☆ ऐसे हळुवारपणे…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
ऐसे हळूवारपण…
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आणि माझी एक लग्न झालेली मैत्रीण सुमती, तिच्या घरी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत होतो. नागपूरचे उन्हाळ्याचे दिवस. कडक उन्हाळा पण कुलरमध्ये आम्हाला दोघीनाही घुस्मटल्यासारखं व्हायचं, म्हणून चक्क खिडक्या उघड्या ठेऊन आम्ही पंखे लावून बसायचो.
ज्ञानेश्वर महाराज पहिल्याच अध्यायात सांगतात,’ अध्यात्म शिकायला पाहिजे ते ‘चकोर तलग्यासारखं’ – चकोराच्या पिल्लासारखं! त्याप्रमाणे हळूवार मन करून ही कथा ऐका. चांदणं पिऊन जगणारा हळूवार चाकोर, त्याची पिल्लं – म्हणजे किती नाजूक कल्पना. हळूवारपणाच्या या व्याख्येनेच वाचतावाचत्ता आम्ही मुग्ध झालो. क्षणभर स्तब्ध होऊन बाहेर पहात होतो. रस्त्यावर शुकशुकाट होता. काम्पौडच्या बाहेर एक बाई होती. नऊवारी पातळाचा पदर डोक्यावरून घेतलेला. डोक्यावर पाटयाचा दगड, हातात अवजारांची पिशवी, पायात टायरच्या रबराच्या केलेल्या चपला. उन्हाने दमलेली होती. घामाघूम झाली होती. बाहेरच्या झाडाखाली ती थांबली. डोक्यावरचा पाटा खाली ठेवला. पदराने घाम पुसत व त्यानेच वारा घेत ती उभी होती. रस्त्यावरच्या त्या झाडाजवळ बसायला जागा नव्हती. ती तशीच उभी राहिली.
सुमती पटकन उठली, बाहेर जाऊन त्या बाईला घरात बोलावून आणलं.
बाई व्हरांड्यात आली. उन्हातून आल्यावर नुसतं पाणी पिऊ नये म्हणून सुमतीने तिला गुळ आणि पाणी दिलं. बाई खुश झाली. ‘बाई, केव्हढ उन्ह आहे बाहेर…’ बाईच्या रापलेल्या चेहऱ्याकडे आणि घट्टे पडलेल्या हातांकडे पहात सुमती म्हणाली. बाईचं जळून गेलेले नाजूकपण ती न्याहळत होती. छिन्नी हतोडा घेऊन दिवसभर काम करणारी ही बाई ,वयाने फार नसावी, पण उन्हाने का परीस्थीतीने वाळली होती. पाटा फार घासला की त्याला पुन्हा ठोके पाडून घेतात ते ‘पाटे टाकवण्याच’ काम ती करीत होती.
‘किती घेता पाटयाचे?’
‘दोन रुपये?’
‘अशी किती कामं मिळतात दिवसाची तुम्हाला?‘
‘दहा मिळाले तर डोक्याहून पानी’ ती
‘नवरा आहे?’
‘नाही, सोडचिट्ठी दिली त्याने, दुसरा पाट बी मांडला.’ किती सहज ती ‘डिव्होर्स’ बद्दल बोलत होती? उन्हात रापता रापता हिच्या संवेदनाही रापल्या असतील का?
‘मुलं आहेत?’ सुमती
‘दोन हायेत.’ ती
‘शाळेत जातात?’
‘कधी मधी! पाऊस झाला अन् शेण गोळा कराया न्हाई गेले तर सालेत जातात. कारप-रेशनच्या’
२० रुपये रोजात दोन मुलं आणि ही बाई रहातात. त्यासाठी ही बाई दिवसभर उन्हात हिंडते. मुलं जमलं तर जातात शाळेत. नवरा नाही. किती अवघड आयुष्य!
सुमतीच्या डोळ्यात पाणी आलं. ‘ऐसे हळूवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल…’ चा मला साक्षात्कार होत होता. सुमतीची सहृदयता मला माहीत होती. घरची मोलकरीण, पोळयावाली, धोबी हे सगळे जणूकाय तिचे ‘कुटुंबिय’च होते. पण ही कोण कुठली बाई, तिच्या कष्टांचाही सुमतीला ताप होत होता. ‘केळीचे सुकले बाग असुनिया पाणी’ तशी इतरांच्या दु:खात ही कोमेजते.
‘पन्ह घ्याल?’ सुमतीने तिला विचारलं.
‘नाही बाई, काम शोधाया पाहिजे. ‘येर’(वेळ) घालवून कसं व्हईल?’
‘एक मिनिट थांबा, माझा पाटा टाकवून द्या’ सुमतीने आतून पाटा आणला. तिच्यासाठी काम काढलं. त्याचे २ रुपये झाले. सुमतीने तिला पाच रुपये दिले
‘बर, थांबा एक मिनिट’ आणखी काम द्यायचं, म्हणून सुमतीने आतून वरवंटा आणला.
‘याला टाकवा.’ तिने वरवंटा पुढे केला.
बाईने तो वरवंटा चटकन जवळ घेतला. छातिशी घट्ट धरला. आणि म्हणाली, ‘’लेकरू आहे ते! त्याला टाकवत नाही.’’ जणू काय एखाद्या बाळाला गोंजारावं तशी ती त्याला गोंजारत होती. बारशाच्या वेळी गोप्या म्हणून वरवंटा ठेवतात, तो संदर्भ! अशा ‘लेकराला’ छिन्नी हातोड्याचे घाव घालायचे या कल्पनेनेच तिच्या अंगावर शहारे आले होते. अक्षरशः दगड फोडण्याचे काम करणारी ही बाई- हळूवारपणे गोप्याला गोंजारत होती. त्या दगडाकडे मायेनं पहात होती. जसं काही झाल्या प्रकाराबद्दल त्याची माफी मागत होती. नमस्कार करावा तसा तो वरवंटा तिने डोक्याला लावला व नंतर परत दिला.
‘ऐसे हळूवारपण जरी येईल’ … चकोरतलग्याचं हळूवारपण त्या दोघींच्या रुपाने माझ्यापुढे जिवंत उभं होतं.
– अग्रेषित.
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्यदिनानिमित्त लेख – वृत्तपत्र स्वातंत्र्य … ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆
भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. भारतीय संविधान हे एक श्रेष्ठ संविधान आहे. या संविधानानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला आचार, विचार, संचार यांचे स्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य,भाषा स्वातंत्र्य वगैरे वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्ये मिळाली आहेत. तो आता प्रत्येकाचा हक्क झाला आहे.
त्यात लेखन स्वातंत्र्यामध्ये वृत्तपत्रातील लेखन हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. कारण देशातील सर्वच भागात वृत्तसेवा सुरू आहे. सगळीकडे वृत्तपत्रे प्रकाशित होतात. ती देशात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे त्या त्या वृत्तपत्रातील विचारही तिथे पोहोचतात. वृत्तपत्रे हा भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. त्यासाठी वृत्तपत्रात लेखन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आवश्यक आहे.
पण हे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे! हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यावरही कायद्याची काही बंधने आहेत. तसे वृत्तपत्र स्वातंत्र्याचे रक्षण आणि नियंत्रण करणारे कायदे संविधानात अस्तित्वात आहेत. शिवाय बंधने घालणारे कायदेही आहेत. प्रत्येक व्यक्तीला ते लागू आहेत.
वृत्तपत्रे छापणे व वितरित करणे हा केवळ धंदा नाही तर ते लोकांपर्यंत व्यवस्थितपणे विचार पोहोचविणे ,त्यांचे विचार जाणून घेणे यांचे एक उत्तम माध्यम आहे.त्यासाठीही कायद्याने संरक्षण आहे पण त्याचा अनिर्बंध वापर गेल्या काही वर्षांपासून होत आहे.
छापलेली वृत्तपत्रे लोकांपर्यंत वितरित करण्याचा ही वृत्तपत्र काढणाऱ्या लोकांना हक्क आहे. तरीही न्यायालयाचा अवमान होईल,कुणाची अब्रूनुकसानी होईल,असे काहीही करण्यास पुरता मज्जाव आहे.अश्लीलता विरोध,गोपनीयता हे सरकारचे तसेच लोकांचे अधिकार आहेत.त्याविरूद्ध आक्षेपार्ह मजकूर छापणे हा कायद्याने गुन्हा ठरू शकतो.
आणीबाणी जाहीर झाली होती तेव्हा एकदा सारी बंधने झुगारून देऊन वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आली होती. आता सुद्धा काही राजकारण्याचा हस्तक्षेप म्हणा किंवा वरदहस्त म्हणा या काही वृत्तपत्रांना मिळालेला आहे. त्या काही वृत्तपत्रांमधून अगदीच एकतर्फी बातम्या छापल्या जातात. हे अत्यंत चुकीचे आहे. असे न करता वृत्तपत्रांनी सर्वच प्रकारच्या विचारांना प्राधान्य दिले पाहिजे.
लोकशाहीचा चौथा महत्वाचा हा स्तंभ या दृष्टीने त्यांनी हक्कांबरोबर कर्तव्याचेही पालन करायला हवे. कायदेशीर बंधने पाळलीच पाहिजेत.
बाकी वृत्तपत्रांचा खप वाढविण्यासाठी समाजाचा कल पाहून ती छापली गेली पाहिजेत. तिथे निरपेक्षपणा अपेक्षित आहे.
त्यानुसार वृत्तपत्रे छापणे, वितरण करणे, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हे भारतीय लोकशाही मध्ये कायद्याने दिलेले स्वातंत्र्य आहे. ते गैर मार्गाने वापरले जाऊ नये आणि विपरीत गोष्टी पसरविण्यासाठी उपयोगात येऊ नये.हीच इच्छा !!
आपल्या भुकेल्या मुलाला दोन मिनटात मँगी खाऊ घालणारी आई.फक्त कमी वेळेचे गणित मांडते.पौष्टिक घटक, गुणवत्ता लक्षात घेत नाहीं! तोच प्रकार खेळात.. पाच दिवसांची मँच..एक दिवसावर…वीस षटकांवर आली. कमी वेळात ..जास्त मँचेस असे गणित मांडले जाते.
….रंगमंचावर पण तेच चित्र. पाच अंकी नाटक. तीन…दोन…एकांकीवर आले. नंतर पंधरा मिनिटांची नाटुकली. संख्यात्मक विचार .काळाचे भान ठेऊन वेळेची बचत करणे. ही सोय ठरली !
८ मार्च चे औचित्य साधून..भारतात प्रथमच रंगमंचावर रुजणार …दोन मिनटांच्या नाटिका. अन् त्या ही महिलांद्वारे..
आता फक्त दोन मिनटात.. साभिनय स्वत:ला सिद्ध करणे. एकपात्री / सामुदायिक, संपूर्ण मुभा आहे!
सामाजिक विषयांचे अनेक पदर फक्त दोन मिनटात गुंफायचे… आशय महत्वपूर्ण.
विषयात खोलवर डुंबायचे नाहीं!! शिवाय कमी वेळात अनेकांना संधी मिळणार ! तोंडाचा रंग पुसण्याची जरुरी नाहीं. दोन मिनटाचा खेळ खेळून.. एका दिवसात अनेक भरा-या घेऊन उच्चांक गाठु शकता. चला तर मग… बांधा पदर… व्हा ..अभिनेता 🎭 / अभिनेत्री 🎭 …
आपण एकेक गंमती बघत रहायचे.
“मी दोन मिनटांचे एका दिवसात पन्नास प्रयोग केले”
नटाने फुशारकी मारायची ..
आणि आपण त्या दोन मिनिटाच्या प्रयोगासाठी इंधन, वेळ, पैसे खर्चून जायचे.
आपली किमान 20 मिनिटे घालवायची…….असो.
आपण शुभेच्छा देऊया.
लेखिका उन्नती गाडगीळ
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ विचार–पुष्प – भाग 15 – पारतंत्र्य आणि धर्म ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
नरेंद्रनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले तो काळ १८८० ते १८८४ च होता. त्यावेळी भारत वेगळ्याच परिस्थितीतून जात होता. सभोवताली अनेक घटना घडत होत्या. चळवळी चालू होत्या. बंगाल मद्रास आणि महाराष्ट्रात राजकीय जागृती होत होती. इंग्रजांनी याचा फायदा घेत आपली राजकीय पकड आपल्या देशावर घट्ट बसवली .त्यांना राजसत्ता मिळाली आणि आपल्याला गुलामगिरी वाट्याला आली होती. या सर्व घडामोडी नरेंद्र च्या संवेदनशील मनाने पाहिल्या होत्या. पण आपल्यावर राज्य करणारे परकीय आहेत याची खंत फक्त मोजक्या सुशिक्षित वर्गालाच होती. हे लोक बुद्धिजीवी होते. लढवय्ये नव्हते. जे खरे देशभक्त होते त्यांना या गुलामगिरीची जाणीव झाली आणि विचार पुढे आला की, आपल्या समाजातली दुर्बलता नष्ट झाली पाहिजे, ते करायचे असेल तर, नव्या पिढीला बलोपासना करून शरीर सुदृढ करायला प्रवृत्त केले पाहिजे. तो मार्ग होता व्यायामाचा .त्यामुळे यासाठी ठिकठिकाणी आखाडे आणि व्यायामशाळा निर्माण झाल्या होत्या. व्यायाम करून शरीर कमावणे हा एक देशभक्तीचा मार्ग आहे असे पुढारी लोकांना वाटत होते.
ते तरुणांना सामर्थ्यसंपन्न होण्याचा संदेश देत होते. याचा परिणाम नरेंद्रवरही झाला. तो पण आखाड्यात जाऊ लागला होता. याच सुमारास हिंदुत्ववादी दृष्टीकोण बाळसे धरत होता. आपण आपल्या धर्माची जाण ठेवली पाहिजे अशा विचाराने नरेंद्र प्रेरित झाला होता. तो वेगवेगळ्या व्यायाम शाळेत, हिंदू महामेळ्यात, आणि व्यक्तींकडे जात असे. या देशाच्या आजवरच्या संस्कृतीचा शिल्पकार असलेला, आणि भविष्याला आकार देऊ पाहणारा समाज केवळ हिंदूंचाच होता. त्यांच्या कार्यक्रमालाही नरेंद्र जाऊ लागला. पण या सुमारास भारतात धर्माची अवस्था अत्यंत शोचनीय, काळजी करण्यासारखी झाली होती. धर्माच्या नावाखाली कितीतरी गोष्टी उघडपणे चालत असत. कशाचेही ज्ञान नाही. संत- सत्पुरुषांच्या शिकवणुकीचा संबंध नाही. बंगालची तर अवस्था इतर प्रांतांपेक्षा अजूनच वाईट होती. याचे मुख्य कारण होते की दुर्गा आणि काली देवतांच्या उपासने मध्ये पशुहिंसा व्हायची. महत्वाच्या उत्सवांच्या वेळी शेकडो पशुचा बळी दिला जायचा. त्यात सर्व लोक सामील व्हायचे. आनंद साजरा करायचे. आपण खूप पुण्ण्याचे काम करत आहोत असे त्यांना वाटायचे.
याचा सार्वजनिक सामाजिक आविष्कार होता तो म्हणजे, सणाच्या वेळी गटागटाने किंवा मिरवणूक काढून रस्त्यावरून जाताना अत्यंत ओंगळवाणं, बीभत्स, अश्लील अशी गाणी म्हणणे, त्यात प्रतिष्ठित थोरा मोठ्यांनी सहभागी होणे व्हायचे. आपल्या वागण्याचा लहान कोवळ्या वयाच्या मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार पण त्यांच्या मनात यायचा नाही. धर्माच्या क्षेत्रात अज्ञान आणि ही विकृती नरेन्द्रने स्वतच्या डोळ्याने पाहिली. या सर्व पार्श्वभूमीचा परिणाम त्याच्या तरुण मनावर होणारच होता. या वेळी राज्यकर्ते महाविद्यालयात बायबल ची शिकवण देऊ लागले. मिशनरी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करू लागले. आणि रस्त्यारस्त्यात हिंदू धर्माची नालस्ती आणि देवदेवतांची टिंगल करत फिरू लागले. त्याउलट हिंदू चे उज्ज्वल असे तत्वज्ञान सांगणारे ग्रंथ तरुणांच्या डोळ्यासमोर सुद्धा पडत नसत. त्यांना आपल्या ग्रंथांचा साधा परिचयही नव्हता होत.नरेंद्रला मात्र लहानपणीच धार्मिक कथा, धार्मिक ग्रंथांचा, कथांचा आई आणि वडिलाकडून परिचय झाला होता.
आपल्याकडेही आज अशी विकृती आपल्या सण-उत्सवात पाहायला मिळते, आपलंच राज्य असूनसुद्धा. नुसतं गणेश विसर्जन मिरवणूक डोळ्यासमोर आणा. आठवा काय काय पाहायला मिळतं त्यात? आज तर आपण पारतंत्र्यात नाही, कुणाचं आपल्यावर राज्य नाही, आपला धर्म आपल्या हातात आहे. आपल्याला योग्य दिशा दाखवणारे आपणच आहोत. त्या काळात आपला धर्म टाकाऊ आहे आणि पाश्चात्य संस्कृती चांगली आहे असेच लोकांना वाटू लागले होते. नरेन्द्रने या बिघडलेल्या परिस्थितीचा विचार करतच पुढील मार्गक्रमण आखले होते. सामाजिक सुधारणा करण्यासाठीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते.
आताही आजच्या पिढीला आपले वेद, उपनिषदे, धार्मिक ग्रंथ आणि शिकवणूक याची कल्पना नाहीच. वाचन नाही. संस्कार नाहीत. विचारांना दिशा नाही. योग्य अयोग्य काय याचं योग्य दिशादर्शन नाही त्यामुळे मन भरकटतय . पाश्चात्य संस्कृती बरोबर वाटते. आजच्या तरुणांनी आपली संस्कृती कशी आहे याचा अभ्यास नक्कीच केला पाहिजे.
☆ दोन सुपुत्र भारतमातेचे… विलास डोळस ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
एक जण भारतीय “लोकशाहीला” शिस्त लावणारा तडफदार माजी “निवडणूक आयुक्त” “टी.एन.शेषन” तर दुसरा कोकण रेल्वे,दिल्ली मेट्रो रेल्वे, सारख्या चमत्काराचा निर्माता “मेट्रोमॅन” “ई.श्रीधरन” हे दोघंही आपआपल्या क्षेत्रात,टॉपचे अधिकारी तर होतेच,पण आप-आपल्या कामामुळे अख्ख्या देशाची व्यवस्था त्यांनी सुधारून दाखवली.
पण गंमत,म्हणजे हे दोघेही अधिकारी तुम्हाला खरं वाटणार नाही अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून एकाच वर्गात शिकत होते आणि पहिल्या नंबरा साठी त्यांच्यात त्या वेळी तुफान स्पर्धा चालायची.
“ई.श्रीधरन” यांनी एका मुलाखतीमध्ये त्याकाळातल्या काही आठवणी सांगितल्या आहेत.
“दोघेही मुळचे केरळचे”. १९४२ साली तिथल्या पलक्कड या गावातल्या सर्वात फेमस असलेल्या बेसल एव्हान्जीकल या मिशनरी हायस्कूलमध्ये “श्रीधरन” यांनी इंग्रजी दुसरी या वर्गात प्रवेश घैतला, “शेषन” आधी पासून त्याच शाळेत होते.वर्गात “शेषन” यांचा पहिला नंबर यायचा.
“श्रीधरन” यांनी आल्या आल्या त्या वर्षी “शेषन” यांना मागे टाकले,आणि
तिथूनच या दोघांची स्पर्धा सुरु झाली.”शेषन” है उंचीला कमी असल्यामुळे, वर्गात नेहमी पहिल्या बेंचवर बसायचे तर “श्रीधरन” उंच असल्यामुळे शेवटच्या बेंचवर. “शेषन” हे अतिशय अभ्यासू,कायम पुस्तकात डोकं खुपसून असायचे.या उलट “श्रीधरन” फुटबॉल आणि इतर खेळ खेळायचे.इंग्रजी मध्ये मात्र “टी.एन.शेषन” यांच्या तोडीस तोड असा, एकही विद्यार्थी अख्ख्या शाळेत कोणीही नव्हता.
बोर्डाच्या परीक्षेत “शेषन” यांनी “श्रीधरन” यांना एका मार्काने मागे टाकलं. १९४७ सालच्या SSIC बोर्ड परीक्षेत “शेषन” ४५२ मार्क मिळवून “पहिले” आले.तर “श्रीधरन” यांना “४५१ मार्क मिळाले” होते आणि त्यांचा दुसरा क्रमांक आला होता..
मार्कांसाठी कितीही जरी स्पर्धा चढाओढ असली तरीही “शेषन आणि श्रीधरन” ही जोडी तर तुटली नाहीच,उलट ते आणखीनच चांगले दोस्त झाले आणि त्यांच्या मैत्रीत खूपच वाढ झाली.
पुढे इंटरमेजीएटसाठी देखील व्हिक्टोरिया कॉलेजला दोघांनीही एकत्र अँडमिशन घेतलं.दोघांनी एकत्रच बसून झपाटून अभ्यास केला.
आख्खा मद्रास प्रांतामध्ये इंजिनियरिंगला प्रवेश मिळेल एवढे मार्क मिळवणारे ते फक्त दोघेच विद्यार्थी होते.
पण “टी.एन.शेषन” यांना मात्र आपल्या भावाप्रमाणे “आयएएस अधिकारी” बनायचं होत यामुळे त्यांनी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला नाही तर त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये फिजिक्स विभागात प्रवेश घेतला. “श्रीधरन” यांनी मात्र आंध्रमधल्या काकीनाडाच्या इंजिनियरिंग कॉलेजमधून सिव्हील इंजिनियरिंग पूर्ण केलं.
पुढे १९५४ साली युपीएससी परीक्षा पास होऊन “शेषन” यांनी “आयएएस” बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. याच काळात “श्रीधरन” यांनी इंडियन इंजिनियरिंग सर्व्हिसेसची एक्झाम देवून ते पास झाले आणि रेल्वेमध्ये भरती झाले.
“योगायोग” असा की हे दोघेही परत “ट्रेनिंगच्या” निमित्ताने इंडियन फोरेस्ट कॉलेज डेहराडून येथे एकत्र आले.. ते जवळ जवळ दोन-एक महिने “शेषन आणि श्रीधरन” एकमेकांच्या सोबत राहिले. त्या नंतर मात्र दोघांचे रस्ते कामानिमित्त कायम स्वरुपी वेगळे झाले.”शेषन” यांनी प्रशासकीय कारकिर्दीत एकामागून एक यश मिळवत त्यांनी भारताचे “मुख्य कॅबीनेट सचिव” बनण्यापर्यंत मजल मारली, हे भारतातील सर्वोच्च पद, त्यांना मिळाले.
१९८९ साली रिटायर झाल्यावर त्यांना निवडणूक आयुक्तपदावर नेमण्यात आलं, हे विशेष.
भारतात निवडणूक काळात आचारसंहिता,शिस्त आणि कडकपण राबण्यास “शेषन” यांनी घालून दिलेली शिस्त ही कारणीभूत ठरली,त्यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव झाला,सन्मान म्हणून त्यांना “मॅगसेसे” पुरस्कार देखील देण्यात आला.. तर इथे “श्रीधरन” यांनी कलकत्ता मेट्रो,कोकण रेल्वे,दिल्ली मेट्रो,कोची मेट्रो,लखनौ मेट्रो असे मोठमोठे अशक्यप्राय वाटणारे प्रोजेक्ट स्वतःच्या कर्तबगारीने व नेतृत्वाने पूर्ण केले.विक्रमी वेळेत सर्वोत्कृष्ट इंजिनियरिंगचे स्कील दाखवत “श्रीधरन” यांनी भारतीय रेल्वेचा संपूर्ण कायापालट करण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडली. त्यांना त्या बद्दल भारताचा सर्वोच्च “पद्मविभूषण” हा किताब सन्मान देण्यात आला.
मैत्रीत अनेकदा लोक स्पर्धा करतात,पण स्पर्धा असावी तर “शेषन-श्रीधरन” यांच्या प्रमाणे चांगल काम करण्याची.देशाला “नंबर वन” करण्यासाठी या दोन वल्लीनी “महान दोस्तांनी” जे औदार्य दाखवलं,आणि बुद्धी कौशल्यानी यशस्वी होवून दाखवलय.त्यांच्या या अलौकिक दैदिप्यमान कामगिरचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.त्यांचा हा आदर्श प्रत्येक तरूण तरूणींनी घ्यावा हे मात्र नक्कीच खरं आहे.
अशा ह्या भारत मातेच्या सुपुत्रांस सॅल्युट👍🙏.
“जय महाराष्ट्र” “भारत माता” की जय हो 🚩🇮🇳👏.
विलास डोळस.
vilasd712@gmail.com
संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
जागतिक हास्य दिन 🤡 विनोद आणि आपण !🤡 श्री प्रमोद वामन वर्तक
‘टवाळा आवडे विनोद’ हे विनोदाच्या बाबतीत खुद्द रामदास स्वामींनी साधारण सतराव्या शतकातच म्हणून ठेवले आहे, हे आपल्याला ज्ञात असेलच ! आणि जर ते तसं ज्ञात नसेल, तर आपला विनोदाचा पाया अजून कच्चा आहे, असं मी छातीठोकपणे म्हणू शकतो ! अर्थात जेव्हा त्यांच्या लेखणीतून हे वचन उतरले तो काळ, सामाजिक परिस्थिती आणि तेंव्हाची त्यांनी केलेली टवाळाची व्याख्या ही त्याच काळाला लागू होती, ह्या माझ्या वेगळ्याच संशोधनाशी आपण नक्कीच सहमत व्हाल !
मी असे म्हणतो आहे त्याचे कारण हे आहे, की टवाळ हा शब्द आजकाल कोणी वापरताना दिसतच नाही ! किंबहुना हा शब्द आताच्या काळी अस्तंगत झाल्यातच जमा आहे ! आत्ताचे जे काही विनोद आपण ऐकतो, बघतो अथवा एकमेकांस सांगतो, त्यांची जर पातळी बघीतली तर, टवाळ हा शब्द त्याच्या पुढे फार म्हणजे फारच मवाळ ठरावा !
विनोदाला एक पातळी असावी, तो कुठे, कधी, कोणा समोर आणि कसा सादर करावा हे एक शास्त्र आहे ! हे माझ्या प्रमाणे अनेकांचे मत असले, तरी या मता बद्दल दुमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा त्या हट्टी लोकांचा असा दावा असतो, की विनोद हा विनोद असतो, त्याला कसली आलीयं पातळी ? विनोदाला पातळीचे परिमाण लावून कसे चालेल ? मग त्यात गंमत ती काय ? वगैरे वगैरे. असो. ज्याला त्याला त्याची पातळी लखलाभ ! आपण उगाच कशाला आपली पातळी सोडून त्यांच्या सारखे खालच्या पातळीवर जा ?
फार पूर्वी कुठे तरी पुसटसे वाचल्याचे आठवतंय, की अलम दुनियेत कित्येक शतकांपूर्वी, म्हणजे मानवाला लिहिता वाचता यायला लागल्यावर, फक्त सतरा विनोद त्यांच्या मूळ स्वरूपात अस्तित्वात होते, एकमेकास सांगितले जात होते ! त्या नंतर जस जशी मानवाची विनोदबुद्धी बहरत गेली, फुलत गेली तसं तशी प्रत्येकाने आपापल्या परिने त्यात भर घातली अँड रेस्ट इज द हिस्टरी ! माझ्या विनोदाचा प्रकाश फार दूरवर पोहोचत नसल्यामुळे, या माझ्या वाचिक माहितीवर विनोदाचे जाणकारच जास्त प्रकाश टाकू शकतील !
टीव्हीवर सध्या ‘ईनोदी’ म्हणून ज्याचा गाजावाजा केला जातो अशा अनेक कार्यक्रमांनी, मालिकांनी नुसतं धुमशान घातले आहे ! डॉक्टरकी चालत नसल्याने, आपल्या एकट्याच्याच जीवावर एखादे चॅनल चालते, अशी ‘हवा’ ज्याच्या डोक्यात गेली आहे, त्याचा प्रोग्रॅम जरी चालू असला, तरी मी चॅनेल बदलतो आणि चक्क बातम्या बघणे पसंत करतो ! त्यात बातम्या देणाऱ्याची बातमी सांगण्याची पद्धत, बोलतांना कानावर पडणारे त्यांचे किंवा तिचे शुद्ध उच्चार किंवा स्क्रीनवरच शुद्ध मराठी वाचून माझी जास्त चांगली निखळ करमणूक होते ! हॊ, उगाच खोटं कशाला बोला !
विनोद आणि माणूस यांचे एक अतूट नातं आहे !
आपल्याला वरचं वाक्य थोडं खटकलं का ? तुमचं बरोबर आहे, नेहमी आपल्याला विनोद आणि मराठी माणूस यांचे एक अतूट नाते आहे, असे वाचण्याची सवय झाली आहे ! त्यात मी थोडा बदल केला इतकच ! कारण सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा विनोदबुद्धी असतेच असते, फक्त एखादा विनोद आकलन करायची कुवत कमी जास्त असल्यामुळे, त्याला एखादा विनोद कळण्यास वेळ लागतो, त्यामुळे त्याची हसण्याची प्रतिक्रीया त्याच्या आकलनशक्ती प्रमाणे उशिरा किंवा अजिबातच येत नाही ! याचा अनुभव आपण कधीतरी घेतला असेलच, बघा आठवून !
आपल्या मराठीत अनेकानेक दिग्गज विनोदी लेखक होऊन गेले, पण विनोद आणि पु.ल. आणि पु.ल. म्हणजेच विनोद, हे समीकरण माझ्या पिढीच्या एव्हढे डोक्यात गेले आहे, की ती जागा माझ्या मते, दुसऱ्या कोणास घेण्यासाठी किती काळ जावा लागेल, हे सांगणे कठीणच आहे ! पु.लंचे विनोदी लिखाण हे खरोखरच अजरामर आहे आणि हल्लीची काही तरुण मंडळीसुद्धा त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडली आहेत, पडत आहेत हे पाहून पु.लं. बद्दलचे आमच्या पिढीचे प्रेम सार्थकी लागले असंच म्हणावंसं वाटतं !
कुठल्याही मानसिक दुःखावर एखादी विनोदी कथा, कविता वाचणे, ऐकणे या सारखा रामबाण ऊपाय नाही, अस हल्लीच वैद्यक शास्त्र सुद्धा सांगत ! इतका विनोदाचा सकारात्मक परिणाम माणसाच्या मनावर होतो ही निखळ विनोदाची जादूच म्हणायची !
आज काल प्रत्येकालाच रोज कुठल्या ना कुठल्या विवंचना भेडसावत असतात, त्यामुळे सकारत्मक विचार करणारी माणसे रोजच्या जीवनात वावरतांना, घडणाऱ्या प्रत्येक घटनेत विनोद शोधात असतात ! अशा लोकांच्या बाबतीत इतर सामान्य लोक त्याला, “याला कुठल्याच गोष्टीचे गांभिर्य नाही, हा सगळ्या गोष्टी हसण्यावारीच नेतो” असे म्हणून नावं ठेवत असतात ! पण माझ्या मते अशा तऱ्हेने जगणारे लोकच, वरकरणी तरी इतरांना कायम आनंदी अथवा सुखी वाटतात, हीच तर खरी अशा लोकांच्या स्वभावातली मेख आहे !
आपणा सर्वांना सुद्धा असाच विनोदाचा सुंदर नजरिया, आपल्या रोजच्या जीवनात लाभो आणि आपले उर्वरीत आयुष्य सुद्धा हसत खेळत व्यतीत होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो !
बघता बघता नवीन वर्षाचा एक महिना संपत आला. हो, एप्रिल महिना संपत आला. आता म्हणाल, “मग नवीन वर्ष कसं?”
एप्रिल महिना हा काही इंग्रजी वर्षाचा पहिला महिना नाही. भारतीय कालगणनेनुसार चैत्र महिना हा वर्षाचा पहिला महिना असतो. चैत्र महिना हा एप्रिल च्या बरोबरीनेच सुरू होतो. दोन वेगळ्या कालगणना पद्धतीमुळे थोडाफार फरक पडतो. पण चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदु वर्षं सुरू होते ते याच महिन्यात. म्हणून नववर्षाचा एक महिना संपत आला असे म्हणणे फारसे चूक ठरत नाही. या पारंपारिकते बरोबर आधुनिक विचारानेही हा नववर्षाचा पहिला महिना ठरतो. एप्रिल महिन्यापासून आपले नवे आर्थिक वर्ष सुरू होते. त्याचा हा पहिला महिनाच ना ? या आर्थिक नववर्षालाही विसरून चालणार नाही.
तसा हा एप्रिल महिना, वातावरण हळूहळू तापवत नेणारा असला तरी या महिन्यात येणार्या विविध कार्यक्रमांमुळे तो सुसह्य होतो. याच महिन्याची सुरवात विजयाचे प्रतीक असणार्या गुढीपाडव्याने होते. रामनवमी, दासनवमी, हनुमान जयंती, तुकडोजीमहाराज जयंती, महावीर जयंती हे सर्व या चैत्र महिन्यात येणारे दिवस. म. फुले जयंती आणि डाॅ. आंबेडकर जयंतीचा ही हा महिना. तर शिवछत्रपतींची पुण्यतिथीही याच चैत्र महिन्यात असते. गुडफ्रायडे हा प्रभू येशूच्या स्मरणाचा दिवस येतो तो याच एप्रिल महिन्यात.
राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही या महिन्याचे महत्व आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारी भारताची मध्यवर्ती बॅंक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक(RBI) 1935 साली एक एप्रिलला स्थापन झाली. शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 05/04/1919 ला एस्. एस्. लाॅयल्टी हे वाफेवर चालणारे भारताचे स्वतःचे जहाज मुंबईहून इंग्लंडला रवाना झाले. त्या स्मृतीप्रित्यर्थ 5एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो. 07 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य समस्या व विचार करण्यासाठी 07/04/1948ला जागतिक आरोग्य संमेलन भरवण्यात आले. तेव्हाच जागतिक आरोग्य संघटनेची(WHO)स्थापना झाली व 1950 पासून हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. 15 एप्रिल हा जागतिक कला दिवस, सर्व कलांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा होतो. 21एप्रिल हा भारतीय नागरी सेवा दिन आहे. याच दिवशी 1947 साली त्यावेळचे गृहमंत्री सरदार पटेल यांनी नागरी सेवकांना संबोधित केले होते. पर्यावरण विषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्यासाठी
1970 पासून 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून पाळला जातो. 23 एप्रिल हा विल्यम शेक्सपियरचा स्मृतीदिन आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. 24एप्रिलला भारतीय पंचायत राज दिन 2010पासून साजरा होतो. मलेरिया आजाराविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने
25एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जाॅर्जेस नोव्हेर यांचा जन्मदिवस 29 एप्रिल. नृत्यकलेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी हा दिवस जागतिक नृत्य दिन या नावाने ओळखला जातो.
म्हणजे या एप्रिल महिन्याचे धार्मिक, पारंपारिक, सामाजिक, वैज्ञानिकदृष्ट्या व साहित्यदृष्ट्या महत्व आहे, वेगळेपणआहे. परंपरा, पर्यावरण, पुस्तक, कला अशा विविध प्रवाहांना एकत्र आणणारा हा एप्रिल महिना!
शिवाय वर उल्लेख केल्याप्रमाणे एप्रिल हा आर्थिक वर्षाचा पहिला महिना हे ही विसरून चालणार नाही. याच महिन्यात एका वर्षाचे आर्थिक नियोजन करावे लागते. हे एका वर्षाचे आर्थिक नियोजन आपले जीवन समृद्ध करू शकते. कारण एकदा संचय करण्याची सवय लागली की ती आयुष्यभर उपयुक्त ठरते. पूर्वजांनी म्हटलेच आहे, ‘संचयात् समृद्ध जीवनम्’. अर्थात धनसंचयाच्या वृत्तीमुळे जीवन समृद्ध होते. त्यामुळे ही सवय जितक्या कमी वयात लावून घेता येईल तितके चांगले. आपली मिळकत कितीही असो, आर्थिक नियोजन प्रत्येकाने केलेच पाहिजे. या वर्षी मी काय काय खरेदी करणार या बरोबरच मी किती बचत आणि गुंतवणूक करणार हे ठरवून त्याप्रमाणे वागले पाहिजे. बचत आणि गुंतवणूक यातील फरक समजून घेतला पाहिजे. आर्थिक नियोजन हे आपल्या कुटुंबासाठी व पर्यायाने समाजासाठी हितकारकच आहे. आर्थिक संकट पेलण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची तयारी सतत केली पाहिजे. हा एक नवा संस्कारच आहे असे समजून अशी सवय लावून घ्यायला काय हरकत आहे?तरच खर्या अर्थाने आनंदाची भक्कम गुढी उभारता येईल.
आणि हे सगळं अगदी खरं खरं आहे बर का ! एप्रिल फूल आजिबात नाही .
माझी भविष्यवाणी तुमच्या राशीला ! श्री प्रमोद वामन वर्तक
मेष (मेंढा)
सध्या घरात जास्त काम कोण करत यावरून, एकाची जरी ही रास असेल, तरी दोघात टकरी संभवतात ! आणि दोघांची हीच रास असेल तर, त्या टकरीने दोघेही रक्त बंबाळ होई पर्यंत टोक गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही !
वृषभ (बैल)
एकाने दुसऱ्याच्या शिंगा पासून या आठवड्यात बचाव करायचा आहे ! उगाच आपापली शिंग एकात एक अडकवून, खडाखडीचा सामना टाळणे दोघांच्या हिताचे आहे एवढं लक्षात ठेवा !
मिथुन (जोडी)
एकमेकांच्या सहकार्यामुळे, घरातली काम हलकी होतं आहेत, असा तुमचा गैरसमज होण्याची शक्यता आहे ! पण जोडीदारापैकी ज्याची ही रास असेल तो अथवा ती, आपण केलेल्या कामांची कुठे तरी नोंद करून ठेवत असेल आणि योग्य वेळ येताच ती डायरी आपल्या जोडीदारासमोर धरेल याची खात्री बाळगा !
कर्क (खेकडा)
पंखा पुसायच्या निमित्ताने आपण स्टुलावर चढला असाल, तर काळजी घ्या ! जोडीदारापैकी ही ज्याची रास असेल तो अथवा ती, काहीतरी निमित्त करून “पाय” ओढून आपणास स्टुलावरून खाली पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही !
सिंह (सिंह)
जंगलात, (म्हातारा नसेल तर) सिहं राजा असतो, एव्हढेच फक्त ध्यनात ठेवा ! त्यामुळे, स्वतःचा बचाव कसा करता येईल याकडे लक्ष देवून या आठवड्यात वागावे लागेल !
कन्या (मुलगी)
ज्या नवऱ्याची ही रास असेल, त्याला या आठवड्यात, काय मुलीं सारखी हळू हळू काम चालली आहेत, असे बोल बायको कडून ऐकायला येण्याची शक्यता नाकारता येत नाही !
तूळ (तराजू)
नवरा बायकोने एकमेकांशी बोलतांना, तोलून मापून बोलण्यात शहाणपणा आहे हे ध्यनात ठेवावे ! नाहीतर त्याचे पर्यवसान, हातात तराजू आणि डोळयांवर पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेच्या साक्षीने, दोघातील भांडणं सोडवण्या पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी काळजी घ्या !
वृश्चिक (विंचु)
आपल्याला नांगीरुपी जिभेवर या आठवड्यात ताबा ठेवून दुसऱ्याशी बोलायचे आहे हे ध्यानात ठेवा ! तरच निभाव लागेल !
धनू (धनुर्धारी)
आपल्या मुखाच्या भात्यातून सुटणाऱ्या वाग्बाणामुळे जोडीदार घायाळ झाल्यावर, चुकून बाण सुटला, अशी सारवासारव या आठवड्यात आपल्यावर करण्याची वेळ
येवू शकते !
मकर (मगर)
कामाच्या बोजामुळे म्हणा, अथवा अन्य काही कारणामुळे म्हणा, आपल्या डोळ्यातून येणारे अश्रू हे खरोखरचे आहेत आणि ते नक्राश्रू नाहीत, याची खात्री जोडीदारास करून द्यावी लागेल !
कुंभ (घडा)
सध्या आपली मानसिक स्थिती आपल्यावर आलेल्या एखाद्या प्रसंगामुळे विचलित होऊ शकते ! तसेच छोटया छोटया कारणावरून, दुसऱ्याचा पाणउतारा करून, त्याचा अहंकाररुपी घडा आपल्या हातून फुटणार नाही याची काळजी घेतलेली बरी !
मीन (मासा)
संसाररुपी सागरात दोघांनी एकत्र रहायचं असल्यामुळे, दोघांनी एकमेकांना पाण्यात पहायचे या आठवड्यात सोडून द्यावे लागेल !