मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”खेळ नशिबाचा असला तरी..” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “खेळ नशिबाचा असला तरी..” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सध्या चालू असलेल्या भारत इंग्लंड ची मॅच, मी माझ्या वडिलांबरोबर बघत होते. शेवटच्या बाॅलवर सिक्स गेला. व त्या एका बॉलमुळे म्हणा किंवा सिक्स मुळे म्हणा आपण हातातोंडाशी आलेला मॅच हारलो.

त्या नंतर त्यावर चर्चेला रंग चढला. जो तो आपापल्या बुद्धी नुसार, त्या एका बाॅलवर आपली प्रतिक्रिया देण्यात दंग होता. चर्चेला उधाण आलं होतं. प्रत्त्येक जण या क्षेत्रातील expert असल्यासारखे विश्लेषण करत होता.

बॉल असा फेकला असता तर, पिच कसं आहे?? त्याप्रमाणे बॉल फेकायला पाहिजे होता. या मोमेंटवर कोणी फुल टॉस बॉल फेकतो का?? वगैरे वगैरे  अंतरराष्ट्रीय स्टेजवर बसलेले कॉमेंटेटर्स तर आपले गहन विचार मांडत होते. जूने उदाहरण देऊन यावर चर्चा करण्यात गुंग होते. काय आणि कसं करायला हवं होतं?? यावर ‘expert comments ‘ देण्यात प्रत्येकाने स्वतः ला झोकून दिलं होतं. क्रिकेट प्रेमी तर पार कोलमडले होते.

मी बाबांना विचारलं, हे सर्व बरोबर बोलताहेत का?? मला मॅच बघायला आवडत, पण खूप बारीक सारीक डिटेल्स काही कळत नाही. डिस्कस करता येत नाही.

तेंव्हा बाबा म्हणाले,  

हा बॉलरही इंटरनॅशनल प्लेअर आहे. बरेच मॅचेस खेळलेला आहे. तो प्रत्यक्ष फिल्ड वर आहे. त्यानेही काही तरी विचार बॉलफेकण्यापुर्वी केलाच असेल ना. त्यालाही हे “एक बॉल पाच रन्स ” हे समीकरण माहित होतं, त्यालाही जिंकायचीच इच्छा होती. ते त्याच्या करिता आणि टीम करिता सर्वच दृष्टीने आवश्यक होतं. महत्वाचे होते. आणि फायद्याचेही होत. मॅच विनर/ फिनिशर म्हणून त्याच्यावर शिक्का लागला असता. तर, त्याची ‘ IPL’ मध्येही किंमत वाढली असती. जाहिराती मिळाल्या असत्या.

“जैसा परफोर्मेंस वैसी प्राइस मिलती हैं।” बॉल फेकण्याआधी कॅप्टन व त्याचे डिस्कशन ही झाले होतेच.

पण यावेळेस निशाणा ठिकाणी लागला नाही. हे खरय. त्याने जो विचार करून बॉल फेकला, तसं झालं नाही. बॅट्समनला पण जिंकायचं होत, त्यांच्यासाठी पण एकच चान्स होता, त्याने शेवटच्या बॉलवर आपले प्राण लावले, शक्ती लावली, तो सफल झाला.

यात चूक कोणाचीच नाही. असं होतच.

“कोशीश करना हमारा कामं है, हारजीत तो परिणाम हैं ”

दोघांनी आपापल्या दृष्टीने बरोबरच विचार केला. सिक्स च्या जागी तो कॅच आउट झाला असता. कदाचित स्टंप्स उडाले असते. तर बाजी पालटली असती.

आयुष्यातही असच होत असत. किती तरी निर्णय आपण घेत असतो. प्रश्न / समस्याच्या degree of difficulty, नुसार आपण त्यावर विचार करतो, कधी दुसऱ्या कोणाबरोबर विचार विमर्श ही करतो. प्रत्येकाला आयुष्यात जिंकायचेच असते. कोणालाही हार, नुकसान नको असते. प्रत्त्येक जण धावायचाच प्रयत्न करतो, पडायचा करत नाही. पण प्रत्त्येक वेळेस आपल्या मनासारखे होतेच असं नाही. निर्णय घेताना परिस्थिती वर खूप विचार करूनही कधी कधी नुकसान होतेच. हार होते, निर्णय चूक घेतला, हेही सर्व नंतरच कळत. घटना घडून गेल्यावरच कळत. शेअर्स मध्ये नुकसान झाले. घराचे बुकिंग झाल्यावर बिल्डरने धोका दिला, पैशाची गुंतवणूक चूक जागी झाली. हे सर्व नंतरच कळत. प्रयत्न शेवटपर्यंत जिंकायचाच असतो.

हार की जीत मॅच झाल्यावरच कळत.

यालाच नशीब म्हणतात का??

प्रत्त्येक निर्णय विचार पूर्वक घेतल्यानंतर ही असं का होतं??

परिस्थिती बदलली की निर्णयही बदलतात.

वेळ कधी कशी येईल?? सांगता येत नाही. रात्री रामाला राज्य द्यायचा निर्णय झाला होता, परंतु सकाळी वनवास मिळाला.

“अपेक्षा घेऊन सुरू केलेला प्रत्येक दिवस अनुभव देऊनच जातो, मग तो देवमाणूस असो नाहीतर सामान्य माणूस असो. “

निसर्गाच्या नियमानुसार बदल होत असतात. आयुष्यात ही बदल होत असतातच. बालपण, तारुण्य, म्हातारपण या वेगवेगळ्या फेज मध्ये खूपदा गणित बदलत, समीकरण बदलतात. तेंव्हा त्याप्रमाणे आधी घेतलेले निर्णय कधी विचार पूर्वक तर कधी नाइलाजाने बदलावे लागतात. म्हणून निर्णय घ्यायचेच नाही असं नाही. पण लवचिकता ठेवावी. जेवढ लवचिक राहाल तेवढं चांगलं.

खूपदा लोकांनी घेतलेल्या निर्णयांवर आपण चर्चा करतो. जोपर्यंत आपल्यावर एखादी ‘तशी’ वेळ येत नाही. तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी चे गांभिर्य कळत नाही.

घरचा प्रमूखाला तर नेहमीच मोठे निर्णय घ्यावे लागतात. त्याच्या निर्णयावर तर घरच्यांच्या बऱ्याच गोष्टी/ भविष्य अवलंबून असतात. प्रमूख नेहमी परिवाराच्या भल्याचाच विचार करून निर्णय घेतो. पण ते नेहमी बरोबरच सिद्ध होत, असं नाही.

घरच्या प्रमूखाची स्थिती घरावरील पत्र्याच्या शेडसारखी असते, जो ऊन, पाऊस, वादळ, वारा सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो. आयुष्यात येणारे उतार चढाव सर्वांना तोंड देतो. आपल्या क्षमतेनुसार निर्णय घेतो. पण त्या खाली राहणारे नेहमी म्हणतात की,

“हा खूप आवाज करतो. ” नेहमी सर्व खुश असतातच असं नाही.

घरच्यांना बरेच निर्णय पटत नाही. कदाचित चूकतही असतील. पण जाणूनबुजून कोणी नुकसान करण्यासाठी चूकीचे निर्णय घेत नाही.

कदाचित नशीबात तेच लिहिले असते. म्हणून तसे निर्णय घेतले जात असावेत.

“अकल कितनी भी तेज़ हो, नसीब के बिना  जीत नहीं सकते ।”

म्हणतात ना,

” देवाला हसवायचे असेल तर त्याला आपला प्लान सांगावा, तो म्हणे गालातल्या गालात हसतो. ” त्याने आधीच आपले आयुष्य ठरवून ठेवलेले असते, त्याचे सर्व निर्णय घेऊन झालेले असतात.

“कोई चाहें कितना भी सोच ले,

आखिर में हुकुम का इक्का कुदरत ही फेंकती हैं।”

निर्णय चूकला तर वाईट वाटणे सहाजिकच आहे. पण (guilt) अपराधीपणाची भावना नसावी.

कधी कधी न ठरविलेल्या/ अपेक्षा नसलेल्या गोष्टी सहज घडतात/मिळतात. तर कधी खूप विचार करून घेतलेले निर्णय अपेक्षेप्रमाणे, मनासारखे नसतात. यालाच बहुतेक नशिबाचे खेळ म्हणतात.

म्हणूनच म्हणतात,

दैव जाणिले कुणी???

 

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १७ आणि १८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १७ आणि १८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक – १७ – – 

मनी मानव व्यर्थ चिंता वाहाते ।

अकस्मात होणार होऊनि जाते ।

घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।

मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥१७॥

अर्थ :

संसारात माणूस अनेक व्यर्थ चिंता करत बसतो. परंतु जे घडायचे असते ते अकस्मात घडूनच जाते. कारण प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार सुखदुःख भोगावे लागते. हे सत्य काही लोकांच्या लक्षात येत नाही आणि ते मात्र त्याबद्दल सतत दुःख करत राहतात.

आधीच्या श्लोकात आपण गेलेल्या व्यक्तीचा जो शोक करतो, तो शोक मोह किंवा लोभातून निर्माण होतो असे समर्थ सांगतात. या श्लोकात ते पुढे एक वेगळाच पैलू उलगडतात. माणूस आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या चिंतांनी त्रस्त असतो. परंतु चिंता करून फारसा उपयोग नसतो, कारण जे घडायचे आहे ते कर्मानुसार घडणारच असते.

माणसाचे आयुष्य चिंतांनी भरलेले असते. चिंता नाही असा दिवस फार क्वचितच येतो. विद्यार्थ्याला परीक्षेत उत्तीर्ण होऊ की नाही याची चिंता असते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नोकरी मिळेल की नाही याची काळजी वाटते. पुढे लग्न होईल की नाही, संसार कसा होईल, मुलं चांगली निघतील का, म्हातारपणी आपली काळजी कोण घेईल? अशा अनेक चिंता माणसाला जन्मापासून मृत्यूपर्यंत सतावत असतात. या चिंतेच्या ओझ्याखाली तो आयुष्य जगत राहतो.

परंतु समर्थ सांगतात की अशा प्रकारची व्यर्थ चिंता करण्याचा काही उपयोग नाही. कारण आपल्या आयुष्यात जे काही घडते ते आपल्या कर्मानुसारच घडत असते. आपले कर्म चांगले असेल तर त्याचे चांगले फळ मिळते, आणि दुष्कर्म केले असेल तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. बाभळीचे झाड लावून आंब्यांची अपेक्षा करणे जसे अशक्य आहे, तसेच दुष्कर्म करून चांगल्या परिणामांची अपेक्षा करणेही व्यर्थ आहे.

महाभारतातील दुर्योधन आणि दुःशासन यांनी नीतीने वागणाऱ्या पांडवांविरुद्ध अनेक कटकारस्थाने रचली. त्या दुष्कृत्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागले आणि अखेर महाभारताच्या युद्धात संपूर्ण कौरववंश नष्ट झाला. कर्माच्या नियमानुसार फळ मिळते याचे हे ठळक उदाहरण आहे.

आपले जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेली एक सुंदर आणि अनमोल भेट आहे. या भेटीचा आपण सदुपयोग करायचा की दुरुपयोग करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे, वाईटकडून चांगल्याकडे अशी आपली वाटचाल व्हायला हवी.

जीवनाला अनेकदा रंगमंचाची उपमा दिली जाते. त्या रंगमंचावर प्रत्येकाला एक भूमिका मिळालेली असते. त्या भूमिकेचे प्रामाणिकपणे आणि उत्तम प्रकारे सादरीकरण करणे हेच आपले कर्तव्य आहे. एखादा शिक्षक असेल तर त्याने आदर्श शिक्षक होण्याचा प्रयत्न करावा. डॉक्टर, इंजिनियर किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात असलेली व्यक्ती आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करत असेल तर तेच तिचे खरे साधन आहे.

आपल्या वाट्याला आलेले कर्म म्हणजेच आपला स्वधर्म आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात —

“स्वये आचरिता स्वकर्म ।

ते स्वकर्म स्वयं होई ब्रह्म ॥”

म्हणूनच माणसाने आपले कर्म उत्तम करणे आवश्यक आहे. जीवनात येणारी सुखदुःखे ही आपल्या प्रारब्धानुसारच येतात हे ज्यांच्या लक्षात येते, ते शहाणे लोक त्यांचा शांतपणे स्वीकार करतात. ते व्यर्थ चिंता करत बसत नाहीत.

परंतु जे या तत्त्वाला समजून घेत नाहीत, ते मात्र दुःख आणि खेद यांच्या गर्तेत अडकून पडतात. स्वधर्म विसरला की माणूस विकारांच्या आहारी जातो, आसक्ती वाढते आणि त्यातून निर्माण होणारी कर्मे त्याला अधिकाधिक बंधनात अडकवतात. परिणामी तो जन्ममृत्यूच्या चक्रात गुरफटत राहतो.

जर आपण खरोखरच हे मानत असू की जीवन ही परमेश्वराने दिलेली अनमोल भेट आहे, तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आपण सुंदर उपयोग करायला हवा. आपल्या कर्तृत्वाने जीवनपथ उजळून टाकायला हवा. कर्तव्य करताना फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने कर्म करणे आणि ते परमेश्वराला अर्पण करणे हीच जगण्याची खरी रीत आहे. अन्यथा तेच कर्म बंधनकारक ठरून दुःखाला कारणीभूत होते.

स्वसंवाद : 

  • मी माझ्या आयुष्यातील घडणाऱ्या घटनांबद्दल खूप चिंता करतो का?
  • जे काही घडते ते माझ्या संचिताचे फळ आहे हे मी मान्य करतो का?
  • माझ्या हातातील वर्तमानकाळ मी चांगल्या कर्मासाठी वापरतो आहे का?
  • स्वधर्माचे पालन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो का?
  • कर्तव्य करताना मी फळाची अपेक्षा ठेवतो का, की निरपेक्ष भावनेने कर्म करण्याचा प्रयत्न करतो?

– – – 

श्लोक क्र. १८ – – – 

मना राघवेंवीण आशा नको रे |

मना मानवाची नको कीर्ति तू रे|

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे |

तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे|१८|

अर्थ: हे मना एका रामाशिवाय (परमेश्वराशिवाय) तू कशाचीच आशा ठेवू नकोस. माणसाच्या ठिकाणी वासना ठेवून तू त्याची स्तुती (कीर्ति गाऊ नकोस) करू नकोस. वेद, शास्त्रे आणि पुराणे ज्या ईश्वराचे वर्णन करतात, त्याचेच वर्णन करणे (स्तुती करणे) योग्य (म्हणजे श्लाघ्यवाणे)आहे. कारण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तोच तुला तारू शकेल.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला आपण व्यर्थ चिंता करीत बसतो असे सांगतात. कारण होणारी गोष्ट पूर्वसंचितानुसार घडणारच असते. पण मग चिंता करायची नाही तर काय करायचे त्याचे उत्तर या श्लोकात आपल्याला मिळते. आपल्याला कोण मदत करेल? कोणाची आशा ठेवायची? कोणाची स्तुती गायची? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या श्लोकात मिळतात.

मनुष्याचा जन्मच वासनेच्या पोटी होतो. त्यामुळे वासना पूर्णपणे सोडणे सोपे नाही. परंतु ईश्वरप्राप्ती शिवाय ठेवलेल्या इतर वासना किंवा कामना दुःखाला कारणीभूत होतात. म्हणून समर्थ सांगतात की हे मना (मानवा)एका भगवंतावाचून तू दुसऱ्या कशाचीही वासना किंवा अपेक्षा ठेवू नकोस.

आपली भारतीय संस्कृती ही मुलत: अध्यात्मप्रधान आहे. ईश्वरप्राप्ती हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे असे अध्यात्मात मानले जाते. सारी वेद, शास्त्रे आणि पुराणे परमेश्वराचे वर्णन करतात आणि परमेश्वराचा महिमा गातात.

परंतु माणसाच्या ठायी असलेल्या देहबुद्धीमुळे त्याला मानवी जीवनातच धन्यता वाटते. इतर श्रेष्ठ व्यक्तींकडे पाहून आपले जीवनही तसेच असावे असे त्याला वाटल्यास नवल नाही. समाजामध्ये लोक थोर व्यक्तींची प्रशंसा करतात. पूर्वीच्या काळी राजे लोक तर आपल्या दरबारात आपली कीर्ती गाण्यासाठी भाट ठेवत असत. आजही वरिष्ठांची खुशामत करण्याची मानसिकता समाजामध्ये रूढ झाली आहे. आपला फायदा करून घेण्यासाठी किंवा स्वार्थ साधण्यासाठी लोक वरिष्ठांची स्तुती करताना दिसतात. अशा प्रकारच्या स्तुतीने ऐहिक जीवनात थोडाफार फायदा होतही असेल. पण त्याला स्वाभिमानाने जगणे म्हणता येणार नाही. ही एक प्रकारची लाचारीच आहे. दुसऱ्याची स्तुती जरूर करावी. गुणग्राहकता आपल्याजवळ असावी परंतु ती स्वार्थापोटी नसावी. लोकांची मानसिकता अशी असते की ते स्वार्थापोटी आज आपली स्तुती करतील परंतु उद्या त्यांचा स्वार्थ साधत नाही असे दिसले की ते निंदा करायलाही मागेपुढे पाहत नाहीत.

परंतु संकटकाळी किंवा अंतिम प्रसंगी श्रीमंत माणसे, वरिष्ठ लोक किंवा नातेवाईक यापैकी कोणीही उपयोगी पडत नाही. मोक्षमार्गावर वाटचाल करणे, आत्मदर्शन किंवा परमेश्वराची प्राप्ती करून घेणे हे जे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे, अशा प्रसंगी केवळ परमेश्वराचेच सहाय्य आपल्याला होत असते. त्याच्याच कृपेने जीवनातील संकटांना आपण धैर्याने तोंड देऊ शकतो.

महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आपल्या सगळ्यांना परिचित आहे. या कठीण प्रसंगातून आपल्याला सोडवतील म्हणून द्रौपदीने सुरुवातीला दरबारातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा पितामह भीष्म, द्रोणाचार्य आदींना विनंती केली. तिचे पती असलेल्या पांडवांची देखील तिला आशा होती. परंतु यापैकी तिच्या मदतीला कोणीच धावून आले नाही. तेव्हा तिने आर्ततेने श्रीकृष्णाचा धावा केला आणि तोच तिच्या मदतीला धावून आला. म्हणून आशा करायची ती परमेश्वराची.

हे मानवा, स्तुती करायचीच असेल तर संत, सद्गुरु किंवा परमेश्वराची कर. त्यांचेच गुणगान गा असे समर्थ आपल्याला सांगत आहेत. वेदांनी, शास्त्रांनी आणि पुराणांनी त्या परमेश्वराची स्तुती गुणांचे वर्णन केले आहेत. समर्थ ज्या राघवाची स्तुती करायला आपल्याला सांगतात, तो राघव म्हणजे परमेश्वर सर्व सृष्टीत विराजमान आहे. राघव हा शब्दच किती सुंदर आहे! राघव म्हणजे चैतन्य! हे चैतन्य सर्व चराचरात भरलेले आहे. चैतन्याची अनेक रूपे असतात. त्याला नावेही वेगवेगळी असतात. पण मूळ चैतन्य एकच असते. ते आपल्याला पाहता आले पाहिजे. आपण त्याचेच गुणगान करावे. तोच आपली जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करील.

स्वसंवाद : 

  • माझ्या आयुष्यात मी खरोखर कोणावर आशा ठेवतो — माणसांवर की परमेश्वरावर?
  • स्वार्थ साधण्यासाठी मी कधी कोणाची खुशामत तर करत नाही ना?
  • दुसऱ्याच्या गुणांची प्रशंसा करताना माझ्या मनात स्वार्थ तर नसतो ना?
  • माझ्या दैनंदिन जीवनात परमेश्वराचे स्मरण किंवा स्तवन याला किती स्थान आहे?
  • ऐहिक यशापेक्षा आत्मिक प्रगती अधिक महत्त्वाची आहे हे मला खरोखर पटते का? (क्रमशः)

 

– क्रमशः श्लोक १७ आणि १८. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ब्रह्मध्वज ते राष्ट्रध्वज” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ “ब्रह्मध्वज ते राष्ट्रध्वज” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

परंपरा, प्रतीक आणि स्वाभिमानाची उंच पताका

आकाशाला स्पर्शणारा अभिमान

… भारताचा राष्ट्रीय ध्वज — केशरी, पांढरा, हिरवा आणि मध्यभागी निळे अशोकचक्र.

आपण त्याला तिरंगा म्हणतो; पण रंगांच्या दृष्टीने तो खरे तर चौरंगा आहे.

अशोकचक्रांकित हा ध्वज म्हणजे आपल्या राष्ट्राची जणू देवताच.

तो भारताच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आत्म्याचा तेजस्वी प्रतीक आहे.

निरभ्र निळ्या आकाशात डौलाने फडकणारा ध्वज पाहिला की मन भरून येते; छाती अभिमानाने फुलते आणि मस्तक आदराने आपोआप झुकते.

ध्वज म्हणजे केवळ कापडाचा तुकडा नसतो.

तो असतो राष्ट्राच्या अस्मितेचा उंचावलेला स्वर.

रणांगणातील पताका

भगवाध्वज आणि जरिपटका

महाराष्ट्राला शिवछत्रपतींच्या परंपरेतून लाभलेला जरिपटका हा स्वाभिमानाचा ध्वज.

पूर्वी युद्धभूमीवर सैन्याच्या अग्रेसर रेषेत हा भगवा झेंडा घेऊन धावणाऱ्या वीराला “बिनीचा सरदार” किंवा “बिनीचा स्वार” म्हणत. याच शब्दावरून बिनिवाले हे आडनाव प्रचलित झाले.

रणांगणावर ध्वज फडकत आहे, याचा अर्थ सैन्य अजून पराभूत झालेले नाही.

बिनीचा स्वार पडला तरी दुसरा वीर पुढे सरसावून ध्वज उचलत असे.

कारण फडकता ध्वज म्हणजे सैन्याचा आत्मसन्मान.

ध्वजाचा तात्त्विक अर्थ

ध्वज म्हणजे उपस्थितीची खूण.

अग्नीला धूम्रध्वज असे म्हणतात, कारण —

“यत्र यत्र धूम्रः तत्र तत्र अग्निः”

जिथे धूर दिसतो, तिथे अग्नी असतो.

ध्वज म्हणजे अस्तित्वाची घोषणा.

रामायणातील ध्वज

रामायणकाळात इक्ष्वाकू वंशाच्या ध्वजावर कोविदार (कांचन) वृक्षाचे चिन्ह होते.

अयोध्येतील नव्या राममंदिरावरही याच परंपरेचा ध्वज फडकतो.

रघुवंशाचा ध्वज रक्तारुण वर्णाचा, कमळासारखा लालसर होता आणि त्यावर सूर्यज्वालेसारखी शमीपत्रे होती. म्हणूनच रामाचा ध्वज अरुणध्वज म्हणून ओळखला जातो.

रावणाच्या ध्वजावर मानवी कवटीचे चिन्ह होते.

कुंभकर्णाच्या ध्वजावर शेषनाग,

मेघनादाच्या ध्वजावर सिंह,

तर प्रहस्ताच्या ध्वजावर सर्प.

या पताका म्हणजे त्या त्या योद्ध्यांच्या सामर्थ्याची जाहीर घोषणा.

महाभारतातील ध्वज

महाभारतातील प्रत्येक योद्ध्याची स्वतःची ध्वजपताका होती.

श्रीकृष्ण — गरुडध्वज

अर्जुन — कपिध्वज (हनुमान)

युधिष्ठिर — चंद्र-नक्षत्र

सहदेव — हंस

नकुल — सुवर्णपृष्ठी हरिण

भीष्म — ताडपत्र व तारे

द्रोण — वेदी आणि धनुष्य

कृपाचार्य — वृषभ

दुर्योधन — नाग

घटोत्कच — गिधाड

या पताका म्हणजे त्या त्या योद्ध्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख.

ध्वजात दडलेल्या कथा

जगातील प्रत्येक राष्ट्राच्या ध्वजात त्याच्या इतिहासाची एखादी आठवण किंवा शौर्यकथा दडलेली असते.

– – अमेरिकेच्या ध्वजावरील ५० तारे तेथील राज्यांचे प्रतीक आहेत, तर १३ पट्टे त्यांच्या प्रारंभीच्या वसाहतींची स्मृती जपतात.

– – दक्षिण गोलार्धातील अनेक देशांच्या झेंड्यांवर सदर्न क्रॉस हा तारकासमूह दिसतो. भारतीय २७ नक्षत्रांमध्ये याचा समावेश नसला तरी पुराणकथांमध्ये त्यालाच स्वर्ग आणि मृत्युलोक यांच्या मध्ये लटकणारा त्रिशंकू असे संबोधले जाते.

– – ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, सामोआ आणि ब्राझील यांच्या ध्वजांवर हा तारकासमूह दिसतो.

काही ध्वजांची प्रतीके

जपानचा ध्वज

पांढऱ्या पार्श्वभूमीवरचा लाल सूर्य — उगवत्या सूर्याच्या देशाची ओळख.

चीनचा ध्वज

लाल पार्श्वभूमीवर एक मोठा आणि चार छोटे तारे — क्रांती आणि समाजरचनेचे प्रतीक.

नेपाळचा ध्वज

दोन त्रिकोणांचा असलेला जगातील एकमेव राष्ट्रीय ध्वज — हिमालयाची प्रतीकात्मक आकृती.

जर्मनीच्या ध्वजात तीन आडवे पट्टे आहेत : काळा – लाल – सोनेरी (पिवळसर).

रंगांचा अर्थ:

काळा – दडपशाही व संघर्षातून उभा राहिलेला इतिहास

लाल – स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान व क्रांतीची भावना

सोनेरी – स्वातंत्र्य, एकता आणि उज्ज्वल भविष्य.

श्रीलंकेचा ध्वज

तलवार धारण केलेला सिंह आणि चार पिंपळाची पाने — सिंहली परंपरा आणि बौद्ध मूल्यांचे प्रतीक.

इतर ध्वज

अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय संस्थाचे सुद्धा आपापले ध्वज असतात. त्यांचे कार्यकर्ते हे ध्वज घेऊन अभिमानाने मिरवतात.

ब्रह्मध्वज आणि गुढी

—- नवनिर्मितीची पताका

ब्रह्मध्वज म्हणजे ब्रह्मतत्त्व, ज्ञान किंवा सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाचे प्रतीक असलेला ध्वज.

लोकपरंपरेत याच ब्रह्मध्वजाचे रूप म्हणजे गुढी.

म्हणजे ब्रह्मध्वज हा तात्त्विक शब्द, आणि गुढी हा लोकजीवनातील व्यवहारातील शब्द.

गुढीपाडव्याला उभारली जाणारी गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, अशी भारतीयांची श्रद्धा आहे. या सृष्टीउदयानाच्या आनंदाप्रीत्यर्थ ब्रह्मध्वज उभारण्याची प्रथा आहे.

वसंत ऋतू — नवनिर्मितीचा काळ.

झाडांना पालवी फुटते, फुले उमलतात.

सृष्टीच्या या नवउदयानिमित्त घरासमोर उभारली जाणारी गुढी म्हणजे नवनिर्मितीचा उत्सव.

समारोप

उंचावलेली पताका

ध्वज हा केवळ कापडाचा तुकडा नसतो.

तो असतो इतिहासाची आठवण, संस्कृतीची ओळख आणि स्वाभिमानाचा उंचावलेला स्वर.

रणांगणात तो शौर्याची शपथ असतो.

राष्ट्रात तो अभिमानाची ओळख असतो.

आणि गुढीच्या रूपाने तो नवनिर्मितीचा मंगल संदेश देत असतो.

म्हणूनच नववर्षाच्या या पवित्र क्षणी आपण ब्रह्मध्वजाला वंदन करतो —

ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद ।

प्राप्तेऽस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मङ्गलं कुरु ॥

 

स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९४८

‘पराभव’ नाम संवत्सर

विक्रम संवत् २०८२–८३

सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 

 

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शब्दकळा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “शब्दकळा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

सूनबाईंनी घासून ठेवलेली देवाची उपकरणे सासूबाई पुसून ठेवत होत्या. मधेच म्हणाल्या “ अगबाई ! आज निरांजन नुसतंच कुरवाळलेलं दिसतंय ! “ बी. ए. मराठी असलेल्या सूनबाईंना वाक्याचा अर्थ कळायला अंमळ वेळच लागला ! अर्थ लागला तेव्हा हसू आणि राग या दोन्हीचं मिश्रण असलेला एक वेगळाच भाव चेह-यावर उमटला. सासूच्या उत्कृष्ट मराठीला दाद द्यावी की चूक काढली म्हणून फणकारा दाखवावा हे तिला कळेचना !

मराठी भाषा फार मजेशीर आणि संपन्न – समृद्ध आहे. तिचा वापर पूर्वीच्या न शिकलेल्या, कमी शिकलेल्या स्त्रिया फार चतुराईने करत ! ‘शर्करा अवगुंठीत’ शब्दांचा वापर लीलया होत असे.

आमचे एक परिचित होते. घर म्हणजे नांदतं गोकुळ ! मुलांच्या दंग्यानं अन् पसा-यानं तिथल्या आजी कावलेल्या असत. ‘ आवरलेलं घर ‘ हे दृष्य फक्त सणावारी किंवा कोणी पाहुणा येणार असेल तरच ! कधी त्यांच्या घरी डोकावलं तर आजी नातवंडांना ओरडताना दिसत. पसा-यात बुडालेल्या आजी सहज बोलून जात, “ कार्टी बसतील तिथे * ठेवतात ! “ हे वाक्य तेव्हा मला मजेशीर वाटायचं. आजवर ते लक्षात असूनही वापरायचा धीर मात्र होत नाही.

माझी एक धष्ट पुष्ट मैत्रीण कामावरुन येताना जिमला जाऊन येत असे. त्या दिवशी तिच्याशी जरा बोलायचं होतं म्हणून साधारण ती येण्याच्या जरा आधीच मी तिच्या घरी गेले. तिच्याकडे सासूबाई आणि आजेसासूबाई अशा दोघीही होत्या. सासूबाई साधारण सत्तरीच्या. मैत्रिणीला यायला थोडा उशीर होणार होता. त्यामुळे सासूबाई भराभर कामं उरकत होत्या. मी आपलं सहज म्हटलं “ काकू, तुम्ही अजूनही फिट आहात अगदी !” लगेच आजी उद्गारल्या “ काय करणार बाई, तरण्या झाल्या बरण्या अन् म्हाता-या झाल्या हरण्या “ ! मी उगीच अंग चोरुन अन् सावरून बसले.

म्हणी अन् वाक्प्रचारांचा वापर करावा तर तो मागच्या पिढीनेच. फारशा शिकलेल्या नसूनही या स्त्रिया सुसंस्कृत आणि प्रसंगी असंस्कृत भाषाही वापरत असत !

वेगळ्या अर्थानं गाजलेल्या एका ओळखीतल्या मुलीचं लग्न तशाच अर्थानं गाजलेल्या मुलाशी झालं, तेव्हा माझी आजी सहज बोलून गेली “हडळीला नव्हता नवरा अन् झोटिंगाला नव्हती बायको ! आता जोडी छान जमली. “

आजोळी पूर्ण सुट्टी घालवल्यानंतर ( तेव्हा उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत कुठले टूर किंवा ट्रीप्स नसायच्या. कधी वडिलांच्या मूळ गावी, कधी आईच्या माहेरी मुक्काम. हाच बदल. ) जूनमधे शाळेत गेले. पहिला दिवस, मराठीच्या बाई वर्गात आल्या. गप्पा टप्पा सुरु झाल्या. मधेच हसत हसत माझ्याकडे बघून म्हणाल्या “ वा ! गालांवर अगदी रुई फुललीय ! “ क्षणभर मी गोंधळले आणि मग अर्थ कळून रुईतच खुद्कन हसले होते.

अगदी शेलक्या शब्दांत उल्लेख करायला मराठी भाषेत उदंड शब्दसमूह आहेत.

आमच्या नात्यातल्या एका मुलीचं लग्न जमायला जरा अवघड जात होतं कारण काय ? तर म्हणे “ म्हशीनं पाय दिलाय ना नाकावर !” गोरीपान मुलगी असेल आणि तिचा नक्षा जर कुठलं वाक्य उतरवत असेल तर “ पांढरी पाल तर आहे, रंग काय चाटायचाय? “ अत्यंत आळशी पुरुषाचा उल्लेख सहजपणे “ दिवसभर शेणाच्या पोसारखा पडलेला असतो “ असा होई. खरं तर वरची वाक्यं मन दुखावणारी नाहीत का ? पण आमच्या आसपासचा स्त्रीवर्ग सहजपणे हे बोलून जाई. ऐकणा-याला पण फार खेद खंत वाटत नसे.

चांगलं पण बोललं जाई बरं का ! एखादी मुलगी सुदृढ असेल तर “ अहो, दहा जणांचं कुटुंब हसत सांभाळेल. “ एखादीसाठी “इतकी रुपवान आहे की वाटेवरचा चोर सुद्धा उचलून नेईल” (म्हणजे काय म्हणायचे असेल? ) कोणी सुग्रण असेल तर “ अहो, पुरणपोळी विरघळते तोंडात, पाण्याला फोडणी दिली ना तरी ओरपत बसाल !”

आताच्या काळात एखादी स्त्री ‘ ब्युटीफुल, गॉर्जियस ‘ दिसत असेल. तेव्हा

 ‘ चारचौघींसारखी ‘, ‘ दहाजणीत उठून दिसेल अशी ‘, ‘ लाखात एक ‘ असे उल्लेख असत आणि त्यावरून रुपाचा अचूक अंदाज येई !

अर्थात पुरुषवर्गही यातून सुटत नसे. शेलकी विशेषणं त्यांच्यासाठीही असत. ‘आग्यावेताळ, जमदग्नीचा अवतार, दुर्वास मुनी, पिंपळावरचा मुंजा, पाप्याचं पितर, लुंग्या सुंग्या’ वगैरे वगैरे ! बरं शब्दकोषात याचे अर्थ शोधायची गरजच नव्हती. आपलं ऐकणं आणि निरीक्षण यातून अचूक अर्थ कळे. ‘ फाटका इसम ‘ मात्र मी बरेच दिवस शोधत होते ! ‘मदनाचा पुतळा ‘ बापकमाईवर जगत असेल तर त्याला शून्य किंमत होती. अचूक शब्दांचा अचूक जागी उपयोग करायला तीक्ष्ण बुद्धी लागते. शाळा कॉलेज फारसं न पाहिलेल्या त्या पिढीकडे ती होती.

गॉसिपिंग त्याही काळात होतंच. घरातल्या ज्येष्ठा व्हरांड्यात, ओट्यावर, अंगणातल्या बाजांवर निवडणं टिपण करत मस्त वेळ घालवत. “ हातपाय लुळे अन् जीभ चुरुचुरु वळे “ असं माझी आजी म्हणे. अशा गप्पांचा उल्लेख कोणी उखाळ्या पाखाळ्या काढणे असाही करे !

ही अशी खमंग, लज्जतदार, मर्मभेदी, वर्मभेदी कधी सभ्य असूनही असभ्य भासणारी मराठी भाषा आमच्या पिढीतच लुप्त होऊ लागली होती. आता तर ती परोठे, ठेपले, पिझ्झा, बर्गरच्या संस्कृतीत विलीन झाली आहे. आंग्लाळलेल्या मराठीत तो ठसकाच नाही, ती मज्जा नाही ! पिढीगणिक भाषा बदलत जाते. ‘ती व्यक्ती’चा ‘तो व्यक्ती’ कधी झाला, समजलं तरी का ? आज प्रसिद्धीमाध्यमांवर जे मराठी बोललं जातं ते ब-याचदा अनाकलनीय असतं. “** पण नांदा“ ! भाषा जिवंत राहायलाच हवी ! सगळ्याचं मिश्रण असलेली भेळ नाही का आपण आवडीनं खातो!तसंच, ही मराठीपण आपलीच आहे, नाही का ?

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १३ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १३ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

गाथेतून उमजणारी गीता(३)

अर्जुनाला रणभूमीवर माझ्याच नातेवाईकांना मी कसे मारू असा जेव्हा भ्रम झाला त्यावेळी, माता, पिता, बहीण, बंधू, भार्या, अपत्ये ही सर्व नाती कशी असत् आहेत, आणि मी- कृष्ण हेच कसे परब्रह्म आहे याचा उपदेश श्रीकृष्णाने गीतेत केला. त्याच परमतत्वानुसार

तुकाराम महाराज सर्व मोह पाशातून मुक्त झाले आहेत. म्हणून ते म्हणतात,

बाप मेला न कळता/ नव्हती संसाराची चिंता/

विठू तुझे माझे राज्य/ नाही दुसऱ्याचे काज/

बाईल मेली मुक्त झाली/ देवे माया सोडविली/

पोर मेले बरे झाले/ देवे माय विरहित केली/

माता मेली मज देखता/ तुका म्हणे हरली चिंता/

ज्या ज्या गोष्टी असत् आहेत, त्याचा विनाश अटळ आहे हे सत्य स्वीकारण्याची शक्ती जेव्हा अंगी येते, तेव्हाच सत् ची, परमतत्वाची, परब्रम्हाची ओळख पटते. त्याचवेळी जिवा शिवाचे ऐक्य होऊ शकते.

जोपर्यंत माणूस संसार बंधनात अडकून पडलेला आहे, तोपर्यंत त्याला संसाराचे भय असते. एकदा का त्याला संसार हा भासच आहे याची खात्री पटली की तो भव भयापासून मुक्त होतो. महाराज आता संसारातून पूर्णपणे निवृत्त झाले आहेत. त्यांना कसल्याही भोगाची आसक्ती राहिली नाही. म्हणून ते देवाजवळ बोलतात,

 भोगावरी आम्ही घातला पाषाण/ मरणा मरण आणियेले/

 विश्व तू व्यापक काय मी निराळा/ कशासाठी बळा येऊ आता/

 काम सारुनिया काढावे बाहेरी/ आणूनी भितरी काय ठेवू/

 तुका म्हणे काही नेणे लाभ हानी/ असेल तो धनी राखो वाडा/

मी गुणातीत आत्मा आहे. मला देह दुःख नाही अशा भूमिकेचा दगड भोगांच्या डोक्यावर ठेवून मी मरणाचा अंत केला आहे. देवा तू जर विश्वव्यापक असशील, तर मी त्यापेक्षा निराळा नाही. अशा परिस्थितीत मला वेगळेपणाचा खटाटोप करण्याची काय जरूर आहे? तू आणि मी एकच आहोत. लाभ किंवा हानीची परवा तू असताना मी का करावी? मी काही लाभ हानी जाणत नाही, जो या देहाचा धनी असेल तोच त्याचे रक्षण करेल.

याचसाठी तुकाराम महाराज त्यांच्या गाथेतून साधकांना विठ्ठलाच्या चिंतनाचे महत्त्व सांगतात.

 काय नोहे केले/ एका चिंतीता विठ्ठले/

 सर्व साधनांचे सार/ भवसिंधू उतरी पार/

 योगयागतपे/ केला त्याने अमुपे/*

 तुका म्हणे जपा/ मंत्र त्रीअक्षरी सोपा/

एका विठ्ठलाच्या चिंतनाने काय मिळत नाही? हा भव सिंधू पार करण्यासाठी विठ्ठल हा त्रि अक्षरी मंत्र पुरेसा आहे. योग, याग, साधना वगैरे गोष्टींची काहीही आवश्यकता नाही.

सर्वतोपरी देहाभिमान शून्य होणे म्हणजेच योग आणि तप आहे. तोच परमार्थ आहे. ज्यावेळी देहाभिमान नाहीसा होईल त्याचवेळी जन्ममृत्युरूपी येरझार थांबेल.

योग तप याची नावे/ गणित व्हावे अभिमाने/७

 करणे ते हेचि कर/ सत्य बरा व्यापार/

 तरी खंडे येरझार/ निधे भार देहाचा/

जेव्हा विषयसुख गोड वाटते, तेव्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडून किती यातना भोगाव्या लागतात याचे वर्णन महाराज त्यांच्या या अभंगात करतात.

 विषयाचे सुख /येथे वाटे गोड/

 पुढे अवघड/ यमदंड/

 मारिती तोडिती/ जोडीतील निष्ठुर/

 यमाचे किंकर/ बहु साल/

 असिपत्र तरुवर/ खैराचे इंगळ/

 निघतील ज्वाल/तैल पाकी/

 तप्तभूमीवरी/ चालविती पायी/

 अग्निस्तंभ बाही/ कवटाळविती/

 म्हणूनी तुका येतो काकुळती/ पुरे यातायाती गर्भवास/

क्षणिक विषयसुखाचे भोगावे लागणारे परिणाम किती भयंकर आहेत याची कल्पना तुकारामांच्या या अभंगातून आपल्याला येते.

एका नामात हरी वसलेला आहे, परंतु आपल्यासारखी सामान्य माणसे देहातच सर्व सुख आहे असे मानतात व त्यामुळे परब्रम्हप्राप्ती आपल्यापासून दूर पळते.

देह हा सादर पहावा निश्चित/ सर्व सुख येथे नाम आहे.

आपल्याला मिळालेल्या देहाकडे आदराने जरूर पहावे, परंतु एक परब्रह्म, एक नामच सर्व सुखाचे साधन आहे.

लटक्या संसारात माणूस अडकतो. लोभ, मोह इत्यादी षड्रिपूंच्या जाळ्यात सापडतो. त्याला हरिनामाचा विसर पडतो. खूप पैसा जमवण्याची धडपड करतो. शेवटी या क्षणभंगुर देहाचा नाश होतो आणि बापाने ठेवलेल्या पैशांवरून दोन भावांचे आपसात भांडण लागते.

 लटीकियाच्या आशा/ होतो पडिलो वळसा/

 होऊनिया दोषा/ पात्र मिथ्या अभिमाने/

 बारावी उघडली दृष्टी/ नाहीतरी होतो कष्टी/

 आक्रंदते सृष्टी/ मात्र या चेष्टांनी/

 मरणाची नाही शुद्धी/ लोभी प्रवर्तली बुद्धी/

 परती तो कधी/ घोड्याची ना माघारी/

 साचवुनी मरे धन/ लावी पोरांची भांडण/

 नाही नारायण / तुका म्हणे स्मरला.

 संसारी माणसाची अशी ही शोककथाच आहे.

आता हा पुढील अभंग पहा.

 येथे नाही उरी आले अवतार/ येरे ते पामर जीव किती/

 विषयाचे झणी व्हाल लोलिंगत/ जेवलीया अंत नलगे भंग/

 वाहून या भार कुंथसील ओझे/ नवे तेचि माझे थीता त्याग/

 तुका म्हणे कैसी नव्हे त्याची लाज/ संती केशी-राज साधियाला/

या अभंगात तुकाराम महाराज प्रापंचिकाला उपदेश करीत आहेत. या ठिकाणी अवतार हा शब्द नारायणाच्या मत्स्य, कुर्म आदी दशावतारांना उद्देशून आला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की जिथे हे अवतार सुद्धा राहिले नाहीत तिथे सामान्यांची काय कथा? विषयाची आसक्ती माणसाला कुठे नेईल त्याचा काही नेम नाही. जे खरोखर आपले नाही, त्याचे ओझे खांद्यावरून विनाकारण वाहून हे माणसा तू स्वतःला कष्ट देऊ नकोस. त्यामुळे स्वहिताचा त्याग होईल. केशव हाच परमात्मा आहे, त्याला साध्य करण्यातच स्वहित आहे.

स्वतः तुकाराम महाराज निःसंग होऊन अहोरात्र गोविंदाचे पोवाडे गात होतेच आणि लोकांनाही भवभयापासून मुक्त व्हावे यासाठी ते सावध करीत होते. विठ्ठलाचे नाव वाचेत असल्यामुळे विषयात अडकलेल्या तुकारामांना  योग्य मार्ग सापडला. कृष्णाने अर्जुनाला गीतेत हेच सांगितले होते की तू कृष्ण भावना भावित होणे जरुरीचे आहे.

क्रमशः… १३

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # अरे विकास विकास… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # अरे विकास विकास… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“आवं दादा या पुलावरून हे काय धावतया म्हनायचं.. आनि तेबी जमिनीवर पाय न लावता असं अधांतरीचं कसं काय पळतया! … “

“अरे बाबानू असं का येड्यावानी इचारतायं? … ती धावती ना तिला या शहराची मेट्रो म्हनत्यात… ती अशीच तुमच्या आमच्या इतकचं काय मोठ्या इमारतीच्या डोक्यावरूनच पळत असती! … तिचा अन जमिनीचा काहीच संबंध येत नाही.. कायमच ती अशी अधांतरी पळत असती.. आताच्या दिवसात या शहराची हु दुसरी जीवनदायीनी हायं बाबानू.. समजलं! … “

… ” असं हायं का? पर अवं दादा पर सहा महिन्याच्या मागं या जागेवर जी झोपडपट्टी व्हती त्यात आम्ही चाळीस पन्नास वर्षं राहत व्हतो.. ते मराठवाड्यात दुष्काळी कामं सुरू झाली म्हणून आम्हाला संमद्याना तकडं काम मिळालं. तवा इकडं घराला कुलूप घालून आम्ही संमदी तकडं गेलो.. सहा महिनं म्हणता म्हणता एक वरीस ततच ठेवून कामं पूरं झाल्यावरच आम्हाला सोडलं… अन इथं येऊन बघतो तर ह्यो मोठा पूल बांधलेला दिसला.. ती पळणारी चकाचक रेल्वे दिसली पन आमच्या झोपड्या काय कुठं नदरलाच दिसनात… अन आमच्या आजुबाजूला राहणारे ते शेजारपाजारचे लोक बी दिसनात… पाक भुईसपाट करून खालनं दोन चार मोठ्ठं रस्तंच बांधलेलं दिसलं… किती मोटारींचा येजा चा गर्दा माप वाढलेलला दिसतूया.. “

“अरे बाबानू आता शहराचा मोठा विकास होऊन राहिलाय… ते सरकारनं स्मार्ट सिटी योजना अमंलात आणायचं ठरवलंय.. तेव्हा सगळ्यात पहिल्यांझुट गदा ही गलिच्छ झोपडपट्टीच्या जागेवर घालण्यात आलीयं… आता शहराचा विकास करताना काही गोष्टींचा त्याग करावा लागतो.. सरकारी वटहुकूम निघाला की सगळ्यांना त्याप्रमाणे वागावचं लागतं… त्येला काय इलाज नाही… आता तुमच्या झोपड्या गेल्या आहेत तर तुम्हाला दुसरीकडे जागा शोधायला हवी.. या भागातला समाजसेवका कडं जाऊन भेटा म्हणजे तो तुम्हाला मदत करील… “

“.. नगं नगं आता आम्ही कोणाला भेटाबिट्याच्या भानगडीत पडनार नाही बघा… तो काय शहराचा विकास हुनार आहे म्हनता तो तर हा असा आभाळालाच भिडायला गेल्या सारखाच डोक्याच्यावरनचं जाणारा हाय नव्हं… मगं आम्ही आमच्या झोपड्या पहिल्या होत्या तश्याच या पुलाच्या खाली प्रत्येक खांबाच्या भवतीनं बांधून राहतो.. नाही तरी त्या खांबाच्या बाजुची जमिनीचा काही आता विकास काय होणार नाही… मगं आम्हाला कोणी तिथून उठवणार पण नाही… ते म्युन्सिपालटीवालं साहेब आम्हाला चांगले वळखतात.. आन ते लै दयाळू बी हायती.. झोपडं बांधल्यावर एक डाव त्यांची गाठ घेऊन पानसुपारी केली कि लाईट पानी अन सुलभ शौचालयाची पन सोय लगेच करतात बघा… सरकारला म्हनावं काय तुझा विकासाचा ऊजेड पाडायचा तो वर आकाशापतूर नेऊन पाडनास.. आम्ही इथं भुईवर चटई पसरुन बघत राहतू… “

“अरं बाबानू या विकास करताना तुमच्या सारख्या गोरगरिबांचीच फारच अडचण होत होती… म्हणून तर तुम्हाला सरकारी कामं देतो, चांगला पैका देतो या आमिषावर ओढून च तिकडं मराठवाड्यात लांब नेलं आणि इकडं हा पूल पूर्ण होईपर्यंत तुम्हाला सोडलचं नाही… काय येतयं का लक्षात काही तुमच्या.. साप पण मेला आणि काठी पण वाचली अशी सरकारनं खेळी केली होती… हं आता तुम्हाला राहायला जागा नाही घर नाही तर तुम्ही तरी काय करणार म्हणा… या पुलाच्या खालच्या जागे शिवाय पर्याय आहे कुठे… शिवाय तुमचा तो म्युनिसिपालिटी चा साहेब आहेच कि तुमच्या मदतीला… नाहीतर त्याने त्याच्या नोकरीत न दिसणारा विकास आता नाही तर कधी करून घ्यायचा… “

“बरयं मी निघतो.. ती मेट्रो जशी धडधड करीत वरनं जाताना दिसली कि मलाही माझ्या छातीत धडधड वाढायला लागते… वयाचा परिणाम आहे बाबा… आकाशाला गवसणी घालणारा विकास बघूनच माझे डोळे दिपून गेले… आता या पुढे अधिक पाहण्याआधी ते लवकरच मिटलेले बरे… “

आणि त्या गावाहून आलेल्या गोरगरीबांनी मेट्रो पुलाच्या खाली खांबाच्या आधारे आपल्या झोपड्या उभा केल्या.. आकाशातून खाली पाहताना चकाचक श्रीमंतीचा थाट दिसत होता आणि त्याच्या सावलीत विसावलेली गरीबी मात्र घाबरून पुलाच्या खांबाला पाली सारखी चिकटून बसली होती…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जागतिक जल दिन – २२ मार्च…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “जागतिक जल दिन – २२ मार्च…” ☆ श्री सुधीर करंदीकर

जागतिक जल दिन हा २२ मार्चला असतो. हे निमित्त साधून आपल्याला हा दिवस अगदी रोज म्हणजे रोज साजरा करायचा आहे.

जलदेवता प्रसन्न असेल तर शरीर आणि मन स्वच्छ राहतं आणि रोग आणि आजार हे कायम लांब राहतात. जलदेवतेला प्रसन्न करण्याचा सोपा मार्ग म्हणजे पाणी वाया न घालवणे आणि पाण्याचा योग्य उपयोग करणे.

 ——–

सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. पाण्याचे महत्व आणि त्याची उपयुक्तता याविषयी जागरूक करण्याकरता जगभरात दरवर्षी २२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो.

जगप्रसिद्ध जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांनी जागतिक जल दिन साजरा करण्याची संकल्पना सर्वप्रथम जागतिक मंचासमोर मांडली आणि यूएनओ च्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला वर्ल्ड वॉटर डे साजरा केला.

आपण पाणी वाया घालवणं म्हणजे कुणालातरी तहानलेले ठेवणं, इतका सोपा आणि साधा विचार जर आपण प्रत्येकाने केला, तर कुठल्याही खेड्यात / गावात / शहरात पाणीटंचाईवर मात नक्कीच होऊ शकते. म्हणूनच म्हणतात पाणी वाया न घालवणे हे एक सोपं आणि साधं पुण्य मिळवण्याचं साधन आहे.

सर्वसाधारणपणे घराघरांमध्ये पाण्याचा वापर असा होतो – आंघोळ, टॉयलेट, भांडी घासणे, कपडे धुणे, वॉश बेसिन चा वापर, बाल्कनी मधल्या कुंड्यांना पाणी, बाल्कनी धुणे, कार स्कूटर धुणे, घराभोवती असलेल्या झाडांना पाणी घालणे, घरा भोवतीची फरशी धुणे, वगैरे वगैरे.

या प्रत्येक हालचालीचा प्रत्येकाने एक त्रयस्थ म्हणून जर आढावा घेतला, आणि सगळ्यांच्या आढाव्यांची गोळाबेरीज केली तर लक्षात येईल की आपण घरातला प्रत्येक जण जेवढे पाणी वापरतो त्यापैकी ८० ते ८५ टक्के पाणी हे वाया जात असते आणि फक्त १५ ते २० टक्के पाण्याचा खरा आणि आवश्यक वापर होत असतो. हे कसं काय ते आता बघू – 

घरामध्ये काहीही वाया जाऊ नये याबद्दल घरातल्या स्त्रिया नेहमीच सजग असतात.

म्हणून विचार केला, घराघरांमध्ये पाणी कसे वाया जाते आणि ते कसे वाचवता येईल, याबद्दल मैत्रिणींना फोन करून त्यांचे विचार / अनुभव विचारावे.

काल दिवसभरात शाळेतल्या मैत्रिणी /कॉलेजमधल्या मैत्रिणी/ वाचक मैत्रिणी यांना भरपूर फोन केले.

त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीची गोळा बेरीज ही अशी –

१) आंघोळ / शॉवर – बहुतेक घरांमध्ये आंघोळ पूर्ण होईपर्यंत शॉवर सुरूच असतो. अंगाला साबण लावताना किंवा शरीर स्वच्छ करताना शॉवर नक्कीच बंद करू शकतो. किती पाणी वाया जात असते याचा अंदाज घ्या.

२) टॉयलेट – टॉयलेटला गेल्यानंतर फ्लश करणे नक्कीच गरजेचे असते. पण लघवीला गेल्यानंतर पूर्ण फ्लश टॅंक एवढ्या पाण्याची गरज नसते. आपण बाजूला नळाखाली छोटी बादली ठेवू शकतो आणि ते पाणी ओतू शकतो. किंवा ड्युएल सेटिंग चा फ्लश टॅंक घेऊ शकतो. एकदा थोडा खर्च होईल पण पाणी वाचवण्याचे पुण्य मिळेल. यामुळे जे पाणी वाचेल ते कल्पनेच्या बाहेरचे असणार आहे.

३) भांडी घासणे – भांडी घासताना नळ सुरूच असतो आणि पाणी वाहत असते. नको असेल तेव्हा नळ नक्कीच बंद करता येतो. भांडी धुताना मोठ्या भांड्यात जे पाणी जमा होते ते झाडाच्या कुंड्यांना नक्कीच घालता येते.

४) वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुणे – आपण ऑटो सायकल सिलेक्ट करतो, कपडे टाकतो आणि मशीन सुरू करतो. कपडे थोडे असले तरी मशीन भरपूर पाणी घेते आणि ते सगळे गरजेचे नसते. कपडे बघून आपण low, minimum, medium वगैरे नक्कीच सिलेक्ट करू शकतो आणि पाणी वाचवू शकतो.

५) वॉश बेसिन चा वापर – सकाळी उठल्यावर दात घासण्याकरता, काही खाल्ल्या नंतर तोंड धुण्याकरता, चेहरा धुण्याकरता बहुतेक सगळ्याच घरांमध्ये बेसिन वापरले जाते. आपण बेसिन पाशी जातो नळ पूर्ण उघडतो आणि नंतर मग दात घासणे /चुळा भरणे / नाक स्वच्छ करणे/ घसा स्वच्छ करणे, हे सगळे आपण करतो आणि नंतर शेवटी नळ बंद करतो. आणि नळाची धार पूर्ण वेळ मोठी असते. म्हणजे ५ टक्क्याचा खरा वापर होतो आणि ९५ टक्के पाणी वाया जाते.

पाणी कसं वाचवता येईल – बेसिनच्या खाली एक कॉक असतो. तो पूर्ण बंद करायचा आणि अगदी थोडासा उघडायचा. आता बघा बेसनची धार अगदी बारीक होईल. हातावर पाणी घेऊन सगळ्या क्रिया करण्याकरता ही धार अगदी पुरेशी असते. बेसिन जवळ असताना डावा हात नळावर ठेवायचा, जेव्हा पाहिजे तेव्हा नळ सुरु आणि इतर वेळा बंद. बघा किती पाणी वाचेल. पाणी वाचवायचं म्हणून काहीही खाल्ल्यानंतर ८ – १० चूळा भरण्याचं मात्र टाळू नका.

(चुळा का भरायच्या याकरता माझा लेख वाचा – चूळा भरूया आणि निरोगी राहूया)

६) बाल्कनीतल्या कुंड्यांना पाणी- बाल्कनी मध्ये छोटी छोटी फुल झाडं, तुळस, गवती चहा, वगैरे लावण्याची बहुतेकांना आवड असते आणि ती छानच आहे. कुंडीतल्या झाडांना अगदी थोडं थोडं पाणी लागतं. बहुतेक जण आतल्या नळापासून एक पाईप आणतात आणि तो एका कुंडीत सोडतात. कुंडी भरून वाहायला लागली की दुसऱ्या कुंडीत..

ओव्हर फ्लो झालेले पाणी बऱ्याच सोसायटींमध्ये ग्राउंड लेव्हल ला चालण्याच्या पॅसेज मध्ये वाहतांना दिसते. आणि हे सगळे पाणी वाया जात असते.

७) बंगले वजा सोसायट्यांमध्ये झाडांना पाणी – बहुतेक जण पाईपनी सगळ्या झाडांना भरभरून पाणी देत असतात. आणि नंतर ते पाणी इतके जास्त होते की गेटमधून बाहेर पडून ते पाणी रस्त्यावर वाहायला लागते. काहीजण पाण्याच्या फवाऱ्याने आपल्या कंपाउंडचं गेट पण धुतात. काहीजण घरासमोरचा संपूर्ण रस्ता त्यावर पाणी मारून गारवा येण्याकरता पाण्याने ओला करतात.

८) कार / स्कूटर धुणे – बऱ्याच घरांमध्ये कार स्कूटर धुताना, पाण्याचा नळ पूर्ण उघडा असतो, आणि कार स्कूटर ची अक्षरशः धुलाई होत असते. पाण्याचा पाईप पंधरा एक मिनिट तरी सुरू असतो. जमिनीवर पाण्याचे लोट वाहत असतात. खरंतर कायमस्वरूपीच हे धुणे आपण टाळू शकतो किंवा अगदी प्रमाणात अधून मधून करू शकतो. गाडीची काच ओल्या फडक्याने पुसता येते आणि इतर भाग कोरड्या फडक्याने पण पुसता येतो.

९) घराभोवतीची फरशी धुणे – बहुतेक बंगल्यांमध्ये भोवतालची फरशी भरपूर पाण्याने धुणे हा रोजचा कार्यक्रम असतो. काही ठिकाणी फरशी वरचा पालापाचोळा पाण्याच्या प्रेशरने ढकलत ढकलत गेटच्या बाहेर ढकलतात. खरंतर फरशांची अशी धुलाई नक्कीच टाळायला पाहिजे. खराट्याने फरशी झाडली तरी स्वच्छ दिसते. आणि कचरा पण गोळा करता येतो

१०) आजकाल सगळीकडेच उंच उंच इमारती होत आहेत आणि छतावरती सोलर वॉटर हिटर असतात. खालच्या कुठल्याही मजल्यावरच्या लोकांनी जर बाथरूम मध्ये गरम पाण्याचा नळ सोडला तर आधी उभ्या पाईपलाईन मधे असलेले एक ते दीड बादली गार पाणी येते आणि नंतर गरम पाणी यायला सुरुवात होते. आधी आलेले गार पाणी बाथरूम मध्ये ओतले जाते. यावर काहीतरी टेक्निकल सोल्युशन काढणे नक्कीच गरजेचे आहे पाणी वाचवण्याकरता.

११) एका मैत्रिणी नी तिचा एक अनुभव सांगितला –

मैत्रीण : अरे, काल मी चक्क पाण्याशी बोलले.

मला काही अर्थ लागेना, म्हणून मी म्हणालो, बाईसाहेब सगळं ठीक आहे ना!

मैत्रीण : अरे खरं तेच सांगतेय. त्यादिवशी मी संध्याकाळी फिरायला वेगळ्या रस्त्याने गेले होते. दोन्ही बाजूला बंगले आणि मधून रस्ता. थोडं पुढे गेले आणि रस्त्यावर पाणी वाहत होतं. आपण पाण्याला जल देवता म्हणतो. त्यामुळे पाण्यावर पाय देऊन पलीकडे जाणे मनाला पटत नव्हते. म्हणून मी कुठे कोरडा भाग आहे का ते बघत होते. तेवढ्यात मला एक वेगळ्याच टोन मध्ये आवाज ऐकायला आला. मी इकडे तिकडे बघितले पण कोणीच नव्हतं. आणि लक्षात आलं की पाण्यामध्येच काहीतरी चेहरा दिसतोय आणि तिथून आवाज येतोय.

पाणी : मी पाणीच बोलतोय. तू या भागात पहिल्यांदाच आलेली दिसतेयस. पाण्यावर पाय देऊन जा काही हरकत नाही. आणि पुढे चालताना तुला बऱ्याच ठिकाणी पाण्यावर पाय ठेवून जावे लागणार आहे, कारण खूप ठिकाणी रस्त्यावर पाणी वाहत असणार. आणि हे रोजचेच आहे.

मैत्रीण : मी मागे फिरते आणि दुसरीकडून जाते

पाणी : अगं रस्त्यावर असे वाहायला आणि वाया जायला मला पण आवडत नाही. पावसाळ्यामध्ये सगळीकडे पाणीच पाणी असते त्यामुळे पर्यायच नसतो. आम्हाला तेव्हा रस्त्यावरून वाहावेच लागते. पण इतर वेळा गरजूंच्या तोंडचे पाणी काढून रस्त्यावर वाहणे मला पण पटत नाही. बट नो चॉईस.

मैत्रिणीने खाली वाकून पाण्याला नमस्कार केला आणि ती पुढे गेली.

पाणी कुठे कुठे वाया जाऊ शकते आणि ते कसे वाचवता येईल, याबद्दल मैत्रिणींनी त्यांची छान छान ऑब्झर्वेशन्स आणि उपाय मला कळवले त्याबद्दल त्यांना धन्यवाद. त्यांचे संकलन मी या लेखात केले आहे. हेतू हाच की सगळ्यांनी जर विचारपूर्वक पाण्याचा वापर केला तर पाणीटंचाई कुणालाही जाणवणार नाही, तहानलेले कोणीही राहणार नाही.

जागतिक जलदिन हा आपण सगळ्यांनी खरंतर रोजच अमलात आणायचा आहे. पावसाळा असो, हिवाळा असो किंवा उन्हाळा असो.

पाण्याला आपण जलदेवता म्हटलं तर आपण नक्कीच पाणी कुठेही आणि कधीही वाया घालवणार नाही. आणि पाण्याची टंचाई कधीच भासणार नाही.

डॉक्टर माधवराव चितळे यांच्या या संकल्पने करता त्यांचे खूप खूप आभार आपण सगळेजण मानूया.

पाण्याच्या पंपाचा ज्यांनी शोध लावला त्यांचे पण आपण आज आभार मानूया. त्यांच्या शोधामुळेच आज आपल्या घराघरात, उंच उंच मजल्यांवर लांब लांब अंतरावरून पाणी येत आहे. शोधणारे जनक आहेत –

 French born inventor – Denis Papin.

ब्रह्मदेवांना पण आपण आजच्या दिवशी एक प्रार्थना नक्कीच करूया – कलियुग संपल्यानंतर तुम्ही जेव्हा नवीन सृष्टीची निर्मिती कराल तेव्हा समुद्राचे पाणी पण नदीच्या पाण्याप्रमाणेच गोड करावे. म्हणजे सगळीकडे भरपूर पाणी राहील. टंचाई कधीच भासणार नाही.

रोज सकाळी उठल्यानंतर पाणी पिताना जलदेवतेला नमस्कार करायचा, आणि मनात मनन करायचं की मी आज कुठल्याही प्रकारे पाणी वाया घालवणार नाही.

 ll जय जलदेवता ll

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खिडकीतून दिसलं… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ खिडकीतून दिसलं… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

दोघेही तावातावाने गाडी जवळ आले. त्याने उजवीकडचे आणि तिने डावीकडचे दार जोरात उघडले. दोघेही एकमेकांशी रागारागाने बोलत होते. घरातून निघतानाच त्यांच्यात कुठल्यातरी कारणाने प्रचंड मतभेद होऊन वाद झालेला असणार. कोणीही मागे हटायला तयार नव्हतं. दोघांनीही सीट बेल्ट खसाखसा लावले. त्याने गाडी सुरू केली. त्याच्या मनातल्या रागामुळे गाडीही ‘घूमघूम” आवाज करतच सुरू झाली. अत्यंत वेगाने पार्किंग मधले वळण पार करून गाडी फाटकाबाहेर पडली.

खिडकीतून हे सारं पहात असताना माझा जीव कमालीचा धडधडत होता. इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत गाडीत सुद्धा ही दोघं भांडतच राहतील का? त्यांचं भांडण विकोपाला गेले तर? त्याचा स्टीअरींग वरचा कंट्रोल गेला तर? समोरून येणारा एखादा जड ट्रक त्याला दिसला नाही तर? काय होईल या विचाराने मी मात्र घामाघूम झाले.

का भांडली असतील ही दोघं? काय बिनसलं असेल असं त्यांच्यात?

दोघेही करिअर माइंडेड तसेच आपापल्या क्षेत्रात यशस्वी. आर्थिक दृष्ट्या संपन्न. इतक्या लहान वयात या क्लास्ड सोसायटीत तीन बीएचकेचा त्यांचा फ्लॅट, गाडी, हाय फाय जगणं. यश, कीर्ती पैसा सारं काही. भांडणाचा नक्की विषय काय असेल? त्याला मुल हवं असेल. हिला नको असेल. जबाबदारी कोणी निभावायची? वेळ कोणाकडेच नाही मग “मीच का? ” असा प्रश्न उपस्थित झाला असेल मग त्यातून दोघांचे पराकोटीचे इगोज!

किंवा तिला प्रमोशन मिळालं असेल, नव्या संधी तिच्यापुढे आरतीचं ताट घेऊन उभ्या असतील. पुन्हा एकदा अंतस्थ धुमसणारा द्वेष, मत्सर, चढाओढ. जोडीदाराचे यश पचवण्यासाठीचं मानसिक औदार्य नसणं वगैरे वगैरे किंवा असं असेल का? त्याचे वृद्ध आई-वडील, ती एकुलती एक म्हणून तिच्यावर असलेली तिच्या आई-वडिलांची नैतिक जबाबदारी, शिवाय तिच्याकडून अपेक्षित असलेल्या सामाजिक रीती परंपरेचं ओझं? मग त्यात पुन्हा “मीच का? ” या प्रश्नानं डोकं बाहेर काढणं?

दिवसभर खिडकीतून पाहिलेल्या भांडत जाणाऱ्या या सुंदर तरुण जोडप्याचा विचार मी करत बसले. स्वतःला त्यांच्या वादांची कारण शोधण्यात गुंतवून घेतलं आणि शिणवूनही घेतलं. लगेच मला माझ्या ज्येष्ठ असण्याचा अधिकार वाटू लागला. आज कालची पिढी म्हणजे अक्रस्ताळीच, डोक्यात राग घालणारीच. “एक घाव दोन तुकडे” नात्यांची तोडमोड क्षणात करणारे. यांना कुणीतरी मोठेपणाच्या नात्याने समजावले पाहिजे, “अरे! संसार म्हणजे तडजोड. एकमेकांना समजून घेणं. घ्यावी लागते माघार कधीतरी आणि घ्यावी की, थोडी वाट पाहावी, शब्दांचे विखारी बाण एकमेकांवर त्वरित सोडण्यापेक्षा मौन बाळगावं, थंडपणे समस्येची उकल करावी. ” बोलेन मी त्यांच्याशी.

संध्याकाळपर्यंत हीच टकटक माझ्या डोक्यात.

मोकळी हवा येण्यासाठी पुन्हा बंद खिडकी उघडली. तिन्ही सांजा उतरल्या होत्या. लोक घराकडे परतत होते आणि मी चकित होऊन पहातच राहिले. सकाळची ती भांडणारी दोघं आता मात्र हसत खेळत गाडीतून उतरली. भरपूर शॉपिंग केलेलं असावं. एकमेकांच्या हातातलं सामान दिलं घेतलं आणि हातात हात घालून, हवेचे मंद झोके अनुभवत थट्टा मस्करी करत ते लिफ्टपाशी गेले.

माझ्या मात्र दिवस विनाकारण खराब गेला होता पण आता या क्षणी मनातून मीही विसावलेच होते की! मनातल्या मनात त्यांच्या सुखी सहजीवनासाठी मी प्रार्थनाही करून टाकली.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ५७ / ५८ / ५९ / ६० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ५७ / ५८ / ५९ / ६० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद महाराज की जय!!!

नारद भक्ति सूत्रे ५७

उत्तरस्मादुत्तरस्मात्पूर्वपूर्वा श्रेयाय भवति ||५७ ||”

अर्थ:

भक्तीच्या या तीन प्रकारांपैकी आधी सांगितलेले प्रकार हे नंतरच्या प्रकारांपेक्षा उत्तरोत्तर जास्त कल्याणकारी आहेत.

विवेचन:

तामस गुणी भक्ति, राजस गुणी भक्ति आणि सात्विक भक्ति याबद्दल आपण मागील सूत्रात थोडा विचार केलेला आहे. तरी आपण काही मुद्दे पाहू.

तमोगुणी साधकाची भक्ति सकाम असते. तो अर्थार्थी असतो. प्रपंच आणि प्रपंचातील वस्तूंच्या भोगांचे त्याला आकर्षण असते. अनेक सुखसुविधा अर्थात उत्तम भोग भोगता यावेत म्हणून तो ईश्वराकडे वळतो.

रजोगुणी भक्तास प्रपंच आणि परमार्थ दोन्ही पाहिजे असतात. प्रपंचातील आणि परमार्थ मार्गातील विविध अनुभवांनी त्याची थोडी तयारी झालेली असते. जग नश्वर आहे, त्यातील सूखे खऱ्या अर्थांनी आपल्याला समाधान देऊ शकणार नाहीत याची अल्पशी अनुभूती त्याला आलेली असते. त्यामुळे भगवंत जसा ठेवेल तसे राहण्याचा प्रयत्न तो करीत असतो.

सत्वगुणी साधकाची भक्ति निष्काम असते. त्याला भगवंत प्राप्तीची ओढ लागलेली असते.

असा भक्त जरी प्रपंचात रहात असला तरी त्याची प्रपंचाची आसक्ती सुटलेली असते, परिणामी त्याची अंगी खरे वैराग्य येते.

याचा थोडा वेगळा विचार केला तर या तीन पायऱ्या आहेत असे आपल्या लक्षात येईल.

१. जागे होणे म्हणजे जीवनाचे ध्येय निश्चित करणे.

२. ध्येय प्राप्तीसाठी कार्य करणे. त्यासाठी आवश्यक गोष्टींचा अंगिकार आणि त्याज्य गोष्टींचा बहिष्कार. इथे साधकाला आपल्या दोषांची जाणीव होते.

३. साधक आपले दोष नाहीसे करण्याचा प्रयत्न करू लागतो.

आपला देश कृषीप्रधान आहे. वरील तीन गोष्टी करणे म्हणजे शेतातील तण, खराब गवत आणि कचरा बाहेर काढून टाकणं. यातून शेताची अर्थात मनरूपी शेताची मशागत होऊन त्यातून चित्त शुद्ध होऊ लागते. चित्तशुद्धी होणे हा परमार्थ मार्गातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. गौणी भक्तीतून साधक मुख्य भक्तीकडे जाऊ लागतो, त्याची साधना हळूहळू उच्च पातळीवर जाऊ लागते…!

जय जय रघुवीर समर्थ 

— 

नारद भक्ति सूत्रे ५८

अन्यस्मात् सौलभ्यं भक्तौ ||५८||”

अर्थ : इतर मार्गांपेक्षा भक्तीमार्ग जास्त सुलभ आहे.

विवेचन:

भगवंत प्राप्तीच्या इतर मार्गांपेक्षा भक्तीमार्ग अधिक सुलभ आहे असे सर्व संत आपल्याला सांगतात. याचा विचार आपण या आधी पंचविसाव्या सूत्रात केलेला आहे. या सूत्रात आपण भक्तिमार्गाचे सोपेपण अर्थात सुलभता पाहणार आहोत.

योगमार्गात मनुष्याला अनेक गोष्टी अत्यंतिक काटेकोरपणे कराव्या लागतात. कारण त्या मार्गात तसेच विधिविधान आहे असे आपल्या लक्षात येईल. योगमार्गात आधी शरीरावर ताबा मिळवून मग मनावर ताबा मिळवावा लागतो. त्यासाठी त्याला युक्त आहार विहार करावा लागतो. भगवंत गीतेत म्हणतात –  

निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्य हि |

मोजूनि करितो त्यास योग हा दुःख नाशन||”

(गीताई ०६. १७)

सध्याच्या काळात आहार, विहार आणि यथायोग्य झोप घ्यायला मिळणे शक्य आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यामुळे सामान्य साधकाला योगमार्ग कठीण ठरू शकतो.

आधी कथन केल्याप्रमाणे मनुष्य कर्म सुद्धा योग म्हणून करू शकतोच असे नाही. तर तो बरेच वेळा करून टाकत असतो, उरकत असतो. अशी कर्म करून मुक्ति मिळू शकेल का? अर्थात सामान्य मनुष्याला, साधकाला कर्म करणे साधू शकते, पण *कर्मयोग* साधणे मात्र जिकिरीचे ठरते.

ज्ञान मार्ग हा बुद्धीचा मार्ग आहे. याची सुरुवात साधन चतुष्ट्याने होते. साधक वैराग्यशील असावा लागतो. अनेक ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास अंगी मुरावा लागतो. इतके सगळे करून ज्ञानप्राप्ती झाली तर त्याचा अभिमान होण्याची शक्यता जास्त असते, असे सर्व संत सांगतात. सर्व संत सांगतात की भगवंताला अहंकार बिल्कुल चालत नाही.

भक्तीमार्ग हा सर्व सामान्य माणसांसाठी अगदी राजमार्गासारखा आहे. या मार्गाला अर्थात भक्तीला राजविद्या असेही म्हणतात. विद्या, संपत्ती, कुळ, वर्णाश्रम, वेदाध्ययन, कठोर तपश्चर्या इत्यादींची भक्तीला अपेक्षा नाही.

सर्वसामान्य मनुष्य आपल्या जवळच्या नातेवाइकांवर, आपल्या आवडत्या वस्तूंवर प्रेम करीत असतो. ते प्रेम कधी स्वार्थी असते तर कधी निःस्वार्थी. प्रेम म्हणजे काय हे दाखवता येत नसले तरी त्या प्रेमाची अनुभूती कमीअधिक प्रमाणात प्रत्येकाने घेतलेली असते. हेच प्रेम भगवंताकडे वळवले की त्याचे भक्तित रूपांतर होते.

संत तुकाराम महाराज या प्रेमाने भगवंत कसा जवळ येतो याचे वर्णन पुढील अभंगात करतात. — – 

*”प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी ॥१॥मनेंसहित वाचा काया । अवघें दिलें पंढरीराया ॥२॥ सत्ता सकळ तया हातीं । माझी कींव काकुलती ॥३॥ तुका म्हणे ठेवी तैसें । आम्ही राहों त्याचे इच्छे ॥४॥”*

(अभंग क्रमांक 432, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

जय जय रघुवीर समर्थ 

– – – 

नारद भक्ति सूत्रे ५९

प्रमाणान्तरस्यानपेक्षत्वात् स्वयं प्रमाणत्वात् (च) ||”

अर्थ : भक्ति कोणत्याही प्रमाणावर म्हणजे पुराव्यावर अवलंबून नाही तर ती स्वतः सिद्ध आहे, म्हणून ती इतर मार्गांपेक्षा सोपी आहे.

विवेचन : कर्मयोग, ज्ञानयोग यांच्याशी तुलना करताना नारद मुनी २६ व्या आणि ३० व्या सूत्रांत याचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये भक्ति स्वयं फलप्रभा आहे असे म्हटले आहे. अर्थात तिला कोणतेही प्रमाण देण्याची गरज नाही.

प्रमा म्हणजे ज्ञान. ज्यामुळे ज्ञान होते, ते प्रमाण. प्रमाणा मध्ये ज्ञानाचा उगम होतो. भारतीय तर्कशास्त्रात तीन प्रमाण मानली गेली आहेत.

१. प्रत्यक्ष

२. अनुमान

३. शब्द किंवा आप्तवाक्य

  1. इंद्रियांना अनुभवाला येणाऱ्या ज्ञानाला प्रत्यक्ष म्हणतात. (Perception)
  2. निरीक्षणावर आधारित निष्कर्ष काढणे म्हणजे अनुमान.
  3. ज्याच्यावर आपला विश्वास आहे, जो आपला हितचिंतक आहे, निःस्वार्थी आहे, त्याचे म्हणणं आपण मान्य करतो. खरे मानतो, ते आप्त वाक्य.

परमार्थ मार्गात जर कर्ममार्ग, ज्ञानयोग अथवा योगमार्गाने जायचे असेल त्यासाठी किमान त्या त्या विषयाचे प्राविण्य अथवा पात्रता (अर्हता) अंगी येणे गरजेचे ठरते.

याउलट भक्तिमार्गात कसलीच लौकिक पात्रता लागत नाही. अनेक संत निरक्षर होते, अनेक संत श्रीमंत होते, अनेक संत अतिशय गरीब होते, काही संतांनी एका नामस्मरणाशिवाय कोणतेही साधन केलेलं नाही. भक्त प्रल्हाद राक्षस कुळात जन्माला आला, अनेक स्त्री संत आहेत. रामाच्या प्रमुख भक्तांपैकी विभीषण राक्षस, हनुमंत वानर तर शबरी वनवासी होती, पण तिघांनी आपापल्या परीने भक्ति करून रामाची प्राप्ती करून घेतली. रामाने तर हनुमतांचा भरतासारखा भाऊ म्हणून गौरव केला.

ज्याप्रमाणे मातेला आपल्या वात्सल्याचे प्रमाण देण्याची गरज वाटतं नाही, त्याप्रमाणे भक्ताला आपल्या भक्तीचे प्रमाण देण्याची गरज वाटतं नाही.

जय जय रघुवीर समर्थ 

– – – 

नारद भक्ति सूत्रे ६०

शान्तिरूपात् परमानंदरूपाच्च ||६०||”

अर्थ : भक्तीमध्ये स्वभावतः शांति असल्याने आणि ती अपार आनंद रूप असल्यामुळे ती इतर साधनांपेक्षा सुलभ आहे.

विवेचन : सर्वसामान्य मनुष्य आपल्या आयुष्यात कधी प्रयत्नाने तर कधी प्रारब्धाने अनेक गोष्टी मिळवतो. पण मनःशांती मिळवणं त्याला जमतेच असे नाही.

बालपणी त्याला नवनवीन खेळणी मिळाली की सुखशांती मिळेल असे वाटते, थोडा मोठा झाला की त्याला रंगीबेरंगी कपडे, चैनीच्या वस्तू मिळाल्या की सुखशांती मिळेल असे वाटते, मग ही मालिका संपता संपत नाही आणि मनुष्याला शांती लाभत नाही…

अनुदिनी अनुतापें तापलो…! “ अशी त्याची स्थिती होऊन जाते. याचा अनुभव जवळजवळ प्रत्येकाने कमीअधिक प्रमाणात नक्की घेतला असेल.

साधक भक्तिमार्गात लागला की मात्र त्याला शांतीचा लाभ होऊ लागतो. “जितकी भक्ति तितकी प्राप्ति” या न्यायाने तो जितका भक्ति मध्ये रमतो, तितका तो मनाने शांती अनुभवू लागतो. भक्ति म्हणजे शीतगृह असे म्हटले तरी वावगे होऊ नये. तिथे गेले की कोणी कसाही असो, त्याला शांती मिळाल्याशिवाय रहात नाही. भक्तिसाधना दृढ होऊ लागली की साधक निःशंक आणि निर्धास्त होऊ लागतो. आपली काळजी घेणारे, आपल्याला खंबीर आधार देणारे आपले सद्गुरू आहेत, याची त्याला खात्री पटते. साधनेच्या पुढील पडावात त्याच्या लक्षात येते की सर्व काही भगवंतच करतो. आपल्या हातात काहीच नाही आणि भगवंत माझ्या भल्या साठीच सर्व काही करीत आहे, अशी त्याची धारणा होऊ लागते. त्यामुळे तो तटस्थपणे भगवंताची लिला पाहू लागतो. मग त्याचा आनंद, त्याचे समाधान, त्याची शांती कधीही भंग पावत नाही. संत तुकाराम महाराज याचे वर्णन पुढील अभंगात करतात.

आनंदाचे डोही आनंदतरंग |

आनंदचि अंग आनंदाचे || धृ. ||

*

काय सांगों जालें कांहीचियाबाई 

पुढें चाली नाहीं आवडीनें || ||

*

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा |

तेथिचा जिव्हाळा तेथें बिंबे || ||

*

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा |

अनुभव सरिसा मुखा आला || ||

(अभंग क्रमांक २५८२, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

जय जय रघुवीर समर्थ

– भक्ती सूत्र क्र. ५७ / ५८ / ५९ / ६० 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “‘वाघनख’ – – NOM DE GUERRE!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “वाघनख’ – – NOM DE GUERRE!” ☆ श्री संभाजी बबन गायके

कर्नल विश्वासराव शिंदे 

दैत्य हिरण्यकश्यपला मारायला नृसिंह अवतारात देवाला हातांच्या बोटांच्या नखांचा वापर करावा लागला… असाच एक राक्षस कलियुगात जन्माला आला होता… यावेळी त्याने ‘अफझल’ म्हणजे ‘श्रेष्ठ(? )’ असं नाव धारण केलं होतं! कलियुगातल्या नृसिंहानेही अर्थात स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेबांनीही नखांनीच अफझलची आतडी बाहेर काढून त्याला यमसदनी धाडले! फक्त ही नखं महाराजांच्या हातांच्या बोटांची नव्हती… बोटांमध्ये अंगठीसारखी घातलेली… धातूची होती! माजलेल्या अफजलचं पोट फाडायला मानवी नखं पुरेशी ठरली नसती… म्हणूनच धातूच्या वाघनखांची योजना महाराजांनी केली होती! हे छोटंसं शस्त्र डोंगराएवढा शत्रू मातीत घालायला पुरेसे ठरले होते!

वर्ष १९८५. भारतीय सैन्यात मराठा लाईट इन्फंट्रीची २१वी बटालियन उभारण्यात आली… भारतीय सैन्यातील विविध रेजिमेंटस, बटालियन्सचा विचार करता ही बटालियन तशी ‘तरुण’ किंवा नवी कोरी म्हणावी अशी होती. सीमापारचे शत्रू तर आहेतच, परंतू देशांतर्गत शत्रू सुद्धा काही कमी नाहीत. उत्तर-पूर्वेकडे देशाला विशिष्ट असा शेजार लाभलेला आहे. विघटनवादी शक्ती या देशांच्या सीमावर्ती भागांत तसेच त्यांच्या सीमांत लपून भारताविरोधात सशस्त्र कारवाया करीत असतात.

घनदाट जंगले, हिंस्र श्वापदे, विषारी कीटक, सततचा पाऊस यांची पर्वा न करता या भागांत आपल्या सैनिकांना काम करावे लागते. इथं समोरासमोरची लढाई लढली जाऊच शकत नाही. इथं आवश्यकता आहे गनिमी काव्याची… गुरील्ला पद्धत! गनिम-ई-कावा म्हणजे शत्रूचे हुलकावणी देणारे युद्ध आणि गुर म्हणजे युद्ध आणि ईला म्हणजे छोटे… छोटे युद्ध! यामागे कमी संख्येत, अचानकपणे प्रकट होत मोठ्या सैन्यावर वायुवेगाने हल्ला करून निघून जाणे, अशी पद्धत असते. आणि हीच पद्धत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा प्रमुख भाग होती, असं दिसून येतं.

१९९०. उत्तर भारतात वाढता विघटनवाद लक्षात घेऊन खास उत्तर-पूर्वी राज्यांसाठी असं स्वतंत्र दल उभारण्याची गरज भासली. त्यावेळी लेफ्टनंट जनरल विजय ओबेराय (सेवानिवृत्त) त्यावेळी मराठा लाईट इन्फंट्रीचे कर्नल होते आणि त्यांच्याकडे एक बटालियन स्पेशल फोर्स म्हणून प्रशिक्षित करण्याचे दायित्व दिले गेले… त्यांनी २१वी बटालियन निवडली!

गुरील्ला पद्धतीच्या युद्धासाठी सैनिकांना विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देणे अनिवार्य असते. म्हणून प्रशिक्षणाचा स्तर अत्युच्च ठेवावा लागतो. या दलाचे नावच स्पेशल फोर्सेस अर्थात विशेष सामर्थ्य असणारी दले असे आहे. भारतीय सैन्यात शिपाई म्हणून भरती होणे हीच मोठी कठीण बाब असते. स्पेशल फोर्सेस मध्ये या भरती झालेल्या, प्रशिक्षित सैनिकांनाच सहभागी करून घेतले जाते. विविध रेजिमेंटस, बटालियन्स मधील सैनिक आणि अधिकारी या दलांत प्रवेश करण्यासाठी स्वयंप्रेरणेने येतात… कारण यांत निवड म्हणजे एक मोठा बहुमान समजला जातो!

प्रशिक्षण कालावधी तीन ते पाच महिन्यांचा असू शकतो. यात पहिले पस्तीस दिवस सततचे शारीरिक प्रशिक्षण, डोळ्यांवर पट्टी बांधून एकत्रित येऊन कवायती करणे इ. चा समावेश तर असतोच. त्याचबरोबर स्वयंपाक करणे, संदेशवहन प्रशिक्षण, इमारती उध्वस्त करणे, तातडीचे वैद्यकीय सहाय्य देणे, अंधारातून, पाण्यातून, जंगलातून रस्ते शोधणे, आणीबाणीच्या स्थितीत अन्न, पाणी शोधणे, विषारी प्राणी हाताळणे आणि शस्त्रे चालवणे. चार चार दिवस पिण्याच्या पाण्याशिवाय राहणे, एक लिटर पाण्यावर तीन दिवस काढणे, सात सात दिवस न झोपता काम करीत राहणे! पाठीवर किमान दहा किलो वजन बाळगणे तर नेहमीचे. चालणे तर असतेच परंतू संपूर्ण युद्धसामग्री घेऊन दहा ते चाळीस किलोमीटर्स चालणेसुद्धा नेहमीचे. विविध भाषा गरजेनुसार शिकवल्या जातात. सैन्यात भरती होताना आणि पुढे प्रत्यक्ष सेवेत खडतर आयुष्य जगत असलेले सैनिकही या प्रशिक्षण सोडून जाण्याचे प्रमाण मोठे असते. प्रशिक्षणाच्या या टप्प्यावर प्रशिक्षण सोडून जाण्याचे प्रमाण सुमारे वीस टक्के असते.

पंचेचाळीसाव्या दिवसापासून आणखी कठीण टप्पा येतो. छत्तीस तास सतत व्यायाम, कसरत करणे, शत्रूच्या प्रदेशात घुसणे तिथून बाहेर पडणे याचा सराव, तीस किलोचे युद्धसाहित्य, चाळीस किलोचे इतर साहित्य घेऊन चालणे दहा किलोमीटर्स वेगाने चालणे, चाळीस ते पंच्याऐंशी किलो वजनाच्या जड वस्तू हलवणे, इकडून तिकडे घेऊन जाणे, पाण्यात बुडी मारून राहणे शिकवताना हात पाय बांधले जातात, पाण्यासंबंधी प्रशिक्षणात पहिल्या सोळा तासांत पिण्यासाठी पाण्याचा एक थेंब किंवा अन्नाचा एक कण दिला जात नाही. आणि या अवस्थेत स्मरण शक्ती, निरीक्षण शक्तीची परीक्षा घेतली जाते. हे झाल्यावर पुन्हा दहा किलोमीटर्स चालणे, सहा तास व्यायाम करणे, शत्रूवर छापा घालणे, जंगलात वास्तव्याची तयारी करणे, जखमी सैनिकांना संकटातून घेऊन येणे इत्यादी इत्यादी गोष्टी सर्वसाधारणपणे शिकवल्या जातात.

५६व्या दिवशी, सतरा किलो वजन घेऊन १०० किलोमीटर्स अंतर चालणे… यासाठी तेरा ते पंधरा तासांचा वेळ लागू शकतो… शिवाय इतर आणखीही प्रशिक्षणे असतात… प्रत्येक मिनिट आणि मिनिट शिकत राहावे लागते… आणि शेवटी अतिरेकी विरोधी कारवाईचे आव्हानात्मक प्रशिक्षण दिले जाते. वाळवंट, बर्फाळ प्रदेश, जंगली प्रदेश, पर्वतीय प्रदेश यांमधील कारवायांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम असतातच. शिवाय विमानातून उडी घेत शत्रू प्रदेशात शस्त्रे घेऊन उतरणे हा भागही असतोच…

एवढे सर्व केल्यावरच Maroon Berete प्राप्त होते… काचेच्या पेल्यातील पेय पिऊन झाल्यावर त्या प्याल्याचा तुकडा चाऊन खाल्ला की प्रशिक्षण पूर्ण केले असे समजले जाते. आणि मगच स्पेशल फोर्सेसचा लढवय्या तयार होतो! परंतू सर्वांत महत्वाची बाब म्हणजे स्वत:ची ओळख लपवून म्हणजे जवळजवळ अदृश्य राहूनच या योद्ध्यांना कामगिरी करावी लागते… They don’t exist so that we can! अर्थात इतरांसाठी ते अस्तित्वात नसतातच. पण त्यांचे हे अस्तित्वात नसणे हे देशातील नागरीकांच्या अस्तित्वात राहण्यासाठी असते!

२१ मराठा चे रुपांतर स्पेशल फोर्समध्ये करण्याचे ठरल्यावर निवड चाचणी झाली. सुमारे दोनशे सैनिक आणि काही अधिकारी स्वयंस्फूर्तीने पुढे आले. यांपैकी केवळ १७ टक्के लोकच प्रशिक्षणात टिकले! विशेष बाब म्हणून इतरांना दुसरी संधी देण्यात आली… तरीही हे प्रमाण पंचवीस टक्क्यांच्या वर जाऊ शकले नाही… इतके प्रशिक्षण जबर होते!

२१ मराठा मध्ये त्यावेळी लेफ्ट. कर्नल राजीव परमार नावाचे अनुभवी उप-प्रमुख अधिकारी कार्यरत होते. चाळीस वर्षे वय असलेले परमार साहेब पदोन्नती घेऊन इतर बटालियन, रेजिमेंटमध्ये जाऊ शकले असते… पण जिथे माझे सैनिक तिथेच मी असेन या दृढ संकल्पामुळे परमार साहेबांनी स्पेशल फोर्समध्ये स्वयंप्रेरणेने नाव नोंदवले… प्रशिक्षणात पद आणि अनुभव याचा विचार न करता सर्वांना समान प्रशिक्षण घ्यावे लागते… या कठीण प्रशिक्षणादरम्यान परमार साहेबांना मृत्यूने गाठले!

२१ मराठाचे स्पेशल फोर्सेस दलात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी रत्नागिरीतल्या मोरावणे गावात जन्मलेल्या कर्नल विश्वासराव भास्करराव शिंदे साहेबांच्या समर्थ खांद्यांवर देण्यात आली. कर्नल शिंदे यांच्या रूपाने त्यांच्या घरातील ही पाचवी पिढी सैन्यात कार्यरत होती. त्यांचे वडील श्री. भास्करराव शिंदे Bombay Sappers मध्ये होते किंबहुना त्यांनीच Bombay Sappersची ४११, Para Field Company उभारली होती!

कर्नल विश्वासराव शिंदे साहेबांनी पुण्याच्या वाडिया महाविद्यालयातून पदवी घेऊन पुढे Indian Military Academy, देहरादून येथे सैन्याधिकारी प्रशिक्षणास प्रवेश मिळवला व त्यातून ते १९७२ मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या १४व्या बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले होते. सध्या सेवानिवृत्त असलेल्या शिंदे साहेबांनी वयाच्या ६८व्या वर्षी विमानातून १५०० फुटावरून parachute jump करून दाखवली होती. अशा अनेक कामगिरी त्यांच्या नावावर आहेत. विविध पदांवर सेवा बजावलेल्या कर्नल शिंदे साहेबांनी महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष दलास प्रशिक्षण देण्याची जबाबदारी अत्यंत प्रभावीरीत्या पार पाडलेली आहे!

२१ मराठा बटालियन स्पेशल फोर्स मध्ये रुपांतरीत करण्यासाठी शिंदे साहेबांनी पूर्ण ताकदीनिशी काम केले… आणि सामान्य जवानांतून विशेष योद्धे निर्माण केले.. आणि या शेकडो जवानांनी, अधिका-यांनी मणिपूर, म्यानमार सीमा इत्यादी ठिकाणी अनेक बलिदाने देत जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला करून त्यांची हत्या करून म्यानमारमध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यांचा शोध घेऊन म्यानमार मध्ये घुसून त्यांना संपवण्याची कामगिरी या फोर्सने २०१५ मध्ये केली होती… Surgical Strike नावाने ही मोहीम प्रसिद्ध आहे. एखादा टोकदार भाला जसा अजिबात आवाज न करता थेट, अचूकपणे लक्ष्य भेदतो… यात चूक करण्याची सुतराम संधी नसते… त्याला Silent Spear म्हणतात… म्हणूनच या २१ स्पेशल फोर्सळा Silent Spear असंही म्हणतात. २०२३ पर्यंत सुमारे ३३ जवान, अधिकारी यांनी या प्रदेशात बलिदान दिले असून तीन कीर्ती चक्रे, १७ शौर्य चक्रे, ५४ सेना मेडल्स, १९५ उत्कृष्ट कामगिरी प्रशस्तीपत्रके अशी कमाई केलेली आहे. होय, शौर्यासाठी मिळवलेली पदके, पारितोषिके मोठ्या अभिमानाने सांगितली जातात… पण यासाठी प्राणांचे बलिदानही द्यावे लागते!

देशासाठी बलिदान देणारे हुतात्मा कर्नल संतोष महाडिक हे याच दलाचे अधिकारी होते. प्रसिद्ध सैन्याधिकारी ब्रिगेडीअर सौरभ सिंग शेखावत (निवृत्त) यांनी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात मोठी कामगिरी करून दाखवल्याचे सर्वश्रुत आहेच!

भारतीय सैन्यातील या स्पेशल फोर्सेस वेगवेगळ्या टोपणनावांनी (moniker) ओळखल्या जातात, त्यांची स्वत:ची परिचय-चिन्हे आहेत. Red Devils, Predators, Russel’s Vipers, Mighty Daggers, Pirates, Mountain Rats, Desert Scorpions, Vipers, Dirty Dozens अशी ही विविध नावे आहेत… याला Nom De Guerre असं संबोधन आहे. म्हणजे युद्धातलं नाव. २१ मराठा बटालियनच्या स्पेशल फोर्सचं असं नाव देण्याची वेळ आली तेंव्हा कर्नल विश्वासराव शिंदे साहेबांनी एक मराठी, आगळंवेगळं आणि अत्यंत अभिमानास्पद नाव सुचवलं… वाघनख!

जय हिंद! जय हिंद की सेना!

 

माहिती संकलक व लेखक : संभाजी बबन गायके.

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares