मराठी साहित्य – विविधा ☆ महावस्त्राचे पदर – भाग ४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

महावस्त्राचे पदर – भाग ४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

(नात्यांचं महावस्त्र : ‘आजी’ (संस्कारांची शिदोरी))

माझ्या कल्पनेतील आजी अशी आहे… 

मायेचे आगर, प्रेमाचा सागर,

ज्ञानाची घागर असे आजी!

आजीची पोतडी गोष्टींनी समृद्ध,

आजीचा बटवा औषधांनी…

 

 शुभ्र केसांचा मऊ अंबाडा, बोलणे तिचे प्राजक्ताचा सडा.

 दातांची जरी कवळी, मनाने सदा राही देवाजवळी.

 

सुरकुत्यांचे जाळे अंगावरी पण

बोलण्यातून फुलती हास्य लकेरी.

 

आईबाबा नसता, आजीचा फिरे हात,

प्रेमाची ती साथ सुरक्षेची!

 

आजीच्या हाताला चव फार,

दुधात साखर असे आजी!

 

आजी म्हणजे फक्त नाव नसतं

वर्तमानाला भूत आणि भविष्याशी जोडणारं एक गाव असतं.

आजची आजी त्या मानाने अधिक आधुनिक आणि आपले आरोग्य उत्तम राखणारी आहे पण तिच्या मनातील नातवंडांबद्दलचे प्रेम आणि सगळ्यांबद्दलची माया कायमच असते!

 ‘नात्यांचं महावस्त्र’ विणताना आईची ‘मायेची पैठणी’ आणि बाबांची ‘सह्याद्रीची ढाल’ आपण पाहिली. पण या वस्त्राला पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या संस्कृतीची, परंपरेची आणि बिनशर्त प्रेमाची जरतारी किनार देणारं एक अथांग नातं म्हणजेच ‘आजी’! आजी म्हणजे मूर्तिमंत माया आणि प्रेम! अनुभव आणि ज्ञान, प्रेम आणि शिस्त, अध्यात्म आणि व्यवहार या सगळ्या गुणांची अनोखी सांगड म्हणजे आजी.

खरं तर, आज्यासुद्धा दोन असतात—एक वडिलांची आई आणि दुसरी आईची आई (आजोळची आजी). या दोन्ही आज्यांची नावं जरी वेगवेगळी असली, तरी दोन्हीकडे मिळणारी मायेची ऊब मात्र एकच असते. एक आजी घरात राहून आपल्यावर रोज संस्कारांचे सिंचन करते, तर दुसरी आजोळची आजी सुट्ट्यांमध्ये लाड पुरवून बालपणात आनंदाचे रंग भरते. या दोन्ही आज्यांच्या छायेत वाढणारं मूल आयुष्याच्या बाजारात कधीच अपयशी ठरत नाही. खरं तर नातवंडांना दुधावरची साय म्हटलं जातं, पण अंगावर सुरकुत्या पडलेल्या आजीची माया या दुधावरच्या सायीसारखीच घट्ट आणि समृद्ध असते!

मला माझी आजी आठवते. तिच्याबद्दल या ठिकाणी थोडं सांगणं नक्कीच अनुचित होणार नाही. माझं बालपण एका अगदी छोट्याशा खेडेगावात गेलं. मी साधारण चौथीच्या वर्गात असेपर्यंत माझी आजी आमच्यासोबत होती; त्यामुळे मला ती अगदी स्पष्ट आठवते. आजी फारशी शिकलेली नव्हती, पण तिच्याजवळ पारंपरिक आणि अनुभवजन्य ज्ञानाचे अथांग भांडार होते. ती अतिशय प्रगत विचारांची होती, नवीन चांगल्या गोष्टींना तिचा कधीच विरोध नसायचा.

मी बाहेरून खेळून आलो की आजी मला आधी सक्तीने हातपाय धुवायला लावायची; त्याशिवाय पाणी पिण्यासाठी माठाकडे जाऊ देत नसायची. मला तर खेळून आल्यामुळे तीव्रतेने तहान लागलेली असायची, त्यामुळे त्यावेळी मला कधी कधी तिचा खूप राग यायचा. पण आज मोठं झाल्यावर, जगाचा अनुभव आल्यावर कळतं की तिचं ते सांगणं आरोग्याच्या दृष्टीने किती बरोबर होतं! कोरोनाच्या भीषण काळात तर आपण सर्वजण याच गोष्टीबाबत अगदी दक्ष राहायला लागलो होतो, जी शिस्त आजीने आपल्याला बालपणीच लावली होती.

लहनपणी आम्हाला ‘आजीचे घड्याळ’ या नावाची एक सुंदर कविता होती. माझी आजी अगदी तशीच होती! तिच्याजवळ घड्याळ नव्हतं, पण तिच्या सगळ्या गोष्टी अगदी वेळच्या वेळी व्हायच्या. सकाळी पहाटे लवकर उठून धार्मिक वाचन, जप या गोष्टी ती नित्यनेमाने करायची. संध्याकाळी मला देवाजवळ हक्काने बसवून ‘शुभंकरोती’ म्हणायला लावायची आणि देवादिकांच्या रंजक गोष्टी सांगायची. आजी म्हणजे संस्कारांची एक चालतीबोलती पाठशाळाच होती.

पूर्वीच्या काळी लग्न फार लवकर होत असत. माझी आई सांगते की, तिचं लग्न माझ्या मामांनी ती अवघ्या १४-१५ वर्षांची असतानाच करून दिलं होतं. तिचे आई-वडील ती लहान असतानाच वारले होते, त्यामुळे मामांनीच तिला मायेने वाढवलं. खरं तर तिचं ते वय शाळेत जाण्याचं आणि बागडण्याचं होतं; पण परिस्थितीमुळे तिला फार शिक्षण घेता आलं नाही. लग्न होऊन नवीन घरात आल्यावर तिला स्वयंपाक वगैरे गोष्टी फारशा येत नव्हत्या. पण माझी आजी, जी नात्याने तिची सासू होती, ती तिची खऱ्या अर्थाने ‘आई’ झाली! तिने माझ्या आईला अगदी पोटच्या मुलीसारखं मानून स्वयंपाकापासून प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी मायेने शिकवल्या. सासू-सुनेच्या नात्याला आई-मुलीचं रूप देणाऱ्या माझ्या अशा आजीचा मला खरोखरच सार्थ अभिमान वाटतो.

आई-बाबांचे जग हे सहसा शिस्तीचं, कर्तव्याचं आणि आजच्या काळात खरं तर खूप धावपळीचं असतं. अशा वेळी घरात आजी असणे म्हणजे दुधात साखर पडण्यासारखे आहे. आई-बाबा घरात नसले, तरी पाठीशी आजी असल्यामुळे त्यांना मुलांची अजिबात चिंता नसते. आई-बाबांच्या शिस्तीचा आणि ओरड्याचा उन्हाळा जेव्हा मुलांच्या वाटेला येतो, तेव्हा आजीच्या पदराची सावली हिमालयासारखी शीतल आणि उबदार ठरते. आईने रागवून हात उगारला की मुलं रडत जिथे जाऊन लपतात, ते जगातील सर्वात हक्काचं आणि सुरक्षित ठिकाण म्हणजे आजीची कुस!

आजीचे ते पिकलेले पांढरे शुभ्र केस हे केवळ वयाचे लक्षण नसते, तर त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या शेकडो उन्हाळ्या-पावसाळ्यांच्या समृद्ध अनुभवाचे ते संचित असते. म्हणूनच, जेव्हा घरावर किंवा प्रपंचावर एखादे संकट येते, तेव्हा आजीचा हा प्रदीर्घ अनुभव घरातील माणसांना संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य दिशा दाखवतो. आजीचा तो जुना लाकडी बटवा आजही अनेकांना आठवत असेल. त्यात केवळ खोबरेल तेल, सुंठ, वेखंड किंवा लवंग नसायची; तर बालपणातल्या प्रत्येक लहान-सहान आजारपणावर फुंकर घालणारा ‘मायेचा परिसस्पर्श’ असायचा. आजच्या ‘अलोपॅथी’च्या काळातही आजीच्या बटव्यातल्या काढ्याची जी चव आणि गुण होता, तो कोणत्याही महागड्या औषधात मिळू शकत नाही. आजकालच्या बऱ्याच नवीन लग्न झालेल्या आणि नुकत्याच माता बनलेल्या आधुनिक स्त्रियांना त्यांचं मूल रडू लागलं की त्या घाबरून जातात, अशा वेळी काय करावं हे त्यांना सुचत नाही. पण घरात जर सासूबाईंच्या रूपाने आजी हजर असेल, तर आजीकडे अशा प्रत्येक प्रसंगाचे हमखास आणि शांत करणारे उत्तर तयार असते.

आजी आणि नातवंडं यांच्यातलं सर्वात मोठं आणि सोनेरी माध्यम म्हणजे ‘गोष्टी’! आजीची ती जुनी पोतडी नेहमीच अद्भूत गोष्टींनी समृद्ध असायची. रात्रीच्या वेळी आजीच्या कुशीत शिरून चांदोबाच्या गोष्टी, परिकथा, इसापनीती किंवा रामायण-महाभारतातील पराक्रमाच्या कथा ऐकणे हा बालपणीचा सर्वात सुंदर महोत्सव असायचा. त्या गोष्टींमध्ये जो निखळ आनंद होता, तो आजच्या दूरचित्रवाणीवरील ‘कार्टून्स’मध्ये नक्कीच नाही. आजी केवळ गोष्टी सांगत नसायची, तर त्या गोष्टींच्या रंजक माध्यमातून ती मुलांच्या नकळत त्यांच्या कोऱ्या मनावर ‘नैतिकतेची’ आणि ‘संस्कारांची’ पेरणी करत असायची. तिने लावलेली ‘शुभंकरोती’ची आणि रामरक्षेची सवय मुलांच्या आयुष्याला अंतर्गत शुद्धता देऊन जाते आणि आयुष्यभर हे संस्काराचे देणे माणसाला सुखद जगण्यासाठी उपयोगी पडते.

पण कधी कधी मनात अशी शंका येते की, आपण भौतिक सोयी-सुविधा मिळवून खरंच प्रगती करत आहोत का? कारण आजी-आजोबांसारखे मायेचे वटवृक्ष आज घराघरातून नाहीसे होताना दिसत आहेत. आज एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, बदलत्या कौटुंबिक चौकटीमुळे हे चित्र तर खूपच बदलले आहे. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन ‘विभक्त कुटुंबे’ आली आणि शहरीकरणाच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये आजची लहान मुले आजीच्या या अथांग मायेला मुकत चालली आहेत.

आई-बाबा दोघेही नोकरीवर गेल्यावर मुले पाळणाघरात किंवा मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोके खुपसून बसलेली दिसतात. मोबाईलवरील ‘यूट्यूब’च्या स्क्रीनवर निर्जीव आवाजात गोष्टी ऐकणे आणि आजीच्या उबदार कुशीत तिच्या हृदयाची जिवंत धडधड ऐकत गोष्ट ऐकणे, यातील जमीन-अस्मानाचा फरक आजच्या डिजिटल पिढीला समजणार कसा?

आजच्या काळाची ही मोठी शोकांतिका आहे की, ज्या आजीच्या पंखांखाली संपूर्ण घर सुरक्षित राहायचे, ती आजी आज अनेक ठिकाणी वृद्धापकाळात एकाकी पडलेली दिसते. आयुष्याच्या या संध्याकाळी तिला पैशांपेक्षा आपल्या मुलांच्या आणि नातवंडांच्या दोन गोड शब्दांची, त्यांच्या वेळेची भूक असते. ज्याप्रमाणे वाळलेल्या पानांनी कधीकाळी आपल्याला रखरखत्या उन्हात मायेची सावली दिली होती, तसेच आजीच्या पिकलेल्या केसांचा आणि तिच्या सुकून गेलेल्या हातांचा आदरयुक्त सन्मान करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.

नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा आजी नावाचा पदर आपल्या संस्कृतीचे खरे वैभव आहे. ही आपली ठेवणीतली पैठणी आहे. ही मायेची सावली घरात जपणे आणि तिच्या अनुभवाचे गाठोडे पुढच्या पिढीकडे आदराने सुपूर्द करणे, हीच खऱ्या अर्थाने या महावस्त्राची वीण घट्ट करणे आहे. संस्कृती, संस्कार आणि प्रेम जपायचं असेल आणि ते पुढील पिढीकडे सुरक्षित सुपूर्द करायचं असेल, तर ‘आजी’ ही गोष्ट कुटुंबातून कधीही ‘माजी’ होता कामा नये! ही तुमची, आमची आणि या समाजाची संयुक्त जबाबदारी आहे.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “स्वयम्…” ☆ मोहिनी किंहिकर हेडावू ☆

मोहिनी किंहिकर हेडावू

??

☆ “स्वयम्…☆ मोहिनी किंहिकर हेडावू 

असते क्षितिजावर नजर..

पण मातीत पाय घट्ट रोवलेले…

स्वतःचा शोधता शोधता अवकाश…

जपत असते नाती हळूवार सावकाश..

मनात खोलवर जाणवत की आपल्यालाही जपावं… हळूवार पणे.. अलवार..

 

जगाच्या व्यवहारात गाडून घ्यायचे नाही…!

 

आणि मनातले अंकुरणे सोडायचे नाही…!

वाटतं दिमाखात.. डौलाव…

आत्मविश्वासाने…!

 

प्रेयस.. श्रेयस… निती.. अनिती…

च्या संघर्षापेक्षा…

मनातले संघर्ष कोलाहल जास्त करतात…

ते शांतपणे हाताळावे लागतात…

 

काही खोलवर गाडून जगावे..

आशेवर! इच्छेवर!! प्रार्थनेवर!!!

© मोहिनी किंहिकर हेडावू

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”Supporting Role..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “Supporting Role.. ☆ संध्या बेडेकर ☆

इतक्यातच गोवर्धन असरानी च्या निधनाची बातमी वाचली. आणि अनेक सिनेमे… त्यातील असरानी चा Supporting role आठवला.

 हम अंग्रेजोंके जमाने के जेलर है.

शोले तील हा डायलाॅग तर सर्वांच्याच लक्षात असेल.

मुख्य भूमिकेत नसले तरी Supporting role खूप महत्वाचा असतो. सिनेमातील मिर्च मसाला, खोडकरपणा, light कॉमेडी supporting role मुळेच असते. त्या भूमिकेशिवाय सिनेमा पूर्ण वाटत नाही. खूपदा तर मूख्य पात्राच्या भूमिकेला supporting actor मुळे रंग चढतो. त्याची भूमिका रंगते. सहज होते. नाट्य प्रभावशाली होत.

 काल आम्ही नाट्य अभिवाचनाची प्रॅक्टिस करत होतो. मुख्य कलाकारांचा रोल अर्थातच मोठा होता, परंतु वेळेवर, योग्य ठिकाणी, supporting कलाकारांनी दिलेल्या responses मुळे आमचा कार्यक्रम छान रंगला. प्रेक्षकांवर गोष्टचा प्रभाव पडला. आवडला सगळ्यांना. बक्षीस ही मिळाल.

आपल्या आयुष्यातही आजूबाजूला बघीतल तर सहायक भूमिकेत काम करणारे किती तरी जण असतात. त्यांच्या support शिवाय आपलंही रोजचे जीवन आयुष्य व्यवस्थीत चालू शकत नाही.

असरानीची बातमी ऐकून सहजच मनात हे विचार आले.

मी आणि ताईने हा सिनेमा दोनदा बघितला होता.

याच विचारात असताना ताई चा फोन आला.

म्हणाली… अग! वाचली का बातमी?

असरानी गेला बाई…

अग! Supporting role किती महत्वपूर्ण असतो. ते फक्त सिनेमातच नाही तर आपल्या आयुष्यात ही त्यांच महत्व असतच. नाही का?

आपल आयुष्य म्हणजे सिनेमाच नाही का ग?

अग! आता माझच बघ… माझ्या Real life picture मध्ये प्रसन्न साक्षी शिल्पा supporting role ची भूमिकाच तर करतायेत.

खरच रक्ताच काही नात नसताना आपल्या आयुष्यात किती माणसांची entry होत असते नाही.

मला थोड हसूच आल. गम्मतच वाटली

 ताईची… आता supporting role चे कौतुक करणारी,… हीच ती वर्ष भरापूर्वीची ताई आठवली. सर्व काम मीच करेन, असा हट्ट असणारी. कोणाचही न ऐकणारी…

 आयुष्याच्या प्रत्येक फेज मध्ये आयुष्य व्यवस्थीत चालू ठेवायला अनेक गोष्टींबरोबर adjustment करायच असत/ कराव लागत/करायला पाहिजे. Support घ्यावा लागतोच.

 आज ताई -भाऊजीं Super senior zone मध्ये आहेत. दोघेही छान राहतात. एकमेकांना सपोर्ट करतात. न चूकता औषध घेतल ना हे काळजीने विचारतात.

सांपत्तिक स्थिती चांगली म्हणजे 

खाऊन पिऊन सुखी आहेत. गाठीशी थोडा पैसाही आहे. दरमहा येणारी पेंशन म्हणजे तर महिन्याचा energy dose आहे. Life Line आहे.

मुलगा अमेरिकेत नोकरी करतोय. तेथील citizenship मिळाली आहे. आता त्याची मुल मोठी झाली आहेत. त्यामुळे कधी मुलगा, कधी सून मधून मधून येऊन जातात. आता ताई भाऊजीं मात्र जात नाहीत. एकतर लांबचा प्रवास, तेथे आजारी पडण खूप महागात पडत. आणि मुख्य म्हणजे तिथे करमत नाही.

इतक्यातच अनघा भारतात येऊन गेली. मागच्या वर्षी अजय आला होता. यावर्षी अनघा.

अजयने यावर्षी मुद्दामच अनघाला पाठवलं. आई बाबांचे काम जरा व्यवस्थित करून ये, हे सांगूनच पाठवलय.

 दोन तीन दिवस तिने ताई ची घरातील काम, इतर गोष्टी बघून घरातील system थोडी reconstruct- Reorganize Redesign केली…

ताईचे सकाळपासून दुपारपर्यंतची काम बघून, यावेळेस अनघा रागवलीच.

अहो आई! काय हे? मी करते, मी करेन हे अस किती दिवस करणार आहात तुम्ही?

आणि किती पैसे वाचवणार आहात?

खर सांगू आई.. तुमच्याकडून आता पहिल्यासारखी काम होत नाहिये. तुम्ही रागवू नका… पण हे बघा अनेक ठिकाणी dusting ची गरज आहे. खर तर deep cleaning ची गरज आहे. तुम्ही नेहमी म्हणता… तेवढाच शरीराचा व्यायाम होतो. पण घर काम करणे म्हणजे exercise नाही तो व्यायाम होत नाही, ते फक्त कामच असत.

अहो! फ्रिज केंव्हा स्वच्छ केलाय सांगा बर तुम्ही?

आता यावेळेस मी काही ऐकणार नाहीच.

अनघाने यावेळेस सर्व आपल्या ताब्यात घेतल.

भाऊजी म्हणाले… अनघा I am with you. मी सांगून सांगून थकलो.

अनघाने…

आधी स्वयंपाक घरातील जूना तवा, हॅन्डल नसलेल चहाचे भांड, प्लास्टिक च्या गाळण्या सर्व बदलल. किती तरी जून्या गोष्टी फेकायलाच हव्या होत्या.

एजेंसी मधून माणस बोलवून घराचे deep cleaning करून घेतले. अनेक उपयोगात नसलेल्या वस्तू, कपडे बाहेर टाकल्या. नवीन आणल्या.

मुख्य म्हणजे घरकामाला आता दोन मावशी येतात. स्वयंपाक करायला, भांडी फर्शी, डस्टिंग करायला येतात.

अनघाच ताई बरोबर च बोलण ऐकून तिसर्या व्यक्तीला… अनघा म्हणजे ताई ची सून नाही मुलगी आहे असच कोणालाही वाटेल..

सोसायटीच्या सेक्युरीटी गार्डचा मुलगा चांगला आहे पण नोकरी करत नाही. त्याला अनघाने बोलवून भाऊजींची महिन्याच्या कामांची लिस्ट सांगितली त्याबरोबरच वरची काम करायला सांगीतल. महिनाचे पैसे द्यायचे ठरले.

भाऊजी जरी on line काम करत असले तरी आता हाताशी प्रसन्न असतो. अगदी लिफाफे, पेंसील काहीही वस्तू आणायची असली, वरून सामान काढायचे किंवा ठेवायचे असले तरी प्रसन्न हाजिर असतो.

खरतर हे सर्व ताई स्वतःच करू शकली असती. पण अस न करण्यामागे काय कारण असतात माहित नाही.

पैसे खर्च करण खूप जणांना जमत नाही. या उलट काही घर मदतनीसांच्या भरवशावरच चालतात. ही दोन extreme टोक आहेत.

याचा मध्य पण असूच शकतो ना.

ताई सारखे वागण बरेच घरात दिसत.

त्यांना स्वतःच कौतुकही वाटत. शरीराला हालचाल नक्की पाहिजेच. पण त्यासाठी वयाच्या पंचाहत्तरीत झाडू फर्शी करण किती योग्य आहे?

 Active रहायला बाकी बर्‍याच गोष्टी आहेतच की.

आपल्या पिढीने खूप पैसा बघीतला नाही. हे खरय. पण छान आरामात रहायला खूप पैसा लागतही नाही. छान व्यवस्थित राहण ही आवड असायला हवी. आणि त्याप्रमाणे पैसा खर्च करावा. घरच्या स्त्रीने अगदी हक्काने त्यानुसार सर्व सोई करून घ्याव्या.

बरे असो…

 आज ताई डबल आनंदात आहे. एकतर सर्व छान व्यवस्थित झालेल बघून, तिला छान वाटतय. , दुसर सूनेनी केलय. तो आनंद वेगळाच असतो. त्या आनंदात वेगळ सूख, समाधान असत.

 आज अनघा आई बाबांना घेऊन बाजारात गेली. दोघांसाठी नवीन कपडे घेतले. आईंसाठी गाऊन घेतले. पायात अडकायला नको म्हणून लगेच टेलरकडून त्यांची उंची बरोबर करून घेतली.

घरातील repair work करून घेतले. बाबांबरोबर बॅंकेत जाऊन त्यांची सर्व काम केली.

पंधरा दिवसांच्या आपल्या भारत visit मध्ये अनघाने आई – बाबांच रोजच काम व्यवस्थित होईल याचा विचार करून सर्व काम केली.

आज ताईने विचारले… अग! अनघा तुझी खरदी केंव्हा करणार आहेस?

अनघा म्हणाली… यावेळेस मी माझ काहीच काम आणल नाहिये.

अनघाची सुट्टी संपत आली आहे.

तिला भेटायला म्हणून मी आज ताईकडे गेले. साक्षी अनघाला न्यायला म्हणून चकल्या तळत होती.

निघताना अनघाने आई- बबांना नमस्कार केला. दोघांचे हात हातात घेऊन म्हणाली…

आई- बाबा मजेत रहा. आता आपण परिस्थितीत बदल करू शकत नाही. आमचे येथे कायमचे येणे, किंवा तुमचे अमेरिकेत येणे दोन्ही शक्य नाही.

आम्हाला तुमची काळजी असते.

आई मजेत रहा. खूप फिरा, बाहेर जा. अस म्हणून अनघा आईंच्या गळ्यात पडून रडू लागली.

बरोबर आहे…

म्हणतात ना…

त्रास निवडायचा की आनंद?

निवड फक्त तुमची आहे.

स्वतःसाठी जगा.

स्वतःला निवडा 

आनंदाने पूढे चला…

स्वतः साठी वेळ द्या. ,

कारण आपण आहोत तर जग आहे.

हे जरी खर असल तरी 

आज दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट अनघाने शिकवली… ती म्हणजे… दुसर्यांसाठी पण वेळ द्या, कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही…

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शास्त्रस्तुती ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ शास्त्रस्तुती ☆ श्री दिवाकर बुरसे

 शास्त्रस्तुती

 – – – ज्ञान, अनुशासन आणि मुक्तीचा दिव्य प्रवास

शास्त्र म्हणजे काय?

शब्दाचा उगम आणि अर्थवैभव– – 

‘शास्त्र’ या शब्दात ‘शास’ हा मूळ धातू आहे. संस्कृत भाषेतील ‘शास’ धातूला ‘ष्ट्रन्’ प्रत्यय लावून ‘शास्त्र’ हा शब्द निर्माण झाला आहे. ‘शास’ या धातूचा अर्थ— उपदेश करणे, शासन करणे, अनुशासित करणे असा आहे.

म्हणूनच ‘शास्त्र’ म्हणजे—

जे मार्गदर्शन करते, अनुशासन घडवते आणि जीवनाला योग्य दिशा देते ते शास्त्र.

शास्त्राची तात्त्विक व्याख्या

भारतीय वैचारिक परंपरेनुसार शास्त्र म्हणजे केवळ संग्रहग्रंथ नव्हे; तर ते क्रमबद्ध, सुसूत्र आणि जीवनदर्शी ज्ञान आहे.

प्राचीन व्याख्या सांगते—

“शासनात् शंसनात् शास्त्रम्”

म्हणजे जे अनुशासन करते आणि ज्ञानाची ओळख करून देते ते शास्त्र. तसेच—

“शास्ति च त्रायते च शास्त्रम्”

म्हणजे जे योग्य-अयोग्याचा निर्णय शिकवते आणि अज्ञानापासून रक्षण करते ते शास्त्र.

शास्त्र : ज्ञानाचे संरचित रूप

कोणत्याही विषयाचे क्रमबद्ध, तर्कसुसंगत आणि अनुभवाधिष्ठित ज्ञान म्हणजे शास्त्र.

या अर्थाने शास्त्रे अनेक असली तरी भारतीय तत्त्वज्ञानात विशेष मान्यता असलेली षट्दर्शने अशी आहेत—

न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत (उपनिषदे)

यांखेरीज—

वेद, पुराणे, स्मृतिग्रंथ, तसेच अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र, नाट्यशास्त्र, छंदशास्त्र, आयुर्वेद इत्यादींचाही शास्त्रांत समावेश होतो; परंतु त्यांचे प्रामाण्य हे श्रुति आणि वेदांताधिष्ठित तत्त्वांवर आधारित असणे आवश्यक मानले गेले आहे.

शास्त्रांचे प्रामाण्य : अनुभव, तर्क आणि आचार

भारतीय तत्त्वज्ञानात शास्त्र हे आंधळ्या श्रद्धेचे नव्हे, तर प्रज्ञेच्या जागृतीचे साधन आहे.

शास्त्रांचा पाया उभा आहे—

श्रुति (अध्यात्मिक परंपरा)

युक्ति (तर्कबुद्धी)

अनुभूति (प्रत्यक्ष अनुभव)

शास्त्र सांगते, पण त्याची सत्यता आचरणातून अनुभवल्याखेरीज ज्ञान परिपूर्ण होत नाही.

म्हणूनच शास्त्र हे—

वाचनापुरते नसून, जीवन जगण्याची कला शिकवणारे मार्गदर्शक आहे.

शास्त्र आणि विवेकबुद्धी

शास्त्राचा खरा उद्देश मनुष्याला विचारस्वातंत्र्य आणि विवेक प्रदान करणे हा आहे, अंधानुकरण नव्हे.

ते शिकवते—

सत्य आणि असत्य यातील भेद.

नित्य आणि अनित्य यातील भेद

आत्मा आणि अनात्म याची ओळख

परंतु—

शास्त्राचा अभ्यास जर केवळ वादासाठी झाला, तर तो ज्ञान न राहता अहंकाराचे साधन बनतो.

म्हणूनच शास्त्राध्ययनासाठी आवश्यक आहेत—

विनय, श्रद्धा आणि चिंतनशीलता

शास्त्र आणि साधकाची भूमिका

नम्र विद्यार्थ्याने, ज्ञानेच्छु साधकाने आणि सूज्ञ व्यक्तीने शास्त्रांचा आदर करावा. त्यांचा सखोल अभ्यास करावा. उथळपणे त्यांना नाकारू नये. एखादा विचार पटला नाही तर

शास्त्राला दोष देण्यापूर्वी स्वतःच्या तर्काची चिकित्सा करावी.

बहुधा दोष आपल्याच आकलनात असतो, आणि सखोल विचारांती हे उमगते आणि मन नम्रतेने शास्त्रापुढे नतमस्तक होते.

कालपरत्वे शास्त्रांचे पुनर्वाचन

काळ बदलतो, परिस्थिती बदलते; परंतु शास्त्रातील मूलतत्त्वे शाश्वत असतात. त्यातील काही दृष्टांत, उदाहरणे, तपशील कालबाह्य होऊ शकतात; परंतु तत्त्वे मात्र चिरंतन सत्य असतात.

म्हणूनच प्रत्येक युगात शास्त्रांचे

नव्या दृष्टिकोनातून पुनर्वाचन आवश्यक ठरते.

शास्त्र : कुमार्गापासून सन्मार्गाकडे

थोडक्यात—

जे ज्ञान माणसाला कुमार्गापासून दूर नेऊन सन्मार्गावर आणते, त्याचे कल्याण करते—तेच शास्त्र.

शास्त्र हे—

जीवनाला दिशा देते

मनाला स्थैर्य देते

बुद्धीला स्पष्टता देते

समारोप : प्रकाशाचा अखंड स्रोत

शास्त्र म्हणजे केवळ अक्षरांचा संग्रह नाही; ते जीवनाचा दीपस्तंभ आहे.

शास्त्र —

अज्ञानातून ज्ञानाकडे नेते

अस्थिरतेतून स्थैर्याकडे नेते

मर्यादिततेतून अमर्यादतेकडे नेते

म्हणूनच—

शास्त्र हे नुसते वाचायचे नसते—ते जगायचे असते,

ते नुसते समजायचे नसते—ते आत्मसात करायचे असते.

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘तो एक धडा’ – लेखिका : ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

‘तो एक धडा’ – लेखिका : ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

ती फक्त दहा वर्षांची होती. स्मिथ फॅमिली मधे जन्मलेली एक लहान मुलगी! नाव होतं टिली स्मिथ!

इंग्लंडमधील सरे नावाच्या गावांत ती रहात होती.

टिली नेहमीप्रमाणे त्या दिवशी शाळेत गेली..

टिलीचे भूगोलाचे शिक्षक मिस्टर कार्नी वर्गात आले. भूगोलाचा तास सुरू झाला. सर सुनामी म्हणजे काय हे मुलांना शिकवत होते..

सरांनी १९४६ मध्ये हवाईला उद्ध्वस्त करणाऱ्या भयानक सुनामीचं कृष्णधवल फुटेज मुलांना दाखवलं..

सुनामी येण्यापूर्वी समुद्रात काय काय बदल दिसतात हे उलगडून सांगितलं…

समुद्र अनैसर्गिकरीत्या कसा मागे मागे जातो, त्याचं पाणी कसं फेसाळतं, आणि समुद्राचं वर्तन कसं विचित्र होत जातं हे सगळं सर उत्तम प्रकारे शिकवत होते..

आणि टिली जीवाचे कान करून ऐकत होती..

दोन आठवड्यांनी ख्रिसमसची सुट्टी सुरू झाली. टिली अतिशय आनंदात होती कारण तिचे आई बाबा तिला सुट्टीसाठी थायलंडला घेऊन गेले होते. हा तिचा पहिलाच परदेश प्रवास होता.

ते फुकेट मध्ये पोचले. फुकेट हे थायलंड देशाच्या दक्षिण भागातील एक अतिशय सुंदर आणि लोकप्रिय बेट आहे. तेथील पांढऱ्या वाळूचा समुद्रकिनारा आणि निसर्गरम्य अशा माई खाओ नावाच्या बीचवर ते पोचले..

साधारण शंभर लोकांना सामावून घेईल असा तो बीच होता व पूर्णपणे भरला होता..

हवा अतिशय छान होती..

पण टिलीला काहीतरी बरोबर नाही असं वाटू लागलं..

तिच्या लक्षात आलं..

समुद्राचं पाणी अजिबात शांत नव्हतं..

ते आत-बाहेर न करता फक्त आत आतच जात होतं..

समुद्र फेसाळला होता..

“बिअरवर जसा फेस येतो तसा समुद्र फेसाळला आहे.. ” ती आई बाबांना म्हणाली.. समुद्र अनैसर्गिकरीत्या मागे जाणं, फेसाळ पाणी, समुद्राचं विचित्र वर्तन सारं काही ती दोन आठवड्यांपूर्वीच भूगोलाच्या वर्गात नुकतीच शिकली होती..

“सुनामी येणार आहे…सुनामी येणार आहे” ती जोरजोरात ओरडू लागली..

पण तिच्या आई-बाबांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही कारण त्यांना समुद्रात एकही लाट दिसत नव्हती. आकाश स्वच्छ होतं. बीच शांत होता.

“मी जाणार आहे इथून.. सुनामी येतय.. ” टिली घाबरून गेली होती.

तिच्या कापऱ्या आवाजातील भीती तिच्या बाबांना जाणवली व त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवण्याचे ठरवले. शिवाय तिथे बीचवर एक जपानी माणूस उभा होता त्याने टिलीचे बोलणे ऐकलं. तो बाबांना म्हणाला, “तुमची मुलगी बरोबर सांगते आहे! सुमात्रामधे भूकंप झालाय ही बातमी मला नुकतीच मिळाली आहे! ”

टिलीच्या बाबांनी ते ज्या हॅाटेलमधे रहात होते त्या स्टाफला सुनामीबद्दल सांगितलं. त्यांनी लगेच बीच रिकामा करायला सुरुवात केली.

सारे बीचवरून बाहेर पडण्यासाठी धावू लागले..

आई, बाबा, टिली पण धावत होते..

टिलीची आई मागे पडली होती. पाणी तिच्या मागून प्रचंड वेगाने येऊ लागलं तेव्हा तिला पळू लागली.. आपण आता मरणार असं वाटत होते पण ती पळत राहिली..

नशीबानं ते त्या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचले.

आणि मग ती प्रचंड लाट आली…३० फूट उंच.

बीचवरील सारं काही.. खुर्च्या, नारळाची झाडं, कचरा.. सारं काही वाहून गेलं.

२६ डिसेंबर २००४ च्या सुनामी मध्ये १४ देशांतील २३०, ००० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले.

फुकेतच्या प्रत्येक बीचवर हजारो लोक मरण पावले.

पण

माई खाओ बीचवर एकही जीव गेला नाही…

कारण 

एका दहा वर्षांच्या मुलीने भूगोलाचा धडा वर्गात लक्ष देऊन ऐकला होता.

टिलीला “एंजेल ऑफ द बीच” म्हणून गौरवण्यात आलं. तिला मरीन सोसायटीचा थॉमस ग्रे स्पेशल अवॉर्ड, “चाइल्ड ऑफ द इयर” घोषित केलं. युनायटेड नेशन्स मध्ये तिचं भाषण ठेवलं गेलं.. आज टिली ३० वर्षांची आहे. ती लंडनमध्ये राहते आणि याट चार्टरिंगमध्ये काम करते.

ती आजही तिच्या भूगोलाच्या सरांचे आभार मानते. “मिस्टर कार्नी नसते तर मी आणि आई बाबा आज जिवंत नसतो. ”

दोन आठवडे..

एक धडा..

शंभर जीव..

हे वर्गात लक्ष देऊन ऐकण्यातलं सामर्थ्य आहे.. शिक्षणातील सामर्थ्य आहे..

शाळेतला एक साधा धडा..

जीवन आणि मृत्यू साठी कारणीभूत ठरला..

“वर्गात लक्ष दे” माझी आई मला रोज शाळेला जाताना सांगायची. वर्गात शिकवलेलं किती लक्षात आहे ते पण नेहमी विचारायची..

आपणही मुलाबाळांना “वर्गात लक्ष दे” सांगण्यास विसरू नका!

(सत्य घटना) 

लेखिका : ज्योती रानडे

सौजन्य : कथाविश्व – गोड कथांचे अनोखे विश्व (2026 Jyoti Ranade. All rights reserved.) 

प्रस्तुती – मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ भारतीय वैभव… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – वर्षा राजाध्यक्ष ☆

वर्षा राजाध्यक्ष

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ भारतीय वैभव…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष 

आपल्यातील बरेच मित्र परदेश वारी आणि तेथील कौतुक सांगतात.

अमेरिकेला भेट देत असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव आणि सल्ला:

प्रिय मित्रांनो,

गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही अमेरिकेतील सिएटल, वॉशिंग्टन येथे राहत आहोत. भारतातून निघताना माझ्या पत्नीला श्वसनाचा गंभीर त्रास होता. त्यामुळे तिच्या प्रकृतीचा विचार करून आम्ही भारतातून पुरेसा औषधसाठा सोबत आणला होता. अमेरिकेत ती औषधे घेतल्यानंतर तिची प्रकृती जवळजवळ पूर्णपणे सुधारली.

मात्र औषधे संपल्यावर मला काळजी वाटू लागली की प्रवासादरम्यान पुन्हा तिचा त्रास सुरू होऊ नये. म्हणून मी माझ्या मुलीला सिएटलमधील फुफ्फुसरोगतज्ज्ञ (Pulmonologist) यांची भेट ठरवण्यास सांगितले.

परंतु आम्हाला सांगण्यात आले की तज्ज्ञ डॉक्टरांना थेट भेटता येत नाही. आधी सामान्य वैद्यकीय तज्ज्ञ (General Physician) यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यासाठी एक आठवड्यानंतरची अपॉइंटमेंट मिळाली आणि तीदेखील फक्त व्हिडिओ कॉलद्वारे.

सुमारे १० मिनिटे डॉक्टरांशी संवाद झाला. भारतात पत्नी कोणती औषधे घेत होती, याची माहिती दिल्यानंतर त्यांनी ती समजून घेतली आणि आवश्यक औषधे लिहून दिली. ती औषधे जवळच्या औषधालयातून मिळतील, असे त्यांनी सांगितले.

मात्र औषधालयात गेल्यावर कळले की ती औषधे तात्काळ उपलब्ध नाहीत आणि ती यायला ४–५ दिवस लागतील.

शेवटी पाचव्या दिवशी औषधे मिळाली. विशेष म्हणजे ती औषधे ‘Cipla’ कंपनीची होती आणि त्यावर “Made in India” असे स्पष्ट लिहिलेले होते. अमेरिकेतील वैद्यकीय विम्यामुळे ५०% सवलत मिळाल्यानंतरही आम्हाला सुमारे ₹२१, ००० मोजावे लागले. म्हणजे भारतात सुमारे ₹२, ५०० किंमतीची औषधे अमेरिकेत जवळपास ₹४२, ००० इतकी महाग पडतात.

भारतात सहज उपलब्ध होणारी ही औषधे मिळवण्यासाठी आम्हाला अमेरिकेत तब्बल १२ दिवस वाट पाहावी लागली. त्यानंतर आठवडाभराने डॉक्टरांच्या सल्लामसलतीसाठी $283 (सुमारे ₹२३, ०००) चे बिलही आले.

निवृत्तीनंतर भारतात राहण्याचे भाग्य लाभले आहे, याची जाणीव ठेवा.

आपण अनेकदा “चांगल्या जीवनाच्या” शोधात परदेशाकडे पाहतो. पण जर शांतपणे विचार केला तर लंडन किंवा न्यूयॉर्कमधील अब्जाधीशांनाही सहज उपलब्ध नसलेल्या अनेक दैनंदिन सुविधा भारतातील मध्यमवर्गीयांना सहज मिळतात.

भारतातील सामान्य माणसाचेही जीवन “व्हीआयपी” का वाटते? — ७ उदाहरणे

१. स्वस्त आणि वेगवान इंटरनेट:

जगातील अनेक देशांमध्ये साध्या इंटरनेटसाठी दरमहा $50 (सुमारे ₹४, ०००) पेक्षा अधिक खर्च येतो. पण भारतात अवघ्या ₹३०० मध्ये हाय-स्पीड 5G डेटा उपलब्ध आहे. जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट सेवा भारतात आहे आणि त्यामुळेच डिजिटल क्रांती घडली.

२. १० मिनिटांत घरपोच डिलिव्हरी:

चहासाठी आले किंवा दूध संपले? Blinkit, Zepto किंवा Swiggy Instamart वर ऑर्डर करा आणि पाणी उकळण्याआधीच वस्तू घरी पोहोचते. युरोपमध्ये मात्र थंडीत चालत दुकानात जावे लागते आणि दुकान बंद असण्याची शक्यताही असते.

३. तत्काळ आरोग्यसेवा:

तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हवा असल्यास थेट रुग्णालयात जाता येते. रक्ततपासणीसाठी सकाळीच तंत्रज्ञ घरी येतो आणि दुपारपर्यंत अहवाल WhatsApp वर मिळतो. अनेक पाश्चिमात्य देशांप्रमाणे महिनोनमहिने प्रतीक्षा किंवा विम्याच्या मंजुरीसाठी धावपळ करावी लागत नाही.

४. मानवी मदतीची साखळी:

घरकाम, स्वयंपाक, वाहनचालक यांसाठी मदत मिळणे ही भारतात फक्त श्रीमंतांची मक्तेदारी नाही; मध्यमवर्गीय जीवनाचाही तो महत्त्वाचा भाग आहे. यामुळे सर्वात मौल्यवान गोष्ट मिळते—वेळ.

५. UPI क्रांती:

₹५ च्या चहापासून ₹५०, ००० च्या लॅपटॉपपर्यंत—फक्त QR कोड स्कॅन करून पैसे देता येतात. पाकीट बाळगण्याची गरज नाही, कार्ड मशीन बंद असल्याचे कारण नाही आणि व्यवहार शुल्कही नाही. या बाबतीत भारत जगाच्या खूप पुढे आहे.

६. छोट्या पण महत्त्वाच्या सुविधा:

रेस्टॉरंटमध्ये मोफत पिण्याचे पाणी मिळते. गल्लीतच इस्त्रीवाला किंवा चहावाला सहज सापडतो. अशा छोट्या गोष्टी आयुष्य अधिक सोपे आणि सुखकर बनवतात.

७. सामाजिक नाती – एक मजबूत सुरक्षा कवच:

आपली संस्कृती न्यायालयीन नोटिसांची नसून नातेसंबंधांची आहे. अडचण आल्यास शेजारी कोर्टात जाण्याऐवजी प्रेमाने खिचडी करून पाठवतात.

निष्कर्ष:

भारत हा केवळ एक देश नाही; तो असंख्य सोयी-सुविधांनी परिपूर्ण असा जीवनाचा अनुभव आहे. अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये लोकांना लॉन कापण्यापासून प्लंबिंगपर्यंत प्रत्येक काम स्वतः करावे लागते. भारतात मात्र सेवा-केंद्रित जीवनशैलीमुळे अनेक कामांसाठी सहज मदत उपलब्ध होते.

इथे आपण केवळ जगत नाही, तर आपल्या प्रत्येक गरजेची काळजी घेणारी एक व्यवस्था आपल्या भोवती असते. हेच “भारतीय वैभव” आहे—ज्याचा हेवा जगातील अनेक देशांना वाटतो.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: वर्षा राजाध्यक्ष

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सुपर वूमन सिंड्रोम” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? विविधा ?

☆ “सुपर वूमन सिंड्रोम…☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतीय समाजातील अनेक स्त्रियांमध्ये तथाकथित “सुपर वूमन सिंड्रोम” दिसून येतो, असे काही समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ मानतात. याचा अर्थ असा की, स्त्रीने एकाच वेळी आदर्श पत्नी, आदर्श सून, आदर्श आई, आदर्श कर्मचारी, आदर्श गृहिणी आणि परंपरेची कट्टर रक्षक अशा सर्व भूमिका निर्दोषपणे पार पाडल्याच पाहिजेत, अशी अपेक्षा ती स्वतःकडून आणि समाज तिच्याकडून ठेवतो. हा केवळ वैयक्तिक स्वभावाचा प्रश्न नसून सामाजिक संस्कार, लिंगाधारित अपेक्षा आणि सांस्कृतिक दबाव यांचा परिणाम असू शकतो.

पतीपरायणतेच्या संकल्पनेत वाढलेल्या अनेक स्त्रिया पतीची सेवा, उपवास-व्रते, धार्मिक विधी आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवणे हेच स्त्रीत्वाचे सर्वोच्च लक्षण आहे, असे मानतात. परिणामी, त्या स्वतःवर कामाचा, त्यागाचा आणि जबाबदाऱ्यांचा एवढा मोठा बोजा अंगावर घेतात की त्याला जणू ‘सुपर वूमन’ बनण्याची स्पर्धाच समजू लागते. घरातील प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ठेवण्याचा, प्रत्येक नाते जपण्याचा आणि प्रत्येक धार्मिक परंपरा पाळण्याचा भार त्या स्वतःच्या खांद्यावर घेतात. या नादात त्या स्वतःचे स्वत्व मात्र गमावून बसतात. स्वतःच्या इच्छा आकांक्षांना दडपून लोक काय म्हणतील किंवा लोकांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतील या आवास्तव इच्छेपोटी ‘सुपर वुमन’ होण्याचा प्रयत्न करतात.

याच मानसिकतेतून काही स्त्रिया संस्कृतीच्या रक्षणाची जबाबदारीही प्रामुख्याने स्वतःवर घेतात. कोणते व्रत करायचे, कोणता सण कसा साजरा करायचा, कोणते कपडे घालायचे, मुलांना कोणते संस्कार द्यायचे, कुटुंबाची परंपरा कशी टिकवायची या सर्व बाबींमध्ये त्या स्वतःला संस्कृतीच्या पहारेकरी समजू लागतात. प्रत्यक्षात संस्कृती ही स्त्री किंवा पुरुष अशा एकाच घटकाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक निर्मिती असते. तरीही इतिहासात स्त्रियांवरच संस्कृतीचे ओझे अधिक टाकले गेले आहे.

आजच्या काळात खरी गरज ‘सुपर वूमन’ किंवा ‘सुपर मॅन’ घडवण्याची नाही, तर समान जबाबदारी स्वीकारणारे, परस्पर आदर राखणारे आणि विवेकाने परंपरांचा विचार करणारे कुटुंब घडवण्याची आहे. संस्कृती टिकवायची असेल तर ती भीती, अपराधभाव किंवा एकाच लिंगाच्या त्यागावर नव्हे, तर समता, संवाद आणि मानवी मूल्यांवर टिकली पाहिजे. तेव्हाच संस्कृती जिवंत राहील; अन्यथा ती केवळ स्त्रियांसाठी कर्मकांडांचे ओझे बनून राहील

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी वारी ! माझा अनुभव !”- लेख क्र. ५ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. ५ ☆ श्री संभाजी बबन गायके 

देवाची गाडी!

 पंढरीची वारी म्हणजे पायी प्रवास हे समीकरण साहजिकच आहे. ज्या काळात वाहतुकीच्या सुविधा नव्हत्या त्या काळात वारकरी संपूर्ण प्रवास पायीच करीत असत. पण कालांतराने वारक-यांची संख्या वाढली, वाटेतील मुक्काम, भोजन व्यवस्था आपली आपण करण्याची गरज भासू लागली तसे सोबत वाहन ठेवणे आवश्यक झाले. त्यामुळे आरंभी पालखी सोहळ्यासोबत लोक बैलगाडी, टांगा अशी वाहने आणीत. या वाहनांमधून साहित्याची आणि गरज पडेल त्यानुसार माणसांची वाहतूक होऊ लागली.

पुढे मोठी स्वयंचलित वाहने उपलब्ध झाल्यावर उत्तम आर्थिक परिस्थिती असलेल्या दिंडीचालकांनी टेम्पो, ट्रक अशी वाहने सोबत घेण्यास सुरुवात केली. यात आरंभी trolly असलेला tractor फार लोकप्रिय आणि सोयीचा होता. अजूनही त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो.

या वाहनांमध्ये दिंडीला आवश्यक असणा-या सर्व साहित्याची वाहतूक करणे किफायतशीर ठरते. तंबू, स्वयंपाक, किराणा इत्यादी साहित्य, दिंडीत पायी चालणा-या वारक-यांच्या पिशव्या हे सर्व या वाहनांत ठेवले जाते. ही वाहने म्हणजे एकाअर्थाने दिंडीची कार्यालयेच ठरतात. ज्यांना पायी प्रवास झेपत नाही, किंवा प्रकृती खालावते असे वारकरी काहीवेळा या वाहनांतून वारीचा प्रवास करत असतात. वारीहून घरी परतण्यासाठी तर हमखास हीच वाहने वापरली जातात.

दानशूर लोक दिंडीसाठी स्वत:ची वाहने देऊ करतात. किंवा ही वाहने भाड्यानेही घेतली जातात. काही मालक, चालक केवळ इंधनखर्च, चालकाचे वेतन एवढा खर्च दिला तरी चालेल, अशा भावनेने वाहनसेवा रुजू करतात.

आज समजा पालखीचा मुक्काम सासवड येथे असेल तर दिंडीची ही वाहने पुण्यातून पालख्या निघण्याआधी निघून हडपसर येथील दुपारच्या भोजनाची जागा गाठतात. दुपारची जेवणे उरकली की, सोहळा निघण्यापूर्वी ही वाहने सासवडकडे रवाना केली जातात. वाहनांची संख्या आणि लोकांची संख्या जास्त झाल्याने बरेचदा रस्त्याच्या एका बाजूने दिंडी चाललेली आहे, आणि शेजारून दिंडीची वाहने चाललेली आहेत, असे दृश्य दिसते.

दुपारच्या भोजनाच्या ठिकाणी वाहनांतून आणलेल्या वस्तूंच्या साहाय्याने स्वयंपाक केला जातो. वाहने मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर तंबू ठोकले जातात. तंबूची जागा आधीच राखून ठेवलेली असते. त्यासाठी दिंडीचालक वारी आधी संबंधित व्यक्तींच्या, संस्थांच्या भेटी घेऊन व्यवस्था ठरवून घेतात. पंढरपुरात ब-याच गावांच्या, दिंड्या यांच्या स्वत:च्या मालकीच्या धर्मशाळा आहेत. पण इतर लोकांना मात्र मोकळ्या जागांत तंबू ठोकावे लागतात.

या वाहनांसोबत स्वयंपाकासाठी आचारी, त्यांचे साहाय्यक प्रवास करीत असतात. बहुतेक वेळा ही मंडळी अल्प मानधनावर आणि देवाची सेवा म्हणून हे काम करीत असतात. काही श्रीमंत दिंड्या स्वत:चे मोठे कामगार पथक सोबत घेऊन चालतात. यात वीज व्यवस्था, तंबू व्यवस्था, भोजन व्यवस्था त्यामानाने काहीशी वरच्या दर्जाची असते. काही ठिकाणी तर प्रत्येक तंबूमध्ये ट्यूब लाईटस, गाड्या, खुर्च्या आणि इतर वीजव्यवस्थाही करण्यात येते. अर्थात बहुतांश ठिकाणी वीज महामंडळाच्या तारांवर धातूच्या तारांचे आकडे टाकून वीज घेतली जाते… कारण तंबू माळावर, उघड्या जागी टाकलेले असतात. अशावेळी अधिकृतपणे वीज जोड घेता येणे शक्य नसते. अर्थात वाढत्या शहरीकरणामुळे हे प्रकार कमी झालेले आहेत. पूर्वी कंदिलाच्या उजेडात काम केले जाई. त्यामुळेच आजही दिंडी वाहनांच्या बाजूला कंदील दिसतात, पाण्याच्या बादल्या, तंबूचे साहित्य दिसते.

वारी काळात त्या त्या शहरांत gas cyllinders, रॉकेल, जळणासाठी लाकडे अशी व्यवस्था शासकीय पातळीवर माफक दरांत केली जाते. स्वयंसेवी संस्था सुद्धा अनेक सुविधा पुरवतात. हल्ली मोबाईल चार्जिंग व्यवस्थाही महत्त्वाची ठरलेली आहे.

वाहनांचे चालक, साहाय्यक सुद्धा या काळात वारक-यांच्या भूमिकेत दिसतात. हे लोक स्वयंपाक, दिंडीप्रवास यांत साहाय्य करताना दिसतात.

पालखी मार्गावर त्या त्या दिवशी केवळ दिंडीच्या वाहनांना प्रवेश दिला जातो. या वाहनांवर दिंडीचे फलक, पताका लावलेल्या दिसतात. हल्ली या वाहनांना टोल माफीही दिली जाते.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून पंढरपूरला पोहोचण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या (एस. टी.) बसेसशिवाय पर्याय नव्हता. इंग्रज काळात १९५९ मध्ये पुणे ते बार्शी अशी रेल्वे व्यवस्था निर्माण झाली. पुढे पुणे ते सोलापूर अशी रेल्वे १८६० मध्ये सुरु झाली. पण सोलापूरहून पंढरपूर तसे बरेच दूर आहे. त्यामुळे तिथून एस. टी. ने जाण्याशिवाय पर्याय नसे. पण दूर मराठवाड्यातील लोकांना पंढरीस येण्यासाठी रेल्वे उपलब्ध नव्हती.

एवरार्ड कॅलथोर्प नावाच्या हुशार, मेह्नती इंग्रज अधिका-याच्या अथक परिश्रमांतून बार्शी ते पंढरपूर अशी narrow guage अर्थात दोन रूळांमध्ये कमी अंतर असलेली रेल्वे सेवा सुरु होऊ शकली. मराठवाड्यातील प्रवाशांसाठी (बार्शी) मिरज ते लातूर असा मार्ग सुरु केला गेल्याने खूप भाविकांची सोय झाली. कुर्डूवाडीनंतर पुढे या गाडीसाठी पंढरपूर रेल्वे स्टेशनची उभारणी झाल्यावर या गाडीला देवाची गाडी हे नाव चिकटले. या गाडीत केवळ सामान्य बैठक व्यवस्था होती. तिकीटदर माफक होते. आणि वेग अतिशय कमी. म्हणजे गाडीतून उतरून जाऊन आपले एखादे छोटे काम उरकून थोडेफार पळत जाऊन ही गाडी पकडता येत असे. आणि लोकांना फार घाईसुद्धा नसे. वारकरी गाडीच्या डब्यातच भजनाचा फड उभारीत आणि संपूर्ण प्रवास नामस्मरणात पूर्ण होई. असो.

पंढरीला देहू-आळंदीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून पायी दिंड्या येत असतात. काही दिंड्या तर कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतूनही येतात. अर्थात या दिंड्यांसोबत चालणा-या लोकांची संख्याही कमी असते. सर्वच दिंड्यांना पोलिस बंदोबस्त देणे शक्य होणारे नसते. या दिंड्या महामार्ग, राज्य मार्ग इत्यादी रस्त्यांवरून प्रवास करीत असतात. बहुदा प्रवास पहाटे लवकर सुरु केला जातो, आणि काही वेळा रात्री उशीरा, अंधार पडेपर्यंत सुरु असतो. दिंडीसोबत चोपदार आणि शिपाई लोक चालत असतात, आणि हे लोक वाहतुकीपासून दिंडीचे संरक्षण करतात. पण अशा कमी संख्येन चालणा-या, अंधारात चालणा-या दिंड्यांमध्ये रस्त्यावरून धावणारी वाहने घुसून अपघात घडल्याची उदाहरणे बरीच आहेत. यात काही बळीही गेलेले आहेत. देहू, आळंदी, शेगाव, त्र्यंबकेश्वर, पैठण येथून येणा-या मोठ्या दिंड्यांच्या बाबतीत असे अपघात झाल्याचे फारसे प्रकार ऐकिवात नाहीत. कारण गर्दी पाहून वाहन चालक काळजीपूर्वक वाहने चालवतात, पोलिस बंदोबस्त असत, शिवाय दिंडी सोबतचे कार्यकर्ते, चोपदार, शिपाई शिस्त सांभाळत असतात.

दिंड्यांसोबत छोटे टेम्पो, मध्यम आकाराच्या ट्रक्स आणि काहीवेळा गरजेनुसार मोठे ट्रक्स असू शकतात. त्याच प्रमाणे शासकीय पाणी पुरवठा व्यवस्थेची वाहने, आरोग्य विभागाची वाहने, पोलिसांची वाहने, खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांची वाहने, हौशी प्रेक्षकांची वाहने असतात. शिवाय संबंधित मार्गांवर नेहमीची प्रवासी वाहतूक सुरूच असते. फक्त गरजेनुसार मार्गांचे नियोजन केले जाते.

पूर्वी ही वाहने रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण अधिक होते. वारीपूर्वी वाहनांची पूर्व तपासणी करून घेण्याची अट असल्याने आता हे प्रकार फारसे दिसत नाहीत. माल वाहतुकीच्या वाहनांतून प्रवासी वाहतूक करण्यास कायद्याने मज्जाव असला तरी मोठी संख्या, जनमताचा दबाव या काही कारणांमुळे प्रशासनाला या नियमाकडे डोळेझाक करावी लागते, हेही खरे आहे!

१३ जुलै, २०२६ रोजी सासवड ते जेजुरी मार्गावर एका दिंडीमध्ये ट्रक घुसून काही वारकरी मृत्युमुखी पडल्याची, जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर ट्रक हा त्या दिंडीचाच, त्यांच्या लोकांची, मालाची वाहतूक करणारा होता असे समजते. वाहनचालक वयस्कर असून, त्यांना अचानक प्रकृती खालावल्यामुळे वाहन नियंत्रणात ठेवता आले नाही, व सदर वाहन दुर्दैवाने पायी चालणा-या बिचा-या महिला वारक-यांना चिरडत पुढे गेले. त्यामुळे मोठी जीवितहानी झाली! ही परिस्थिती त्यावेळी तरी मानवी नियंत्रणात नव्हती, असे निदर्शनास आले आहे. या पुढील काळात चालकांची आरोग्य तपासणी आणि इतर सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा आहे! पूर्वी हत्ती दिंडीसोबत आणला जाई. पण त्यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर प्रतिबंध आणले गेले आहेत. दिंडीरथाला जोडलेले बैल, घोडे यांच्यामुळे सुद्धा काहीवेळा अपघात घडतात. पण हे प्रमाण अतिशय कमी आहे. दरवर्षी अनुभवातून सुधारणा केल्या जातात. अधिकृत दिंडीत चालणा-या वारकरी मंडळीची स्वयंशिस्त उत्तम असल्याने चेंगराचेंगरीचे प्रकार सहसा होत नाहीत. पण संख्याच मोठी असल्याने वारीचे नियोजन खूप अवघड बनले आहे. सोहळा ज्या ज्या जिल्ह्यांतून जातो, त्या त्या जिल्ह्यांतील पोलिसांकडे सोहळ्याला संरक्षण देण्याची जबाबदारी दिलेली असते. पोलिसांत महिला पोलिसांची संख्याही नजरेत भरण्यासारखी मोठी असून त्यामुळे महिला वारकरी, भाविक यांचे उत्तम संरक्षण होते. वारीत चोरांची संख्याही बरीच असते. पोलिसांमुळे यावर खूप नियंत्रण आलेले आहे.

सासवड-जेज्रुरी मार्गावर झालेल्या या दुर्दैवी अपघातात जीव गमवावा लागलेल्या वारकरी भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली! यापुढे अधिक काळजी घेतली जाईल, ही अपेक्षा! रामकृष्णहरी!

– लेख क्र. ५ 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दारातल्या गप्पा –  लेखिका : प्रार्थना देशमुख ☆ प्रस्तुती – सुनीला वैशंपायन ☆

सुनीला वैशंपायन 

??

☆ दारातल्या गप्पा –  लेखिका : प्रार्थना देशमुख ☆ प्रस्तुती – सुनीला वैशंपायन 

साध्या क्षणांत दडलेला आनंद आणि स्त्रीजीवनाचा एक सुंदर भाग!

आपल्या महाराष्ट्रात आणि एकूणच भारतीय संस्कृतीत एक अतिशय साधं पण तितकंच खास असं दृश्य आपण नेहमी पाहतो — घराच्या दारात, जिन्यावर किंवा गॅलरीत उभ्या राहून होणाऱ्या गप्पा… म्हणजेच ‘दारातल्या गप्पा’.

या गप्पांसाठी ना कोणतं निमंत्रण लागतं, ना खास वेळ ठरवावा लागतो. दोन ओळखीच्या स्त्रिया एकमेकींना दिसल्या की बस्स… गप्पांचा प्रवास सुरू होतो. आणि मग वेळ, काम, स्वयंपाक, बाजार… सगळं काही हळूहळू विसरायला लागतं.

“चल निघते आता…” — पण निघणं कधीच होत नाही!

दारातल्या गप्पांमधलं सर्वात प्रसिद्ध वाक्य म्हणजे —

“चल निघते आता गं…”

हे वाक्य साधारणपणे प्रत्येक 10-15 मिनिटांनी पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतं. पण गंमत अशी की, हे म्हणणारी व्यक्ती प्रत्यक्षात मात्र अजूनही दारातच उभी असते.

“घरात काम आहे गं…”

“स्वयंपाक ठेवला आहे…”

“नवरा येईल आता…”

असं सगळं बोललं जातं, पण तरीही पाय काही हलत नाहीत. कारण गप्पांमध्ये एक वेगळीच ओढ असते — जी माणसाला थांबवून ठेवते.

 

दारातल्या गप्पांचं एक छोटं पण रंगीत विश्व!

या गप्पांमध्ये विषयांची काहीच मर्यादा नसते. अगदी छोट्या गोष्टींपासून मोठ्या चर्चांपर्यंत सगळं काही इथे घडतं.

आजच्या स्वयंपाकाची चर्चा 

भाजी बाजारातले दर 

शेजारच्या घरातील घडामोडी

टीव्ही सिरियलमधले नवीन ट्विस्ट 

आणि कधी कधी जुन्या आठवणींच्या गोड गोष्टीही 

आणि सगळ्यात शेवटी एक ठरलेलं वाक्य —

“आपल्याला काय करायचंय लोकांचं! ” 

 

वेळ कसा जातो हेच कळत नाही…

या गप्पा सुरू झाल्या की वेळ थांबतो असं वाटतं. पाच मिनिटं म्हणून सुरू झालेली चर्चा कधी एक तास होते, हेच कळत नाही.

कुकरची शिट्टी विसरली जाते,

टीव्हीवरील आवडती मालिका चुकते,

कधी कधी फोनवर आलेले कॉलही दुर्लक्षित होतात…

आणि घरात वाट पाहणारे लोक मात्र म्हणत राहतात —

“आता नक्की येतील…” 

 

फक्त गप्पा नाहीत… हा एक मानसिक आधार आहे!

काही लोक याला फक्त वेळ घालवणं म्हणतील, पण खरं पाहिलं तर या गप्पा म्हणजे स्त्रियांसाठी एक छोटासा विराम असतो.

घरकाम, जबाबदाऱ्या, कुटुंब, नोकरी — या सगळ्यांच्या मधोमध स्वतःसाठी काढलेला हा थोडा वेळ म्हणजे मन हलकं करण्याचा एक सुंदर मार्ग असतो.

हसणं, बोलणं, मन मोकळं करणं — हे सगळं मानसिक ताण कमी करतं. आणि म्हणूनच या ‘दारातल्या गप्पा’ अनेकदा औषधासारख्या काम करतात.

– – नात्यांना जवळ आणणारा एक साधा सेतू

या गप्पांमुळे शेजारपाजारात प्रेम, ओळख आणि आपुलकी वाढते.

“ती शेजारीण” हळूहळू “माझी मैत्रीण” बनते.

आणि हेच छोटंसं नातं अनेकदा मोठ्या अडचणीच्या वेळी आधार देऊन जातं.

 

शेवटी इतकंच…

जीवनात मोठ्या गोष्टींपेक्षा छोट्या क्षणांतच खरा आनंद दडलेला असतो.

‘दारातल्या गप्पा’ हे त्याच छोट्या आनंदाचं एक सुंदर उदाहरण आहे.

म्हणूनच…

जर तुमच्या आजूबाजूलाही अशा गप्पांचा फड रंगत असेल, तर त्याकडे फक्त गंमत म्हणून नाही, तर जीवन जगण्याचा एक हलका, सुंदर आणि आनंदी क्षण म्हणून पाहा.

 

तुमच्याकडेही असा अनुभव आहे का? “चल निघते आता…” म्हणत किती वेळ गप्पा चालतात? नक्की कमेंट करा!

लेखिका : प्रार्थना देशमुख 

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग –३३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

गीतांजलीत प्रकट झालेले टागोरांचे मृत्यू विषयक विचार :-

गीतांजलीतील बहुतांश कवितांमध्ये टागोरांनी आपले मृत्यू विषयक विचार मांडलेले आहेत. ते मृत्यूचं स्वागत करतात आणि तेही अत्यंत संयतपणे व सौहार्दपूर्ण रितीने! मृत्यू अटळ आहे म्हणून तो आनंदाने स्वीकारायचा, असं नाही तर ती एक आनंददायक व हवीहवीशी वाटणारी घटना आहे असं त्यांना वाटतं व म्हणून ते मृत्यूची वाट बघतात. मृत्यू नंतर परमेश्वरासारखा जिवलग सखा भेटणार म्हणून ते आनंदित होतात. मृत्यू मधेच जीवनाची इतिकर्तव्यता आहे असं ते मानतात.

आत्म्याला सुखावणारी एकमेव गोष्ट म्हणजे मृत्यू! त्यानंतर ‘पुनरपि जननम् ‘ वाटणीला येईल की, मोक्ष मिळून परमेश्वरा बरोबर एकरूपता मिळेल हे टागोरांना महत्वाचे वाटत नाही. गीत क्र. ३४ मधे तर ते देवाला म्हणतात की, “मला मुक्ती नकोच कारण तुझ्यापासून वेगळा असेन तरच मी तुला डोळे भरून पाहू शकेन, तुझ्यावर भरभरून प्रेम करू शकेन. तुझी सेवा करण्याची संधी मला मिळेल. तू माझा आहेस हे मला सर्वांना अभिमानाने दाखविता येईल. “

पुनःपुन्हा मिळणाऱ्या जीवनासाठी टागोर कृतज्ञ आहेत. गीतांजलीतील अनेक कवितांमधून त्यांनी ‘जीवन मृत्यूच्या चक्रा’ विषयी भाष्य केलं आहे. ते म्हणतात, “जीवन व मृत्यू दोन्ही चिरंतन आहेत कारण जीवना नंतर मृत्यू आला तरी मृत्यूनंतर पुन्हा जीवन अटळ आहे. आणि जर मोक्षप्राप्ती झाली तर मृत्यूपश्चात मृत्यूचे भयच रहात नाही. ” 

एका गीतात (क्र. ९५) आईचं दूध पिणाऱ्या बालकाचे उदाहरण देऊन ते सांगतात की, “आई बाळाला उजव्या स्तनाकडून डाव्या स्तनाकडे नेते तेंव्हा ते बाळ रडू लागते. त्याला हे कळत नाही की, दुसऱ्या बाजूचे दूध त्याला मिळणारच आहे. तद्वतच माणसाला मृत्यूची भीती सतावत असते आणि मृत्यूनंतर पुन्हा जीवन मिळणारच आहे, हे तो विसरतो. “

मराठी संतांनी देवाच्या सहवासाची तुलना माहेरपणाशी केली आहे तर टागोर देवाच्या चिरंतन सहवासाची तुलना सासरी होणाऱ्या पतीच्या अखंड सहवासाशी करतात. एके ठिकाणी (गीत क्र. ९४) ते म्हणतात, “मृत्यूनंतर मी पतीगृही जाईन, तिथे ग्रह तारे माझं स्वागत करतील व पतीबरोबर एकांती भेट झाल्यानंतर, मीलन झाल्यानंतर माझं स्वतंत्र अस्तित्वच राहणार नाही. जीव शिव एकरूप होऊन जातील. “

एका कवितेत (९०) ते म्हणतात की, ” जर मृत्यू (यम) माझ्या दारात अतिथी म्हणून आला तर मी त्याला दार दडपून हाकलून देणार नाही तर त्याचं मी आदरातिथ्य करेन. माझ्या जवळच्या सर्व ऐहिक गोष्टी त्याला देईन व माझे प्राण त्याच्या स्वाधीन करीन. कारण आपल्याला सर्वात प्रिय असलेल्या गोष्टीचं दान देण्याची शिकवण मला माझ्या संस्कृतीने दिली आहे.

कधी ते देवाला आपला प्रियकर मानून (गीत क्र. ९१) त्याला सांगतात की, “तुझ्या भेटीची आस मनात बाळगूनच मी हे जीवन व्यतीत केलं आहे. तुझ्याकडे जाण्यासाठी मी इथले सगळे पाश हळूहळू तोडत आलो आहे. आता तुझी भेट हीच माझी अंतिम आस आहे. ते म्हणतात जीवनाचा संघर्ष आता मला निष्फळ वाटतो आहे. (गीत क्र. ९९) जीवनाच्या ऐलतीरावरून मृत्यूच्या पैलतीरापर्यंत ही आयुष्याची होडी वल्हवणं आता मला शक्य नाही. तेव्हा तूच मला आता पैलतीरावर घेऊन जा. अन्यथा मी हे सुकाणू सोडून देईन म्हणतो. “

एके ठिकाणी (गीत क्र. ९२) ते म्हणतात, “जीवन हे एक नाटक आहे. शेवटच्या अंकानंतर पडदा पडेल व मृत्यूनेच उजळलेलं तुझं अमर्त्य जग मला मिळेल. इथे कसलाही भेदभाव नाही, काळाचा अडसर नाही, उभ्या जन्माच्या देण्या घेण्याचा हिशेब, कामना, वासनांची लक्तरे या नश्वर जगातच टाकून देऊन तुझ्या अमर्त्य जगात मी प्रवेश करीन.

मित्र, आप्तेष्ट, सगेसोयरे सर्वांचा निरोप घेऊन (गीत क्र. ९३) ते आपल्या चुकांबद्दल क्षमा मागतात व या अंतिम प्रवासाला निघताना त्यांच्या प्रेमाची शिदोरी सोबत घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त करतात.

—–

गीत : ९७

WHEN my play was with thee I never questioned who thou wert. I knew nor shyness nor fear, my life was boisterous.

In the early morning thou wouldst call me from my sleep like my own comrade and lead 

me running from glade to glade.

On those days I never cared to know the meaning of songs thou sangest to me. Only 

my voice took up the tunes, and my heart danced in their cadence.

Now, when the playtime is over, what is this sudden sight that is come upon me? The 

world with eyes bent upon thy feet stands in awe with all its silent stars.

—–

 मराठी भावानुवाद : गीत : ९७

खेळगडी तू माझा

परि ठाऊक नसे

मज गांव तुझा,

नावही माहित नसे

तुझ्यासोबत परि

कसली भीती नसे

जीवन आनंदमय,

बुजरेपणा नसे

प्रभातीच तू यावे,

सोबत मज न्यावे

वनीरानी फिरवावे,

सुहृद सखा व्हावे

सोबतीने फिरतांना,

ऐकविसी मज गाना

अर्थ ठाऊक नसे मना

ऐकून त्या सूर ताना,

मनमोर नाचतांना

बाल्य सरे जेधवा

उमगे मज तेधवा,

नभ, धरा अन् तारे

आणि तसे जग सारे

नतमस्तक, आदरे

चरण तुझे स्पर्शत रे!

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

 गीत : ९८

 WILL deck thee with trophies, garlands of my defeat. It is never in my power to escape 

unconquered.

I surely know my pride will go to the wall, my life will burst its bonds in exceeding pain, and my empty heart will sob out in music like a hollow reed, and the stone will melt in tears.

I surely know the hundred petals of a lotus will not remain closed for ever and the secret recess of its honey will be bared.

From the blue sky an eye shall gaze upon me and summon me in silence. Nothing will 

be left for me, nothing whatever, and utter death shall I receive at thy feet.

—–

मराठी भावानुवाद : गीत : ९८

पराभूत मी असे जीवनी

अजिंक्य नसणे सत्य जाणुनि

आलो शरण पायी तुझ्या मी

स्वाभिमानास त्यागुनि॥

*
वेदनांचा विस्फोट होता

हुंदके मम हृदयी दाटता

वेळूही शोकात्म सूर दे

खडकालाही पाझर फुटता॥

*
एक आशा तेवतसे पण

मिटले कमल उमलेल तो क्षण

तुझ्या कृपेचा मधु मिळे मग

वाट पाहतो माझा कण कण॥

*

नील गगनातून कोणी

पाहतसे मज क्षणोक्षणी

पाठवील संदेश मूक तो

मुदित होईन मनोमनी॥

`*

मृत्यू विना नच कांही मागीन

अन्य कांही नकोच सांगीन

तुझिया पदांशी करित समर्पण

चिद्शांतीने तव मुख पाहीन॥

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

गीत : ९९

WHEN I give up the helm I know that the time has come for thee to take it. What there is to do will be instantly done. Vain is this struggle.

Then take away your hands and silently put up with your defeat, my heart, and think it your good fortune to sit perfectly still where you are placed.

These my lamps are blown out at every little puff of wind, and trying to light them I forget 

all else again and again.

But I shall be wise this time and wait in the dark, spreading my mat on the floor; and 

whenever it is thy pleasure, my lord, come silently and take thy seat here.

—–

मराठी भावानुवाद : गीत : ९९

जीवन नौका मी वल्हवितो

सोडून देईन सुकाणू म्हणतो 

*

संघर्षही आता वाटे निष्फळ 

दूर किनारा, तूच ने जवळ

*

नाही जर का हे तुज साध्य 

पराभव तुझा करी तू मान्य

*

शांत आणि मग तुझ्या मंदिरी

दगडी मूर्तीत रहा दगडापरी

*

विझवे दीपक, वार्‍याची फुंकर

पुनःपुन्हा मी लावी तो शुभंकर

*

कळले आता कशास लावू?

अंधारतचि पथारी पसरू

*

जेंव्हा तुजला वाटे येशील

मजपाशी अंधारी बसशील

– क्रमशः भाग ३३..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares