मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डेल्टा-15… लेखक : श्री दत्ता पवार ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ डेल्टा-15… लेखक : श्री दत्ता पवार ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

अमेरिकेत “9/11‘ला दहशतवादी हल्ला झाला, त्या वेळची एक हृदयस्पर्शी कथा आहे.

दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टॉवरवर आदळली आणि दोन्ही टॉवर जमीनदोस्त झाले, तर दुसऱ्या. मार्गावरून जाणारे आणखी एक विमान पाडण्यात आले. ही खबर मिळताच सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली. जगभरातून जी विमाने अमेरिकेकडे येत होती, त्या सगळ्यांनाच रेडिओ मेसेज केले गेले, की अमेरिकेला येण्याचे रद्द करा, जवळच्याच विमानतळावर विमाने लॅंड करा आणि पुढील आदेशाची वाट पाहा.

“डेल्टा-15‘ या विमानालाही असाच संदेश आला. हे विमान कॅनडाहून येत होते. विमानाचा मार्ग बदलण्याचे कारण काय हे कुणालाच समजले नाही. वैमानिकही याबाबतीत अनभिज्ञ होता. कॅनडातील एका गावातील विमानतळावर विमान उतरले, तेव्हा प्रवाशांना कळाले, की अमेरिकेकडे जाणारी आणखी 52 विमाने तेथेच उतरली आहेत.

या सगळ्या विमानांतील प्रवाशांची संख्या दहा हजारांवर होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गावात हा विमानतळ होता, त्या गावची लोकसंख्याही दहा हजारांच्या आसपास होती. म्हणजे अक्षरशः गावाच्या लोकसंख्येएवढे पाहुणे तेथे आले होते.

वैमानिकाला पुढील आदेश मिळेपर्यंत तीन दिवस लागले. तोपर्यंत या पाहुण्यांना सांभाळण्याची जबाबदारी गावावर होती. गावातील प्रशासनाने व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली. सर्व शाळा बंद केल्या. जवळपासच्या घरांतून पलंग, खुर्च्या, जेवणाचे सामान प्रत्येक शाळेत पोचविले.

पाहुण्यांची उत्तम सोय करण्यात आली. या सर्व व्यवस्थेचे संयोजन रेड क्रॉस सोसायटी करीत होती.

“डेल्टा-15‘मध्ये एक गर्भवती तरुणीही होती. तिची विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले. तीन दिवस गावातील लोकांनी पाहुण्यांना गावभर फिरविले. बोटीमधून त्यांच्या सहली काढल्या. एकूण काय, गावाने पाहुण्यांना एकटे वाटू दिले नाही. आल्या प्रसंगाची झळ त्यांच्यापर्यंत पोचणार नाही, याची दक्षता घेतली.

तीन दिवसांनंतर पुन्हा वैमानिकाला संदेश आला. त्याला अमेरिकेला परतायची परवानगी मिळाली होती. प्रवासी विमानात चढू लागले, तसे गावकऱ्यांना व प्रवाशांनाही रडू आवरेना. तीन दिवसांत त्यांच्यात एवढा स्नेह निर्माण झाला होता, की आता स्वगृही जायचे असूनही प्रवाशांचा पाय निघत नव्हता.

एवढ्या लोकांच्या आदरातिथ्याचा ताण पडला, तरी त्याचा त्रास गावकऱ्यांना वाटला नव्हता. गावकऱ्यांनी सर्व खर्च आपसांत वाटून घेतला. अशा कठीण प्रसंगात आपण कोणाच्या तरी उपयोगी पडलो अशी सर्वांची भावना होती.

विमानात गेल्यानंतर एका प्रवाशाने वैमानिकाला सांगितले, की “मी जे बोलणार आहे ते आपल्या नियमात बसत नाही. मला माझ्या सहप्रवाशांशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. विशेष बाब म्हणून मला बोलण्याची परवानगी द्यावी. ‘

सहसा वैमानिक अशी परवानगी देत नाहीत. परंतु तो प्रसंगच इतका हळवा होता, की वैमानिकालाही प्रवाशांच्या मनःस्थितीची पूर्ण कल्पना आली होती. ती परिस्थितीच अशी होती, की वैमानिकाने त्या प्रवाशाला बोलायला मनाई केली नाही.

प्रवासी म्हणाला, “या गावाने तीन दिवस आपली एवढी सेवा केली आणि आपल्याला एवढे सांभाळले, की मला वाटते आपण सर्वांनी त्यांचे कायम कृतज्ञ राहायला हवे. आपण सर्वांनी आपापल्या शक्तीनुसार काहीतरी पैशांची मदत माझ्याकडे द्यावी. मी एक निधी उभारणार आहे. त्यात हे पैसे टाकून या गावातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करावी, असे माझ्या मनात आहे. मी जो ट्रस्ट उघडणार आहे त्याचे नाव ‘डेल्टा-15‘ हेच ठेवणार आहे. “

बघता बघता एकेक प्रवासी पुढे आला. ज्याने त्याने यथाशक्ती जमेल तेवढी रक्कम त्या प्रवाशाकडे सुपूर्द केली. सर्व प्रवाशांकडून आलेली रक्कम मोजली असता, थोडे थोडके नव्हे, तर तब्बल चौदा हजार डॉलर जमले होते. ज्याने हा प्रस्ताव मांडला होता, तो स्वतः अतिश्रीमंत उद्योजक होता. त्याने आपल्या पदरचे तेवढेच पैसे त्या गंगाजळीत घातले.

नंतर त्याने वैमानिकाच्या मदतीने ज्या डेल्टा कंपनीचे विमान होते, त्या कंपनीलाही भरघोस निधी देण्याची विनंती केली. विमान कंपनीचे विमानही वाचले होते आणि त्यातील प्रवासी सुखरूप होते. त्यांना काही इजा झाली असती, तर कंपनीला मोठी भरपाई द्यावी लागली असती. विमान अमेरिकेला सुखरूप परतल्यावर कंपनीनेही त्या दानशूराच्या रकमेत भरीव निधी घातला.

‘डेल्टा 15‘ हा ट्रस्ट सुरू झाला, तेव्हा त्यांच्याकडे चक्क दीड कोटी डॉलर गोळा झाले होते.

दरवर्षी ट्रस्टच्या वार्षिक अहवालात किती मुले ट्रस्टच्या पैशातून शिकली हे प्रसिद्ध होत गेले. ज्या लोकांनी ट्रस्टसाठी पैसे दिले होते, त्यांना कॅनडाच्या त्या गावात काढलेले तीन दिवस आठवले. ट्रस्टसाठी आपण दिलेल्या पैशांचे चीज झाले, असे त्यांना वाटले व ते समाधान पावले. कॅनडामधील ते छोटेसे गाव आनंदाने हरखून गेले. ट्रस्टच्या पैशांच्या मदतीने त्या गावातील अनेक मुले विविध क्षेत्रांतील नामवंत म्हणून प्रसिद्ध झाली. अशी ही ‘डेल्टा-15‘ची हृदयस्पर्शी कहाणी.

आपल्याकडे असा काही आणीबाणीचा प्रसंग आला, की आलेल्या पाहुण्यांना कसे लुटले जाते, त्यांचा गैरफायदा कसा घेतला जातो, त्यांच्यासाठी दिलेली मदत दुसरीकडे कशी वळवली जाते, याच्या कथा आपण वर्तमानपत्रातून वाचतो आणि मनोमन दुःखी होतो. मग तो दुष्काळ असो, प्रलय असो अथवा दुसरे कुठले अस्मानी संकट असो.

डेल्टा-15‘ची ही कहाणी कदाचित आपल्या देशातही असेच देशप्रेम जागृत करेल एवढीच अपेक्षा आहे.

 

लेखक : दत्ता पवार 

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भक्तीचा उद्गार – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ भक्तीचा उद्गार – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

सुधीर गाडगीळ यांनी सांगितलेला हा प्रसंग अतिशय हृदयस्पर्शी आहे.

ते सांगतात—पुण्यातील मंडईत संतवाणीचा कार्यक्रम संपत आला होता. शेवटचा अभंग झाला होता. पेटी, तबला आवरले जात होते. कलाकार उठू लागले होते. भीमसेन जोशीही शांतपणे उभे राहून स्टेजवरून उतरण्याच्या तयारीत होते. सभागृहात ‘कार्यक्रम संपला’ अशीच भावना होती.

तेवढ्यात, प्रेक्षकांमधून एक हमाल पुढे आला. साधा, घामेजलेला, काम करून आलेला. हात जोडून, थोड्या संकोचाने तो म्हणाला—

“जोशीबुवा… ‘तीर्थ विठ्ठल’ म्हणाल का? ”

क्षणभर सगळे थांबले. कार्यक्रम संपलाच होता. साथीदारांनी वाद्यं आवरली होती. अशा वेळी अभंग म्हणणं म्हणजे पुन्हा सगळं उलगडणं. काहींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.

पण भीमसेन जोशी थांबले. त्यांनी त्या हमालाकडे नीट पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आग्रह नव्हता, हट्ट नव्हता—फक्त भक्ती होती. जोशीबुवांनी क्षणाचाही विचार न करता मागे वळून म्हटलं, “अहो, पेटी-तबला ठेवू नका… तीर्थ विठ्ठल म्हणूया. ”

सगळे स्तब्ध झाले.

पुन्हा पेटी उघडली गेली. तबल्यावर हात बसला. आणि मग भीमसेन जोशींनी

“तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल…”

सुरू केलं.

सुधीर गाडगीळ सांगतात—तो अभंग मैफिलीचा भाग नव्हता; तो करुणेचा, माणुसकीचा आणि भक्तीचा उद्गार होता. आवाजात विलक्षण आर्तता होती. जणू त्या हमालाच्या आयुष्याचं ओझं त्या स्वरांत उतरलं होतं. हमाल रडत उभा होता. प्रेक्षक नुसते ऐकत नव्हते—ते अनुभवत होते.

अभंग संपल्यावर टाळ्या नव्हत्या. फक्त गहिरं मौन होतं.

गाडगीळ शेवटी म्हणतात—

“त्या दिवशी कळलं, भीमसेन जोशी हे मोठे गायक होतेच; पण त्याहून मोठं होतं त्यांचं मन. कार्यक्रम संपला होता, पण भक्ती संपलेली नव्हती—आणि जोशीबुवांनी ती ओळखली.”

हा प्रसंग, संतवाणी म्हणजे नेमकं काय, हे कायमचं समजावून जातो.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :  श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ज्योतीने तेजाची आरती… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ ज्योतीने तेजाची आरती… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

काजवा” किती वेगळा अद्भुत कीटक आहे ज्याने तेज प्रकाशित केले… स्वतः! स्वयंनिर्मितीचा पुरावा हा! पण चंद्रासारखाच परप्रकाशित!

चंद्राचा शीतल प्रकाश मिळवतोय सूर्याकडून तर काजव्याचा प्रकाश मिळवतोय, नव्हे नव्हे मिळतोय आंतरिक सूर्यापासूच (त्याचा आत्मा)!

 

मोराचं सौंदर्य, सिंहांच शौर्य, हरणाची चपळता, विंचवाचं डंख मारणं, पाण्याचं उतारा कडे वाहण, अग्नीचं जाळणं, कमल पत्राची निर्लेपता, ढगांची सौहार्द्रता, सागराची असीमता, नदीची पवित्रता, पर्वतांची स्थिरता, फुलांची मोहकता… किती सांगू…

“हरि अनंत हरिकथा अनंता”… याप्रमाणे ही प्रकृती चिंतनाचा नसून आनंदाचा विषय व्हावा हे वाटणेही कुणाचे? तोच आत्मा जो (काजव्याला व चंद्राला) सर्वत्र आहे, तोच हृदयस्थ आहे त्याचे!

 

आता एक गोष्ट लक्षात येते की सगळीकडे तोच कार्यरत आहे, पण त्याची ओळख पटत नाही! आपल्या शरीरात एक गोष्ट नक्की की पहाणारा “मी” आहे तसेच प्रकृतीला व मला सांभाळणारा ही एकच व तोच सगळीकडे व माझ्यात अविरतपणे आहे! मग…

 

“अनेक रुपे नटलेली” ही सत्ता आता आपली वाटू लागते कारण आधी इतर गोष्टी पाहिल्या की एकतर न्यूनगंड किंवा मिळवण्याची धडपड असायची स्वमर्यादेच्या जाणीवेचा हा अभाव!

हा अभाव संपणे म्हणजे जीवनाची खरी सुरुवात आहे. या मूलभूत जाणीवेनंतर जगात काहीही करणे ही त्या जाणीवेची प्रतिक्रिया असणार आहे (अभावातून प्रभावाकडे! )

 

“माझ्यातलाच” तो आहे तर मग यत्र तत्र सर्वत्र “माझ्यातलाच” आहे, हा प्रभावाचा “स्वानंद” आहे!

 

हिमालयाला गवसणी घालणारा कुणीतरी गिर्यारोहक माझीच इच्छा पूर्ण करतोय (माझाच हा विस्तार आहे), माझी शास्त्रीय संगीताची इच्छा एखादा कलाकार पूर्ण करतो, तोही माझाच विस्तार ठरतो. मी किंवा माझ्याच मुलीनी किंवा माझ्याच शिष्यांनी ते गायले तर फक्त “आनंद” असेल तर तो स्वानंदाचा एक भाग आहे! “स्वानंद हा त्याचा अमर्याद विस्तार आहे”! हा विस्तारही माझ्या स्वानंदाचा विषय नाही कारण जीवनाची काळी बाजूही माझ्यातल्या च मी चा विस्तार आहे! हा चौफेर विस्तार शून्य (अंधार)व अमर्याद (प्रकाश) माझाच आहे!

जितकं सकारात्मक उत्तम ऊर्जादायी तेजस्वी जगात आहे तितकंच या विरुध्दही आहे हे न नाकारता प्रकृतीचाच तो विस्तार आहे हे जाणवणं खरं “माझं” आहे! शब्दांचा विस्तार व शब्दांचे शून्यत्व एकाच पारड्यात पहाणारा “मी” आहे!

विरोधाभासात जो स्थिर आहे तो मी आहे म्हणून माझं काहीच नाही व सगळंच माझं आहे हे ही मी नाही!

(फक्त) मी आहे!

एक निमिषभर मिळालेला हा दुर्मिळ, अमर”क्षणच” मी आहे त्यासाठी “मी” आहे!

अपूर्ण गोडी पूर्ण करोनी “क्षण झाला अमर”… (अमृतकण)

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – – ७७ / १ – ग्रँड कॅन्यन ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ७७ / १ – ग्रँड कॅन्यन ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

ग्रँड कॅन्यन.

असं म्हणतात की तुम्ही अगदी जाज्वल्यपणे एखादं स्वप्न बाळगलं असेल तर कधीतरी ते प्रत्यक्षात साकार होतंच.

अॅरीझोना स्टेट अमेरिका येथील ग्रँड कॅन्यन कधीतरी पहायला मिळावंं हे माझं अगदी शाळेत असतानापासूनचे स्वप्न होते. आणि ते अगदी अलीकडेच म्हणजे २०२२ साली माझी अमेरिकास्थित लेक ज्योतिका हिच्यामुळे प्रत्यक्षात अवतरले.

आतापर्यंतच्या भ्रमंतीतली ही वेगळाच अनुभव देणारी, निसर्गाचा निराळाच अविष्कार दाखवणारी अविस्मरणीय सफर होती. माझी नात सायरा, ज्योतिका, मी आणि विलास अटलांटाहून अमेरिकन एक्सप्रेसच्या विमानाने अॅरिझोना स्टेट मध्ये फ्लॅगस्टाफ या गावात आलो. आमच्या प्रवासात डॅलसला चार तासाचा हाॅल्ट होता.

 

ग्रँड कॅन्यनला जाण्यासाठीचे हे पर्यटन स्थळ आहे.

इथल्या स्थानिक वेळेनुसार आम्ही रात्री साडे नऊला पोहचलो. ज्योतिकाने कार रेन्ट केली. सुंदर, मोठी ऐसपैस कार.

डलासला आम्ही डिनर घेतलेच होते. एग रोल्स, फ्राईड राईस, चिकन नुडल्स वगैरे.

फ्लॅगस्टाफला हाॅलीडे इन मध्ये बुकींग होतेच.

छान आरामदायी हाॉटेल.

लगेच झोपेच्या अधीनच झालो. प्रवासाने थकवा आलाच होता. अटलांटा आणि अॅरीझोनाच्या वेळेत तीन तासाचा फरक आहे.

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरच जाग आली. ज्योतिकाने दिवसभराची भटकंती योग्य पद्धतीने आखलेली होतीच.

ब्रेकफास्ट घेउन आम्ही लगेच निघालो. ज्युस, दही सीरीअल्स, आॅम्लेट वगैरे अमेरिकन ब्रेकफास्ट होता.

आजचे ध्येय होते *हाॉर्स शू बेन्ड हिल्स.. *

ड्राईव्ह अतिशय सुंदर होता. अॅरीझोना म्हणजे जगातील सर्वांत मोठे वाळवंट. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेला विस्तीर्ण ओसाड प्रदेश. मध्ये मध्ये दिसणारी खुरटी पण हिरवट झुडुपे. गडद पिवळ्या रंगाची रानफुले. लालसर रंगाचे गवत. लांबच लांब पसरलेले पर्वत. अगदी निरभ्र निळे अथांग आकाश. निसर्गाचं एक अत्यंत निराळं पण देखणं रुप पाहून विस्मयीत झालो. भारतातले कच्छचे रणही आठवले. वाटेत अनेक नैसर्गिक सँड ड्युन्स दिसले. अगदी रचून ठेवलेल्या वाळूच्या ढिगार्‍यासारखे दिसत होते. आता आम्ही संपूर्ण डोंगरांच्या विळख्यातच होतो जणू जिथे पहाल तिथे हे लाल रंगांचे दगडी कॅन्यन. या डोंगरांमध्ये निसर्गानेच अनंत आकाराची शिल्पेच बनवली आहेत जणू! इतकी रेखीव आणि आकृतीबंध! बघणार्‍याच्या नजरेने त्या शिल्पांना कुठलीही नावे द्यावीत. महाल, मंदीरे, कळस, मखर, गाभारे नृत्यांगना, राजे, प्राणी, काहीही. अतिशय रेखीव आणि कोरीव. आणि हे सारंं नैसर्गिक. मानवनिर्मीत शिल्पकला आतापर्यंत ठिकठिकाणी पाहिल्या. पण इथे एकमेव शिल्पकार, केवळ निसर्ग. आम्ही रस्त्यात थांबत, फोटो काढत या निसर्गाच्या अप्रूपतेच्या आठवणी साठवत होतो.

हाॅर्सशूबेन्ड हाही एक नैसर्गिक चमत्कारच आहे. एका उंच डोंगराभोवती घोड्याच्या नालेसारखी कोलॅरॅडो नदी वळसा घेत वाहते. आम्ही व्ह्यु पाॉईंट वरुन हे मनोहर दृष्य डोळ्यात साचवले. हिरवीगार संथ नदी. जणू इतस्तत:विखुरलेल्या डोंगरांची सखीच.

 

व्ह्युपाॅइंटपर्यंत बरेच चालावे लागले होते. रणरणतं उनही होतं. मात्र हवेत सुखद गारवा होता. वार्‍याच्या झुळकी आनंददायी होत्या. प्रदूषणरहित वातावरण. आणि डोक्यावरचे नितांत निळे आकाश. त्यामुळे उन्हातले चालणे सुद्धा अजिबात कष्टदायी नव्हते.

 

मी सहज म्हटलं, भारतात अशा ठिकाणी खाद्य पेयांच्या टपर्‍या असतात. इथे तसे काहीच नाही.

माझी नात लगेच म्हणाली”, here they dont want to ruin the nature–”

किती खरे आहे हे!!

इथे फक्त निसर्गाच्या सहवासात रहा. आनंद जपा, आनंद वेचा.

 

*ग्रँड कॅन्यन रेलरोडटुर* तर्फे केलेला आमच्या प्रवासाचा पुढचा टप्पाही एक वेगळाच अनुभव देणारा होता. सकाळी आठ वाजता आमच्या हाॅटेलवर ट्रॅव्हल्सची व्हॅन घ्यायला आली.

व्हॅन एकदम आरामदायी होती. आम्ही दहा प्रवासी होतो.

निरनिराळ्या देशातील लोक होते ते. आमचा ड्रायव्हर एकदम हसतमुख आणि भरपूर बोलका होता. संपूर्ण प्रवासात तो अनेक किस्से, भौगोलिक माहिती आम्हाला पुरवत होता.

गेट टू ग्रँड कॅन्यन या रेल्वेस्टेशनवर आम्ही एका ट्रेनमध्ये बसलो. हा ट्रेनचा प्रवास अतिशय सुंदर होता. गाडीत सर्व सुखसोयी आणि स्वच्छता होती. मधून मधून प्रवाश्यांची खबरबात घेणारा मदतनीसही होता. तो अॅरीझोना स्टेटचा इतिहासही सांगायचा. फोटोग्राफर होती. गिटारवादक होता. त्याने सुरेल संगीताने प्रवाशांचे मनोरंजन केले. पाईन ट्रीच्या जंगलातला हा आगगाडीचा संथ प्रवास अगदी अविस्मरणीय होता.

आम्ही ग्रँड कॅन्यन स्टेशनला पोहचलो. दोन तासाचा हा आगगाडीचा प्रवास कसा संपला ते कळलेच नाही.

इथे आमची व्हॅन व ड्रायव्हर हजरच होते.

प्रथम लंच घेतले. आणि नंतर प्रत्यक्ष ग्रॅड कॅन्यन ची सफर सुरु झाली. अतिशय सुंदर, रेखीव आखीव गाव. इथे रहाण्यासाठी बैठे बंगले असतात. पण त्यासाठी तीन वर्षे आधी बुकींग करावे लागते.

पहिल्या व्ह्यु पाॅईंटला आम्ही उतरलो आणि निसर्गाच्या त्या विस्तीर्ण, भव्यतेच्या दर्शनाने नि:शब्द झालो. अमेरिकेतल्या सात आश्चर्यांपैकी ग्रँड कॅन्यन हे एक नैसर्गिक भूगर्भीय आश्चर्य!

कॅन्यन म्हणजे दरी. खिंड. आणि या दरीतली पर्वतासमान भासणारी अनेक आकारांची नैसर्गिक शिल्पे.

कोलोरॅडो नदीचा प्रवाह इथे पहायला मिळतो. जमीनीतून वर झेपावणारे असंख्य खडक या नदीच्या पाण्याच्या दाबाने कातरत गेले. शिवाय वाराही या खडकांना सतत कापत असतो आणि त्यातून ही असंख्य शिल्पे तयार झाली आहेत. आणि मैलौन् मैल ती पसरलेली आहेत. बघणार्‍याच्या नजरेला जो दिसेल तो आकार. इथे राजवाडे, मंदीर दालने, गड किल्ले, गाभारे, माणसे प्राणी पक्षी अगदी गणपती, नंदीबैल, गरूड पक्ष्यांसारखे आकार इथे पहायला मिळतात. एक अॉस्ट्रेलिअन माझ्या जवळ आला, आणि म्हणाला, ”see over there, an indian temple of God Mahadeo” क्षणभर मलाही ते तसेच वाटले. आणि जगभरात भारतीयांचं इशप्रेम किती प्रसिद्ध आहे हे जाणवले.

 निसर्ग हाच किमयागार.

आम्ही इथे डक अॉन द राॅक या पाॅइंटवर उतरलो.

अक्षरश: एक धारधार चोचीचं बदक पंख आत गोळा करुन एका प्रचंड दगडावर बसलंय् आसाच भास होतो.

१९५० साली आयसेन हॉवरने या ठिकाणी भेट दिली होती.

त्यावेळी ते एक सामान्य नागरिक होते. त्यानंतर ते अमेरिकेचे प्रेसीडेंट बनले.

अर्थात हे सर्व आकार वारा वादळ पाण्यांनी बदलू शकतात.

शंभर वर्षानंतर इथे कदाचित हे आकार नसतील. ते बदललेले असतील.

ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणजे काय याचा अनुभवच इथे जणू घेता आला.

एक घारीसारखा पक्षी आकाशात विहरत होता. क्षणभर मला वाटले यांच्या पंखावर बसावे आणि या भव्य दरीतली

ही निसर्गाची किमया न्याहळावी.

स्वर्ग म्हणजे आणखी वेगळे काय असेल.??

थोडे पुढे गेल्यावर वॉच टाॅवर पाॉईंटला कोलोरॅडो नदीचा प्रवाह पहायला मिळाला. याठिकाणी मात्र तिचा प्रवाह 

मलीन वाटला.

 

नोव्होवा नावाची एक इंडीअन जमात इथे आहे. त्यांनी त्यांचं हेरीटेज जपलेलं आहे. बदलत्या जगाचा भाग त्यांना 

व्हायचे नाही. अॅरीझोनाचा काही भाग हा त्यांचं स्वतंत्र राष्ट्र म्हणून मानला जातो. तिथे अमेरिकन फेडरल रुल नसून

नोहोव्हा जमातीचे रुल्स आहेत. त्यांचा अध्यक्षही निराळा आहे. आम्ही ग्रँड कॅन्यनहून परतताना नोवोव्हा रीझोल्युशनला भेट दिली. तिथे मास्क घालणे सक्तीचे होते.

त्यांचे आर्ट आणि क्राफ्ट चे दुकान सुंदर होते. तिथे त्यांची

जीवनपद्धती दाखविणार्‍या कलाकृती पहायला मिळाल्या.

त्यांच्या जीवनाचे एकच ध्येय या पृथ्वीचे रक्षण. निसर्गाला 

मूळ स्वरुपातच सांभाळणे.

मनात आले, खरोखरच आज काळाची ही गरज आहे…

 

याच सफरीतले आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणजे. *lower Antelope canyon. *

आम्ही अँन्टीलोप कॅन्यन व्हीजीटींग सेंटरपर्यंत फ्लॅगस्टाफहून कारने आलो. जवळ जवळ अडीच तासाचा ड्राईव्ह होता. ही जागा नोवाहा कम्युनिटीच्या राज्यात येते.

इथूनच प्रत्यक्ष टूरला सुरवात होते. ज्योतिकाने आधीच टुर बुक केली होती. सेंटरवर तिने तिचे बुकींग दाखवले.

आमचे तिघांचे बुकींग होते. मात्र जी सेंटरवरची मदतनीस होती ती म्हणाली, । इथे दोघांचच बुकींग दिसतय्”. सायराचे नावच नव्हते. ज्योतिकाला इंटरनेट मिळत नव्हते. त्यामुळे 

तिला कंपनीशी संपर्क साधता येत नव्हता. शेवटी तिने सायराचे तिथल्या काउंटरवरच परत तिकीट काढले. आॅनलाईनपेक्षा इथले तिकीट थोडे कमीही होते. टेक्नोलाॉजीचे जसे फायदे तसे तोटेही…असो!

साधारण एक तासाची ही भूगर्भीय सफर होती. आम्हाला दुपारी सव्वा बाराची वेळ मिळाली. इथेही वेळेत एक तासाचा फरक आहे. एक तासाने हा परिसर मागे आहे.

आम्ही तिथल्या गिफ्ट शॉपमध्ये काही खरेदी करण्यात वेळ घालवला.

– क्रमशः भाग ७७ / १ 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्हॅलेंटाईन डे ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना देशपांडे

 ☆ मनमंजुषेतून ☆

☆ व्हॅलेंटाईन डे ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆ 

१४ फेब्रुवारी हा जगभर “व्हॅलेंटाईन डे “म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतात.

पण प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या दिवसाची गरज काय? . त्यासाठी वेगवेगळ्या कल्पना केल्या जातात, वेगवेगळे कार्यक्रम आखले जातात. , प्रेम व्यक्त केले जाते. रोमान्स ताजा ठेवण्यासाठी जीवाचा आटापिटा केला जातो. सगळेजण करतात म्हणून आपण हा दिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतो. सर्वजण लॉन्ग ड्राईव्हला जातात म्हणून आपण जातो, कॅन्डल लाईट डिनर करतो, निष्कारण इतरांचेअनुकरण करतो. काहीतरी गिफ्ट द्यायचे म्हणून खिशाला परवडत नाही तरी एखादी वस्तू खरेदी करतो. कमीत कमी एखादं ग्रीटिंग उधार उसनवारीने आणतो आणि पैसे परत करावे लागणार म्हणून दुःखी होतो. ५रुपयाला मिळणार फूल २५रू. खरेदी करतो पण ह्या सगळ्याची खरंच गरज आहे का? कशासाठी पाश्चात्त्यांचे अनुकरण करायचे? ज्याच्यावर किंवा जिच्यावर प्रेम आहे ते पैशातच व्यक्त केले पाहिजे असे कुणी सांगितलंय.

“प्यार करने के लिये पैसा नहीं लगता.. और प्यार में कोई सही, गलत मी नहीं होता.. प्यार सिर्फ प्यार होता है”या उक्तीप्रमाणे त्याला किंवा तिला जे आवडते ते केले तर आनंद द्विगुणित होईल. एखादा मित्र अनेक वर्षे भेटला नसेल तर त्याची भेट घडवून आणता येईल, आवडीचा पदार्थ पोटभर खाऊ घालता येईल. आपल्या मनातील भावना कागदावर लिहून देता येईल ज्यामुळे त्याला किंवा तिला आनंद मिळेल. एखादया भांडण झालेल्या मित्र -मैत्रिणींशी पुन्हा समेट घडवता येईल. मागील वादाबद्दल सॉरी म्हणून दिलगिरी व्यक्त करता येईल. आपल्या मध्ये असणारी एखादी वाईट सवय कायम सोडतोअसा वादा करता येईल त्यामुळेत्याचे किंवा तिचे जीवन बदलून जाईल. हीच खरी प्रेमाची कसोटी ठरली आणि हेच गिफ्ट आयुष्यभर पुरेल. या गोष्टी केल्या तर खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाईल असे मला वाटते.

© सौ अर्चना देशपांडे 

पुणे

मो.नं‌‌ ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक वेगळी प्रेम कहाणी… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? इंद्रधनुष्य ?

☆ एक वेगळी प्रेम कहाणी☆ सुश्री शीला पतकी 

तिचं डोकं दुखत होतं पण काम तर करणं भाग होतं. 50 टोप्या प्रत्येक बाईने शिवायच्या होत्या. तिचे हात पटापट चालत होते. मशीन वर पाय भरभर चालत होते… पण डोके दुखण्याची वेदना चेहऱ्यावर दिसत होती. आसपास अशीच राष्ट्र उपयोगी काम चाललेली होती. एक दहा बाय दहाची खोली त्यातच एका कार्यकर्त्याचा संसार तिथेच बुलेटिनचे गठ्ठे आणि बरच काही…! इतक्यात एक तरुण कार्यकर्ता आत मध्ये आला टोप्या घेऊन जाण्यासाठी त्यांन त्या सतरा अठरा वर्षाच्या मुलीकडे पाहिलं का कोण जाणे पण त्याला वाटलं तिला काहीतरी होतंय त्यांना विचारलं, ” बरं वाटत नाही का? ” ती म्हणाली, ” नाही डोकं फक्त दुखतंय” तो म्हणाला,… “चहा घेऊन बघा “ती म्हणाली, ” ते आमच्या घरी चहा करत नाहीत महात्माजींचा आदेश आहे ना… “… मग तो तातडीने बाहेर पडला… अर्ध्या तासात परत आला… हातात एक थर्मास होता आणि रॅपर मधली गोळी! त्यांना तिचं काम थांबून एक ग्लास पाणी दिलं आणि म्हणाला, “गोळी घ्या डोके दुखणे थांबेल आणि त्यावर हा एक कप चहा घ्या” आता मात्र तिने त्याच्याकडे पाहिलं आपल्यासाठी इतक्या आदराने आणि प्रेमाने आपल्या दुखण्याची दखल घेऊन हे सगळं करणारा तरुण कोण? … समोर एक 22 /23 वर्षाचा काळ्या रंगाचा दणकट हाडापेराचा कुरळ्या केसाचा तरुण उभा होता तिने त्याच्याकडे पाहिलं तो नजरेनेच म्हणाला घ्या चहा घ्या काही बिघडत नाही. तिने चहा घेतला थोड्या वेळाने डोकं दुखायचं थांबलं.

तरुण रोज त्या कार्यालयात कामानिमित्त येत होता हळूहळू त्यांचं बोलणं वाढलं तिने विचारलं, “खेड्यातून आलात? तो म्हणाला, ” हो शेती असते तिकडे पण शिक्षणाला इथेच होतो. शाळा सोडली… महात्माजींचा आदेश. कार्यकर्ता म्हणून सामील झालो सध्या तरी मोठ्या नेत्यांच्या हाताखाली निरोप पोहोचवणं संदेशवहन जेवण पोहोचणे इत्यादी कामे करतोय चोरून बुलेटिन वाटतो वेषांतराची कला आहे तिचा उपयोग करत लपून छपून असणारी काम करतो”. ती बेहद खुश झाली तो म्हणाला पण माझ्या जेवणाची सोय नाहीये…! ती म्हणाली, ” मी डबा देईन तुम्हाला “… तो म्हणाला मोफत नको खानावळी सारखा डबा देत असाल तर पैसे देऊन जेवेन”… ती म्हणाली, “आईला विचारून सांगते”. मग डब्याचा निमित्ताने तो रोज येत राहिला

… एक दिवस धाडस करून त्यांना विचारलं… हो धाडसच कारण ती वेगळ्या जातीची होती तो उच्च कुलीन ब्राह्मण होता घरी पटणार नाही तिला स्वीकारणार नाही याची त्याला जाणीव होती. तरीही त्यांन निर्णय घेतला. तिच्याही आईचा विरोधच होता. माणस आपली जात सोडत नाहीत आणि ते खरेच आहे कारण जीवनशैली वेगळी असते ना? पण त्या अठरा वर्षाच्या मुलीने ते धाडस दाखवलं. घरात कोणीही पुरुष माणूस नाही एक धाकटा भाऊ आणि विधवा आई. हे आपलं यापेक्षा अधिक भलं करू शकणार नाहीत हे लक्षात घेऊन तिने त्याच्याशी विवाह केला व त्यांचा चहा विचारण्याचा दिवस व्हॅलेंटाईन डे ठरला…! कुठल्याही मंगल अक्षता नाहीत.. कुठलेही भटजी नाहीत… हौस मौज नाही… शालू शेले नाहीत..! कोर्टातले एका लावलेल्या छोट्या स्टॅम्पवर ते लग्नासाठी करारबद्ध झाले. कोर्टात जमलेल्यांनी आशीर्वाद दिले. त्यांचा संसार सुरू झाला! तो कधी तुरुंगात, कधी घराबाहेर देशाच्या कामात… अनेक बाजूने विरोध… पैशाची नोकरी नाही कामधंदा नाही घरची बऱ्यापैकी श्रीमंती असताना खायचे वांदे व्हायचे… पण ते डगमगले नाहीत दोघांच्या जीवावर संसार उभा केला मुलाना उत्तम शिकवलं देशभक्तीच बीज पेरलं आज आणि हसत खेळत दिलखुलासपणे जगत राहिले…! एकमेकांची कदर करत…! जग अख्ख विरोधात होतं पण ते एकमेकांसाठी होते… मग सगळे जग त्या दोघांनी जिंकून घेतलं आज ते दोघ असते तर तो म्हणाला असता, तूच माझी व्हॅलेंटाईन करतेस ना अजूनही प्रेम तुझ्या कळ्या कभिन्न नवऱ्यावर…! “

आणि ती शांतपणे हसली असते कारण तिचं नाव शांता होत…!!!

एक सुंदर प्रेम कहाणी जी खरी आहे प्रत्येक व्हॅलेंटाईन डे ला मला ती आठवते आणि अभिमान वाटतो त्या दोघांचा. राष्ट्र प्रेमातून एकमेकांवर प्रेम करून संसार थाटणारे हे दोन प्रेमी जीव माझे आई-बाबा आहेतबाई दादा, आज तुम्ही हयात नाहीत… पण तुमच्या एवढी प्रेमळ निर्मळ प्रेम कहाणी दुसरी मी पाहिली नाही. फक्त 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करणे मोठ्या हॉटेलत जाणं भेटवस्तू देणं मग म्युझिक लावून नाच करण… केक कापणं… राजे हो हा व्हॅलेंटाईन डे नाही. प्रेम देवतेचे स्मरण करायला हे काही करावं लागत नाही फक्त एकच गोष्ट करावी लागते एकमेकांवर नितांत प्रेम.. एकमेकांप्रती विश्वास आणि आयुष्यभराची खंबीर साथ…!

असो… आज एकमेकांवर प्रचंड प्रेम करणाऱ्या प्रेमी जीवाना हॅपी व्हॅलेंटाइन डे!!!

 

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हृदयी प्रीत जागते… लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ हृदयी प्रीत जागते… लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

‘व्हँलेंटाईन डे‘ वरून मला गझलनवाजांचा एक शेर वजा किस्सा आठवला…

एकदा एक मूर्ख शायर सूर्यास म्हणतो की…

भास्करा, कीव मजला

येऊ लागते कधी मधी,

रात्र प्रणयाची तू रे

पाहिली आहे कधी?

तेव्हा सूर्य उत्तर देतो…

आम्हासही या शायराची

कीव येऊ लागते,

याच्या म्हणे प्रणयास

रात्र यावी लागते.

प्रेम हे काय दिवस ठरवून व्यक्त करायची चीज आहे?

आपलं मराठी-हिंदी साहित्य एवढं समृद्ध आहे की प्रेम व्यक्त करायच्या किती विविध शैली आपणांस ठाऊक होतात.

… प्रेम ही खरं तर नजरा-नजरेची

परिणिती आहे.

गदिमा म्हणून गेलेयत…

… *प्रथम तुज पाहता, * *जीव वेडावला… *

यांचं प्रेम सुद्धा एवढं हळुवार की गिरगांव चौपाटीवर भेटूया असे सरळ-सरळ न म्हणता ती खाली मान घालून शालीनतेने पी. सावळारामांच्या काव्यात म्हणते की

… जिथे सागरा धरणी मिळते

 तेथे तुझी मी वाट पहाते

मग एकदाची परतीच्या भेटीची वेळ ठरते. हा कावरा-बावरा झालाय, ती लाजेनं चूर झालीय. सगळं कसं शांत शांत.

ही कोंडी शेवटी तो फोडतो,

(सोबतीला पाडगांवकर, खळे आणि हृदयनाथ या त्रयीला घेऊन.)

… लाजून हासणे अन् हासून ते पहाणे,

 मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे

– – भेट झाल्यावर मात्र हृदयात एक अनाहूत हुरहुर सुरू होते.

– मग परत गदिमा मदतीला येतात,

… हृदयी प्रीत जागते, जाणता अजाणता

तोही आपल्या विश्वात नसतोच.

 

… होशवालों को खबर क्या.. बेखुदी क्या चीज है,

 इश्क किजे, फिर समझिये, बंदगी क्या चीज है

प्रेमात ती ठार वेडी झालीय,

म्हणतेय काय…

… मी मनांत हसता प्रीत हसे, हे गुपीत कुणाला सांगू कसे?

त्याचे बहाणे ती सुद्धा ओळखून आहे. तिच्या पाठीशी अस्सल कोंकणी सारस्वत (आरती प्रभू) आहेत,

ती म्हणते,

… नाही कशी म्हणू तुला विडा मी दुपारी,

 परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी

ह्याचे बहाणे थांबायची चिन्हे नाहीत. मग तीच म्हणते,

… ये मुलाकात इक बहाना है, प्यार का सिलसिला पुराना है ।

शैलेंद्रच्या काव्यातच सांगायचे तर – – 

… घडी घडी मेरा दिल धडके, हाय धडके, क्यू धडके…

– – ह्याची खात्री पटलीय पण खुंटी हलवून घट्ट करू पाहतोय… 

… कहना है, कहना है, आज तुमसे ये पहेली बार,

 तुम ही तो लायी हो जीवन में मेरे, प्यारही प्यारही प्यार…

ती त्याच्या हरकतीने मोहरून गेलीय… तृप्त झालीय.

… धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना,

 शब्दरूप आले, मुक्या भावनांना…

आणि मग झाडांची पाने हलतात. तो खूष…..

… जेव्हां तिची नी माझी, पहिलीच भेट झाली,

झाली फुले कळ्यांची.. झाडे भरात आली..

– – आणि तिनं चक्क होय म्हटलं. हा गडाबडा लोळायचा बाकी… 

.. तुम क्या जानो, मोहब्बत क्या है..

 

.. कोकिळ कुहूकुहू बोले, तू माझा तुझी मी झाले.

दोघांत एवढं अद्वैत निर्माण झालं की ती म्हणते…

… तुज्ये पायान् रूपता काटां, माज्ये काळजान् लागतां घांव…

– – आपण दोघांचे एक कधी झालो हे त्यांना कळलंच नाही. हृदये जरी दोन असली तरी अंतर्मन मात्र एकच होतं… 

… दो लब्जों की है बस ये कहानी…

या हृदयीचे त्या हृदयी कधी झाले, ते ह्या युगुलाला कळलेच नाही…..

… आज तू डोळ्यांत माझ्या, मिसळूनी डोळे पहा,

 तू असा जवळी रहा, तू अशी जवळी रहा…

प्रेमाची भावना इतक्या हळुवारपणे व्यक्त करणाऱ्या या कविता ज्या साहित्यात आहेत, त्या *मराठी भाषेला ‘व्हॅलेन्टाईन डे’ च्या बाजारू आणि उथळ स्वरूपाकडे बघण्याची गरजच काय?

भारतीय संस्कृती आणि माय मराठीप्रेमी… नक्कीच सहमत असतील!!!

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कृष्णस्पर्श…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

सौ.राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “कृष्णस्पर्श…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

‘कुब्जा’ हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर येते ती मथुरेतील कंसाची दासी. कुरुप, कुबड असलेली एक वृद्धा. कंसासाठी ती चंदन घेऊन जात असते. वाटेत कृष्ण भेटतो. म्हणतो, ‘सुंदरी, मला देशील चंदन? ’

कुणी तरी तिला प्रथमच ‘सुंदरी’ म्हणाले होते. तिने कृष्णाला चंदनाचा लेप लावला. कृष्ण कुणाकडून तसेच काही कसे घेईल? त्याने कुब्जेच्या हनुवटीला धरून ती वर उचलली आणि कुब्जा खरेच सुंदर झाली.

भक्तांना हे सहजच पटते. चिकित्सकांना ही निव्वळ कल्पित कहाणी वाटते. मला या कथेतून वेगळाच आनंद मिळतो.

 कुणी असुंदर असेल तर मान उंचावून कसे वावरेल? त्यात दासी असल्याने तिला ‘तोंड वर करायचा’ अधिकार तरी कसा असेल? कृष्णाने कुब्जेची हनुवटी उंचावली. तिला ताठ व्हायला शिकवले. कुरूप असो की दासी असो; मान वर करूनच जगले पाहिजे, हे भान कृष्णाने तिला दिले.

 ‘दिसण्या-असण्यातून’ न्यूनगंड निर्माण होऊ न देता आपणही दिमाखात जगू शकतो, हे दाखवण्याची संधी ईश्वराने किती विश्वासाने आपल्याला दिली आहे. कुब्जा सुंदर झाली की नाही हे मला ठाऊक नाही; पण तिच्या मनातली असुंदरतेची जाणीव कृष्णाने दूर केली, असे मला वाटते.

 

इकडे विठुरायानेही कंबरेवर हात ठेवून, थाटात उभे राहत हे दाखवून दिले की, सौंदर्य नाही तर औदार्य महत्त्वाचे. सौंदर्य येते आणि वयोमानाने ओसरतेही.

औदार्य अठ्ठावीस युगे टवटवीतच राहते.

 

खूपदा भक्ती करणारेही जेव्हा म्हणतात की, देवा-धर्माचे इतके आम्ही करतो; पण ईश्वराची कृपा काही होत नाही.

 पण, पारमार्थिक साधना म्हणजे जग बदलणे नाही, तर आपला दृष्टिकोन बदलणे. हे समजले की आपल्या वृत्तीच्या कुब्जेला सुंदर व्हायला वेळच लागत नाही.

 

रखरखत्या उन्हात कुठून कोकीळ कुजन ऐकू आले की मनाला निवलेपण जाणवते ना?

 पहिल्या पावसाने आसमंतभर दरवळणाऱ्या मातीच्या गंधाने चित्ताला हरखून जायला होते की नाही?

 तान्हे मूल कुणाचेही असो; गर्दी-गोंधळातही आपल्याकडे बघून गोड हसते, तेव्हा आपल्याही ओठांवर स्मितरेषा दरवळते की नाही?

 आपल्याबाबत हे घडते तेव्हा निश्चित मानावे की आपल्याला कृष्णस्पर्श झाला आहे.

अंतरीची ही निरपेक्ष संवेदनशीलता हाच कृष्णाचा साक्षात्कार.

 

 मनातली असुंदरतेची, अपूर्णतेची जाणीव संपली की सारे सुंदरच आहे. हे जाणवते.

 माझ्या कृष्णाने निर्माण केलेले काहीही असुंदर असूच शकत नाही, ही श्रद्धा दृढ असली की झाले!

 

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी` |

कर कटिवरी ठेवूनीया ||

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बातम्या… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

🔅 विविधा 🔅

☆ बातम्या ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

खरं तर दूरदर्शन वरील बातम्या पाहून त्याच त्या बातम्या

कितीवेळ पहाव्या अन का पहाव्या असा प्रश्न पडतो. एकच बातमी सह्याद्री वाहीनी सोडली तर प्रत्येक वाहीनी वर दर दहा मिनीटाला चालू असते. प्रत्येक घरात हल्ली दूरदर्शन आहे. घरात राहणा-या माणसानीं ती कितीवेळा पहावी याला काही गणितच राहिलेले नाही.

एक एक बातमी तर सलग तीन तीन दिवस चालू असते. एखदा बातमी सरळ सांगायची. परत तीच बातमी मीठमसाला लावून सांगायची. परत तीच फोडणी देवून सांगायची. परत दोन तासानी त्या बातमीच्या घटनेबद्दल लोकांचं काय मत आहे, हे विचारायचं. प्रत्यक्ष त्या घटनेचं त्या जागेवरील चित्रीकरण दाखवायचं. बातमी तीच एखदा पुरुषाकडून कांहीवेळाने स्त्री कडून सांगायला लावायची.

ते ही जोरदार आवाजात. घरातल्या ऐकणा-या माणसाला वाटावं ही बातमी नसून कोठेतरी दंगलच चालू आहे. हे सर्व का? तर चॉनेलवाल्यांचा टीआरपी

वाढावा म्हणून. मला यातून एक म्हणायचं आहे तुमच्या टीआरपी साठी किती लोकांना तुंम्ही कितीदा मुर्ख बनवणार आहात.

सर्वसाधारण १९९० च्या पुर्वी बातम्या सांगणा-या स्त्री कलाकार सुंदर वेशभूषा करून बातम्या सांगायच्या. फार सुंदर बातम्या वाटायच्या. मनांला वाटायचं या बातम्या तास न तास पहात रहाव्या. एकतर बातम्या देणा-यांचा आवाज इतका गोड असायचा. बाहेर बसणारे लोक, हा आवाज ओळखायचे. त्या बातम्यात कर्णमधुर आवाज होता, शालीनता होती. सहजसुंदर आवाजाने ते रसिकांना आकर्षित करायचे. अशा बातम्यांची सुरुवात सहजसुंदर हास्याने व्हायची तर शेवटही सुंदरशा हास्यानेच व्हायचा.

टिव्ही वरील हिंदी बातम्यांची सुरूवात सन १९६५ पासून झाली. पहिली बातमी देण्याचा मान हा प्रतिमा पुरी यानां मिळाला. त्यानंतर ज्यानीं जादूई आवाजाने सर्वसामान्य रसिकांवर भूरळ पाडली त्यामध्ये सलमा सुलतान, शमी नारंग, सरला नायर, मंजिरी जोशी अगदी अलीकडे म्हणजे २००५ पर्यंत शोभना जगदीश यांच नांव घ्यावं लागेल. अर्थात आपल्याकडे टिव्ही १९८५-९० च्या काळात आला. पण एक सत्य आपण कबूल केले पाहिजे. जोपर्यंत दूरदर्शन होतं तोवर सारं काही ठिक होतं.

चांगल्या बातम्या व दर्जेदार मालिका आपणाला त्यावेळीच पहायला मिळाल्या. रंगीत टिव्ही नसतानां आपण हे रसिकतेने पहायचो. ऐकायचो.

आज आपण पहातोय त्या बातम्या भले ख-या असतील ही पण रसिकांना त्या फेक न्यूज वाटू

लागल्यात. म्हणजेच त्यामधील सत्यता पडताळणीची

वेळ तुंम्हा-आंम्हावर आलेली आहे. या बाबींचा निश्चितच आपणाला गांभीर्याने विचार करावा लागेल.

राजकीय बातम्या बद्दल तर न बोललेलं बर!

इतक्या बेभरवशाच्या बातम्या चॅनेल वाले द्यायला लागलेत. उदाहरण द्यायचं झालं तर हल्ली काही नेत्यांना मंत्री पद मिळाली नाहीत. त्यामूळे ते नाराज आहेत. इथपर्यंत ठिक आहे. पण ते अमुक पक्षाकडे निघालेत. त्यानीं या नेत्यांची भेट घेतली, त्या नेत्यांची भेट घेतली. प्रत्यक्ष आजही पाहिलं तर आपणास यामध्ये काही ही सत्य नसल्याचे आढळून येईल. पण अशा बातम्या कोण पहिल्यांदा देतो यासाठी ही लागलेली चुरस आहे, हे सहज आपल्या लक्षात येईल.

काही बातम्या टीआरपी वाढविण्यासाठी अति रक्तरंजित दाखविल्या जातात. जर अशा बातम्यांची खरी बाजू लोकांपासून दडवून ठेवली जाते. त्यामुळे आज आपली जबाबदारी फारच वाढली आहे हे सत्य नाकारून चालणार नाही.

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “हॅप्पी व्हॅलेंटाईन…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “हॅप्पी व्हॅलेंटाईन…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आजी फिरायला निघाली.

दोन जिने उतरून आजोबा खाली आले…

“अग जरा थांब”

” का… काय झालं? “

” अगं स्वेटर घालायला विसरलीस… उद्या आजारी पडलीस तर मलाच पाय दाबून द्यावे लागतील… “

” ईश्य… अहो काय हे… चार चौघात काय बोलताय”…

मैत्रिणींबरोबर थोडी लाजत हसत आजी गेली.

दोन्ही लेकी लग्न होऊन सासरी गेलेल्या… त्यामुळे आजोबा आजी दोघेच घरात.. पण मजेत दिवस घालवत असतात.

 

“आज दमलेली दिसतेस.. पोळ्या आणू का बाहेरून..? “

“नको आज मेथीची भाजी, भाकरी आणि दाल फ्राय करणार आहे.. “

” फक्कड मेन्यू… कर कर… “

 

त्या दिवशी संध्याकाळी आजोबा सारखा फोन हातात घेत होते.

” अहो सारख काय बघताय? कोणाचा फोन येणार आहे का? “

” हो पल्लवीचा”

“कोण पल्लवी… “

” अगं गोव्याला आमच्याबरोबर ट्रेनिंगला होती… “

तेवढ्यात वाजलाच…

” हो हो निघतो.. पोचतो वेळेत”

अस म्हणून आजोबा गडबडीत गेले..

तरीच आज टी शर्ट घातलाय.. नवीन जॅकेट घातलय… पण या आधी कधी पल्लवी चा उल्लेख केलेला नाही डोक्यात किडा वळवळलाच

सत्तरीतही…

खुशीत आजोबा घरी..

 आजीला कुठले चैन पडायला आजोबा पाय धुवायला गेल्यावर आधी कुणाचा फोन आला होता हे चेक केलं…

आजीला हसूच यायला लागले..

अमोल पिल्ले… ही पल्लवी का…

मनाशी म्हणाली,

घरी आल्यावर माझी कशी गंमत केली हे सांगून माझी मस्करी करणार होता का? मी पण काही कमी नाही… हे आता दाखवतेच…

 

“अहो किती उशीर केलात.. आत्ताच अरू गेला… “

” कोण अरू…? “

” अहो माझी मैत्रीण अरुणा आत्ताच गेली. आमंत्रण द्यायला आले होते दोघे.. “

” पण आत्ता तू अरू गेला अस म्हणालीस.. “

” कोण मी..? “

आजोबांचा चेहरा बघण्यासारखा…

” अहो… उद्या कानाच्या डॉक्टरांकडे जाऊच या.. हल्ली तुम्हाला नीट ऐकू येत नाही बाई. मी बोलते एक तुम्ही दुसरच ऐकता… “

“अग खरचं आत्ता मला स्पष्ट ऐकू आलं.. तू अरुच म्हणाली होतीस”

 

आजीनी फोनचा नंबर फिरवल्याची एक्टिंग करायला सुरुवात केली होती. अशी झक्कापक्की चालु असते दोघांची…

खरं सांगू का…

आयुष्यभर दोघांनी हसत खेळत आयुष्य जगायचं…

मन जुळली की हे असले दिवस साजरे करावेच लागत नाहीत…

तीनशे पासष्ट दिवसातला एक दिवस असतो का हो व्हॅलेंटाईन…

सकाळी हातात दिलेला गुलाब संध्याकाळी कचऱ्यात जातो…

त्यापेक्षा एकमेकांचे हात हातात घेऊन आयुष्यभर आनंदात राहाव… सुखदुःखात एकमेकांना साथ द्यावी..

दोन माणसं म्हंटली की मतं

वेगवेगळी असणारच… इकडे तिकडे जरा होणारच. ज्याला जमेल त्यानी चार पावलं मागे यायचं… मग प्रश्न फार पुढे जात नाहीत. आहे त्या परिस्थितीत आनंदात राहायचं… ईतकच तर सुखी संसाराच गमक असतं..

 

रोजच्या धकाधकीच्या जीवनात बाहेरून आलं की शांतता हवी असते…

अगदी कुठल्याही वयात…

आपला साथीदार जोडीला आहे.. एकमेकांची साथ… विश्वास आहे असं लक्षात आलं की कुठलंही दुःख झेलायला मन तयार होतं.

तरुणपणी आयुष्य धुंदीत जातं. चाळीशी नंतर भान येतं. ते भान आधीच येऊ दे… कदाचित नंतर ऊशीर झाला असेल.

 

आपली हिंदू संस्कृती स्नेह, माया, प्रेम शिकवते. त्याच्याबरोबरच नात्याची कदर आणि आदर करायला पण शिकवते. त्याचा अंगीकार करा. चॉकलेटवाल्यांच्या जाहिरातीतबाजीला आपण फसायचं का? भुलवायला नेकजण बसलेले आहेत… आपण विचार करायला हवा.

शाश्वत आनंद, सुख कशात आहे हे ओळखा. असा आनंद आयुष्याच्या शेवटपर्यंत मिळायला हवा..

हो की नाही… तो मिळाला की रोजचाच दिवस निरपेक्ष प्रेमाने भरलेला असतो.

 

एक गंमत सांगू का…

आजींना भेटायला अरुणच आला होता… पण बायकोला अरूणाला घेऊन…

आज ना ऊद्या आजी हे आजोंबांना सांगणारच.. असेच छोटे आनंद घेत दोघेजण जगत आहेत…

आता हा लेख आधी का पाठवला हे तुम्ही ओळखलंच असेल..

तुम्ही सुज्ञ आहात..

घेताल समजून…

 

मग शीर्षक हे का घेतले? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल..

तुम्ही त्याशिवाय वाचणार नाही हे मला माहीत होतं म्हणून…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares