मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १० … ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अभंगातून समजलेले संत तुकाराम

गाथेतील एकेक अभंगांचे वाचन करत असताना संत तुकारामांचे पांडुरंगाशी असलेले भक्तीचे नाते आपल्याला हळु. हळू उलगडत चालले आहे. हे भक्तीचे नाते कायम तसेच राहावे एवढेच त्यांचे देवाकडे मागणे आहे. म्हणून ते म्हणतात, “अनेक जन्मात माझे आचरण चांगले नव्हते. म्हणून हे देवा मला तुमच्या पायांचा वियोग झाला. मात्र या जन्मात काहीतरी चांगले कर्म माझ्या हातून घडले असावे, आणि म्हणूनच तुमची माझी भेट झाली. आता तुम्ही कृपा करा. मी अपराधी, दुराचारी आहे. संसाराच्या तापाने त्रस्त झालो आहे. माझ्या अंतरंगातील काम, क्रोध, कल्पना विक्षेप यामुळे मी तुमच्या पर्यंत पोहोचत नाही असे झाले आहे. इकडे संसार धड नाही, तिकडे परमार्थात गती नाही, अशी माझी कुचंबणा झाली आहे मी निरुपयोगी ठरलो आहे”

 हा न तोसा ठाव झाला पांडुरंगा/

 नयेची उपेगा काय करू/

 आपुलिया नावा धावुनिया धावे/ लवकर यावे तुका म्हणे//

 अशा परिस्थितीत हे पतितपावना, तुझे नाव सार्थ कर आणि माझ्याकरता धावत ये.

 आता या अभंगात तुकाराम बुवा काय म्हणतात?

 कारे तुम्ही ठेवा बहुतानिमित्ते/

 माझीया संचिते वोढवले/

 भक्ती प्रेम गोडी बैसली जिव्हारी/

 आनंद अंतरी येणे झाला/

 पुसले पडळ तिमिर विठ्ठले/

 जगती भरले ब्रह्मानंदे//

 तुका म्हणे केलो कामने वेगळा/

 आवडी गोपाळा असे वरी//

तुकाराम लोकांना सांगत आहेत की जन हो, मी संसाराचा त्याग केला म्हणून तुम्ही माझ्यावर आरोप करता, पण खरं सांगायचं तर हेच माझं संचित आहे. माझ्या अंतःकरणातील विठूच्या प्रेमामुळे माझ्या दृष्टीतील अज्ञानाचा अंधार दूर झाला आहे, आणि मला सर्व जग ब्रह्मानंदाने भरलेले दिसत आहे. मी कामनाशून्य होऊन माझ्या मनात फक्त एका कृष्णाची प्रीती आहे.

या ठिकाणी संत तुकारामांची देह बुद्धी पूर्णतया  विनाश पावली आहे.

 आमुची विश्रांती/ तुमचे चरण कमळापती/

 हेचि एक जाणे/ काया वाचा आणि मने/

 नीच जना लोका/ तळील पायरीस तुका//

या ठिकाणी तुकाराम महाराज स्वतःस सर्वांहून नीच म्हणजे खालच्या पातळीवरचा असे संबोधित आहेत. देवा, तुमच्या चरणांवर अनेक भक्त लोटांगण घालतात, त्या सर्व भक्तात मी खालच्या तळाच्या पायरीवर आहे.

खरा भक्त हा नेहमी लीन असतो, विनम्र असतो हेच आपल्याला तुकारामांचे रूप या अभंगात पहावयास मिळते.

 संत प्रवृत्तीचे तुकाराम महाराज कसे होते यासंबंधी अधिक माहिती या खालील अभंगातून आपल्याला मिळते.

  होईल तो भोग/ भोगीन आपुला/

 न घालीन विठ्ठला/ भार तुज//

 तुम्हा पासाव हे / इच्छितसे दान/

 अंतरीचे ध्यान/ मुखी नाम//

 नये काकुळती/ गर्भवासासाठी/

 न धरी हे पोटी/ भय काही//

 तुका म्हणे मज/ उदंड एवढे/

 नाचेन मी पुढे/ मायबापा//

“विठ्ठला, प्रारब्धाने मला जे भोग भोगायचे असतील, ते मी आनंदाने भोगीन. तुझ्यावर त्याचा जराही भार टाकणार नाही. मला तुझ्याकडून हेच दान हवे आहे. तुझे ध्यान माझ्या अंतरंगात सदैव राहो आणि तुझे नाम माझ्या मुखी अखंड राहो. मला गर्भवासाचे भय नाही.

अनेक जन्म मला मिळाले तरी हरकत नाही, फक्त माझी एकच मागणी तू पूर्ण केलीस तर तुझ्यापुढे मी प्रेमभराने सदैव नाचत राहीन. “

सदैव भगवंताची भक्ती आणि प्रीती अंतरंगात राहावी एवढी एकच इच्छा तुकाराम त्यांच्या अनेक अभंगांतून वेळोवेळी व्यक्त करतात. परमेश्वराच्या दर्शनासाठी कितीही जन्म घेण्याची त्यांची तयारी आहे. ते देवाकडे मोक्षाची याचना करत नाहीत.

कधी कधी तुकाराम महाराज लहान होऊन आपल्या मायबापांकडे बाल हट्ट करतात.

 भोगलो मी आता/ आपुल्या स्वभावे/

 कृपा करून देवे/आस्वासीजे//

मी सांसारिक नित्य कर्म करून फार थकलो आहे, तेव्हा कृपा करून तुम्ही मला असे आश्वासन द्या की,

 देऊनी आलिंगन/ प्रीतीच्या पडीभरे/

 अंगेही दातारे/ निववावी//

 उदार अंतकरणाने हे देवा, तुम्ही मला आलिंगन देऊन माझ्या थकलेल्या शरीराला शांत कराल.

 अमृताची दृष्टी/ घालूनिया वरी/

 शीतळ हा करी/ जीव माझा//

 तुमच्या अमृतरुपी कृपादृष्टीचा वर्षाव करून माझ्या जीवाची तळमळ शांत कराल.

 घेई उचलोनी /पुसे तहानभूक/

 पुसी माझे मुख/ पितांबरे//

माझी तहानभूक जाणून मला कडेवर उचलून घ्याल, आणि माझे मुख आपल्या पितांबराने स्वच्छ कराल.

 बैसोनिया माझी धरी हनुवटी/

 ओवाळूनी दिठी करुनी सांडी//

  तुका म्हणे बापा अहो विश्वंभरा/

 आता कृपा करा ऐसी काही//

मला आपल्या मांडीवर घेऊन माझी हनवटी धराल, माझी दृष्ट काढाल, अशा प्रकारे विश्वंभरा तुम्ही माझ्यावर कृपा कराल. मला असे आश्वासन द्या.

काय हा तुकारामांचा बालहट्ट! भक्ताचे व देवाचे नाते कसे अधिकाराचे होऊ शकते हे आपल्याला या अभंगातून अगदी सहज समजते.

सतत पांडुरंगाचा धावा केल्याने तुकाराम महाराजांना पंढरीच्या विठोबाचे आता दर्शन घडलेले आहे आणि त्यामुळे धन्यता पावलेले तुकाराम ब्रह्मानंद अवस्थेत बेधुंद होऊन गात आहेत.

 पावलो पंढरी वैकुंठ भुवन/

 धन्य आजी दिन सोनियाचा//

 पावलो पंढरी आनंद गजरे/

 वाजतील तुरे शंखभेरी//

पावलो पंढरी क्षेम आळिंगणी/

 संत या सज्जनी निवविलो//

 पावलो पंढरी पार नाही सुखा/

 भेटला हा सखा मायबाप//

 पावलो पंढरी येरझार खुंटली/

 माऊली वोळली प्रेम पान्हा//

 पावलो पंढरी आपुले माहेर/

 नाही संसार तुका म्हणे//

भू वरचे वैकुंठ म्हणजे पंढरपूर, या ठिकाणी तुकाराम महाराज येऊन पोहोचले आहेत आणि त्यांचा दिवस धन्य धन्य झाला आहे. पंढरीत संत जनांनी त्यांना प्रेमाने आलिंगन दिल्यामुळे त्यांचे सर्व श्रम निमाले आहेत. मायबाप पांडुरंगाच्या भेटीने त्यांच्या आनंदाला पारावार नाही. आता जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्यांची कायमची सुटका झाली आहे. विठाईच्या प्रेम पान्ह्याने त्यांना आता संसाराचे बंधन राहिले नाही. या ठिकाणी परमेश्वराशी ते संपूर्णपणे एकरूप झाले आहेत.

 जय जय विठ्ठल/ श्री हरी विठ्ठल/

 विठ्ठल विठ्ठल/ पांडुरंग//

 क्रमशः… १०  

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह..’ ☆ श्री दिवाकर बुरसे

प्रतिवर्षी ४ ते १० मार्च या काळात ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह’ देशभर साजरा केला जातो. औद्योगिक क्षेत्रात याचे विशेष महत्व आहे. या वर्षीच्या- आजच्या ४मार्चला सुरू होत असलेल्या – सुरक्षितता सप्ताहानिमित्त वाचकांना एका कवितेची अल्पशी भेट आणि सर्वांना सुरक्षित जीवन लाभावे ही ईश्वरचरणी ‘यंत्रदासा’ची मनोमन प्रार्थना.

☆ तुझा तूच त्राता ☆

पहा मानवा, यंत्रक्रांतीमुळे आज

मानेवरी बैसली जोखडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।धृ।।

 *

जसा लागला शोध चक्रा-गतीचा

जगाने गती घेतली केवढी

कुणाला नसे थांबण्या वेळ आता

मढ्यांना इथे स्वस्थता तेवढी!

अशा जीवघेण्या प्रवाहातुनीही

तुला जायचे पैलतीराकडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।१।।

 *

किती वादळी वेग हे वाहनांचे

तयातून जाणेच आहे सुखे

वितीचे तुझे पोट! जे जाळण्याला

पडे खेळणे अग्निसंगे इथे

तरी पाळ सारे इशारे दिलेले

जराही नको वागणे वाकडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।२।।

 *

पहा, वाहते गोगलीशंख पाठी

ढके वादळी उंटनाका सुखे

अती दक्षतेने चले सूरवंट

मधूमक्षिकांची पहा कौतुके

वनी अस्वलेभाकऱ्या साठवीती

मनू का असे हीन त्यांच्या पुढे?

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।३।।

 *

तुझा तूच त्राता, नसे अन्य कोणी

मनी जाण हे सत्य जे सांगतो

अती दक्षतेने सदा वागतो जो

तयाचीच चिंता हरी वाहतो!

न घे काळजी देह, यंत्रा-धनाची

असा जीव देवा कदा नावडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।४।।

🙏🏽

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ४८ आणि ४९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ४८ आणि ४९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्ती सूत्र क्र. ४८ आणि ४९.

भक्तीसूत्र ४८…

यः कर्मफलं त्यजति, कर्माणि संन्यस्यति, ततो निर्द्ंवद्वो भवति ॥४८॥

अर्थ : जो कर्मफलाचा त्याग करतो, सर्व कर्मांचाही त्याग करतो, त्यामुळे तो द्वंद्वरहित होतो, अर्थात मायेच्या पलिकडे जातो.

विवेचनमागील सूत्रात जो योगक्षेमाचाही त्याग करतो, जो निर्मम होतो, संगांचा त्याग करतो तो मायेतून तरून जातो असे सांगितले, या सूत्रात आणखी तीन साधने सांगतात. प्रथम कर्मफलत्याग सांगितला आहे. या साधनाचा मागील साधनाशी संबंध आहे. मानवप्राणी हा या जगात येतो तो कर्ता म्हणून येतो. कर्तृत्वाबरोबर येणारा दुसरा धर्म म्हणजे कर्मफलाचे भोक्तृत्व हा आहे. कोणीही जे कर्म करत असतो ते निष्फळ जावे म्हणून करीत नाही तर त्याचे फळ भोगावयास मिळावे याच हेतूने करीत असतो. यासच फलासक्ती म्हणतात. अशा आसक्तीने मानव कर्मे करतो. जर फल न मिळेल अथवा त्या फलाची आसक्ती नसेल तर कर्मे करण्याकडे प्रवृत्ती होणे कठीण आहे, हे जरी खरे आहे तरी जीव जो कर्मात अडकतो तो या फलासक्तीमुळेच. मी कर्ता हा अभिमान म्हणून मीच या कर्माचे फळ भोगावे ही आसक्ती, यासच कर्माचा बंध म्हणतात, असे श्रीज्ञानेश्वर महाराज सांगतात.

“तैसा कर्तृत्वाचा मदु । आणि कर्मफळाचा आस्वादु । या दोहींचें नांव बंधु । कर्माचा कीं ॥”

(ज्ञान. १८. २०५)

या फलासक्तीतूनच पुढे रागद्वेषादी विकार, अनुकूल-प्रतिकूल भावना, इत्यादी निर्माण होतात. त्यातल्या त्यात संसारी माणसाची सकाम कर्माकडे विशेष प्रवृत्ती होते ती आणखीही बंधनाला कारण होते. मनुष्याला जन्ममरण प्रवाहात वाहत जावे लागते त्याचे कारणही हे कर्मफळच आहे. याचा परिणाम असा होतो की मनुष्य असो वा साधक जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून पडतो. आणि मिळणाऱ्या प्रत्येक नव्या जन्मात पुढील जन्माची बेगमी करतो.

माउली म्हणतात,

वृत्ती{ऐ}सें मन धरिती । मना{ऐ}सी क्रिया करिती । केलिया ऐसी वरीती । मरोनि देहें ॥

(ज्ञान. १७. ५८)

ज्याला मायेतून तरून जावयाचे आहे त्याला फलासक्ती ठेवता येणार नाही. कारण तोही एक मायापरिणामच आहे. म्हणून विवेकी साधक हळूहळू मायेच्या जाळ्यातून सुटण्याकरिता एक एक बंध तोडून टाकण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यातच ‘कर्मफलंत्यजति’ याचा अंतर्भाव होतो.

कर्माचे चार प्रकार आहेत. नित्य, नैमित्तिक, काम्य व प्रायश्चित्त. त्यांत साधकाने काम्य कर्मे करू नये असे सांगितले जाते. ज्ञात-अज्ञात पातकक्षालनाकरिता प्रायश्चित्त कर्मे करावीत व नित्यनैमित्तिक कर्मे न केली तर प्रत्यवाय आहे, म्हणून ती टाकू नयेत. अशा प्रकारे जर कर्मे करील तर तो कर्मत्यागीच मानला जाईल. मात्र ती कर्मे निरहंकार वृत्तीने कर्तृत्वमद व फलाशा टाकून करावीत. प्रारब्धाने आलेली किंवा आपली विहित कर्मे अवश्य करावीत. त्यांचा त्याग करणे उचित नाही असे माउली म्हणतात.

“जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती ।परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधुनी ॥ तयां कर्मत्यागु न घडे । जें कर्तव्य मनीं सांपडे ।वरी नटती तें फुडें । दरिद्र जाण ॥”

(ज्ञा. ३. ६४/६५)

तीन प्रकारचा कर्मत्याग गीतेमध्ये सांगितला आहे.

१. वेद, ईश्वर, परलोक यावर विश्वास न ठेवणारा तमोगुणी पुरुष अविवेकाने जो विहित कर्माचा त्याग करतो तो तमोगुणी त्याग होतो.

२. शरीराला फार कष्ट होतात, दुःख होते या भीतीने जो कर्मत्याग केला जातो त्यास राजस त्याग म्हणतात

३. जो मनुष्य/साधक आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म कर्तृत्वमद व फलास्वादाची अभिलाषा टाकून करतो त्यास सात्त्विक त्याग म्हणतात.

कर्मत्यागाचे एक सोपे सूत्र सांगता येईल. एखाद्या कंपनीत मनुष्य नोकरी करत असतो. तेथील अधिकारी जे काम त्याला सांगतो, त्यानुसार तो मनुष्य ते काम करीत असतो. त्या कामातून होणाऱ्या लाभहानीकडे त्याचे फार लक्ष नसते. सांगितलेल्या कामात आपल्याकडून छोटीशीही चूक होऊ नये याची दक्षता तो मनुष्य घेत असतो. ते काम त्याने चोख केले की मालक/अधिकारी त्याला मासिक पगार देतो. आणि त्या व्यवसायात त्या मालकाला नफा झाला तर तो दिवाळीला भेटवस्तू (बोनस) पण देत असतो. इथे आपण भगवंताला आपले मालक करावे, त्याच्याकडे नोकरी करावी असे करता आले तर आपले काम अधिक सोपे होईल असे वाटते. संसारातील लाभ हानी स्वाभाविकपणे भगवंताची होईल. आपण त्यातून अलिप्त होऊ शकू. थोडक्यात मनुष्याने भगवंताच्या हातचे उपकरण बनून जावे. त्याला म्हणावं तू ठेवशील तसा राहीन, पण तुझाच बनून राहीन. एकदा कर्तेपण भगवंताकडे दिले (अगदी मनापासून) की लाभहानी हा विषयच रहात नाही. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात की प्रपंच दाई सारखा करावा आणि परमार्थ आई सारखा करावा.

मायेच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आणिक एक त्याग करावा लागतो, त्याचा विचार पुढील सूत्रात पाहू.

जय जय रघुवीर समर्थ 

 – – 

भक्तिसूत्र ४९

वेदानपि संन्यसति, केवलमविच्छिन्नानुरागं लभते ॥ ४९ ॥

अर्थ : जो वेदांनी सांगितलेल्या विधिनिषेधात्मक कर्मसमूहाचा त्याग करतो त्याला भगवंताच्या उत्तरोत्तर वाढ शुद्ध, अखंड, एकरस प्रेमाचा लाभ होतो. अर्थात, तो मायेपासून मुक्त होतो.

विवेचनमागील सूत्रात कर्मफले व ती प्राप्त होण्याकरिता केली जाणारी विहित कर्मे यांचाही तो भक्त त्याग करतो असे सांगितले आहे.

वेद हे अपौरुषेय आहेत. वेदांचे प्रामुख्याने चार अंगे आहेत. पहिले अंग आहे संहिता. दुसरे अंग आहे ब्राह्मण ग्रंथ आणि तिसरे आहे आरण्यके. चौथे आहे वेदांत.

संहितेमध्ये वेदकालीन देवतांचे मंत्र आले आहेत. ब्राह्मण ग्रंथात विविध यज्ञाबद्दल माहिती आलेली आहे तर तिसऱ्या भागात अर्थात आरण्यकात भगवंतासंबंधी चिंतन करून जे अनुभव घेतले, त्याचा उहापोह इथे आढळतो. चौथे आहे वेदांत, यात उपनिषदे येतात. या चारी अंगाचा अभ्यास अनेकांनी केला, पण वेदांचा अभ्यास केला, सर्व वेद तोंडपाठ केले म्हणून त्यांंना भगवंताची प्राप्ती झाली असे होत नाही. तर त्यातील मर्म लक्षात घेतले पाहिजे. श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराज सांगतात की साधकांमध्ये एक दुर्गुण अवश्य येतो. त्याला परमार्थ छान बडबडता येतो. एक उदा. पाहू. चार धाम यात्रेला जाण्यासाठी एक जण रेल्वेचे तिकीट काढायला गेला. त्याने तिकीट काढले. त्या तिकीट देणाऱ्या माणसाने त्या मनुष्याला चार धाम यात्रेचे संपूर्ण वर्णन करून सांगितले. तसेच कुठे काय करावे? कुठे खरेदी करावी? कोणते हॉटेल स्वस्त आहे? धर्मशाळा कुठे आहेत? ते सर्व सांगितले. या मनुष्याने त्या तिकीट देणाऱ्या मनुष्याला सहज प्रश्न केला की तुम्ही बरेच वेळा यात्रा केलेली दिसते. तर तो तिकीट विकणारा म्हणाला मी एकदाही यात्रा केली नाही. लोकांनी सांगितलेल्या माहितीवरून मी हे सर्व तुम्हाला सांगू शकलो. नुसती माहिती झाली म्हणून उपयोग होत नाही.

वेदांचा, अभ्यास करून मनुष्य नुसती पोपटपंची करणार असेल, तर त्याचा काय उपयोग? त्यात अनुभूती असणे अत्यंत महत्वाचे. इथे तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो.

“वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथां।”

संत तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग आहे.

“वेद अनंत अनंत बोलिला । अर्थ इतुकाचि साधिला ॥१॥ विठोबासी शरण जावें । निजनिष्ठे नाम गावें ॥२॥ सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतुकाचि निर्धार ॥३॥ अठरापुराणीं सिद्धांत । तुका ह्मणे हाचि होत ॥४॥”

कोणतेही तत्व नुसते पाठ करणे अपेक्षित नाही. तर त्याची अनुभूती घेतलेली असावी. तरच ते आपल्याला कळले असे होते. बाळ नीट चालायला शिकेपर्यंत पांगुळगाडा वापरतो. याच नियमाप्रमाणे ज्ञान प्राप्त करेपर्यंत ‘पांगुळगाडा’ वापरणे अपेक्षित आहे. आणि थोडे अधिक मोठे झाल्यावर त्या ‘पांगुळगाड्या’चा अभिमान न धरता त्याचा त्याग करणे अधिक उचित आहे. 

राग म्हणजे प्रेम. राग म्हणजे रंग. अनु म्हणजे मागे जाणे, अथवा… ला शोभणे. भक्ताचे भगवंतावरील प्रेम वाढत जाते, तेव्हा त्याला प्रेमाचा रंग लागला असे म्हटले जाते. भक्त मिरेला कृष्ण भक्तीचा रंग लागला होता, असे म्हटले जाते. साधकाचे असेच व्हावे. *या प्रेमाला अनुराग असे म्हणतात. भिंतीला रंग लागला की आधीचे रंग संपूर्णपणे नष्ट होत असतात. अर्थात त्या साधकाच्या वासना निर्बीज होत असतात. 

संत तुकाराम महाराज म्हणतात,

“प्रेम देवाचें देणें । देहभाव जाय जेणें । न धरावी मनें । शुद्धी देशकाळाची ॥१॥ मुक्त लज्जाविरहित । भाग्यवंत हरीभक्ती । जाले वोसंडत । नामकीर्तीपवाडे ॥२॥ जोडी जाली अविनाश । जन्मोनि जाले हरीचे दास । त्यांस नव्हे गर्भवास । परब्रह्मीं सौरस ॥३॥ हे चि वाहाती संकल्प । पुण्यप्रसंगाचे जप । तुका म्हणे पाप । गांवीं नाहीं हरीजना ॥४॥”

(अभंग क्रमांक ११५६, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

असे प्रेम प्रत्येकाला लाभावे अशी सद्गुरूचरणी प्रार्थना.

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ४८ आणि ४९.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २८४ – सोबती…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २८४ – विजय साहित्य ?

☆ सोबती…!

वेळ द्यायचा कुणाला

वैयक्तीक गोष्ट ठरे

जिवलग मित्रासाठी

पाझरती स्नेहझरे..! १

*

नसे मैत्रीत हिशोब

असे प्रेम जीवापाड

नाही लपू देत कुणा

संशयाच्या दाराआड…!२

*

मैत्री नाही व्यवहार

नाही‌ स्वार्थी देणे घेणे

निरालस अपेक्षांचे

जाते देऊनीया देणे…!३

*

शब्दाविना जिथे जिथे

काढी आवर्जून वेळ

त्याच नात्यामधे जमे

जीवलग मैत्री मेळ…!४

*

कोणत्याही अटीविना

नाते मैत्रीचे टिकेल

अविश्वास संशयाला

तिथे निरोप मिळेल…!५

*

कुणासाठी द्यावा वेळ

नाही सांगावे लागत

जिथे वाहे स्नेह झरा

तिथे येतसे धावत…!६

*

त्याच त्याच चुका जेव्हा

सवयींचा होती भाग

नाते निखळ मैत्रीचे

जाते लावूनीया आग..!७

*

नको अपेक्षांचे ओझे

करा मित्रांची कदर

वेळ वाईट‌ येताच

धरा मैत्रीचा पदर…! ८

*

समर्थन पडे थिटे

फाटे कारणांची झोळी

दोष स्वभावाचे करी

सुखी जीवनाची होळी…!९

*

आहे ताकद तोवर

पैसा खेळतो हातात

आयुष्याच्या‌ संध्याकाळी

हवा‌ सोबती दारात…!१०

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कीर्तीचा मृदंग… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ कीर्तीचा मृदंग… ☆ प्रा. भरत खैरकर 

विरुनी जरा उरावे, धरित्रीच्या ठायी

वेडे समर्पण आपले होईल सुगंधी जाई!

इच्छांची टोके आपल्या बांधती रेशीमगाठी

उचलावे आयुष्य सारे श्रमाळल्या हाती!

 *

शीव ओलांडूनी दुराव्याची पंखात घ्यावे आभाळ

आसमंती वास्तव्य जरी कां धरित्रीत असावी नाळ!

 *

आत्म्याची राख होता अश्रूंचे वाढी ओझे

काळाच्या उदरात कीर्तीचा मृदंग वाजे!

 

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हा रक्तपुष्पी फुलोरा… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हा रक्तपुष्पी फुलोरा… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वृत्त : उद्धवमात्रा : 2+8+2+2=14)

ते रूप विहंगम दिसते 

उमलून रोज येताना 

जास्वंद देखणा हसतो

पानात फूल होताना 

*

स्वागत अरुणाचे करण्या

अरुणा नामाने येतो

हरिवल्लभ कोणी म्हणती

श्री चरणी सेवा देतो 

*

गजवदनाला प्रिय भारी

ही जवाकुसुमी फुलारी

हा लाल लाल जयपुष्पी

किरिटावर शोभा न्यारी

*

रंगात रंगला सारा 

हा रक्तपुष्पी फुलोरा 

पिवळा, जांभळा, भगवा

अन् शुभ्र दिसे हा गोरा

*

बहुगुणी आणि उपयोगी

कुंतलास जासुम जपतो

झुपक्यात उमलतो गोंडा

झिरमाळी पानी लपतो

*

मी पाहत बसते याला 

वाऱ्यावर झुलतो जेव्हा

कलिकेचे फुलात सजणे 

भ्रमराचे गुंजन तेव्हा

*

पाकळीत झालर फुलते

रंगांच्या मखमालीवर

काव्यात उतरतो माझ्या

गाणे होते मग सुस्वर

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मराठीची ऐशी की तैशी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ मराठीची ऐशी की तैशी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

(काल बेला शेंडे हिच्या लाईव्ह शो ने लोकसत्ताच्या “अभिजात लिट फेस्टची” सांगता गडकरीला झाली. पण तिकीट बारी वरील पाटी बघून (फोटो बघा) डोकं भणाणून गेलं! तेंव्हा कार्यक्रम बघतांना लिहिलेली रचना!)

*

मराठी लिट फेस्टमध्ये 

भाषेची पडली बत्तीशी,

जीव सोडला मराठीने 

ठाण्यात कालच्या दिवशी!

*

प्रयोग ‘नवीन नाटकाचा’

होता काल हाउसफुल्ल,

बोर्ड बघून गडकरीचा 

दांडी मराठीची झाली गुल!

*

‘बेला’चं नवीन नाटक 

तिला सुद्धा माहित नसावं,

बोर्ड बघून वाटलं लोकांना 

आता हसावं कां रडावं!

*

खरी ‘अभिजात मराठी’

लोकसत्तालाच कळली,

डोळ्यात भरण्या सारखी 

*फेस्टची सांगता झाली! *

*फेस्टची सांगता झाली! *

टीप: व्यक्त केल्या गेलेल्या विचारांशी / मतांशी संपादक-मंडळ सहमत असेलच असे नाही..

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३०४ ☆ समता… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३०४ ?

☆ समता… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(एक मुक्तछंद कविता)

भारतीय आहोत सारे धर्म असो वेगळे,

सर्व धर्म समभाव येथे, एक आपली पाळेमुळे !

*

रमजान,नाताळ अन् दिवाळी, सण करु साजरे ,

 आहेत एकमेकांवरी आपले प्रेमभाव निर्व्याज रे!

*

भारत आपला देश आहे वेगळा अन् चांगला,

राम, रहीम, रॉबीन येथे नेहमी मैत्रभावे वागला!

*

प्रेम नांदो या इथे, जाती ,धर्म या भिंती नको

एकता, समता, समभाव येथे ईश्वर राखो !

*

शांती असावी सर्वदा, आपण मानवता मानतो,

प्रेमभावाचाच आपला इतिहास येथे गाजतो

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आला वसंत सोहळा… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ आला वसंत सोहळा ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

आला वसंत सोहळा

देठ पानास कोवळा

सोनपालवी आडानं

गोड गाते ती कोकिळा

 *

नाविण्याचा हा आनंद

धरा सजण्यात धुंद

मंदावलेला समिर

जाये लुटूनिया गंध

                *              

रंग हिरवा पानात

भाव कोवळा मनात

रानी फुलतो बहावा 

गंधाळूनी आसमंत

 *

रास पिकल्या पानाची

वारा नेतोया  लूटून

जुनाट त्या आठवांची

कर मना बोळवण

 *

सरं आता पानगळ 

उन चौफेर पिवळं 

कुहूकुहू ताल धरी 

किती सुरेल ते बोल

 *

रानीवनी पळसाला

रंग केशरी चढला

किलबिल पाखरानी

सोनआनंद वाटला

© सौ.वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

*

रविंद्रनाथ टागोर हे जगातले एकमेव असे कवी आहेत, ज्यांनी रचलेल्या दोन काव्यांना भारत व बांगलादेश या दोन राष्ट्रांनी आपले राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली आहे. परंतु का कोण जाणे, पण त्या काळातील तथाकथित विचारवंतांमध्ये टागोरांबद्दल गैरसमज फार होते व कदाचित ते जाणून बुजून पसरविलेही जात होते. कदाचित टागोर एका उच्चशिक्षित, सुखवस्तू, जमिनदार घरात जन्मले होते, त्यांचे बंधू ब्रिटिश सरकारमधे अंमलदार होते, त्यांच्या वडिलांची उच्च सरकारी अधिकाऱ्यांत उठबस होती म्हणून असेल. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला म्हणून असेल.

सुरवातीच्या काळात ते सरकारवर फारशी जहाल टीका जाहीरपणे करत नसत. जे कांही म्हणायचं ते आपल्या लेखनातून, काव्यातून म्हणत. “जनगणमन अधिनायक जय हे” हे गीत टागोरांनी इंग्रज बादशहाच्या स्वागतासाठी लिहिलं होतं हा गैरसमज आजही कित्येकांच्या मनात आहे. पण त्यांनी ब्रिटिश राजवटीविरोधात लिहिलेल्या लेखांना तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. ब्रिटिश युवराज भारतात आले तेव्हा टागोरांनी म्हटलं होतं, “स्वतःच्या बळाचं प्रदर्शन करणाऱ्या राजाचं स्वागत करणं म्हणजे कैद्यांच्या पंगतीला मेजवानी म्हणण्यासारखं आहे. “

ब्रिटिश साम्राज्यशाहीने भारतीयांना स्वत्वहीन करून टाकले होतं व गोऱ्या कातड्याच्या लांगूलचालनात उच्चभ्रू समाज धन्यता मानत होता. यावर १८८४ साली, वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी त्यांनी तत्कालीन कॉंग्रेसच्या धुरिणांना उद्देशून लिहिलं होतं की, इंग्रजांपेक्षा स्वतःला हीन दीन समजून वागणारे लोक त्यांच्यापुढे हात जोडून “आम्हाला बरोबरीचा दर्जा द्या” अशी मागणी करणार आहेत काय? आम्ही स्वत:च्या हिमतीवर आपली, आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढवू शकणार नाही काय? जे स्वतःचा मान स्वतः राखू शकत नाहीत, त्यांचा मान राखायला परके येणार आहेत काय? का आपण स्वभाषेत बोलत नाही? का स्वदेशी वस्त्रं वापरत नाही? का म्हणून आम्हीच आमच्या मनात स्वदेशाची घृणा बाळगतो? ” असा विचार करणारा व ते बोलणारा, लिहिणारा कवी ब्रिटिश राजासाठी स्वागतगीत लिहिल का?

रविंद्रनाथांनी उत्तम इंग्रजी येत असूनही, वयाच्या पन्नाशी पर्यंत फक्त बंगाली भाषेतून लिहिलं व बंगालीतूनच भाषणं केली. पण त्याचवेळी उत्तम इंग्रजी कविता, धर्मोपसानेचे संस्कृत मंत्र, संत तुकारामांचे अभंग इ, साहित्य आपल्या वंग बांधवांसाठी बंगालीत भाषांतरित केले.

जालियनवाला बागेतील हत्याकांडानंतर त्यांनी आपला ‘सर’ हा किताब परत केला होता हे सर्वांना ठाऊक आहे पण वयाच्या ८०व्या वर्षी मृत्युशय्येवरून त्यांनी लिहिलेले (कृष्ण कृपलानींकडून लिहून घेतलेले), ब्रिटिश राजवटीला सणसणीत चपराक मारणारे त्यांचे अनावृत्त पत्र मात्र कुणाला फारसे ठाऊक नाही. दुर्दैवाने त्यानंतर दोनच महिन्यांनी ते वारले. पण या पत्रात त्यांनी “आधी भारतीयांचे शोषण थांबवा, त्यांना स्वतंत्र करा आणि मगच नाझींच्या विरुद्ध लढायला बोलवा” अशी जी मागणी केली होती त्याचाच स्फोट म. गांधींच्या ८ ऑगस्ट १९४२च्या ‘चले जाव’च्या भाषणात झालेला दिसला.

मनाला झोंबणाऱ्या भावनांना आपल्या गीतातून वाचा फोडणाऱ्या या महाकवीची “आमि भय करबोना” सारखी गीतं गात हजारो बंगाली तरूण वंगभंगाच्या चळवळीत पोलिसांच्या लाठ्या खात होते. “आमार शोनार बांगला” “ऍकला चलो रे” ही त्यांची सुप्रसिद्ध स्फूर्तीदायक गाणी याच चळवळीतली!

(संदर्भ – रविंद्रनाथ: तीन व्याख्याने, ले. पु ल देशपांडे)

—– 

☆ गीत : ३७ ☆

I THOUGHT that my voyage had come to its end at the last limit of my power, ⎯ that the

path before me was closed, that provisions were exhausted and the time come to take 

shelter in a silent obscurity.

But I find that thy will knows no end in me. And when old words die out on the tongue,

new melodies break forth from the heart; and where the old tracks are lost, new country is revealed with its wonders.

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत: ३७ ☆

*

वाट संपली, प्रवास थांबला

डळमळला विश्वास आतला

हीच वेळ कां चिरनिद्रेची?

*

तान थबकता ओठावरची

सरगम उसळे हृदयांतरीची 

असेल कशी ही खूण अंताची?

*

वाट हरवता वाटेवरची

निर्मिती होते नव विश्वाची

अंतच हा नां त्या अंताचा? सांग तूचि!

*

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—– 

☆ गीत ३८ ☆

THAT I want thee, only thee ⎯ let my heart repeat without end. All desires that distract 

me, day and night, are false and empty to the core.

As the night keeps hidden in its gloom the petition for light, even thus in the depth of my unconsciousness rings the cry ⎯ I want thee, only thee.

As the storm still seeks its end in peace when it strikes against peace with all its might,

even thus my rebellion strikes against thy love and still its cry is ⎯ I want thee, only 

thee

—–  

☆ मराठी भावानुवाद : गीत ३८ ☆

*

रात्रीच्या गर्भात, प्रकाशाचा हव्यास

तशी माझ्या मनी, तुझीच रे आस

मला तू हवास, मला तू हवास॥

*

शांत हवा अंत, जसा वादळास

तुझी ओढ वेगे, माझ्या प्रेमास

मला तू हवास, मला तू हवास॥

*

विचलित मन, करण्या प्रयास

वासनांचा दाह, कर्मांचा फास

मला तू हवास, मला तू हवास॥

*

मिथ्या जग, आसक्ती कशास

चिरंतन माझ्या, मुखी हा ध्यास

मला तू हवास, मला तू हवास॥

*

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—– 

☆ गीत ३९ ☆

WHEN the heart is hard and parched up, come upon me with a shower of mercy.

When grace is lost from life, come with a burst of song.

When tumultuous work raises its din on all sides shutting me out from beyond, come to 

me, my lord of silence, with thy peace and rest.

When my beggarly heart sits crouched, shut up in a corner, break open the door, my king, and come with the ceremony of a king.

When desire blinds the mind with delusion and dust, thou holy one, thou wakeful, come 

with thy light and thy thunder.

—–

मराठी भावानुवाद : गीत ३९

*

मन माझे होता शुष्क अन् कठोर

वर्षाव दयेचा करी मजवरती

*

आनंदास होता पारखा या जीवनी

गीत रंगांची उधळण कर ती

*

जो तुज अंतरतो, कोलाहल दैनंदिनीचा

असह्य होता, दे शांती अन् विश्रांती 

*

दीन माझे मन, जखडले धरणीशी

तोड दार, दाखव सत्ता, हो अधिपती

*

वासनांचे जर उठेल मोहोळ 

ने प्रखर प्रकाशी, देण्यास जागृती

*

– क्रमशः भाग १३.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares