मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘मीपण’ गळून जावे… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ ‘मीपण’ गळून जावे… ☆ राधिका भांडारकर ☆

त्यादिवशी ती मला सांगत होती, “मी आहे म्हणून यांचं बरं चाललंय. माझ्यामुळेच यांचं सारं सुरळीत चाललं आहे. संसाराचा रगाडा काही कमी असतो का? सगळं काही मी खांद्यावर पेलते म्हणून यांना कसली ददात नाही, तोशीश नाही. उद्या मी गेल्यावर यांचं कसं होईल गं? याची चिंता मला लागून राहिली आहे. ”

… थोडक्यात ‘मी मी आणि मीच’. माझ्या आधीही मीच, आताही मीच आणि नंतरही मीच. तिचं हे लांबलचक “मी पुराण” ऐकून मला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं पण तिला काही समजूतीचं लवचिकतेचं, दूरस्थ, निवृत्त राहण्याबाबतीतलं काही सांगावं असंही मला वाटेना. कारण ती तिच्या ‘मीपणात’ इतकी डुबून गेली होती की माझं बोलणं तिनं माशी सारखं उडवून दिलं असतं. शेवटी मी तिला इतकंच म्हणाले, “खरोखरच तू सुपर वुमन आहेस. ”

आमच्या सोसायटीतल्या मिसेस उदगावकर ही अशाच. तशा त्या देखण्या आहेत, त्यांची राहणी नीटनेटकी आहे, धनवानही आहेत, पारिवारिक आयुष्यात तशा सुखीच. रोज संध्याकाळी कट्ट्यावर येतातही पण बाईच्या चेहऱ्यावर अदृश्य अक्षरे लिहिलेली जाणवतात. ”आय अॅम द बेस्ट! ” माझ्यासारखी मीच. जे जे काही नंबर वन ते सगळं सगळं माझ्याकडे आहे. ”

.. …. तशा बोलतात सगळ्यांशी पण चेहऱ्यावर असलेला कायमस्वरूपी, दुसऱ्यांच्या बाबतीतला तुच्छताभाव कधीही लपत नाही. ज्या दिवशी त्या कट्ट्यावर येत नाहीत तो दिवस भाग्याचाच असतो म्हणाना सगळ्यांसाठी.

“आज आल्या नाहीत का मिसेस “फुशारकी”? बरं झालं! ” असं म्हणून कट्ट्यावर एक अत्यंत नैसर्गिक असा हशा पिकतो.

समोरचे नानाही त्याच पठडीतले आहेत. ”आपलं बुवा असं आहे. भल्याभल्यांनी माझ्यापुढे नाकं घासली आहेत आता सांगा? ”

पण नानांच्या बाबतीत एकदा कुणीतरी म्हणाले होते, ” अहो! कोण विचारते या नानांना? निवृत्त झाले तेव्हा साधा निरोपसमारंभ ही कुणी आयोजित केला नाही यांच्यासाठी. एकही मित्र, स्नेही यांना नाही. पत्नी बिचारी त्यांचा हा अहंभाव, मीपणा नाईलाजाने सहन करते पण मुले कुठे विचारतात? ”

 – – थोडक्यात ही “मीपण” पांघरून वावरणारी माणसं असतात ना ती आपल्या पलीकडे काही जग आहे हे विसरूनच गेलेली असतात. अत्यंत अहमन्य आणि आत्मकेंद्री असतात ही.

मला आठवतंय एकदा मी माझ्या नातीने (वय वर्ष सात) काढलेलं एक सुंदर चित्र जवळच्या एका नातेवाईक स्त्रीला दाखवत होते. खरं म्हणजे तिने ते नीट पाहिलं सुद्धा नाही. कौतुक करणं तर दूरच राहो पण फाटकन म्हणाली,

.. “छे हो! हे तर काहीच नाही. माझ्या नातवाने केलेली पेंटिंग्ज तुला दाखवेन. रवी वर्माने पाहिली असती ना तर त्यानेही त्याचं कौतुक केलं असतं. आमच्या घरात एका खोलीत माझ्या सुनेने त्याची सर्व पेंटिंग्ज भिंतीवर छान रचनात्मक पद्धतीने लावून ठेवली आहेत. ये एकदा पहायला मग कळेल तुला. ”

– – तिच्या कलाकार नातवाचं मला का कौतुक नसावं पण *त्या दिवसाचा एक अत्यंत बावळट चेहरा म्हणून*(Todays Face या मोडमध्ये) माझा क्रमांक नक्कीच लागला असता…. तिनं माझ्या वात्सल्य भावनांना अथवा ममत्त्वाला किती दुखावलं याचा तिला पत्ताही नसेल इतकी ती स्वतःत गुंतलेली होती. तिच्या “मीपणाच्या” रम्य कल्पना विश्वात ती मात्र खरोखरच खुशीत असावी. *खुदपसंत* यालाच म्हणतात का?

अशा अहंभावात रमलेल्यांना काय कळणार हो संत रामदासांचा दासबोध आणि युगंधराची गीता? हे लिहिताना “गाढवापुढे वाचली गीता” ही म्हण मात्र माझ्या मनात अगदी बिनदिक्कत प्रवेश करती झाली.

भगवत गीतेनुसार “मीपण” म्हणजेच अहंकार, म्हणजेच दुःखाचे मूळ कारण. अहंकार सोडून निमित्तमात्र होऊन कर्म करणे, निस्वार्थ भावनेने जगणे आणि देहबुद्धी न ठेवता आत्मरूपाने राहणे, अहंकाराचे विसर्जन करणे, मीपण गळून जाणे हे तत्त्वज्ञान यांच्या कधीतरी पचनी पडो असाच धावा जणू मी या समस्त “मीपण” बाळगणाऱ्यांसाठी परमेश्वरापाशी करेन.

– – या “मीपण” असणार्‍यांच्या गोतावळ्यात जेव्हा मी चेंगरून जाते तेव्हा नकळत स्वतःलाही तपासून पाहते बरं का! मी थोडीच साधू संत आहे? तसे काही विकार माझ्यातही असणारच ना? *कोहम* हा प्रश्न माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जेव्हा घुमतो तेव्हा मीही अशीच भांबावते. खरं म्हणजे त्या क्षणी ही जी काही माणसं माझ्या भोवती अहमन्यतेचे झेंडे घेऊन परिक्रमा करत असतात तेव्हा मी सावधपणे विचार करू लागते” मी कशी आहे? ” यापेक्षा मी कशी असले पाहिजे याकडे आपोआपच लक्ष केंद्रित करते. झाडावरून एक पान अलगद माझ्या पायाशी गळून पडतं आणि तेव्हाच त्या गळून पडलेल्या पानाच्या स्वधर्माशी मी मला तपासून पाहते. माझ्यात असलेलं “मीपण” हे असंच या पानासारखं गळून पडावं. नको अहंकार, नको मोह, नको पाश. मुक्त तरी जोडलेलं, स्वतंत्र तरी नम्र. “मी आणि माझे” या रेषा ओलांडून पूर्णपणे विसावलेलं असं माझं मन असावं मग या सुखाच्या अविकारी मार्गावरून जाण्याची मला ओढ लागते पण जमेल का मला हे?

खरं म्हणजे मनातल्या मनात मी कधीतरी, माझ्या भोवतालच्या या अहंकाराने पछाडलेल्या माणसांचे आभार मानते कारण त्यांच्यामुळेच “मीपणा” गळावा या चिंतनयुक्त तत्त्व रेषेवर मी येऊन पोहोचलेली असते. समाजात अशा माणसांची होणारी थट्टा, उपहास, निंदा, नकोसेपण आणि पर्यायाने त्यांचे अंतिम एकटेपण पाहून मला या अवगुणांपासून दूर जावेसे वाटते.

– – एक असतो अर्ध्या हळकुंडात पिवळा होऊन समाजात स्वतःचीच पाठ थोपटत बडेजावात मिरवणारा तर दुसरा असतो साधक, तपस्वी, स्थिर, शांत, निगर्वी. त्याच्या ठायी असलेल्या महान कलागुणांचा त्याला इतकासाही दर्प नसतो, अहंकार नसतो. तो त्याच्या प्रेक्षकांसमोर श्रोत्यांसमोर, शिष्यगणांसमोर आणि स्वतःच्या कलेशीही सदैव लीन असतो. श्रेयस आणि प्रेयस मधल्या कलहात तो कधीच नसतो. शेवटच्या श्वासापर्यंत “मीपण” पार गळून गेलेला तो फक्त एक अभ्यासक असतो.

.. आज मी नसेन तशी, नाहीच. पण उद्याच्या वाटेवर मी नक्की प्रयत्न करेन.

‘ लहानपण देगा देवा … मुंगी साखरेचा रवा.. ’

– – यातला “लहानपण” हा शब्द खूप व्यापक आहे. ”लहानपण” म्हणजे मीपणा, मोठेपणा गळून गेलेला काळ.

.. “ भगवंता माझ्यातले “मीपण” असेच गळून जावे इतकेच माझे मागणे ”.

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लामियाचा केक… ☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆

डॉ. तेजस्विनी वाळिंबे

? इंद्रधनुष्य ?

☆ लामियाचा केक☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆

काही वर्षांपूर्वी एका जंगल सफारी दरम्यान वाघाचे दर्शन घेण्यासाठी आमची धडपड चालू होती. हरणं, गवे, हत्ती दिसले पण वाघ काही दिसेना. परतीच्या वाटेवर दूर एका झाडामागे मला काहीतरी भास झाला. “वाघच असावा बहुतेक, ” मी म्हणाले, तर आमचा गाईड हसून म्हणाला, ” तो वाघापेक्षाही भयानक दोन पायांचा प्राणी आहे. ” या विधानाच्या सत्यतेचा अनुभव अनेक वेळा नराधमांच्या कृत्याच्या बातम्या वाचून आपल्याला येतो. क्रौर्य आणि हिंसेने बरबटलेल्या अनेक घटना कौटुंबिक हिंसाचाराच्या रूपाने कधी बाहेर येतात तर कधी सामूहिक अत्याचार आणि दंगलींच्या रूपात दिसतात.

जगाच्या इतिहासात प्रचंड हिंसाचार आणि क्रौर्य घडतं ते युद्धाच्या वेळी. सीमेवरील सैनिकच याचे बळी ठरतात असे नाही तर लहान मुलं, स्त्रिया हजारो निरपराध जीवांचं आयुष्य आणि अनेक पिढ्या युद्धामुळे उध्वस्त होतात. कधीही भरून न येणाऱ्या भळभळणाऱ्या जखमा युद्धामुळे तयार होतात.

लामियाची ही कथा अशीच एक. 1990 साल, इराक मधील एका छोट्या खेड्यात आपल्या आजी – बीबी सोबत राहणारी नऊ वर्षाची एक गोड मुलगी लामिया आणि तिचा हिंदी नावाचा एक कोंबडा. लामिया आपल्या काबाडकष्ट करणाऱ्या आजीबरोबर एका झोपडीत राहत होती. आजीला ती प्रत्येक कामात मदत करत असे. कंदीलाच्या प्रकाशात घरचा अभ्यास करणारी, आपल्या मित्रासोबत आपले स्वप्न बोलून दाखवणारी निरागस लामिया. सद्दाम हुसेन इराकवर राज्य करत होता. या तानाशहाचे गोडवे गाऊन शाळेतला दिवस सुरू होतो. ‘आमचं रक्त, आमचा आत्मा, आमचं सर्वस्व आम्ही त्याग करू आमच्या सद्दाम साठी. शत्रू ने आमचं अन्नपाणी, औषधे बंद केले, एवढेच काय आम्ही श्वास घेतो ती हवा थांबवली तरी आम्ही झुकणार नाही. ‘ अशी सद्दामच्या जयजयकाराची प्रार्थना होऊन शाळा सुरू होते. सायरन चे आवाज आणि आकाशात घिरट्या घालणारी विमानं छातीत धडकी भरत असतात. सद्दाम हुसेन चा वाढदिवस शाळेत साजरा करायचा असतो. त्यासाठी मुलांच्या नावाच्या चिठ्ठ्या शिक्षक काढतात. एक विद्यार्थी शाळा स्वच्छ करेल, एक ताजे फळं आणेल. केक कोण आणणार?

केक आणण्यासाठी चिठ्ठी निघते ती लामियाच्या नावाची. शाळेत रोज डबाही आणू न शकणारी लामिया सगळ्यांसाठी केक कसा आणणार? घरी पोहोचल्यावर आपल्या लाडक्या बीबीला ती ही बातमी सांगते. शेजारणी कडून ते आजीला आधीच समजलं असतं. शेजारणीचा मुलगा सईद लामियाचा मित्र. रात्री बीबी आणि लामिया केकला काय काय साहित्य लागणार, याची यादी करतात मैदा, साखर, बेकिंग पावडर इत्यादी. लामियाच्या वडिलांची आठवण म्हणून ठेवलेलं एक घड्याळ आणि अशाच काही जुन्या वस्तू झोळीत घेऊन लामिया, बीबी आणि हिंदी, लामियाचा कोंबडा दुसऱ्या दिवशी शहरात जायला निघतात. शहरात गेल्यावर बीबी काही जुन्या वस्तू विकून एक छान ड्रेस लामियाला घेऊन देते. मग ती तिला एका जुन्या ओळखीच्या संपन्न घरात घेऊन येते. ती म्हणते, ” मी आता म्हातारी झाली आहे. तुझं शिक्षण, खाणं- पिणं मला आता झेपणार नाही. तू आता यांच्यासोबत रहा. लामियाचा चेहरा कावरा -बावरा होतो.

“बीबी, तू माझ्यावर रागावली का? मी सगळं करेन. कपडे धुवेन. भांडी घासेन. तू म्हणशील ते ऐकेन. मला तू इथे नको राहायला सांगू. मी तुझ्याबरोबर येईन. तू केक साठी माझ्यावर रागावली आहेस का? ” बीबी काही उत्तर देईना. संधी साधून लामिया पळाली. तिला बिचारीला वाटलं की केक साठी बीबी आपल्यावर रागावलेली आहे. मी केकचं साहित्य जमवलं तर बीबी आपल्याला परत घरी घेऊन जाईल. बीबी लामियाला शोधत याला त्याला विचारता विचारता पोलीस स्टेशनमध्ये येते. पोलीस तिला काही दाद देईना. तिकडे लामिया गावात भटकत राहते. योगायोगाने तिचा मित्र सईद तिला भेटतो. केकचं साहित्य जमवण्यासाठी दोन लहान मुलांची केविलवाणी धडपड. कधी चोरी करतात, कधी लोक त्यांना फसवतात, कधी कोंबडा हरवतो, कधी भांडतात, रुसतात तर कधी एकमेकांसाठी जीव ओवाळतात. हॉस्पिटलमध्ये हातपाय तुटलेले लोक जेव्हा सईदला भेटतात तेव्हा सईद त्यांना विचारतो, ” अमेरिकन बॉम्ब मुळे तुटला का तुझा हात? “

इकडे बिबीला एक भला माणूस भेटतो. अंध:कारातही कुठेतरी पणतीची मंद वाद तेवत असते, तशीच या क्रौर्याने भरलेल्या या जगात भली माणसं अधून मधून भेटत राहतात. बीबी त्या माणसाच्या मदतीने पोलीस स्टेशनमध्ये लामिया हरवल्याची तक्रार करते. तेवढ्यात सायरनचा आवाज येतो आणि बीबी खाली कोसळते. हा भला माणूस बीबीला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करतो. लामियाची शहरातली पायपीट सुरूच असते. एका दुष्ट माणसाच्या तावडीतून पळून येताना एका मिरवणुकीत ती घुसते आणि पोलीस तिला पकडतात. त्या भल्या माणसाला अखेरीस लामिया सापडते …

तो त्वरेने तिला हॉस्पिटलमध्ये आजीला भेटायला घेऊन जातो पण आजी बेडवर नसते. लामियाला भेटण्याअगोदरच बीबीचा मृत्यू झालेला असतो. बीबीचं प्रेत घेऊन दोघे परत खेड्यात येतात. बीबीला दफन केल्या जातं. आता सईदची आई लामियाला केक करायला शिकवते. या केक साठी लामियाने आजीच्या मरणाचं दुःख झेललं असतं. अनेक हालअपेष्टा सोसून जमा केलेलं ते केकचे साहित्य. अखेर तो वाढदिवसाचा दिवस येतो. सद्दामचा जयजयकार होतो. शिक्षक लामियाचा केक, इतर मुलांनी आणलेली फळं टेबलवर मांडून ठेवतात. केकचा एक घास खाऊन बघतात आणि लामियाचं कौतुक करतात. डोळ्यात अश्रू आणि दुःखी चेहऱ्याने लामिया ते सगळं बघत असते. इतक्यात सायरनचा आवाज येतो, पाठोपाठ बॉम्ब पडल्याचा आवाज. सगळी मुले बेंच खाली लपतात. लामिया आणि तिचा मित्र एकमेकांकडे बघत बेंच खाली लपलेले असतात. तेवढ्यात आणखी मोठा आवाज येतो. बॉम्ब तिच्या वर्गावरही पडतो. अर्धा वर्ग उद्ध्वस्त होतो. एका क्षणात नाहीसे होतात- शिक्षक, वर्गातली मुलं आणि लामियाने आणलेला केकही. लामिया आणि तिचा मित्र अश्रूपूर्ण नजरेने एकमेकांकडे बघत असतात आणि याच वेळी कुठेतरी आनंदी म्युझिक सुरू असतं. सद्दाम हुसेनच्या राजवाड्यात वाढदिवसाचा भव्य कार्यक्रम आयोजित केलेला असतो. छतापर्यंत मोठा केक. दिव्यांचा झगमगाट. पदार्थांची रेलचेल…. सत्तेची राक्षसी महत्त्वाकांक्षा, क्रौर्य आणि हिंसेतून मिळालेला बीभत्स आनंदोत्सव.

ही कथा आहे, “The president’s cake, ” या सिनेमाची.

आजही जगात हजारो निरागस मुलं अनाथ होतात, हजारो बेघर होतात, हजारो भूकबळी पडतात. युद्ध काही संपत नाही. सत्तेची न संपणारी राक्षसी आकांक्षा, मत्सर, क्रौर्य, विवेक बुद्धीचा अभाव यातील प्रत्येक गोष्ट विनाशकारी ठरते आणि या सगळ्या एकत्रित आल्या तर काय होणार?

ऐश्वर्यमीर्ष्या नैर्घृण्यं क्षीबत्वं निर्विवेकता|

एकैकं किं न यत् कुर्यात् पञ्चाङ्गित्वे तु का कथा ॥

 

© डॉ. तेजस्विनी वाळिंबे

(नेत्रतज्ञ)

 (एक डॅाक्टरची आई)

पुणे मो. ८८८८८३१९०५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वृद्धत्व :: एक गाळण्याची प्रक्रिया.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ वृद्धत्व :: एक गाळण्याची प्रक्रिया.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

दक्षिण भारतात ६०, ७०, ८०, ९० आणि १०० व्या वर्षाचे वाढदिवस साजरे करण्याची परंपरा आहे, याचे कारण:

आपण ६०, ७०, ८०, ९० आणि १०० ही वर्षे इतक्या थाटामाटात का साजरी करतो? या आकड्यांमागे काही *आध्यात्मिक* अर्थ आहे की या केवळ सांस्कृतिक परंपरा आहेत?

याचे उत्तर महाभारतातील एका प्रभावी कथेत दडलेले आहे—राजा ययातीची कथा.

राजा ययातीचे आयुष्य ऐश्वर्य, सुख आणि यशाने परिपूर्ण होते. पण जेव्हा अचानक वृद्धत्व आले, तेव्हा तो आतून हादरला. सखोल चिंतनानंतर त्याला एक गहन सत्य उमजले:

सुखाला मर्यादा आहेत, पण इच्छेला कधीच अंत नसतो. “

या एका जाणीवेने त्याचे आयुष्य बदलले. त्याने वृद्धत्वाचा स्वीकार केला आणि स्पष्ट केले की मानवी आयुष्यात पाच आंतरिक वळणे असतात—जी वयावर नाही, तर समजूतदारपणावर आधारित असतात.

विशेष म्हणजे, ही पाच वळणे भारतीय परंपरेतील ६०, ७०, ८०, ९० आणि १०० वर्षांच्या टप्प्यांशी तंतोतंत जुळतात. चला तर मग, हे टप्पे सोप्या भाषेत समजून घेऊया.

६० वर्षे – षष्टी:

मन साठवण्याकडून समजून घेण्याकडे वळते.

वयाच्या ६० व्या वर्षी शरीरात नाही, तर प्राधान्यक्रमात बदल होतो. “मला अजून किती मिळू शकेल? ” हा प्रश्न हळूहळू मावळतो आणि “आता खरंच महत्त्वाचं काय आहे? ” हा प्रश्न त्याची जागा घेतो.

येथे आत्मचिंतन सुरू होते. आता गोंगाट, टाळ्या किंवा इतरांकडून मिळणाऱ्या मान्यतेची गरज उरत नाही. आता ओढ असते ती केवळ स्पष्टतेची. हा ऱ्हास नाही—तर महत्त्वाकांक्षेला मिळालेली परिपक्वतेची जोड आहे.

७० वर्षे – भीमरथ शांती:

स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा शांतता अधिक शक्तिशाली वाटते.

चाळीशी आणि पन्नाशीमध्ये आपण जगाला आपले म्हणणे पटवून देण्यात वेळ घालवतो. ७० व्या वर्षी एक शांत बदल घडतो. तुम्ही आता लगेच प्रतिक्रिया देत नाही. वादांचे आकर्षण संपते. *वाद जिंकण्यापेक्षा नाते टिकवणे जास्त महत्त्वाचे वाटते. *

एक जाणीव प्रबळ होते: “बरोबर असण्यापेक्षा शांत असणे जास्त मौल्यवान आहे. ” म्हणूनच ७० वे वर्ष साजरे केले जाते.

८० वर्षे – सहस्रचंद्रदर्शन / शताभिषेकम:

तुमचे अस्तित्वच एक उपचार बनते.

८० व्या वर्षी लोक तुमच्याकडे केवळ सल्ल्यासाठी येत नाहीत. ते काहीतरी सखोल शोधत येतात—एक असा विश्वास की, “आयुष्य जगता येते, पचवता येते आणि समजून घेता येते. “

या वयात तुमचे अस्तित्वच एक आशीर्वाद बनते.  शब्दांची गरज उरत नाही. तुमचे असणेच सांगून जाते: “सगळं काही ठीक होतं. आयुष्य आपला मार्ग शोधून घेतं. ” म्हणूनच ८० वे वर्ष पवित्र मानले जाते.

९० वर्षे – नवती:

अहंकार हळूच निवृत्त होतो.

९० व्या वर्षी काहीतरी दुर्मिळ घडते. *तुम्हाला आता लोकांना सुधारण्याची इच्छा होत नाही. * तुम्ही तुमच्या मतांना चिकटून राहत नाही. गोष्टी वैयक्तिक रित्या घेतल्या जात नाहीत. तुमचे मन सहजासहजी दुखावले जात नाही.

हे अशक्तपणामुळे घडत नाही—तर आयुष्याने तुम्हाला आतापर्यंत पुरेसे दाखवलेले असते. *क्षुल्लक गोष्टी आता तुमची ऊर्जा खर्च करण्यास पात्र नसतात. * एक सात्त्विक शांतता मनात स्थिरावते. ही नम्रताच खरी आध्यात्मिकता आहे.

१०० वर्षे – शतमानम्:

आयुष्य वैयक्तिक कहाण्यांच्या पलीकडे जाते.

१०० व्या वर्षी पोहोचणे म्हणजे केवळ वर्षांची संख्या गाठणे नव्हे. ही अशी अवस्था आहे जिथे आयुष्याचे व्यापक चित्र स्पष्ट दिसू लागते.

तुम्हाला जाणवते की तुम्ही वाहिलेल्या अनेक चिंता अनावश्यक होत्या. तुम्ही दिलेले प्रेम हेच खरोखर महत्त्वाचे होते. आणि हे आयुष्य नेहमीच एका अनामिक, दयाळू शक्तीने सावरून धरलेले होते. १०० व्या वर्षी व्यक्ती एक ‘व्यक्ती’ उरत नाही, तर ती एक दैवी ‘अस्तित्व’ बनते.

सार:

आपल्या ऋषीमुनींनी केवळ वयाचा उत्सव साजरा केला नाही. त्यांनी वयासोबत येणाऱ्या आंतरिक परिवर्तनाचा उत्सव साजरा केला.

  • ६० – प्राधान्यक्रम बदलतात.
  • ७० – शांतता हीच ताकद बनते.
  • ८० – अस्तित्व हेच औषध/उपचार बनते.
  • ९० – अहंकार शांतपणे विरघळतो.
  • १०० – आयुष्य पूर्णत्वास जाते.

वृद्धत्व म्हणजे झिजणे नव्हे.  वृद्धत्व ही एक गाळण्याची प्रक्रिया आहे—ज्यातून केवळ शहाणपण, सौम्यता आणि कृपा शिल्लक राहते.

अर्थात – – 

वयाने मोठे होणे म्हणजे आयुष्य अधिक शुद्ध, सुज्ञ आणि सौम्य होणे होय. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ मैत्रिणींचं माहेरपण… – लेखिका : अर्चना अनंत ☆ प्रस्तुती –  सुचिता पंडित ☆

सुचिता पंडित

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मैत्रिणींचं माहेरपण… – लेखिका : अर्चना अनंत ☆ प्रस्तुती –  सुचिता पंडित 

​शरयू मोबाईल हातात घेऊन शांतपणे बसली होती. सकाळपासून व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर एकामागून एक स्टेटस दिसत होते.

​”अधिक मासाचं वाण मिळालं…”

“माहेरहून ओटी आली…”

“भावाने खास बोलावलं…”

​कुठे लेकींचे फोटो, कुठे माहेरच्या अंगणात काढलेले क्षण, तर कुठे आईच्या हातचा स्वयंपाक.

​स्टेटस पाहताना शरयूच्या ओठांवर हलकंसं हसू आलं, पण मनात कुठेतरी एक हुरहूर दाटून आली.

​”आपलं असं कौतुक कधी झालंच नाही…” ती स्वतःशीच पुटपुटली. 

​खिडकीतून बाहेर नजर गेली. समोरच्या झाडावर पक्षी किलबिल करत होते. घरात सगळं सुरळीत होतं. संसार, मुलं, जबाबदाऱ्या… काहीच कमी नव्हतं.

​तरीही मनाच्या एखाद्या कोपऱ्यात माहेर नावाचा एक नाजूक धागा अजूनही जिवंत होता.

​तेवढ्यात मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं — माधवी.

​”हॅलो, काय करतेस गं?” माधवीने विचारलं.

​”काही नाही गं. हे अधिक मासाचे स्टेटस बघत होते.”

​माधवी हलकंसं हसली, “माझंही तेच चाललंय. आई-बाबा होते तोपर्यंत थोडंफार तरी अधिक मासाचं कौतुक व्हायचं. आता तर माहेरच संपलं म्हण ना!”

​क्षणभर दोघीही शांत झाल्या.

​”अगं, आपण आता पन्नाशी पार केलीये. कुठे अशा अपेक्षा ठेवायच्या आता?” शरयू म्हणाली.

​”अपेक्षा नाही गं…” माधवीचा आवाज किंचित भरून आला, “पण कधीतरी वाटतं ना… कुणीतरी हक्काने म्हणावं, ‘ये गं माहेरी.’ भाऊ आहे, वहिनी आहेत. त्यांचा संसार, त्यांची मुलं, त्यांच्या जबाबदाऱ्या… तेही त्यांच्या जागी चुकीचे नाहीत. पण मनातली माहेराची ओढ कधी संपत नाही गं!”

​शरयूच्या मनातलं जणू माधवीच बोलत होती. फोन ठेवला, पण दोघींच्या मनातले विचार थांबत नव्हते.

​शरयूने लगेच त्यांच्या मैत्रिणींच्या ग्रुपवर एक मेसेज टाकला — “सांगा बरं, तुमचं माहेरपण अजून टिकून आहे का?”

​काहीच क्षणांत उत्तरांचा पाऊस सुरू झाला…

​”माझा तर भाऊच नाही…”

“आई गेल्यापासून माहेरी जाण्याचं कारणच उरलं नाही…”

“भाऊ आहे, पण आता पूर्वीसारखं काही राहिलं नाही गं…”

“माहेर आहे, पण तिथे आता माहेरपण नाही…”

​एकामागून एक मेसेज वाचताना शरयूच्या लक्षात आलं की, ग्रुपमधली एकही मैत्रीण अशी नव्हती, जिला अजूनही जुन्यासारखं हक्काचं माहेर लाभलं होतं.

​त्या रात्री शरयूने माधवीला पुन्हा फोन केला.

​”ऐक, एक कल्पना आहे.”

​”काय?”

​”आपणच आपल्या मैत्रिणींचं माहेरपण जपायचं!”

​क्षणभर पलीकडून शांतता पसरली. “म्हणजे? काय म्हणायचंय तुला?” माधवीने विचारलं.

​”अधिक मासानिमित्त सगळ्या मैत्रिणींना घरी बोलवू. पण अगदी सरप्राइज! कुणालाच काही सांगायचं नाही. प्रत्येकीची ओटी भरायची, छोटंसं गिफ्ट द्यायचं आणि एक दिवस त्यांना पुन्हा माहेरची लाडकी लेक असल्याचा अनुभव द्यायचा.”

​माधवी काही क्षण गप्प राहिली. मग तिचा भरून आलेला आवाज ऐकू आला, “शरयू… ही फक्त कल्पना नाही गं… ही तर एक सुंदर भावना आहे!”

​पुढचे काही दिवस दोघींची अक्षरशः धावपळ सुरू झाली. स्वयंपाकाचा बेत त्यांनी स्वतः ठरवला. आंब्याचा रस, मऊसुत पुरणपोळी आणि सगळ्यांचे आवडीचे पदार्थ… सोबतीला ओटीचं सामान, भेटवस्तू, सजावट… सगळं काही दोघींनी मिळून केलं.

​पण तयारी करताना त्यांच्या मनात अनेक शंका आणि प्रश्नही येत होते.

​”उगीच तर नाही ना करत आपण हे सगळं?”

“लोकांना आवडेल का?”

“कोणी याला नाटक तर म्हणणार नाही ना?”

“या वयात अशा गोष्टींनी कोण भावूक होतं?”

​पण प्रत्येक वेळी त्यांच्या मनातून एकच उत्तर यायचं — “जर यामुळे कुणाच्या चेहऱ्यावर घटकेचा आनंद मिळणार असेल, तर हे जरूर करायचं!”

​ठरलेल्या दिवशी घर फुलांनी सजलं होतं. दारात सुंदर रांगोळी काढली होती. स्वयंपाकघरातून रसाचा आणि पुरणपोळीचा सुगंध दरवळत होता.

​एकामागून एक मैत्रिणी येऊ लागल्या. सगळ्यांना वाटलं होतं की, हा नेहमीसारखाच एखादा गेट-टुगेदर असेल. गप्पा, जेवण आणि जुन्या आठवणी. हशा, टाळ्या, कॉलेजचे दिवस, लग्नानंतरचे किस्से… घर आनंदाने आणि किलबिलाटाने भरून गेलं होतं.

​आणि मग अचानक शरयूने घोषणा केली, “आजचा कार्यक्रम इथेच संपत नाहीये…”

​सगळ्या मैत्रिणी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागल्या.

​त्यानंतर एकेक मैत्रीण पाटावर बसू लागली. तिची प्रेमाने ओटी भरली जाऊ लागली, हातात सुंदर भेटवस्तू दिली गेली. आणि शरयू-माधवी दोघीही प्रत्येकीला एकच वाक्य सांगत होत्या — “आज तू आमच्या माहेरची लेक आहेस!”

​ते वाक्य ऐकताच अनेकांच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. कित्येक वर्षांनी कुणीतरी त्यांना ‘लेक’ म्हणून जपलं होतं. कित्येक वर्षांनी कुणीतरी त्यांच्या मनातल्या त्या रिकाम्या कोपऱ्यावर मायेचा हात ठेवला होता.

​पण अजून एक भावूक क्षण बाकी होता…

​ग्रुपमधली एक मैत्रीण, जिला सगळ्या जणी हक्काने “झाशीची राणी” म्हणायच्या. स्वभावाने अत्यंत कणखर, निर्भीड, कधीच न रडणारी आणि वेळ प्रसंगी सगळ्यांना आधार देणारी.

​तिची ओटी भरून झाल्यावर ती काही क्षण शांत उभी राहिली. अचानक ती शरयूच्या जवळ आली आणि पुढच्याच क्षणी तिच्या गळ्यात पडून  रडू लागली… अगदी एखाद्या लहान मुलीसारखी! तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते.

​भरून आलेल्या आवाजात ती म्हणाली, “अगं शरयू… माझ्यासाठीही कुणी असं काही करू शकतं, असं मला कधी वाटलंच नव्हतं गं!” ती थोडी थांबली आणि पुढे म्हणाली, “आई-वडील जिवंत होते, तेव्हाही माझं असं कौतुक कधी झालं नाही… आज पहिल्यांदाच वाटतंय, मी सुद्धा कुणाची तरी लाडकी लेक आहे!”

​क्षणभर घरात पूर्ण शांतता पसरली. कोणाच्याही डोळ्यांतलं पाणी लपून राहिलं नाही.

​शरयू आणि माधवी एकमेकींकडे पाहत होत्या. त्यांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू होते. कारण त्या एका वाक्याने त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली होती.

​”आपण उगीच तर नाही ना केलं?”, “लोक काय म्हणतील?”, “कुणाला आवडेल का?” — या सगळ्या शंकांना त्या एका भावनिक क्षणाने पूर्णविराम दिला होता.

​त्यांना जाणवलं की, आपण काहीच चुकीचं केलं नाही. आपण फक्त काही रिकाम्या झालेल्या मनांना मायेचा ओलावा दिला, काही हरवलेल्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आणि काही स्त्रियांना पुन्हा एकदा “लेक” असल्याची जाणीव करून दिली.

​त्या दिवशी गिफ्टची किंमत महत्त्वाची नव्हती, की ओटीत काय होतं याला अर्थ नव्हता. महत्त्व होतं ते फक्त त्या शुद्ध भावनेला, त्या मायेला आणि त्या आपलेपणाला!

​कारण स्त्री कितीही मोठी झाली, कितीही कणखर झाली, तिने कितीही जबाबदाऱ्या पेलल्या… तरी तिच्या मनात एक छोटीशी मुलगी कायम जिवंत असते, जिला कधीतरी हक्काने माहेरी जायचं असतं.

 

​आणि त्या दिवशी शरयू आणि माधवीने त्या सगळ्या मुलींना पुन्हा एकदा त्यांचं हक्काचं माहेर मिळवून दिलं होतं.

​खरंच… माहेर हे फक्त एक विटांचं घर नसतं, माहेर ही एक निखळ भावना असते. आणि त्या दिवशी त्या सगळ्या मैत्रिणींना त्यांचं हरवलेलं माहेर पुन्हा सापडलं होतं… मैत्रीच्या रूपाने!

 

@ अर्चना अनंत

 

माझं मनोगत…

ही कथा काल्पनिक नाही. यातला भावनिक अनुभव आम्ही मैत्रिणींनी प्रत्यक्ष जगला आहे. अधिक मासानिमित्त आम्ही सगळ्या मैत्रिणींना एकत्र बोलावलं, त्यांची ओटी भरली, त्यांचं कौतुक केलं आणि त्यांना पुन्हा एकदा “लेक” असल्याची जाणीव करून देण्याचा छोटासा प्रयत्न केला. त्या क्षणी अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते आणि मन भरून आलं होतं.

पण या निमित्ताने माझ्या स्वतःच्या मनातही काही विचार आले.

आम्ही चार बहिणी. वडील आमच्या लहानपणीच गेले. आर्थिक परिस्थिती जेमतेम  . त्यामुळे वाण, औक्षण, भेटवस्तू किंवा अशा प्रकारचं विशेष कौतुक आमच्या वाट्याला फारसं आलं नाही. पण त्याबद्दल मला कधीच वाईट वाटलं नाही. कारण माझ्या आईने आम्हाला जे भरभरून प्रेम दिलं, ज्या ताकदीने उभं केलं आणि प्रत्येक अडीअडचणीत जी साथ दिली, त्याची किंमत कोणत्याही भेटवस्तूपेक्षा खूप मोठी होती.

आज आई नाही. तिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कुणीही भरून काढू शकत नाही. कितीही मोठं गिफ्ट मिळालं, कितीही प्रेमाने औक्षण झालं, तरी आईच्या मायेची सर त्याला येऊ शकत नाही.

मला वाटतं, अशा भेटीगाठी, असे उपक्रम आणि अशा प्रेमाच्या क्षणांमुळे मनाला आधार मिळतो, जुन्या जखमांवर मायेची फुंकर बसते. पण खरं माहेर आपण आपल्या आठवणींत जपून ठेवलेलं असतं. आई-वडिलांचं प्रेम, त्यांचे संस्कार, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण हेच आयुष्यभर आपली खरी संपत्ती असते.

आपली माणसं आपल्यापासून दूर जातात, पण त्यांचं प्रेम कधीच दूर जात नाही. ते आपल्या प्रत्येक आठवणीत, प्रत्येक यशात आणि प्रत्येक संघर्षात आपल्यासोबत असतं. म्हणूनच मला वाटतं, माहेर फक्त एका घरात नसतं; ते आपल्या मनात, आपल्या स्मृतीत आणि आपल्या जपलेल्या प्रेमात कायम जिवंत असतं.

लेखिका:  अर्चना अनंत

प्रस्तुती: सुचिता पंडित

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अश्रु ढाळले किती… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ अश्रु ढाळले किती… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

☆ अश्रु ढाळले किती  ☆

तुला न जाणिव स्मृतीत तुझिया अश्रु ढाळले किती

भान विसरले सुन्न जाहले रडले मी एकांती ||ध्रु||

*

पुष्प बहरल्या उपवनातुनी लपेटून गंध

भृंग-कळ्यांना खिजवित दावून अपुली प्रीत धुंद

उरात जपुनी धुंद आठवणी दिवस कंठले किती

अश्रु ढाळले किती ||१||

*

तरूतळी संध्यालाली पसरे मृद्गंधाची साथ

आणा भाका कितीक शपथा हाती होते हात

आता अंधुक सांजेपाठी काजळलेल्या राती

अश्रु ढाळले किती ||२||

*

प्रेम आपुले शोभतसे ते मनिच्या क्षितिजावरती

सौंदर्याची केवळ पखरण काही नाही हाती

जीवन झाले आता मृगजळ उगीच आशा होती

 अश्रु ढाळले किती ||३||

*

तुझ्याचसाठी जीवन जगणे जपले स्वप्न उरी

तुझ्याविना हा काळ कंठला मुग्ध राहुनी जरी

कवटाळुनिया मरण उराशी जगत राहिले अति

अश्रु ढाळले किती ||४||


©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.

रसग्रहण: अश्रु ढाळले किती

माणसाचे आयुष्य म्हणजे केवळ वय वाढणे नक्कीच नाही. नानाविध भावनांची अनुभूती व त्यांचा अविष्कार जीवनात होत असतो.. या भावनांचे प्रकटीकरण करणे, त्यांचे विवरण यथार्थ शब्दातून मांडणे ही आंतरीक भावना सर्वांना असते. कवी मनाच्या लोकांना तर ती नेहमीच खुणावते.. अर्थात काही वेळा हे असे अनुभव कवीचे स्वतःचे ही असूच शकतात.. भावनांना शब्दांचे साज देऊन कवी कविता रुपात ही अनुभूती काव्यरसिकांसमोर सादर करतो. यथार्थ, अर्थवाही, अर्थपूर्ण काव्यरचना करताना कवी त्याच्याकडील शब्दभांडार कवितेच्या रूपावर उधळून देतो. कवितेचे हे शृंगारलेले रूप पाहून, वाचून वाचक /रसिक सहजपणे मोहित होतो. भावनेची प्रांजलता आणि तिचे हे साजिरे रूप घेऊन आलेली, मनावर गारुड करणारी अशीच एक भावकविता वाचण्यात आली. कवी आहेत डॉक्टर निशिकांत श्रोत्री… त्यांच्या निशिगंध या काव्यसंग्रहातील हे भावगीत. आज या कवितेचा आस्वाद घेऊ या.

 “अश्रु ढाळले किती” या शीर्षकावरून या कवितेत विरह /दुःख भावनांचा आविष्कार असणार हे रसिक वाचकांच्या लक्षात येतेच. यथार्थ व अर्थपूर्ण काव्यशीर्षकामुळे वाचकांच्या मनात मनोज्ञ भावनेचे शब्दचित्र नक्कीच तयार होते. या जाणिवेला अतिशय उच्च स्तरावर नेणारी आणि तितकीच भावगर्भितता देणारी ही कविता. काव्यशीर्षकातून उमगलेल्या भाववृत्तीचे अतिशय सुंदर शब्दचित्रण या कवितेत केलेले दिसते.

सर्वप्रथम या ठिकाणी मुद्दाम नमूद करावेसे वाटते की ही संपूर्ण कविता “तिच्या” भावनेशी निगडित आहे. तिच्या अंतरंगातून उमटलेल्या आवाजांचा नाद आहे. कवी पुरुष असूनही त्यांनी या स्त्रीच्या भावनेला पूर्णपणे न्याय देऊन त्या प्रकारची शब्दयोजना आणि भाव या कवितेतून व्यक्त केले आहेत. त्यासाठी लागणारे तरल मन कवीपाशी असल्यामुळेच हे शक्य झाले आहे हे निश्चित…

 

तुला न जाणिव स्मृतीत तुझिया अश्रु ढाळले किती

भान विसरले सुन्न जाहले रडले मी एकांती ||ध्रु||

 

कवितेतील “ती” परिस्थितीवश एकांत भोगते आहे खरं तर एकटी पडली आहे हे म्हणणे योग्य ठरेल. कारण हा एकांत तिच्या दृष्टीने अजिबात सुखावह नाही. तिला अतीव प्रिय असलेल्या प्रियकराचा शाश्वत विरह घडवून नियतीने हा तिच्यावर लादलेला आहे. साहजिकच या नकोनकोशा एकांतात ती स्वतःबरोबरच आजूबाजूच्या लोकांचे ही भान विसरली आहे. “भान हरपणे” न म्हणता “भान विसरले” अशी शब्दयोजना केल्याने कवीचे साहित्यिक भान लक्षात येते. दुःखामध्ये सर्व गोष्टींचा विसर पडतो हे लक्षात घेऊन अशी सुयोग्य शब्दरचना केली आहे. विरहाचा दुःखद धक्का प्राक्तनाने जीवनात तिला दिला आहे. अशा परिस्थितीत अटळ सत्याचे भान ती विसरली आहे हे गर्भित अर्थाने सूचित केले आहे. वरवर साधा सोपा सरळ अर्थ वाटतो पण कवीने सहजपणे गहन अर्थ यातून व्यक्त केला आहे. या सहेतुकपणामुळे कवितेतील तिच्या भावावस्थेकडे प्रकर्षाने लक्ष जाते. ती सुन्न, बधिर होवून जाणिवेच्याही पलीकडे गेलेली आहे. एकांतात ती केवळ रडली आहे. त्याच्या नसण्याने त्याच्या स्मृती तिच्या मनात प्रकर्षाने उचंबळून येतात. आपसूकच तिने अश्रू ढाळले आहेत. “किती” या शब्दांतून अगणित, गणना करता न येणारे हा सूचक भावार्थ अपेक्षित आहे. तिच्या या जाणिवेची त्याला जाणीव नसणारच कारण तो या “अशा” भावनिक जाणीवेच्या पलीकडे गेलेला आहे. ही जाणीव आता त्याला कधीच जाणवणार नाहीये. अतिशय सहजपणे साध्या, सोप्या शब्दांतून मृत्यूचे अटळ सत्य उलगडले आहे. मोजक्या व यथार्थ शब्दातून तिच्या भावनेचा स्तर आणि तीव्रता या ध्रुवपदातून लक्षात येते. अन् म्हणूनच सहजपणे वाचक तिच्या भावनांशी नकळतच जोडला जातो.

 

पुष्प बहरल्या उपवनातुनी लपेटून गंध

भृंग-कळ्यांना खिजवित दावून अपुली प्रीत धुंद

उरात जपुनी धुंद आठवणी दिवस कंठले किती//१//

 

सुमनविकसित उपवनात गंधांची उधळण झालेली असणार हे गृहीत आहे. येथे पुष्पबहर म्हणजे प्रीतीचा बहर. प्रेमाच्या उपवनी प्रीतपुष्पे बहरली.. त्यांचा

गंधदरवळ तनामनावर/तनामनाशी लपेटून घेतला. “लपेटून”शब्द फारच सुंदर व सुयोग्य.. भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेला व काळजाजवळ असलेला गंध.. लपेटून हा अर्थपूर्ण व अर्थवाही शब्द यासाठी वापरला आहे. विकसित फुलांवर रुंजी घालणारे भुंगे तसेच इतर

अविकसित, अजून न फुललेल्या कळ्या यांना आपल्या धुंद प्रीतीचे प्रदर्शन करुन या युगुलाने खिजवले आहे. इथे भुंगे म्हणजे इतरेतर जे प्रीतीचा गंध व अनुभव घेत आहेत. त्यांच्यापेक्षा आपली प्रीती उच्च दर्जाची तसेच अधिक गहिरी आहे हे जाणवून दिले आहे. कळ्यांचा संदर्भ ज्यांनी अजून प्रेमाचा अनुभव घेतला नाही त्यांच्याशी आहे. “खिजवित” या शब्दातून स्वतःच्या गहिऱ्या प्रेमाचे जाणूनबुजून प्रदर्शन केले हा भाव व्यक्त केला आहे.

या कडव्यात अतिशय कल्पकतेने रूपक, चेतनागुणोक्ती तसेच अतिशयोक्ती अलंकारांचा वापर करून कवीने प्रेमाचा अनोखा स्तर वर्णिला आहे. अशा या धुंद प्रीतिच्या धुंद आठवणी मनात नव्हे तर उरात जपून तिने कितीतरी (अनेक असा अर्थ)दिवस कंठले आहेत.. “उरात”शब्दातून आत्यंतिक जवळ हा अर्थ लक्षात येतो. “कंठणे”म्हणून नाईलाजास्तव ती जगत आहे याकडे निर्देश केला आहे. पहिल्या दोन चरणातले यमक व तिसऱ्या चरणाचे ध्रुवपदाशी साधलेले यमक सहज सुंदर… साहजिकच कवितेला मोहक लय व गेयता लाभली आहे.

 

तरूतळी संध्यालाली पसरे मृद्गंधाची साथ

आणा भाका कितीक शपथा हाती होते हात

आता अंधुक सांजेपाठी काजळलेल्या राती

अश्रु ढाळले किती ||२||

समय /काळ सरत राहिला. सांजवेळ सामोरी आली. अशावेळी झाडाच्या मुळात/अंतरंगात संध्येची लाली पसरते. अन् कातरवेळी कातर झालेल्या काळजाला जणू काही फक्त ओलावलेले डोळे साथ व साद देतात, घालतात. हे वाहणारे अश्रूं जमिनीवर पडून त्याचा गंध (मृद्गंध) मनाला साथ देतो. झाडाची मुळे जशी जमिनीत खोलवर जातात तसेच तिच्या ही मनात प्रीत खोलवर रूजलेली आहे. येथे तरू म्हणजे ती व संध्या म्हणजे वाढलेले वय/आयु… तसेच केवळ त्याच्या आठवणीने तिच्या गाली लाली पसरली असा अजून एक अर्थ.. माणूस अंतिमतः मातीत मिसळतो हे सत्य नाकारता येत नाही. तो गंध तिला साद घालतो आहे असा ही भावार्थ… अतिशय सुंदर रूपक… कवितेतील भावनेला अधिक अर्थ देणारे.. तिला अशा वेळी मनात जाग्या असलेल्या, कधी काळी घेतलेल्या साऱ्या आणाभाका, शपथा पुन्हा एकदा आठवतात. तेव्हा एकमेकांचे हात हातात होते… एकमेकांना एकमेकांची साथ होती, संगत, सोबत होती. आता मात्र अंधुक सांजेपाठी अटळपणे येणाऱ्या काजळलेल्या, काळोख्या रात्री नजरेतून, काळजातून व्यक्त होत आहेत. त्याच्या नसण्याने तिचे आयुष्य अंध:कारमय झाले आहे. प्रीतिचा अस्त म्हणजे रात्र झाली आहे.

 

प्रेम आपुले शोभतसे ते मनिच्या क्षितिजावरती

सौंदर्याची केवळ पखरण काही नाही हाती

जीवन झाले आता मृगजळ उगीच आशा होती

 अश्रु ढाळले किती ||३||

 

या साऱ्या सुखद व दु:खद आठवात तिला प्रकर्षाने जाणवते की त्यांचे हे प्रेम तिच्या मनाच्या क्षितिजावरती शोभून दिसते आहे. अर्थात क्षितिजाप्रमाणे आता ते भासमान व दूरवर आहे. थोडक्यात तिला वास्तवाची जाणीव ही आहे. या रम्य आठवणी आता केवळ मनात जाग्या आहेत. प्रीतिच्या सौंदर्याची काल्पनिक पखरण फक्त हृदयात व हृदयातून आहे. यातले काहीच आता पुन्हा प्रत्यक्षात घडणार नाही. “काही नाही हाती”यातून हातात हात नाहीत, सोबत उरली नाही. शब्दशः हातात हात नाहीत हे जाणवून दिले आहे. तसेच “हाती न लागणे”म्हणजे न गवसणे.. श्लेष फारच छान… प्रीतभावनेने समृद्ध झालेले भावविश्व आता काळाआड गेले आहे.

जीवन हेच मृगजळाप्रमाणे भासमान झाले आहे. त्याच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची भावना खरी नाही हे तृषार्त मनाला जाणवले आहे. मृगजळाची आशा जशी खोटी असते तशीच आशा आता जीवनाविषयी वाटते आहे. जीवन या शब्दावरील श्लेषही अत्यंत समर्पक. जीवन म्हणजे पाणी व आयुष्य. तिच्या जीवनाला लागलेली प्रेमाची तहान कधीच भागणार नाही हे सत्य तिच्या मनाने स्वीकारले आहे.

 

तुझ्याचसाठी जीवन जगणे जपले स्वप्न उरी

तुझ्याविना हा काळ कंठला मुग्ध राहुनी जरी

कवटाळुनिया मरण उराशी जगत राहिले अति

अश्रु ढाळले किती ||४||

 

त्याच्या अनुपस्थितीत केवळ त्याच्याचसाठी जीवन जगणे हे स्वप्न तिने उरात बाळगले होते. तुझ्याचसाठी मधील “च” भावनेची सत्यता व तीव्रता जाणवून देणारा. तिला स्वतःला जीवनाविषयी कुठल्याही प्रकारची आस राहिलेली नाही. केवळ त्याच्यासाठी जगणे हाच तिच्या जीवनाचा उद्देश होता, ते तिचे स्वप्न होते. ते तिने प्रामाणिकपणे उरात जपले. त्याच्याशिवाय जगताना हा सर्वकाळ तिने मुग्ध राहून, अबोल राहून कंठला. मुग्ध

शब्दातून एखाद्या कळी प्रमाणे ती विकसित न होता जगली. नाईलाजाने जगताना जाणीवपूर्वक मुग्धता राखली. परंतु हा काळ बिलकुल सोपा नव्हता. मरणाला उराशी कंटाळून ती जगत होती. “अति”, या शब्दातून तिला नकोसे असताना व तिला वाटणाऱ्या गरजेपेक्षाही जास्त ती जगली अशी तिची भावना जाणवते. अर्थात त्याच्या शिवाय जगताना सारे आयुष्य “अति” झाले, जास्त झाले. एखादी गोष्ट नको असताना जेव्हा प्रमाणाबाहेर घडते तेव्हा हे “अति झाले” असे आपण म्हणतो.

“जीवन जगणे जपले”, “काळ कंठला” यातील अनुप्रास, पहिल्या दोन चरणातील यमक व शेवटच्या चरणातील ध्रुवपदाशी साधलेले यमक सहज व अर्थपूर्ण वाटते.

 

मनातल्या प्रांजल प्रीतीच्या प्रांजळ भावनेला व आपल्या प्रियकर / पतीच्या शिवाय जगताना जाणवलेल्या अंतरीच्या अनुभूतीला अतिशय काव्यात्मतेने, विविध साहित्यालंकारांनी नटवून या कवितेत प्रस्तुत केले आहे. नैसर्गिक भावनेतील खरेपणा जपून तो लयबद्ध पद्धतीने व्यक्त केला आहे. ही कविता सूर्यकांत या मात्रावृत्तात रचली आहे. काव्यवाचकांना हृदयाला थेट भिडणारे हे सुंदर भावगीत नक्कीच आवडेल. कवीचे तरल मन व साहित्यिक जाणीव कौतुकास्पद.. , मनाला भुरळ घालणारी…

 

© नीलिमा खरे

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बाजार…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “बाजार…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

पैसे देऊन वस्तू व काही प्रमाणात सेवा विकत मिळण्याचं ठिकाण असंच बाजार या बद्दल सांगता येईल. पण तरीही वेगवेगळा अर्थ बाजार या शब्दात असतो. ज्या वस्तू पैसे देऊन उघडपणे मिळतात व जिथे व्यवहार सरळ, व सचोटिने होतात असे कितीतरी बाजार आहेत.

भाजी बाजार, सराफ बाजार, मासळी बाजार, धान्य बाजार, कापड बाजार, अजूनही काही प्रमाणात बर्‍याच ठिकाणी भरला जाणारा आठवडे बाजार असे नेहमीचे व सगळ्यांना माहित असणारे अनेेक बाजार आहेत. या बाजारात मिळणार्‍या वस्तूंचे भाव सगळ्यांसाठी, सगळ्यावेळी सारखेच असतात अस नाही.

पण शाळेत वर्गावर शिक्षक येण्याआधी आमचा वाढलेला गोंधळ, गोंगाट ऐकून शिक्षक आल्यावर म्हणायचे, काय बाजार भरवला आहे. याचा अर्थ बाजार म्हणजे गोंधळ, गोंगाट, आणि बेशिस्तपणा असाच असायचा.

गुरांचा बाजार पण असतो. नावावरुन या बाजाराच स्वरूप काय असेल ते लक्षात येतच. पण निवडणूक झाल्यानंतर मात्र काहीवेळा वारंवार घोडेबाजार हा शब्द वापरला जातो. तेव्हा मात्र शब्द जरी घोडेबाजार असा असला तरी तो वापरतांना त्यात घोड्याचा नाहीतर कोणाचा उल्लेख असतो हे सहज लक्षात येतं. पण तो शब्द उघडपणे वापरला जातो. आणि नकळत आपण प्राण्यांच्या रांगेत एका बुध्दीजीवी समजल्या जाणाऱ्या प्राण्याला बसवतो. एकिकडे बुध्दीमुळेच आपल्यात व प्राण्यात भेद आहेत हे सांगतो. आणि दुसरीकडे या घोडेबाजाराचा उल्लेख करत परत बुध्दीवरच शंका घेतो. एखाद्याला समजत नसेल तर त्याला गाढव म्हंणण समजून घेउ. पण…

या शिवाय ‘बाजार’ नावाचा एक चित्रपट पण काढला होता. यात काय दाखवलं होत ते सांगणार नाही, पण बाजार हा शब्द फक्त चांगल्या, किंवा फक्त वाईट गोष्टींसाठीच वापरला जातो अस नाही. तर त्यावेळी भावना कोणत्या असतात त्यावरून चांगल का वाईट हे ठरवाव लागतं. आता चोरबाजारही असतो. पण तिथे वस्तू विकत घेणारे चोरच असतात अस नाही. शेअर बाजार पण आहे. याबद्दल सांगायची गरज आहे असही नाही.

शारिरीक दुखणं, अपघात, डाॅक्टर, हाॅॅस्पिटल, ऑपरेशन या गोष्टींची देखील आता काहीप्रमाणात सवय झाली आहे. पण आता अशा ठिकाणी देखील पाॅलीसी आहे का? … अशी विचारणा पहिल्यांदा होतेच. हा विचारण्याचा हेतू वाईटच असतो अस नाही. पण काहिवेळा याचा अनुभव चांगला सुध्दा नसतो. अशा पाॅलीसी देणारे अनेक आहेत. पण यापैकी एकाचा पाॅलीसी बाजार असाच उल्लेख करतात. आणि मग खरच बाजार या शब्दाबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही विचार मनात येतातच.

या सगळ्या बाजाराचा विचार मनात आला तो सध्या सुरु असलेली सिलेंडरच्या काळ्याबाजाराच्या चर्चेवरून. वरचे सगळे बाजार हे दिसतात, खूपदा त्यांची ठिकाणही ठरलेली असतात. पण काळाबाजार हा असा बाजार आहे जो असतो, भरतो पण दिसत नाही. किंवा दिसणार नाही याचीच दक्षता या बाजारात घेतली जाते. हा प्रत्येकवेळी एकाच गोष्टीचा, एकाच ठिकाणी, एकाच वेळी नसतो. परिस्थिती आणि काळ यानुसार याची सगळी गणितं बदलतात. स्वस्त दरात पुरवठा होणारं धान्य. खतं, ज्या गोष्टी अनधिकृतपणे विकल्या जातात अशा गोष्टी. अशा सगळ्या गोष्टींचा मग काळाबाजार भरतो.

या शिवाय सिनेसृष्टीला माया बाजार अस म्हणणारे आहेत. याची पण अनेक कारणं असतील. शिवाय भंगार बाजार, कोंबडी बाजार असेही बाजार असतात. पण सगळ्या बद्दल लिहिल तर शब्दांचा बाजार भरवला अस वाटेल.

बाजार या शब्दामुळे विचारांचा बाजार भरला होता. तो थोडा थोडा कमी करतोय, बाकी काही नाही.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “१० प्रश्न…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “१० प्रश्न☆ श्री जगदीश काबरे ☆

खाली दिलेले १० प्रश्न हे माणूस रॅशनल विचार करणारा (तार्किक, विवेकवादी) आहे की नाही हे ओळखण्यासाठी तयार केलेले आहेत.

प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना खालील चार पर्याय वापरता येतील —

(अ) पूर्ण असहमत (ब) थोडा असहमत (क) थोडा सहमत (ड) पूर्ण सहमत

रॅशनल विचार ‘ ओळखण्यासाठी प्रश्नमंजुषा———

१) मी कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तिच्या मागचा पुरावा किंवा तर्क शोधतो.

२) देव, भाग्य किंवा नियती यापेक्षा मानवी प्रयत्न आणि विज्ञानावर माझा जास्त विश्वास आहे.

३) धार्मिक किंवा पारंपरिक विधी करण्यापूर्वी मी त्यामागील तर्कशुद्ध कारणांचा शोध घेतो.

४) एखादी गोष्ट बहुसंख्य लोक मानतात म्हणून ती खरी असते असे मला वाटत नाही.

५) कोणतीही श्रद्धा किंवा परंपरा जर मानवी हक्क किंवा समानतेविरुद्ध जात असेल, तर मी तिचा विरोध करतो.

६) माझ्या निर्णयांवर भावना किंवा समाजाचा दबाव नव्हे, तर तथ्ये आणि विचारांचा प्रभाव असतो.

७) भविष्य जाणणारे, वास्तुशास्त्र, राशी, ग्रहदशा यावर आधारित सल्ले मला अवैज्ञानिक वाटतात.

८) मी माझ्या विचारांना चुकीचे ठरवणारा पुरावा आल्यास मत बदलायला तयार असतो.

९) समाजात स्त्री-पुरुष समान आहेत ही भूमिका मी धर्मग्रंथांपेक्षा वैज्ञानिक आणि नैतिक दृष्टिकोनातून मान्य करतो.

१०) अंधश्रद्धा, चमत्कार किंवा तथाकथित “दैवी हस्तक्षेप” या संकल्पना मला समजून घेण्यासारख्या नव्हे तर तपासण्यासारख्या वाटतात.

– – या सगळ्या प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून स्वतःलाच द्यावयाची आहेत.

– — – वरील सगळ्या प्रश्नांना ‘पूर्ण सहमत’ हे उत्तर देणारा माणूस रॅशनल विचार करणारा आहे असे समजायला हरकत नाही.

 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “ओम फेसबुकाय नमः” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “ओम फेसबुकाय नमः” ☆ श्री सुधीर करंदीकर

” ओम फेसबुकाय नमः “

बऱ्याच दिवसात एका मित्राशी फोनवर बोलणं झालं नव्हतं म्हणून विचार केला आज वेळ आहे तर फोन करावा. पलीकडे रिंग वाजली आणि लेडीज आवाज आला –

हॅलो कोण बोलतायं आपण

मी : नमस्कार, मी करंदीकर बोलतोय. शर्माजी कुठे बाहेर गेलेत का.

तिकडून : नाही, ते घरीच आहेत पण सध्या ते फेसबुकवर आहेत.

मी : म्हणजे! मग फोन तुम्ही कसा काय घेतला

तिकडून : रोज सकाळचा नाश्ता झाला की ते दोन तास फेसबुकवर असतात. आणि त्यावेळेत कोणाचाही फोन घ्यायचा नाही म्हणून कॉल फॉरवर्डिंग करता माझा नंबर दिलेला असतो. म्हणून फोन माझ्या फोनवर येतो.

तिकडून : ते फेसबुक वरून उठले, की तुमचा फोन येऊन गेल्याचे त्यांना सांगते.

मी ठिक आहे म्हटले, बाय-बाय केले आणि फोन बंद झाला.

आणखीन एका मित्राला फोन लावला आणि तो पण फेसबुक वरच होता.

विचार केला, एका मैत्रीणीला फोन लावावा, ती नक्कीच फेसबुक वर नसणार.

फोन लावला आणि तिकडून पुरुषी आवाज आला..

तिकडून : हॅलो कोण बोलताय आपण?

मी : नमस्कार, मी करंदीकर बोलतोय. छाया मॅडम आहेत का?

तिकडून : आहेत, पण आता त्या फेसबूक वर आहेत. अजून दोन एक तास तरी त्या फेसबुक वरून बाहेर येणार नाहीत. हा त्यांचा रोजचा शेड्यूल असतो. बाहेर आल्या की त्यांना तुमचा फोन आल्याचे सांगतो.

मी थोडे बोललो आणि धन्यवाद म्हणून फोन बंद केला.

विचार केला की आता अशा मित्राला फोन लावावा की जो स्वतः फेसबूक वर असला आणि कॉल फॉरवर्ड त्याच्या बायकोकडे गेला, तर त्याच्या बायकोशी पण बोलता येईल, कारण त्या पण चांगल्या ओळखीच्या आहेत.

मी फोन लावला रिंग वाजली आणि तिकडून एकदम तरुण माणसाचा आवाज आला –

हॅलो कोण बोलताय आपण?

मी : मी करंदीकर बोलतोय, सुरेश जी आहेत का.

तिकडून : आहेत पण आता ते फेसबुक वर आहेत

आणि या वेळेत ते कोणाचाही कॉल घेत नाहीत.

मी : त्यांच्या मिसेस ना फोन देता येईल का?

तिकडून : सॉरी सर, त्या म्हणजे आई पण आता फेसबुक वर आहे. ती पण यावेळी कोणाचे फोन घेत नाही. मी सुरेशजींचा मुलगा बोलतोय.

माझं वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे मी घरीच आहे. दोघांनी त्यांचे फोन कॉल फॉरवर्ड वर माझा नंबर दिला आहे.

मी : दोघंही दोन तीन तास फेसबुकवर म्हणजे सकाळच्या वेळी घरात कामाचा खोळंबा होत असेल

तिकडून : नाही नाही, सगळ्या कामांना मावशी आहेत. आणि ते दोघं फेसबुक वर असले, की घरात तेवढीच शांती असते. माझी बायको पण रिलॅक्स असते.

मी दोघांनाही तुमचा फोन आल्याचे सांगतो.

मी मुलाशी त्याच्या ऑफिस बद्दल / कामाबद्दल थोडी चौकशी केली, ‘हॅव अ नाईस डे’ असे म्हणून फोन बंद केला.

 — — विचार केला, अरे सगळे फेसबुक वर आहेत आणि आपण फेसबुकच्या बाहेर आहोत हे काही बरोबर नाही.

 मी लगेच माझ्या मोबाईलवर कॉल फॉरवर्ड करता बायकोचा नंबर टाकला आणि फेसबूकमय झालो.

 “ओम फेसबुकाय नमः”

 

 © श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५७ आणि ५८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५७ आणि ५८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ५७ – – 

जगीं होइजे धन्य या रामनामे ।

क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे ॥

उदासीनता तत्त्वता सार आहे ।

सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥

अर्थ :  भक्ताने सतत रामनाम घेऊन या जगात धन्य व्हावे. नुसते नामस्मरण करण्यापेक्षा क्रिया म्हणजे कृतीने, भक्तीने सातत्याने उपासना करावी. मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका न येऊ देता, उदासीनपणे (म्हणजे आजूबाजूच्या घटनांचा मनावर परिणाम न होऊ देता) मोकळ्या मनाने रामनामाची उपासना करावी आणि या जगात भक्त म्हणून धन्य व्हावे.

विवेचन : या आधीच्या दहा श्लोकांमध्ये समर्थांनी आदर्श भक्त कसा असावा, त्याची लक्षणे सांगितली आणि त्यावरून साधकांना देखील आपण कसे असावे याचा बोध होतो. पण त्या मार्गाने जायचे कसे किंवा त्यासाठी काय करायचे याचा उपाय ते या श्लोकात आपल्याला सांगत आहेत.

आधीचे श्लोक वाचून जर आपल्याला समर्थ म्हणतात त्याप्रमाणे सर्वोत्तम भक्त व्हावेसे वाटले तर समर्थांचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल. परंतु असे भक्त होण्यासाठी संस्कारांची आणि प्रयत्नांची गरज असते. लहानपणापासूनच संस्काराचे महत्त्व असते. ओल्या मातीला आकार देणे सोपे असते. म्हणून मुलांना चांगल्या गोष्टी सांगणे आणि प्रत्यक्ष आपल्या वागणुकीतून त्यांच्यासमोर चांगल्या वागण्याचा आदर्श ठेवणे या गोष्टी संस्कारात येतात.

त्याचप्रमाणे समर्थांनी सांगितलेला भक्त होण्यासाठी देखील संस्काराची मनाला गरज असते. आपले मन सतत विषयाकडे ओढ घेत असते. त्यामुळे मनाला जाणीवपूर्वक भगवंताचे स्मरण, त्याची उपासना करण्याची सवय लावून घ्यावी लागते. हे एक प्रकारचे संस्कारच असतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात सामान्य माणसाला देवात सुद्धा विषय दिसतात. परंतु संतांना विषयात सुद्धा देव दिसतो.

संतांजवळ प्रत्येक गोष्टीत देव पाहण्याची जी दृष्टी असते, ती विकसित व्हावी लागते आणि ती संस्कारानेच विकसित होते. म्हणून नामस्मरण, त्यासोबतच कृती आणि उपासना यांच्या माध्यमातून परमेश्वराचे ध्यान करावे. भोवतालच्या परिस्थितीमुळे मनात नाना प्रकारचे विकल्प किंवा शंका येतात. खरा भक्त अशा कोणत्याच गोष्टीकडे लक्ष न देता मनापासून भगवंताची उपासना करतो. म्हणूनच त्याच्यावर उपासनेत मोकळेपणा असतो.

भक्ताने उदासीन असावे असे समर्थ जे म्हणतात त्याचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. उदासीन हा शब्द इंद्रियांच्या बाबतीत वापरला गेला आहे. म्हणजे आपले मन जे सतत विषयांकडे ओढ घेते ती आवरणे, आणि विषयांच्या बाबतीत विरक्त राहणे म्हणजेच उदासीन राहणे होय. थोडक्यात म्हणजे विषयांच्या बाबतीत आपली वृत्ती उदासीन असली पाहिजे. भोवतालच्या परिस्थितीबद्दल नाही. आपण प्रापंचिक माणसे आहोत म्हणून आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना मग त्या अनुकूल किंवा प्रतिकूल असो, त्या संबंधात आपल्याला त्यांची योग्य ती दखल घेऊन वागावे लागेल. आपले जे कर्तव्य आहे त्याबाबत सजग राहावे लागेल. म्हणजेच त्या बाबतीतली उदासीनता कामाची नाही. आपल्याला प्रपंचात राहून परमार्थ साधायचा आहे. तेव्हा जी उदासीनता आहे ती विकारांबद्दल असावी. अशा प्रकारची सवय एकदा आपल्या मनाला लागली की मग भगवंताची मोकळेपणाने आपण उपासना करू शकू.

आपल्यासारख्या सामान्य माणूस अनेक गोष्टींना आणि विषयांना मनाने बांधला गेलेला असतो आपण जोपर्यंत ही बंधने तोडत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भगवंताचे होऊ शकत नाही किंवा त्याच्याजवळ जाऊ शकत नाही. मनाने प्रपंचाचा संग टाकावा आणि भगवंताचा संग जोडावा. मग खरोखरच भगवंताचे धन्य भक्त होण्यासाठी आपण पात्र होऊ.

स्वसंवाद :: 

१) माझी उपासना “नित्यनेमाने” होते का? मी सुखात किंवा दुःखात असताना सुद्धा?

२) “सामान्य माणसाला देवात विषय दिसतो” माझ्या उपासनेत माझे खरोखर देवाकडे लक्ष असते का की मनात इतर विचारच जास्त असतात?

३) विकारांबद्दल उदासीन आणि कर्तव्याबद्दल सजग या दोन्ही गोष्टींचा समतोल माझ्या जीवनात आहे का?

– – – – 

श्लोक क्र. ५८ – – – 

नको वासना वीषई वृत्तिरुपें।

पदार्थी जडे कामना पूर्वपापें |

सदा राम निष्काम चिंतीत जावा।

मना कल्पनालेश तोहि नसावा॥५८॥

अर्थ :  हे मना, भौतिक विषयांमध्ये वृत्तीरूपाने वासनांमध्ये अडकू नकोस. पूर्व पापांमुळेच आपले मन विषय वासनांमध्ये अडकते. म्हणून भगवंताचे नेहमी निष्काम भावाने चिंतन कर आणि मनामध्ये कल्पनेचा लवलेशही ठेवू नकोस.

(पदार्थी- दृश्य/बाह्य विषयांमध्ये, निष्काम- कोणतीही इच्छा न ठेवता, कल्पना-सुखाच्या गोष्टींचे मनोरे रचणे, लेश- मागमूस)

विवेचन :  ५७ ते ६० या श्लोकांमध्ये समर्थ आपल्याला विषयवासनेचा त्याग करण्याबद्दल सांगत आहेत. वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो हे आपण मागील श्लोकांमध्ये पाहिले आहे. या श्लोकात म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात की विषयांमध्ये वृत्ती रूपाने आपली वासना अडकता कामा नये. या दृश्य किंवा भौतिक जगात आपण ज्या ज्या गोष्टी पाहतो, त्यामध्ये आपले मन अडकते. ही सवय पूर्वपापामुळे लागते असे समर्थ सांगतात. हे पूर्वपाप म्हणजे पूर्व संचित संस्कार असे म्हणता येईल. हे संस्कार किंवा वृत्ती केवळ एका जन्माची नसून अनेक जन्मांची असते. त्यातूनच असे वागण्याची बुद्धी होते. यावर उपाय म्हणून निष्कामपणे रामाचे चिंतन करावे आणि विषयवासनांची कल्पना देखील मनामध्ये अजिबात उरू देता कामा नये.

वस् धातूपासून वासना हा शब्द आला आहे. वस् म्हणजे राहणे किंवा स्थिर होणे. आपले मन सतत इंद्रियांमध्ये म्हणजेच विषयांमध्ये राहते आणि सवयीने ते तेथेच स्थिर होते. म्हणून त्याला आपण वासना असे नाव देतो. स्पर्श, शब्द, रूप, रस आणि गंध यांच्या सहाय्याने इंद्रियां मार्फत आपण विषय सेवन करीत असतो. थोडक्यात वासना म्हणजे हवेपण! आपल्याला जोपर्यंत हे हवे, ते हवे असे वाटत असते तोपर्यंत आपली चित्त त्या त्या विषयांमध्ये गुंतलेले असते.

वृत्ती, कामना आणि वासना असा प्रवास आपण बाह्य जगतातील वस्तूंसाठी करीत असतो. आपले मन अतिशय चंचल आहे. या मनावर वारंवार वेगवेगळ्या विषयांचे तरंग उठतात. असे अनेक तरंग जेव्हा तयार होतात, तेव्हा त्यातून त्या विषयाबद्दलची कामना म्हणजेच इच्छा निर्माण होते. ही कामना जेव्हा तीव्र होते तेव्हा तिचे रूपांतर वासनेमध्ये होते. हा वृत्ती, कामना आणि वासनेपर्यंतचा प्रवास माणसाला त्यातून बाहेर पडू देत नाही आणि शेवटी अध:पतनाकडे घेऊन जातो.

माणूस एकदा वासनेच्या अधीन झाला की त्याला दुसरे काही सुचत नाही. तो त्या सवयीचा गुलाम होतो आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या गोष्टीचे समर्थन करू लागतो. धूम्रपान किंवा मद्यपान करणारे त्या गोष्टींचे समर्थन करीत असतात असे आपण अनेकदा पाहतो. म्हणजे त्यांना त्यात आपण काही वावगे करीत आहोत असे वाटतच नाही. राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ या नाटकात सुधाकर दारूच्या सवयीचा गुलाम होतो आणि त्यात त्याला काही वाटेनासे होते. परंतु नंतर ही दारू त्याच्या संसाराची धूळधाण करते. प्रख्यात गायक दीनानाथ मंगेशकर यांना देखील मदिरेचे व्यसन लागले होते आणि अति व्यसनामुळे त्यांचे अकाली निधन झाले. मुले लहान असताना संसार उघड्यावर टाकून निघून जावे लागले.

माणूस वृद्ध झाला, इंद्रिये थकली तरी देखील माणूस त्यातून बाहेर पडत नाही. शेवटपर्यंत विषय वासना त्याला त्रास देतच असतात. एखादी गोष्ट प्रत्यक्षात मिळाली नाही की मग तो कल्पनेच्या राज्यात रमतो, कल्पनेचे मनोरथ करू लागतो. आजच्या काळात तर टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया या सगळ्या आभासी गोष्टी कल्पनेच्या राज्यात माणसाला गुंतवून ठेवतात.

मग या सर्व गोष्टीतून सुटका करून घेण्याचा काही उपाय आहे का? निश्चितच आहे! समर्थ म्हणतात, “आपण निष्कामपणे रामाची चिंतन करावे, त्याचे ध्यान, मनन, चिंतन, पूजा करावी. हे सर्व संस्कार आहेत. त्यातून हळूहळू वाईट विषयांची कामना कमी होत जाते, मनामध्ये सद्वासना निर्माण होतात आणि शेवटी निर्वासना अवस्था निर्माण होऊन साधक मोक्षापर्यंत पोहोचतो. असा त्याचा प्रवास वाईटाकडून चांगल्याकडे होऊ शकतो.

पण इथे समर्थ आपल्याला निष्काम भक्ती करायला सांगतात हे लक्षात घ्यायला हवे. आपण सामान्य माणसे परमेश्वराची भक्ती देखील काहीतरी हेतू किंवा इच्छा मनात धरून करीत असतो. त्यामुळे आपली वासना शेवटपर्यंत सुटत नाही. हे ईश्वरा, मला अन्य काही नको. फक्त तू हवा आहेस अशा प्रकारची आर्तता जेव्हा भक्तीत येईल, तेव्हा आपली वाटचाल मोक्षमार्गाकडे व्हायला सुरुवात होईल.

या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचा अरे अरे ज्ञाना झालासी पावन हा अभंग आठवतो. त्यात ते म्हणतात,

वृत्तीची निवृत्ती आपणा सकट |अवघेची वैकुंठ चतुर्भुज ||

जेव्हा साधकाची आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती होऊ लागते, तेव्हा त्याच्या वृत्तीची निवृत्ती होऊ लागते. ती देखील कशी? तर आपणा सकट म्हणजे त्याचा मी पणा, अहंकार सगळे काही नष्ट होते आणि संपूर्ण वैकुंठच त्याला विष्णूरूप दिसू लागते. कामना, वासना सर्वच गोष्टी नाहीशा होतात. कल्पनेचा लवलेश देखील राहत नाही आणि मग आपोआपच जन्ममृत्यूच्या चक्रातून देखील त्याची सुटका होते.

स्वसंवाद ::

१) माझ्या मनात वारंवार येणाऱ्या कोणत्या इच्छा हळूहळू वासनांमध्ये रूपांतरित होत आहेत?

२) “मला हे हवेच आहे” असे वाटते तेव्हा मी त्यामागचा विचार करतो का?

३) मी एखादी गोष्ट मिळाली नाही तर अस्वस्थ होतो का, की शांत राहू शकतो?

४) माझ्या आयुष्यात कल्पनाविलास (दिवास्वप्ने / आभासी जग) किती प्रमाणात आहे?

५) मी दररोज किमान काही वेळ निष्काम भावाने नामस्मरण किंवा चिंतन करतो का?

– क्रमशः श्लोक ५७ आणि ५८.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १० – पेशव्यांच्या इतिहासात हरवलेली स्त्री:— सगुणाबाई ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १०. – पेशव्यांच्या इतिहासात हरवलेली स्त्री:— सगुणाबाई ☆ प्रा.भारती जोगी ☆

पेशव्यांच्या इतिहासात हरवलेली स्त्री:— सगुणाबाई

“मी सगुणाबाई! नाही ना ओळख लागंत? नाव ही नाही आठवंत ना? बरोबरंच आहे ना… इतिहासाच्या कुठल्या पानात गडप झाले, जमा झाले, हरवले कुणास ठाऊक!

आता मीच देते ओळख करून…

मी… सगुणाबाई! थोरल्या बाजीरावांची धाकटी सून… जनार्दन रावांची पत्नी. सुंदर, गोरीपान आणि विशेष म्हणजे… शिकलेली!

सातारच्या भिडे सावकारांची मी कन्या, वयाच्या ५व्या वर्षी १० वर्षाच्या जनार्दन रावांची पत्नी बनून पेशव्यांच्या घरात आले. आणि जाणवले की बाई गं, मला तर इथे अनेक एकाहून एक अशा मातब्बर सासू आणि जावांमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचयं!

गंमत वाटली ना, अस्तिवाचं टिकवणं तेव्हाही होतं… हे वाचून! पण खरंयं ते!

पण हाय रे दैवा! अस्तित्व टिकवून ठेवीन म्हणंत असतांनाच… अचानक कर्नाटक च्या मोहिमे वरून परततांना जनार्दन रावांना टायफॉइड झाला, आणि मी १०व्या वर्षीच विधवा झाले हो! *बालविधवा* हा शिक्का कपाळावर, आणि लाल आळवण अंगावर! सौभाग्य म्हणजे काय? हे देखील कळले नव्हते, आणि बालविधवा म्हणजे काय? हे तरी कुठे माहिती होतं??

तुम्हाला सांगते… सासर-माहेर दोन्हींची श्रीमंती… पण… सौभाग्याची श्रीमंती हिरावून नेली ना नियतीने! नव-याचा केवळ १४ व्या वर्षी मृत्यू… त्यामुळे एकही पराक्रम नावावर नाही… त्यामुळे मी अभिमानाने मिरवावं असं कुठलंही पद, प्रतिष्ठा किंवा सत्ता ही नाही. जगायला कुठलं कारण ही नाही. मग काय… मरेपर्यंत जगावं लागणार, म्हणून मग विरक्ती ची वाट धरली, बालवयातच! हो! कारण… बालविधवा म्हणजे… *समिधा*!! मूक, मौन, शांत जळंत राहणा-या! त्यांत कुठला आलायं ना ओलावा?

पण एक आधार मिळाला, वेळ घालवायला… *ग्रंथवाचन*! वेगवेगळ्या ठिकाणाहून ग्रंथ मागविले,

दुर्मिळ ग्रंथ संग्रह केला. भरपूर वाचन केले. पोथी-पुराणे ही वाचली. तीर्थक्षेत्री च्या तीर्थ यात्रा ही केल्या.

तुम्हाला एक गंमत सांगते… इतिहासाने माझी नोंद नाही घेतली, पण माझ्या दुर्मिळ ग्रंथ संग्रहाची मात्र नोंद आहे… कदाचित… अ क्षर असा अ क्षय साठा… म्हणून तरला की काय??

असंच वैराग्य युक्त, वैराण आयुष्य आणि वय सरंत होतं… वर्षा-वर्षानी पुढं-पुढं!! कुटुंबातील अनेक मृत्यू या डोळ्यांनी बघितले, पचवले… मायाळू सासू काशीबाई, पित्यासमान नानासाहेब, भावासमान सदाशिव राव, नारायण राव… एक ना अनेक!

पण तुम्हाला सांगते… माधवराव आणि रमाबाईंचं आकस्मिक जाणं… नाही पेलवलं गेलं हो! हा चटका नाही साहता आला. मग खूपच एकटेपण आलं… प्रकृती बिघडली… खालावतच गेली… आणि साता-याजवळ वडूज गावी, वाड्यात… कायमची विसावले मी!

आणि… आणि… पेशवाईतील…

*पहिली बालविधवा*… इतिहास जमा झाली… एक समिधा निमाली!!

– लेख क्र. १० .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares