☆ भाव, अभाव आणि प्रभाव …☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
श्रीकृष्ण युधिष्ठिर आणि बलराम दादाच्या आग्रहास्तव कौरवांकडे दूत बनून गेला. जसं रामराया मिथिलेत आल्यावर जनक महाराजांनी सीतेचं सुंदरसदन रिकामं करून रामरायाची निवास व्यवस्था केली होती, त्याचप्रमाणें दुर्योधनाने आपल्या भावाचं, दुःशासनाचं राजभवन सुशोभित करून कृष्णाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. परंतू , श्रीकृष्णाने ते नाकारलं. शिवाय युद्ध टाळण्याची चर्चा निष्फळ ठरल्यावर जेव्हा दुर्योधनाने एक प्रयत्न म्हणून भगवंताला ५६ भोग भोजनाचं निमंत्रण दिलं, तेसुद्धा गोविंदाने नाकारलं….
भगवंताने भोजन नाकारण्याचं जे स्पष्टीकरण दिलं ते फार मार्मिक आहे. गोपाळ म्हणाले, “दुर्योधना, एखाद्याकडचं भोजन घेण्याची तीन कारणे असू शकतात ! —
१) भाव २) अभाव ३) प्रभाव
१) अन्न देणाऱ्याचा प्रेम भाव
२) भुकेल्याकडे अन्नाचा अभाव
३) भुकेल्याच्या मनात अन्नदात्याबद्दलचा प्रभाव
मुरारी म्हणाला, “दुर्योधना, मला जेवू घालण्यात तुझा प्रेमभाव नसून कपट आहे. मी शिधा सोबत आणलेला असल्याने माझ्याकडे अन्नाचा अभाव नाही. आणि तुझ्या दुराचरणामुळे माझ्या मनांत तुझ्याबद्दल आदरयुक्त प्रभाव नाही. मग तुझे हे ५६ भोग मी का स्विकारावे ? “
लहानपणी घरात भरपूर दूध, दही, लोणी असूनही दुसऱ्याकडे डल्ला मारणारा हा माखनचोर आतासुद्धा सोबत शिधा असतांना दुसरीकडे जेवायला जायच्या विचारात होता.
तेव्हा, द्रोणाचार्य, कृपाचार्य या आदरणीय गुरूजनांनी भोजनाचं निमंत्रण दिलं. परंतू , दुराचारीचा पक्ष धरल्याने कान्हाने त्यांचंसुद्धा निमंत्रण नाकारून त्यांचं गर्वहरण केलं ! आणि मग भगवंतानें विचार केला की, भूक तर लागलीच आहे आणि हे सर्व लोक तर माझ्या भोजनाच्या अनुग्रहाला पात्र नाहीत. परंतु, ब्रम्हज्ञानी, कर्मयोगी आणि अनन्य भक्त असलेला एकजण या राज्यात आहे, तो म्हणजे भक्त विदुर !
मन करम वचन छांड चतुराई ।
तबहि कृपा करत रघुराई ।।
मग काय ! भगवंत विनाआमंत्रण या भक्ताच्या घरी स्वतःहून गेले. परंतू, दैव म्हणा किंवा प्रारब्ध, विदुरकाका बाहेर गेलेले होते. काकू घरी होत्या. आणि ज्या भगवंताची आतापर्यंत भक्ती केली तो प्रत्यक्ष आपल्या दारात उभा पाहून त्या मातेचा कंठ दाटून आला आणि रडत रडतच भगवंताला हाताला धरून बसवलं…
विदुराणी भिजलेल्या डोळ्यांनी हा मुखचंद्र न्याहाळत म्हणाली, ” लाला, अरे दररोज तुझ्यासाठी लोणी-साखर काढून ठेवत होते, तू आलाच नाहीस. आता आलास, पण लोणी-साखर तयार नाही ?”
आणि मग काय सांगू ! या साध्वीने, आत जाऊन लोणी करत बसले तर भगवंताचा चेहरा नजरेआड होईल, म्हणून मग बाजूला ठेवलेले केळीचे घड घेतले आणि या भावविभोर अवस्थेत केळी सोलून भगवंताला साली भरवू लागली, आणि केळी बाजूला टाकू लागली.
थोड्या वेळाने जेव्हा विदुरकाका आले, तेव्हा परब्रम्ह परमात्मा स्वतः अचानक घरी आलेला पाहून आता काकांनी अश्रूंनी श्रीचरणी अभिषेक घातला. नंतर त्यांना भगवंताला केळीच्या सालांचा भोग चालू पाहून कसंतरी वाटलं आणि मग त्यांनी केळी भरवायला सुरुवात केली. आणि काकांनी विचारलं, ” हे गिरीधर, केळी गोड आहेत ना ?”
एवढा वेळ हे काका काकू रडत होते, आता भगवंताचा गळा भरून आला, अश्रू अनावर झाले. हा गोकुळ नंदन म्हणाला,
“काका, केळी फार गोड आहेत. परंतू काकूंच्या हातानं जी सालं खाल्ली ना त्याची बरोबरी फक्त माझ्या बालपणी यशोदा मातेने भरवलेल्या लोण्याशीच होऊ शकते. आज मला माझं बालपण पुन्हा जगायला मिळतंय या अमृतसेवनाने “
आणि हे ऐकून पुन्हा तिघांनी अश्रूंचा बांध मोकळा केला. हे तिघं म्हणजे भक्ती, प्रेम आणि ज्ञान ! विदुरकाकांचं परमात्मज्ञान, विदुराणीची निर्लेप, निर्दोष भक्ती आणि भगवंताचं या दोघांवरचं अमर्याद प्रेम ! या तिघांपैकी कोण श्रेष्ठ हे कसं आणि का ठरवायचं ?
भगवंताला साक्षी ठेवून सांगतो, हा भक्ती, प्रेम आणि ज्ञान यांचा त्रिवेणी संगम म्हणजे नाम ! ते नाम जीवापाड जपून कर्तव्याच्या मर्यादा सांभाळाव्या, भगवंत आपल्या घरी यायला, आपल्या हृदयांत साठवायला वेळ नाही लागणार.
।। श्रीगुरुदेवदत्त ।।
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ भारतरत्न गुलझारीलाल नंदा ☆ संग्राहक – श्री माधव केळकर☆
भाडे न दिल्याने घरमालकाने ९४ वर्षीय वृद्धाला भाड्याच्या घरातून हाकलून दिले. म्हाताऱ्याकडे जुना पलंग, काही अॅल्युमिनियमची भांडी, प्लास्टिकची बादली आणि घोकंपट्टी वगैरे शिवाय काहीही सामान नव्हते. म्हातार्याने मालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली. शेजाऱ्यांनाही म्हातार्याची दया आली आणि त्यांनी घरमालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ द्यायाला सांगितले . घरमालकाने अनिच्छेने त्याला भाडे भरण्यासाठी थोडा वेळ दिला.
म्हातार्याने सामान आत घेतले.
तेथून जाणाऱ्या एका पत्रकाराने थांबून सर्व दृश्य पाहिले. ही बाब आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे उपयुक्त ठरेल असे त्यांना वाटले. त्याने एक मथळा देखील शोधला, ” क्रूर जमीनदार पैशासाठी म्हातार्याला भाड्याच्या घरातून बाहेर काढतो.”.. मग त्याने त्या जुन्या भाडेकरूचे काही फोटो काढले आणि भाड्याच्या घराचेही काही फोटो काढले.
पत्रकाराने जाऊन आपल्या प्रेस मालकाला घडलेला प्रकार सांगितला. प्रेसच्या मालकाने चित्रे पाहिली आणि त्यांना धक्काच बसला. त्यांनी पत्रकाराला विचारले, “ म्हाताऱ्याला ओळखता का? “ पत्रकार नाही म्हणाला.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मोठी बातमी छापून आली. ” गुलझारीलाल नंदा, भारताचे माजी पंतप्रधान, एक दयनीय जीवन जगत आहेत.” असे शीर्षक होते. या बातमीत पुढे लिहिले होते की, माजी पंतप्रधान कसे भाडे देऊ शकले नाहीत, आणि त्यांना घरातून कसे हाकलून देण्यात आले. आजकाल फ्रेशर्सही भरपूर पैसे कमावतात, अशी टिप्पणीही केली गेली. तर दोन वेळा माजी पंतप्रधान राहिलेल्या आणि दीर्घकाळ केंद्रीय मंत्री राहिलेल्या व्यक्तीकडे स्वतःचे घरही नाही.
वास्तविक गुलझारीलाल नंदा यांना रु. 500/- प्रति महिना भत्ता उपलब्ध होता. मात्र आपण स्वातंत्र्यसैनिकांच्या भत्त्यासाठी लढलो नसल्याचे सांगत त्यांनी हे पैसे नाकारले होते. नंतर त्यांच्या मित्रांनी त्यांना असे सांगून भत्ता स्वीकारण्यास भाग पाडले की मुळात त्यांना दुसरे कोणतेही स्त्रोत नाही. या पैशातून ते घरभाडे देऊन गुजराण करत असत .
दुसऱ्या दिवशी विद्यमान पंतप्रधानांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना वाहनांच्या ताफ्यासह त्यांच्या घरी पाठवले. एवढ्या व्हीआयपी वाहनांचा ताफा पाहून घरमालक थक्क झाला. तेव्हाच त्यांना कळले की त्यांचे भाडेकरू श्री गुलझारीलाल नंदा हे भारताचे माजी पंतप्रधान होते. घरमालक त्यांच्या गैरवर्तनाबद्दल लगेच गुलझारीलाल नंदा यांच्या चरणी नतमस्तक झाले.
अधिकारी आणि व्हीआयपींनी गुलझारीलाल नंदा यांना सरकारी निवास आणि इतर सुविधा स्वीकारण्याची विनंती केली. गुलझारीलाल नंदा यांनी, ‘या वृद्धापकाळात अशा सुविधांचा काय उपयोग?’ असे सांगून त्यांची ऑफर स्वीकारली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत ते एका सामान्य नागरिकाप्रमाणे सच्चे गांधीवादी म्हणून जगले. 1997 मध्ये सरकारने त्यांचा भारतरत्न देऊन गौरव केला.
आदरांजली आणि विनम्र अभिवादन
संग्राहक : माधव केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ आयुष्याची योग्य दिशा… सुश्री अंजली गवळी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
आयुष्यात अनेकदा असं होतं की, आपण ठरवतो एक आणि होतं वेगळंच. त्यामुळे संपूर्ण आयुष्यच भरकटल्यासारखं वाटायला लागतं. पुढे काय करावं याची काही दिशा दिसत नाही आणि त्यातून हतबलता वाढायला लागते. कारण जे काही अनपेक्षित समोर येतं त्याबाबत आपण काही विचारच केलेला नसतो. पण त्या परिस्थितीतही पुन्हा उठून सज्ज होण्यातच खरं सामर्थ्य आहे. जो हे सामर्थ्य ओळखतो, कोणत्याही परिस्थितीवर रडण्यापेक्षा तिला सामोरं जाण्याचं धाडस दाखवतो तोच खरा नायक ठरतो.
इतिहास अभ्यासक, लेखक, प्रेरणादायी वक्ते नितिन बानगुडे पाटील यांचं एक भाषण अतिशय प्रसिद्ध झालं आहे. आयुष्याला दिशा कशी द्यायची याविषयी ते मार्गदर्शन करतात. ते म्हणतात, “जगायचं असेल तर सिंहासारखं जगता आलं पाहिजे. शेळी बनून जगण्यात अर्थ नाही. पण त्यासाठी सिंहासारखे कष्ट घेण्याची तयारीही असली पाहिजे. जर आयुष्यात काही साध्य करायचं असेल, यश मिळवायचं असेल तर पहिले त्याच्या प्रवासाला सुरुवात करावी लागेल. आपल्या क्षमता, कौशल्य, सामर्थ्य सगळ्याच्या साहाय्याने स्वतःला झोकून द्यावं लागेल आणि मगच ध्येय ठरवलेल्या दिशेने आपण प्रवास करु शकतो. केवळ आणि केवळ अपार मेहनतीच्या जोरावरच कोणताही माणूस यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. जो कोणी हे काहीच करणार नाही तो मात्र नैराश्यात नाहीसा होईल. टिकतो तोच जो काहीतरी साध्य करतो, मिळवतो.
आयुष्यात आपण जिंकूच हा आत्मविश्वास असलं तर यश नक्कीच मिळतं. त्यासाठी स्वतःच्या क्षमतांची ओळख करुन घ्यावी, स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव असावी. यशस्वी तेच झाले ज्यांनी नियोजनपूर्वक काम केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यशाचं रहस्यही आपल्याला हेच सांगतं. भान राखून त्यांनी योजना आखल्या आणि बेभान होऊन त्या अंमलात आणल्या. आपणही स्वतःच्या क्षमता, मर्यादा जाणून नियोजन करावं आणि एकदा ते केलं की बेभान होऊन ते पूर्ण करण्यासाठी कामाला लागावं.“
असं म्हणलं जातं की, प्रत्येक माणूस असामान्य, अलौकिक असतो. त्याला हवं ते मिळवण्याची सगळी क्षमता त्याच्यात असते. पण त्या क्षमतांची जाणीवच नसल्याने तो सामान्य बनून जगतो. खरं तर अभिमान वाटेल असं काम आपल्याला करुन दाखवता आलं पाहिजे. त्यासाठी स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, स्वतःच्या क्षमतांवर आपल्याला प्रचंड विश्वास असायला पाहिजे. पण नेमकं इथेच आपण कमी पडतो आणि आयुष्याला दिशा मिळण्याऐवजी दशा होऊ जाते. आपलं भविष्य कसं असणार हे ठरवणं बरंचसं आपल्या हातात असतं. जर आपण नियमित व्यायाम केला, चांगल्या लोकांमधून राहून चांगले विचार केले, ध्येयपूर्तीसाठी भरपूर मेहनत घेतली तर आयुष्याची दिशा चांगलीच असणार आहे यात काही शंकाच नाही. पण जर आपण गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये राहत असू, महत्त्वाची कामं करण्यात चालढकलपणा करत असू, आपल्या आयुष्याबाबतच आपल्यात प्रामाणिकपणा नसेल, अनैतिकता भरली असेल तर आपल्या आयुष्याची दिशा भरकटणारच. त्यामुळे आयुष्याला चांगल्या दिशेने न्यावं की वाईट दिशेने न्यावं हे ठरवणं आपल्या हातात आहे.
आपल्या आजूबाजूचं वातावरणही आपल्या आयुष्याला कशी दिशा मिळणार, हे ठरवत असतं. आजूबाजूला काहीही महत्त्वाकांक्षा नसलेल्या व्यक्ती असतील, कोणतंही गांभीर्य नसलेल्या व्यक्ती असतील तर आपणही हळूहळू त्यांच्यासारखंच होत असतो. हेच जर ध्येय असलेली माणसं आजूबाजूला असतील, आयुष्याबाबत गांभीर्य असलेल्या व्यक्ती असतील तर आयुष्य चांगल्याच दिशेने जाईल. आपल्याला काय हवं आहे, कसं आयुष्य हवं आहे ते ठरवून आपण संगत निवडली पाहिजे. भविष्याच्या दृष्टीने व्यवस्थित योजना आखून त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपल्याला करता आले पाहिजेत. आपल्या आयुष्याचा उद्देश काय हे आपण एकदा लक्षात घेतलं तरी आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी मदत होऊ शकते. गरज आहे फक्त उघड्या डोळ्यांनी आयुष्याकडे बघण्याची, ध्येय ठरवून ते पूर्ण करण्याची आणि आपण असामान्य आहोत हे दाखवण्याचीही. हे सगळं आपण करु शकलो तर आपलं आयुष्य योग्य दिशेला आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो.
— ले. : अंजली गवळी
संग्राहक : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पुण्यातील ज्ञानप्रकाश हे दैनिक व टिळक यांचे अजिबात पटत नसे . एकदा ज्ञानप्रकाशच्या संपादकांना अग्रलेख लिहिणे जमणार नव्हते, म्हणून हरीपंत गोखले हे टिळकांकडे आले व म्हणाले उद्यासाठी मला एक अग्रलेख लिहून द्या. टिळक म्हणाले ‘अर्ध्या तासाने या !’ गोखले आल्यावर टिळकांनी एक लखोटा त्यांच्या हातात दिला. तो उघडून पाहिल्यावर त्यांचा डोळ्यांवर विश्वास बसेना. टिळकांनी ज्ञानप्रकाशच्या संपादकांच्या शैलीत अग्रलेख लिहिला होता– आणि तो त्यांच्या परंपरेशी साधर्म्य राखणारा— टिळकांवर टीका करणारा ! असे होते टिळक महाराज !
एका संपादकाने दुसऱ्या वृत्तपत्रात स्वतःवरच टीका करणारा अग्रलेख लिहावा, हा कधीही मोडला न जाणारा जागतिक विक्रमच होय .
“SWARAJYA IS MY BIRTH RIGHT, AND I SHALL HAVE IT.“ असे परकीय सत्तेला ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक वंदन
संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ स्त्रियांच्या विविध आणि सुंदर छटा… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
डेअरी दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा होतो. तिथे एकाच ठिकाणी ” दूध, दही, ताक, लोणी, तूप “
बघून वाटलं की अरेच्या, ह्या तर सर्वच स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..! पाहूया कसे ते..?—-
“दूध”
दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन: कुमारिका.
दूध म्हणजे माहेर . दूध म्हणजे आईवडिलांशी नातं —शुभ्र, सकस, निर्भेळ—-
स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही,ते लगेच बेचव होतं.
त्यावेळी तिला आपल्यासारखं जग सुद्धा स्वच्छ ,सुंदर,निरागस दिसतं.
“दही“
कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं की कुमारिकेची वधू होते . दुधाचं नाव बदलून दही होतं !
दही म्हणजे त्याच अवस्थेत थिजून घट्ट होणं !–लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत थिजून राहते. –दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. ” कितीही मारहाण करणारा,व्यसनी,व्यभिचारी, मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला “ तरी” स्त्री त्याच्याप्रती एवढी निष्ठा का दाखवते ? नवरा हा “पती परमेश्वर” म्हणून ? नव्हे –
तर याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं.
“ताक”
सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या की दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात,त्यांची आता सून होते, म्हणजे “ताक” होतं.– ” दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी.”
‘बडबडणारी सासू असो ( वात प्रकृती ) किंवा खवळलेला नवरा असो (पित्त प्रकृती)’–ताक दोघांनाही शांत करतं.. हा यावरचा उत्तम उपाय आहे असं आयुर्वेद म्हणतो.
“ताक” म्हणजे सुनेचं सासरशी नातं. सासरी स्त्री ताकासारखी बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय. तिथे दूध पचत नाहीच ! ‘दूध’ पाणी घालून बेचव होतं पण ‘ताक’ मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष संसारातल्या सगळ्या प्रश्नांवर कामी येतं .
“लोणी”
अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं. मग २० वर्षांनी जेव्हा माझं फलित काय असा प्रश्न ताक विचारतं, तेव्हा मऊ,रेशमी, मुलायम, नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो . हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं. रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण कण ‘लोणी’ होऊन हळूच बाजूला जमा होत असतात हे तिच्या लक्षात येत नाही. कानावरच्या चंदेरी बटा खरं तर रोज आरशात लाजून तिला सांगत असतात. पण तिला त्यांची ही भाषा कळत नाही . तरुण दिसण्यासाठी ती त्या बटांचं तोंड काळं करते. ‘ताकाला’ पुन्हा ‘दूध’ व्हायचं असतं, हा वेडेपणा नाही का ?
“तूप“
‘लोणी’ ही तिची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही. ते आपलं रूप बदलतं . नव-याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी, नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते – आणि त्याच लोण्याचं आता कढवलेलं “साजूक तूप होतं”. वरणभात असो ,शिरा असो ,किंवा बेसन लाडू असो, घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर साजूक तूप पडतं आणि जादू घडते.
देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात खोचलेली वात बघितली की मला घरासाठी येताजाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते.
घरासाठी, कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे ‘तूप’ संपून जातं.हीच ती स्त्रीची अंतिम उच्च अवस्था होय.
” दूध ते तूप ” हा असा अनोखा स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास.
” स्त्री आहे तर श्री आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.”
—” असा हा स्त्रीचा संपूर्ण प्रवास- न थांबणारा, सतत धावणारा,न कावणारा, न घाबरणारा, कुटुंबासाठी झिजणारा, कुटुंबाची काळजी घेणारा “. —–
ह्या प्रवासास तथा समस्त स्त्री वर्गास मानाचा मुजरा ll.
संग्राहिका : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈