मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हेही एक सर्वोच्च शिखरच – – –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆

श्री अमोल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हेही एक सर्वोच्च शिखरच – – –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर

नदाव बन येहूदा 

आजच व्हॉटसअप वरती एक पोस्ट वाचनात आली. इस्राएलचा चोवीस वर्षीय युवा गिर्यारोहक नदाव बन येहूदा ह्याने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट अर्थात सागरमाथा सर करायला फक्त तीनशे मीटर बाकी राहीले असताना देखील शिखर सर करण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि तरीही आज जगात ही बातमी वाचलेल्या सर्वांच्या कौतुकाचा विषय तो बनून राहिला असेल हे नि:संशय.

कारण नदावने दुसऱ्या एका गिर्यारोहकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या वैयक्तिक विक्रम, कीर्ती, उपलब्धि ह्या गोष्टीना दुय्यम स्थान देत मूल्य आणि मूल्य संस्कार ह्याना श्रेष्ठ मानत “योग्य” गोष्ट केली.

त्याच्याच शब्दात सांगायचे तर “एव्हरेस्ट वरील माझ्या चढाई च्या मार्गात मला दोन मृतदेह दिसले की जे गिर्यारोहक नुकतेच मृत झाले असावेत. मी ज्या दोराच्या आधाराने चढत होतो त्यालाच ते लटकलेले होते. अंगातील त्राण संपल्यामुळे आहे तिथेच स्वतःला anchor करून ते तिथे थांबले आणि कदाचित कोमात जाऊन मृत झाले. त्यांना पार करून सर्व पुढे जात होते. आणि नंतर मला तो दिसला – तुर्कस्तानचा आयदिन इरमाक. आम्ही खाली कॅम्प मध्ये भेटलो होतो आणि आता तो हेल्मेट नाही, ऑक्सिजन मास्क नाही, ग्लोव्हज नाहीत अशा परिस्थितीत शेवट होण्याची वाट पहात होता. इतर काही गिर्यारोहक त्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले. मात्र मी दुर्लक्ष करू शकलो नाही, आणि मी वैयक्तिक विक्रम आणि दुसऱ्या एका मनुष्याचे प्राण ह्यात दुसऱ्या गोष्टीची निवड केली. “

नदावने हा निर्णय घेतला खरा; पण तो अमलात आणणे हे तितकेच कठीण काम होते. बेशुद्ध पडलेल्या आयदिन ला उचलून खाली आणणे कर्मकठीण होते कारण त्याचे आणि स्वत:चे दोघांचे ओझे सांभाळत उतरायचे होते. आयदिन बेशुद्ध असल्यामुळे जास्त भारी वजनाचा भासत होता. अधून मधून त्याला शुद्ध यायची पण त्यात तो वेदना असह्य होऊन ओरडायचा. अशा परिस्थितीत खाली येताना नदाव चा स्वतः चा ऑक्सिजन मास्क फाटला. ग्लोव्हज काढावे लागले. त्यामुळे त्याला स्वतः ला बोटाना हिमदंश झाला. वाटेत त्याला अजून एक मलेशियन गिर्यारोहक भेटला की जो सुद्धा मरण्याच्या मार्गावर होता. वर जाणाऱ्या काही climbers कडून नदाव ने त्या दोन अत्यवस्थ climbers साठी ऑक्सिजन सिलिंडर मिळवली आणि नऊ तासांच्या भगीरथ यत्नानंतर त्या दोघांना घेऊन कॅम्प पर्यंत पोचण्यात तो यशस्वी झाला. तेथून हेलिकॉप्टरने त्यांना काठमांडू येथे नेऊन इस्पितळात दाखल केले आणि उपचार सुरू झाले. दोन जीव वाचवण्यात नदाव यशस्वी झाला.

जीवनात काही असे परीक्षेचे क्षण येतात जिथे तुम्ही कशा प्रकारचे मनुष्य आहात, तुमची मूल्य व्यवस्था कशी आहे आणि त्या मूल्यांसाठी तुम्ही किती मोठा त्याग करू शकता वा किंमत देऊ शकता हे स्वतः शीच नक्की करावं लागतं. अशा परीक्षेच्या क्षणी नदाव ने, एव्हरेस्ट सर करणारा सर्वात कमी वयाचा इस्रायली गिर्यारोहक ह्या सन्मान व कीर्तीचा त्याग करत मानवतेच्या सर्वोच्च मूल्याला प्राथमिकता दिली आणि जगासाठी एक धडा दिला. गिर्यारोहणाच्या धाडसी खेळातील अत्युच्च मूल्य ओळखून त्याप्रमाणे वागत एक अनोखे धैर्य दाखवले.

एकीकडे मानसन्मान, वैयक्तिक महत्वाकांक्षेची पूर्तता, सर्वोच्च शिखर सर करण्याची वैयक्तिक स्वप्नपूर्ती हे सारे आणि दुसरीकडे दुसऱ्या मनुष्याचा जीव वाचवण्याचा अशक्यप्राय प्रयत्न ज्यात वरील मानसन्मान, कीर्ती, स्वप्नपूर्ती, महत्त्वाकांक्षा पूर्ती ह्या गोष्टींच्या त्यागावरोबरच एक अजून भयंकर शक्यता होती आणि ती म्हणजे स्वतः चा जीव गमावण्याची. पण नदाव नियतीने पुढे वाढून ठेवलेल्या अती कठीण परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि with flying colors he passed.

आज भले नदावला सागरमाथा सर करता आला असेल. भविष्यात तो हे लक्ष्य गाठेल किंवा नाही गाठू शकणार. मात्र तो कायम स्वतः ला ताठ मानेने आरशात बघू शकेल, त्याच्या कुटुंबियांना, मित्रांना डोळ्याला डोळा भिडवून भेटू शकेल आणि दुसऱ्याचा जीव वाचवण्याचे जे अलौकिक समाधान आहे ते कायम त्याच्या उराशी असेल.

आज सागरमाथा सर न करता सुद्धा, नदाव बन येहुदा सर्व जगातील लोकांच्या मनात सर्वोच्च शिखरावर विराजमान झाला असेल ह्यात शंका नाही.

लेखक : मनीष मोहिले

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एका रुपयाची किंमत!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “एका रुपयाची किंमत!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, सुब्रोतो नावाचा, वीस वर्षाचा एक मुलगा होता, जो कलकत्त्यातील एका कॉलनीमध्ये राहात होता.

त्याचे वडील एक भट्टी चालवत असत, जिथे ते दूध तापवून त्यापासून खवा बनवण्याचे काम करत असत.

सुब्रोतो खरं तर एक चांगला मुलगा होता, परंतु त्याला अनावश्यक खर्च करण्याची एक वाईट सवय होती. तो नेहमीच वडिलांकडे पैसे मागत असे आणि ते खाण्यापिण्यामध्ये आणि सिनेमा बघण्यामध्ये खर्च करत असे.

एके दिवशी वडिलांनी सुब्रोतोला बोलावले आणि म्हणाले, “”हे बघ बाळा, आता तू मोठा झाला आहेस, त्यामुळे तुला आपल्या जबाबदाऱ्या समजून घेतल्या पाहिजेत. हे रोज उठून, तू माझ्याकडे पैसे मागतोस आणि ते इकडे तिकडे उडवतोस, ही चांगली गोष्ट नाही.”

“काय बाबा! कुठे मी तुमच्याकडे हजारों रुपये मागितले आहेत?फक्त काही रुपयांसाठी तुम्ही मला एवढे लेक्चर देत आहात? एवढेसे रुपये, तर मी कधी पण तुम्हाला परत करू शकतो.” सुब्रोतो जरा वैतागून म्हणणला.

सुब्रोतोचे बोलणे ऐकून वडील विचलित झाले, परंतु त्यांना कळून चुकले की, धाकदपटशाहीने ही गोष्ट त्याला समजणार नाही. म्हणून ते म्हणाले, “”ही तर खूप चांगली गोष्ट आहे… असे कर की, तू मला जास्त नाही, फक्त एक रुपया रोज आणून देत जा.”

सुब्रोतो हसला आणि जणू काही मी जिंकलो, या आविर्भावात तो तिथून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुब्रोतो जेव्हा वडिलांकडे आला, तेव्हा त्याला बघताच वडील म्हणाले, “बाळा, आण माझा एक रुपया.”

त्यांचे बोलणे ऐकून सुब्रोतो जरा घाबरला, आणि लगेच आपल्या आजीकडून एक रुपया घेऊन आला.

“घ्या बाबा, मी घेऊन आलो तुमचा एक रुपया,” असे म्हणून त्याने ते नाणे वडिलांच्या हातात दिले.

वडिलांनी ते नाणे घेतले आणि भट्टीमध्ये फेकून दिले.

“हे काय, तुम्ही असे का केले?”” सुब्रोतोने वैतागून विचारले.

वडील म्हणाले, “तुला काय करायचे आहे? तुला फक्त एक रुपया देण्याशी मतलब असला पाहिजे. मग मी त्याचे काहीही करू शकतो.”

सुब्रोतोने पण जास्त वाद घातला नाही आणि तो तिथून गुपचूप निघून गेला.

दुसऱ्या दिवशी जेव्हा वडिलांनी त्याच्याकडे एक रुपया मागितला, तेव्हा त्याने आपल्या आईकडून एक रुपया घेऊन त्यांना दिला… बरेच दिवसांपर्यंत हाच क्रम चालू राहिला. तो रोज कुणा मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून एक रुपया घेई, आणि वडिलांना देई आणि वडील ते नाणे भट्टीमध्ये फेकून देत.

नंतर एक दिवस असा आला की, ज्यावेळी प्रत्येक जणांनी त्याला पैसे देण्यासाठी नकार दिला. सुब्रोतोला काळजी वाटली, की आता तो वडिलांना एक रुपया कुठून आणून देणार.

संध्याकाळ होत आली होती, त्याला काही समजत नव्हते की आता काय करावे! एक रुपया, न देण्याची नामुष्की त्याला सहन होणारी नव्हती. त्यावेळीच त्याला रस्त्यावर एक वयस्कर मजूर दिसला, जो एका प्रवाशाला सायकल-रिक्षात बसवून घेऊन जात होता.

“ऐका दादा, काही वेळासाठी तुम्ही मला ही रिक्षा ओढू द्याल का? त्याच्या बदल्यात मी तुमच्याकडून फक्त एक रुपया घेईन,”सुब्रोतो रिक्षावाल्याला म्हणाला.

रिक्षावाला खूप थकून गेला होता, त्यामुळे तो लगेच तयार झाला.

सुब्रोतो रिक्षा ओढू लागला.हे काम त्याला वाटत होते, त्यापेक्षा खूप कठीण होते… थोडे अंतर ओढल्यानंतरच त्याच्या हाताला घट्टे पडले, आणि पाय पण दुखू लागले! कसेतरी त्याने आपले काम पूर्ण केले आणि त्याच्या मोबदल्यात जीवनात पहिल्यांदाच स्वतःहून एक रुपया कमविला.

आज मोठ्या गर्वाने तो वडिलांकडे गेला आणि त्यांच्या हातावर एक रुपया ठेवला. रोजच्याप्रमाणे वडिलांनी रुपया घेऊन तो भट्टीत फेकण्यासाठी हात उचलला.

“थांबा बाबा!”सुब्रोतो वडिलांचा हात धरत म्हणाला, “तुम्ही हा फेकू शकत नाही! ही माझ्या मेहनतीची कमाई आहे.”” आणि सुब्रोतोने त्यांना घडलेली पूर्ण गोष्ट सांगितली.

वडील पुढे झाले आणि आपल्या मुलाला त्यांनी घट्ट आलिंगन दिले.

“बघ बेटा! इतके दिवस मी नाणी आगीत फेकत होतो, परंतु एकदाही तू मला थांबवले नाहीस. परंतु, आज जेव्हा तू स्वतःच्या मेहनतीची कमाई आगीमध्ये पडताना बघितलीस,तर एकदम ओरडलास. अशा प्रकारे, जेव्हा तू माझ्या मेहनतीची कमाई नको त्या गोष्टींमध्ये उडवतोस, त्यावेळेस मला पण तेवढेच दुःख होते. मी पण उदास होतो… म्हणूनच पैशाची किंमत समजून घे.जरी ते तुझे असू देत किंवा दुसऱ्या कोणाचे, कधीही अनाठायी खर्च करून, त्यांना नष्ट करू नकोस!”

सुब्रोतोला वडिलांनी सांगितलेली गोष्ट समजली. त्याने लगेच वडिलांना वाकून नमस्कार केला आणि आपल्या चुकीच्या व्यवहाराबद्दल क्षमा मागितली. आज त्याला एका रुपयाची किंमत समजली होती आणि त्याने मनातल्या मनात संकल्प केला की, आता तो कधीही पैशाचा अपव्यय करणार नाही.

मित्रांनो, हे तर आपल्याला कळले एका रुपयाचे महत्त्व, परंतु प्रत्येक क्षणी आपल्याला जे निसर्गाकडून फुकटात मिळत‌ आहे, ज्याशिवाय आपण एक क्षणसुध्दा जिवंत राहू शकत नाही, तर आपण त्याची किंमत कधी चुकवू शकू का?

जर नाही, तर हे जीवन देणाऱ्याच्या प्रति, आपण प्रत्येक क्षणी कृतज्ञ होऊ शकतो का!

आपण आपल्याला मिळालेल्या संसाधनांचा उपयोग कसा करतो, ते आपलं चारित्र्य दर्शवत असते. आपली ही संसाधने आपलं अंतर्गत व्यक्तिमत्व आहे, जसे मन, बुद्धी, अहंकार… नंतर मग वेळ आणि बाहेरील संसाधने जसे संपत्ती, शक्ती इत्यादी. आपण त्यांचा उपयोग खऱ्या उद्देशासाठी सर्वोत्कृष्ट रीतीने केला पाहिजे.

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिल, दोस्ती आणि रियुनियन… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ दिल, दोस्ती आणि रियुनियन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

आयुष्य हे एका प्रवाही नदीसारखे असते.. ती नदी वाहत राहते, किनारे बदलत राहतात, प्रवासी बदलतात पण काही दगड तिच्या तळाशी कायमचे विसावलेले असतात. मैत्रीही अशीच असते. काळ कितीही पुढे सरकला, आयुष्याने कितीही नवी वळणे घेतली, तरी मनाच्या तळाशी जपलेल्या मित्रांच्या आठवणी कधीच पुसल्या जात नाहीत. आणि जेव्हा अनेक वर्षांनी मित्र पुन्हा एकत्र येतात तेव्हा तो केवळ रियुनियन नसतो तो हरवलेल्या दिवसांना पुन्हा एकदा कवेत घेण्याचा भावनिक उत्सव असतो…

शाळेच्या त्या वर्गात एकाच बाकावर बसलेली मने आज जगाच्या वेगवेगळ्या दिशांना विखुरलेली असतात. कुणी यशाच्या शिखरावर पोहोचलेला असतो, कुणी संघर्षाच्या वाटेवर चालत असतो तर कुणी संसाराच्या जबाबदाऱ्यांत स्वतःला विसरून गेलेला असतो पण रियुनियनच्या दिवशी या सगळ्या ओळखी मागे पडतात. पुन्हा एकदा तेच खट्याळ चेहरे, तेच निरागस हसू आणि तेच बेधडक मन समोर उभे राहते. काळाने चेहऱ्यावर सुरकुत्या उमटवल्या असतील, केसांवर पांढरेपणा चढवला असेल पण मैत्रीच्या आठवणी मात्र अजूनही तारुण्याने उजळलेल्या असतात… शाळेच्या अंगणात एकत्र खेळलेले खेळ, डब्यातील घास वाटून खाल्लेले दिवस, शिक्षकांच्या रागानंतरही ओठांवर उमटलेले खट्याळ हास्य, परीक्षेच्या आदल्या दिवशी केलेला अभ्यास आणि सुट्टीची घंटा वाजताच दप्तर खांद्यावर टाकून धावणारी पावले हे सारे क्षण काळाच्या पडद्याआड गेलेले असतात मात्र रियुनियनच्या निमित्ताने ते पुन्हा नव्याने जिवंत होतात. प्रत्येक चेहऱ्यावर काळाच्या रेषा उमटलेल्या असतात पण डोळ्यांतील निरागस मैत्री तशीच ताजी असते…

मैत्री म्हणजे अपेक्षारहित विश्वास. न सांगताही मनातील वेदना समजून घेणारे डोळे, अपयशात खांद्यावर ठेवलेला आधाराचा हात आणि यशात मनापासून वाजवलेली टाळी

यालाच तर मैत्री म्हणतात… रक्ताच्या नात्यांपेक्षाही अनेकदा मैत्रीचे नाते अधिक जवळचे वाटते कारण ते स्वार्थाने नव्हे तर मनाने जोडलेले असते… मैत्री ही रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक जिव्हाळ्याची असते. या नात्याला स्वार्थाचा स्पर्श नसतो, अपेक्षांचे ओझे नसते. मित्रांच्या सहवासात माणूस स्वतःला विसरून मनमोकळेपणाने हसतो. जीवनातील यश-अपयश, आनंद-दुःख, संघर्ष आणि स्वप्ने यांची देवाणघेवाण करताना जाणवते की वर्षांचे अंतर मैत्रीची उब कमी करू शकत नाही…

रियुनियनमध्ये जुन्या आठवणींची पाने एकामागून एक उलगडत जातात. वर्गात केलेल्या खोड्या, डबा चोरून खाण्याचे प्रसंग, शिक्षकांची बोलणी, वार्षिक स्नेहसंमेलनातील गोंधळ, परीक्षेच्या आदल्या रात्री केलेली अभ्यासाची धडपड

प्रत्येक आठवण हसवते तर काही आठवणी डोळ्यांत नकळत पाणी आणतात.. त्या क्षणी काळ थबकतो आणि आयुष्य पुन्हा एकदा बालपणाच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहते.

आजच्या यांत्रिक जगात माणूस मोबाईलच्या संपर्कात आहे पण मनांच्या संपर्कापासून दूर जात आहे.. हजारो संदेशांची देवाणघेवाण होते तरीही मन मोकळे करून हसण्यासाठी माणूस शोधावा लागतो म्हणूनच रियुनियन ही केवळ भेट नसते ती नात्यांना पुन्हा जिवंत करणारी ऊब असते. मित्रांच्या हास्यात दडलेला आनंद आणि त्यांच्या मिठीत मिळणारा दिलासा कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असतो… आजच्या डिजिटल युगात संदेश आणि व्हिडिओ कॉल सहज उपलब्ध आहेत पण समोरासमोर भेटून हातात हात घेण्याची, खांद्यावर हात ठेवून हसण्याची आणि डोळ्यांत डोळे घालून आठवणींना उजाळा देण्याची ऊब कोणतेही तंत्रज्ञान देऊ शकत नाही. म्हणूनच रियुनियन हा केवळ कार्यक्रम नसतो तो नात्यांना पुन्हा नव्याने जगवणारा उत्सव असतो…. खरे तर जीवनाच्या प्रवासात पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवता येते पण बालपणीची निरागस मैत्री विकत घेता येत नाही. ती फक्त जपावी लागते. रियुनियन हा त्या जपलेल्या नात्यांचा उत्सव असतो. तो आपल्याला शिकवतो की आयुष्य कितीही व्यस्त झाले तरी मनासाठी काही माणसे राखून ठेवली पाहिजेत कारण शेवटी यशाच्या शिखरावर उभे राहिल्यावर टाळ्या वाजवणारे अनेक मिळतील पण पडल्यावर हात धरून उभे करणारे मित्रच असतात म्हणूनच ‘दिल, दोस्ती आणि रियुनियन’ हे तीन शब्द नसून आयुष्याचा हळवा, जिवंत आणि अमूल्य अनुभव आहे. काळाच्या ओघात सर्व काही बदलते पण मैत्रीचे धागे मात्र काळालाही तोडता येत नाहीत म्हणूनच मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक हाक कायम घुमत राहते

“मित्रांनो, पुन्हा भेटूया… कारण आठवणींना नव्याने जगण्यासाठी रियुनियनची एक भेटच पुरेशी असते. “

रियुनियन हा त्या मैत्रीच्या झऱ्याला पुन्हा एकदा उगम देणारा क्षण असतो. म्हणूनच आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळून पाहताना जर काही सर्वाधिक मौल्यवान वाटत असेल, तर ते म्हणजे

मित्र, त्यांच्या आठवणी आणि पुन्हा एकदा त्यांना भेटण्याचा तो अविस्मरणीय रियुनियन…!

शेवटी असे वाटते की, ‘दिल, दोस्ती आणि रियुनियन’ ही तीन शब्दांची गोष्ट नसून आयुष्यभर जपण्यासारखी अमूल्य ठेव आहे…

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फ्रेंडशिप डे – – लेख क्र. ३ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ फ्रेंडशिप डे – – लेख क्र. ३ ☆ श्री सुधीर करंदीकर

त्या दिवशी फ्रेंडशिप डे असल्यामुळे भरपूर मित्रांबरोबर शुभेच्छांची देवाण-घेवाण झाली. काही मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा पण झाल्या.

… तुमचे पण मेसेजेस आणि गप्पा नक्कीच झाले असतील.

काल सकाळी नात तन्वी हिचा फोन आला : “ हॅपी फ्रेंडशिप डे. ” 

मी पण तिला हॅपी फ्रेंडशिप डे म्हणालो.

मी : अगं आज फ्रेंडशिप डे आहे, ग्रँड फादर डे नाही.

तन्वी : आबा माहिती आहे. ग्रँड फादर च्या आधी यु आर माय बेस्ट फ्रेंड. तुम्ही माझ्याशी नेहमी मस्त गप्पा मारता. समजावून सांगता. म्हणून यु आर माय फ्रेंड.

… या संवादावर मी सहज विचार केला आणि लक्षात आलं की आजोबा आणि नात या नात्याला मित्र मित्र ही पण जोड दिली तर जास्तच मजा येईल.

आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्या मागे अनेक विशेषणे लावून, स्टेटस लावून वावरत असतो. माझा धर्म, माझी जात, पोटजात वगैरे वगैरे ओळख लावून आपण आपसांमध्ये दुरावा निर्माण करत असतो. घराबाहेर खरंतर फक्त स्वतःचे नाव आणि सगळ्यांचा मित्र एवढीच आपली ओळख असावी.

घरामध्ये असताना नवरा, बायको, आई, वडील वगैरे विशेषणे आपल्या मागे असतात, त्यामुळे आपला अधिकार जागृत होतो. असं करू नका, तसं करू नका, असे आपले उपदेश सुरू होतात.

वयस्कर आई-वडिलांना मुलं असं करू नका, तसं करू नका, असे बजावत असतात. वयस्कर वडील मुलांना/ नातवंडांना सारखे सल्ले देत असतात. नवरा बायको यांच्यामध्ये पण हीच भाषा असते. पुढे त्याचे रूपांतर वादावादी आणि घरामध्ये ताण तणाव यामध्ये होते. घरातले संवाद, हसणं खिदळणं हे सगळचं लोप पावतं. आणि सगळे फेसबूक आणि व्हाट्सअप ला आपला कृत्रिम मित्र करतात. आणि यांचा अतिरेक तब्येती करता कसा त्रासदायक ठरतो हे आपण बघतोच

… म्हणून नातं या विशेषणातून बाहेर काढणारा सोपा मार्ग म्हणजे, आपल्या नात्याच्या बरोबर मित्र हा शब्द सोडायचा….. नवरा मित्र, बायको मित्र, सासु मित्र वगैरे.

… घरची जबाबदारी पार पडताना मी बायको करता नवरा असणार आणि इतर वेळा मित्र असणार.

… घरामध्ये वयस्कर वडील आहेत त्यांची जबाबदारी पार पाडताना मी त्यांचा मुलगा असणार, इतर वेळेला त्यांचा मित्र असणार.

आपण सगळ्यांनीच जर हा विचार अमलात आणला, तर “आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” असेच छान वातावरण घरात आणि बाहेर नेहमीच राहणार हे नक्की.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पिशव्यांची पिशवी!… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ पिशव्यांची पिशवी!… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय घराची काही वैशिष्ट्यं असतात – – – 

.. डब्याला झाकण सापडत नाही, पण झाकण मात्र फेकायचं नसतं.

.. घरात कुठेतरी एक डबा असतो, ज्यात स्क्रू, खिळे, रबरबँड, जुन्या चाव्या आणि कशाचे आहेत हे देवाला ठाऊक असलेले दोन प्लास्टिकचे पार्ट असतात.

आणि स्वयंपाकघराच्या दारामागे असते— पिशव्यांची पिशवी!

तिचा जन्म कधी झाला हे घरात कुणालाच माहीत नसतं.

…… भाजीची पिशवी आली—आत.

मेडिकलची आली—आत.

कपड्यांच्या दुकानातून जरा जाड पिशवी मिळाली की तिचं प्रमोशन—

“ही ठेव हं. चांगली आहे!”

आता आपल्या घरात ‘चांगली पिशवी’ ही फार व्यापक संकल्पना आहे. जिला भोक नाही, ती चांगली!

कधीतरी पिशव्यांची पिशवी इतकी फुगते की दारामागून बाहेर डोकावू लागते.

…. मग घरातला एखादा धाडसी माणूस प्रश्न विचारतो,

“एवढ्या पिशव्या कशाला हव्यात? ”

त्यावर उत्तर येतं,

“तुला काय त्रास होतोय? राहू दे. कधी तरी लागतील!”

मध्यमवर्गीय संसारात ‘कधी तरी’ या दोन शब्दांनी जेवढी जागा व्यापली आहे, तेवढी बहुधा फर्निचरनेही नाही.

दहा वर्षांपूर्वीच्या मोबाईलचा चार्जर आहे. मोबाईल गेला, कंपनी गेली, कदाचित तो चार्जिंग पोर्टसुद्धा इतिहासजमा झाला—पण चार्जर आहे.

दिवाळीत आलेल्या मिठाईचा सुंदर डबा आहे. त्यात मिठाई नाही. सध्या काहीच नाही. पण डबा फेकायचा नाही… कारण? “चांगला आहे!”

आणि एक शर्ट आहे. तो सध्या बसत नाही.

पण त्याला फेकण्याचा प्रश्नच नाही.

“पाच किलो कमी झालं की होईल!”

तो शर्ट कपडा नसतो. तो आशावादाचा पुरावा असतो!

मला कधीकधी वाटतं, आपण वस्तू साठवतच नाही.

आपण ‘कधी तरी’ साठवत असतो.

.. कधी तरी लागेल.

.. कधी तरी उपयोग होईल.

.. कधी तरी वेळ मिळेल.

.. कधी तरी मी पुन्हा तसा होईन.

आणि मग एक दिवस जाणवतं—

आपल्या मनातसुद्धा अशीच एक पिशव्यांची पिशवी आहे.

.. दहा वर्षांपूर्वी कुणीतरी केलेला अपमान अजून आहे.

.. पाच वर्षांपूर्वीचं कौतुकही आहे.

.. एक निर्णय चुकीचा घेतला होता, तो आहे, त्याचं गिल्ट आहे.

.. कुणीतरी आपल्याशी कसं वागायला हवं होतं, त्याची अपेक्षा आहे.

.. आणि त्या भांडणात समोरच्याला द्यायचं राहून गेलेलं भन्नाट उत्तर तर अगदी व्यवस्थित जपून ठेवलंय!

…. कशासाठी?

.. बहुधा…“कधी तरी लागेल!”

भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात—

विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः ।

निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥

“माझं’ म्हणून प्रत्येक गोष्ट घट्ट धरून ठेवण्याची गरज ज्याला उरत नाही, तोच शांततेकडे जातो.

गीता घरातल्या पिशव्या फेकायला सांगत नाही.

…. ती कदाचित मनातल्या पिशव्या तपासायला सांगते.

कारण कपाटातल्या पिशव्यांनी फार तर जागा अडते.

…. मनातल्या पिशव्यांनी आयुष्यच अडतं.

…. जुना अपमान, जुना अहंकार, जुनं यश, जुनी चूक, जुनी अपेक्षा—सगळंच ‘कधी तरी लागेल’ म्हणून जपून ठेवलं, तर नवीन अनुभव ठेवायचे कुठे?

कदाचित अपरिग्रह म्हणजे घर रिकामं करणं नव्हे. तर कालचं किती उद्यापर्यंत वाहून न्यायचं, हे ठरवता येणं.

.. त्यामुळे पुढच्या वेळी पिशव्यांची पिशवी खाली उतरवून आवरायला घेतली, तर एक पिशवी आणखी उघडून पाहूया.

.. मनातली पिशवी |

…. उपयोगाचं असेल ते ठेवू… शिकण्यासारखं असेल तेही ठेवू.

बाकीचं?

सरळ टाकून देऊ.

…… कारण प्रत्येक गोष्टीला—

“कधी तरी लागेल!”.. असं म्हणत राहिलो, तर एक दिवस *आज* ठेवायलाच जागा उरणार नाही.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पर्यावरणाचे सदिच्छादूत : दिलीप आणि डॉ. सौ. पौर्णिमा कुलकर्णी- भाग – २ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

पर्यावरणाचे सदिच्छादूत : दिलीप आणि डॉ. सौ. पौर्णिमा कुलकर्णी– भाग – २ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

(आपण शहरात राहूनही पर्यावरणस्नेही जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्या गरजा आणि उपभोगवादी प्रवृत्ती आपल्याला कमी आली पाहिजे. प्लास्टिक, कागद इ सारख्या वस्तूंचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे. पाणी जपून वापरले पाहिजे.)  इथून पुढे – – 

ते आपल्याला चार R सांगतात. पहिला R म्हणजे ज्या गोष्टी पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहेत, ज्यांचे लवकर विघटन होत नाही, अशा वस्तुंना refuse करा म्हणजेच नाही म्हणा. जर ते शक्य नसेल तर दुसरा R म्हणजे reduce म्हणजे त्या वस्तूचा कमीतकमी वापर करा. तिसरा R म्हणजे reuse. त्या वस्तूंचा पुनर्वापर करा. आणि चौथा R म्हणजे recycle. म्हणजे त्या वस्तूंचा वापर पुनर्निर्माणासाठी करा. उदा. कागदाची रद्दी रद्दीवाल्याकडेच द्या जेणेकरून त्यापासून नवीन कागद निर्मिती होईल. अधिक वृक्षतोड करावी लागणार नाही.

दिलीपदादा आणि पौर्णिमाताई ज्याला आपण लाल डबा म्हणून हिणवतो त्या लाल बसनेच प्रवास करतात. जवळ जायचं असेल तर शक्यतो पायीच जातात. त्यापेक्षा जास्त अंतर असेल तर सायकल वापरतात. लांबच्या अंतरासाठी लाल बसचा वापर करतात. ए सी तर नाहीच नाही. बसच्या प्रवासात काढलेलं तिकीट सुद्धा ते जपून ठेवतात. त्याच्या पाठकोऱ्या भागाचा त्यांना काहीतरी लिहिण्यासाठी उपयोग होतो. ते तिकीट नंतरही ते फेकून देत नाहीत. रद्दीच्या कागदाची एक पिशवी त्यांनी केली आहे. त्यात ते ठेवतात. पुरेशी रद्दी साठल्यावर रद्दीवाल्याला देऊन टाकतात. त्यांना अमेय आणि सृजन अशी दोन मुले आहेत. अमेय पुण्यात बी एस्सी करतो. सृजन दापोलीच्या शाळेत शिकतो. दोघंही सायकल वापरतात किंवा आपल्या आईवडिलांप्रमाणे बसचा वापर करतात. आपल्या आईवडिलांची साधी जीवनशैली त्यांनीही अंगिकारली आहे. ही दोन्ही मुले इतर सर्वसामान्य मुलांसोबत सरकारी मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकली. समाजाच्या सर्व स्तरातील मुलांसोबत त्यांना मुक्तपणे शिकू दिले, खेळू दिले. समाजाच्या, निसर्गाच्या सान्निध्यात ती वाढतील याची काळजी घेतली.

जीवन जगण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतात असे विचारल्यावर दिलीपदादा हसत हसत म्हणतात. आम्हाला महिना पाच हजार रुपये खूप होतात. त्यातूनही पैसे उरतात. शिवाय आता पुस्तकांची रॉयल्टी, व्याख्यानांचे मानधन वगैरे धरून दहा बारा हजार रुपये मिळतात. एवढ्या पैशांचं काय करायचं हा प्रश्नच पडतो. ते म्हणतात, ‘ अर्थार्जन करायचं ते केवळ उदरनिर्वाहासाठीच! अनावश्यक वस्तूंचा संग्रह करायचा नाही. तुम्ही आम्ही तर चपला, बूट, कपडे, फर्निचर इ. वस्तूंचा किती अनावश्यक साठा करतो. निसर्गाच्या सान्निध्यात जीवन जगायचं. बागकाम करायचं. त्यानं आनंद मिळतो. माणूस हा दिनचर प्राणी आहे. निशाचर नाही. त्यामुळे दिवसा काम करावं. रात्री जागत बसून विजेचा अपव्यय करू नये. दिवसाचा प्रकाश डोळ्यांसाठी चांगला असतो. रात्री काम करण्याने संगणक, मोबाईल वापराने डोळ्यांवर ताण पडतो. दिवसा उपलब्ध असलेल्या सूर्यप्रकाशाचा भरपूर वापर करून घ्यावा. कपडे वाळवण्यासाठी वॉशिंग मशीन न वापरता सूर्यप्रकाशात ते वाळवावेत. भांडी घासण्यासाठी राखेचा वापर करावा म्हणजे तेच सांडपाणी बागेला वापरता येते. शहरातील लोक पाण्याची अक्षरशः नासाडी करतात. कपडे, भांडी धुण्यासाठी नळ सुरूच ठेवतात. गाडी धुण्यासाठी मुबलक पाणी वापरतात.

त्याऐवजी बादलीत पाणी घेऊन गाडी ओल्या फडक्याने पुसली तर कमी पाण्यातही स्वच्छ करता येते. अंघोळीसाठी साबण वापरण्याची आवश्यकता नाही. साबण वापरला नाही तर अर्धी बादली पाण्यातसुद्धा छान अंघोळ होते. शिवाय ते पाणी झाडांना वापरता येते. दिलीपदादा आणि पौर्णिमाताई स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करत नाहीत. ते वाळलेल्या काटक्या किंवा तुटलेल्या फांद्यांचा वापर करून चुलीवर स्वयंपाक करतात. त्याशिवाय सोलर कुकर स्वयंपाकासाठी वापरतात. त्यांच्या घरात टीव्ही नाही, मिक्सर नाही. बातम्या कळण्यासाठी आणि करमणुकीसाठी एक रेडिओ फक्त आहे. ताक रवीने घुसळतात. काही वाटायचे असले तर पाट्या वरवंट्यावर वाटतात. असे करण्यासाठी कष्ट जरूर पडतात, वेळ लागतो पण त्यातून त्यांना एक वेगळा आनंद मिळतो. शिवाय शारीरिक व्यायाम होतो. महिन्याकाठी जेमतेम एक ते दोन युनिट ते वीज वापरतात. त्याचे सत्तर पंचाहत्तर रुपये बिल येते तेवढेच. पण ते गमतीनं म्हणतात, ‘ आम्ही टाटा अंबानींपेक्षा महागडी वीज वापरतो. एका युनिटला सत्तर रुपये! ‘ 

जीवन जगण्याची काही सूत्रे त्यांनी ठरवली आहेत. त्याप्रमाणे आधी ते वागतात आणि मगच लोकांना सांगतात.

सूर्योदवपूर्वी उठावेच. अनेशापोटी काही व्यायाम वा योगासने करावी. ट्रेडमिलवर व्यायाम करणे त्यांना मंजूर नाही कारण त्यासाठी विनाकारण विजेची नासाडी होती. त्यापेक्षा फिरायला जाणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. त्यामुळे निसर्गाचे सान्निध्यही लाभते. दिवसातून एखादा तास तरी थोडा घाम येईपर्यंत काही शारीरिक कष्टाचे काम करावे. त्यामुळे आरोग्य चांगले राहते. झाडं, माती, पालापाचोळा म्हणजे घाण नाही. जे बायो डिग्रेडेबल आहे त्यामुळे रोग होत नाहीत. माती, पालापाचोळा यांना रोज एकदा तरी हात लागलाच पाहिजे. घरात नैसर्गिक खेळती हवा आणि पुरेसा उजेड असावा. पंख्याची गरज भासू नये आणि गरज लागलीच तर अगदी कमीतकमी वापर करावा. ए सी चा वापर तर नकोच. माठातील पाणी प्यावे. फ्रीजचा वापर टाळावा. ताजे अन्न, फळे, भाजीपाला खावा. शक्यतो घरीच जेवावे. बाहेरचे खाऊ नये. प्रवासात जाताना सुद्धा दिलीपदादा आणि पौर्णिमाताई स्टीलचे ग्लास सोबत नेतात. त्यातच ते चहावाल्याकडून चहा घेतात. चहासाठी कागदी वा प्लास्टिकचे मग वापरून पर्यावरणाची हानी करणे त्यांना मान्य नाही. दुपारी सूर्य डोक्यावर आला की जेवावं आणि संध्याकाळी अंधार पडण्याआधी जेवून घ्यावं. रात्र ही विश्रांतीसाठी आहे. दिसामाजी काहीतरी ते लिहावे या समर्थांच्या उक्तीचं ते पालन करतात. ते म्हणतात गरज आणि हाव यात आपल्याला फरक करता आला पाहिजे. निसर्ग आपल्या गरजा भागवू शकतो पण आपली हाव मात्र तो पुरी करू शकत नाही. आपल्या उत्पादन वाढीच्या आणि हावेच्या लालसेमुळे निसर्गाला आपण ओरबाडतो आहोत. पुढच्या पिढ्यांसाठी आपण काही ठेवणार आहोत की नाही?

त्यांचं एकंदरीत वागणं आपल्यासारख्या शहरी जीवनमान अंगवळणी पडलेल्या लोकांना विचित्र वाटेल. उपभोगासाठी विविध वस्तूंचा संचय करणाऱ्या आणि त्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करणाऱ्या आपल्यासारख्यांना त्यांची जीवनशैली पचनी पडणार नाही. पण हे लक्षात घ्यायलाच हवे की हे दोघे उच्चशिक्षित आहेत. केवळ मी पर्यावरणस्नेही वागून असा कितीसा फरक पडणार आहे असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी सुरुवात स्वतःपासून केली. गांधीजींचे फोटो लावून व्यासपीठावर त्यांच्यावर बोलणाऱ्या आपल्यासारख्या लोकांपेक्षा गांधीजींच्या तत्वांचे खरे अनुकरण या दोघांनी केले आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. या दोघांची आध्यात्माची बैठकही पक्की आहे. विचारांची बैठक पक्की आहे. एकदा ठरवले की ते निर्धाराने करतात. गेली पंचवीस वर्षे ते ही जीवनशैली जगत आहेत. अनेक मंडळी आवर्जून त्यांचं घर, त्यांची जीवनशैली पाहायला जातात. अशा व्यक्तींचंही ते स्वागत करतात. त्यांचे ‘ स्वप्नामधील गावा ‘ हे पुस्तक त्यांना असे जीवन जगताना आलेले अनुभव आपल्याला सांगते. ‘ *थेंबांनी जर भरते घागर, का उधळावा उगाच सागर*? ‘ हे त्यांचे तत्वज्ञान आपणही एकदा जरूर विचार करावा असे आहे.

 समाप्त

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मोक्ष…  भाग – २ ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ मोक्ष…  भाग – २ ☆ विभावरी कुलकर्णी ☆

(पण आम्ही अगदी निग्रहाने, मनावर दगड ठेवून त्या सगळ्या मोहाकडे दुर्लक्ष केले. गर्दी इतकी अलोट होती, की एकमेकींचा हात सुटण्याची भीती होती. म्हणून आम्ही एकमेकींचे हात घट्ट धरून चालत होतो. मैत्रिणी एकमेकींना समजावत होत्या, “आधी दर्शन घेऊया. मग येताना निवांत खरेदी करू!” कारण पुढे काय वाढून ठेवले आहे, याची आम्हा कोणालाच कल्पना नव्हती.)

इथून पुढे – –

गर्दीच्या लाटांतून वाट काढत, ढकलले जात आम्ही कसेबसे मंदिराच्या मुख्य आवारात पोहोचलो. साधारणपणे आपण कोणत्याही मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळ चप्पल-बुटांचे जोड काढून ठेवतो. आम्हीही चपला काढणार होतो. पण त्या अथांग गर्दीचा अथांग पसारा पाहून आम्ही ठरवले, आधी जरा रांग कुठे आहे ते शोधूया, मग चपला काढू.

आणि आमचा हा निर्णय किती योग्य होता, हे पुढच्याच क्षणी कळाले!

दर्शन रांगेचा शोध घेता घेता, दर्शनापूर्वीच आम्हाला संपूर्ण मंदिराला एक भव्य प्रदक्षिणा घालावी लागली. वाटेत प्रत्येक दुकानदाराचा आग्रह सुरू होता, “मावशी, चप्पल इथे काढा, नारळ-फुल घ्या!” पण आम्ही त्या आग्रहाला बळी पडलो नाही. जर सुरुवातीलाच चपला काढल्या असत्या, तर उन्हात अनवाणी पायांनी संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालावी लागली असती.

मंदिराच्या मागच्या बाजूला ३० ते ४० दगडी पायऱ्या चढून वर जायचे होते. आता तिथे पायऱ्यांजवळ आल्यावर मात्र चपला कुठे काढायच्या, हा प्रश्न निर्माण झाला. गर्दीत चप्पल हरवण्याची भीती होतीच. अशा वेळी माझी नेहमीची ‘युक्ती’ कामी आली! तशी मी फारच धोरणी आणि हुशार आहे बरं का… (असा आपला स्वतः विषयीचा गोड गैरसमज)

मी माझ्या बॅगेतून एक प्लास्टिकची पिशवी काढली, चपला त्या पिशवीत टाकल्या आणि ती पिशवी स्वतःच्या खांद्याला अडकवून घेतली! माझी ही युक्ती पाहून मैत्रिणींनीही पटकन आपापल्या चपला पिशवीत भरल्या. चला, चपला हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची एक मोठी चिंता तर कायमची मिटली!

असा गोल-गोल वळसा घालून आल्यावर आम्हाला वाटले, ‘हाहा! आता दर्शन होणार!’ आम्ही एका छोट्या लाकडी दरवाजातून मंदिराच्या मुख्य आवारात प्रवेश केला. पण आत पाऊल ठेवताच देव आपल्यापासून किती दूर आहे, याची दाहक कल्पना आली!

आतमध्ये अथांग पटांगणात बांबूच्या भल्यामोठ्या काठ्या बांधून गोल-गोल फिरणाऱ्या शेकडो ओळी (Barricades) तयार केल्या होत्या. तो एक प्रकारचा चक्रव्यूहच होता! आम्ही त्या रांगेत उभे राहिलो. १० मिनिटे… २० मिनिटे… १ तास… २ तास… ३ तास उलटून गेले! तरीही त्या रांगा संपण्याचे नावच घेत नव्हत्या. आम्ही जसे पुढे जायचो, तशी नवीन रांग समोर उभी राहायची.

आता चपला पिशवीत असल्याने आम्ही अनवाणी होतो. पायाखाली छोटे-छोटे खडे टोचत होते. काही वेळाने आम्हाला त्या रांगा न संपण्याचे खरे गुपित कळले. गर्दीतली बरीच हुशार माणसे बांबूच्या काठ्यांच्या खालून सरपटत, रांग ओलांडून मधल्या मध्ये पुढच्या रांगेत शिरत होती! लोक सर्रास नियम मोडत होते. मग प्रामाणिकपणे रांगेत उभ्या असणाऱ्या आमचा नंबर कसा बरं लवकर लागणार?

पण त्या कंटाळवाण्या आणि त्रासाच्या रांगेतही अनेक गमतीजमती अनुभवायला मिळाल्या. रांगेत उभ्या उभ्याच अनोळखी लोकांशी गप्पा सुरू झाल्या. कित्येक वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या काही जुन्या मैत्रिणी तिथे अचानक भेटल्या. लहान मुले तर बांबूच्या खालून इकडून तिकडे पळण्याचा आणि रांगेत लपाछपी खेळण्याचा आनंद घेत होती. काही चतुर महिला तर आपल्या लहान मुलांना बांबूच्या खालून पुढे पाठवायच्या आणि “अहो, माझे लहान बाळ पुढे गेले!” असे सांगून मुलाच्या निमित्ताने स्वतःही ४-५ रांगा ओलांडून पुढे जायच्या!

आम्ही मात्र शांत होतो. आमच्या मनात एकच विचार सुरू होता ‘मोक्षदात्या कपर्दिकेश्वराच्या दर्शनाला चाललोय, तर थोडे कष्ट तर होणारच ना! ईश्वरप्राप्ती एवढी सोपी कुठे असते? ‘ या सात्विक मानसिकतेमुळे आम्ही त्या शारीरिक त्रासाचाही आनंद घेत होतो.

त्याच वेळी आमच्या रांगेत शेजारी एक अतिशय सात्विक, भाविक महिला भेटली. तिने मंदिराचे महत्त्व, तिथल्या वृक्षाची महती आणि दर्शनाने कशी ‘मोक्षप्राप्ती’ होते, यावर प्रवचनवजा भाषण सुरू केले.

ती अगदी भारावून सांगू लागली, “हे बघा बायकांनो! देवाच्या दारी रांगेत मधे शिरणे पाप आहे! देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर शरीराला कष्ट सोसावेच लागतात. जेव्हा पायात खडे टोचतात, तहान-भूक व्याकुळ करते आणि शरीर थकते… तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या पापांचे क्षालन होते आणि ते दर्शन आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाते!”

तिने स्वतः आजवर कोणकोणत्या तीर्थक्षेत्री किती शारीरिक कष्ट सहन करून, उपाशी पोटी रांगेत उभे राहून दर्शन घेतले, याचे असे काही रंगवून रंगवून वर्णन केले, की आम्ही अगदी भारावून गेलो! आम्हाला वाटले, ही कुणी सामान्य स्त्री नसून प्रत्यक्ष मोक्षाचा रस्ता दाखवणारी साक्षात सात्विक मूर्तीच आहे. आम्ही तर तिच्या पाया पडायच्या विचारात होतो!

इतक्यात कुणाचा तरी धक्का लागला आणि आमचे लक्ष क्षणभर विचलित झाले. २-३ मिनिटांनी जेव्हा आम्ही त्या ‘मोक्षदात्री’ महिलेकडे पुन्हा पाहिले, तर ती गायब! आम्ही आजूबाजूला तिला शोधू लागलो. ‘अचानक ही कुठे गेली? ‘

काही वेळाने आमची नजर पुढे गेली आणि आमचा डोळ्यांवर विश्वासच बसेना! जी महिला आम्हाला एक मिनिटापूर्वी ‘कष्ट सोसून दर्शन घेतल्याने कसा मोक्ष मिळतो’ याचे ज्ञान पाजळत होती… ती स्वतःच बांबूच्या खालून अत्यंत शिताफीने सरपटत, ७ ते ८ रांगा ओलांडून, प्रामाणिक भाविकांना मागे टाकत कपर्दिकेश्वराच्या दर्शनासाठी बरीच पुढे निघून गेली होती!

तिचा तो ‘अद्भूत मोक्ष मार्ग’ पाहून आम्ही डोक्याला हात लावला आणि आम्हाला हसू आवरेनासे झाले!

बरेच बांबू ओलांडणाऱ्या लोकांचे धक्के सहन करत, पायात शेकडो खडे टोचवून घेतल्यानंतर, तब्बल ५ तासांच्या खडतर वाटचालीनंतर अखेर आम्ही कपर्दिकेश्वराच्या गर्भगृहाच्या समोर उभे राहिलो!

आणि… समोरचे ते दृश्य पाहताच आमचे भान हरपले!

गर्भगृहात महादेवाची ती अलौकिक, नयनरम्य तांदळाची पिंडी साक्षात तेजाने तळपत होती. एका चिमुकल्या लिंबावर संपूर्ण तांदळाची पिंडी अत्यंत कौशल्याने आणि श्रद्धेने तोललेली होती. त्या पिंडीचे दर्शन होताच, मनातील सर्व थकवा, पायांच्या वेदना आणि ५ तासांची पायपीट एका सेकंदात गायब झाली! ५ तासांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले होते. डोळे भरून आम्ही त्या ‘मोक्षदात्याचे’ रूप मनात साठवून घेतले. हात आपोआप जोडले गेले आणि तोंडून शब्द बाहेर पडले “हर हर महादेव! कपर्दिकेश्वर महाराज की जय!”

दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. ५ तास सतत रांगेत उभे राहिल्यामुळे शरीर पूर्णपणे गळून गेले होते. सकाळी गाडीत ठरवलेली ती जत्रा, खरेदी, बांगड्या, भांडी… या कशाचीही आता इच्छा उरली नव्हती.

पण त्या गर्दीत एक चांगली गोष्ट घडली. परतीच्या वाटेवर रस्ता चुकण्याची किंवा चालण्याचे कष्ट करण्याची अजिबात गरज नव्हती! कारण भाविकांची ती अथांग गर्दीच मागून ढकलून ढकलून आम्हाला पुढे नेण्याचे काम करत होती! आम्हाला फक्त एकमेकींचे हात घट्ट धरून उभे राहायचे होते. गर्दीच्या त्या मानवी प्रवाहाने आम्हाला थेट मंदिरापासून २ किलोमीटर दूर असलेल्या पार्किंगपर्यंत आणून सोडले!

इतके तास दर्शनातच निघून गेल्यामुळे आणि शरीर थकल्यामुळे, इतर ठिकाणी फिरण्याचा किंवा कुठल्या दुसऱ्या मंदिरात जाण्याचा प्रश्नच उरला नव्हता. आम्ही सरळ गाडीत बसलो आणि घराची वाट धरली.

अशा प्रकारे, ओतूरच्या त्या मोक्षदात्या कपर्दिकेश्वराचे अद्भुत दर्शन, रांगेतील त्या ‘मोक्ष’ सांगणाऱ्या बाईची गंमत आणि तो संपूर्ण प्रवास आमच्या आयुष्यातील एक ‘अविस्मरणीय भावयात्रा’ बनून राहिली!

समाप्त — 

©  विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “विलक्षण मराठी भाषा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “विलक्षण मराठी भाषा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक 

रस्ता – मार्ग

  • जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.
  • जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.

खरं – सत्

  • बोलणं खरं असतं
  • सत्यला सोबत पुरावा जोडावा लागतो.

घसरडं – निसरडं

  • पडून झालं की घसरडं.
  • सावरता येतं ते निसरडं.

अंधार – काळोख

  • विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.
  • निसर्गात जाणवतो तो काळोख.

पडणं – धडपडणं

  • पडणं हे अनिवार्य.
  • धडपडणं हे कदाचित सावरणं.

पाहणं – बघणं

  • आपण स्वत:हून पाहतो.
  • दुस-यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.

पळणं – धावणं

  • पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.
  • ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.

झाडं – वृक्ष

  • जे माणसांकडून लावलं जातं ते झाडं.
  • जो आधीपासूनच असतो तो वृक्ष.

खेळणं – बागडणं

  • जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.
  • जे मुक्त असतं ते बागडणं.

ढग – मेघ

  • जे वा-याने ढकलले जातात ते ढग.
  • जे नक्की बरसतात ते मेघ.

रिकामा – मोकळा

  • वेळ जो दुस-याकडे असतो तो रिकामा.
  • आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.

निवांत – शांत

  • *कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा.
  • काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा.

आवाज – नाद

  • जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज.
  • जो घ॔टेचा होतो तो नाद.

झोका – हिंदोळ*

  • जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका.
  • जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा.

स्मितं – हसणं

  • मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित.
  • जे लोकांसमोर दाखवावं लागतं ते हसणं.

अतिथी – पाहुणा

  • जो यावा यावा असा वाटतो तो अतिथी.
  • जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो पाहुणा.

घोटाळा – भानगड

  • जो अचानक नकळत होतो तो घोटाळा.
  • जी नियोजनबद्ध पद्धतीने होते ती भानगड.

आभाळ- आकाश

  • भरून येत ते आभाळ
  • निरभ्र असत ते आकाश

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावध व्हा… ☆ दीपा नारायण पुजारी ☆

दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ सावध व्हा…  ☆ दीपा नारायण पुजारी ☆

रात्रीचे अकरा वाजत आले होते. शेजारच्या घरातील भजनसंध्या अजून सुरुच होती. भजनात रंगलेल्या त्या कुटुंबाला संध्यासमय उलटून निशाराणी अवतरली आहे हे कळलं नसावं. भक्तीरसात ते चिंबचिंब चिंबोरे झाले होते.

भक्तीरसात, शांतरस असतो हे त्यांना ठाऊक नसावं. गायनातला गोडवा संपला होता आणि त्या भगवंताला आपला आवाज ऐकू जावा म्हणून कंठघोष सुरू झाला होता. शेजारी दवाखाने आहेत. आजूबाजूच्या घरात वृद्ध, जेष्ठ लोक रहात आहेत. कुणी परिक्षार्थी, अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतील या गोष्टींचं भान त्यांना उरलं नसावं. देवाचं नाव घेताना, त्यानंच निर्माण केलेल्या या सृष्टीवर ते केवढा अन्याय करताहेत, हे कोणी, कसं पटवून द्यायचं बरं? सगळे उच्चविद्याविभूषित, कलासक्त,. त्यांच्या भक्तीत विघ्न कसं आणायचं?

हा भक्तीरस श्रवणीय, आनंददायी न राहता, ध्वनीप्रदूषणास कारणीभूत ठरतो. ध्वनीप्रदूषणाचे अनेक परिणाम होतात. डोकेदुखी, रक्तदाब वाढणं, डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होणं आणि कायमचं कमी ऐकू येणं अर्थात बहिरेपणा. मोठ्या आवाजात बोललेलं ऐकण्याची सवय कायमसाठी लागू शकते. मग हळू आवाजात बोललेलं ऐकण्याची क्षमता कमी होते. एकाग्रता कमी होते. हा त्रास सगळ्यांना सोसावा लागतो. आवाज कमी ठेवा असं सांगावं तर, आम्ही आमच्या घरात गातोय आणि ते ही देवभक्तीपर अभंग. तुमच्या कानांना त्रास का होतो? अशा प्रकारची उत्तरं ऐकावी लागतात. केवळ कर्णबधीर नाही तर मनबधीर झालेल्या या लोकांना कसं समजवायचं? असो.

माझ्या झोपेचं मात्र या भजनानं पुरतं खोबरं केलं होतं. काणठळ्या बसवणारा आवाज कानावरुन हात बाजूला सारू देत नव्हता. अशा बेभान झालेल्या भक्तीरसात न्हालेले चिंबोरे गणेशोत्सवात भक्तीनं निथळून नाचताना दिसतातच नं आपल्याला. लग्नसमारंभ असो किंवा वाढदिवस, गौराईंचं आगमन असो किंवा निवडणूक जिंकल्याचा जल्लोष आपला आनंद व्यक्त करण्याची पद्धत कर्णकटू तर असतेच, पण सामाजिक शांतता बिघडवणारी असते. समाजात राहताना नीतीनियमांचं पालन न करणारे अनेक महाभाग दिसतात. ध्वनी प्रदूषण हा शब्द यांच्या शब्दकोशात नसावाच. कोणता कृष्ण, कोणता राम यांना प्रसन्न होत असेल? बिचारे देव सुद्धा कपाळावर आठ्या घालून, कान बंद करुन बसत असतील.

निसर्गाच्या साध्या सरळ नियमांना धाब्यावर बसवून चाललेल्या अशा कितीतरी कृतींना ही अवनी कंटाळली आहे. तिला आता हा आक्रोश सहन होत नाहीये. मोठ्या आवाजात, वेगानं, धुराड्यातून धूर सोडत पळणारी वाहनं, तिचं शरीर तुडवतात. आधुनिकीकरणाच्या नावाखाली, तिची हिरवी बाळं, मुळासकट उखडून टाकली जातात. ती तापलेल्या तप्त तव्यागत किती उसासे सोडत आहे. सजीवांना संजीवन देणारी ही अवनी, आपलं काम चोख बजावत आहे. तरीही वेगवेगळे संकेत देऊन ती तिच्यावर होणारा अन्याय सांगत असते. त्यातूनच जंगलात लागणारा वणवा, असह्य उष्मा, दुष्काळ, पाण्याचं दुर्भिक्ष्य अशा गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्सुनामी, महापूर, भूकंप, ज्वालामुखी अशा उद्रेकाच्या रुपानं पृथ्वी तिचा राग व्यक्त करत असते. या वर्षी पावसानं दिलेली हुलकावणी याचंच लक्षण आहे.

आपण सावध व्हायला हवं. संकेत समजून घ्यायला हवेत. अन्यथा ही सर्जनशीलता गमावून बसलेली, रुष्ठ झालेली पृथ्वी, आग ओकणारा सूर्य, संतुलन बिघडलेलं निसर्गचक्र यांना तोंड देणं अवघड होऊन बसेल. आपल्या पुढच्या पिढीला तप्त दाह देणारं वाळवंट म्हणजे पृथ्वी अशी व्याख्या करावी लागेल. हरित अवनी म्हणजे काय असतं हे कळणं दुरापास्त होईल. हिरवे डोंगर, नदीनाले, सरोवरं, तलाव या गोष्टी चित्रात बघाव्या लागतील. हिरवे गालीचे अदृश्य होतील. पक्षांचा गोड किलबिलाट बंद होईल. सूर रुसून बसतील. संगीताचा वसंत हरवेल आणि फक्त ग्रीष्म राहील. म्हणूनच.. म्हणूनच सावध व्हा..

© दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जग सुंदर करणारे अनामिक देवदूत – – – लेखक : श्री विशाल अडे ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

? मनमंजुषेतून ?  

☆ जग सुंदर करणारे अनामिक देवदूत – – – लेखक : श्री विशाल अडे ☆ प्रस्तुती –  अंजली दिलीप गोखले ☆

भर पावसात भिजत उभ्या असलेल्या तरूणास विचारले,

“नुसताच भिजतो कश्याला? “

तो उत्तरला “नही साब”..

त्याच्या डाव्या बाजूला जमिनीकडे बोट दाखवतं तो म्हणाला,

“इधर निचे बडा मेन होल का गार है. ढक्कन निकल गयेला है”

तो त्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये, म्हणून तिथे ऊभा होता?

रस्त्याखालचे मेनहोल भरले असावे, अन्यथा पाणी चक्राकार आत घुसताना दिसले असते.

फुटभर उंचीचे पाणी वरून वेगाने जात होते.

पायी चालणाऱ्याला वा दुचाकीवरून जाणाऱ्या कोणाला जाणवलेही नसते, की खाली खोल सांडपाण्याचे मेनहोल आहे?

मी अवाक झालो?

कोण होता हा?

कोणासाठी हा असा पाण्यात उभा राहिलायं?

मी भर पावसात खाली उतरलो.

त्याला म्हटले,

“बहोत बढिया, भाई?”

तो फक्त कसनूसं हसला आणि म्हणाला,

“बस, कोई गिरना नै मंगता इधर”

“कबसे खडा है? “

“दो बजे से”

घड्याळात पाच वाजले होते..?

३ तास तसेचं ऊभे राहून याला भूक लागली असणारं.

दुर्दैवाने माझ्याकडे काहीच नव्हते.

सगळी दुकानेही बंद.

हा भूक लागल्यामुळे जागा सोडेल, असे काहीच चिन्ह नव्हते?

कुठल्या प्रेरणेने तो हे करतं होता?

त्या घाण गुडघाभर ऊंचीच्या पाण्यात उभे राहून तो तीन तासांपासून कोणाला वाचवतं होता?

आणि का?

दोन वाजल्यापासून त्याने कित्येक जणांना वाचवले असणार.

कोणाला त्याची जाणीवही नव्हती, नसेल.

खुद्द याला तरी त्याची कुठे पर्वा होती?

*ही अशी छोटी छोटी माणसें हे जग सुंदर करून जातात?*

मागच्या डिसेंबरमध्ये दादरला फुटपाथवर एक आंधळा म्हातारा ‘कालनिर्णय’ विकतं बसलेला दिसला.

दुकानातून घेण्याऐवजी, याच्याकडून घेतलेले काय वाईट, असा विचार करून थबकलो.

“केवढ्याला ‘कालनिर्णय’, काका? “

“फक्त बत्तीस रूपये, साहेब”

केविलवाणे तो म्हणाला.

सकाळपासून एकही विकले गेलेले दिसत नव्हते.

मी एक घेतले.

पन्नासची नोट होती. ती त्याला दिली.

हाताने चाचपडत तो ती नोट तपासतच होता, तेवढ्यात अचानक उंची कपडे घातलेला साठीतला एक देखणा गृहस्थ खाली वाकला.

“कितने का है ये? “

“बत्तीस रुपया”

“कितने है? “

“चौदा रहेंगे, साब”

ज्याला मराठी येतं नाही, असा हा माणूस मराठीतले कालनिर्णय कशासाठी विकत घेतोयं?

त्या माणसाने खिशातून साडेचारशे रुपये काढून त्याला दिले आणि ते सगळे कालनिर्णय बखोटीला मारले?

मी आश्चर्यचकित..?

छापील किंमतीत विकत घेतोय, म्हणजे पुनर्विक्रीसाठी निश्चितच घेत नाहीये.

तसाही, कपड्यांवरूनही हा असले किरकोळ धंदा करणाऱ्यातला वाटतं नव्हता.

तो गृहस्थ थोडा पुढे गेला असेल.

मला राहवलेचं नाही.

मी थांबवून त्यांना विचारलेच?

हे मुळचें लखनौचे महोदय.

एअरइंडियातल्या मोठ्या पदावरून नुकतेचं निवृत्त झाले होते.

शिवाजीपार्कात स्वत:चे घर होते.

एकुलता एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता.

लठ्ठ पेन्शन येत होती.

“वो बेचारा पंधरा कालनिर्णय बेचके कितना कमाता होगा?

सौ, डेढसौ?

वैसे भी बेचारे को सौ रुपये के लिए दिनभरं ऐसेही धुप मे बैठना पडता था.

मैने ऊसका काम थोडा हलका करं दिया.

बस इतनाही?”

मला काही बोलणेचं सुचले नाही?

पण एवढ्या चौदा कालनिर्णयांचे तो करणारं काय होता?

“सोसायटी मे बहोत मराठी फ्रेंडस है, उन को बांट दूंगा?”

मी दिग्मूढ?

“तु एक मिनीट लेट आता, तो तुझे भी फोकट मे देता?”

मला डोळा मारतं, हसतं तो लखनवी देवदूत रस्ता पार करून गेला सुद्धा?

*माणूसकी याहून काय वेगळी असते? *

एखाद्या हॉस्पिटलबाहेर ‘तात्काळ रक्त हवे’ असा फलक वाचून, ऑफिसला वा घरात जायला ऊशीर होईल, याची तमा न बाळगतां रक्त देणारे कोण असतात?

ते ही रांग लावून?

कोण असतात हे?

कुठल्या जातीचे?

कोणत्या धर्माचे?

‘भैये’ असतात की ‘आपले’ मराठी?

हिन्दू की मुसलमान?

मुंबईत रस्त्यावर चहा विकणारे लाखो ‘चायवाले’ आहेत.

सकाळी चहा बनवल्यावर पहिला कपभरं चहा ते रस्त्यावर फेकतात.

दिवसाचा पहिला चहा रस्त्यावर न फेकता भिकाऱ्याला पाजणारा बांद्र्याचा एक ‘चायवाला’ मला माहिती आहे?

सकाळी सकाळी भिकारी आलाचं नाही, तर एका भांड्यात तेवढा चहा बाजूला काढून, धंद्याला सुरूवात करतो?

“बरकत आती है” एवढीचं कारणमिमांसा त्याने दिली होती.

डोळे ऊघडून पाहिले, तर असे असंख्य अज्ञात देवदूत आपल्याला ठायीठायी आढळतात, पण आपली नजरचं मेलेली असते.

काही दिवसांपूर्वी थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी हजारो अनामिक हात मदतीस आले.

गुहेतले पाणी पंपाने बाहेर काढावे लागले.

ते पाणी कुठे फेकले?

बाजुच्या शेतजमिनीत.

ज्याच्या शेतातं ते पाणी फेकावे लागले, त्या शेतातलें तीन एकरातले ऊभे पिक या पाण्याने अक्षरशः वाहून गेले.

एका छोट्या शेतकऱ्यासाठी हे प्रचंड नुकसान?

एका पत्रकाराने त्या शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीविषयी विचारले.

” नुकसानीचे काय एवढं?

मुले वाचली ना? पेरणी परतं करता येईल.

मुलांचे प्राण परतं आणता आले असते का? “

हे ऊत्तर ऐकूनचं डोळ्यात पाणी आले?

हे जग सुंदर आहे.

ते सुंदर करणारे अनामिक देवदूत आजही या जगात आहेत आणि राहतीलही.

फक्त तो तिरस्काराचा, आत्मकेंद्री स्वार्थाच्या काळ्या काचांचा गॉगल डोळ्यावरून काढला पाहिजे?

*”सोप्पं आहे. चला, जमवू या?”*

 

लेखक : विशाल अडे 

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares