माझी शाळा. हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अत्यंत हळवा कोपरा असतो. आयुष्याच्या भविष्याची, शाळा ही सुरुवात असते. काहीच कळत नसतं, कसलाच अनुभव नसतो. बाल मनातली एक अनोळखी भीती आणि डोळ्यातून नकळत सांडणारे पाणी घेऊन, आईचा हात घट्ट पकडून, शाळेच्या आवारात पाऊल टाकलेलं असतं, आणि त्यानंतर एक एक पायरी चढत, शाळेच्या त्या सुंदर विश्वात आपलं बाल्य, कौमार्य, तारुण्य कसं विकसित होत जातं हे कळतही नाही.
माझी शाळा… गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल ठाणे.
.. एक लांबलचक इमारत, खूप मोठे पटांगण. ,घंटा,पार बांधलेली झाडे,टीचर्स रुम,प्रयोगशाळा,आणि मित्रमैत्रीणींचा घोळका. वर्गात नोटीस घेऊन येणारा शिवा,आणि खूप काही.
पाचवीच्या वर्गात असताना वाटायचं दहावीचा वर्ग किती छान आहे! आपण कधी त्या वर्गात जाऊ? आणि ही दहावी ची मुलं जसा रुबाब करतात, तसा आपल्याला कधी करायला मिळेल?
शाळा म्हणजे बेंचेस, खडू, फळा, गणवेश, प्रार्थना, मधल्या सुट्टीतला सवंगड्यांबरोबर बरोबर खाल्लेला डबा. आणि उरलेल्या वेळात खेळलेले, सोनसाखळी, लंगडी,लगोरी असे मैदानी खेळ. हरलो-जिंकलो,आऊट,टाईम प्लीज, रुसवे भांडणे, कट्टी -बट्टी, कच्चा लिंबू अय्या! ईश्श!
आणि कधीतरी थोडं घाबरत थोडं धिटाईने, नियम मोडत, शाळेच्या आवाराबाहेर जाऊन, एक पैशाचा खाल्लेला गोड पेरू! जांभळं,चिंचा म्हातारीचा कापूस वगैरे. अवीट गोडी! अविस्मरणीय! त्या एका पैशाच्या पेरूची, आजच्या शंभर रुपयाच्या थाई पेरू ला गोडी कशी येणार?
गोखले बाई फार आवडायच्या. विंदांची स्वेदगंगा ही कविता त्यांनी इतक्या तळमळीने शिकवली होती,की आजही त्या ओळी अर्थासकट मनावर स्वार आहेत.
स्वेद बिंदूंनो विसरा भीती
खूप बाळगा एकचित्त
अहित जयातून तीच अनिती
वेद यात नि यात बायबल
पुराण अथवा कुराण यातच
मता मतांचा सोडा गोंधळ ।।
गोखलेबाई ही कविता एका चालीत आणि लयीत म्हणायच्या. आणि ती आमच्या उमलत्या मनावर हलकेच पांघरत जायची. शाळेत शिकलेली, म्हटलेली,
” फुलपाखरू छान किती दिसते! ” किंवा “देवा तुझे किती सुंदर आकाश! ” किंवा कुसुमाग्रजांची,
” आवडतो मज अफाट सागर।
निळ्या जांभळ्या जळात केशर ।।.. शाळेच्या अंगणात बहरलेल्या या काव्यानंदाने आजपर्यंत च्या जीवनात कधीही साथ सोडली नाही.
नाशिककर बाईंनी प्रेमचंद मुन्शी,मन्नु भंडारी,हरिवंशराय बच्चन यांच्या साहित्याची ओळख करून दिली. फडके बाईंनी माझ्यासारख्या बेसूर गळ्यातू नही, भूप रूप शांतरस असलेले आरोह-अवरोह काढले. चित्रकलेचे तांबे सर मला म्हणायचे,” अगं! तुला नक्की काय काढायचे आहे? चिमणी की बदक? “
विविध कलांचे असे एकेक थेंब शाळेच्या त्या अंगणात मनात साठत गेले. दोन डोंगरातला उगवता सूर्य,निळे आकाश,उडणारे पक्षी,नारळाचे झाड,घर,नदी रस्ता हे एकमेव जागतिक चित्र आजही शालेय जीवनाची साक्ष आहे!
सूर्याभोवती पृथ्वी कशी फिरते, याचं प्रात्यक्षिक चौधरी बाई करून दाखवायच्या. वर्गातलाच कोणीतरी एक सूर्य, कोणीतरी एक पृथ्वी, आणि मग सारी ग्रहमाला बाईंच्या स्टेजवर फिरायला लागायची. या नाटकात मीही एकदा मंगळाची भूमिका केली होती!
पण सारं काही मजेत शिकलो.
पहिल्या नंबर पासून तिसाव्या नंबर पर्यंत प्रवास केला. पण स्पर्धा नव्हती. मित्र-मैत्रिणींच्या यशातही आनंद होता. तसे काही काही चेहरे होते कुसकट! पण वैर, द्वेष असे काही नव्हते. ” यावेळेस माझा नंबर तू पटकावलास.. “इतकाच राग.
शिक्षाही भोगल्या की! बेंचावर उभे राहिलो, वर्गाच्या बाहेर ओणव्याने ऊभं राहून काही मिनिटे सहन केली. शंभर वेळा, शिक्षा म्हणून एखादी ओळ लिहिली. पण पालकांनी कधी शिक्षकांची तक्रार केली नाही.
शाळा म्हणजे एक मंदिर होतं. “हे! जगत्राता विश्वविधाता “या प्रार्थनेने शाळा सुरु व्हायची…
वर्हांड्यातल्या फळ्यावर रोज एक सुविचार लिहिलेला असे. आम्ही विद्यार्थीच लिहीत असू.
एकमेका सहाय्य करू। अवघे धरू सुपंथ।।
खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।
अंथरूण पाहून पाय पसरावेत।
अलसस्य कुत:विद्या । अविद्यस्य कुत: धनम्।।
अधनस्य कुत: मित्र ।अमित्रस्य कुत: सुखम।।
Friend in need is a friend indeed
– – असे कितीतरी सद्विचार…संस्कारांचं गाठोडं बांधून दिलं या शाळेने.
या शाळेने, जसं मन घडवलं, तसं उमलत्या वयाबरोबर फुलणार्या स्पंदनांची ही जाणीव करून दिली. कळीचं फुल होताना घडणारी अंतस्थ वादळं बघायला आणि अनुभवायलाही शिकवलं. त्यासाठी लागणारी संयमाची, प्रशिक्षणाची, स्थैर्याची किल्लीही हाती ठेवली..
अकरावी नंतर शाळा संपली. (आमच्या वेळी दहावी अधिक दोन असे नव्हते. अकरावी होती. आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात असे.)
शाळेच्या त्या इमारतीला, त्या पटांगणाला, तिथल्या झाडांना, त्या घंटेला निरोप देताना, खूप खूप काहीतरी वाटून गेले.
उरले उरात काही
आवाज चांदण्याचे
आकाश तारकांचे
उचलून रात्र गेली ।।
अशी काहीतरी भावना झाली असावी.
माझी शाळा या दोन शब्दांबरोबर, या भावनांचे धबधबे असे कोसळले खरे! पण आज, या शेवटच्या टप्प्यावरून मागे वळून पाहताना, दूर कुठेतरी, अंत: चक्षूने माझी शाळा पाहताना वाटते, या चार भिंतीच्या शाळेने मला संरक्षण दिले. माझ्या जगण्याच्या सीमा निश्चित केल्या ही असतील. पण माझी विद्यार्थीदशा कुठे संपली? या शाळेच्या बाहेर एक मोठी शाळा होती जिथे माझा प्रवेश झाला. आणि त्या शाळेत मी अजूनही आहेच की! आज हीच *माझी शाळा* आहे. फरक इतकाच, या शाळेला भिंती नाहीत, बसायला बाक नाहीत, लिहायला फळा नाही,शिक्षकांचा ठराविक समूह नाही. जिथे जाऊ तिथे शिक्षक आहेत. ते आपल्यालाच शोधायचे आहेत. सारे काही मुक्त आहे. ज्ञानाचा सागर आहे. त्यात एक तर बुडाल नाही तर तराल. इथे तुमचं तुम्हाला शिकायचंय्. तुमचं तुम्हाला टिपायचंय्. अंथरुण पाहून पाय पसरायचे की अंथरुणच वाढवायचे? नेहमी खरं बोलायचं की कधी खोट्याचाही आधार घ्यायचा? जगावर प्रेम करायचे की जगापासून सावध राहायचे? एका गालावर कोणी मारलं तर दुसरा गाल पुढे करायचा की ठोशास प्रतिठोसा द्यायचा, हे तुमचं तुम्हाला ठरवायचे आहे. *ये ग ये ग सरी माझे मडके भरी* हेच का माझं गाणं इथे असायला हवं हेही तुम्हालाच ठरवायचे आहे. आज मात्र *माझी शाळा* म्हणजे हे जग आहे,हे जीवन आहे का?
मनात येतं..
।जग हे बंदी शाळा
कुणी न येथे भलाचांगला
जो तो पथ चुकलेला
कुणा न माहीत सजा किती ते
कोठून आलो नच स्मरते
सुटके लागी मन घाबरते
जो आला तो रमला।।
या माझ्या शाळेत मात्र आजही मी विद्यार्थीच आहे. प्रवाहपतित, ज्ञानपिपासू. गुरूच्या शोधात असलेली मी अजूनही गमभन गिरवत आहे…
येई वो… किती प्रेमाने, लडिवाळपणे,आपलेपणाने विठु माऊलीला साद घातलेली आहे. अरे ये रे…
लांबवर कोणी दिसतंय का हे बघायला आपण कपाळावर (निढळावर)आडवा हात धरतो.
डोळे बारीक करून कोणी दिसतंय का… हे आतुरतेने बघायला लागतो. तशीच आम्ही तुझी वाट बघतोय.. तू येरे…
आमचा प्रतिपाळ करणारा तो माय आणि बाप दोन्ही आहे. येणाऱ्या जाणाऱ्यां बरोबर त्याला निरोप दिलेला आहे… त्यामुळे त्याच्या वाटेकडे डोळे लाऊन बसलो आहोत… तो येणार ही मनाशी खात्री आहे… त्याची वाट बघण्यातही आनंद आहे…
“पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला
गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला… “2
अंतरंगातला प्रकाश उजळला तरच हे डोळे दिपवून टाकणार आभाळभर पसरलेलं..
झळकलेलं दिसेल.
प्रत्यक्ष विठ्ठल येणार आहे त्याचं रूप असे भव्यदिव्यच असणार…
कल्पनेच्या राज्यात जाऊन बघा बरं ते रूप…
मग गरुडावर बसून येणारा तो कैवारी दिसेल… पण तो माझा कैवार म्हणजे पक्ष कधी आणि कसा घेईल… याचाही मला विचार करायला हवा. त्यासाठी माझी बाजू सत्याची,न्यायाची हवी. मगच तो माझ्या साथीला येईल.
“असो नसो भाव आम्हा तुझिया ठाया
कृपादृष्टी पाहे माझ्या पंढरीराया”3
महाराजांना आपली स्थिती कशी आहे हे पूर्ण माहित आहे… ते ओळखून आहेत.. तुझ्या बाबतीत आमचा भाव इतका शुद्ध,सात्विक, निरामय नाही. आम्ही प्रपंचात अडकलो आहोत.. तुझ्याकडे काहीतरी मागायलाच येतो. संकटात असलो की तुझी आठवण काढतो..
स्वतःचे हे अवगुण माहीत असूनही अत्यंत लडिवाळपणे हक्काने ते सांगत आहेत…
कारण तो सर्वांत जवळचा आहे. इथे त्याला म्हणूनच
“माझ्या पंढरीराया” असे संबोधले आहे.
तू आम्हाला क्षमा कर आणि आमच्याकडे कृपाळु नजरेने पहा.
“विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी”4
विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला की मग काय रोजच दिवाळी… दिवाळी म्हणजे पूर्णानंद आणि तो रोजच मिळणार… मग सुखाला काय कमी?
म्हणूनच आपला सात्विक भाव एकत्र करून त्याची आरती करायची.. आरती म्हणजे काय तर… आर्त स्वराने हृदयातून साद घालून म्हटली जाते ती आरती…
आता अंतकरणात भक्तीची निरांजन पेटवायची.. सदविवेकाचा कापूर लावायचा.. मनोभावे… आरती करायची.. तरच ती विठ्ठलापर्यंत पोहोचेल. इतका मनोरम आणि निर्मळ भाव आमच्यात हवा.. आरती म्हणताना ती आस आमच्या शब्दातही हवी…
असं हे या आरतीतलं आपल्याला नीट समजलेलं आहे.
इथपर्यंत झालं…
आता आपल्याला कृती करायची आहे. शांतपणे डोळे मिटून घ्यायचे. आरती नुसती तोंडाने म्हणायची नाही तर ती अंतःकरणपूर्वक म्हणायची. त्यातला मूळ अर्थ जाणून घ्यायचा. शाब्दिक अर्थापेक्षा खूप वेगळे काही सांगायचं आहे हे ध्यानात… लक्षात घ्यायचं आहे.
मग जबाबदारी वाढते. आपल्याला तसं वागायचं बंधन येतं. पण हे बंधन हवसं आहे. या बंधनात कोणाची जबरदस्ती नाही. तर विठ्ठल प्रेमाने आपणच… बांधून घ्यायच आहे.
आपल्याला प्रगत करणारं उन्नतीकडे नेणार अस हे आहे. ते पूर्णपणे अंगी बाणून घेऊया.
विठ्ठलाला अनन्य शरण जाऊ या
मग तो येईलचं त्याची वाट पाहूया…
प्रत्यक्ष विष्णुदास नामांनीच हे सांगितलेलं आहे ते सुद्धा कितीतरी वर्षापूर्वी… एक सांगू का…
आपणही मनापासून बोलावून तर बघू या … मग प्रेमाने त्याला हाक घाला बरं ……
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८१ आणि ८२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ८१ – –
मना मच्छरे नाम सांडू नको हो ।
अती आदरे हा निजध्यास राहो ।
समस्तांमधे नाम हे सार आहे ।
दुजी तूळणा तूळिता ही न साहे ।।८१।।
अर्थ : हे मना, कोणत्याही प्रकारच्या मत्सराच्या आहारी जाऊन देवाचे नामस्मरण कधीही सोडू नकोस. इतरांचा हेवा करण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी, अत्यंत आदराने व निष्ठेने भगवंताच्या नामाचा अखंड ध्यास घे. देवाचे नामस्मरण हेच सर्व श्रेष्ठ साधन आहे. त्याची तुलना अन्य कशाशीही करवत नाही.
विवेचन :या श्लोकातही समर्थ नामाचा महिमा आपल्याला सांगतात. आधीच्या श्लोकात निर्धारपूर्वक ज्या मत्सराचा त्याग करायला समर्थांनी आपल्याला सांगितले, त्याचा उल्लेख या ठिकाणी पुन्हा येतो. मानवी स्वभाव असा आहे की जी गोष्ट आपल्याकडे नाही पण दुसऱ्याकडे आहे असे पाहिल्यावर त्या व्यक्तीबद्दल पहिली प्रतिक्रिया मनात येते ती म्हणजे मत्सर. हा मत्सर वाढत गेला की अनर्थ घडतो. नको त्या गोष्टी माणसाच्या हातून घडतात. गीतेत सांगितल्याप्रमाणे ‘ मत्सर ‘ हा आसुरी गुण आहे. मागील काही श्लोकात हिरण्यकश्यपूचे उदाहरण आपण पाहिले आहे. हिरण्यकश्यपू राजा होता, सामर्थ्यवान होता, स्वतःच्या शक्तीचा त्याला गर्व होता, इथपर्यंत सर्व ठीक आहे. पण जेव्हा लोक त्याची स्तुती करायची सोडून परमेश्वराची स्तुती करतात, तेव्हा मात्र त्याच्या मनात भगवंताच्या नामाविषयी मत्सर निर्माण होतो. मग प्रजेने आपलेच नाम घ्यावे, भगवंताचे नाम कोणी घेऊ नये असा आदेश तो काढतो. पण त्याचा स्वतःचा मुलगाच विष्णुभक्त असतो. शेवटी मत्सर आणि द्वेषामुळे हिरण्यकश्यपूचा नाश होतो हे आपल्याला माहिती आहे.
काही लोकांना नकळत नामाबद्दलही द्वेष असतो. नामाने असे काय होणार आहे? त्याला कशाला एवढे महत्व द्यायचे? मग नकळत नामाबद्दल मनात मत्सर निर्माण होतो. नाम घ्यायला सुरुवात केली असेल तरी मग असा मनुष्य नाम घेणे सोडून देतो. म्हणून समर्थ म्हणतात की बाबारे, मत्सराच्या अधीन होऊन नाम घेणे सोडू नकोस.
मत्सराच्या अधीन झालेल्या माणसाला नामाचे महत्वच कळलेले नसते. महत्व कळण्यासाठी नामाचे सामर्थ्य माहित असावे लागते. त्यासाठी संतांचा उपदेश मनापासून ऐकावा लागतो. तो उपदेश नुसता ऐकून चालत नाही तर तो पटला पाहिजे. इथे बळजबरी उपयोगाची नसते. हे महती जेव्हा पटते, तेव्हा भगवंताबद्दल, नामाबद्दल आदर निर्माण होतो. म्हणून भगवंताचे नाम आदरपूर्वक घेतले पाहिजे. त्यात प्रेम हवे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा ध्यास लागला पाहिजे. आपल्या आवडीची एखादी गोष्ट असते. मग तिचा आपल्याला ध्यास म्हणजेच छंद लागतो. हा छंद लागला म्हणजे मन पुन्हापुन्हा तिकडे ओढ घेते. कोणी सांगावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ” गोविंद गोविंद, मना लागलिया छंद. ” एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासाची आवड निर्माण झाली की त्याला कोणी अभ्यास कर म्हणून सांगावे लागत नाही. साधकाला नामाची गोडी लागली की मग नाम घ्या असे त्याला सांगावे लागत नाही.
परमेश्वर प्राप्तीची अनेक साधने आहेत. अनेक मार्ग आहेत. पण त्या सर्वांमध्ये ‘ नाम ‘ हे साधन श्रेष्ठ आहे. त्यासाठी कोणतीही उपाधी, कोणतेही साधन लागत नाही. जपमाळ नसली तरी चालते. आपले काम करताना देखील नाम जपता येते. ‘ हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।। असे ज्ञानेश्वर माउली म्हणतात. त्याचे तात्पर्य हेच आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद असे ते सांगतात ते याचसाठी. समर्थही आपल्याला हीच गोष्ट सांगतात. संतांच्या उपदेशात एकवाक्यता असते. लोककल्याणाची तळमळ आढळते. शब्द भलेही वेगळे असतील पण तात्पर्य एकच असते.
तेव्हा हे मना, कोणत्याही परिस्थितीत तू नाम घेणे सोडू नकोस. ते अत्यंत आदरपूर्वक घे. समस्त साधनांमध्ये ते सारभूत आहे. त्याची महती एवढी की त्याची तुलना अन्य कशाशीही होऊ नाही. ‘ नामपरते तत्व नाही रे अन्यथा. ‘ हे लक्षात ठेव.
स्वसंवाद :
१. माझ्याकडे जे नाही आणि इतरांकडे आहे, ते पाहून माझ्या मनात नकळत ‘मत्सर’ किंवा हेवा निर्माण होतो का? त्यामुळे माझे मनस्वास्थ्य हरवते का?
२. संतांनी सांगितल्याप्रमाणे, माझ्या मनाला संसार किंवा इतर भौतिक गोष्टींऐवजी कधी भगवंताच्या नामाचा ‘निजध्यास’ (छंद) लागला आहे का?
३. नाम घेताना भगवंताबद्दल आदर आणि प्रेम माझ्या मनात असते का?
४. माउलींनी सांगितल्याप्रमाणे “नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा” यावर माझा पूर्ण विश्वास बसला आहे का? की माझे मन अजूनही इतर साधनांच्या गराड्यात फिरत असते?
=====
श्लोक क्र. ८२ – –
बहू नाम या रामनामी तुळेना ।
अभाग्या नरा पामरा हे कळेना ।
विषा औषध घेतले पार्वतीशे ।
जिवा मानवा किंकरा कोण पूसे? ।।८२।।
अर्थ : रामनामाची तुलना अन्य कोणत्याही नामाशी होऊ शकत नाही. परंतु जी माणसे पारमार्थिक दृष्ट्या अभागी असतात, त्यांना (रामनामाचे हे महत्व) कळत नाही. अहो, प्रत्यक्ष भगवान शंकरांनी विषाचा दाह शांत करण्यासाठी रामनाम हे औषध म्हणून घेतले. मग आपल्यासारख्या सामान्य जीवांची त्यासमोर किंमत काय?
(तुळेना – तुलना होऊ शकत नाही, अभागी नर – पारमार्थिक दृष्टया दुर्दैवी व्यक्ती, पार्वतीशे – भगवान शंकर/ पार्वतीचे पती, किंकर – चाकर/दास)
विवेचन :या श्लोकामध्ये देखील अन्य श्लोकांप्रमाणे समर्थ रामनामाचे महत्व आपल्या मनावर ठसवत आहेत. श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत. त्यामुळे साहजिकच त्यांना रामनामापुढे अन्य नामाचे महत्व वाटत नाही. रामनामाची तुलना अन्य कशाशीही होऊ शकत नाही असे त्यांना वाटते. आणि त्यांना असे वाटणे हे अगदी बरोबर आहे. रामरक्षेचा समारोप करताना बुधकौशिक ऋषींनी रामनामाचे महत्व सांगताना, ” सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ” असे म्हणतात. अर्थात या श्लोकात भगवान शंकर पार्वतीला रामनामाचे महत्व सांगताना म्हणतात की राम राम या नामातच माझा जीव रमतो. रामनाम हे विष्णूच्या सहस्त्र नामांची बरोबरी करणारे आहे. खरे तर रामनामाचे महत्व स्पस्ट करणारे एवढे मोठे उदाहरण दिल्यानंतर अन्य काही सांगण्याची आवश्यकताच राहत नाही. पण तरीदेखील माता जशी तळमळीने आपल्या मुलाला एखादी गोष्ट समजावून सांगते, तसेच समर्थ आपल्याला सांगत आहेत.
आपली ज्या देवतेवर श्रद्धा असेल, त्या देवतेचे नाम हे अत्यंत श्रेष्ठ आहे असे आपल्याला वाटले पाहिजे. आपण जर शंकराची भक्ती करीत असू तर ‘ ओम नमः शिवाय ‘ या मंत्रावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. आपण जर विष्णूचे भक्त असू तर ‘ ओम नमो भगवते वासुदेवाय ‘ या मंत्रावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. तसेच रामनामाचे महत्व श्रीरामाच्या भक्तांना वाटले पाहिजे. ते सांगण्यासाठीच समर्थांची एवढी तळमळ!
पण समर्थ म्हणतात,” जी माणसे पारमार्थिक दृष्टया अभागी असतात त्यांना रामनामाचे हे महत्व (सांगूनही) कळत नाही. म्हणूनही असे जीव अभागीच आहेत. मुखामध्ये रामनाम यायला किंवा त्याची गोडी वाटायला देखील काही तरी पूर्वसंचित हवे. मुखात रामनाम येणे किंवा रामनाम घ्यावेसे वाटणे हे खरोखरच भाग्याचे लक्षण आहे. ज्यांना तसे वाटत नाही ते जीव अभागी!
देवांनी आणि राक्षसांनी मिळून समुद्रमंथन केले. त्यातून दिव्य अशा चौदा रत्नांसोबतच हलाहल (जहाल विष) देखील बाहेर आले. त्यामुळे सर्व प्राणिमात्रांच्या आणि सृष्टीच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न झाला. भगवान शंकरांनी हे हलाहल प्राशन करून सर्व सृष्टी आणि प्राणिमात्रांचे रक्षण केले. पण त्यांचा अंगाचा तीव्र दाह होऊ लागला. तो कशानेच शांत होईना. त्या हलाहलाने त्यांचा कंठ निळा झाला. ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. विषाचा दाह शांत होण्यासाठी त्यांनी शीतल चंद्र मस्तकी धारण केला. गंगेला देखील मस्तकी धारण केले. पण शेवटी रामनामानेच त्यांचा दाह शांत झाला.
जालीमातील जालीम विषाचा देखील ज्या औषधाने दाह शांत होतो, असे औषध म्हणजे रामनाम आहे. सर्व भव म्हणजे संसाराचे भय हरण करणारे, दुःख दूर करणारे असे हे औषध आहे. ज्याप्रमाणे श्रीरामाचा बाण अचूक शरसंधान करतो, तसे रामनाम म्हणजे रामबाण औषध आहे. आधुनिक विज्ञानाने देखील रामनामाचे महत्व मान्य केले आहे. आजचे मानसशास्त्र आणि न्यूरो सायन्स रामनाम हे प्रभावी साउंड थेरपी आणि ध्यान पद्धतीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे स्पष्ट करतात. तणावमुक्तीसाठी रामनाम ऊर्जा प्रदान करणारे असल्याचे ही आधुनिक शास्त्रे मान्य करतात.
प्रत्यक्ष भगवान शंकर जेव्हा रामनामाच्या आश्रय घेतात तेव्हा आपल्यासारख्या सामान्य नराची काय कथा? संत तुलसीदासजी म्हणतात, ” रामनाम में पावत पावन, रवी तेजोमय चंद्र सुधा धन. ” रामनाम हे पावन करणारे आहे. ज्याप्रमाणे सूर्याचा तेज आणि चंद्राची शीतलता आपल्याला जीवन प्रदान करते, तसेच हे रामनाम सर्व सुख, परम शांती आणि ऊर्जा देणारे आहे.
स्वसंवाद ::
१. ज्याप्रमाणे भगवान शंकरांनी विषाचा दाह शांत करण्यासाठी रामनामाचा आश्रय घेतला, तसा मी माझ्या आयुष्यातील राग, मत्सर किंवा चिंतेचा दाह शांत करण्यासाठी नामस्मरणाचा आधार घेतो का?
२. “मुखामध्ये रामनाम येणे किंवा त्याची गोडी वाटणे हे भाग्याचे लक्षण आहे,” हे लक्षात घेऊन मी माझ्या या परम भाग्याचा रोज सुयोग्य वापर करतो का?
३. माझ्या आराध्य दैवताच्या नामावर आणि मंत्रावर माझी संपूर्ण आणि अनन्य श्रद्धा आहे, की माझे मन अजूनही डळमळीत होत असते?
४. संत तुलसीदासांनी म्हटल्याप्रमाणे, रामनामातील सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता अनुभवण्यासाठी मी दिवसातून काही क्षण तरी शांत चित्ताने नाम घेतो का?