें ती मला बोलत होती.

बर एकदा बोलून बाईनी गप्प बसावं की नाही ? 

परत एकदा एका कार्यक्रमात मी ती साडी नेसलेली दिसली की तिचं सुरू झालं….तिनी सगळ्यांना मी किती महागात साडी घेतली याच साग्रसंगीत वर्णन करून सांगितलं.

बाकीच्या बायका अगदी आश्चर्यचकित होऊन तिचं बोलणं ऐकत होत्या. तीला साथ देत होत्या…त्यातील एकीने पटोला चौदाशेला दुसरीनी बाराशेला आणि तिसरीने तर हजारलाच घेतलेली होती…

मला तर वाटतं बायका जास्ती असत्या तर पाचशेलाही पटोला घेणारी कदाचित त्या दिवशी मला भेटली असती….

हिरवी साडी घेऊन आले तेव्हा तर फारच गंमत झाली….

मैत्रिणीला कौतुकांनी ती दाखवली ती म्हणाली,

“अग नीता हा हिरवा रंग नाहीये..हा तर रामा कलर आहे. ” 

खरं सांगते तेव्हा रामा हा रंग आहे हे मला कळले. नंतर तिने मला बराच वेळ समजवून सांगितले तरी हिरवा रंग “रामा ” कधी होतो हे मला कळलेच नाही. शेवटी बिचारीने…हरे रामा…

म्हणून कपाळाला हात लावला.

नंतर घरी आलेल्या मैत्रिणीला कौतुकानी मी सांगितले,

” बघ मी नवीन रामा कलरची साडी घेतली. ” तर तिने विचारलं,

” तू यातला मजिंठा कलर का नाही घेतलास? तो खूप छान दिसतो. “

मला अजिंठ्याची लेणी माहीत होती. हे मजिंठा मी प्रथमच ऐकत होते….तरी अज्ञान ऊघडं पडू नये म्हणून मी म्हटलं,

” अगं त्यांच्याकडे मजिंठा कलरच नव्हता..”

” लाजरीकडून घेतलीस ना ?त्यांनी यातल्या मजिंठा कलरच्या साड्या शोकेस ला लावल्या आहेत “

यावर मात्र मी गप्प बसले.

असे फजितीच प्रसंग माझ्यावर वरचे वर येत असतात…

दुकानातली जी साडी आवडेल ती मी घेऊन येते. देताना दुकानदार त्या साडीचं नाव सांगतो. पण घरी येईपर्यंत मी ते विसरून जाते. मग मैत्रिणींनी विचारले, कुठली साडी आणलीस ?की उत्तर देता येत नाही. त्या दिवशी मात्र मी नांव पक्के लक्षात ठेवले होते. मैत्रिणीला उत्साहाने सांगितले,

” मणिपूर सिल्क घेतली”

तिने साडी हातात घेतली आणि म्हणाली,

“अग ही मणिपूर नाही काही….ही तर ढाका सिल्क आहे. “

” पण दुकानदारांनी ही मणिपूर म्हणून सांगितलं “

” अग त्याला काय कळतंय मी सांगते ना..ही ढाका सिल्कच….”ती ठामपणे म्हणाली.

बघा…म्हणजे दुकानदारांपेक्षा माझ्या मैत्रिणीचं ज्ञान जास्ती आहे.

साड्या बघताक्षणीच फटाफट त्यांची नांवे सांगणाऱ्या माझ्या मैत्रिणींच्या अफाट ज्ञानाचे मला फार कौतुक वाटते.

मी बेळगाव सिल्क घेतली तेव्हा फार गंमत झाली. शेजारच्या काकूंकडे त्याच वेळेस त्यांच्या कानडी वहिनी आल्या होत्या. काकूंना बेळगाव सिल्क दाखवायला गेले. त्यांच्या वहिनी जवळच बसल्या होत्या. साडी हातात घेऊन त्या म्हणाल्या,

“अहो हे बेळगाव सिल्क नव्हे हो..आमचं बेळगाव सिल्क कसं घट्ट असतंय..हे कसले हो पातळं..हे बेळगाव नाहीच बघा “

“वहिनी इथे हेच बेळगाव सिल्क म्हणून विकतात. “

यावर काकू म्हणाल्या,

” तुमच्या पुण्यातले लोक लबाडं बघा..कशालाही काहीही म्हणतात..आणि तुमच्या गळी मारतात फसवतात..”

” वहिनी पुण्यात यालाच बेळगाव सिल्क म्हणतात…” काकूंनी बोलायचं प्रयत्न केला… पण वहिनी ऐकून घेईनात…

” लोक काही म्हणत हो..हे बेळगाव सिल्क नव्हे बघा…माझं आणलं नाही..नाहीतर इथेच फरक दाखवला असता…”

काकू त्यांना परत पटवायला लागल्या पण वहिनी पण ठाम होत्या…

आता हा ” बेळगाव “प्रश्न असल्याने हा लवकर सुटायचे चिन्ह दिसेना तेव्हा मी माझी बेळगाव सिल्क घेऊन तिथून हळूच निघून आले.

साड्यांची नावे लक्षात राहावीत म्हणून मी त्या साडीच्या नावाशी खूणंगाठ बांधून ठेवते.

एका साडीचे नाव आहे वल्कलम्.

हे नांव पूर्वी ऋषी घालायचे त्या वल्कल या शब्दाशी मी जोडलेले आहे. म्हणजे ऋषी..साडी…वल्कलं असं मी मनात ठेवलेल आहे.

खरं म्हणजे साडी आणि ऋषी ही जोडी जरा विजोडच वाटते..पण मला लक्षात ठेवायला सोपे आहे.

मला हलकी भारी कुठलीही साडी आवडते. नवीन साडी मिळाली याचाच आनंद वाटतो. त्या दिवशी ची साडी बघून मैत्रीण म्हणाली,

” नीता साडी दिसायला छान आहे…पण टिकेल असं वाटत नाही. “

इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर आता एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. मग तीच तिला सांगितली म्हटलं….

” अगं संत सज्जनांनी सांगून ठेवलेले आहे हा देह नश्वर आहे…मग तिथे त्यावरच्या साडीची काय कथा? टिकेलं तेवढे दिवसं आनंदानी वापरायची..

हा देह आहे तोपर्यंत आला दिवस मजेत घालवायचा मग पुढचे पुढे बघू….”

काय खरं की नाही?..

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

निवडुंग.

निवडुंग या काटेरी, झुडुप प्रकारच्या वनस्पतीशी माझ्या काही बालपणीच्या आठवणी जोडलेल्या आहेत. धारदार बोथट मणके असलेल्या निवडुंगाच्या चांगल्या गलेलठ्ठ फांदीचे एक सारखे उभे तुकडे करून, त्याचे सुरेख दिवे आई बनवायची. त्यात तेल वात रुजवायची. आणि चांदीच्या ताटात ते पेटवलेले दिवे लावून दिवाळीच्या धनतेरसच्या दिवशी धनाची पूजा करायची. इतका देखणा देखावा असायचा तो!

आजी म्हणायची प्रत्येक वनस्पतीचा सन्मान ठेवणे ही आपली संस्कृती आहे.

याच निवडुंगाशी माझी एक कडवट आठवणही आहे. आमच्या बागेत सदाफुली, मोगरा, जास्वंदी, जाई आणि जुई सोबत एका कुंडीत कोरफड लावलेलं होतं. काटेरी धारदार गुळगुळीत, मऊ, हिरवागार कोरफडीचा वाढलेला गुच्छ छानच दिसायचा. पण मला खोकला झाला की आजी, या कोरफडीची फणी कापून त्यातला गुळगुळीत गराचा रस करून प्यायला लावायची. खोकला पळायचा पण मनात रुतलेला त्याचा कडवटपणा मात्र नकोसा वाटायचा.

कधी कधी आजी तो गर केसांनाही चोपडायची. माझे कुरळे दाट केस पाहून मैत्रिणी म्हणायच्या,

“इतके कसे ग दाट तुझे केस?” मी त्यांना सांगायची, “कोरफडाचा चीक लावा”. तेव्हां त्या नाकं मुरडायच्या.

ठाण्याला शहराचे स्वरूप गेल्या काही वीस पंचवीस वर्षापासून आलं असेल. पण त्याआधी ठाण्याच्या आसपास खूप जंगलं होती. काटेरी, वेडी वाकडी, मोकाट वाढलेली. प्रामुख्याने तिथे निवडुंगाची झाडे आढळायची. आणि त्या वयात निवडुंग या वनस्पतीविषयी कधी आकर्षण वाटलंच नाही. नजर खिळवून ठेवावी असं कधी झालं नाही.

नंतर कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्राचा अभ्यास करताना या निवडुंगाची पुन्हा वेगळी शास्त्रीय ओळख झाली. कॅक्टेसी, फॅमिली झीरोफाइट्स(xerophytes) अंतर्गत येणाऱ्या या निवडुंगाचे अनेक प्रकार हाताळले. पाहिले. कितीतरी वेगवेगळे प्रकार, वेगवेगळी नावे. वई निवडुंग, त्रिधारी निवडुंग, फड्या निवडुंग, बिनकाट्याचा निवडुंग, पंचकोनी निवडुंग, वेली निवडुंग, लाल चुटूक फळं येणारी काही गोंडस निवडुंगं, काही काटेरी चेंडू सारखे दिसणारे..असे कितीतरी प्रकार अभ्यासले. वाळवंटातही हिरवगार राहण्याची क्षमता असलेलं हे काटेरी झाड, फांद्यांमधे कसं पाणी साचवून ठेवतं आणि स्वतःला टिकवतं, याचा वनस्पतीशास्त्राच्या पुस्तकातून भरपूर अभ्यास केला. त्याचे पर्यावरणीय आणि वैद्यकीय फायदे जाणून घेतले. पुढील आयुष्यात तर या निवडुंगाच्या छोट्या कुंड्यांनी घरही सुशोभित केलं. एक काळ असा होता की घरात विशिष्ट प्रकारचं कॅक्टस असणं हे स्टेटस झालं होतं! आजकाल तर एलोवेरा जेल, एलोवेरा क्रीम, ऑइल यांनी तर घराघरात ठाण मांडलेआहे. एलोवेरा म्हणजे तेच ना आजीचं कोरफड?

आता माझ्या अंगणात एका कोपऱ्यात, आई ज्याचे दिवे बनवायची ते चौधारी निवडुंग खूप वाढले आहे. कधी कधी ते उपटून टाकावं का असेही माझ्या मनात येतं. पण उन्हाळ्यात जेव्हा काही झाडं सुकून मरगळतात तेव्हा हे हिरवंगार निवडुंगाचं झुडुप मला काहीतरी सांगतं. शिकवण देतं. माझा गुरू बनतं. मला ते काटेरी झाड स्वयंपूर्ण वाटतं. स्वतःची शस्त्रं सांभाळत स्वतःचं रक्षण करणारं सक्षम जैविक वाटतं. वाळवंटातही हिरवेपण जपणारं एक कणखर व्यक्तिमत्त्वाच्या रूपात ते माझ्यासमोर येतं. आणि मनात सहज येतं, आपणही असेच निवडुंग होऊन जावे. जीवनाच्या वाळवंटी, विराण वाटेवरही हिरवेगार राहावे. काटे सुद्धा दिमाखाने मिरवावेत…

आणि जमलं तर आईच्या पूजेच्या ताटातला दिवाच होऊन जावे..

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रश्न सामाजिक स्वास्थ्याचा… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? मनमंजुषेतून ?

☆ प्रश्न सामाजिक स्वास्थ्याचा… ☆ श्री संदीप काळे ☆

छत्रपती संभाजीनगर जवळ घृष्णेश्वर मंदिर आहे. मी आणि माझा मित्र किशोर गुंजाळ दर्शनासाठी तिथे गेलो होतो. मंदिराच्या एका कोपऱ्यात एक स्त्री आणि एक पुरुष एकमेकांचे हात हातात घेऊन रडताना दिसले. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे निघालो.

थोड्यावेळाने माझे लक्ष झाडाखाली बसलेल्या काही लोकांकडे गेले. त्याच लोकांमध्ये ते दोघेही होते, ज्यांना मी मंदिरात रडताना पाहिले होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू अजूनही थांबले नव्हते. बाजूला बसलेली काही मंडळी त्यांना शांत होण्याचा सल्ला देत होती.

आम्ही थोडे पुढे गेल्यावर एका ठिकाणी जेवायला बसलो. त्या हॉटेलमधील एक माणूस दुसऱ्याला सांगत होता, “त्या झाडाखाली बसलेले जोडपे आहे ना, त्यांनी पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांची मुलं परदेशात शिकत आहेत. पैसा, संपत्ती, सगळं काही आहे, पण समाधान नसल्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला होता. ” हे ऐकून मी गडबडीने किशोरचा हात पकडला आणि त्या माणसांमध्ये जाऊन बसलो.

‘जर त्या त्या वेळी कोणीतरी मार्गदर्शन करणारे असते, तर माझ्याकडून चुकीचे काम झाले नसते’, असे ठामपणे सांगणारे अनेक जण मी पाहिले आहेत. मात्र, येथे मी ते प्रत्यक्ष अनुभवत होतो.

ते जोडपे, ते कुटुंब आणि त्या सर्व माणसांशी मी संवाद साधला. त्या संभाषणानंतर मी इतका थक्क झालो की, माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते. मी ज्यांच्याशी बोलत होतो, त्यांची नावे अर्चना देशमुख आणि सतीश देशमुख.

अर्चना देशमुख या मूळच्या यवतमाळच्या, पूर्वाश्रमीच्या अर्चना पाटील. त्या मराठवाड्यात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. सतीश देशमुख हे मराठवाड्यातील एक मोठे उद्योजक आहेत. त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. त्यांना दोन अपत्ये झाली. मात्र, काही वर्षांतच सतीश आणि अर्चना यांच्यातील मतभेद टोकाला पोहोचले आणि अखेर त्यांनी घटस्फोट घेतला.

सतीश आणि अर्चना यांचा मुलगा संकेत हा अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) क्षेत्रात कार्यरत आहे, तर त्यांची मुलगी सत्यभामा ही परदेशात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. घटस्फोटानंतरही सतीश यांच्या आई-वडिलांपासून अर्चनाच्या आई-वडिलांपर्यंत, तसेच त्यांच्या दोन्ही मुलांपर्यंत सर्वांचे नाते घट्ट राहिले. मात्र, सतीश आणि अर्चनाचे नाते मात्र तितकेच ताणले गेले होते.

दोघांचेही स्वभाव अतिशय टोकाचे होते. दोघेही प्रतिष्ठित आणि उच्च सामाजिक स्थान असलेले व्यक्ती असल्यामुळे त्यांना मन मोकळे करणे सहज शक्य नव्हते. पण खोलवर विचारल्यानंतर, ते दोघे हळूहळू व्यक्त होऊ लागले.

अर्चना सांगत होत्या, “आम्ही दोघेही आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी एवढे झटत होतो की, त्यात आमचे व्यक्तिगत आयुष्यच हरवून गेले. वैयक्तिक, मानसिक आणि शारीरिक गरजा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी कधी कधी एक पाऊल पुढे टाकावे लागते, तर कधी एक पाऊल मागेही घ्यावे लागते. कधी नवऱ्याने समजून घ्यावे लागते, तर कधी बायकोने. मात्र, हे सगळे आम्ही दोघेच विसरलो होतो. त्यामुळे आमच्या नात्यात इतकी दरी निर्माण झाली की, अखेर घटस्फोट झाला. ”

पुढे त्या म्हणाल्या, “खरं तर सामाजिक आणि शारीरिक गरजा कुठेतरी पूर्ण होतील, या विचाराने आम्ही विभक्त झालो. मात्र, घटस्फोटानंतर आम्हाला मानसिक शांती मिळाली नाही. अखेरीस आम्ही समुपदेशनासाठी गेलो, आणि तिथेच आम्हाला सत्याचा साक्षात्कार झाला. मग आम्ही निर्णय घेतला की, आपल्याला एकत्र राहिले पाहिजे. त्यातूनच आम्ही पुन्हा एकत्र आलो. ”

सतीश आणि अर्चनांच्या नातेवाईकांमध्ये संजू पाटील नावाचे एक वकील होते. ते म्हणाले, “हे दोघेजण पुन्हा एकत्र आल्यावर, त्यांच्या आई-वडिलांनी ठरवलं की आपण ज्या घृष्णेश्वराला मानतो, त्याच्या समोर जाऊन नतमस्तक व्हायला पाहिजे. त्यामुळे आम्ही सगळेजण आज घृष्णेश्वर ला आलो. ”

संजू एकेक विषय मांडत होते, आणि मी त्यांना प्रश्न विचारत होतो. अर्चना आणि सतीश हे दोघे विभक्त का झाले, याची कारणे उघडपणे सांगणे सोपे नव्हते. पण हा प्रश्न केवळ त्यांच्यापुरता मर्यादित राहिला नव्हता, तो आता संपूर्ण समाजाच्या मानसिक आरोग्याशी निगडित झाला होता. संजू वकील आणि त्यांच्यासोबत असलेल्या मंडळींनी यावर माझ्याशी चर्चा केली.

मी अर्चना आणि सतीश दोघांनाही विनंती केली, “तुम्ही आज अनेक भांडणाऱ्या आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून नाती तोडणाऱ्या स्त्री-पुरुषांसाठी एक आदर्श आहात. ”

अर्चना माझ्याकडे पाहत शांतपणे म्हणाल्या, “आम्ही काही उदाहरण वगैरे नाही आहोत. जर उदाहरण असायचं असेल, तर त्यासाठी आम्हाला खूप वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. स्त्री आणि पुरुष निसर्गाने वेगळे बनवले आहेत, पण अनेकदा दोघेही ते वेगळेपण स्वीकारत नाहीत. त्यामुळे वाद होतात. ”

डॉ. विजय दहिफळे

सतीश म्हणाले, “तेरा दिवसांपूर्वीच मी संभाजीनगरमध्ये डॉ. विजय दहिफळे (93560 33230) यांच्या ‘सामाजिक स्वास्थ्य’ कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्यांना मी याआधी टीव्हीवर पाहिले होते, पण त्या दिवशी प्रत्यक्ष ऐकले आणि मनावर जबरदस्त परिणाम झाला. त्याच कार्यक्रमातून मी माझ्या बायकोला फोन केला. रडत रडत तिने तो फोन उचलला आणि म्हणाली, ‘हा एवढासा फोन करायला तुला पंधरा वर्षे लागली?’”

 मी तिला उत्तर दिलं, “आता मला एकही मिनिट तुझ्यापासून दूर राहायचं नाही. तू जिथे कुठे आहेस, मला सांग, मी तुला भेटायला येतो. ” अर्चना संभाजीनगरपासून १५० किमी दूर होती, पण त्या क्षणी मी थेट तिच्याकडे पोहोचलो.

 मी तिला पाहिलं आणि जाणवलं—ती अजूनही तशीच होती. माझी वाट पाहत बसलेली, माझी काळजी करणारी. तिला फक्त माझ्याकडून प्रेमाची, आपुलकीची, सुरक्षिततेची जाणीव हवी होती.

 मी मात्र तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. तिला काय हवं आहे, कधी हवं आहे, हे समजण्याइतका मी सजग नव्हतो. पण ही डोळस समज आणि खऱ्या अर्थाने ‘पुरुष’ असण्याची अनुभूती मला डॉ. विजय दहिफळे यांच्या सहवासात आल्यावरच मिळाली. आम्ही दोघेही त्यांच्या क्लिनिक मध्ये जाऊन त्यांना भेटलो. त्यांनी आमचं गैरसमजुतींचं जडलेलं आवरण दूर करून सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र दिला.

 सतीश पुढे म्हणाले, “आमच्या घटस्फोटामुळे आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण झाला. आमच्या मुलांना मानसिक वनवास भोगावा लागला. आम्ही दोघेही आमच्या वैयक्तिक आयुष्यात सुखी नव्हतो. अशा कित्येक समस्या या एका निर्णयामुळे उभ्या राहिल्या होत्या. ”

मी आणि किशोर दोघेही हे ऐकून थक्क झालो.

 डॉ. विजय दहिफळे यांचा संपर्क आणि पत्ता घेऊन आम्ही त्यांना भेटायचं ठरवलं. संभाजीनगरमध्ये न्यायालयाजवळच त्यांचा दवाखाना होता. सायंकाळची वेळ होती, आणि त्या वेळीही डॉक्टरांना हार-तुरे घेऊन भेटायला आलेल्यांची संख्या मोठी होती. आम्हीही भेटण्याच्या रांगेत उभे राहिलो.

 तिथे उपस्थित असलेल्या लोकांशी बोलत असताना लक्षात आलं की, बहुतांश लोक शारीरिक आणि मानसिक त्रासांतून बाहेर पडून आता सुखी जीवन जगत होते. माझ्या मनात एकच विचार घोळत होता– आपलं सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी अशा डॉक्टरांची समाजाला नितांत गरज आहे. सतीश आणि अर्चना यांच्यासारख्या शेकडो जोडप्यांनी नव्याने आयुष्य सुरू केलं होतं, आणि त्यासाठी डॉ. दहिफळे यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरलं होतं.

 सुख, मग ते शारीरिक असो की मानसिक, ते उपभोगण्यासाठी आपला जन्म कसा आहे? आपण कसे वागले पाहिजे? याबाबत समुपदेशन करणे, आणि गरज पडल्यास स्वतः विकसित केलेली औषधे लोकांना देणे यामध्ये डॉ. दहिफळे यांचा कमालीचा हातखंडा होता.

 मी डॉक्टरांनी जे काही उभं केलं होतं, ते बारकाईनं निरीक्षण करत होतो. तुटलेली लग्न आणि मनं पुन्हा जोडण्याच्या कार्यात डॉक्टरांनी जागतिक पातळीवर विक्रम केले होते. एक-दोन नव्हे, तर अडीच लाखाहून अधिक जोडप्यांना सामाजिक स्वास्थ्याचं महत्त्व पटवून देऊन त्यांनी त्यांना एकत्र आणलं होतं.

 मी स्त्रीरोगतज्ञांविषयी अनेक ठिकाणी वाचलं होतं, पण इथं डॉक्टर पुरुषरोगतज्ञ होते.

 डॉक्टर बाहेर आले. त्यांनी प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधला. सर्वांशी बोलून झाल्यावर शेवटी आम्ही दोघेच उरलो. डॉक्टर आमच्याशी अगदी आत्मीयतेने बोलले. आम्ही अर्चना आणि सतीश यांचा दाखला देत डॉक्टरांशी संवाद सुरू केला.

 अत्यंत हुशार, प्रचंड हजरजबाबी आणि अनेक वर्षांचा सामाजिक स्वास्थ्याचा अनुभव असलेले डॉक्टर आमच्या प्रत्येक प्रश्नाला सखोल उत्तर देत होते. आम्ही अडीच तास डॉक्टरांशी गप्पा मारल्या, पण तरीही आमचे समाधान झाले नाही.

 मी डॉक्टरांना अनेक वेळा टीव्हीवर ‘कामशास्त्र’ या विषयावर मनमोकळेपणाने बोलताना पाहिले होते. आज समाजात, घरात, शाळा- कॉलेजांमध्ये सेक्स संदर्भात उघडपणे बोललं जात नाही. त्यामुळेच संपूर्ण पिढी गोंधळलेल्या विचारसरणीकडे आणि अज्ञानाकडे झुकत आहे, हे डॉक्टर आम्हाला समजावून सांगत होते.

 डॉक्टर म्हणत होते, “हे सत्य आहे की, सेक्स या विषयावर घरात, शाळेत, कॉलेजमध्ये आणि समाजात उघडपणे चर्चा केली जात नाही. त्यामुळेच तरुणाई दिशाहीन होत आहे. ”

 डॉक्टरांनी राज्यभरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये समुपदेशन मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेमुळे दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला.

डॉक्टरांनी त्यांच्या कामाचे पुरावे—बातम्या, छायाचित्रे आणि संशोधन दाखवत आम्हाला समजावले की, आपल्या भारतीय संस्कृतीने ‘कामसूत्र’ या महत्त्वाच्या ग्रंथाकडेही दुर्लक्ष केले आहे.

 ज्या डॉक्टरांनी पाच लाखांहून अधिक संसार वाचवले, दहा लाखांहून अधिक युवकांना शारीरिक जाणीव आणि समज दिली, त्या क्षेत्रात कदाचित राज्यात कुणीच इतकं मोठं कार्य केलं नसेल.

भविष्यात पुढील चारशे वर्षे डॉक्टरांचे ज्ञान पुढील पिढ्यांच्या उपयोगी यावे, यासाठी डॉक्टरांनी आधीच तयारी करून ठेवली आहे.

काही माणसं समाजासाठी पूर्णतः झपाटलेली असतात आणि ते केवळ समाजाच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करतात. हीच भावना डॉक्टरांच्या कार्यातून प्रकर्षाने जाणवत होती.

सेक्स, कामसूत्र, स्त्री-पुरुष संबंध यांसारखे शब्द ऐकताच पुढे काय बोलावे हे कळत नाही. मात्र, डॉक्टर या प्रश्नांकडे थेट आणि डोळसपणे पाहतात.

मूळचे अंबाजोगाईचे असलेले डॉ. दहिफळे हे “माझ्या घडणीत वडील सोपानराव आणि आई पार्वती यांच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे, ” असे आवर्जून सांगत होते.

डॉक्टर अनेक लोकांशी संवाद साधत होते, कुणाला समुपदेशन करत होते, कुणाला औषधे देत होते. पण हे सर्व करत असताना तिथे पैशाची अजिबात विचारणा नव्हती.

मी डॉक्टरांना विचारले, “डॉक्टर, समाजसेवा ठीक आहे, पण हे सगळं चालवायचं कसं?”

डॉक्टरांनी वर पाहत हात जोडले आणि उत्तर दिले, “त्याची सगळी काळजी घेतली आहे. ”

एखाद्या मंदिराबाहेर जशी मोठी गर्दी आणि प्रदीर्घ रांग असते, तशीच रांग डॉक्टरांना भेटण्यासाठीही होती. लोक हार-तुरे घेऊन त्यांना भेटण्यासाठी उभे होते.

मी आणि किशोर परतीच्या मार्गाला लागलो. आम्ही दोघेही चर्चा करत होतो की, मानसिक आणि शारीरिक आरोग्य समाजासाठी किती महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी डॉक्टर दहिफळे जे महान कार्य करत आहेत, ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं होतं.

डॉ. दहिफळे थेटपणे कार्य करतात आणि आता हे कार्य आपण सर्वांनी हाती घेण्याची गरज आहे.

 

तुम्ही डॉक्टर नसाल, तरीही तुम्ही चांगले समुपदेशक बनून भरकटलेल्या पिढीला योग्य मार्ग दाखवू शकता.

हेही तेवढेच सत्य आहे, बरोबर ना?

— डॉ. विजय दहिफळे 

© श्री संदीप काळे

संस्थापक, व्हाईस ऑफ मेडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रिय बाबा… कवयित्री : सुश्री वंदना श्रीवास्तव ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

☆ प्रिय बाबा… कवयित्री : सुश्री वंदना श्रीवास्तव ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

मूळ हिन्दी कविता लिंक >> हिन्दी साहित्य – कविता ☆ ओ मेरे जनक… ☆ सुश्री वंदना श्रीवास्तव ☆

प्रिय बाबा,

तू पुन्हा मला 

चिमणी म्हणालास.

मला आठवण आहे,

जेव्हा मी छोटीशी चिमणी होते,

अंगणात नाचत, बागडत होते, तेव्हा

तू मला आपल्या मांडीवर बसवून

आकाशाकडे बोट दाखवत 

म्हणाला होतास,

तुला उडायचं आहे.

हे अनंत आकाश तुझं आहे. ,

अनंत उड्डाणासाठी.

तेव्हा माझे डोळे लकाकले होते.

माझे पंख उत्साहाने फडफडले होते

पण, तेव्हा मला कुठे माहीत होते 

की मी पंख पसरून उडण्याचा प्रयत्न करेन,

त्या अनंत आकाशात,

तेव्हा माझ्याभोवती तू कुंपण घालशील 

माझे पंख थोडेसे खुडशील 

शाळेत पोपटपंची केलेलं

मी फटाफटा बोलत होते 

शाळेत शिकवलेल्या कविता 

लचकत, मुरडत गात होते, तेव्हा,

तू मुग्ध होत होतास.

माझ्या विद्वत्तेवर आणि असामान्यत्वावर 

पण जेव्हा मी,

माझे स्वत:चे शब्द बोलण्याची इच्छा धरली,

त्या ठरीव परिभाषेला बाजूला सारून,

माझी वाक्ये बोलू लागले,

तेव्हा तू गुपचुप माझी जीभच कातरलीस 

माझ्या शब्दकोषातील किती पाने फाडून टाकलीस 

तो तूच होतास ना! माझ्यावर खूप खूश होतास आधी 

मग आपला ‘कोहिनूर’ मूल्यांकनासाठी 

दुसर्‍यांकडे का सोपवलास? 

ज्यांनी माझं मनोबल आतपर्यंत तोडलं.

आता जर ‘चिमणी’ म्हणून बोलवायचं असेल,

तर कान टोचण्याच्या वेळी,

हा मंत्रही कानात पुटपुट की 

चुकीचं ऐकून मी गप्प बसू नये.

डोळ्यात काजळाबरोबर 

स्वप्न बघण्याची हिंमतही भर.

कवटाळताना मला इतकं साहस दे की 

त्यांना पूर्ण करण्याची जिद्द मी दाखवू शकेन 

इतका आत्मसन्मान भर माझ्यात, की

जे आहे, जशी आहे, तशीच बनून राहू शकेन.

इतकं करू शकलास बाबा,

तरच मला ‘चिमणी’ म्हणून हाक मार.

तरच मला ‘चिमणी’ म्हणून हाक मार… 

—–

मूळ कविता – ओ मेरे जनक

मूळ कवयित्री – सुश्री वंदना श्रीवास्तव 

संपर्क – नवी मुंबई महाराष्ट्र; ई मेल- vandana pradeep05@gmail.com

भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निर्माल्य !! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ निर्माल्य !! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

बाजारात अनेक फुले होती. मोगरा होता, गुलाब होता, जाई होती, जुई होती, सोनचाफा होता. शेवंती होती, झेंडू होता, सायली होती, मखमल होती, अनेक फुलं होती. सर्व लोकं ही फुले घेण्यास उत्सुक होती. प्रत्येक फुलाची ऐट वेगळीच. प्रत्येकाचे मूल्य वेगवेगळे आणि सुगंधाप्रमाणे वाढत जाणारे.

मी तगर!! कुठेही सापडणारे, सहज उपलब्ध असलेले नि त्यामानाने ‘नगण्य’ मूल्य असलेले सामान्य फुल. मला मनमोहक ‘गंध’ नाही, रूप नाही, रंग ही सामान्य (पांढरा). मला कोण देवाच्या पायी वाहणार ? परमेश्वराच्या मंगल आणि पावन चरणांना स्पर्श करण्याचे भाग्य मला कसे लाभणार ? 

मनात असलेली, ध्यास लागलेली गोष्ट यथावकाश घडतेच असे म्हटले जाते. मलाही त्याची अनुभूती आली. भगवंताच्या रूपाने एक साधू महाराज आले, त्यांनी मला ‘खुडून’ घेतले आणि भगवंताच्या चरणावर अर्पण केले. माझी सुप्त इच्छा पूर्ण झाली. मला मूल्य नाही मिळाले, किंमत मिळाली नाही, सुगंध मिळाला नाही, पण एक गोष्ट मिळाली की ज्यामुळे मी कृतकृत्य झालो. मी कोमेजलो नाहीच, निर्माल्य होण्याचे भाग्य मला मिळाले यापेक्षा पुण्य काय असू शकते ? भगवंताच्या सहवासात माझे ‘निर्माल्य’ झाले. निर्माल्य! 

… मनुष्याचे जीवन फुलासारखे तर असते. नाना तऱ्हेची फुले तशी नाना तऱ्हेची माणसे. फक्त निर्माल्य होणे गरजेचे. किमान तसा प्रयत्न आपण करायला हवा.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२१ – आधुनिक काळातला स्तुत्य उपक्रम ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२१ – आधुनिक काळातला स्तुत्य उपक्रम ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आधुनिक काळातला स्तुत्य उपक्रम….

जुन्या काळातल्या पुण्यात भरारी घेताना मन आधुनिक पुण्यातही झेपावतं. नुकतीच कोथरूड येथे, मयूर कॉलनीत, जोग शाळे समोर असलेल्या ‘श्री वर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठान, ‘ येथिल ‘जैन स्थानक भवन ‘ येथे ‘भुकेलेल्यांना पोटभर जेवण ‘ ह्या एकाच तत्वावर चालविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती मिळाली. येथे गरीब श्रीमंत एकाच पंक्तीला बसून भोजनाचा आस्वाद घेतात. ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, विद्यार्थी, फक्त 100 रुपयांत भाज्या वरणभात, पोळ्या नमकीन, रविवारी मिष्ठान्न अशा गरमागरम ताज्या सात्विक भोजनाचा मनमुराद आस्वाद घेतात. समस्त लहान थोर मंडळींची ‘पोटोबा’ शांती करणारे हे पुण्यपुरुष नव्हे संतच म्हणावं लागेल त्यांना, भोजन तयार करणाऱ्यांचाही यात सिंहाचा वाटा आहे, त्यांनाही ” अन्नदाता सुखी भव ” हा आशीर्वाद द्यावा लागेल कारण अनेकांच्या मुखात त्यांच्यामुळे घरगुती जेवण जाते. विद्यार्थ्यांच्या आया त्यांच्यामुळेच निर्धास्त असतात. असे हे महात्मा, समाजसेवक आहेत तरी कोण ? असा प्रश्न मला पडला. आणि त्यांची नांवे कळली. आनंद देणारे, घेणारे आणि वाटणारे हे समाजसेवक आहेत, श्री. ईश्वर भटेवरा आणि श्री. प्रितेश कर्नावट. त्यांच्या नांवातच ‘ईश्वर’ आहे आणि प्रितेश म्हणजे प्रित यांच्या नावातही ‘प्रेम’ आहे. या सदगृहस्थांशी संवाद साधताना जाणीव झाली, ‘ मानव सेवा हीच देशसेवा. ‘आणि ‘अन्नदान हेच श्रेष्ठ दान ‘ही त्यांची ब्रीदवाक्ये आहेत. भोजनोत्तर तृप्त झालेल्या रुग्णांचे, वयोवृद्धांचे त्यांना भरभरून आशिर्वाद मिळतात. संस्थेतर्फे महिन्यातून सहा वेळा वारजे व किनारा हॉटेल नजिकच्या मजुरांना मोफत नाश्ता देऊन ते संतुष्ट करतात. धार्मिक कार्यात तर त्यांचं पुढचं पाऊल असतंच पण भूतदयेतही ही संस्था अग्रेसर आहे. ‘जीवदया ‘ गोशाळेला नियमितपणे चारापाणी देऊन मुक्या जनावरांचा, गोमातेचाही ते आशिर्वाद घेतात. इतर मदत करून आणि देणगी देऊन काही सज्जन त्यांना हातभार लावतात आपणही या सात्विक थाळीचा उपभोग घेण्यासाठी भोजनालयाला भेट देऊया. उत्तम आणि स्तुत्य अशा ह्या उपक्रमेला खूप खूप धन्यवाद.  

त्यांचा पत्ता– श्रीवर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठान, जैन स्थानक भवन, योग शाळेसमोर, मयूर कॉ. पुणे संपर्क– ईश्वर भटेवरा — 83 78 88 34 45 आभार..

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दर्शन रामरायाचे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “दर्शन रामरायाचे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मैत्रिणीचा फोन..

” कशी आहेस नीता? खूप दिवसांनी फोन करते आहे.”

” अगं ठीक आहे. रामरायाचं दर्शन करून आले.”

यावर अगदी आश्चर्याने ती म्हणाली

” काय सांगतेस काय? कमाल आहे तुझी. मला बोलली पण नाहीस..”

त्यात काय सांगायचं मला काही समजलचं नाही…

” कधी ठरवलंस? मला विचारायचं तरी  …मी पण आले असते “

ती रागवलीच ….

“अग  रामनवमीला फार गर्दी असणार म्हणून सकाळी मनात आलं आणि जाऊन आले .”

“म्हणजे इथेच होय.. मग ठीक आहे. मला वाटलं अयोध्येला गेलीस का काय?”

सध्या सगळ्यांना राम म्हटलं की अयोध्याच का आठवत आहे कळतं नाही..

तीला म्हटल

” कधीतरी इथल्याही रामाला जायचं. देवळात रामनवमीची तयारी चाललेली आहे . कार्यक्रम पण सुरू आहेत.”

यावर ती म्हणाली

 ” एक सांगु मी किती दिवसात रामाच्या देवळात गेलेच नाहीये. जाईन एकदा”

” तुळशीबागेत जातेस ना ? मग जाऊन यायचं की”

” अगं  तिथे गेल की खरेदीच्या नादात विसरून जाते.”

“असू दे … पुढच्या वेळेस गेलीस की जा … अजूनही कुठे कुठे रामाची देऊळं आहेत की तिथेही जाऊन ये..”

“खरचं ग.. लक्षातच येत नाही संध्याकाळी  जाऊन येईन”

मी बघीतल आहे..खूप जणी अयोध्येला जायला मिळालं नाही म्हणून दुःखीकष्टी आहेत.

खरतरं ईथल्या देवळातल्या रामातही रामच आहे… कधीतरी जावं त्याच्या दर्शनाला.

त्या मूर्तीतही तेच प्राणदत्त्व आहे. पण आपण मूर्तीच्या सौंदर्याकडे मंदिराच्या शिल्पातच दंग होत आहोत का? असे वाटते आहे.

 आपण टीव्हीवर मोबाईलवर अयोध्येच मंदिर बघितलेलं आहे. जेव्हा जमेल तेव्हा जाऊ नाही जमलं तर जाणारही नाही.

आपण जाऊ शकलो नाही अशी कित्येक ठिकाणं आहेतच की ….

त्यासाठी वाईट कशाला वाटून घ्यायचं…

आपला रामराया फक्त अयोध्येत नाहीये. तो इथल्या देवळातल्या मूर्तीतही आपण पाहूया…

त्यासाठी आधी शांतपणे बसुया…

डोळे बंद केले आणि मनोभावे त्याची आठवण केली की अंतर्यामी त्याची जाणीव होते.

जमेल तेव्हा अयोध्येला  जरूर जा.

एक लक्षात ठेवा.. अमुक एक देवळात जाणं हेच आपलं साध्यं आहे का ?  तिथे गेल तरच देव भेटणार आहे का? याचाही विचार करा.

रामराया कुठे आणि कशाकशात पाहायचा याचा शोध घ्या.

अंतरंगात डोकावून  मनोभावे विचार करा .

रामराया कुठे ना कुठे भेटेलच…

रामनवमी पाच दिवसांवर आलेली आहे. रोज रामरक्षा, अभंग, रामाची गाणी, आरत्या म्हणा… तुमचा तुम्हाला आनंद मिळेल.

विष्णुदास नामा यांनी रामाची फार सुंदर आरती लिहीलेली आहे. ती तुमच्यासाठी पाठवत आहे.

आरती

श्रीराम जय राम जय जय राम

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम

टणत्काराचे ठाण  करी धनुष्यबाण

हनुमंत पुढे उभे हात जोडून ॥१॥ 

*

भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळीती

सिंहासनी आरुढले जानकीपती ॥२॥

*

रत्नजडित माणिक  वर्णु काय मुगुटी

स्वर्गातून देव पुष्पवृष्टी करिती ॥३॥

*

लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्रांची

चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ॥४॥

*

विष्णुदास नामा म्हणे मागणे हेचि

अखंडित सेवा घडो रामचंद्रांची…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares