मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ कुत्रा छंद नव्हे संगत – भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ पुस्तकावर बोलू काही ☆ कुत्रा छंद नव्हे संगत – भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

छंद नव्हे संगत पुस्तकाचे अंतरंग भाग ३

पुस्तकाच्या शेवटी एक श्वानधर्माचे उदाहरण वाचताना खरोखरच अचंबा वाटतो. ती गोष्ट

अरुणाचल प्रदेश ते‌ काराकोरम खिंड हे आठ हजार कि.मि. अंतर पार करण्यात सेनादलातील तीन अधिकाऱ्यांना कुत्र्याने कशी साथ दिली! गिर्यारोहण चालू झाले. भूतानमधील डोंगररांग दरीतून जाताना मॅस्टिफ जातीचे कुत्र्याचे पिल्लू त्यांच्या मागे लागले. दया आली आणि अधिकाऱ्याने त्याला आपल्या बरोबर घेतले त्याचे नाव द्रुग, (घोडेस्वार) ठेवले गेले. सिक्कीम मधून जाताना द्रुग वेगळ्या मार्गाने पळत जायला लागला. आणि बर्फ उकरायला लागला. पाहिले तर एका माणसाचे प्रेत होते. अधिकाऱ्यांनी हात जोडून पुन्हा त्यावर बर्फ टाकला. पुढे प्रवास गौरी शंकरच्या बेस कॅम्प जवळून २१ हजार फूट उंचीवरून झाला. नेपाळ पार करून कुमाउला पोहोचले. जानेवारी ते नोव्हेंबर त्यांचा प्रवास द्रुगच्या सहवासात आनंदात झाला.

शां. ना. दाते यांच्याकडे श्वान विश्वकोश आहे. कोणत्याही जातीच्या कुत्र्या बद्दल त्याच्या सर्व गुणधर्मांसह संपूर्ण माहिती ते क्षणात देत असत. त्यांचा 50 वर्षांचा परिचय व इतिहास आहे. त्यांच्या परिश्रमाचे आणि तपश्चर्येचे मूर्त रूप हे पुस्तक आहे.

कुत्र्याला बघून पळून जाणारी माणसे हे पुस्तक वाचून कुत्रा पाळण्याचा विचार करू लागले. आणि अनेकांनी प्रत्यक्षात आणले ही. आज दाते हयात नाहीत. पण त्यांचे ९६ पानांचे पुस्तक या रूपाने अमर आहेत.

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-२०) – ‘सुषीरवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

 ☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-२०) – ‘सुषीरवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

मागच्या लेखात एक उल्लेख अनावधानाने राहून गेला त्याविषयी…

तालवाद्यांपैकी ज्या वाद्यांमधे प्राण्यांचं कातडं वापरलेलं असतं त्यांना ‘अवनद्ध वाद्ये’ किंवा ‘चर्मवाद्ये’ असं म्हणतात, त्याचं कारण ‘अवनद्ध’ ह्या शब्दाचा अर्थच ‘कातड्याने मढवलेले’ हे आपण पाहिलं. मात्र तालवाद्यांपैकी इतर वाद्यं, ज्यामधे धातूचे, लाकडाचे दोन तुकडे किंवा चकत्या किंवा नळ्या/काठ्यांचा एकमेकांवर आघात झाल्याने नादनिर्मिती होते त्या वाद्यांना घनवाद्ये असं म्हणतात. दोन्ही प्रकारातली वाद्यं ही तालवाद्यंच आहेत आणि दोन्हींतही नादनिर्मिती ही आघातानेच होते… फरक आहे तो फक्त कातड्याचा वापर त्या वाद्यात झाला आहे कि नाही, इतकंच!

सुषीर वाद्यांकडं वळायचं म्हटलं कि पटकन आपल्या डोळ्यांसमोर उभा राहातो मनमोहन मुरलीधर कृष्ण… आपल्या मुरलीवादनानं अवघ्या जगताला संमोहित करणारा! त्याचं वाद्य म्हणजे ‘बासरी’ ज्यात फक्त एका आकारबद्ध पोकळीत फुंकर मारल्यानंतर निर्माण होणाऱ्या कंपनांतून नादनिर्मिती होते. सर्व सुषीर वाद्यांमधे हे एकच तत्व लागू आहे. मात्र मुळात ह्या तत्वाचा शोध कसा लागला असावा? ह्या तत्वानुसार माणसाकडून अंत:प्रेरणेनं घडणारी गोष्ट म्हणजे शीळ! कोणत्याही वाद्याचा आधार न घेता गोड, मधूर शीळ कशी घातली जाते? तर तिथं असतं ते फक्त एकच तत्व, फुंकरीतून म्हणजेच हवेच्या साहाय्यानं केली जाणारी नादनिर्मिती! शीळ घालत असताना आपसूक निर्माण होणाऱ्या आपल्या तोंडाच्या आणि ओठांच्या स्थितीचा विचार केला असता लक्षात येईल कि, ह्या प्रक्रियेत घशातून येणारा हवेचा झोत तोंडाची पोकळीतून मार्गस्थ होऊन ओठांच्या एका विशिष्ट आकारामुळे योग्यप्रकारे नियंत्रित होत असल्यानं नेटकी व सुंदर नादनिर्मिती होते.

जुन्या ग्रंथांमधे उल्लेख आढळतात कि, प्राचीन काळी ‘अन्न’ म्हणून प्राण्यांची शिकार केल्यावर त्यांचं मांस खाल्यानंतर उरलेले अवयव शिल्लक तसेच राहात असतील. कधीतरी गमतीतच कुणीतरी प्राण्यांच्या शिंगांमधे फुंकर मारून पाहिली असेल आणि असं केलं तर त्यातून छान आवाज येतो हे लक्षात आलं असेल. हळूहळू पुढं हेही लक्षात आलं असेल कि शिंगांचा आकार, लांबी बदलली कि आवाजाची जात बदलते. नंतर ह्या गोष्टीचा उपयोग माणूस एखाद्या कारणासाठी सगळ्यांना एकत्र जमवण्यासाठी किंवा एकमेकांना काही संकेत देण्यासाठी करू लागला.

सर्वांना माहीत असणारी ह्याबाबतीतली काही उदाहरणं म्हणजे… ‘रणशिंग’ हे युद्ध सुरू होत असल्याचा संकेत देणारं वाद्य!… काही मंगल प्रसंगाच्या सुरुवातीला वाजवलं जाणारं व सैन्यसंचालन, मिरवणुकी ह्यातही आढळून येणारं अर्धचंद्राकृती ‘शृंग’ हे वाद्य, शिवाय ‘तुतारी’ हे वाद्यही बऱ्याच जणांना माहिती असेल. ह्या वाद्यांना मंगलवाद्यं मानलं जातं. कारण ही वाद्यं म्हणजे प्राण्यांची शिंगं, म्हणजे नैसर्गिकरीत्या अस्तित्वात आलेली!… पुढं मग इतर वाद्यांप्रमाणं वेगवेगळे प्रयोग ह्यात झाले. आज धातूचीही ह्या प्रकारची वाद्यं आपल्याला पहायला मिळतात, काही थोडा भाग धातूचा आणि उर्वरित भाग लाकडाचा अशीही असतात, मात्र त्यांचं मूळ हे प्राण्यांचं शिंग आहे.

ह्याच बरोबर बांबूसारख्या पोकळ नळकांडीत फुंकर मारून बघितली असतानाही आवाज येतोय हेही लक्षात आलं आणि त्यातून हळूहळू पावा, अलगूज, वेणू, बासरी ह्यांनी जन्म घेतला. झाडाच्या पातळ पानाची गुंडाळी (ज्याला बहुधा आपण पुंगळी म्हणायचो) करून त्यात फुंकल्यावरही सुंदर आवाज येतो हे आपण सर्वांनीच लहानपणी करून पाहिलं असेल. ही पिपाणीची शिशुअवस्था म्हणता येईल.

त्याचबरोबर झाडांची पानं एकावर एक ठेवून ती ओठांत धरून त्यात फुंकर मारून आवाज काढण्याचा उद्योगही आपण सर्वांनीच केला आहे. दोन पानांच्यामधे आपसूक तयार होणाऱ्या हवेच्या छोट्याशा पोकळीत फुंकर मारली गेल्यानंच त्यातून आवाज निघत असतो. आज ज्या वाद्यांमधे ‘रीड’ ही संकल्पना वापरलेली दिसून येते तिचा जन्म ह्या प्रकारातूनच झाला असावा.

अशाप्रकारे नादनिर्मिती होऊ शकते हे एकदा लक्षात आल्यावर ‘शंख’ हेही एक नैसर्गिक वाद्य माणसाला सापडलं. प्राचीन काळापासून हे वाद्य पवित्र मानलं गेलं आहे त्याचं कारणच कदाचित ‘परमशक्तीकडून झालेली ह्या वाद्याची निर्मिती’ हे असावं! नैसर्गिक शक्तीनं तयार स्वरूपातच आपल्याला बहाल केलेलं हे वाद्य वाजवताना मानवाला फक्त त्यात फुंकर मारण्याशिवाय काहीच करायचं नसतं आणि ‘परमोच्च शक्तीनं’ तयार केलेलं वाद्य म्हणजे त्यात काहीतरी शक्ती असणंही अपरिहार्यच! म्हणूनच जिथं शंख फुंकला जातो त्या जागेतील सर्व नकारात्मक शक्ती नाश पावून तिथलं वातावरण शुद्ध होतं असं आपल्याकडं विश्वासानं मानलं जातं. घराघरांतून पूजाविधीच्या वेळी शंखपूजन आणि शंख फुंकण्याचं कारणही हेच असावं.

गारुड्याची पुंगी म्हणजेही सुषीर वाद्यच! छोट्या आकाराच्या भोपळ्याच्या खालच्या भागात एकसारख्या लांबीच्या बांबूच्या दोन नळ्या प्रत्येकी एकेरी जिव्हाळीसहीत (रीड) मेणाने घट्ट बसवलेल्या असतात. त्यातल्या एका नळीला छिद्रं असतात व दुसरी नळी एकच आधारस्वर निर्माण करत राहाते. वरती भोपळ्याच्याच निमुळत्या भागातून फुंकर मारली कि नादनिर्मिती होते.

ह्या प्रकारच्या वाद्यांपैकी शास्त्रीय संगीतनिर्मिती करू शकण्याइतपत विकसित, प्रगत अवस्थेला पोहोचलेली वाद्यं म्हणजे बासरी, शहनाई, सुंद्री आणि दक्षिण प्रांतातील नादस्वरम्‌ ! ह्या प्रकरातील वाद्यं वाजवण्याच्या दोन पद्धती आहेत. काही वाद्यांचं निमुळतं टोक ओठांत धरून मग त्यात फुंकर मारली जाते, उदा. शहनाई, सुंद्री, पुंगी, पावा इ. आणि काही वाद्यांमधे बाहेरून फुंकर घालून नादनिर्मिती केली जाते. उदा. बासरी, शंख इ.!

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  asawarisw@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अंगण ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

परिचय

बी.एससी, बीएड. २१ वर्षे हायस्कूल मध्ये नववी दहावी ला बीजगणित व सायन्स विषय शिकवले. मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाले.

बोर्डाच्या बीजगणित परीक्षक व शास्त्र प्रात्यक्षिक परीक्षा परीक्षक एसएससी बोर्ड सेंटर कंडक्टर तीन वर्षे

छंद  वाचन, लेखन व पर्यटन

दरवर्षी दोन तीन दिवाळी अंकात कथा छापून येतात

☆ विविधा ☆ अंगण ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆ 

ये ग ये ग चिऊताई! बाळाच्या अंगणी! तुला देईल चारा पाणी! माझी सोनुली राणी! असं म्हणताच माझा ५ वर्षांच्या नातवाने विचारले अंगण‌ म्हणजे काय ग आजी? फ्लॅटमध्ये रहात असल्यामुळे प्रश्न पडणे स्वाभाविकच.

अंगण म्हणजे काय हे सांगताना मी बालपणी अंगणात रमून गेले.

अंगण म्हणजे घराची शोभा. अंगणातील तुलसी  वृंदावन म्हणजे घराचं पावित्र्य. रेखीव रांगोळी काढलेल्या तुळशी समोर उदबत्तीचा सुगंध दरवळायला.याच अंगणात उंच मोरपिसाची टोपी घालून वासुदेव यायचा,माकडांचा खेळ रंगायच्या.बाहुला बाहुलीचे लग्न अंगणात लागायचे, वरमाई कोण आणि कोणाला वरमाईचा मान कोणाला द्यायचा याचं भांडण अंगणात जुंपायचे. दुपारी मुलींचे गजगे,काचकवडया,टिकरया तर संध्याकाळी मुलांचे  गोटया, विटीदांडू, लगोरी हे खेळ रंगायचे.अबोली चे गुच्छ,तळहाताएवढे जास्वंदीचे फूल, मंजिऱ्या मुळे घमघमणारी तुळस अंगणात असायची. गुढीपाडव्याला गुढी, आषाढीला पालखी सजवून वारी निघायची.नागपंचमीला उंच झोक्याची चढाओढ चालायची. अंगणात हंडी फोडली जायची. काल्याचा प्रसाद खायचा काय सुरेख चव असायची काल्याची!

नवरात्रात फेर धरून हादगा चालायचा, उंच स्वरात हादगा गाणी चालायची. खिरापत हातात पडताच मुली शेजारच्या अंगणात धावत जात.

दिवाळीत किल्ला तयार करून त्यावर शिवाजी महाराज विराजमान व्हायचे. सर्व मुले आपल्या घरातील मावळे किल्ल्यावर उभे करायचे व किल्ला सजवायचे.

उन्हाळ्यात अंगणात पथारी पसरून गप्पा.विनोद, गाणी यांना ऊत यायचा.. मन भरलं की रातराणीचा,मोगरयाचा सुगंध घेत झोपी जायचं.

मी अंगणाच्या आठवणीत एवढी रमून गेले की “आजी मला दूध दे ना गं!” असे तो म्हणताच मी एकदम भानावर आले.

 

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पटलं तर… ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

Author: Hemant Bawankar - साहित्य एवं कला विमर्श

 ☆ विविधा ☆ पटलं तर… ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

आपण कधी कधी अगतिक आणि अहसाय होतो ना? त्या दिवशी माझी तशीच अवस्था झाली होती. डेंटिस्ट डॉक्टरांकडे त्या खुर्चीत मी बसले होते आ  ऽ ऽ वासून. माझ्या दाढेच्या पोकळीचे ख ss र करून कोरीव काम चालले होते. तेवढ्यात डॉक्टरांचा एक मित्र आला. माझ्या दाताचे ड्रिलिंग करता करता त्यांच्या गप्पा सुरु झाल्या.

त्या मित्राचा मुलगा नुकताच M.B.B.S झाला होता आणिलगेच एका सरकारी दवाखान्यात जॉबही मिळाला होता. त्या आनंदा प्रित्यर्थ्य या मित्राला पेढे द्यायला तो आला होता.

बातमी चांगली होती म्हणजे काय खूपच चांगली होती. डिग्री मिळताच जॉब? वॉव! या मध्ये मी अस्वस्थ होण्यासारख – काहीच नव्हते. पण त्यांचे पुढचे बोलणे ऐकून माझा मेंदू हादरायला लागला.” आता काही काळजी नाही बघ. अरे, सरकारी दवाखान्यात काम असते कुठे आता? पण पगाराची निश्चिंती. अरे असा जावई मिळवायला आमच्या घरी रांग लागल रांग ! कपाटापासून गॅस शेगडी पर्यंत सगळ देतात जावयाला. आम्हाला काही चिंता नाही बघ.”

हे ऐकल्यावर त्याची मेडिकल कॉलेजला अॅडमिशन कशी झाली असेल ? तो पास कसा झाला असेल याहीपेक्षा त्याच्याकडे पेशंट आला तर त्याचे कसे व्हायचे या विचाराने माझ्या दाढेची पोकळीच काय मेंदूही हादरायला लागला.

मुलाचे बारावीचे वर्ष म्हणजे सगळे घरदार अलर्ट. मुलांवर घारीसारखी नजर असते पालकांची. त्याचे कॉलेज किती ते किती? कलासच्या वेळा कोणत्या? त्यानुसार आई आपल्या कामाचे नियोजन करत असते. एका मैत्रिणीच्या मुलाचा हा अनुभव. क्लासच्या एका परीक्षेमध्ये त्याला खूप चांगले मार्क्स मिळाले होते. पण त्या सरांचा त्यावर विश्वास बसला नाही. त्याचा तपासलेला पेपर त्याला न दाखवता त्याला त्यांनी ही उत्तरं बघून लिहिलीस हे कबूल कर नाहीतर तुला घरी सोडणार नाही अशी तंबी दिली. तो सारखे सांगत होता मी अभ्यास करून, नबघता पेपर सोडवलाय. पण सरांना ते काही केल्या पटत नव्हते. तासभर बिचारा उभा! सर काही केल्या त्याला घरी जाऊ देईनात. त्याला खूप भूक लागली होती. शेवटी कळवळून तो सरांना म्हणाला,” सर, तुम्ही सांगता म्हणून म्हणतो मी पेपर बघून सोडवला.” कॉपी न करता त्याला तसे बोलावे लागल. इकडे मुलगा घरी आला नाही म्हणून आई काळजीत. आल्यावर त्याने खरे कारण सांगितले तरी तिलाही ते पटेना. या मानसिक दोलायमान अवस्थेत त्याचे आठ दहा दिवस अस्थिरतेत गेले. आता तोच मुलगा आपल्या मेरिटवर हिमतीवर चांगली नोकरी मिळवून परदेशात स्थिर झालाय. काय विचार करायचा आपण आणि काय निष्कर्ष काढायचा यातून?

आपण मोठ मोठे अभिनेते इतके पाहतो की त्यांनी मेडिकलच शिक्षण पूर्ण केले आणि नंतर ते सोडून देऊन अभिनया कडे वळले आणि ते क्षेत्र गाजवल. कोणी इंजिनियरींगची डिग्री मिळवून गायनाकडे वळले आणि प्रसिद्ध गायक बनले. या लोकांनी सांगितलेले समर्थन न पटण्यासारखे असते. एका गरीब, हुशार, होतकरू मुलाला तुमच्या शिक्षणाचे पैसे तरी द्यायचे ना, त्याचे आख्खे घर वर आले असते. त्याची बुद्धि आणि वेळ धडपड करण्यात जाऊन त्याचे आयुष्य कष्टात काळजी करण्यात गेले नसते. कितीतरी मुली सुद्धा बारावीला चांगले मार्क्स पडले म्हणून मुलींच्या कोट्यामधून इंजिनियरींगला अॅडमिशन मिळवतात आणि लग्न झाल्यावर आमच्याकडे नोकरी केलेली आवडत नाही म्हणून घरी बसतात. हे आधी नाही का समजत? पण कोण, कुणाला आणि कसे सांगणार ?

असे आपल्या अवती भोवती कितीतरी प्रश्न निर्माण होत असतात. डोक्याभोवती पिंगा घालून आपल्याला त्रस्त करत असतात. आपणच का विचार करत रहातो असेही वाटते. कितीतरी गोष्टी काही केल्या पटत नाहीत. तरी आपण गप्प बसतो.

बघा, पटलं तर

व्हय म्हणा.

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ११) – राग~मधूवंती ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगीत राग गायन (भाग ११) – राग~मधूवंती ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

सूरसंगतराग~मधूवंती

“रंजयती इति राग” असे संगीतांतील रागांविषयी म्हटले जाते. कोणताही राग घ्या, रसिकांचे मनोरंजन करणे हेच त्याचे काम!राग म्हणजे तरी नेमके काय? तर कमीत कमी पांच व अधिकाधिक सात शुद्ध/कोमल स्वरांची गुंफण!

मधूवंती हा त्यामानाने आधुनिक असा सुमधूर राग.

कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे यांचे फार जवळचे स्नेहसंबंध होते.वसंतराव कुमारांना गुरू मानत असत.काही कारणांमुळे दोघांत वाद होऊन थोडा दुरावा निर्माण झाला होता,त्यावेळी मनाच्या विमनस्क अवस्थेत वसंतरावांनी

“मैं आऊ तोरे मंदरवा

पैय्या परत देहो मनबसिया”

अशा अस्थाईच्या दोन ओळी लिहून पाठविल्या.त्यावर कुमारांनी ताबडतोब “अरे मेरो मढ्ढैया तोरा आहे रे।काहे धरो चरन मोरे मनबसिया।।” असा अंतरा लिहून पाठविला व बंदीश पूर्ण केली. तीच पुढे मधूवंतीतील बंदीश म्हणून प्रसिद्ध झाली.

“मी तुमचाच आहे, माझे घरही तुमचेच आहे, असे असतांना माझे चरण धरण्याची काय गरज? असा या ओळींचा अर्थ आहे. दोघांच्या मैत्रीतील सामंजस्य जसे यांत दिसून येते तसाच मधूवंती हा शूद्ध मैत्रीचा राग आहे. याच्या नावांतच मधू आहे, तेव्हा या रागांतील माधूर्याविषयी वेगळे सांगावयास नको.

तांत्रिक द्दृष्ट्या हा राग तोडी थाटांतून निर्माण झाला आहे, परंतु तोडीप्रमाणे रिषभ/धैवत कोमल नसून शुद्ध आहेत. ह्याचे चलन तोडीप्रमाणे असल्यामुळे या रागाचा जनक तोडी थाट असावा असे वाटते.

जाति~ओडव/संपूर्ण

वादीपंचम, संवादीषडज्, राग सादर करण्याची वेळ दिवसाचा तिसरा प्रहर. सहाजिकच मध्यम तीव्र आणि गंधार कोमल. वैचित्र्यासाठी कधीकधी अवरोही रचनेत कोमल निषाद वापरण्याची पद्धत आहे.

नि सा (ग)(म)प नि सां

सां नि ध प,(म)प (नि)ध प,(म)(ग)रे सा असे याचे आरोह नि अवरोह.(ग) (म) प नि सां नि ध प,(म) प (ग) (म)प (नी) ध प,(म)प (ग) (म)(ग) रे सा या स्वरसमूहावरून मधूवंतीची ओळख पटते.

सांझ भई,अजहूॅं नही आये प्रीतम प्यारे ही विलंबीत तीनतालमधील अश्विनी भिडे~देशपांडे यांची बंदीश प्रचलित आहे.बैरन बरखा रितू आई ही कुमारांची मध्यलय तीनतालमधील बंदीश वर्षाऋतूचे चित्र डोळ्यासमोर उभे करते.

असे म्हणतात की कोल्हापूरच्या पाध्येबुवांनी अंबिका असा राग तयार केला,पुढे विलायतखाॅंसाहेबांनी त्याचे मधूवंती असे गोजिरे नामकरण केले.

सुमन कल्याणपूर यांचे मधूवंतीच्या सुरासुरांतून आळविते मी नाम। एकदां दर्शन दे घनश्याम।।हे गीत रसिकजनांचे आवडते आहे. गीत रामायणांतील श्रीराम जेव्हा वनवासाला निघण्यापूर्वी सीतेचा निरोप घेण्यासाठी तिच्या महाली गेले तेव्हा काकूळतीने सीतेने हट्ट केला व ती म्हणाली, “निरोप कसला माझा घेता।जेथे राघव तेथे सीता।।” बाबूजींनी ही रचना मधूवंती या रागांतच निबद्ध केली आहे.

वरील गीतांतील शब्दांवरून मधूवंतीच्या स्वरांत विनवणी, नम्रता या भावना साकार होत असल्याचे आपणांस दिसून येते. बहरला पारिजात दारी, फुले कां पडती शेजारी हे माणिक वर्मांचे गाजलेले गीत मधूवंतीच्या सुरांवरच आधारलेले आहे. मनमंदीरमे आयो शाम, रस्मे उल्फतको निभाये, पायलिया बावरी ही काही सिनेगीते मधूवंतीचीच झलक दाखवितात.

क्रमशः ….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 3 ☆ श्री विनय माधव गोखले

 ☆ विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 3 ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

इथून पुन्हा जगदीश्वरच्या मंदीराकडे येताना एका महत्वाच्या पायरीकडे लक्ष जाते, ते म्हणजे ‘हिरोजी इंदूळकर’ ह्यांच्या. हिरोजींनी मोठ्या हिकमतीने, निष्ठेने रायरीच्या डोंगराचा ‘रायगड’ असा कायापालट केला आणि महाराजांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला होता तो सार्थ केला. महाराज जेव्हा हा दुर्ग बघायला आले तेव्हा हिरोजींनी सोन्यासारखा घडवलेला बेलाग ‘रायगड’ पाहून प्रसन्न झाले. त्यांनी हिरोजींना विचारले “तुम्हाला काय इनाम हवे?” त्यावर हिरोजी म्हणाले “मला सोने नाणे इनाम काही नको. फक्त मंदिराकडे येणार्‍या भक्तांस माझ्या नावाची पायरी दिसेल अशी ठिकाणी ती बांधण्याची परवानगी द्यावी!”

स्वामीनिष्ठ हिरोजींना मानाचा मुजरा करून पुढे आम्ही गाठले ते टकमक टोक! स्वराज्यातील गुन्हेगारांना, विश्वासघातक्यांना इथून कडेलोटाची कठोर शिक्षा दिली जात असे. पण इथेही काही पर्यटकांनी प्लास्टिकच्या बाटल्यांचा कडेलोट करून कड्याच्या टोकावरच कचरा केला आहे. असो.

इथेच घडलेली एक ऐकायला मजेशीर पण प्रत्यक्षात थरारक कथा नेहमी सांगितली जाते. ती म्हणजे, महाराज ‘टकमक’ टोकावर आले असताना त्यांच्यावर छत्री धरणारा एक सेवक वार्‍याच्या झंझावातबरोबर हवेत उडाला. सुदैवाने त्याने छत्री घट्ट पकडून ठेवल्याने तो हवेवर तरंगत, भरकटत, अलगदपणे शेजारील निजामपूर गावात सुखरूप उतरला. तेव्हापासून त्या गावाचे नाव निजामपूर छत्रीवाले असे ठेवण्यात आले. बसने पुण्यास परतीच्या मार्गावर असताना मला ह्या गावाचे नावंही एका फाट्यावर वाचायला मिळाले.

टकमक टोकावरून आमची वरात पुन्हा होळीच्या माळावर आली आणि तिथून महाराजांच्या पुतळ्यामागे असलेल्या राजदरबार, सदर पाहायला निघाली. हा परिसर मात्र चांगलाच भव्य आहे. दरबारात सिंहासनावर बसलेल्या महाराजांचा मेघडंबरी पुतळाही आहे. पण इथे काही फुटांवरून दर्शन घ्यावे लागते, अगदी जवळ जायला आता मनाई आहे. ह्याला कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी कुणा समाजकंटकांनी तलवारीचा तुकडा तोडून पळविला होता.

त्यामागे आले असता दिसतात ते म्हणजे महाराजांचा राजवाडा, राण्यांचे महाल, शयनगृह इ. इथे मात्र सर्व भग्नावशेष पाहून मन खिन्न झाले. नुसतीच जोती पाहून महालांची ऊंची कशी कळणार? आपण नुसत्या कल्पनेचे महाल उभारायचे. राजवाड्याची एकंदर भव्यता मात्र जाणवल्यावचून राहत नाही. येथील एका बाजूच्या मेणा दरवाजाने तुम्हाला गंगासागर तलाव आणि मनोर्‍यांकडे जाता येते तर दुसर्‍या बाजूने धान्य कोठार व तसेच पुढे उतरून ‘रोप वे’च्या वरच्या स्थानका कडे जाता येते.

एव्हाना दोन वाजल्यामुळे जनतेला भूक लागली होती. सर्वजण जेवणाची आतुरतेने वाट पाहत होते जे थोड्याच वेळात ‘रोप वे’ ने दोघे जण घेऊन आले. मेणा दरवाज्याच्या बाहेरील मोकळ्या जागेत अंगतपंगत मांडून पोळी, फ्लॉवर-मटार-बटाटा अशी तिखट रस्सा भाजी, बटाट्याची सुकी भाजी, पापड आणि ‘गिरीदर्शन’ क्लबतर्फे ‘चितळे’ श्रीखंड अशा चविष्ट जेवणावर यथेच्छ ताव मारून झाल्यावर गंगासागर तलावाचे मधुर पाणी पिऊन आम्ही ‘दुर्गदुर्गेश्वर रायगडा’चा निरोप घेतला.

आता उर्वरीत दोन-तृतीयांश ‘रायगडा’चे दर्शन कधी मिळते आहे ह्याची मी रांगेत उभा राहून वाट पाहतो आहे. जगदीश्वर मजवर कृपा करो आणि हा योगही लवकर जुळून येवो, हीच प्रार्थना!

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – तीन ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ संजय दृष्टि – लघुकथा – तीन ☆

तीनों मित्र थे। तीनों की अपने-अपने क्षेत्र में अलग पहचान थी। तीनों को अपने पूर्वजों से ‘बुरा न देखो, बुरा न सुनो, बुरा न कहो’ का मंत्र घुट्टी में मिला था। तीनों एक तिराहे पर मिले। तीनों उम्र के जोश में थे। तीनों ने तीन बार अपने पूर्वजों की खिल्ली उड़ाई। तीनों तीन अलग-अलग दिशाओं में निकले।

पहले ने बुरा देखा। देखा हुआ धीरे-धीरे आँखों के भीतर से होता हुआ कानों तक पहुँचा। दृश्य शब्द बना, आँखों देखा बुरा कानों में लगातार गूँजने लगा। आखिर कब तक रुकता! एक दिन क्रोध में कलुष मुँह से झरने ही लगा।

दूसरे ने भी मंत्र को दरकिनार किया, बुरा सुना। सुने गये शब्दों की अपनी सत्ता थी। सत्ता विस्तार की भूखी होती है। इस भूख ने शब्द को दृश्य में बदला। जो विद्रूप सुना, वह वीभत्स होकर दिखने लगा। देखा-सुना कब तक भीतर टिकता? सारा विद्रूप जिह्वा पर आकर बरसने लगा।

तीसरे ने बुरा कहा। अगली बार फिर कहा। बुरा कहने का वह आदी हो चला। संगत भी ऐसी ही बनी कि लगातार बुरा ही सुना। ज़बान और कान ने मिलकर आँखों पर से लाज का परदा ही खींच लिया। वह बुरा देखने भी लगा।

तीनों राहें एक अंधे मोड़ पर मिलीं। तीनों राही अंधे मोड़ पर मिले। यह मोड़ खाई पर जाकर ख़त्म हो जाता था। अपनी-अपनी पहचान खो चुके तीनों खाई की ओर साथ चल पड़े।

©  संजय भारद्वाज

(18.7.18, रात्रि 9.06)

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

9890122603

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 2 ☆ श्री विनय माधव गोखले

 ☆ विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 2 ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

ह्यापुढे आम्ही पोहोचलो ते एका अतिशय ऐतिहासिक महत्वाच्या जागी तो म्हणजे होळीचा माळ. इथे गडावरील होळीचा सण साजरा व्हायचा आणि इथेच महाराजांचा राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला होता. तिथल्या छत्रपतींच्या भव्य पुतळ्यापुढे नतमस्तक झाल्यावर जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. ‘स्वराज्य’ मिळवण्यासाठी स्वत:चे अवघे आयुष्य ओवाळून टाकणार्‍या, जिवाची बाजी लावून परक्या शत्रूचा तसेच घरभेद्यांचाही नि:पात करणार्‍या, प्रसंगी महाघोर संकटांना शौर्याने तोंड देऊन स्वत:ची, अवघ्या रयतेची, स्वदेशाची आणि स्वधर्माची अस्मिता जपणारे आणि उजळवून टाकणारे श्रीमान योगी जिथे राजसिंहासनावर बसले त्याच भूमीवर आपण उभे आहोत ही जाणीव मनाला गहिवर आणि डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू आणते.

होळीच्या माळावरून चालत पुढे आम्ही बाजारपेठ मध्ये आलो. आता ह्या ठिकाणी घरांची फक्त जोती शिल्लक आहेत. इथे घोड्यांवरून मालाची खरेदी-विक्री चालायची असे म्हणतात. काही इतिहासतज्ञ असेही म्हणतात की ही बाजारपेठ नसून गडावर मुक्कामास असलेल्या सरदारांची / भेटीस आलेल्या खाशांच्या राहण्याची सोय म्हणून बांधलेली घरे आहेत.

बाजारपेठेतून पुढे आल्यावर एका मावशींकडे कोकम सरबत पिण्याचा मोह आवरला नाही. मावशींकडे “तुमचे गाव कोणते? आता धंदा’पाणी’ कसे सुरू आहे?” अशी विचारणा केल्यावर “पायथ्याचं हिरकणवली आमचं गाव. अजून पूर्वीइतके पर्यटक येत नाहीत.” म्हणाल्या. “इथून भवानीकडा किती लांब आहे?” असे विचारण्याचाच अवकाश त्यांनी गडाची सगळी कुंडलीच माझ्यासमोर मांडली.  ? “गड पूर्ण बघायला किमान तीन दीस लागतील, गडावर इतकी तळी आहेत, तितकी टाकं आहेत”,

त्याचजोडीला “दारूगोळ्याच्या कोठारावर इंग्रजांचा तोफगोळा पडून मोठा स्फोट झाला आणि पुढे बारा दिवस गड जळत होता”, अशी काही दारुण ऐतिहासिक माहिती बाईंकडून ऐकायला मिळाली. त्यांचा नवरा किंवा घरातील कुणीतरी गाईडचे काम करणारे असावे अशी मला शंका येते न येतेस्तोवरच एक कुरळ्या केसांचा पुरुष तिच्याकडे आला आणि म्हणाला “चल, लवकर पाणी पाज”. हयालाच मी थोड्या वेळापूर्वी पर्यटकांच्या एका चमूला माहिती देताना पहिले होते. सुशिक्षित काय किंवा अशिक्षित काय बायकोच शेवटी नवर्‍यास पाणी पाजणार!!  ?? असो.

इथून पुढे थोडे चालत आम्ही जगदीश्वर मंदिरापाशी आलो. महाराज रोज पूजेसाठी इथे येत असत. त्यामुळे मंदीराच्या बाहेर पादत्राणे उतरवूनच आत जावे. थोड्या भग्नावस्थेतील नंदीचे दर्शन घेऊन गाभार्‍यात प्रवेश करावा. शंकराच्या पिंडीचे दर्शन घ्यावे आणि आजूबाजूची गर्दी विसरून दोन मिनिटे डोळे मिटून शांत बसावे.

चिरेबंदी मंदिराची रचना भव्य असून एका चिर्‍यावर संस्कृत श्लोक कोरलेला आहे. हा चिरा भिंतीमधील इतर चिर्‍यांपेक्षा वेगळा दिसतो त्यामुळे असेही म्हणतात की हा चिरा मूळ घडणीतील नसून नंतरच्या काळात बसवण्यात आला असावा.

मंदिराच्या मागील बाजूसच छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ आहे. ह्या पवित्र जागी माथा टेकवून सर्व भक्तमंडळी धन्यधन्य होतात. रणजीत देसाईंच्या पुस्तकातील ‘श्रीमान योगी’ इथे समाधीस्थ असले तरी सर्व हिंदूंच्या हृदयसिंहासनावर अजून जागृत राज्य करीत आहेत ह्याची जाणीव होते. महाराजांच्या समाधीमागेच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. इथूनच थोड्या दूर अंतरावर लिंगाण्याचा सुळका आव्हान देत उभा दिसतो. त्याच्या मागेच राजगड-तोरणा ही दुर्गजोडी अस्पष्ट का होईना पण दिसते. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी मात्र स्पष्टपणे दिसते. समाधीच्या डाव्या बाजूस पहिले तर ‘कोकणदिवा’ दृष्टीस पडतो.

“मरावे परी कीर्तीरूपी उरावे”

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 1 ☆ श्री विनय माधव गोखले

 ☆ विविधा ☆ रायगड प्रवास वर्णन…भाग 1 ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

२०१९ च्या दिवाळीत पंढरपूर क्षेत्री जाऊन जवळजवळ दीड तास दर्शनाच्या रांगेत उभा राहिलो असताना मी विचार करीत होतो की ‘इतका वेळ रांगेत घालवणे उचित आहे का? देवालयाला बाहेरूनच नमस्कार करायला काय हरकत आहे?’ पण मग विचार केला की देवाचे दर्शन हे सहजपणे न होता हे असेच कष्टसाध्य असले पाहिजे. नुसते पैसे भरून काही मिनिटांत होणारे सुलभ दर्शन “देखल्या देवा दंडवत!” सारखे झटपट समाधान देईलही कदाचित पण त्याने देवदर्शनाची आस फिटेल का? सरतेशेवटी एकदा पांडुरंगाच्या सगुण मूर्तीसमोर उभा राहिलो आणि मात्र डोळ्याचे पारणे फिटून धन्यधन्य झालो! कदाचित मंदिरातील, गाभार्‍यातील वातावरणाचा, आवाजाचा कुठेतरी मनावर खोलवर परिणाम होत असावा. “स्थानं खलु प्रधानं” असे म्हटले आहे ते काय उगीच नव्हे. थोडाफार असाच परिणाम नुकताच पुन्हा एकदा अनुभवास आला जेव्हा मी रायगडावरील ‘महाराजां’च्या स्फूर्तिदायक मूर्तीसमोर उभा राहिलो तेव्हा.

१६ जानेवारी २०२१ रोजी मी रात्री 10:30 वाजता ‘गिरीदर्शन’च्या ‘रायगड’ ट्रेकच्या बसमध्ये उत्साहाच्या भरात चढलो आणि लक्षात आले की मी मास्क आणि उन्हाळी टोपी ह्या दोन्ही आवश्यक गोष्टी घरीच विसरलो आहे. JJ असो. बस हलली असल्याने आता काही करणेही शक्य नव्हते. बसमध्ये मात्र सर्वत्र तरुणाई भरली होती त्यामुळे उत्साहाचे वारे संचारले होते. मग माझ्या शेजारी बसलेल्या मेकॅनिकल इंजींनीयरिंगच्या तिसर्‍या वर्षाला शिकत असलेल्या चिंचवडच्या सर्वेश बरोबर ओळख काढून गप्पा सुरू केल्या. “कोविद मुळे लेक्चर्स ऑफलाइन झाली नाहीत आणि ऑनलाइनही नियमितपणे होत नाहीत” असे गार्‍हाणे गात बिचारा जेरीस आलेला होता. कुठेतरी आयुष्यात बदल हवा म्हणून तो ट्रेकला आला होता. असो.

रात्री साधारण साडेतीन वाजता पाचाड गावातील एकांच्या मुक्कामस्थळी पोहोचलो. लगेचच घरच्या सारवलेल्या ओसरीवर पसरून सर्व पुरुषांनी ताणून दिली आणि मुली घरातील एका खोलीमध्ये विसावल्या. पुढील तीन-चार तासच जेमतेम झोपायला मिळणार होते. पण तासभर झाला असेल नसेल, आमच्या शेजारीच कांबळी टाकून झाकलेल्या एका दुरडीखाली ठेवलेल्या कोंबड्याने बांग द्यायला सुरुवात केली. त्याला आजूबाजूच्या त्याच्या साथीदारांनी सुरात सूर मिसळून साथ द्यायला सुरुवात केली. त्याच जोडीला दुरडीमध्येच असलेल्या कोंबड्याच्या पिल्लांनीही चिवचिवायला सुरुवात केली. एखाद्याच्या “झोपेचे खोबरे होणे” ह्याऐवजी झोपेचे कुकुच्च्कू होणे असा वाक्प्रचार प्रचलित करून ‘अखिल कोंबडे पक्ष्या’चा निषेध करावा असे ठरवून मी झोपेची आराधना करायला लागलो.

सकाळी साडेसहाला उठून पहिले तर ‘रोप वे’च्या पाळण्याच्या ट्रिप सुरू झालेल्या दिसल्या. लगेच आवरून आम्ही हॉटेल ‘मातोश्री’ मध्ये पोहे-चहाचा भरपूर नाश्ता करून पायथ्याशी पोहोचलो आणि आमच्या दुहेरी ‘लेग वे’ ने चढाईस प्रारंभ केला.

रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांची भरपूर गर्दी लोटली होती. त्यामुळे गडाची संपूर्ण माहिती देणार्‍या गाईडनाही काम मिळत होते. पायथ्याची सर्व दुकाने एव्हाना सजली असल्याने मला उन्हाळी टोपी लगेच विकत घेता आली. मास्क मात्र कोणीच घातलेला नव्हता, त्यामुळे मीही तो घेण्याच्या फंदात पडलो नाही. काही पायर्‍या चढून पहिल्या बुरूजापाशी थांबलो. स्वराज्याची दुसरी राजधानी असलेल्या रायगडच्या दर्शनाला आलेल्या भक्तांच्या भावना अनावर होऊन “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी” अशा उत्स्फूर्त घोषणा सतत उठत होत्या. तिथल्या दुकानातच महाराजांची प्रतिमा असलेला ‘जाणता राजा’ लिहिलेला भगवा झेंडा मिळत होता. त्यासोबत फोटो काढून घेण्याची सर्वजण धडपड करीत होते. काहीजण तो झेंडा हातात घेऊन धावत गड चढून जात होते.

आपल्या आवडत्या राजाला मानाचा मर्दानी मुजरा देण्याची व भेटण्याची केवढी विलक्षण आतुरता!!

मजल दरमजल करीत चढत असताना आमच्या मध्येच पाठीवर पायरीचे तासीव अवजड दगड लादलेली गाढवे ही गड चढत होती. एका पाथरवटाला विचारले तर कळले की एका दिवसात एक गाढव तीन फेर्‍या मारते. हे ऐकून मात्र ह्या कष्टाळु प्राण्याचे भारीच कवतिक वाटले. इथे आम्ही कसाबसा एकदा हा गड चढउतार करून मोठा पराक्रम गाजवणार होतो! अर्थात रायगडच्या पायर्‍यांचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळी चढाईच्या वेळेत उन्ह अजिबात लागत नव्हते व त्यामुळे थकवा जाणवत नव्हता. एक पर्यटक मोबाईलवर मोठयाने गाणी ऐकत गड उतरत होता त्याला आमच्या चमूतील एकाने ताबडतोब बंद करायला लावला. सुमारे दोन-सव्वादोन तासांत आम्ही वर पोहोचलो.

प्रथम दर्शन झाले ते महादरवाज्याचे. काही वर्षांपूर्वीच बसवलेला हा 16 फूटी भव्य दरवाजा खरोखर बघण्यासारखा आहे. त्यानंतर स्वागत करतो ते ‘हत्ती तलाव’. “हत्ती तलावात शिरला तर कसं बाहेर येईल?” तर ह्याचे उत्तर “ओला होऊन!” हा विनोद मला आठवला. पण रायगडावरील ह्या तलावात जर हत्ती शिरला तर तो खात्रीने पायाचे तळवेही न ओलावता कोरडा ठणठणीत बाहेर येईल इतका हा शुष्क पडला आहे. पावसाचे पाणीही गळतीमुळे ह्यात टिकत नाही. पूर्वी केलेल्या गळती-प्रतिबंधक योजना पूर्णपणे अयशस्वी ठरल्या आहेत. इथून थोडे वर आल्यावर ‘शिरकाई’ देवीचे मंदिर लागते.

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-१९) – ‘तालवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

 ☆ सूर संगत ☆ सूरसंगत (भाग-१९) – ‘तालवाद्ये’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

‘गीतम्‌ वाद्यम्‌ नृत्यम्‌ च त्रयम्‌ संगीतमुच्यते’ अशी संगीताची व्याख्या आपल्या प्राचीन संगीतज्ञांनी केली आहे. गेल्या काही लेखांमधे आपण मुळात संगीत कसे अस्तित्वात आले असावे आणि माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग कसे आणि का झाले असावे, ह्याविषयी विचार केला. परंतू त्यावेळी फक्त गीत किंवा गायन ह्या प्रकाराला अनुसरूनच लेखन झालं. आता वाद्यं का आणि कशी अस्तित्वात आली ह्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. असं म्हटलं जातं कि सृष्टीच्या कणाकणात लय आहे. त्यामुळे वाद्यप्रकारांमधे तालवाद्ये ही सर्वात आधी अस्तित्वात आली. असं मानलं जातं कि, भगवान शंकरांकडून ‘डमरू’ ह्या पहिल्या तालवाद्याची निर्मिती झाली. दुसरी एक अशी कथा वाचायला मिळते कि, स्वाती नावाच्या एक ऋषींनी एकदा पावसाचे मोठाले थेंब कमळाच्या पानांवर पडताना त्याचा आवाज ऐकला. एका लयीत कानांवर पडत राहिलेला तो सुंदर आवाज ऐकून त्यांच्या मनात ‘अशी सातत्यानं लय राखण्यासाठी तालवाद्यं हवीत’ ही कल्पना आली. म्हणजे शेवटी निसर्गाच्या प्रेरणेतूनच ही कल्पना जन्मली.

जुन्या ग्रंथांमधे असा उल्लेख आढळतो कि भरतमुनींच्या काळात शंभरभर तरी तालवाद्यं अस्तित्वात होती. ‘ताल’ ही संकल्पना नंतरची! मात्र कोणत्याही गोष्टीला अंगभूत ‘लय’ असते आणि ती साधली गेली तरच ती गोष्ट जास्त प्रभावी ठरते हे निश्चित! ह्यावरून असं म्हणता येईल कि, गायन, नृत्य कलेतील अंगभूत लयसौंदर्य आणखी खुललून ते जास्त प्रभावी करण्याच्या प्रयत्नातून तालवाद्ये अस्तित्वात आली. गायनाला, नृत्याला अर्थपूर्ण जोड/साथ देण्यासाठी तालवादन अस्तित्वात आले आणि प्रगतशील मानवाच्या प्रयत्नांतून पुढे तर तालवाद्ये आणि तालसंकल्पना इतकी विकसीत झाली कि त्यांचंच ‘एकलवादन’ (सोलो) शक्य होऊ लागलं ज्यावेळी लयसौंदर्याचं प्रामुख्य आणि सूर फक्त साथ देण्यापुरते मर्यादित असतात.

तालाचा विचार करताना एका आवर्तनामधे ठराविक अंतराने ठराविक मात्रा राखणं हा महत्वाचा भाग येतो. मात्र अगदी सहजी गुणगुणतानाही लय साधली गेली तरच त्यातून आनंद मिळतो. बोली भाषेचाच वापर करून माणसाच्याच जगण्यातील महत्वाच्या क्षणांचा उत्सव करणारे छोटेछोटे गीतप्रकार अस्तित्वात येत असतानाच शेवटपर्यंत त्यातली लय पकडून ठेवण्यासाठी मानवाकडून सहजस्फूर्तीने त्या लयीच्या हिशोबाने ठराविक अंतराने टाळी वाजवली गेली असेल, कधी हाताने मांडीवर आघात करून लय राखली गेली असेल, पायाने ठेका धरला गेला असेल. ह्या क्रिया आपल्या प्रत्येकाकडूनही अगदी सहजी घडत असतातच. एरवीही घरी आरतीच्या वेळी एका लयीत टाळ्या वाजवणे, कोणतेतरी गीत ऐकत असताना आपल्याही नकळत पायाने ठेका धरला जाणे, एखाद्या गायकाच्या जोशपूर्ण गायनाला साथ देताना श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे त्या गाण्याच्या लयीसोबत टाळ्या वाजवणे हे किती सहजी घडते! अशाप्रकारे लय साधताना मानवाने केलेला शारीरिक अवयवांचा उपयोग हा वाद्य कल्पनेचा प्रारंभकाल मानला जातो.

पूर्वीच्या जीवनमानाचा विचार केला तर लक्षात येईल कि स्वत:च्या शरीराच्या आधारे ठेका धरणे ह्याशिवाय भवताली उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा ह्या गोष्टीसाठी वापर करताना हुशार मानवाने दोन दगड एकमेकांवर आपटून, दोन लाकडाचे तुकडे एकमेकांवर आपटून पाहिले असतील. आजचे ‘टिपरी’ हे वाद्य म्हणजे दोन लाकडी काठ्यांचा एकमेकांवर आघात करणे हेच तर आहे! मात्र त्याचा उगम हा आदिमानवाच्या संगीतातील लय टिकवून ठेवण्याच्या गरजेतून झाला. आपल्याकडच्या चिपळ्या म्हणजेही एकसारख्या आकाराचे दोन लाकडी तुकडेच तर आहेत. पुढं धातूचा शोध लागला त्यानंतर चिपळीच्या तसेच करताल ह्यासारख्या वाद्याच्या लाकडी तुकड्यांमधे धातूच्या चकत्या बसवण्याचे प्रयोग झाले, टाळ, मंजिरी, झांज हे प्रकार अस्तित्वात आले. मात्र ह्या सगळ्याचं मूलतत्व एकच कि, दोन घन पदार्थांचा एकमेकांवर आघात केला तर नादनिर्मिती होते आणि त्याची लय पकडून ठेवण्यासाठी मदत होऊ शकते हा आपल्या जुन्या पिढ्यांनी लावलेला शोध!

आपल्या देवघरातील छोट्या घंटा किंवा देवळातल्या मोठ्या घंटा म्हणजेही एका घन पदार्थाच्या तुकड्याने दुसऱ्या घन पदार्थावर होणाऱ्या आघातातून केली जाणारी नादनिर्मिती! घुंगरूं हेसुद्धा एक प्रकारचं वाद्यच ज्यामधे धातूच्या पोकळ गोलाच्या आत असलेल्या एका धातूच्याच तुकड्याचा आघात झाला कि नादनिर्मिती होते. पायांत बांधल्यावर आपल्या पायाच्या हालचालींमुळं किंवा हातात घेऊन वाजवताना हाताने घुंगरू हालवल्यामुळं हा आघात आपोआप होतो.

प्राचीन काळी अन्न शिजवण्यासाठी मातीची भांडी वापरली जात असत. त्यावर बोटांनी आघात केला तरी सुंदर नाद निघतो हाही शोध त्यांना लागला. आज दक्षिणेतील घटम, कर्नाटक किनारपट्टींतल्या प्रांतातील घुमट, उत्तरेतील मटका ही वाद्यं हे त्याचंच उदाहरण!

प्राचीन काळी जंगलात राहाणाऱ्या मानवाचं मुख्य अन्न म्हणजे प्राण्यांची शिकार करून त्यांचं मांस शिजवून खाणं हे होतं. शिकार केलेल्या प्राण्याचा खाण्यालायक भाग म्हणजे त्याचं मांस! हळूहळू त्या प्राण्याचं कातडं, हाडं, शिंगं हा सगळा उर्वरित भागही कसा वापरता येईल ह्याचा विचार मानवाच्या मनात सुरू झाला असेल किंवा कधी तो आपसूक मानवाच्या समोर आला असेल. प्राण्यांचं कातडं बसायला वापरणं, त्याचा अंगरखा शिवून थंडीत आपल्या शरीराला ऊब मिळावी म्हणून वापरणं ही त्याची काही उदाहरणं! वाद्यांच्याबाबत विचार करता एका बाबीचा उल्लेख जुन्या पुस्तकांत आढळतो कि, शिकार केलेल्या प्राण्यांचं कातडं वाळण्यासाठी झाडाला टांगून ठेवलं असताना ते वाळल्यानंतर सहज त्यावर माणसाच्या हाताचा आघात झाला आणि त्यावेळी ‘वाळलेल्या कातड्यावर आघात केला असता नादनिर्मिती होते’ हा शोध लागला. हळूहळू पोकळ भांड्यावर हे चामडं बांधून त्यावर आघात केला तर आणखी सुंदर नादनिर्मिती होते (कारण पोकळ भाग हा त्या नादाचा ‘रेझोनेटर’ आणि ‘अम्प्लिफायर’ म्हणून काम करतो) हे लक्षात आलं आणि त्यातून चर्मवाद्यांची निर्मिती झाली.

ह्या चर्मवाद्यांना ‘अवनद्ध वाद्यं’ असं म्हटलं जातं. ‘अवनद्ध’ ह्या शब्दाचा अर्थच मुळी ‘कातड्याने मढवलेले’ असा होतो. आता डोळ्यांसमोर अशी अनंत वाद्यं उभी राहातील. लोकसंगीतात वापरली जाणारी अनेक तालवाद्यं ढोल, ताशा, हलगी, संबळ, टिमकी, नगारा इ. सगळीच ह्या प्रकारात येतात. ह्यापैकी काही वाद्यं हाताने आघात करून वाजवली जातात तर काही काठीने आघात करून! आज शास्त्रीय संगीतातील समाजमान्यता पावून सर्व रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी तबला, पखवाज, मृदंग इ. वाद्येही ह्याच प्रकारातली! ह्या सर्वच वाद्यांमधे सध्या जो भाग लाकडी असतो तो पूर्वी मातीचा असायचा. पुढं मग कालमानानुसार लाकूड, धातू इ. गोष्टी वापरून विविध प्रयोग होत राहिले. ह्याचा अर्थ एकच कि अगदी प्राचीन काळापासून माणसाने निसर्गाच्या सान्निध्यात वावरताना निसर्गाकडून विविध गोष्टी शिकत आपला विकास साधला. संगीतही त्याला अपवाद नाही. ह्याच प्रक्रियेमधे उपलब्ध साधनांच्या वापरातून वाद्यांची उत्पत्ती होत राहिली. तालवाद्यांप्रमाणे तंतुवाद्ये आणि सुषीर वाद्ये कशी अस्तित्वात आली ह्याची रंजक कहाणी आपण पुढच्या लेखात जाणून घेऊ!

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  asawarisw@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares