मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्पर्श …! – लेखिका : सुश्री राधा मराठे ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ स्पर्श …! – लेखिका : सुश्री राधा मराठे ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

“अक्का खूप आजारी आहेत. आठवण काढत आहेत. एकदा येऊन भेटून जा” असा नीरजाचा निरोप येऊन खरं तर ८-१० दिवस होऊन गेले होते पण काही ना काही कामं निघत राहिली आणि जायचं राहून गेलं. अक्का तशा माझ्या कुणीच लागत नव्हत्या. माझ्या मावशीच्या जावेची बहिण – इतका लांबचा संबंध होता आमचा.

बालविधवा होत्या – घरात तसं त्यांना काही महत्त्वाचं स्थान नव्हतंच. मग कुणा नातेवाईकाकडे काही अडचण निघाली की अक्कांची रवानगी तिथे होई. अक्का त्या घरी मिळून-मिसळून राहत, तिथली अडचण निस्तरली की दुसरीकडे कुठेतरी बोलावणं असेच, नाहीतर मग पुतण्याकडे जात. नीरजा त्यांच्या चुलतसुनेची सून. म्हणजे तशी त्यांची नातसूनच. पुतण्याच्या घरात अक्कांना थारा होता, त्यांना कधी कुणी जा म्हटलं नाही पण प्रेमाने अगत्यही दाखवलं नाही. कर्तव्य समजून त्यांचं करत राहिली ती माणसं. पण तेवढंही आजकाल कोण करतं? त्यामुळे अक्कांना फार कृतज्ञता वाटे त्यांच्याबद्दल.

एक दिवस मी अगदी वेळ काढून मुद्दाम अक्कांना भेटायला गेले. अक्कांची अगदी जुडी झाली होती. अंथरुणावर दिसतही नव्हत्या. मी त्यांच्याजवळ बसले. त्यांचा हात धरला.

“कशा आहात अक्का? ”

माझा आवाज ऐकून त्यांनी डोळे उघडून पाहिलं. चेहऱ्यावर अस्पष्ट स्मित उमटलं. मला अगदी भरून आलं. अक्का खूप राबल्या होत्या आमच्या घरी. माझ्या भावांच्या मुंजी, आमची सगळ्यांची लग्नं, आम्हा बहिणींची आणि भावजयांची बाळंतपणं, आईचं आजारपण असे कितीतरी प्रसंग. प्रत्येक वेळी आई हक्काने अक्कांना बोलवून घेई. त्याही लगेच येत. आल्या-आल्या त्यांच्या हातात स्वयंपाकघर सोपवून आई इतर गोष्टीत लक्ष द्यायला मोकळी होई. प्रत्येकाची आवड, आमच्या घरच्या पद्धती, चवी-ढवी सगळं बरोब्बर लक्षात असे त्यांच्या. आमच्या परीक्षा, इतर उद्योगही त्यांना पाठ असत. आमच्या घरी यायच्या वेळा लक्षात ठेवून आवर्जून काहीतरी खायला, चहा त्या तयार ठेवीत. प्रेमाने आग्रह करून खायला घालीत. आई नेहमी म्हणे, “देव तरी कसा निष्ठूर. इतकी हौस आहे संसाराची, हाताला चव आहे. पण स्वत:चा संसार काही करु शकली नाही बिचारी. सासरे त्या काळी थोड्या नव्या विचारांचे म्हणून केशवपन तरी टळलं बाईचं.

अक्कांच्या वयाचा आम्हाला कधी नेमका अंदाज यायचाच नाही. विचारलं तरी त्याही हसून टाळायच्या. आता त्या आडगावात त्यांच्या जन्म तारखेची नोंद तरी कोण करणार होतं म्हणा. पण आईपेक्षा ५-७ वर्षांनी तरी लहान असाव्यात त्या. उभं आयुष्य ह्याच्या-त्याच्या घरी चूल फुंकण्यात गेलं. कोणतंच घर कायमस्वरूपी त्यांचं झालं नाही. आयुष्याच्या अखेरीला डोकं टेकायला जागा मिळाली हेच मोठं नशीब अशी परिस्थिती.

त्यांचा हात हातात घेऊन मी त्यांची चौकशी केली. माझा हात त्यांनी अगदी घट्ट धरला. त्यांच्या त्या कृश हातात अजून बरीच शक्ती होती म्हणायची. माझा हात आपल्या गालावर घट्ट दाबून धरला. त्यांच्या डोळ्यातल्या काढत पाण्याने माझा हात ओला झाला. मला अगदी अवघडल्यासारखं झालं. एका मागोमाग एक कामे चपळाईने उरकणाऱ्या अक्का अशा विकल झालेल्या पाहून पोटात अगदी तुटलं. त्यांच्या डोक्यावर मी हात फिरवला. तोही हात आपल्या हातात घेऊन त्यांनी छातीशी अगदी घट्ट धरला. आता मला आणखीच अवघडायला झालं. तेवढ्यात नीरजा खोलीत आली. तिची चाहूल लागल्याबरोबर अक्कांनी माझे हात सोडून दिले. त्यांच्याकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकून ती म्हणाली, “चहा घ्यायला बाहेरच चला तुम्ही. इथे नको. पडू दे त्यांना शांत. ”

मी तिच्या मागोमाग बाहेर आले. तिने पुढे केलेला चहा न बोलता घेतला. ती घुटमळत होती. तिला काहीतरी सांगायचं होतं बहुतेक. बोलू की नको अशा संभ्रमात असावी. अखेर म्हणालीच, “तुमच्या आईची आणि तुम्हा सर्वांची सतत आठवण काढतात. त्यांना फार वाटतं तुम्हा सगळ्यांबद्दल. त्यांना तुम्ही जवळच्या वाटता म्हणून एक सांगावंसं वाटतं. बोलू का? ”

“हो, हो. बोल ना. अगदी नि:संकोच बोल. ” मी असं म्हटलं खरं, पण मनातून थोडी धास्तावलेच. तिच्या प्रस्तावनेचा एकूण सूर पाहून अक्कांना तुमच्याकडे न्या असं म्हणते की काय याची सूक्ष्म भीती वाटली. ह्यांच्या अनियमित वेळा, मुलां-नातवंडांचं वेळापत्रक सगळं क्षणात मनात उभं राहिलं.

“अक्का हल्ली फार विचित्र वागतात. मुलांना जवळ बोलावतात, त्यांचे हात कुरवाळतात, त्यांना आपल्या अंगावरुन हात फिरवायला सांगतात. मुलांना नाही आवडत. या सदा कुणाच्या ना कुणाच्या घरी चूल फुंकत राहिलेल्या. मुलांना पणजी-आजी म्हणून त्यांची काही माया लागलेलीच नाही. आजोबांची काकू आपल्या घरात राहते एवढीच ओळख. आता शरीर अगदीच साथ देत नाही म्हणून इथेच पडून असतात एवढंच. बाबांकडे पाहून आम्ही काही बोलत नाही. त्यांचं सगळं पाहतो. देवाच्या दयेने आम्हाला काही कमी नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली, आया सगळी व्यवस्था आम्ही केली आहे. पण त्यांच्या विचित्र वागण्याने मी आणि सासूबाई अगदी त्रासून गेलो आहोत. प्राचीच्या सासऱ्यांची साठी आहे म्हणून सासूबाई तिच्याकडे गेल्या आहेत ८-१० दिवसांसाठी. म्हणून मी बोलून घेतेय. काय करावं काही कळत नाही. ” मी एकदम गप्पच झाले. त्यांच्या हातातली असोशी मलाही जाणवली होती. थोडं विचित्र वाटलं होतं, पण नीरजा काही वेगळंच सांगत होती.

“मी बघते, विचार करते. ताईशी, वहिनीशी बोलते. ८-१० दिवसांत चक्कर टाकते परत. ” असं म्हणून मी बाहेर पडले. अक्कांचा निरोप घ्यायचंही सुचलं नाही. विचार करते असं नीरजाला म्हटलं तरी काय विचार करणार होते मी तरी? काही सुचत नव्हतं. ही विचित्र समस्या कुणाशी अगदी ताई आणि वहिनीशी तरी कशी बोलावी असं झालं होतं. ४-६ दिवसांनी पुन्हा नीरजाचा फोन आला. “ताबडतोब येऊन जा. ” यावेळी मी लगेच गेले. खोलीत जाऊन अक्कांजवळ बसले. अक्का घळा घळा रडायला लागल्या. नीरजा तिथेच उभी होती. “गेले चार दिवस चाललंय हे रडणं. थांबतच नाहीत. मी अगदी घाबरून गेले आहे. सासुबाईंना यायला अजून ४ दिवस अवकाश आहे. काय करावं काही सुचत नाही. ”

मी स्वस्थ राहिले. जरा वेळाने अक्का उठून बसल्या. पाठीशी उशी घेऊन भिंतीला टेकून बसल्या. आवाज जरा क्षीण झाला होता, पण वाणी स्पष्ट होती. माझा हात हातात घेऊन सांगू लागल्या, “दहाव्या वर्षी लग्न झालं. न्हाण यायच्या आधीच साप चावून नवरा गेला. नाव लिहावं लागतं म्हणून ते आठवतंय, पण चेहरा नाही आठवत आता. माझे सासरे त्या काळच्या हिशेबाने नव्या विचारांचे होते, म्हणून न्हाव्याला परतवला त्यांनी, बोडकी नाही केली मला. पण यापेक्षा जास्त सुधारणा नाही झेपली त्यांना. माहेरी गरिबी. तिथे तरी कोण विचारणार होतं? सासरी निदान अन्न-वस्त्राला तरी काही कमी पडलं नसतं. म्हणून त्यांनी ठेवून तरी घेतलं. तेव्हापासून कष्टांना जे जुंपून घेतलं ते हात-पाय चालेनासे होईपर्यंत. कष्ट करीत होते, म्हणून लोकांना माझी आठवण तरी येत होती. पुढे कोकणातून इथे शहरात आले. गोपाळ मोठ्या हुद्द्यावर होता, त्याने ठेवून घेतलं. पण सुनेला ही गावंढळ चुलत सासू फारशी आवडत नव्हती. तिच्याकडे चार नोकर राबत होते. तिला माझ्या कष्टांची तशी गरजही नव्हती. मग जिकडे गरज असे, तिकडे ती माझं बोचकं ती पाठवून देई. दोन वेळचं जेवण आणि अंगावर धड लुगडं एवढ्यावर राबले सगळ्यांच्या घरी. लोकांनी आपुलकी दाखवली, विश्वास टाकला, नोकराइतकी हलकी वागणूक नाही दिली पण शेवटी मी आश्रितच राहिले. कुणाच्याही घरात घरची होऊन राहणं नशिबात नव्हतं माझ्या.

लग्न झालं तेव्हा मायेचा स्पर्श जो सुटला, तो पुन्हा कधी मिळाला नाही. न्हाण यायच्या आधी नवरा गेला, म्हणून नवऱ्याचा स्पर्श नाही. नवरा नाही म्हणून मुलं नाहीत, त्यांचा लडिवाळ स्पर्श नाही. ज्या ज्या घरी राहिले-राबले, तिथे कुणी जवळ यावं, मिठी मारावी, गळ्यात हात टाकावे असं काही नातं नसायचं. देवाच्या दयेने कधी आजारपण आलं नाही, पण कधीतरी डोकं कलकलायचं. मग आपलं आपणच आल्याचा चहा घ्यायचा, कपाळावर वेखंड-सुंठीचा ओढा घालून घ्यायचा आणि पुन्हा पदर खोचून उभं राहायचं. मुलं खायला माझ्याकडे मागायची, पण शाळेतून-बाहेरुन आल्यावर त्यांना आई-आजीच लागायच्या. अक्का नाही. फार जीव तुटायचा माझा. आपण अधांतरी तरंगतोय, आपल्या पायाखाली जमीनच नाही असं वाटायचं. दोन वेळा जेवण, अंगभर कपडा आणि डोक्यावर छप्पर असलं की शरीर जगतं, पण मनाला तेवढं पुरत नाही. त्याला प्रेम, माया हवी असते. शरीराला मायेचा, प्रेमाचा स्पर्श मिळाला की मन शांत होतं. आयुष्यभराची ही ओढ मला जाळतेय. आग होतेय अंगाची. ती औषधाने थांबणार नाही. तिला मायेच्या स्पर्शाचीच गरज आहे. कुणाला सांगणार ही जळजळ? आश्रित बाईला मन असतं हे कुणाला पटणार? कोणत्या जन्मातलं पाप फेडतेय ते एक त्या देवालाच माहीत. ”

अक्का बोलायच्या थांबल्या. पण त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत राहिलं. “शांत व्हा” असं म्हणून मी त्यांचा हात धरला. तो त्यांनी घट्ट धरला. “रडू दे गं. उभ्या आयुष्याचं रडणं साठवून ठेवलंय. रडण्याचा आनंद तरी मिळू दे. ” मी अगदी कानकोंडी झाले. अक्कांचं बोलणं कणभरही खोटं किंवा चूक नव्हतं. अक्कांच्या वागण्याची तक्रार करणारी नीरजाही एकदम गप्प झाली होती.

मी घरी आले. आल्या-आल्या ह्यांनी माझ्या हातातली पिशवी घेतली. सुनेने पाणी दिलं. तिच्या कडेवरच्या नातवाने माझ्या अंगावर उडी मारली. आजी त्याला दिवसभर भेटली नव्हती. तिच्याकडून लाड करुन घ्यायची हुक्की आली होती त्याला. त्याला छातीशी कवटाळून सोफ्यावर टेकले. त्या सगळ्यांच्या ओझरत्या स्पर्शाने माझ्या शरीराचा दिवसभराचा थकवा गेला पण मन आणखी थकून गेलं. अक्कांचा चेहरा, त्यांची विकलता मनातून जाईना. आजपर्यंतच्या आयुष्यात झालेले स्पर्श आठवत राहिले. प्रेम, माया, आपुलकी, ओढ – काय नव्हतं त्या स्पर्शात? आनंद, दु:ख, संताप, निराशा, कंटाळा, वैफल्य – विविध भावनांच्या कल्लोळात किती वेळा सापडले. ज्या ज्या वेळी स्पर्शाची ओढ लागली, त्या त्या वेळी ती मिटवणं मला सहज शक्य झालं होतं. मुलगी, मैत्रीण, बहिण, बायको, आई आणि आता आजीही. प्रत्येक नात्याचा वेगळा स्पर्श त्या त्या वेळी मला न मागता-अगदी सहजपणे मिळत गेला. कदाचित त्यामुळेच अन्न-वस्त्राइतकीच जिवंत माणसाचा स्पर्श ही देखील माणसाच्या जगण्याची गरज असते हे मला कधी कळलंच नाही. अक्कांच्या रूपाने अगदी अचानक ते सत्य प्रकर्षाने माझ्या समोर आलं आणि त्यामुळे मी अगदी अस्वस्थ होऊन गेले. रस्त्यावरच्या भिकारणीलाही जे सहज मिळू शकतं, ते कित्येकांचा अंतरात्मा तृप्त करणाऱ्या अक्कांसारख्या बाईला का मिळू नये? इतकी साधी बिन-पैशांची गरजही पूर्ण होऊ नये आणि आयुष्यभर तळमळत राहावं असं काय पाप केलं असेल त्यांनी मागच्या जन्मी?

दुसऱ्याच दिवशी सकाळी अक्का गेल्याचा निरोप आला. सगळं आटपून आम्ही घरी आलो. सून म्हणाली, “अक्कांचं जाणं तुम्हाला फारच लागलेलं दिसतंय. तुमचं सगळं जगावेगळंच असतं. अक्का आपल्या नात्याच्या न गोत्याच्या. एका आश्रित, स्वयंपाकाच्या बाईसाठी तुम्हाला इतकं वाईट वाटावं याचीच कमाल वाटते मला. ” अक्कांच्या वेदनेचा आणि अतृप्तीचा मनाला लागलेला भुंगा माझं मन कुरतडतोय हे नाही सांगू शकले मी तिला.

लेखिका : सुश्री राधा मराठे

प्रस्तुती : प्रभा हर्षे

 ९८६०००६५९५

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “गुरुदक्षिणा…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? जीवनरंग ?

☆ “गुरुदक्षिणा…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

नयन.

नयन नाव होतं त्याचं.

प्रचंड हुश्शार.

सातवीत सगळ्या तुकड्यांमधे पहिला आलेला तो.

आठवीत नेनेसरांच्या वर्गात.

हुश्शार मुलगा चांगलाच असायला हवा की नाही?

नयन नव्हता तसा.

प्रचंड उपद्रवी… भांडखोर… उर्मट… एखाद्या डाॅनसारखा कुप्रसिद्ध.

आपल्याच शिक्षकांना तोंडघशी पाडणारा… शिक्षकांची व्यवस्थित नक्कल करणारा.

निगरगट्टासारखा मार खायचा… वर फिदीफिदी हसायचा.

100% गाॅन केस… पोरं सोडा, शिक्षकसुद्धा वचकून असायचे त्याला.

दुसरा कुणी असता, तर कधीच एल. सी. हातात मिळालं असतं..

कारण एकच..

त्याची हुशारी.

 

स्काॅलरशीपच्या परीक्षेत सुद्धा जिल्ह्यात पहिला. शाळेला तो हवा होता आणि नकोही.

14 जून. शाळेचा पहिला दिवस. नेने सर ‘आठवी अ’ च्या वर्गावर निघालेले. मोकाशी सर घाईघाईने आले.

“नेने सर.. बेस्ट लक. पार्सल पाठवलंय तुमच्या वर्गात, नयन नावाचं. चांगला फोडून काढता जा त्याला.

त्याशिवाय सुधारणार नाही तो… “

नेने सर कसनुसं हसले. पाच वर्षांची त्यांची सर्विस. एकही दिवस हातात छडी घेतली नाही कधी.

ते काय फोडून काढणार?

खरं तर नेनेसर स्वतः अतिशय हुशार. शिकवण्याची पद्धतही वेगळी. पुस्तकाबरोबर पुस्तकाबाहेरचंही बरंच काही.

केमिस्ट्री शिकवायचे. रिअॅक्शन लक्षात ठेवण्याचं, त्यांचं स्वतःचं भन्नाट टेक्निक होतं. खरं तर केमिस्ट्रीसारखा बोर विषय. जीव ओतून शिकवायचे. मजा यायची. चिडलेलं तर त्यांना कधी कुणी बघितलेलंच नव्हतं. मारणं तर दूर की बात. चांगल्याचं जाहीर कौतुक. कुणी चुकलं तर तास संपल्यावर थांबवत. हलकेच समजावून सांगत. जाहीर पंचनामा कधीच नाही. या सगळ्याची रिअॅक्शन काय? .. नेने सर सगळ्यात पाॅप्युलर. त्यांच्या वर्गात कधीच गोंधळ नसायचा. पोरं मन लावून शिकायची. छान मार्कस् मिळवायची. वर्गातून ओरडण्याचा आवाज कधीच यायचा नाही. आलाच तर अधूनमधून हसण्याचा खिदळी आवाज.

थोडक्यात काय? नेनेसरांची त्यांच्या स्टुडन्टस्’शी व्यवस्थित केमिस्ट्री जुळायची.

पहिला दिवस. पहिला तास. अटेन्डन्स.

नयन दुसानीस… 

नेने सरांनी मान वर करून नयनला नीट बघितला.

.. हिरवे डोळे. डोक्यावर काटेरी केस. साळींदरासारखे. निर्मळ चेहरा. आणि ओठांवरचं छद्मी हास्य.

कुठली तरी संधी मिळावी, म्हणून वाट पाहणारी बाॅडी लँग्वेज. चेहऱ्यावर हुशारीचं तेज. पण त्याला कोंदण मग्रुरीचं.

… नेनेसरांनी सहज वाचला त्याचा चेहरा. एक्स्ट्रा एनर्जी आहे या पोरात. निचरा होत नाहीये. हा चेहरा मास्क आहे… काहीतरी लपवणारा… कळेल..

 

दुसऱ्या दिवशीपासून नयन फाॅर्मात. उपद्व्याप सुरू.

नेनेसरांनी लेक्चर संपल्यावर थांबवला त्याला.

“घरी कोण कोण असतं? “

‘वडील, भाऊ, आजी.. ‘

” आई? “

‘ हो, आईही आहे ‘… नयनचं नजर चोरणारं उत्तर.

नेनेसरांनी समजून घेतलं.

‘”तू सुधारला नाहीस तर तुझं नाही, माझं फेल्युअर असेल ते. एक डील करू यात. दिवसभरात तू चुकलास तर त्याची शिक्षा मी भोगेन. तू एखादी चांगली गोष्ट केलीस तर, शाळेच्या नोटीसबोर्डवर तसं लिहून ठेवेन. “

 

तसं रूटीनच सुरू झालं… नयननं वर्गात कचरा केला… नेनेसरांनी झाडू घेवून साफ केला.

नयननं बोर्डवर नेनेसरांचं ड्राॅईंग काढलं… नेनेसरांनी ते पुसलं नाही… शाळेच्या नोटीसबोर्डवर लिहिलं.

” नयन उत्तम चित्र काढतो. मधल्या सुट्टीत सगळ्यांनी, आठवी अ च्या वर्गात जाऊन बघावे. “

मधल्या सुट्टीत सगळी झुंबड वर्गात… नयनला थोडीशी लाज वाटली.

आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा… नयनला पहिलं प्राईझ. पुन्हा नोटीसबोर्डवर नयनचं कौतुक.

 

नयननं एक नवीनच सुरू केलंय. नेनेसर फळ्यावर लिहण्यासाठी वळले की, नयन गडगडाटी हसायचा.

सगळ्यांना माहिती होतं, कोण हसतंय ते.. नेनेसर काहीच झालं नसल्यासारखे पुढे शिकवीत राहिले.

नेमका प्रिन्सीपलसरांचा राऊंड. त्यांच्या कानावर हे हसणं गेलं. ते वर्गात शिरले.

” नेनेसर तुम्हाला ऐकू येत नाहीये का? अशानं शाळेत डिसीप्लीन राहील का? कोण आहे तो शोधून काढा. आणि घेऊन या माझ्याकडे. रस्टिकेट करतो त्याला. “

‘ नको सर.. माझे सगळे स्टुडन्टस् चांगलेच आहेत. आय विल मॅनेज सर.. ‘

” काय मॅनेज करताय? तुमची स्ट्रॅटेजी बदला.. नाहीतर तुम्हालाच सरळ खालच्या वर्गावर टाकतो. “

… प्रिन्सिपल सर ताडताड निघून गेले.

 

मान खाली घालून नेनेसरांनी ऐकून घेतलं.. नयन हादरला. त्याचे हिरवे डोळे दाटून आले. तास संपल्यावर टीचर्स रूममधे सरांच्या पायावर डोकं ठेवून ढसाढसा रडला.

सरांनी पाठीवर हात फिरवून म्हटलं, ” मला माहित्येय. तुझं दुःख काय आहे ते. माझी आईही, मी चार वर्षाची असतानाच गेली. तुझ्यासारखाच जगावर सूड उगवायचो मी. उशिरा कळलं, मी चुकत होतो.

नयनला चांगल्या गोष्टींसाठी लोकांनी लक्षात ठेवावं असं मला मनापासून वाटतं. अजून एक ऐकशील.

तुझी नवीन आई तेवढीच प्रेमळ आहे. तिला एक संधी दे.. कदाचित तुझ्या सख्ख्या आईची जागा ती घेवू शकणार नाही… पण तिचा सख्खा मुलगा तू नक्की होऊ शकशील.. “

 

त्या दिवसापासून…

नयन पार बदलून गेला. हुश्शार… हवाहवासा. आपला नयन. सगळ्यांचा लाडका. अगदी त्याच्या नवीन आईचाही.

नयन नववीत गेला.. तरीही नेनेसरांचा लाडका विद्यार्थीच राहिला. नेनेसरांना भेटल्याशिवाय रहायचा नाही.

 

बघता बघता नयन दहावीत..

दहावीत शाळेतून पहिला.. नेनेसर खूष… शाळा खूष.

आयआयटीच्या तयारीसाठी त्याला पुण्याला ठेवला त्याच्या बाबांनी..

पुढे तो आयआयटी खरगपूरला गेला..

…

आज किती तरी दिवसांनी नेनेसर वाचू शकत होते. बहुधा तीन वर्षांनंतर.

… ती नकोशी आठवण. शाळेच्या टेंपोमधनं नेनेसर, केमिस्ट्री लॅबसाठी मटेरियल घेवून येत होते.

टेम्पोला झालेला एक्सीडेंट… फुटलेल्या काॅन्सन्ट्रेटेड अॅसिडच्या बाटल्या… तो अॅक्सीडेन्ट नेनेसरांचे डोळे घेवून गेला. सगळीकडे अंधार. नेनेसरांना सवय झालेली.

” काही हरकत नाही. तीस वर्षे का होईना, जग बघितलंय मी. किती तरी जण जन्मापासून अंधाराशी दोस्ती करून जगत आहेत. “

तरीही..

नेनेसर काठी घेवून शाळेत यायचे. मस्त शिकवायचे. कुणीतरी स्टुडन्ट ते सांगतील तसं, फळ्यावर लिहायचे. केमिस्ट्री शिकवायला, नेनेसरांना डोळ्यांची गरजच नव्हती. शाळा नेनेसरांना सोडूच शकत नव्हती.

 

कालच नेनेसरांचं आॅपरेशन झालं. कुणीतरी डोनर नेनेसरांना आपले डोळे देवून गेला. आज सकाळीच डोळ्यांवरची पट्टी काढली.

… आणि हे पत्र. कितीतरी दिवसांनी नेनेसर अक्षरं वाचत होते.

“… आणखी काय लिहू सर? तुम्ही जगाकडे बघायची खरी दृष्टी दिलीत. हा ज्ञानदीप कधी विझता कामा नये. सेकंड ईयरलाच कळलं, मला कॅन्सर आहे. एक वर्ष हाताशी… सर थर्ड ईयरला टाॅप करण्यासाठीच अभ्यास केला. रिझल्ट लागेल तेव्हा मी नसेन….. माझे “डोळे” वाचतील तो रिझल्ट. भरपूर छळलंय तुम्हाला सर… पहिल्यांदा चांगलं काही करण्याची संधी मिळत्येय. सोडणार नाही… अशीच वाट दाखवत रहा.. न विझता. माझी ही गुरूदक्षिणा स्वीकारावी सर… “

 

पुढचं वाचवेना. अक्षरानं ओळख सांगितलेली. नेनेसरांनी पटकन् आरसा मागितला. आरशात बघितलं.

त्यांचे नवीन हिरवे डोळे पाझरत होते.

 

… नवीन डोळ्यांनी एकच प्रश्न केला.

” आता तरी नयनला, लोक लक्षात ठेवतील ना सर? “

 

सरांनी आठवणीचे डोळे मिटले. नयनचा हसरा चेहरा स्पष्ट दिसू लागला.

 

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “सारे प्रवासी घडीचे!” अनुवादित हिन्दी संग्राहक : कमांडर शरण अहुजा ☆ मराठी अनुवाद : श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “सारे प्रवासी घडीचे!” अनुवादित हिन्दी संग्राहक : कमांडर शरण अहुजा ☆ मराठी अनुवाद : श्री संभाजी बबन गायके ☆

हल्ली मी बहुतेक वेळा रात्रीच माझी भाड्याची taxi चालवतो. मागच्या आठवड्यात रात्री अकराच्या सुमारास सरकारी रुग्णालयाच्या गेटवरून मी एक भाडे उचलले. एक वृद्ध गृहस्थ होते, पांढरा शर्ट आणि पांढरे शुभ्र धोतर… वयाने थकलेले… पण त्यांचा आवाज मात्र खणखणीत होता.

माझ्या कारमध्ये बसतानाच त्या आजोबांनी मला सांगितलं… ”. मला पाच ठिकाणी जायचं आहे… पाच हजार रुपये रोख देईन… पण मला पाच ठिकाणी का जायचं आहे हे विचारू नका… फार तर शेवटच्या ठिकाणावर पोहोचलो की सांगेन हवंतर! ” आणि आजोबांनी ठिकाणांची नांवे लिहिलेला कागद माझ्याकडे दिला.

पहिलं ठिकाण… दक्षिण कोलकात्यातील एक जुनं घर. तिथं पोहोचल्यावर मी कार थांबवली… पण आजोबा कारमधून खाली उतरले नाहीत… त्यांनी दरवाजाची काच खाली घेतली आणि त्या घराकडे नुसते पहात राहिले… जवळजवळ दहा मिनिटे! I त्यांच्या डोळ्यांत आसवे होती… ”चला, निघुयात आपण दुस-या जागेकडे! ” ते म्हणाले.

दुसरी जागा:- एक प्राथमिक शाळा तिथलीच जवळची. शाळेचे गेट अर्थातच बंद होते रात्र असल्याने. शाळेतल्या मैदानावर अंधार होता. आजोबा कारमधून खाली उतरले. मैदानातल्या झोक्यावर बसले… झोके घेऊ लागले… हळूहळू. वीस मिनिटांनी ते परत आले आणि मला म्हणाले, ”या शाळेत मी ४३ वर्षे शिकवले आहे! ही ४३ वर्षे माझ्या आयुष्यातली सर्वांत सुंदर वर्षे होती! ”

तिसरे स्थळ. एक जुनं कॉफी हाऊस. रात्री उशीरापर्यंत सुरु असणारं. आजोबांनी तिथं गाडी थांबवायला सांगितली. ते आत गेले… कोप-यातील एका टेबलशी बसले… एक चहा मागवला… पण एकही घोट नाही घेतला… फक्त इकडेतिकडे पहात राहिले काहीवेळा. चहा थंड झाला. आजोबा पैसे देऊन बाहेर आले.

मला म्हणाले, ”१९६९ मध्ये मिताली इथंच भेटली होती पहिल्यांदा मला… माझी बायको! ”

आम्ही पुढे निघालो… निमताला स्मशानभूमी! आजोबा खाली उतरले. स्मशानातल्या एका थडग्याजवळ जाऊन हात जोडून उभे राहिले… ओठांची अस्फुट हालचाल होत होती… काहीतरी बोलत होते… ऐकणारं कुणी दिसत नव्हतं… बहुदा मितालीशी बोलत असावेत… मनातलं. अर्ध्या तासाने कारपाशी येऊन म्हणाले, ”चलायचं? तीन वर्षे झालीत मितालीला जाऊन! ”

यादीतील पाचवं आणि शेवटचं ठिकाण आलं… स्थानिक शासकीय रुग्णालय… भलं मोठं. आजोबांनी मला कार पार्किंगमध्ये लावायला सांगितली. आणि म्हणाले, ”आता मी तुम्हांला आपल्या या पाच ठिकाणच्या प्रवासाचं कारण सांगतो… माझ्याकडे आता फार वेळ उरला नाही आयुष्यात… डॉक्टर म्हणालेत… आणखी फारतर काही आठवडे आहेत तुमच्या हातात. चौथ्या स्टेजचा कॅन्सर आहे म्हणतात. आज मला माझं सर्व आयुष्य एकाच वेळी पहायचं होतं… अनुभवायचं होतं.. म्हणून पाच जागी नेलं तुम्हांला! ”

 हे ऐकताच माझ्याही डोळयांनी पाझरायला सुरुवात केली… मी माझं डोकं स्टीअरींग व्हीलवर टेकवलं…!

आजोबा सांगत होते… ”पहिले ठिकाण… जुनं घर. हो, तेच घर जिथं मी माझ्या मुलांना वाढवलं… संसार केला. पुढे शाळेत गेलो होतो आपण… तिथंच मला माझ्या जीवनाचं ध्येय गवसलं… आणि ते कॉफी हाऊस… मिताली… माझी प्रेम… तिथंच तिची आणि माझी नजरानजर झाली… प्रेम झालं आणि पुढे लग्न… मुलंबाळं… संसार… तिच्याच हातात हात घालून फिरलो जगाचा हा बाजार! आणि एवढ्या रात्री त्या स्मशानात गेलो होतो… कारण तिथंच मी मितालीला शेवटचं पाहिलं होतं… निरोप दिला होता जड अंत:करणाने…! ”

“आणि आता… ही शेवटची जागा… इस्पितळ… इथंच दाखल आहे मी… सर्वांची नजर चुकवून बाहेर पडलो होत… सारे मला शोधत असतील… रागावलेही असतील. पण आता इथून बाहेर येणं होणार नाही माझं! ” एवढं बोलून आजोबांनी माझ्या हातावर पाच हजार रुपये ठेवले… ”घ्या… ठरल्यानुसार आहेत पैसे! … खूप खूप आभारी आहे मी तुमचा… मला आयुष्याची सफर घडवलीत तुम्ही… फार उपकार झाले या म्हाता-यावर! ”

मी ते पैसे त्यांच्या हातांत कोंबले आणि म्हणालो, ”साहेब, मी हे पैसे नाही घेणार! ” त्यावर आजोबा म्हणाले, ”मुला, मी पैसे द्यावेत असं माझं कुणी उरलं नाहीये या जगात. मुलं मोठी झाली आणि देश सोडून गेलीत… आताशा संपर्कही नाही ठेवत फारसा. बहुतेक मित्रांनी जगाला आधीच रामराम ठोकलाय.. आता माझी वाट बघत बसले असतील…! तू मला तुझ्या आयुष्यातले तीन तास दिले आहेस… या माणुसकीची किंमत मी नाही करू शकणार… घे… ठेव हे पैसे! ” असं म्हणत आजोबा कारमधून उतरले… आणि त्यांच्या wardकडे चालत निघाले… हळूहळू… व्हरांड्यातले दिवे अंधुक होतेच…!

मी सकाळी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि विचारलं, ”अनिरुद्ध मुखर्जी… खोली नंबर ४१२? ’ मला त्यांची खोली दाखवण्यात आली. मी फुलांचा गुच्छ नेला होता सोबत… ”अरे, तुम्ही आलात? ” मला पाहताच आजोबा हसून म्हणाले. मी म्हणालो, ”आजोबा, तुम्हांला मी असं एकटं कसं सोडेन! ? ”

पुढे आम्ही दोन तास गप्पा मारत बसलो होत. मिताली, त्यांचे विद्यार्थी आणि सोडून गेलेली मुलं.. असं बरंच काही.

मग मी रोजच त्यांच्या भेटीस जाऊ लागलो… कधी चहा घेऊन, तर कधी फळं. मी त्यांना वर्तमानपत्रे वाचून दाखवायचो किंवा कधीकधी नुसतंच जाऊन शांत बसायचो… आजोबांना वेदना होत होत्या… पण ते तसं मला जाणवू द्यायचे नाहीत…!

अशाच एके दिवशी ते मला म्हणाले, ” मला वाटलं होतं की मी असाच एकाकी मरून जाईन. पण माझ्या शेवटच्या दिवसांत तुझ्यासारखा एक अनोळखी माणूस माझं कुटुंब बनला… मुलगा, मित्र, सहकारी सर्वकाही. माझे आशीर्वाद आहेत मुला! ” मी त्यांचा हात हातात घेतला… ”आजोबा, तुम्ही एकटे नाही आहात. ” 

मंगळवार… पहाटेचे सव्वा तीन वाजलेले असतील… आजोबा गेले! मी तिथंच त्यांच्यापाशीच बसून होतो… त्या रात्री मला तिथं थांबावं असं का कुणास ठाऊक खूप वाटत होतं… म्हणून मी कारवर न जाता तिथंच थांबून राहिलो होतो… आजोबा जाईपर्यंत! ” 

जाण्याआधी आजोबा म्हणाले होते, ” सर्वांना माझा निरोप देशील? अनोळखी लोकांकडे बघ… नीट बघ. आपण सर्वच कुठं तरी निघालेलो आहोत… काहीजण घाईने तर काहीजण निवांत चालताहेत… पण पुढे जात मात्र आहेत… मग या वाटेवर थोडंसं दयाळू व्हायला काय हरकत आहे? तू दयाळू झालास माझ्याबाबतीत… माझे शेवटचे क्षण तू अर्थपूर्ण केलेस… मुला”

काही वेळातच श्वासांचे येणेजाणे दाखवणारे यंत्र सलग लाल रेषा दाखवीत… बीप असा दीर्घ आवाज करून बंद झाले…!

आजोबांच्या अंत्यविधीप्रसंगी केवळ सहाच लोक उपस्थित होते… एक मी, तीन नर्सेस, एक वकील आणि एक माजी विद्यार्थी. ४३ वर्षांची अध्यापकीय कारकीर्द, ५२ वर्षांचा संसार, ८१ वर्षांचे आयुष्य… आणि शेवटी सहाच माणसं?

मी म्हणालो, ”आजोबा मला काही गोष्टी शिकवून गेलेत… आपल्याला अनोळखी असलेली एखादी व्यक्ती दुस-या एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण जगही असू शकते… प्रत्येकाची स्वत:ची एक अशी कथा असते… माणूस जगत, मरतो आणि आयुष्यभर वाट पहात राहतो… ते केवळ त्याला कुणीतरी समजून घ्यावं म्हणून! त्यांनी मला माझ्या संसारासाठी पाच हजार रुपये दिले त्यापेक्षा जास्त मूल्य त्यांनी दिलेल्या शिकवणीचे आहे. माणुसकी ही काही स्वतंत्र गोष्ट नसते… माणुसकीच सर्वकाही असते. ते पाच हजार रुपये मी अजूनही जपून ठेवले आहेत…!

कुणी सांगावं… कोणताही प्रवासी कदाचित त्याच्या आयुष्यातील हा शेवटचा प्रवास करीत असेल… आप्त-स्वकीयांचा शेवटचा निरोप घेत असेल… म्हणून मी हल्ली माझी कार अत्यंत वेगळ्या पद्धतीने चालवत असतो… मी विचारपूस करतो, त्यांचं ऐकत असतो… मी माणूस पाहण्याचा प्रयत्न करीत असतो. कारण एका वृद्ध शिक्षकाने मला फक्त एक रात्र मागितली होती… आणि एका अनोळखी माणसाने ती दिलीही होती…!

संग्राहक : कमांडर शरण आहुजा साहेब..

भारतीय नौसेनेतून सेवानिवृत्त.. यांनी वरील कथा उपलब्ध करून दिली आहे.

मराठी अनुवाद – श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तप्तपदी… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ तप्तपदी… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

 तप्तपदी – – 

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।

बल्लाळं मुरुडं विनायकमहं, चिंतामणिं थेवरम् ॥

लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं, विघ्नेश्वरं ओझरम् ।

ग्रामोरांजण संस्थितो गणपती, कुर्यात् सदा मंगलम् ॥

॥ शुभमंगल सावधान ॥

भटजींचे मंगलाष्टक सुरु होते. वधू—वरामध्ये अंतरपाट होता. लग्न मंडप वर्‍हाडींनी भरलेला. प्रत्येकाच्या हाती अक्षता. आता थोड्याच वेळात मंगलाष्टके संपून वाजंत्री वाजणार होती. जयमाला एकमेकांच्या गळ्यात घालून दोन जीव मंगल, पवित्र बंधनात बांधले जाणार होते, ही रेशीमगाठी आयुष्यभरासाठी राहाणार होती.

वाजंत्री वाजली, मी जयमाला घातली व एक दीर्घ श्वास घेतला. मे महिन्यातील कडक ऊन, त्यात शालूचा भार, दागिन्यांचा भार, माझ्या कपाळावर घर्मबिंदू जमा झालेले. मी मावशीला इशारा केला. तिने अलगद घर्मबिंदू टिपले. थंड पाणी अंगठा, तर्जनी व माध्यमाच्या साहाय्याने अलगद फवार्‍यासारखे माझ्या चेहर्‍यावर उडविले जेणे करून मला थोडे प्रफुल्लीत वाटले व माझा मेकअपही खराब नाही झाला.

स्टेजवर आम्हां उभयतांना शुभेच्छा देणार्‍यांची गर्दी उसळली. आई, मावशी, मामा व माझे इतर नातेवाईक येणार्‍यांच्या स्वागतात गुंतलेले.

“कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये ” मामांनी तर लाऊड स्पीकरमधूनच अनाऊंसमेंट केली.

चला पुढील विधीसाठी वधूवरांना आणा ” इति गुरुजी. होमपात्रात अग्नि प्रज्वलित केला होता. पाटावर तांदूळाच्या सात राशि एका ओळीत ठेवलेल्या. ” अग्निभोवती एक एक वर्तुळ पूर्ण झाले कि या पाटावरील एक एक राशि पायाच्या अंगठ्याने बाजूला करायची ” गुरुजी मला सांगत होते.

मी (निलांबरी) व अर्णव विवाह बंधनात बांधले जात होतो. अग्नीला साक्षी ठेवून सप्तपदीचे सात फेरे सुरू झाले. प्रत्येक पावलासोबत माझ्या मनात एकच विचार चक्रावत होता—’लग्न म्हणजे फक्त सात पावले एकत्र चालणे की दोन वेगवेगळ्या विचारांना एकत्र बांधणे? ‘

१) इष एकपदी भव सा मामनुव्रता भव।

(अन्न व आरोग्य)

घरात अन्नाची कमतरता भासू नये व दोघांनी कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

वधूने पायाने तांदूळाची एक राशि बाजूला सारावी 

२) ऊर्जे द्विपदी भव सा मामनुव्रता भव।

(ऊर्जा व शक्ती) शारीरिक आणि मानसिक सामर्थ्यासाठी, तसेच संकटांचा सामना करण्यासाठी एकमेकांना ताकद देणे.

मी तांदूळाची दुसरी राशि बाजूला सारली

३) रायस्पोषाय त्रिपदी भव सा मामनुव्रता भव।

(संपत्ती आणि समृद्धी)

प्रामाणिक मार्गाने संपत्ती कमावणे आणि संसाराचा आर्थिक भार समजूतदारपणे सांभाळणे

४) मयोभवाय चतुष्पदी भव सा मामनुव्रता भव।

(सुख आणि समाधान)

संसारात प्रेम, आनंद, परस्पर आदर आणि समाधान टिकवून ठेवणे.

आता पुढील तीन फेर्‍यांसाठी वधू पुढे राहील व वराने तिच्या मागून चालावे

५) प्रजाभ्यः पंचपदी भव सा मामनुव्रता भव।

(कुटुंब आणि संतती)

उत्तम संतती, त्यांचे संगोपन आणि परिवाराचे कल्याण करण्यासाठी एकत्र प्रार्थना करणे.

६) ऋतुभ्यः षड्पदी भव सा मामनुव्रता भव।

(ऋतू आणि जीवनभर साथ)

जीवनाच्या सर्व ऋतूंमध्ये, सुख-दुःखात आणि प्रत्येक प्रवासात एकमेकांची साथ न सोडणे.

७) सखे सप्तपदी भव सा मामनुव्रता भव।

(मित्रता आणि विश्वास)

आयुष्यभर एकमेकांचे सच्चे मित्र, विश्वासू आणि समर्पित जोडीदार राहणे.

सप्तपदी संपली व आम्ही उभयता थोरांचे आशीर्वाद घेऊ लागलो. “नांदा सौख्य भरे ” ” पुत्रवती भव” ” दोघे गुणाने संसार करा “ आशीर्वाद मिळत होते. सप्तपदी चालू असतांना माझे चुलत आजोबा नवपिढीला, तरूणाईला समजावत होते. या सप्तपदीला फार महत्व, त्याशिवाय लग्न झाले मानले जात नाही. नुसती जयमाला घालून उपयोग नसतो.

आम्हांला वधूवराला जेवायला बसविले. एकमेकांना गोडाचा घास भरवतांना अर्णवने थोडी मस्तीही केली.

प्रत्येक मुलीला नकोसा वाटणारा विदाईचा क्षणही आला. सगळेच भावनाशील झालेले, ज्या घरात मी जन्मले, लहानाची शहाणी झाले, आई बाबांच्या छत्रछायेत वाढले, भावंडांशी खेळले, प्रसंगी भांडले, मायेच्या ओलाव्यातही बांधले गेले ते घर मला परकं होणार होतं. माहेर झालं होतं, पाहुणी म्हणूनच मी येथे येणार होते. जणू एक रोपटं उचलून दुसर्‍या जागी लावलं होतं. खूप कठीण क्षण होता माझ्यासाठी.

सासरी आले. काही धार्मिक विधी, सत्यनारायण पूजन, स्वागत समारंभ, नंतर कुलदेवतांचे दर्शन आटोपले. आणि घरात वादाला सुरुवात झाली. माझी जेठाणी म्हणे आमची जवाबदारी संपली आणि तिने काढता पाय घेतला.

असू देत, काही बिघडत नाही. सांभाळू आपण सगळं म्हणत मी कंबर कसली. घर, आँफिस, आजारी सासूची सेवा, सणवार, व्रतवैकल्य सगळं सुरळीत पार पाडत होती. मधूनच माझे दोन्ही

जेठ, तिन्ही नणंदा भावाकडे आर्थिक अडचणी दाखवत पैसे मागायचे. ” आता माझंही लग्न झालंय? मलाही घर संसार आहे? अर्णवने असे म्हणताच, ” आम्ही कोणी नाही का तुझे, तुला एवढा शिकवला, डाॅक्टर केला, त्यात आमचे कष्ट नव्हते काही. ” नणंदेच्या मुलीचं लग्न, दे पैसे, भावाच्या मुलीचं बाळंतपण, दे पैसे, भावाच्या मुलाची अॅडमिशन” दे पैसे, असे वारंवार घडत राहिले व अर्णव पैसे देतच राहिला. ” अर्णव, थांबव हे, काही लिमिट आहे कि नाही ” ” देऊ दे निलांबरी, माझी माणसं आहेत ” ” हो तुझी माणसं आहेत, पण तू केलेली मदत कधी परत मिळते काय? एक तरी पैसा परत आलाय का? ” ” नसेल आला, पण आपल्याला काही कमी पडलंय काय? ” ” कमी पडलंच असतं जर मी कमावती नसते तर. माझ्या पैशांवर घर चालावायचं, तुझा पैसा तिकडे वळवायचा “शब्दाला शब्द वाढला आणि मी न जेवताच झोपले. उद्या आॅफिसला मला एका प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन द्यायचं होतं, डोकं भणभणायला लागलं. स्वतःला कसंबसं कंट्रोल केलं मी.

माझ्या सुख समाधानाला गालबोट लागलं होतं. सप्तपदीतलं हे पाऊल माझ्यासाठी तप्तपदी ठरलं होतं

सासूच्या आजारपणात झालेली सेवा, सूनमुख पाहुन तिने समाधानानं निरोप घेतला.

मला कडक डोहाळे लागलेले, आॅफिसमधील कामाचं प्रेशर, मी प्रोजेक्ट लिडर असल्याने रजाही मिळत नव्हती, अशावेळी सासरची कोणीही मंडळी मदतीला आली नाही, आली माझी आई मदतीला.

प्रथमेशचा जन्म माझ्या जीवनातला सुखदायी क्षण. आनंदाचा क्षण, पण माझे दीर, जाऊ, नणंदा कोणीही बाळाला बघण्यासाठी आले नाही. अर्णवचा वारस, म्हणजे जणू त्यांचा दुश्मनच होता तो.

हळूहळू अर्णवचं सोशल ड्रिंक्सच्या नावाखाली पिणंही वाढू लागलं. रात्री अपरात्री येणं वाढू लागलं, मी काही बोलायला गेले तर पुन्हा वाद. मी तो टाळण्याचा प्रयत्न करायची.

प्रथमेश सहा महिन्यांचा, त्या रात्री खूप किर किर करत होता. तीन वाजायला आले. अर्णवचा पत्ता नाही, फोन उचलत नव्हता. हाॅस्पिटलला फोन केला, तिथे नव्हता, त्याच्या एक दोन मित्रांना फोन केला, त्यांनाही माहित नव्हते. झाले अर्णवचा पारा चढला, हाॅस्पिटलला, मित्रांना फोन करून तू माझी बदनामी केली म्हणत आक्रस्ताळेपणा करू लागला. पायाखालचा हा ही निखारा मला वेदना देऊन गेला.

अर्णव बाथरूममध्ये स्नान करत असतांना अर्णवचा फोन आला. मी घेतला, एका स्त्रीचा आवाज होता, ” हाय स्वीटहार्ट? काय करतोस? ” स्वीटहार्ट? कोण आहेस तू? ” माझा आवाज ऐकताच समोरून फोन कट झाला. अर्णव धावत पळतच बाथरूममधून आलेला. “अर्णव, कोण होती ही तुला स्वीटहार्ट म्हणणारी “. ” मला नाही माहित, राँग नंबर असेल. सोड, तू नको टेंशन घेऊस. “

आता अर्णवचा मोबाईल चेक करणं भाग होतं. अर्णवच्या लक्षात ही गोष्ट येताच त्याने मोबाईलला पासवर्ड लावला. कोणाचा फोन आल्यास बाहेर किंवा एकांतात घेऊ लागला.

त्याचं स्वीटहार्ट प्रकरणही बाळसं धरत होतं. पैशाचा ओघ सासरची मंडळी व स्वीटहार्ट कडे वाढू लागला.

“काय अर्णव आम्ही तुझी माणसं. ये आमच्यात राहायला. सोड तो कैदखाना, मस्त खा, पी, मजा कर. माझे स्वार्थी दीर जाऊ शिकवत होते. आणि माझ्या संसारावर पाणी फेरणारी स्वीटहार्ट तर आगीत तेल ओतत होती. डिव्होर्स पिटीशन दाखल कर म्हणून सारखी मागे लागलेली.

आणि एक दिवस अर्णव गेलाच कि मला व प्रथमेशला सोडून. लग्नात घातलेली सप्तपदी, सात जन्माचं वचन सात वर्षातच कमकुवत होत या पदाला आलेलं होतं.

पण माझ्या बाळासाठी व माझ्या अभिमानासाठी मी सज्ज झाले. बोलणारे लोकं, समाज, नातेवाईंकांचे सल्ले सगळं काही सोसत मार्गक्रमणा करत राहिले.

आणि एक दिवस अतिशय भणंग अवस्थेत अर्णव परतला. ” कोण ” क्षणभर मी ओळखलंही नाही. ” मी तुझा अर्णव? ” ” असं काय घडलं कि तुला आता माझी आठवण यावी ” ” मी चुकलो, तुझ्या आश्रयाला आलोय. सगळ्यांनी मला लुटलं, नातेवाईकांनीही, आणि तिनेही, जिने प्रेमाचं नाटक केलं, प्रेम नव्हतंच तिचं कधी, फक्त हवा होता पैसा, आणि माझ्यासोबत टाईमपास. आज मी खरंच भणंग भिखारी झालोय गं “, ” अर्णव अर्धांगी होती मी तुझी. सप्तपदीची सात वचने दिली होती आम्ही एकमेकांना. पण तू ती वचने धुडकावून लावलीस. तुला तो एक खेळ वाटला रे. पण मी मात्र त्या आगीत होरपळले. आला आहेस आश्रयाला तर राहा, नाही म्हणणार नाही मी. पण त्या प्रेमाची अपेक्षा मात्र करू नकोस. त्या तप्तपदीमध्ये ते केव्हाच खाक झालंय. उरलीय

आता केवळ माणुसकी.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीच कहाणी पुन्हा एकदा? ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

☆ तीच कहाणी पुन्हा एकदा? ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

रामा मूळचा अलिबागचा. वडिलांना मुंबईत टेक्सटाइल मिलमध्ये नोकरी लागली आणि सगळं कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं. परळच्या चाळीतल्या भाड्याच्या दोन खोल्यांमध्ये त्याची आई तुटपुंज्या पगारात जमा व खर्चाचा मेळ घालायचा प्रयत्न करत बसायची.

रामा म्युनिसिपालिटीच्या शाळेत. अगदी नापास नाही झाला कधी पण अभ्यासात यथातथाच. कधी मन रमलंच नाही त्याचं शाळेत. ती फुटक्या गळक्या हौदाची गणितं, ते भुमितीतले त्रिकोण आणि त्यांची क्षेत्रफळं, इतिहासांच्या सनावळ्या – रामाचं डोकंच गरगरायचं. फक्त खेळायचा तास तेवढा त्याच्या आवडीचा. कबड्डीचा तो राजा होता – एकदा चढाईला उतरला की दोघा तिघांना शिवल्याशिवाय तो परत यायचाच नाही आणि कोपऱ्यात रक्षण करताना असा तो समोरच्याच्या पायात घुसायचा आणि चिवटपणाने त्याला असा धरून ठेवायचा जणू गुळाला चिकटलेला डोंगळाच.

PT चे शिक्षक एकदा वडिलांना म्हणालेही होते – पोरगं चांगलं खेळतं. त्याला खेळू द्या, राज्यस्तरावर गेला तर त्या सर्टिफिकेटच्या जोरावर पुढं नोकरी वगैरे चांगली भेटेल. पण धोपटमार्गाने जाणाऱ्या वडिलांच्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही.

अगदी गटांगळ्या खात नाही पण कसाबसा SYBA पर्यंत रामाची गाडी गेली, SY ला दांडी गुल झाल्यावर वडिलांनी रामाला आपल्याच कारखान्यात चिकटवलं आणि रामा आपल्या वडिलांचे आयुष्य परत पहिल्यापासून जगू लागला. तीच कहाणी पुन्हा एकदा.

रामाचं लग्न झालं होतं, त्याला एक मुलगी होती. आई वडिल परत अलिबागला आपल्या घरी गेले होते. रामाची मुलगी त्याच म्युनिसिपल शाळेत होती. बापाची कबड्डी तिच्याही रक्तात उतरली होती. तीच चढाई करायची तडफ आणि तोच कोपऱ्यातला चिवटपणा. आज मुलीच्या शिक्षकांनी रामाला शाळेत बोलावून घेतले होते – शाळेच्या अभ्यासात गती नसेल फारशी पण तुमची पोरगी चांगलं खेळते. तिला खेळू द्या, राज्यस्तरावर गेली तर त्या सर्टिफिकेटच्या जोरावर पुढं नोकरी वगैरे चांगली मिळेल तिला. आणि हल्ली व्यावसायिक कबड्डीतही करियर करता येतं.

रामासाठी जणू कोणी घड्याळाचे काटे उलट फिरवले होते. त्याच्या नजरेसमोर कबड्डीचा सामना जिंकलेला, घामाने डबडबलेला, अर्ध्या चड्डीतला शाळकरी रामा आला – आणि डोळ्यासमोर आला आजचा कारखान्यात घाम गाळणारा, अजूनही चाळीतल्या त्याच दोन खोल्यांत राहणारा रामा.

 रामा निर्धार करून शिक्षकांना म्हणाला – “तिला खेळू दे, मास्तर. माझीच कहाणी मी माझ्या पोरीला पुन्हा एकदा जगायला नाही लावणार. “

© डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दंवबिंदू… ☆ स्वप्ना मुळे (मायी) ☆

स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ दंवबिंदू… ☆ स्वप्ना मुळे (मायी) ☆

“या… उगवलात का आज?? नशीबच आमचं! ” असं रागानं म्हणत तिनं गुळण्या केल्या आणि खोलीत शिरून पलंगाखालची एक कळकट पिशवी ओढली. त्यातून ताडपत्री बाहेर काढली. सासूबाईंना म्हणाली, “मी पत्र्यावर चढून टाकून घेते नीट हे… आणि पाणी ओतून बघते. तुम्ही कुठे गळतंय ते लगेच सांगा मला. आज दिलंय सूर्यबाबानं दर्शन, तर करून घेऊ हे काम! चार दिवस मेल्या पावसानं संधी दिली नाही पत्र्यावर चढायची… आज करूनच टाकते. ”

सासुबाई म्हणाल्या, “अगं चहा तर घे सकाळचा…”

त्यावर चिडूनच आरती म्हणाली, “अहो, त्या निसर्गाचं डोकं फिरलं पाच मिनिटात, तर परत गोंधळ, आणि मग मला पोळ्या करायला निघायचंय. नंतर हे राहून जातं… तुमचे उगाच हाल. घरभर गळक्याखाली भांडी लावत बसायचं. गळक्या पाण्यानं आपल्या ऑर्डरच्या निवडलेल्या भाज्या सडून जातायेत. नकोच! आधी हे काम, मग चहा…” असं म्हणत ती खिडकीचा आधार घेत कसरत करत वर चढली. ते प्लास्टिक पूर्ण पत्र्यावर टाकलं. उडून जायला नको म्हणून जागोजागी त्यावर दगड ठेवले.

सासूबाईंनी कसंबसं करत, वर तिला कळशी दिली… जिथं जास्त गळत होतं, तिकडे पाणी टाकत सगळे धोक्याचे कोपरे तिनं पाणी टाकून तपासले. सगळं उरकून ती खाली उतरली. एकदम घामाघूम झाली होती ती आणि दमली पण होती. सुरकुतलेल्या हातांनी सासूबाईंनी वेलचीचा चहा समोर धरला, तशी ती सुखावली.

चहा घेताना सासुबाई डोळे भरून कौतुकानं आपल्या सुनेकडे पाहत होत्या… आजपर्यंत उपभोगत असलेलं सुख आपल्या लेकाच्या आजारपणानं हरवलं; त्यात लेकही हरवला… पण हिनं हिम्मत हारली नाही. खरंतर माहेरी निघून जाऊ शकत होती… पण गेली नाही. आपला हात डोक्यावर ठेवून म्हणाली, “तुम्ही फक्त आशीर्वादाची साथ द्या, आपण परत नव्यानं उभं राहू. ”

ह्या वर्षभरात खुप कष्ट केले… लोकांची देणी फेडली, खरंतर किती वैभवशाली जगणं होतं आम्हा दोघींचं. लेकाची चांगली नोकरी, छान फ्लॅट, दागिने… पण किती बदललं सगळं! आपण विचारही केला नव्हता आयुष्याचा शेवटचा टप्पा असा जाईल… पण ही पोरगी खरंच गुणाची आहे.

परवा समोरच्या रो हाऊसच्या रांगेत सुखवास्तुतल्या त्या डॉक्टरणीनं क्लिनिक फार चाललं नाही, म्हणून नैराश्य येऊन आत्महत्या केली. त्या दिवशी सगळ्या कॉलनीत हळहळ झाली, तेव्हा बरेच जण आपल्या सुनेविषयी किती सकारात्मक बोलले… 

‘आरतीकडून शिकायला हवं. जिथं अपार्टमेंटमध्ये सून म्हणून आली, त्याच कॉलनीत बंगल्यातली ही वरची छोटी पत्र्याची खोली भाड्यानं घेऊन राहते… परिस्थितीची लाज वाटून घेतली नाही आणि नैराश्याचं मळभ दाटू दिलं नाही. जोडीदार सुटला, ते दुःख तर केवढं! पण सगळं स्वीकारून आनंदी असते. लाज न बाळगता पोळ्यांची कामं सुरू केली. नाहीतर ह्या डॉकटरणीसारखी अशी असंख्य माणसं थोडंही अपयश पचवत नाहीत. इतकं सुखी आयुष्य असून असे निर्णय घेतात…’

‘अरे, जरा समाजात बघा… एक वेळ खायला मिळत नाही. हात, पाय, डोळे असे अवयव नसलेले हिमतीनं जगतात आणि हे धडधाकट लोक मनानं खचून असे जीव देतात… ना चिमुरड्या जीवांचे विचार, ना म्हाताऱ्या आई-वडील, सासु-सासऱ्यांचा विचार करतात…’

‘खरंच मालतीबाई, तुमची आरती कमाल आहे बरं! सध्या तिचं ते निवडलेल्या भाज्या देण्याची सर्विस तर किती मस्त… सगळे खूश आहेत तिच्यावर…’_

सगळ्या बायकांनी आरतीचं कौतुक केलं होतं. हे सगळं आठवून सासुबाईचं मन आताही सुखावलं.

आरतीनं सासूबाईंना हाक मारली, “आई, अहो कोणत्या विचारात हरवल्या? आई, मी आज पोळ्या झाल्या की जरा मार्केटमध्ये जाऊन येईन. तो शेतकरी ताज्या गवार शेंगा देईन म्हणालाय. आणून आपल्याला आज रात्रभरात त्या निवडायच्यात. एका कॅटरिंगवाल्याची ऑर्डर आहे…”

सासुबाई तिचा हात हातात घेत म्हणाल्या, “करू या गं… पण तू थोडी कमी दगदग कर. स्वतःची काळजी घे. ”

सासूबाईंचा हात दाबत ती म्हणाली, “आई माणसावर ना वेळ येत असते. त्याक्षणी त्यानं हिम्मत धरली आणि कष्ट केलं तर तो जिंकलेला असतो. अगदी ह्या तुळशीवर पडलेल्या दवबिंदूसारखं…”

“दवबिंदूसारखं…? म्हणजे कसं गं? ”_ सासुबाईंनी विचारलं.

तिनं त्यांचा हात धरत त्यांना गच्चीत कठड्यावर ठेवलेल्या तुळशीजवळ आणलं. त्यावर पडलेले थेंब दाखवत ती म्हणाली, “काल पावसामुळं हे पाणी त्याचं वहाणं सोडून इथं गोठलं ह्या पानांवर… पण त्यानं मनात हिम्मत धरली ना, सूर्याला स्वतःत पाहण्याची! वाहण्याचं अस्तित्व विसरलेला थेंब आज मोत्यासारखा दिसतोय ना आई? ही अशी चमकण्याची जिद्द घेऊन जगु या आपण दोघी… लवकरच आपण आपलं हरवलेलं जगणं परत जगायला लागू आई. फक्त तुम्ही साथ द्या…”

सासूबाईंच्या गालावरही दवबिंदू आले होते कारण सूर्याची किरणं सगळ्याच थेंबावर पडून सगळीकडे मोती चमकत होते. जगण्याची जिद्द सूर्याला स्वतःत पाहण्याचं दवबिंदूचं वेड आता दोघींच्या आसवांत स्पष्ट चमकत होतं.

 

© स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संस्थापक् संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मुद्दल… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ मुद्दल… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

☆

दर महिन्याच्या पाच तारखेला त्या आजी पोस्टात यायच्या.

काउंटरवर शंभरची नोट ठेवायच्या, आरडीच्या पासबुकात नोंद करून घ्यायच्या, आणि जाताना एकच प्रश्न विचारायच्या.

“जाधवांचा पत्ता लागला का रे? “

अक्षयची या पोस्ट ऑफिसात बदली होऊन तीन महिने झाले होते आणि तिन्ही महिने त्याने हे न चुकता बघितलं होतं. पाऊस असो, ऊन असो, पाच तारीख चुकली नाही. एकदा पाच तारखेला रविवार आला, तर आजी सहा तारखेला सकाळी दार उघडायच्या आत हजर. सगुणाबाई नाव त्यांचं. ऐंशीच्या घरातल्या. जुन्या पोस्टमास्तरांनी चार्ज देताना सांगून ठेवलं होतं, “त्या आज्जी येतील. शंभर भरतील. जाधवांचं विचारतील. नाही म्हणायचं आणि चहा विचारायचा. चाळीस वर्षं चाललंय हे. “

चाळीस वर्षं? अक्षयला राहवलं नाही. चौथ्या महिन्याच्या पाच तारखेला नोंद करून झाल्यावर त्याने विचारलंच.

“आजी, हे जाधव कोण? आणि पत्ता कशाला हवाय तुम्हाला? “

सगुणाबाईंनी क्षणभर त्याच्याकडे बघितलं. मग त्या काउंटरजवळच्या बाकावर बसल्या आणि पासबुक मांडीवर ठेवून बोलायला लागल्या.

“मुद्दलाचा शोध चाललाय रे बाबा. चाळीस वर्षं झाली. ” त्यांनी पासबुकावरून हात फिरवला. “पंच्याऐंशी साल. आम्ही सांगलीला होतो. हे गोडाऊनवर कामाला आणि मी घरोघरी धुणीभांडी करायचे. पहिलं बाळंतपण अवघड झालं माझं. दवाखान्याने पाचशे रुपये मागितले. पाचशे म्हणजे तेव्हा यांचे दोन महिन्यांचे पगार. हातात फुटकी कवडी नव्हती. आणि यांच्याबरोबर गोडाऊनवर काम करणारा गणपत जाधव नावाचा गडी होता. कोकणातला. त्याने त्या रात्री स्वतःच्या पगाराचं पाकीट जसंच्या तसं यांच्या हातात ठेवलं. म्हणाला, “ पोरगं आधी, हिशोब नंतर. ” आजींचा आवाज जरासा कापला. “माझा मुलगा त्या पाचशेमुळे जगात आला रे. “

“आणि मग? “

“मग महिन्याभरात गोडाऊन बंद पडलं. गणपतभाऊ गावी निघून गेले. जाताना पत्ता लिहून दिला होता एका कागदावर. पावसाळ्यात आमच्या पत्र्याच्या खोलीत पाणी शिरलं आणि त्या कागदाचा लगदा झाला. यांना गाव आठवतं ते अर्धवट. देव.. देवरुख, देवगड, देवळे.. काहीतरी देवाचं नाव होतं म्हणतात. आम्ही शोधत राहिलो, सापडले नाहीत. मग हे म्हणाले, जोवर सापडत नाही, तोवर त्याचे पैसे वेगळे साठवत जा. वाढवत ठेव. देणं ठेवून मरायचं नाही. “

त्यांनी मांडीवरचं पासबुक उघडून दाखवलं. आणि त्याच्याखाली पिशवीतून अजून पाच जुनी पासबुकं काढली. चाळीस वर्षांची चवड. पहिल्या पुस्तकावरची शाई उडालेली, शेवटचं करकरीत.

“दर महिन्याला शंभर. आधी दहा भरायचे, मग परवडेल तसे वाढवले. मुदत संपली की पुन्हा नवीन खातं. व्याजासकट सगळं मिळून एक लाख बहात्तर हजार झालेत. ” आजी शांतपणे म्हणाल्या. “मुद्दल पाचशेच आहे रे. बाकी सगळं व्याज आहे. उपकाराचं व्याज मोठं असतं. “

 

अक्षय पासबुकांच्या चवडीकडे बघत राहिला. मग त्याने एक गोष्ट केली, जी चाळीस वर्षांत कुणाला सुचली नव्हती.

पोस्टमनला गावातलं प्रत्येक घर माहीत असतं. अक्षयने त्याच संध्याकाळी देवरुख, देवगड, देवळे आणि आसपासच्या सगळ्या पोस्ट ऑफिसांना मेसेज टाकले. नाव गणपत विठोबा जाधव. वय नव्वदच्या आसपास. पंच्याऐंशी साली सांगलीच्या गोडाऊनवर होता. कुणाच्या बीटमध्ये असे आजोबा असतील तर कळवा.

 

आठवडा गेला. दुसरा गेला. देवगडहून नकार आला, देवळ्याहून नकार आला. अक्षयला वाटलं, चाळीस वर्षांत जे झालं नाही ते आपल्याला दहा दिवसांत कसं जमेल.

… आणि अकराव्या दिवशी देवरुखजवळच्या साखरप्याहून फोन आला. तिथला जुना पोस्टमन हसत म्हणाला, “जाधव आजोबा? अरे, आमच्या बीटमधले. अजून ठणठणीत आहेत. पारावर बसून पोरांना सांगलीच्या गोडाऊनच्या गोष्टी सांगत असतात. “

 

पुढच्या पाच तारखेला सगुणाबाई नेहमीप्रमाणे आल्या. शंभराची नोट काढली. आणि अक्षयने काउंटरवरून मोबाईल पुढे केला. स्क्रीनवर व्हिडीओ कॉल चालू होता. पलीकडे साखरप्याच्या पोस्टात एका बाकावर एक नव्वदीचे आजोबा बसले होते.

“आजी, तुमच्या यजमानांना घेऊन याल का? जाधव सापडलेत. “

त्या दिवशी संध्याकाळी काठी टेकत रामभाऊ पोस्टात आले. स्क्रीनवर दोघं जुने दोस्त एकमेकांना बघत राहिले. चाळीस वर्षं मधे होती, पण ओळखायला दोन सेकंद लागले.

“गणप्या.. “

“रामा.. अरे तू जिवंत आहेस? “

… पोस्ट ऑफिसातली रांग थांबली. कारकून उठून उभे राहिले. हसणं आणि रडणं एकदमच झालं. सगुणाबाई डोळे टिपत बाजूला उभ्या होत्या, आणि त्यांच्या चेहऱ्यावर चाळीस वर्षांचं ओझं उतरताना अक्षयला स्पष्ट दिसत होतं. रामभाऊंनी सगुणाबाईंच्या हातातली पासबुकं स्क्रीनसमोर धरली. “तुझे पाचशे परत करायचे राहिले होते. बायकोने चाळीस वर्षं साठवलेत. एक लाख बाहत्तर हजार झालेत. नातवाचा खाते नंबर दे, उद्या भरतो. “

 

पलीकडे गणपत जाधव बराच वेळ गप्प होते. मग म्हणाले, “माझे पाचशेच होते रे. ते तेवढे पाठव. बाकीचे तुझ्या सुनेच्या हातचे लाडू समजून साखरप्याच्या शाळेला दे. पोरांची फी भरायला. पाचशेने एक पोरगं जगलं, आता लाखाने शंभर शिकू देत. “

… रामभाऊंनी स्क्रीनकडे बघून हात जोडले आणि एवढंच म्हटलं, “आजची रात्र चाळीस वर्षांनी शांत झोपेन. “

 

महिन्याभराने साखरप्याच्या शाळेत नवीन खोलीचं काम सुरू झालं. भिंतीवरच्या पाटीचा फोटो अक्षयच्या मोबाईलवर आला. “गणपत जाधव आणि रामभाऊ साळुंखे यांच्या मैत्रीच्या स्मरणार्थ. “

… आणि पुढच्या पाच तारखेला सगुणाबाई पुन्हा पोस्टात आल्या. अक्षयने चमकून बघितलं. त्यांनी काउंटरवर शंभराची नोट ठेवली आणि नवीन खात्याचा फॉर्म मागितला.

“आता कशासाठी आजी? देणं तर फिटलं.. “

“सवय राहिली रे चाळीस वर्षांची, ” आजी हसल्या. “आता साठवीन ते साखरप्याला जायच्या तिकिटासाठी. गणपतभाऊंच्या हातचा चहा प्यायचाय एकदा. “

☆

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : sunil68deshpande@outlook.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सहल ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🔅 जीवनरंग 🔅

☆ सहल ☆ विभावरी कुलकर्णी ☆

पुण्याची सकाळ नेहमीसारखीच धावपळीची होती. पण आजच्या या सकाळी ‘स्नेहबंध’ सोसायटीच्या त्या छोट्याशा आवारात एक वेगळाच उत्साह ओसंडून वाहत होता. एका लक्झरी बसच्या शेजारी पन्नाशी आणि साठीच्या पार गेलेल्या सात-आठ महिला गप्पा मारत उभ्या होत्या. कोणाच्या हातात पाण्याची बाटली होती, तर कोणाच्या खांद्यावर हलकीशी शबनम बॅग. या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक लहान मुलासारखा भाबडा आनंद खेळत होता.

या संपूर्ण उत्साहाच्या केंद्रस्थानी होती अनघा.

पंचविशीत असलेली अनघा, हुशार, समजूतदार आणि अत्यंत संवेदनशील मुलगी. सोसायटीतल्या या सगळ्या काकू, मावशींना तिने लहानपणापासून पाहिलं होतं. त्या साऱ्या जणी तिच्या आईच्या वयाच्या होत्या. प्रत्येकीची स्वतःची एक कहाणी होती. कुणी आयुष्यभर संसाराची गाडी ओढताना स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवली होती, तर कुणी मुलांच्या करिअर आणि नातवंडांच्या संगोपनात स्वतःचं अस्तित्त्वच विसरून गेल्या होत्या. सकाळी ६ वाजता उठून रात्री ११ पर्यंत स्वतःला घरातील कामांत झोकून देणाऱ्या या स्त्रियांनी “स्वतःसाठी जगणं” म्हणजे काय, हे कधी अनुभवलेच नव्हते.

अनघाने जेव्हा ऑफिसच्या कामातून काही दिवसांची सुट्टी घेतली, तेव्हा तिच्या मनात पहिला विचार आला तो म्हणजे ‘या सगळ्या मावशींना कुठेतरी दूर घेऊन जायचं. त्यांना या रोजच्या चौकटीतून बाहेर काढायचं. ‘ तिने सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘कास पठार’ची निवड केली. निसर्गाची अद्भूत किमया, विविधरंगी फुलांचा गालिचा, आणि साताऱ्याची ती प्रसन्न हवा! अनघाला प्रामाणिकपणे वाटत होतं की, निसर्गाच्या या अवर्णनीय सौंदर्यात या साऱ्यांना नेलं, तर त्यांचं मन मोकळं होईल.

पण ही सहल आयोजित करणं सोपं नव्हतं.

सुरुवातीला जेव्हा अनघाने हा प्रस्ताव सोसायटीत ठेवला, तेव्हा अनेकजणींनी नकार दिला.

“छे गं अनघा, आता या वयात कुठे भटकू आम्ही? ” सावित्रीकाकू म्हणाल्या.

“आणि घरचं कोण करेल? आमचे अहो तर माझ्याशिवाय चहासुद्धा घेत नाहीत, ” शांताबाईंची तक्रार होती.

काहींना पैशांची अडचण होती. “हल्ली सहलीचे रेट किती वाढलेत, उगीच कशाला उधळपट्टी? ” असं म्हणणाऱ्या सुमतीकाकूही होत्या.

पण अनघा जिद्दी होती. तिने घरोघरी जाऊन प्रत्येकीची समजूत काढली. “काकू, फक्त एक दिवस! स्वतःसाठी जगा. घरातली कामं रोजचीच आहेत. “

ज्या काकूंची आर्थिक अडचण होती, त्यांच्याकडून अनघाने एक रुपयाही घेतला नाही. तिने स्वतःच्या पगारातून त्यांचे पैसे भरले. जेव्हा तिच्या आईने विचारलं, “तू इतका खर्च का करतेस अनघा? “

तेव्हा अनघा हसून म्हणाली होती, “आई, या मावशींनी आयुष्यभर जो त्याग केलाय, त्यासमोर माझी ही छोटीशी पुंजी काहीच नाही. त्यांना त्यांचा तो आनंद मिळवून देणं, हेच माझ्यासाठी मोठं बक्षीस आहे. “

अखेर तो दिवस उजाडला. अनघाने प्रत्येकीसाठी प्रवासात लागणारा नाश्ता, पाण्याचे जार, आणि प्रथमोपचार पेटी (First Aid Kit) स्वतः तयार केली होती.

बस पुण्यातून साताऱ्याच्या दिशेने निघाली. महामार्गावर गाडी लागताच वातावरणातला संकोच वितळू लागला. अनघाने जुनी, आवडती गाणी लावली.

“झाड लाविले दारी… “, “अरुप रूपी प्रकटली… “, “ये रे घना… ” काकूंच्या गप्पांचा सूर रंगू लागला. आयुष्यभर स्वयंपाकघरात आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असणाऱ्या या महिला आज मोकळा श्वास घेत होत्या.

प्रवासात अनघाने सर्वांना गरमागरम पोहे आणि चहा दिला.

शांताबाई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, “अनघा बाळा, आज कित्येक वर्षांनी मला सकाळी उठून कोणासाठी चहा करावा लागला नाही. हातात आयता चहाचा कप मिळणं, यापेक्षा दुसरं सुख काय असू शकतं गं? “

“हो ना गं! रोज सकाळी ‘काय नाश्ता करू? ‘ हा प्रश्न पडायचा. आज हातात आयता गरम पोह्याचा डबा आलाय. स्वर्गासारखं वाटतंय, ” सुमतीकाकू म्हणाल्या.

त्या साऱ्या जणी अनघाला मनोमन आशीर्वाद देत होत्या. रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे, गार वारा आणि गाण्याचा ताल… अनघाला वाटत होतं, तिची मेहनत सार्थकी लागली. तिने मनातल्या मनात कास पठाराच्या त्या सुंदर फुलांची कल्पना केली. ‘जेव्हा त्या हे निसर्गसौंदर्य पाहतील, तेव्हा किती खूश होतील! ‘ या विचारानेच तिचं हृदय आनंदाने भरून येत होतं.

दुपारी १२ च्या सुमारास बस कास पठारावर पोहोचली.

कास पठार – युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं ठिकाण. निळं, गुलाबी, पिवळं, जांभळं अशा विविधरंगी छोट्या-छोट्या फुलांचा गालिचा पसरलेला. अनघाने सर्वांची तिकिटे काढली आणि त्यांना पठारावर घेऊन गेली. तिची उत्सुकता ताणली गेली होती. ती प्रत्येकीच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे आणि आनंदाचे भाव टिपण्यासाठी तयार होती.

“काकू, हे पहा! किती सुंदर आहे ना हे निसर्गाचं रूप! ” अनघा उत्साहाने म्हणाली.

सगळ्या जणी फिरू लागल्या. पण तितक्यात, समूहातील एक ज्येष्ठ आणि जरा मिजासखोर असणाऱ्या सुनंदाकाकू मोठ्याने हसल्या आणि तुच्छतेने म्हणाल्या,

“छ्या! ही रानटी फुले दाखवायला इतक्या लांब आणले होय? ही तर आमच्या शेताच्या बांधावर तुडवत जात असतो आम्ही लहानपणा पासूनच! या बारीक-सारीक गवताच्या फुलांसाठी एवढा त्रास आणि एवढा खर्च? “

त्या शब्दांचा आवाज अनघाच्या कानावर आदळला आणि एखाद्या काचेच्या भांड्यासारखा तिचा सगळा आनंद एका क्षणात चक्काचूर झाला.

सुनंदाकाकूंच्या त्या एका वाक्याने बाकीच्या महिलांच्या उत्साहावरही पाणी फिरवले गेले. काही जणी म्हणाल्या, “हो ना, मला वाटलं खूप मोठी मोठी, बागेत असतात तशी गुलाबाची किंवा झेंडूची झाडं असतील. ही तर अगदीच छोटी रानफुलं आहेत. “

अनघा स्तब्ध झाली. तिचं हृदय पिळवटून निघालं. ज्या निसर्गसौंदर्यासाठी तिने महिनाभर नियोजन केलं होतं, ज्या वनस्पतींच्या दुर्मीळतेची जगभरात चर्चा होती, त्याला या महिलांनी ‘बांधावरचं रानटी गवत’ म्हणून हिणवलं होतं!

तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. पण तिने पटकन स्वतःला सावरलं. तिला समजलं की, दृष्टिकोन आणि पिढीचा फरक इथे आडवा येत होता. ज्या महिलांनी आयुष्यभर शेतात किंवा साध्या बागांमध्ये मोठी फुलं पाहिली होती, त्यांना या दुर्मीळ ‘बायोडायव्हर्सिटी’चं महत्त्व समजावणं कठीण होतं.

पण या एका घटनेमुळे तिची पूर्ण सहल निष्फळ ठरण्याच्या मार्गावर होती. वातावरणात एक प्रकारचा संताप आणि शांतता पसरली होती.

अनघाने समंजसपणा धरला आणि ठरवलं ‘मला निराश होऊन चालणार नाही. मी यांना आनंद देण्यासाठी आणलं आहे. जर त्यांना निसर्गात तो आनंद मिळत नसेल, तर मला मार्ग बदलावा लागेल. ‘

तिने आपली वैयक्तिक नाराजी एका बाजूला ठेवली. चेहऱ्यावर पुन्हा एकदा गोड हास्य आणत ती म्हणाली, “अहो काकू, निसर्गाची आवड प्रत्येकाची वेगळी असते. चला, तुम्हाला जर इथे मजा येत नसेल, तर आपण पुढे जाऊया! “

तिने लगेच सर्वांना बसमध्ये बसवले. साताऱ्यातील एका उत्तम, स्वच्छ आणि प्रसिद्ध हॉटेलमध्ये ती सर्वांना घेऊन गेली.

तिथे तिने सातारची प्रसिद्ध ‘झणझणीत मिसळ’, ‘पिठलं-भाकरी’, आणि सोलकढी’ची ऑर्डर दिली.

जेव्हा हॉटेलमध्ये गरमागरम, चवदार जेवण समोर आलं, तेव्हा सगळ्या महिलांचे चेहरे पुन्हा उजळले.

“अहाहा! काय अप्रतिम चव आहे, ” सावित्रीकाकू म्हणाल्या.

“खरंच, घरी रोज स्वयंपाक करून कंटाळा आला होता. आज अगदी तृप्त वाटलं, ” बाकीच्या जणींनीही मान डोलवली.

जेवण झाल्यावर अनघाने सर्वांसाठी सातारचे प्रसिद्ध ‘ कंदीपेढे’ मागवले. गोड तोंडाने सगळ्यांचा मूड पूर्णपणे बदलला.

जेवण झाल्यावर अनघाने लगेच पुढचा प्लॅन तयार केला. साताऱ्याजवळील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ‘सज्जनगड’ आणि ‘शिखर शिंगणापूर’ किंवा स्थानिक ‘पालीचे खंडोबा मंदिर’ आणि ‘अजिंक्यतारा’ परिसरातील ऐतिहासिक देवस्थानांकडे तिने गाडी वळवायला सांगितली.

जेव्हा बस देवस्थानाच्या आवारात पोहोचली, तेव्हा सर्व महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांती आणि भक्तीभाव दिसून आला.

मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन जेव्हा त्यांनी दर्शन घेतलं, घंटा नाद ऐकला, आणि तीर्थ-प्रसाद घेतला, तेव्हा त्यांच्या मनातील सर्व थकवा निघून गेला.

शांताबाई मंदिराच्या पायरीवर बसून म्हणाल्या, “अनघा, तू आज आम्हाला साक्षात देवाच्या चरणी आणलंस. या वयात आम्हा बायकांना निसर्गापेक्षा देवाचं दर्शन जास्त समाधान देतं गं. खूप छान वाटलं. “

सुनंदाकाकू ज्या कास पठारावर टोमणा मारून गेल्या होत्या, त्याही अनघाजवळ आल्या. अनघाच्या डोक्यावर हात ठेवत त्या म्हणाल्या, “बाळा, मघाशी मी पठारावर काहीतरी भलतंच बोलले, मला माफ कर. पण तू रागवली नाहीस आणि आम्हाला इथे घेऊन आलीस. आज देवाने तुझ्या रूपाने आम्हाला हा आनंदाचा दिवस दाखवला. “

संध्याकाळी जेव्हा बस पुण्याच्या दिशेने परत निघली, तेव्हा बसमधलं वातावरण पूर्णपणे बदललेलं होतं.

सगळ्या काकू-मावशींच्या हातात सातारचे पेढे, मंदिरातला प्रसाद आणि चेहऱ्यावर एक असीम समाधानाचं हास्य होतं. त्या अनघाचे हात हातात घेऊन तिचे आभार मानत होत्या.

“आयुष्यात असे दिवस खूप कमी येतात, जेव्हा स्त्रीला स्वतःसाठी जगायला मिळतं. तू आज तो दिवस आम्हाला दिलास, अनघा! ” 

अनघा बसच्या खिडकीतून बाहेर पाहत होती. कास पठारावर पडलेला तो विरजणाचा क्षण आता खूप मागे राहिला होता.

तिला समजलं होतं की, सहलीचं सार्थक निसर्गाच्या चित्रात नव्हतं, तर या साऱ्यांच्या मनाला मिळालेल्या समाधानात होतं. ज्या उद्देशाने तिने ही सहल काढली होती त्या आईसमान महिलांच्या चेहऱ्यावर हसू आणणं तो उद्देश अखेर पूर्ण झाला होता.

पुण्यात पोहोचल्यावर जेव्हा त्या सगळ्या आपापल्या घरी निघून गेल्या, तशी अनघाने एक दीर्घ आणि शांत श्वास घेतला. तिच्या मनात एकच विचार होता ‘कष्ट सार्थकी लागले! ‘

 

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “आजीची मुंदी…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ आजीची मुंदी… ☆ प्रा. भरत खैरकर ☆

पुण्याच्या मंडईत अजूनही सकाळी साडेसहाला तशीच गर्दी असते. भाजीचे ढीग.. फुलांचे हार.. आणिघामाचा.. शेणाचा.. आणि नुकत्याच कापलेल्या कोथिंबीरीचा संमिश्र वास. मी तिथून गेलो की मला १९७५ सालचा एक अर्धातास आठवतो. त्या अर्ध्या तासात माझ्या आयुष्याचा निकाल लागला होता.

मी नुकताच पुण्याला आलो होतो. गावाकडून आलेल्या पोरासाठी पुणे म्हणजे दुसरा देश! सायकलवर फिरणारं शहर, पणप्रत्येक गल्लीत काहीतरी वेगळं घडत असल्याची जाणीव. मी तेव्हा काय करत होतो? फायनान्स कंपनीत होतो. आजच्याभाषेत सांगायचं तर ‘फील्ड ऑफिसर’. तेव्हाच्या भाषेत – वसुली.

व्यापाऱ्यांकडून रोजची, आठवड्याची आरडी, वर्गणी जमा करायची. हातात एक लांब वही, खाकी पिशवी, आणिकपाळावर उन्हाचा शिक्का.

गावाला याचा अर्थ वेगळा होता. “पोरगा पुण्यात काय करतो? ” हा प्रश्न आईपेक्षा जास्त काकांना छळत होता. काका म्हणजेवडिलांचे धाकटे भाऊ. गावात ज्यांचा शब्द म्हणजे हुकूम! त्यांना वाटायचं, पुण्यात गेलेला पोरगा म्हणजे साहेब झाला पाहिजे. खुर्ची, टेबल, टाय. माझं काम त्यांना ‘बिगारी’ वाटायचं. लोकांच्या दारात उभं राहून पैसे मागणे.

एकदा काका हट्टाला पेटले. “चला, दाखवच तू काय दिवे लावतोस ते पुण्यात. ” वडील गप्प. त्यांनाही बघायचं होतं. दोघेसकाळच्या एसटीने पुण्यात आले. माझी एका खोलीची जागा.. पत्र्याची.. त्यांना मी मंडईत घेऊन गेलो. माझं ऑफिस तेच!

मी काय केलं? मंडईतल्या माझ्या सगळ्यात जुन्या ग्राहकाकडे, एका भांड्याच्या व्यापाऱ्याकडे त्यांना बसवलं. “बाबा, काका, तुम्ही इथे बसा. मी जरा वसुली करून येतो. ” त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न होता – हा आपल्याला इथे का बसवतोय?

मी बाहेर पडलो. अर्धा तास. फक्त अर्धा तास.

त्या अर्ध्या तासात मी नेहमीसारखा फिरलो. शेट्टींच्या दुकानात वहीत नाव, सही. जोशी काकूंकडून वीस रुपये. एकाने चहापाजला, एकाने तक्रार केली – “अरे काल उशिरा आलास. ” मी सगळं लिहून घेतलं.

मला माहिती नव्हतं, मी बाहेर असताना आत काय घडतंय. मी परत आलो तेव्हा चित्र वेगळं होतं. व्यापाऱ्याने त्यांना चहामागवला होता. काका थोडे ओशाळलेले, बाबा शांत पण डोळ्यात एक वेगळीच चमक.

संध्याकाळी खोलीवर आल्यावर काकांनी विषय काढलाच. त्यांचा स्वभावच तसा. मनात ठेवणारे ते नव्हतेच!

“काय रे, हेच का तुझं काम? लोकांचे चार-चार रुपये जमा करत हिंडायचं? यात काय इज्जत आहे? “

खोलीत शांतता पसरली. पत्र्यावर पावसाचे थेंब नसताना सुद्धा अशीच शांतता अंगावर येते.

तेव्हा बाबा बोलले. माझे बाबा. आयुष्यात कधी मोठ्याने न बोलणारे. ते म्हणाले, ते आजही माझ्या कानात आहे.

“अरे, तुझ्या पोरासारखं दारूचे पैसे जमा करत नाही तो. तुझा पोरगा गावात लोकांचे संसार मोडतो, दारूच्या बाटल्यांसाठीवसुली करतो. माझा पोरगा निदान इज्जतदारीने कमावतो. हरामाचा पैसा नाही कमवत. ” काका गप्प.

बाबा पुढे म्हणाले, “सकाळी त्या व्यापाऱ्याकडे काय ऐकलंस? काय म्हणत होते लोक? ‘पोरगा मेहनती आहे, इमानदारआहे, दिलेलं काम बरोबर करतो. ‘ यापेक्षा अजून काय पाहिजे रे माणसाला? “

त्या दिवशी मला कळलं, वडिलांचा ‘इज्जत’ हा शब्द कधी नोटांच्या बंडलात मोजला जात नाही. तो मंडईतल्या गर्दीत, एकाव्यापाऱ्याच्या तोंडून आलेल्या दोन शब्दात मोजला जातो. माझ्या काकाचा मुलगा खरंच तेव्हा गावात दारूच्या गुत्त्यावर वसुलीकरत होता. लोकांच्या शिव्या खात होता. माझी वसुली आणि त्याची वसुली यातला फरक बाबांनी एका वाक्यात सांगितलाहोता.

माझ्या बोटातली ही अंगठी बघितली का? ही बारा ग्रॅमची. आज सोन्याचा भाव बघितला तर लोक म्हणतील, दाखवतोय. पण ही दाखवण्यासाठी नाही, ही आठवणीसाठी आहे.

मी साईबाबांचा भक्त लहानपणापासून. दहावीत असताना पहिल्यांदा शिर्डीला गेलो. तेव्हा शिर्डी म्हणजे आतासारखंसंगमरवरी नव्हतं. बाहेर छोटे-छोटे स्टॉल. चार आण्यात तांब्याची, प्लास्टिकची अंगठी मिळायची. त्यावर साईबाबांचा फोटो. सगळी पोरं घेत होती, बोटात घालत होती. मला पण घालायची होती. मी त्या गर्दीत उभा राहून बाबांना मनात म्हटलं होतं – “भगवंता, मलाही अंगठी घालायची आहे, पण देतोस तर सोन्याची दे. प्लास्टिकची नको! “

तेव्हा ते बालिश मागणं होतं. देवाकडे सोनं मागणारा दहावीतला पोरगा. पण देव कधी कधी बालिश मागणं सुद्धा लक्षातठेवतो.

दीड-दोन वर्षांनी मी गावी गेलो. आजी.. माझ्या वडिलांची आई.. कंबर वाकलेली, पण नजर पाणीदार. तिने मला जवळबोलावलं. पदराच्या गाठीतून एक छोटी पुडी काढली. उघडली तर आत सोन्याची मुंदी.

“ही मुंदी, ही अंगठी मी तुला देतो, ” ती म्हणाली.

मी चरकलो. मी तेव्हा विशीतला. मला माहिती होतं, गावात अशा गोष्टींचा अर्थ काय होतो.

मी म्हटलं, “आजी, नको. उद्या तू गेली.. मेली.. तर तुझे बाकीचे नातू, माझे चुलत भाऊ मला त्रास देतील. म्हणतील, आजीलाफसवून अंगठी घेतली. “

आजी हसली. तिच्या तोंडात दोनच दात उरले होते.

तिने दुसऱ्या दिवशी सगळ्यांना बोलावलं. अंगणात सगळे गोळा झाले – काका, चुलते, भावकी. ती सगळ्यांच्या समोरम्हणाली, “ही मुंदी मी माझ्या या नातवाला देत आहे. कोणीही त्याच्याकडे हक्क सांगायचा नाही. माझ्या मनाने देत आहे. “

विषय संपला. कोणी काही बोललं नाही, पण नजरा बोलत होत्या.

मी ती अंगठी घेतली आणि सरळ पुण्याला आलो. रविवार पेठेत आसरेकर ज्वेलर्सकडे गेलो. त्यांना म्हटलं, ही वितळवूनमाझ्या बोटाच्या मापाची करा. बारा ग्रॅमची झाली. मी तेव्हा साईबाबांच्या नावाने बोटात घातली, ती आजतागायत काढलेलीनाही. उन्हात काळी पडली, पावसात धुतली गेली, पण बोटावरून निघाली नाही. कारण ती सोन्याची नाही, ती श्रद्धेची आहे.

पुढे काय झालं, ते सांगतो. आजी वारली. बातमी आली आणि मी गावी गेलो. अंगणात रडारड. आणि तिथेच हिशोब सुरूझाला.

काकांनी मला बाजूला घेतलं. म्हणाले, “आजीने तुला अंगठी दिली होती ना? मग आता तेरवीचा खर्च तू कर. “

बाकीच्यांनी हात झटकले. कोणी धान्य दिलं, कोणी पाच पन्नास रुपये. पण सगळा किराणा, सगळा स्वयंपाक, पाहुण्यांचंजेवण – सगळा भार माझ्यावर. बारा ग्रॅमच्या अंगठीचा मोबदला म्हणून मला तेरवीचा अख्खा खर्च भरावा लागला. मी भरला. एक शब्दही न बोलता भरला. कारण मी तेव्हा शिकलो होतो, गावात सोनं फुकट मिळत नाही. त्याची किंमत मोजावी लागते. कधी पैशात, कधी नात्यात.

आज मागे वळून पाहताना हसू येतं. १९७५ ची मंडई आणि आजची मंडई यात किती फरक आहे. तेव्हा वसुली म्हणजेमाणसाला भेटणं होतं. वहीत नाव लिहिणं, सही घेणं, चहा पिणं, सुख-दुःख ऐकणं. आज सगळं फोनवर. UPI चा आवाजआला की व्यवहार संपला. माणूस गायब झाला. तेव्हा ‘इमानदार आहे’ हे सर्टिफिकेट मिळवायला अर्धा तास मंडईत सोडावंलागायचं. आज पाच स्टार रेटिंग एका क्लिकवर मिळतं.

आणि ही अंगठी? आजची पोरं प्लास्टिकच्या अंगठ्या घालत नाहीत. ते थेट सोन्याच्या अंगठ्यांचे फोटो इन्स्टाग्रामवरलाईक करतात. श्रद्धा तशीच आहे, फक्त स्टॉल बदलले आहेत. तेव्हा आम्ही चार आण्याच्या अंगठीसाठी देवाकडे हट्ट करतहोतो, आज आम्ही हजारो रुपयांच्या गॅजेटसाठी हट्ट करतो.

काकांचा तो प्रश्न आजही तसाच आहे, फक्त रूप बदललंय. “काय करतो? ” याचा अर्थ आजही “किती कमावतो? ” असाचविचारला जातो. “कसं कमावतो? ” हा प्रश्न कोणी विचारत नाही. माझ्या वडिलांनी १९७५ साली तो प्रश्न विचारला होता. म्हणूनच मी टिकून राहिलो.

माझ्या बोटातली ही अंगठी बारा ग्रॅमची नाही. ती त्या अर्ध्या तासाची आहे, जेव्हा दोन म्हातारे माणसे मंडईत बसून माझीइज्जत मोजत होते. ती त्या आजीच्या पदराच्या गाठीची आहे, जिने गर्दीतून मला निवडलं. आणि ती त्या तेरवीच्या किराणादुकानाची आहे, जिथे मी शिकलो की प्रत्येक आशीर्वादामागे एक हिशोब असतोच.

साईबाबाने माझं ऐकलं का? माहिती नाही. पण त्याने मला एक गोष्ट शिकवली – सोनं बोटावर घालायचं नसतं, ते मनातबाळगायचं असतं. बोटावरचं सोनं लोकं बघतात, मनातलं सोनं देव बघतो.

आणि म्हणूनच ही अंगठी मी काढत नाही. ती काढली तर मला भीती वाटते, मी पुन्हा त्या मंडईतल्या अर्ध्या तासाला विसरूनजाईन की काय?

 

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “तर्क…” – लेखिका : ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – शोभा जोशी☆

शोभा जोशी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “तर्क…” – लेखिका : ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – शोभा जोशी ☆

अमेरिकेला येण्याची नाना व कमलताईंची पहिलीच वेळ होती. मुलगा फारच मागे लागला म्हणून ते तयार झाले खरे पण नवी सूनबाई, कशी असेल, कशी वागेल काही अंदाज येत नव्हता. ते येऊन पोचले तेव्हा हिना कामाला गेली होती. आपण येणार त्या दिवशीही अर्धा दिवस देखील सुट्टी टाकता येत नाही हा विचार दोघांच्या मनात येऊन गेला पण त्यांनी जयंतला काही विचारलं नाही. त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही हे ठरवून ते आले होते.

त्यांच्या मुलगा जयंत गेली बारा वर्षे अमेरिकेत रहात होता. जयंत हिनाला कुठल्याशा डेटिंग साईट वर भेटला व कोविडच्या काळात त्याचे लग्न झाले. त्यानंतर नील जन्माला आला व भारतात आई बाबांना भेटायला जाणे पुढे गेले. शेवटी जयंतनं आई बाबांनाच आग्रह करून अमेरिकेत बोलावले.

कमलताईंनी बेसनाचे लाडू केले. जयंतचे आवडते बेसनाचे लाडू! बाकी काही आणू नको अशी त्याची सक्त ताकीद होती. धडधडत्या ह्रुदयाने व थरथरत्या पावलांनी दोघांनी जयंतच्या घरात प्रवेश केला.

जयंत व हिनानं घर सुंदर सजवलं होतं. कलाकुसरीच्या वस्तूंनी सुशोभित केलं होतं. समोरच असलेला गजाननाचा भव्य फोटो बघून त्यांचं मन सुखावलं. तेवढ्यात हिना नीलला डे केअर मधून घेऊन घरी आली.

“आई-नाना, कसा झाला प्रवास? ” तिनं शुद्ध मराठीत विचारलं व कमलाताई आश्चर्यचकित झाल्या. नेहमी फोनवर एखादं दुसरं हिंदी वाक्य बोलणारी हिना किती सुरेख मराठी बोलते आहे असं मनात येतय न येतय तोच हिना म्हणाली, “मैत्रीणीकडे मराठी शिकते आहे. ” हिनाचे प्रयत्न बघून नानाही खूष झाले.

“आजी-आजोबा” नीलचे बोबडे बोल ऐकून आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.

जेवण करून दोघं जरासे विसावले.

“किती छान आहे ना हिना? फोनवर बोलताना किंवा फोटोमधून फारसं काही कळत नाही. ” कमलताईंनी नानांकडे उत्तराच्या अपेक्षेने बघितले पण नानांना झोप लागली होती.

जेटलॅगमुळे दोघांनाही बराच वेळ झोप लागली. जयंत जेवणासाठी उठवायला आला.

“चला गरम गरम पोळ्या करतोय. या जेवायला. ” कमलताई व नाना स्वयंपाक घरात आले व कणिक मळणाऱ्या जयंतकडे पहातच राहिले. त्याने डाळ फोडणीस टाकली. तो भराभर पोळ्या करू लागला.

“जयंत, रायता बनव हं. ” हिनाचा आतून आवाज आला. ती नीलला झोपवत होती. हिना डावरी आहे असं कमलताईंच्या लक्षात आलं.. सारं काही करताना डावा हात पुढे होता. अगदी नीलला भरवतानाही! डाव्या हाताने भरवलेलं त्यांना कससच वाटलं.

हिना जेवून बाहेर येऊन काहीतरी वाचत बसली. जयंतनं सगळा स्वयंपाक करून जेवणं झाल्यावर मागचं आवरलं. हिना झोपायला गेल्यावर कमलताईंनी न राहवून विचारलं.

“जयंत, हिनाची तब्ब्येत बरी नाही का? स्वयंपाक तूच केलास म्हणून विचारते. ”

“नाही आई. तिला काही झालेलं नाही. तिला कुकिंग जमत नाही व आवडतही नाही. ” जयंत अगदी सहजपणे सांगत होता.

“पण खाण्याची आवड आहे ना? कुकिंग आवडत नाही म्हणजे? ” कमलताईंनी मनातला प्रश्न मनातच ठेवला पण मगाशी एकदम छान वाटणारी हिना आता मनातून उतरू लागली होती.

जयंत कामाला जाण्यापूर्वी नीलला तयार करत असे. आठ वाजता हिना तयार होऊन कामाला जात असे व नीलला डे-केअरला पोचवून साडेआठला जयंत कामाला जात असे.

हिनाचा डबा पण जयंतनं तयार केला होता.

“अहो घरातलं काहीही काम न करता नवऱ्याला सगळं करायला लावणं या मुलीला कसं बरं वाटतं? इकडची काडी तिकडं करत नाही. असे होतात का संसार? ” कमलताईंना सुचत नव्हतं.

“तुम्ही यात पडू नये असं मला वाटतं. जयंत आनंदी दिसतो आहे. त्यांना जे करायचे ते करू देत. ” नानांनी विचार करून सांगितलं. कमलताईंना ते पटलं नाही. त्यांनी स्वयंपाकाची सूत्रं हातात घेतली व सर्वांचा स्वयंपाक त्या करू लागल्या.

‘सासु सासरे असताना तरी एखादी चार गोष्टी करेल ना स्वयंपाक घरात जाऊन? शोभतं का हे वागणं? माझा मुलगा बिचारा मर मर राबतो आहे. आणि नाना म्हणतात तू यात पडू नको. आपण केवळ महिनाभर राहणार आहोत इथे. ’ कमलताईंना विचारांनी घेरलं होतं. चैन पडत नव्हतं.

एक दिवस जयंत व नाना नीलला घेऊन बाहेर गेले होते. कमलताईंनी धाडस करून हिनाशी बोलायचं ठरवलं.

“हिना तू कधीच कुकिंग करत नाहीस? ” 

“नाही. ” एकच शब्द बोलून ती थांबली.

“बरय ग तुझं. आम्ही न आवडून कुणाला सांगणार. पर्यायच नसतो. संसार म्हटलं की बाईला सारं करावच लागतं. ” कमलताई यावर ती काय बोलते म्हणून वाट बघू लागल्या.

“जयंतला फार काम पडतं असं वाटतं म्हणून विचारत आहात ना? ” हिनाचा प्रश्न रास्त होता.

“आई, हा विषय कधी ना कधी निघणार याची खात्री होती. ” तिनं उजवा हात मनगटापासून बाहेर काढला. तो प्रोस्थेटिक हात होता. तिला कोपरापुढे हातच नव्हता. पण त्या हाताची बनावट इतकी सुरेख होती की कधी हा खोटा हात आहे असं वाटतचं नव्हतं.

कमलताईंनी धक्का बसला.. त्या गडबडल्या.. गोऱ्यामोऱ्या झाल्या.

“आई, आम्ही दोघं भेटलो व एकमेकांच्या प्रेमात पडलो. मला उजवा हात नाही हे मी जयंतला प्रथमच सांगितलं होतं. तरी तो मला भेटत राहिला. मी अशीच जन्मले आहे. डावा हात वापरून बऱ्याच गोष्टी जमत होत्या पण नील झाला तेव्हापासून त्याला उचलून डावा हात दुखत आहे. जयंत सगळी कामं करतो. त्यानं लग्न होण्यापूर्वी मला सांगितलं होतं की तो घरकाम करेल. मी बाहेरची कामं व माझी नोकरी सांभाळून त्याला जमेल तशी मदत करत असते पण तुम्ही असताना मला हा विषय नको होता. पण तुम्ही मायेपोटी विचारलंत. माझ्यावर टीका करण्यासाठी नाही हे मला समजतय सो इटस् ओके. ” हिनाचं बोलणं ऐकून कमलताईंना लाज वाटत होती.

जयंत व नाना घरी आले. हिनाचा प्रोस्थेटिक आर्म टेबलावर ठेवलेला बघून जयंतला सगळं समजलं.

जयंत हिनाशेजारी जाऊन उभा राहिला व म्हणाला,

“आई, हिचा उजवा हात मी आहे. ” 

नानांना काय बोलावे कळत नव्हते. कमलताईंना हे सारं पाहून धक्का बसला होता. त्या स्तब्ध झाल्या होत्या.

क्षणभरापूर्वी वाटत होतं.. माझा मुलगा बिचारा मरमर राबतो. आता जाणवत होतं की तो राबत होता त्याच्या प्रेमासाठी. तिच्यातील कमी भरून काढण्यासाठी..

कमलताईंनी स्वयंपाकघरातून लाडवाचा डबा घेऊन बाहेर आल्या. टेबलावरील प्रोस्थेटिक आर्म ला जो पंजा होता त्यावर त्यांनी लाडू ठेवला.

“हिना मला माफ कर. तू स्वयंपाक करत नाहीस याबद्दल तुला मी कमी लेखत होते पण आज कळलं… हात नसला तरी माणूस संसाराला हातभार लावू शकतो. मी तुला नेहमीच्या चाकोरीत बसवलं आणि काहीही माहित नसताना उगीचच तर्क करत बसले. माणूस असाच असतो.. पूर्ण माहिती नसताना तर्क करणारा. बरोबर नाही हे.. ”

क्षणभर शांतता पसरली. मग कमलताईंनी जयंतकडे पाहिलं. “आणि खरंच.. हात असूनही… काही लोक समोरच्या माणसाचा हात धरायला शिकत नाहीत. ”

जयंत गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागला. त्यांनी हिनाचा हात दंडाला पकडला. “मला तुझी ओळख करून घ्यायची आहे.

तुला सुनेच्या साच्यात बसवून नाही तर एक माणूस म्हणून. तू लहानपणापासून अपंग आहेस पण सांगू का? कितीतरी लोक शरीराने नाही पण मनानं अपंग असतात – माझ्या सारखे!

“आई, हिनाचा हात जन्मापासून असा नव्हता.. जरी तिनं ते सांगितलं तरी. आम्ही दोघं नायगारा बघायला चाललो होतो. मी गाडी चालवत होतो. गाडीला अपघात झाला व त्या अपघातात हिच्या हाताची ही तऱ्हा झाली. आता लग्न करायला नको असं हिना म्हणत होती. पण प्रेम केलं मी तिच्यावर. माझ्या चुकीने अपघात झाला होता पण ती एका शब्दाने मला काही म्हणाली नाही. ” जयंतचे डोळे भरून आले होते.

“आई मला अजिबात कुकिंग येत नाही असं नाही बरका. मी शिरा कसा करते बघाच म्हणून हिना स्वयंपाक घरात गेली.

जयंतला दोष न देता माझा हात लहानपणापासून असा आहे म्हणून सांगणाऱ्या हिना बद्दल कमलताईंच्या मनात प्रेम दाटून आलं..

नानांचं वाक्य आज त्यांना मनोमन पटलं होत.

‘जिथे तर्क संपतो, तिथे माणुसकी सुरू होते आणि त्या क्षणी आयुष्य बदलून जातं..

 

लेखिका : ज्योती रानडे

प्रस्तुती : शोभा जोशी 

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1