मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गूगल मॅप ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य? 

☆ गूगल मॅप ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

आपण कार चालवत असताना गुगल मॅप वापरतो. गुगल मॅपने चालताना जर ड्रायव्हर मॅपप्रमाणे वळण न घेता पुढे गेला, तर गुगल मॅपचा निवेदक रागवत नाही. चुकीवर बोलत बसत नाही.  तर मॅप  “रिरुट”  करतो.  पुन्हा योग्य आणि जवळचा मार्ग गुगल मॅप सांगतो.

जीवनातील असंच एखादं वळण चुकलं, तर त्याची चूक काढत बसण्यापेक्षा 

आपणही स्वतःला किंवा आपल्या संपर्कातील लोकांना  “रिरुट”  करायला शांतपणे आणि सहजपणे “भाग” पाडले पाहिजे.

 झालेल्या चुकांवर भर देऊन निराशाजनक वातावरण तयार करण्यापेक्षा 

“रिरूट ” करून आशादायी वातावरण तयार करणे कधीही चांगले…

संग्राहक –  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मधुलिका…सावली एका वीर योद्ध्याची !- भाग-2…. संभाजी गायके ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ??‍?

☆मधुलिका…सावली एका वीर योद्ध्याची ! – भाग-2 ….संभाजी गायके ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित  ☆ 

( तिथून जी पराक्रमाची घोडदौड सुरू झाली ती अगदी काल-परवापर्यंत म्हणजे अगदी भारताचे पहिले C.D.S. अर्थात चीफ ऑफ़ डिफेन्स स्टाफ पदी निवड होईतोवर.) इथून पुढे —–

त्यांच्या उण्यापु-या ३७ वर्षांच्या सैन्य-जीवनातील ३० वर्षांची मी साक्षीदार ! संसारवेलीवर दोन फुलांसारख्या मुली दिल्या देवाने ! अक्षरश: शेकडो धोकादायक, गुप्त सैनिकी-कारवायांमध्ये साहेब अगदी फ्रंटवर असत. पण त्याची झळ त्यांनी आमच्या संसाराला लागू दिली नाही. कश्मिरात आणि अन्य ठिकाणी पहाडांवर केलेल्या, जीवावर बेतू शकणा-या काऊंटर इन्सर्जन्सी कारवाया,  चीन सीमेवरचा विशिष्ट संघर्ष असो, सर्जिकल स्ट्राईक, म्यानमार कारवाई असो, साहेबांनी या कानाची खबर त्या कानाला लागू दिली नाही. सगळं यथासांग झाल्यावर वर्तमानपत्र, बातम्यांतून साहेबांचा पराक्रम कळायचा. पण काळजात काळजीचे ढगही दाटून यायचे. पण ते सीमेवर गुंतलेले असताना ‘नो न्यूज इज गुड न्यूज’ म्हणत दिवस ढकलायचे याची सवय झाली होती. कधी भारतीय सैनिक, अधिकारी युद्धात कामी आल्याच्या बातम्या आल्या की हृदय पिळवटून निघायचे ! त्यांच्या तरूण विधवांची समजूत काढता-काढता जीव कासावीस व्हायचा. ‘ आपल्याही कपाळीचं कुंकु असं अकाली विस्कटलं तर?’ हा विचार आत्म्यास चिरत जायचा ! साहेब जस-जसे मोठ्या पदांवर चढत गेले तस-तसे त्यांच्यासोबत राहण्याची संधी मिळत गेली. मुलींचे शिक्षण, त्यांचे  विवाह इ. आघाडी सांभाळण्यात मी तरबेज झालेच होते. पण आता आणखी मोठा संसार करण्याची, नव्हे सावरण्याची जबाबदारी नशिबाने मिळाली. देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या जवानांच्या विधवा पत्नींना नुकसानभरपाईसोबत आणखीही काही हवं असतं. नव्हे, समाज त्यांचं देणं  लागतो…मानसिक आधार, समुपदेशन आणि संसार सांभाळण्यासाठी आर्थिक पाठबळ देऊ शकेल असे व्यावसायिक कौशल्य-प्रशिक्षण ! त्यांच्या इतर  समस्या तर वेगळ्याच. पण या कामात माझी मानसशास्त्रातील पदवी, मी आधी कॅन्सरपीडितांसाठी केलेल्या कामाचा अनुभव या बाबी मदतीला आल्या. जीव ओतून काम तर करतच होते..एवढ्या मोठ्या सैन्य-अधिका-याची पत्नी…शोभली तर  पाहिजेच ना ? साहेबांनी देशात-परदेशात अनेक मानसन्मान मिळवले. त्यांना चार स्टार मिळाले होते..आणि ते स्वत: एक स्टार…मिळून फाईव स्टार ! युनिफॉर्मवरील पदकांची चमक तर कुबेराचे डोळे  दिपवणारी ! प्रदीर्घ सैन्यसेवा आणि प्रदीर्घ संसार…दोन्ही आघाड्यांवर बिपिनजी विजेता. दोन्ही मुली म्हणजे जीव की प्राण ! आणि मी? कर्तव्याच्या म्यानातली मी दुसरी तलवार असले तरी मला त्यांनी पहिल्या तलवारीच्या जखमा कधीच सोसायला लावल्या नाहीत. पहाडी युद्धातले तज्ज्ञ असलेले बिपिनजी माझ्यामागे पहाडासारखे उभे असत. मृत्यूशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले बिपिनसाहेब २०१५ मध्ये एका भयावह हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूशी मिलिट्री-हॅंडशेक करून आलेले होते. परंतू पुढे कधीही हेलिकॉप्टरमध्ये बसायला कचरले नाहीत. ते मोहिमेवर निघाले की त्यांच्यासोबत जायचा हट्ट करावसा वाटे…पण ते शक्य व्हायचेच नाही. सेवानिवृत्ती झाली न झाली तोच भारतमातेच्या सेवेची महान जबाबदारी शिरावर येऊ घातली…

ऑल्वेज अ सोल्जर या न्यायाने बिपिनजींनी ती स्विकारलीही. आता मात्र मला माझ्या साहेबांसोबत जाण्याचा अधिकार आणि संधीही मिळू लागली…आणि मी ती आनंदाने साधतही होते….शिवाय मी AWWA (Army Wives Welfare Association)ची प्रमुखही झाले होते…साहेबांना आणि मलाही देशासाठी, सैनिकांसाठी, त्यांच्या विधवांसाठी, मुला-बाळांसाठी आणखी खूप काही करायचे होते…वैधव्य आणि एकाकीपणा कपाळी आलेल्या सैनिकपत्नींचे दु:ख मी जवळून अनुभवले होते. ती भिती मी अनुभवली होती…एकदा तसा प्रसंग माझ्यावर येता-येता राहिला होता. म्हणून मी सतत साहेबांसोबत राहण्याचा हट्ट धरत असे आणि तशी अधिकृत संधीही मला  मिळत असे..

८ डिसेंबरलाही मी साहेबांसोबत होते…आणि आता त्यांच्यासोबतच अनंताच्या प्रवासाला निघाले आहे..त्यांच्या हातात हात घालून !

(सैनिक देशासाठी लढत असतात, बलिदान देत असतात. त्यांच्या कुटुंबियांचाही त्याग मोठा. भारतमातेचे वीर सुपुत्र बिपिनजी रावतसाहेब आणि त्यांच्या सहका-यांना भावपूर्ण नमन करताना रावतसाहेबांच्या धर्मपत्नी मधुलिका बाईसाहेबांनाही सॅल्यूट आणि भावपूर्ण श्रद्धांजली !

—-जय हिंद ! जय हिंद की सेना ! )

समाप्त

(उपलब्ध माहितीवरून,संदर्भावरून आणि जरूर त्या ठिकाणी काल्पनिकतेचा आधार घेऊन श्रद्धापूर्वक केलेले स्वलेखन:)

लेखक : – संभाजी गायके. ९८८१२९८२६०)

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख ☆ वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया: गार्गी वाचकन्वी ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

 ? वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया ?

☆ गार्गी वाचकन्वी ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

गार्गी वैदिक काळातील अत्यंत विद्वान स्त्री होती. गर्ग गोत्रात जन्म झाला, म्हणून तिचे नाव गार्गी. वाचकनू ऋषींची‌ कन्या म्हणून तिला गार्गी वाचकन्वी  म्हणतात. ती प्राचीन भारतीय तत्वज्ञ होती. वैदिक साहित्यात तिला एक महान नैसर्गिक  तत्वज्ञानी, वेदांची अभ्यासक आणि ब्रह्म विद्येचे ज्ञान असलेली व्यक्ती ब्रह्मवादिनी म्हणून देखील ओळखले जाते. तिने ऋग्वेदात अनेक स्तोत्रे लिहिली. तिने आजीवन ब्रह्मचर्य पाळले . तिची कुंडलिनी शक्ती जागृत  होती. गार्गी ही वैदिक युगातील पहिली स्त्री तत्वज्ञ होती. ती मिथिला शहरात राहात असे.

एकदा राजा जनकाने ब्रम्हसभेचे आयोजन केले. सर्व नामवंत विद्वानांना आमंत्रण दिले. या सर्वात श्रेष्ठ विद्वान कोण हे शोधण्यासाठी त्याने एक युक्ती केली. 1000 गाईंच्या शिंगांना दहा तोळे  सोने बांधले आणि आणि सांगितले तुमच्या सगळ्यात उत्तम विद्वान असेल त्यांनी या गायी न्याव्या. कुणाची हिम्मत होईना. याज्ञवल्क्य ऋषि आत्मविश्वासाने उठले आणि त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले या सर्व गाई घेऊन जा. सर्व विद्वानांनी अडवले व तुमचे श्रेष्ठत्व सिद्ध करा असे सांगितले. याज्ञवल्क्य म्हणाले मला गायींची गरज आहे. त्या घेत आहे. मी तुमच्याशी वाद-विवाद करू शकतो. सर्व ऋषींच्या प्रश्नांना त्यांनी योग्य उत्तरे दिल्यामुळे सर्वजण गप्प बसले पण जनक राजाच्या परवानगीने गार्गी उभी राहिली तिनेअतिशय काळजीपूर्वक व सखोल अभ्यासावर आधारित असे अनेक प्रश्न विचारले. त्यांची योग्य उत्तरे तिला मिळाली

तिने विचारले पाण्यामध्ये सगळे पदार्थ मिसळतात मग हे पाणी कशामध्ये मिसळते?, ऋषी उत्तरले पाणी शेवटी हवेत शोषले जाते. तिने विचारले, हवेत कुठे मिसळते? ऋषी म्हणाले अवकाशाच्या जगात मिसळते .आता तिने त्यांच्या प्रत्येक उत्तराला प्रश्नात बदलले. आणि विचारले, अशाप्रकारे गंधर्व लोक, आदित्य लोक ,चंद्रलोक, नक्षत्र लोक, देवलोक, इंद्रलोक, प्रजापती लोक, आणि ब्रह्म लोकांपर्यंत पोचते. शेवटी ब्रम्ह लोक कोणामध्ये आहे?

तिचा दुसरा प्रश्न असा होता की आकाशाच्या वर जे काही आहे आणि पृथ्वीच्या खाली जे काही आहे  आणि या दोघांच्या मध्ये जे काही आहे या दोघांच्या मध्ये बरंच काही घडतं तर हे दोघे कशात गुंतलेले आहेत? तिचा पहिला प्रश्न स्पेस आणि दुसरा प्रश्न टाईम संबंधी होता. तिने विचारले संपूर्ण विश्व कुणाच्या आधीन आहे? त्याचे उत्तर मिळाले अक्षर तत्त्वाचे. ऋषीनी वर्णमालेबद्दल सविस्तर माहिती दिली. तिचा आणखी एक प्रश्न होता आत्मज्ञानासाठी ब्रह्मचर्य आवश्यक आहे.  लग्नाचे बंधन नको. कारण बंधनामुळे इतरांची काळजी घ्यावी लागते. ऋषी उत्तरले लग्न करणे, इतरांची चिंता करणे हे बंधन नाही. संपूर्ण जग निस्वार्थी प्रेमाचा पुरावा आहे. सूर्याची किरणे, उष्णता, आणि प्रकाश पृथ्वीवर पडला तर जीव जन्माला येतो. ही पृथ्वी सूर्याकडे काहीही मागत नाही. तिला फक्त सूर्याच्या प्रेमात कसे फुलायचे एवढेच माहीत असते. सूर्य सुद्धा पृथ्वीवर वर्चस्व गाजवत नाही. प्रकृती आणि पुरुष यांचे कर्मयोग आणि जीवन हे त्यांच्या खऱ्या प्रेमाचे फळ असते. गार्गी चे पूर्ण समाधान झाले. पण पुराणात असा उल्लेख आहे की शेवटी तीच जिंकली. तिला याज्ञवल्क्य यांच्या बुद्धिमत्तेबद्दल आदर होता. तिने त्यांचे श्रेष्ठत्व मान्य केले. व हेच सर्वात श्रेष्ठ विद्वान आहेत असे सांगून गायी नेण्यास सांगितले. या दोघांच्यामध्ये जो संवाद झाला त्याच्यावर योग याज्ञवल्क्य हा योगावरील शास्त्रीय ग्रंथ तिने लिहिला. अशी ही असामान्य विदुषी आणि अतुलनीय प्रतिभावंत गार्गी. तिला कोटी कोटी कोटी प्रणाम.

 

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ जिना…कवी वसंत बापट ☆ रसग्रहण.. श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? काव्यानंद ?

☆ जिना…कवी वसंत बापट ☆ रसग्रहण.. श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

जिना

कळले आता घराघरातून

नागमोडीचा जिना कशाला

एक लाडके नाव ठेवुनी

हळूच जवळी ओढायला

जिना असावा अरुंद थोडा

चढण असावी अंमळ अवघड

कळूनही नच जिथे कळावी

अंधारातील अधीर धडधड

मूक असाव्या सर्व पायऱ्या

कठडाही सोशिक असावा

अंगलगीच्या आधारास्तव

चुकून कोठे पाय फसावा

वळणावरती बळजोरीची

वसुली अपुली द्यावी घ्यावी

मात्र छतातच सोय पाहुनी

चुकचुकणारी पाल असावी

जिना असावा असाच अंधा

कधी न कळावी त्याला चोरी

जिना असावा मित्र इमानी

कधी न करावी चहाडखोरी

मी तर म्हणतो-स्वर्गाच्याही

सोपानाला वळण असावे

पृथ्वीवरल्या आठवणीनी

वळणावळणावरी हसावे

          – वसंत बापट

‘जिना’ या एका साध्या शब्दावरचे कवी वसंत बापट यांचे काव्य वाचताना कवी केशवसुत यांच्या,’ साध्याही विषयात आशय मोठा किती आढळे ‘ या ओळींची आठवण होते.एक मजल्यापेक्षा अधिक मजल्यांच्या घराने जिना निर्माण केला आणि तो कवितेचा विषय बनला.

ही कविता लिहिताना पहिल्याच कडव्यात कविने जिनाच्या बारशाची तयारी दाखवली आहे.आपल्या घरातल्या जिन्याला आपण आपलं आवडत नाव ठेवावं .त्या नावाचे स्मरण होताच जिन्यात जाऊन बसावयासाठीच  त्या नावाची गरज !प्रत्येक घराला जिना असावा असे कवीला वाटते. हा जिना नागमोडी वळणाचा असावा कारण असे वळण घेताना लहानपणापासून सर्वांना वेगळे वाटते. वळणातला वेगळेपणा वर्णन न करता येण्यासारखा असतो. जिना सावकाशपणे चढता यावा,जातायेता कुणीतरी धक्का द्यावा अशी ही कल्पना, जिना अरुंद असावा असा विचार करणाऱ्या कविच्या मनात असावी. तो थोडा अवघड असावा म्हणजे जिना चढताना बसता येते,जिन्याशी बोलता येते. जिन्यातला अंधारही कविला हवासा वाटतो.अंधारात धडपडत चालणे हे सर्व कविच्या मनाला गुदगुल्या, करणाऱ्या गोष्टी वाटतात.

कधी कधी कविता पायरीवर एकांतात बसून हितगुज करावेसे वाटणे कवीच्या,’ मुक्या पायऱ्या’ या शब्दातून व्यक्त होते.जिना चढताना पडणे,खरचटणे आपल्याला सहन करावे लागते पण लोकांचे हे वागणे  सोशिक जिना सहन करतो अशी कवी कल्पना आहे.जिन्याच्या वळणावळणाच्या जिन्यावर चालणारी गुप्त चर्चा, देवाण घेवाण, लाडिक बळजोरी बरोबर नाही असे वाटून जिन्यावरच्या छतावर आडोशाला बसलेली पाल चुकचुकत असावी,तिचे ते चुकचुकणेही गरजेची मानणारा कवि वळणाला  महत्त्व देतो. जिन्याला आंधळा म्हणतो.

 जिना प्रकारात कविला ‘ स्वर्ग सोपान’ अधिक आवडतो कारण स्वर्गात पटकन जाता येत नाही.कवितेच्या या विचारात कुंतीच्या गजगौरी व्रत उद्यापनासाठी स्वर्गातला हत्ती आणण्याकरिता अर्जुनाने तयार केलेल्या बाणांच्या जिन्याची आठवण होते

वसंत बापटांची अतिशय सुंदर अशी ही कविता आयुष्यातील चढ उतारांचे रूपक ठरावी अशी आहे.जिन्याचे वर्णन करताना कविनी वापरलेले शब्द आयुष्यात येणाऱ्या प्रसंगाशी तंतोतंत जुळणारे वाटतात.

आजच्या फ्लॅटसिस्टिमच्या जमान्यात लिफ्टचा वापर करणारे या कवितेतील शब्दानंदाना नक्कीच मुकतील.

आयुष्याचे चढउतार  समजण्यासाठी जिना हवा आणि तोही कवि श्री. वसंत बापट यानी आपल्या कवितेत रंगविल्याप्रमाणेच असावा.एक अप्रतिम कविता असे या कवितेचे वर्णन करता येईल.

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एकटेपणा: एक अतिज्येष्ठ नागरिक – भाग 2 ☆ शब्दांकन….श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? मनमंजुषेतून ?

☆ एकटेपणा: एक अतिज्येष्ठ नागरिक – भाग 1  ☆ शब्दांकन….श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

( त्याला आत्ता जशी चांगली भलेलट्ठ पगाराची नोकरी आहे तशी काही मुंबईत मिळणार नाही ह्या कारणाने तो प्रस्ताव बासनात गुंडाळावा लागला.) इथून पुढे —–

मुलगी तिच्या संसारात तिच्या बछड्यांबरोबर मग्न असते. कधीतरी आठवड्यातून एकदा तिला वडिलांना फोन करायची आठवण होते, तेव्हां ती न विसरता तब्येतीची चौकशी करते. बाकी खूप वर्षे मी एकटा माझ्या ह्या बंगल्यात असतो. गेले दहा वर्षे बाहेरून दुपारच्या जेवणाचा डबा येत होता. सकाळी आलेला डबा मला रात्रीच्या जेवणालाही पुरत होता. जिथपर्यंत सकाळचे फिरणे होते तिथपर्यंत तब्येतीची काही तक्रार नव्हती. पण गेल्या दोन वर्षांपासून जास्त चालवत नसल्याने तब्येत ढासळत चालली आहे. एक दोनदा तोल जाऊन पडल्यामुळे चालताना हातात कायमची काठी आली आहे. ती निर्जीव लाकडाची असली तरी सध्या तरी खूप जवळची झाली आहे. काही ना काही आजाराने अधूनमधून बाजूच्यांची किंवा कोणा ओळखीच्यांची मदत घेऊन ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल होत असतो. 

सध्या घोडबंदर येथील एका वृद्धाश्रमात स्वतःला मी दाखल करून घेतले आहे. तब्येतीची चौकशी करायला माझ्या मुलाचे आणि मुलीचे दोन दिवसाआड फोन कॉल्स येतात. बरे वाटते त्यांचे कॉल्स आले की. शरीराला नाही पण जरा मनाला उभारी मिळते. त्यांनी फोन केलेला काही कारणास्तव माझ्याकडून उचलला गेला नाही तर लगेच घाबरतात दोघेही. लगेच वृध्दाश्रमाच्या मॅनेजरला फोन करतात. माझ्या तब्येतीपोटी फोन करतात– की मी जिवंत आहे का नाही हे कन्फर्म करतात– काही कळत नाही. 

माझा बँक बॅलन्स खूप आहे. मुलांना सगळे देऊनही खूप काही जमा आहे. पण एक गोष्ट खरी आहे. ह्या नवीन तरुण पिढीला आपल्या मागील पिढीकडून काही अपेक्षा नाही. त्यांच्या पंखांत मागच्या पिढीने त्यांना चांगले शिक्षण दिल्यामुळे खूप बळ आलेले असते. त्यांची अपेक्षा एवढीच असते की, आपण म्हातारे झालो आहोत तर स्वतःला आपण व्यवस्थित सांभाळावे. त्यांना आपण कमविलेल्या पैशात अजिबात इंटरेस्ट नसतो. त्यांचे एकच म्हणणे असते की तुम्ही तुमचा पैसा स्वतःवर खर्च करून स्वतःला सांभाळा. मनाने ते कायम आपल्या जवळ असतात म्हणे. फक्त नी फक्त त्यांच्याकडे आपल्यासाठी नसते ती म्हणजे फुरसतीची वेळ. त्यांच्याकडे तुमच्याशी अर्धा तास बोलण्यासाठी वेळ नसतो. वेळेला  तुमच्यासाठी ते पैसे खर्च करू शकतात, पण तुमच्यासाठी त्यांचा बहुमोल असा वेळ काढणे त्यांना शक्य होत नाही. —-

शेवटचे वेध लागले आहेत. बघू कुठपर्यंत मजल मारू शकतो. सगळे आयुष्य चांगले काढले. आता काही दिवसांचा तर प्रश्न आहे. एक मात्र खरं आहे, मुलांना शिकवून उडायला शिकविल्यानंतर ते परत आपल्या घरट्यात येतील अशी अपेक्षा करत आयुष्य काढणे चुकीचे ठरते. जेव्हा आपण त्यांना उच्च शिक्षण देऊन मोकळ्या आकाशात सोडतो, तेव्हाच आपल्या मनाची तयारी करून ठेवली पाहिजे की ते आपल्या घरट्यात परत येणार नाहीत. परत येणारे काही अपवाद असतात.  पण त्याचे प्रमाण एकदम कमी आहे. त्यांचे चुकते आहे असेही मला वाटत नाही. पण एक मात्र खरं आहे, आई किंवा वडिलांची सेवा करणे हे सगळ्या मुलांच्या आणि मुलींच्या नशिबात लिहिलेले नसते. काही नशीबवान मुलांना आणि मुलींनाच ते करण्याचे भाग्य मिळते. सध्यातरी आपले म्हातारपण चांगले जाण्यासाठी त्याची तरतूद स्वतःच आधी करून, आपल्याला नंतर एकटे रहायचे आहे अशी मनाची तयारी करणे जरुरीचे आहे. 

सर्वात जास्त एकटेपणा तेव्हा वाटतो, जेव्हा एकांतात आपण मोकळ्या हवेत किंवा चार भिंतीच्या आड बसल्यावर, एकटे का बसलोय हे  विचारायलाही कोणी नसते. एकटेपणात खरं तर आपण एकटे नसतो. आपल्या सोबत असतात आपल्या मनाला सलत असणाऱ्या काही कटू आठवणी,  आणि आपल्या मनाला सुखावणाऱ्या खूप गोड आठवणी.  सोबत नसतो तो फक्त नि फक्त एक हक्काचा आपला माणूस—- 

समाप्त 

– एक अति ज्येष्ठ नागरिक 

शब्दांकन —श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मधुलिका…सावली एका वीर योद्ध्याची !- भाग-1 …. संभाजी गायके ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ??‍?

☆मधुलिका…सावली एका वीर योद्ध्याची ! – भाग-1 ….संभाजी गायके ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित  ☆ 

”आपल्या प्रिन्सेस मधुलिकासाठी आता एखादा राजकुमार पहायला हवा! ”  मी जेव्हा जेव्हा कॉलेजातून एखादं प्रमाणपत्र, एखादं पारितोषिक घेऊन घरी यायचे तेव्हा तेव्हा पिताश्री आमच्या मातोश्रींना हे वाक्य म्हणायचेच !

आज मी मानसशास्त्रातील डिग्री घेऊन घरी आले तेव्हाही अगदी तोच संवाद झडला आई-बाबांच्यात. पण यावेळी बाबांच्या आवाजात काहीसा निश्चयच दिसला. मी म्हटलं,”आता कुठे राहिलेत राजेरजवाडे,मला राजकुमार मिळायला? तुम्ही तर आता राजकारणात आहात…एखाद्या मोठ्या नेत्याच्या मुलाशी द्याल माझी लग्नगाठ बांधून ! ” बाबा म्हणाले,” आता स्वतंत्र हिंदुस्थानात कुणी राजा नसला तरी शूर सरदारांची काही कमतरता नाही. माझ्या पाहण्यात एक लढवय्या, हुशार, राजबिंडा तरूण आहे- तुझ्यासाठी सुयोग्य असा. मी पूर्वतयारी करून ठेवलीय, फक्त तुझ्या मनाचा अंदाज घ्यावा म्हणून थांबलो होतो ! ”  हे ऐकताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. पण बाबा पुढे म्हणाले ते ऐकून एकदम धक्काच बसला. “ मधुलिका,पण एक अडचण आहे…त्याचं एक लग्न झालंय आधीच ! ”  माझ्या चेह-यावरचं भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह पाहून बाबा हसून म्हणाले, 

” अगं आर्मी ऑफिसर आहे तो…तलवारीशी लगीन झालंय त्याचं आधीच. ”  माझ्या चेह-यावरचं प्रश्नचिन्ह आता अधिकच बाकदार झालं होतं. “ बाबा ! नीट सांगा ना अहो ! ”  त्यावर बाबा म्हणाले,

” बिपिन रावत त्याचं नाव. एका मोठ्या आर्मी ऑफिसरचा सुपुत्र. एन.डी.ए. पासआऊट आहे. आणि इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, डेहराडून मधल्या ट्रेनिंगमध्ये पहिला नंबर पटकावून बहादराने मानाची तलवार मिळवलीय…स्वोर्ड ऑफ ऑनर ! हमने तुम्हारे लिए बात चलायी है….! “  यानंतर बाबा माझ्याशी,आईशी काय काय बोलत राहिले कोण जाणे ! माझं कशातही लक्ष नव्हतं ….मी तर अगदी हरखूनच गेले होते… मला असंच आव्हानात्मक, साहसी आयुष्य हवं होतं ! आणि सैनिकाशिवाय ते मला दुसरं कोण देऊ शकणार होतं ? आणि त्यात बिपिन तर आर्मी ऑफिसर ! लहानपणापासूनच मला त्या रूबाबदार युनिफॉर्मचं भारी आकर्षण होतं. कर्मधर्मसंयोगानं मनासारखं आयुष्य लाभणार होतं….माझा होकार माझ्या लाजण्यातूनच व्यक्त झाला. मग लग्नाआधी मीही थोडा अभ्यास केला आर्मी लाईफचा. (हो, आर्मीवाल्यांच्या सगळ्या रॅंक्स मी लग्नाआधीच माहित करून घेतल्या होत्या…बाबा म्हणालेच होते…बिपिन एक दिन बहुत बडे अफसर बनेंगे !) बिपिनजींचे वडील म्हणजे माझे सासरे लक्ष्मणसिंग रावत त्यावेळी लेफ्टनंट जनरल पदावर होते आणि भटिंडा येथे पोस्टेड होते. त्यामुळे माझी आणि बिपिनसाहेबांची एंगेजमेंट भटिंडा मिलिटरी कॅम्प मध्येच झाली. बिपिन साहेब त्यावेळी कॅप्टन होते आणि सैन्य कारवायांच्या धकाधकीतून लग्नासाठी कशीबशी सुट्टी काढून आले होते ! आमचे शुभमंगल मात्र दिल्लीत झाले..वर्ष होते १९८५! साहेबांचं पहिलं प्रेम म्हणजे आर्मी ! सुरूवातीला सवत वाटणारी आर्मी नंतर माझी लाडकी झाली. वन्स अ‍ॅन आर्मीमॅन…ऑल्वेज अ‍ॅन आर्मीमॅन च्या चालीवर मीही आर्मीवुमन झाले. लग्नानंतर अगदी थोड्याच दिवसांत साहेब बॉर्डरवर रूजू झाले. संसाराच्या उंब-यापेक्षा त्यांचं मन लाईन ऑफ अ‍ॅक्च्युल कंट्रोलवरच्या उंब-यावर जास्त धाव घेई. मी सोबत जाण्याचा आग्रह केला की फक्त गोड हसायचे ! म्हणायचे ‘ एक म्यान में दो-दो तलवारे कैसे सँभालू ? ‘ त्यांचे सहकारी त्यांना ‘मॉस’ म्हणजे Married Officer Staying Single’ म्हणत असत. मॉस म्हणजे इंग्लिशमध्ये शेवाळं. A rolling stone does not gather moss असं म्हटलं जातं. म्हणजे सतत गडगडणा-या दगडावर शेवाळं साचत नाही. अर्थात सतत भटकत असलेल्या माणसावर फारशी जबाबदारी नसते. पण साहेबांचं मात्र तसं अजिबात नव्हतं. सतत शिकत  राहणं, सतत धाडसी मोहिमा आखणं आणि त्यांचं नेतृत्व करणं हे त्यांच्या जणू स्वभावातच होतं. वडिलांच्याच बटालियन मध्ये पहिलं पोस्टिंग झालेलं ! तिथून जी पराक्रमाची घोडदौड सुरू झाली ती अगदी काल-परवापर्यंत, म्हणजे अगदी भारताचे पहिले C.D.S. अर्थात ‘ चीफ ऑफ़ डिफेन्स स्टाफ’ पदी निवड होईतोवर.

क्रमशः….

(उपलब्ध माहितीवरून,संदर्भावरून आणि जरूर त्या ठिकाणी काल्पनिकतेचा आधार घेऊन श्रद्धापूर्वक केलेले स्वलेखन:)

लेखक : – संभाजी गायके.

९८८१२९८२६०

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘स्वयंपाकघर…बदलती रुपे’ – भाग 2 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ ‘स्वयंपाकघर…बदलती रुपे’ – भाग 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆

 ……………….स्वयंपाकघरातल्या अत्यावश्यक वस्तू आज कालबाह्य झाल्या असल्या तरी माझ्यासाठी मात्र त्यांच्या आठवणी आजही मोलाच्या आहेत.

काळ बदलला.गरजा बदलल्या.घराचं स्वरुप जसं बदललं तसंच स्वयंपाकघराचंही. आमच्या संसारात आधीच्या स्वयंपाकघरातल्या चुलीची जागा आधी पितळी टाकीच्या आवाजाच्या स्टोव्हनं, नंतर वातीच्या स्टोव्हनं न् पुढे खूप वर्षांनंतर आधी  ‘ पांचाल’ नावाच्या हिरव्या रंगाच्या बीडाच्या न् नंतर स्टीलच्या गॅसशेगडीने घेतली होती.चुल नसल्याने स्वयंपाकघरात स्वयंपाकाचा कट्टा आला.पाटांची जागा फोल्डिंगच्या डायनिंग टेबलने घेतली. स्टोव्हचा काकडा,स्टोव्हची पीन,राॅकेलचा पाच लिटरचा कॅन,पितळाच्या भांड्यांची जागा घेतलेली स्टीलची भांडी,लोखंडी तव्याच्या जागी आलेले आधी अल्युमिनीयमचे न् नंतरचे निर्लेपचे तवे,अडगळीत गेलेल्या जाळीच्या कपाटाची जागा घेणारा फ्रीज ही कालच्या स्वयंपाकघराने स्विकारलेली अल्पकाळातली स्थित्यंतरे.खूप नंतर नवीन घरी किचन ट्राॅलीज् आल्या.मुलाचा संसार सुरु झाल्यावर फ्रीजच्या सुधारलेल्या आवृत्त्यांपाठोपाठ मायक्रोवेव्ह न् ओव्हनही.

परवाच्या न् कालच्या स्वयंपाकघराची ही रुपं मला खूप जवळून अनुभवता आली.उद्याचं स्वयंपाकघर कसं असेल ते काळ नव्हे तर उद्याची नवी पिढीच ठरवेल.त्यामुळे ते कसे असेल याची कल्पना करण्यापेक्षा ते कसं असावं हे सांगणे मला अगत्याचे वाटते.

पूर्वीच्या घरापासूनच घराचा अविभाज्य भाग असणाऱ्या कांही जागानाच घराने स्वतःचं नाव बहाल करीत मनापासून सामावून घेतलंय.स्वयंपाक’घर’, देव’घर’, माज’घर’ ज्यात ‘घर’ शब्दशः खऱ्याअर्थानं सामावलेलं असायचं अशा मोजक्या जागा.त्यातलं देवघर बऱ्याच घरातून हद्दपार झालंय.माजघराची पूर्वीची वैशिष्ट्ये आस्तित्त्वातच नाहीत आणि स्वयंपाकघराची जागा ‘किचन’ने घेतलीय.

हे खरंतर वरवरचे बदल आहेत.काळानुरुप बदललेल्या गरजांनुसार हळुहळू झालेले न् मनापासून स्विकारले गेलेले.तरीही पूर्वीचा साळढाळपणा नसला तरी माणसं ‘ तीच ‘आहेत.ती ‘ तशीच ‘ असावीत ही अपेक्षा मात्र अवास्तव ठरेल हे लक्षात घ्यायला हवं.

‘स्वयंपाकघर ‘ या संकल्पनेत फक्त अन्न शिजवणे नाही, तर स्वच्छतेला प्राधान्य देऊन शुचिर्भूत पध्दतीने ते शिजवणे अभिप्रेत आहे. रांधणाऱ्याच्या मनातल्या आपुलकी, प्रेम आणि सद् भावना  या गृहितच आहेत.हे सगळं किती आवश्यक आहे हे अलिकडच्या कोरोनाकाळाने दाखवून दिलेलं आहेच. हव्यासाने, भौतिक सुखाच्या हव्यासाने स्विकारलेली प्रदुषित जीवनशैलीच कोरोनाच्या प्रसाराला पूरक ठरल्याचे लक्षात आल्यानंतर तरी स्वच्छता पालनाचा विचार मास्क न्  सॅनिटायझर वापरापुरता मर्यादित न ठेवता तो खानपानाच्या सवयींच्या योग्यायोग्यता तपासून पहाण्याइतका सखोल व्हायला हवा.मग उद्याच्या किचनमधे स्वयंपाक स्री करते,घरातला पुरुष करतो,एकमेकांच्या सोयीनुसार दोघांपैकी कुणीही आलटून पालटून करतात की  घरी नेमलेली स्वैपाकीण किंवा आचारी करतो हा निर्णय प्रत्येक घराचा वेगवेगळा असला तरी त्यात Quality control लाच महत्त्व असावे.हाॅटेलमधून मागवून विनासायास भूक भागवण्यात समाधान मानण्यातले धोके ओळखून जेवणाला

 ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ‘ का म्हणतात हे समजून घेऊन त्यादिशेने प्रयत्नशील रहाणे अगत्याचे ठरेल.थोडक्यात स्वतःच्या प्राधान्यक्रमात नवे चकचकीत किचन खऱ्या अर्थाने

‘परिपूर्ण किचन ‘असण्याला प्राधान्य देण्यात यावे असे मनापासून वाटते. 

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एकटेपणा: एक अतिज्येष्ठ नागरिक – भाग 1 ☆ शब्दांकन….श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? मनमंजुषेतून ?

☆ एकटेपणा: एक अतिज्येष्ठ नागरिक – भाग 1  ☆ शब्दांकन….श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

नमस्कार ……

मी ऍडव्होकेट ……….. जाऊ दे. नाव लिहिणार होतो पण नको. माझे नाव तसे प्रसिद्ध नाही आणि ते सांगून तसा काही फरकही पडणार नाही. पण माझे वय सांगतो. गेल्या महिन्यात ८६ पूर्ण झाले. माझ्या आत्तापर्यंतच्या जीवनप्रवासाची गाथा आज तुमच्यासमोर थोडक्यात मांडतो. मला माहित आहे तुम्हाला वाटणार, हा म्हातारा आता आपलं रडगाणं गाणार.  पण तसे नाही. मी जरा आजकालची परिस्थिती काय आहे त्याची जाणीव तुम्हाला करून देणार आहे. 

शालेय जीवनात खूप नसलो तरी हुशार मुलगा अशी गणती होत होती. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय तरी व्यवस्थित असल्याने कुठच्याही संघर्षाशिवाय कॉलेज शिक्षण पूर्ण केले आणि पुढे वकिलीचे शिक्षण पूर्ण करून एका नावाजलेल्या कंपनीत मी नोकरीला लागलो. चांगला पगार असल्याने घरून लग्नाची घाई होत होती. पण मला अजून काही कायद्याचे शिक्षण घ्यायचे असल्याने ते लांबणीवर टाकले. तरुणपणीचा उत्साह मला खूप काही शिकायला उद्युक्त करत होता आणि त्यात मला सफलताही मिळत गेली. पैशाचे गणित खूप सोप्पे होत गेले. आणि वयाच्या ३२ व्या वर्षी लग्न आणि पुढच्या चार वर्षात दोन वर्षाच्या अंतराने एक कन्यारत्न आणि एका पुत्ररत्नाचाही लाभ झाला. त्याचवर्षी ठाण्यातील श्रीरंग सोसायटीमध्ये मी एक प्लॉट घेऊन छानसा टुमदार बंगलाही बांधला. आयुष्य खरेच व्यवस्थित आखीव आणि रेखीव चालले होते. ‘ हम दो हमारे दो ‘ ह्या तेव्हाच्या सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आयुष्य खरंच मस्त चालले होते. 

दोन्ही मुलांचे शालेय शिक्षण व्यवस्थित चालले होते. काही वर्षांनी मी चांगली नोकरी सोडून कोर्ट केसेस घेऊन कोर्टात जायला सुरवात केली. त्यातही मला चांगले यश मिळत गेले आणि थोड्याच दिवसात ठाण्यातील नामांकित वकिलांमध्ये माझी गणती झाली. मुलाला इंजिनिअर होऊन पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत शिकायला जायचे होते. आणि त्याला माझा दुजोरा असल्याने, त्यादृष्टीने त्याच्या शिक्षणाची  वाटचाल झाली आणि तो अमेरिकेत गेला. मुलीचे शिक्षण पुरे होऊन तिने तिच्या  कॉलेजमधला सुसंस्कृत असा मुलगा तिचा जीवनसाथी म्हणून निवडला आणि त्याला आमची हरकत घेण्याचे काही कारण नसल्याने ती लग्न होऊन तिच्या सासरी गेली. 

मुलगा अमेरिकेत शिकून तिथेच नोकरीला लागला. तिथेच त्याला महाराष्ट्रीयन डॉक्टर मुलगी मैत्रीण मिळाली. मुंबईत येऊन त्याचेही तिच्याशी लग्न पार पडले आणि दोघांच्याही व्यस्त व्यावसायिक कार्यक्रमानुसार त्यांना लगेच परत अमेरिकेत जावे लागले. वयाच्या साठीपर्यंत सगळे कसे मस्त चालले असतांना, अचानक छोट्याश्या आजाराने माझी बायको देवाघरी गेली. आता त्या मोठ्या बंगल्यात मी एकटा रहात होतो. माझे वकिलीचे ऑफिसही बंगल्यातच थाटले होते. एकटा असल्याने पूर्णवेळ मी वकिलीच्या व्यवसायात स्वतःला झोकून दिले होते आणि त्यामुळे पैसाही मला चांगला मिळत होता. पैशाचे व्यवस्थित नियोजन करून त्याची गुंतवणूक करणे चालू होते. सुरवातीला दोन वर्षातून एकदा तीन महिन्यांसाठी माझे अमेरिकेला मुलाकडे जाणे होत होते. पहिल्या एक दोन ट्रिपला मला बरे वाटले. मुलगा आणि सुनेने रजा घेऊन अमेरिकेचा काही भाग दाखविला. दोन ते तीन ट्रिपपर्यंत दोन लहान नातवंडांबरोबर वेळ चांगला जात होता. पण नंतर मला तिकडे बोलायला कोणी मिळत नसल्याने कंटाळा येऊ लागला. मुलगा आणि सून मध्ये एकदा त्यांच्या दोन लहान मुलांना घेऊन ठाण्याला घरी आले होते. पण माझी दोन्ही नातवंडे ठाण्यातल्या बंगल्यात आले रे आले की आजारी पडत. असे दोनदा झाल्यावर ते कधी भारतात आले, की एक तर सूनबाईच्या माहेरी दादरला किंवा ठाण्यातल्या एका चांगल्या हॉटेलमध्ये रहायला जाऊ लागले. एकंदरीत काय तर मुलगा, सून आणि नातवंडे ह्यांना माझ्याकडे रहाता येत नसे, तर मला अमेरिकेत त्यांच्याकडे राहणे आवडत नसे. 

मुलगा प्रेमाने, हट्टाने, जबरदस्तीने तिकीट पाठवायचा म्हणून मी परत एकदा अमेरिकेला त्याच्याकडे गेलो होतो. पण ते दोघे कामाला गेल्यावर घरात मी एकटा. काय करायचे ते कळेना. नातवंडांनाही माझा लळा नसल्याने तेही माझ्याशी जास्त बोलायला येत नसत. मी स्वतःच काही तरी वेळ घालवायचा म्हणून तिकडच्या कोर्टात जाऊन बसू लागलो. पण कोर्टही  घरापासून लांब होते आणि तिथे आपल्यासारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने रोज जाणे काही जमत नसे. त्यावर्षी तीन महिने रहायला गेलेला मी कंटाळून एका महिन्यातच परत आलो. 

सूनबाई डॉक्टर असल्याने माझ्या आहे त्या बंगल्यात तिच्यासाठी दोन मजल्यांचे हॉस्पिटल बांधून द्यायची माझी तयारी होती. पण माझ्या नातवंडांच्या तब्येतीचा प्रश्न आणि मुलाला, त्याला आत्ता जशी चांगली गलेलट्ठ पगाराची नोकरी आहे तशी काही मुंबईत मिळणार नाही ह्या कारणाने, तो प्रस्ताव बासनात गुंडाळावा लागला.

क्रमशः …

– एक अति ज्येष्ठ नागरिक 

शब्दांकन —श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भुलभुलैया… ☆ संग्राहक – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

?इंद्रधनुष्य? 

☆ भुलभुलैया… ☆ संग्राहक – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

१३ ऑक्टोबर.. !

इतिहासातल्या ज्या ज्या घटनांनी जग बदललं, त्यातली एक घटना 1846 साली या दिवशी घडली होती.   

अनॅस्थेशीयाच्या शोधाअगोदर कोणतीही शस्त्रक्रिया करायची असेल तर एकतर त्या रुग्णाला चार दणकट माणसं धरुन ठेवत किंवा त्याच्या डोक्यात मारून त्याला बेशुद्ध केलं जाई. किंवा त्याला भरपूर दारू/अफू/मँड्रेक दिलं जाई.. पण हा सगळा मामला बेभरवशाचा असे. मध्येच शुद्धीवर येऊन रुग्ण गुरासारखा ओरडत असे. भुलीची अशी ‘खौफनाक’ परिस्थिती असल्याने त्याकाळी ऑपरेशन्स पण मर्यादित होत असत. अगदी जीवावर बेतल्याशिवाय कोणीही स्वतःवर सर्जरी करून घेत नव्हतं.. पण इतिहासातल्या या दिवशी ही परिस्थिती बदलली..

होरॅस वेल्स यांच्यानंतर ‘विल्यम थॉमस ग्रीन मॉर्टन’ असं लांबलचक नाव असलेल्या एका माणसानं तब्बल दोन वर्षे केलेल्या अनेक प्रयोगांनंतर मॅसेच्युसेटच्या जनरल हॉस्पिटलमध्यल्या बुल्फिन्च अँफीथिएटरमध्ये जाहीर डेमोन्स्ट्रेशन ठेवलं. ( त्याकाळी ऑपरेशन्स जाहीररित्या अँफी थिएटरमध्ये होत असत. म्हणून त्याला तेव्हा ‘ऑपरेशन थिएटर’ असं म्हणलं जात असे. तेव्हापासून आजतागायत ऑपरेशनच्या खोलीला ‘ऑपरेशन थिएटर’च म्हटलं जातं). त्या दिवशीचा तो भुलेचा जाहीर प्रयोग यशस्वी झाला.. तो दिवस होता १६ ऑक्टोबर १८४६…. आणि या दिवसापासून वैद्यकशास्त्रातील या नव्या पर्वाला सुरुवात झाली. We have conquered pain ! अशा अर्थाच्या हेडलाईन्सनी दुसऱ्या दिवशीचे सगळे न्यूजपेपर भरून गेले.. नंतर लंडन, पॅरिस, बर्लिन, पीटर्सबर्ग अशा अनेक ठिकाणी ‘इथर’ वापरून शस्त्रक्रिया झाल्या, आणि अनॅस्थेशियाच्या शोधावर शिक्कामोर्तब झाले.  

आणि मानवाने वेदनेवर विजय मिळवला !!

पुढे जसजसा खात्रीलायक भुलेच्या औषधांचा शोध लागला आणि हे शास्त्र विकसित होत गेलं, तसतशी सर्जरीने पण गरुडझेप घेतली.. आज अत्यंत गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया लीलया पार पडतात याचे श्रेय निश्चितच, खात्रीलायक असलेल्या आणि जास्तीत जास्त अचूकतेकडे गेलेल्या अनेस्थेशीयाला आहे..

भूलतज्ञ होण्यासाठी MBBS नंतर 3 वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (MD) आहे. यात रुग्ण ऑपरेशन थिएटरमध्ये आणल्यापासून ते बाहेर काढेपर्यंत त्याच्या हृदयाचे ठोके कमी जास्त करणे, त्याचा बीपी कंट्रोल करणे, त्याचे मेंदू/किडनी/लिव्हर यांच्या कामाचे रेकॉर्ड ठेवणे, सगळ्या सिस्टिम्सची काळजी घेणे आणि त्यांचे कार्य कंट्रोलमध्ये ठेवणे, याचं अत्यंत क्लिष्ट शिक्षण अंतर्भूत आहे. त्यात Critical care आणि Pain management ही आहे.. 

रुग्णाच्या बेशुद्धावस्थेत त्याचा श्वास बंद पडलेला असतो, तेव्हा भूलतज्ञच कृत्रिम श्वास देऊन त्याच्या जीवनरथाचा सारथी बनलेला असतो. आणि रुग्णाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी झगडत असतो. पण रुग्णांच्या लेखी तो ‘गुमनाम’च असतो.. कित्येकांना आपलं ऑपरेशन कोणत्या डॉक्टरनं केलं त्यांचं नाव तर माहीत असतं, पण भूल कोणत्या डॉक्टरांनी दिली होती, हे मात्र बऱ्याच जणांना सांगता येत नाही.. मला सांगा, किती जणांना आपल्या भूलतज्ञाचं नाव माहिती आहे.?  आणि ऑपरेशननंतर कितीसे पेशंट ” मला ऑपरेशनच्या वेदना जाणवू न देणाऱ्या भूलतज्ञाचे आभार ” अशा शब्दांत भावना व्यक्त करतात बरं.?! 

आपण आपल्यासाठी अन्न निर्माण करणाऱ्या बळीराजाबद्दल कृतज्ञ असतो, सीमेवर आपलं रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल हळवे असतो, पण आपल्याला ऑपरेशनदरम्यानच्या जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती देणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानायचे असतात, याबाबतीत मात्र एकंदरीत समाजातच उदासीनता दिसून येते.. यावर वर्तमानपत्रात ना कुणाचे लेख येतात.. ना कुठे भूलतज्ञाचा सत्कार होतो.. ना इतर डॉक्टरांसारखी प्रसिद्धी कोणा भूलतज्ञाच्या नशिबी असते..

मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा देखील भूलशास्त्र विषय घेण्याकडे ओढा तसा कमीच असतो. कारण एकतर प्रसिद्धी मिळत नाही, त्यामानाने मोबदलाही मिळत नाही, पण उलट रिस्कचे आणि स्वतःवर येणाऱ्या स्ट्रेसचे प्रमाण खूपच जास्त असते !!

पण काहीही असलं तरी एक मात्र खरं की, इतर सगळे डॉक्टर्स हे जरी पेशंटला ‘ आजारातून बरं करणारे ‘ असले तरी, – भुलेदरम्यान जगण्या- मरण्याच्या सीमारेषेवर असणाऱ्या पेशंटला सहजगत्या ठीक ठेवणारे– वेळ आली तर पेशंटला मरणाच्या दारातून खेचून आणू शकणारे.. आणि पदोपदी पेशंटच्या आणि साक्षात यमाच्यामध्ये उभे राहणारे मात्र, फक्त आणि फक्त ‘ भूलतज्ञ ‘च असतात.. 

अशा या पडद्यामागच्या हिरोंचे आभार मानण्याचा आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे..

या जागतिक भूलदिनाच्या सर्व मानवजातीला शुभेच्छा !!

 

संग्राहक : श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘स्वयंपाकघर…बदलती रुपे’ – भाग 1 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ ‘स्वयंपाकघर…बदलती रुपे’ – भाग 1 ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘स्वयंपाकघर’ या शब्दाला लगडलेल्या असंख्य आठवणी मनात आहेत. माझ्याच नजरेसमोर या प्रदीर्घ काळात माझ्या अंगवळणी पडत, हळूहळू प्रत्येक गोष्टच तिचं मूळ रुप अनोळखी वाटावं इतकी बदलत गेलेली आहे. त्याला स्वयंपाकघर तरी अपवाद कसं असणार..?स्वयंपाकघराच्या स्वरुपाच्या जुन्या रुपाची आठवण आज आवर्जून आठवताना मात्र कल्हई केलेल्या भांड्यासारखी लखलखीत रुपात नजरेसमोर येतेय.लिहिण्याच्या ओघात सहज आलेला ‘कल्हई’ हा शब्द पूर्वीच्या स्वयंपाकघरासाठी आजच्या भाषेत सांगायचं तर Must च होता.

माझ्या दृष्टीने माझ्या बालपणापासूनच्या आठवणीतलं स्वयंपाकघर म्हणजे कालचं नव्हे.परवाचं.माझ्या संसारातलं स्वयंपाकघर कालचं.पण आधी थोडं परवाच्या स्वयंपाकघरा बद्दल. ते आजच्या ‘किचन’ पेक्षा तर खूपच वेगळं होतं.तेव्हा त्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या , एखादा अपवाद वगळता , जवळजवळ सर्वच वस्तू आज कालबाह्य झालेल्या आहेत.वस्तूच नव्हे तर तिथल्या कामाच्या पद्धतीही..!

आम्ही मुलं साखरझोपेत असतानाच बागेतल्या पक्षांच्या किलबिलाटाआधीच, लवकर उठून स्वयंपाकघरात कामाला लागलेल्या माझ्या आईच्या हातातल्या बांगड्यांची किणकिण सुरु होत असे.तो मंजूळ आवाज इतक्या सवयीचा होऊन गेलेला होता की आजही इतक्या वर्षांनंतर या जुन्या आठवणी नजरेसमोरुन सरकत असताना ती किणकिण एखाद्या पार्श्वसंगीतासारखी मला ऐकू येत असल्याचा भास होतोय. पहाटेच नव्हे तर दिवसभराच्याच आईच्या स्वैपाकघरातल्या वावराची ती किणकिण ही एक हवीहवीशी वाटणारी खूण आहे माझ्या आठवणीतली.

‘चूल’ हा तेव्हाच्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भागच.घरी कर्त्याबाईची पारोशी..म्हणजे आंघोळी आधीची.. कामं सुरु व्हायची ती चुलीपासूनच.घरातली इतर सगळी उठण्यापूर्वीच आधी स्वयंपाकघरातला केर काढून चूल सारवून घेतली जायची.हे सारवण नित्याचेच खास काम.पूर्वी सगळीच घरं मातीची असायची. बांधकामात सर्रास वापरली जाणारी पांढरी मातीच चुलीच्या सारवणासाठी वापरली जायची. एखाद्या निरुपयोगी जुन्या भांड्यात  कालवलेल्या तशा पांढऱ्या पातळसर मातीत जुन्या कापडाचा बोळा बुडवून आई संपूर्ण चूल आतून बाहेरुन सारवून घ्यायची.चूल आणि चूलीमागचा भिंतीचा अर्धा भागही. एरवी चुलीत जळणाऱ्या लाकडांच्या धगीने न् धुराने चूल आणि मागच्या भिंतीचा थोडा भागही काजळून जायचा.ते सगळं टाळण्यासाठी म्हणून हे सारवणं आवश्यक असायचं.दिवसभरातल्या चुलीतल्या उष्णतेने टवके उडालेलं ते सारवण दुसऱ्या दिवशी पहाटे आधी साफ करुन केर काढला की चूल पेटवण्यापूर्वी  पुन्हा नवीन सारवण.आम्हा मुलांना सकाळी जाग आल्यानंतर दृष्टीस पडायची ती ही अशी सारवून त्यावर गोपद्मं न् ‘श्री अन्नपूर्णा प्रसन्न’ या रांगोळीलेखल्या रुपाने सजलेली साजरी चूलच.

आजही ती चूल तिचं आस्तित्त्व विरलं असलं तरी  ‘चूल आणि मूल’, ‘ घरोघरी मातीच्या चुली ‘ ‘चुलीतली लाकडं चुलीतच जळायची’अशा कितीतरी म्हणींच्या रुपात अजरामर झालेली आहे.

चहाचं आधण, चहा टाकणं,स्वयंपाकपाणी,पारोशी कामं,सोदणं (हात पुसायला आणि गरम भांडी चुलीवरुन उतरवायला आईच्या कमरेला सतत खोचलेलं असणारं स्वच्छ फडकं)पाटपाणी,पानं घेणे, जेवणखाण, जेवायला वाढणे,पंक्तीत हवो नको  पहाणे…या सारखे रोजच्या वापरातले स्वयंपाक, स्वयंपाकघर,आणि जेवण यांच्याशी निगडित अनेक रुढ बोलीभाषेतले शब्द हल्ली क्वचितच कधी ऐकायला मिळतात.

पूर्वी पितळेची भांडी, पातेली,ताटंवाट्या,तांबे,हे स्वयंपाकघराचं ऐश्वर्य असायचं.स्वयंपाक पितळेच्या भांड्यापातेलीतच शिजायचा आणि पितळेच्या ताटंवाट्यातच वाढला जायचा.आमटी करताना वापरायला चिंचेचा कोळ काढून घेऊन राहिलेली चिंच ही सगळी ताब्यापितळेची भांडी घासून लखलखीत करायला आई आठवणीने बाजूला  ठेवायची.धुणीभांडी बहुतेक घरांमधे मुली हाताशी येईपर्यंत आईच करायची.जळकी भांडी घासताना हात भरुन यायचे म्हणून भांडी,पातेली,तवा चुलीवर चढवण्यापूर्वी त्यांच्या बाहेरच्या भागाला आई आधी माती कालवून लावायची न् मग चुलीवर चढवायची.पितळेची ही सगळीच भांडी, ताटं-वाट्या यांना अन्न कळकू नये म्हणून कल्हई लावून घेतली जायची.कल्हईवाला  ठराविक काळाने हाकारे देत रस्त्यावरुन फिरायचाच.ते कल्हई लावण्याचं ‘ प्रोसेस ‘ अगदी त्याचे दर ठरवतानाच्या घासाघिशीसकट पहाणं हा आमचा आनंद असायचा.घासाघीस खूप वेळ चालली तरी व्यवहार कधीच मोडायचा नाही. कारण कल्हई वाल्याच्या घरची चूल पेटणं ही त्याचीही गरज असायचीच.गरज दोन्ही बाजूना असल्यामुळेच ‘गरजवंताला अक्कल नसते’ ही म्हण या व्यवहारापुरती तरी नेहमीच खोटी ठरायची.कारण इथे दोन्ही गरजवंताना व्यवहार न मोडण्याची अक्कल असायचीच.

पाटा-वरवंटा, खलबत्ता, सूप,जातं, जाळीच्या दाराचं दूध ठेवायचं छोटंसं कडिकोयंड्याचं कपाट,फडताळं,शिफ्तर,शिंकाळं, ताटाळं, कपबशांचा भिंतीला टांगायचा स्टॅंड अशा आणि इतरही अनेक तेव्हाच्या स्वयंपाकघरातल्या अत्यावश्यक वस्तू आज कालबाह्य झाल्या असल्या तरी माझ्यासाठी मात्र त्यांच्या आठवणी आजही मोलाच्या आहेत…..

क्रमशः…..

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares