मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आषाढ तळावा… लेखक : डॉ.शिवानंद सासरे ☆ प्रस्तुती: प्रज्ञा गाडेकर ☆

प्रज्ञा गाडेकर

 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आषाढ तळावा… लेखक : डॉ.शिवानंद सासरे ☆ प्रस्तुती: प्रज्ञा गाडेकर ☆

 

लेखक: 

 

आषाढ तळावा.. श्रावण भाजावा..

भाद्रपद उकडावा..!

पण हे असंच का?

पाऊस म्हणजे भारतीय परंपरेचा खाद्य-योग ! पावसाळा हा केवळ ऋतू नसून, निसर्गाच्या रसपूर्ण लीला अनुभवण्याचा एक सु-काळ होय. “तळणं, भाजणं आणि उकडणं..” या एकाच पावसाच्या तीन रूपांतरामागे लपलेलं आहे – आयुर्वेदिय तत्वज्ञान, शरीराची गरज आणि चविष्ट आनंदाचा मंत्र! पण असं खाणं कितपत सुरक्षित आहे ? असं खाणं म्हणजे नेमकं काय खाणं ?

 

१) आषाढ म्हणजे पावसाचा श्रीगणेशा.‌ आतून कोरडेपणा व बाहेरून गारवा अशा विचित्र परिस्थितीत सापडल्याने शरीर सर्वत्र आखडते. परिणामी सांधे- गुडघेदुखी, सर्दी- फडसे, थंडीताप, infections अशा वाताच्या समस्या वाढतात. जमिनीखालची उष्णता व पहिला मुसळधार पाऊस, यामुळे एकाच वेळी पित्त वाढते अन् वात सर्वत्र अडकून बसतो. या दोन्हींना तंतोतंत बॅलन्स करायचं असेल तर आषाढात “तळलेलं” खाणं हा अफलातून उपाय आहे !

 

विशेषत: कोलेस्टेरॉल जराही वाढू न देता, तळलेले व गरम पदार्थ शरीराला आतून गरम व बाहेरून नरम ठेवण्याचे काम अचूकपणे करतात. तळलेलं अन्न हेच त्यावेळी “औषध” बनते. आणि हे केवळ आषाढ महिन्यातच घडते !

 

म्हणूनच मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड, कुरड्या, चकल्या, शेव, तिखट मिठाच्या पुऱ्या इ. आधीच बनवून ठेवायची पद्धत आहे. जेणेकरून पहिल्या पावसात हे पदार्थ तळून खाता येतील आणि पावसाचे आजार टाळता येतील.

 

शिवाय पावसाचा पहिला रोमॅंटिक स्पर्श.. कढईतून बाहेर पडणारी कुरकुरीत कांदाभजी.. आणि कपातला उबदार चहा.. यासारखा Instant Romantic अंतर्बाह्य “आषाढ डायट” जगात शोधूनही सापडणार नाही !

 

२) श्रावण म्हणजे सणांचा महिना. जमिनीतली उष्णता संपून चकाकी ऊन पडू लागते. ऊन-पावसाच्या खेळातून गारवा कमी होतो, मात्र दमटपणा वाढतो. वात हळूहळू कमी होऊन शरीरावयवांचे आखडणे, दुखणे इ. तुलनेने कमी होते. मात्र पित्त वाढलेलेच असते. अशावेळी वाताचा फार विचार न करता, केवळ पित्त आटोक्यात ठेवणे महत्त्वाचं, म्हणून श्रावणात “भाजलेलं” खाणं सर्वोत्तम आहे.

 

आगीत भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, मका, वाटाणा, वांग्याचं सुगंधी भरीत, मातीचा वास घेणारी भाजलेली ज्वारीची भाकरी, भाजलेले पापड,‌ तांदूळ भाजून केलेला भात, भाजलेले लाडू इ. सर्व पित्ताचा राग थोपवतात. परिणामी ऍसिडिटी, मायग्रेन, हाय-बिपी, मुळव्याध ह्या तक्रारींचा जन्म होत नाही.

 

आणि हो, भाजलेलं खाण्याचा जो स्वर्गानुभव श्रावणात येतो, तो अख्या वर्षभरात कधीच येत नाही. कदाचित म्हणूनच आपल्याकडे “श्रावणमासी हर्ष मानसी…” असं म्हटलेलं आहे.

 

३) भाद्रपद म्हणजे ‌परतीचा पाऊस आणि तीव्र उकाड्याचं आगमन. गारव्याचा लवलेश संपल्याने वात बऱ्यापैकी शांत होतो. मात्र उकाड्यामुळे श्रावणात आधीच वाढलेले पित्त, शरीरात जिथे संधी मिळेल तिथे उद्रेक उत्पन्न करतो (ie पित्ताचा प्रकोप होतो).

 

हाच तो काळ जिथे जरा चुकीचं खाल्लं, की हार्टअटॅक, पॅरालीसीस, तीव्र ताप, कोणताही क्षुल्लक आजार अचानक गंभीर होणे इ. गोष्टी घडू लागतात. परिणामी सर्वाधिक वार्षिक मृत्यू ह्याच महिन्यात होताना दिसतात.

 

अशा अनुचित घटना टाळण्यासाठी भाद्रपद महिन्यात बहुतांश धार्मिक उपवास आलेले आहेत. जेणेकरून अन्न कमी खाल्ले जाईल आणि पित्त प्रकोप व्हायला वाव भेटणार नाही. याचसाठी भाद्रपदात “उकडलेलं” खाणं अगदी योग्य आहे.

 

जसे की, उकडलेल्या शेंगा, कंदमुळं, शेंगदाणे, उकडीचे मोदक, उकडून शिजवलेल्या पालेभाज्या, उकडलेला भात इ. प्रयत्नपूर्वक खाल्ल्याने October HEAT चे रूपांतर आपण October HIT मध्ये नक्की करू शकतो.

 

कदाचित म्हणूनच गणपती, गौरी, दुर्गा या देवता आपल्याला भेटण्यासाठी मुद्दाम भाद्रपदाचाच आसमंत निवडतात. कारण उकडलेलं अन्न म्हणजे शरीराला दिलेला शुद्धता व शांतीचा स्पर्शच ! नाही का ?

लेखक:डॉ. शिवानंद बासरे

प्रस्तुती: प्रज्ञा गाडेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # १०४३ ⇒ || अभंग || ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए दैनिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – || अभंग || ।)

?अभी अभी # १०४३⇒ आलेख – || अभंग || ? श्री प्रदीप शर्मा  ?

जो भजे हरि को सदा, वो ही परम पद पाएगा। हरि हजार हाथ वाला ही नहीं, हजार नाम वाला भी है। राम तेरे कितने नाम, विष्णु सहस्रनाम ! भक्त विभक्त भले ही नहीं होता हो, लेकिन अपने इष्ट के भक्ति भाव में अनुरक्त रहता है। वह जो भजता है, वह भजन हो जाता है।

भारत देश संतों की पावन भूमि है। संगत, संतन की कर ले। अयोध्या के मर्यादा पुरुषोत्तम राम हों, या फिर मथुरा, गोकुल, वृन्दावन के श्याम, सूर, तुलसी, और मीरा ही नहीं, गुजरात के नरसिंह भगत और महाराष्ट्र के संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, और समर्थ रामदास ने भी अपने भजनों से जन मानस को भक्ति रस में आंदोलित और आनंदित किया।।

कृष्ण भक्ति के कई आयाम हैं। वे ठाकुर जी भी हैं और मथुराधीश और द्वारकाधीश भी। वे ही राधाकृष्ण हैं और वे ही नाथद्वारा के श्रीनाथ जी भी। उनकी लीला अपरम्पार है। जगन्नाथ पुरी में अगर वे दाऊ बलराम और बहन सुभद्रा के साथ विराजमान हैं तो पंढरपुर में उनके साथ रुक्मिणी जी हैं। वृन्दावन के ही कृष्ण कन्हैया पंढरपुर में विट्ठल बन जाते हैं। यहां उनके साथ राधा रानी नहीं देवी रुक्मिणी विराजमान हैं।

जिस तरह अष्टछाप के संतों ने और रसखान और मीराबाई ने कृष्ण भक्ति में पदों की रचना की, उसी प्रकार महाराष्ट्र में संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव और जनाबाई ने पंढरपुर के विठोबा की भक्ति में लीन हो, मराठी में अभंग की रचना की। वैष्णव संप्रदाय की तरह महाराष्ट्र में भी वारकरी संप्रदाय है जो अपने विट्ठल के दर्शनार्थ अपने अपने स्थानों से जय श्री हरि विट्ठल का जयघोष और पांडुरंग के अभंगों का कीर्तन करते हुए पैदल ही पंढरपुर की ओर प्रस्थान करते हैं।।

संत ज्ञानेश्वर महाराज ने ही वारकरी संप्रदाय की नींव डाली। वारकरी का अर्थ होता है, परिक्रमा करना। देवशयनी एकादशी को यहां लाखों भक्त विठोबा रुक्मिणी मंदिर की नाचते गाते परिक्रमा और पूजा अर्चना करते हैं। मीराबाई के पदों की ही तरह विठ्ठलाच्या गवळणी महाराष्ट्र के घर घर में गाई जाती है।

आप कोई भाषा जानें यह जरूरी नहीं, बस पंडित भीमसेन जोशी का अभंग माझे माहेर पंढरी एक बार सुन लें।

विसरू नको रे आई बापा ला और धरिला पंढरी चा चोर जैसे कई अभंग आपकी भक्ति भाव की चेतना को भंग नहीं होने देंगे।।

चैतन्य महाप्रभु की यह कीर्तन विधा ही आज महाराष्ट्र में अभंग और वारकरी संप्रदाय के रूप में फल फूल रही है।

आइए पंढरपुर चलें.. !!

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जीवन’संपदा’ नष्ट करणाऱ्या संवेदनाहीनतेचे जाळे” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

“जीवन’संपदा’ नष्ट करणाऱ्या संवेदनाहीनतेचे जाळे ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

मानवी जीवनाला सर्वोच्च प्राधान्य या तत्वावरच मानवी समाजाची रचना झाली आहे… आणि त्यानुसारच कार्यपद्धतीही निश्चित करण्यात आली आहे. किंबहुना ती तशीच होणे अपेक्षित आहे. मृत्यू अटळ असला तरी तो नैसर्गिकपणे आला तरच त्याला अर्थ असतो. बाकी सर्व मृत्यू ‘बळी’ या प्रकारात मोडतात!

 घरोघरी वीजपुरवठा, इंटरनेट, टेलीविजन वाहिन्या इत्यादी सुविधांसाठी वायर्स, केबल्स, पाईप्स वापरणे गरजेचेच असते. यात या केबल्स इत्यादी इकडून तिकडे ‘फिरवणे’ क्रमप्राप्त असतेच. वीजपुरवठा केबल्स भूमिगत टाकता येतात. पण इतर केबल्सचे तसे नाही. एक इमारत ते दुसरी इमारत, मध्ये असणारी झाडे, विजेचे खांब इत्यादीवरून या केबल्स दुसरीकडे नेताना त्या खाली अधांतरी लोंबकळत राहणार हे निश्चित. वादळ, मानवी हस्तक्षेप, केबल्स खराब होऊन तुटून जाणे, चोरी करण्यासाठी केबल्स कापून नेणे व उरलेली केबल तशीच ठेवणे, यांमुळे या केबल्स खाली येतात. काही ठिकाणी या केबल्सच्या गुंडाळ्या करून बाजूला लटकत ठेवल्या जातात, चोर केबल कापून उरलेली केबल तशीच लटकवत ठेवून जातात, आणि या केबल्स जर लोकांच्या जाण्या-येण्याच्या मार्गात असतील तर त्या त्वरीत तिथून दूर करणे अनिवार्य असते. पण नेमकी हीच बाब दुर्लक्षित राहिल्याचे दिसते. कारण कुणाच्या जीवाचे कुणाला काही सोयरसुतक राहिलेले आहे, असे अजिबात आढळत नाही. आग लागलेली ज्याला दिसते त्याने त्याचक्षणी बोंब ठोकत इतरांना सावध करणे, सूचना देणे जसे केले जाते, तसे या बाबतीत केले जात नाही. काहीजणांना हा धोकाच लक्षात येत नाही. केबल्स यंत्रणा राबवणा-या लोकांच्या लक्षात आणून दिले तर लगेचच हालचाल होईलच असेही नाही. हा सर्वस्वी दोष आपल्या समाजव्यवस्थेचा, प्रशासनाचा आहे.

कायद्याच्या भाषेत सदोष मनुष्यवध हा प्रकार असतो. भारतीय दंड (शिक्षा) संहितेच्या १००/१०१ कलमानुसार साधारणत: अशी परिभाषा आहे की, एखाद्याच्या एखाद्या कृतीने, मनुष्याचा मृत्यू ओढवू शकतो, याची कल्पना असतानाही त्याबाबत योग्य ती काळजी न घेतली जाणे याला त्या व्यक्तीला, संस्थेला जबाबदार धरले जाईल. यासाठी १० वर्षे ते आजन्म कारावास आणि आर्थिक दंडाची तरतूद आहे. या प्रकारच्या घटनांमध्ये झालेला मृत्यू ‘वध’ म्हटले गेले आहे, यातच सगळे आले!

या कायद्याची अंमलबजावणी कटाक्षाने झाली तरच इतरांना जरब बसेल. परंतू आपल्याकडील मानसिकता, पळवाटा असणारे कायदे, लपवण्याची, फसवण्याची कला अवगत असणारे तज्ज्ञ, आर्थिक हितसंबंध, राजकीय हेवेदावे यांत सर्व जिरून जाते… आणि हवेत विरूनही जाते.

खड्डे खोदून ठेवले जातात, त्यांच्या भोवती संरक्षक व्यवस्था ठेवण्याची तसदी घेतली जात नाही, अंधारात माणसे या खड्ड्यात कोसळतात. शेतात शेततळी तयार होतात, तिथेही हीच त-हा. पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा मांजा चीन मधून येतो आणि चिनी आपल्या लोकांचा युद्धाशिवाय बळी घेऊ शकतात आणि त्यांना हा नायलान धागा मांजा म्हणून नालायक व्यापारी साहाय्य करतात. वाहने विरुद्ध दिशेने चालवून, अतिशय बेदरकारपणे चालवून, चीनी हेडलाईट्स लावून समोरच्याला तात्पुरते आंधळे करून जाणारे, वाहने रिवर्स घेताना, पार्क करताना त्यांच्याखाली कुणी मनुष्य, प्राणी नाही न हे पाहण्याची काळजी न घेणारे, बांधकामाच्या ठिकाणी वाळूत एखाद्या कष्टकरी महिलेचे लेकरू निजवले गेले असू शकते याचा विचार मनातही न आणणारे चालक, एकमेकांशी समांतर वाहने चालवत बोलत चाललेले वाहनचालक… मरणासाठी ही अशी हजारो कारणे आहेत. आणि या मरणांना आपण कारणीभूत होऊ शकतो, याची तिळमात्र शक्यता मनात नसणारी माणसेही लाखो आहेत. जगायचे कसे?

स्वत:च्या चुकीमुळे स्वत:चाच अपघातात मृत्यू झाला आहे, अशा व्यक्तीवर सुरुवातीला एफ. आय. आर. दाखल होतो! पण मृत व्यक्तीला शिक्षा देता येत नसल्याने हा गुन्हा रद्दही केला जातो. पण यासाठी न्यायिक प्रक्रिया असल्याचे ऐकण्यात आले आहे. पण जे इतरांच्या मृत्यूस कारणीभूत आहेत, अशांवरही ही प्रक्रिया लागू असते. परंतू हे खटले खूप प्रलंबित राहतात, हे दुर्दैव आहे… अफाट लोकसंख्या हे कारण तर आहेच पण त्यापेक्षाही राजकीय, सामाजिक इच्छाशक्तीचा अभाव हेही सर्वांत मोठे कारण आहे… जीव महत्त्वाचा मानला तर सर्वकाही करणे शक्य आहे… पण असो.

त्याला काय होतंय, मला काय त्याचं आणि हे असंच चालायचं अशी सार्वत्रिक वृत्ती बळावल्याने आपण आपली जीवन संपदा गमावण्याच्या अगदी जवळ असतो… हे सत्य आहे. फक्त तू आधी की मी आधी? एवढाच काय तो प्रश्न उरतो. कधी न कधी मरायचेच आहे, ज्याचे दिवस भरले तो जातो, आपण काय करणार? देव माणसाच्या मृत्यूला स्वत: जबाबदार राहू नये म्हणून अशाच काही सबबी शोधतो असेही लोक बोलतात. एक व्यक्ती जेंव्हा अशी अचानक, विनाकारण, दोष नसताना या जगातून जाते अर्थात तिला जावेच लागते… तेंव्हा अनेकांवर अनेक संकटे ओढवतात… ही यादी मोठी आहे!

त्यामुळे जे आता जिवंत आहेत, त्यांनी आपणही किंवा आपलेही कुणी यात केंव्हा तरी सापडू शकते, अशा विचाराने, एखादी आग लागली की आपण जसे धावत सुटतो, त्या पध्दतीने काही उपाय केले तरच हे थांबेल. अन्यथा… आपल्या कर्माची फळे भोगायला वर जाण्याची हल्ली गरज नाही… इथंच सर्व व्यवस्था आहे!

माझ्या मित्राची पत्नी, संपदा संदीप पटवर्धन अशाच एका केबल जाळ्यात अडकून जीवाला मुकली. त्यानिमित्ताने हे मनातले लिहिले आहे. विसरून जाऊ नका. कारण संपदाच्या वधाचा दोष आपल्याही माथी आहेच. पुढे असे आणखी पाप आपल्या हातून घडू नये, ही अपेक्षा आहे.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शोध अवकाशाचा” ☆ मोहिनी किंहिकर हेडावू ☆

मोहिनी किंहिकर हेडावू

अल्प परिचय 

कला शाखेतून पदवी घेतली

सध्या नागपूर मध्ये सहायक राज्यकर आयुक्त (Assistant Commissioner of State Taxes)

वाचनाची लिखाणाची आवड. ललित लेखन, कविता तसेच सामाजिक विषयावर लिखाण करायला आवडते. लोकप्रभा, तरुण भारत, देशोन्नती, मातृ सत्ता व जन्मंगळ मधून लेख प्रकाशित झाले.
नुकतच ‘मनातलं’ हा ललित लेखांचा संग्रह प्रकाशित.

??

☆ “शोध अवकाशाचा☆ मोहिनी किंहिकर हेडावू 

अमृता प्रीतम चा चौथा कमरा मला का नसावा?

म्हणून मी माझ्या अवकाशाचा शोध घ्यायचा ठरविले..

“आम्ही नाही बाई, कधी अश्या शोधाच्या मागे लगलो?

पोटापाण्याच्या प्रश्नातच अवकाश गुदमरून गेले… “असे अनेकांचे ताशेरे!

मी दुर्लक्ष केले..

बहिणाबाईंनी कुठे अवकाशाचा शोध घेतला? पण तिला गवसलेचना!

 

“कामात असतानाच ओवीच इन्क्यूबेशन..

तर जात्यावर बसल्यावर, त्या शब्दबध्द व्ह्यायच्या”

एका विदूषीचा मार्मिक टोमणा.

पण मी तिकडे दुर्लक्ष केले..

 

मी जिद्दीने मार्गक्रमण केले.. माझे अवकाश मला गवसले..

शरीराने कात टाकली. आणि मनानेही…

तिथे भाऊसाहेबांनी शायरीची मैफिल!

आर्किमिडीज बाथटब मध्ये युरेका म्हणत बसलेला..!

सिद्धार्थ ला बुद्धत्व प्राप्त होण्याचा क्षण अनुभवला!

तर काही हे क्षण आपल्या आयुष्यात येण्यासाठी रांगा लावून उभे!

मी गर्दीत माझ्यासाठी एक कोपरा शोधला.. उभे राहिले तिथेच… दाटीवाटीत!

ध्रुवला अढळ पदासाठी किती संघर्ष करावा लागला… हे उमगले.. !

‘भगीरथप्रयत्न ‘या शब्दाचा अर्थ ही!

 

मी होते माझ्याच धुंदीत!

मोकळा श्वास घेत!

 

भानावर आले…

पहाते तर मी एकटीच उभे!

सगळे घराकडे परतले.

माउंट एव्हरेस्ट चढल्यावर ही उतरावंच लागत… जगरहाटीत यावेच लागते…

व मीही जागी झाले.

स्वप्नातून…

अन् आले वास्तवात!

© मोहिनी किंहिकर हेडावू

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “यश हे अमृत झाले?” ☆ वर्षा बालगोपाल ☆

वर्षा बालगोपाल 

??

☆ “यश हे अमृत झाले☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

यश हे अमृत झाले सुख स्वर्गीचे आले

दिग्विजयाच्या मनोरथावर नक्षत्रांचे झुलते अंबर

मागेपुढती राजपथावर

लक्ष दीप लागले

यश हे अमृत झाले 

 *

स्तुतिसुमनांचे उधळित झेले जनगौरव तो जयजय बोले

कीर्तध्वजावर लावून डोळे भाग्य पुढे चालले

यश हे अमृत झाले 

 *

वैभव मिरवीत मंदिरी येता दिसेल डोळी ती मंगलता

सुख अंधारी मन व्याकुळता दु:ख सुखे हासले

 *

यश हे अमृत झाले

सुख स्वर्गीचे आले

परि दु:ख सुखे हासले

पुत्र व्हावा ऐसा चित्रपटातील पी सावळाराम यांचे गीत ऐकता ऐकता सुखदा आपला मुलगा सुशील याचे सायकल शिकणे आनंदाने पहात होती. सुशील अंगणात सायकल चालवायला शिकत होता. पहिल्यांदा हाफ पॅडलिंग करता करता दमून गेला. नंतर सीटवर बसण्याचा प्रयत्न करताना दोनदा तीनदा आपटला. हाताला लागलं, कपडे तर मातीत घोळून निघाले. पण तरीही जिद्दीने तो स्वतः सीटवर बसून पूर्ण पॅडलिंग करत सायकल चालवायला शिकला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. त्याच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून सूर्य सुद्धा थोडा ओशाळा झाला असेल.

अतिशयोक्तीचा भाग सोडला तर खरंच कष्टानंतर मिळालेल्या यशाचे वर्णन कितीही केले तरी कमीच असते. खरंच यश हे अमृत झालेले असते आणि त्या यशासाठी घेतलेले दुःख, झालेल्या यातना या सुद्धा सुखात परावर्तीत होतात.

त्या सुखात नकळत अजून चांगल्या गोष्टी कशा दडलेल्या असतात, तर सुशील आनंदात घरात आला. त्याने इकडे तिकडे पाहिले आणि हळूच कोणी नाही पाहून प्रथम बाथरूम गाठले. आपले कपडे पाहून आई रागवेल असे वाटून स्वतःचे कपडे स्वतः धुतले. स्वच्छ आंघोळही केली.

आई सुखदाने सगळे पाहिले होते. त्यामुळे तिने तेल हळद तयार ठेऊन खरचटलेल्या जागेवर ते लावले. लगेच गरम दूध प्यायला देऊन बेसनाचा लाडू पण दिला. आनंदाने जेव्हा सुशिलने आई आता मला सायकल येते हे सांगितले तेव्हा सुखदाने त्याला शाब्बासकी दिली. म्हणाली खरंच खूप आनंद होतोय. पण यशाहुनीही प्रयत्न सुंदर असतात बाळा.

बघ तू पडलास, तुला लागलं तरी तू प्रयत्न सोडले नाहीस जिद्द पक्की केलीस माघार घेतली नाहीस म्हणूनच तुला सायकल तर आलीच. पण आईच्या कामाची जाण येऊन तुला तुझे कपडे धुण्याइतके स्वावलंबी केले. तुला स्वच्छतेचे महत्व वाटून तुला कोणी न सांगताही आंघोळही केलीस.

जीवनातही असेच असते. भिंतीवर तोंडात खाऊ घेऊन जाणारी मुंगी पण खाली खाली घसरते, कधी पडते पण वर जाण्याची जिद्द धरून ती वर जातेच. एडिसनने हजार वेळा प्रयोग करून मग 1001 व्या वेळी ब्लबचा शोध लागला. त्यावेळी त्याच्या मुलाखतीत तो म्हणाला होता की काय केले नाही तर ब्लब लागतो हे मी वेगवेगळ्या हजार मार्गानी शिकलो. अपयश हे आपल्याला अनुभव देत असते आणि तोच मोठा गुरू होउन आपल्याला ज्ञानी करत असते.

सोहनलाल द्विवेदी यांची लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ही कविता आपल्याला एक सकारात्मकता देते.

म्हणूनच यशाचा सागर पार करायचा असेल तर प्रयत्नांच्या बेटांवर विसावायला हवं. ती बेटे कदाचित पैलतीरापेक्षा अधिक सुंदर असतात.

परवाच एक जण अतिशय निराश होउन बसला होता. कारण upsc परिक्षा सलग तिसऱ्यांदा अगदी थोड्या मार्कांने नापास झाला होता. म्हणाला अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे माहित होते पण येथे तर जीनाच तयार होताना दिसतोय. पण बाळा हे सुद्धा काही खोटे नसते. प्रत्येकवेळी जरी अपयश आले असे वाटत असले तरी तुम्ही यशाच्या कडे अजून थोडे पुढे गेलेला असता. यशाच्या शिखरावर जायला पायऱ्या चढयलाच हव्या. हेलिकॅप्टरने यश शिखरावर उतरणे याला काही अर्थ नसतो. तुम्ही तो जीना नजरेपुढे आणा. पहिली पायरी अपयश, दुसरी पायरी अपयश +निर्धार, तिसरी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न, चौथी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट, पाचवी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट+सातत्य, सहावी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट+सातत्य +सराव, सातवी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट+सातत्य +सराव+आत्मविश्वास, मग सातव्या पायरीनंतर यश तुमचेच असते. याचा अर्थ अपयशा नंतरपुन्हा तुम्ही तितकी अपयशे पचवण्याची मानसिकता ठेवली पाहिजे असा नाही. तर तुम्ही बाकीच्या सगळ्या पायऱ्या एका दमात सुद्धा चढू शकता आणि पुढच्या वेळेस लगेच यश मिळेलही. पण जर लगेच यश नाहीच मिळाले तर त्याने नाराज होउन प्रयत्न सोडून देण्या पेक्षा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले तर यश मिळणारंच हा आत्मविश्वास हवा.

सुशिलला मनोमन पटले आणि तो सहज म्हणाला 

यशाहुनीही प्रयत्न सुंदर 

दिलेस मंत्रा जपे निरंतर 

मिळेल याने मला पुरंदर 

म्हणेल आई मला धुरंदर ||

© वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १३ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १३. ☆ प्रा.भारती जोगी ☆

मृणालिनीदेवी रविंद्रनाथ टागोर 

ज्या सौंदर्याला मी फक्त माझ्या घरात पहायचो,

ते आज मला चांदण्यांत, फुलांत आणि नभात दिसते.

तू आता फक्त माझी राहिली नाहीस

तू या संपूर्ण सृष्टीचा एक भाग झालीस. 

हा वेदनेचा स्पर्श होत प्रकटलेला भावनांचा आवेगी ओघ आहे; जो…

विश्व कवी, कवी गुरू, गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांनी, आपल्या प्रिय पत्नीच्या निधनानंतर स्मरण या काव्यसंग्रहात प्रसृत करत ; प्रवाहित केला… स्मृती सुमन रुपात!! 

रवींद्रनाथांच्या वडिलांच्या टागोर इस्टेट मध्ये व्यवस्थापक असलेल्या बेनीमाधव यांची कन्या… भवतारिणी रविंद्रनाथांची पत्नी म्हणून आली त्यावेळी तिचं वय होतं ९ वर्षे… आणि रविंद्रनाथांचं वय होतं २२. लग्नानंतर तिचं नाव बदलून मृणालिनी ठेवण्यात आलं. अतिशय साध्या, ग्रामीण भागातून आलेली ही निरक्षर बालिका! एक नाजूक वेल… जी एका विराट वृक्षाच्या छायेत… त्याच्या आधारावर जगू पहाणारी.

पण तिचं भाग्य थोर की, विवाहानंतर घरचीच कामं केली पाहिजेत अशी कुणीही जबरदस्ती नाही केली. स्वतः रवींद्रनाथांनी तिला लोरे टे हाऊस या शाळेत इंग्रजी भाषा शिकायला पाठवले. पाटी-पुस्तक, गणवेश ते दाखला काढणे, हे सगळं केलं. संस्कृत भाषा शिकवायला, गृह-शिक्षक नेमला. आणि बघता-बघता… मुळातच प्रतिभावंत असलेली ही मृणालिनी… पाकळी-पाकळीने उमलंत… फुलू लागली… संपूर्ण उन्मिलित होण्यासाठी, सर्वांगाने उमलंत फुलवण्यासाठी, सुरू झालं तिचं उन्मिलन!! आणि बघता-बघता ही मृणालिनी इंग्रजी, संस्कृत, बंगाली या तिन्ही भाषांवर प्रभुत्व प्राप्त करत, पारंगत झाली. ही वेल त्या विराट वृक्षाच्या आधाराने, गगनावरी जाण्यास उत्सुक झाली.

आणि मग सुरू झाला एक अनोखा प्रवास… एका मुलीचा… अशिक्षित ते अनुवादक होण्याचा! 

लग्नाच्या वेळी निरक्षर असलेल्या मृणालिनी देवी भाषांतरकार म्हणून नावारूपाला आल्या.

प्राचीन भारतीय ग्रंथांचा सखोल अभ्यास करताना, त्यांना वाटले की, हे ज्ञान बंगाली वाचकांना ही मिळावे. म्हणून मृणालिनी देवींनी…

महाभारतातील अत्यंत क्लिष्ट आणि तत्वज्ञानाने भरलेल्या शांती पर्वाचा बंगालीत अत्यंत सोपा अनुवाद केला. अगदी ज्ञानेश्वर माऊलींच्या… ऐसी अक्षरे रसिके मेळविन… ची च आठवण आली.

इतकंच नाही तर कठोपनिषद याचे केलेले भाषांतर त्यांच्या भाषिक आणि वैचारिक प्रगती चे उत्तम उदाहरण म्हणावे!! त्यांनी अनुवादकाच्या भूमिकेतून या ग्रंथांचे सांस्कृतिक, आणि दार्शनिक महत्त्व दाखवून दिले.

मृणालिनी देवींची आपल्या पतीची ख-या अर्थानं सहचरी होण्याची ही तळमळ थेट पोहोचते आपल्या अंतरंगात!! टागोर घराण्याचा वारसा असलेल्या साहित्य, नाट्य या दोन कलांवर मृणालिनी देवींनी ही आपला स्वतः चा असा एक वेगळा ठसा उमटवला. नाटकांतून ही प्रमुख नायिकेची भूमिका केली. याशिवाय बालसाहित्य, कथा लेखन, बोधकथा लेखन ही केले.

टागोरांच्या वाड्याचा उंबरठा ओलांडून आल्यापासूनच… त्या घराण्याच्या साहित्यिक वारसा जपंत, पुढे पाऊल टाकत निघालेल्या मृणालिनी देवी जणू त्या वाटेवर मोठ्या आत्मविश्वासाने चालत राहिल्या याच विश्वासाने…

हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा

त्याच्या कृतार्थ डोळ्यांत, झुले उंच माझा झोका…

आणि खरंच रवींद्रनाथांच्या खंबीर साथीने… आधी वयातील अंतरामुळे औपचारिक असलेलं नातं, हळूहळू एक नितांत सुंदर असं बौद्धिक, भावनिक साहचर्याचं नातं झालं! टागोरांच्या परिवरातही त्या समरस झाल्या होत्या. आपल्या अनुवादाच्या आनंदात त्या आपल्या सासुबाईंनाही सामावून घेत. म्हणुनच की काय त्याची छोटी मुलगी मीरा आपल्या डायरीत लिहिती झाली…

” शांतिनिकेतन च्या दुस-या मजल्यावरील व्हरांड्यात एक टेबललॅंम्प जळतोयं. माझ्या आईच्या हातात एक इंग्रजी कादंबरी आहे. ती वाचतीये आणि माझ्या आजी साठी अनुवाद करतीये. “

फक्त मृणालिनी देवींच्या या बौद्धिक पैलूंची इतिहासात म्हणावी तशी नोंद नाही घेतली गेली… हे जाणवतं! 

वयात खूप अंतर असुनही टागोरांच्या जीवनावर आणि कलेवर मृणालिनी देवींचा खूप प्रभाव दिसून येतो.

रविंद्रनाथ जेव्हा कामानिमित्त, प्रवासासाठी घराबाहेर असायचे तेव्हा ते मृणालिनी देवींना आवर्जून पत्रे पाठवीत. त्या दोघांतील सुसंवाद आणि प्रेमच तर दिसून येतयं ना यांतून! पत्नी कडून उत्तर यायला उशीर झाला तर नाराजी ही व्यक्त करत. ही पत्रे… हा प्रेमाचा ठेवा… विसा भारती द्वारे प्रकाशित Letters by टैगोर (Volume 1) मध्ये संग्रहित करण्यात आली आहेत.

मृणालिनी देवींचं आणखी एक परिपक्व, प्रगल्भ असं रूप बघायला मिळालं ते रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन मध्ये सुरू केलेल्या ब्रह्मचर्य आश्रम या शाळेच्या प्रारंभिक अवस्थेत! त्यावेळी पैशाच्या अडचणीमुळे रविंद्रनाथ खूप चिंतेत होते. त्यावेळी त्यांची ही सहधर्मचारिणी ख-या अर्थाने त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि तिने आपले लग्नातील सगळे दागिने विकून पैसा उभा केला. आणि, साकार झाली रवींद्रनाथांच्या कल्पनेतील ती शाळा! 

स्वतः मृणालिनी देवी कलकत्त्यातलं ऐश्वर्य सोडून आश्रमात रहायला आल्या. आणि विद्यार्थ्यांच्या रहाण्याची, जेवणाची, आरोग्याची काळजी घेऊ लागल्या. मुळातच सुगरण असलेल्या मृणालिनी देवी, स्वतः च्या हाताने सात्त्विक, पौष्टिक आणि चवदार स्वयंपाक बनवत आणि मायेनं जेवू घालंत. शाळेला कुटुंब रूप देऊन, त्या स्वतः आई झाल्या त्या सगळ्या मुलांची! टागोर घराण्याची स्वयंपाकाचे नवनवे प्रयोग करण्याची परंपरा येथे ही सांभाळली आणि आश्रमातील जेवणाची चव समृद्ध केली या अन्नपूर्णेनं!! 

आणि आपल्या पूर्वाश्रमीचं नाव भवतारिणी सार्थ करत… रविंद्रनाथांच्या शांतिनिकेतन चा भव… संसार तारिणी सिद्ध झाली.

मृणालिनी देवींचं मोठं दुर्दैव की त्या अल्पायुषी ठरल्या. फक्त २८ वर्षे आयुष्य लाभलं त्यांना. पण तरीही रविंद्रनाथांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी पडद्यामागून मोठीच भूमिका बजावली. इच्छा असूनही आपल्या पतीला खूप वर्षे साथ मात्र नाही देऊ शकल्या त्या.

अचानकच मृणालिनी देवींना एका अज्ञात आजाराने ग्रासलं. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत गेली. रविंद्रनाथ त्यांना इलाजासाठी आपल्या जोरासांको ठाकुर बारी येथे घेऊन गेले. तेव्हा गाडी ६ तास लेट असल्याने त्यांना विलासपूर येथील स्टेशन च्या वेटिंग रूममध्ये थांबावे लागले. त्यावेळी त्या वेळेत ही त्यांनी फांकी नावाची एक कविता रचली. ती आजही बिलासपूर च्या प्लॅटफॉर्म वरील एका भिंतीवर शिलालेखाच्या रूपात आहे. रविंद्रनाथांनी शिलालेखात अक्षर रूपात… अ क्षर केले… आपल्या वेदनेला! 

शांतिनिकेतनला युनेस्को जागतिक वारसा… स्थळाचा दर्जा मिळवून देणा-या वटवृक्षाचे पहिले बीज ठरला… मृणालिनी देवींचा… आर्थिक आणि नैतिक पाठिंबा! तिथे त्यांच्यातील समिधा समर्पणात कुठेही कमी पडली नाही.

मृणालिनी देवींच्या निधनानंतर रविंद्रनाथांनी मृणालिनी आनंद नावाचा बगिचा तयार केला. तिथं अनेक प्रकारची फुलझाडे लावली. आपल्या ख-या अर्थाने सहचरी ठरलेल्या, प्रेरणा आणि समर्थनाचा अखंड स्त्रोत बनून राहिलेल्या पत्नीच्या निधनानंतर ही… तिची उपस्थिती… तिचं नाव टागोरांच्या कवितेत आणि संगीतात निरंतर गुंजत राहिलं. त्यांच्यातील नातं एक वारसा म्हणून टागोरांच्या काव्यरचनांमधील प्रेम, विरह, औदासीन्य यांत बघायला मिळतं…

तू जिथे गेली आहेस, तिथे माझे डोळे पोहोचू शकत नाहीत

पण तरीही, तू माझ्या मनात एक शांत प्रकाशासारखी जिवंत आहेस…

– रविंद्रनाथ टागोर

लेख क्र. १३

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक मराठी विक्रमी व्यक्ती.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ एक मराठी विक्रमी व्यक्ती.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

जपान मधील टोकियो मध्ये कसाई भागात एक मराठी विक्रमी व्यक्ती रहाते.. पुण्यात शनिवार पेठेतील शनिवार पोलीस चौकी जवळ त्यांचा वाडा होता. तो माणूस आता १९९५ ला जपान ची स्कॉलरशिप घेऊन जपान मधे जातो आणि तिथे एका प्रायव्हेट शाळेचा प्रिन्सिपल होतो.

त्यांची आई तिथे पुरण पोळी ते साबुदाणा खिचडी पर्यंत सर्व भारतीय चटण्या तसेच भारतीय पोशाख शिवते व भारतीय रेस्टोरंटही चालवते.

हा माणूस टोकियो मधे स्वतः तीन मजली प्रचंड मोठ घर बांधतो. घरात मराठी पुस्तकांची लायब्ररी करतो, तसेच मराठी भाषा शिकवण्याचे क्लासेसही घेतो. सर्व जपानी शाळांना आग्रह धरतो. हाच भारतीय मराठी माणूस जपान मध्ये नंतर तिथं आमदार होतो.

अजून बरंच काही आहे. पण सगळ्यावर कळस म्हणजे आता त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या घराशेजारी उभारला आहे. पुण्यातील खटावकर यांनी तो तयार केला. तो जपानला विमानाने १० लाख रुपये फक्त वाहतूक खर्च करुन नेला व ८ मार्च २०२५ ला तेथे उभारला. सुमारे ९०० भारतीय लोक उपस्थित होते. यांच्याकडे महाराजांनी लिहिलेल्या सुमारे ३०० हस्तलिखित पत्रांचा खजिना आहे.

… ह्या माणसाचं नाव आहे योगेंद्र पुराणिक.

माहिती संग्राहक : अज्ञात

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आईने दिलेलं सुंदर उत्तर…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आईने दिलेलं सुंदर उत्तर…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

“मम्मी, तू आणि बाबांनी अनंत अडचणी असताना त्या काळात लग्न केलंत आणि एकमेकांना खूप समजून घेतलं.

गेली छत्तीस वर्षं संसार केलात. !

आमच्या पिढीला का गं जमत नाही हे.. ?”

तिशीची लेक हातातला फोन टेबलवर आपटत म्हणाली.

चार वर्षं मज्जेत ‘बॉयफ्रेन्ड’ असलेल्याचा आठ महिन्यापुर्वी ‘हजबन्ड’ झाल्यानंतरचा हा राग होता.

“प्रश्न विचारलास का?” पंचावन्नची आई त्या फोनला पडलेल्या चऱ्यांकडे पाहत शांत आवाजात म्हणाली, “उत्तर हवंय का?”

“हो, उत्तर हवंय, ” लेक म्हणाली.

 “असे आहे न बाळा, ” आई सहजच म्हणाली…

“आम्ही ‘कसं जमवता येईल’ ते शोधत होतो, तुम्ही ‘जमलं तर पाहू’ म्हणताय.

 

आमच्या वेळी प्रेम हे व्हायचं,

तुमच्या काळात ते केलं जातं.

 

आम्ही साथीदार व्हायचो,

तुम्ही भागीदार बनवता.

 

आमच्यात प्रेम ही सहजता होती,

तुमच्यात तो अट्टहास झालाय.

 

आमचं प्रेम लहानाचं मोठं व्हायचं,

तुमचं प्रेम लहानपणीच घाई करतं.

 

आमच्या वेळी मैत्री विश्वासात रूपांतरित व्हायची,

तुम्ही ‘जवळिकीला’ रिलेशनशिपचा बोर्ड लटकवण्याची घाई करताय.

 

आम्ही कविता लिहायचो, तुम्ही त्या फॉरवर्ड करताय.

 

आमचे ‘जीवनसाथी’ होते,

तुमचे ‘बॉयफ्रेन्ड’ नि ‘गर्लफ्रेन्ड’ आहेत.

 

आमचं प्रेम आमच्यासाठी होतं,

तुमचं प्रेम ‘सगळ्या फ्रेन्ड्सचा बॉयफ्रेन्ड आहे, मग माझाही असलाच पाहिजे’, म्हणून केलं जातंय.

 

आमचे बॉयफ्रेन्ड नव्हते; कारण जो आहे तो फ्रेन्ड असण्याच्या खूप पुढे गेलाय, हे आम्हाला स्पष्ट जाणवायचं. तुमच्यात इन्स्टाग्रामवर अकाउंट असलंच पाहिजे तसा बॉयफ्रेन्डही असलाच पाहिजे.

 

आम्ही गिफ्ट नव्हे तर स्वत:लाच समर्पित करायचो; तुमच्या गळाभेटीतही भेट कितीची आणली असेल, याची कॅलक्युलेशन्स असतात.

 

आम्ही धुंद होतो;तुम्ही उधळलेले आहात.

 

आम्ही चेहऱ्यावरचं तेज शोधायचो;

तुम्ही शर्टचा ब्रान्ड पाहताय.

 

आम्हाला नजरेतली समजदार चमक भाळायची,

तुम्हाला गॉगलच्या किमती भुरळ घालतायत.

 

आमच्या शरीरांना पेशन्स मंजूर होता;

तुमच्या मनालाच तो नकोय.

 

बाळा… जमणं, न जमणं हे क्षमतेवर अवलंबून असतं.

क्षमता डेव्हलप करायची असते.. !

 

जगता आलं पाहिजे,

मरता केव्हाही येतं,

पण जगता आलं पाहिजे. !

सुख भोगता केव्हाही येतं,

पण दुःख पचवता आलं पाहिजे.

रंग सावळा म्हणून काय झालं,

कर्तृत्व उजळता आलं पाहिजे.

रंग गोरा असला म्हणून काय झालं,

मनावरील काजळी काढता आली पाहिजे.

यशानं माणूस उंच जातो,

पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत.

मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे.

पाप काय?

कसंही करता येतं,

पण पुण्य करता आलं पाहिजे.

ताठ काय कोणीही राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे.

ठेच जीवनात लागतेच,

सहन करता आली पाहिजे.

मलमपट्टी करून तिला, पुन्हा चालता आलं पाहिजे.

शहाण्याचं सोंग घेऊन,

वेडं होता आलं पाहिजे.

कशाला बळी न पडता, आनंदी जगता आलं पाहिजे.

जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल,

ती उणीव भरता आली पाहिजे.

हास्य आणि अश्रूचा मिलाप करून,

फक्त समाधानी राहता आलं पाहिजे…

आयुष्य खूप सुंदर आहे

 भरभरून जगता आले पाहिजे. “

 

जे काही लिहिले आहे ते आजच्या पिढीला डोळ्यात अंजन घालणारे आहे.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘वादळांना दिशा नसते.. जहाजांना असावी लागते’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘वादळांना दिशा नसते.. जहाजांना असावी लागते’ ☆ श्री दिवाकर बुरसे

वादळांना दिशा नसते; जहाजांना असावी लागते

 मनाच्या सागरात ध्येयाचा दीपस्तंभ उभा राहिला की नकारात्मक विचारांचे धुके विरायला लागते.

 मानवी इतिहासातील प्रत्येक महान प्रवासाचा आरंभ एका दिशेपासून झाला आहे. “

 समुद्राला वादळांची भीती नसते.

वादळं त्याच्या स्वभावात असतात.

प्रत्येक वादळानंतर काही जहाजं किनाऱ्यावर पोहोचतात आणि काही समुद्रात हरवून जातात.

 भेद लाटांमध्ये नसतो.

जहाजांच्या डोळ्यांत असतो.

ज्यांच्या दृष्टीपुढे दीपस्तंभ असतो, ती जहाजं धुक्यातही मार्ग शोधतात.

ज्यांच्या दृष्टीपुढे निश्चित दिशा नसते, ती शांत पाण्यातही भरकटतात.

 मनाचंही असंच असतं.

भूतकाळाची खंत,

भविष्याची भीती,

 स्वतःबद्दलच संशय,

 “माझ्याकडून काही होणार नाही… “

“माझी वेळ निघून गेली… “

“लोक काय म्हणतील?”

 

हे असले विचार नवीन नाहीत. मानवजातीइतकेच पुराण आहेत.

पण त्यांचं एक वैशिष्ट्य आहे—ते रिक्त मनातच सर्वाधिक वाढतात.

रिकाम्या घरात प्रतिध्वनी अधिक ऐकू येतात.

रिकाम्या बंदरात वाऱ्यांचा ध्वनी मोठा वाटतो आणि रिकाम्या मनात शंका सत्यासारख्या वाटू लागतात !

 

 मानसशास्त्र सांगतं— मनाला जर अर्थपूर्ण दिशा मिळाली नाही, तर ते स्वतःच चिंता निर्माण करू लागतं.

 नकारात्मक विचारांचा सर्वात मोठा शत्रू सकारात्मक विचार नसतो, तो असतो—अर्थपूर्ण कृती.

संत तुकारामांचा अभंग आजही काळाच्या पल्याडून ऐकू येतो—”मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. ”

ही ओळ आनंदाचा उपदेश नाही,

 ही ओळ दिशेचा उपदेश आहे –

 

प्रसन्न मन म्हणजे दुःख नसलेलं मन नव्हे; प्रसन्न मन म्हणजे दुःखापेक्षा मोठं ध्येय सापडलेलं मन !

 काळ्या पाण्याची शिक्षा.

समोर अथांग जलधी.

भोवती अभेद्य भिंती.

हाता – पायात निर्दय शृंखला.

जगाशी संबंध तुटलेला.

पण त्या अंधाऱ्या बंदिगृहातही एक गोष्ट जिवंत होती—स्वातंत्र्याचं ध्येय.

 

ज्यांनी सागराला स्वातंत्र्याची शपथ घेतली, त्यांना समुद्राच्या मधोमध उभारलेल्या कारागृहाने कसं रोखलं असतं?

 साखळदंडांनी केवळ हात जखडले, विचार नाही.

भिंतींनी शरीर अडवलं, क्षितिज नाही.

ज्यांच्या मनात ध्येयाचे स्थंडिल धगधगत असते त्यांना परिस्थिती हरवत नाही; ती केवळ त्यांची परीक्षा घेते.

 

एक राजपुत्र राजवाडा सोडून निघाला.

एका कृश वकिलाने ‘सूर्य कधीही न मावळणाऱ्या’ साम्राज्याच्या डोळ्यात डोळे घातले.

एका बहिष्कृत मुलाने शिक्षणाच्या बळावर इतिहासाला नवा अर्थ दिला.

एका मासेमाऱ्याच्या गावात वाढलेल्या मुलाने आकाशाला स्पर्श करण्याचं धाडस केलं.

 

इतिहासातली मोठी माणसं मोठ्या परिस्थितीत जन्माला आली म्हणून मोठी झाली नाहीत. ती मोठी झाली कारण त्यांच्याकडे स्वतःपेक्षा मोठं ध्येय होतं.

 ध्येय म्हणजे केवळ ‘करिअर’ नाही.

 ध्येय म्हणजे सकाळी उठण्याचं कारण, रात्री झोपण्यापूर्वीची शांतता.

ध्येय म्हणजे पराभवानंतर पुन्हा उभं राहण्याचं मनोबल आणि उद्याच्या दिशेने टाकलेलं आजचं पाऊल.

ध्येय म्हणजे अंतिम गंतव्य नाही.

ध्येय म्हणजे प्रवासाला मिळालेला उत्तरतारा.

 तो वादळं थांबवत नाही, पण तो भरकटूही देत नाही.

 

नकारात्मक विचारांना हरवायचं असेल तर त्यांच्याशी झुंज देण्यात अर्थ नाही.

अंधाराशी भांडून का कधी प्रकाश निर्माण होतो ?

तिथे दिवाच लावावा लागतो !

 

 तुमचं ध्येय लिहून ठेवा.

त्याचे लघु लघु भाग करा.

प्रत्यही एक पाऊल टाका.

प्रत्येक भीतीला विचारा—”तू सत्य आहेस, की केवळ माझी कल्पना?”

 

मनाला जर काम दिलं नाही, तर ते झालेले व्रण मोजत बसतं.

मनाला दिशा दिली नाही, तर ते भीतीचे नकाशे काढत राहतं. मनाला ध्येय दिलं नाही, तर ते शंकांची शेती करू लागतं.

 

 समर्थ रामदासांच्या अश्वासक वचननांचा ध्वनी आजही कानी निनादतो —”केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे. ”

त्याच वेळी जीवन कुठेतरी हळूच गुणगुणत राहतं—”रुक जाना नहीं… “

 

जीवनात पराभव नसतात, असतात केवळ दोन प्रकारचे प्रवासी—एक ते, जे चक्रावून वादळांकडे पाहतात, आणि दुसरे ते, जे एकटक दीपस्तंभाकडे पाहतात.

 अखेर माणूस जगतो तो केवळ श्वासांवर नाही…

तो जगतो एखाद्या अपूर्ण स्वप्ना च्या पूर्ततेसाठी,

 एखाद्या अजून न गाठलेल्या क्षितिजासाठी,

 एखाद्या अजून न लिहिलेल्या इतिहासासाठी.

 

 ज्या दिवशी माणसाला स्वतःपेक्षा मोठं असं एखादं ध्येय सापडतं, त्या दिवशी त्याच्या आयुष्यातील सगळे प्रश्न सुटतात असं नाही,

वादळं थांबतात असं नाही,

धुकं विरत असही नाही,

 पण त्याला प्रश्नांपेक्षा मोठा मार्ग सापडतो !

 

अनेकदा—मार्ग सापडणं हे उत्तर सापडण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं असतं.

 म्हणून मनात वादळ उठलं, तर वाऱ्यांना दोष देऊ नका. स्वतःला एकच प्रश्न विचारा—”माझ्या समुद्रात दीपस्तंभ आहे का?” कारण…

वादळांना दिशा नसते, जहाजांना असावी लागते!

 वादळं येतील.

धुकं दाटेल.

लाटा आदळतील.

पण जर दीपस्तंभ जळत असेल,

तर जहाजं हरवत नाहीत.

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी वारी ! माझा अनुभव !”- लेख क्र. १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. १ ☆ श्री संभाजी बबन गायके 

गोष्ट १९९७ मधली. माऊली हडपसरच्या दुपारच्या विसाव्यावरून दिवे घाटाकडे प्रस्थान करत्या झाल्या होत्या. सकाळपासून शहरात बंद असलेली बससेवा दुपारी काही अंशी सुरु झाली होती. त्यामुळे डेक्कन जिमखान्यावरून हडपसर गाडीतळापर्यंत बस मिळाली आणि दुपारी तीन वाजता दिवे घाटाच्या रस्त्याला लागता आले.

आभाळात तुरळक ढग होते आणि ऊनही होतंच. वातावरणात उष्मा दाटला होता. दिवे घाटाकडे जाणारी वाहने अर्थातच नव्हती. काही पाण्याचे tankers मात्र पुढे जाताना दिसत होते. तसाच चालत निघालो. वाटेत तहान लागली की रस्त्यावर उभ्या असलेल्या tanker मधले पाणी प्यायलो.. जे त्यातील जंतूनाशक औषधामुळे घशाखाली लवकर उतरत नव्हते.. पण इलाज नव्हता. एकतर त्या दिवशी एकादशी असल्याने सकाळी केलेल्या थोड्याशा फराळावरच दिवस ढकलला होता. दिवे घाटाच्या ओढीने पावले झपाझप पडत होती.

मागील काही वर्षे दिंडीसोबत पुणे ते सासवड आणि पुढे पंढरीपर्यंत पायी वारी घडल्याने घाटातील सुंदर वातावरणाच्या आठवणी मनात दाटून आलेल्या होत्या. वेगाने वाट चालणारे वारकरी, दिंडीची वाहने आणि टाळ मृदुंगाचा ध्वनी अजूनही कानांत घुमत होता. घाटाचा रस्ता काहीसा एका बाजूला उताराचा असल्याने उजव्या पायावर शरीराचे वजन आपसूक जास्त येते. पुढची दिंडी थांबली की आपल्यालाही थांबावेच लागते… त्यावेळी मांडीच्या खुब्याचे हाड आपल्याशी बोलू लागलेले असते. पण तिकडे फारसे लक्ष जात नाही. घाट हिरवागार आणि माणसांच्या अंगावरील वेशाने पांढरा शुभ्र दिसत असतो. त्यात पावसाची एखादी सर येऊन गेली की तो गारवा मनात आनंदाची बरसात करीत राहतो. माऊली… माऊली करीत वारक-यांचे जत्थे पुढे पुढे धावत असतात. पुण्यापासून सासवड हा टप्पा तसा बराच मोठा आहे.

वारीत दोन प्रकारची माणसे चालत असतात. ज्यांच्या स्वत:च्या स्वतंत्र दिंड्या आहेत, त्यांची मुक्कामांची जागा आधीच ठरलेली असते. इतर लोक मिळेल तिथे राहतात, खातात आणि वारीसोबत चालत राहतात. वारीत व्यवासायानिमित्त सहभागी असणा-या लोकांची, भिका-यांची संख्याही मोठी असते.

संध्याकाळचा अंधार जवळ येऊ लागला आणि सासवड जवळ येऊ लागले की दिंडीतील वारक-यांना एकत्रित चालणे गरजेचे होऊन जाते. अन्यथा गर्दीमुळे पुढच्या दिंडीत आणि आपल्या दिंडीमध्ये थोडे जरी अंतर पडले आणि चुकामुक झाली की त्या लाखोंच्या समुद्यात आपली दिंडी आणि तिची मुक्कामाची जागा सापडणे महामुश्किल होऊन जाते… असा अनुभव पाठीशी असतो. त्यामुळे सासवड जवळ येताच लगबग वाढते.

दिवे घाटमाथा ते सासवड पालखी तळ हेही अंतर मोठे आहे. त्यामुळे वारकरी लोकांची बरीच दमछाक झालेली असते. उपवास असल्याने तशी शारीरिक ताकद कमीच असते. पुण्यातील विश्रांतीनंतरचा हा मोठा टप्पा असल्याने वारकरी काहीसे थकलेले असले तरी मनात उत्साह मोठा असतो.

मी वेगाने चालत निघालो. आणि एका वळणावर मला वारका-यांचा एक गट चालताना दिसला. त्यांना गाठले तर पुढच्या वळणावर चक्क माऊलींचा रथ… घाटातील चढावर चढण्याच्या प्रयत्नात! आधी विश्वासच बसेना… जवळ जाऊन पाहता परिस्थिती लक्षात आली. त्यावेळी रथ बराच जड असे. बैलांच्या अनेक जोड्या लावून रथ ओढावा लागे. वारकरी मंडळी घाईत असल्याने रथाला ओलांडून केंव्हाच पुढे गेली होती. रथापुढे क्रमांक एकची दिंडीसुद्धा बरीच पुढे गेली होती. रथासोबत असलेल्या पाच-पन्नास लोकांनी, सेवेकरी, पोलिसांनी बैलांच्या जोडीने रथ वर वर ढकलत चालवला होता. माऊली! माऊली! असा गजर करीत एका एका चढाचे अवघड वळण पार केले जात होते… मी ही जमेल तसा हातभार लावला!

काही वेळातच पुढे चालणारा जनसमुदाय आणि पालखी रथ यांच्यात योग्य समन्वय साधला गेला. सासवडची भजनी मंडळी घाटाच्या माथ्यावर स्वागतासाठी दिंडी घेऊन आलेली होती… माऊली आता सासवडच्या वेशीतून प्रवेश करत्या झाल्या होत्या! 

घाटाच्या शेवटच्या टोकावर पुण्यातल्या अनेक व्यापा-यांनी त्यांच्या मालगाड्या आणून आधीच उभ्या करून ठेवल्या होत्या… आणि त्यांच्या मार्फत वारक-यांना फराळाचे पदार्थ, उपयोगी वस्तू यांचे मुक्तहस्ते वितरण सुरु होते… ! 

मला पुण्यात तसेच रात्री माघारी यायचे होते. याच मालट्रकमधून येण्याची परवानगी एका चालकाने दिली. अंधार पडू लागला होता. मालट्रक परतण्याच्या तयारीत होते. एवढ्यात मला घाटातून खालून तीन आकृत्या चालत येताना दिसल्या… दोन महिला आणि एक वयस्कर पुरुष! पुरुषाच्या पायात काटा रुतल्याने त्यांचा पाय सुजला होता. पत्नी आणि सूनबाई यांच्या साहाय्याने ते वारकरी गृहस्थ एवढा मोठा घाट चढून आले होते… म्हणून त्यांना एवढा उशीर लागला होता! 

यावेळी पुण्यातून सासवडकडे दिवे घाट मार्गे वाहनांची वाहतूक पूर्ण बंद असते. पण कसा कुणास ठाऊक एक मिनीट्रक मागून येताना दिसला… ! मी त्या वाहनाला आडवा होत वाहन अडवले. चालक नाखुशीनेच थांबला… वाहनाच्या मागच्या बाजूने त्या वारकरी बाबांना वर चढवण्याचा प्रयत्न करू लागलो. पण त्यांच्या पायाला मोठी सूज, वेदना असल्याने त्यांना वेळ लागला… बाबांना वर चढता आलेच नाही.. आणि का कुणास ठाऊक त्या चालकाने त्याचे वाहन पुढे दामटले… आम्ही आवाज देत राहिलो… पण तो चालक वाहन घेऊन निघूनही गेला! त्या दोन महिला आणि ते वारकरी बाबा खालीच राहिले… तेथून त्यांचा सासवड मुक्काम किमान चार-पाच किलोमीटर्स तरी दूर असावा! 

मी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बाबांनी मला तोंडभरून आशीर्वाद दिला… आणि म्हणाले… ”असू दे, बाळा! माऊली घेऊन जातील आम्हांला!” आणि असं म्हणत ते तिघेही हळूहळू सासवडच्या दिशेने निघाले. मी त्यांना खाली वाकून नमस्कार केला. माझ्याकडे असलेले फराळाचे पदार्थ त्यांच्या हाती सोपवले!

अंधारून आले होते… मागून एकही वाहन येताना दिसत नव्हते. मी त्या तिघांच्या पाठमो-या आकृत्यांकडे पहात राहिलो… माझे वाहन पुढे निघाले! घाट उतरेपर्यंत वर येणारे एकही वाहन नजरेस पडले नाही! ती तीन माणसं त्यांच्या मुक्कामाला किती वाजता, कशी पोहोचली असली असतील हा एकच विचार मनात सातत्याने येत राहिला! माउलींनी त्यांना सुखरूप नेले असेलच याची खात्री होती! 

दरवर्षी पुण्यातून माऊली दिवेघाटाकडे निघतात तेंव्हा त्या तीन वारक-यांची आठवण आल्याशिवाय रहात नाही! रामकृष्णहरी! 

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares