मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नवरात्र.. बहुतेक घरांमधले चलचित्र ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ नवरात्र.. बहुतेक घरांमधले चलचित्र ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

(महिलांचा अनुभव)

आज नवरात्र सुरू होतय्. मी एकदम खुश होते. आधीच ठरवलं होतं, की रोज सकाळी ऑफीसला जाण्यापूर्वी, देवीच्या देवळात जाऊन यायचं. मुलगी यायला तयार झाली, तर तिला पण घेऊन जायचं. ह्यांना विचारण्यात कांहीच पॉईन्ट नव्हता. एकदम नास्तिक माणूस आहे. माझ्या जाण्यात पण त्यांनी खो घातला असता.

आज मुद्दामच सकाळी लवकरच उठले. सगळ्या चपला, सॅन्ड्ल्स उचलून मोठया बॅगेत भरून ठेवल्या. उगीच घालायचा मोह व्हायला नको. आता ‘नो फूट् वेअर फॉर नाईन डेज्’. नो स्लीपरस् ऑलसो’.

आजचा रंग नारंगी (ऑरेंज) होता. नारंगी रंगाची साडी /मॅचिंग ब्लाउज /मॅचिंग पर्स / मॅचिंग गळ्यातले-कानातले घालून तयार झाले. इतर वेळ असती, तर मॅचिंग सॅन्डल्स पण असते, असो. मुलीला येते कां? विचारले, तर चक्क ‘हो’ म्हणाली.

मुलगी : आई, मी येतेय्, पण, साडी बीडी – नो वे, रंगाचे बंधंन – नो वे, आणि मी पायात बुट घालणार. कबूल असेल, तर बोल?

मी : अग, मनू, ९ दिवसांचा तर प्रश्न आहे! इतर वेळा आम्ही तुला काही म्हणतो कां?

मी : (मनात) आणि म्हणूनहि, ही कुणाचं ऐकते कां? ह्यांचे आणि सासूबाईंचे, तिचे नेहेमी अतिच लाड असतात!

मुलगी : अगं, साडीचं फार ओझं होतं. पॅन्ट आणि टी शर्ट नी मोकळं वाटतं. आणि पायात काही नाही, ही तर कल्पनाच करवत नाही. एकतर चालायला सगळीकडे फूटपाथ नाहीत, फुटपाथवरच्या फरश्या बरेच ठिकाणी उखडलेल्या असतात. कुत्री फिरवणाऱ्यांच्या कुत्र्यांनी ठिकठिकाणी शी केलेली असते. परदेशात लोक कुत्री फिरवतात, ते बघून इथे पण लोक कुत्री फिरवायला लागले. ते लोक शी गोळा करायला प्लॅस्टीक पिशवी बरोबर नेतात, पण आपल्याला ते कमीपणाचे वाटते. रस्त्यावर अधे-मधे दारूच्या फुटक्या बाटल्या पडलेल्या असतात. पायात काच गेली म्हणजे संपलेच. आई, अनवाणी चालण्याचं, तू पण जरा जास्तच करते आहेस!

मी विचार केला, मुलगी देवीला यायला तयार झाली, हेच खूप झाले. आम्ही दोघी तयार झालो. निघतांना यांना ‘आम्ही जाऊन येतो’ असे सांगितले. तर, हे म्हणाले, ‘देवीला जाताय, का, फॅशन शो ला जाताय’? मी स्वत:कडे बघितले आणि लक्षात आलं, की गळा आणि पाठ जरा जास्तच मॉडर्न आहेत आणि स्लीव्हलेस प्रकार देवीला आवडेल ना? असा पण विचार मनात डोकाऊन गेला. बाय करून, दोघी बाहेर पडलो. बरेच स्त्री-पुरूष माझ्यासारखेच अनवाणी चालतांना पाहून छान वाटले. दर्शन घेऊन घरी आले.

कपाटातली दुसरी नारंगी साडी काढली. आज रविवार होता पण ऑफिसला आज सुट्टी नव्हती. ऑफीसला गेले. ऑफीसमधे ८-१० जणी नारंगी साडीत होत्या. अनवाणी मात्र मी एकटीच होते. बॉसनी आणि सगळ्यांनीच त्याबद्दल माझं कौतुक केलं.

सगळ्या म्हणाल्या, सकाळी देवीला अनवाणी जाऊन आलो. बाहेर फारच घाण असते. आता इतर ठिकाणी पायात घातलय, का नाही, हे बघायला देवी कशाला येतेय. त्यामुळे इतर वेळेला आम्ही पायात घालणार.

दिवसभर उपास असल्यामुळे, दुपार नंतर पोटात कावळे काव-काव करायला लागले होते, पण रात्रीपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. संध्याकाळी भाजी आणायला साडी बदलून बाहेर पडले. आज या-ना-त्या कारणानी नारंगी ५ साडयांना बाहेरची हवा लागली. रात्री दिवसांच्या रंगाप्रमाणे, रोज नेसायच्या साडयांचे गठ्ठे करून ठेवले. रोज ५-६ साडया नक्कीच नेसता येतील. अशा रितीनी नवरात्राची सुरूवात छान सुरू झाली.

 © श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनाच्या वाड्यात गडबड झाली – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ मनाच्या वाड्यात गडबड झाली – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

मनाच्या वाड्यात गडबड झाली… जुन्या दुःखांची पंचायत भरली… आली आली ग आठवण बाई… आली ग आठवण बाई…

कोपऱ्यात बसलेले एक जुने दुःख उठले… डोळे चोळीत म्हणाले… अहो, आमचे काय ठरले? आम्ही अजून मनातच राहायचे का?

तेवढ्यात आनंदराव दारातून आत आले… हातात हास्याचे गाठोडे… खांद्यावर समाधानाचे उपरणे…

आनंदराव म्हणाले… काय रे, अजून हीच मंडळी? अजून हीच दुःखे? अजून हाच बाजार? दहा वर्षांपूर्वीचा अपमान… पंधरा वर्षांपूर्वीचा राग… वीस वर्षांपूर्वीचे अपयश… अहो, एवढा जुना माल अजून गोदामात ठेवला आहे?

तेवढ्यात एक दुःख फुगून म्हणाले… आम्ही खास आहोत… आम्ही भावनिक आहोत…

आनंदराव हसले… म्हणाले, भावनिक नाही रे बाबा… तुम्ही आता निर्माल्य झाला आहात… कालची फुले आज निर्माल्य होतात… मग कालची दुःखे आज ताजी कशी?

प्रश्न बरोबर होता… दुःखे गप्प बसली…

एवढ्यात श्रद्धाबाई पुढे आल्या… त्यांनी देवाच्या चरणी फुलांची परडी ठेवली… म्हणाल्या… ही फुले माझी होती… आता त्याची झाली…

मग दुःखांचे काय?

तीही त्याचीच…

देवा… हे राग तुझे… हे अपयश तुझे… ही चिंता तुझी… आता तूच सांभाळ…

हे ऐकताच मनाच्या वाड्यात कुजबुज सुरू झाली… अहो… आपण तर दुःखांना कायमस्वरूपी भाडेकरू ठेवले होते… आता त्यांना नोटीस मिळाली वाटते…

तेवढ्यात भारूड सुरू झाले…

मनाच्या वाड्यात गडबड झाली… जुन्या दुःखांची उचलबांगडी झाली… आली आली ग आनंद बाई… आली ग आनंद बाई…

एक दुःख पुटपुटले… आम्ही जाऊ कुठे?

आनंदराव म्हणाले… गंगार्पण व्हा… निर्माल्य घरात ठेवत नाहीत… मनातही ठेवत नाहीत…

जाता जाता एक जुनी चिंता म्हणाली… माझी आठवण येईल…

मन हसले… म्हणाले… नाही गं… तुझ्या जागी आता आनंदाची पेरणी करायची आहे…

तेवढ्यात शेतकरीबुवा आले… म्हणाले… जमिनीतील तण काढले नाही तर पीक येत नाही… मनातील दुःख काढले नाही तर आनंद उगवत नाही…

वा रे वा… मनाला मुद्दा पटला…

राग बाहेर… मत्सर बाहेर… अहंकार बाहेर… दुःख बाहेर…

आत फक्त प्रेम… आत फक्त विश्वास… आत फक्त आनंद…

तेवढ्यात समाधानराव टाळी वाजवून म्हणाले…

ठरले… ठरले… ठरले…

दुःखांचे निर्माल्य करायचे ठरले… आनंदाची पेरणी करायची ठरली…

मनाच्या वाड्यात पुन्हा उजेड झाला… आनंदाच्या घोषणा सुरू झाल्या…

जय समाधान… जय समाधान…

जय आनंद… जय आनंद…

आणि मनाच्या दारात बसलेला अनुभव नावाचा म्हातारा हसून म्हणाला…

“देवाला वाहिलेली फुले परत मागत नाहीत… मग त्याच्या चरणी ठेवलेली दुःखे पुन्हा उचलून का घ्यायची? “

– – – दुःखांचे निर्माल्य करण्याचा सल्ला देणारा एक साधा निरीक्षक…

☆

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नवरात्र विशेष – लक्षवेधी ललना : सामान्य स्त्रिया : असामान्य जगणे – लेख क्र. २  ☆ वीणा कुलकर्णी ☆

वीणा कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ नवरात्र विशेष – लक्षवेधी ललना : सामान्य स्त्रिया : असामान्य जगणे – लेख क्र. २ ☆ वीणा कुलकर्णी ☆

IT क्षेत्रातील करिअर व घर-कुटुंब सांभाळणारी व्यस्त स्त्री…

हातात लॅपटॉप, डोक्यात डेडलाईन आणि मनात सतत घराची काळजी!

घरातील वृद्धांचे संगोपन आणि मुलांचे पालकत्व निभावण्याची जबाबदारी घरातील स्त्रीचीच, हा जणू अलिखित नियमच आहे. परंपरेने चालत आलेला हा नियम आजही तसाच आहे.

त्याशिवाय ऑफिसमध्येही स्वतःची बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता सिद्ध करण्याचे आव्हान या स्त्रीला पेलायचे असते.

२४ तासांच्या दिनक्रमात तिच्या विश्रांतीला दुय्यम स्थान असते. घरात सर्वांत कमी तास झोप घेणारी व्यक्ती बहुधा तीच असते.

ठळकपणे तिचं घवघवीत यश दिसतं, तिची पदकं दिसतात, तिच्या यशाचे तिला मिळणारे फायदेही दिसतात; पण त्यामागची तिची धावपळ, तिचा संघर्ष, तिची व तिच्या मुलांची अनेक तास एकमेकांशिवाय दूर राहण्याची तडजोड मात्र दिसत नाही.

सकाळी ती शाळेचा डबा बनवताना शेफ असते, मुलांना शाळेत सोडताना ड्रायव्हर असते, मुलांना खेळासाठी ग्राउंडवर सोडणे आणणे, होम वर्क करून घेणे, शाळेच्या पालक सभांना जाणे कितीतरी सर्व जबाबदार्‍या ती आनंदाने स्वीकारत असते. हे सर्व करताना तिलाही थकवा येत असतो पण ती बोलून दाखवत नाही हा तिच्या मनाचा मोठेपणा.

तिला मानसिक आधार हवा असतो. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी,

तिच्या घरासाठी तिच्या मुलांसाठी वेळ देणारी व्यक्ती तिला हवी असते. पण प्रत्यक्षात असं किती वेळा घडतं? नाही घडत तसे कारण 

प्रत्येकाच्या कामाच्या धांदलीत शक्य नसते ते.

घर व करिअर करत असताना तिची तारेवरची कसरत होत असते.

अशावेळी 

तिच्या करिअरला कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा प्रेमाने पाठिंबा आणि सहकार्याची जोड हवी हे जाणून घेणे इष्ट आहे.

घर ही केवळ तिची एकटीची जबाबदारी नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

अशा कर्तृत्ववान स्त्रिया म्हणजेच आपल्या गोड कन्या, सुना, बहिणी आणि मैत्रिणी. या सगळ्यांना आपण समजून घेऊ या.

त्यांची स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी त्यांना आत्मविश्वास देऊ या. त्यांच्या यशात सहभागी होऊ या. त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगू या.

तिच्यातही एक दुर्गा आहे!

– लेख क्र. २ 

☆

© वीणा कुलकर्णी

संपर्क : G.503 ऋतुरंग श्रावण सोसायटी। अरण्येश्वर, पुणे 411 009

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्वातंत्र्याच्या इतिहासातील हरवलेली स्त्री-पाऊलवाट… उषा मेहता – लेख क्र. ४ ☆ मंजिरी येडूरकर ☆

मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्वातंत्र्याच्या इतिहासातील हरवलेली स्त्री-पाऊलवाट… उषा मेहता – लेख क्र. ४ ☆ मंजिरी येडूरकर ☆

उषा मेहता

२५ मार्च १९२० साली गुजरात मधील सुरत शहरात उषा मेहता यांचा जन्म झाला. तसे त्यांचे कुटुंब गर्भ श्रीमंत होते. त्यांचे वडील ब्रिटिश राजवटीत जज म्हणून काम करीत होते. त्यांना मिळणारा मानमरातब, घरात नोकर चाकर अशा वातावरणात त्या वाढल्या. पण वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांची व गांधीजींची भेट झाली. त्यावेळी गांधीजींनी पदयात्रा काढली होती. त्यानंतर म्हणजे आठव्या वर्षी त्यांची पुन्हा गांधीजींशी भेट झाली. त्यावेळी स्वदेशीची चळवळ सुरू होती आणि त्यांच्या विचारांनी त्या प्रचंड प्रभावित झाल्या त्यांनी तेव्हापासूनच खादीचे कपडे वापरण्यास सुरुवात केली ती शेवटपर्यंत!

एवढीशी कोवळी मुलगी गांधीजींबरोबर सायमन कमिशन’ आंदोलनात सहभागी झाली. त्यांनी आपल्या वडिलांना सांगितले की त्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात भाग घेणार व त्यासाठीच आपले जीवन व्यतीत करणार. त्यामुळे त्यांनी लग्नही केले नाही.

पण वडील इंग्रजांची नोकरी करत असल्यामुळे त्यांना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेता येत नव्हता. तरीही त्या चोरून पत्रके वाटण्याचे काम करीत होत्या. गांधीजींचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत होत्या. त्यांनी शिक्षणात लक्ष घातले, त्या पदवीपर्यंत शिकल्या आणि पुढे कायद्याचे शिक्षण घेत होत्या पण १९३० साली वडील रिटायर झाले आणि त्यांचे कुटुंब मुंबईला स्थायिक झाले. त्यामुळे त्या आता पूर्ण वेळ चळवळींमध्ये भाग घेऊ शकत होत्या. त्यावेळीच त्यांनी काँग्रेसच्या सक्रिय सदस्या म्हणून काम पाहण्यास सुरुवात केल्याने त्यांना त्यांचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले.

तुम्हाला माहीतच असेल भारतात पहिलं रेडिओ स्टेशन २३ जुलै १९२७ ला मुंबई येथे व २६ ऑगस्ट १९२७ ला कलकत्ता येथे सुरू झाले. यालाच आपण आकाशवाणी म्हणतो. त्याआधी काही खाजगी रेडिओ केंद्रांनी सुरुवात केली होती. पण ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. या रेडिओ स्टेशन वरून गांधीजी व इतर काँग्रेस कार्यकर्त्यांची भाषणेही प्रसारित होत होती. गांधीजींच्या चळवळींची माहिती, आंदोलनांची माहिती, पण दिली जात होती आणि त्यामुळे आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत होता. ९ ऑगस्ट १९४२ हा आंदोलनाचा महत्त्वाचा टप्पा होता. पूर्ण भारतभर तिरंगा फडकणार होता. आठ ऑगस्टच्याच रात्री प्रमुख नेत्यांची धरपकड झाली. गांधीजींना अटक झाली आणि सर्व रेडिओ केंद्रे बंद करण्यात आली. ९ ऑगस्टचे आंदोलन पुढच्या क्रांतिकारकांच्या फळीने उचलून धरले आणि पूर्ण केले. परंतु त्यापुढे मात्र रेडिओ केंद्र बंद झाल्यामुळे लोकांना काहीच माहिती मिळत नाही असं होऊ लागलं. स्वराज्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांबद्दल त्यांना काहीच कळेना. मग इंग्लंडला जाऊन रेडिओ ट्रान्समिशन शिकून आलेल्या नरिमन प्रिंटर यांच्यासोबत एक गुप्त बैठक घेतली. शिकागो रेडिओ केंद्राचे मालक नानक मोटवानी यांना रेडिओ स्टेशन चालविण्याचे साहित्य पुरविण्यास सांगितले. आणि २७ ऑगस्ट १९४२ ला गुप्त रेडिओ स्टेशनचे पहिले प्रसारण देशभरात झाले आणि “४२. ३४ मीटर बँड पर एक अंजान जगहसे यह इंडियन नॅशनल काँग्रेस का रेडिओ है” हे पहिले उषा मेहता यांचे शब्द घुमले आणि आता गांधीजींची अटक, मेरठ मधला उठाव, त्यात ३०० सैनिक मारले गेले, अशा सर्व बातम्या लोकांपर्यंत पोहोचू लागल्या. या स्टेशनची जबाबदारी उषा मेहता व इतर त्यांचे सहकारी यांनी घेतली.

ही बातमी ब्रिटिश सरकारला कळणार व ते प्रसारणाचे ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करणार हे नक्की होते. त्यामुळे उषा मेहता व त्यांचे सहकारी रोज गुप्तपणे जागा बदलत होते. कधी वेष बदलून, कधी जंगलात जाऊन, कधी रात्रीतल्या रात्री नवीन ठिकाण शोधून, आणि नुसता एक माणूस नाही तर सगळे सहकारी, सगळे समान, हलवावे लागत होते. उषा मेहता यांनी धाडसाने, अगदी बेमालूमपणे कार्य सुरू ठेवले होते.

पण आपला इतिहासच असा आहे की कोणीतरी घरभेदीच शत्रूला बातम्या पोचविण्याचे काम करतो. थोड्याशा पैशाची, सत्तेची लालुच पुरेशी असते, स्वार्थापुढे देशाचा विचार केला जात नाही, सहकाऱ्यांच्या जीवाचा विचारही केला जात नाही. इथेही असेच झाले.

जिवावर उदार होऊन काही लोकांनी चालवलेले हे रेडिओ केंद्र ८८ दिवस चालले, आणि अखेरीस एका कामगाराने फितूरी केली व १२ नोव्हेंबर १९४२ ला उषा मेहता यांना अटक झाली. त्यांच्यावर खटला भरला गेला. त्यावेळी ब्रिटिश सरकारने त्यांना सांगितले की जर तुम्ही पुन्हा कोणत्याही आंदोलनात भाग घेणार नाही असे कबूल करत असाल किंवा लिहून देत असाल तर आम्ही तुम्हाला आत्ता इंग्लंडला पुढील शिक्षणासाठी पाठवू. त्यांनी अर्थातच नकार दिला. जजच्या परवानगीने त्यांनी खटला सुरू असताना एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही, स्वतःच्या बचावासाठी ही काहीही बोलल्या नाहीत. त्यांना चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली.

स्वतंत्र भारतात त्यांना ‘भारताची रेडिओ वुमन’ हा किताब मिळाला. त्यांनी पुढे शिक्षकी पेशा स्वीकारला व अविरत गांधीजींच्या मतांचा, तत्त्वांचा प्रसार केला. त्यांना १९९८ ला ‘पद्मभूषण’ने गौरविले गेले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांचे ११ ऑगस्ट २००० ला निधन झाले.

– क्रमशः भाग ४.  

© मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काही वर्षांपूर्वीची मी आणि आजची मी… – लेखिका : सुश्री जयंती देशमुख ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ काही वर्षांपूर्वीची मी आणि आजची मी… – लेखिका : सुश्री जयंती देशमुख ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

☆

 “ काही वर्षांपूर्वीची मी आणि आजची मी “  प्रस्तुती : मनोहर जांबोटकर 

 

…

दोघींना समोरासमोर उभं केलं, तर कदाचित एकमेकींना ओळखायलाही थोडा वेळ लागेल.

पूर्वी आयुष्य म्हणजे सगळं काही नीटनेटके, वेळच्या वेळी आणि आपल्या मनासारखं असणं, असंच वाटायचं. कुणी काही चुकीचं बोललं की त्याचा खुलासा हवा असायचा. कुणी मन दुखावलं की त्याला ते कळायलाच हवं असं वाटायचं. घरातलं एखादं काम राहिलं की बेचैनी यायची.

 

आता?

आता पडदा थोडा तिरका राहिला तरी चालतो.

कपाटातली एखादी साडी जागच्या जागी नसली तरी चालते.

कुणी गैरसमज करून घेतला तर प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही.

 

बहुतेक…

आता मला सगळं “बरोबर” करण्यापेक्षा स्वतःचं मन “ठीक” ठेवणं महत्त्वाचं वाटतं.

एकदा जुन्या वस्तू आवरत होते. कितीतरी वर्षांपासून जपून ठेवलेल्या गोष्टी हातात येत होत्या—पहिल्या पगाराची पावती, मुलांनी लहानपणी काढलेली चित्रं, जुन्या शुभेच्छापत्रिका, काही पत्रं…

पूर्वी प्रत्येक गोष्ट जपून ठेवली असती.

त्या दिवशी मात्र काही वस्तू हातात घेतल्या आणि शांतपणे बाजूला केल्या.

आठवणी ठेवायला वस्तूंची गरज नसते, हे कळलं.

काही आठवणी कपाटात नसतातच…

त्या आपल्यात राहतात.

आणि काही वस्तू सोडताना वस्तू जात नाहीत—

आपण त्या काळाला अलगद निरोप देत असतो.

 

हल्ली एखाद्या कार्यक्रमाला जाताना “सगळ्यांना भेटायचं” हा अट्टहास नसतो.

 

कुणी भेटलं तर आनंद.

नाही भेटलं तरी मनात राग नाही.

 

पूर्वी एखाद्याने आपल्याला फोन केला नाही की प्रश्न पडायचा—“काय झालं असेल? ”

आता वाटतं, कदाचित त्याच्याही आयुष्यात त्याची काही कारणं असतील.

 

प्रत्येक शांततेचा अर्थ नाराजी नसतो.

हे कळायला थोडी वर्षं जावी लागतात.

एकदा मुलाने माझ्याकडे एक जुना शर्ट दाखवला.

 

“आई, हा आता ठेवू नकोस. देऊन टाक. ”

मी सहज म्हणाले, “अजून चांगला आहे. ”

 

तो हसला.

“तुझ्याकडे प्रत्येक गोष्ट ‘अजून चांगली’ असते. माणसंही! ”

त्या वाक्यावर मी बराच वेळ शांत होते.

खरंच…

माणसांनाही आपण त्यांच्या जुन्या रूपातच धरून ठेवतो का?

 

कुणीतरी बदललेलं असतं, कुणाची परिस्थिती बदललेली असते, कुणाच्या प्राधान्यक्रमांचा अर्थ बदललेला असतो…

आणि तरी आपण म्हणत राहतो—

 

“पूर्वी असा नव्हता. ”

आता मात्र एखाद्याला बदलू देण्याइतकी मोकळीक मनात आलीय.

आणि स्वतःलाही.

हल्ली आरोग्य, सौंदर्य, वय या सगळ्यांबद्दलची माझी भाषाच बदलली आहे.

आरशात एखादी सुरकुती दिसली की पूर्वीसारखी नाराजी होत नाही.

ही सुरकुती म्हणजे वयाचं चिन्ह नाही…

ती हसलेल्या असंख्य क्षणांची सही आहे, असं वाटतं.

केसांमध्ये आलेलं एखादं पांढरं केस आता उपटून काढावंसं वाटत नाही.

त्याला माझ्या आयुष्याने दिलेला छोटासा पदक समजते.

 

आणि गंमत म्हणजे…

आता सुंदर दिसण्यापेक्षा आनंदी दिसणं मला जास्त आवडतं.

पूर्वी एखाद्या फोटोमध्ये आपला चेहरा कसा दिसतोय, याची चिंता असायची.

आता फोटो सुंदर आहे की नाही यापेक्षा त्या क्षणी आपण खरंच हसलो होतो का, हे आठवतं.

हल्ली प्रवासाला निघाले की “काही राहिलं तर? ” या काळजीपेक्षा “काही सुंदर दिसलं तर थांबूया” असं वाटतं.

खिडकीबाहेरचं एखादं झाड, अचानक दिसलेला सूर्यास्त, अनोळखी गावातलं छोटंसं देऊळ…

पूर्वी कदाचित लक्षातही आलं नसतं.

आता मात्र वाटतं—

जगणं म्हणजे फक्त गंतव्यापर्यंत पोहोचणं नाही; वाटेत दिसणारंही आपलंच असतं.

एकदा कुणीतरी माझ्यावर अगदी चुकीचा आरोप केला.

पूर्वी मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी तासन्‌तास बोलले असते.

त्या दिवशी फक्त एवढंच म्हणाले—

“तुला जे योग्य वाटतं ते मान. ”

आणि विषय संपवला.

 

घरी आल्यावर लक्षात आलं…

समोरच्याला पटवून देण्यात माझं सत्य मोठं होत नाही.

आपल्याला स्वतःचं सत्य माहीत असणं पुरेसं असतं.

हा आत्मविश्वास आधी नव्हता.

तो आता आलाय.

आणि हल्ली “नाही” म्हणायलाही भीती वाटत नाही.

 

प्रत्येक निमंत्रण स्वीकारायचं नाही.

प्रत्येक काम अंगावर घ्यायचं नाही.

प्रत्येक नातं पूर्वीसारखंच टिकवायचा हट्ट करायचा नाही.

 

कधी कधी स्वतःसाठी जागा ठेवण्यासाठी

काही गोष्टींना नकार द्यावा लागतो.

आणि तो नकार देताना अपराधी वाटत नाही.

बहुतेक हाच तर बदल आहे.

 

पूर्वी मला सगळ्यांना आवडायचं होतं.

आता मला स्वतःला आवडणं महत्त्वाचं वाटतं.

एके दिवशी कपाटातून एक जुनी साडी काढली.

खूप वर्षांपूर्वी घेतलेली. आवडती होती, पण “विशेष प्रसंगासाठी” म्हणून जपून ठेवलेली.

विशेष प्रसंग आला नाही.

साडी तशीच राहिली.

त्या दिवशी ती नेसली.

कुणाचा वाढदिवस नव्हता.

कुठला समारंभ नव्हता.

काही कारणही नव्हतं.

फक्त मला ती नेसायची होती.

आरशात स्वतःकडे पाहिलं आणि हसू आलं.

आपण किती गोष्टी “योग्य वेळ आली की” म्हणून जपून ठेवतो!

साडी, सुगंध, प्रवास, भेटी, आवडी…

आणि कधी कधी आयुष्यच निघून जातं.

म्हणून आता मी ठरवलंय—

योग्य वेळ येण्याची वाट पाहायची नाही.

जगता येईल तो प्रत्येक क्षण योग्य वेळ करायचा.

हो…

 

मी बदलतेय.

माझ्या स्वभावातला हट्ट थोडा विरघळतोय.

अपेक्षांचा आवाज थोडा कमी होतोय.

तुलना मागे पडतेय.

मनावर घेतलेल्या गोष्टी हातातून निसटू देण्याची कला शिकतेय.

सगळ्यांना उत्तर देण्यापेक्षा काही प्रश्न अनुत्तरित ठेवतेय.

सगळ्यांना खूश करण्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहतेय.

 

आणि सगळ्यात महत्त्वाचं—

स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी दुसऱ्यांच्या हातात देणं थांबवतेय.

माझा आनंद कुणाच्या वागण्यावर अवलंबून राहू नये, एवढं मात्र शिकलेय.

मला अजून खूप काही करायचं आहे.

कदाचित काही नवीन शिकायचं आहे.

काही जुनी स्वप्नं पुन्हा उघडायची आहेत.

काही ठिकाणी एकटं जायचं आहे.

काही लोकांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत.

काहींना मनापासून माफ करायचं आहे.

 

आणि स्वतःलाही…

काही वर्षं स्वतःसाठी कमी जगल्याबद्दल.

आता आरशात पाहताना चेहऱ्यावरचं वय दिसतं.

पण डोळ्यांत?

तिथे अजूनही एक मुलगी आहे.

थोडी शहाणी झालेली.

थोडी शांत झालेली.

थोडी हट्टी अजूनही.

 

पण आता स्वतःच्या आनंदासाठी हट्ट करणारी.

ती मला म्हणते—

“चल… अजून थोडं जगूया. ”

मी हसते.

कारण आता मला समजलंय—

आयुष्य बदलत नाही म्हणून आपण दुःखी होत नाही;

आपण बदललो की आयुष्याकडे पाहण्याची आपली नजर बदलते.

म्हणून हो…

मी बदलतेय.

कुणासाठी नाही.

कुणाला दाखवण्यासाठी नाही.

फक्त स्वतःला पुन्हा एकदा सापडण्यासाठी.

 

आणि या वेळी…

स्वतःला हरवू न देण्यासाठी…

*

लेखिका : जयंती देशमुख

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाऊस उतरुनी आला… ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ पाऊस उतरुनी आला… ☆  उज्ज्वला केळकर ☆

☆

‘नेमेचि येतो मग पावसाळा

हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’

अशी एक कविता शाळेत असताना अभ्यासली होती. तेव्हा वाटलं होतं, पावसाळाच काय, सारेच ऋतु नेमाने येतात. पावसाळा… हिवाळा… उन्हाळा… दुसरी-तिसरीत असताना हेही पाठ केलं होतं की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर- पावसाळा…. ऑक्टोबर, नोहेंबर, डिसेंबर, जानेवारी- हिवाळा… फेब्रुवारी, मार्च, एप्रील, मे- उन्हाळा… आता इतके काटेकोरपणे नाही पण सृष्टीने नेमून दिलेले हे काम ऋतु इमाने- इतबारे बजावायचे. ७ जूनच्या टिपणीला मृगाचा पाऊस पडायचा. मग आजी आम्हाला अंगणात पातेली, तसराळी नेऊन ठेवायला सांगायची. त्या निमित्ताने थोडं भिजून घ्यायचं. पातेली, तसराळी भरली की आत नेऊन ठेवायची. त्या निमित्ताने पुन्हा थोडं भिजणं. त्यातल्या पाण्यात थोडी, हिंग पावडर घालायची आणि ते पाणी प्यायचं म्हणजे वर्षभर आजारपण येत नाही, असं ती म्हणायची. ही ६०-७० वर्षापूर्वीची गोष्ट.

आताशी पाऊसही थोडा लहरी झालाय. सात जूनच्या टिपणावर येईलच असं नाही. दिवाळीत पहाटे उठल्यावर थंडी अंगाला झोंबत नाही. ती परदेशीच गेलेली असते. तिथून, कधी तरी चार महीने नाही, तर दूरच्या पाहुण्यासारखी, चार दिवस येऊन, गळामिठी घालून जाते. उन्हाळा मात्र कायमच अंगाला बिलगलेलाच असतो.

अलीकडे मृग या पावसाच्या पाहिल्या नक्षत्रावर पाऊस पडेलंच याची खात्री नाही. अनेकदा असं झालय, पाऊस येतोयसं वाटतं, पण तो न पडताच निघून जातो.

‘घन ओथंबून आले

क्षण माथ्यावर झुकले

परि न बरसले येथे

ते तसेच निघूनी गेले.

ते निघूनी जाता जाता

डोळ्यात दाटूनी आले

अन होऊन अश्रूधारा

गालावर झरझरले

सखी ग, घन बरसूनी गेले

सखी ग, घन बरसूनी गेले ‘

तर असेही घन बरसून जातात. मग पावसाची आळवणी सुरू होते. मुलं- बाळं म्हणतात,         ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा… पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. ’

पाऊस आला, की लोकसंस्कृतील, म्हणजे ग्रामीण भागातील स्त्री खूश होऊन जाते. पूर्वी खेडोपाडी नळ वगैरे नव्हतेच. स्त्रिया नदीवरून पाणी आणत किंवा विहीरीचं पाणी ओढत. अशीच एखादी स्त्री म्हणाली असेल, ‘ये ग ये ग सरी, माझे मडके भरी’ तिची आळवणी सरीने ऐकली असणार, म्हणूनच ती पुढे म्हणते, ‘ सर आली धावून, मडके गेले वाहून. ’ मडके वाहून जाण्याइतका पाऊस झाला की त्या श्रमलक्ष्मीला थोडासा विसावा. पागोळ्यांखाली भांडी, बादल्या, हांडे ठेवून पाण्याची साठवण करायची.

रिमझिम पाऊस अंगण भिजवतो आणि त्याची मुसळधार, रान हिरवेगार करते. म्हणूनच म्हणायचं,

‘पावसा पावसा येऊन जा. तापलं अंगण निववून जा.

कीट, घाण धुवून जा. नद्या-नाले भरून जा.

शेते राने भिजवून जा. पिकांचं दान देऊन जा.

पावसा पावसा येऊन जा. सार्‍यांना हसवून निघून जा. ‘

इतकंच नाही, मुलांच्या मनात येतं,

‘जाता जाता, पावसा, पावसा इंद्राचं धनू ठेवून जा. ’

पावसाळ्यात इंद्रधंनुष्याकडे बघताना, पोरांनाच काय थोरांनाही आनंद होतो नाही का?

किती रूपं पावसाची! ती सारीच रूपं मनाला मोहिनी घालणारी.. गुलाबदाणीतून गुलाबपाणी शिंपडल्यासारखा, थेंबांची शिंपण करणारा टपटप पाऊस, त्याच्या थेंबांचे मोती केसात माळायचे, तर पावसात जायलाच हवं. मातीचा वास मनभरून काळजात साठवायचा, तर दारं उघडून अंगणात आणि अंगण ओलांडून शेतात-शिवारात जायला हवं.

थेंबांच्या मग सरी होतात. रिमझिमत रहातात. ‘रिमझिम’ हा मोठा नादमधुर शब्द. अनेक कवींना त्याने खुणावलय. खुळावलय. मंगेश पाडगावकर लिहितात,

‘श्रावणात घननीळा बरसला रिमझिम रेशीमधारा

उलगडला झाडातून अवचित हिरवा मोरपिसारा. ’

हे भावगीत नव्हे, चित्रगीतच आहे. निसर्गाचे किती देखणं रूप मंगेश पाडगावकरांनी यातून डोळ्यापुढे उभं केलं आहे.

मी लिहिलं आहे, ‘पाऊस रिमझिम झरतो बन बन मोहरले, फुलले

लखलखती वीज धराया कुणी बाहू पसरून आले. ’

कुणा प्रियकर-प्रेयसीची भेट मोहरलेल्या, फुललेल्या बनात होते. कुणी अभागिनी मात्र या पाऊसकाळात आपल्या प्रिय पतिविना, एकटीच उदासशी आपल्या घरात बसून आहे. ती म्हणते,

‘रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात पियाविण उदास वाटे रात’

ती मेघाला विनवते आहे, ’बरस असा तू मेघा रिमझिम आज यायचे माझे प्रियतम’ तो आला की मग मात्र तू असा बरस असा बरस, की ‘पिया न जाईल माघारी दारात. ’

आपल्या प्रिय पत्नीच्या वियोगामुळे व्याकूळ झालेला कालिदासाचा यक्ष, मेघालाच दूत बनवून आपल्या पत्नीला संदेश पाठवतो, आणि एक उत्कृष्ट खंडकाव्य निर्माण होतं ‘मेघदूत’॰

रिमझिमत्या सरी, नंतर पाऊसझडी होतात. त्या झडझडून येतात. त्यांना वार्‍याची साथ लाभते. मन थोडं भयचकित होते. पावसाचं हे रूप घरात बसूनच आनुभवावं असं असतं खरं तर! ग. दि. माडगूळकरांच्या कृष्ण विरहिणी गौळणीला मात्र कृष्णाला भेटायला जायची आस आहे, पण ती जाणार तरी कशी? घन घन माला नभी दाटल्याहेत. धारा कोसळताहेत. अंगणाचे तळे झाले आहे. पाणी इतके वाढले आहे की तिच्या दाराशी येऊन भिडले आहे. बिच्चारी…

त्या तशा प्रलयातही एखादी प्रेयसी आपल्या प्रियकराला भेटायला जाते. ती म्हणते,

‘पाऊस झडींनी झडतो बेताल नदीची गाज

रे उधाण तव स्पर्शाचे सावरू कशी मी आज ‘ हवंहवंसं वाटणार्‍या त्या उत्कटतेतही तिचं मन भांबावून गेलय.

आरती प्रभूंची नायिका मात्र उन्मुक्त. ती घन मेघांना आवाहन करीत म्हणते,

‘ये रे घना ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना’

पुढे ती सांगते, ‘टाकुनि या घरदार नाचणार नाचणार

नको नको म्हणताना, नको नको म्हणताना, मनमोर भर राना’

त्या नायिकेप्रमाणे मलाही वाटतं, तिच्यासारखंच टाकुनिया घरदार, राना –वनात जाऊन मनमुक्त नाचावं, पण लगेच दुसरा विचार येतो मनात की लोक मला वेडी तर म्हणणार नाहीत ना? सगळ्या कशा संत स्त्रीयांप्रमाणे ऐहिकाचे बंध तोडू शकणार?

सध्या पाऊस चांगला पडतोय. पावसाच्या पहिल्या सरी कोसळल्या आणि मातीच्या गंधाने मन धुंद झालं, तेव्हा कुणाला तरी म्हणावसं वाटलं, ‘भाव अत्तराचे कोसळले, जेव्हा पहिल्या पावसाचे थेंब मातीत मिसळले. ’ पावसाच्या थेबांकडे पाहून रविंद्रनाथ टागोरांच्या मनात एक मनोज्ञ विचार आला. आपल्या एका मुक्तकात (स्ट्रे बर्डस) ते म्हणतात,

‘पावसाच्या आतुर थेंबांनी धरतीमायला पुन्हा पुन्हा चुंबत म्हंटलं,

‘आम्ही तुझी वेडी पोरं आहोत…

आई, पुन्हा आलो तुझ्याच कुशीत.

स्वर्गात करमलच नाही ग तुझ्या आठवणीनं’ आई तिच्या वेड्या पोरांना कुशीत घेते. तिचा आनंद सुगंधाचं रूप लेऊन गगनावेरी जातो. अंकुराच्या रूपाने तिचं काळीज फाडून तिचा आनंद बाहेर येतो. शेतात – रानात पिकांच्या रूपात ओसंडू लागतो. धरतीच्या आनंदात मग आपलाही आनंद मिसळतो.

यंदाचा पाऊस आपली सुखस्वप्नं वास्तवात उतरवेलसं दिसतय. हवामान तज्ञांचा अंदाज आहे की यंदा पाऊस चांगला पडेल.

कोकणातील मंडळी आपल्या कुलदेवतेला, पूजा, अभिषेक झाल्यावर गा-हाणं घालतात, तसंच गा-हाणं मलाही घालावासं वाटतय,

‘हवामानतज्ञांचे अंदाज खरे ठरू देत रे देवा… ’

‘व्हय महाराजा… ’

‘शेतं भाटं चांगली पिकूदेत रे देवा… ’

‘व्हय महाराजा… ’

पाण्याचा सुकाळ होऊ दे रे देवा… ’

‘व्हय महाराजा… ’

‘पाण्याचा प्रलय मांडू नको रे देवा… ‘

‘व्हय महाराजा… ’ असं आणखीही खूप काही म्हणावसं वाटतं. नद्या आपल्या काठांच्या मर्यादेतच वाहू देत; घरं, शेतं, भाटं, माणसं, जनावरं, सुरक्षित राहूदेत. तुझ्या पाण्याबरोबर करोनाही वाहून जाऊ दे… आणखीही असं बरंच काही…

पाऊस येतो काही दिवसांसाठी, पण बेगमी मात्र करतो, वर्षासाठी. महानोरांसारखा शेतकरी कवी विंनम्रतेने आवाहन करतो,

‘या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतूनी चैतन्य गावे. ’ आपल्या या कवितेचा शेवट करताना ते म्हणतात, ‘कोणती पुण्ये अशी येती फळाला

जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. ’

ही काही कुठल्या गेल्या जन्मीची पुण्ये नव्हेत. शेतात राबणार्‍यांच्या, कष्टाच्या पुण्याचे, हे फळ आहे. श्रमलक्ष्मीवर धरणी आई प्रसन्न होते आहे. जोंधळ्याला चांदण्याचे तेज येते आहे.

अर्थात हे सारं घडतं पाऊस, शहाण्यासारखा समजूतदारपणे वागला तरच. एखाद्या वात्रट मुलासारखा त्याने आक्रस्ताळेपणा केला तर… मागे एकदा असंच झालं होतं…

मी म्हणाले होते –

‘मी म्हणाले, ये लवकर ये,

रिमझिमत ये, फुलकोषात झिरपत ये

नद्या-नाले भरत ये, बीजातला अंकुर जागवत ये,

नवे जीवन घडवत ये,

सृष्टी सुजलाम सुफलाम करत ये.

…

तू आलास, लगेचच आलास,

दौडत झोडत आलास,

फूल-पाने मोडत – तोडत,

नद्या – नाल्यांना पूर आणत,

बीजातला अंकूर कुजवत,

अवघे जीवन नष्ट करत,

सृष्टीमध्ये विनाश घडवत,

तू आलास.

असा कसा रे आलास?’

पाऊस असा आला की वैताग येतो. राग येतो. जीवाचा संताप संताप होतो. आपण पावसाला शिव्या-शापही देतो, तरी पण आपण त्याला ‘येऊ नको’, असं काही म्हणत नाही. आपण ‘ये रे, ये रे पावसा’ असंच म्हणत राहतो.

पाऊस आपण शरीराच्या डोळ्यांनी बघतो. मनाच्या डोळ्यांनी अनुभवतो आणि काळजाच्या डोळ्यात त्याच्या आठवणी साठवून ठेवतो.

पाऊस येतो. काही काळ आपल्यासोबत रहातो आणि नंतर निघून जातो, पण खरच का तो निघून जातो? धन-धान्याच्या, शाक- भाज्यांच्या, फळा-फुलांच्या, नदी-नाले-विहीरीतील पाण्याच्या रूपात तो निरंतर आपल्याजवळ असतोच ना!

© उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मन… दिसत नसलेलं जग! ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ मन… दिसत नसलेलं जग! ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

मनात खूप काही साठलेलं असतं…

 

काही न बोललेले शब्द,

काही न ओघळलेले अश्रू,

काही हरवलेली स्वप्नं,

तर काही हसऱ्या चेहऱ्यामागे लपवलेलं दुःख…

मन दिसत नाही.

पण ते आपल्या डोळ्यांतून, शब्दांतून आणि वागण्यातून कळतं.

कधी मन आभाळाएवढं मोकळं असतं…

तर कधी स्वतःच्याच आत हरवलेलं!

प्रत्येक शांततेला समाधानाचं नाव नसतं. प्रत्येक हास्यामागे आनंद असतोच असंही नाही. काही वेदना शब्दांपलीकडच्या असतात… आणि काही माणसं गर्दीतही एकाकी असतात!

मनालाही हवी असते एक जागा—

जिथे मुखवटा उतरवता येईल,

मन मोकळं करता येईल,

आणि निःशब्दपणेही समजून घेतलं जाईल.

शेवटी, मन निरोगी असणं म्हणजे नेहमी आनंदी असणं नव्हे; दुःखातही स्वतःला हरवू न देणं… आणि गरज पडल्यास आधार स्वीकारता येणं!

आज जागतिक मानसिक आरोग्य दिनी मनात एकच विचार रुंजी घालतो—

– – चेहरे वाचणाऱ्या या जगात, मनं समजून घेणारी माणसं वाढतील का?

🌿 मन जपूया… माणुसकी फुलवूया! 

जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

☆

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नवरात्र विशेष – लक्षवेधी ललना : सामान्य स्त्रिया : असामान्य जगणे – लेख क्र. १  ☆ वीणा कुलकर्णी ☆

वीणा कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ नवरात्र विशेष – लक्षवेधी ललना : सामान्य स्त्रिया : असामान्य जगणे – लेख क्र. १ ☆ वीणा कुलकर्णी ☆

मदतनीस….

रोजच्या आयुष्यातली ही एक महत्वाची स्त्री.

 

दुसऱ्यांची घरं स्वच्छ करताना ती स्वतःच्या दुःखावर धूळ कधीच साचू देत नाही. नेहमी आनंदी.

दुसऱ्यांचा संसार सावरताना स्वतःचा संसारही सांभाळते.

मुलाबाळांची देखभाल, शिक्षण याकडे जमेल तसे व झेपेल त्यापेक्षा अधिक काम करण्याची तिची तयारी असते.

तिच्या हातांना विश्रांती कमी, पण जबाबदाऱ्या अधिक.

तिच्याही मनात स्वप्नं असतात,

अपेक्षा असतात.

तिला सणवार आवडतात,

हौसमौज हवी असते.

नट्टापट्टा हवा असतो.

 

आपण दररोज तिच्या 

येण्यास गृहीत धरून 

आपल्या कामाचे नियोजन करतो.

 

तिच्या अनुपस्थितीत तिच्या 

वेळेची आणि श्रमांची किंमत आपण ओळखतो.

 

ती केवळ मदतनीस नाही, तर कुटुंबाचा आधार आहे. ती एकदा आली की 

घराचे रूप बदलून जाते.

त्याचे मोल कशात नाही.

आपल्या 

रोजनिशीत तिच्या येण्याची 

नोंद खूप 

महत्वाची असे हे व्यक्तिमत्त्व.

 

ती पण आपल्यासारखे 

स्वाभिमानाने जगण्यासाठी 

धडपड करत आहे.

तिच्या स्वाभिमानाला 

आपण सन्मान देऊ या का?

 

तिच्यातही एक दुर्गा आहे. !

☆

© वीणा कुलकर्णी

संपर्क : G.503 ऋतुरंग श्रावण सोसायटी। अरण्येश्वर, पुणे 411 009

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्वातंत्र्याच्या इतिहासातील हरवलेली स्त्री-पाऊलवाट…प्रीतिलता वड्डेदार – लेख क्र. ३ ☆ मंजिरी येडूरकर ☆

मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्वातंत्र्याच्या इतिहासातील हरवलेली स्त्री-पाऊलवाट… प्रीतिलता वड्डेदार – लेख क्र. ३ ☆ मंजिरी येडूरकर ☆

प्रीतिलता वड्डेदार

यांचा जन्म ५ मे १९११ रोजी सध्याच्या बांगलादेशातील ढालघाट येथे झाला. त्या‌ अतिशय हुशार होत्या. इंटरमिजिएट परीक्षेत पहिला क्रमांक पटकावल्यानंतर त्या कलकत्त्याला आल्या. तेथे त्यांनी ब्रिटिश सरकार विरोधी कारवायात सहभाग घ्यायला सुरुवात केली होती. शिक्षणाला तेवढेच महत्त्व असल्याने, त्यांनी मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली व एका शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करू लागल्या.

१९३० च्या दशकात बंगालने गांधीजींच्या अहिंसेच्या विचारांना नाकारले होते. त्यामुळे तेथे सशस्त्र संघटना उदयाला आल्या. लहानपणापासूनच शूर स्वातंत्र्य सेनानी राणी लक्ष्मीबाई यांचा त्यांच्यावर प्रभाव होताच. त्यामुळे जेव्हा स्त्रियांना सशस्त्र क्रांतिकारी गटात घेऊ नये असा प्रवाह होता, तेव्हा त्या म्हणाल्या, ” स्वातंत्र्याच्या लढ्यात पुरुष व स्त्रिया असा भेदभाव कसा केला जाऊ शकतो? स्त्रियांनी शस्त्र उचलणे ही आपल्या देशात काही नवीन गोष्ट नाही. ज्या ज्या देशात क्रांती यशस्वी झाली तेथे शेकडो स्त्रियांचा सहभाग होता. मग भारतातच का विरोध असावा. स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी सक्षम मानणे अन्याय कारक नाही कां? ही कल्पना दूर झाली पाहिजे. म्हणजे मग बघा, या सशस्त्र क्रांतिकारी संघटनेत हजारोंनी स्त्रिया सामील होतील. ” त्यांच्या ह्या विचारांना खरोखरीच बळ मिळाले. त्यांनी लढण्याचे, हल्ला करण्याचे, नेतृत्व करण्याचे, प्रशिक्षण घेतले. त्यांचा सूर्य सेन यांच्या ‘युगांतर’ गटाच्या ढालघाट छावणीत प्रवेश झाला.

काही लोकांचा महिलांच्या सहभागाला विरोध होता पण सूर्यसेन यांच्या मते शस्त्रे वाहून नेण्यास महिला अधिक उपयुक्त ठरतात कारण पुरुषांच्या इतका स्त्रियांवर संशय घेतला जात नाही. रामकृष्ण बिश्वास हे क्रांतिकारक त्यावेळी तुरुंगात होते. पण प्रीतिलता तो आपला लहान भाऊ आहे, त्याला भेटतो आहोत, असे दाखवून त्यांना तुरुंगात वरचेवर भेटत होती व त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवत होती. त्यांच्याबरोबर बोलून धाडींचे आणि हल्ल्याचे कट रचले जात होते. अनेक धाडी व हल्ल्यांमध्ये तिने सक्रिय सहभागही घेतला. पहिल्यांदा जरी अशा प्रकारे ब्रिटिशांना फसवण्यासाठी त्यांचा प्रवेश झाला असला तरी त्यांच्यातील कुशल नेतृत्व गुण, धैर्य दिसून आल्यामुळे त्या हळूहळू उच्च पदावर पोहोचल्या. १८ एप्रिल १९३० ला चित्तगोंगच्या शस्त्रागारावर प्रीतिलताच्या नेतृत्वात हल्ला केला गेला. या हल्ल्यात त्या टेलिफोन लाईन्स व टेलीग्राफ कार्यालय नष्ट करण्यात यशस्वी झाल्या.

१९३१ ला बिस्वास यांना फाशी झाली आणि प्रीतिलता यांच्या क्रांतिकारी विचारांना जास्तच बळ मिळाले. जेव्हा एक स्त्री कोणाचा जीव घेऊ शकेल का असा प्रश्न निर्माण व्हायचा तेव्हा त्या म्हणायच्या, ” जेव्हा मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी माझा जीव द्यायला तयार आहे. तेव्हा मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोणाचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाही. ” त्यांच्या हृदयात धगधगणारा सूड, देशभक्तीची आग दिसून येत होती.

१३ जून १९३२ मध्ये त्यांची सूर्यसेन यांच्याबरोबर गुप्त भेट ठरली होती. भेटायला त्या लपतछपत गेल्या. पण ब्रिटिश सैनिकांना संशय आल्याने त्या जागेला सैनिकांनी वेढा घातला. त्यामुळे तेथे चकमक झाली. कांही क्रांतिकारी मारले गेले. पण सूर्यसेन व प्रीतिलता निसटण्यात यशस्वी झाले. ब्रिटिश अधिकाऱ्यांना तिची माहिती मिळाली व आता मोस्ट वॉन्टेड च्या यादीत तिचे नाव गेले.

ब्रिटिशांसाठी असलेला एक पहारतली युरोपियन क्लब होता. या क्लबच्या बाहेर एक फलक होता. त्यावर लिहिले होते, ‘या क्लब मध्ये कुत्री व भारतीयांना प्रवेश नाही’ सूर्य सेन यांचे लक्ष या क्लब ने वेधून घेतले आणि हल्ला करून तो क्लब नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. या हल्ल्याचे नेतृत्व प्रीतिलताकडे होते. ती पंजाबी माणसाच्या वेशात होती. त्यांनी क्लब वर हल्ला करून तो पेटवून दिला. ज्यावेळी तिथे चाळीस एक लोक बसले होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार सुरू केला आणि नेतृत्व करण्यासाठी सर्वात पुढे असणाऱ्या प्रीतिलताला गोळी लागून ती जखमी झाली. आता आपण पकडले जाणार हे समजल्यामुळे तिने जवळच ठेवलेली सायनाईड ची गोळी खाल्ली व वयाच्या फक्त एकविसाव्या वर्षी राष्ट्रासाठी स्वतःचे बलिदान दिले.

या हल्ल्याच्या अगदी आदल्याच दिवशी त्यांनी आईला पत्र लिहिले होते त्यात त्या म्हणतात, ” आई असा आक्रोश करू नको. मी सत्यासाठी, स्वातंत्र्यासाठी मरणार आहे. यात तुला आनंद वाटत नाही कां? देश गुलामगिरीत आहे. इंग्रजांच्या अत्याचारामुळे जनता त्रस्त आहे. आपल्या मातृभूमीचा अपमान करीत आहेत. ती बेड्यांच्या ओझ्याखाली वाकली आहे. हे सर्व तू मुकाट्याने सहन करणार आहेस कां? आपण काहीतरी करायला नको कां? तू स्वातंत्र्यासाठी तुझ्या एका मुलीचा बळी देऊ शकत नाहीस कां? “

धन्य ती आई आणि धन्य तिची करारी मुलगी!!

– क्रमशः भाग ३   

© मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काळ बदलला…. भावना त्याच आहेत… – लेखक : सुश्री ज्योती निंबाळकर ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ काळ बदलला…. भावना त्याच आहेत… – लेखक : सुश्री ज्योती निंबाळकर ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

☆

“तुमची बहीण स्वतः गाडी चालवू शकते, मग तिला माहेरून आणायला भाऊ २०० किलोमीटर का जाईल? ” मुग्धाने अमोलला हा प्रश्न विचारला… तिला वाटत होतं, हा जुनाट रिवाज आहे. पण काही तासांनी तिलाच जाणवलं की, ती फक्त एक प्रथा नव्हती… त्यामागे बहिणीला मिळणारी आपलेपणाची भावना होती.

“अहो तुम्ही माझे पती आहात, समजदार आहात म्हणून सांगते… आजकाल मुली किंवा बहिणींना माहेरून आणणं-नेणं ही प्रथा जवळजवळ बंद झाली आहे.

आजच्या काळात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. तुमची बहीण सायलीसुद्धा मोठ्या कंपनीत काम करते. तिच्याकडे स्वतःची गाडी आहे. मग तुम्ही दोनशे किलोमीटर गाडी चालवत तिला आणायला का जाता? ”

मुग्धाने अमोलला समजावलं.

अमोलच्या हातात गाडीची चावी होती. तो काही क्षण शांत राहिला.

“तुझं म्हणणं बरोबर आहे… पण यावेळी राखीसाठी तिला स्वतः घेऊन यावं, असं मनापासून वाटत होतं. लहानपणी बाबा आत्याला आणायला जायचे, तेव्हा किती आनंद व्हायचा… ते आठवतंय. ”

मुग्धा म्हणाली,

“अहो, आता काळ बदलला आहे. फोन आहे, गाडी आहे… सगळं सोपं झालंय. तिला स्वतः येऊ द्या. ”

अमोलने सायलीला फोन केला.

“ताई, तू उद्या स्वतःच्या गाडीने ये. मला ऑफिसमधून सुट्टी घेणं जरा अवघड आहे. ”

सायली काहीवेळ शांत झाली.. “हो रे अमोल… काही हरकत नाही. मी येते, ” सायलीने शांतपणे उत्तर दिलं.

दुसऱ्या दिवशी सायली स्वतःची गाडी चालवत माहेरी आली.

सगळ्यांना भेटून ती हसत होती, बोलत होती… पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद काहीसा अपुरा वाटत होता.

सायंकाळी सगळे अंगणात बसले होते. तेवढ्यात शेजारच्या घरासमोर एक रिक्षा थांबली.

त्यातून एक साधीशी मुलगी उतरली. तिचा भाऊ तिचं सामान घेऊन आला होता.

ती भावाच्या पाठीवर हलकीशी थाप मारत हसून म्हणाली,

“किती बोलतोस रे तू! पूर्ण रस्ताभर माझं डोकं खाल्लंस! ”

दोघेही हसत घरात गेले.

सायली मात्र त्या दोघांकडे एकटक पाहत राहिली.

तिच्या हातातला चहाचा कप तसाच राहिला.

थोड्याच वेळाने ती उठली आणि खोलीत गेली.

मुग्धाला काहीतरी जाणवलं. ती तिच्या मागे गेली.

खोलीत सायली जुन्या फोटोकडे पाहत रडत होती.

मुग्धाने तिच्या जवळ बसत विचारलं,

“ताई, काय झालं? ”

सायलीने डोळे पुसले.

“मुग्धा… तुला माहीत आहे का, स्वतःच्या पायावर उभं राहणं चांगलं असतं… पण कधी कधी ते खूप एकटंही करतं. ”

मुग्धा शांतपणे ऐकत राहिली.

सायली म्हणाली,

“आज मी माझ्या महागड्या गाडीतून एकटी आले. गाडीमध्ये एसी होता, संगीत होतं, आराम होता… पण तो आनंद नव्हता, जो लहानपणी अमोलसोबत साध्या बसमधून येताना मिळायचा.

मला गाडी चालवायला कुणाची गरज नाही. मला कुठेही जायला कुणाची गरज नाही.

पण… माझ्या माहेरी येताना मला माझ्या भावाची गरज होती.

भाऊ बहिणीला घ्यायला येतो, तेव्हा तो फक्त गाडी चालवत नसतो…

तो तिला सांगत असतो—

‘तू आमच्यासाठी अजूनही तितकीच खास आहेस. ’

रस्त्यात होणाऱ्या गप्पा, जुन्या आठवणी, भांडणं, हसणं… हे फोनवर कुठे मिळतं?

आज मी लवकर पोहोचले खरी… पण तो प्रवास खूप एकटेपणाचा होता. ”

मुग्धाच्या डोळ्यांतही पाणी आलं.

तिला जाणवलं… ती ज्याला जुनाट प्रथा समजत होती, त्यामागे कदाचित एक सुंदर भावना दडलेली होती.

तिने सायलीचा हात हातात घेतला.

“ताई, मला माफ करा. मी फक्त सोय आणि व्यवहार पाहिला… पण नात्यांची ऊब पाहिलीच नाही. ”

सायलीने तिला मिठी मारली.

“काही नाही गं… काळ बदलतो, पण काही भावना बदलत नाहीत. ”

दुसऱ्या दिवशी सायली परत जाण्यासाठी निघाली.

तिने गाडीची चावी हातात घेतली.

तेवढ्यात मुग्धाने तिच्या हातातून चावी घेतली आणि अमोलकडे फेकली.

अमोलने चावी पकडली.

“गाडी काढा. ताईला तुम्ही सोडायला जाणार! ”

अमोलच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

“अगं, कालपर्यंत तूच म्हणत होतीस…”

मुग्धा हसत म्हणाली,

“मी म्हणाले होते काळ बदलला आहे… पण भावना थोड्याच बदलल्या आहेत! ”

सायलीच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.

ती म्हणाली,

“धन्यवाद मुग्धा… आज तू मला माझं माहेर पुन्हा दिलंस. ”

गाडीत बसल्यावर अमोलने विचारलं,

“ताई, आठवतंय का? लहानपणी तुझ्या बाहुलीचा पाय मी तोडला होता…”

“अरे! तूच तोडला होतास! ” सायली हसत म्हणाली.

“नाही गं, तो आधीपासूनच तुटला होता! ”

दोघांचं हसणं गाडीत घुमलं.

दोनशे किलोमीटरचा तो प्रवास कदाचित वेळ आणि पेट्रोल घेणारा होता…

पण त्या प्रवासात भाऊ-बहीणीचं नातं पुन्हा जिवंत होत होतं.

कधी कधी एखादी व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी असते म्हणून तिला कुणाची गरज नसते असं नाही…

काही नाती गरजेसाठी नसतात, ती फक्त आपलेपणाची जाणीव करून देण्यासाठी असतात.

☆

लेखिका: ज्योती निंबाळकर

प्रस्तुती :  प्रफुल्ला शेणॉय

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares