मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 109 ☆ मला भेटलेली दुर्गा ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 109 ?

☆ मला भेटलेली दुर्गा ☆

आजचा विषय खूपच चांगला आहे, मी खूप विचार केला आणि माझी दुर्गा मला माझ्या घरातच सापडली, होय मला भेटलेली दुर्गा  म्हणजे माझी सून सुप्रिया !

माझा मुलगा अभिजित चोवीस वर्षाचा झाल्यावर आम्ही त्याच्यासाठी मुली पहायला सुरूवात केली.

कारण त्याची बदली अहमदाबाद ला झाली होती आणि त्याच्या पत्रिकेत मंगळ असल्यामुळे आम्ही पत्रिका पाहून  लग्न करायचं ठरवलं होतं, म्हणजे आमचा थोडा फार ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. सुप्रिया तशी नात्यातलीच, माझ्या चुलत बहिणीने तिला पाहिले होते आणि ती म्हणाली होती, ती मुलगी इतकी सुंदर आहे की तुम्ही नाकारूच शकत नाही. पण ती अवघी एकोणीस वीस वर्षांची होती आणि इंजिनिअरींगला होती, तिचं शिक्षण, करिअर… तिचे आईवडील इतक्या लवकर तिचं लग्न करतील असं वाटलं नाही!

पण सगळेच योग जुळून आले आणि खूप थाटामाटात लग्न झालं!पण सुरूवातीला अभिजित अहमदाबादला आणि ती पुण्यात आमच्या जवळ रहात होती कारण तिचं काॅलेज पुण्यात… ती लग्नानंतर बी.ई.झाली फर्स्ट क्लास मध्ये! काही दिवस जाॅब केला. अभिजितची अहमदाबादहून मुंबई ला आणि नंतर पुण्यात बदली झाली, दोघेही जाॅब करत होते नंतर प्रेग्नंट राहिल्यावर तिने सातव्या महिन्यात जाॅब  सोडला. नातू झाला. तिने तिच्या मुलाला खूप छान वाढवलं आहे, पाचव्या महिन्यात बाळाला घेऊन ती माहेरहून आल्यानंतर बाळाला पायावर अंघोळ घालण्यापासून सर्वच!थोडा मोठा झाल्यावर पुस्तक वाचायची सवय तिने त्याला लावली, तो आता तेरा वर्षाचा आहे सार्थक नाव त्याचं तो खूप वाचतो आणि लिहितो ही,अकरा वर्षाचा असताना त्याने एक कादंबरी लिहिली (फॅन्टसी) ती प्रकाशितही झाली आहे, अमेझाॅनवर! ते सर्व सोपस्कार त्याने स्वतः केले! नातू लेखक आहे, कविताही केल्यात त्याने, त्याचे श्रेय लोक मला देतात पण सार्थक ला वाचनाची गोडी सुप्रिया ने लावली आणि तिच्या स्वतःमध्ये ही लेखनगुण आहेत, तिच्या फेसबुकवरच्या पोस्ट (अर्थात इंग्रजी) वाचून कविमित्र लेखक श्रीनिवास शारंगपाणी म्हणाले होते, “तुमची सून चांगली लेखिका होईल पुढे”! खरंतर मी लग्नात तिचं सुप्रिया नाव बदलून अरुंधती  ठेवलं ते बुकर पुरस्कार विजेत्या अरुंधती राॅय च्या प्रभावानेच ! असो !

सुप्रिया (माझ्यासाठी अरुंधती) काॅन्व्हेन्ट मध्ये शिकलेली तरीही मराठीचा अभिमान असलेली,फर्डा इंग्लिश बोलणारी तरीही उगाचच इंग्रजीचा वापर न करणारी चांगली, स्वच्छ मराठी बोलणारी! सर्व प्रकारचा स्वयंपाक उत्कृष्ट करणारी, खूप चांगलं,सफाईदार ड्रायव्हिंग करणारी !

माझे आणि तिचे संबंध सार्वत्रिक सासू सूनांचे असतात तसेच आहेत, कुरबुरी, भांडण ही आमच्यातही झालेली आहेत, मुळात माझ्या सूनेने माझ्या अधिपत्याखाली रहावं अशी माझी कधीच इच्छा नव्हती, तिने तिच्या आवडी निवडी जपाव्या, स्वतःतल्या क्षमता ओळखून स्वतःचा उत्कर्ष करून घ्यावा अशीच माझी सूनेबद्दल भावना, अपेक्षा कुठलीही नाही!

मला ती दुर्गा भासली तो काळ म्हणजे कोरोना चा लाॅकडाऊन काळ! त्या काळात अभिजित सिंगापूर ला गेलेला, आम्ही सोमवार पेठेत आणि सुप्रिया सार्थक पिंपळेसौदागर येथे पण लाॅकडाऊन च्या काळात ती सार्थक ला घेऊन सोमवार पेठेत आली, कामवाली बंद केली होती, घरकामाचा बराचसा भार तिने घेतला, त्या काळात सार्थकनेही न सांगता भांडी घासली, खूपच सुसह्य झालं ती आल्यामुळे!

नंतर माझं मणक्याचं ऑपरेशन, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेली कोरोनाची लागण…. घरी गेल्यावर एका पाठोपाठ एक पाॅझीटीव्ह होत जाणं…. आम्हाला दोघांनाही तिनं हाॅस्पिटल मध्ये अॅडमीट करणं…. त्या काळातलं तिचं धीरोदात्त वागणं आठवलं की अजूनही डोळे भरून येतात, हे टाईप करतानाही अश्रू ओघळत आहेत, आमच्या नंतर, आम्ही हाॅस्पिटल मध्ये असताना,  ती आणि सार्थक पाॅझीटिव आले, काही दिवस ती घरीच क्वारंटाईन राहिली, दोन तीन दिवस तिचा ताप उतरेना मग ती सार्थकला  बरोबर घेऊन मंत्री हॉस्पिटल मध्ये अॅडमीट झाली तेव्हा तर ती झाशीची राणीच भासली, काही दिवस आगोदरच आम्ही मणिकर्णिका पाहिला होता ऑनलाईन, खूपजण म्हणतात ती “कंगना राणावत” सारखी दिसते! पण कंगना पेक्षा ती खूपच सुंदर आहे सूरत और सिरतमे!

लेख जरा जास्तच लांबला आहे. पण माझ्या कोरोना योद्धा सूनेबद्दल एवढं तरी लिहायलाच हवं ना अर्थात या लढाईत तिला तिच्या बहिणी आणि मेहुण्यांची महत्वाची साथ होती हे ही कृतज्ञतापूर्वक नमूद करते!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शिवशाहीर…… ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ शिवशाहीर…… ☆ सौ राधिका भांडारकर 

babasaheb purandare felicitation ceremony: बाबासाहेब पुरंदरेंचा उद्या नागरी सत्कार; निमंत्रितांच्या यादीत 'या' दिग्गजांचा समावेश - shiv shahir babasaheb purandare turns 100 ...

? बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे ?

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी ऐकल्या नंतर ,वाचल्यानंतर मन जड झाले.एका ऐतिहासिक पर्वाचाच अस्त झाला.

संपूर्ण जीवनात त्यांचा एकच ध्यास होता, शिवचरीत्र घराघरात पोहचवायचे.शिवाजी राजाचे उत्तुंग व्यक्तीमत्व ,आणि त्याचे विवीध पैलु जाणीवपूर्वक अभ्यासून त्यांनी श्रोत्यांपुढे वाचकांपुढे मांडले…

वयाच्या शंभराव्या वर्षापर्यंत अखंड वाचन आणि अभ्यास त्यांनी उपासकाच्या भूमिकेतून केला.नवे अभ्यासक,,नवे इतिहासकार व्हावेत म्हणून ते तरुणांना प्रेरणा देत.मदत करत…

कथाकथन, व्याख्यान, नाटक, जाणता राजा हे महानाट्य, पुस्तकं, विवीध मालीकांसाठी संहीता लेखन, या माध्यमातून त्यांनी शिवचरित्र घराघरात नेलं.. सुलभ भाषाशैली, प्रभावी ओघवतं वक्तृत्व .. यामुळे सामान्य माणसाना शिवाजी राजा, त्यांचे कर्तुत्व, त्यांचे माणूसपण, त्यांचे राजेपण, नेतृत्व, देवत्व याचे आकलन झाले.

त्यांच्या मुखातून शिवचरीत्र ऐकताना श्रोते शिवमय होत.मंत्रमुग्ध होत.गेली सात दशके बाबासाहेबांनी हे अमृत प्रांतोप्रांती पाजले…

बळवंत मोरोपंत पुरंदरे हे त्यांचं मूळ नाव..

पण जनमानसात त्यांची ओळख बाबासाहेब पुरंदरे याच नावाने आहे..

वयाच्या आठव्या वर्षी वाढदिवसाची भेट म्हणून त्यांनी वडीलांकडे सिंहगड दाखवण्याचा हट्ट केलाहोता वडीलांनी तो पुराही केला होता..

शाळेत त्यांनी केलेलं भाषण ऐकून, शिक्षकांनी त्यांना छातीशी कवटाळलं.. म्हणाले.. “खूप मोठा होशील.. अभ्यास कर.. इतिहासाचे संस्कार जनात वाट…”

“शिवभक्ती ही आपल्याला संस्कारातून आणि रक्तातूनच मिळाली आहे ..”असे ते सांगत.

भारत सरकारने पद्मविभूषण हा किताब त्यांना बहाल केला. महाराष्ट्रभूषण म्हणूनही त्यांना गौरवण्यात आले. मात्र या दोन्ही सन्मानाच्या वेळी उलटसुलट विचारप्रवाह वाह्यले. बाबासाहेब मात्र तटस्थच राहिले. त्यांनी स्वत:ला कधी इतिहासकार असे बिरुद लावले नाही. ते अभ्यासक, उपासकाच्या भूमिकेतच वावरले… लोकांनी मात्र त्यांना शिवशाहीरच मानले.

महाराष्ट्रभूषण पुरस्काराच्या दहा लाख रकमेतील फक्त दहा पैसे त्यांनी स्वत:जवळ ठेवले आणि पदरचे घालून पंधरा लाखाची देणगी त्यांनी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलला  दिली.

गणगोतमधे पु.ल. देशपांडे त्यांच्याविषयी लिहीतात, “इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे. भक्त आहे. पण त्या भक्तीमार्गावर ज्ञानदीपाचा प्नकाश आहे. निराधार विधान करायचे नाही.ही प्रतिज्ञा आहे.लिहीताना अखंड सावधपण आहे..”

त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. बारीकसारीक तपशील त्यांच्या लक्षात रहात. अभ्यासात सातत्य होते. ते हाडाचे संशोधक होते. तेम्हणत “शास्त्रीय पद्धतीने लिहीलेलं लेखन अभ्यासकांपुरतं मर्यादित रहातं. मात्र रंजक पद्धतीचं लेखन सर्वसाधारण माणसांपर्यंत पोहचतं..”

सागर देशपांडे यांनी लिहीलेल्या बाबासाहेबांवरच्या बेलभंडार या पुस्तकात या संशोधकाची परिपूर्ण ओळख होते…

शंभराव्या वाढदिवसाच्या समारंभात ते म्हणाले होते, “मला जर १२५वर्षांचं आयुर्मान लाभलं तर मी शिवचरीत्र ब्रह्मांडाच्या पलीकडे घेऊन जाईन…”

त्यांच्याइतका लोकप्रिय संशोधक आजपर्यंत झाला नसेल.पानटपरीवरही आदराने त्यांचा फोटो कितीतरी जणांनी पाहिला असेल.तेही लोकांचा तितकाच आदर करत.लहान मुलांनाही ते अहो जाहो करत… असं हे थोर व्यक्तीमत्व..आज अनंतात लोपलं.

काळाच्या उदरांत विसावलं…

एक ध्यास पर्व संपलं…शिवभक्तीने तळपलेला हा महासूर्य अनंताच्या क्षितीजावर मावळला…

ऊरले आहेत ते चैतन्याचे, स्फुर्तीचे, प्रेरणेचे नारिंगी रंग…

अशा व्यक्तीमत्वापुढे  नतमस्तक होऊन आदरपूर्वक वाहिलेली ही श्रद्धांजली..!!??

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे – भावपूर्ण श्रद्धांजली ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

? मनमंजुषेतून ?

☆ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे – भावपूर्ण श्रद्धांजली  ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆ 

babasaheb purandare felicitation ceremony: बाबासाहेब पुरंदरेंचा उद्या नागरी सत्कार; निमंत्रितांच्या यादीत 'या' दिग्गजांचा समावेश - shiv shahir babasaheb purandare turns 100 ...

? बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे ?

ज्यांनी आपले उभे आयुष्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी अर्पण केले, अशा थोर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली…….?

हिमालयातील ट्रेकसाठी दुरांतोमधून प्रवास सुरू होता. संध्याकाळ झाली होती. बाहेर अंधार पडला होता. आम्ही पत्ते खेळत होतो. तितक्यात आमच्यापैकी कुणीतरी धावत येऊन, ‘ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे दिसले आपल्या गाडीत — मागच्या बाजूने २ डबे ओलांडून गेल्यावर दिसले ‘  अशी बातमी दिली. ताबडतोब डाव सोडून आम्ही धावत गेलो. आणि त्यांचे दर्शन घडले. त्या तेजःपुंज व्यक्तिमत्वापुढे नतमस्तक झालो. डोक्यावर हात ठेवून त्यांनी आम्हा सर्वांना आशीर्वाद दिले. तो आयुष्यातला खूप अविस्मरणीय क्षण होता. प्रत्यक्ष देव भेटल्याचा अनुभव आला. डोळ्यात आनंदाश्रू —मन भरून आले.

बोलता येईना. ते हसले. “बसा”  म्हणाले. वडिलांजवळ बसल्यासारखेच वाटले. आता ट्रेक यशस्वी होणारच हे निश्चित होते. आणि तसेच झाले. एक विलक्षण अनुभव जगता आला. त्याबद्दल देवाची  खूप खूप आभारी आहे.

भेटीनंतर जी उर्जा, चेतना मिळाली, ती आजतागायत टिकून आहे. अजूनही ट्रेकला जायचं ठरवलं की, ही आठवण मनात येते. आणि अंगात चार हत्तींचे बळ आल्यासारखे वाटते.

अफाट स्मरणशक्ती, आपल्या भाषणातून, लेखनातून, अभिनयातून संपूर्ण इतिहास, त्यातील प्रसंग,  जिवंतपणे डोळ्यासमोर उभे करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते. अत्यंत निष्ठावंत शिवप्रेमी, अभ्यासू आदर्श व्यक्तिमत्व–ज्यांनी आपलं सर्व आयुष्य खर्च करून भावी पिढीसाठी इतिहास जागवला, आणि तो जिवंत ठेवण्यासाठी तळमळीने अखंड यज्ञ सुरू ठेवला, त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शतशः नमन—?

शरीराने आज ते आपल्याजवळ नसले तरी त्यांचे महान कार्य सतत प्रेरणा देणारे आहे. ते कार्य पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्यांसाठी ते नेहमीच त्यांच्या सोबत आहेत, हे नक्कीच–

भावपूर्ण श्रध्दांजली… ?

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

विश्रामबाग, सांगली.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मिसिंग टाईल्स फिलाॅसाॅफी.. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी… ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

काही मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक प्रयोग केला —-

एका नव्याकोऱ्या, आलिशान, चकचकीत आणि देखण्या हॉटेलचा शुभारंभ होता. 

आतून बाहेरुन ते हॉटेल अतिशय भव्यदिव्य आणि सुंदर होते. त्या हॉटेलच्या डिझाईनवर, बांधकामावर, आणि तिथल्या फर्निचरवर पाण्यासारखा पैसा ओतण्यात आला होता. 

हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला हजारो लोकांना आमंत्रण दिले गेले होते.

पण मानसशास्त्रज्ञांनी एक प्रयोग म्हणून ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा वापर करण्याचे ठरवले.

–त्यांच्या सांगण्यावरून हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये पोहोचल्याबरोबर दिसणारी, अगदी समोरच्या भिंतीवर लावलेल्या सुंदर टाईल्सच्या डिझाईनमधली एक टाईल, मुद्दामहून बाजूला काढून ठेवण्यात आली होती.  

आता एक वेगळीच गंमत सुरु झाली. हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक पाहुणा त्या हॉटेलचे सौंदर्य पाहून हरखून गेला खरा, पण आल्याबरोबर काही क्षणात त्यांचे लक्ष मिसिंग टाईलकडेच वारंवार जाऊ लागले—-शेकडो लोकांनी एकमेकांना ती मिसिंग टाईल दाखवली, त्याच्यावर चर्चा केली—

‘ ही टाईल  बसवायची राहिली आहे का ? का ती बाजूला गळून पडली ?’  यावर तावातावाने वादविवाद झडू लागले—–‘ हॉटेल मालकाच्या ह्या एका निष्काळजीपणामुळे हॉटेलच्या सौंदर्याला गालबोट लागले आहे,’  असेही शेकडो जणांनी बोलून दाखवले.

एवढेच नाही, त्या हॉटेलमध्ये आल्यावर पाहुण्यांना कसे वाटले, याविषयी पाहुण्यांना फिडबॅक भरून द्यायचा होता– त्यामध्ये बहुतांश जणांनी अगदी थोडक्यात हॉटेलची डिझाईन, तिथले इंटेरीअर, तिथले लँडस्केपींग आणि तिथल्या महागड्या कलाकुसरीच्या वस्तू ह्याविषयी अगदी थोडक्यात लिहिले, आणि मिसिंग टाईलबद्दल अगदी भरभरून लिहिले. 

त्या हॉटेलमध्ये जागोजागी एकाहून एक देखणी, आकर्षक शिल्प ठेवण्यात आली होती. पाहतच राहाव्यात अशा सुंदर सुंदर पेंटींग्ज होत्या. आकर्षक रंगसंगती असलेल्या अनेक भिंती होत्या.

मानसशास्त्रज्ञांच्या सांगण्यावरुन एका मोठ्या पांढऱ्याशुभ्र भिंतीवर मात्र दोन काळे डाग जाणूनबुजून ठेवण्यात आले होते. खरेतर ते डाग इतके छोटे होते, की एकूण भिंतीच्या दहा टक्के सुद्धा त्यांचा आकार नव्हता.—–पण मिसींग टाईल प्रमाणे ह्या डागांकडेही लोकांचे चटकन लक्ष जाऊ लागले—– लोक एकमेकांना उत्साहाने ते डाग दाखवू लागले— 

‘ सगळे काही इतके छान बनवले, पण हे दोन डाग मात्र तसेच राहिले ‘ ह्याबद्द्ल आश्चर्य व्यक्त करू लागले. 

काही काही अतिउत्साही लोक तर बांधकामातल्या फक्त चुकाच शोधू लागले,

एकमेकांना टाळ्या देऊन हॉटेलमधल्या उणीवा सेलिब्रेट करू लागले.

शेवटी हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगाविषयी खुलासा केला. 

——–   

“आल्याबरोबर लॉबीमध्ये दिसणारी मिसिंग टाईल जाणून- बुजून काढून ठेवण्यात आली होती ”,

“मोठ्या पांढऱ्याशुभ्र भिंतीवर दोन डाग मुद्दाम उमटवण्यात आले होते ”,—आणि माणसांचे ह्या दोन्ही गोष्टींवरचे प्रतिसाद जाणून घ्यायचे होते. 

—-आणि रिझल्ट धक्कादायक म्हणावा असाच होता. 

हॉटेलमध्ये स्तुती कराव्यात अशा शेकडो, हजारो गोष्टी मांडून ठेवण्यात आलेल्या असतांनाही,   बहुतांश लोकांनी फिडबॅक फॉर्ममध्ये मिसींग टाईल आणि डागांचाच उल्लेख केला होता. 

मित्रांनो,

कमतरता शोधणं, पाहताक्षणी चुका काढणं, दोष काढून नावं ठेवणं, ही माणसाची वृत्ती जन्मतः असते का ?—तर नाही.

पण जसजसे आपण मोठे होतो, तसतशी आपल्याला कमतरता आणि उणीवा शोधण्याची सवय लागते. 

—मग कधी आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात असलेल्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवतो, त्यावर चर्चा करतो. 

—तर कधी आपण स्वतःच्या आयुष्यात असलेले प्रॉब्लेम्स मोजत बसण्यात आपली बहुमूल्य उर्जा आणि बहुमूल्य वेळ खर्च करतो. 

—-“मला योग्य ते शिक्षणच मिळाले नाही.”

—“माझा जन्म गरीब घरात झाला.”

—“माझा जन्म अशा जातीत झाला, जिथे मला संधीच उपलब्ध नाही.”

—“माझे आई वडील शिकलेले नव्हते.”

—“माझ्याजवळ खानदानी संपत्ती नाही, जमीन नाही.”

—“माझ्या वडिलांनी माझ्यासाठी कसलेच बॅकअप तयार केले नाही, मला भांडवल दिले नाही.”

—“आमच्या जवळ बुद्धी नाही.”

—“आमच्या जवळ डिग्री नाही.”

—“घरच्या परिस्थितीमुळे आम्ही मनासारखे शिक्षण घेऊ शकलो नाही.” 

—“मी दिसायला तितकी सुंदर नाही.”

—“माझा जोडीदार मला हवा तसा मिळाला नाही, म्हणुन माझी प्रगती शक्य नाही.”

ह्या आणि अशा कित्येक मिसिंग टाईल्स शोधणं, आणि त्यावर चर्चा करणं, हा मूर्खपणा आहे, असं तुम्हाला वाटत नाही का?

—ज्याला आयुष्यात काही मिळवायचे आहे, तो आजूबाजूला लपलेल्या संधीमध्ये सोने शोधतो. —आणि ज्याला आयुष्यात काही करायचेच नाही, तो मात्र फक्त मिसींग टाईल शोधतो…..!!!

Yogi

संग्राहक : सुनीत मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नकारात्मकतेची कृष्णछाया..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ नकारात्मकतेची कृष्णछाया..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

भडिमार..!नकारात्मकता हाच स्थायिभाव असलेला एक शब्द.एखाद्या कृतीचा हानिकारक परिणाम अधोरेखित करणारा हा शब्द. कोणत्याही गोष्टीचा अविरत ओघ,सातत्याने घडणारी क्रिया, ऐकणाऱ्याला उसंत न देता भान हरपून ऐकवलं जाणारं बरंच कांही यापैकी कशातही नकारात्मकता असेल तर त्याचे अचूक वर्णन करायला ‘भडिमार’ या शब्दाला पर्याय नाहीच.पण याच प्रत्येक बाबतीत जर सकारात्मकता असेल,तर त्याचे चपखल वर्णन करायला मात्र जेव्हा ‘भडिमार’हा शब्द कुचकामी ठरतो आणि तेव्हा इतर अनेक सुंदर शब्द नेमके दिमतीला हजर होतात.

पाऊस पडण्याची एक साधी घटना.ऊन-पावसाच्या खेळातल्या हलक्या सरी असतील तर तो पाऊस ‘रिमझीम’ पाऊस असतो. जीवघेण्या कडक उन्हाने तावून सुलाखून निघालेल्या धरणीला सुखावणारा आणि त्रस्त जीवाला शांतवणारा पाऊस अथक जोरदार पडणारा असला तरी तो पावसाचा भडिमार नसतो तर  ‘वर्षाव’ असतो.पण तोच पाऊस जर जगणं उध्वस्त करणारा, जीव नकोसा करणारा,जोरदार वाऱ्याच्या साथीनं तांडव करीत प्रचंड झाडांनाही उपटून फेकून देत घरांची छपरं उडवीत भिंती उध्वस्त करणारा असेल तर मात्र तो पाऊस टपोऱ्या थेंबांचा भडिमार करणारा विध्वंसकच असतो.

मुलांना प्रेमानं समजून सांगत त्यांना योग्य वळण लावणं आणि धाक दाखवून त्याना  सक्तीने शिस्त लावू पहाणं यात उद्देश एकच असतो पण त्यांचे परिणाम मात्र परस्परविरोधी..!प्रेमाने समजावणं मुलांना आश्वस्त करत योग्य मार्ग दाखवणारं असतं तर धाक दाखवणारा शब्दांचा भडिमार मुलांच्या मनात भिती तरी निर्माण करतो नाहीतर तिरस्कार तरी.

परस्परांना समजून घेत सामंजस्याने एक पाऊल मागे घेण्याची तयारी साध्या साध्या गोष्टीत लपलेला आनंदाचा खजिना खुला करते,तर मी म्हणेन तीच पूर्वदिशा हा हेकेखोरपणा कर्कश्श बोचऱ्या शब्दांचा भडिमार करीत नात्यांची वीण उसवत असतो.

भडिमाराची अनेक रुपे असतात. भडिमार प्रश्नांचा असतो,अपशब्दी शिव्यांचा असतो,कडवट डोस वाटावेत अशा उपदेशांचा असतो,अनाहूत सल्ल्यांचा असतो,आग्रही जाहिरातींचा असतो, कोणत्याही निवडणूकांच्या बाजारातल्या खोट्या आश्वासनांचाही असतो.जिथं जिथं ज्या ज्या रुपात तो असतो,त्यात नकारात्मकताच ठासून भरलेली दिसेल.सकारात्मकता असेल तिथे भडिमार असूच शकत नाही. उत्स्फुर्त प्रतिसादाचं प्रतिक म्हणून वाजवल्या जाणाऱ्या टाळ्यांचा प्रचंड ‘कडकडाट’ असतो.भडिमार नव्हे.एखाद्या चमकदार यशाबद्दल चारही दिशेने होत असतो तो कौतुकाचा वर्षाव असतो, कौतुकाचा भडिमार नव्हे.उत्स्फुर्त प्रतिसाद,कौतुकाचा वर्षाव,यात असा प्रसन्नतेचा उत्साहवर्धक प्रकाश असतो आणि भडिमाराच्या अंगांगात मात्र अंधाऱ्या नकात्मकतेच्या कृष्णाछायाच..!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लिगो (LIGO)… श्री विनीत वर्तक ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ? 

☆  लिगो (LIGO)… श्री विनीत वर्तक  ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

लिगो म्हणजे Laser Interferometer Gravitational-Wave Observatory.

 जगातील तिसरी लिगो अमेरिकेनंतर नासा भारतात उभारत आहे. अमेरिकेबाहेर पहिल्यांदा अशी अद्यावत लिगो भारतात आपल्या महाराष्ट्रात बनणार आहे. महाराष्ट्राच्या हिंगोली तालुक्याच्या औंढानागनाथ इथे लिगो आकाराला येत आहे. जवळपास १३०० कोटी रुपयांची जगातली महाग अशी प्रयोगशाळा आपल्या महाराष्ट्रात आकाराला येत असताना सो कॉल्ड मराठी आणि महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना त्याची पुसटशी कल्पना ही नाही. नासाचे वैज्ञानिक आणि भारतातून डी.ए.ई. चे अधिकारी ह्यांची वर्दळ गेल्या काही वर्षापासून ह्या भागात सुरु आहे. इथल्या जवळपासच्या लोकांना नासा काहीतरी मोठ्ठ प्रोजेक्ट करत आहे इतकीच जुजबी माहिती आहे. पण वैश्विक संशोधनाला  कलाटणी देणारी ही अत्याधुनिक प्रयोगशाळा आपल्या माजघरात आकार घेत असताना त्याची उत्सुकता आणि त्याबद्दल जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. 

लिगो म्हणजे नक्की काय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी ग्रॕवीटेशनल वेव्ह (गुरुत्वीय लहरी ) समजून घ्यावी लागेल. विश्वात अश्या अनेक घटना घडत असतात की ज्या माणसाच्या कल्पनेच्या पलीकडल्या आहेत. एकूणच विश्वाची निर्मिती आणि त्यात असलेल्या अनेक गूढ गोष्टी ह्याबद्दल अजूनही बरेच संभ्रम आणि तोकडे ज्ञान आहे. २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शोधाची अनेक नवीन दालन उघडी झाली आहेत. त्यातलं एक दालन म्हणजेच लिगो. गेल्या शतकात विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन ह्यांनी भाकीत केलं होतं की जेव्हा वैश्विक घटना,  म्हणजे कृष्णविवरांच (Black Holes) मिलन किंवा न्युट्रॉन ताऱ्यांची टक्कर अश्या घटना घडतील तेव्हा स्पेस – टाईम मध्ये त्यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड गुरूत्वीय बलामुळे लहरी तयार होतील. नदीच्या पाण्यात दगड टाकल्यावर जसे पाण्यात तरंग निर्माण होतात त्याच पद्धतीने ह्या लहरी तयार होऊन विश्वाच्या पोकळीत प्रवास करतील. जेव्हा ह्या लहरी ग्रह तारे ह्यांना आदळतील तेव्हा स्पेस – टाईम मध्ये विश्व जेलीच्या बॉलसारखं  आकुंचन आणि प्रसरण पावेल. ते ज्या लहरींनी होईल त्यांना गुरुत्वीय लहरी असं म्हटलं गेलं .

पूर्ण विश्वात तरंग उमटवायला विश्वात होणारी उलथापालथ ही तितकी प्रचंड असली पाहिजे. गुरूत्वीय लहरी त्यामुळे ओळखणे कठीण आहे. कारण ह्या तरंगामुळे पृथ्वीचं  होणारं आकुंचन आणि प्रसरण हे अवघ्या  एका फोटोन च्या आकाराचे  असू शकते. तसेच ह्या तरंगाची क्षमता ही त्या उलथापालथी वर अवलंबून आहे. विश्वातील ज्या घटना अश्या गुरूत्वीय लहरी निर्माण करू शकतात त्या म्हणजे, दोन कृष्णविवरांच मिलन, दोन न्युट्रॉन ताऱ्यांचं एकमेकाभोवती फिरणं आणि सुपरनोव्हा. तर अश्या घटना जेव्हा विश्वाच्या पटलावर घडतात तेव्हा त्याचे तरंग गुरुत्वीय लहरींच्या स्वरूपात प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. आधी म्हंटलं तसे पृथ्वीवरही हे तरंग सतत आदळत असतात, पण ते ओळखणे आधी तंत्रज्ञानाला शक्य नव्हतं. कारण एका फोटोनच्या आकारात होणारा फरक मोजणारी यंत्रणा आपल्याकडे नव्हती. पण विज्ञान सतत पुढे जात आहे, त्यामुळे आत्ता आपण तशी यंत्रणा निर्माण करू शकत आहोत. त्यामुळे ह्या लहरी जेव्हा जेव्हा पृथ्वीवर आदळतील, तेव्हा तेव्हा पृथ्वीच्या होणाऱ्या आकुंचन आणि प्रसरण ह्यावरून त्या लहरींचा स्त्रोत,  नक्की केव्हा ही लहर अस्तित्वात आली ह्याबद्दल सांगू शकतो. 

२०१५ साली जेव्हा लिगो तयार होऊन काम करायला लागलं, तेव्हा पहिल्यांदा आपल्याला ही वेव्ह पृथ्वीवर कळाली. ही  गुरुत्वीय लहर १.३ अब्ज वर्षांपूर्वी दोन कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झाली होती. म्हणजे १.३ अब्ज वर्षापूर्वी निघालेली ही वेव्ह तब्बल ३ लाख किलोमीटर प्रती सेकंद ह्या वेगाने पृथ्वीवर यायला इतकी वर्ष लागली. आत्तापर्यंत प्रकाश हे एकच माध्यम घेऊन आपण विश्वाकडे बघत आलो आहोत. पण जेव्हा ह्या वेव्हनी १.३ अब्ज वर्षापूर्वीची माहिती पृथ्वीवर पोचवली, त्या वेळेस आपण एका नवीन दरवाजातून विश्वाकडे बघू लागलो. आईनस्टाईनने ते स्वप्न बघितले आणि लिगोने तो दरवाजा शोधला. ४ जानेवारी २०१७ ला जेव्हा तिसरी वेव्ह लिगोने शोधली ती तब्बल ३ अब्ज वर्षापूर्वी तयार झाली होती. म्हणजे त्यावेळेचा पूर्ण इतिहास ही वेव्ह आपल्या सोबत घेऊन प्रवास करत होती. ह्या वेव्हच्या अभ्यासातून अनेक गोष्टी आपल्याला समजणार आहेत, ज्याबद्दल आपण अजून अनभिज्ञ आहोत. गुरूत्वाकर्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनच पूर्ण बदलून जाणार आहे. 

भारतासाठी अभिमानाची गोष्ट ही की लिगो तयार करण्यात भारतीय वैज्ञानिक अग्रेसर आहेत. आईनस्टाईनच्या ज्या थेअरी ऑफ रिलेटीव्हीटीवर आपण आज हे शोधू शकलो आहेत, ते लिगो उपकरण बनवण्यात भारतीय वैज्ञानिकांचे योगदान प्रचंड आहे. जगातील १००० हून अधिक वैज्ञानिकात भारताच्या अनेक संशोधकांनी आपले योगदान दिले आहे. लिगोमध्ये दोन आर्म काटकोनात चार किलोमीटरचे असतात. जेव्हा  ग्रॅव्हिटेशनल वेव्ह पृथ्वीवर आदळते, तेव्हा तिच्या आदळण्याने ह्या आर्मच्या लांबी मध्ये फरक होतो. हाच फरक लेझर, मिरर आणि अतिसूक्ष्म बदल नोंदवणाऱ्या उपकरणांनी बंदिस्त केला जातो. आनंदाची बातमी अशी की अस लिगो भारतात बांधण्यासाठी युनियन केबिनेट ने फेब्रुवारी २०१६ मध्ये मंजुरी दिली आहे. ६७ वैज्ञानिक १३ प्रयोगशाळा, जश्या ( DAE,TIFR, IIT Bombay, IIT Madras, IUCAA Pune, RRCAT Indore, UAIR Gandhinagar, IIT Gandhinagar, IIT Hydreabad etc.)  ह्यात सहभागी आहेत. २०२२ मध्ये लिगो तयार झाल्यावर अश्या वेव्हचा अभ्यास भारतीय वैज्ञानिकांना भारतात आणि महत्वाचे  म्हणजे महाराष्ट्रात करता येणार आहे. 

आईनस्टाईनने बघितलेले  आणि अभ्यासलेले स्वप्न आता प्रत्यक्षात आपण अनुभवतो आहोत. ह्या विश्वाच्या पसाऱ्यात आपल्याला माहित असलेल्या गोष्टी खूप कमी आहेत. आजवर प्रकाश ह्या एकाच दरवाज्याने आपण विश्व बघत आलो. पण आता ग्रॕव्हीटेशनल वेव्हमुळे अजून एक दरवाजा उघडला गेला आहे. ह्यातून विश्व समजून घेणे मोठे रंजक असणार आहे. ह्यात भारतीय वैज्ञानिक आणि संशोधक तितकाच समतोल वाटा उचलत आहेत हे बघून खूप छान वाटले. विश्वाच्या ह्या नव्या दरवाज्याचे स्वप्न बघणारा आईनस्टाईन आणि ते प्रत्यक्षात उतरवणारे “ लिगो “चे सर्वच भारतीय संशोधक ह्यांना सलाम.    

– श्री विनीत वर्तक

(माहिती स्त्रोत :- गुगल, नासा) 

संग्राहक :- मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रार्थना ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रार्थना ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

प्रार्थना म्हणजे ती नाही. जी आपण हात जोडून, गुढघ्यावर बसून देवाकडं काहीतरी मागण्यासाठी केलेली असते…! 

प्रार्थना तीच असते, जी सकारात्मक विचार करून लोकांसाठी काहीतरी चांगली इच्छा करते–, ही खरी प्रार्थना…!!

जेव्हां तुम्ही कुटुंबाच्या पोषणासाठी अत्यंत चांगल्या मनानं स्वयंपाक करता, ती प्रार्थना असते…!!

जेंव्हा आपण लोकांना निरोप देताना, त्यांच्या चांगल्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो, ती प्रार्थना असते…!! 

जेंव्हा आपण आपली ऊर्जा आणि वेळ देऊन एखाद्याला मदत करतो, ती प्रार्थना असते…!!

जेव्हा आपण कोणाला तरी मनापासून माफ करतो, ती प्रार्थना असते.

प्रार्थना म्हणजे कंपनं असतात. एक भाव असतो. एक भावना असते. एक विचार असतो. प्रार्थना म्हणजे प्रेमाचा आवाज असतो.  मैत्री, निखळ नाती, हे सगळं म्हणजे प्रार्थनाच तर असते…!!

? श्री स्वामी समर्थ ?

सग्राहक –  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चि म टा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐  चि म टा ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“आई s s s गं ! किती जोरात चिमटा काढलास !”

काय मंडळी, आठवतंय का तुम्हांला उद्देशून कोणीतरी किंवा तुम्ही कोणाला तरी उद्देशून हे असं म्हटल्याचं ? माझ्या पिढीतील मंडळींना हे नक्कीच आठवत असणार ! कारण त्या काळी मुलं मुली शाळेत किंवा घरी, सारे खेळ एकत्रच खेळत होती. मुला मुलींची शाळा वेगवेगळी, ही कन्सेप्ट खूपच नंतरची. एखाद्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी खेळतांना काही कारणाने भांडण झालं, तर त्याची परिणीती फार तर फार दुसऱ्याला चिमटा काढण्यात व्हायची. अगदीच तो किंवा ती द्वाड असेल तर चिमट्या बरोबरच दुसऱ्याला बोचकरण्यात ! आत्ताच्या सारखी पाचवी सहावीतली मुलं, आपापसातल्या भांडणातून एकमेकांवर वर्गात चाकू हल्ला करण्यापर्यंत, तेंव्हाच्या मुलांची मानसिकता कधीच गेली नव्हती ! कालाय तस्मै नमः! असो !

तर असा हा चिमटा ! ज्याचा अनुभव आपण आपल्या लहानपणी कोणाकडून तरी घेतला असेल किंवा तसा अनुभव दुसऱ्या कोणाला तरी नक्कीच दिला असेल ! अगदीच काही नाही, तर आठवा शाळेत कधीतरी “गुरुजींनी” तुम्हांला “घरचा अभ्यास” पूर्ण न झाल्याने दंडाला काढलेला चिमटा ! तो “गुरुजींनी” काढलेला चिमटा एवढा खतरनाक असायचा की दुसऱ्या दिवशी सुद्धा ती चिमट्याची जागा ठुसठुसायची आणि काळी निळी पडायची ! आणि ही गोष्ट घरी कळली की दुसरा दंड पण घरच्या वडीलधाऱ्या लोकांकडून काळा निळा व्हायचा !  हल्लीच्या “सरांना” किंवा “मॅडमना” कुठल्याही यत्तेच्या मुलांना हात लावून शिक्षा करणे तर सोडाच, उंच आवाजात ओरडायची पण चोरी ! कारण उद्या त्या मुलांच्या “मॉम किंवा डॅडने” “प्रिन्सिपॉलकडे” तक्रार केली, तर “सरांना” किंवा “मॅडमला” स्वतःची मुश्किलीने मिळवलेली नोकरी गमवायची भीती ! तेंव्हाच्या “गुरुजींना” सगळ्याच मुलांच्या घरून, त्यांना वाटेल तसा त्यांच्या दोन्ही हातांचा, डस्टर, पट्टी किंवा छडी यांचा अनिर्बंध वापर करायचा अलिखित परवाना, “गुरुजी” म्हणून शाळेत नोकरीला लागतांनाच मिळालेला असायचा ! आणि या पैकी कुठल्याही गोष्टीचा यथेच्छ वापर करायला ते “गुरुजी” त्या काळी मागे पुढे पहात नसत.

 तारेवर ओले कपडे वाळत घालतांना ते वाऱ्याने पडू नयेत म्हणून, “हा चिमटा तुटला, जरा दुसरा दे !” असं आपण घरातल्या कोणाला म्हटल्याच बघा आठवतंय का ? (कधी अशी काम केली असतील तर ?) माझ्या लहानपणी लाकडाचे स्प्रिंग लावलेले चिमटे, अशा तारेवरच्या सुकणाऱ्या कपड्यांना लावायची पद्धत होती !  ते चिमटे तसे फार नाजूक असायचे. आता तुम्ही म्हणाल नाजूक चिमटे ? म्हणजे काय बुवा ! तर तुम्हांला लगेच कळणाऱ्या भाषेत सांगायचं तर, तरुणपणी जर तुम्ही प्रेमात पडला असाल(च)?आणि कधीकाळी तुमच्या प्रेयसीने तुम्हांला लाडात येवून प्रेमाने नाजूक चिमटा काढला असेल, तर तो आठवा, तेवढं नाजूक ! हे उदाहरणं लगेच पटलं ना ? ?पण ज्यांच्या नशिबात कांद्या पोह्याचा कार्यक्रम होऊन गळ्यात वरमाला पडली असेल त्यांनी आपल्या लग्नाचं फक्त पाहिलं वर्ष आठवून बघा ! तर लग्ना नंतरच्या पहिल्या वर्षातच बरं का, असा नाजूक चिमट्याचा आपल्याला हवा हवासा प्रसाद, आपापल्या बायकोने आपल्याला दिल्याचं बघा आठवतंय का ! मी फक्त पहिल्या वर्षातच असं म्हटलं, त्याला कारण पण तसं ठोस आहे. कसं असत ना, लग्ना नंतरचे नव्या नवलाईचे दिवस संपल्यावर, उरलेल्या वैवाहिक जीवनात बायकोकडून वाचिक चिमटे ऐकायची सवय नवरे मंडळींना करून घ्यावी लागते ! पण जसं जशी संसाराची गाडी पुढे जाते, तसं तसा या वाचिक चिमट्याचा त्रास, त्याची स्प्रिंग लूज झाल्यामुळे असेल कदाचित, पण नवरोबांच्या अंगावळणी पडतो एवढे मात्र खरे !?त्यामुळे अशा वाचिक चिमट्याचा पुढे पुढे म्हणावा तसा त्रास होतं नाही, नसावा !

तर मंडळी, पुढे पुढे हे त्या काळी वापरात असलेले लाकडी चिमटे जाऊन, त्याची जागा तारेच्या चिमट्याने घेतली.  तारेच्या म्हणजे, आतून तार आणि बाहेरून प्लास्टिकचे आवरण ! पण या चिमट्याचा एक ड्रॉबॅक होता. तो म्हणजे आतल्या तारेवरचे प्लास्टिकचे आवरण निघाले की त्याच्या आतली तार गंजत असे आणि त्यामुळे तो ओल्या कपड्यावर लावताच त्यावर डाग पडत असे. नंतर नंतर हे चिमटे पण वापरातून हद्दपार झाले आणि त्याची जागा निव्वळ प्लास्टिकने बनलेल्या, लहान मोठ्या आकाराच्या चिमट्याने घेतली, जी आज तागायत चालू आहे. माझ्या मते या पुढे सुद्धा तीच पद्धत अनंत काळ चालू राहील, हे आपण स्वतःच स्वतःला चिमटा न काढता मान्य कराल यात शंका नाही !?

मागे मी एका लेखात म्हटल्या प्रमाणे, विषय कुठलाही असला तरी त्यात नेते मंडळींचा उल्लेख असल्या शिवाय, तो लेख पूर्ण झाल्याच समाधान मला तरी मिळत नाही ! ?आता तुम्ही म्हणाल चिमट्याचा आणि नेते मंडळींचा संबंध काय ? तर तो असा, की पूर्वी जी खरोखरची विद्वान नेते मंडळी होऊन गेली, ती आपल्या विद्वताप्रचूर भाषणातून, आपापल्या विरोधी पक्षाच्या नेते मंडळींना चांगलेच शाब्दिक चिमटे काढीत ! तो तसा चिमट्याचा शाब्दिक मार, तेंव्हाच्या नेत्यांची कातडी गेंड्याची नसल्यामुळे, त्या काळी त्यांच्या खरोखरचं जिव्हारी लागतं असे ! गेले ते दिवस आणि गेले ते विद्वान नेते !

आपली मराठी भाषा कोसा कोसावर बदलते याचा अनुभव आपण कधी ना कधी घेतला असेलच. “अरे बापरे, पाणी उकळलं वाटतं ! जरा तो चिमटा बघू !” आता या वाक्यात आलेला चिमटा हा कोणत्या प्रकारात मोडतो हे आपल्या लगेच लक्षात यायला हरकत नाही ! म्हणजे काही महिला मंडळी ज्याला “सांडशी” किंवा “गावी” किंवा “पकड” म्हणतात त्यालाच काही काही महिला चिमटा असं पण म्हणतात !

“तू तुझ्या पोटाला कधी चिमटा काढून जगला आहेस का ?” असा प्रश्न आपण जर का आजच्या तरुण पिढीतल्या मुलांना किंवा मुलींना विचारला, तर ९९% तरुणाईच उत्तर असेल “मी कशाला माझ्याच पोटाला चिमटा काढायचा ? दुखेल ना मला ! पण हां, तुम्ही सांगत असाल तर मी दुसऱ्या कोणाच्या तरी पोटाला नक्कीच चिमटा काढू शकतो हं!” या अशा उत्तरावर, आपण माझ्या पिढीतील असाल तर नक्कीच खरोखरचा कपाळाला हात लावाल !

शेवटी, आपल्या सगळ्यांवरच या पुढे आपापल्या पोटाला कधीही चिमटा न काढता, सुखी आणि समाधानी आयुष्य व्यतित करायला मिळू दे, हीच त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि हे चिमटा पुराण आणखी चिमटे न काढता संपवतो !

ता. क. – वरील पैकी कुठल्याही “चिमट्याचा” कोणाला वैयक्तिक त्रास झाल्यास, त्याला लेखक जबाबदार नाही !

© श्री प्रमोद वामन वर्तक

०९-११-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ परशुराम –बुरोंडी दापोली ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ? 

☆ परशुराम –बुरोंडी दापोली  ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

स्व हिमतीवर भगवान परशुरामांचा पुतळा उभारुन आपल्या आराध्यदेवतेप्रती भक्तीचा महापूर वाहणाऱ्या ‘परशुराम भूमी’ प्रांगणाची निर्मिती करणाऱ्या आणि भगवान परशुरामांची भव्य मूर्ती उभारणा-या गानू परिवाराला कितीही धन्यवाद दिले, तरी अपूर्ण राहतील…

दापोलीतून कोळथरेला निघताना बुरोंडी दापोली लागते. तिथे भगवान परशुरामांचा भव्य पुतळा आहे. फारसा गाजावाजा न करता ही निर्मिती सुरु आहे.. आजूबाजूला पहाताना भव्य मूर्ती दिसते, ती पण भगवान परशुरामांची…. तिथे माणूस प्रचंड आनंदाने उतरतोच …..

ज्ञान, भक्ती, त्याग आणि सृजन यांचा साक्षात्कार म्हणजेच विष्णूंचा सहावा अवतार — भगवान परशुराम ! आपल्या युगातील अत्याचारी आणि समाजविघातक शक्तींचा नाश करुन तब्बल २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केलेले थोर पराक्रमी व समाजाला सुखाचा मार्ग दाखविणारे——- चिरंजीव भगवान परशुराम ! तपःसाधना, शस्त्रविद्या आणि वेदधर्म यांचा आद्य संगम म्हणजे—– भगवान परशुराम ! 

अशा भगवान परशुरामांचे मूर्त रुपात दर्शन घडावे आणि ते तरुण पिढीसाठीही प्रेरणादायी ठरावे, या हेतूने पुण्यातील न्यू मॉडर्न ऑप्टिशियन्सचे मालक – सौ.अश्विनी आणि अनिल गोविंद गानू यांनी परशुरामभूमीची निर्मिती केली आहे…..

४० फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर २१ फूट उंची असलेली परशुरामांची ही भव्य मूर्ती उभी असून फेरोक्रीट पद्धतीने हा पृथ्वीचा अर्धगोल बांधला आहे. भगवान परशुरामांचे हे भव्य शिल्प उत्तराभिमुख असून ‘तामसतीर्थ’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या समुद्रकिना-याचे दर्शन येथून होते. समुद्राच्या तेवढ्याच भागाचे पाणी तांबडे दिसते, म्हणून त्याला ‘तामसतीर्थ’ म्हणतात.

हे कमालीची स्वच्छता असलेले निसर्गरम्य ठिकाण  आहे. गोलाकार पृथ्वीच्या आत शिरल्यावर ध्यानगुंफा आहे. तिथे बसलात की, काहीही बोला – प्रतिध्वनी उमटतात. परशुरामांच्या चरणी लीन होतात.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा भव्य पुतळा, त्याची निगा आणि इतर खर्च प्रचंड असूनही,  येथे कसलेही प्रवेशशुल्क नाही…..

केवळ ‘जय परशुराम’ करुन न थांबता, प्रत्यक्षात भव्य मूर्ती उभारणा-या गानू परिवाराला लाखो धन्यवाद. सगळ्यांकडे खूप काही असते, पण द्यायला उंच मन लागते…. सभोवतालचा आल्हाददायी परिसर मन तजेल करतो. मनाला शांतता देणाऱ्या या परशुराम-भूमीच्या निर्मितीला आठ वर्षे झाली आहेत. 

माहिती संग्राहक : — सुहास सोहोनी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खिडकी… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

?विविधा ?

☆ खिडकी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

रुक्मिणी तिच्या सखीला सांगते,” ते आले,मी त्यांना पाहिलं, बरं का,.सर्वांच्या आधी मी त्यांना पाहीलं”. किती आनंद झाला होता रुक्मिणीला.स्वयंवर नाटकांतील हा प्रवेश.

माझाही अनुभव काही फारसा वेगळा नाही. आमच्या घराच्या खिडकीतूनच मी त्याला प्रथम पाहीलं.

आजूबाजूच्या लोकांकडून तो फारच देखणा आहे, रूबाबदार आहे,असं बरंच काही कानावर आलं होतं पण त्यादिवशी आमच्या दिवाणखान्याच्या खिडकीतून मला त्याचं दर्शन घडलं.ऊंचापुरा बांधा, गुलाबी गौर वर्ण,सोनेरी छटा असलेले कुरळे केस,अगदी उदयाचलीचा अरूणच! मन माझे मोहून गेले!

त्याच वेळी अंतर्शालेय नाट्यस्पर्धेत आमच्या शाळेने ‘ए क होता म्हातारा’ हे मो.ग.रांगणेकरांचे नाटक सादर केले होते आणि त्यांतील “ये झणि ये रे ये रे ये रे ये रे माघारी”हेच पद एकसारखे  गुणगुणण्याचा मला नाद लागला होता.गाता गाता खिडकीतून सहज बाहेर पहायचे आणि अहो आश्चर्य तो आलेला असायचाकीहो!

अग अग  खिडकीबाई आमच्या मूक प्रेमाची तू पहीली साक्षीदार!

काय झालं असतं, घराला खिडकीच नसती तर? कारागृहच! खिडकी पलिकडचं जग किती सुंदर आहे.

आमच्या घरांतून रोज सूर्योदय दिसतो,ती गुलाबी पहाट पाहतांना कसं अगदी प्रसन्न वाटतं,आणि मग आठवतं ते देसकारातलं कृष्णाचं पद,”प्रिये पहा! रात्रीचा समय सरुनी होत उषःकाल हा”!

काही घरांतून सूर्यास्त दिसत असेल, तलावाकाठी असलेल्या घरांना नौका विहार, पक्ष्यांचे उडणारे थवे, तलावाचे निळेशार पाणी अशा सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेता येत असेल. काही  घरे भर वस्तीत रस्त्यावर असतात. रस्त्यावरची वर्दळ, वाहनांचा आवाज,फेरीवाल्यांच्या विक्षिप्त आरोळ्या हेही खिडकीपलिकडचे जग अनुभवणे मजेचेच असते.

मुंबईला मरीनड्राईव्हवर फिरत असतांना दिसतात धनाढ्य लोकांची समुद्राच्या विरुद्ध दिशेला असलेली घरे. घरांना ग्लास वाॅल आणि मोठमोठाल्या फ्रेन्च विंडोज! कांचेच्या पलीकडून उसळणार्‍या लाटा पाहातांना, समुद्राची गाज ऐकतांना ह्या रहिवाश्यांना मिळणारा आनंद काय वर्णावा?

मला आठवतं आम्ही काश्मीरला पेहेलगाम याठिकाणी गेलो होतो.आमच्या हाॅटेलच्या समोरूनच लिडार नदी वाहत होती. तिची अखंड खळखळ, शुभ्र फेसाळलेले पाणी खिडकीतून पाहताना डोळ्याचे पारणे फिटत होते जणू.

अलिकडे टी.व्हीवर कसली तरी जाहिरात दाखवतात.त्याचे जिंगल आहे” काय काय दाखवते ही खिडकी”

मलाही तेच वाटतंकाय काय दाखवते ही खिडकी?

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares