मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फक्त नऊ ओळीत महाभारताचे सार…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “फक्त नऊ ओळीत महाभारताचे सार” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

फक्त नऊ ओळींमध्ये महाभारताचे सार – – 

*फक्त नऊ ओळींमध्ये महाभारताचे सार समजून घ्या, ज्यात पाच लाख श्लोक आहेत… *

तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल,

तुम्ही स्त्री असो वा पुरुष,

तुम्ही गरीब असो वा श्रीमंत,

तुम्ही तुमच्या देशात असाल किंवा परदेशात,

थोडक्यात…

*जर तुम्ही माणूस असाल तर खालील महाभारतातील मौल्यवान ९ मोती वाचा आणि समजून घ्या… *

१. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या अवास्तव मागण्या आणि इच्छांवर वेळीचं ताबा ठेवला नाही तर तुम्ही आयुष्यात असहाय्य व्हाल… *’कौरव’*

२. तुम्ही कितीही बलवान असलात तरी तुम्ही अधर्माला पाठिंबा दिलात तर तुमचे सामर्थ्य, शस्त्रे, कौशल्ये आणि आशीर्वाद सर्व निरुपयोगी होतील… *’कर्ण’*

३. *तुमच्या मुलांना इतके महत्त्वाकांक्षी बनवू नका की ते त्यांच्या ज्ञानाचा गैरवापर करून संपूर्ण विनाश घडवून आणतील… *

 *’अश्वत्थामा’*

४. अशी वचने कधीही देऊ नका की तुम्हाला अधर्मींना शरण जावे लागेल… *’भीष्म पितामह’*

५. *संपत्ती, सत्ता, अधिकार यांचा गैरवापर आणि चुकीच्या लोकांचे समर्थन हे शेवटी संपूर्ण विनाशाकडे नेत असते…  *’दुर्योधन’*

६. *सत्तेचा लगाम कधीही आंधळ्या व्यक्तीकडे सोपवू नका, म्हणजे जो स्वार्थ, संपत्ती, गर्व, ज्ञान, आसक्ती किंवा वासनेने आंधळा आहे, कारण तो विनाशाकडे नेईल…  *’धृतराष्ट्र’*

७. ज्ञानासोबत शहाणपण असेल तर तुमचा विजय नक्कीचं होईल… *’अर्जुन’*

८. फसवणूक तुम्हाला सर्वच बाबतीत यशाकडे नेणार नाही…  *’शकुनी’*

९. *जर तुम्ही नैतिकता, नीतिमत्ता आणि कर्तव्य यशस्वीपणे जपले तर जगातील कोणतीही शक्ती तुमचे नुकसान करू शकत नाही. * *’युधिष्ठिर’*

हा लेख सर्वांसाठी फायदेशीर आहे, म्हणून कृपया कोणत्याही बदलाशिवाय सामायिक करा.

*सर्वे भवन्तु सुखिनः*

*सर्वे सन्तु निरामयः*

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चढलेला मोठा आवाज” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “चढलेला मोठा आवाज” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

“शांत स्वरात बोलल्यास साक्षात ईश्वरच त्या घरात वास्तव्य करतो. “

– – आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की, घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये. विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत ठेवावा.

घरात हसतमुखाने वावरावे. मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे.

घरांतील नोकरवर्गावरही तारस्वरात ओरडू नये कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या *ऋण लहरी अशुभ अनुभव* देऊ लागतात. अचानक पोट बिघडते. भूक मंदावते. अस्वस्थ वाटू लागते. म्हणून कोणालाच चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे *अदृष्य लहरींची शिकार* होण्याची वेळ आणते. काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नि जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो.

शुभ लहरींचे ही तसेच आहे. १२ हजार मैलांवर असलेल्या मुलाला आई आशिर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते. २५ वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे उत्तरीय ओले होते. वासराला पाहून गायीला पान्हा फुटतो.

एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवितात. एखाद्या सफाई कामगाराला बक्षिस दिले तर तो हात उंचावून आशिर्वाद देणार नाही, थँक यु म्हणणार नाही पण 

त्याच्या मनातून निघणाऱ्या आनंद लहरींमुळे तुमच्या शरीरा भोवती एक विशिष्ट चुंबकीय तरंग तयार होऊन तुम्हाला आगळावेगळा उत्साह वाटेलच. 

म्हणून दानधर्माचे अपार महात्म्य आहे.

फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे. ती दाहक बोलण्याने अपमानित होते.

म्हणून संवाद साधतांना, मंत्रपठण करतांना, स्तोत्रे म्हणतांना, आरती करतांना, पोथी वाचतांना, *आपला स्वर कमालीचा मृदू असावा. * भले तुम्ही मग कितीही बैठक, सत्संग करा पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तुमच्या आरडा ओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही. शक्य असेल तेवढे शांतपणे बोला, शांतपणे वागा तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल नाही तर सगळं व्यर्थ आणि देखावा आहे.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ’यश म्हणजे?…’ – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ’यश म्हणजे?…’ – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆

(महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनी एका व्याख्यानात “यश म्हणजे काय? ” यावर केलेले मिश्कील भाष्य )

वयाच्या चौथ्या वर्षी यश म्हणजे…

आता चड्डीत ‘शू’ न करणे,

 

आठव्या वर्षी यश म्हणजे…

घरी परत येण्याचा नेमका रस्ता माहित असणे,

 

बाराव्या वर्षी यश म्हणजे

मित्रमंडळी जमा होणे,

 

अठराव्या वर्षी यश म्हणजे

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे,

 

तेवीसाव्या वर्षी यश म्हणजे

विद्यापीठातून पदवी संपादन करणे,

 

पंचवीसाव्या वर्षी यश म्हणजे

मनाजोगता जॉब मिळवणे,

 

तिसाव्या वर्षी यश म्हणजे

लग्न करून स्थिरस्थावर होणे,

 

पस्तिसाव्या वर्षी यश म्हणजे

बऱ्यापैकी पैसा कमावणे,

 

पंचेचाळीसाव्या वर्षी यश म्हणजे

अद्यापही आपण तरूण असल्याचा भास निर्माण करणे,

 

पन्नासाव्या वर्षी यश म्हणजे

मुलांना चांगले शिक्षण देणे,

 

५५ व्या वर्षी यश म्हणजे

आजही सगळी कर्तव्ये पार पाडण्यासाठी सक्षम असणे,

 

६० व्या वर्षी यश म्हणजे

ड्रायव्हिंग लायसेन्सचे नूतनीकरण करणे,

 

६५ व्या वर्षी यश म्हणजे

निरोगी आयुष्य जगणे,

 

७० व्या वर्षी यश म्हणजे

कुणालाही आपले ओझे न वाटणे…

याचे समाधान असणे,

 

७५ व्या वर्षी यश म्हणजे

जुन्या मित्रांसोबत लहानपणीच्या गप्पा मारणे,

 

८० व्या वर्षी यश म्हणजे

घरी परत येण्याचा रस्ता लक्षात राहणे,

 

आणि…

 

८५ व्या वर्षी यश म्हणजे

पुन्हा एकदा चड्डीत ‘शू’ न करणे…

लेखक :  पु. ल. देशपांडे

प्रस्तुती :श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वर्ग नावाच्या मैफलीतील कलावंत…! – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती – सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

 

? वाचताना वेचलेले ?

☆ वर्ग नावाच्या मैफलीतील कलावंत…! – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती – सौ. दीपा नारायण पुजारी ☆

शिक्षक म्हणजे बोलणारा कारकून नव्हे. तर तो एक कलावंत आहे. कलावंत ज्याप्रमाणे जन्मावा लागतो असे म्हणतात ;त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा जन्मावा लागतो असे मला वाटते. याचाच अर्थ कलावंताची प्रतिभा जशी उपजत असते, पुढे ती मार्गदर्शनाने फुलवता येते. विविध प्रकारच्या कार्यशाळांतून आकाराला येते. व्यासंगाने कलेची जडणघडण करता येते. परंतु मुळात त्या व्यक्तिमत्त्वात कला निर्मितीचे काही रसतंतू असावेच लागतातत्. केवळ कुणाला तरी वाटते आहे म्हणून, कवी नर्तक, चित्रकार गायक, निर्माण करता येत नाहीत. अध्यापन व्यवसायाचा मी जेव्हा अगदी मुळातून विचार करतो, तेव्हा मला असे वाटते, कलावंताप्रमाणे अध्यापक हा सुद्धा अभिजात असावा लागतो. नव्या पिढीला काहीतरी मनातलं सांगावे, केवळ इथून तिथून गोळा केलेले, आजच्या भाषेत कॉपी-पेस्ट केलेले अध्यापन असून चालत नाही. जमिनीतून तरारून बी उगवावे तसे अध्यापन असावे लागते. केवळ देखावा म्हणून प्लॅस्टिकचे झाड प्लास्टिकची फुले कितीही हुबेहूब केली, तरीही आलेल्या पाहुण्यांना चकवता येईल; परंतु फुलपाखरांना चकवता येत नाही. कारण फुलपाखरांना फुलांच्या आत्म्यातील सुगंध कळतो. त्याचप्रमाणे, नव्या पिढीलाही समोर उभा असलेला आपला शिक्षक हा अंतर्यामातून बोलतो आहे की नाही हे नक्कीच जाणवते. विद्यार्थी उघड व्यक्त करू शकणार नाही, परंतु त्याला अध्यापनातील सच्चेपणा नक्कीच प्रतीत होत असतो. मनापासून केलेल्या अध्यापनाने विद्यार्थ्यांची हृदये स्पंदित होतात. खऱ्या अर्थाने आपला व्यवसाय म्हणजे ” ये हृदयीचे ते हृदयी “रुजवण्याचा आगळावेगळा स्वधर्म आहे.

अध्यापनाची कलासुद्धा आपल्या पिंडात असावी लागते. अर्थात् प्रशिक्षणाने एक उत्तम अध्यापक घडवता येतो. पण मुळात अध्यापनाचे काही मूलद्रव्य त्याच्यात असावे लागते.

सुमारे पस्तीस वर्षाच्या अध्यापन काळात आणि अनेक विद्यालयांच्या मधून कार्यक्रम केल्यामुळे तेथीलही अनेक प्रकारचे अध्यापक निरीक्षणांतून अनुभवले.

काहीना केवळ प्राचार्यांच्या केबिनमध्ये खलबते करण्यातच रस असे. आपले नियोजित तास बुडतील कसे, याची काळजीपूर्वक काळजी घेताना काही शिक्षक असायचे. काही शिक्षकांना केवळ वेतनश्रेणी, भत्त्यांची वाढ आणि विविध प्रकारच्या आर्थिक कमाईच्या वाटा यातच रस असायचा. ही मंडळी कधी एखाद्या नव्या पुस्तकाबद्दल बोलली आहेत, किंवा वर्गातील एखादा नवा शैक्षणिक प्रयोग त्यांनी चर्चिला आहे, किंवा स्नेहसंमेलनात एखादा उपक्रम त्यांनी मुलांकडून बसवला आहे, हे मला जाणवलेच नाही. बरीच मंडळी ती अक्षरशः काठावर बसून गंमत पहात. लाटेवर येऊन त्यांना अध्यापनाच्या अथांग तलावात भिजता आलेच नाही. काही जणांना वेगवेगळ्या निमित्ताने चमचमीत खाण्याचे आकर्षण असे. एखादी खाद्य पार्टी आयोजित करण्यात त्यांचा हातखंडा. अर्थातच स्टाफरूम मध्ये असे चेहरे लोकप्रिय असतातच तसेच ते होते. त्यातील काहींचे स्वभाव चांगले होते. परंतु प्रत्यक्ष अध्यापनात जितकी उडवा उडवी करता येईल तितकी ते करत असत. आपल्या संपन्न ग्रंथालयाचा लाभ त्यांनी मनापासून कधी घेतला आहे हे मी अनुभवलेच नाही फक्त पाठ्यपुस्तके तेवढे बदलत असतात आणि संभाव्य प्रश्नांच्या उत्तरांची मार्गदर्शक आहे या व्यतिरिक्त अनेक प्राध्यापकांचा ग्रंथालयाशी संबंध नसायचा नवीन चरित्रे कुठली आली आहे कथा कादंबरी लेखन कुठले आले आहे याकडे त्यांनी आवर्जून लक्ष दिले आहे हे कधी मला जाणवलेच नाही आणि गंमतही की आपण एखाद्याला सुचवू शकतो पण आपल्या व्यवसाय मित्रांना आपण आग्रह करू शकत नाही, कारण आपला अपमान करण्याचे धारदार शस्त्र त्यांच्याकडे असते. त्यांना आपले हेतू ध्यानात येत नाही, त्यांना फक्त वाटते “हा कोण टिकोजीराव! आम्हाला काहीतरी वेगळे शिकवतो आहे. स्वतःचे ज्ञान घरी ठेवा म्हणाव ” हा त्यांचा सूर लगेच आपल्याला लक्षात येतो आणि अर्थातच आपण त्यांना काही सांगण्याच्या फंदातच पडत नाही

परंतु सुदैवाने अशा प्रकारची मंडळी अगदी तुरळक असत, पण एखादा खडा सुद्धा आपले जेवण काहीसे नीरस करतोच ना! उत्साही शिक्षकांचा उत्साह काही उदास मंडळी मुळे मावळतो, अशावेळी ज्येष्ठ शिक्षक, प्राचार्य, यांनी जे चैतन्याने काम करत आहेत, जे प्रयोगाशील आहेत, आपले तन-मन धन खर्च करत आहेत, त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. कारण त्यातच वर्गात आशेने वाट पाहणाऱ्या नव्या पिढीचे भवितव्य दडलेले आहे. कुठल्याही क्षेत्रात लोकप्रियता ही योगायोगाने आपोआप मिळत नाही तर ती प्रत्यक्ष काम करून सातत्य ठेवून मिळवावी लागते. मोराला ज्याप्रमाणे पिसारा असतो, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या भक्तीचा पिसारा त्यांना लाभतो. मी असे काळजाचे शिक्षक अनेक पाहिले आणि मुशाफिरीतही आजही मी असे कार्यशील उत्साही शिक्षक पाहतो आहे अनुभवतो आहे. अध्यापनाची मनापासून आवड असणारे अनेक शिक्षक मी असे पाहिले की त्यांना अधिक वेतनाच्या व्यावसायिक संधी त्यांच्या उमेदीच्या वयात मिळत असूनही अध्यापकच व्हायचे याच स्वप्नाने ते झपातून या क्षेत्रात आले होते. जेव्हा कोणत्याही शाळेत कार्यक्रमासाठी जातो तेव्हा डोळ्यात उत्सुकता असलेला, संवादात प्रसन्नता आणि वागण्यात अगत्य असणारा तरुण अध्यापक मी जेव्हा पाहतो, तेव्हा मला त्याचा मी न पाहिलेला, अतिशय रंगलेला असा तास कल्पनेने अनुभवतो.

एखादी मैफल रंगवायला गायक रंगमंचावर जावा त्या उत्साहाने जे वर्गात जातात आणि तास संपवून पुन्हा एकदा स्टाफरूम मध्ये परतल्यावर तो उत्तम अध्यापनाचा आनंदरंग त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसत असेल, तर तो अध्यापक या क्षेत्राशी एकरूप झाला आहे असे समजावे.

आपण अध्यापक अखेर माणसेच आहोत. केव्हा तरी कंटाळा येणारच. केव्हातरी मन उदास असणार ; आपल्या घरातील किंवा आयुष्यातील सुखदुःख आपल्या चेहऱ्यावर ते उमटणारच. पण हे ‘केव्हातरी ‘ केव्हातरीच असावे, जर तोच आपला स्वभाव झाला, तर आपणही उदास आणि समोरची पिढी उदास!

शक्यतो एका दालनातून दुसऱ्या दालनात जावे, तसे मनाचा मूड बदलून स्वतःला अंतर्यामातून बदलता येणे ही सुद्धा अध्यापन व्यवसायातील एक कला आहे. एकदा हा व्यवसाय आपण स्वीकारल्यानंतर त्या व्यवसायाविषयी, आणि विशेषतः जिवंत मनांना, नवी पंखभरारी देण्याचा हा व्यवसाय निवडल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढते. अंतर्मुख होऊन अगदी प्रत्येकाने आपल्याला या व्यवसायात आनंद मिळतोय का? मिळत असेल तर तो अधिक कसा मिळेल आणि मिळत नसेल तर तो का मिळत नाही याचा शोध अंतर्मुख होऊन घ्यायला हवा असे मला वाटते. आपल्या व्यवसायातील व्यावसायिक अस्थिरता, काही वेळा होणारा स्थानिक पातळीवरचा अन्याय, अध्यापनाव्यतिरिक्त करावी लागणारी शासकीय कामे ही कारणे आहेतच. नक्कीच अशा तऱ्हेच्या कारणांचे कुणीच समर्थन करणार नाही.

पण मला नेहमी वाटते, या सगळ्या बाह्य गोष्टीची शिक्षा त्या अजाण विद्यार्थ्यांना का बरे द्यायची,? उभे आयुष्य त्यांना साद घालत असत भविष्य खुणावत असते. मोठ्या अपेक्षांनी ती समोरील अध्यापकाकडे पाहत असतात. अशावेळी आपला अनुभव, आपले ज्ञान, व्यवहारज्ञान त्यांना भरभरून दिले तर शिक्षक पदाचा विस्तारही होतो आणि ते पद सखोले होते सखोलही होते.

कलावंत ज्याप्रमाणे कलेतील नवनिर्मितीमुळे चिरतरुण राहतो. अक्षरशः अध्यापकाच्या व्यवसायातही तेच घडत असते. मला काही जण विचारत असत, ” एकच कविता अनेक वर्ष शिकवून तुम्हाला कंटाळा येत नाही का? “

मी त्यांना म्हणत असे, “कविता तीच असेल, पण मी नवा आहे. मी नित्य नवा झालो की आपोआपच कवितेतील नवीन रूपरंग आकळतात. शिवाय दरवर्षी वर्ग बदलतो, चेहरे नवीन असतात. त्यामुळे अर्थात ती कविता मला “तीचतीच “वाटत नाही माझे तर स्पष्ट मत आहे, आपल्या मानसिक वयाबरोबर साहित्यातील संवेदनशील पदर अधिक उलगडत जातात. उदाहरणार्थ ‘औदुंबर’ सारखी कविता एका सारखी शिकवू शकत नाही. सतत त्यात नवे नवे काहीतरी सापडत जाते. खरे म्हणजे नवे जे सापडते, ते केवळ कवितेतील असत नाही, तर ते आपल्यातले नवे सापडते ;आणि त्यामुळे भाषा असो की विज्ञान, गणित असो का इतिहास भूगोल, विषय कुठलाही असो ;सतत नव्या वर्षी नव्या वर्गात नव्या मुलांपुढे आपण नवतेचा शोध घेत असतो आणि त्यामुळेच नवनिर्मितीचा आणि कलावंताचा ज्याप्रमाणे संबंध आहे, त्याप्रमाणे अर्थातच अध्यापकाचा आणि नवनिर्मितीचा संबंध आहे. म्हणूनच मला हाडाचा शिक्षकही कलावंत वाटतो. आचार्य अत्रे यांनी आपल्या आत्मकथनात” मी शिक्षक कसर झालो? “या प्रकरणांमध्ये स्पष्ट म्हणून ठेवले आहे, “पुढे आयुष्यात माझ्याकडून जे लेखन झाले, अनेक नाटके लिहिली गेली, साहित्यात मी अनेक प्रयोग केले, त्या सर्वांची मुळे माझ्या अध्यापन व्यवसायात आहेत. अतिशय बोलके वाक्य आहे त्यांचे. लेखनातील प्रतिभा अध्यापनात येते आणि अध्यापनातील प्रतिभेने आपले लेखने वेगळे होते.

शिक्षकाकडे अक्षरशः संपूर्ण समाज अध्यापनाच्या निमित्ताने वर्गात येतो. आणि त्यामुळेच अनेक सुखदुःखे आपण जवळून पाहतो. केवळ आपण पुस्तके वाचत नाही, विद्यार्थ्यांचे चेहरे वाचतो. चेहरे वाचतावाचता, सामाजिक पुस्तक कळत जाते. समाजात नेमके कुठले बरे वाईट बदल होत आहेत, मानसिक प्रवाह येत आहेत, कुठल्या प्रकृती विकृती जन्माला येत आहेत, हे आपल्याला एक कलावंत म्हणून कळते. अध्यापकाला ती संधी असते. मात्र ती घेतली पाहिजे. अध्यापनाच्या व्यवसायाकडे केवळ एक अनुक्रमाणिका पूर्ण करण्याचा, आणि उत्तर पत्रिका तपासण्याचा व्यवसाय तेवढ्यापुरताच जर आपण पाहिले, तर अनुक्रमणिका पूर्ण होईल आपण मात्र अपूर्ण राहू आणि अर्थातच एक अपूर्ण शिक्षक स्वतःलाही न्याय देऊ शकत नाही, आणि आपल्या व्यवसायाला हिला न्याय देऊ शकत नाही. म्हणूनच मनाच्या पूर्ण जागेपणाने, उत्फुल्ल मनाने आपण वर्गात जावे लागते. कलावंत ज्याप्रमाणे एखादी मैफल रंगवतो,.

कधी वक्तृत्वाने कधी अभिनयाने, त्याप्रमाणे अध्यापकाला सुद्धा वर्ग नावाची मैफल रंगवण्याची संधी असते. मात्र ते जिंदादिल मन आपल्यामध्ये हवे, ते आपल्यामध्ये तो निश्चित आहे, म्हणूनच हे हितगुज.

लेखक : श्री प्रवीण दवणे

प्रस्तुती : सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन नं : 9665669148 ईमेल : deepapujari57@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले  ☆ जिना… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ जिना… ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

आज एका हॉस्पिटलचा जिना घाईघाईने चढत होतो, पंधराएक पायऱ्या असतील! माझ्या पुढे कठडा पकडून उजव्या हातात दोन पिशव्या सांभाळत एक साठीच्या आसपासचे गृहस्थ हळूहळू जिना चढत होते. किरकोळ शरीरयष्टी, अंगात मळकट शर्ट, साधीशी पॅन्ट!

सहसा मी असं कधी करत नाही, पण आज का कोणास ठाऊक, वाटलं आणि मी मागून त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, “द्या इकडे पिशव्या! ”

त्यांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं, एकंदरीत माझे कपडे, डोळ्यांवर राहून गेलेला गॉगल, आणि तसं पाहता माझं वय… मी देखील गेलोय की पन्नाशीत! म्हणजे आमच्या वयात फारसं अंतर नसावं!

“असू द्या! ” ते संकोचून म्हणाले. तरी मी पिशव्या घेतल्या, त्यांनी अजून विरोध करू नये म्हणून भराभर पायऱ्या चढलो आणि वर जाऊन उभा राहिलो. ते जिना चढताना माझ्याकडे पाहून छान हसले. जवळ आले, पिशव्या माझ्याकडून घेतल्या, खाली जमिनीवर ठेवल्या आणि माझ्या दोन्ही खांद्यावर अलगद हात ठेवले.

“बायको सिरीयस आहे माझी, खूप नाजूक अवस्थेत आहे, पण आत्ता पायऱ्या चढताना वाटलं… जगेल ती, अजून जगात चांगुलपणा शिल्लक आहे! ”

सरसरून काटाच आला अंगावर… किती किरकोळ, साधी, क्षुल्लक गोष्ट वाटते आपल्याला, पण घेणारा त्यातून काय, कसं घेईल हे सांगता येत नाही!

आज मनोमन ठरवलं… कोणी दखल घेऊ दे वा न घेऊ दे, निरपेक्ष वृत्तीने जमेल तितकं दुसऱ्यासाठी करत राहायचं…

आयुष्याचा जिना चढत असताना असंच जमेल तितकं दुसऱ्याचं दुःख हलकं करायचा प्रयत्न करायचा! वरच्या टोकाला पोहोचल्यावर जे समाधान मिळेल, तोच तर स्वर्ग की!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆’MY SOUL HAS A HAT…’ – मूळ रचना : मारिओ दि अन्द्रादे – अनुवाद : कॅप्टन वैभव दळवी ☆ प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले ☆

डॉ ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

‘MY SOUL HAS A HAT…‘ – मूळ रचना : मारिओ दि अन्द्रादे – अनुवाद : कॅप्टन वैभव दळवी ☆ प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले

 

– – – आणि अचानक लक्षात आलं..

 

आज मी माझी सरलेली वर्ष मोजली 

आणि अचानक लक्षात आलं..

अरेच्चा! जेवढं जगून झालंय 

त्यापेक्षा कमीच उरलंय की जगायचं..

मग एखाद्या लहान मुलाचं कसं होतं ना..

खूप आवडीचा खाऊ खाताना..

तसं झालं काहीसं…

 

सुरुवातीला तो आवडीने खाऊ खातोच 

पण जेंव्हा त्याच्या लक्षात येतं की 

आता थोडासाच खाऊ उरलाय, तेंव्हा मात्र 

ते मूल खाऊ अधिकच चवीचवीने 

आणि अगदी मन लावून खायला लागतं.

 

कुठल्याच संकेत, नियम आणि कायदयांचं पालन होणार नाहीय 

हे पुरेपूर ठाऊक असताना..

केवळ त्यांचीच चर्चा करणाऱ्या प्रदीर्घ बैठकांसाठी आता माझ्याकडे वेळ नाही.

 

ज्यांची केवळ वयच वाढलीत.. बुद्धी नाही.. अशा मूर्ख लोकांना सहन करण्याचा संयम 

आता माझ्यात अजिबात उरलेला नाही.

 

फार कमी वेळ उरलाय माझ्याकडे..

आता मला फक्त अर्क हवा आहे..

आत्मा घाईत आहे माझा…

फार थोडा खाऊ शिल्लक आहे माझ्याजवळ आता.

 

मला माणसांच्या जवळ जगायचंय आता..

खऱ्याखुऱ्या माणसांच्या…

ज्यांना माहीत आहे, आपल्या स्वतःच्या चुकांवर कसं हसायचं.

ती माणसं..

जी विजयाच्या गर्वाने फुगलेली नाहीत 

आणि ती माणसं…

जी त्यांनी केलेल्या कर्माची संपूर्ण जबाबदारी घेतात.

खरंतर अशा प्रकारेच माणसाची प्रतिष्ठा अबाधित राहते 

आणि आपण कायम सत्य आणि प्रमाणिकतेच्या मार्गावर राहतो.

 

आपलं आयुष्य कामी येणं..

उपयुक्त होणं हे अत्यंत महत्त्वाच.

 

मला अशी माणसं माझ्या अवतीभवती हवी आहेत की ज्यांना दुसऱ्यांच्या हृदयाला स्पर्श कसा करायचा 

हे चांगलंच ठाऊक आहे…

अशांच्या हृदयाला… ज्यांनी आयुष्याचे सणसणीत फटकारे झेललेत,

आत्म्याच्या पवित्र, मधुर स्पर्शाने 

ज्यांना तरीही मोठं केलंय.

 

हो आहे मी घाईत..

मी आयुष्याला उत्कटतेने जगण्याच्या घाईत आहे..

ती उत्कटता…

जी केवळ प्रगल्भतेतून येते.

आता माझ्याकडे उरलेली जराशीही मिठाई फुकट घालवायची माझी इच्छा नाही.

 

मला नक्की माहीत आहे की ही मिठाई अतिशय उत्तम आहे..

मी आत्तापर्यंत खाल्लेल्या खाऊपेक्षाही खूप सुग्रास.


माझं आता एकच ध्येय आहे…

माझ्या प्रेमीजनांसोबत आणि सद्सद्विवेक बुद्धीसोबत समाधानात आणि शांततेत 

अखेरचा क्षण गाठणं.. बस.

 

आपल्याकडे बरं का दोस्तांनो…

दोन आयुष्य असतात..

आणि दुसरं आयुष्य सुरू होतं जेंव्हा लक्षात येतं 

की आपल्याकडे जगायला फक्त एकच आयुष्य आहे..

(मारिओ दि अन्द्रादे या ब्राझिलियन कवीच्या ‘MY SOUL HAS A HAT’  या कवितेचा स्वैर अनुवाद. -)

अनुवाद : कॅप्टन वैभव दळवी

प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “श्रीमंत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “श्रीमंत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

तुला कसं कळतं की तू *श्रीमंत* आहेस?

– – एक अद्भुत उत्तर – – एका IIT विद्यार्थ्याकडून… 

जेव्हा मी माझं B. Tech करत होतो, तेव्हा आमच्याकडे ‘Mechanics’ शिकवणारे एक प्राध्यापक होते.

त्यांचे लेक्चर्स खूपच रंजक असायचे कारण त्यांची शिकवण्याची आणि संकल्पना समजावण्याची पद्धत वेगळीच होती.

एकदा वर्गात त्यांनी काही प्रश्न विचारले:

१. शून्य म्हणजे काय?

२. अनंत म्हणजे काय?

३. शून्य आणि अनंत एकच असू शकतात का?

आम्हाला वाटलं की आम्हाला उत्तरं माहिती आहेत आणि आम्ही म्हणालो:

– शून्य म्हणजे काहीच नाही.

– अनंत म्हणजे कोणत्याही मोजता येणाऱ्या संख्येपेक्षा मोठी संख्या.

.. शून्य आणि अनंत हे विरुद्ध आहेत आणि ते कधीच सारखे होऊ शकत नाहीत.

त्यांनी आम्हाला प्रतिवाद करत विचारलं – अनंत म्हणजे नेमकं काय? कोणतीही संख्या कशी काय कोणत्याही मोजता येणाऱ्या संख्येपेक्षा मोठी असू शकते?

.. आमच्याकडे उत्तर नव्हतं.

मग त्यांनी अनंताची संकल्पना एका मनोरंजक पद्धतीने समजावून सांगितली, जी मला आज ३५ वर्षांनंतरही आठवते.

ते म्हणाले – एखादा निरक्षर मेंढपाळ आहे, ज्याला फक्त २० पर्यंत मोजता येतं अशी कल्पना करा.

जर त्याच्याकडे २० पेक्षा कमी मेंढ्या असतील तर तो नेमकी संख्या सांगू शकेल (जसं की ३, ५, १४ वगैरे).

पण जर संख्या २० पेक्षा जास्त असेल, तर तो म्हणेल – “खूप आहेत. ”

त्यांनी मग समजावलं की विज्ञानात “अनंत” म्हणजे ‘खूप आहेत’ (आणि मोजता न येण्याजोगं नव्हे) आणि त्याचप्रमाणे “शून्य” म्हणजे ‘फार कमी’ (आणि काहीच नाही नव्हे).

– – उदाहरण म्हणून ते म्हणाले – जर पृथ्वीचा व्यास सूर्यापर्यंतच्या अंतराशी तुलना केली, तर पृथ्वीचा व्यास फारच लहान असल्यामुळे त्याला शून्य म्हणता येईल.

पण हाच पृथ्वीचा व्यास जर एका धान्याशी तुलना केला, तर तोच व्यास अनंत म्हणता येईल.

… म्हणून त्यांनी निष्कर्ष काढला की तीच गोष्ट शून्यही होऊ शकते आणि अनंतही, हे पूर्णपणे संदर्भावर, किंवा तुलना करण्याच्या मापदंडावर अवलंबून असतं.

*श्रीमंती* आणि गरिबी यांचं नातं देखील शून्य आणि अनंत यांच्यासारखंच आहे.

.. हे सगळं तुमच्या इच्छांच्या तुलनेवर अवलंबून आहे.

… जर तुमचं उत्पन्न तुमच्या इच्छेपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही *श्रीमंत* आहात.

जर तुमच्या इच्छा तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतील, तर तुम्ही गरीब आहात.

मी स्वतःला *श्रीमंत* मानतो कारण माझ्या इच्छा माझ्या उत्पन्नापेक्षा खूपच कमी आहेत.

मी *श्रीमंत* झालोय ते खूप पैसा मिळवून नव्हे, तर माझ्या इच्छांना कमी करूनच, मोह माया (उदाहरणार्थ – व्यसन) पासून लांब राहूनच….

जर तुम्ही तुमच्या इच्छांना कमी करू शकलात, मोह माया यापासून लांब राहू शकलात, तर तुम्हीही या क्षणी *श्रीमंत* होऊ शकता…, परंतु तुम्ही जर मोह मायेत अडकलेले आहात तर.. , नक्कीच नाही…

– – – तुमचंही आयुष्य नेहमी चांगल्या विचारांनी, चांगल्या कर्मांनी, चांगल्या लोकांनी, संबंधांनी आणि सुंदर मित्रांनी *श्रीमंत* होवो, हीच सदिच्छा…

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “ICU अर्थात… ‘I See You’ ची रूम” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “ICU अर्थात… ‘I See You’ ची रूम” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

*जगात सर्वात सुंदर जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे आय्. सी. यु.!! *

*मीपणा अंगात आला असेल, अंगात खूप गर्मी असेल, मी कुणीतरी मोठा असल्याचा माज असेल, श्रीमंतीची घमेंड असेल, पदाचा बडेजाव असेल तर आय्. सी. यु. ची रूम बघावी आणि विचार करावा. *

 *दोन व्यक्तींमध्ये भेद निर्माण करणारी कोणतीच रेषा इथे नसते. तुमचा धर्म, जात, वर्ण, श्रीमंत, गरीब… एवढंच नाही तर स्त्री-पुरुष हा भेदही इथं नसतो!! *

 *तो काचेचा दरवाजा ओलांडून आय्. सी. यु. मध्ये आलात की सगळे भेद जिथे चपला सोडता तिथेच गळून पडतात. आत जाते ते फक्त मानवाचे शरीर…!!! *

 *आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तकं, ग्रंथ असतील किंवा जगावं कसं हे शिकवणारे असंख्य गुरू सुध्दा असतील. पण जो अर्थ, जे तत्वज्ञान इथं आय्. सी. यु. मध्ये मिळतं, ते कुठेच वाचायला मिळत नाही!! आयुष्याचा खरा अर्थ येथेच कळतो!! *

 *म्हणूनच ही जागा खरोखरच फार सुंदर आहे. *

 *एखाद्या घरात भुताटकी असते, कोणीतरी कधीतरी तिथं मेलेलं असतं, लोकांना तिथे भीती वाटते. कुठेतरी रस्त्यावर, मोठ्या झाडाखाली अशाच अफवा असतात, भीती असते. * 

*पण इथं… इथं आय्. सी. यु. च्या एकेका बेडवर आजवर शंभर, दोनशे, असंख्य लोक मेलेले असतात!! कसली भीती नाही, काही अफवा नाहीत. माणूस गेला, बेडशीट बदललं, दुसरा माणूस आला.. एवढं सोप्पं असतंय इथं!! *

*हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, पारशी, आस्तिक, नास्तिक जे कोणी असतील त्या सगळ्यांच्या फुफ्फुसात एकाच मशिनमधून ऑक्सिजन जातो. * 

– – *आपण बाहेर बारीक सारीक गोष्टींचा विचार करत असतो. कोणाला काय वाटेल या विचारात असतो. कपडे कसे आहेत, लोक हसतील का माझ्या अवताराला, बोलण्याला, भाषेला… इथं बेडवर त्या कोणत्याच गोष्टीला किंमत नसते. पुरुष असो की स्त्री… लाज वगैरे गोष्टींना तिथं किंमत शून्य असते! *

*वेळेची खरी किंमतही सर्वात जास्त इथेच कळते. जेव्हा आपल्याला कळतं की आपली व्यक्ती आपल्याला सोडून जाणार आहे तेव्हा एकच गोष्ट डोक्यात असते… फक्त आणखी एक दिवस, एक तास, अजून पाच मिनिटं मिळावी. *

*बाहेरच्या जगात आपण असंख्य अपेक्षा घेऊन जगत असतो. लोक स्वत: कडून, इतरांकडून… अपेक्षांचा डोंगर घेऊन चालत असतात. घर, गाडी, शिक्षण, नोकरी, प्रेम, व्यवसाय, नातेवाईक, पैसा… ‌असंख्य अपेक्षा! * 

*तिथे फक्त एकच अपेक्षा असते. अजून एकदा… फक्त एकदा… डोळे उघडावेत…!!!! *

*आयुष्यात कधी वाटलंच की मी फार मोठा आहे तर अशा ठिकाणी जाऊन यायचं… सगळी घमेंड उतरते! * 

*कधी वाटलंच की, माझ्याकडे काहीच नाही, सगळं संपलं आहे… तेव्हाही जायचं… आपल्याला कळतं की आपल्याकडे काय आहे! *

*निसर्गाने माणूस निर्माण करतेवेळी जो उद्देश समोर ठेवला असेल त्या स्वरूपातील ‘ माणूस ‘ मला तिथे दिसतो… अर्थात्… * 

 *I See You* 

*म्हणूनच ही जागा जगात सर्वात सुंदर आहे! *

– – – सर्व धर्म, जात, भाषा, प्रांत व लिंग ह्यातील भेद नष्ट करणारे ICU.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “हे कुठले रंग?…” – लेखक : श्री विद्याधर शेणोलीकर ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “हे कुठले रंग?” – लेखक : श्री विद्याधर शेणोलीकर ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

” हे कुठले रंग…? “.

आमच्या एम. आय. टी. कॉलेज परिसरात कोणताही सणवार म्हणजे नुसता नंगानाच असतो. बाहेरून आलेली मुलं-मुली आणि त्यांच्या नादानं आपली मराठमोळी मुलं-मुली नुसता धांगडधिंगा करत असतात. आज खाली चौकात रंगपंचमी निमित्त बरीच मुलं जमून रंग खेळत आहेत आणि हातात दारूच्या बाटल्या आहेत. खरंतर पूर्वी पुण्यात धुळवडीला रंग खेळतच नव्हते. रंगपंचमी ही पंचमीलाच साजरी केली जायची. परंतु आता सोशल मीडियामुळे देशभरातल्या विविध सणवारांचं वारं सर्वांना लागलं आहे आणि आपण कसे परंपरा सांभाळतो हे दाखवण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे.

 माझ्या आज्ज्यांनी कधी माझ्या आजोबांचा चेहरा चाळणीतून पाहिल्याचं मला आठवत नाही. माझ्या आईनंही माझ्या वडिलांचा चेहरा कधी चाळणीतून पाहिल्याचं मला आठवत नाही. पण आता चाळणीतून नवऱ्याचा चेहरा काय पहा आणि दिवाळीला छोटी दिवाली काय, आणि बडी दिवाली काय…

 काय नाही नाही ते प्रकार ऐकायला आणि पाहायला मिळतात. कसली छोटी दिवाली आणि कसली बडी दिवाली? ? आपल्याकडे दिवाळी ही दिवाळीच असते. आता खरं सांगायचं तर सर्व सणवार हे इव्हेंट झालेले आहेत.

 गणपतीत मंडप जाहिरातींनीच सजून गेलेला असतो आणि प्रायोजकच गणपती पेक्षा जास्त झळकत असतो. म्हणजे गणपती कुठला हे महत्त्वाचं नाही तर प्रायोजक कोण हे महत्त्वाचं…

 विसर्जन मिरवणुकांमध्ये तर डीजे बंद होतील त्या दिवशी बाप्पा खऱ्या अर्थाने पावला असं म्हणावं लागेल…

 “डीजे लावून मिरवणुका”… ही अक्षरशः पुणे शहराला लागलेली कीड आहे…

सामान्य पुणेकर या सगळ्यापासून फार दूर गेलेला आहे. पण आता खऱ्या पुणेकराला विचारतो कोण? ? खरा पुणेकर हा फक्त विनोद करण्यापुरता आणि टोमणे मारण्यापुरताच उरलेला आहे. पुण्याची संस्कृती लोप पावून तिथे विकृती आलेली आहे…

 पुण्यात पूर्वीही पान तंबाखू गुटखा खाणारे होते, परंतु या मंडळींना कुठेतरी मनाला चाड होती. रस्त्याच्या कडेला जाऊन पान तंबाखू थुंकावी एवढी लाज होती. आता सिग्नल ला बिनधास्तपणे तोंडातला गुटखा रिकामा करणे आणि परत वर शांतपणे तुमची प्रतिक्रिया बघणे ही विकृती फोफावत आहे. बसच्या शेजारून जायला तर धाडसच हवे. कधी अंगावर पिचकारी पडेल नेम नाही. आता पेठांमध्येही मटण चिकन खानावळींमध्ये सर्रास मिळते. स्पष्टच बोलायचं तर पुण्याच्या काहीशा ब्राह्मणी संस्कृतीला नाव ठेवत राहणे, सतत पुणेकरांवर टोमणे मारणे, पुणेकरांवर विनोद करणे यातच बाहेरून आलेली मंडळी धन्यता मानतात… आणि हळूहळू इथेच स्थायिक होतात… सध्या पेठा म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसचे कारखाने झाले आहेत. यात कुणाचं किती करियर होतं हा एक मोठाच प्रश्न आहे. सरकारी जागा पन्नास आणि परीक्षा देणारे पन्नास हजार…

 तरुण मुलं आपल्या आयुष्याचा मौल्यवान वेळ वाया घालवत आहेत हे दिसत असतं. यात खरोखर कोणाचं करियर होत असेल तर ते क्लास चालक, खानावळ वाले, पान सिगरेट वाले आणि जागा भाड्याने देणारे यांचं… या मुलांच्या वेड्यावाकड्या जाणाऱ्या बाईक्स म्हणजे शहराच्या वाहतुकीला डोकेदुखी झालेली आहे. तरुण मुलांमध्ये वाढणारी व्यसनं हा तर एक वेगळाच चिंतेचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांना बसणारी पुणेकर स्थानिक मुलं विरळाच आहेत. स्थानिक मुलं आयटी क्षेत्र वगैरे क्षेत्रात करिअर करून परदेशी जायची स्वप्न बघत असतात. पुण्याच्या वाहतुकीत वाहन चालवणं अक्षरशः अंगावर काटा आणणार असतं. पोलिसांवरही पुणेकरांचा विश्वास राहिलेला नाही असं म्हटल्यास वावगं ठरू नये. “हिट अँड रन” ची प्रकरणं वाढत आहेत आणि पुढे या प्रकरणांचं काय होतं हा पुणेकरांसाठी एक मोठाच कुतूहलाचा विषय आहे. आता शिक्षणाचे महत्त्व जाऊन पैशाला अवास्तव महत्त्व आलेलं आहे. बाहेरून आलेले तरुण कामधंदा बघायचं सोडून राजकारण्यांच्या सतरंज्या उचलण्यात धन्यता मानताना दिसतात. लाल सिग्नल तोडून जाणे हे पुणेकरांना आता नवीन चित्र नाही. वाहन चालवताना सतत सावध राहावं लागतं. कोण कुठल्या दिशेने येऊन धडकेल सांगता येत नाही. शिवाय धडकणारा मुजोरपणा दाखवतो तो वेगळाच…

 आता जो जेवढा मोठा गुंड, जो जेवढा मोठा गुन्हेगार तेवढा तो राजकारणात यशस्वी… एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांच्यासारखी नेतृत्वं आता लोप पावली आहेत. पूर्वी पुण्यातील सर्वच पक्षांचे राजकारणी अत्यंत सुसंस्कृत होते. भाषेत नम्रता, सुसंस्कृतपणा होता. आता राजकारणात प्रतिस्पर्ध्यांवर चिखलफेक करून रोजच धुळवड खेळली जाते. राजकारण, समाजकारण अत्यंत खालच्या पातळीला गेले आहे. आता घरं तुमच्या-आमच्यासाठी बांधली जात नसून बिल्डरांची पोटं भरण्याकरता बांधली जातात आणि बिल्डरांची पोटं काही भरता भरत नाहीत…

पूर्वी एखाद्या पुणेकराला विचारलं तू पुढे काय करणार आहेस? ?

तर कोणी म्हणायचा मी आय. आय. टी. ची तयारी करतो आहे, कोणी म्हणायचा मी परदेशी जाणार आहे, कुणी म्हणायचा मी एनडीए ची तयारी करतो आहे. आता काय, तर मी इस्टेट एजंट आहे, मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे…

इस्टेट एजंट हा प्रकार तर मला कळलेलाच नाही. कुत्र्याच्या छत्रीसारखे गल्लीबोळात इस्टेट एजंट आहेत. पूर्वी कुठल्याही वाड्यामधून निळं आभाळ सहज दिसायचं… मोकळी हवा खेळती असायची… गल्ल्या शांत होत्या…

आता निळं आकाश दिसणं दुर्मिळ झालं आहे. धुकं तर कित्येक वर्षात पुणेकरांनी पाहिलेलंच नाही. दवबिंदू कसे असतात नव्या पिढीला माहीत नाही. चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येत नाही…

पूर्वीचा पुणेकर सणवार हौसेनं करायचा. गणपती बघायला जाणे हा एक आनंद होता. एक उत्सुकता असायची. पुण्यातले गणपतीचे देखावे हे साऱ्या महाराष्ट्राचं आकर्षण होतं. स्वीट होम, जनसेवा, पुष्करणी भेळ ही पुणेकरांची विश्रांती स्थान होती. पूर्वीचा पुणेकर भेळेवर, मिसळीवर समाधान मानायचा. त्याला आनंद मिळवण्यासाठी गुटखा, दारू असल्या गोष्टींची गरज पडत नव्हती. ही व्यसन अपवादानेच केली जायची आणि या व्यसनांचा तिरस्कार केला जायचा. आता मात्र यात सगळ्या गोष्टी अभिमानाने मिरवल्या जातात. पुणे शहर हे आता शिक्षणाचं माहेर घर राहिलेलं नसून गुन्हेगारीचं माहेर घर झालेलं आहे असं खेदानं म्हणावसं वाटतं. या सगळ्यात जुन्या पुणेकराचा श्वास घुसमटतो आहे. आता जुनी रंगपंचमी घरात बसूनच आठवायची आणि खिडकीतून बाहेरचा धांगडधिंगा शांतपणे बघत रहायचा…

आणि रंगपंचमी, किंवा एकंदरच सणांच्या नावाखाली काय काय रंग उधळले जातात ते हतबलपणे पहात रहायचं…

एवढंच मूळ पुणेकरांच्या हाती राहिलं आहे…!!!

लेखक : श्री विद्याधर शेणोलीकर

कोथरूड, पुणे.

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आर एच डायग्नोस्टिक्स… – लेखिका : सुश्री सुधा मूर्ती ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आर एच डायग्नोस्टिक्स… – लेखिका : सुश्री सुधा मूर्ती ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

सुधा मूर्ती यांचे वडील आर. एच. कुलकर्णी डॉक्टर होते. त्यांचं पोस्स्टिंग एका खेड्यात झालं होतं. डॉक्टर म्हणून असलेलं ज्ञान, कौशल्य वापरण्याची वेळच येत नव्हती. खेड्यातील लोक बरं वाटेनासं झालं की स्वतःच त्यांना माहीत असलेले नैसर्गिक उपचार करून बरे होत असत…

पण एक रात्र वेगळीच उजाडली…

पाऊस कोसळत होता. विजा चमकत होत्या. ढग गर्जत होते.

अंधार, पाऊस, विजा, लखलखाट नी गडगडाट.

कोणीही पेशंट नसण्याची सवय असलेले आर. एच. कंदिलाच्या उजेडात जेवण उरकून निवांत बसले असतानाच दाराची कडी वाजली.

दारात अनोळखी माणसं उभी होती…

“डॉक्टर सायेब, बॅग घ्या तुमची. येक पेशन्ट बघायला जायचं हाय. “

समोरचे लोक मराठी बोलत होते…

आर. एच. यांनी एकंदर हवामान बघून त्यांना जमेल तितका विरोध करत सांगितलं, “क्लिनिक बंद झालं आहे. “

समोर जे लोक उभे होते त्यांच्या body language मध्ये नुसता आग्रह नव्हता. एक अनुच्चारीत गर्भित धमकी होती. त्यातल्या एकाने डॉक्टरांना जवळजवळ ओढूनच बाहेर काढलं…

डॉक्टर बॅग घेऊन मुकाट्यानं बैलगाडीत बसले…

“मला कुठं नेत आहात? “

त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची तसदी कोणीही घेतली नाही.

कधीतरी तो प्रवास थांबला. एका घरापुढं बैलगाडी थांबली.

भातांची शेतं भोवताली. अन् मध्यभागी एक घर.

घरातल्या स्त्रीने त्यांना मार्गदर्शन केलं…

“हिकडं… हिकडं ठेवलीय तिला. “

डॉक्टर तिच्या मागं गेले.

अन क्षणात मागं सरकले.

समोर एक सोळा सतरा वर्षांची मुलगी प्रसूती वेदनेनं तळमळत होती.

“मला नाही जमणार हे. मी स्त्री रोग तज्ञ नाही. माझं प्रशिक्षण झालं नाही यात. “

त्यांचा विरोध अगदी फुसका ठरला. समोरची पार्टी अधिक आग्रही, अधिक आक्रमक होती.

“त्ये काय आमाला ठावं न्हाई. तुमी ह्ये बाळातपण करा. तुम्ही म्हणाल तेवढा पैका देतो. “

डॉक्टर गोंधळले. घाबरले. इथून सुटका नाही हे त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी की काय त्यांनी त्यांना त्या खोलीत ढकलून दार लावून घेतलं.

बेगुमान कोसळणारा पाऊस, खोलीत ती असहाय मुलगी अन् घाबरलेले आर. एच…

परतीचा मार्ग नाही म्हटल्यावर प्रशिक्षण घेत असताना प्रोफेसर्सना डीलिव्हरीमध्ये असिस्ट केल्याचे एक दोन प्रसंग आठवत त्यांनी काम सुरु केलं.

वेदना आणि दुःख सोसत पडलेली ती मुलगी त्यांना म्हणाली, “काही करू नका. मी मरेपर्यंत इथं बसून रहा. मला नी बाळाला वाचवू नका. “

ती विनंती त्यांचं काळीज कापत गेली…

“काय बोलतेस? मी डॉक्टर आहे. मला शेवटच्या क्षणापर्यंत प्राण वाचवण्याचे प्रयत्न करायचं शिकवलं गेल आहे. “

मुलगी रडली. तिच्या डोळ्यातून पाऊस बरसू लागला…

“हे लोक माझ्या बाळाला मारून टाकतील आणि मला जिवंत ठेवलं तरी बेदम मारतील. आम्हांला वाचवू नका. “

ती पुन्हा पुन्हा विनंती करत होती…

तिनं सांगितलेल्या हकीकतीनुसार ती जमीनदाराची मुलगी होती. शाळा शिकायची म्हणून तिला बाहेर ठेवलं. तिथं प्रेमात पडून तिनं मर्यादा ओलांडली होती. ती गरोदर आहे समजताच तिचा प्रियकर पळून गेला होता. हे सगळं घरच्यांना समजेपर्यंत उशीर झाला होता. गर्भपात करणं रिस्की होतं. म्हणून घरच्यांनी तिला या दुर्गम भागात आणून लपवून ठेवली होती…

बाळंतपण करण्यातील आपला तुटपुंजा अनुभव नी ज्ञान, त्याच्या बरोबरीने दोन जीव वाचवण्याची तळमळ डॉक्टरांनी पणाला लावला…

मुलीनं एका मुलीला जन्म दिला.

मुलगी जन्मली आहे…  समजल्यावर ती आणखी हतबल झाली. जगलोच नशिबानं तरी हिला कसं सांभाळायचं…?

“ती रडत का नाही? मेलीय का ती? बरं होईल मेली असली तर. “

एक नुकतीच आई झालेली मुलगी आपल्या बाळाच्या मरण्याची आशा करत होती…

वेदनेचा न संपणारा हा प्रवास पाहून डॉक्टर पण स्तिमित झाले होते…

“शक्य झालं तर पुण्याला पळून जा. तिथं पुणे नर्सिंग स्कूल आहे, तिथं गोखले म्हणून clerk आहे. त्याला माझं नाव सांग. तो तुला नर्सिंग कोर्सला ऍडमिशन मिळवून देईल. स्वतःच्या पायावर उभी रहा म्हणजे मुलीला वाढवू शकशील. “

त्यांनी तिला सल्ला दिला…

“कशी जाऊ…? माझ्याकडे पैसे नाहीत. “

यावर आर. एच. गप्प झाले. कारण त्या क्षणी त्यांच्याकडे फक्त त्यांची बॅग होती…

आपण काहीच करू शकत नाही ही खंत बाळगत ते बाहेर आले…

“डॉक्टर सायेब, ही घ्या तुमची फी, आन हितं जे काय बी घडलं त्ये भायेर कुटं बोलू नका. “

एका माणसानं त्यांच्या हातावर शंभर रुपये ठेवत त्यांना धमकी दिली…

“माझी कात्री राहिली वाटतं खोलीत, आलोच’ म्हणत आर. एच. पुन्हा मागं गेले. मुलीच्या हातावर शंभर रुपये ठेवत म्हणाले, “हे घे आणि इथून बाहेर पड अन् मी सांगितलं तसं कर. “

“तुमचं नाव काय, डॉक्टर? “, तिनं विचारलं…

“आर. एच. कुलकर्णी. पण लोक मला आर. एच. म्हणतात. “

पावसाच्या राक्षसी आवाजात तिला फक्त आर. एच. एवढंच ऐकू गेलं…

त्यानंतर कित्येक वर्षे गेली. त्यांचं लग्न झालं. पैसे साठवून त्यांनी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षानंतर चेन्नईच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन ते गायनॉकोलॉजिस्ट झाले. प्रोफेसर झाले. लोकप्रिय डॉक्टर आणि विद्यार्थिप्रिय प्रोफेसर झाले…

एकदा एका मेडिकल कॉन्फरन्समध्ये एका तिशीतल्या महिलेचं रिसर्च presentation ऐकून त्यांनी तिचं अभिनंदन केलं. कौतुक केलं…

मागून कोणी तरी त्यांना जेवायला जाण्यासाठी हाक मारली,

“आर. एच. , जेवायला निघायचं ना? “

“तुमचं नाव काय, डॉक्टर? “

समोरच्या मुलीनं विचारलं. त्यांनी सांगितलं…

“तुम्ही 1943 साली चंदगड मध्ये होता? “

“हो. “

मुलीचे डोळे चमकले.

“डॉक्टर, मी इथून चाळीस किलोमीटर्स दूर राहते. तुम्ही थोड्या वेळासाठी माझ्या घरी येता का? “

तिच्या डोळ्यात आर्जव होतं. पण आर. एच. ना ती विनंती विचित्र वाटली.

“पुन्हा कधीतरी”, म्हणत त्यांनी तिला टाळण्याचा प्रयत्न केला.

“प्लीज डॉक्टर. ही विंनती अशा व्यक्तीची आहे जिनं तुमची कित्येक वर्षे वाट पाहिली आहे. “

आर. एच. गोंधळले. तिच्या नजरेत असणारं कोडं त्यांना सोडवता येत नव्हतं. अखेर ते तिच्या घरी गेले…

ते जिथं पोहचले ते देखील एक नर्सिंग होम होतं…

“आई, हे डॉ. आर. एच. , ज्यांची तू वाट पाहत होतीस. “,

ती म्हणाली.

पन्नाशीतली एक बाई पुढं आली. त्यांच्या पायावर झुकली.

“तुम्हाला मी आठवत नसेल. त्या पावसाळी रात्री तुम्ही मला मदत केली. माझी डिलिव्हरी केली. मला पैसे दिले. त्या काळी शंभर रुपये खूप मोठी रक्कम होती. पण तुम्ही ती सगळी मला देऊ केली. मी पुण्यात आले. तुमच्या मित्राला भेटले. नर्स झाले. माझ्या मुलीला मी योग्य पद्धतीनं वाढवू शकले. माझ्या मुलीनं स्त्री रोग तज्ज्ञ व्हावं ही माझी इच्छा तिनं पूर्ण केली. ती आणि तिचा नवरा इथं प्रॅक्टिस करतात. मी तुम्हाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. तुमचं नाव आर. एच. एवढंच ऐकू आलं होतं. दरम्यान तुमचे मित्र गोखले पण वारले. आमच्या नर्सिंग होमच्या उदघाट्नाला तुम्हाला बोलवण्याची माझ्या मुलीची खूप इच्छा होती. पण तुम्हाला संपर्क कसा करायचा हेच समजत नव्हतं. “

आर. एच. भरल्या डोळ्यांनी, त्यांनी घडवलेलं एक हाडामांसाचं भविष्य समोर पाहत होते. डोळ्यातल्या पाण्यानं धूसर झालेल्या चित्रात त्यांनी नर्सिंग होमचं नाव शोधलं. ते होतं…

… “आर एच डायग्नोस्टिक्स “

लेखिका : सुश्री सुधा मूर्ती

(सुधा मूर्ती यांच्या ‘तीन हजार टाके’ पुस्तकातून) 

प्रस्तुती : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares