मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ९ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ९ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

जगभरातील अनेक विद्यापीठात गेल्या एक शतकाहून अधिक काळ सातत्याने निरनिराळ्या राष्ट्रीयत्वाचे, धर्माचे, जातीचे, पंथाचे विद्यार्थी गीतांजलीचा अभ्यास करत आहेत. यावरून हे सहजच सिद्ध होतं की, गीतांजलीतील तत्वज्ञान जरी हिंदू धर्मातील हजारो वर्षे जुन्या उपनिषदीय संकल्पनांवर आधारित असलं, तरीही ते कालातीत व सर्वस्पर्शी आहे. ते माणसाच्या काळजाला भिडणारं आहे.

उदाहरणादाखल कांही विद्यापीठांचा उल्लेख करावासा वाटतो.

  1. विश्वभारती विद्यापीठ, कोलकता
  2. कलकत्ता विद्यापीठ, कोलकता
  3. जाधवपूर विद्यापीठ, कोलकता
  4. ऑक्सफर्ड विद्यापीठ, यू के
  5. University of Illinois Urbana – Champaign, USA.
  6. The Scottish center for Tagore studies, UK
  7. HongKong Baptist University, HongKong
  8. Trinity College, Dublin, Ireland
  9. ‘Geetanjali and beyond’ is a peer reviewed, open access, academic and creative international journal of UK promoting creative writing and research on Rabindranath Tagore’s work and life, his circle and his impact.

—–

गीत : २५

IN the night of weariness let me give myself up to sleep without struggle, resting my trust upon thee.

Let me not force my flagging spirit into a poor preparation for thy worship.

Its is thou who drawest the veil of night upon the tired eyes of the day to renew its sight in a fresher gladness of awake

—–

मराठी भावानुवाद : गीत २५

*

कंटाळुनि ही रात्र झोपली

सहजचि जावे मी ही झोपुनि

सर्व भार या आयुष्याचा

अस्तित्वावर तुझ्या टाकुनि॥

*
गत गोष्टींचा हिशोब करता

हताश झालो, थकलो दमुनि

माझ्या हातून चुका न होवो

मात्र त्यामुळे तुझिया पूजनी॥

*
थकला दिनमणी, येई चरणी

पांघरिसी त्या निशा, थोपटुनि

दमल्या नयना त्वरे शांतवुनि

पुनरपि पसरे, आनंद उगवुनि

*

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

गीत २६

HE came and sat by my side but I woke not. What a cursed sleep it was, O miserable me!

He came when the night was still; he had his harp in his hands, and my dream became resonant with its melodies.

Alas, why are my nights all thus lost? Ah, why do I ever miss his sight whose breath touches my sleep?

—–

मराठी भावानुवाद : गीत २६

*

प्रत्यक्ष तो आला

माझ्याजवळ बसला

पण मी झोपलेला

शापित ही झोप कसली!

माझी मला कीव वाटली

रात्र निःस्तब्ध झाली

त्याच्या ओठात होती मुरली

त्याचे मंजुळ स्वर

माझ्या स्वप्नात निनादतात

पण अशा रात्री कां

माझ्या हातातून निसटतात?

त्याचे ऊष्ण श्वास

माझ्या स्वप्नांना स्पर्शतात

त्याच्या दर्शनापासून कां

माझ्या नेत्रांना वंचित ठेवतात?

 

भावानुवाद © शोभना आगाशे 

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

गीत २७

LIGHT, oh where is the light? Kindle it with the burning fire of desire!

There is the lamp but never a flicker of a flame, ⎯ is such thy fate, my heart Ah, death were better by far for thee!

Misery knocks at thy door, and her message is that thy lord is wakeful, and he calls thee to thy love-tryst through the darkness of night.

The sky is overcast with clouds and the rain is ceaseless. I know not what this is that stirs in me, ⎯ I know not its meaning.

A moment’s flash of lightning drags down a deeper gloom on my sight, and my heart gropes for the path to where the music of the night calls me.

Light, oh where is the light! Kindle it with the burning fire of desire! It thunders and the wind rushes screaming through the void. The night is black as a black stone. Let not the hours pass by in the dark. Kindle the lamp of love with thy life.

—–

मराठी भावानुवाद : गीत २७

*

दीप असे परी ज्योती नसे

प्रकाश तर ना कुठेच दिसे

मृत्यू बरा, दुर्भाग्य नकोसे॥

*

दुःखाची दारी थाप असे

आठव प्रियाचा त्यात असे

संकेत भेटीची वेळ असे॥ 

*

मेघव्याप्त हे गगन असे

धारांनी तनमन चिंब असे

अंर्तमन पण अस्वस्थ असे॥

*

चपला दिपवी नेत्र जेधवा

सुरेल बासुरी ऐकू ये तेधवा

मार्ग शोधी अन् भेटी केशवा॥

*

प्रेमदीप तू देई उजळुनि

आशेचा स्फुल्लिंग चेतवुनि

जीवनज्योती अपुली अर्पुनि॥

*

– क्रमशः भाग नववा

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हे खरे सिंघम!! ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ हे खरे सिंघम!! ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

कधीकाळी पुण्यात घरोघरी वर्तमानपत्रे टाकून शिकणारा मुलगा आज महाराष्ट्राच्या पोलीस दलाचा प्रमुख झाला आहे.

सदानंद दाते हे खरेतर 26/11 च्या हल्ल्यावेळचे हिरो. तुकाराम ओंबासेंनी देशासाठी बलिदान दिले तर दाते अखेरपर्यंत दहशतवाद्यांशी लढत राहिले. मात्र जमाना ‘पेड मार्केटिंग’ व मीडियातील चमकोगिरीचा आहे. त्यामुळे ‘कट्ट्या’ वर हिरो म्हणून हल्ल्यावेळी ताजमध्ये लपून बसलेले लोक पुढे आले.

सध्या स्वयंघोषित ‘सिंघम’ म्हणून स्वतःचेच प्रोजेक्शन करण्याची लाट पोलीस दलात आलेली असताना दाते कायम असल्या प्रकारापासून दूर राहिले. प्रामाणिकपणे काम करत राहिले. महायुती सरकारमध्ये प्रामाणिक माणसाचा सन्मान म्हणून, दाते यांना संधी मिळाली हे विशेष!

महाराष्ट्र पोलीस व मुंबई पोलिसांचा एकेकाळी जगभर दरारा होता. सदानंद दाते ते गतवैभव मिळवून देतील, याच सदिच्छा व शुभेच्छा.

माहिती संकलक : अज्ञात

प्रस्तुती : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पेरावे तसे उगवते! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

सौ. सुचिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ माणसं मनातली – लेखक : व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं…

काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात. आपली होऊन जातात. तर, काही कितीही सहवासात राहिली, तरी त्यांची आतून ओढ नसतेच…

चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल, तर

त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं…

शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं मनाला ते

कधीच नसतं…

शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो.

शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, आणि विनयशीलता असेल, तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती

हवी हवीशी वाटते…

म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही,

देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो…

आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं…

आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं,

ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई…

ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही…

आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे?

नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत. 

कदाचित, पुन्हा भेटतील न भेटतील!

 

लेखक: व. पु. काळे

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – एक संवाद वृक्षांशी… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

उगवतीचे रंग – एक संवाद वृक्षांशी.. ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

माणूस आणि निसर्ग याचं एक अतूट नातं आहे. खरं म्हणजे माणूस निसर्गाचाच एक भाग आहे किंवा होता असे आपण म्हणू या. होता असं दुर्दैवाने म्हणावं लागतं कारण माणूस आज निसर्गापासून दूर गेलाय. निसर्गाने त्याला दूर केलं नाही.आणि या निसर्गापासून दूर जाण्याचे दुष्परिणाम आपण भोगतोय मंडळी. मानवी जीवनात निर्माण झालेले ताणतणाव, विविध प्रकारचे आजार, वाढते प्रदूषण या सगळ्या गोष्टी निसर्गापासून किंवा नैसर्गिक जगण्यापासून आपण जे लांब चाललो आहोत त्याचे परिणाम आहेत.

झालं असं की मागच्या आठवड्यात मी काही कारणानिमित्त एका गावाला गेलो  होतो.तेव्हा तेथे असलेल्या माझ्या नातेवाईकांकडे मुक्काम केला.त्यांचे घर चौथ्या मजल्यावर होते. दिवसभरच्या प्रवासाच्या थकव्याने अंथरुणावर पडल्याबरोबर झोप लागली. सकाळी प्रसन्न होतो. सकाळही प्रसन्न होती. मंडळी आपण जेव्हा प्रसन्न असतो तेव्हा भोवतालचे जगही आपल्याला प्रसन्न भासते.आणि आपण जेव्हा उदास असतो तेव्हा भोवतालचे जगही तसेच उदास भासते.म्हणून तर तुकोबा म्हणतात, “मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.” आणि आपली रात्री झोप व्यवस्थित झाली असेल तर सकाळी आपण उल्हसित असतो.तसाच मी ही होतो.

मी सूर्यदर्शन घ्यावे म्हणून बाहेरच्या व्हरांड्यात आलो. बाहेर पाहिले तो सुर्यनारायण बरेच वर आले होते. सूर्याची सोनेरी किरणे आसमंतात पसरली होती. आणि त्या इमारतीच्या समोरच्या बाजूला चार गगनचुंबी वृक्ष होते. ते वृक्ष सूर्यप्रकाशात न्हाऊन निघाले होते. त्या उंचच उंच वृक्षांकडे मी बराच वेळ भान हरपून पहात राहिलो. त्यांनी माझे मन आकर्षून घेतले होते. मोठी सुंदर दिसत होती ती झाडे. वसंतात त्यांना नुकतीच नवीन पालवी फुटली होती. तो हिरवाकंच पर्णसंभार त्यांच्या अंगावर मोठा खुलून दिसत होता.

त्यांच्याकडे बघता बघता माझी जणू समाधी लागली. ती झाडे सजीव होऊन माझ्याशी बोलू लागली, “ अरे, बघतोस काय असा आमच्याकडे ? ही आमची सुंदर नवी हिरवीगार पाने आवडली ना तुला ! पण ही अशीच नाही आली रे. आम्ही किती ऊन, पाऊस, वारा वादळे झेलली आमच्या अंगावर. कधी कधी अंगावर झालेले कुऱ्हाडीचे घावही सोसले.म्हणून उंच वाढलो आम्ही. घाव सोसल्याशिवाय जीवनात शहाणपण आणि परिपक्वता येत नाही. आणि हो, आम्ही ज्या जागी उभे आहोत तेथेच घट्ट पाय रोवून उभे राहिलो.घाबरलो नाही. हललो नाही.” बुद्धाशी, ज्ञानेश्वरांशी अशीच बोलली असतील का ही झाडे ? त्यांनाही वृक्षाच्या सान्निध्यातच साक्षात्कार झाला.तुकोबांनी म्हणूनच म्हटले असावे, “ वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे.” त्या वृक्षांमधील एक झाड बरेच जुने होते.त्याच्या खोडावरून त्याचे वय लक्षात येत होते. पण त्यानेही नवी पालवी धारण केली होती. ही नवी पालवी आशेची प्रतिक होती.तुमचे वय कितीही असू देत, जोपर्यंत तुमच्या मनात आशा आहे, जगण्याची उर्मी आहे,तोपर्यंत तुम्ही तरुणच राहाल.आणि ही आशा, जगण्याची उर्मी संपली की तुम्ही तरुण असलात तरी, वृद्धत्वाकडे वाटचाल कराल.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ७५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ७५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

तो नसता तर

“युद्धस्य कथा रम्या!” असे म्हणताना मला खूप वेळा वाटते की प्रवासातही जेव्हा काही थरारक अनुभव येतात, ते आठवून मात्र पुन्हा पुन्हा गंमत आणि नवल वाटतच रहाते. तो प्रसंग, त्या भोवतालचं वातावरण, कारण, त्या वेळची गोंधळलेली मनस्थिती आठवली की वाटतं सारंच किती विचित्र आणि अनपेक्षित होतं! त्या दिवशी खरं म्हणजे काहीही होऊ शकत होतं पण दैवदयेने तसं झालं नाही म्हणूनच आज आपण इतक्या वर्षानंतर हे लिहू शकतो याची जाणीव झाल्यावर तर अधिकच मजा वाटते.

त्यावेळी मी आठवी नववीतच असेन. त्यावर्षीच्या मे महिन्याच्या सुट्टीत भाईंनी (माझे आजोबा, आईचे वडील) काश्मीर सफरीचा दणदणीत बेत आखला. भाई, भाईंची बहीण,(जिला आम्ही  आत्या म्हणत असू), आमचा परिवार आणि मावशीचा परिवार मिळून एकूण १४ जणांच्या ग्रुपची कस्टमाईज्ड टूर एका ट्रॅव्हल एजन्सी कडून भाईंनी नियोजित केली.  जवळजवळ एक महिन्याची अत्यंत आरामदायी आणि मनोवेधक अशी ती दूर होती.

“भारताचं नंदनवन” डोळे भरून पाहणार, तिथल्या सुंदर नैसर्गिक वातावरणाचा अनुभव घेणार, तिथली उंच दाट झाडी, नाना प्रकारची, विविध रंगांची टवटवीत फुले, तिथली गोरी गुलाबी हसरी माणसं, नद्या, तलाव, हिमालयाची शिखरे, थंडी जे सगळं फक्त भूगोलात वाचलेलं होतं ते “याची डोळा याची देही” भोगणार हा विचारच किती उत्तेजक होता!

साठच्या दशकातलं ते काश्मीर अत्यंत सुंदर होतं. निसर्गाच्या कुशीत, हिमालयाच्या शिखरांनी वेढलेलं, उंचावर वसलेल्या महादेवाच्या मंदिरात होणाऱ्या घंटानादानं पवित्र भासणारं काश्मीर खरोखरच स्वस्थ आणि मंगलमय होतं. झुळझुळणाऱ्या नद्या मानवी जीवनातलं पावित्र्य किनाऱ्यावर ठेवून वाहत होत्या. तेव्हा त्या शुभ्र फेसाळलेल्या होत्या. रक्तरंजित नव्हत्या. त्यावेळेचं काश्मीर आनंदी, मुक्त आणि तिथल्याच गेंदेदार गुलाबांच्या फुलासारखं सतत चैतन्यमयी, हसरं होतं. कसलीही दहशत नव्हती, तणाव नव्हता ,भयमुक्त होतं, धर्मभेद आणि हिंसक राजकारणापासून, सत्ता कारणापासून दूर होतं. 

तिथल्या एक महिन्याच्या वास्तव्यात आम्ही तिथल्या नैसर्गिक सौंदर्यासह, तिथल्या भौगोलिक, सामाजिक कला संस्कृतीचाही आनंद भरपूर लुटला.तिथली मुघल उद्याने, तिथली खाद्य संस्कृती मनापासून पाहिली,आस्वादली, अनुभवली पण तरीही हे सगळं आठवत असताना त्या एका प्रसंगाचे मात्र विस्मरण कधीच होऊ शकत नाही.प्रत्येक वेळी तो प्रसंग आठवताना वेगवेगळा थरारआणि विचार घेऊनच येतो.

साठच्या दशकात काश्मीरमध्ये प्रवाशांसाठी तांत्रिक सुधारणा फारशा झालेल्या नव्हत्या. बर्फाच्छादित डोंगराडोंगरात  वसलेल्या, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी घोड्यावरूनच जावे लागायचे. डोंगरातले कच्चे, दगड मातीचे अरुंद रस्ते, एका बाजूला उंच गिरीमाथे, आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि मधल्या अरुंद भागातून घोड्यावर बसून रिकीबीत  पाय घट्ट अडकवून आणि खोगीर दोन्ही हातानी पक्कं पकडून त्या मूक प्राण्यावर आपल्या जीवनाचा भार आणि विश्वास टाकून त्या अनोळखी वाटेवर जीव मुठीत घेऊन केलेला प्रवास तसा सोपा नव्हताच पण सुरुवातीला वेगळेपणात उत्तेजकता असतेच. साहस, थ्रील याचाही आनंद वेगळाच असतो. एकदा तुमची मानसिकता पक्की झाली की मनातली भीती आपोआपच दडपली जाते. शिवाय त्या त्या घोड्याचा मालक आपल्याबरोबर येणारच असतो हाही एक मोठा दिलासा त्यावेळी होताच.

श्रीनगर पासून काही अंतरावर असलेल्या एका गावी बसने आल्यानंतर गुलमर्ग पर्यंतचा आमचा घोड्यावरचा प्रवास अत्यंत मजेत, हसत खेळत आणि निर्भयतेने सुरूही झाला. त्यावेळी आमच्याबरोबर मार्गदर्शक म्हणून आम्ही राहत असलेल्या नगीन लेक मधल्या हाऊस बोटीच्या मालकाचा मुलगा गुलाममहम्मद बरोबर होता. २५/२६वर्षांचा असेल तो. खूप आनंदी वृत्तीचा,, बोलका, मनमोकळा आणि प्रवाशांचं मन रिझवणारा, काहीसा मिस्कील  पण काळजी घेणारा असाच तो होता.

घोड्यावरची सफर सुरू झाल्यानंतर आमच्या समूहाची काही वेळानंतर बरीच पांगापांग झाली. काही भराभर पुढे गेले. सोबत असलेले घोडेवाले सोबत सोडून गेले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे,” वो(अश्व) जानता है कहाँ जानेका, कोई तकलीफ नही, डरने का नही.” अशी त्यांची एक गाईड लाईन होती. 

माझा घोडेवाला मात्र माझ्याबरोबरच होता पण माझा घोडा फारच हट्टी, आळशी आणि काहीसा मनमानी असावा किंवा त्या दिवशी त्याचं काहीतरी चांगलंच बिनसलं असावं. तो चालतही नव्हता, पळतही नव्हता त्यामुळे मी सर्वांपासून खूपच मागे पडले होते. आमच्या परिवारातले जवळ जवळ सगळेच पोहोचत आले असतील मी मात्र अशीच अर्ध्या रस्त्यावर रेंगाळत होते. मी, घोडा आणि माझा घोडेवाला. माझा घोडेवाला घोड्याची खूप मनधरणी करत होता. शेवटी ‘बाबापुता’ करता करता त्याचाही पेशन्स, धीर, मनावरचा संयम सुटला आणि हातातल्या काठीने त्याने त्या घोड्याच्या पार्श्वभागावर जोरात मारले आणि काय सांगू तो घोडा असा काही उधळला आणि सैरावैरा कसाही धावू लागला की माझी तर ‘पाचावर धारण’ बसली. मी ओरडू लागले, किंचाळू लागले. डावीकडची खोल दरी, उधळलेला घोडा, आणि संपूर्ण ताबा हरवलेली,अननुभवी मी फक्त माझा मृत्यू बघत असताना रिकीबीमधून माझे पाय सटकले आणि आणि मी धाडकन घोड्यावरून कोसळले.काहीच कळले नाही. शुद्ध हरपली असावी माझी. काही क्षण, मिनिटे, तासही गेले असतील कदाचित. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा फक्त एकच सुखद धक्का बसला,” मी जिवंत होते. पूर्णपणे वनपीस होते. शरीराचा एकही अवयव मला सोडून गेलेला नव्हता. निर्जन, घनदाट जंगल, प्रचंड थंडी आणि दगड मातीत आपटलेला पण तरीही शाबूत फक्त खरचटलेला  माझा देह! शून्य स्थिती म्हणजे काय ते त्या दिवशी  मला कळलं. मृत्यूला भोज्या करून आल्यानंतरच्या जीवनात पुन्हा स्थिर होण्यासाठीचा तो एक शून्य क्षण होता. ना मी कुणाला हाक मारू शकत होते, ना कोणाची मदत मिळण्याची मला तिथे शक्यता वाटत होती पण तेवढ्यात कुठून तरी कसातरी पुढे गेलेला गुलाम मोहम्मद धडपडत त्याच्या घोड्यावरून दौडत कदाचित मलाच शोधण्यासाठी तिथे आला. त्याने मला  अशा विव्हळ स्थितित पाहिलं आणि अक्षरश: मला  उचललं आणि त्याच्या घोड्यावर नीट बसवलं. प्यायला पाणी दिलं आणि तो माझ्या पाठीमागे बसला आणि म्हणाला,” डरो मत.  मै हूँ ना! आल्ला की मेहरबानी तू बच गई. शुकरगुजार है हम उसके!”

मला काहीच समजत नव्हतं. मी बोलूही शकत नव्हते. निर्विचार निर्विकार होते मी. फक्त एवढंच जाणवलं हा गुलाम मोहम्मद मला माझ्या परिवाराची नक्की भेट घडवेल. मी त्याचे हात घट्ट पकडले.

पण एवढ्यावरच हा एपिसोड समाप्त होणार नव्हता. पुढे घडलं ते आणखीच अनपेक्षित आणि विचित्र होतं. काही वनाधिकाऱ्यांचं त्या भागात पेट्रोलिंग चालू होतं. त्यांनी मला आणि गुलाम मोहम्मदला असं घोड्यावर एकत्र पाहिल्यावर त्यांच्या डोक्यातला गुन्हेगारी कायदा सळसळला असावा. त्यातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुलाम मोहम्मदला वेड्यासारखे मारायला सुरुवात केली. मलाही घोड्यावरून उतरवले. मी बाजूला उभी राहून गुलाम महम्मदची चाललेली बेसुमार  पिटाई बघत होते. माझा जीव कळवळत होता. काश्मिरी भाषेत ते बोलत होते. गुलाम मोहम्मद त्यांची गयावया करत होता. काय घडले ते सांगण्याचा प्रयत्न करत होता पण ते अधिकारी काही ऐकूनच घेत नव्हते. बेभानपणे त्याला नुसते मारतच होते. हळूहळू मला घडत असलेल्या प्रसंगाचा, कारणाचा अंदाज येऊ लागला. या वनाधिकाऱ्यांची अशी समजूत झाली होती की “हा तरुण गुलाम मोहम्मद माझ्याशी काहीतरी अतिप्रसंग करत होता” आणि  अशा गुन्ह्याला कायद्याने फार मोठी शिक्षा होती वास्तविक त्यावेळच्या माझ्या वयाचा आणि आधीच घाबरलेल्या मनस्थितीचा विचार करता मी प्रसंगावधान कसे राखू शकले याचे मला आजही नवल वाटतं. पण त्या क्षणी मी,न घाबरता त्या मारणार्‍या अधिकाऱ्याचा दणकट हात जोरात पकडला आणि जितक्या जोरात मला बोलता येईल तितक्या उच्च स्वरात मी त्याला म्हटलं “छोड दो उसे. मारो मत.आप क्या कर रहे है? ये कोई गुंडा नही है. ये मेरे लिए भाई जैसा है .उसने मेरी सहाय्यता की है,जान बचायी है.”

तरीही हे त्यांना लगेचच पटलं नाही त्यांना पटवण्यासाठी सगळी हकीकत.. आम्ही टुरिस्ट असल्यापासून ते गुलाम महम्मद आमच्या हाऊसबोटीचा मालक असल्यापर्यंतचा आणि त्यावेळी घडलेल्या घटनेचा सविस्तर वृत्तांत मी जेव्हा माझ्या अत्यंत भेसळ, मोडक्या तोडक्या हिंदीत सांगितला तेव्हा त्यांनी काहीसे नाईलाजानेच पण गुलाम मोहम्मदला अखेर सोडले.

गुलाम महम्मदची मी कशी माफी मागू, कसे आभार मानू मला काहीही समजत नव्हतं पण त्याने मात्र मला व्यवस्थित सांभाळून “गुलमर्गला” आणले. माझे सारे तेरा जिवलग अत्यंत चिंतेत होते. मला पाहून सर्वांना एकदम “हुश्श” वाटले, ताईने, छुंदाने लहानग्या  उषा निशाने(माझ्या बहिणी) मला धावत येऊन घट्ट मिठी मारली. रंजनने (माझा मावस भाऊ) मात्र त्याही क्षणी नेहमीप्रमाणे मला “मूर्ख, बावळट, अतिशहाणी” असेही बोलून घेतले. प्रत्येकाची प्रतिक्रिया काहीही असेल पण या सगळ्यांचा आपल्यावर किती जीव आहे हेच त्या क्षणी जाणवलं आणि माझा रक्षक एक मुस्लिम युवक गुलाम मोहम्मद हे सगळं अगदी मनापासून एन्जॉय करत होता. बाकी घडलेली सगळी कहाणी सर्वांना हळूहळू सांगितली तेव्हा भाईनी गुलाम मोहम्मदला प्रेमाने जवळ घेतले.त्याला बक्षीसीही दिली.

त्यानंतरची आमची संपूर्ण सफर अगदी सुखात,निर्विघ्नपणे पार पडली हे सांगणे नकोच.

आज जेव्हा मागे वळून या प्रसंगाकडे मी पाहते तेव्हा वाटते कोण हिंदू कोण मुस्लिम?

कोणता धर्म कोणती जात?

त्यादिवशी काहीही घडू शकलं असतं. मी दरीत कोसळले असते तर? गुलाम मोहम्मद आलाच नसता तर किंवा खरोखरच त्याची बुद्धी फिरली असती तर? पण माथ्यावरचं विस्तीर्ण आकाश, उंच उंच वाढलेली ती दाट पर्णभार असलेली सुरुची झाडे, सभोवतालची हिमशिखरे आणि या साऱ्यांमध्ये कुठेतरी ईश्वरी लहरींचे, ईश्वरी शक्तीचे अस्तित्व  ज्यांनी माझे सर्वतोपरी रक्षण केले! आजही याच शक्तीला मी विनम्रपणे वंदन करते.

नकळतपणे पिसाळलेल्या,दहशतवादी समूहात हरवलेला गुलाम महम्मदचा चेहराही शोधत राहते.

– क्रमशः भाग ७५ 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मसालेभात…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “मसालेभात…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आमचा त्या दिवशीचा शाखेतला खेळ होता मसालेभात .

काय म्हणता..

ही तर खायची गोष्ट आहे..

हो खरंच खायचीच गोष्ट..

 

पण त्याचा कसा खेळ होतो ते सांगते .गोल करून सर्वांनी उभं राहायचं  एकीने म्हणायचं मसालेभात… दुसरीने म्हणायचं मी नाही खात… तिसऱीने विचारायचं ..

का नाही खात? चौथीने त्याचे तिला वाटेल ते उत्तर द्यायचं. अर्थात हा सगळा पटापट बोलून खेळला जाणारा खेळ. 

उत्तर येणार नाही ती बाद.

चमचमीत विषय…

मसालेभातानी भरलेलं ताटच सामोर आलं…

आता तो का नाही खात?

याच कारण एक एक जण सांगायला लागली. पहिली तीन वाक्य पटकन म्हणून होतात.. चौथीला  उत्तर तयार ठेवून सांगायचं होतं.

 

अर्थात हा स्वयंपाकातला विषय .. तिथे तर आमचंच राज्य ..आणि हे राज्य फुकट दिलं तरी कोणी घेणार नाही म्हणा

 – – तर काय सांगत होते… मसालेभात

अनेक वेळा केलेला .त्यामुळे हसत हसत लगेच उत्तरं येत होती .मटार नाही त्यात, गाजर नाही त्यात, फ्लॉवर नाही त्यात,  हे सांगता सांगता सांगता…

मीठ ,हिंग ,जिरे ,शहाजिरे ,दालचिनी, लवंग ,वेलदोडे, कोथिंबीर, खोबरं हे सगळं सांगून झालं …

आता फक्त तांदूळच तेवढे राहिले होते ….

मग खेळ खेळता खेळता एक एक जण बाद होत गेली. शेवटी दोघीच राहिल्या. का नाही खात? याला उत्तर देताना त्यातली एकजण म्हणाली, 

” भूक नाही मला आज”

दुसरीला काही सुचलंच नाही .पहिली त्या.खेळात जिंकली .खेळ संपला.

 ” अरे वा किती छान उत्तर तुला  सुचलं.. “म्हणून तिच मी कौतुक केलं.

 

घरी आले. विचार केला. हा काय बर खेळ असेल…

तेव्हा लक्षात आलं की आम्ही सर्वांनी फक्त मसालेभातावरच लक्ष केंद्रित केलं होतं. त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे… 

‘आऊट ऑफ द बॉक्स’…जाऊन  त्याचा संपूर्ण परिस्थितीजन्य वेगळा ही अर्थ असू शकतो हे लक्षातच घेतलं नव्हतं .

मी का खाल्ला नाही येतला ” मी ”  चा विचारच केला गेला नव्हता. संपूर्णपणे एकांगी विचार करून आम्ही  मसालेभातालाच दूषणं देत होतो. आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे त्याला ट्रोल करत होतो आणि त्याची गंमतही घेत होतो….

 

मला आज नको, माझा खायचा मूड नाही, नंतर खाईन, आत्ता वेळ नाही.. असे अनेक पर्याय मला घरी आल्यावर सुचायला लागले.

समजा त्याच वेळेस ही उत्तरें दिली असती तर कदाचित खेळच बदलला असता….

 

म्हणजे आपल्यासमोर एखादी गोष्ट चुकीची आहे हे दहा वेळा दहा जण सांगायला लागले की आपल्यालाही ती तशीच वाटते .आपणही त्यातले न्यून काय आहे हे हुडकायला लागतो.

 

संदर्भ लक्षात आला का?

असं आपल्या आसपास कुठे घडत आहे  का ?…बघा बरं तपासून…

सध्य:स्थितीत कोण आपली दिशाभूल तर करत नाही ना..

याचा विचार करावा लागेल.

एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू आपल्या समोर येतच नाही असं तर होत नाही ना…

असत्याला आपण सत्य मानत आहोत का?

त्यादिवशी आम्ही अगदी छोट्या शहाजीऱ्यालाही दोष दिला होता…

तसं तर आपलं होत नाहीये ना?

तंत्रज्ञानाचा अतिरेक झाल्याने या  समाज माध्यमांचा ऊपयोग करून आपल्यावर माहितीचा भडीमार होत आहे…. या सगळ्या गोंधळात नकळत आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत का? 

“सावज ” म्हणून कोणी आपल्याला गळाला लावत आहे का? याचा सावधपणे विचार करणे गरजेचे आहे.

 

मात्र यासाठी जे घडतय ते चुकीचं आहे हे सांगणारं …. योग्य कुणीतरी … मार्गदर्शन करणार हवं आहे . त्यांच्याशी आपला  संपर्क आणि संवाद हवा आहे .नाहीतर आपण अविवेकाच्या लाटेत वाहत जाऊ.

 

आपलं हित कशात आहे हे आता राष्ट्र सेविका समितीत जाऊन थोडे  कळायला लागलेले आहे. आम्ही आपल्याच नादात होतो. पण तिथे गेल्यापासून आसपास काय चाललेलं आहे याचा आम्ही… निदान विचार करायला लागलो आहोत.

हळूहळू  सुधारणा होत आहे. समितीत शिकवलेल्या एका गीतातल्या या चार ओळी..

” गलत मत कदम उठाओ

 सोच कर चलो विचार कर चलो

 राह की मुसीबतोंको पार कर चलो” 

 

मुसिबतें कौन सी है..

हमे मालूम है..

फिर विचार तो करना ही पडेगा…

सोच लो …

अरे हो…एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे शाखेतल्या खेळातला ” मसालेभात ” ही फक्त ” खायची “गोष्ट नव्हती…

हे तुमच्या लक्षात आलं ना….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “राणी मा गाईदन्ल्यू…” ☆ सौ शोभा जोशी ☆

सौ शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “राणी मा गाईदन्ल्यू…” ☆ सौ शोभा जोशी

आपल्या निःस्वार्थ कर्माने दुसर्‍याच्या मनात सदैव घर करून जगणे हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे. अशी कमाई करणारे आपल्या देशात असंख्य लोक आहेत. अगदी जनजातीत सुध्दा. त्यापैकीच एक आहेत राणी मा गाईदन्ल्यू.

भारताच्या उत्तर पूर्वेकडचा भाग पूर्वांचल या नावाने प्रसिध्द आहे. या भागात असणार्‍या सात राज्यांना ‘ सेव्हन सिस्टर्स ‘असही म्हटलं जातं.

बर्फाचे डोंगर, दर्‍या, नद्या, धबधबे, झाडी, दरीत पसरलेले धुके, धुके घेत असलेले विविध आकार अशा नैसर्गिक सौंदर्यानी ही राज्ये नटलेली आहेत.

या सात राज्यांपैकी मणीपूर राज्यात, उहूसैन व मकरू या नद्यांमध्ये काला नागा पर्वतांची रांग आहे. या रांगांमध्ये नागा नावाची जनजाती राहाते. तेथील लंकोवा गावामध्ये २६ जानेवारी १९१५ ला गाईदन्ल्यू यांचा जन्म झाला. त्यांच्या वडीलांचे नाव लोथोनाग व आईचे नाव करोतलीन्ल्यू होते. सात बहिणी आणि एक भाऊ असा त्यांचा मोठा परिवार होता. गाईदन्ल्यूचा अर्थ चांगला मार्ग दाखवणारी. ‘ मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ‘ अशी आपल्याकडे म्हण आहे. गाईदन्ल्यू लहानपणापासूनच स्वतंत्र विचारांच्या, दृढ इच्छाशक्ती असलेल्या, प्रतिभासंपन्न, आणि चिंतनशील होत्या. गल्लीतील मुलांमध्ये त्या जास्त हुशार, समजदार आणि तीक्ष्ण बुध्दीच्या होत्या. लहानपणापासूनच इंग्रजांचे अत्याचार त्या पाहात होत्या. आपल्या संस्कृतीवर, धर्मावर होणारं ख्रिस्तींचं आक्रमण त्या पाहात होत्या. म्हणून आपल्या संस्कृतीचं, धर्माचं इंग्रजांपासून रक्षण करणं, रूढी, परंपरा टिकवून ठेवणं, अंधश्रध्दा दूर करणं तसंच इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावणं हे ध्येय त्यांनी उराशी बाळगलं होतं.

त्यांचा चुलत भाऊ हैपोउ जादोनांग हा त्यांच्यापेक्षा १० वर्षांनी मोठा होता. त्यानं ‘ हेरका ‘ हे धार्मिक आंदोलन सुरू केलं होतं. त्या धार्मिक आंदोलनाचा प्रभाव गाईदन्ल्यूंवर पडला. हे धार्मिक आंदोलन हळू हळू स्वतंत्रता आंदोलनाकडे झुकलं. इंग्रजांनी हे धार्मिक आंदोलन मोडून काढण्यासाठी १९३१ मध्ये जादोनांगला कैद केलं. त्याच्यावर खटला चालवून २० आॅगस्ट १९३१ ला त्याला फाशी दिले.

त्याच्या मृत्यूनंतर आंदोलनाची सूत्रं वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी गाईदन्ल्यू यांच्याकडे आली आणि लहान वयातच त्यांनी इंग्रजांविरूध्द लढा द्यायला सुरूवात केली. त्या खूप आक्रमक झाल्या. ‘ हम आजाद लोग है। गोरे हमपर राज नही कर सकते।’ अशी त्यांनी घोषणा दिली.

त्यांनी जेमी आणि रोंगमै नागा या जनजातींना एकत्र केले. या जनजाती पुढे जेलियांगरांग हराका नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. स्थानिक लोकांना आंदोलनात ओढण्यासाठी त्यांनी, इंग्रजांना टॅक्स देऊ नका असं लोकांना सांगितले. इंग्रजांच्या जाचाला लोकही कंटाळले होते. त्यांनी त्यांचा सल्ला मानून टॅक्स देणं बंद केलं. इंग्रज भडकले. त्यांनी लोकांवर कारवाई सुरू केली. गाईदन्ल्यू आपल्या साथीदारांसह भूमीगत राहून इंग्रजांवर हल्ले करत राहिल्या. आणि त्यांना भीतीच्या छायेत ठेवले. त्यांच्या या गनिमी काव्याच्या लढाईने इंग्रज जेरीस आले. त्यांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला होता. काय करावे इंग्रजांना समजेना. त्यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या पण त्या हाती लागल्या नाहीत. इंग्रजांनी त्यांना पकडून देणार्‍याला २००/- रू. चं आणि नंतर ५००/- रू. बक्षीस जाहीर केलं, त्यांची माहिती देणार्‍याचा कर १० वर्षं माफ केला जाईल अशीही लालूच दाखवली. पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यावेळी गाईदन्ल्यूंचं वय अवघं १६ वर्षांचं होतं. त्यांच्या या लढ्याचा प्रभाव, आसाम, मणिपूर, नागालॅंड या राज्यांवरही होता.

१६ फेब्रुवारी १९३२ रोजी आसाम रायफल्सच्या सैनिकांबरोबर त्यांची लढाई झाली. पण त्यावेळीही इंग्रजांना त्यांना पकडता आले नाही. या लढाईला ‘ हैग्रम की लढाई ‘ असं म्हणतात.

नंतर त्या पोलोमी गावी गेल्या. आपल्या साथीदारांसह त्यांनी तिथं आऊट पोस्ट बनवायला सुरूवात केली. त्याची कुणकुण इंग्रजांना लागली. त्यांनी मोठं सैन्य पाठवून त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला अनपेक्षित असल्यानं आणि त्या दुसर्‍या कामात गुंतलेल्या असल्यानं बेसावध होत्या. लढाईच्या तयारीत नव्हत्या. त्यामुळं त्या पकडल्या गेल्या. त्यांना कोहिमाला पाठवलं गेलं. त्यांना तुरूंगवासाची शिक्षा झाली. त्यांनी १४ वर्षं तुरूंगवास भोगला. या १४ वर्षांत त्यांना अनेकदा निरनिराळ्या तुरूंगात हलवण्यात आलं.

१९३७ मध्ये पं. नेहरूंना त्यांचा पराक्रम कळला. त्यांनी शिलाॅंगच्या तुरूंगात त्यांची भेट घेतली. ‘आपण तर नागांच्या राणी आहात ‘ असं म्हणून त्यांनी त्यांचा गौरव केला. नेहरूंनी, गाईदन्ल्यूंची तुरूंगातून सुटका करावी अशी मागणी इंग्रजांकडे केली. परंतु इंग्रजांनी ती धुडकावून लावली. कारण त्यांना सोडलं तर त्या पुन्हा उठाव करतील अशी भीती इंग्रजांना होती.

स्वातंत्र्यानंतर त्यांची तुरूंगातून सुटका झाली. सूर्याला जरी तात्पुरतं ग्रहण लागलं तरी तो कायमचा निस्तेज थोडाच होतो! त्या पुन्हा झळाळून उठल्या. त्यांनी समाजकार्याला वाहून घेतलं. शेवटपर्यंत त्या राष्ट्रहिताकरता संघर्ष करत राहिल्या. आपल्या स्वातंत्र्याच्या रजत जयंतीला त्यांना ताम्रपट देऊन गौरविण्यात आलं. हा सन्मान मिळवणार्‍या त्या एकमेव महिला होत्या. १९८२ ला पद्मभूषण देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं.

१८८५ साली झालेल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या भिलाई येथील पहिल्या महिला संमेलनास त्यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी महिलांना आवाहन केलं की, आपण देशाचे, धर्माचे, भारतीय संस्कृतीचे, आमच्या अस्तित्वाचे रक्षण करावे. मी कधीही धर्म बदलणार नाही, विदेशी होणार नाही. कारण मी हिंदू आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. असं प्रत्येक महिलेनी ठरवलं पाहिजे. अशा या निस्सीम देशभक्त, प्रखर हिंदूधर्माभिमानी, पराक्रमी, निष्ठावान, संस्कृतीरक्षक, समाज हिताचे रक्षण करणार्‍या गाईदन्ल्यूंना १७ फेब्रुवारी १९९३ रोजी देवाज्ञा झाली.

त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारत सरकारने एक टपाल तिकिट काढले. वनवासी कल्याण आश्रमाने सुध्दा, त्यांचे देशासाठीचे योगदान लक्षात घेऊन त्यांचे चरित्र संपूर्ण देशभर प्रसारित केले. २०१४ ते २०१५ हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमातर्फे २६ जानेवारी हा दिवस ‘ नारी शक्ती दिवस ‘ म्हणून साजरा करण्यात येतो. या वीरांगनेच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

माहिती संग्रहिका व लेखिका :  सौ शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्वासांत श्वास गुंफताना ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “श्वासांत श्वास गुंफताना !” ☆ श्री संभाजी बबन गायके

या जगात तिने पहिले पाऊल टाकले खरे, पण प्रवासच एवढा लांबला होता की तिची गात्रे अगदी थकून गेली होती. माणसं जगात आणू शकतील, पण श्वास तर आपला आपणच घ्यायचा असतो ना! आणि तिला तोच नेमका घेता येत नव्हता…किंबहुना तिने पहिला श्वासच घेतला नव्हता!

तिचं इवलंसं सर्वांग रक्तानं माखलेलं होतं. 

एखाद्या प्राण्याचं पिलू असती, त्यातल्या त्यात गाय हरणा मांजराच्या पोटी जन्माला आली असती तर तिच्या त्या मातांनी तिचं अंग चाटून तरी घेतलं असतं…पण ती मनुष्याच्या पोटी निपजली होती! 

तिच्या जन्माच्या मुहूर्त खरं तर नको इतका लांबला होता..आई बिचारी कळा तरी देऊन देऊन किती देणार? पण सृजनाच्या,नवनिर्मितीच्या या सोहळ्यात निसर्ग इतर कुणालाही ढवळाढवळ कशी ती करू देत नाही! 

ती जगात प्रवेशली तेंव्हा जिवंतपणाचं कोणतंही लक्षण दिसत नव्हतं. पण ज्या हातांनी तिला पहिल्यांदा हातात पेललं…त्या हातांना लगेच समजलं….या मातीत श्वास पेरावे लागतील अन्यथा काहीच क्षणांत देह माती होऊन जाईल, हे निश्चित!

तिने त्वरित बाळाच्या देहाला मुखावाटे प्राणवायू देण्याची प्रकिया आरंभली…पण आज ती यंत्रणाच जणू मरून गेलेली होती. 

तिने क्षणाचाही विलंब न करता तिचे ओठ त्या कळीच्या ओठांवर घट्ट रेखले आणि ये हृदयीचे श्वास ते हृदयी पोहोचू लागले. वासरू गायीच्या आचळांशी झटताना पाहिलं असेल जगाने…पण आज श्वासंचे दुग्धपान करण्याचा जिवापाड प्रयत्न एक वासरू करीत होतं.

सात जन्म असतात,सात समुद्र असतात,सात पाताळे असतात,सप्त नद्या पवित्र असतात…त्याच धर्तीवर तिला या जगात परत येण्यास सात मिनिटे लागली!

रुदन हे खरं तर दुःखाची वेदनेची अभिव्यक्ती असते. पण तिच्या रूदनाने आनंदाच्या लहरी उफाणल्या.

जिने श्वास घेतला तिची ही पहिलीच वेळ..पण जिने श्वास दिले तिच्यासाठी ही कितवी वेळ हेही तिला आठवत नाही. यावेळी तिची ही कृती चित्रित झाली! त्यामुळे तिचा जीवनदायिनी अवतार जगाला समजला! पण 

हे तर तिचं कामच,कर्तव्यच होतं असाही विचार होऊ शकतो. पण तसं नाही हे…यंत्र हात टेकते, हतबलता मन व्यापून टाकते त्यावेळी ही अशी कृती आभाळा एवढ्या पराक्रमासारखी भासते..नव्हे असतेच.

आग्रा शहराजवळच्या इतमदपूर येथील CHC (community health centre) येथील शासकीय रुग्णालयात ‘खुशबू’ जन्माला आली ते जणू मृतावस्थेतच. तेथे कर्तव्यावर असलेल्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेखा सुरुसे चौधरी यांनी खुशबू वर तातडीने उपचार सुरू केले. प्राणवायू पुरवणारी Ambu Bag, ऑक्सिजन सिलेंडर ही स्वयंचलित यंत्रणा काही तांत्रिक बिघाडामुळे काम करेनाशी झाली. अशा परिस्थितीत एक एक क्षण महत्वाचा असल्याने डॉक्टर चौधरी यांनी त्वरित CPR प्रक्रिया सुरू केली…mouth to mouth resucitation केले! या प्रक्रियेत रुग्णाच्या तोंडात आपल्या तोंडाने हवा फुंकावी लागते. या घटनेत बाळ अत्यंत अस्वच्छ होतं….पण त्याची पर्वा न करता डॉक्टर सुरेखा यांनी सात मिनिटांत बाळाच्या शरीरात प्राणवायू भरला… आणि खुशबू मृत्यूच्या गुहेतून परतली! बाळ रडते आहे आणि डॉक्टर हसत आहेत… हे चित्र जगातले सर्वांत गोड चित्र असेल!

२०२२ मध्ये ही घटना घडून गेली आहे. डॉक्टर चौधरी यांनी अशा प्रकारे अनेक बाळांना जीवदान दिले आहे,असे तेथील मुख्य वैद्यकीय अधिकारी सांगतात! डॉक्टर चौधरी यांच्या या कर्तव्यनिष्ठेचे,व्यावसायिक कुशलतेने स्थानिक पातळीवर कौतुक झाले होते.

ही बातमी माझ्या नुकतीच पाहण्यात आली. ही सकारात्मक गोष्ट तुम्हांला समजावी म्हणून हे लिहिले. डॉक्टर्स प्राणरक्षक असतात… हे ध्यानात घेतले पाहिजे. अपवादांची चर्चा जास्तच होते….पण नियम सिद्ध होतो म्हणून अपवाद सांगण्यात काय अर्थ?

यानिमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील परोपकारी बंधू भगिनींना वंदन !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘ताटासमोरची शांत कृतज्ञता…’ – लेखिका: श्रीमती शुभश्री ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘ताटासमोरची शांत कृतज्ञता…’ – लेखिका: श्रीमती शुभश्री ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

भारतीय संस्कृतीत जेवण म्हणजे केवळ पोट भरण्याचे साधन नसून तो एक संस्कार मानला जातो.

म्हणूनच जेवणापूर्वी  “दासबोध”मध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला खालील श्लोक म्हटला जातो.

“वदनी कवळ घेता नाम  घ्या श्रीहरीचे।

सहज हवन होते नाम घेता फुकाचे ॥

जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह ।

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥”

या काही ओळींमध्ये केवळ देवाचे स्मरण नसते. तर अन्नासाठी, त्यामागील श्रमासाठी आणि मिळालेल्या समाधानासाठी कृतज्ञता दडलेली असते. मग असे अन्न खाताना अहंकार भाव नसतो. कारण ते आपल्या कष्टाचे असले तरी ते ईश्वरकृपेने मिळालेले असते. त्यात ईश्वराचा वास व देवपूजेसारखे पुण्यकर्म असते. असे श्रद्धेने,योग्य भावनेने केलेले जेवण म्हणजेच यज्ञ होय.

अशी प्रार्थना करण्याची आपली परंपरा आहे.मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात आणि मोबाईलमध्ये गुंतलेल्या आयुष्यात ही प्रार्थना हळूहळू विस्मरणात जात आहे.

परदेशात राहत असताना, एके दिवशी अगदी सहजपणे माझ्या नजरेत एक साधंसं दृश्य आलं. आणि माझ्या मनात ते खोलवर रुतून बसलं. माझी कामवाली (मेड) जेवणाच्या प्लेटसमोर बसली होती. तिचे डोळे मिटले होते. आणि ती ओठाने हलकेच पुटपुटत होती. सभोवतालच्या गडबडीतही तिच्याभोवती शांततेचं एक वलय होतं.

जेवणानंतर मी तिला विचारलं. तेव्हा ती सहजपणे म्हणाली, “Madam, We are praying for and believing in one God in heaven “ (“मी प्रार्थना करत होती.”)

मला थोडं आश्चर्यच वाटलं. पुढे ती म्हणाली की, त्यांच्या संस्कृतीत जेवणापूर्वी देवाचे आभार मानण्याची पद्धत आहे. अर्थात,तिने ती प्रार्थना तिच्या स्थानिक भाषेत केली होती. पण नंतर तिने मला तिचा अर्थ इंग्रजीत सांगितला. खरेतर तिच्या प्रार्थनेचे शब्द साधे पण अर्थ विलक्षण खोल विचार करायला लावणारा होता. ती म्हणाली, “आम्ही अगोदर देवाचे आभार मानतो. कारण त्याच्या कृपेने मला आज हे अन्न मिळाले. आणि त्याच्याच बरोबर तुमचेही आभार मानतो. कारण तुम्ही ते मला दिले. त्यामुळेच मी आज तृप्तपणे खाऊ शकते आहे.आणि त्यासाठी तुम्हाला सदैव सुख शांती लाभो, अशीही मी देवाकडे प्रार्थना करते. थोडक्यात काय, ‘अन्न दाता सुखी भव।’”

म्हणजेच प्रार्थना शब्दात नसते.

ती भावनेत असते. ती देवळात नाही तर ताटासमोरही करायची असते.

आणि त्याच क्षणी मला प्रकर्षाने जाणवलं, प्रार्थना ही भाषा, देश किंवा संस्कृतीत अडकलेली नसते. आपल्यापेक्षा वेगळ्या देशात, वेगळ्या संस्कृतीतील एक साधी स्त्री अन्नाप्रती इतकी कृतज्ञता व्यक्त करते,की जी कृतज्ञता आपण विसरत चाललो आहोत. तीच कृतज्ञता एका परक्या देशात अजूनही श्वास घेताना पाहत होते.

कदाचित पुन्हा एकदा आपल्याला हे असंच जेवणापूर्वी थोडं थांबायला हवं. ताटाकडे पाहून क्षणभर डोळे मिटून शब्दाशिवाय “धन्यवाद” म्हणायला हवेत. कारण ‘अन्न पोट भरतं.’

पण ‘कृतज्ञता माणूसपण जिवंत ठेवते.’

*

लेखिका: श्रीमती शुभश्री

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लोक म्हणतात… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ लोक म्हणतात… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

लोक म्हणतात, हे कर… ते कर, ‘असं कर… तसं कर,,, ‘

‘हे करू नको… ते करू नको… ‘आमचं ऐक… कल्याण होईल. ‘

आपण त्यांचं ऐकून घ्यायचं, पण आपल्याला हवं तेच करायचं.

कधी चूक होईल. निर्णय चुकतील. लोक म्हणतील

‘आम्ही म्हंटलं नव्हतं तेव्हा… ’

हेही आपण ऐकून घ्यायचं.

हो… हो… म्हणत राह्यचं. पण निर्णय चुकला म्हणून उदास, निराश व्हायचं नसत.

दु:ख होईल. कष्ट त्रास सोसावे लागतील. सोसूयात, पण पुढे पुढे जात राहू या. चुका होतील,

पण, त्यातून नवीन काही

शिकायला मिळेल. आत्मविश्वास वाढेल. अनुभव येतील, तशा चुका कमी होतील यशोकंद हाती येईल. आनंदी आनंद होईल. रामदासांचे म्हणणं

मनावर कोरायचं. ऐकावे जनाचे, करावे मनाचे मग वाटचाल ठाम होईल.

यशोमार्गी घेऊन जाईल

—–

कळतं पण वळत नाही.

आयुष्य : एक प्रवास. करायचा बिनधास्त. कळतँ, समजतं, माहीत असतं, पण कृतीत काही उतरत नाही. कळतं पण वळत नाही.

रोज रात्री झोपताना ठरवते, वादे वादे जायते तत्वबोध: तत्वबोध: कुठले?

जायते कंठशोष: म्हणून मग ठरवते, ‘ त्यांना एकट्यांनाच बोलू द्यायचे. उत्तर मुळी द्यायचेच नाही. मग कसे होतील वाद? एका हाताने टाळी मुळी वाजतच नाही.

पण रात्रीचे सगळे सकाळी विसरते. उठल्यापासून बोलाचाली सुरू होते.

किती तरी वेळ वाद मुळी थांबतच नाही. कळतं, पण मुळी वळतच नाही.

मुले आणि हे घरभर पसारा करतात. माझ्या डोक्याच्या शिरा तडतडतात.

मी बोल बोल बोलते. कळतं याचा काही उपयोग नाही. पसारा आवरल्याशिवाय गत्यंतर नाही. कळतं सारं, पण बोलल्याशिवाय रहावत नाही. ‘ कळतं, पण वळत नाही.

हे म्हणतात, ‘एकमत असेल, तर तुझ्या मताप्रमाणे. दुमत असेल, तर माझ्या ‘

मी म्हणते, ‘ एकमत असेल, तर तूमच्या मताप्रमाणे. दुमत असेल तर माझ्या

हीच गुरुकिल्ली सुखी सहजीवनाची. लक्षात ठेवायचं, विसरायचा नाही. ‘

आमच्या यांना कळतं, पण वळतच नाही.

 कामवाली उशिरा आली तर…. न सांगता रजेवर राहिली तर, रागावायचं नाही.

‘काम नीट कर. भांडी नीट विसळ. धुणं घट्ट पीळ. ’ म्हणायचं नाही.

‘तुम्हीच करा मग वैनी’ म्हणाली तर मनावर घ्यायचं नाही. कळतं सगळं, पण वळत नाही.

 आरोग्यासाठी हवा योगा आणि व्यायाम. रोज जायचं फिरायला नको नुसता आराम’. नको नुसत्या टीव्ही, सीरिअल्स, नको नुसते गाणे

व्हाट्स अप मध्ये डोके घालून नको नुसते बसणे

सगळं सगळळं कळतं आहे. पण वळत मुळीच नाही. कुत्र्याचे शेपूट वाकडे झाल्याशिवाय रहात नाही.

 मुले-नातवंडे मोठी झाली. कामासाठी बाहेर जाऊ लागली.

कधी उशिरा घरी येऊ लागली. ‘का रे झाला उशीर? ‘ विचारायचं नाही.

‘निदान फोन तरी करायचास! ‘ म्हणायचं नाही.

 ‘आम्हाला आमचं कळतं ‘ त्यांचं उत्तर असतं.

आपण खंतावायचं नाही. ‘चिंता, काळजी वाटते’, म्हणायचं नाही.

सारं सारं कळतं, पण वळत नाही. वळत नाही.

© सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares