मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भरून हे आले नभ… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ भरून हे आले नभ… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

भरून हे आले नभ सावळे सावळे

टपटप पडतात मोती नि पोवळे

किरणात चमकती मोतियांच्या माळा

थुईथुई नाचतो हो पिसाऱ्यात डोळा…

*

सावळीच तनू तुझी सावळाच रंग

करू नको समाधी तू माझी पहा भंग

मोत्यासम चमकती तुझ्या दंतपंक्ती

मोरासम चमकती पहा तुझे रंग…

*

नभावाणी कुंतल ते सावळे करडे

काजळ तू घालू नको मोह नको गडे

चमकते विज अंगी पाहताच तुला

सुंदर तू आहे किती मला पडे कोडे…

*

चपळ तू आहे वीज नभात कडाडे

हालतात क्षणातच ढगांची बिऱ्हाडे

पांगापांग होई सारी नभ होई निळे

सावळीशी प्रभा तुझी नभात मग पडे…

*

तुझ्याकडे पहावे की नभाकडे पाहू

वेड लागे नभालाही वाटे इथे राहू

होतो काळाकरडा नि बघत राहतो

आरशात नभाच्या तो तुलाच पाहतो..

© प्रा.सौ.सुमती पवार 

नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – svpawar6249@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अमृत गारवा… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ अमृत गारवा… ☆ प्रा. भरत खैरकर 

देही यौवन दाटले

तुडुंबली आत आग

कसा वेडा तू सजना

रात्र तरी पुरी जाग!

*

फुटे देहाच्या डहाळी

कंच हिरव्या असोशी

माथ्यावरचे आभाळ

तुझी पहाते कसोटी!

*

घे रे वेढूनी हा देह

शिंप अमृत गारवा

ह्या क्षणाला फुटू दे

एक अंकुर हिरवा!

 

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हरसिंगारी तू फुलवंती (रातराणी) ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हरसिंगारी तू फुलवंती (रातराणी) ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वृत्त : नववधू… ध्रुवपद दोन चरण 2+8+6=16, अंतऱ्याचे पहिले तीन चरण 8+8=16, अंतऱ्याचे मेळाचे चरण 2+8+6=16) 

ती कलिका झाली धुंद अशी

अन् सलगी करते वाऱ्याशी ||ध्रु||

*
चमचमणारे गगनी तारे

धरणी वरती आले सारे 

वेलीवरती दिसती न्यारे

ही कोमल सुमने तमनाशी

अन् सलगी करती वाऱ्याशी ||1||

*
श्वेत चांदणी लखलखणारी

सुवर्ण भासे चमचमणारी 

जग धुंद होय अवतीभवती

 मन माझे धावे तुजपाशी

अन् सलगी करते वाऱ्याशी ||2||

*
संध्याराणी तव् सांगांती

तुझ्या रुपाची गाणे गाती

हरसिंगारी तू फुलवंती

चांदणी फूल तू वैद्य जशी

अन् सलगी करती वाऱ्याशी ||3||

*

रातराणीस या पुसू कसे

कुपी सुगंधी बघ तुझ्यातसे

सौंदर्याचे तव् गमक असे

गुज खोल तुझे माझ्यापाशी 

अन् सलगी करते वाऱ्याशी ||4||

*

मी मुग्ध जाहले तुझ्या परी 

हरितामधली तू सोनपरी

मम् कवने सजली तुझ्यावरी

तव् नाते जुळले शब्दाशी

अन् सलगी करते वाऱ्याशी ||5||

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ भरलेले ताट… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? भरलेले ताट… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

साग्रसंगीत स्वयंपाक झाला 

ताट भरले काठोकाठ 

ग. दि. मा आणि संकर्षणच्या

कविता आठवल्या पाठोपाठ 

*
पण मला मात्र असे ताट पाहून 

सगळ्यांपेक्षा जरा वेगळेच वाटले 

उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म 

.. ओठी आले ||

*
जठराच्या यज्ञासाठीच्या समिधा 

तुपात न्हाऊन सजलेल्या 

वेगवेगळ्या पदार्थांची 

आहुती होऊन आलेल्या ||

*
मीठ चटणी लोणचं कोशिंबीर रायते 

जठराग्नी चेतवण्या आले आयते ||

पापड पापड्या कुरोड्या तळलेले 

प्रज्वलीत ते कुंड जाहले ||

*

साधं वरण भात तूप लिंबाने 

अग्निवरती प्रोक्षण केले 

पोळी भाजी वांग उसळ 

जिव्हा चमच्याने यज्ञ मुखी घातले ||

*
पवित्र अशा या समिधांनी 

अग्नी देवतेस उत्तेजित केले 

चविष्ट वडे भजी वड्यांनी 

त्यास संतुष्ट केले ||

*

आमटी कालवणाच्या गुणांनी 

देवतेचे मन भारून गेले 

शेवटची समिधा मिष्टानाची 

देवता जीवास तृप्त केले ||

*

पियुशाचा मुखवास मिळता 

ढेकर देऊन आशिर्वाद दिले 

अन्नपूर्णा सुखीभव,

अन्नदात्याचे कल्याण होवो म्हटले||

*

असे षड्रस युक्त जेवण मिळता 

आरोग्य चांगले लाभणार 

आरोग्यम धनसंपदा 

त्या घरी नांदणार ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २८९ ☆ पसारा… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २८९ ?

☆ पसारा… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

कसा सांग हा सावरावा पसारा,

किती काळ मी वागवावा पसारा!

*

कशा स्वच्छ होतील सांदी फटीही,

कळेना कसा घालवावा पसारा !

*

पदर खोचुनी काम जाते कराया,

परी वाटते बाळगावा पसारा !

*

इथे अंगवळणी पडावे कसे हे,

जुना जाणता हाकलावा पसारा ?

*

असे वेंधळेपण सदासर्वदाही,

कुणी का असा लांबवावा पसारा !

*

दिवाळीस जातोय माळ्यावरी अन्

पुन्हा वाटते साठवावा पसारा!

*

घराला मुभा मुक्त संचारण्याची,

कसाही कुणी पांघरावा पसारा !

*

कुणा शल्य सांगू जिवीच्या जिवाचे ?

‘प्रभा’ वाटते आवरावा पसारा !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मराठीची खंत.. ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ मराठीची खंत.. ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

अभिजात मी मराठी

ज्ञानेशाची मी जननी

अमृताते पैजा जिंके

माधुर्याची मी अवनी ||

*

शारदेची मी तनया

बाकी भाषांची भगिनी

मावशांसाठी व्हा प्रेमळ

का जाता मज त्यजूनी||

*

केले साबीत स्वतःला

तरी का अवहेलना

बोलताना ही मराठी

कमीपणा वाटे जना||

*

कारण ते खजिलतेचे

मी नसावे वाटे मना

हर मातेचे हे विचार

माझ्या बछड्यांनो जाणा||

*

दुसऱ्या भाषांची सक्ती

जेव्हा करता ना तुम्ही

मनातूनी मज वाटे

धाडले हो वृद्धाश्रमी||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ म्हातारपणा..  कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री अनंत केळकर ☆ ☆

? वाचताना वेचलेले ?

 ☆ म्हातारपणा..  कवी : अज्ञात प्रस्तुती : श्री अनंत केळकर ☆

म्हातारपणाला नाव छान

कोणी म्हणे संन्यासाश्रम

कोणी म्हणतं वानप्रस्थाश्रम

मी म्हणतो आनंदाश्रम

 

म्हातारपणात कसं राहायचं?

घरात असेल तर आश्रमासारखं

आश्रमात असेल तर घरासारखे

कशातच कुठे गुंतायचं नसतं

 

जुन्या आठवणी काढायच्या नाही

‘आमच्या वेळी’ म्हणायचं नाही

अपमान झाला समजायचं नाही

उगाच लांबण लावायची नाही

 

सुखाची भट्टी जमवत जायचं

साऱ्यांशी दोस्ती जुळवत राहायचं

रागलोभाला लांब पळवायचं

आनंद सारखा वाटत जायचं

 

म्हातारपणसुद्धा छान असतं

लेन्स इम्प्लांटने स्वच्छ दिसतं

नव्या दातांनी सहज चावता येतं

कानयंत्राने ऐकू येतं

 

पार्कात जाऊन फिरून यावं

क्लबात जाऊन पत्ते कुटावं

देवळात जाऊन भजन करावं

टीव्हीमधल्या सिरियल बघावं

 

मुलांसमोर गप्प बसावं

नातवंडांशी खेळत राहावं

बायकोबरोबर भांडत जावं

मित्रांबरोबर बोलत सुटावं

 

जमेल तेव्हा टूरवर जावं

बायकोचं लगेज सोबत न्यावं

दिलखुलास फिरून घ्यावं

थकलं तिथेच बसून राहावं

 

लायन रोटरी अटेंड करावं

वेळ असेल तर गाणं गावं

एकांतात ठेक्यावर नाचून घ्यावं

पाहिलं कुणी व्यायाम म्हणावं

 

कंटाळा आला झोपून जावं

जाग आली फेसबुक बघावं

बघता बघता घोरत राहावं

टोकलं कोणी व्हाटस्ऍप उघडावं

 

एकटं घरी किचन पाहावं

दुधाची साय गायब करावं

मुलांचा खाऊ टेस्ट करावं

आलं मनात गोडाचं खावं

 

जुना शर्ट घालत राहावं

थोडे केस सावरत राहावं

आरशालाच बोगस म्हणावं

कोणी नसलं तर वाकुली करावं

 

छान रंगवावी सुरांची मैफील

मस्त जमवावी जेवणाची पंगत

सुरेल जुळवावी गप्पांची संगत

लुटत राहावी जगण्याची गंमत

 

स्वाद घेत,दाद देत

तृप्त मनाने आनंद घेत

हळुच आपण असं निघून जावं

जसं पिकलं पान गळून पडावं

 

कवी : अज्ञात

संग्राहक – श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पौर्णिमा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ पौर्णिमा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

पौर्णिमा येईल तेव्हा चंद्र पूर्णाकार होतो

विश्व सारे शांतवाया अमृताची धार होतो

*

 फार चिंता वाढताना गात गाणे रात जाते

आवसेला वेढणारा रंग काळाशार होतो

*

 रोज दारी चांदण्याची रांग येते सोबतीला

त्या घडीला रोज त्यांचा चांगला सत्कार होतो

*

संकटानी ग्रासले की कोण नसते सोबतीला

आपला निर्धार तेव्हा आपला आधार होतो

*

रीत आहे या जगाची दूरदृष्टी पाळण्याची

काळ पुढचा त्यामुळे तर शेवटी साकार होतो

*

काळजीच्या संगतीने सर्वकाही योग्य होते

धुर्ततेने वागले की चांगला संसार होतो

*

सत्य आहे नित्य येथे चांगल्याला साथ देते

बंध सारे पाळताना नेमका संस्कार होतो

*

तो खरा तर लाच खावू हे कधी कळलेच नाही

घेत जातो देत जातो तोच दावेदार होतो

*

रोज मंत्री ऐतखाऊ बैठकाचा स्वाद घेतो

आणि तेथे नेमका तो भामटा सरदार होतो

*

प्रेम खोटे कोणतेही फार होते स्वार्थ साधू

गरजवंताच्या पुढे मग नेमका अंधार होतो

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ दु:ख वाटे चावळावे… प्रा. सौ. सुमती पवार ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ दु:ख वाटे चावळावे… प्रा. सौ. सुमती पवार ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

दु:ख वाटे चावळावे. (रसग्रहण)

“पदरात निखारे असले तरी ओठावर मात्र हास्य असावे. ”

आजही समाजात स्त्रीची हीच प्रतिमा आहे किंबहुना समाजाला स्त्रीचं हेच रूप अपेक्षित आहे, मान्य आहे.

हजारो वर्षांपासून स्त्रीच्या दुःखात, वेदनेत, समस्येत फारसा मूलभूत फरक झालेला जाणवत नाही आणि असलाच फरक तर तो केवळ एक मुलामा आहे. खोटा, वरवररचा. आत मध्ये मात्र तेच जळणं, तोच अंगार. अशाच अर्थाची, माननीय कवयित्री सौ. सुमती पवार यांची “दुःख वाटे चावळावे.. ” ही स्त्री वेदना व्यक्त करणारी आणि मनातले धुमसणारे निखारे फुलवणारी एक अतिशय वास्तववादी सुरेख कविता वाचनात आली. याच कवितेचा रसास्वाद आज आपण घेऊया.

☆ दु:ख वाटे चावळावे… ☆

सुखदु:ख वाटे चावळावे, चघळती त्या बायका

चटके मनावर ओरखडे दाविती ना बायका..

*

ते रोज मरणे रोज जगणे मार बुक्यांचा बसे

लावूनी कुलूपे बसती त्या का करूनी घ्यावे वाटे हसे?

*

परी फुटतो बांध अवचित कधी पाणवठी वा वावरी

संताप होतो व्यक्त कृतीतून रडवेली होते, हासरी..

*

खोचून काचा साडीचा तो आपटून कापडे

साचलेला मळ निघतो मुखातून अंगार पडे..

*
बरसती अंगारासवे नयनातूनी लाह्या जणू

आसवे पाण्यात पडती सरिता सागरी जणू..
*

मोकळे मग आकाश होते पिळुनी आणखी मुक्तते

घेऊन उसना चेहरा मग ती घरी पुन्हा सामावते..

*
कधी न कळते अथवा वळते गेंडासमाजास ती

बंद ओठांवरही चालते रानटी मिजास ती…

*
वळकटी होते तिची मग करकचून ती बांधती

पेटत्या चितेत मग ती पूर्ण होते सारी रिती..

*
रानटी तो प्राक्तनाचा लिहिणारा धनी असे

काय जळते कोणाचे ते अनुभवावाचूनी ….

कळणार कसे? ….
*

– प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

कविता वाचल्यानंतर प्रथम डोळ्यासमोर येते ती संसाराचा गाडा निमुटपणे, विनातक्रार, कष्टाने, मानहानी सोसत ओढणारी एक ग्रामीण स्त्री! तिचं जग म्हणजे गावचा पाणवठा, नदीचा किनारा अन् तिथेच भेटणारी समदु:खी माणसं!

सुखदुःख वाटे चावळावे चघळती त्या बायका

चटके मनावर ओरखडे दाविती ना बायका

कशा असतात बायका! जरी कितीही वाटलं चुकतमाकत, तुटकपणे, अडखळत का होईना मनातलं खुपणारं जगाला सांगावं पण दुःख गिळण्याची सवय लागलेल्या या स्त्रिया स्वतःच्या मनावरचे चटके, ओरखडे लपवतच राहतात. आहे त्या परिस्थितीत जगत राहतात.

कवितेच्या या पहिल्या चरणात स्त्री कशी शोषित आहे याचं दर्शन होतं. *चावळावे* *चघळतती* हे शब्द तोच काव्यभाव अत्यंत परिणामकारक पद्धतीने व्यक्त करतात.

ते रोज मरणे रोज जगणे मारबुक्क्यांचा बसे

लावूनी कुलूपे बसती त्या करून घ्यावे वाटे हसे?

कधी शब्दांचा, कधी शारीरिक लाथा बुक्क्यांचा मार खात जगणं म्हणजे एक प्रकारचं रोजचं मरणच पण तरी “हाताची घडी आणि तोंडावर बोट” या पद्धतीने कुठेच व्यक्त व्हायचं नाही, बोलायचं नाही कारण बोललं, तक्रार केली तर त्यातून साधणार काहीच नाही. बदनामी मात्र होणार. हे कायमस्वरूपी भय उराशी बाळगतच ही अत्याचारित स्त्री जगत असते पण कधीतरी याचा स्फोट होतोच ना? अति होतं आणि बांध फुटतो. कसा? कशा रीतीने? त्याचं काळीज फाटणारं वर्णन कवयित्रीने पुढच्या चरणात केलं आहे.

तरी फुटतो बांध अवचित कधी पाणवठी वा वावरी

संताप होतो व्यक्त कृतीतून रडवेली होते हासरी..

गावात एखादा पाणवठा असतो. नदीचा किनारा असतो अथवा एखादं शेत असतं जिथे ती मोलमजुरी करते. ही सारी ठिकाणं म्हणजे तिच्यासाठी कधीतरी मन मोकळं करण्याची माध्यमं असतात. साऱ्याच पीडित असतात म्हणूनच एकमेकींची सुखदुःखं जाणू शकतात. रडवेली मनं मोकळी होतात. क्षणभर का होईना तिच्या मुखावर मग हास्य विलसते.

तिच्या मनातली खदखद, संताप कसा कृतीतून व्यक्त होतो त्याचं बोलकं चित्र सुमतीताई पुढच्या चरणात आकारतात.

खोचून काचा साडीचा तो आपटून कापडे

साचलेला मळ निघतो मुखातून अंगार पडे

ढीगभर धुणं घेऊन ती पाणवठ्यावर आलेली आहे. धुताना कपडे दगडावर आपटत असताना तिच्या मनातला संताप, उद्विग्नता तडतडणार्‍या ठिणग्यांप्रमाणे बाहेर पडते. जसा कपड्यातून मळ बाहेर येतो तसाच तिच्या मनातही कित्येक दिवस साठलेला मळ, कचरा बाहेर पडतो.

या चरणात “कापडं धुणं” हे अतिशय चपखलपणे रूपकात्मक पद्धतीने कवयित्रीने इथे मांडलं आहे. जशी एखादी पंचींग बॅग असावी.

स्त्री जीवनाशी निगडित असलेली ही रोजची सर्वसाधारण कृती तिच्या दुःखाला वाट फोडणारंं एक प्रभावशाली माध्यम कसं होऊ शकतं हे अत्यंत साध्या तरीही परिणामकारक शब्दात कवयित्री सुमतीताईंनी मांडलं आहे. हा चरण वाचताना अंगावर अक्षरशः शहरा येतो आणि कुठेतरी मनाला काटेही बोचतात.

बरसती अंगारासवे नयनातूनी लाह्या जणू

आसवे पाण्यात पडती सरिता सागरी जणू

मोकळे मग आकाश होते पिळुनि आणखी मुक्त ते

घेऊन उसना चेहरा मग ती घरी पुन्हा सामावते

एकीकडे ती आपटून धोपटून कपडे धूते, त्यातला मळ काढते आणि शेवटी ते घट्ट पिळते. ही प्रत्येक कृती प्रतिकात्मक आहे. तिच्या मनात साठलेला प्रचंड संताप, उद्रेक, चीड या प्रत्येक कृतीतून अगदी स्वाभाविकपणे बाहेर पडते. तिच्या मनात फुटणाऱ्या त्या संतप्त विचारांच्या लाह्या टणटणतात. तिच्या डोळ्यातून अश्रू ही ओघळत राहतात. वाहत्या पाण्यात तेही सामावून जातात. जशी नदी सागराला मिळावी त्याप्रमाणे. तिचे अश्रू त्या पाण्याशी एकरूप होतात. तो पाण्याचा प्रवाह तिच्या अश्रूंना उदरात घेतो. अशा रीतीने तीही मुक्त होते! मोकळी होते. ” झालं मोकळं आभाळ” अशी तिची हलकी मनस्थिती होते आणि मग ती पुन्हा तिचा तोच उसना हसरा चेहरा घेऊन घरी परतते.

या काव्यपंक्ती वाचताना वाचकांचे मन भळभळतं. इथे “स्वभावोक्ती” अलंकार अतिशय सुंदरपणे कवयित्रीने साधलेला आहे. पाणवठ्यावर धगधगणारं मन घेऊन कपडे धुणारी ही व्यथित ग्रामीण स्त्री अक्षरश: डोळ्यासमोर साकारते. आणि नकळत तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू आपण पुसावेत असे वाचकालाही वाटते.

कधी न कळते अथवा वळते

गेंडा समाजास ती

बंद ओठावरही चालते

रानटी मिजास ती..

वळकटी होते तिची मग करकचून ती बांधती

पेटत्या चितेत मग ती पूर्ण होते

सारी रिती…

समाज इतका बोथट, बथ्थड, संवेदन शून्य आहे की त्याला तिचं दुःख कळून घ्यायचंच नाही, कळलं तरी वळत नाही अशीच या भावना शून्य समाजाची स्थिती आहे. उलट स्त्री म्हणजे केवळ उपभोग्य वस्तू. तिला मन आहे, तिच्यात एक आत्मा आहे याची ना दखल ना जाणीव. काय होतं तिच्या साचून ठेवलेल्या यावेदनांचं? फक्त एक वळकटी. आयुष्य सरतं. अखेर करकचून बांधलेली वळकटी धगधगत्या चितेतच रिकामी, निवांत होते. आयुष्यभर जळणाऱ्या तिच्या दुःखाला मरण हाच एकमेव जणू आसरा असतो, थांबा असतो. तिच्या मरणातच तिची शांती असते.

रानटी तो प्राक्तनाचा लिहिणारा धनी असे

काय जळते कोणाचे ते अनुभवावाचूनी कळणार कसे

शेवटच्या चरणात मात्र हतबलता, हताशपणा जाणवतो. ज्या कुणाच्या गळ्यात ती तिच्या आयुष्याची माळ घालते तो तिचा धनीच तिचे भागधेय ठरवतो. तिच्या नशिबाची रेषा तोच आखतो आणि ती निमुटपणे, मिटल्या इंद्रियाने सारे स्वीकारते. तिच्या जळण्याने कुणाचे काही जळत नाही, बिघडत नाही. तिच्या दुःखापर्यंत खरं म्हणजे कोणीच पोहोचत नाही. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अनुभव नसलेल्यांना ते कसे जाणवणार? त्यांची फक्त वरवरची सहानुभूती असेल. त्यात थोडीच अंतःकरणाची तडतड असेल?

संपूर्ण मुक्तछंदातली ही कविता वाचल्यानंतर मन कमालीचं सुन्न होतं. या कवितेत एक उपहास आहे जो मन फाडणारा आहे. मात्र कवयित्री सुमती ताईंच्या प्रत्येक शब्दातून झिरपणारी तिची वास्तववादी व्यथा, “स्त्रीचं मन एक स्त्रीच जाणू शकते. ” या निष्कर्षापर्यंत नक्कीच आणून सोडते. शिवाय या कवितेतली वेदना, व्यथा मोठी की ती व्यथा जीवनभर सोसणारी सोशिक स्त्री मोठी हे ठरवता येत नाही पण तरीही या कवितेतून पाझरणारं जे स्त्रीरूप आहे ते कधी बदलेल का? बदलता येईल का? हा प्रश्न मात्र मनात उभा राहतो. कवितेतील गावकुसाकडची स्त्री समस्त पीडित नारीजातीचंच अशाप्रकारे प्रतिनिधीत्त्व करते.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओवाळणी… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ ओवाळणी… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

 मागच्या दोन वर्षापूर्वीचा एक प्रसंग आहे. मी लिहिलेली ओवाळणीची कविता सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. ती कविता लातूरला एका व्यक्तीने वाचली. आणि त्याने मला थेट कॉल लावला. आणि जवळपास तो माणूस दहा मिनिट फक्त हुंदके देत राहिला. हुंदका आवरत तो इतकंच म्हणाला.. ‘ सध्या बोलता येत नाही. संध्याकाळी पुन्हा कॉल करतो. फक्त उचला. ’ …. एवढंच बोलून फोन कट झाला.

…… तर गंमत अशी होती की जमिनीच्या झालेल्या वादातून बहीण आणि भाऊ यांच्यात जवळपास चार वर्षे बोलणं बंद झालेलं होतं. ही कविता त्या भावाने वाचली आणि थेट बहिणीच्या घरी सगळी कागदपत्रे घेऊन गेला. सगळी संपत्ती तिच्या नावावर करायला तयार आहे म्हणाला.. ‘ पण हा रुसवा नको ताई ‘ म्हणून मनमोकळेपणाने रडला. दोघेही भाऊ बहीण एकमेकांच्या गळ्यात पडून रडले. आणि संध्याकाळी या दोघांनीही मला फोन करून धन्यवाद दिले होते.

…. माझ्या कवितेला मिळालेलं हे फार मोठं बक्षीस होतं.

तीच कविता पुन्हा एकदा आपल्या हवाली करतोय.

☆ ओवाळणी… ☆

ओवाळणीच्या ताटात नोटा

टाकून झाल्यावर…

त्याने तो कागद पुढे केला 

आणि लहानशी रिकामी जागा दाखवत म्हणाला…

ताई इथं तुझी सही हवीय फक्त…

 

तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला

पदराने डोळे पुसत हसत म्हणाली,

आण तो कागद

दादा सही करते

फक्त एक वचन देऊन जा

वर्षभर आला नाहीस तरी चालेल

दर भाऊबिजेला न चुकता येत जा..

 

माय बाप गेलं

आत्ता माहेरही रुसलं आहे..

मातीतल्या नात्याचं नावही

पुसलं आहे..

 

मुलांना चांदोमामाची ती

रोज गोष्ट सांगते..

मुलं झोपी जातात तेव्हा..

तिच्या डोळ्यात जत्रा

माहेरची पांगते..

 

सुखी ठेव देवा भाऊराया माझा

नवस रोज मागते..

किती किती आणि कितीतरी

भावाचं कौतुक सांगते सासरी..

अन तिच्या माहेरात फक्त तिची

वाट पाहते ओसरी…

 

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

लेखक / कवी

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares