मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जपानमध्ये महागाई” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “जपानमध्ये महागाई” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर ☆

☆

जपानमध्ये जेव्हा कोणत्याही वस्तूचा भाव प्रचंड वाढतो –

उदा. साखर, कोबी, मुळा – तेव्हा ते भारतात आपण करतो त्याच्या अगदी उलट वागतात.

१. ते ती वस्तू विकत घेणेच बंद करतात ‘काईमोनो नो तेबानारे’

जपानमध्ये एक संस्कृती आहे- ‘तेबानारे’ म्हणजे खरेदीपासून दूर जाणे.

जर कोबी २०० येनवरून ५०० येन झाला, तर जपानी गृहिणी त्या आठवड्यात कोबी घेणारच नाही. ती दुसऱ्या स्वस्त भाजीकडे वळेल, जसे की मोड आलेले बियाणे (मोयाशी – नेहमी १०-१५ रुपयांना मिळते), जे त्यांचे महागाईचे मापक आहे.

ते कधीच साठेबाजी करत नाहीत. साठेबाजी करणे हे स्वार्थी आणि लाजिरवाणे मानले जाते.

२. पर्यायाकडे वळणे – ‘चिए नो थ्योरी’

त्यांच्याकडे शहाणपणाची पाककृती (Wisdom Cooking) ही संकल्पना आहे. जर साखरेचा भाव वाढला तर ते लगेच:

– कमी साखर वापरणे

– मिरीन, मध किंवा कृत्रिम गोडव्यासारखा पर्याय वापरणे

– मेनूच बदलणे – गोड पदार्थाऐवजी खारट पदार्थ बनवणे

 जर कांद्याचा भाव दुप्पट झाला तर ते कांदा टाकून भाजी बनवणार नाहीत, ते कांद्याशिवाय भाजी बनवतील.

 ३. घबराट नाही, निषेध नाही

जपानमध्ये तुम्हाला कधीच दिसणार नाही:

– बाजारात लोक भांडत आहेत

– न्यूज चॅनेल “महागाई डायन” म्हणून ओरडत आहेत

– सरकारला साठा मर्यादा लादावी लागत आहे

सुपरमार्केट गेल्या वर्षीचा भाव vs सध्याचा भाव दाखवणारा बोर्ड लावतात, त्यामुळे ग्राहकाला कळते की हे हवामान/ वादळामुळे तात्पुरते आहे.

४. उत्पादक आणि विक्रेता भाववाढ सोडतात

AEON, Don Quijote सारखे मोठे जपानी सुपरमार्केट्सचे धोरण आहे – जरी घाऊक भाव ३०% वाढला तरी ते किरकोळ भाव फक्त ५-१०% वाढवतात आणि बाकीचा तोटा स्वतः सोसतात, ग्राहकांची निष्ठा टिकवण्यासाठी. ते काही महिने तोटा सहन करतात.

शेतकरी सहकारी संस्था (JA – Japan Agriculture) देखील भाव थंड करण्यासाठी लगेच बफर स्टॉक बाजारात सोडते.

५. सरकारी कारवाई खूप जलद आणि शांतपणे होते

जर २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ भाव २०% पेक्षा जास्त वाढला, तर METI आणि कृषी मंत्रालय लगेच:

– आयात कोटा उघडते

– सरकारी साठा बाजारात सोडते (ते तांदूळ, साखरेचा मोठा साठा ठेवतात)

– ग्राहकांना नाही तर शेतकऱ्यांना अनुदान देते

सर्वोत्तम उदाहरण: २०२३-२४ मध्ये खराब हवामानामुळे कोबीचा भाव ८०० येन प्रति नग झाला. जपानी लोकांनी फक्त कोबी खाणे बंद केले. सुपरमार्केटने अर्धा कोबी, पाव कोबी विकायला सुरुवात केली. रेस्टॉरंट्सनी मेनूमधून कोबी काढून टाकला. ३ आठवड्यांत भाव परत २०० येनवर आला. कोबी न खाल्ल्याने कोणीही मेले नाही.

एकाच ओळीत सांगायचे तर, ‘आपण भारतीय भावनिक प्रतिक्रिया देतो. ‘

व्यावहारिक प्रतिक्रिया द्या :- ‘खरेदी करू नका, भाव आपोआप खाली येईल:…

* * * *

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Life नावाच्या exam मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी!  –  लेखक : श्री विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

श्री मिलिंद जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ Life नावाच्या exam मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी!  –  लेखक : श्री विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

मित्र हो, काळ बदलतो तसं प्रश्नांचं स्वरूप देखील बदलतं.

Solutions काढण्याच्या पद्धती सुद्धा बदलतात!

ज्या गोष्टी, जे प्रॉब्लेम्स आपण गृहीतच धरलेले नसतात, कधी कधी नेमके तेच आपल्या वाट्याला येतात!

अशा वेळेस अजिबात घाबरू नका, भिऊ नका. शांतपणे विचार करा आणि योग्य ते निर्णय घ्या!

जे नातेवाईक, जे मित्र आपल्याला आपले खरेखुरे हितचिंतक वाटतात, त्यांचे जरूर मार्गदर्शन घ्यावे

आपण कोणाचा तरी सल्ला घेतो, उपाय विचारतो, याचा अर्थ आपण कमी हुशार असतो असं नाही!

‘राजे’ लोक सुद्धा प्रधानाचा सल्ला घ्यायचे, राष्ट्र प्रमुखाला सुद्धा सल्लागार नेमावे लागतात!

 एखाद्या प्रश्नावरती सर्व बाजूने विचार विनिमय होऊन उत्तम मार्ग निघावा, म्हणून सल्ला घ्यायचा असतो!

आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न येत असतात!

एका दुःखावर मार्ग सापडला की दुसरं दुःख लगेच तयार असतं, यालाच Life म्हणतात.आयुष्य असंच असतं. त्यामुळे अजिबात घाबरू नका!  

आपण आपलं दुःख जर कोणालाच सांगितलं नाही तर दुःख वाढत असतं, डोकं सुन्न होत असतं!

एखाद्या समस्येवर जेव्हा आपल्याला काहीच उपाय सुचत नसतो, तेव्हा मित्राची मदत घ्यायची असते!

फक्त ज्याला आपण आपले दुःख सांगू तो पाठ वळताच टिंगलटवाळी करून हसणारा नसावा, एवढी काळजी जरूर घ्यावी!

हल्ली समजदार असे मित्र, विश्वास ठेवावा असे नातेवाईक मिळणं खरंच अवघड आहे, परंतु असे लोक शिल्लकच राहिले नाहीत, असे अजिबात नाही!

संख्या कमी आहे, हे मान्य. पण अशा प्रगल्भ विचारसरणीचे लोकच उरले नाहीत हे मात्र चूक आहे.फक्त तसे मित्र, तशी माणसं आपल्याला ओळखता आली पाहिजेत आणि त्यांना जपताही आलं पाहिजे!

नवऱ्याला बायकोचा मित्र होता आलं आणि बायकोला नवऱ्याची मैत्रीण होता आलं की प्रपंचातील अनेक प्रश्न सहज सुटतात, परंतु कधी कधी तेच एकमेकांसाठी प्रॉब्लेम क्रियेटर्स ठरतात!

नवरा बायकोच जर क्षुल्लक कारणावरून भांडत बसले, एकमेकांवर रागराग करून चिडचिड करू लागले, अबोला धरू लागले तर घरातील खरे प्रश्न कसे काय सुटतील?

आयुष्य नावाच्या परीक्षेमध्ये फक्त वर्षाच्या शेवटी किंवा सेमिस्टर पद्धतीने पेपर्स नसतात!

प्रपंचामध्ये रोज परीक्षेला बसायचं असतं!

परीक्षेचा वेळ, Syllabus, टाइम टेबल, प्रश्नांची काठिण्य पातळी काहीही ठरलेलं नसतं!

शांतता, संयम, सहनशीलता, या सद्गुणांशिवाय Life नावाच्या exam मध्ये उत्तीर्ण होताच येत नाही! म्हणून हे सर्व सद्गुण जाणीवपूर्वक आत्मसात करा!

त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा, All the best!

काssssही काळजी करू नका सगळं चांगलं होईल!

☆

लेखक: प्रा.विजय पोहनेरकर

प्रस्तुती: श्री मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खऱ्या अर्थाने जगणं…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “खऱ्या अर्थाने जगणं…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

मी जितकी वर्षे जगलो आहे, त्यापेक्षा आता कमी वर्षे जगायची आहेत, हे समजल्यापासून माझ्यात झालेले बदल:

आता एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या निधनाने मी फार रडत नाही, कारण आज नाही तर उद्या माझीही वेळ येणार आहे हे मला उमगले आहे.

माझे अचानक निधन झाले तर, माझ्यानंतर काय होईल याची चिंता करणे मी सोडून दिले आहे. कारण माझ्याविना कोणी उपाशी राहणार नाही, माझ्यावाचून कुणाचे काहीही अडणार नाही. हे जग आधी होते तसेच अव्याहत सुरू राहणार आहे. माझी संपत्ती माझ्यासोबत येणार नाही, हेही उमगले आहे.

समोरच्या व्यक्तीकडे असलेला पैसा, पद, सत्ता, प्रतिष्ठा पाहून, आता मला इर्षा, असूया किंवा भीती वाटत नाही.

स्वतःसाठी भरपूर वेळ काढू लागलो आहे. जग माझ्या खांद्यावर टिकून नाही आणि माझ्याविना काहीच थांबणार नाही, हे लक्षात आले आहे.

छोट्या विक्रेत्यांशी आणि फेरीवाल्यांशी घासाघीस करणे आता मी बंद केले आहे. कधी आपली फसवणूक होते आहे, हे कळत असूनही ते हसत स्वीकारायला शिकलो आहे.

भंगार गोळा करणाऱ्यांना जुनी वर्तमानपत्रे, रिकामे डबे सहज देऊन टाकतो. त्यातून त्यांना मिळणारा आनंद पाहून मलाही समाधान मिळते.

रस्त्यावर बसून व्यापार करणाऱ्या एखाद्या गरजू व्यक्तीकडून कधी गरज नसलेली वस्तूही विकत घेऊ लागलो आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे तेच तेच बोलणे कितीही वेळा शांतपणे ऐकतो. “हे आधीही सांगून झाले आहे, ” असे म्हणणे सोडले आहे.

चुकीच्या व्यक्तीशी वाद घालण्यापेक्षा मानसिक शांतता जपणे पसंत करू लागलो आहे.

लोकांच्या चांगल्या कामांची आणि विचारांची मनापासून प्रशंसा करतो. त्यातून आनंद मिळतो. स्वतःच्या वाईट/चुकीच्या सवयी आणि हट्टी समजुती माझ्यावर लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवायला शिकलो आहे. त्यांना बदलवण्याचा प्रयत्न आता करत नाही.

जीवनाच्या शर्यतीत मला मागे टाकण्यासाठी कोणी डावपेच खेळत असेल, तर मी शांतपणे त्याला पुढे जाऊ देतो. कारण, माझा कोणी प्रतिस्पर्धीही नाही आणि मी कोणाशी स्पर्धाही करू इच्छित नाही.

स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी करायला शिकलो आहे. लोक काय म्हणतील, याची चिंता त्यांच्यावरच सोपवली आहे. इतरांना खूश ठेवण्यासाठी स्वतःचे मन मारणे बंद केले आहे.

पंचतारांकित हॉटेलांपेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात राहणे आवडू लागले आहे. जंक फूडपेक्षा साध्या, पौष्टिक अन्नात जास्त समाधान मिळते, हे आता लक्षात आले आहे.

गरज नसताना, स्वतःवर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा एखाद्या गरजूच्या हातात मदतीची रक्कम ठेवण्याचा आनंद अधिक मोठा वाटतो. मदत करण्याची वृत्ती पूर्वीही होती, आता ती प्रयत्नपूर्वक वाढवू लागलो आहे.

चुकीच्या माणसांसमोर स्वतःला बरोबर सिद्ध करण्यापेक्षा शांत राहणे पसंत करतो. जास्त बोलण्यापेक्षा मौनाची निवड करतो. स्वतःवर जास्त प्रेम करायला शिकलो आहे.

मी या जगातला एक प्रवासी आहे. माझ्यासोबत फक्त केलेली सत्कर्मे, वाटलेले प्रेम, आदर आणि माणुसकीच येणार आहे, याची खात्री पटली आहे.

हा देह आई-वडिलांची देणगी आहे, आत्मा ही परमेश्वराची देणगी आहे, माझे नावही इतरांनी दिलेले आहे. जेव्हा माझे स्वतःचे काहीच नाही, तेव्हा नफा-तोट्याची गणिते कशाला?

माझे दुःख, अडचणी, काळज्या, तक्रारी लोकांना सांगणे बंद केले आहे. कारण

जे समजून घेतात, त्यांना सांगावे लागत नाही आणि ज्यांना सांगायची वेळ येते, त्यांना समजूनच घ्यायचे नसते, हे वास्तव आता लक्षात आले आहे.

आता मी माझ्या स्वतःच्या आनंदात रमतो. माझ्या सुख-दुःखासाठी शेवटी मी स्वतःच जबाबदार आहे, हे मला उमगले आहे.

मी प्रत्येक क्षण जगायला शिकलो आहे. जीवन अत्यंत मौल्यवान आहे. कधीही काहीही घडू शकते, हे वास्तव स्वीकारले आहे. चांगले किंवा वाईट दिवसही निघून जातील. कारण, येथे काहीही कायमचे नाही.

अंतःकरणातील आनंदासाठी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. मानवसेवा, जीवदया आणि निसर्गसेवेत स्वतःला झोकून दिले आहे. अनंताकडे जाणारा मार्ग याच्यातून जातो, हे लक्षात आले आहे. निसर्गाच्या कुशीत राहायला शिकलो आहे, कारण उशिरा का होईना, शेवटी त्याच्याच कुशीत विलीन व्हायचे आहे, हे समजले आहे.

कदाचित मला आता खऱ्या अर्थाने जगता यायला लागले आहे.

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोष्ट खूप छोटी असते हो… –  लेखक : श्री प्रियदर्शन दातार ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

श्री मिलिंद जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ गोष्ट खूप छोटी असते हो… –  लेखक : श्री प्रियदर्शन दातार ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

तुम्ही गाडीतून जाताना,न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला, तर ब-याचदा तो मिळतच नाही,पण उतरून जर,”दादा, पत्ता सांगता का?” असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते….

गोष्ट खूप छोटी असते हो!करायची.

 

स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला ,घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही, तर फारसं बिघडत नाही.पण फोन केला तर नातं नक्कीच जुळतं…

गोष्ट खूप छोटी असते हो!करायची.

 

 अंधारात तुम्ही कधी पाय अडखळून पडलात,तसाच मागचाही पडू शकतो.तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं,तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात….

गोष्ट खूप छोटी असते हो!करायची.

 

आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादर चढतात.पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरुन तिला मदत केली तर,तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो….

गोष्ट खूप छोटी असते हो!करायची.

 

बॅंकेत कामाला गेल्यावर ,कोण्या  एकाला ‘स्लिप घेतल्यावर पुढे काय करायचं’ उमगत नसतांना,तुम्ही त्याला स्वत:हून मदत केली तर ,तुमचा पेन परत करताना तुमच्याकडे तो जे पहातो ना,ते खूप छान असतं….

गोष्ट खूप छोटी असते हो!करायची.

 

घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो.कधी त्याला ग्लोव्ह्ज द्यायचे.कधी skinचं मलम देऊन टाकायचं…

गोष्ट खूप छोटी असते हो!करायची.

 

कमी जागेत बाईक पार्क करतांना तिरक्या स्टॅंडवर न लावता,सरळ स्टॅंडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली तर त्याचं “thank you” ऐकायला मस्त वाटतं….

गोष्ट खूप छोटी असते हो!करायची.

 

किराणा दुकानाच्या गर्दीत,तिने घेतलेल्या सामानाचा ढीग पहाणा-या त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली तर सामान नीट ठेवणं तिला सोप्पं जातं.

माणसामाणसातील निष्कारण असलेली बंधनं गळून पडतात…

गोष्ट खूप छोटी असते हो!करायची.

 

जगण्याच्या रोजच्या धबडग्यात प्रत्येकाला हे सुचतंच असं नाही.

आपण द्यायचा सल्ला त्याला,जसा मी देतोय.

वाढवायचं प्रेम माणसामाणसातलं…

गोष्ट खूप छोटी असते हो!करायची.

☆

लेखक : श्री प्रियदर्शन दातार

प्रस्तुती: श्री मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “बिल्ववृक्षाची अमर कथा…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “बिल्ववृक्षाची अमर कथा…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

स्कंद पुराणातील बिल्ववृक्षाची अमर कथा:

युगानुयुगांच्या पलीकडे वसलेल्या त्या अनादि काळात, जेव्हा विश्वाचे नियम अजूनही स्वतःचे अस्तित्व शोधत होते, तेव्हा मंदार पर्वताच्या उत्तुंग रांगांवर एक वेगळेच चैतन्य स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत होते… कैलासाच्या गोठवणाऱ्या बर्फाळ शिखरांपेक्षा मंदार पर्वताचे वातावरण अधिक उबदार, गूढ आणि हिरवळीने नटलेले होते. दाट धुक्याची मखमली चादर ओढून उभ्या असलेल्या देवदार, पारिजात आणि कदंबाच्या विशाल वृक्षांमधून वाहणारा मंद वारा जणू स्वर्गीय सुरावट आळवत होता. सूर्याची तांबूस-सोनेरी किरणे जेव्हा त्या घनदाट अरण्यपथावर पडत, तेव्हा पानांवरचे दवबिंदू एखाद्या मोत्यासारखे चमकून उठत असत. याच अलौकिक अरण्यातून साक्षात देवाधिदेव महादेव आणि जगन्माता पार्वती शांत पावलांनी फेरफटका मारत होते… विचार करूनच अंगावर काटा येतो प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव आणि साक्षात या विश्वाची जगत जननी पार्वती तिथून फेरफटका मारतात… काय अद्भुत!

महादेवांच्या अंगावरील भस्म त्या कोवळ्या उन्हात सौम्य चकाकत होते, तर त्यांच्या विशाल जटांमधून एक-दोन मोकळ्या बटा वाऱ्याच्या लहरींसोबत संथपणे हेलकावत होत्या. त्यांच्या शेजारी चालणाऱ्या माता पार्वतीच्या मुखमंडलावर जगातील समस्त सृष्टीचे वात्सल्य एकवटले होते. त्यावेळी पार्वती केवळ एक देवी नव्हत्या, तर या अथांग विश्वाचे पालनपोषण करणारी एक आई, आणि महादेवांच्या वैराग्याला प्रेमाच्या बंधनात गुंफणारी एक सहचारिणी होत्या. चालता चालता पार्वतीच्या पायातील नूपुरांचा मंद झंकार अरण्यातील श्वापदांनाही एक वेगळीच शांतता देत होता. हिंस्र व्याघ्र आणि निष्पाप हरणे एकाच झऱ्याचे पाणी पिऊन शांत बसले होते, कारण साक्षात शिव आणि शक्ती आज त्यांच्या भूमीवर अवतरले होते… प्रत्यक्ष परब्रम्हाचे दर्शन घेण्याचे भाग्य या पशुपक्ष्यांचे होते… लता वेलींचे होते…

दोघेही चालत चालत पर्वताच्या एका अत्यंत उंच आणि विस्तीर्ण पठारावर आले. तिथे पोहोचताच अचानक उन्हाची तीव्रता वाढू लागली होती. स्वर्गीय मार्ग असला तरी त्या दिवशी सूर्यदेव जणू आपल्या संपूर्ण तेजाने तळपत होते. त्या रखरखत्या उन्हात आणि सततच्या भ्रमणामुळे पार्वतीदेवींच्या श्वासांची गती किंचित मंदावली. त्यांच्या सुकुमार पावलांना चालण्याचा थोडा शीण जाणवू लागला होता. ही तीच पार्वती होती जिने महादेवांना प्राप्त करण्यासाठी हजारो वर्षे पंचाग्नी साधना केली होती, कडक थंडीत आणि मुसळधार पावसात उभ्या राहून कठोर तपश्चर्या केली होती; परंतु आज महादेवांच्या सान्निध्यात त्या एका साध्या, कोमल स्त्रीच्या रूपात होत्या. त्यांच्या गोऱ्यापान आणि चंदनासारख्या तेजस्वी कपाळावर श्रमाचे बारीक, चकाकणारे घामाचे थेंब जमा होऊ लागले. महादेवांनी तिरप्या नजरेने आपल्या प्रियेकडे पाहिले. विश्वाचा संहार करणाऱ्या त्या त्रिनेत्र महादेवांच्या डोळ्यांत यावेळी प्रचंड वात्सल्य आणि अपार प्रेम दाटून आले होते. त्यांनी विचारले, “हे गिरिजे, तू थकलीस का? ज्या हिमालयाची तू कन्या आहेस, त्या पर्वतांच्या अंगाखांद्यावर चालताना तुझ्या मुखावर हा श्रमाचा भार कसा? ” पार्वतीदेवींनी हळूच मान वर केली आणि महादेवांच्या डोळ्यांत पाहत अत्यंत लाघवी स्वरात म्हणाल्या, “हे देवाधिदेव, तुमच्यासोबत चालताना विश्वाचा भारही हलका वाटतो, मग या शरीराचा शीण तो काय? पण या सूर्यकिरणांचा दाह इतका तीव्र आहे की माझ्या शरीरालाही या पंचमहाभूतांच्या नियमांची जाणीव करून देत आहे. “

पार्वतीचे हे शब्द ऐकून महादेवांच्या ओठांवर एक गूढ स्मितहास्य उमटले. ते थांबले, आणि पार्वतीही थांबली. त्या शांत क्षणी, पार्वतीच्या कपाळावरून घामाचा एक अत्यंत तेजस्वी, स्फटिकासारखा पारदर्शक थेंब हळूच ओघळला. तो केवळ घाम नव्हता, तर साक्षात आदिशक्तीच्या तपाचे, तिच्या प्रेमाचे आणि तिच्या चैतन्याचे सांद्र रूप होते. तो थेंब हवेत क्षणभर चमकला, आणि पुढच्याच क्षणी मंदार पर्वताच्या त्या काळ्याभोर, सुपीक मातीवर टपकन पडला. तो थेंब जमिनीला स्पर्श करताच संपूर्ण भूमंडळात एक सूक्ष्म कंपन निर्माण झाले. सभोवतालचा वारा क्षणार्धात थांबला. पानांची सळसळ थांबली. आकाशातील ढग त्या पठारावर येऊन स्तब्ध झाले. जणू काही एखादी महान घटना घडण्यासाठी संपूर्ण निसर्गाने आपला श्वास रोखून धरला होता. पार्वती स्वतः त्या मातीकडे आश्चर्याने पाहू लागल्या, कारण ज्या ठिकाणी तो घामाचा थेंब पडला होता, तिथे मातीतून एक तेजस्वी, हिरवागार प्रकाश बाहेर पडत होता.

त्या दिव्य प्रकाशातून एका क्षणात एक कोवळा अंकुर वर आला. पाहता पाहता, काही सेकंदांच्या आत त्या अंकुराने एका भव्य, देखण्या वृक्षाचे रूप धारण केले. त्या वृक्षाची उंची वाढली, त्याच्या फांद्या चारी दिशांना पसरल्या, आणि त्यावर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पाने उमलली. ती पाने साधीसुधी नव्हती.. एका प्रकारचे दिव्यत्व त्या प्रत्येक पानातून झळकत होते… प्रत्येक देठावर तीन-तीन पाने एकमेकांना जोडून एका त्रिकोणी आकारात डोलत होती. त्या झाडाच्या खोडातून एक विलक्षण, मनाला मोहून टाकणारा सुगंध सुटला होता. त्या सुगंधाने संपूर्ण मंदार पर्वत दरवळून गेला. पार्वती आश्चर्यचकित होऊन त्या वृक्षाकडे पाहतच राहिल्या. त्यांनी आपल्या हाताची नाजूक बोटे पुढे केली आणि त्या झाडाच्या एका कोवळ्या पानाला स्पर्श केला. तो स्पर्श होताच त्यांच्या संपूर्ण शरीरात एक विजेची लहर धावून गेली. त्यांना स्वतःच्याच अस्तित्वाचा, स्वतःच्याच आत्म्याचा एक अंश त्या झाडामध्ये धडधडताना जाणवला. देवी पार्वतीने चकित होऊन महादेवांकडे पाहिले आणि विचारले, “हे प्रभू, हा कोणता चमत्कार आहे? माझ्या शरीराच्या एका क्षुल्लक घामाच्या थेंबातून अशा अद्भुत वृक्षाची निर्मिती कशी झाली? आणि या वृक्षाच्या पानात, फांद्यांमध्ये मला माझेच अस्तित्व का भासत आहे? या झाडाचे रहस्य काय आहे? “

महादेवांचे डोळे मिटले होते. ते काही क्षण त्या वृक्षाच्या अंतरंगात सुरू असलेले चैतन्य पाहत होते. जेव्हा त्यांनी डोळे उघडले, तेव्हा त्यांचा चेहरा एका अलौकिक तेजाने उजळून निघाला होता. ते पुढे आले आणि त्यांनी त्या वृक्षाच्या खोडावर अत्यंत प्रेमाने हात ठेवला.

महादेवांचा गंभीर आणि धीरगंभीर आवाज त्या खोऱ्यात घुमू लागला, ” उमा, हा कोणताही साधा वृक्ष नाही. हे विश्वाचे एक नवीन आश्रयस्थान आहे. तुझ्या घामाच्या थेंबातून जन्मलेला हा वृक्ष आजपासून संपूर्ण त्रिभुवनात ‘बिल्ववृक्ष’ या नावाने अमर होईल. ज्याप्रमाणे तू माझ्या अस्तित्वाचा अर्धा भाग आहेस, त्याचप्रमाणे हा बिल्ववृक्ष माझ्या पूजेचा अविभाज्य भाग बनेल. या वृक्षाच्या कणाकणात तुझेच विविध रूप वास करेल. ” महादेवांचे हे बोलणे ऐकून पार्वतीची उत्सुकता अधिकच वाढली. त्या म्हणाल्या, “माझे रूप? या वृक्षाच्या अंगांगात मी कशी सामावले आहे, हे कृपा करून मला सांगा. “

भगवान शिव त्या वृक्षाच्या मुळांकडे पाहत म्हणाले, “ऐक प्रिये, या बिल्ववृक्षाच्या मुळांमध्ये तुझे ‘गिरिजा’ रूप वास करेल, जे पृथ्वीला घट्ट धरून ठेवेल आणि भक्तांना स्थैर्य देईल. याच्या खोडामध्ये तुझे ‘माहेश्वरी’ रूप असेल, जे विश्वाचे नियंत्रण करते. याच्या विशाल आणि पसरलेल्या फांद्यांमध्ये तुझे ‘दाक्षायणी’ रूप वास करेल, जे त्यागाचे आणि शक्तीचे प्रतीक आहे. या वृक्षाच्या प्रत्येक पानापानात साक्षात तुझे ‘पार्वती’ रूप असेल, जे अत्यंत कोमल, शीतल आणि पवित्र आहे. जेव्हा या वृक्षाला सुवासिक फुले येतील, तेव्हा त्या फुलांमध्ये तुझे ‘गौरी’ रूप दरवळेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा या वृक्षाला फळे लागतील, तेव्हा त्या अमृतासमान फळांमध्ये तुझे ‘कात्यायनी’ आणि साक्षात ‘महालक्ष्मी’ रूप वास करेल. म्हणूनच या वृक्षाला केवळ बिल्ववृक्ष नव्हे, तर ‘श्रीवृक्ष’ असेही म्हटले जाईल. “

महादेवांचे हे गूढ आणि अद्भुत वर्णन ऐकताना साक्षात पार्वतीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ज्या वृक्षाचा जन्म त्यांच्या घामातून झाला होता, त्याला महादेवांनी आपल्या हृदयाजवळ स्थान दिले होते. पण पार्वतीच्या मनात अजूनही एक शंका होती. त्यांनी विचारले, “हे देवाधिदेव, या वृक्षाची पाने तीनच्या समूहात का आहेत? या त्रिदलांमागे कोणते रहस्य दडलेले आहे? “

महादेवांनी एक त्रिदल तोडले. त्यांच्या हातावर ते हिरवेगार बेलपत्र अलौकिक दिसत होते. महादेवांनी ते पान आपल्या त्रिनेत्राजवळ धरले आणि म्हणाले, “हे त्रिदल म्हणजे केवळ तीन पाने नाहीत. हे माझ्या तीन नेत्रांचे प्रतीक आहे. हे सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांचे संतुलन आहे. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे साक्षात रूप आहे. हे त्रिदल म्हणजे सृष्टीची निर्मिती, तिचे पालन आणि तिचा संहार या तिन्ही अवस्थांचा संगम आहे. जो कोणी भक्त संसारात राहून पापांच्या जाळ्यात अडकला असेल, संकटांनी घेरला गेला असेल, त्याने जर अंतःकरणापासून हे त्रिदल बेलपत्र माझ्या लिंगस्वरूपावर अर्पण केले, तर त्याचे तीन जन्मांचे पाप एका क्षणात भस्मसात होईल. जो मला एक बिल्वपत्र अर्पण करेल, त्याला हजारो सुवर्णकमळे अर्पण केल्याचे पुण्य प्राप्त होईल. “

त्यानंतर महादेवांनी त्या वृक्षाला एक अत्यंत दुर्लभ आणि दैवी वरदान दिले. महादेव म्हणाले, “या पृथ्वीतलावर जेव्हा कलियुगाचा अंधकार पसरेल, मानवाचे मन विकारांनी आणि पापांनी मलीन होईल, तेव्हा हा बिल्ववृक्ष त्यांच्यासाठी तारणहार ठरेल. या वृक्षाच्या सावलीत बसून जो कोणी साधना करेल, त्याला साक्षात कैलासावर बसल्याचे समाधान मिळेल. जो मनुष्य बिल्ववृक्षाची लागवड करेल, त्याचे संगोपन करेल, त्याच्या कुळातील पिढ्यान् पिढ्या दारिद्र्य आणि अज्ञानाच्या अंधारातून मुक्त होतील. एवढेच नाही, तर माझ्या पूजेमध्ये गंगाजळ आणि बिल्वपत्र या दोनच गोष्टी मला सर्वात जास्त प्रिय असतील. हिरे, मोती, सुवर्ण किंवा राजवैभव मला प्रसन्न करू शकणार नाही, परंतु एका गरीब भक्ताने वाहिलेले हे साधे, हिरवेगार त्रिदल मला संपूर्ण विश्वाचे सुख देईल. “

महादेवांचे हे अमृततुल्य शब्द ऐकून मंदार पर्वतावरील समस्त निसर्ग जणू नतमस्तक झाला. स्वर्गातून देवांनी त्या बिल्ववृक्षावर पुष्पवृष्टी केली. गंधर्वांनी मधुर संगीत छेडले आणि अप्सरांनी नृत्य केले. पार्वतीदेवींनी अत्यंत भक्तीभावाने पुढे होऊन त्या नवजात बिल्ववृक्षाला आलिंगन दिले. एका मातेने आपल्या बाळाला छातीशी धरावे, तसे त्यांनी त्या झाडाला स्पर्श केला. त्यांच्या स्पर्शाने त्या झाडावर अनेक सुंदर, गोलाकार फळे लगडली. ती फळे बाहेरून अत्यंत कठीण, पण आतून अत्यंत मधुर आणि औषधी रसाने भरलेली होती, जी माणसाच्या शरीरातील सर्व दाह आणि रोग शांत करण्याची शक्ती ठेवत होती.

शिव आणि शक्ती यांच्या या अद्वैत प्रेमातून, एका घामाच्या थेंबापासून सुरू झालेला हा प्रवास आज सनातन संस्कृतीचा सर्वात पवित्र आधारस्तंभ बनला आहे. मंदार पर्वतावरील त्या दुपारच्या शांततेत जन्मलेला हा बिल्ववृक्ष आजही महादेवांच्या मंदिरात, भक्तांच्या अंगणात आणि शिवाच्या मस्तकावर तितक्याच श्रद्धेने डोलत आहे. जेव्हा जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर एक बेलपत्र वाहतो, तेव्हा नकळत आपण केवळ एक पान वाहत नसतो, तर माता पार्वतीच्या त्या त्यागाला, तिच्या घामातील चैतन्याला आणि महादेवांच्या त्या अथांग प्रेमाला स्पर्श करत असतो. हा वृक्ष आपल्याला शिकवतो की निसर्गातील प्रत्येक गोष्टीत ईश्वराचा वास आहे, आणि समर्पणाची खरी ताकद ही बाह्य श्रीमंतीत नसून अंतःकरणाच्या शुद्धतेत असते.

माता पार्वतीच्या घामातून जन्मलेल्या आणि साक्षात महादेवाला प्रिय असणाऱ्या या बिल्ववृक्षाची ही दुर्मिळ कथा!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ इतके मला पुरे आहे… कवी : अज्ञात  ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ इतके मला पुरे आहे… कवी : अज्ञात  ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

☆

बसायला आरामखुर्ची आहे,

हातामध्ये पुस्तक आहे,

डोळ्यांवर चष्मा आहे,

इतके मला पुरे आहे. ।।१।।

 *

निसर्गामध्ये सौंदर्य आहे,

निळे आकाश, हिरवी झाडी आहे,

सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्य आहे,

इतके मला पुरे आहे. ।।२।।

 *

जगामध्ये संगीत आहे,

स्वरांचे कलाकार आहेत,

कानांना सुरांची जाण आहे,

इतके मला पुरे आहे. ।।३।।

 *

बागांमध्ये फुले आहेत,

फुलांना सुवास आहे,

तो घ्यायला श्वास आहे,

इतके मला पुरे आहे. ।।४।।

 *

साधे, चवदार जेवण आहे,

सुमधुर फळे आहेत,

ती चाखायला रसना आहे,

इतके मला पुरे आहे. ।।५।।

 *

जवळचे मित्र आहेत,

मोबाईलवर संपर्कात आहेत,

कधीतरी भेटत असतात,

इतके मला पुरे आहे. ।।६।।

 *

डोक्यावरती छत आहे,

कष्टाचे दोन पैसे आहेत,

दोन वेळचे दोन घास आहेत,

इतके मला पुरे आहे. ।।७।।

 *

देहामध्ये प्राण आहे,

चालायला त्राण आहे,

शांत झोप लागत आहे,

इतके मला पुरे आहे. ।।८।।

 *

याहून जास्त आपल्याला काय हवे आहे?

जगातील चांगले घेण्याचा,

आनंदी, आशावादी राहण्याचा,

विवेक हवा आहे!

इतके मला पुरे आहे. ।।९।।

 *

विधात्याचे स्मरण आहे,

प्रार्थनेत मनःशांती आहे,

परमेश्वराची कृपा आहे,

इतके मला पुरे आहे. ।।१०।।

 *

शरीर माझे योग्य साथ देत आहे,

स्मृतीची मला साथ आहे,

मी कुणावरही आज अवलंबून नाही — ही देवाची कृपा आहे,

इतके मला पुरे आहे!

इतकेच मला पुरे आहे! ||११||

☆

कवी – अज्ञात 

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गणपती होता टिळकांशी भांडत…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “गणपती होता टिळकांशी भांडत…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

☆

काल रात्री गणपती बाप्पा

होता टिळकांशी भांडत,

आपल्या अडचणींची कैफियत

होता पोटतिडकीने मांडत ||

* 

देवघरातून तू मला

बाहेर का आणलंस?

तुमच्या लाडक्या देवाचं कौतुक

कशाला चार-चौघात मांडलंस?

 *

गायलास तू सुरुवातीला

ताल-सुरात आरत्या,

केलीस साधी फुलांची आरास

भोवती रंगीत बत्त्या.

 *

खूप मस्त छान असायचं

आनंद वाटायचा येण्यात,

सुख-शांती-समाधान मिळे

चैतन्य तुला देण्यात.

 *

दहा दिवस उत्सवाचे म्हणजे

असे, दिव्यत्वाची रंगत…

काल रात्री गणपती बाप्पा

होता, टिळकांशी भांडत ||

 *

पूर्वी प्रवचन, कीर्तन, गायनाने

मंगलमयी वाटायचे,

प्रबोधक, उद्बोधक भाषणांनी

विचार उंची गाठायचे

 *

आत्ता सारखा हिडीसपणा

मुळीच नव्हता तेव्हा,

शांताबाईच्याच नावाचा

आता अखंड धावा.

 *

पीतांबर, शेला, मुकुट

हे माझे खरे रुप,

शर्ट, पँट, टोपी, पागोटे

धिंगाण्याला फक्त हुरूप.

 *

शाडूची माती… नैसर्गिक रंग

गायब आता झाले कुठे?

लायटिंग केलेल्या देखाव्याने

मला दरदरून घाम फुटे!

 *

श्रध्दा, भक्तीभाव, आदर मनीचा

गेला ना रे सांडत…

काल रात्री गणपती बाप्पा

होता, टिळकांशी भांडत ||

 *

माणसां-माणसांनी एकत्र यावे

एकमेकांना समजुन घ्यावे,

देव-घेव विचारांची करतांना

सारे कसे एक व्हावे.

 *

जातीभेद नसावा…

बंधुभाव असावा,

सहिष्णुतेच्या विचारांनी

नवा गाव वसावा.

 *

मनातला विचार तुझ्या

खरंच होता मोठा,

पण, आज मात्र खऱ्या विचारांनाच

बघ मिळालाय फाटा. ओळख

 *

पूर्वी विचारांबरोबर असायची

खाण्यापिण्याचीही रेलचेल,

आता मात्र देखाव्यांमागे

दडलेला असतो काळा खेळ.

 *

पूर्वी बदल म्हणून असायचे

पोहे-चिवडा-चहा-काॅफी…

साग्रसंगीत जेवणा सोबत

लाडू-मोदक-पेढे-बर्फी.

 *

आता, रात्री भरले जातात

पडद्यामागे, मद्याचे पेले

डी. जे. वर नाचत असतात

माजलेले दादांचे चेले.

 *

नको पडूस तू असल्या फंदात

तेव्हाच मी होतो सांगत…

काल रात्री गणपती बाप्पा

होते, टिळकांशी भांडत ||

 *

कशासाठी उत्सव असा

सांग ना रे बांधलास?

देवघरातून गल्लोगल्ली

डाव माझा मांडलास!

 *

दहा दिवस कानठळ्यांनी

होतो मला आजार,

व्यवहारी दुनिया इथली,

इथे चालतो लाखोंचा बाजार.

 *

रितीरिवाज, आदर-सत्कार,

मांगल्याचा नाही पत्ता,

देवघरा ऐवजी माझा

रस्त्यावरती सजतो कट्टा.

 *

जुगार-दारु-सट्टा-मट्टा –

अनैतिकतेला येतो ऊत,

देवाऐवजी दैत्याचेच मग

मानेवरती चढते भूत.

 *

सामाजिक बाजू सोडून सुटतो

राजकारणालाच इथे पेव,

गौरी-गणपती सण म्हणजे –

गैरव्यवहाराची ठेव-रेव.

 *

नको रे बाबा, नको मला हा

मोठेपणाचा तुझा उत्सव,

मला आपले तू माझ्या जागी

परत एकदा नेऊन बसव.

 *

कर बाबा कर माझी सुटका

नको मला ह्यांची संगत…

काल रात्री गणपती बाप्पा

होता, टिळकांशी भांडत ||

 *

आपल्या अडचणींची कैफियत

होता पोटतिडकीने मांडत,

काल रात्री गणपती बाप्पा

होता, टिळकांशी भांडत ||

 ☆

कवी : अज्ञात

प्रस्तुती: शशी नाडकर्णी -नाईक

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ श्रीकृष्ण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ श्रीकृष्ण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

☆

कृष्ण खरंतर योगेश्वर होता.. शरीरातल्या सोळा सहस्त्र नाड्या त्याच्या ताब्यात होत्या.. जणू काय त्याच्या बायकाच.. लगेच आपण त्याला सोळा सहस्त्र बायका चिकटवल्या.. ज्ञान फक्त काहींच्याच पोतडीत राहिले.. उरलेले त्याला सोळा हजार स्त्रियांशी संग करणारा ठरवून मोकळे झाले.. मग त्याचे उदात्तीकरणही केले..

एखाद्याला ‘देव’ बनवण्याच्या प्रक्रियेत हे उदात्तीकरण फार आवश्यक असतं. त्याशिवाय माणसाचा देव होत नाही. ही प्रक्रिया शेवटी माणसाला दगड बनवून मंदिरात कोंडते..! आणि मग त्याने काय करायचं, काय खायचं, कसं वागायचं, कधी झोपायचं, कधी उठायचं हे त्याचे भक्तगण ठरवतात. तो लाचार होतो. कारण त्याचा देव झालेला असतो. आपण जसे असतो तसे आपल्याला जग दिसते.

दुसऱ्याच्या पत्नीबरोबर रासलीला खेळणारा कृष्ण आणि आणि स्वतःच्या पत्नीला संशयावरून वनवासात पाठवणारा राम ही सोयीस्कर रूपे भारतीय पुरुषांनी मनात जपली. पण त्याच्या ज्या रुपाची आज समाजाला गरज आहे, त्याचा आपण खरंच विचार करतो का?

या माणसाने आपल्याला ‘गीता’ दिली.. जगभरातले विद्वान आज गीतेला एक सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान मानतात.. या माणसाने आपल्याला ‘कृष्णनीती’ दिली.. राजकारण कसे खेळावे, खेळवावे याचे धडे स्वत:च्या वागणुकीतून घालून दिले… कृष्णाचे व्यक्तिमत्व इतके बहुरंगी आणि बहुढंगी आहे की, त्याचे पैलू दाखवण्यासाठी हरिवंश, भागवत आणि महाभारत या ३ ग्रंथाची निर्मिती करावी लागली आणि त्यानंतरही कितीतरी ग्रंथ आणि पुस्तके… पाळणा, दूध, दही,

रासलीला या पलीकडचा कृष्ण गिरीश जखोटिया यांनी त्यांच्या “कृष्णनीती ” या पुस्तकात रंगवला आहे…

त्याने जपलेली मूल्ये कालातीत आहेत, असा-

१. तत्त्वज्ञानी, राजकारणी, मुत्सद्दी…

२. त्यावेळी अस्तित्वात असलेल्या इंद्रपूजेलाही आव्हान देऊन निसर्गाची पूजा करणारा, त्याचे महत्त्व पटवून देणारा… रूढी आणि परंपरा न पाळणारा बंडखोर…

३. गवळी असूनही, आपल्या जातीची खंत न बाळगता लोकांना एकत्र करून त्यावेळच्या जुलमी राज्यसत्तेला उलथवणारा क्रांतिकारक…

५. द्वारकेला व्यापारी बाजारपेठ बनवणारा वेल्थ क्रिएटर…

६. स्थापत्य शास्रज्ञ(इंजिनिअर) आपल्या कलात्मक दृष्टीने द्वारका नगरी बनविणारा…

अशा अनेक रूपात यातील कृष्ण दिसतो…

गीतेची निर्मिती करणारा विप्र, पांडवांना विजय मिळवून देणारा क्षत्रिय, गोकुळात असताना दही दुधाचे योग्य वितरण करणारा, द्वारकेला बाजारपेठ बनवणारा वैश्य आणि गुराख्याच्या कामालाही प्रतिष्ठा मिळवून देणारा आणि त्यातही कमीपणा न मानता सर्वच समाजाचे स्वकर्तृत्वावर नेतृत्व करणारा शूद्र अशा सर्व वर्णात कृष्ण दिसतो आणि भावतो…

‘महाभारता’चा परिपक्व कृष्ण आपल्यासमोर येतो तो एक नेता, योध्दा, तत्त्वज्ञानी, राजकारणी आणि क्रांतिकारी म्हणून…

“कृष्णकिनारा” मधून तो भेटतो राधा, द्रौपदी आणि कुंतीचा सखा, मित्र, पाठीराखा म्हणून…

आणि जितकं मन, मेंदू, मस्तक जागे ठेवाल तितक्या रूपात तो मग भेटतच राहतो…

कृष्णाची ही रूपं समजून न घेता केवळ ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ला शरण जाऊन ज्या प्रथा, जशा आहेत तशा पाळणाऱ्या, जे समज जसे होते तसे निर्बुद्धपणे पुढे नेणाऱ्या सुशिक्षित (?) लोकांची चीड येते! निदान या गोष्टींचे भांडवल करतांना त्याची बुद्धिमत्ता, त्याची समज, त्याचा धोरणीपणा.. कलियुगात कसं वागावं याचा त्याने घालून दिलेला वस्तुपाठ तरी समजून घ्यायचा…

कृष्ण मस्तीत जगला.. कारण तो माणूस होता.. त्यामुळेच जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर यादव वंश संपला, तेव्हा तो काही करू शकला नाही आणि खंतावला.. माणसासारखे मरण आले त्याला..!

माणूस म्हणून त्याचे तेज, त्याचा लढाऊ बाणा त्याचे ‘योगेश्वर’ रूप.. म्हणजेच खरा ‘कृष्ण’… त्याला विविध पुस्तकांतून वाचणं म्हणजेच त्याची भक्ती. माणसाला माणूस म्हणून ज्यांना समजून घेता येत नाही किंवा घ्यायचंच नसतं त्यांना असे पोकळ भक्तीचे देखावे मांडावे लागतात…

ज्यांना समजून घेता येतं, त्यांच्यासाठी तर तो नेहमीच दीपस्तंभ…

कृष्णा… तू थोडा तरी समजलास, म्हणून आयुष्यातील कितीतरी चक्रव्यूहं भेदता आलीत…

 ☆

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ म्हातारपण: हे समजून घ्या… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ म्हातारपण: हे समजून घ्या… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

☆

म्हातारपणात एकटे पडू नका आणि कोणावरही ओझे बनू नका. यासाठी या गोष्टी आतापासूनच नक्की समजून घ्या.

१ :- जमिनीच्या भानगडीत पडू नका.

फक्त “शेजाऱ्याला धडा शिकवण्यासाठी” आपले आयुष्य कोर्ट-कचऱ्यांच्या पायऱ्यांवर वाया घालवू नका. कदाचित खटला संपण्यापूर्वीच तुम्ही जग सोडून जाल. आणि जर लढून जमीन जिंकलीच, तर तिथे तुम्ही नाही—वकीलच राहतील.

२ :- जुन्या गाड्या ओझे बनू शकतात.

पाच लाखांचा फायदा होत आहे, असा विचार करून जुन्या गाड्या घरी आणू नका. जर गाडी रस्त्यापेक्षा जास्त वेळ गॅरेजमध्ये उभी राहत असेल, तर हृदयविकाराचा झटका गाडीला नाही—तुम्हाला येईल.

 ३ :- आपली संपत्ती हस्तांतरित करण्याची घाई करू नका.

आज जरी मुले ‘देवासारखी’ वाटत असली, तरी एकदा सर्व संपत्ती त्यांच्या नावावर केली, तर त्याच घरात तुम्ही ‘नकोशी वस्तू’ बनू शकता. मुले वाईट नसतात, पण जग निर्दयी आहे. शेवटच्या श्वासापर्यंत काही ना काही आपल्या नावावर नक्की ठेवा.

४ :- आपली शेवटची बचत सुरक्षित ठेवा.

३० वर्षांच्या कमाईतून बनलेली पेन्शन मुलांच्या व्यवसायात गुंतवू नका. शेवटी औषधोपचारासाठी तुम्हाला त्याच मुलांसमोर हात पसरवावे लागतील.

५ :- मुलांच्या घरात चिकटून राहू नका.

फक्त ‘ती आपली मुले आहेत’ असे म्हणून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू नका. जास्त जवळिकीने तुमचे प्रेम त्यांच्यासाठी ओझे बनू शकते. स्वतःसाठी एक छोटीशी जागा बनवा आणि स्वतंत्र आयुष्य जगा.

६ :- तीर्थयात्रेसाठी मुलांची वाट पाहू नका.

‘जेव्हा त्यांना सुट्टी मिळेल तेव्हा ते मला नेतील’, असा विचार करून प्रतीक्षा करू नका. जेव्हा त्यांना वेळ मिळेल, तेव्हा कदाचित तुम्ही चालण्याच्याही स्थितीत नसाल. जोपर्यंत ताकद आहे, तुमच्या आवडत्या ठिकाणी जा—मग एकटेच का असेना.

७ :- आज जे खाण्याची इच्छा असेल, तेच खा.

तुमच्या जोडीदाराला (पती/पत्नीला) आजच त्यांच्या आवडीची गोष्ट खाऊ घाला. खाण्याची थाळी घेऊन स्मशानात रडत म्हणणे—“त्यांना हे खूप आवडायचे”—फक्त दिखावा आहे.

 ८ :- स्वतःसाठी आरामाची व्यवस्था करा.

मृत्यूच्या दिवसापर्यंत कामाचा डोंगर उपसत बसू नका. जर तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त धावतच राहिलात, तर शेवटी काहीही जिंकलेले नसेल. आपल्या शरीराला हवा असलेला आराम द्या.

९ :- झोपेपेक्षा मोठे कोणतेही औषध नाही.

अकारण येणारा निद्रानाश कमी करा आणि शांतपणे झोपा. जेव्हा तुम्ही आजारी पडाल, तेव्हा कोणीही तुमचे दुःख वाटून घेण्यासाठी येणार नाही—ते तुम्हाला एकट्यालाच सहन करावे लागेल.

 १० :- हे कधीही विसरू नका की तुम्ही एकटेच आला आहात.

ही अपेक्षा कमी करा की कोणीतरी तुमच्यासाठी सर्व काही करेल. एक दिवस तुमची सावलीही तुमची साथ सोडून जाईल. मृत्यूही एकटाच असतो—त्यामुळे एकटे राहणे आनंदाने शिका.

आनंद अशी कोणतीही गोष्ट नाही जी कोणी तुम्हाला देईल; आनंद अशी गोष्ट आहे जो तुम्हाला स्वतःच निर्माण करावा लागतो.

जेव्हा तुमचे पती/पत्नी निरोगी असतील, तेव्हा लहान-मोठे प्रत्येक काम स्वतः करायला शिकण्यात अजिबात संकोच करू नका.

तुम्ही जरी वसीयत (मृत्युपत्र) लिहिली असली, तरी ती बदलण्याचा संपूर्ण अधिकार तुमच्याकडे आहे—हे लक्षात ठेवा.

जर वारसदार तुम्हाला त्रास देत असतील किंवा परेशान करत असतील, तर लक्षात ठेवा—आज कायदा आणि जिल्हा प्रशासन तुमच्या पाठीशी आहे.

रोज चालण्याची सवय ठेवा आणि जर जुने मित्र किंवा नातेवाईक असतील, तर त्यांच्याशी तुमच्या तरुणपणाच्या आठवणी नक्की शेयर करा.

नेहमी लक्षात ठेवा की एक दिवस जीवनाचा हिसाब पूर्ण होईल; त्या शेवटच्या दिवसासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहा.

शेवटी, हे जाणून की तुम्ही काहीही सोबत नेणार नाही—सर्वांच्या सोबत प्रेम आणि मित्रत्वाने वागा, गरजवंतांना मदत करा आणि स्वतःला एक चांगला माणूस बनवा…

☆

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चिमूटभर गोडी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆

डॉ ज्योती गोडबोले 

 

? वाचताना वेचलेले ?

☆ “चिमूटभर गोडी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆

☆

“भाजीत चिमूटभर साखर घाल गं, म्हणजे उग्रपणाही कमी होतो आणि पदार्थाची गोडीही वाढते, ” स्वयंपाक करताना आजी म्हणायची. भाजीमध्ये चिमटीभर साखर किंवा गूळ हवा म्हणजे पदार्थाची चव वाढते.

मला नवल वाटतं, आजीवर्गाचं.

त्यांना बरोबर माहीत असायचं, कशात काय घातलं म्हणजे गोडी वाढते.

पूर्वी घरोघरी कर्ता पुरूष म्हणजे करारी, थोडा तापट, घराला धाकात ठेवणारा असायचा.

कुणाचं कशावरून बिनसलं आणि आजोबांचा आवाज चढला की आजी, “हो, हो. बरोबर आहे तुमचं, ” म्हणून होणारा वाद टाळायची नंतर सावकाशीने आजोबांना मुद्दा पटवून द्यायची.

चिमूटभर समजूतदारपणा दाखवला की कलह टळतो, असं म्हणायची.

घरातील मूल चुकलं तरी त्यावेळेस आवाज चढवायचा नाही, कारण मूलही मग आक्रमक होतं आणि ऐकत नाही.

सावकाशीने समजावून सांगायचे, ज्यावेळेस ते समजून घेईल. चिमूटभर माया दाखवली तर सांगण्याचा परिणाम होतो, असं आईपण म्हणायची.

म्हणूनच त्यांचे संसार विनाकलह झाले.

कामवाल्या बाईबाबतही असंच. तिने कधी दांडी मारली, कधी उशिरा आली, तरी ती पण एक संसारी बाई आहे, आपल्यापेक्षा तिला आव्हानं असतात जास्त. मग अशा वेळेस “का गं आज उशीर झाला? बरी आहेस ना? काळजी घे गं बाई. चल. दोन घास खाऊन घे, ” म्हटलं की ती बाई कायम आपल्याला बांधून राहील.

थोडी माणूसकी खूप मोठं काम करते.

थोडा विश्वास, थोडं प्रेम, थोडी आपुलकी या गोष्टी माणसं जोडायला हव्यातच संसारात.

आजी नेहमी म्हणायची – आपण ४ पावलं मागे आलो तरी लहान होत नाही आपण. एखादे वेळेस माघार घेणं हे माणूस म्हणून २ पावलं आपल्याला पुढे घेऊन जातं.

आताची सतत ‘अरे ला कारे’ करायची सवय पाहिली की आपण खूप काहीतरी गमावतो आहोत, असं वाटतं.

ही एक चिमूट आयुष्यात बदल करू शकते.

थोडा चिमूटभर अहंकार कमी केला तर आपण आयुष्यात चिमूटभर आनंदाची नक्कीच भर घालू शकतो.

☆

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1