मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पर्यावरणाचे सदिच्छादूत : दिलीप आणि डॉ. सौ. पौर्णिमा कुलकर्णी- भाग – १ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

पर्यावरणाचे सदिच्छादूत : दिलीप आणि डॉ. सौ. पौर्णिमा कुलकर्णी– भाग – १ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

तुम्हाला का जगायचं हे जर कळले तर कसे जगायचं या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळत जाते. आणि जीवनाचं हे ध्येय ज्याला कळलं तो आपलं जीवन समृद्ध तर करतोच, पण इतरांचंही जीवन समृद्ध करण्यासाठी हातभार लावतो. अशाच एका ऋषितुल्य दाम्पत्याचा परिचय आज आपल्याला करून द्यायचा ठरवला आहे. त्यांचं नाव आहे दिलीप कुलकर्णी आणि डॉ सौ पौर्णिमा कुलकर्णी. एकमेकांना सर्वच बाबतीत अनुरूप आणि साथ देणारी ही जोडी. हे दोघंही पर्यावरणाचे सदिच्छा दूत आहेत असं म्हटलं तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे दिलीपदादा आणि पौर्णिमाताई. या दोघांची यु ट्यूबवरील वेध या सदरात डॉ आनंद नाडकर्णी यांनी घेतलेली मुलाखत मी पाहिली आणि त्यांची जीवनशैली, साधेपणा पाहून मी आश्चर्यचकित झालो. मग मी आंतरजालावरून आणखी माहिती घेतली. तीच साररूपाने तुमच्यापुढे ठेवतो आहे.

दिलीप कुलकर्णी म्हणजे एक मनमोकळा माणूस चेहऱ्यावर हास्य. मुक्तपणे वाढेल तशी वाढू दिलेली दाढी. अंगावर इस्तरी न केलेले परंतु स्वच्छ असे सुती कपडे. तेवढेच साधं स्वच्छ आणि पारदर्शक असं हे व्यक्तिमत्व? आधी ते पुण्यात टेल्कोमध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की आपण ही नोकरी फार काळ करू शकत नाही कारण आपण जीवन जगण्यासाठी जी तत्त्वं मनाशी ठरवली आहेत, ती यामुळे साध्य करता येणार नाही. सुखवस्तू आणि आरामदायी जीवनशैली प्रदान करणाऱ्या नोकरीमुळे येणारा सुखवस्तूपणा त्यांनी येऊ दिला नाही. किंबहुना तसे जगणे त्यांना मान्यच नव्हते. म्हणून त्यांनी उत्तम पगार आणि प्रतिष्ठा देणारी ही नोकरी सोडली आणि कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद केंद्राशी स्वतःला जोडून घेतलं. काही वर्षे हे काम त्यांनी केलं. त्याबरोबरच ग्राहक चळवळ, ग्रामायन यासाठी काम करायला सुरुवात केली. काही काळ ‘ विवेक विचार ‘ या नियतकालिकाचं संपादन केलं. याच काळात त्यांची पौर्णिमाताईंशी ओळख झाली. पौर्णिमाताई या आयुर्वेदाच्या पदवीधर. दोघांचेही विचार आयुर्वेदाला आणि पर्यावरणाला पूरक असे होते. दोघांचे सूर जुळले आणि दोघांनी लग्न करून एकत्र आपल्या ध्येयासाठी कार्य करायचे ठरवले.

पौर्णिमाताईंच्या संसाराच्या कल्पना चारचौघींपेक्षा वेगळ्या होत्या. गाडी, बंगला, साड्या, दागिने या गोष्टीत त्यांचं मन रमणे शक्यच नव्हते. कमीतकमी गरजा ठेवणे, उपभोगाच्या वस्तूंवर नियंत्रण आणणे, ऊर्जेचा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा कमीतकमी वापर करणे ही तत्वे त्यांनी मनाशी ठरवली होती.

१९९३ मध्ये दिलीपदादा आणि पौर्णिमाताई आपल्या मुलासह कोकणातील पंचनदी या गावी राहायला आले. त्या ठिकाणी त्यांच्या काही मित्रांनी एक प्रकल्प सुरु केला होता. दिलीपजींनी चार वर्षे त्या प्रकल्पाचे काम पाहिले. पण पुढे काही कारणामुळे तो प्रकल्प बंद पडला. त्यानंतर या दोघांनी १९९७ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या कुडावळे या गावी जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी १० गुंठे जमीन भाडेकराराने घेतली. दिलीपदादा, पौर्णिमाताई यांचा संसार या ठिकाणी सुरु झाला. दिलीपदादा आणि पौर्णिमाताई हे दोघंही खरे समाजशिक्षक. त्यांचं वाचन, चिंतन सतत सुरूच होतं. त्यातून त्यांच्या पर्यावरणविषयक जाणिवा अधिकाधिक समृद्ध होत होत्या. त्यातून जे विचारमंथन झालं त्यावरून दिलीपदादा आणि पौर्णिमाताई या निर्णयाला आले की लोकांना केवळ सल्ला देण्यापेक्षा आपण स्वतःच अशी पर्यावरणपूरक जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करू या.

स्वतः पौर्णिमाताई या आयुर्वेदाच्या पदवीधर असल्याने आयुर्वेदिक औषधे, जीवनशैली त्यांना उत्तम प्रकारे परिचित होती. पण त्यांच्या असे लक्षात आले की लोकांना केवळ औषधे सांगण्यापेक्षा त्यांची जीवनशैली जर आयुर्वेदाच्या तत्वांशी मिळतीजुळती असेल तर त्याचा जास्त चांगला उपयोग होईल. त्यांना हेही लक्षात आलं की पर्यावरणस्नेही जीवनशैली आणि आयुर्वेदाची तत्वे यात कुठेही विसंवाद नाही. ते परस्पर पूरक आहेत. त्यामुळे आधी तसे वागून दाखवायचे आणि मगच लोकांना काही सांगायचे असे दोघांनी ठरवले.

कुडावळे ठिकाणी दिलीपजींनी त्यांना हवे तसं घर बांधलं. त्यांना पर्यावरणपूरक असं मातीचच घर हवे होतं. तस त्यांनी बांधून घेतलं. जमिनीचा तळही मातीचाच. ही जमीन शेणाने सारवायची. थोडी शेती, थोडं बागकाम करायचं असा त्यांचा दिनक्रम सुरु झाला. छोट्याशा कौलारू घरात शांत, सुखी आणि समाधानी जीवन जगण्याचा आनंद ते घेतात. पण केवळ शेती, बागकाम यातच त्यांना अडकून पडायचं नव्हतं. ‘ आधी केले मग सांगितले ‘ या उक्तीचा प्रत्यय या दोघांनी लोकांना आणून दिला. त्यांनी प्रबोधनात्मक लेखनाला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहणाऱ्या लोकांच्या नजरा कौतुकात बदलायला सुरुवात झाली. त्यांना व्याख्यानांची निमंत्रणे यायला लागली.

त्यातूनही त्यांना जनजागृतीचा एक मार्ग गवसला. हे सगळं सुरु असताना त्यांनी ‘ गतिमान संतुलन ‘ हे मासिक सुरु केलं. त्याशिवाय हसरे पर्यावरण, दैनंदिन पर्यावरण, निसर्गायण, विकसित भारत, बदलू या जीवनशैली, अणू विवेक, सम्यक विकास, बसू चरित्र, अहेड टू नेचर, वेगळ्या विकासाचे वाटाडे आदी पुस्तके लिहिली. याच कालावधीत त्यांना ‘ निसर्गायण ‘ शिबिराची कल्पना सुचली. पर्यावरणविषयक गोष्टी जाणून घेण्याची ज्यांना उत्सुकता आहे, ज्यांना पर्यावरणासाठी काहीतरी करावेसे वाटते अशांसाठी त्यांनी निवासी आणि अनिवासी शिबिरे सुरु केली.

दिलीपदादा आणि पौर्णिमाताई यांना असा प्रश्न जेव्हा विचारण्यात येतो की तुम्ही अशा प्रकारची जीवनशैली जगण्यासाठी मोठी किंमत मोजत आहात का? तेव्हा ते म्हणतात, ‘ किंमत तर शहरी लोकांना मोजावी लागते. ट्रॅफिक जाम, प्रदूषण, निरनिराळे आजार या रूपाने शहरी लोक ही किंमत मोजतात. आजकाल आपण खूप उपभोगवादी झालो आहोत. उपभोगामुळे अधिकाधिक वस्तूंची हाव वाढत जाते. त्यामुळे उत्पादन वाढवावे लागते. उत्पादन वाढले म्हणजे विकास झाला असे आपण समजतो. पण हा विकास पर्यावरणाची म्हणजे बाह्य आणि आपली आंतरिक हानी करतो. अधिक उत्पादन यावे म्हणून रासायनिक खते, कीटकनाशके आपण वापरतो. यामुळे जमिनीची आणि पर्यावरणाची हानी तर होतेच पण अन्नधान्य, फळे, भाजीपाला, पाणी इ. च्या माध्यमातून हे घातक पदार्थ आपल्या शरीरात जातात. त्यातून अनेक नवनवीन आजारांना आमंत्रण मिळते.

मग सगळ्यांनी त्यांच्यासारखं शहर सोडून खेड्यात राहायला जावं का? याचं उत्तर त्यांच्या दृष्टीनं ‘ नाही ‘ असं आहे. आपण शहरात राहूनही पर्यावरणस्नेही जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्या गरजा आणि उपभोगवादी प्रवृत्ती आपल्याला कमी आली पाहिजे. प्लास्टिक, कागद इ सारख्या वस्तूंचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे. पाणी जपून वापरले पाहिजे.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मोक्ष…  भाग – १ ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ मोक्ष…  भाग – १ ☆ विभावरी कुलकर्णी ☆

ओतूरच्या कपर्दिकेश्वराची भावयात्रा – – 

माणसाचा स्वभाव मोठा गमतीशीर असतो. कुणी जर म्हणाले, “चला, आज मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे, ” की माणसे अगदी मनापासून सावरून बसतात, कान टवकारतात आणि उत्सुक्तेने ऐकू लागतात. पण तेच जर कुणी म्हटले, “आज आपण जरा ज्ञान-माहिती किंवा एखादे तात्विक भाषण ऐकूया, ” की लगेच लोकांचा धीर सुटतो. पूर्वीच्या काळी अशा वेळी लोक सतरंजीचे दोरे काढत बसत असत. पण आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात सतरंजीच्या दोऱ्यांची जागा आपल्या हातातील मोबाईलच्या अंगठ्याने घेतली आहे. माहिती किंवा भाषण सुरू झाले की, अंगठा भरकन वर सरकतो आणि स्क्रीन स्क्रोल (Scroll) होते! म्हणूनच, हे कोणते शुष्क भाषण नाही; तर ही एका साध्या, निखळ आणि गमतीशीर भावयात्रेची रंजक कथा आहे.

आषाढ संपून जेव्हा श्रावण महिना सुरू होतो, तेव्हा निसर्गासोबतच माणसाचे मनही एका वेगळ्याच मांगल्याने न्हाऊन निघते. श्रावण म्हणजे सण, उत्सव, व्रतवैकल्ये आणि उपवास यांची एक अखंड पर्वणीच! मंदिरातून येणारा घंटानाद, धूपाचा सुगंध आणि वातावरणात असणारा एक सात्विक गारवा मनात वेगळाच उत्साह भरतो. त्यातही ‘श्रावणी सोमवार’ या दिवसाचे महत्त्व तर काही वेगळेच! वर्षभरात इतर वेळी फारसा देवधर्म न करणारी माणसेही श्रावणी सोमवारी आवर्जून उपवास करतात आणि महादेवाच्या दर्शनाला जातात.

आता हे सगळे वाचून तुम्हाला वाटले असेल, की मी नेहमीप्रमाणे श्रावण महिन्याचे अथवा महादेवाचे मोठे कौतुक सांगत बसणार आहे की काय? पण तसे अजिबात नाही हो! श्रावणाचे महत्त्व तर आपल्या सर्वांना बालपणापासून माहीतच आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात तर गावोगावी, डोंगरदऱ्यांत शंकराची अथांग मंदिरे पसरलेली आहेत.

माझेही अगदी तसेच होते. दरवर्षी श्रावण महिना जवळ आला, की माझ्या आतला भाविक जागा व्हायचा. मग चालू व्हायची शोधमोहीम! ‘या श्रावणात नक्की कोणत्या शिवमंदिरात दर्शनाला जायचे? ‘ मग तशाच देवाची आवड असणाऱ्या मैत्रिणींना फोन करणे, प्लॅन आखणे हे माझे ठरलेले गणित.

मागच्या वर्षी असाच श्रावण महिना उजाडला आणि मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये चर्चा सुरू झाली. अनेक मंदिरांची नावे समोर आली, पण शेवटी ओतूर येथील ‘कपर्दिकेश्वर’ मंदिरावर शिक्कामोर्तब झाले. ओतूरच्या कपर्दिकेश्वराचे वेगळेपण मी अगदी लहानपणापासून ऐकून होते. अगदी लहान असताना घरातील मोठ्या माणसांसोबत तिथे गेले होते, पण बालवयात घेतलेले ते दर्शन काळाच्या ओघात विस्मृतीत जमा झाले होते. म्हणूनच या श्रावणी सोमवारी कपर्दिकेश्वराच्याच दरबारी जायचे, असा पक्का बेत आखला गेला.

ज्या ठिकाणी आपण जातो, त्या जागेची थोडीफार पार्श्वभूमी आणि इतिहास आपल्याला माहीत असावा, हा माझा जुना नियम. म्हणून मी नेहमीप्रमाणे आपल्या ज्ञानी ‘गुगल बाबांना’ शरण गेले. गुगल बाबांनीही एका क्लिकवर कपर्दिकेश्वराचा सविस्तर आणि सचित्र इतिहास माझ्यासमोर उघडून ठेवला. ते वाचून मी अगदी अचंबित झाले!

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक पुरातन शिवमंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरे तर शेकडो वर्षांची जुनी आहेत. पुणे शहराच्या उत्तरेला असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील ओतूर नावाच्या शांत शहरामध्ये, मांडवी नदीच्या सुंदर तीरावर हे ‘कपर्दिकेश्वर मंदिर’ वसलेले आहे. या मंदिराला तब्बल ९०० वर्षांचा प्रदीर्घ आणि पावन इतिहास आहे! दरवर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी महादेवाचा मोठा उत्सव आणि भव्य यात्रा भरते.

पण या मंदिराचे सर्वात मोठे आश्चर्य आणि प्रमुख आकर्षण म्हणजे ‘तांदळापासून बनवलेली आणि एका लिंबावरती उभी असणारी शिवलिंगाची पिंडी! ‘

हो, अगदी बरोबर ऐकलेत तुम्ही! कोरड्या तांदळाचे दाणे जोडून बनवलेली ही अत्यंत नाजूक आणि अद्भुत पिंडी एका छोट्याशा लिंबावर संतुलित (Balance) करून उभी केली जाते. हे नयनरम्य रूप पाहण्यासाठी आणि महादेवाच्या कृपेचा वर्षाव अनुभवण्यासाठी प्रत्येक श्रावणी सोमवारी तिथे तब्बल एक लाखाहून अधिक भाविक हजेरी लावतात. यात्रेनिमित्त मंदिराच्या परिसरात कुस्त्यांचे भव्य फड रंगतात.

तसेच, या मंदिराला आणखी एक महान आध्यात्मिक परिमाण लाभले आहे. मंदिराच्या अगदी शेजारीच संत तुकाराम महाराजांचे गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराज यांचे संजीवन समाधी मंदिर आहे. महाराष्ट्रातील प्रमुख तीन संजीवन समाधींपैकी ही एक मानली जाते. विशेष म्हणजे, ज्या मंत्राने संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायात दुमदुमून जातो, त्या ‘राम कृष्ण हरी‘ या जगप्रसिद्ध महामंत्राचे उगमस्थानही हेच पावन क्षेत्र आहे!

मंदिराचा अलौकिक इतिहास आणि नामकरण

गुगल बाबांनी मंदिराच्या स्थापनेची ही कथा अत्यंत रंजकपणे सांगितली होती. सन १२०० च्या शतकात श्री बाबाजी चैतन्य महाराज मांडवी नदीच्या तीरावर एकाग्र चित्ताने अनुष्ठानाला बसले होते. अनुष्ठान करत असताना त्यांनी भक्तीभावाने नदीकाठच्या वाळूचे एक शिवलिंग तयार केले. वाळूचे शिवलिंग बनवत असताना, त्या वाळूमध्ये महाराजांना अचानक एक छोटीशी ‘कवडी’ सापडली. आश्चर्य म्हणजे, जेव्हा त्यांनी ती कवडी निरखून पाहिली, तेव्हा त्या चिमुकल्या कवडीच्या पोटात त्यांना नैसर्गिक शिवलिंग आढळून आले!

संस्कृत भाषेमध्ये ‘कवडी’ला ‘कपर्दीक’ असे म्हटले जाते. याच कवडीत सापडलेल्या शिवलिंगावरून या मंदिराचे नाव ‘कपर्दिकेश्वर’ असे पडले. पुढे सन १२-१३ व्या शतकात या शिवलिंगाची रीतसर भव्य मंदिरामध्ये स्थापना करण्यात आली.

मंदिराचे भौगोलिक स्थान तर अप्रतिम आहे. चंद्राकार वळण घेणाऱ्या मांडवी नदीच्या तीरावर, हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत हे पुरातन, भव्य दगडी मंदिर दिमाखाने उभे आहे. शिवलिंगाच्या स्थापनेच्या काळापासूनच येथील पुजाऱ्यांनी एक अनोखी परंपरा सुरू केली. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर कोरड्या तांदळाची भव्य पिंडी बांधायची आणि ती एका लिंबावर तोलून धरायची! शतके उलटली, पिढ्या बदलल्या, पण ही तांदळाच्या पिंडीची अद्भुत परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि निष्ठेने सुरू आहे.

या मंदिरात वर्षभर अनेक सण उत्साहात साजरे होतात:

१. पवित्र श्रावण महिन्यातील सर्व सोमवार

२. महाशिवरात्रीचा उत्सव

३. त्रिपुरारी पौर्णिमा

४. बाबाजी चैतन्य महाराजांचा पावन समाधी सोहळा

ही सर्व माहिती वाचल्यानंतर माझ्या मनातील ओतूरला जाण्याची उत्कंठा हजार पटीने वाढली होती.

माझा असा वैयक्तिक विचार आहे, की ज्या ठिकाणी आपण दर्शनाला किंवा फिरायला जाणार असू, त्याची माहिती आधीच मिळवावी; आणि तिथे जाऊन आल्यावर मिळालेला आनंद आणि अनुभव इतरांना सांगावा.

त्यानुसार, ठरलेल्या श्रावणी सोमवारी आम्ही सर्व मैत्रिणी भल्या पहाटेच गाडी काढून ओतूरच्या दिशेने निघालो. मनात कपर्दिकेश्वराच्या दर्शनाची तीव्र ओढ होती, तांदळाची ती अद्भुत पिंडी डोळ्यांत साठवून घ्यायची होती आणि लहानपणी पाहिलेली ती जत्रा पुन्हा एकदा अनुभवायची होती. गाडीत जाताना आम्ही आपापसात गप्पा मारत होतो “आपण पहाटेच निघालोय, म्हणजे सकाळी लवकर पोहोचू. फार गर्दी नसेल. तासभरात दर्शन आटोपले की मग आजूबाजूला अजून कुठे कुठे फिरता येईल? ” आम्ही तर दुपारच्या नंतरचा प्लॅनही गाडीतच आखून टाकला होता.

पण आमचा खरा हेतू त्या ‘मोक्षदात्या’ कपर्दिकेश्वराचे दर्शन घेणे हाच होता.

सकाळी सकाळी आम्ही ओतूर येथे पोहोचलो. पण तिथे पोहोचताच आमचा पहिला अंदाज चुकला! मंदिराच्या २ किलोमीटर आधीच भव्य गाडी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. पुढे गाड्या नेण्यास सक्त मनाई होती. गाडी पार्क करून आम्ही बाहेर आलो, तर समोर अथांग जनसागर पसरला होता! पार्किंगपासून मंदिरापर्यंतचा तो २ किलोमीटरचा रस्ता म्हणजे एक भलीमोठी आणि रंगीबेरंगी जत्रा होती.

त्या जत्रेतील दुकाने पाहून कोणत्याही स्त्रीचे मन भुलून जावे, असा तो नजराणा होता! निरनिराळी चमकणारी ज्वेलरी, काचेच्या आणि धातूच्या बांगड्या, स्वयंपाकघरासाठी लागणारी नवनवीन भांडी, नक्षीदार पिशव्या, हेअर पिन्स, रंगीबेरंगी क्लिप्स… अगदी काय बघू आणि काय नको, अशी आमची अवस्था झाली होती. सोबतच विविध खाद्यपदार्थांचे आणि मिठाईचे खमंग स्टॉल्स सुटलेल्या वासाने आमची परीक्षा घेत होते.

पण आम्ही अगदी निग्रहाने, मनावर दगड ठेवून त्या सगळ्या मोहाकडे दुर्लक्ष केले. गर्दी इतकी अलोट होती, की एकमेकींचा हात सुटण्याची भीती होती. म्हणून आम्ही एकमेकींचे हात घट्ट धरून चालत होतो. मैत्रिणी एकमेकींना समजावत होत्या, “आधी दर्शन घेऊया. मग येताना निवांत खरेदी करू! ” कारण पुढे काय वाढून ठेवले आहे, याची आम्हा कोणालाच कल्पना नव्हती.

— क्रमशः भाग पहिला 

©  विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मनाच्या नजरेने प्रेम” – लेखक : मधुकिशोर ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मनाच्या नजरेने प्रेम” – लेखक : मधुकिशोर ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

कुणीतरी आपल्यावर प्रेम करावं…

कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं..

कधीतरी तू किती सुरेख आहेस असं म्हणावं..

यासाठी किती किती आटापिटा करायचा..

 

एक कळलंय मला आताशा..

हे सगळं करणं व्यर्थ आहे..

या सगळ्यासाठी तुम्ही काहीही करायची

गरजच नसते..

 ज्यांचे तुमच्यावर खरेखुरे प्रेम आहे..

ते तुमचे लखलखीत अंतःकरण जाणतात..

तुम्हाला बदलायच्या भानगडीत ते पडत नाहीत.. ते तुम्हाला आहे तसे स्वीकारतात..

 

तुमच्या आत खोलखोल दडलेलं प्रेम त्यांना जाणवतं..

तुमचे चांगले गुण त्यांना समजतात..

त्यांच्या बरोबर राहून तुम्ही आनंदी बनता, खूश रहाता..

आजूबाजुची भौतिक परिस्थिती कशी आहे हे त्यांच्यासह असताना गौण ठरतं..

 

आपल्यातल्या काही त्रुटी असू द्याव्यात तशाच..

आपल्यावर मनाच्या नजरेने कोण प्रेम करतंय ते कळण्यासाठीच..

* * * *

लेखक- मधुकिशोर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ज्ञान… ☆ दीप्ती कोंदड कुलकर्णी ☆

दीप्ती कोंदड कुलकर्णी

? विविधा ?

☆ ज्ञान… ☆ दीप्ती कोंदड कुलकर्णी 

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते? खरोखर, ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीही नाही. ज्ञानाच्या शाखा अमर्याद आहेत. ज्ञान लिपीतून, चित्रातून, लिखित स्वरूपात किंवा अगदी मौखिक स्वरूपात सुद्धा दिले जाते. पूर्वीची सर्व ग्रंथसंपदा संस्कृत भाषेत आहे. कारण संस्कृत ही प्राचीन भाषा आहे. लॅटिन सुद्धा पुरातन भाषा आहे. आपले धर्मग्रंथ संस्कृत भाषेत आहेत तसेच प्राकृत भाषेतही आहेत. अलीकडे मात्र इंग्रजी (आंग्ल) भाषेला “Window of the World” म्हणतात. म्हणजे जगातील कोणत्याही देशाशी संवाद साधताना इंग्रजी भाषेचा सर्रास उपयोग केला जातो. आपण अनेक भाषांतून विविध देशातील ज्ञानाचा प्रसार होत असलेला पाहतो. इतिहास, भूगोल, कृषी, क्रीडा, उद्योग, वाणिज्य, वैद्यकशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कुंभारकला, चित्रकला, युद्धकला, शस्त्रनिर्मिती, वस्त्रविणणे, नाट्यशास्त्र, छायाचित्रण, इ. अनेक विषयांचे ज्ञान घ्यायचे म्हटले तर आपला जन्म अपुरा पडेल इतके ज्ञानाचे साठे अमर्याद आहेत.

पूर्वी मौखिक परंपरेनुसार गुरूकडून शिष्य ते पुढील पिढीपर्यंत असे ज्ञान पठण करून पोहोचवित. भूर्जपत्रावर लेखन करणे सुरू झाल्यानंतर ग्रंथनिर्मितीस प्रारंभ झाला. या लेखनानंतर मोडी लिपी किंवा पुढे मोडीचा वापर सुरू झाला. पूर्वी गुरूपदावर विराजमान झालेली व्यक्ती ज्ञानी, अनुभवी व विविध विषयात पारंगत असे. आजही शाळा व महाविद्यालयात अनेक पदव्या प्राप्त केलेले शिक्षक, प्राध्यापक आपण पाहतो. आज संगणकावर, मोबाईलवर, लॅपटॉपवर कोणत्याही विषयाचे अगदी अद्ययावत ज्ञान क्षणात मिळू शकते;

ही एक प्रकारची क्रांतीच आहे. खरी ज्ञानी व्यक्ती ही अहंकाररहित आणि विनम्र असते. याउलट ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ या न्यायाने अनेक क्षेत्रातील ज्ञानातील थोडे थोडे मोजके ज्ञान असणारी व्यक्ती अहंकारी असू शकते.

मूलभूत ज्ञान मिळवून निरनिराळ्या साहित्यकृती निर्माण करून अनेक लेखक, संत आज अजरामर झालेले आपण पाहतो. कालिदासांचे ‘अभिज्ञान शाकुंतल’ भारतातच नव्हे तर जर्मनी व इतर देशात गाजले आहे. शेक्सपिअर ची लोकप्रियता जगन्मान्य आहे. ज्ञानेश्वरी माऊलींनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचे अनेक भाषात भाषांतर झाले आहे. महाभारतास तरी ‘व्यासोच्छिष्टं’ असे म्हणतात कारण असा एकही विषय नाही की ज्याचा उहापोह महाभारतात झाला नाही. व्यासांनी सांगितलेले महाभारत साक्षात श्रीगणेशाने लिहून घेतले आहे.

दिल्याने वाढते ते ज्ञान आणि जे घेतले जात नाही ते अज्ञान असे म्हणणे अगदी योग्य ठरेल. ज्ञानाचा उपयोग करून व्यक्ती उच्च पदी विराजमान होते. ज्ञानामुळे प्रतिष्ठा प्राप्त होते. पूर्वी ज्ञानसंपन्न अशा व्यक्तींना राजाश्रय मिळत असे. आजशी ज्ञानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. म्हणून ज्ञान हा माणसाला तिसरा डोळा आहे, असे म्हणतात.

© दीप्ती कोंदड कुलकर्णी

हैदराबाद

मो.नं. ९५५२४४८४६१

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निद्रेच्या उंबरठ्यावरचे गूढ ध्यान – लेखक : अज्ञात☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ निद्रेच्या उंबरठ्यावरचे गूढ ध्यान – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

रात्र हळूहळू पृथ्वीवर उतरते. दिवसाचा गोंगाट शांत होऊ लागतो. मनाच्या आकाशात दिवसभर उडणारे विचारांचे पक्षी आपल्या घरट्याकडे परतू लागतात. आणि मग येतो तो क्षण—जेव्हा मनुष्य डोळे मिटतो.

पाहता पाहता एक अद्भुत घटना घडते.

… दिवसभर “मी”, “माझं”, “माझ्यासाठी” या भावनांनी व्यापलेला मनुष्य अचानक सर्व काही सोडून देतो. पद, प्रतिष्ठा, संपत्ती, नाती, चिंता, स्वप्नं, संघर्ष, यश-अपयश—सगळं काही मागे राहतं. झोपेच्या दारातून आत जाताना तो काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही.

हे केवळ झोपणं नसतं… हे एका अज्ञात शक्तीसमोर केलेलं पूर्ण समर्पण असतं.

.. कारण झोप म्हणजे एक छोटासा मृत्यू आणि सकाळ म्हणजे एक नवा जन्म. रात्री आपण स्वतःला विश्वाच्या स्वाधीन करतो. आपल्या हृदयाची धडधड, श्वासांची लय, शरीरातील असंख्य प्रक्रिया—हे सर्व आपण नियंत्रित करत नसतो. तरीही काही अदृश्य कृपा आपल्याला सांभाळत असते.

कधी विचार केला आहे?

झोपताना आपल्याला खात्री नसते की पहाटे डोळे उघडतीलच. तरीही आपण निर्धास्तपणे निद्राधीन होतो. हा विश्वास कुठून येतो?

… कदाचित तो विश्वास आपल्या आत्म्याला त्या परमचैतन्याशी असलेल्या नात्यातून मिळत असावा.

ध्यानात साधक जाणीवपूर्वक स्वतःला शांततेकडे नेतो. पण झोपेत निसर्ग स्वतः आपल्याला त्या शांततेच्या गर्भात घेऊन जातो. म्हणूनच गाढ झोपेत एक अवर्णनीय आनंद असतो. त्या क्षणी ना इच्छा असते, ना अपेक्षा, ना दुःख, ना सुख.

… फक्त अस्तित्व असतं…

.. निराकार…

.. निर्विचार…

.. निशब्द…

आणि कदाचित त्या गहन शांततेत आत्मा क्षणभर स्वतःच्या मूळ स्वरूपाला स्पर्श करत असतो.

पहाट होते.

पूर्व दिशेला प्रकाशाचा पहिला किरण जन्म घेतो.

आपले डोळे उघडतात.

श्वास अजूनही सुरू असतो.

हृदय अजूनही धडधडत असतं.

आणि जीवन पुन्हा एकदा आपल्याला हाक देतं.

… तो क्षण साधा नसतो. ती कृपा असते.

… कारण प्रत्येक सकाळ ही आपल्या पात्रतेमुळे मिळत नाही; ती आपल्याला दिलेली एक नवीन संधी असते.

विश्व जणू हळूच सांगत असतं—

“अजून तुझा प्रवास पूर्ण झालेला नाही… अजून काही अनुभव घ्यायचे आहेत… अजून काही कर्म पूर्ण करायची आहेत… “

अध्यात्माची सुरुवात कदाचित याच जाणिवेतून होते—

… की जीवनावर आपला अधिकार नाही, फक्त सहभाग आहे.

… आपण या विश्वाचे मालक नाही.

… आपण केवळ निमित्त आहोत.

जेव्हा मनुष्य रात्री झोपताना संपूर्ण समर्पण करतो आणि सकाळी उठताना कृतज्ञतेने मस्तक झुकवतो, तेव्हा त्याचं प्रत्येक श्वास ध्यान बनतो, प्रत्येक दिवस साधना बनतो आणि प्रत्येक रात्र ईश्वराच्या कुशीत विसावल्यासारखी वाटू लागते.

… मग झोप ही फक्त विश्रांती राहत नाही.

… आणि जाग येणं ही फक्त दिनचर्या राहत नाही.

… तो दररोज घडणारा एक गूढ आध्यात्मिक उत्सव बनतो—

… जिथे प्रत्येक रात्र अहंकाराचा विसर्जन सोहळा असते,

… आणि प्रत्येक पहाट आत्मजागृतीचा नवीन उदय.

ज्याला या रहस्याची अनुभूती आली, त्याला समजतं की जीवन हे जगायचं नसतं—ते कृतज्ञतेने स्वीकारायचं असतं. 

लेखक : अज्ञात 

संकलन व प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वतःवर प्रेम करा… ☆ सुश्री सुरेखा चिखलकर ☆

सुश्री सुरेखा चिखलकर

? मनमंजुषेतून ?

☆ स्वतःवर प्रेम करा☆ सुश्री सुरेखा चिखलकर

आपण अनेकदा म्हणतो, “कोणी माझी काळजी घेत नाही, कोणी मला समजून घेत नाही, कोणी माझ्यावर प्रेम करत नाही “

… पण या प्रत्येक प्रश्नापूर्वी एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा; मी स्वतःसाठी काय करतो? जो माणूस स्वतःच स्वतःला सतत दोष देतो, स्वतःची किंमत कमी करतो आणि स्वतःच्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो, त्याला इतरांनी कायम आनंद द्यावा, ही अपेक्षा पूर्ण होणे कठीण असते.

स्वतःवर प्रेम करणे म्हणजे आरशात स्वतःचे रूप पाहून आनंदी होणे एवढेच नाही.

… स्वतःच्या चुका स्वीकारून त्यातून शिकणे, स्वतःला माफ करणे, स्वतःचा सन्मान राखणे आणि गरज पडल्यास स्वतःसाठी ठामपणे उभे राहणे हेही स्वतःवर प्रेम करण्याचेच रूप आहे.

जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो, तेव्हा इतरांकडून प्रेमाची भीक मागावी लागत नाही. कारण त्यावेळी आपला आनंद इतरांच्या स्वीकृतीवर नाही, तर स्वतःच्या आत्मविश्वासावर उभा असतो.

… म्हणून आयुष्यात सर्वप्रथम स्वतःशी मैत्री करा. कारण जो स्वतःचा होऊ शकत नाही, त्याच्यासाठी दुसऱ्यांचे प्रेमही अनेकदा अपुरे ठरते. *_

 © सुरेखा चिखलकर

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘यूपीआय’ चे शिल्पकार…  – लेखक : श्री प्रसन्न आठवले ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘यूपीआय’ चे शिल्पकार…  – लेखक : श्री प्रसन्न आठवले ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

(UPI – Unified Payments Interface)

श्री. दिलीप असबे 

आज जगातील जवळपास निम्म्या रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांमध्ये एकट्या भारताचा वाटा आहे. हे केवळ भारताच्या अथांग लोकसंख्येमुळे नाही, तर या पेमेंट सिस्टीममुळे शक्य झाले आहे जी पूर्णपणे मोफत आहे, २४ तास अखंड चालते आणि वाराणसीतील रस्त्यांवरील फेरीवाल्यापासून ते मुंबईतील कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत सर्वांसाठी समान रीतीने काम करते.

ही प्रणाली डिझाइन करणारे आणि यशस्वीपणे अमलात आणणारे अभियंते म्हणजे दिलीप असबे. रोजच्या जीवनात यूपीआय (UPI) वापरणाऱ्या बहुतांश भारतीयांनी त्यांचे नाव कदाचित ऐकलेही नसेल.

यूपीआय येण्यापूर्वी, डिजिटल पेमेंटचे गणित सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होते. जेव्हा जेव्हा एखादे कार्ड स्वाइप केले जायचे, तेव्हा व्यापाऱ्याला व्हिसा (Visa) किंवा मास्टरकार्डला (Mastercard) १ ते २ टक्के शुल्क द्यावे लागायचे. या परदेशी कंपन्या भारतातील प्रत्येक व्यवहारावर व्यापाऱ्यांकडून पैसे उकळत होत्या. लहान व्यापाऱ्यांना हे परवडणारे नव्हते. बँकेतून पैसे ट्रान्सफर करायला तास जायचे आणि ते फक्त बँकेच्या दिवशीच व्हायचे. परिणामी, कोट्यवधी भारतीयांसाठी रोख रक्कम (Cash) वापरणे ही त्यांची आवड नसून एक गरज बनली होती.

मुंबईचे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असलेल्या दिलीप असबे यांनी एनपीसीआय (NPCI) च्या सुरुवातीच्या दिवसांत तिथे काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी आयएमपीएस (IMPS), एनईएफटी (NEFT) आणि रुपे (RuPay) यांसारख्या भारताच्या मुख्य पेमेंट प्रणाली उभारण्यात तब्बल एक दशक घालवले. २००९ पर्यंत, त्यांच्या टीमने आधारच्या (Aadhaar) आधारे एक नवीन पेमेंट लेयर तयार करता येईल का यावर काम सुरू केले.

२०१५ पर्यंत त्यांच्या लक्षात आले की आयएमपीएस प्रणाली पुरेशी नाही. त्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये यूपीआय लॉन्च करण्यात आले. ही एक मोफत, २४ तास चालणारी आणि सर्व बँकांशी एकाच वेळी जोडली गेलेली प्रणाली होती, ज्यावर कोणतेही ॲप सहज तयार करता येत होते. शुल्काबाबत दिलीप असबे यांचे तत्त्व अगदी स्पष्ट होते: तुम्ही ग्राहकांकडून कोणतेही शुल्क वसूल करू शकत नाही, अन्यथा हे संपूर्ण मॉडेल अपयशी ठरेल.

आज यूपीआय ५० कोटींपेक्षा जास्त (+500 Million) वापरकर्ते आणि ६ कोटी ५० लाख (65 Million) व्यापाऱ्यांना ६७५ बँकांच्या माध्यमातून सेवा देत आहे. यूपीआयद्वारे दरमहा १८ अब्जांपेक्षा जास्त (18 Billion) व्यवहार होतात आणि व्यवहारांचे एकूण मूल्य २० लाख करोड पेक्षा जास्त आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताचे वर्णनजलद पेमेंट क्षेत्रातील जगाचा नेताअसे केले आहे.

दिलीप असबे हे २०१८ पासून NPCI चे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत आहेत.

एका बिगर-नफा (Non-profit) संस्थेत काम करणाऱ्या एका मराठी सरकारी अभियंत्याने १४० कोटी लोकांसाठी ही आर्थिक क्रांती उभारली.

लक्षात घ्या या UPI साठी कोणताही आयपीओ (IPO) नाही, कोणतीही युनिकॉर्न (Unicorn) कंपनी नाही… फक्त यूपीआय (UPI).

जाता जाता पण महत्वाचं :::: 

ज्या नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वात UPI च्या योजनेचा पाया घातला गेला, आणि दिलीप असबे यांच्या टीमने अखंड मेहनत घेऊन एप्रिल 2016 मध्ये लाँच केलेली ही सिस्टिम आजही अखंड कार्यरत आहे, त्याच नंदन निलेकणी यांना पेपर फुटी विरोधातील तंत्रज्ञान निर्मितीची जबाबदारी मोदींजींनी दिली आहे. त्यामुळे एक सर्वंकष लिकप्रूफ व्यवस्था नक्की निर्माण होईल याची खात्री बळगूया.

 – मला आलेल्या इंग्रजी लेखाचा मराठी भाषेत अनुवाद सादर करत आहे.

┉❀꧁꧂❀┉

लेखक / अनुवादक : प्रसन्न आठवले

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सहजीवनाचं दैवत्व…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “सहजीवनाचं दैवत्व…” – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

तिच्या डोक्यावर तुळशीचं वृंदावन होतं, त्याच्या खांद्यावर वीणा होती. दोघांच्याही पायात चप्पल नव्हती. पण…

त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं, ते आज लाखोंच्या गाड्यांतून फिरणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावरही क्वचितच दिसतं…

मी त्यांच्या मागे बराच वेळ चालत होतो…

 त्यांनी एकदाही तिचा हात हातात घेतला नाही, एकदाही त्यांनी त्यांच्या प्रेमाचं प्रदर्शन केलं नाही, एकदाही कुठली अतिशयोक्ती नव्हती…

पण प्रत्येक पावलागणिक त्यांचं प्रेम बोलत होत.

तो वृद्ध वारकरी चार पावलं पुढे जाई? 

 अचानक मागे वळून पाही ती येतेय ना…

हे पाहण्यासाठी.

 तीही काही बोलत नव्हती. फक्त त्यांच्या मागे वळून पाहण्यावर हलकंसं हसायची. बस्स… इतकंच.

दुपार झाली…

दिंडी एका ठिकाणी विसावली…

 सगळे आपापल्या शिदोऱ्या सोडू लागले…

तिने जुन्या कापडात बांधलेली भाकरी काढली. मिरचीचा ठेचा आणि भाकरी…

ती म्हणाली…

 “आधी तुम्ही तुकडा मोडा”

तो म्हणाला…

 नको गं… तू आधी घे,

दोन मिनिटं दोघेही एकमेकांनाच आग्रह करत राहिले…

शेवटी…

 तिने भाकरीचा तुकडा मोडून त्याच्या हातात ठेवला, आणि स्वतःचा घास नंतर घेतला.

 त्या क्षणी मला जाणवलं… आजची पिढी प्रेम व्यक्त करण्यासाठी महागड्या हॉटेलला जाते,

 कितीतरी मोठं सेलिब्रेशन करते,

 तरी अखेर असमाधानीच…

 

आणि ही पिढी..

 अर्ध्या भाकरीतही एकमेकांना पूर्ण आयुष्य देऊन टाकते…

सायंकाळी मुक्काम झाला…

 तिने मुक्कामाच्या अलीकडे नदीवर जाऊन त्याचं धोतर धुतलं…

हात थरथरत होते.

कंबर वाकली होती.

डोळ्यांना नीट दिसत नव्हतं.

तरी…

 तिने धोतरावर एकही डाग राहू दिला नाही…

तो दूर बसून तिच्याकडे पाहत होता… कोणी पाहू नये म्हणून.

 त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं…

 कारण तिच्या हातात आता ताकद नव्हती,

 पण त्याच्यासाठीची माया अजून तरुण होती,

वीणा वाजवत तो गुणगुणू लागला…

 ‘तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना,

 केल्या विठुरायाला हो संसार पेलनाss’

रात्री झोपताना त्याने आधी तिच्या अंथरुणाखालचे दगड काढले,

 ती म्हणाली काय करता?

तो हसला…

“झोपताना पाठ दुखेल”

इतकंच… ते वाक्य छोटं होतं,

 पण त्यात 55 वर्षाचा संसार दडला होता…

आज प्रेमाचा अर्थ बदलला आहे,

 लोक म्हणतात मला माझी स्पेस हवी,

त्या दोघांनी मात्र आयुष्यभर एकमेकांना जागा दिली,

 पण अंतर कधी दिलं नाही…

आज लग्नाच्या वाढदिवसाला सोशल मीडियावर शंभर फोटो टाकले जातात… ,

 यांनी कधी एक फोटोही काढला नाही,

कारण त्यांच्या आठवणी कॅमेऱ्यात नव्हत्या.

 त्या एकमेकांच्या डोळ्यात आणि हृदयात जपलेल्या होत्या…

आजची पिढी प्रेम सिद्ध करण्यासाठी भेटवस्तू देते, त्या देण्यात काही गैर नाही,

पण ती तिथे चुकते जिथे ते एकमेकांना न पेलणारे वचन देते,

 या जुन्या पिढीने एकमेकांना तारुण्य दिल, श्रम दिले, त्याग दिला, संयम दिला आणि शेवटी म्हातारपणातही एकनिष्ठेने साथ दिली…

वारकरी दिंडीतली ती म्हातारी जोडी पाहिली की वाटतं…

 प्रेमाचा सर्वात मोठा आवाज हा कधीच शब्दांत नसतो,

 तो आयुष्यभर निभावलेल्या जबाबदाऱ्यांच्या शांततेत असतो…

ती आजही त्याच्या मागून चालते,

 कारण पुढे जाण्याची तिची इच्छा नसते,

आणि तो आजही अधून मधून मागे वळून पाहतो, कारण तिला मागे सोडण्याची त्याची हिंमत नसते…

 त्यांनी एकमेकांना कधी गुलाब दिला नाही,

 पण आयुष्यभर एकमेकांच्या वाटेवरचे काटे वेचत राहिले…

 त्यांच्या संसारात आय लव यूनव्हतं,

‘पण तुम्ही आधी घास घ्या’..

 हेच त्यांचे सर्वात मोठं प्रेम पत्र होतं…

 आजकाल प्रेमाचा शेवट लग्नात होतो,

 आणि त्यांचं प्रेम तर लग्नानंतरच सुरू झालं होतं…

सुरकुत्या चेहऱ्यावर पडल्या,

 पण नात्यावर नाहीत,

देह थकला…

 पण एकमेकांची काळजी करण्याची सवय कधी म्हातारी झाली नाही…

ती वारकरी जोडी दिंडीत विरून गेली…

मी बराच वेळ त्यांच्याकडे पाहत राहिलो,

 क्षणभर वाटलं…

पंढरपुराकडे चालणारे ते दोन वारकरी नव्हतेच,

 

तो विठ्ठल होता…

ती रखुमाई होती..

कारण देव असाच असतो..

तो आयुष्यभर एकमेकांच मन राखणाऱ्या नात्यात असतो…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : प्रभा हर्षे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – फुकट काहीही नसते…? – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – फुकट काहीही नसते…? – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

सेल! सेल! सेल! … एक खरेदी करा दुसरी वस्तू अगदी फ्री! फ्री! अशा पाट्या मान्सून मध्ये सगळी कडे जास्तच झळकतात.. महिला वर्ग तर अशा मान्सून सेल ची अगदी आतुरतेने वाट बघत असतो.. पण खरचं ह्या एक वर एक फ्री ह्या अशा ऑफर फायदेशीर असतात का हो की ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न असतो.. कारण या जगात कोणतीच गोष्ट फुकट मिळत नसते..

“फुकट” हा शब्द ऐकला की प्रत्येकालाच आनंद होतो. पण खरतर या जगात फुकट काहीच मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. ती कधी पैशांत मोजली जाते, तर कधी वेळ, कष्ट, त्याग, संयम किंवा जबाबदारी ह्यांच्या रूपात मोजली जाते..

निसर्ग आपल्याला हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि अन्न देतो. पण त्यामागे ही निसर्गाचे संतुलन टिकवण्याची जबाबदारी आपलीच असते. शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या धान्यामागे त्याचा घाम, मेहनत असते. त्यामुळे अन्नाचा प्रत्येक घास अमूल्य असतो.. आणि त्या घासाची किंमत जो पर्यंत कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत त्याचे खरे मोल कळत नाही..

एखाद्या परीक्षेत उत्तम यश गुण मिळवण्यासाठी नियमित अभ्यास, शिस्त आणि सातत्य आवश्यक असते आणि ह्या किंमतीवरचं यशाची पावती मिळते म्हणजेच यश मिळवण्यासाठी प्रयत्न सातत्य आणि मेहनत ही किंमत मोजावी लागतेचं… एखाद्या खेळाडूसाठी एखादी स्पर्धा त्यातील यश मेडल मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे प्रॅक्टिस करावी लागते अपार कष्ट घ्यावे लागतात वेळ खर्ची घालावा लागतो तेंव्हा कुठे यशाची पायरी मिळते.. प्रत्येक यशामागे संघर्षाची कहाणी असते. संघर्षाची चिकाटीची किंमत मोजावी लागते..

आजच्या काळात अनेक गोष्टी “फ्री” म्हणून दिल्या जातात. परंतु त्याची किंमत आपण वेळ, छुपे टॅक्सेस किंवा इतर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात चुकवत असतो. त्यामुळे जे दिसते तेच खरे असते असे नाही. कोणतीच गोष्ट कधीच फुकट मिळत नाही.. त्याची कोणत्या ना कोणत्या प्रकारे किंमत मोजावीच लागते..

आई-वडिलांचे प्रेम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांची साथ यांना पैशांत मोजता येत नाही. पण त्यामागे त्यांचा त्याग, काळजी आणि निस्वार्थ भाव असतात म्हणून अशा नात्यांचे मोल खूप जास्त असते.. अशी नाती अमूल्य असतात आणि ती ज जपणे ही आपली जबाबदारी असते..

जीवनात यश, सन्मान, विश्वास आणि आनंद हे कोणालाही सहज मिळत नाहीत. त्यासाठी प्रामाणिकपणा, परिश्रम, संयम आणि चिकाटी आवश्यक असते. कष्टाशिवाय मिळालेली गोष्ट टिकत नाही, पण कष्टाने मिळवलेले सुख आयुष्यभर अभिमान देऊन जाते.

म्हणूनच “फुकट काहीही नसते” हे जीवनाचे सत्य आहे. प्रत्येक गोष्टीमागे कोणाचा तरी त्याग, कष्ट किंवा किंमत दडलेली असते. म्हणून मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचे मोल ओळखून कृतज्ञ राहता आले पाहिजे, त्या मागे लागलेल्या कष्टांची किंमत ओळखता येण खूप गरजेचं असतं.

“कष्ट हेच खरे भांडवल आणि परिश्रम हेच यशाचे प्रवेशद्वार आहे. ” कष्टाशिवाय फळ नाही, आणि मूल्याशिवाय कोणतीही गोष्ट नाही. ” म्हणून फुकटाच्या मोहात न पडता, प्रामाणिक परिश्रमाने मिळवलेल्या प्रत्येक यशाचा अभिमान आयुष्यभर आनंद देऊन जातो..

© अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुझ्यासारखा तूच मित्रा.. ” ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

??

☆ “तुझ्यासारखा तूच मित्रा.. ”  ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆

यावर्षी ३० जुलै आणि २ ऑगस्ट अशा दोन दिवशी “ मैत्रीदिन “ साजरा केला गेला. तसा बरेचदा तो असाच दोन वेळा जगात साजरा केला जातो, आणि याचे कारण असे की ३० जुलै ही तारीख “ UN International Day of Friendship “ म्हणून जागतिक पातळीवर ‘मैत्रीदिन’ म्हणून साजरी केली जाते. तर दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी.. जो यावर्षी २ ऑगस्ट रोजी होता.. भारत, अमेरिका, आणि यू. के. मध्ये ‘ मैत्रीदिन ‘ साजरा केला जातो.

… दरवर्षीप्रमाणे यंदाही, उपलब्ध असलेल्या सर्व सामाजिक माध्यमांवरून या दोन्ही दिवशी शुभेच्छांचा मुसळधार पाऊस पडला आणि मैत्रीला चिंब भिजवून गेला… आनंद आणि समाधान दोन्ही भरभरून देऊन गेला.

… वाचता वाचता सहजच असं लक्षात आलं की अशा बहुतेक सर्व शुभेच्छा “ मैत्री “ चे महत्व, प्रत्येकाच्या आयुष्यात तिची असणारी आवश्यकता, आणि अर्थातच त्यामागची कारणं, ‘मैत्री’ या शब्दाशी मूलतःच जोडल्या गेलेल्या भाव-भावना, आणि त्या भावनांबद्दल व्यक्त करावीशी वाटणारी कृतज्ञता … हेच सगळं ठळकपणे सांगणाऱ्या होत्या.. नेहेमीसारख्याच…आणि यात आक्षेप घेण्यासारखं खरोखरच काहीच नाही.

पण एका सुहृदाने मात्र मला एक हिंदी कविता पाठवली होती जी फक्त मैत्रीबद्दल न बोलता, स्वतःच्या एका जिवलग मित्राला उद्देशून लिहिलेली होती…भावना त्याच पण व्यक्त करण्याची पद्धत वेगळी.. आणि त्यामुळे अर्थातच ती मनाला फार भावली … त्या मित्राच्या आपल्या आयुष्यात असण्याबद्दल.. व्यक्तिशः त्याच्याबद्दल वाटणारा विश्वास आणि त्याच्याबद्दल मनात सतत असणारी कृतज्ञतेची भावना ठळकपणे व्यक्त करणारी ती कविता … आणि म्हणूनच त्या कवितेचे हे वेगळेपण मनाला थेट भिडले.

…. आणि त्या कवितेचा स्वैर भावानुवाद करण्याचा मोह टाळताच आला नाही.

हिंदी कवी श्री. विजय सिंह चौहान यांच्या.. ।। तुमसा कोई नहीं ।।.. या हृद्य कवितेचा हा स्वैर भावानुवाद ……

☆ तुझ्यासारखा तूच मित्रा.. ☆

भेटण्यासाठी कुठलंच कारण नको 

अन गप्पा मारण्यासाठी एखादा विषयही नको 

शब्दांचं अवडंबर नको… बस् फक्त तुझा आपलेपणा पाहिजे 

बाकी काहीच नको रे मित्रा …

 

मन जेव्हा मनाशी जुळतं..

नातं आपसूकच विणलं जातं 

मग कितीही वर्षं का उलटेनात..

मनात उजळणारे स्नेहाचे दिवे विझू शकतच नाहीत रे मित्रा …

 

भेट कितीही दिवसांनी होवो..

डोळ्यात तो पूर्वीचाच विश्वास असतो 

मग काही न बोलताही खूप काही बोललं जातं 

मनातल्या मधुर संवेदना एकमेकांच्या मनाला लगेच जाणवतात मित्रा …

 

कुठलाही स्वार्थ नाही.. कसलीच अपेक्षाही नाही 

फायदा- नुकसान याचा हिशोब तर नाहीच नाही 

तूच तो मित्र जो सदैव सोबत उभा असतोच असतोस 

प्रत्येक सुखाचे वा दु:खाचेही उत्तर तूच देऊ शकतोस मित्रा …

 

अशा तुझ्या सुंदर पवित्र मैत्रभावनेला माझा मनापासून सलाम मित्रा 

माझ्या मनातल्या मनात तुझा सततच सन्मान मित्रा 

हे आपलं मैत्रीचं घट्ट नातं आयुष्यभर असंच दरवळत राहू दे..

माझा-तुझा स्नेह अविनाशी आणि विश्वास असाच अतूट राहू दे मित्रा… 

खरंच.. तुझ्यासारखा फक्त तूच मित्रा…

© मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares