☆ वैद्यानां शारदी माता – वैद्य अश्विन सावंत ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर☆
या सूत्राचा अर्थ असा की वैद्यांसाठी शरद ऋतु हा मातेप्रमाणे असतो. शरद ऋतुमध्ये (म्हणजे ऑक्टोबर हिटच्या उष्म्याच्या दिवसांमध्ये) रोगराई एवढ्या मोठ्या प्रमाणात बळावते की त्यामुळे वैद्य-डॉक्टर मंडळींसाठी तो सुगीचा काळ ठरतो.
वर्षाऋतुनंतर येणारा शरद ऋतु म्हणजे पावसाळ्यातील शीत-आर्द्र (थंड-ओलसर) वातावरणानंतर येणारा उष्ण-दमट वातावरणाचा उन्हाळा. बरं, वातावरणात होणारा हा बदल हळूहळू झाला तरी त्याचा परिणाम तितक्या तीव्रतेने होणार नाही. मात्र मागील काही वर्षांपासुन (तुम्हीं-आम्हीं भूमातेची कत्तल चालवली आहे तेव्हापासुन) हा वातावरणबदल अचानक होऊ लागला आहे. काल-परवापर्यंत पाऊस व थंड वातावरण आणि लगेच एक-दोन दिवसात अंगाची काहिली करणारा उन्हाळा!याला काय म्हणायचे? या अचानक होणा~या बदलाबरोबर शरीराने कसे काय जमवून घ्यायचे?
कधी कधी तर दिवसा आकाशात सूर्य तळपत असतो, उकाडा वाढतो,घामाच्या धारा वाहू लागतात आणि अचानक सायंकाळी वारे वाहू लागतात, ढग जमून येतात,काळोख दाटून येतो आणि पाऊस पडू लागतो किंवा रात्री ढग गडगडायला लागतात,विजा चमकू लागतात व धुवांधार पाऊस पडू लागतो. कोणता ऋतु समजायचा हा?दिवसा उन्हाळा-रात्री पावसाळा?
निसर्गात असे विचित्र बदल चोविस तासांमध्ये होत असतील तर शरीराने त्या बदलांबरोबर कसे जुळवून घ्यायचे? वातावरणातल्या या अकस्मात बदलांबरोबर जुळवून घेण्याची शरिराची धडपड म्हणजेच या दिवसात दिसणारे आजार! याचमुळे काश्यपसंहितेने ’ऋतुमध्ये होणारा अकस्मात बदल’ हे शरीर-संचालक वात-पित्त-कफ या तीन दोषांमध्ये विकृती होण्याचे एक महत्त्वाचे कारण सांगितले आहे आणि ते आयुष्य क्षीण करण्यास कारणीभूत होते असेही म्हटले आहे.
दुसरीकडे जरी पाऊस थांबला तरी शरदात वाढलेली सूर्यकिरणांची तीव्रता वर्षा ऋतुमध्ये ओलसर-गार वातावरणाची सवय झालेल्या शरीराला सहन होत नाही. शरीरातला ओलावा (मोईश्चर) सुर्याच्या उष्णतेमुळे सुकून जातो . ओलावा कमी झाल्याने शरीरातले विविध स्त्राव संहत होतात.पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने पित्त सुद्धा तीव्र होते. एकंदरच शरदातल्या उष्म्यामुळे शरीरात उष्णता (पित्त) वाढून शरीर विविध पित्त विकारांनी त्रस्त होते. त्यात तुम्ही जर उन्हाळा सुरु झाला म्हणून वर्षा ऋतुला (पावसाळ्याला) अनुकूल झालेल्या आपल्या आहारविहारामध्ये अचानक बदल केलात तर तो बदल शरीराला अधिकच रोगकारक होईल आणि या नाही तर त्या पित्तविकाराने त्रस्त व्हाल, त्यात पुन्हा तुम्ही पित्त (उष्ण) प्रकृतीचे असाल तर अधिकच!
शरद ऋतुमध्ये एकंदर शरीराभ्यन्तर परिस्थिती अशी असते आणि लोकांमध्ये सुद्धा अशी लक्षणे दिसतात की शरीरामध्ये केवळ पित्ताचा नाही तर पित्ताबरोबरच वात व कफ अशा तीनही दोषांचा प्रकोप होतो की काय अशी शंका येते. वास्तवात हारीतसंहितेने शरद ऋतुमध्ये कधी कधी, काही-काही शरीरांमध्ये वात-पित्त-कफ या तीनही दोषांचा प्रकोप सुद्धा होतो असे म्हटले आहे. तीनही दोषांचा प्रकोप म्हणजे शरीर विकृत आणि विविध रोगांना आमंत्रण.
त्यामुळेच या दिवसांत कुटुंबामधील एकतरी सदस्य काही ना काही आरोग्य-तक्रारीने त्रस्त असतो. म्हणूनच तर शरदऋतु हा अनेक आजार निर्माण करुन वैद्यांना भरपूर रुग्ण पुरवून त्यांना खुष ठेवतो, म्हणून त्याला वैद्य-डॉक्टरांची काळजी घेणारी आई ,या अर्थाने ’वैद्यानां शारदी माता’ असे संबोधले आहे.
( मानवी आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या ऋतुचर्या या विषयाची सविस्तार माहिती देणाऱ्या ऋतुसंहिता या वैद्य अश्विन सावंत लिखित आगामी पुस्तकामधून)
संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
“नमस्कार, नमस्कार ! काय रे मोरू, आज बरेच दिवसांनी शुक्राची चांदणी…..”
“काय पंत, मी तुम्हाला चांदणी वाटलो की काय ?”
“सॉरी सॉरी मोरू, अरे पेपर मधे तो आपला चांदणी बार……”
“आपला चांदणी बार ?”
“अरे तसं म्हणायची एक पद्धत असते मोरू, आपला या शब्दाचा अर्थ तसा शब्दशः घ्यायचा नसतो !”
“ते माहित आहे मला, पण तुमच्या त्या चांदणी बारच काय ?”
“मोऱ्या, माझा कुठला आलाय चांदणी बार, आम्ही सगळे…… “
“अरे हो, मी विसरलोच पंत, तुमचे ‘खाऊ पिऊ मजा करू’ हे पेन्शनरांचे मित्र मंडळ दर महिन्याला वेगवेगळ्या बार मधे जाते ना !”
“अरे हळू बोल गाढवा, हिच्या कानावर गेलं, तर आत्ता दिवसा ढवळ्या मला चांदण्या दाखवायला कमी करणार नाही ही !”
“ओके, पण त्या चांदणी बारच काय सांगत होतात तुम्ही पंत ?”
“काही नाही रे मोरू, त्या बारची एक बातमी आली आहे पेपरात, ती वाचत असतांना नेमका तू टपकलास, म्हणून चुकून तुला चांदणी म्हटलं एव्हढच !”
“कसली बातमी पंत, हॅपी अवर्सचा टाइम वाढवला की काय ?”
“मोरू एक काम कर, आता घरी जाताना हा पेपर घेवून जा आणि सावकाश चांदण्या बघत… सॉरी सॉरी.. सावकाश सगळ्या बातम्या वाचून, संध्याकाळी आठवणीने तो परत आणून दे ! आणि आता मला सांग इतक्या दिवसांनी, सकाळी सकाळी शुचिर्भूत होऊन किमर्थ आगमन ?”
“काही नाही पंत, सोनं द्यायला आलो होतो !”
“कमाल आहे तुझी मोरू, तू दुबईला गेलास कधी आणि आलास कधी ? चाळीत कोणाला पत्ता नाही लागू दिलास !”
“तसं नाही पंत, मी काय म्हणतोय ते जरा…. “
“आणि तुझ ही बरोबरच आहे म्हणा, तिकडे जायला वेळ तो कितीसा लागतो, फक्त अडीच तासाचा काय तो प्रवास ! अरे इथे हल्ली लोकांना दादर ते वाशी जायला तीन….. “
“पंत, सोनं काय फक्त दुबईला मिळत ?”
“तसंच काही नाही, पण दुबईला स्वस्त असतं असं म्हणतात आणि सध्या IPL पण चालू आहे ना, म्हणून म्हटलं तू एका दगडात दोन….. “
“पंत, खरं सोनं देण्या इतका मी अजून ‘सुरेश अंधानी’ सारखा श्रीमंत नाही झालो !”
“आज ना उद्या होशील मोरू, माझे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी !”
“पंत, नुसते आशीर्वाद असून चालत नाहीत, त्यासाठी कापूस बाजारात उभे राहून, सूत गुंड्या विकणाऱ्या बापाच्या पोटी, मोठा मुलगा म्हणून जन्मावं लागत, त्याला एक धाकटा निक्कमा भाऊ असावा लागतो, जो परदेशातल्या भर कोर्टात हात वर करून, मी कफल्लक आहे, असं अर्मानी सूट बूट घालून छाती ठोक पणे सांगू शकेल आणि…. “
“अरे मोरू, तू सोन्या वरून एकदम अँटिलीया… सॉरी सॉरी… भलत्याच सत्तावीस मजली अँटिनावर चढलास की !”
“पंत, आता तुम्ही विषयच असा काढलात, मग मी तरी किती वेळ …. “
“बरं बरं, पण तू ते सोनं का काय ते…. “
“हां पंत, हे घ्या सोनं, नमस्कार करतो !”
“मोरू, अरे ही तर आपट्याची पानं, यांना सोन्याचा मान दसऱ्याच्या…… “
“दिवशी, ठावूक आहे मला पंत !”
“आणि अजून नवरात्र यायचे आहे, संपायचे आहे आणि तू आत्ता पासूनच हे का वाटत फिरतोयसं ?”
“अहो पंत, त्या दिवशी यांची किंमत खऱ्या सोन्यापेक्षा कितीतरी जास्त असते ना, म्हणून !”
( मागील भागात आपण पहिले – तिथेजाऊनत्यांनीविष्णूहाचहविर्भागदेण्यासाठी योग्य आहे,असेसांगितले. तेव्हापासून‘भक्तवत्सलांछन‘ हे बिरुदविष्णूदेवानेअलंकाराप्रमाणेमिरवलेआहे. आता इथून पुढे )
भृगुऋषी निघून गेले, पण लक्ष्मीला मात्र त्यांच्या वर्तनाचा राग आला. ती म्हणाली, ‘तुमच्या हृदयातील माझ्या निवासावर, आलिंगन स्थानावरच त्यांनी लाथ मारली. हा माझा घोर अपमान आहे. तुम्ही त्यांना काहीही न बोलता, त्यांचे आगत-स्वागत केलेत. पण मला हे सहन होत नाही. मी आपल्या सान्निध्याचा व या वैकुंठाचा त्याग करून, परमदिव्य अशा महाक्षेत्री करविरास ( म्हणजेच कोल्हपुरास) जाते. विष्णूने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने ऐकले नाही. ( देव-देवताही माणसांसारख्याच रुसतात, फुगतात तर! – देव, दानवा नरे निर्मिले – केशवसुत ).
पुढचा कथा भाग असा, लक्ष्मी गेल्यानंतर विष्णूला चैन पडेना. तिच्या लाभासाठी त्याने दहा वर्षे तपश्चर्या केली. मग नंतर आकाशवाणी झाली, की सुवर्णमुखरी नदीच्या उत्तर तिरावर तपोभूमी तीर्थ स्थापन कर. तिथे देवलोकातील दिव्य कमळे, नाना परिमळाचे वृक्ष लाव. तिथे १२ वर्षे तप कर. त्याप्रमाणे विष्णूने सरोवर निर्माण केले. वृक्ष लावले व तपश्चर्या केली. तिथे पद्मतीर्थात लक्ष्मी प्रगटली. तीच पदमवती होय. तिने कल्हार (कृष्णकमळ) फुलांची माळ विष्णूच्या गळ्यात घातली. विष्णूने त्यानंतर पुष्करणी जवळिल शेषाचलावर वस्तव्य केले. हे पुढे वेंकटगिरी या नावाने प्रसिद्धीस आले. इथे वेंकटेशाच्या हृदयावर लक्ष्मीची मूर्ती आहे, पण त्याच्याशेजारी ना लक्ष्मी आहे, ना पद्मावती. पद्मावतीचे मंदीर खाली सरोवराजवळ आहे. लक्ष्मीचा निवास कोल्हापुरी आहे. त्यामुळे कोल्हापूर हे वैष्णव क्षेत्रही झाले. जनमानसावरील हा ठसा स्पष्ट आणि गडद होण्याच्या दृष्टीने, पुढे नवरात्रात तिरुपती देवस्थानहून महालक्ष्मीसाठी किती तरी लाखांचे शालूही येऊ लागले. ही प्रथा कधीपासून सुरू झाली, हेही अभ्यासकांनी अभ्यासायला हरकत नाही.
सर्वसामान्य श्रद्धाळू भाविकांच्या दृष्टीने मात्र देवी जगदंबा, मग ती पार्वती असो, की लक्ष्मी, जगाची माता आहे. शक्तिमान आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी आहे. दुष्टांचे निर्दाळण करणारी आहे. एवढेच त्यांना पुरेसे असते.
देवीने अनेक असुरांचा नाश केला. शुंभ-निशुंभ, धूम्रवर्ण, रक्तबीज आणखी किती तरी… देवी महात्म्यात त्याचे वर्णन आहे. प्राचीन काळी कोलासुर नावाचा दैत्य स्त्रियांना फार त्रास द्यायचा. तेव्हा सर्व स्त्रियांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची प्रर्थना केली. मग त्यांनी कोलासुराचा नाश करण्याचे कार्य महालक्ष्मीवर सोपवले. महालक्ष्मीने कोलासुराला मारून लोकांना संकटमुक्त केले. या घटनेवरून त्या नगरीला कोल्हापूर हे नाव प्राप्त झाले. कोलासुर म्हणजे रानडुक्कर. ते शेतीची नासधूस करते. देवीने त्याला मारून शेतीचे रक्षण केले. म्हणून महालक्ष्मी ही समृद्धीची देवताही मानली जाते.
दुर्गा, महिषासुरमर्दिनी हेही त्या महालक्ष्मीचेच रूप. त्याबद्दल अशी कथा सांगितली जाते, की देव-दानवांचा संग्राम झाला. त्यात असुरांचा जय झाला. असुरांचा राजा महिषासुर इंद्र झाला. त्याने देवांचे अधिकार हिरावून घेतले. देव दीन झाले. ते ब्रह्मदेवाकडे गेले व त्याच्यासह शंकर आणि विष्णू यांच्याकडे गेले. ते ऐकून शंकर क्रोधित झाले. त्यांच्यामुखापासून तेज निघाले, तसेच सर्व देवांच्या मुखातून तेज निघाले. ते तेज एकत्र झाले. ते तेज एकत्र मिळून एक नारी झाली. पुढे देवी महात्म्यात म्हंटले आहे, ‘तीच भवानी जगदंबा । त्रैलोक्याची जननी अंबा । जी हरिहराते स्वयंभा। उत्पन्न करिती जाहली । म्हणजे, जिने देवांना उ्पन्न केले, त्यांच्या तेजापासून तिनेभक्तकार्यासाठीपुन्हा अवतार घेतला, असे वर्णन आहे. शंकराच्या तेजापासून तिचे मुख झाले. यमाच्या तेजापासून केस, विष्णूच्या तेजापासू नबाहू, अशाप्रकारे विविध देवांच्या तेजापाससून तिचे विविध अवयव बनले. नंतर सतत नऊ दिवस व नऊ रात्री तिने महिषासुर व असुर सैन्याशी युद्ध केले आणि महिषासुराचा व सर्व असुर सैन्याचा वध केला आणि देवांना आणि पृथ्वीला असुरांच्या तावडीतून मुक्त केले. या कालावधीत देवही तपश्चर्येला बसले होते. आपल्या तपाचे पुण्य त्यांनी देवीला अर्पण केले. अखेर नऊ दिवस आणि नऊ रात्रींच्या तुंबळ युद्धानंतर महिषासुराचा वध झाला. दसरा हा देवीच्या विजयोत्सवाचा दिवस.
एकवीरा आईचे मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला या लेण्यांजवळ आहे..
कार्ला निवासीनी शक्तीदायीनी श्री एकविरा देवी आई महाराष्ट्राची आराध्य कुलदेवता, हाकेला धावणारी, नवसाला पावणारी आई एकविरा देवी म्हणजेच आदिमाता रेणुका.. परशुरामाची माता…
जगप्रसिद्ध कार्ला लेणीच्या तोंडाशी असणारे एकविरा देवीचे मंदिर म्हणजे कोळी बांधवांबरोबरच तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान… या देवीची मूर्ती ही स्वयंभू असून हे देवस्थान पांडवकालीन असल्याचे मानले जाते… आई एकविरेचे स्थान कार्ला गडावर स्वयंभू असून अतिशय प्राचीन आहे. आईची मूर्ती स्वयंभू तांदळा दगडात प्रगटलेली “शेंदूर चर्चित” आहे.. लेण्यांमध्ये असलेले तिचे स्थान हे मंदिराचे वेगळेपण.. प्राचीनता आणि तिचे लोभस रूप यामुळे या देवीचे महत्व काही वेगळेच आहे..
आपण मंदिरात प्रवेश केल्यावर प्रथम आपल्या नजरेस पडतो आईचा चांदीचा नक्षीदार गाभारा.. ते नयनरम्य नक्षीकाम पाहून मन मोहून तर जातेच पण आईचे लोभस रूप पाहून आपण आपलेच राहत नाही.. ते लोभस तेजस्वी रूप डोळ्यात साठवत डोळ्यातून अश्रू कधी वाहू लागतात ते समजतही नाही.. तेजस्वी नेत्र असलेल्या या देवीच्या मुखमंडलावरील हास्य व ते प्रसन्न रुप पाहून मन अगदी उल्हासित होतं. मनात नवीन चैतन्यं निर्माण होतं..
शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होताच वातावरणात एक वेगळीच उर्जा सामावल्याची अऩुभूती होते. एका अद्वितीय शक्तीचा जागर या नऊ दिवसांमध्ये केला जातो.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत एकविरा मातेच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी व देवीचा नवस फेडण्यासाठी येतात.
!! एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी !!
असे म्हणत आराध्य दैवत असलेल्या आणि नवसाला पावणारी म्हणून कोळी समाजात एकविरा देवीचं स्थान पूजनीय आहे…नवसाला पावणारी कोळी बांधवांचे आराध्य दैवत असणारी देवी..
देवळाच्या भोवती निसर्ग सिध्दहस्ताने वंदन करत आहे. कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून देवीची महती असली तरी सर्वच भाविकांची ती स्फूर्तीदेवता आहे..
डोंगरातलं स्थान, प्रसन्न रूप, जागरूक देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून महत्व असलेल्या या देवीचं लोभसवाणं रूप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळ्यात साठवून घ्यायलाच हवे.. नव्या उमेदीने जगण्यासाठी आई एकविरेचे दर्शन व परिसरातील निसर्ग- सौंदर्याने आपले मन प्रफुल्लित होऊन जाते हे मात्रं निश्चितच…
संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी
लेखिका /कवयित्री
ठाणे
9870451020
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
भक्तांची अगाध श्रद्धा बघुन देव – दिकांना, स्व:स्थान सोडून भक्ताकडे धाव घेतली, यातीलच एक पौराणिक कथा म्हणजे पुणेनिवासीनी चतु:शृंगी ही देवी आहे.
इसवी सन ६१३ मध्ये पुणे येथे फक्त दहा-बारा घरे असल्याचा उल्लेख सापडतो. राष्ट्रकूट वंशातील कृष्ण राजा याने तयार केलेल्या दानपत्रामध्ये (इ.स. ७५८) या शहराचे नाव ‘पुण्य विषय’ असे असल्याचे आढळते. पुढे त्याचे ‘पुनक विषय’ झाले. आणि इ. स. ९९३ मध्ये ते ‘पुनवडी’ झाल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर ते पुणेश्वर मंदिरामुळे ‘पुणे’ असे झाले असावे. एकंदर पुणे नावविषयी अशा आख्यायिका आहेत.
चतु: शृंगी पुण्यात कशी आली ती कथा पुढे आहे.
नाशिक जवळच्या वणीचे म्हणजेच सप्तश्रुंगीदेवीचे पुण्यातील स्थान म्हणजे चतु:श्रुंगी. सप्तश्रुंगनिवासिनी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक व अनेकांची कुलस्वामिनी.
पुण्यात विद्यापीठ परिरसरात सेनापती बापट रस्त्यापासून सुमारे दीडशे फूट उंच चढून गेल्यावर चतु:शृंगी मातेचे विलोभनीय दर्शन होते. चतु:शृंगी माता स्वयंभू व जागृत असून ती नवसाला पावते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
या मंदिरासंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते.
पेशव्यांचे पुण्यातील एक सावकार दुर्लभशेठ पीतांबरदास महाजन हे देवीचे परमभक्त होते. दरवर्षी ते नाशिकजवळील श्रीसप्तशृंगी गडावरील देवीच्या यात्रेस जात असत. कालमानाने ते अतिशय वृद्ध झाले व वारी चुकणार असे त्यांना वाटू लागले व ते अतिशय दु:खी झाले. तेव्हा श्रीसप्तशृंगी देवी त्यांच्या स्वप्नात आली व पुण्याच्या वायव्येस असलेल्या डोंगरावर आपण वास्तव्यास असल्याचे त्यांना सांगितले. त्याप्रमाणे त्यांना या डोंगरावर देवीचे स्वयंभू स्थान आढळले.परंतु वेळेआधीच दुर्लभशेठ देवीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले तेंव्हा देवी पूर्ण प्रकट झालेली नसून तीन हात व चेहेराच प्रकट झाल्याचे त्यांना आढळून आले. हे स्थान म्हणजेच चतु:श्रुंगी होय. अर्थातच या स्थानी दूर्लभशेठने मंदिर बांधले.
वणीची सप्तशृंगी येथे अवतरली सप्तशृंगी देवीच्या मंदिरापाशी डोंगराची सात शिखरे होती असे म्हणतात. आता तेथे चारच शिखरे दिसतात म्हणून या देवीला चतु:शृंगी’ हे नाव मिळाले
पुणे शहरातील नरपगीर गोसावी यांना देवी प्रसन्न झाल्यामुळे त्यांनी तेथे सभामंडप, पायऱ्या व विहीर बांधली.
हनुमान जयंती चैत्री पौर्णिमा शनिवार, पूर्वा नक्षत्र शके १६८७ हा देवीचा प्रकटदिन आहे. चैत्र पौर्णिमेचा हा विशेष दिवस देवीचा प्रकट दिन म्हणून दरवर्षी मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. मंदिराचा सभामंडप, धर्मशाळा, पाय-या, विहीर, रस्ते, दागदागिने हे सर्व भक्तांनी श्रद्धेने अर्पण केले आहे.
चतु:शृंगी मंदिराच्या परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून नवरात्रीत मोठी जत्रा भरत असे, ती कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालत असे.
पुण्यात उत्तर पेशवाईत दुर्लभशेठने नाणी पाडण्याचा म्हणजेच टाकसाळीचा मक्ता घेतला होता, तसेच नाशिकजवळही दूर्लभशेठची एक टाकसाळ होती. दूर्लभशेठने पुण्यात एक धर्मशाळा बांधली व तेथे कालियामर्दनाची मूर्ती स्थापन केली.
*लक्ष्मीरस्त्यावर सतरंजीवाला चौकानजीक ही मूर्ती आजही पाहायला मिळते. चतु:श्रुंगी हे पूर्वीपासून पुणेकरांचे श्रद्धास्थान राहिले आहे. नवरात्रात गावातून तालीमबाज नारळाचे तोरण घेऊन चतु:श्रुंगी येथे पहाटे पळत जात असत. आता तालीमबाज व पळत जाणे बाजूला पडले असले, तरी आजही पुण्याच्या पेठांमधून चतु:श्रुंगीला तोरण वाहण्याची प्रथा सुरू आहे.
चतु:श्रुंगीचे दुसरे एक मंदिर रविवार पेठेत आहे हे मात्र थोडक्याच जणांना माहित असेल. सुमारे २०० वर्षांपूर्वी किसनदास राजाराम यांनी येथे देवीची स्थापना केली व बढाई समाजाने मंदिर बांधले. येथे देवी तांदळा स्वरूप आहे. सुभानशा दर्ग्याच्या चौकातून गोविंद हलवाई चौकाकडे जाऊ लागले की उजव्या बाजूस हे मंदिर आहे.
अशी चतु:शृंगी देवीची पौराणिक कथा आहे.
संग्राहक : सुश्री शैला मोडक
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ अनोखे व्रत नवरात्रीचे ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
खरं तर हा लेख नसून मनापासून केलेलं एक आवाहन आहे.
नवरात्रात अनेक व्रते केली जातात. कोणी नऊ दिवस उपवास करतात,गादीवर झोपणं वर्ज्य करतात.वहाणा वापरत नाहीत, तर कोणी नऊ दिवस जोगवा मागतात. हल्ली एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. तसा तो वाईट नाही, पण त्याचा अतिरेक झाला आहे. मुख्य म्हणजे हा प्रकार धार्मिक नाही . कोण्या एका व्यापाऱ्याने स्वतःचा व्यवसाय वाढावा म्हणून नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या, ड्रेस वापरण्याची टूम काढली आणि सर्वांनी ती डोक्यावर घेतली. प्रत्येकीला ते सहज शक्य आणि परवडणारे असतेच असे नाही. कुणीतरी असली धार्मिक आधार नसलेली प्रथा चालू करतात आणि सर्वजण ती अंधपणे आचरणात आणतात. ह्या प्रथांची रूढी बनते
चला तर आपण नवीन प्रथा सुरू करूया. नवरात्रातला प्रत्येक दिवस सत्कारणी लावायचा असे आपण व्रत घेऊया. उतायचे नाही मातायचे नाही, घेतला वसा टाकायचा नाही हे पक्के करू या.
पहिला दिवस-या दिवशी आपण स्वतःपासून सुरुवात करुया, स्वतःचे लाडकोड स्वतः पूर्ण करू या, हवं ते खाऊया आणि आवडते छंद जोपासूया. पण मनाशी एक गोष्ट पक्की करायची की मन मारायचं नाही, कुठलीही इच्छा दडपायची नाही. कुठल्याही कारणाने पुढे ढकलायचे नाही.
दुसरा दिवस– हा दिवस आपल्या जवळच्या लोकांचे लाड.कौतुक करण्यात घालवूया. त्यांना आठवणीने त्यांचं तुमच्या आयुष्यातलं महत्त्व जाणवून देऊया. प्रत्येकाला हे मनापासून ऐकायचं असतं.
तिसरा दिवस– हा दिवस देऊया मैत्रिणींना आणि स्नेह्यांना. दुरावले असतील तर फोन करा. जवळ असतील तर एकत्र जमून आनंदात वेळ घालवा. ” माझ्यासाठी मैत्री किती महत्वाची आहे “ ही भावना त्यांच्यापर्यंत पोचू द्या.
चौथा दिवस- या दिवशी गरजू व्यक्तींना मदत करायची. ही मदत पैसे, वस्तू, शब्द कोणत्याही स्वरुपात चालेल. मग ती व्यक्ती वृद्धाश्रम- अनाथ आश्रम येथील चालेल_
पाचवा दिवस – विद्या “ व्रत “ आहे असं म्हणूया. शिक्षणासंदर्भात जिथे जेवढी जमेल तशी मदत करू या. विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य द्या, किंवा कुणाला काही शिकवा. शाळेला, ग्रंथालयाला मदत करा.
सहावा दिवस – हा दिवस राखून ठेवूया मुक्या प्राण्यांसाठी. ” गोशाळांना” भेट द्या. प्राण्यांना स्वतः चारा खाऊ घाला. प्राणी संस्थांना मदत करा.
सातवा दिवस – हा दिवस निसर्गासाठी ठेवूया. एक तरी रोपटे लावूया, आणि निसर्गाचे संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखू या
आठवा दिवस – हा देशासाठी ठेवू या. माझा देश, माझे राष्ट्र, माझा जिल्हा यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार करूया. आपला परिसर स्वच्छ ठेवू या. सरहद्दीवरील सैनिकांना दोन प्रेमाचे शब्द पाठवूया
नववा दिवस- ” पूर्णाहुतीचा” दिवस. सर्व वाईट चालीरीती, रुढी आणि दुष्ट विचारांची आहुती देऊ या. सकारात्मक विचारांच्या पुरणाच्या दिव्यात माणुसकीच्या ज्योती लावून त्याआदीशक्तीची आरती करु या. आपुलकीचा, एकात्मतेचा गोड प्रसाद वाटू या.
दहावा दिवस – सीमोल्लंघनाचा दिवस. आप़ण केलेल्या निर्धाराप्रमाणे, आपले मन नकारात्मक विचारांचा उंबरठा ओलांडून पुढे गेले आहे का हे बघा. मन मोकळं करा, लिहा बोला पण व्यक्त व्हा. कारण विचार आणि कृती बदलणे हेच खरे सीमोल्लंघन होय .मग आनंदाचा सोनेरी दसरा आपल्या आयुष्यात कायम असेल आणि प्रसन्न झालेल्या आदिशक्तीचा कृपाशिर्वाद ही पाठीशी असेल.
—-ही सगळं करताना त्या त्या दिवसाच्या रंगाचे कपडे परिधान करू नका असे नाही. पण नुसता कपड्याचा रंग बदलण्यापेक्षा आपले मळकट झालेले विचार बदलूया.
अश्विन महिना लागला, की शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवस, आणि हो, नऊ रात्रीसुद्धा नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू होते. नवरात्रोत्सव हा देवीचा उत्सव. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अखील भारतातील देवीस्थाने गजबजून जातात. देवीच्या मंदिरातून श्रद्धाळू भाविकांची अपार गर्दी उसळते. ‘उदे ग अंबे उदे’ म्हणत देवीच्या उदयाची आकांक्षा बाळगली जाते. तिला आवाहन केलं जातं.
आदिशक्तीच्या मातृस्वरुपाला अंबा, जगदंबा़, किंवा अंबाभवानी म्हणतात. याच शक्तीने, प्रकृतीने, निर्गुणाला चेतवून अखंड ब्रह्मांडाची निर्मिती केली. तीच जन्मदात्री, धात्री, पालनकर्ती आणि रक्षणकर्तीही. हीच महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली या रुपांनी त्रिविध आणि त्रिगुणात्मक बनते. तिची नाना रुपे आहेत. तिला नाना नावांनी ओळखले जाते. तिची स्थाने जशी अनेक आहेत, तशीच तिच्याठायी मानवी मनाने वेगवेगळी सामर्थ्ये कल्पिली आहेत. भवानी, रेणुका, चामुंडा, शांतादुर्गा, पद्मावती, संतोषी, जोगेश्वरी, शाकांबरी ही त्यापैकीच काही नावे.
महालक्ष्मी हे जगदंबेचेच एक रूप आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर, मुंबई, केळशी, आडिवरे, कुडाळ, वाई इ. ठिकाणी महालक्ष्मीची मंदिरे आहेत, तथापि कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या स्थानाचे महात्म्य खूप आहे. तिच्या नावाने पिठा-मिठाचा जोगवा’ मागत कोल्हापूरला जाताना भाविक महिला म्हणतात,
‘कोल्हापूरवासिनी ग अंबे दे दर्शन मजसी
तुझ्या कृपेने जाती लयाला पापांच्या राशी’
आपल्याला पिठा-मिठाचा जोगवा’ सत्वर’ घालायला ती सांगते. कारण तिला दूरवर कोल्हापूरला जायचय. देवीला बांगड्या, हार-गजरे अर्पण करायचेत. साडी-चोळी नेसवून खण-नारळाने तिची ओटी भरायचीय. ती सौभाग्याची देवता आहे, असा स्त्रियांचा विश्वास आहे. लोकमानसात हे विचार, संस्कार, श्रद्धा, भावना खूप खोलवर रुजलेल्या आहेत.
कोल्हापूरवासिनी अंबाबाई, हे पार्वतीचं रूप, की लक्ष्मीचं, याबद्दल अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. पुराणकथा व अन्य ग्रांथिक आधार बघितले, तर ती शिवाची पार्वती आहे, तसेच विष्णूची लक्ष्मीही आहे, असे सांगणार्या कथा आपल्याला वाचायला मिळतात.
कोल्हापूर हे आद्य आणि महत्वाचं शक्तिीपीठ आहे. महत्वाच्या साडेतीन पीठातील ते पहिले महत्वाचे पीठ. या शक्तिपीठांबद्दल अशी कथा सांगितली जाते, की दक्ष प्रजापती आणि असिक्वीनी यांना जगदंबेच्या वरदानाने सती नावाची एक सर्वज्ञ व अवतारी कन्या झाली. तिने शंकराशी विवाह केला. दक्षाला ते पसंत नव्हते. पुढे दक्षराजाने एक यज्ञ केला. त्यात सतीचा अपमान झाला, म्हणून तिने यज्ञवुंâडात उडी घेतली. त्यामुळे शंकर संतप्त झाला. त्याने यज्ञकुंडातून अर्धवट जळलेले निष्प्राण शरीर बाहेर काढले व ते खांद्यावर टाकून त्याने तांडव सुरू केले. त्यामुळे सगळी पृथ्वी भयभीत झाली, तेव्हा नारायणाने शिवालायातून बाहे काढण्यासाठी आपल्या सुदर्शन चक्राने व धनुष्यबाणाने मागच्यामागे सतीच्या देहाचे अवयव तोडण्यास सुरुवातकेली. या पवित्र देहाचे अवयव पृथ्वीवर १०८ ठिकाणी पडले. तिथे तिथे शक्तिपीठे निर्माण झाली. कोल्हापूर (किंवा पूर्वी यालाच करवीर नगरी म्हणत) इथे सतीच्या हृदयापासूनचा वरचा भाग पडला. सर्व अवयवात मस्तक हे प्रधान, त्यामुळे सर्व शक्तिीपीठात कोल्हापूर हे सर्वोच्च व आद्य शक्तिपीठ मानले जाते. दुसरे शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची भवानी. तिसरे म्हणजे माहूरची रेणुका व अर्धे पीठ म्हणजे वणीची सप्तशृंगनिवासिनी.
कोल्हापूरवासिनी अंबाबाई, हे लक्ष्मीचं, रूप आहे, असं सांगणारी कथाही पुराणातआहे. एकदा काश्यपऋषी यज्ञ करत असताना, त्याचा हविर्भाग कुणाला अर्पण करणार असे नारदाने विचारले, असता कोणती देवता यासाठी योग्य, असा विचार सुरू झाला. मग ते ठरण्याची जबाबदारी भृगु ऋषींवर टाकण्यात आली. ते प्रथम ब्रह्मलोकी गेले. नंतर कैलासावर शंकराकडे गेले, पण या दोघांनीही त्यांची दखल घेतली नाही. ते रागावून वैकुंठाला गेले. तिथेही विष्णू-लक्ष्मी बोलत होते. त्यांचे काही भृगुऋषींकडे लक्ष गेले नाही. ते संतापले आणि त्यांनी विष्णूच्या छातीवर लाथ मारली. पुढे विष्णुचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी ऋषींचे स्वागत केले आणि म्हणाले, ‘आपल्यासारख्या महात्म्याचे दर्शन मोठ्या पुण्याईने होते. माझ्या खडकासारख्या छातीवर लाथ मारल्याने आपले पाऊल दुखावले तर नाही ना? बोला मीआपले काय प्रीयकरू?’ त्यांचा हा दिव्य भाव पाहून भृगुऋषींचा राग पळून गेला. त्यांनी आपल्या पावलाचे चिन्ह कायमचे छातीवर धारण करायला सांगितले व ते मृत्यूलोकी निघून गेले व तिथे जाऊन त्यांनी विष्णू हाच हविर्भागदेण्यासाठी योग्य आहे, असे सांगितले. तेव्हापासून’ भक्तवत्सलांछन’ हे बिरुद विष्णूदेवाने अलंकाराप्रमाणे मिरवले आहे.
नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मी माझे काही विचार या लेखातून मांडण्याचा प्रयत्न करते—-
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम:
नम:प्रकृत्यै भद्रायै नियत:प्रणता स्मताम् ।।
अश्विन शुद्धप्रतिपदेपासून घरोघरी घटस्थापना होते. देवीचे मूर्त तेज वातावरण उजळते.मंत्रजागर, आरत्या, यांचा नाद घुमतो.उदबत्त्या ,धूपार्तीचे सुगंध दरवळतात. दररोज नवनवे नैवेद्य देवीला अर्पण केले जातात. नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रेही परिधान केली जातात. सर्वत्र उत्साह, मांगल्य, पावित्र्य पसरलेले असते.
लहानपणापासून आपण एक कथा ऐकत आलो आहोत– महिषासुराची. या महिषासुराने पृथ्वी आणि पाताळात अत्याचार माजवला होता. आणि त्यास स्वर्गाचे राज्य हासील करायचे होते. सर्व देव इंद्रदेवांकडे जाऊन ,महिषासूरापासून रक्षण करण्याची प्रार्थना करतात. इंद्र आणि महिषासुरात युद्ध होते व या युद्धात इंद्रदेव पराभूत होतात. हतबल झालेले देव ब्रह्मदेवाकडे येतात.व आसुरापासून रक्षण करण्याची विनंती करतात. महिषासुराचा वध हा मनुष्यमात्राकडून होणे असंभव होते. मग ब्रह्मा, विष्णु,महेश यांच्या तेजातून एक स्त्रीशक्ती निर्माण केली जाते. ही स्त्रीशक्ती म्हणजेच आदीमाया.–“ आदीशक्ती.दुर्गामाता.”
शंकराचे त्रिशूळ, विष्णुचे चक्र, वरुणाचा शंख, यमाची गदा, तसेच कमंडलु, रुद्राक्ष, अशा दहा शस्त्रांची परिपूर्ण शक्ती…दशभुजा दुर्गा..सर्वशक्तीमान रुप– तिचे आणि महिषासुराचे घनघोर युद्ध होते. व महिषासुराचे दारुण मर्दन होते. म्हणून ही महिषासुरमर्दिनी—सिंहारुढ ,पराक्रमी, तेज:पुंज देवी.
नवरात्रीचे ,महाराष्ट्रात आणखी एक विशेष म्हणजे भोंडला. भोंडला म्हटले की शालेय जीवनातले दिवस आठवतात. नवरात्रीत सगळ्या सख्या,नऊ दिवस वेगवेगळ्या सखीकडे जमतात. पाटावर सोंडेत माळ धरलेल्या हत्तीचं चित्र काढायचं, अन् त्या पाटाभोवती फेर धरुन एकेक प्रचलित लोकगीतं गायची—तर असा हा भोंडला, भुलाई, हादगा —
ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा।।
–अशी सुरुवात होऊन मग गाणी रंगत जातात. सख्या आनंदाने फुलतात. आणि मग शेवटी—
बाणा बाई बाणा स्वदेशी बाणा
गाणे संपले खिरापत आणा..।।
खिरापत ही गुलदस्त्यातील. ती ओळखायची. अन् नंतर चट्टामट्टा करायचा…नवरात्रीच्या या उत्सवातील, असा हा पारंपारिक खेळ…सामुहिक आनंदाचा सोहळा.
अर्थात् नवरात्र म्हणजे देवीचाच उत्सव. तिची शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा ,कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री ही निरनिराळी नऊ नावे असली, तरी ती त्या एकाच आदीशक्तीची विविध रुपे आहेत. देवीच्या कथाही अनेक आहेत. पण सामाईकपणे ही नारीशक्ती आहे.आणि तिचा अवतार,अहंकार, क्रोध, वासना, पशुप्रवृत्ती, यांचा संहार करण्यासाठीच झाला आहे…
दरवर्षी नवरात्री उत्सवात या सर्वांचं,मोठ्या भक्तीभावाने पूजन,पठण होते. गरबा, दांडीयांचा गजरही या आनंदोत्सवाला सामायिक स्वरुप देतोच..
पण मग एका विचारापाशी मन येऊन ठेपतं—-आपले सर्वच सण, हे आध्यात्मिक संदेश घेऊन येतात..अर्थपूर्ण.नैतिक संदेश.—पण उत्सव साजरे करताना या संदेशाचं काय होतं..?
ज्या स्त्रीशक्तीची नऊ दिवस पूजा केली जाते, दहाव्या दिवशी अनीतीचा रावण जाळला जातो, आणि मग अकराव्या दिवसापासून पुन्हा तीच हतबलता…??
खरोखरच स्त्रीचा सन्मान होतो का? स्त्री सुरक्षित आहे का आज? ज्या शक्तीपीठाची ती प्रतिनिधी आहे , त्या स्त्रीकडे किंवा त्या स्त्रीबाबत विचार करण्याचा समाजाचा दृष्टीकोन नक्की कसा आहे ? —-आज तिच्या जन्माचा आनंदोत्सव होतो का? का तिला उमलण्याच्या आतच खुडलं जातं…?
ज्या पवित्र गर्भातून विश्वाची निर्मीती होते, त्या देहावर पाशवी,विकृत वासनेचे घाव का बसतात…?
विद्रोहाच्या घोषणांनी काही साध्य होते का?–समाजासाठी मखरातली देवी,आणि आत्मा असलेली, चालती बोलती स्त्री.. ही निराळीच असते का?—–
असे अनेक प्रश्न ,अनेक वर्षे युगानुयुगे,अगदी कथांतून, पुराणातून, इतिहासातून व्यक्त झाले आहेत.
आणि आजही ते अनुत्तरीत आहेत.
स्त्रीचा विकास झाला म्हणजे नक्की काय झाले? ती शिकली. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाली. उच्चपदे तिने भूषविली, तिच्या वागण्या बोलण्यातही फरक पडला. तिचा वेशही बदलला. ती आत्मनिर्भरही झाली—-पण तिचा संघर्ष संपला का? तिचे हुंदके,तिची घुसमट,तिची होरपळ..आहेच त्या चौकटीत—एका मोठ्या रेषेसमोरची ती एक लहान रेषच–दुय्यमच. म्हणून डावलणं आहेच. सन्मान कुठे आहे तिचा…?
मग हा जागर कधी होणार? तिच्या सामर्थ्याचं त्रिशूळ, बुद्धीचं चक्र, विचारांची गदा, सोशिकतेचं कमंडलु ,भावनांची रुद्राक्षं, तेजाचे तीर —जेव्हां धार लावून तळपतील ,तेव्हाच या शक्तीपीठाचा उत्सव सार्थ ठरेल…
नवरात्री निमित्ताने जोगवा मागायचाच असेल तर स्त्री-जन्माच्या पावित्र्याचा. .मांगल्याचा .शक्तीच्या आदराचाच असला पाहिजे हे मनापासून वाटते…
हे देवी ! तुझ्या दशभुजा, सर्व शस्त्रांसहित पसर आणि तुझ्या दिव्य तेजाचंच दर्शन दे…..!!!