मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दत्तावतार..…..☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ दत्तावतार.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

दत्तावतार..

श्री दत्तगुरु अवतारा,

हे त्रिगुणात्मक जग तारा!

अवतरला तुम्ही या जगती,

तारण्या दु:ख आपत्ती !

 

उत्पत्ती, स्थिती अन् लय हे

चक्र हो जाण जगताचे!

हे ब्रह्मा विष्णू महेश,

कर्ते अवघ्या लीलेचे!

 

सती अनुसयेचे सत्त्व

लागले येथ पणाला!

बालके होऊनी तान्ही

जागविले मातृत्वाला!

 

गौरव बहु या जगी झाला

अनसूया मातृपदाचा!

अवतार दिगंबर तो हा

तिज न्याय देई हा साचा!

 

© सौ. उज्वला सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 85 – हरवलेले माणूसपण ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 85 – हरवलेले माणूसपण ☆

समृध्दीने नटलेल घर पाहून हरवले देहभान ।

शोधून सापडेना कुठेही हरवलेले माणूसपण ।।धृ।।

 

कुत्र्या पासून सावध राहा भलीमोठी पाटी।

भारतीय स्वागताची आस  ठरली खोटी।

शहानिशा करून सारी आत घेई वॉचमन ।।१।।

 

झगमगाट पाहून सारा पडले मोठे कोडे ।

सोडायचे कुठे राव हे तुटलेले जोडे ।

ओशाळल्या मनाने कोपऱ्यात  ठेऊन ।।२।।

 

सोफा टीव्ही एसी सारा चकचकीतच मामला।

पाण्यासाठी जीव मात्र वाट पाहून दमला ।

नोकराने आणले पाणी भागली शेवटी तहान ।।३।।

 

भव्य प्रासादातील तीन जीव पाहून ।

श्रीमंतीच्या कोंदणाने गेलो पुरता हेलावून ।

चहावरच निघालो अखेर रामराम ठोकून।।४।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भगवद् गीता… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

? भगवत गीता ? सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

कृष्ण लाभला गुरुवर

शिष्य कौंतेय धनुर्धर ||

 

बोधी माधव अर्जुनासी

गीता लाभली जगताशी ||

 

गीता शिकवी ब्रह्मज्ञान

गीता जागवी आत्मभान ||

 

ज्ञान देतसे तत्त्वज्ञाचे

भान देतसे जगण्याचे ||

 

कैसे बोलावे विवेकाने

कैसे रहावे संक्षेपाने ||

 

कैसी असावी आत्मियता

कैसी असावी अलिप्तता ||

 

करू अभ्यास जीवेभावे

राहू सदैव प्रेमभावे || 

 

कर्म करावे इच्छेविना

जावे शरण दयाघना ||

 

धर्म असतो जिथे जिथे

लाभे विजय तिथे तिथे ||

 

सखा श्रीकृष्ण दयावान

देई कृपेचे वरदान ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 105 – वाट ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 105 – विजय साहित्य ?

☆ वाट  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

चंद्र लाजरा  पहा, काय काय बोलतो

मेघ कुंतलातूनी, शब्द शब्द डोलतो…  ||धृ.||

 

सांग तू मनातले, कोण आवडे तुला

छेड प्रीत मारवा, हास लाजऱ्या फुला

हात दे हातात तू, पाय वाट सोडतो… ||१||

 

दोन चंद्र भोवती, सांग कोण देखणा

एक सांगतो मना, प्रेम पुष्प वेचना

ये अशी समीप तू, भाव रंग वाचतो… ||२||

 

कला, कळा अंतरी, भावती तुला मला

शब्द श्वास जाहला, दाटला पुन्हा गळा

पौर्णिमा मनातली, प्रीत स्पर्श जाणतो..||३||

 

रात राणी सोबती,देई साक्ष चांदवा

भावना मनातल्या, प्रेम रंगी नांदवा

भेट तू पुन्हा पुन्हा, मीच वाट पाहतो..||४||

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बहुरूपी…. ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ बहुरूपी…. ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त :पादाकुलक)

शब्दचि वक्ता शब्द प्रवक्ता

जातिवंत हा श्रवणभक्तही

रसवंतीचे सुरम्य गुंजन

दिव्य सृष्टिचे भव्य दृश्यही !

 

काळोखाचा दर्दी वाचक

शब्द उपासक तेजाचाही

संधिप्रकाशी धूसर अंधुक

अनाम एका विश्वाचाही !

 

शब्द कधिकधी सुगम्य साधा

जसा जळावर तरंग वरवर

अतींद्रियाच्या अथांग डोही

ओढुन नेई कधी खोलवर !

 

शब्द सुगंधी फूल मुलायम

सृजनदूतही , प्रलयंकरही

प्राणामधल्या अंगारांवर

संततधारी करुणाघनही  !

 

अनुभूतीशी इमान निष्ठा

व्रत शब्दाचे हेच निरंतर

कधी परिमळे मातीतुनही

कवेत घेई कधी दिगंतर !

 

सतरंगी नभ शब्दप्रभूंचे

शब्द बहुरुपी त्यांच्यासंगे

सुखदुःखांचा करुणरम्य रे

उत्सव रंगे शब्दासंगे !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 91 – घुसमट…. ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

? साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #91 ?

☆ घुसमट…. ☆

दिवसभर टपरीवर

काम करून घरी गेल्यावर

पोराला कुशीत घ्यायचं असुनही…

कुशीत घेता येत नाही

कारण…

कपड्यांना येणाऱ्या तंबाखूच्या वासानं

पोरगं क्षणभरही

माझ्या कुशीत थांबत नाही

तेव्हा वाटतं..

खरडून काढावा हा तंबाखूचा वास

अगदी शरीराच्या कातड्यासकट

जोपर्यंत दिवसभर पानाला कात लावून

रंगलेले हात..

रक्ताने लाल होत नाही तोपर्यंत

कारण..

दिवसभर ज्याच्या साठी मी

जीवाच रान करून झटत असतो

तेच पोरग जेव्हा माझ्याकडे पाठ करून

आईच्या कुशीत शिरत

तेव्हा काळजातल्या वेदनांना अंतच

उरत नाही…

आणि काही केल्या

अंगाला येणारा तंबाखूचा वास काही जात नाही

तेव्हा कुठेतरी आपण करत

असलेल्या कामाचं वाईट वाटतं

वाटतं…!

सोडून द्यावं सारं काही

आणि

लेकराला बरं वाटेल

अंस एखादं काम बघावं

मग कळतं की

आपण करत असलेल हे

काम त्याच्या साठीच आहे

समज आल्यावर,

त्याला आपसूक सारं कळेल

आणि…

बापाच्या कुशीतला तंबाखूचा

वासही मग त्याला

अत्तरा सारखा वाटेल

शेवटी फक्त एवढच वाटतं

आपण करत असलेल काम

आपल्या पोरांन करू नये

त्याच्या लेकरांन तरी त्याच्याकडे

पाठ करून

आईच्या कुशीत झोपु नये…

 

© सुजित कदम

पत्ता.117,विठ्ठलवाडी जकात नाका 

सिंहिड रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झाली फुले कळ्यांची….. ☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ झाली फुले कळ्यांची….. ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

सहवास लाभला जो झाली फुले कळ्यांची

आठवता ते दिन फुलते कळी मनीची ….

 

मृदगंध होता प्यारा , श्वासात घे भरूनी

चाहूल लागत ती होती पहा दुरूनी

मन पक्षी धाव घेई …

          सळसळ हो कळीची …..

आठवता ते दिन ….

                      फुलते कळी मनीची ….

 

असती विभोर सारे ,मनमोर थुईथुई

स्वप्नात रंगलेले ,असतात सारे भोई

पर्वा नसे कुणाला….

          वाळूत तापल्याची

आठवता ते दिन …

                         फुलते कळी मनीची ….

 

वेडे असो दिवाणे ,दिन जाती ते सुखाने

दमदार त्या मनांच्या, दु:ख्खास ठोकरीने

तळव्यावरी ते फुलं…

                 निरखून पाहण्याची

आठवता ते दिन ….

                          फुलते कळी मनीची ….

 

कुपीत ठेवूनी ती ,स्वप्ने पहा शहाणी

रमतात जन सारे ,भूतकाळच्या दुकानी

सुखावे वर्तमान …

                  निरगाठ त्या सुखाची…

आठवता ते दिन …..

                      फु..ल..ते..कळी मनीची…

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

(९७६३६०५६४२)

svpawar6249@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 112 ☆ गज़ल ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 112 ?

☆ गज़ल ☆

मी कशासाठी लिहावे नेमका  अंदाज नाही

वाहवा नवखीच आहे तो तुझा आवाज नाही

 

बंड माझे कोंडले होते जरी मी अंतरी या

व्यक्त होण्या आज येथे कोणतीही लाज नाही

 

मी मला वाटेवरी या भेटले आहे नव्याने

पेटवा आता कितीही रान मी नाराज नाही

 

येत  आहे जाग  आता झोपले होते कधीची

सूर्य येथे कोणताही जाहला हमराज नाही

 

मैत्र त्यांचे दो घडीचे पाठ फिरली की कुटाळी 

बुडबुडे ते हो जरासे, सागराची गाज नाही 

 

मज न पर्वा लाभला नाही किनारा ओळखीचा

भीत होते काल मी, ते भय तुफानी  आज नाही

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ जिना…कवी वसंत बापट ☆ रसग्रहण.. श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? काव्यानंद ?

☆ जिना…कवी वसंत बापट ☆ रसग्रहण.. श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

जिना

कळले आता घराघरातून

नागमोडीचा जिना कशाला

एक लाडके नाव ठेवुनी

हळूच जवळी ओढायला

जिना असावा अरुंद थोडा

चढण असावी अंमळ अवघड

कळूनही नच जिथे कळावी

अंधारातील अधीर धडधड

मूक असाव्या सर्व पायऱ्या

कठडाही सोशिक असावा

अंगलगीच्या आधारास्तव

चुकून कोठे पाय फसावा

वळणावरती बळजोरीची

वसुली अपुली द्यावी घ्यावी

मात्र छतातच सोय पाहुनी

चुकचुकणारी पाल असावी

जिना असावा असाच अंधा

कधी न कळावी त्याला चोरी

जिना असावा मित्र इमानी

कधी न करावी चहाडखोरी

मी तर म्हणतो-स्वर्गाच्याही

सोपानाला वळण असावे

पृथ्वीवरल्या आठवणीनी

वळणावळणावरी हसावे

          – वसंत बापट

‘जिना’ या एका साध्या शब्दावरचे कवी वसंत बापट यांचे काव्य वाचताना कवी केशवसुत यांच्या,’ साध्याही विषयात आशय मोठा किती आढळे ‘ या ओळींची आठवण होते.एक मजल्यापेक्षा अधिक मजल्यांच्या घराने जिना निर्माण केला आणि तो कवितेचा विषय बनला.

ही कविता लिहिताना पहिल्याच कडव्यात कविने जिनाच्या बारशाची तयारी दाखवली आहे.आपल्या घरातल्या जिन्याला आपण आपलं आवडत नाव ठेवावं .त्या नावाचे स्मरण होताच जिन्यात जाऊन बसावयासाठीच  त्या नावाची गरज !प्रत्येक घराला जिना असावा असे कवीला वाटते. हा जिना नागमोडी वळणाचा असावा कारण असे वळण घेताना लहानपणापासून सर्वांना वेगळे वाटते. वळणातला वेगळेपणा वर्णन न करता येण्यासारखा असतो. जिना सावकाशपणे चढता यावा,जातायेता कुणीतरी धक्का द्यावा अशी ही कल्पना, जिना अरुंद असावा असा विचार करणाऱ्या कविच्या मनात असावी. तो थोडा अवघड असावा म्हणजे जिना चढताना बसता येते,जिन्याशी बोलता येते. जिन्यातला अंधारही कविला हवासा वाटतो.अंधारात धडपडत चालणे हे सर्व कविच्या मनाला गुदगुल्या, करणाऱ्या गोष्टी वाटतात.

कधी कधी कविता पायरीवर एकांतात बसून हितगुज करावेसे वाटणे कवीच्या,’ मुक्या पायऱ्या’ या शब्दातून व्यक्त होते.जिना चढताना पडणे,खरचटणे आपल्याला सहन करावे लागते पण लोकांचे हे वागणे  सोशिक जिना सहन करतो अशी कवी कल्पना आहे.जिन्याच्या वळणावळणाच्या जिन्यावर चालणारी गुप्त चर्चा, देवाण घेवाण, लाडिक बळजोरी बरोबर नाही असे वाटून जिन्यावरच्या छतावर आडोशाला बसलेली पाल चुकचुकत असावी,तिचे ते चुकचुकणेही गरजेची मानणारा कवि वळणाला  महत्त्व देतो. जिन्याला आंधळा म्हणतो.

 जिना प्रकारात कविला ‘ स्वर्ग सोपान’ अधिक आवडतो कारण स्वर्गात पटकन जाता येत नाही.कवितेच्या या विचारात कुंतीच्या गजगौरी व्रत उद्यापनासाठी स्वर्गातला हत्ती आणण्याकरिता अर्जुनाने तयार केलेल्या बाणांच्या जिन्याची आठवण होते

वसंत बापटांची अतिशय सुंदर अशी ही कविता आयुष्यातील चढ उतारांचे रूपक ठरावी अशी आहे.जिन्याचे वर्णन करताना कविनी वापरलेले शब्द आयुष्यात येणाऱ्या प्रसंगाशी तंतोतंत जुळणारे वाटतात.

आजच्या फ्लॅटसिस्टिमच्या जमान्यात लिफ्टचा वापर करणारे या कवितेतील शब्दानंदाना नक्कीच मुकतील.

आयुष्याचे चढउतार  समजण्यासाठी जिना हवा आणि तोही कवि श्री. वसंत बापट यानी आपल्या कवितेत रंगविल्याप्रमाणेच असावा.एक अप्रतिम कविता असे या कवितेचे वर्णन करता येईल.

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झटकून टाक जीवा.. ☆ महाकवी ग.दि. माडगूळकर ☆

स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

Best Bhojpuri Video Song - Residence w

जन्म – 1 ओक्टोबर 1919  मृत्यु – 14 डिसेंबर 1977 ☆

☆ कवितेचा उत्सव ☆ झटकून टाक जीवा.. ☆ महाकवी ग.दि. माडगूळकर ☆  

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा

फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा

 

होईल ताप काही मध्यान्हिच्या उन्हाचा

अविचार सोड असल्या कोल्हाळ कल्पनांचा

आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणांचा

 

पुष्पास वाटते का भय ऊन पावसाचे

आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे

हसुनी करी परि ते वर्षाव सौरभाचा

 

का कालचा उद्याला देसी उगा हवाला

द्यावाच वाटतो ना मग जीव दे जीवाला

अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा

 

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा…

 

गीतकार- महाकवी ग.दि. माडगूळकर

चित्र : साभार Gajanan Digambar Madgulkar – Wikipedia

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares