मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अवकाशाची सीमा… कवी – डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ अवकाशाची सीमा… कवी – डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

रसग्रहण. (गाथा नारी जन्माची)

एक काळ असा होता की मुलगी जन्माला आली की तिचे संगोपन करताना किंवा तिला वाढवताना आई-वडिलांच्या मनात महत्त्वाचा जर कुठला विचार असेल तर “आपली मुलगी वयात आल्यावर तिच्यासाठी एखादा चांगला कुटुंबस्थित जोडीदार पाहायचा आणि तिचा विवाह जमवून द्यायचा म्हणजे आपली जबाबदारी संपली.”

आणि हाच विचार मनाशी बाळगून ती एक सक्षम गृहिणी बनावी, सासर माहेरचा मान तिने वाढवावा असे संस्कार तिच्यावर केले जात. म्हणजे मुलगी म्हटली की तिला स्वयंपाकपाणी आणि घर कामाचे धडे प्रथम विनाअट घ्यावेच लागायचे. तिने किती शिकावे अथवा तिने तिच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करावी की न करावी या सगळ्या आघाडीवर तिला मान्यता देण्याआधी या सगळ्यांमुळे तिचा विवाह जमवण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात हा प्राथमिक पण प्रबळ विचार असायचा. थोडक्यात त्या काळात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणे ही स्त्रीच्या आयुष्यातली अत्यंत अडथळ्याची शर्यतच होती पण हळूहळू काळ बदलला अगदी शंभर टक्के नसला तरी बऱ्याच प्रमाणात, बऱ्याच क्षेत्रात, जवळजवळ सर्वच क्षेत्रात आजची स्त्री अग्रेसर होत असल्याचं चित्र दिसू लागलं आणि या परिणामाचा विचार करताना मनात येते की एखाद्या स्त्रीच्या जडणघडणीत आई-वडिलांचा जर डोळस, समंजस सहभाग आणि सामाजिक विचारसरणीला डावलण्याचे बळ असेल तर ती नक्कीच काहीतरी दैदिप्यमान असे करू शकते हे बऱ्याच अंशाने सिद्ध झालेले आहे. याच विचारांचे प्रतिबिंब डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या अवकाशाची सीमा या गीतात मला दिसलं. खरोखरच मन आनंदलं आणि या गीताचा रसास्वाद घ्यायलाच हवा असे अगदी मनापासून वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.

☆ अवकाशाची सीमा ☆ 

☆

तो: अवकाशाची सीमा कर्तुत्वाला

 खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला ध्रु

 *

ती : हो वीणा सरस्वतीची

 हो पद्मिनी पदन्यासाची

 सुरसमाधि गंधर्वाची

 प्रतिसाद कलेच्या दे आव्हानाला

 खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला१

 *

तो : खेळाडू मैदानाची

 मासोळी जलतरणाची

 पाकोळी अवकाशाची

 यश राहू दे सदा तुझ्या साथीला

 खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला २

 *

 तो: तव प्रज्ञा विनायकाची

 ती: ज्ञानाची विज्ञानाची

दोघे :वर्षा तुजवर आशीशाची

 तव तेजाचा मार्ग दीप जगताला

 खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला३

☆

 – डॉ. निशिकांत श्रोत्री (निशिगंध)

हे गीत वाचल्यानंतर प्रथम जाणवतं ते हे एक प्रेरणा गीत आहे. या गीतात एका भाग्यशाली गुणी कन्येला आई-वडिलांकडून मिळणाऱ्या आशीर्वादाचे चित्र शब्दांकित केले आहे. आपल्या कन्येने चौफेर प्रगती करून तिचे स्वतःचे एक स्थान निर्माण करावे आणि जन्मदात्यांची मान उंच करावी अशी अपेक्षा त्यात मांडली आहे आणि त्यासाठी त्यांचं संपूर्ण पाठबळ तिला देत असताना भरभरून आशीर्वादही दिले आहेत हेच प्रथम दर्शनी गीत वाचताना लक्षात येतं. एका उदारमतवादी आईबापांचं आपल्या कन्येविषयीचं स्वप्न यात सुंदरपणे रेखाटलं आहे.

 हे एक निराळेच द्वंद्वगीत आहे आणि या गीतातील गायक माता आणि पिता आहेत.

  तो: अवकाशाची सीमा कर्तुत्वाला

 खुडुनि आणी नभिच्या नक्षत्राला।ध्रु  

या गीतातलं हे ध्रुवपदच पित्याने कन्येला दिलेल्या प्रेरणेचं आहे. मोठ्या अभिमानाने आणि विश्वासाने एक बाप मुलीला सांगत आहे, “ बेटा इतकं मोठं तुझं कर्तुत्व असूदे की त्यासाठी विशाल आकाशाच्या सीमाही तोकड्या पडाव्यात. अशी उंच भरारी घे की आकाशाचा चंद्र तुझ्या झोळीत येईल. ” या ध्रुवपदाच्या दोन ओळीतच त्या कन्येच्या सामर्थ्याविषयी पित्याने विश्वास दाखवला आहे आणि तिला उत्स्फूर्तपणे प्रोत्साहित आणि प्रेरित केले आहे.

“तुझ्या ध्येयासाठी SKY IS THE lIMIT असू दे” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला ही काव्यपंक्ती रूपकात्मक आहे. नभिचे नक्षत्र आणावे यात तिने उंच भरारी घेऊन अशक्य ते शक्य करून दाखवावे ही अपेक्षा बाळगलेली आहे.

कन्येच्या स्वप्नात भागीदार असलेली तिची माता ही हेच म्हणते,

 ती: हो वीणा सरस्वतीची

 हो पद्मिनी पदन्यासाची

 सूर समाधी गंधर्वाची

 प्रतिसाद कलेच्या दे आव्हानाला

 खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला१

जे कुठलं क्षेत्र तू निवडशील त्यात तू स्वतःला अत्त्युत्तम सिद्ध कर. त्या क्षेत्रातील शिखर गाठण्याचा प्रयत्न कर. संगीत क्षेत्रात तुला जर एखदे तंतुवाद्य शिकायचं असेल तर त्यात इतकं यश तुला मिळो की तुझ्या हाती वाजणारी वीणा ही जणू काही साक्षात सरस्वतीचीच वाटावी.

जर तुला नृत्यकलेत काही करून दाखवायचं असेल तर पदन्यासाचे शास्त्र इतकं आत्मसात कर की तुझं नृत्य पाहताना साक्षात पद्मिनीचेच दर्शन होईल आणि श्रेष्ठ गायिका बनायचं असेल तर सुरांची कठोर तपश्चर्या करून स्वर्गीय गंधर्वांची कला आत्मसात कर. तुझे गायन हे गंधर्वगायन ठरो. कुठल्याही कलेचं सर्वार्थाने, सर्वांगाने आव्हान तुला पेलता आलं पाहिजे.

आईने व्यक्त केलेलं हे कलेचं स्वप्न तर पित्याची आणखी काही निराळी इच्छा..

 तो: खेळाडू मैदानाची

 मासोळी जलतरणाची

 पाकोळी अवकाशाची

 यश राहू दे सदा तुझ्या साथीला

 खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला२

आपल्या उमलत्या कन्येला मोठ्या अभिमानाने हा पिता सांगत आहे, ” तुला जर क्रीडा क्षेत्रात तुझं स्थान निर्माण करायचं असेल तर मग मैदान गाजव. मैदानी खेळात असं प्राविण्य मिळव की सारं जग एक उत्तम खेळाडू म्हणून तुझं नाव घेईल. पाण्यात पोहायचं असेल तर मासोळी सारखं डोळ्यांचं पारणं फिटणारं पोहणं शिकून घे. इतकी गती, इतकं चापल्य त्यात असूदे! अंतराळात झेप घे आणि अवकाशालाच गवसणी घाल.

मी नेहमीच तुला यशासाठी शुभेच्छा देईन. जे वांछित आहे ते तुला मिळेलच. यश तुझ्या पदरात आपणहून येईल. फक्त डळमळू नकोस. असाध्य ते साध्य करण्याचा प्रयत्न कर. एक लक्ष्य ठेव. कधीही ध्येयाच्या मार्गावरून तुझं पाऊल मागे पडू नये. सदैव पुढे जात रहा.”

या ओळींमध्ये पाकोळी अवकाशाची ही शब्दरचना जरा विस्मित करते. खरं म्हटलं तर पाकोळी म्हणजे एक आकाशात भिरभिरणारं लहानसं पाखरू. पाकोळी हे पित्याने कन्येच्या “आज ती लहान असल्याचं” दर्शविण्यासाठी वापरलेला प्रतिकात्मक, रूपकात्मक शब्द असावा.

“बाळ आज तू माझं छोटंसं पाखरू आहेस पण तू जर अवकाशाचा वेग घ्यायचं ठरवलंस ना तर तुझ्या पंखातील ताकद नक्कीच वाढेल आणि आत्मनिर्भरतेने तू भविष्यात अंतराळात भरारी घेऊन चंद्र तार्‍यांशी दोस्ती करू शकशील हा विश्वास मला आहे. एक पाकोळी अवकाश ताब्यात घेऊ शकते हे जगाला दिसू दे. ”

पुढचा चरण अतिशय वाचनीय, आणि भावना उचंबळून टाकणारा आहे

तो: तव प्रज्ञा विनायकाची

 ज्ञानाची विज्ञानाची

दोघे: वर्षाव आशीशाची

 तव तेजाचा मार्गदीप जगताला

 खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला ३

पहिल्या ओळीत पित्याने कन्येला म्हटलं आहे, तव प्रज्ञा विनायकाची

“विनायक म्हणजेच गणेश म्हणजेच बुद्धीची देवता. मुली तू प्रज्ञावंत आहेस, बुद्धिमान आहेस, त्या गणेशाची तुझ्यावर कृपा आहे आणि त्याने बहाल केलेल्या बुद्धीचा तू योग्य रीतीने उपयोग करून घे. ”

या म्हणण्याला त्या मातेचेही अनुमोदन आहे आणि ती लगेच म्हणते,

ज्ञानाची विज्ञानाची ईश्वराने तुला ज्ञानी बनण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. यथाशक्ती तू योग्य असे ज्ञानकण वेचून तुझ्या ज्ञानाची झोळी भरून घे. ”

 या इथे कवीने वापरलेल्या विज्ञानाची हा शब्द फार सूचक आहे. यात असा अर्थ अभिप्रेत आहे की, ” जगाने विज्ञानात प्रचंड प्रगती केली आहे. या विज्ञान युगात तू यत्किंचीतही मागे पडू नकोस. जे जे नवे ते ते स्वबुद्धीने आत्मसात कर. रचनात्मक प्रगत विज्ञानाचा सकारात्मक पाठपुरावा करून तुझ्या हातून काहीतरी अलौकिक घडू दे! ”

मातापित्यांच्या स्वप्नाचे सूर एकमेकात मिसळतात आणि दोघेही एकत्रपणे म्हणतात,

 वर्षाव तुजवर आशीशाचा

 तव तेजाचा मार्गदीप जगताला

 खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला..

आम्ही दोघेही तुझ्यावर मनापासून आशीर्वादांचा वर्षाव करतोय आणि विश्वास व्यक्त करतो की जिथे कुठे जाशील, जे कुठले क्षेत्र निवडशील त्यात तुला झळाळते लखलखीत यश लाभो आणि तुझ्या यशोतेजाने तू तुझ्या मागून येणाऱ्यांना प्रकाश दे. त्यांचाही मार्ग उजळ. जगासाठी एक आदर्श उदाहरण तुझ्या रूपाने ठेव. पुढच्या पिढीसाठी तू दीपस्तंभ हो आणि आकाशातील चंद्र तारे वेचण्याचं तुझं धडाडीचं स्वप्न पूर्ण होऊ दे. ”

अशा रीतीने हे संपूर्ण गीत उलगडताना एका सुंदर प्रेरणागीताचा अनुभव मनाला प्रसन्न करतो. या गीतात आई-वडिलांनी कन्येला दिलेला प्रेमळ आणि प्रांजळ असा मौलिक आशीर्वाद आहे.

॥शुभास्ते पंथान: संतु॥ याच भावाचा तो आशीर्वाद आहे. आपल्या कन्येसाठी कला, क्रीडा, साहित्य, संगीत, विज्ञान, ज्ञानाची सर्व दालने त्यांनी खुली ठेवली आहेत. कसलाही दबाव तिच्यावर नाही. एका कळीतून सुंदर फुल पूर्ण उमलू दे हीच भावना.

डॉ. निशिकांत श्रोत्री एक महान कवी तर आहेतच पण आजपर्यंत त्यांच्या ज्या अनेक कविता मी वाचलेल्या आहेत त्यातून त्यांचं स्त्रीवादीपण प्रकर्षाने झिरपलेलं आहे. कुठलीही कविता असूदेत पण त्यांच्या शब्दातून मनापासून स्त्रीचा सन्मान करणारेच भाव प्रकट होत आले आहेत. अगदी त्यांच्या शृंगारिक कवितेत सुद्धा त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारे विकृतपणे स्त्रीचे चित्र कधीही चितारलेलं मला आठवत नाही. कदाचित माझ्याकडून हे थोडं विषयांतर होत असेल पण कवीच्या मनाचे अंतरंग किती निर्मळ असू शकतात हे आजच्या त्यांच्या अवकाशाची सीमा या गीताविषयी लिहिताना मला जाणवलं आणि ते अधोरेखित करावसं वाटलं कारण एखादं काव्य सुंदर का वाटतं तर तिथे कवीचं सुंदर मन असतं म्हणूनच.

अवकाशाची सीमा या गीतातील साधीच, फारसे क्लिष्ट अलंकार, छंद, वृत्त नसलेली पण प्रेमळ आई-वडिलांचे मुलीबद्दलच्या भविष्याचे स्वप्नरंजन करणारी प्रेमळ, वात्सल्यपूर्ण आणि प्रेरणादायी शब्दरचना वाचकाच्या मनाला थेट भिडते. फक्त इतकच नसून हे गीत समाज विचारसरणीला शंभर पावले पुढे नेतं म्हणून तेही अधिक महत्त्वाचं वाटतं. या गीतातला वात्सल्य रस आणि माता पित्यांच्या कन्येविषयीच्या उच्च भावना माझ्यासारख्या स्त्रीवाचकाला आणि दोन कन्येच्या मातेला नक्कीच भारावून टाकतात. या गीताचं हेच परमयश आहे असंच मी मानते.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ राग मल्हार (महुडे) ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

 

??

☆ राग मल्हार (महुडे) ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

बघता बघता आकाश काळ्या कुट्ट ढगांनी भरून गेले. पिसाट वारे वाहू लागले. ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट सुरू झाला.

रानात मोर आपले पिसारे फुलवून, माना उंचावून, म्याँव, म्याँव करीत आनंदाने केकारव करू लागले. क्षणातच पावसाच्या टपो-या थेंबांचा वर्षाव सुरू झाला. बहुप्रतिक्षित वर्षाऋतुचे हवेहवेसे वाटणारे विभ्रम सुरू झाले! पाऊस आला, पाऊस आला!!

हा भावनाविष्कार

साकार करी मल्हार।।

टीप :- आई मुलाला लाडाने जसे “बबड्या, छबड्या” म्हणते तसे मल्हार या लोकप्रीय रागाला काहीजण “महुडे” या लाडक्या नावाने संबोधितात. (ही माहिती कवी कै. वसंत बापट यांच्याकडून मी ऐकली होती.) 

☆ राग मल्हार (महुडे) ☆

☆

मत्त गजांसम धुंद गडद घन घुमती गगनात

मूर्तिमान मल्हार दाटला आज सकल विश्वात।।धृ।।

*

घुमती सागर, घुमति पयोधर, घुमती वादळवारे

मंदिरात जणु मृदंग घुमती, घुमती कडे-कपारे

काळ नागिणीपरी धावती सरिता फेसाळत

मूर्तिमान मल्हार दाटला आज सकल विश्वात।।१।।

*

रत्ने तोलित मोर नाचती धारांच्या तालात

लयकारी पाहून तयांची बिजली स्तिमित मनात

स्थिरावल्या त्या बलाकमाला थकुनी दूर वनात

मूर्तिमान मल्हार दाटला आज सकल विश्वात।।२।।

*

धडका देती डोंगरमाथी मेघ झिंगल्यापरी

प्रियकर स्मृतीने धडके काळिज सखिचे वरचेवरी

काय करिल परी खुळी! झाकळे ‘महुडे‘ नयनात

मूर्तिमान मल्हार दाटला ‘असा‘ सकल विश्वात।।३।।

गीत रचना : श्री दिवाकर बुरसे

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ गंगा माहेराची… + संपादकीय निवेदन – सुश्री ज्योत्स्ना तानवडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

🎇 अ भि नं द न  🎇 

शुभंकरोती साहित्य परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वृत्त बद्ध काव्य स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांना त्यांच्या गंगा माहेराची या काव्यरचनेसाठी उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

सौ. तानवडे यांचे ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

आज त्यांची पुरस्कार प्राप्त कविता प्रकाशित करत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

☆ ☆ ☆ ☆ ☆

शुभंकरोति साहित्य परिवार आयोजित भव्य वृत्तबद्ध काव्य स्पर्धा ‘उत्तेजनार्थ सन्मान प्राप्त‘

? कवितेचा उत्सव ?

☆ “गंगा माहेराची” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(वृत्त – लवंगलता (८|८|८|४))

☆

मनी घालती पिंगा अवचित फेऱ्या आठवणींच्या

फेर धरोनी नाचत थयथय गाऱ्या भिंगोऱ्याच्या ||

 *

शेतामधले कौलारू घर सदैव गजबजलेले

तीन पिढ्यांचे बंध रेशमी प्रेमळ गुरफटलेले ||

* 

दारापुढती गोधन दावण खूण वैभवी झुलते

ढवळ्या पवळ्या खिलार जोडी घुंगुरमाळा घुमते ||

 *

सख्खे मावस आत्ते मामे चुलत नातलग सारे

एकोप्याच्या मेळाव्याला भेटण्यास येणारे ||

 *

सरस्वतीचे मंदिर मोठे जीवन घडवत जाई

संस्कारांची दिली शिदोरी वाटे दुसरी आई ||

 *

मंदिरातल्या आरतीमधे मन रेंगाळत राही

आशीर्वादे आयुष्याला कळस यशाचा पाही ||

 *

गावाकडल्या मातीमध्ये नाळ जोडली आहे

माहेराच्या घरामधुनिया प्रेमळगंगा वाहे ||

 ☆

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७७ आणि ७८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७७ आणि ७८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ७७ — – 

करी काम नि:काम या राघवाचे ।

करी रूप स्वरूप सर्वा जिवांचे ।

करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता ।

हरिकीर्तनी वृत्तिविश्वास होता ।।७७।।

अर्थ : या राघवाच्या प्राप्तीची मनापासून कामना कर. सकल प्राणिमात्रांच्या ठायी असलेले त्याचे रूप स्वत:मध्येही पहा. त्याचे गुणगान करण्याचा छंद लागला की सारे भेद, द्वंद्व नाहिसे होतील.

(नि:काम – निष्काम होऊन/निरिच्छ वृत्तीने, निर्द्वंद्व – सुखदुःखाच्या पलीकडे जाणे /द्वैतभाव नष्ट होणे, हरिकीर्तन – परमेश्वराचे गुणगान करणे)

विवेचन : परमेश्वर प्राप्तीची इच्छा असणाऱ्या साधकाने कसे वागावे ते समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. आपण सामान्य प्रापंचिक माणसे आहोत. आपल्या मनात निरनिराळ्या इच्छा, वासना वेळोवेळी उद्भवत असतात. जोपर्यंत वासना आहेत, तोपर्यंत परमेश्वर प्राप्ती होणार नाही. आपण परमेश्वराची प्रार्थना, ध्यान करतो ते सुद्धा मनात काहीतरी इच्छा ठेवूनच. त्यामुळे एक वेळ आपल्या त्या कामना पूर्ण होतील पण ईश्वर मात्र आपल्यापासून दूरच राहील. म्हणून इतर सर्व वासनांचा त्याग करून मला अन्य काही नको. फक्त परमेश्वर हवा आहे अशा अनन्य भावनेतून जर आपण त्याचे गुणगान केले तर त्याचा एक परिणाम असा होईल की हळूहळू आपल्या इतर वासना नाहीशा व्हायला लागतील. देहबुद्धी कमी होईल.

त्या गोष्टीचे मात्र आपल्याला सतत ध्यान लागले पाहिजे. त्याचा छंद किंवा वेड लागले पाहिजे. असे झाले म्हणजे आपल्या अंतर्यामी असणारा ईश्वर हळूहळू या विश्वात सर्वत्र विद्यमान आहे याची जाणीव होईल. तो जसा माझ्यात आहे तसाच सर्व प्राणीमात्रात देखील आहे याची जाणीव दृढ होत जाईल. तो केवळ सजीवात नसून निर्जीवात किंवा सृष्टीच्या कणाकणात त्याचे अस्तित्व आहे हे जाणवेल. भक्त प्रल्हादाचे उदाहरण आपल्याला माहिती आहे. प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपू देवांना आपला शत्रू समजत होता. पण अशा या असुराचा मुलगा प्रल्हाद मात्र विष्णूचा भक्त होता. जेव्हा हिरण्यकश्यपूने त्याला विचारले, ” कुठे आहे तुझा ईश्वर? ” तेव्हा त्याने सांगितले की तो या सर्व चराचरात भरून राहिला आहे. मग हिरण्यकश्यपूने विचारले की या निर्जीव अशा खांबात देखील तो आहे का? तेव्हा प्रल्हादाने होय उत्तर दिले. नंतर त्याच स्तंभातून परमेश्वराने नरसिंह रूप धारण करून दुराचारी अशा हिरण्यकश्यपूचा वध केला.

पैठणच्या ब्रह्मवृंदासमोर ज्ञानदेवांनी सर्वांभूती एकच ईश्वर आहे हे रेड्याच्या मुखातून वेद वदवून सिद्ध केले. संत एकनाथांनी तृषार्त अशा गाढवाला गंगेचे पाणी पाजून त्याचा आत्मा शांत केला आणि सर्वांचा आत्मा एकच आहे याचा प्रत्यय लोकांना आणून दिला. भगवंताच्या भक्तीने या सगळ्या संतांच्या मनातील द्वंद्व नाहीसे झाले होते.

त्याप्रमाणे हरिनामाचे गुणगान केले की आपल्याही जाणिवा हळूहळू सूक्ष्म व्हायला लागतात. मनातील द्वंद्व नाहीसे होते. या जगामध्ये विविध रंग आणि रूपात तोच नटलेला आहे याचा साक्षात्कार होतो. जसे वेगवेगळ्या भांड्यात भरून ठेवलेले पाणी त्या भांड्याच्या आकारात राहते. पण पाणी एकच असते. सोन्याचे दागिने विविध प्रकारचे आणि आकाराचे असतात. पण त्यातील सोने एकच असते. त्याप्रमाणेच या विश्वात परमेश्वरच सगळीकडे भरून राहिला आहे ही जाणीव दृढ होत जाते. संत ज्ञानेश्वर म्हणतात, ” हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणचि जाहला. ” अशी साधकाची अवस्था होते. म्हणून आपण निर्वासन होऊन फक्त एका परमेश्वराचीच वासना धरावी असे समर्थांचे सांगणे आहे.

स्वसंवाद :: 

१. माझी आजची भक्ती किंवा प्रार्थना ही देवाला काहीतरी ‘मागण्यासाठी’ (सकाम) आहे, की मी केवळ त्याच्या ‘स्वरूपासाठी’ (निष्काम) त्याची आराधना करतोय?

२. संतांनी गाढवात किंवा खांबातही देव पाहिला; मी माझ्या दैनंदिन जीवनात माझ्या आजूबाजूच्या माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये तोच ईश्वरी अंश पाहू शकतो का?

३. माझ्या मनातील ‘आपले-परके’, ‘चांगले-वाईट’ हे द्वंद्व किंवा भेद नष्ट व्हावेत म्हणून माझ्या ठायी रामनामाचा ‘वृत्तीविश्वास’ दृढ झाला आहे का?

४. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे “हे विश्वचि माझे घर” ही भावना माझ्या मनात रुजण्यासाठी मी माझ्या संकुचित विचारांचा ‘छेद’ (त्याग) करायला तयार आहे का?

– – – – 

श्लोक क्र. ७८ – – 

अहो ज्या नरा रामविश्वास नाही ।

तया पामरा बाधिजे सर्व काही ।

महाराज तो स्वामी कैवल्यदाता ।

वृथा वाहने देहेसंसारचिंता ।।७८।।

अर्थ : ज्या मनुष्याचा परमेश्वरावर विश्वास नाही, त्या माणसाला (पामराला) सर्व प्रकारची संकटे त्रास देतात. भगवंत महाराज म्हणजे राजांचा राजा आहे, या विश्वाचा स्वामी म्हणजे मालक आहे, तो कैवल्यदाता म्हणजे मोक्ष देणारा आहे. असा हा सर्वशक्तिमान परमेश्वर आपली काळजी वाहण्यास समर्थ असताना आपण उगाच देहाची आणि संसाराची चिंता करीत बसतो.

(पामर – क्षुद्र /हीन /दीन /दुबळा, बाधणे – त्रास होणे, कैवल्यदाता – मोक्ष देणारा, वृथा – व्यर्थ)

विवेचन : आधीच्या श्लोकात समर्थांनी श्रीरामावर निष्काम श्रद्धा ठेवून त्याचे नामस्मरण केल्यास मनातील द्वंद्व नाहीसे होते. सर्व जीवांच्या मध्ये तो एकच परमात्मा व्यापून राहिला आहे असा साक्षात्कार होतो असे सांगितले आहे. या श्लोकात ज्याचा रामावर विश्वास नाही अशा माणसाचा खरपूस समाचार समर्थ घेतात. अशा माणसाला ते पामर म्हणतात. पामर म्हणजे क्षुद्र, हीन. गरीब आणि पामर यात फरक करता येतो. गरीब माणूस आपल्या कर्तृत्वाने स्वतःची उन्नती करून घेऊ शकतो. पामर हा त्या दृष्टीने महामूर्ख म्हणावा लागेल. कारण आपले हित कशात आहे हे त्याला कळत नाही. ज्यांची परमेश्वरावर श्रद्धा नाही, अशा माणसांना समर्थ पामर म्हणतात. मग तो ऐहिक दृष्ट्या भलेही श्रीमंत असेल, पण पारमार्थिक दृष्ट्या अभागी आणि हीन दीन.

असा माणूस आर्थिक दृष्ट्या भलेही सधन असेल पण प्रपंचात येणाऱ्या संकटांनी तो खचून जातो. प्रपंचातील संकटांचे तडाखे भल्याभल्यांना सोसवत नाहीत. छोट्यामोठ्या गोष्टींनीही अशी माणसे विचलित होतात. समर्थांच्या शब्दात सांगायचे तर अशा माणसांना संसार आणि त्यातील अडचणी बाधक ठरतात. पण ज्यांची रामावर श्रद्धा आहे, अशा माणसांना प्रपंचातील संकटे विचलित करीत नाहीत. त्यांना संकटे येत नाहीत असे नाही. पण भगवंतावर सर्व भार टाकल्यामुळे त्यांना अशा गोष्टींचा त्रास होत नाही.

या श्लोकात भगवंताच्या गुणांचे वर्णन करताना समर्थ तीन विशेषणे वापरतात. तो ‘महा ‘राज आहे, स्वामी आहे आणि कैवल्यदाता आहे. महाराज म्हणजे महान राजा. राजांचा राजा. रामराज्य होऊन आज हजारो वर्षे लोटली तरी रामराज्याची कल्पना आजही लोकांना भावते. रामराज्य म्हणजे आदर्श राज्य होते. राम हा आदर्श राजा. दुसरी गोष्ट म्हणजे तो या चराचराचा स्वामी आहे. इंग्रजी शब्द वापरायचा तर तो ‘ सुप्रीम पॉवर ‘ आहे. या विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारकर्ता तोच आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तो कैवल्यदाता आहे. कैवल्यदाता म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष देणारा. ज्याने ज्याने रामनाम घेतला, तो तरून गेला. मग तो वाल्या कोळी असेल, भक्त प्रल्हाद असेल, रामनाम घेणारी शबरी असेल किंवा अहिल्या असेल. हनुमंत आणि बिभीषण हे रामाचे भक्त तर चिरंजीव झाले.

थोडक्यात सांगायचे झाले तर श्रीराम म्हणजे कल्पवृक्ष आहेत. कल्पवृक्ष हा इच्छिलेले देणारा असतो. त्याच्या सावलीत बसून आपण काय मागायचे हे आपल्यावर आहे. तो आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती देणारा आहे. कैवल्य प्रदान करणारा आहे. असा हा भगवंत आपल्या पाठीशी असताना आपण देहाची आणि संसाराची व्यर्थ चिंता वाहत असतो. माझे कसे होईल, माझ्या मुलाबाळांचे, नातवंडांचे कसे होईल अशी चिंता आपण करीत बसतो. तर कोणाला या जगाचे कसे होईल अशा प्रकारची चिंता. अशा अनेक प्रकारच्या चिंतांनी सामान्य माणूस गोंधळून जातो.

समर्थ म्हणतात, ‘ मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. ‘ प्रारब्धानुसार जे घडायचे असते, ते घडणारच असते. आपण मात्र व्यर्थ चिंता करीत बसतो. त्यापेक्षा आपण त्याच्यावर विश्वास ठेवून सर्व भार त्याच्यावर सोपवावा. याचा अर्थ मात्र असा नाही की आपल्या वाट्याला आलेले कर्म न करता स्वस्थ बसायचे. अर्जुनाला कर्तव्यप्रवण करण्यासाठीच तर भगवंताने गीता सांगितली ना! तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या वाट्याला आलेले निहित कर्म उत्तम प्रकारे करावे. तोच पुरुषार्थ आहे. इतर गोष्टी परमेश्वरावर सोपवाव्यात. तुकाराम महाराज म्हणतात, “घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. “मग देहाच्या आणि प्रपंच्याच्या चिंता आपल्याला सतावणार नाहीत.

स्वसंवाद :: 

१. “माझे कसे होईल? माझ्या कुटुंबियांचे कसे होईल? ” या विचारसरणीत अडकून मी समर्थांनी म्हटल्याप्रमाणे प्रपंचाची ‘वृथा’ (व्यर्थ) चिंता करत बसलो आहे का?

२. संकटाच्या काळात मी एका ‘पामरा’सारखा विचलित होऊन खचून जातो, की भगवंतावर संपूर्ण भार टाकून खंबीरपणे परिस्थितीचा सामना करतो?

३. कल्पवृक्षाप्रमाणे असणाऱ्या श्रीरामाच्या चरणी आल्यावर मी त्याच्याकडे केवळ तात्पुरती ऐहिक सुखे मागत आहे, की चिरंतन शांती आणि मोक्षाची आस धरतो आहे?

४. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, “देव सुखाचा सागर” आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे का? मी माझे निहित कर्म करून उरलेला भार त्याच्यावर सोपवायला शिकलो आहे का?

– क्रमशः श्लोक श्लोक ७७ आणि ७८

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ लागली माऊलीची ओढ!! ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

☆ लागली माऊलीची ओढ!! ☆ नीलांबरी शिर्के ☆

☆

हाती केशरी पताका

तिचा सनातनी रंग

पाय चालताती वाट

मुखी विठूचे अभंग!!

*

माथी चंदनाचा टिळा

त्यात शोभतसे बुक्का

म्हणा विठ्ठल विठ्ठल

मग पाय पुढे टाका!!

*

गळा तुळशीची माळ

दोन्ही हातामध्ये टाळ

वाट ओसरण्यापायी

खेळू फुगडीचा खेळ!!

*

संथ वाहे चंद्रभागा

वाळवंटी भक्त दंग

करा स्नान अन सारे

वाट पाहे पांडुरंग!!

*

नामदेवाची पायरी

कान्होपात्रेचे ते झाड

भेट घेता संत स्थाना

लागे माऊलीची ओढ!!

*

माथा पावलाशी जाता

स्पर्शे पुंडलिक विट

देह पुण्यवंत होई

सार्थकता काठोकाठ!!

☆

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जं ग ल रा ज? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जं ग ल रा ज? ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

परवा धडक दिली बिबटयाने 

मुंबईच्या वेशीवर भायंदरला,

काल आला सोनेरी कोल्हा 

पाणी प्यायला कल्याणला!

*

सगळ्या मुंबापुरीची होणार 

थोड्याच दिवसात राणीबाग,

हावऱ्या मुंबईकरा आता तूच

एका पिंजऱ्यात रहायला लाग!

*

केलास “त्यांच्या” अधिवासाचा 

स्वार्थापोटी खूप सत्यानाश,

आता तुझ्या हद्दीत येऊन 

घेऊ लागले बघ तुझाच घास!

*

अक्कल गहाण ठेवून तुझी 

तू बांधलेस जंगलात मनोरे,

वेळ अजूनही गेली नाही 

आता तरी बंद डोळे उघड रे!

आता तरी बंद डोळे उघड रे!

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ युद्ध… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ युद्ध… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

☆

अजिंक्य त्यांना वाटे किल्ला बुरूज माझे अभेद्य नव्हते

बरे जाहले गुपीत माझे हल्लेखोरां कळले नव्हते

* 

दीड वितीचे इथे रणांगण समोर नखभर होते योद्धे

प्रेक्षणीय पण लुटूपुटूचे रण लढणेही नशिबी होते

 *

दिग्विजय कुणी बहाल केला गल्लीमधल्या विजयालाही

नाचविले कुणी माझे घोडे फत्ते जणु की अश्वमेधही

 *

तहास आणिक माघारिसही रणनीतीची चढली झूल

पराजयाला कधी लाभली हौतात्म्याची उदात्त भूल

 *

लुटूपुटूचे घावहि घातक ओरखड्यांच्या जखमा प्राणा

चकमकसुद्धा गांभीर्याने घ्यावी, उशिरा आले ध्याना

 *

केली जी मी घायाळांस्तव फळास आली चुकुन प्रार्थना

अर्पू लागले पामर काही मला फुकाची श्रेयवंदना

 *

न्यूनांचे अन् वैगुण्यांचे फिटता फिटता फिटले रिंगण

चक्रव्यूहही आले ध्यानी सरले सारे बाळबोधपण

 *

नुरली ईर्ष्या अजिंक्यतेची तटबंदीची सरली चिंता

युद्ध न उरले मुळी कुणाशी स्वतः स्वतःशी लढणे आता!

☆

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७५ आणि ७६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७५ आणि ७६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

 श्लोक क्र. ७५ – – 

समस्तामध्ये सार साचार आहे ।

कळेना तरी सर्व शोधून पाहे ।

जिवा संशयो वाउगा तो तजावा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७५।।

अर्थ : परमेश्वर प्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये भगवंताचे नाम हेच सार (उत्कृष्ट साधन) आहे. जर हे समजत नसेल तर श्रुती, स्मृती, पुराणे, वेद, उपनिषदे आणि संतांची वचने यांचा अभ्यास करून पहा. भगवंताच्या नामाबद्दल विनाकारण येणाऱ्या संशयाचा त्याग कर. पहाट समयी भगवंताचे चिंतन कर.

(समस्तामध्ये – भगवंत प्राप्तीच्या साधनांमध्ये, सार – महत्वाचे/शाश्वत सत्य, साचार – खरोखरच /आचरणात आणण्याजोगे, वाउगा – व्यर्थ/निरर्थक, तजावा – त्याग करावा)

विवेचन :: समर्थ पुन्हा पुन्हा भगवंताच्या नामाची महती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पटवून देत आहेत. आधीच्या श्लोकांमध्ये त्यांनी इतर साधनांपेक्षा रामनाम हे घेण्यासाठी किती सोपे आहे हे समजावून सांगितले. या श्लोकात ते म्हणतात की रामनाम हेच सार आहे. बाकी सर्व असार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ” सार सार सार विठोबा, नाम तुझे सार, म्हणोनि शूळपाणी जपताहे वारंवार. ” बा विठ्ठला, तुझे नाम हेच एक सार आहे. म्हणून तर प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव त्याचा वारंवार जप करीत असतात.

फळे जमिनीतील पाणी, जीवनसत्वे शोषून घेतात. फळातून ते सार आपल्यापर्यंत पोचवतात. नदी पर्वतातील गाळ, कचरा इ. वाहून आणते पण गोड पाणी आपल्यापर्यंत पोचवते. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्याची वाफ होते. मेघ आपल्याला जीवनदायी जलधारांचा वर्षाव करतात. आपले शरीर देखील आपण खाल्लेल्या अन्नातील सार शोषून घेते. असार आहे ते बाहेर टाकते. निसर्गातील सर्वच घटक अशा प्रकारे सार ग्रहणाचे कार्य करीत असताना आपल्याला दिसतील. त्याप्रमाणेच ज्याने हे विश्व निर्माण केले, त्याचे नामच सर्व सार आहे. नामातच त्याचा वास आहे. तेच नाम आपणही घ्यावे. पण आपण मात्र असार असलेला हा संसार खरा मानून सारभूत असलेले भगवंताचे नाम घेत नाही.

पण नामाचा महिमा वारंवार सांगूनही काही लोकांना पटत नाही. अशा लोकांना समजावणे अवघड असते. स्वतः शोध घेतल्याशिवाय त्यांची खात्री पटत नाही. त्यांच्या मनात अपार शंका असतात. यांना सांगायला काय जाते? नुसत्या नामामध्ये एवढे सामर्थ्य असणे कसे काय शक्य आहे? नुसते नाम घेऊन काय होणार आहे? कशाला त्यात वेळ घालवायचा? अशा लोकांसाठी समर्थ म्हणतात की माझे बोलणे तुम्हाला खरे वाटत नसेल तर स्वतः खात्री करून घ्या. विविध ग्रंथ, पुराणे, वेद, उपनिषदे अभ्यास. संतांच्या वचनांचे वाचन करा. हे सगळे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सगळे ग्रंथ, पोथ्या पुराणे एकमुखाने भगवंताच्या नामाचा उद्घोष करीत आहेत. सर्व संतांनी देखील नामाचा महिमा एकमुखाने गायिला आहे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल, तेव्हा आपल्या मनातील व्यर्थ शंकांचा त्याग करा. सर्व संशय टाकून द्या. ‘ संशयात्मा विनश्यति ‘ असे म्हणतात. तेव्हा परमेश्वराचे नाम हेच सर्व सार असल्याची जेव्हा खात्री होईल तेव्हा सगळ्या शंका टाकून देऊन निःशंक मनाने भगवंताचे नाम घ्या. कवी अशोक परांजपे आपल्या एका सुंदर गीतात म्हणतात – – 

नाम आहे आदि अंती, नाम सर्व सार ।

आहे बुडत्याला नौका ठेवली जीवनी आधार ।।

या गीताच्या शेवटच्या कडव्यात ते म्हणतात – – 

नाम जपो वाचा नित्य श्वासांतही नाम

नाममय होवो देवा माझे नित्य कर्म

असे आपलेही कर्म नाममय व्हावे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात – – 

नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा ।

वायां आणिका पंथा जासील झणीं ॥

– – म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात की प्रभात समयी भगवंताचे चिंतन करावे. म्हणजे दिवसभर त्याचे स्मरण राहते.

स्वसंवाद :: 

१. निसर्गातील प्रत्येक घटक जर केवळ ‘सार’ ग्रहण करत असेल, तर मी मात्र संसारातील ‘असार’ (क्षणभंगुर) गोष्टींनाच आयुष्यभराचे सत्य मानून त्यात गुंतलो आहे का?

२. भगवंताच्या नामाबद्दल किंवा भक्तीबद्दल माझ्या मनात नकळत काही ‘वाउगा’ (व्यर्थ) संशय किंवा तर्क-वितर्क येत राहतात का?

३. सर्व संतांनी आणि श्रेष्ठ ग्रंथांनी ज्या नामाला ‘जीवनाचा आधार’ म्हटले आहे, त्या नामाचा अनुभव मी स्वतः कधी निःशंक मनाने घेऊन पाहिला आहे का?

४. माझे नित्य कर्म ‘नाममय’ व्हावे यासाठी मी रोजच्या धावपळीत किती जागृत राहतो?

– – – – 

श्लोक क्र. ७६ – – 

नव्हे कर्म ना धर्म ना योग काही ।

नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ।

म्हणे दास विश्वास नामी धरावा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७६।।

अर्थ : आपल्या हातून कर्म, धर्म किंवा योग यातील एकही गोष्ट व्यवस्थित होत नाही. माणूस पूर्णपणे भोगातही रमत नाही किंवा पूर्णपणे त्यागही त्याच्या हातून घडत नाही. अशा परिस्थितीत समर्थ म्हणतात नामावर विश्वास ठेवा. पहाटेच्या वेळी श्रीरामाचे चिंतन करा.

(त्याग – विरक्ती, सांग – यथासांग/व्यवस्थितपणे)

विवेचन : प्रभाते मनी राम चिंतीत जावा या श्लोकमालिकेतील हा शेवटचा श्लोक. या दहा श्लोकांच्या गटात समर्थांनी भगवंताच्या नामाचा महिमा निरनिराळ्या प्रकारे वर्णन केला आहे. प्रत्येक श्लोकाचा शेवट ‘ प्रभाते मनी राम चिंतीत जावा ‘ या ओळीने झाला आहे. या श्लोकांनी नामस्मरणाचे आणि प्रभात समयी श्रीरामाच्या चिंतनाचे महत्व आपल्या मनावर ठसवले आहे.

आपण प्रापंचिक माणसे. जसे जमेल तसे आपल्या वाट्याला आलेले कर्म करण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु मतमतांच्या गलबल्यात आपण एवढे हरवून किंवा गोंधळून जातो की हाती आलेल्या कर्माला व्यवस्थितपणे न्याय देणे आपल्याला जमत नाही. धर्मपालनाच्या बाबतीतही असेच होते. धर्मपालनासाठीच्या विविध गोष्टी, विविध मार्ग ऐकून सामान्य माणूस गोधळतो. मग हे करू की ते करू अशी त्याची अवस्था होते. योगाचा किंवा ध्यानधारणेचा अभ्यास करणे त्याला शक्य होत नाही. थोडक्यात सांगायचे तर सामान्य माणसाची स्थिती एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीप्रमाणे होते. लोकांची ही मानसिकता ओळखून त्यांची दिशाभूल करणारे बुवा बाबा त्यांचे उखळ मात्र पांढरे करून घेतात. समर्थांसारखे सद्गुरू लोकांना अशा प्रकारच्या गोंधळाच्या स्थितीतून बाहेर काढण्याचे अचूक कार्य करतात. लोकांना सन्मार्गाची दिशा दाखवतात.

समर्थांच्या काळात तर सामान्य माणूस अशा गोंधळलेल्या स्थितीतच होता. तो कर्मकांडात अडकला होता. त्यामुळे ईश्वरप्राप्तीच्या खऱ्या मार्गापासून दूरच चालला होता. अशा वेळी समर्थ, संत तुकाराम आदी संतांनी लोकांना खरा धर्म काय आहे हे समजावून सांगितले. लोकांची परंपरा, अंधश्रद्धा आदींवर प्रहार करून त्यांना खरा ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवला. समर्थांनी नामस्मरण हे सर्वात सोपे साधन आहे. त्यासाठी काही पैसा, वेगळा वेळ, शारीरिक श्रम या गोष्टी लागत नाहीत हे सांगितले.

कालमान बदलले आहे. पूर्वीप्रमाणे लोकांना योग, याग, तप करणे जमणार नाही हे ओळखून त्यांनी परमेश्वर प्राप्तीसाठी लोकांच्या हाती नामस्मरणाची गुरुकिल्ली दिली. आपल्या वाट्याला आलेल्या कर्माचे जेवढया चांगल्या प्रकारे शक्य होईल तसे पालन करा, आपण जे काही धार्मिक विधी करतो, त्यात काही तरी अपूर्णता राहून जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण शेवटी म्हणतो, ” आवाहनं न जानामी, न जानामी तव अर्चनं… ” असे म्हणून परमेश्वराची क्षमा मागतो आणि काही अपूर्ण राहिले असेल ते पूर्ण करून घे अशी प्रार्थना करतो. म्हणूनच धर्म, योग, याग या गोष्टी पूर्णपणे जशाच्या तशा पालन करणे जमणार नाही हे समर्थ जाणतात. पण या सगळ्यात एकच महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा असे त्यांचे सांगणे आहे. ती गोष्ट कोणती? तर ते म्हणतात, “म्हणे दास विश्वास नामी धरावा. ” इतर गोष्टी जशा जमतील तशा करा. पण नामावर विश्वास ठेवून नामस्मरणाचा सोपा मार्ग अवलंबा असेच त्यांचे सांगणे आहे. संत ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात, ” एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. ” तेव्हा सर्व संतांचे सांगणे एकच आहे. परमेश्वराचे नाम भक्तिभावाने घ्या. जणू तो समोर उभा आहे अशी कल्पना नाम घेताना करा. तुकाराम महाराज म्हणतात, “नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जगजेठी । ऐसे धरोनिया ध्यान, मनी करावे चिंतन. ” तेव्हा अशा प्रकारे प्रभात समयी श्रीरामाचे चिंतन करा.

स्वसंवाद :: 

१. विविध ग्रंथांचे मतमतांतर आणि संभ्रम यात अडकून न पडता, मी समर्थांनी सांगितलेल्या ‘नामावरील विश्वासाची’ गुरुकिल्ली स्वीकारायला तयार आहे का?

२. “आवाहनं न जानामी” म्हणताना माझ्या मनात माझ्या अपूर्णतेची जाणीव आणि भगवंताप्रती संपूर्ण शरणागती असते का?

३. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, मुखात नाम घेताना प्रत्यक्ष ‘जगजेठी’ (परमेश्वर) माझ्या समोर उभा आहे, अशी अनुभूती घेण्याचा मी कधी प्रयत्न करतो का?

४. या १० श्लोकांच्या मालिकेतून मी नेमके काय शिकलो? उद्यापासून माझ्या मनात ‘राम चिंतनाची’ नवी पहाट होईल का?

– क्रमशः श्लोक श्लोक ७५ आणि ७६

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मृत्युपत्र … कवी : स्वामी निश्चलानंद ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

स्वाती मंत्री

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मृत्युपत्र … कवी : स्वामी निश्चलानंद ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

☆

गांवकुसाला ओलांडत ये

लटलट कांपत एक आकृती

थरथरणारे हात सांगती

जगण्यासाठी साहले किती

टेकत काठी रस्त्यावरती

खटखट तालावरी पाउले

या वेगाने कशी फिरावी

गांवभराची चार राउळे? ||१||

 *

रस्त्याकडल्या नळास पाणी

पाहुन स्वारी तिथे थांबली

ओंजळ भरुनी घेता घेता

हात कापुनी पुन्हा सांडली

खांद्यावरची पडशी उचकुन

पोचे पडला डबा काढला

तहान भागुन मिळे तजेला

वाट शोधुनी पुन्हा निघाला ॥२॥

 *

थोडे अंतर चालुन जाता

नदीकाठच्या देवळातले

घंटेचे स्वर कानावरती

पडता अवचित हात जोडले

चढत्या दिवसामुळे उन्हाची

तिरीप चमकुन डोळ्यावरती

भोवळ आल्यागत वाटूनी

फतकल घालुन बसे खालती ||३||

 *

जरा सावचित होत बिचारा

खुरडत सरकत तसाच गेला

वठलेल्या झाडाच्या फुटक्या

पारावरती जाउन निजला

अंगावरचा सदरा ओला

चिकटुन दिसते पोट खपाटी

धोतर चिंध्या कश्याबश्या त्या

जुळल्या होत्या मारुन गाठी ||४॥

 *

पायावरती रक्त साकळे

खाजवलेल्या ओरखड्यांचे

लगेच संधी दिसे, फावले

भुणभुण करणाऱ्या माश्यांचे

बऱ्याच वेळानंतर कोणी

तरी जवळुनी जरा निरखले

कुजबुज झाली प्रेत पाहुनी

आले गेले बघे सटकले ||५||

 *

पोलिस आले, पुन्हा चौकशी

माहित नव्हते कुणास काही

कुणी म्हणाले, दिसे भिकारी

घाटावरती पडून राही

भीक मागता देवळापुढे

चुकुन कुणाशी बोलत नव्हता

पोटापुरता घास लाभता

डोळे मिटुनी पुटपुट करता ॥६॥ ㅤ 

 *

उशाखालची पडशी काढुन

पोलिस पाही उलटुन सारे

काही बोळे, सुकी भाकरी

पुरचुंड्या अन्‌ दाणे खारे

गुंडाळीच्या मधून निघती

पाकिटातल्या नोटा काही

सोबत त्यांच्या एक चिठोरा

ओल लागुनी पसरे शाई ॥७॥

 ㅤ* 

मजकुर पाहुन गडबडले अन्‌

चकित होउनी पुन्हा वाचती

जगास उद्देशुनिया त्याने

अंतिम इच्छा लिहिली होती

“झालो नाही कधी कुणाचा

कुणावरी ना भार उरावा

जमवुन ठेवत गेलो पैसे

यातुन अंतिम खर्च करावा” ॥८॥

 ☆

कवी: स्वामी निश्चलानंद

संग्राहक : सुहास सोहोनी

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # ३०२ – कालिदास दिन…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # ३०२ – विजय साहित्य ?

☆ कालिदास दिन…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

☆

कवी कालिदास दिन

आषाढाची प्रतिपदा

काव्य शृंगार तिलक

प्रासादिक ही संपदा. १

*

जोडोनीया दोन्ही कर

समर्पित शब्द फुले

स्वीकारावी शब्दार्चना

लाभू देत विश्व खुले. २

*

कुलगुरु कालिदास

काव्य शास्त्र अनुभूती

शब्द संपदा संस्कृत

अभिजात कलाकृती. ३

*

महाकवी कालिदास

काव्य कला अविष्कार

निसर्गाचे सहा  ऋतू

ऋतू संहार साकार.४

*

अलौकिक प्रेमकथा

मालविका अग्निमित्र

खंडकाव्य मेघदूत

सालंकृत शब्द चित्र. ५

*

शिव आणि पार्वतीची

कथा   कुमार संभव

अभिज्ञान शाकुंतल

प्रेमनाट्य शब्दोच्चय.६

*

राजा पुरूरवा आणि

नृत्यांगना  उर्वशीचे

अभिजात कथानक

निजरूप प्रतिभेचे. ७

*

मेघा बनवोनी दूत

यक्षराज आराधना

कालिदासे वर्णियेली

प्रेमसाक्षी संकल्पना. ८

*

अग्रगण्य  अभिव्यक्ती

कालिदास साहित्याची

शब्दोशब्दी सामावली

शब्द शक्ती सृजनाची. ९

*

चित्रकार, शिल्पकार

यांचे वंदनीय स्थान

साहित्यिक शिरोमणी

कालिदास दैवी  ज्ञान.१०

*

अशी प्रेरणा चेतना

व्यासंगात रूजलेली

कालिदासी साहित्यात

काव्यसृष्टी फुललेली. ११

☆

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares