श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५७ आणि ५८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ५७ – –
जगीं होइजे धन्य या रामनामे ।
क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे ॥
उदासीनता तत्त्वता सार आहे ।
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥
अर्थ : भक्ताने सतत रामनाम घेऊन या जगात धन्य व्हावे. नुसते नामस्मरण करण्यापेक्षा क्रिया म्हणजे कृतीने, भक्तीने सातत्याने उपासना करावी. मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका न येऊ देता, उदासीनपणे (म्हणजे आजूबाजूच्या घटनांचा मनावर परिणाम न होऊ देता) मोकळ्या मनाने रामनामाची उपासना करावी आणि या जगात भक्त म्हणून धन्य व्हावे.
विवेचन : या आधीच्या दहा श्लोकांमध्ये समर्थांनी आदर्श भक्त कसा असावा, त्याची लक्षणे सांगितली आणि त्यावरून साधकांना देखील आपण कसे असावे याचा बोध होतो. पण त्या मार्गाने जायचे कसे किंवा त्यासाठी काय करायचे याचा उपाय ते या श्लोकात आपल्याला सांगत आहेत.
आधीचे श्लोक वाचून जर आपल्याला समर्थ म्हणतात त्याप्रमाणे सर्वोत्तम भक्त व्हावेसे वाटले तर समर्थांचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल. परंतु असे भक्त होण्यासाठी संस्कारांची आणि प्रयत्नांची गरज असते. लहानपणापासूनच संस्काराचे महत्त्व असते. ओल्या मातीला आकार देणे सोपे असते. म्हणून मुलांना चांगल्या गोष्टी सांगणे आणि प्रत्यक्ष आपल्या वागणुकीतून त्यांच्यासमोर चांगल्या वागण्याचा आदर्श ठेवणे या गोष्टी संस्कारात येतात.
त्याचप्रमाणे समर्थांनी सांगितलेला भक्त होण्यासाठी देखील संस्काराची मनाला गरज असते. आपले मन सतत विषयाकडे ओढ घेत असते. त्यामुळे मनाला जाणीवपूर्वक भगवंताचे स्मरण, त्याची उपासना करण्याची सवय लावून घ्यावी लागते. हे एक प्रकारचे संस्कारच असतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात सामान्य माणसाला देवात सुद्धा विषय दिसतात. परंतु संतांना विषयात सुद्धा देव दिसतो.
संतांजवळ प्रत्येक गोष्टीत देव पाहण्याची जी दृष्टी असते, ती विकसित व्हावी लागते आणि ती संस्कारानेच विकसित होते. म्हणून नामस्मरण, त्यासोबतच कृती आणि उपासना यांच्या माध्यमातून परमेश्वराचे ध्यान करावे. भोवतालच्या परिस्थितीमुळे मनात नाना प्रकारचे विकल्प किंवा शंका येतात. खरा भक्त अशा कोणत्याच गोष्टीकडे लक्ष न देता मनापासून भगवंताची उपासना करतो. म्हणूनच त्याच्यावर उपासनेत मोकळेपणा असतो.
भक्ताने उदासीन असावे असे समर्थ जे म्हणतात त्याचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. उदासीन हा शब्द इंद्रियांच्या बाबतीत वापरला गेला आहे. म्हणजे आपले मन जे सतत विषयांकडे ओढ घेते ती आवरणे, आणि विषयांच्या बाबतीत विरक्त राहणे म्हणजेच उदासीन राहणे होय. थोडक्यात म्हणजे विषयांच्या बाबतीत आपली वृत्ती उदासीन असली पाहिजे. भोवतालच्या परिस्थितीबद्दल नाही. आपण प्रापंचिक माणसे आहोत म्हणून आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना मग त्या अनुकूल किंवा प्रतिकूल असो, त्या संबंधात आपल्याला त्यांची योग्य ती दखल घेऊन वागावे लागेल. आपले जे कर्तव्य आहे त्याबाबत सजग राहावे लागेल. म्हणजेच त्या बाबतीतली उदासीनता कामाची नाही. आपल्याला प्रपंचात राहून परमार्थ साधायचा आहे. तेव्हा जी उदासीनता आहे ती विकारांबद्दल असावी. अशा प्रकारची सवय एकदा आपल्या मनाला लागली की मग भगवंताची मोकळेपणाने आपण उपासना करू शकू.
आपल्यासारख्या सामान्य माणूस अनेक गोष्टींना आणि विषयांना मनाने बांधला गेलेला असतो आपण जोपर्यंत ही बंधने तोडत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भगवंताचे होऊ शकत नाही किंवा त्याच्याजवळ जाऊ शकत नाही. मनाने प्रपंचाचा संग टाकावा आणि भगवंताचा संग जोडावा. मग खरोखरच भगवंताचे धन्य भक्त होण्यासाठी आपण पात्र होऊ.
स्वसंवाद ::
१) माझी उपासना “नित्यनेमाने” होते का? मी सुखात किंवा दुःखात असताना सुद्धा?
२) “सामान्य माणसाला देवात विषय दिसतो” माझ्या उपासनेत माझे खरोखर देवाकडे लक्ष असते का की मनात इतर विचारच जास्त असतात?
३) विकारांबद्दल उदासीन आणि कर्तव्याबद्दल सजग या दोन्ही गोष्टींचा समतोल माझ्या जीवनात आहे का?
– – – –
श्लोक क्र. ५८ – – –
नको वासना वीषई वृत्तिरुपें।
पदार्थी जडे कामना पूर्वपापें |
सदा राम निष्काम चिंतीत जावा।
मना कल्पनालेश तोहि नसावा॥५८॥
अर्थ : हे मना, भौतिक विषयांमध्ये वृत्तीरूपाने वासनांमध्ये अडकू नकोस. पूर्व पापांमुळेच आपले मन विषय वासनांमध्ये अडकते. म्हणून भगवंताचे नेहमी निष्काम भावाने चिंतन कर आणि मनामध्ये कल्पनेचा लवलेशही ठेवू नकोस.
(पदार्थी- दृश्य/बाह्य विषयांमध्ये, निष्काम- कोणतीही इच्छा न ठेवता, कल्पना-सुखाच्या गोष्टींचे मनोरे रचणे, लेश- मागमूस)
विवेचन : ५७ ते ६० या श्लोकांमध्ये समर्थ आपल्याला विषयवासनेचा त्याग करण्याबद्दल सांगत आहेत. वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो हे आपण मागील श्लोकांमध्ये पाहिले आहे. या श्लोकात म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात की विषयांमध्ये वृत्ती रूपाने आपली वासना अडकता कामा नये. या दृश्य किंवा भौतिक जगात आपण ज्या ज्या गोष्टी पाहतो, त्यामध्ये आपले मन अडकते. ही सवय पूर्वपापामुळे लागते असे समर्थ सांगतात. हे पूर्वपाप म्हणजे पूर्व संचित संस्कार असे म्हणता येईल. हे संस्कार किंवा वृत्ती केवळ एका जन्माची नसून अनेक जन्मांची असते. त्यातूनच असे वागण्याची बुद्धी होते. यावर उपाय म्हणून निष्कामपणे रामाचे चिंतन करावे आणि विषयवासनांची कल्पना देखील मनामध्ये अजिबात उरू देता कामा नये.
वस् धातूपासून वासना हा शब्द आला आहे. वस् म्हणजे राहणे किंवा स्थिर होणे. आपले मन सतत इंद्रियांमध्ये म्हणजेच विषयांमध्ये राहते आणि सवयीने ते तेथेच स्थिर होते. म्हणून त्याला आपण वासना असे नाव देतो. स्पर्श, शब्द, रूप, रस आणि गंध यांच्या सहाय्याने इंद्रियां मार्फत आपण विषय सेवन करीत असतो. थोडक्यात वासना म्हणजे हवेपण! आपल्याला जोपर्यंत हे हवे, ते हवे असे वाटत असते तोपर्यंत आपली चित्त त्या त्या विषयांमध्ये गुंतलेले असते.
वृत्ती, कामना आणि वासना असा प्रवास आपण बाह्य जगतातील वस्तूंसाठी करीत असतो. आपले मन अतिशय चंचल आहे. या मनावर वारंवार वेगवेगळ्या विषयांचे तरंग उठतात. असे अनेक तरंग जेव्हा तयार होतात, तेव्हा त्यातून त्या विषयाबद्दलची कामना म्हणजेच इच्छा निर्माण होते. ही कामना जेव्हा तीव्र होते तेव्हा तिचे रूपांतर वासनेमध्ये होते. हा वृत्ती, कामना आणि वासनेपर्यंतचा प्रवास माणसाला त्यातून बाहेर पडू देत नाही आणि शेवटी अध:पतनाकडे घेऊन जातो.
माणूस एकदा वासनेच्या अधीन झाला की त्याला दुसरे काही सुचत नाही. तो त्या सवयीचा गुलाम होतो आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या गोष्टीचे समर्थन करू लागतो. धूम्रपान किंवा मद्यपान करणारे त्या गोष्टींचे समर्थन करीत असतात असे आपण अनेकदा पाहतो. म्हणजे त्यांना त्यात आपण काही वावगे करीत आहोत असे वाटतच नाही. राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ या नाटकात सुधाकर दारूच्या सवयीचा गुलाम होतो आणि त्यात त्याला काही वाटेनासे होते. परंतु नंतर ही दारू त्याच्या संसाराची धूळधाण करते. प्रख्यात गायक दीनानाथ मंगेशकर यांना देखील मदिरेचे व्यसन लागले होते आणि अति व्यसनामुळे त्यांचे अकाली निधन झाले. मुले लहान असताना संसार उघड्यावर टाकून निघून जावे लागले.
माणूस वृद्ध झाला, इंद्रिये थकली तरी देखील माणूस त्यातून बाहेर पडत नाही. शेवटपर्यंत विषय वासना त्याला त्रास देतच असतात. एखादी गोष्ट प्रत्यक्षात मिळाली नाही की मग तो कल्पनेच्या राज्यात रमतो, कल्पनेचे मनोरथ करू लागतो. आजच्या काळात तर टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया या सगळ्या आभासी गोष्टी कल्पनेच्या राज्यात माणसाला गुंतवून ठेवतात.
मग या सर्व गोष्टीतून सुटका करून घेण्याचा काही उपाय आहे का? निश्चितच आहे! समर्थ म्हणतात, “आपण निष्कामपणे रामाची चिंतन करावे, त्याचे ध्यान, मनन, चिंतन, पूजा करावी. हे सर्व संस्कार आहेत. त्यातून हळूहळू वाईट विषयांची कामना कमी होत जाते, मनामध्ये सद्वासना निर्माण होतात आणि शेवटी निर्वासना अवस्था निर्माण होऊन साधक मोक्षापर्यंत पोहोचतो. असा त्याचा प्रवास वाईटाकडून चांगल्याकडे होऊ शकतो.
पण इथे समर्थ आपल्याला निष्काम भक्ती करायला सांगतात हे लक्षात घ्यायला हवे. आपण सामान्य माणसे परमेश्वराची भक्ती देखील काहीतरी हेतू किंवा इच्छा मनात धरून करीत असतो. त्यामुळे आपली वासना शेवटपर्यंत सुटत नाही. हे ईश्वरा, मला अन्य काही नको. फक्त तू हवा आहेस अशा प्रकारची आर्तता जेव्हा भक्तीत येईल, तेव्हा आपली वाटचाल मोक्षमार्गाकडे व्हायला सुरुवात होईल.
या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचा अरे अरे ज्ञाना झालासी पावन हा अभंग आठवतो. त्यात ते म्हणतात,
वृत्तीची निवृत्ती आपणा सकट |अवघेची वैकुंठ चतुर्भुज ||
जेव्हा साधकाची आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती होऊ लागते, तेव्हा त्याच्या वृत्तीची निवृत्ती होऊ लागते. ती देखील कशी? तर आपणा सकट म्हणजे त्याचा मी पणा, अहंकार सगळे काही नष्ट होते आणि संपूर्ण वैकुंठच त्याला विष्णूरूप दिसू लागते. कामना, वासना सर्वच गोष्टी नाहीशा होतात. कल्पनेचा लवलेश देखील राहत नाही आणि मग आपोआपच जन्ममृत्यूच्या चक्रातून देखील त्याची सुटका होते.
स्वसंवाद ::
१) माझ्या मनात वारंवार येणाऱ्या कोणत्या इच्छा हळूहळू वासनांमध्ये रूपांतरित होत आहेत?
२) “मला हे हवेच आहे” असे वाटते तेव्हा मी त्यामागचा विचार करतो का?
३) मी एखादी गोष्ट मिळाली नाही तर अस्वस्थ होतो का, की शांत राहू शकतो?
४) माझ्या आयुष्यात कल्पनाविलास (दिवास्वप्ने / आभासी जग) किती प्रमाणात आहे?
५) मी दररोज किमान काही वेळ निष्काम भावाने नामस्मरण किंवा चिंतन करतो का?
– क्रमशः श्लोक ५७ आणि ५८.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






