मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ विसर्जन (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ क्षण सृजनाचा ☆ विसर्जन (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

पुण्यातला सुप्रसिद्ध बाजीराव रोड … त्या रस्त्यावर असणारा तितकाच प्रसिद्ध शनिपार चौक.. चहूबाजूंनी सदैव गजबजलेला.. जीवनावश्यक सर्व चीजा सहजपणे उपलब्ध करून देणारे, या चौकात एकत्र येणारे चारही रस्ते… या चौकाच्या.. या बाजीराव रस्त्याच्या अगदी लागून असलेल्या ठिकाणी मी जन्मापासून पुढे ४६-४७ वर्षं राहिलेली आहे. आणि म्हणूनच या चौकाच्या चौफेर असणारे चार महत्वाचे गणेशोत्सव आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशीची मोठ्या उत्साहात वाजत गाजत जाणारी विसर्जन मिरवणूक म्हणजे माझ्या आयुष्याचा जणू एक अविर्भाज्य भागच…. उत्साह आणि आनंदाची …गणेशाच्या मंगलमय नेत्रसुखद दर्शनाची लयलूट करणाऱ्या या सगळ्या गोष्टी… जाण्याआधीच पुढच्या वर्षीच्या आगमनाची वाट पाहायला भाग पाडणारा हा उत्सव….

….. हो.. आठवतंय तेव्हापासून गेल्या काही वर्षांपर्यंत असंच तर होतं सगळं. फुले मंडईपासून विसर्जन मिरवणूक सुरु व्हायची. आणि त्यासाठी पुण्यातली सगळी सार्वजनिक मंडळे रांग लावून सज्ज असायची.

ढोल ताशे – त्याबरोबर शिस्तीने तालबद्ध.. लयबद्ध नाचत जाणारे त्या त्या मंडळाचे कार्यकर्ते – शांततेने.. स्वयंशिस्त पाळणारे बघे लोक…… आणि वेळेत सुरु होऊन वेळेत संपणारी प्रेक्षणीय मिरवणूक……

….. काही वर्षांनी कालानुरूप हे चित्र हळूहळू बदलत चालल्याचे कुठेतरी जाणवत होते हे नक्की.. शहराची लोकसंख्या सतत वाढत होती.. गणपती पहात हिंडण्याची वेळही वाढत होती. सजावटीचे नवनवे तंत्रज्ञान उपलब्ध होण्याचे प्रमाणही वेगाने वाढत होते.. तरीही त्यावेळचं एकूणच सामाजिक वातावरण सुसह्य होत होतं…….. पण आता गेल्या काही वर्षांपासून मात्र, प्रसन्नता.. मनापासूनचा भक्तिभाव.. आणि मनात साठवून ठेवावा असा आनंद देणाऱ्या या उत्सवाचे.. विशेषतः विसर्जन मिरवणुकीचे स्वरूप पूर्णपणे पालटल्याचे स्पष्टपणे अगदी दरवर्षी जाणवते आहे. डीजे.. त्यावर वाजणारी कानठळ्या बसवणारी कर्कश्श गाणी.. त्यावर बेधुंद होऊन विचित्र अंगविक्षेप करत भान हरपून नाचणारी तरुणाई … पाहतांना चक्कर यावी अशी विद्युत रोषणाई …. सगळे सगळे अगदी असह्य करणारे होत चालले होते.. नव्हे.. झालेच होते.

.. भर रस्त्यावर असणाऱ्या माझ्या घराच्या गॅलरीत एका वर्षी रात्री त्या मिरवणुकीसाठी चाललेला अनागोंदी गोंधळ बघत अगदी सुन्न होऊन उभी होते.. कारण घरात झोप लागणं केवळ अशक्य होतं. जिकडे तिकडे सगळा नुसता धुमाकूळ.. रस्ता दिसतच नव्हता.. दिसत होती फक्त डोकी.. आणि डोकी… आणि फक्त कलकलाट.. हा शब्दही खरं टोकदाच होता त्या डोकं बधीर करणाऱ्या गोंगाटासाठी. रस्त्याच्या कडेने दाटीवाटीने उभे असलेले खाद्यपदार्थांचे अगणित स्टॉल्स आणि त्याच्या कढयांवर मुद्दाम आपटल्या जाणाऱ्या झाऱ्यांचे जणू डोक्यात घाव घातल्यासारखे घणघणाट …. चणे-फुटाणे, कर्कश्श पिपाण्या, फुगे, आणि काय काय विकणाऱ्यांच्या गर्दीला मारलेल्या हाका….. किती आणि काय काय सांगावं …

….. मिरवणुकीसाठी नंबर लावून उभ्या असलेल्या एका ट्रकवर ठेवलेल्या गणपतीकडे मध्येच माझं लक्ष गेलं.. त्याच्याकडे पहात असतांना अचानक त्या विघ्नहर्त्या गणेशाचाच चेहेरा अगदी केविलवाणा.. रडवेला.. वैतागलेला दिसत असल्याचा मला भास व्हायला लागला…….. आणि मनात नकळत शब्द उमटू लागले……

नाद रंग अन उत्साहाचा उत्सव चाले चोहीकडे

परि या जल्लोषात हरवली उत्सवमूर्ती कुणीकडे ….

*

दहा दिवस त्या मांडवात बांधून घातले त्यालागी

आज पहा किती बरे वाटले.. घरी जाण्याची घाई उगी….

*

रात्रीपासून मोटारीवर बसवून त्याला ठेवियले

सहनशील हा गजानन परी, आसन ना त्याचे ढळले ….

*

सकाळपासून जल्लोषाला पूर पहा हो किती आला

वाजतगाजत सगळे जमले उधाण आले उत्साहाला ….

*

मोटारीवर मुकाट बसुनी गणपती सारे पहात होता

जाणवले त्यालाही होते, गर्दीतच तो चुकला होता ….

*

लेझीम ढोल नि टिपरीचा तो तालच गर्दीमध्ये हरवला

धांगडधिंगा किती चालला विसरलेच त्या गजाननाला ….

*

“ छंदच नीत मज सकल जनांना चकवत असतो नशीबरूपे

म्हणे आज मी स्वतःच चुकलो – चकविती ही माझीच रुपे ….

*

विचार करता करता थकुनी गजाननाचा लगे डोळा

दचके जेव्हा जागे होता.. दिसे तळपता सुवर्णगोळा ….

*

जाण्याचा की दिन पालटला, कसल्या भक्तांशी ही गाठ

जातो जातो म्हणतो तरीही सोडती ना ते त्याची वाट ….

*

आज विनवतो हा भक्तांना.. मायबाप जाऊ दे की मजला

दहा दिवस राहिलो ना गुपचुप.. नका धरू आता वेठीला ….

*

पुढच्या साली नक्की येईन.. म्हणे एक परि शर्त असे

नकोत लैला नकोत मजनू, सनई चौघडा पुरे असे ….

*

बिभत्स वर्तन कुठे नसावे.. मंगल वातावरण हवे

माझ्या नावे सर्वार्थाने जनजाग्रण व्हायाचि हवे ….

*

…. गजाननाचेही मन हाले या भक्तांचा निरोप घेता

जलमार्गे जाताजाता.. त्या पाण्यावर हलती लाटा ….

*

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जीव केवढा.. काम केवढे..? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जीव केवढा.. काम केवढे..? ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

वाहक युक्ती वाहन युक्तीला

पोलीसही करी सलाम

दोन चाकी इवल्या वाहना

लावलेस हे केवढे काम

*
जीव केवढा या वाहनाचा

त्यावर आरूढ कैक जणांचा

विचार करावा बसणारांनी

श्वास कोंडला असेल त्याचा

*
उतरा खाली सारे सत्वर

सत्कारच मी करतो तुमचा……

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ विसर्जन… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? विसर्जन…? श्री आशिष  बिवलकर ☆

विसर्जन करून आलो,

मखर भासते सुनेसुने |

उडाली रंगत सजावटीची,

भरलेले घर वाटे उणे उणे |

*
मन झाले अस्वस्थ,

चलबिचल झाली मनाची |

लक्ष पुन्हा जाई मखराकडे,

आठवण येते गणाची |

*
सजल्या मखरात,

उरला शंख आणि वाळू |

बाप्पा गेला गावाला,

कटू सत्य हे कसे टाळू |

*
नवा दिवस उजाडेल,

सुरु होईल राहटगाड |

घड्याळाचा काटा,

धावेल मागे जीवापाड |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मागणे श्री गजानना” ☆ श्री दयानंद घोटकर ☆

श्री दयानंद घोटकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मागणे श्री गजानना ☆ श्री दयानंद घोटकर

दयानिधी हे, सिद्धी वल्लभा

माय पिता तूच, गुरु सोयरा

शरण तुजला, श्री गणेशा

दे प्रज्ञा, कला हे चिन्मया….

*

देह बुद्धीचे, कर्म टळेना

विषय वासना, दूर हटेना

जीवनी, भ्रांती संपेना

दे ज्ञान, वैराग्य, भावना….

*

अहंकार, अभिमान दाटला

विश्वामाजी, कली मातला

यंत्र तंत्र, अतिरेक जाहला

सत्य संकल्प, नाही उरला

दे शांती समाधान, भक्ता….

*

प्रदूषणाचा, असुर मातला

शोक संताप, जगी वाढला

निस्वार्थ सेवा, कुठे दिसेना

अंगी देवत्वही, जाणवेना

दे सामर्थ्य, संयम, मानवा…

*

सकल दोष हे, नष्ट होऊ दे

धर्म, कर्म, संशोधन वाढू दे

मंगलनाम तव, मुखी असू दे

यश लाभू दे, अध्यापना…

© श्री दयानंद घोटकर (प्रेमकवी)

संपर्क – तावरे काॅलनी.सातारा रोड.पुणे

मो 9822207068

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – काय ते विरक्ती… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – काय ते विरक्ती… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

काय ते विरक्ती न कळेची आम्हां /

जाणों एक नामा विठोबाच्या//१//

*

नाचेन मी सुखें वैष्णवांचें मेळीं /

दिंडी टाळघोळीं आनंदें या //२//

*

शांति क्षमा दया ते मी काय जाणें /

विठ्ठलकीर्तनें वांचूनियां //३//

*

कसया एकांत सेवूं तया वना /

आनंदें या जनामाजी असो//४//

*

कासया उदास होऊं देहावरीं /

अमृतसागरीं डुबोनियां //५//

*

तुका म्हणे मज असे हा भरवसा/

विठ्ठल सरसा चालतसे//६//

– संत तुकाराम.

तुका म्हणे

तुकाराम महाराजांनी आत्मानुभवाने साधा सोपा भक्ती मार्ग स्वीकारला आहे. आणि तोच त्यांनी आपला जीवनक्रम ही मानला आहे. त्या मार्गाचे मोठेपण आणि सोपेपणा सांगताना ते म्हणतात.

विरक्ती म्हणजे नेमके काय हे आम्हाला माहीत नाही. आम्ही फक्त विठ्ठलाचे नाम जाणतो त्याचेच नाम संकीर्तन करतो. त्यांच्याच पायी लीन होतो. तेथेच आम्हाला जीवनाचे सारसर्वस्व भेटते. तेच आम्हाला सुखशांती मिळवून देते. म्हणूनच आम्ही टाळमृदंगाचा गजर करत वैष्णवाच्या मेळ्यात सहभागी होऊन आनंदाने नाचत भक्तीरसात न्हाऊन निघतो

दया, क्षमा, शांती हे सारे काही आम्ही विठ्ठलाच्या तन्मयतेने केलेल्या कीर्तनातूनच जाणतो. विठ्ठला शिवाय आम्ही काहीच जाणवत नाही. मग आम्ही जप तप साधना करण्यासाठी काय म्हणून वनवासात एकांतात राहून तपश्चर्या करावी. आम्ही जनसमुदायात मिसळताना आनंदी होतो. तेच आम्हाला फलदायी वाटते. हितकारक वाटते. परमार्थ, अध्यात्म, विरक्ती हे शब्द आम्हाला फारच बोजड वाटतात. त्यांचा अर्थ ही आम्हाला निपटणे कळत नाही. ते सारेच कठीण आहे. अवघड आहे. म्हणून त्या जंजाळात पडावेसेही वाटत नाही. देवाचे भक्तीभावाने नामस्मरण करा. आनंदाने नाचा. तुम्हाला सर्व काही तेथेच मिळेल. त्यासाठी वनात राहून तपश्चर्या करण्याची जरुरी नाही. विविध प्रकारची कर्मकांडे, यज्ञयाग वृतवैकल्ये करण्यात ही काही अर्थ नाही.

सर्वसामान्य माणसांच्या आनंदायी मेळ्यात राहूनच परमोच्च पारमार्थिक आनंद परम सुखाने लुटता येतो. भक्ती रसाने तुडूंब भरलेल्या अमृतसागरात डुंबत असताना परमेश्वरानेच दिलेल्या या देहाकडे मी उदास वाण्याच्या नजरेने मी का पाहावे आणि त्याला कशासाठी दंडीत करावे. लोकांच्यात सामील होऊन, त्यांच्यात मिळूनमिसळून विठ्ठलाचे नामस्मरण व नामसंकीर्तन करत रहाणे हाच परमार्थ करण्याचा अत्यंत सोपा पण अतिशय प्रभावी मार्ग आहे. तो मार्गच आपल्या मनोकामना पूर्ण करील. तोच आपल्याला सर्व काही शिकवील. म्हणूनच परमार्थ करताना विषेश आणि विशिष्ट कर्मकांडे करण्याची आवश्यकता नाही. भक्ती मार्ग इतका सहज आणि सोपा असताना तो अवघड आणि दुस्तर का करावयाचा.

रसास्वाद…

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ या अवघड वाटेवर… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? या अवघड वाटेवर…? श्री आशिष  बिवलकर ☆

 

डोईवर पाट धरला,

अंत:करण झाले जड |

वाट विसर्जनाची,

चालणे झाले अवघड |

*

भाव दाटले मनी,

नयनी अश्रू धारा |

आसवांनी भिजून माझा 

गेला देह सारा |

*

धीर देती मंडळी,

हात ठेवुनी पाठीवर |

सोबत त्यांची हवी वाटते 

या अवघड वाटेवर |

*

पार्थिव रुपी बाप्पाचे,

जरी आज विसर्जन |

भक्तीभावाने भरलेले,

असेल नित माझे मन |

*

निरोप देतो तुम्हा आता,

जुळले माझे दोन्ही कर |

आमंत्रण आम्हा सर्वांचे,

पुढल्या वर्षी या लवकर |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २६३ – निरोपारती ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २६  – विजय साहित्य ?

☆ निरोपारती…!

विसर्जनांती देव चाललें,

आता निजधामा

निरोपारती,स्विकारूनीया,

निरोप हा घ्यावा…|| धृ.||

*

उत्सव खासा, रजेमजेचा,

आहे वरदायी

परंपरेचा, कलागुणांचा,

ठेवा फलदायी

स्वागत झाले, गणरायाचे,

मोद घरी न्यावा…|| १.||

*

लाडू मोदक, शमी केवडा,

ताजी दुर्वादले

भाव भक्तीचे, कलागुणांचे,

केले रे सोहळे

यथामतीने,यथाशक्तिने,

पुजार्चंन देवा…|| २.||

*

रोज नव्याने,तुझी आरती,

श्रद्धा हृदयांत

गौरी पूजन, भव्य सोहळा,

उत्सव रंगात

आरासशोभा,विद्युतमाळा,

नेत्री दडवावा… || ३.||

*

पंचपक्वान्ने,फळाफुलांनी,

भरली रे ओटी

सुखकर्ता तू,ध्यास घराला,

कीर्ती तुझी मोठी.

सरीता आली,तुला न्यायला,

यावे गणराया…|| ४.||

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देव हृदयात आहे… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ देव हृदयात आहे… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

देव हृदयात आहे, वेड्या मना शोध, पाहे

देव मनात तनात नसानसात तो राहे..

देव हृदयात आहे…

*

श्वास चालतो चालतो, देव जाताच थांबतो

हृदयाचा एक ठोका देव आहे त्यात चोखा

देव अनंत अनंत देवा वाचून आहे काय?

देव हृदयात आहे..

*

देव श्रीमंतीचे वाण, देव शेतातले धान

बीज अंकुरत नाही नसे देव तया ठायी

देव म्हणजे चैतन्य देव जीवातला प्राण…

देव हृदयात आहे…

*

जीवाशिवाचे मिलन आहे विश्वाचे चलन

एकरूप एकप्राण माणसा तू जाण जाण

देव नाही अशी जागा मना शोघून तू पाहे..

देव हृदयात आहे..

*

देव विश्वाचे कोंदण दिले माणसा आंदण

देव बिल्लोरी आरसा त्यात तुमचाच ठसा

देव पहावा स्वत:त हृदयाच्या रांजणात

मनी आणता देवाने सारे विलयात जाये..

देव हृदयात आहे…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – svpawar6249@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कहाणी… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ कहाणी… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

राब राबतो तरीही

कष्ट येती न फळास

फळं. फुलं न लागते

स्वप्नामधल्या वेलीस

*

घेता साधेसेच दान

अशी टरकते झोळी

हाक सुदैवाची येता

चाल दुर्देव हे खेळी

*

जरी चालतो आजन्म

कसा सरे न प्रवास

हरवलेल्या सुखांचा

लागेच ना मागमूस

*

असे आयुष्य; त्याचीही

अशी अव्यक्त कहाणी

दिसू द्यायचे न परी

कधी डोळ्यांतले पाणी

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू आणि मी… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ तू आणि मी ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

तुझ्या माझ्या आठवणींची,

सत्तरीही उलटून गेली!

पाठच्या बहिणीसम सखे,

तुझी माझी जोडी राहिली! .. १

*

बालपणीची आपली सोबत,

एकमेकीच्या घरी असे!

साज शृंगार तुझा माझा,

सारखाच मनी वसे! .. २

*

एकीने घातली चार वेणी,

दुसरीलाही तशी हवी!

तर कधी लांब वेणीवरी,

रिबिनीची झूल हवी! .. ३

*

बालपणाने प्रवेश केला,

अलगदपणे तारुण्यात!

गोड गुपितांची लयलूट,

एकमेकींच्या कानात! .. ४

*

शैशवाचे दिवस संपले,

गेलो मांडवाच्या दारी!

ओढ आपली तरी न संपली,

होती अन् ती खरीखुरी! .. ५

*

मिळे अकल्पित वेळ कधी,

असे एकमेकीसाठी शकून!

सोडला ना एकही आपण,

भेटीचा तो असे सुकून! .. ६

*

आता उरलो एकमेकींचा,

विरंगुळा तो मनोमनी!

आयुष्याच्या उरल्या क्षणांची,

साथ मिळेल ही क्षणोक्षणी! . ७

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares