मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “प्रिय जुलै महिना…!!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “प्रिय जुलै महिना…!!!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

प्रिय जुलै महिना,

सप्रेम नमस्कार, विनंती विशेष…?

कालच तू निघून गेलास, पण आजही तुझी आठवण आली म्हणून हा पत्र प्रपंच…? 

महिनाभर राहून गेलास, आपण बोललो – भेटलो तरीही मनातल्या अनेक गोष्टी सांगायच्याच राहून गेल्या, त्या सांगण्यासाठी हे आंतरदेशीय पत्र तुला टाकत आहे.

हल्ली पत्राचा जमाना गेला, पण आपल्यापासून सुरुवात करायला काय हरकत आहे…?

… लहानपणी मी खूप पत्र लिहायचो… ते फिकट निळं, आभाळाच्या रंगाचं आंतरदेशीय आणायचं, कुणी येणार नाही अशा ठिकाणी खोलीचा एक कोपरा पकडून बसायचं, संध्याकाळ नंतर नक्षीदार चांदण्याची काळी साडी नेसून रात्र जशी नकळत येते… इतका वेळ कुठ्ठेही दिसत नसलेला चंद्र, रात्रीच्या भाळावर चांदीच्या बंद्या रुपयागत जसा अचानकपणे नकळतच चमचमतो, तसे शब्दही नकळत चमचम करत मनात यायचे रे…? 

… पिकात सोडलेलं पाणी जसं जमिनीत मुरतं, तसे सुचलेले शब्द मनात मुरायचे, खडे मीठ टाकून आंब्याच्या कोयीसकट, माठात घातलेल्या पिवळ्याशार लोणच्यासारखे…? 

… रानात पेरणी करावी आणि एक दिवस अचानक उठून बघावं आणि इतके दिवस काळ्याशार दिसत असलेल्या मातीत अचानक हिरवे कोंबच कोंब दिसू लागावेत… काळी मातीच जणू हिरवी होऊन जावी, तसं ते निळं पत्र माझ्या मनातल्या भावनांनी हिरवं होऊन जायचं…? 

शेवटी पत्राच्या एका कडेला जिभेवरून फिरवून थोडं ओलं केलं किंवा भाताची चार शितं या कडेवरून त्या कडेवर बोटानं लावली की, आधीच लावलेला डिंक मनातल्या मनात हरखून जायचा… भात खाऊन पोट भरल्यागत…?!!

हरखून, विरघळलेला तो डिंक पत्र घट्ट चिटकवायचा आणि नाती सुद्धा…? 

… नाती टिकवायला प्रेमाची चार शितं आणि थोडा मायेचा ओलावा लागतो हेच खरं…? 

पत्र लिहून झालं की, हाफ चड्डी सावरत, गावातल्या गल्लीबोळातनं फिरून, पत्र “पोष्टाच्या लाल पेटीत” टाकायला दुडक्या चालीनं पळत सुटायचो… पोस्टाची ती आsss करून उभी असलेली लाल पेटी, अजूनही मनात घर करून आहे रे… लहानपणी ती आsss करून उभी असलेली लाल पेटी दिसायची…

… आज आsss करून उभी असलेली उघडी नागडी चिल्ली पिल्ली दिसतात… पोटात भुकेचा वणवा पेटलेला… तो ही लालच…? 

.. ये लाल रंग कब मुझे छोडेगा…???

असो, यावेळी तू आणलेला पाऊस आम्हाला खूप आवडला. आम्ही तो पुरवून पुरवून वापरत आहोत.

कुणाला भिजवून गेला, तर कोणाची तहान भागवून गेला…

शेतकऱ्यांची चूल पेटवून गेला…? 

तुला सांगायचं राहिलं,

… आपल्या गावात ज्यांच्याकडे धड कपडे नाहीत किंवा घरं नाहीत, रस्त्यावर राहतात अशा सर्वांना रेनकोट आणि छत्र्या दिल्या आहेत, काळजी नसावी.

… आपल्या घरामागे जी गल्ली आहे ना, तिथल्या एकाने त्याच्या अपंग आईला, घराबाहेर काढले, तिला व्हीलचेअर दिली.

… त्याचं बघून दुसऱ्याने त्याच्या वडिलांना बाहेर काढलं, ते आजारी होते, पायाने अधू होते. त्यांना हाताने चालवायची तीन चाकी सायकल घेऊन दिली आहे. गंमत बघ, पूर्वी बाबा आपल्या लहान मुलांना तीन चाकी सायकल घेऊन द्यायचे, आज बाबांना तीन चाकी सायकल घेऊन देताना मला काय वाटलं असेल, हे शब्दात नाही सांगू शकत जुलै…

– – तर घराबाहेर काढलेल्या या आई-बाबांना भेटायला गेल्यानंतर जाणवले, त्यांच्यासारखे अनेक जण रस्त्यावर राहत होते… नाईलाजाने जगण्यासाठी याचना करत होते.

वेळ – मित्र – नाती यांना किंमतीचं लेबल नसतं पण हरवल्यावर त्यांचं मोल कळतं जुलै…

… ज्या आई-बाबांना, त्यांच्या मुला-मुलींनी घराबाहेर काढलं आहे, त्यांना आईबापाचं मोल कधी कळेल रे…?

.. या सर्वांनाच रस्त्यावरच गोळ्या औषधं दिली आहेत, रक्त लघवी तपासण्या केल्या आहेत, कुणाला कुबडी, कुणाला काठी, तर कुणाला मानेचे – कमरेचे पट्टे गरजेप्रमाणे दिले आहेत. जे मला रस्त्यात करायला जमत नाही अशा सर्वांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे.

तुला “तो” आठवला का…? हां… “तोच तो”…

त्याने आता टगेगिरी, मारामारी या सर्व गोष्टी सोडल्या आहेत. काम करू लागला आहे. परवा त्याच्या लग्नाला जाऊन आलो, तुझी आठवण काढत होता. सासरी जाताना मुलीच्या वडिलांना काय वाटेल, म्हणून स्वतःच रडणारा तो हाच तो, त्याच्या भावनांना सलाम करणारा मीच तो…? 

तुला तर माहीतच आहे, आपल्या गावात जे लोक असे बाहेर राहतात आणि याचना करतात त्यांना गोळा करून आपण त्यांच्याकडून जेवढा जमेल तेवढा गावाचा भाग झाडून पुसून स्वच्छ करत आहोत. या संपूर्ण टीमला आपण “खराटा पलटण” असं नाव दिलं आहे.

.. दर आठवड्याला अशी स्वच्छता करून प्रत्येकाला महिनाभर पुरेल इतका किराणा दिला आहे.

.. आई स्वरूप अनेक माऊली होत्या, त्यांना नवीन साड्या दिल्या आहेत.

अरे हो, लहान लहान मुलांनी, जुलै काका कुठे गेला? जुलै काका कुठे गेला? असं म्हणत मला भंडावून सोडलं, मग त्यांची समजूत काढण्यासाठी काकांनी हे लाडू पाठवले आहेत, असं सांगून रस्त्यावरील सर्व चिल्ल्या पिल्लांना लाडू दिले.

आपल्या गावातले जे लोक सध्या कुठे ना कुठे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत आणि त्यांना डबा आणून देणारं कुणीही नाही, अशा सर्वांना आपण जेवणाचे डबे पोच केले आहेत, त्याचप्रमाणे आपल्या गावातले जे लोक रस्त्याकडेला पडून आहेत, त्यांनाही जेवण दिले आहे. मागच्या पाच वर्षांपासून आपण रोजच्या रोज हे करत आहोत.

तुला माहित आहे ना जुलै… अनेक पालक घरातल्या लहान मुलांना शाळेत न टाकता, आपल्या मुलांना घेऊन भीक मागायला आपल्या गावातल्या धार्मिक स्थळांच्या बाहेर जमा होतात.

.. अशा अनेक पालकांना भेटून त्यांच्या संमतीने त्यांच्या मुलांना भीक मागणे सोडायला लावून त्यांना शाळा कॉलेजात घातले आहे.

… यावर्षी अशा साठ मुला मुलींना आपण शैक्षणिक मदत केली.

तुला ती चिंगी माहितीय…? तान्ही असल्यापासून तिची आई तिला भीक मागायला घेऊन जायची, यावर्षी आपण तिला नर्सरी मध्ये टाकलं आहे. तो पिंट्या… त्याला टॅलीचे क्लासेस लावले… ती पिंकी आठवते का तुला…? जुलै काका मला गाडीवर चक्कर मार असं म्हणणारी… हां तीच, तीला एमबीएला ऍडमिशन घेऊन दिलं आहे… अजून एकीला आयएएस व्हायचं आहे, हायस कुटं दोस्ता…?

– – सर्वात महत्त्वाची गोष्ट, भीक मागणाऱ्या ज्या लोकांना भीक मागणे सोडायचे आहे अशांसाठी आपण एक रोजगार केंद्र (Employment Centre) सुरू केलं आहे. तिथे आपल्या या लोकांच्या साथीने परफ्युम, कृत्रिम मोती आणि फुलांचे बुके, कापडी पिशव्या आणि लिक्विड वॉश अशा गोष्टी तयार करत आहोत, या सर्व वस्तूंच्या विक्रीतून आलेले पैसे त्यांचा पगार देण्यासाठी वापरत आहोत.

.. सध्या पंधरा ते वीस लोक या प्रकल्पात काम करत आहेत, ते कष्टकरी होऊन गावकरी झाले आहेत, याचा आनंद आहे… आणखीही अनेक लोकांना काम करण्याची इच्छा आहे, परंतु त्यांना पगार देण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, ही खंत सुद्धा आहे.

.. थोडा वेळ जाऊ दे, होईल सर्व व्यवस्थित, मैं समय हुं… असं तूच म्हणतोस ना जुलै…?

 तुझ्यावर विश्वास आहेच आणि आम्ही प्रयत्न सोडणार नाही, यावर विश्वास ठेव? 

 – – तू म्हणशील हे सर्व करतंय कोण…?

.. तर, मी तुला लिहिलेलं हे माझं पत्र जे आत्ता वाचत आहेत, ती हीच मंडळी आहेत… तेच करतात सारं…? 

.. ज्यांनी दुसऱ्याच्या “वेदना” समजून घेऊन “वैद्य” होण्याचा प्रयत्न केला, ती हीच मंडळी आहेत… तेच करतात सारं…?!

.. ज्यांनी स्वतःचे हात मला दान दिले आहेत, ती हीच मंडळी आहेत… तेच करतात सारं…?!!

– – या सर्वांचे हात घेऊन, मी आणि मनीषा काम करत आहोत, ज्यांच्या समोर आम्ही कायम नतमस्तक होतो, ती हीच मंडळी आहेत… तेच करतात सारं…

आता हे आंतरदेशीय पत्र पुरे करतो, जिभेनं ओलं करून, भाताची चार शीतं लावून, पत्र टाकायला पुन्हा पोस्टाच्या पेटीकडे पळत जायचं आहे…? 

… जाता जाता एक सांगतो, तू गावातून गेल्यानंतर आज आमच्याकडे ऑगस्ट रहायला आला आहे.

.. तो येताना श्रावण घेऊन आला आहे, अनेक सणवार तो आम्हांला भेट देणार आहे.

मित्रा जुलै, तू सुद्धा वारी आणि आषाढी एकादशी घेऊन आलास. सर्व वातावरण भक्तीमय झालं होतं… अजूनही आहे… कायम राहील…? 

… पण आम्ही काही उपवास केला नाही, कारण आम्ही रोजच पोटभर उपास करतो…

… भंगलेल्या मूर्ती काही दिवसात पुन्हा उठून उभ्या राहून, जेव्हा आशीर्वादाचे दोन शब्द माझ्या झोळीत टाकतात, अभंग मी तिथेच अनुभवतो…

… चंदनाची उटी नाही, माझ्याकडे मलमाची वाटी आहे… जखमांमुळे सडत चाललेले पाय, जेव्हा बरे होऊन चालायला लागतात, त्यांच्या पायाने जणू मीच वारी करतो…

… माझ्या हातातला स्टेथोस्कोप टाळ होतो आणि त्यांच्या हृदयातली धडधड मृदंग… भजन मी इथेच अनुभवतो…

… जीर्ण आणि जराजर्जर झालेल्या वृद्ध शरीरांवर मी भक्ती करतो, मग त्यांच्या कायेमध्येच मला विठ्ठल दर्शन देतो…

– – – म्हणून मग मी नाही गाठला चंद्रभागेचा तीर… ना गाठले पंढरपूर…

कळावे, लोभ असावा.

तुझा मित्र,

अभिजीत 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८९ आणि ९० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८९ आणि ९० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ८९ – – 

जनीं भोजनीं नाम वाचे वदावे ।

अती आदरे गद्य घोषें म्हणावे ।

हरीचिंतने अन्न जेवीत जावे ।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।।८९।।

अर्थ : लोकांमध्ये असताना आणि जेवण करताना भगवंताचे नाम घ्यावे. हे नाम घेताना ते आदरपूर्वक आणि मोठ्याने गजर करून स्पष्टपणे म्हणावे. जेवण करताना भगवंताचे चिंतन करावे. असे केल्याने नैसर्गिकपणे भगवंताची प्राप्ती होते.

(घोषें – मोठ्याने गजर करून, हरीचिंतने – भगवंताच्या स्मरणात राहून, स्वभावे – सहजपणे)

विवेचन : अन्नाला आपण पूर्णब्रह्म म्हणतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपली भारतीय संस्कृती अन्नाला परमेशराचाच दर्जा देते. अन्नाला इतका मोठा आणि पवित्र दर्जा आपण देतो हेच आपल्या संस्कृतीचे मोठे वैशिष्ट्य आहे. मग असे पवित्र अन्न सेवन करताना आपला भावही पवित्र असावा. भाव किंवा भावना या गोष्टीला प्रत्येक ठिकाणी महत्व. आपल्या मानण्यावरच सर्व काही अवलंबून असते. परमेश्वराच्या मंदिरात जाणारा भाविक मनोभावे त्या मूर्तीची पूजा करतो. त्याच्यासाठी ती केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष भगवंताला तो त्या ठिकाणी पाहतो. परंतु त्याच ठिकाणी एखादा नास्तिक माणूस गेला तर त्याच्यासाठी ती फक्त एक पाषाणाची मूर्ती असते. म्हणूनच जेवताना पवित्र भाव असावा. हा पवित्र भाव कसा येईल? तर अन्नाचा घास घेण्यापूर्वी जेव्हा आपण पवित्र असे भगवंताचे नाम उच्चारू तेव्हा.

आजकाल हॉटेलमध्ये जाण्याची, बाहेरचे खाण्याची आवड सगळ्यांमध्ये निर्माण झाली आहे. कसे जेवतो आपण हॉटेलमध्ये? जरा आठवून पहा. आजूबाजूला लोकांच्या बोलण्याची कलकल असते. त्यातच आपण वेटर केव्हा आपले जेवण आणतो त्याकडे लक्ष ठेवून असतो. जेवताना बरेच जण मोबाईल पाहतात. जेवणाला आपल्या संस्कृतीत ‘ उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ‘ असे म्हणतो. पण तिथे केवळ उदरभरणच होते. त्याला परमेश्वराच्या नामाचे अधिष्ठान आपण देत नाही.

जेवण म्हणजे एक यज्ञकर्म आहे. एखादा यज्ञ करताना आपण त्या त्या देवतेचे नाव घेऊन अग्निमध्ये आहुती टाकत असतो. अशा प्रकारे दिलेली आहुती अग्निमार्फत त्या त्या देवतेपर्यंत पोचते असे आपण मानतो. आपल्या पोटात देखील जठराग्नी असतो. तो प्रदीप्त झाल्यानंतरच त्याला आहुती द्यायची असते. आपल्या जठरातील अग्नीला ‘वैश्वानर’ असे नाव आहे. हा शब्द विश्वात सर्वत्र व्यापून राहिलेल्या अग्निदेवतेचे प्रतिनिधित्व करतो. अर्थात ही अग्निदेवता म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भगवंताचे स्वरूप आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, ” अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।” अर्थात सर्व प्राणिमात्रांच्या शरीरात असलेला वैश्वानर अग्नी म्हणजे मी आहे.

म्हणून समर्थ म्हणतात की समूहामध्ये जेवण करताना आदरपूर्वक परमेश्वराचे नाम घ्यावे. सर्वांना कळेल, स्पष्टपणे ऐकू येईल अशा पद्धतीने ते म्हणावे. पूर्वी आपल्याकडे जेवणाच्या पंक्तीत बसताना श्लोक म्हणण्याची प्रथा होती. आजही ती काही ठिकाणी पाळली जाते. त्यामुळे अन्नाबद्दल पवित्र भाव बाळगणे, जेवणाला लगेच सुरुवात करण्याऐवजी थोडा संयम पाळणे, भगवंताचे नाम आदरपूर्वक घेणे या गोष्टींचे संस्कार सहजपणे बालमनावर होत होते. आता मात्र पंक्तीत श्लोक म्हणणे फार कमी झाले आहे. कोणी तो म्हणत असेल तर त्याच्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. घरी आपण एकटे असू तेव्हा देखील जेवणापूर्वी भगवंताचे नामस्मरण करूनच जेवणाला सुरुवात करावी.

आपण जसे अन्न खाऊ तसे विचार निर्माण होतात. सात्विक अन्न असेल तर विचार देखील चांगले निर्माण होतात. राजस किंवा तामसीअन्न विकारांना जन्म देते. आपली आई, पत्नी किंवा बहीण जेव्हा स्वयंपाक करते, त्यावेळी तिच्या मनात आपण आपल्या माणसांसाठी हे भोजन बनवतो आहोत असा भाव असतो. ते भोजन तयार करताना मनात प्रेम असते. साहजिकच ते विचार तिने तयार केलेल्या अन्नात उतरतात. आपले पूर्वज आणि ऋषीमुनी म्हणूनच वाटेल त्या ठिकाणी जेवत नव्हते. महाभारतात श्रीकृष्ण जेव्हा शिष्टाई करण्यासाठी कौरवांकडे जातो, तेव्हा दुर्योधनाने बराच आग्रह करूनही तो त्या ठिकाणी जात नाही. त्याऐवजी विदुराकडील साधेच परंतु सात्विक अन्न जेवणे तो पसंत करतो.

अनेक लोकांना नोकरी व्यवसायानिमित्त काही वेळा नाईलाजाने बाहेर जेवण घ्यावे लागते. असे जेवण घेताना त्याभोवती पाणी फिरवून आपण भगवंताचा प्रसाद ग्रहण करतो आहे अशी भावना मनात असू द्यावी. मग त्या अन्नाचे प्रसादात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. जेवताना भगवंताचे स्मरण असू द्यावे. असे केले म्हणजे ती आहुती खरोखरच भगवंतापर्यंत पोहोचेल. ज्याला अध्यात्मार्गावर चालायचे आहे त्याला तर अन्न सेवन करताना अशी दक्षता घ्यायलाच हवी. अन्नाचा स्थूल भाग आपल्या शरीराचे भरण पोषण करतो तर त्याचा सूक्ष्म अंश आपल्या मनाचे आणि बुद्धीचे पोषण होते. म्हणून अन्न ताजे, सात्विक, साधे असावे.

जेवताना आपले लक्ष चवीकडे जास्त असते. एखादी गोष्ट आवडली की आपण खाण्यावर नियंत्रण ठेवत नाही. रसना म्हणजे आपली जीभ यात महत्वाची भूमिका पार पाडते. जिभेची दोन कार्ये आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्वाद किंवा चवीचे ज्ञान आपल्याला तिच्यामुळे होते. दुसरे म्हणजे जीभ हे बोलण्याचे साधन आहे. ज्याला जिभेवर नियंत्रण ठेवता आले, त्याला परमार्थ लवकर साधता येतो. खाताना आणि बोलताना अशा दोन्ही अर्थाने. ज्याला भगवंत प्राप्तीची इच्छा आहे त्याने त्याच्या स्मरणाशिवाय एक क्षणही वाया जाऊ देता कामा नये. स्वामी समर्थांच्या वाङ्मयात सांगितल्याप्रमाणे “अहो येता जाता, कार्य करीता, सदा घेता देता, उठत बसता वदनी वदता ग्रास गिळता… ” या पंक्तीप्रमाणे सदोदित त्याचे नामस्मरण करत जावे. मग भगवंत दूर नाही.

स्वसंवाद :: 

१. मी जेवण करताना केवळ जिभेच्या ‘स्वादाचा’ आणि आवडीचा विचार करतो, की ते शरीराला ऊर्जा देणारे एक ‘यज्ञकर्म’ म्हणून शांत चित्ताने स्वीकारतो?

२. आजकाल जेवताना मोबाईल पाहण्याची किंवा टीव्ही बघण्याची लागलेली सवय सोडून, मी किमान २ मिनिटे देवाचे नाव घेऊन भोजनाला सुरुवात करतो का?

३. “अन्नाचा सूक्ष्म अंश माझ्या मनाचे आणि बुद्धीचे पोषण करतो, ” हे लक्षात ठेवून मी सात्त्विक आहार घेण्याबाबत आणि अन्न शिजवताना मनात चांगले विचार ठेवण्याबाबत जागरूक आहे का?

४. “येता जाता, उठत बसता, ग्रास गिळता” माझ्या मनात आणि वाचेवर त्या जगनियंत्याचे नाव अखंड राहते का?

——- 

श्लोक क्र. ९० – – 

न ये राम वाणी तया थोर हाणी ।

जनीं वेर्थ प्राणी तया नाम काणी ।

हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी ।

बहू आगळे बोलिली व्यासवाणी ।।९०।।

अर्थ : ज्याच्या मुखात रामाचे नाव येत नाही असा माणूस आपल्या जीवनाचे मोठे नुकसानच करून घेत असतो. अशा व्यक्तीचे जगणे व्यर्थ आहे. अशी व्यक्ती अत्यंत हीन समजावी. वेदशास्त्रे, पुराणे यात महर्षी व्यासांनी हरिनामाची महती विविध प्रकारे सांगितली आहे.

(हाणी – हानी/नुकसान, काणी – क्षुद्र/हीन)

विवेचन :  रामनामाचे महत्व अपरंपार आहे. आतापर्यंतच्या विविध श्लोकातून त्याचे महत्व विविध प्रकारे आपल्याला सांगितले आहे. या श्लोकात ते ज्याच्या मुखी रामनाम येत नाही अशा मनुष्याची अवस्था वर्णन करतात. मुळात मनुष्य जन्म दुर्लभ. ८४ लक्ष योनी अनेकवार फिरून हा जन्म मिळतो असे सांगितले जाते. अशा या दुर्लभ मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्यायचे असेल तर मुखामध्ये हरिनाम येणे आवश्यक आहे. रामनाम म्हणजे अमृत आहे. जे रामनामाचा आश्रय घेतात अशांचा मुखातून जणू अमृत बाहेर पडते. ते मुख खरोखरच धन्य होय. अन्यथा आयुष्य व्यर्थ बडबडण्यात गेले असे समजावे. अशा व्यक्ती जगल्या काय आणि मेल्या काय सारखेच? त्यांचे जीवन व्यर्थ गेले. अशा व्यक्तींचे जगणे म्हणजे अत्यंत हीन दीन अशा प्रकारचे आहे असे समर्थ म्हणतात. समर्थानी अशा व्यक्तीसाठी ‘काणी ‘ शब्द वापरला आहे. अशा व्यक्तींचे जिणे कवडीमोलाचे. स्वा. सावरकरांचे शब्द हरिनामाबद्दल वापरायचे तर असे म्हणता येईल, ” तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण, तुज सकल चराचर शरण… “

हरीनाम मुखात न येता जगणे म्हणजे मरणच आहे. ‘ हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षणमात्रें ‘ असे ज्ञानदेव म्हणतात. हरिनामाचे सामर्थ्य अगाध आहे. त्याचे नाम मुखात आले की जन्मोजन्मीचे पाप नष्ट होते. त्यासाठी ज्ञानदेव गवत आणि अग्नीची उपमा वापरतात. वाळलेले गवत अग्नीच्या संपर्कात आले की क्षणार्धात जळून नष्ट होते, अग्नीशी समरस होते. तसेच परमेश्वराचे नाम घेणारी व्यक्ती त्याच्याशी एकरूप होते. ती परमेश्वरच होऊन जाते.

असे हरिनामाचे महत्व साधुसंतांनी निरनिराळ्या प्रकारे वर्णन केले आहे. मनुष्याला त्याद्वारे सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. व्यासांनी वेद, शास्त्रे, पुराणे यांची रचना केली. त्यांनी देखील विविध प्रकारे त्यात हरिनामाचे महत्व स्पष्ट केले आहे. महाभारतात एकदा दुर्योधन श्रीकृष्णाला विचारतो की धर्म म्हणजे काय हे मला कळते पण तसे वागण्याची बुद्धीच मला होत नाही. अधर्म म्हणजे काय हेही मला समजते, पण त्यातून मला बाहेर पडता येत नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, ” तुझ्या हृदयात तू मला स्थान दे म्हणजे तुला चांगले वागण्याची बुद्धी होईल. ” प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात परमेश्वराचे वास्तव्य असतेच. परंतु अज्ञानामुळे त्यावर पडदा पडलेला असतो. हा पडदा ज्ञानाच्या प्रकाशाने दूर होतो. पण दुर्योधनासारख्या व्यक्ती प्रत्यक्ष भगवंताने सांगूनही त्याप्रमाणे आचरण करीत नाहीत. अशा माणसांचे जगणे खरोखरच व्यर्थ होय. संत मीराबाई म्हणतात, ” रामनाम रस पीजे मनवा, रामनाम रस पीजे, तजि कुसंग संतसंग बैठी नित, हरी -चर्चा सुणी लीजें. ” रामनामाच्या रसातील गोडी चाखल्याशिवाय कळणार नाही. तेव्हा आपणही रामनामाचा आश्रय घ्यावा. आपल्या मुखात अखंड रामनाम येईल असा सत्संग, असे वागणे असावे. मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्यावे. संत एकनाथ म्हणतात, “रामनाम ज्याचे मुखी, तो नर धन्य तिन्ही लोकी. “

स्वसंवाद :: 

१. ८४ लक्ष योनी फिरून मिळालेल्या या ‘दुर्लभ मनुष्य जन्माचा’ वापर मी केवळ व्यर्थ गोष्टींमध्ये करत आहे, की रामनामाने त्याचे सार्थक करत आहे?

२. दुर्योधनाप्रमाणे मलाही बऱ्याचदा ‘चांगले काय आणि वाईट काय’ हे समजत असूनही, माझ्या मनातील अज्ञानाचा पडदा दूर करण्यासाठी मी देवाकडे ‘सद्बुद्धी’ मागतो का?

३. संत एकनाथांच्या वचनानुसार, तिन्ही लोकांत ‘धन्य’ होण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी मी रोजच्या जगण्यात नामस्मरणाचा आश्रय घेतो का?

– क्रमशः श्लोक ८९ आणि ९०

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘शिक्षण आणि सक्षमीकरण’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मीनल केळकर☆

मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

‘शिक्षण आणि सक्षमीकरण‘ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

एके दिवशी एका कंपनीत मुलाखतीच्या वेळी अनिल नावाच्या बॉसने सीमाला विचारले, “तुला या नोकरीसाठी किती पगाराची अपेक्षा आहे? “

सीमा बिनधास्त आत्मविश्वासाने म्हणाली, “किमान ९०, ००० रुपये. “

अनिलने तीच्याकडे पाहिलं आणि पुढे विचारलं, “तुला कुठल्या खेळात रस आहे का? “

सीमाने उत्तर दिले, “हो मला बुद्धिबळ खेळायला आवडते. “

अनिल हसत हसत म्हणाला, “बुद्धिबळ हा खूप मनोरंजक खेळ आहे. त्याबद्दल बोलूया. तुम्हाला कोणता बुद्धिबळ पॅटर्न सर्वात जास्त आवडतो? किंवा तुम्ही कोणत्या चालीने सर्वात जास्त प्रभावित आहात? “

सीमा हसत म्हणाली, “वजीर. “

अनिलने उत्सुकतेने विचारले, “का? माझ्या मते घोड्याच्या युक्त्या सर्वात अनोख्या आहेत. “

सीमाने गंभीरपणे उत्तर दिले, “खरं तर घोड्याच्या चाली रंजक असतात, पण बाकीच्या शिक्क्यांमध्ये वेगळेपणाने आढळणारे सगळे गुण मंत्र्याकडे आहेत. ” तो कधी सीलसारखं पाऊल टाकून राजाला वाचवतो, कधी तहानेने चालत आश्चर्यचकित करतो, तर कधी ढाल बनून राजाचे रक्षण करतो. “

तीच्या समजूतदारपणाने प्रभावित होऊन अनिलने विचारले, “खूप मनोरंजक! पण राजाबद्दल तुझे मत काय आहे? “

सीमाने लगेच उत्तर दिले, “सर, बुद्धिबळाच्या खेळात मी राजाला सर्वात कमकुवत मानते. ” तो स्वत:चा बचाव करण्यासाठी फक्त एक पाऊल उचलू शकतो, तर मंत्री त्याला प्रत्येक दिशेने संरक्षण देऊ शकतो. “

सीमाच्या प्रतिसादाने अनिल प्रभावित झाला आणि म्हणाला, “खूपच हुशार! उत्कृष्ट उत्तर. आता मला सांग यापैकी कोणता चेहरा तू स्वत:ला मानतेस? “

सीमाने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले, “राजा. “

अनिल थोडं आश्चर्यचकित होऊन म्हणाला, “परंतु पंतप्रधानांच्या मदतीची नेहमी वाट पाहणाऱ्या राजाला तुम्ही दुर्बल आणि मर्यादित म्हटले आहे. ” मग तू स्वतःला राजा का मानतेस? “

सीमा हलके हसत म्हणाली, “हो, मी राजा आहे आणि माझा मंत्री माझा नवरा होता. त्याने नेहमी स्वतःपेक्षा माझे रक्षण केले, प्रत्येक अडचणीत मला साथ दिली, पण आता तो या जगात नाही. “

हे ऐकून अनिलला जरा धक्काच बसला आणि त्याने गंभीरपणे विचारले, “मग तुला हे काम का करायचं आहे? ” “

सीमाचा आवाज भरून आला, तिचे डोळे ओले झाले. तीने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, “कारण माझे प्रधान आता या जगात नाहीत. आता मला प्रधान होऊन माझ्या मुलांची आणि माझ्या आयुष्याची जबाबदारी घ्यावी लागेल. “

हे ऐकून खोलीत शांतता पसरली. अनिल टाळी वाजवत म्हणाला, “शाब्बास, सीमा. तू एक मजबूत स्त्री आहेस. “

शिक्षण आणि सक्षमीकरणाचे महत्त्व — — —

जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणींना तोंड देणाऱ्या सर्व मुलींसाठी ही कथा प्रेरणादायी आहे. मुलींना चांगले शिक्षण देणे आणि त्यांचे संगोपन करणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून त्यांना कधीही कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला तर त्या प्रधान बनू शकतील आणि स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक मजबूत ढाल बनू शकतील…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तसंच जाऊ नको..!  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

श्री मिलिंद जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ तसंच जाऊ नको..!  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

आपले संस्कार, आपली संस्कृती.

घरी आलेल्या कुणालाही ‘तसंच’ पाठवायचं नाही आणि आपण कुणाकडे जाताना ही ‘तसंच’ जायचं नाही हा आमच्या घरचा शिरस्ता!

या ‘तसंच’मध्ये जगभरचा पाहुणचार सामावलेला होता.

माझे कुणी मित्रमैत्रीण ठरवून आले की बटाटेवडे कर, अचानक आले तर त्यांच्या आवडीचा गोडाचा शिरा नाहीतर सांजा कर.. अगदीच वेळ नसेल तरी धडपडत उठून किमान “सफरचंदाची एक फोड तरी खा” म्हणत ती हातावर दे.

आई-बाबांचे ऑफिसमधले कुणी पाहुणे आले तर किमान चहा तरी कर.

नातेवाईकांपैकी कुणी येणार असेल तर खास आवडी-निवडी जप हे सारं कसे अध्याहृतच होतं.

हे सगळं करताना आई-आजीच्या चेहऱ्यावर कधी आठी यायची नाही, कधीही श्रम दिसायचे नाहीत, आणि त्यांचं स्मितहास्य पण लोपायचं नाही… इतकं ते सारं अगदी सहज होतं! सहज होतं म्हणूनही ते सुंदरपण होतं!

पाहुण्यांसाठी असलेल्या ह्या नियमाला एक पोटनियमही होता. आपल्याच घरातून निघतानाही ‘तसंच’ निघायचं नाही. घरातल्या सर्व माणसांसाठीही एक उपनियम होताच!

सकाळचा चहा पिऊन झालेला असला तरी, “‘तशीच’ जाऊ नको ग कॉलेजला! ” असं म्हणत आजी तूपसाखर लावलेली एक पोळी घेऊन माझ्या मागे उभी असायचीच.

मनसुखानी नावाचा प्रोफेसर त्यावेळी आम्हां मुलींमध्ये भारीच फेमस होता. आमच्या गप्पांतून आजीला हे कळलं असावं. आणि मग..

“आजी, उशीर होतोय ग.. नकोय मला.. मी जाते तशीच, ” असं म्हणण्याचा अवकाश…

ती त्या मनसुखानीच्या नावाने बोटं मोडायची.

“त्या मनसुखानीला म्हणावं एवढी पोळी खाल्ल्याशिवाय माझी आजी काही मला ‘तशीच’ सोडत नसते. बाकी तू तुझं बघ, ” असा तिचा राग उफाळून यायचा पण घरातून निघताना ‘तसंच’ जायचं नाही हा तिचा नियम आम्हाला पाळायलाच लागायचा.

आपण कुणाकडे जातानाही ‘तसंच’ जायचं नाही हा या सगळ्याचा व्यत्यास.. तोही तितकाच खरा होता. आत्याकडे जाताना खास ठेवणीतल्या लोणच्याची बाटली भरली जायची. मावशीला आवडतात म्हणून घारगे व्हायचे.. एक ना दोन! यातलं काहीच नाही जमलं आणि अचानक कुणाकडे जावं लागलं तर जाता जाता द्राक्षं घे.. चिकू घे, असलं काही न काही त्या करायच्या.

हे सगळे सोपस्कार आई-आजी पाळायच्या इथपर्यंत ठीक! पण मी माझ्या शाळा-कॉलेजच्या वयात काही कामासाठी कोणाकडे एकटीच जातेय तरी या ‘तशीच’ जाऊ नको गं, म्हणायच्या आणि मग मात्र माझी चिडचिड व्हायची. मी कधी ऐकायचे, पण अनेकदा त्या-त्या वयातल्या न ऐकण्याच्या नादात ‘तशीच’ निघून जायचे. लहान आहे.. मोठी होईल तेव्हा कळेल, असं म्हणून सोडूनही द्यायच्या!

एकदाच आजीने या चिडचिडीवरचा उतारा केला.

मला म्हणाली, “कपभर चहाही न देता कुणाला ‘तसंच’ पाठवशील किंवा रिकाम्या हाताने कोणाकडे जाशील.. तर आपल्या घरातलं काही जाणार नाही.. पण पत मात्र जाईल. ज्याला ऐपत आहे, त्याने आपली पत सांभाळावी. ”

आजही माझ्या आणि माझ्यासारख्या अनेक घरातून ‘तसंच’ कुणी जात नाही. आणि आपणही ‘तसंच’ कुणाकडे जात नाही.

काय करणार..?

आजीचे नाते सांगणारी मौल्यवान विद्यापीठं शब्द पेरून आपल्या आसपासच वावरत असतात ना.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: श्री मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? विविधा ?

☆ “गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने…☆ श्री जगदीश काबरे ☆

गुरुपौर्णिमा हा दिवस पारंपरिक अर्थाने गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मानला जातो. परंतु बदलत्या काळात गुरु या संकल्पनेकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. ज्ञान हे आज एका व्यक्तीच्या मक्तेदारीत राहिलेले नाही. पुस्तके, प्रयोग, संवाद, संशोधन आणि तंत्रज्ञान यांमधून ज्ञानाचे असंख्य स्रोत उपलब्ध झाले आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याला केवळ आज्ञाधारक शिष्य बनविण्यापेक्षा विचार करणारा, प्रश्न विचारणारा आणि नवनिर्मिती करणारा नागरिक बनविणे अधिक महत्त्वाचे ठरते.

पारंपरिक गुरुशिष्य परंपरेने भारतीय समाजाला मोठी सांस्कृतिक परंपरा दिली असली तरी तिच्या काही रूपांमध्ये गुरुचे वचन अंतिम मानण्याची प्रवृत्ती वाढली. अशा वातावरणात शंका विचारणे, मतभेद मांडणे किंवा प्रस्थापित विचारांना आव्हान देणे हे अनेकदा अनुचित मानले गेले. अशा विद्यार्थ्याला उद्धट, दुर्वतनी समजले गेले. परिणामी, ज्ञानाचे चिकित्सक आकलन करण्याऐवजी ते स्वीकारण्यावर भर राहिला. गुरुशिष्य परंपरेचा सगळ्यात वाईट परिणाम म्हणजे प्रश्न विचारण्याची सवय कमी झाली की नवनिर्मितीची शक्यतादेखील कमी होते, हा आहे. याउलट शिक्षकमित्र ही संकल्पना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नात्याला अधिक लोकशाहीवादी आणि सर्जनशील स्वरूप देते. शिक्षकमित्र विद्यार्थ्याला तयार उत्तरे देत नाही; तो योग्य प्रश्न विचारायला शिकवतो. तो विद्यार्थ्याच्या शंका ऐकून घेतो, त्याच्या विचारांना दिशा देतो, चुका करण्याची आणि त्यातून शिकण्याची मोकळीक देतो. अशा वातावरणात विद्यार्थी केवळ माहितीचा संग्रहकर्ता राहत नाही, तर ज्ञानाचा शोध घेणारा संशोधक बनतो. विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य आणि समाजपरिवर्तन या सर्व क्षेत्रांतील मोठे शोध प्रश्न विचारण्याच्या धैर्यातूनच जन्माला आले आहेत.

एकविसाव्या शतकातील शिक्षणाचे उद्दिष्ट आज्ञाधारक अनुयायी घडविणे नसून स्वतंत्र विचार करणारे, विवेकशील आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्व घडविणे हे असले पाहिजे. त्यामुळे गुरुपौर्णिमा साजरी करताना केवळ व्यक्तिपूजेला महत्त्व देण्याऐवजी जिज्ञासा, चिकित्सक विचार, मुक्त संवाद आणि ज्ञानाच्या सततच्या शोधाला प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकाची गरज आहे. म्हणूनच भविष्यात गुरुपेक्षा शिक्षकमित्र ही संकल्पना अधिक उपयुक्त ठरणारी आहे, कारण ती विद्यार्थ्याला अंधानुकरणाची साखळी तोडण्यासाठी विचारांचे बळ देते. त्यामुळे परंपरेचा आदर राखत, पण आधुनिक काळाच्या गरजेनुसार शिक्षणाचे आणि गुरु म्हणवल्या जाणाऱ्या शिक्षकांचेही स्वरूप बदलण्याची वेळ आता आली आहे हे निश्चित. म्हणून मला वाटते की, गुरुशिष्य या नात्यापेक्षासुद्धा शिक्षकमित्र हे नाते जास्त महत्त्वाचे आहे. कारण गुरुशिष्य परंपरेत ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ याप्रमाणे गुरु आज्ञा प्रमाण मानली जाते. शिष्य शंका आणि प्रश्न विचारत नाही. त्यामुळे नवीन काही निर्माण करू शकत नाही. गुरुने दिलेले ज्ञान घोकंमपट्टी करून विद्वान झाल्याचा त्याच्यात आभास निर्माण होतो. त्या उलट शिक्षकमित्र या नवीन परंपरेत विद्यार्थी शंका विचारतो, प्रश्न विचारतो आणि आपल्या विचारांना शिक्षकमित्राच्या सहाय्याने निश्चित दिशा देतो. त्यामुळे काहीतरी नवीन करण्याची उर्मी त्याच्यात संचारते.

एवंच कधीतरी पारंपारिक विचारांच्या पलीकडे जाऊन आधुनिक काळानुसार आपण विचार करायला सुरुवात करणार आहोत काय, हा प्रश्न या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लाहोर की मिट्टी.. ” – लेखक : श्री अमरनाथ सिंग ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

??

☆ “लाहोर की मिट्टी.. ” – लेखक : श्री अमरनाथ सिंग ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

माझी आई पंजाबी ड्रेस घालायची. साडी किंवा लुगडं नेसणाऱ्या बायांमध्ये ती वेगळीच दिसायची. मला ते खूप खटकायचं. असं वेगळं दिसणं मला अजिबात आवडायचं नाही. मी लहान असतांनाची ही गोष्ट. मी लाडीगुडी लावायचो, कधी कधी हट्ट करायचो, साडी नेस म्हणून. तिला काही ते जमलं नाही.

तिचं लग्न झालं तेव्हा ती घागरा-कुर्ता घालायची. हरियाणाचा हा पारंपरिक वेश आहे. तिकडे गावी सोनिपतला असतांनाची ही गोष्ट. लग्नात माझ्या नानांनी तिला अकरा किलो चांदीचे दागिने दिले होते. घागरा-कुर्त्यासह एव्हढे दागिने अंगावर ती कसे वागवत असेल या विचारांनी आम्ही अचंबित व्हायचो. मग जेव्हा इकडे आली महाराष्ट्रात, तेव्हा पंजाबी ड्रेस घालू लागली. तिला मग त्याचीच सवय झाली. नंतर तिला पेहराव बदलणं जमलंच नाही. आयुष्यात एकदाही तिने साडी नेसली नव्हती.

महाराष्ट्राचे परिधान नाही पण भाषा मात्र तिने पुरेपूर आत्मसात केली होती. घराबाहेर तिचा सगळा जीवनव्यवहार मराठीतच चालायचा. नंतर सगळ्या बहिणींच्या बाबतीतही अगदी असंच घडलं.

आईच्या मैत्रिणी सगळ्या मराठी बोलणाऱ्या बाया होत्या. ती त्यांच्याशी उत्तम मराठीत बोलायची. नर्सरीत कामाला जायची. ही नर्सरी (नाशिक जिल्ह्यात) वैतरणा धरणाच्या जवळ होती. ७२च्या दुष्काळात आईची पाटबंधारे खात्यातील नोकरी गेली. वडिलांच्या एकट्या नोकरीवर घर चालणे कठीण होते. दोन बहिणी लग्नाच्या होत्या. नर्सरीत रोजंदारीवर ती जाऊ लागली.

मी दुसरीत असेन. तिच्या सोबत कधी कधी नर्सरीत जायचो. दुपारी सगळ्या बाया रिंगण करून जेवायला बसायच्या. सगळ्यांच्या पुरचुंड्या आणि डबे मधोमध मांडले जायचे. ज्वारी-बाजरी-नाचणीच्या भाकऱ्या, लसणाची चटणी, बेसन, ठेचा, कांदा, मुळा, मेथी, कांद्याची पात, भाजलेले शेंगदाणे… त्या सगळ्या गप्पा मारता मारता आवडीने जेवायच्या. कष्टकरी समूहाचे एकमेकांशी वाटून खाण्याचे ते दृश्य माझ्या मनावर कायमचे कोरलं गेलं आहे.

धृपताबाई आईची मैत्रीण. दोघी शनिवारी नाशिकला जाऊन फळं आणि भाज्या आणायच्या. रविवारच्या आठवडे बाजारात दोघी ते विकायच्या. शेजारी-शेजारी जमिनीवर दुकान मांडली जायची. सगळा व्यवहार मराठीत चालायचा. एक काष्टेवाली आणि एक पंजाबी ड्रेसवाली अशा या मैत्रिणी सगळ्यांच्या खूप परिचयाच्या होत्या.

सकाळी लक्ष्मीबाई दूध घालायला यायची. लुगड्यातली लक्ष्मीबाई, तिच्या कपाळावरील भलं मोठं कुंकू, नाकातील नथ आजही ठळक आठवते. सगळ्यात शेवटी ती आमच्याकडे यायची. किटली-कळशीत शिल्लक असलेलं सगळं दूध बळंबळं घालून जायची. आई तिला कप-बशीत चहा द्यायची. एका हाताने हळूच नथ बाजूला सारून बशी ओठाला लावून ती जोरात फुरका मारायची. फुरक्याचा तो आवाज अजूनही कानात गुंजतो. चहा झाला की त्या दोघी सुख-दुःखाच्या गोष्टी करत घटकाभर बसायच्या.

माझा जन्म इथे महाराष्ट्रात झाला. इथेच वाढलो. आसपास मराठी वातावरण होतं. आम्ही सगळी बहीण-भावंडं मराठी माध्यमातून शिकलो. त्यामुळे आम्ही सगळे उत्तम मराठी बोलू लागलो. आज मी सगळं वाचन-लेखन मुख्यतः मराठीतच करतो. हे मला आपसूकच मिळालं आहे. आसपासच्या वातावरणातून.

आश्चर्य वाटतं मला आईचं. तिचा जन्म लाहोरचा. फाळणीनंतर उसळलेल्या दंगलीत जीव वाचवून त्यांचं कुटुंब इकडं आलेलं. फाळणीच्या काळात आई अकरा वर्षांची असेल. तसं कळतं वय होतं तिचं. तेव्हा तिला दोन भाषा यायच्या, घरात बोलली जाणारी हरियाणवी आणि आसपास मोहल्ल्यात बोलली जाणारी पंजाबी.

पुढे दहा बारा वर्षे हरियाणात गेली. नंतर तिचं लग्न झालं अन रोजगाराच्या शोधात ती वडिलांसोबत महाराष्ट्रात आली. अंगावरच्या कपड्यानिशी ते आले होते. हरियाणवी आणि पंजाबीशिवाय त्यांना इतर कोणतीही भाषा येत नव्हती. मराठीचा एक शब्दही त्यांनी ऐकलेला नव्हता.

त्यांचा पहिला ठिकाणा नगर जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातला घोडनदी प्रकल्प. पाटबंधारे खात्यात रोजंदारी कामगार म्हणून लागले. पुढे सेवेत पर्मनंट झाले. तिथे जवळपास एक दशक राहून बदली होऊन ते आले नाशिक जिल्ह्यात वैतरणानगरला. तिथे आणखी एक दशक राहिले. मग परत बदली झाली ठाणे जिल्ह्यातील सुर्याप्रकल्पावर. तिथे २००० साली ती सेवानिवृत्त झाली. तिथून पुढचा काळ देहूरोडला. २०१५ ला पुण्यात माझ्याकडे असतांना तिचा मृत्यू झाला.

अर्ध्या शतकाचा हा महाराष्ट्रातला तिचा रहिवास. या काळात अगदी पहिल्या टप्प्यातच तिने मराठी आत्मसात केली. वडील सुद्धा चांगलं मराठी बोलायचे. पण आईसारखं अस्खलित नाही.

आईने मराठी कशी आत्मसात केली असेल. तिला प्रेरणा नेमक्या कशा मिळाल्या असतील. ती पूर्ण निरक्षर होती. नवी भाषा शिकण्याची प्रक्रिया तिच्या अंतःकरणात नेमकी कशी घडली असेल, हे जाणून घेण्याची प्रचंड इच्छा मला ती गेल्यानंतर निर्माण झाली. आयुष्याच्या धावपळीत बरेच तपशील असेच सुटून जातात. नंतर त्याचं महत्व जाणवतं. मग जीव हळहळत राहतो.

भाषा आत्मसात करतांना नेमकं काय घडलं होतं आईच्या बाबतीत? आज ते कसं कळणार? आता केवळ आठवणी उरल्या आहेत. मी आठवणींचा धांडोळा घेऊ लागतो. मागे मागे जाऊ लागतो. मला तिचे शब्द आठवतात.

ती म्हणायची,

“बेटा, जिस मिट्टी में उगा अन्न खाते हैं,

जहां का पाणी पिते हैं,

वहां की बाणी (भाषा) 

म्हारी नस नस में बस जाणी चेईये. ” 

अशी नाळ जुळली होती मायची अन मराठीची!

जवळपास पन्नास वर्षे महाराष्ट्रात राहून ती खऱ्या अर्थाने मराठी मातीची लेक बनली होती. शेवटी या मातीत ती सामावली.

आम्ही तिचं अस्थी विसर्जन देहूगावला इंद्रायणी नदीत केलं.

#लाहौर_की_मिट्टी

#इंद्रायणी_के_जल_में_समा_गयी

– 

लेखक : अमरनाथ सिंग

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बांध!!!” ☆ मोहिनी किंहिकर हेडावू ☆

मोहिनी किंहिकर हेडावू

??

☆ “बांध!!!☆ मोहिनी किंहिकर हेडावू 

मी युगान युगाची विरहिणी! सागर मिलनाची आस असलेली!! अनंत काळापासून!!

नाही आवडत मला, माझ्या वर बांध घातलेले! मला वाहू द्या माझ्या मनाप्रमाणे! निरागसपणे! अविरत! अखंड! सागराकडे!! जो बाहू पसरून कधीची माझी वाट बघत आहे!!!

घाला बांध माझ्यावर, कितीही, पण माझ्या मनावर बांध घालू शकत नाही कोणी! ते तर कधीच सागरा कडे जाऊन त्याच्या बाहुपाशात विसावले आहे.!! जेव्हा त्याची ओढ अनावर होते, तेव्हा मी माझे मित्र काळे मेघ, यांना मदतीला साद घालते आणि तेही तेवढ्याच तत्परतेने येतात. कदाचित माझी स्थिती पाहून त्यांचे त्यांना अश्रू थोपविता येत नसावे आणि ते बरसताता, वर्षाव करताता… तेव्हा बांधकाम विशारद म्हणतात, “बांधाचे दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे ‘, हे ऐकून माझे कान तृप्त होतात!

मी प्रियकराला भेटायचे म्हणून तयारीला लागते. खूप खूप बोलायचे असते. कमी वेळात! त्याची एकदा उजळणी करून घेते आणि तो क्षण येतो ज्याची मी आतुरतेने वाट बघत असते!! दरवाजे धडकन उघडतात… मी बेभान धावत सुटते,… माझ्या पायाचे मलाच ओझे वाटते… पण मी धावत असते… माझ्या भेटीसाठी आसुसलेला तोही! तो आपले भरभक्कम बाहू पसरतो… आणि त्याच्या बाहुपाशात मी विरघळत जाते,… स्वतःचे अस्तित्व विसरते! एकरूप होते!!

पण ह्या मिलानाला मात्र चंद्र साक्षी नसतो! कारण तो फक्त नश्वर प्रेमीयुगल यासाठीच आपले चांदणे पसरत असतो!!

आमच्या अमर प्रेमासाठी काळे मेघ असतात, दिलासा देतात! मध्येच कधीतरी वीज चमकते. त्या प्रकाशात मला दिसतात ते माझ्या प्रियकराचे सागराचे अथांग डोळे, ज्यात माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी प्रेम सामावलेले असते! आणि आणि माझ्यावर कधी तरी बांध घातले होते, हेदेखील मी विसरते!

© मोहिनी किंहिकर हेडावू

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८७ आणि ८८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८७ आणि ८८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ८७ – – 

मुखी राम त्या काम बाधू शकेना ।

गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ।

हरिभक्त तो शक्त कामास मारी ।

जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ।।८७।।

अर्थ : ज्या व्यक्तीच्या मुखी रामनाम आहे, त्याला कामवासना त्रास देऊ शकत नाही. नामाच्या शक्तीमुळे कामवासनेवर ताबा मिळवण्यासाठी लागणारे धैर्य त्याला आपोआप प्राप्त होते. नामामुळे सामर्थ्य प्राप्त झालेला भगवंताचा भक्त कामवासनेला सहज नष्ट करू शकतो. या गोष्टीचे मूर्तिमंत उदाहरण असलेला आणि ब्रह्मचर्याचे पालन करणारा मारुती जगामध्ये खरोखरच धन्य झाला आहे.

(काम – कामवासना, गुणे – त्या योगाने, शक्त – सामर्थ्य)

विवेचन :  काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे माणसाचे मोठे शत्रू आहेत. ठरवले तर क्रोध, मद, मोह आदी विकारांवर नियंत्रण मिळवणे सोपे असते. परंतु काम हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू. त्यावर नियंत्रण प्राप्त करणे भल्याभल्यांनाही अवघड. विश्वामित्रांसारख्या तपस्वी ऋषींची तपश्चर्या मेनकेने भंग केली. पराक्रमी आणि विद्वान असलेला रावण आपल्या कामवासनेवर नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यामुळे कामवासना जिंकणे अत्यंत अवघड. संसारी माणसाला कामवासनेचा मर्यादित उपभोग घेण्यास शास्त्रांची ना नाही. परंतु साधना करायची असेल तर संसारी व्यक्तीने देखील कामवासनेवर नियंत्रण ठेवणे क्रमप्राप्त असते. आपण ‘ काम ‘ आणि ‘ राम ‘ दोन्ही एकाच वेळी साध्य करू शकत नाही. ‘ राम ‘ हवा असेल तर ‘ काम ‘ सोडावा लागेल.

परंतु ज्याच्या मुखी रामनाम येते आहे, अशी व्यक्ती कामवासनेवर विजय मिळवू शकते. त्याला कामवासना बाधित करू शकत नाही. रामभक्त हनुमान हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. त्याच्या हृदयात रामनामाचा अखंड जप सुरु आहे. त्यामुळे ‘ काम ‘ भावनेला तेथे थारा नाही. हनुमंत म्हणजे अखंड ब्रह्मचर्य पालन करणारा. मुखात रामनाम आणि ब्रह्मचर्य पालन यामुळे त्याच्या अंगी धैर्य, शक्ती यासारखे इष्ट गुण निर्माण झाले आहेत. त्याला ‘ काम ‘ विचलित करू शकत नाही. जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी तो लंकेत गेला तेव्हा रावणाच्या अंतःपुरात अनेक सुंदर स्त्रिया नको त्या अवस्थेत त्याच्या नजरेस पडल्या. परंतु सदैव जो रामनामातच रंगला आहे, अशा महाबली हनुमंताला ते दृश्य विचलित करू शकले नाही. सीतेच्या समोरही तो आपल्या स्वतःचा तिचा पुत्र म्हणून उल्लेख करतो. म्हणूनच ब्रह्मचारी असलेला हनुमान जगात धन्य आहे.

म्हणून समर्थ म्हणतात, ” हरिभक्त तो शक्त कामास मारी ” जो कायम हरीची भक्ती करतो, असा सामर्थ्यशाली माणूस कामवासनेला मारून टाकण्यासाठी समर्थ असतो. अशा व्यक्तीचे नाम परा वाणीपर्यंत पोहोचलेले असते. परा वाणीचे केंद्र हे नाभीजवळ आहे असे म्हटले जाते. कामवासनेचे केंद्र देखील त्याच ठिकाणी आहे. एकदा का नाम नाभीपर्यंत परा वाणीच्या माध्यमातून पोहोचले की तेथे कामवासना राहूच शकत नाही. संत कबीर म्हणतात, ” जहाँ काम तहाँ राम कहाँ । जहाँ राम तहाँ काम कहाँ।”

स्वतः समर्थच या श्लोकाचे उत्तम उदाहरण आहेत. मुखी अखंड रामनाम आणि ब्रह्मचर्य पालन. त्यामुळे शक्ती, धैर्य हे गुण आपोआपच त्यांच्या ठायी वास करीत होते. त्यामुळे रामसेवेचे मोठे कार्य त्यांच्या हातून घडले. म्हणूनच तेही जगात धन्य आहेत.

स्वसंवाद :: 

१. माझ्या दैनंदिन व्यवहारात माझे मन बाह्य आकर्षणे किंवा विकारांमुळे विचलित होते का? अशा वेळी मी हनुमंताप्रमाणे रामानामाचा आश्रय घेतो का?

२. “जिथे काम तिथे राम नाही, आणि जिथे राम तिथे काम नाही, ” हे कबीरांचे वचन लक्षात ठेवून मी माझ्या मनात प्रभू श्रीरामांना अढळ स्थान दिले आहे का?

३. माझ्या हातून होणारे नामस्मरण केवळ ओठांवर (वैखरी) आहे, की ते नाभीपर्यंत (परा वाणी) पोहोचून माझ्या विकारांचे शुद्धीकरण करत आहे?

४. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, स्वतःमध्ये ‘धैर्य आणि शक्ती’ हे उत्तम गुण निर्माण करण्यासाठी मी रोजच्या धावपळीत जाणीवपूर्वक भगवंताचे नाम घेतो का?

===== 

श्लोक क्र. ८८ – – 

बहू चांगले नाम या राघवाचे ।

अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ।

करी मूळ निर्मूळ घेता भवाचे ।

जिवा मानवा हे चि कैवल्य साचे ।।८८।।

अर्थ :  या रामाचे नाव अतिशय चांगले आहे. ते सुंदर, छोटेसे, म्हणायला सोपे आणि बिनखर्चाचे आहे. हे नाम भवाचे म्हणजे संसाराचे मूळ कारणच नाहीसे करते. हे नाम मोक्ष किंवा परमात्म्याचे दर्शन घडवणारे आहे.

(साजिरे – सुंदर /शोभून दिसणारे, स्वल्प – छोटेसे, फुकाचे – बिनखर्चाचे, मूळ – मूळ कारण, निर्मूळ – समूळ उच्चाटन करणे, कैवल्य – मोक्ष/चिरंतन सुख, साचे – नक्कीच/खरोखर)

विवेचन :  या श्लोकात समर्थ नामाचे महत्व पुन्हा एकदा स्पष्ट करतात. ‘ राम ‘ हे नावच किती चांगले आहे! सुंदर आहे, अल्पं आहे. ते घेण्यास कोणताही खर्च करावा लागत नाही. बरं, हे नाव घ्यायचे तरी कशासाठी? तर समर्थ सांगतात की हे नाम ज्या संसारात येऊन माणूस सुखदुःखे भोगतो, जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो, त्याचे मूळ कारणच नाहीसे करणारे आहे. हे मूळ कारण नाहीसे करते म्हणजे तरी काय करते? तर हे नाम कैवल्यप्राप्ती करून देणारे आहे. कैवल्य म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे चिरंतन सुख! तेच प्राप्त करून देणारे हे रामनाम.

एखादी छोटीशी परिणामकारक गोळी असावी आणि ती घेतल्याने आजार समूळ नाहीसा व्हावा तशी ही गुटिका आहे. दिसायला छोटी पण अत्यंत परिणामकारक. ज्याने ज्याने ती घेतली, त्याचा भवंताप नाहीसा झाला. पण खरे कारण असे की आमचा विश्वासच यावर बसत नाही. एक छोटेसे दोन अक्षरांचे नाम. त्याच्यात एवढे सामर्थ्य कसे असेल? पण त्याच्यातील सामर्थ्याचा प्रत्यय तेव्हाच येईल, जेव्हा ते मनापासून घेतले जाईल. वाल्या कोळ्याने रामनाम घेतले आणि अखिल विश्वाला वंदनीय अशा वाल्मिक ऋषींमध्ये त्याचे रूपांतर झाले. त्यांच्या हातून ‘ रामायण ‘ हा अजरामर ग्रंथ लिहिला गेला. रामाचे नाव काय करू शकत नाही. समुद्रात सेतू बांधणाऱ्या वानर सेनेने दगडावर फक्त ‘ राम ‘ असे लिहिले आणि काय आश्चर्य! ज्या दगडांचा मूळ गुणधर्म पाण्यात बुडण्याचा, ते चक्क पाण्यावर तरले. एवढेच नाही तर त्यावरून रामाची सेना लंकेला पोचली.

या भवसागरात आपल्यालाही तरून जायचे असेल तर हृदयामध्ये ‘ रामनामाला ‘ स्थान देणे जरूर आहे. अन्यथा पाषाणात आणि आपल्यात काही फरक राहणार नाही. बुडणे हे ठरलेले. रामनाम ही या भवसागरातून तारून नेणारी नौका आहे. बरं, हे नाम तरी किती सोपं, सुंदर आणि बिनखर्चाचे. बसल्या बसल्या, काम करताना तुम्ही केव्हाही ते घेऊ शकता. त्यातली गोडी ही अनुभवावी लागते. ती सांगून कळत नाही. अनुप जलोटा यांनी गायिलेले भजन ‘ जगमें सुंदर हैं दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम.’ आपल्याला माहिती असेल. ‘ राम ‘ या दोन अक्षरी शब्दात ‘ र ‘ हे अक्षर अग्निवर्णाचे निदर्शक आहे तर ‘ म ‘ हे अक्षर चंद्राची शीतलता दाखवणारे आहे. थोडक्यात म्हणजे ‘राम ‘ या शब्दात सूर्यशक्ती आणि चंद्रबल यांचा मिलाफ आहे. ते संतुलित आहे. म्हणूनच ज्याने ते घेतले, त्याच्या आयुष्यात संतुलन साधले जाते. ‘ जय जय राम, जय श्रीराम, दो अक्षर का प्यारा नाम, रामनाम के जपनेसेही बन जाते सब बिगडे काम. ‘

रामनाम घेण्याची मनाला सवय लावली तरच आयुष्याच्या अखेरीस मुखात रामनाम येईल. हे घडले तर कैवल्यप्राप्ती आहेच. मन विषयविकारात अडकले तर अखेरीस ओठावर रामनाम न येता अन्य कशात तरी मन अडकेल आणि मग पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकू. रामनामाचा जप केल्याने साधक रामरूप होतो. तुकाराम महाराज म्हणतात, “राम म्हणता रामच होईजे, पदी बैसोनि पदवी घेईजे. “

स्वसंवाद :: 

१. जे नाम अतिशय सुंदर, सोपे आणि ‘फुकाचे’ (बिनखर्चाचे) आहे, ते घेण्यासाठी मी आळस करतो की अत्यंत आदराने त्याचा स्वीकार करतो?

२. संसारातील सुखांमध्ये रमून मी केवळ ‘बुडणाऱ्या पाषाणासारखे’ आयुष्य जगत आहे, की रामनामाची नौका धरून या भवसागरातून ‘तरून’ जाण्याचा प्रयत्न करत आहे?

३. माझ्या आयुष्यात सुख-दुःखाचे प्रसंग येताना मानसिक संतुलन राखण्यासाठी, मी रामनामातील सूर्यशक्ती आणि चंद्रबलाचा अनुभव घेतो का?

४. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, “राम म्हणता रामच होईजे” या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी मी माझ्या मनाला नामस्मरणाची अखंड सवय लावत आहे का?

क्रमशः श्लोक ८७ आणि ८८

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ते ७३८ दिवस – – –  लेखक : श्री मनीष वाघ ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆

श्री अमोल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ते ७३८ दिवस – – –  लेखक : श्री मनीष वाघ ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर

ज्युलिया हिल

ते_७३८_दिवस – – 

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनाऱ्यालगत तब्बल दोन ते तीन हजार वर्षे वयोमान असलेल्या आणि ३०० फुटांपर्यंत वाढणाऱ्या ‘सेक्विया सेम्परविरन्स’ म्हणजेच ‘कोस्टल रेडवूड’ या प्रजातीच्या झाडांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. हे वृक्ष जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. या वृक्षांचे लाकूड फर्निचर बनविण्यासाठी वापरता येते, हे कळल्यावर एका लाकडी साहित्य बनविणाऱ्या कंपनीने या लाकडांचे कंत्राट मिळवले आणि मग या वृक्षांची बेसुमार तोड होऊ लागली. याचा दुष्परिणाम म्हणून जमिनीची धूप, सुपीक माती वाहून जाणे यांसारखे पर्यावरणाचे नुकसान तर झालेच; शिवाय जंगलातील इतर जैवविविधतेचेही अस्तित्व धोक्यात आले.

नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात तेव्हा अवघ्या विशीत असणाऱ्या ज्युलिया हिल या तरुणीने या जंगलाच्या संरक्षणासाठी लढा देण्याचा निर्धार केला. बरोबर २३ वर्षांपूर्वी, १० डिसेंबर १९९७ या दिवशी ती एका १, ५०० वर्षे वय असलेल्या वृक्षावर जमिनीपासून १८० फूट उंचावरील एका छोटय़ा मचाणावर जाऊन बसली. जोपर्यंत या वृक्षांना जीवदान मिळत नाही तोपर्यंत खाली उतरायचे नाही आणि अहिंसक मार्गाने आंदोलन करायचे, असे तिने व तिच्या सहकाऱ्यांनी ठरवले होते. त्यांचे हे आंदोलन दिवसागणिक पुढे सरकू लागले तसे त्या कंपनीचे धाबे दणाणले.

हाडे गोठविणारी थंडी, पावसाचा मारा होत असतानाही आंदोलन चालूच ठेवण्याचा ज्युलियाचा निर्धार पक्का होता. हे आंदोलन थांबवावे म्हणून त्या कंपनीने तिला साम-दाम-दंड-भेद वापरून अतोनात त्रास द्यायला सुरुवात केली, धमकीसत्र सुरू झाले. परंतु या कशालाच ज्युलिया बधली नाही. तिचे कुटुंबीय, तिचे सर्व सहकारीही ठामपणे तिच्या पाठीशी उभे राहिले. तिच्या या अनोख्या आंदोलनाला हळूहळू जगभरातून पाठिंबा मिळू लागला. अखेर लाकूडतोडय़ा कंपनीने माघार घेतली. ती ज्या झाडावर (तिने या झाडाला ‘लुना’ हे नाव दिले होते! ) ठाण मांडून बसली होती ते झाड तर वाचलेच, शिवाय त्याच्या आजूबाजूचे ६१ मीटर परिघातील जंगल हे कायमस्वरूपी ‘बफर झोन’ म्हणून घोषित करण्यात आले.

१८ डिसेंबर १९९९ रोजी, म्हणजे ७३८ दिवसांनी ज्युलिया झाडावरून खाली उतरली! आज ज्युलिया ‘सर्कल ऑफ लाइफ’ या ट्रस्टमार्फत ‘अहिंसक मार्गाने पर्यावरण रक्षण करा आणि वसुंधरा वाचवा’ हा संदेश देत जगभरातील जीवसृष्टीच्या संवर्धनासाठी झटत आहे.

लेखक : मनीष चंद्रशेखर वाघ

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कुटुंबातील मॅनर्स… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कुटुंबातील मॅनर्स… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की, समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं आणि ओवलेला दोरा संपला तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा. दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.

पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं अंघोळीला जाण्यापुर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं. दुसऱ्यानं तिसऱ्यासाठी, जेणेकरुन वेळ आणि इंधन बचत व्हायचीच; पण गैरसोयही टाळता यायची.

सुबत्ता वाढत गेली, तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवन शैलीही बदलत गेली. आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही, असं मात्र नाही.

आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं नीट पुरवणी आत ठेऊन निश्चित जागी ठेवला, तर दुसऱ्याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो नि शोधाशोध पण करावी लागत नाही.

पाण्याची बाटली आपण रिकामी केली तर लगेच भरुन फ्रीजमध्ये ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागत नाही.

बेसिनपाशी हँडवाॅश संपत असतं. ज्याला कळेल त्यानं रिफिल करायचं हा नियम केला, तर कोणालाही त्रास होणार नाही.

पाण्याचा ग्लास, चहाचे कप आपापले धुवून, घासून ठेवायचे हा नियम घरात पाळला तर भांडी कमी साठतील.

खाऊ, फळं, नियमित खाल्ले जाणारे पदार्थ किंवा कात्री, स्टेपलर, सेलोटेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे. आपली टर्न आल्यावर संपल्या नि बिघडल्या तर आठवणीने आणणे, ही काळजी घेणे.

घर सगळयांचं असतं. सगळी जबाबदारी गृहिणीची असं म्हणून जवाबदारी झटकून न टाकता एकत्र रहाण्याचे मॅनर्स सगळयांनीच शिकायची गरज आहे. प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात, पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो नि चुकीच्या सवयी लागतात.

घर ही एक संस्था समजून घराची एक शैली एक नियमावली जरुर तयार करा. हे एक लहानसं युनिट समजा. देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे असतात तसे घरातही काही नियम असले पाहिजेत तरच त्याचं हाॅटेल होणार नाही (खरंतर हाॅटेलचेसुध्दा नियम असतातच).

ही एक संधी आहे घराला घरपण देण्याची. सगळे घरात आहेत, काही एकत्र सवयी लावून घेतल्या, तर भविष्यात नक्कीच फायदा होईल.

आपल्या घरामध्ये कोणाचाही फोन आला तर एकमेकांना त्यांचे निरोप न विसरता देणे, घरातील कोणाकडेही मित्र-मैत्रीण आल्यास त्यांचे यथोचित स्वागत करणे, घरी येणारी व्यक्ती ही कुटुंबाची मैत्री आहे, असं समजून त्यांचे आदरातिथ्य करूया. घरातील प्रत्येक वस्तूवर व्यक्तींची नावे असलीच पाहिजेत असे नाही. बहुतेक सर्व वस्तू कॉमन असतात. त्याला ही घरपण म्हणतात. तसेच घरातील कोणतीही खाण्यापिण्याची वस्तू संपविण्यापूर्वी कोणी खायचे राहिले नाही ना? अशी चौकशी करावी. घरातील प्रत्येकाचे दिवसभराचे काम, अंदाजे वेळापत्रक, उद्योगातील आर्थिक व्यवहार एकमेकांना माहिती असण्याची आवश्यकता आहे.

कुटुंबातील माहेरची किंवा सासरची व्यक्ती असो, सर्वांचे समान आदरातिथ्य

असावे अशा प्रकारच्या गोष्टींना कुटुंबातील मॅनर्स किंवा संस्कार असे म्हणतात, याचे खूप चांगले परिणाम पुढील पिढीवर होतात.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares