मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘अभिजात संगीत’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? मनमंजुषेतून ?

☆ ‘अभिजात संगीत’ ☆ श्री दिवाकर बुरसे

संगीत ही खरे तर स्वर्गीची कला!

सृष्टी निर्मितीसवेच ब्रह्मदेवाने हिची निर्मिती केली. नारद, नंदी, भरत आदि महामुनींनी अत्यंत कठीण परिश्रम करून ती भूतलावर आणली, आम्हा सामान्य मानवांना उपलब्ध करून दिली.

केवळ सात सुरांचा सारा खेळ!

या सप्त-सूरसरितांच्या संगमातून साकारला हा संगीताचा अथांग रत्नाकर. त्यात किती राग, किती रागिण्या. कशी त्यांची रूपे, कसे त्यांचे रंग, गंध, आकार… साजिरे गोजिरे!

सात सूर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनंत राग – रागिण्या.

… यांच्यातून साकारते एक नादब्रह्म! म्हणूनच पूर्वीच्या वाग्गेयकारांनी, ऋषिमुनींनी या संगीताची प्रतिष्ठापना केली परमेश्वराच्या पवित्र मंदिरातून.

… पण खरं तर हे सूर चराचर व्यापूनही चार अंगुळेभर उरलेच आहेत, अगदी ब्रह्मतत्वासारखे! म्हणूनच ऋषीमुनींनी –

चैतन्यं सर्वभूतानां विवृतं जगदात्मना ।

नादब्रह्म तदानन्दमद्वितीयमुपास्महे ॥

– – असे म्हणत त्याची उपासना केली. ईश्वरप्राप्तीचा एक वेगळा मार्ग त्यांना गवसला.

स्वरमाध्यमातन उभे राहणारे हे स्वरविश्व अमूर्त अरूप आहे. आपल्या परीने ज्याने त्याने ते समजून, जाणून घ्यायचेय, अनुभवायचेय.

– – ज्याला ते जसे भावले तसे त्याने ते व्यक्त केले. कुणी शिल्पातून, कुणी रंगरेषांच्या तर कुणी शब्दांच्या माध्यमातून!

मी सुद्धा एक असाच प्रयत्न केलाय…..

अभिजात भारतीय संगीताची उत्पत्ती…

(Evolution of Indian Classical Music)

*

वाद्य, नृत्य अन् गीत मिळोनी होते संगीत कला 

ही स्वर्गीची ठेव लाभली दैवे मनुजाला।। ध्रु।। 

*

प्रथम दिले ब्रह्म्याने संगीत भोळ्या सांबाला 

त्याने दिधले सरस्वतीला, तिने नारदाला 

यक्ष, किन्नरा, गंधर्वांना, नंदी अन् भरताला 

तिथून पातले भूलोकाला, अम्हा मानवाला।।१।। 

*
निद्रा मुद्रेतून उमेच्या “रुद्रवीणा” जन्मली 

डौलदार चालीतून तैशी “नृत्यकला” प्रकटली 

कृद्ध शिवाच्या पद घातातुनी “तांडव” आकारले

चार दिशांतुनी चार राग हे तसेच निर्मियले।।२।। 

*

पूर्व दिशेतुनि उठला “भैरव”

” हिंडोलाचे” पश्चिम वैभव 

दक्षिणेतूनि “दीपक” उमटे

“मेघ”, “श्री”चे कौतुक वाटे

उमे निर्मिला ” कौशिक” पश्चात 

संगीत हे जणू वेदच साक्षात! ।।३।। 

 🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ४ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ४. ☆ प्रा.भारती जोगी ☆

एमिली शेंकल

समिधाच सख्या या!! …

सन १९४५, ऑगस्ट महिना, संध्याकाळ ची वेळ! ती स्वयंपाकघरात नेहमीसारखी कामात… आणि अचानक रेडिओ वर ऐकायला येते… ‘ सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू! ‘

 ती हळूच उठते, बेडरूममध्ये जाते, जिथे तिची जेमतेम ३ वर्षे वयाची मुलगी झोपलेली असते. बिछान्याजवळ गुढगे टेकून बसते आणि आयुष्यात पहिल्यांदाच मनाने कोसळते… अश्रूंचा बांध फुटतो, मनसोक्त रडते. जिच्या दृढतेसाठी, साहसी स्वभावासाठी तिचा पती बाघिन म्हणत असतो… ती रडत होती, शक्तीच संपल्या सारखी!!

 ती होती… एमिली शेंकलकॉंग्रेस योद्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पत्नी!!

 एमिली च्या डोळ्यांपुढून सगळा जीवनपट सरकू लागला. आठवला तिला तो दिवस… सुभाषबाबूंच्या परिचयाचा!

सविनय कायदेभंगाच्या चळवळीमुळे तुरूंगात गेलेल्या सुभाष बाबूंची तब्येत ढासळू लागली, ब्रिटिश सरकारने उपचारासाठी त्यांना व्हिएन्ना मध्ये ठेवले. हॉस्पिटलमध्ये सुद्धा देशाचाच विचार करणा-या सुभाष बाबूंनी, भारतीय युवकांना स्वातंत्र्य लढ्यासाठी एकत्रित करण्याचं ठरवलं. द इंडियन स्ट्रगल या नावाने पुस्तक लिहायला घेतलं. त्यासाठी टाइपिस्ट ची गरज भासली. आणि मुलाखतीत निवड होऊन एमिली शेंकल चा सुभाषबाबूंच्या आयुष्यात प्रवेश झाला. हळूहळू रोजच्या भेटीतून… सौम्य स्वभाव, हसतमुख, स्पष्टवक्ती, निस्वार्थी, कामाला वाघ… अशा एमिली कडे सुभाषबाबू आकर्षित झाले. देशप्रेम अग्रस्थानी असलेल्या मनात… एका उदात्त अशा प्रेमाने अलगद प्रवेश केला. आजपर्यंत घरच्यांना लग्नासाठी नेहमीच नकार देणारे दोघेही… नकळतपणे गुंतले.

२६ डिसेंबर १९३७ या दिवशी… एमिली च्या वाढदिवशी… दोघांनी अखेर गुप्त विवाह केला. आणि शेवटपर्यंत तो गुप्तच ठेवला. कारण सुभाष बाबूंसाठी देश सर्वोपरि होता. हे एमिली पूर्णपणे जाणून होती. म्हणूनच उदात्त हेतू आणि एक शोकांतिका असलेलं नातं तिने जोडलं. उदात्त हेतू ला उदात्त अशी साथ देऊन त्यांची खरी हमराज बनली. तिनं सुभाष बाबूंच्या संघर्षाला समजून घेतलं. त्या नात्यात एमिली ने अदम्य साहस, सर्वोच्च गरिमा आणि उच्च त्यागाची भावना… हे गुण पेरले, रूजवले.

लग्नबंधनात बांधल्या नंतरही तिने सुभाषचंद्र ना मात्र आपल्या प्रेमात बांधून न ठेवता… आजाद ठेवलं.

सुभाषचंद्र जरी एक सैनिक, एक योद्धा, एक कूटनीतिचा महारथी होते तरीही… या सगळ्याच्या आंत/आड आणखी एक सुभाष आहे… हे एमिली ने ओळखलं होतं. आणि फक्त त्या मौन स्नेहातलं एक आगळं-वेगळं प्रेम, ते जपणं तिनं ओळखलं. त्यामुळे च तर… १२ वर्षांच्या लग्नाच्या आयुष्यात फक्त ३ वर्षे सहवास लाभला तरीही एमिली ने हे… दुराव्यातलं दृढ नातं ही जपलं! कधीच दुरावू दिलं नाही. सुभाषबाबू आणि तिच्यातलं हे अनोखे, गुप्ततेतले पती-पत्नीचं नातं, हे स्नेहबंध… ख-या अर्थाने बद्ध झाले ते… सुभाषबाबूंनी विविध ठिकाणाहून एमिली ला पाठवलेल्या पत्रांमध्ये! ही पत्रे त्यांच्या मर्मबंधातली ठेव बनली.

पण ही पत्रे… प्रेम पत्रे होती कां? की दोन जीवांचं तादात्म्य पावणं? एकमेकांसाठी संबल… सहयोगी, आधार, ख-या अर्थाने, सहचर बनंत, दूर राहूनही एकमेकांना भेटणं, जपंत रहाणं होतं ते! नात्यातील संबोधने सुद्धा बघा… ते फ्राऊलिन शेंकल ने सुरूवात करीत, आणि तिच्या पत्राची सुरूवात असे.. श्री बोस!!

 त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रात… राजनीती, विविध पुस्तके संगीत, विनोद, आध्यात्मिकता, आणि एकमेकांच्या नाजूक तब्येतीची चौकशी… हा असे… पत्रातल्या मायन्याचा आयना!!!

सुभाष बाबूंनी एकदा आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करणा-या… गोएथे या कवीच्या, कालिदासाच्या शाकुंतल मधल्या अनुवादित ओळी शोधायला सांगून… अप्रत्यक्षरित्या भावना प्रकट केल्या. त्या ओळी अशा…

क्या तुम युवा वर्ष के फूलों और उसके पतन के फूलोंको पसंद करोगे?

और वह सब जिससे आत्मा आनंदित हो, तृप्त हो…

 क्या तुम स्वर्ग और पृथ्वी को एक ही नाम से मिला दोगे?

 हे, शकुंतले, मैं तुम्हारा नाम लेता हूं!

बस्स्… हीच ती मनतळातली जाणीव… जिच्या बोधावर एमिली ने नंतरंचं संपूर्ण आयुष्य एक… समर्पित पत्नी, एक आदर्श माता, वृद्ध आईची काठी, लेक अनिता ची सखी, बनून स्वाभिमानाने, स्वबळावर व्यतित केलं.

एमिली ने आपल्या लेकीला… एक अतिशय बुद्धीमान आणि शैक्षणिक रूची असलेली स्त्री बनवलं. एक अर्थशास्त्रज्ञ बनली तिची लेक. विश्वविद्यालयात प्रोफेसर झाली. प्रोफेसर मार्टीन फाफ यांच्या शी विवाह बद्ध झाली.

एमिली… एक आदर्श पत्नी च नाही, तर एक आदर्श माता ही सिद्ध झाली. तिने आपल्या लेकीत… पित्याच्या नावाने मोठी न होता, स्व प्रयत्नाने आपलं आयुष्य उभं करण्याचे, आणि स्व कर्तृत्वाने मोठं होण्याचे, जगाला काहीतरी सकारात्मक देण्याचे संस्कार रूजवले!!!

अशी ही एमिली… जी एका महानायका च्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, त्याच्या नंतर ही तितक्याच खंबीरपणे, स्वाभिमानाने, पतीच्या परिवाराकडून भारतात येण्याचा आग्रह नाकारून, एका छोट्या टेलिग्राफ ऑफिस मध्ये, कमी पगारावर नोकरी करून, वृद्ध मातेचा सांभाळ करंत, लेकीला सत्याचा सामना करणारी लढवय्यी बनवंत… शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मनातल्या नायका ची आणि जनातल्या महानायका ची मूक नायिका बनून जगली.

या मौन, मूक संवेदनेला, देश प्रेमासाठी राखरांगोळी करणा-या त्या त्यागकुंडातील राखेच्या कणातला एक भाग बनणारी ही… समिधा च ना?

– लेख क्र. ४.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आठवणींचे पक्षी… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? इंद्रधनुष्य ?

☆ आठवणींचे पक्षी☆ सुश्री शीला पतकी 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात त्या वेळचे केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ, तारकेश्वरी सिन्हा यांना घेऊन आले होते.. काकासाहेब गाडगीळ यांना मी महाविद्यालयीन विद्यार्थिदशेपासूनच ओळखत होतो.. मुंबई प्रांताचे स्पीकर भाऊसाहेब फिरोदिया व काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते मी संपादीत केलेल्या प्रा. रतनलाल सोनग्रा यांच्या व्यासपीठावर या पुस्तकाचे प्रकाशन अहमदनगरला त्या वेळी (१९६६/६७) केले होते.. पुण्यात यावेळी मी किर्लोस्कर मासिकांचा सहसंपादक होतो.. काकासाहेब यांनी मला जवळ बोलावून तारकेश्वरी सिन्हा यांची ओळख करून दिली होती.. आपल्या उर्दू शेरशायरीयुक्त भाषणांसाठी आणि धारदार वक्तृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या तारकेश्वरी सिन्हा यांचे नाव मला माहीत होते.. संसदेतील आपल्या स्पष्ट मतांसाठी त्या प्रसिद्ध होत्या. राम मनोहर लोहियांसारख्या ज्येष्ठ नेत्यांसोबतचे त्यांचे वादविवाद होत असत.. १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर, त्यांनी इंदिरा गांधींना सोडून मोरारजी देसाई आणि के. कामराज यांच्यासारख्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर त्या इंदिरा गांधींच्या कट्टर टीकाकार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या होत्या. तथापि, हे देखील उल्लेखनीय होते की जोपर्यंत त्या राजकारणात सक्रिय होत्या, तोपर्यंत इंदिरा गांधींनी त्यांना काँग्रेसचे तिकीट दिले—अगदी आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांमध्येही. मी तारकेश्वरी यांना किर्लोस्कर साठी मुलाखत देण्याची विनंती करीत असतानाचे हे छायाचित्र आहे.. कैक वर्षानंतर हा फोटो मला सापडला.. व तो प्रसंग मनात तरळून गेला… आठवणींचे पक्षी. ,. ” 

– प्रा. जवाहर मुथा

– – तारकेश्वरी सिन्हा यांच्याबद्दलची वरची पोस्ट आज वाचली. मला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती आणि तेव्हा माहितीचे स्त्रोत पण नव्हते मी नुकतीच कॉलेजमध्ये जाऊ लागले होते तेव्हा त्या सोलापुरात आल्या होत्या. त्या इंदिरा गांधीच्या विरोधक आणि माजी पंतप्रधान माननीय मुरारजी भाई देसाई यांच्या पक्षातल्या.. म्हणजे काँग्रेस एस आणि काँग्रेस आय. तेव्हा त्यांचे भाषण पार्क मैदान वर झाले.

काँग्रेसचे विभाजन झाले होते, त्या एस पक्षातल्या होत्या. त्यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होती म्हणजे पार्क मैदान भरले होते त्यापूर्वी कार्यकर्त्यांसाठी जनरल लायब्ररीच्या वरच्या हॉलमध्ये त्यांचे भाषण झाले. त्या दोन्ही कार्यक्रमाला मी होते. मुख्य म्हणजे संपूर्ण दिवसभर मी तारकेश्वरी सिन्हा बरोबर होते जनरल खूप गप्पा झाल्या. आता माझ्या एवढ्या मुलीशी ती एवढी मोठी विदुषी काय गप्पा मारणार ना? … टिळक स्मारक मधला कार्यक्रम संपून आम्ही पार्क मैदान वर गेलो पार्क मैदान वर वॉशरूमची सोय नाही त्या म्हणाल्या काय करायचे मी म्हणलं काहीतरी सोय करू त्या तिथे संपूर्ण पार्क मैदान च्या बागेची सोय पाहणारे माझ्या वडिलांचे मित्र स्वातंत्र्यसैनिक राजमाने राहत होते म्हणजे ए बी राजमानांचे वडील त्यांच्या घरी आम्ही गेलो आणि काकांना मी अडचण सांगितली. त्यांच्या घरात छोटे बाथरूम होते ते सगळे बाहेर आले तेव्हात्या वाॅशरूम मध्ये फ्रेश झाल्या. काकांनी त्यांना चहा घ्यायला विनंती केली त्या पाच मिनिटे थांबून पाणी पिऊन त्यांच्या घरातून बाहेर पडल्या राजमान्यांचे घर अत्यंत नेटके आणि स्वच्छ होते त्याचे जाताना कौतुक करायला त्या विसरल्या नाही काकूंचा हात हातात घेऊन त्यांनी त्यांच्या घराचे कौतुक केले होते. त्यांचे पार्क मैदान वर भाषण झाले मी बऱ्याच व्यवस्थेत होते, त्यामुळे मला भाषण सलग ऐकता आले नाही आणि काही कळतही नव्हते. राजकारणातले फारसे ठाऊक नाही. पण त्यांचे वक्तृत्व अप्रतिम होते हे कानावर पडणारे शब्दावरून जाणवत होते.

– – आज मी प्राध्यापक मुथा यांचा लेख वाचला आणि मला जाणवले… इतक्या वर्षांनी.. कि आपण केवढ्या मोठे व्यक्ती बरोबर होतो दिवसभर…! पण आपल्याला काही घेता आले नाही कारण ती व्यक्ती किती मोठी आहे याची जाणीवच नव्हती. त्या इंदिरा गांधींच्या प्रखर टीकाकार होत्या. सोलापुरात एस काँग्रेसचे कार्य आदरणीय डॉक्टर अंत्रोळीकर हे करत होते ते आमच्या वडिलांचे गुरु. त्यानी मला सांगितले होते की तारकेश्वरी सिन्हा यांच्याबरोबर तू दिवसभर राहायचे. आज मला त्याची हळहळ वाटते. केवढ्या मोठ्या बाई माझ्याबरोबर होत्या आणि मी त्यांचा काहीच लाभ घेतला नाही हे आज आत्ता जाणवलं – – – – – आयुष्यात कुठल्या गोष्टीचा कधी पत्ता लागेल काही सांगता येत नाही…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पत्रिका (कुंडली) आणि प्रगती पुस्तक…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “पत्रिका (कुंडली) आणि प्रगती पुस्तक…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

आपल्याला प्रगतीचा आधार समजवून घ्यायला याच दोन गोष्टी लागतात. दोन्ही ठिकाणी काही घरं (रकाने) आणि काही आकडे असतात. पत्रिकेवरच्या आकड्यांनुुसार निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर विश्वास ठेवला नाही तरी, प्रगती पुस्तकावरच्या आकड्यांवर विश्वास ठेवावाच लागतो. आणि याच प्रगती पुस्तकावरच्या आकड्यांमुळे बर्‍याचदा (घरातली माझी) परिस्थिती बदललली होती. त्यामुळे आकडे आणि परिस्थिती माझ्या बाबतीत हातात हात घालून फिरत असली तरी मोठे आकडे आणि चांगली परिस्थिती अशी ती नव्हती, आणि नाही.

पत्रिका ही वेळ आणि काळ यावर, म्हणजे जन्मावर अवलंबून असते अस म्हंटल तर प्रगती पुस्तक हे केलेल्या कर्मावर अवलंबून असतं अस म्हणाव लागेल. पण या जन्मावर आणि कर्मावर अवलंबून असलेल्या गोष्टीबद्दल वर्मावर लागेल अस बरच काही ऐकाव लागलं आहे. पत्रिकेत कदाचित मागच्या जन्माच्या काही गोष्टींचा प्रभाव असेल. पण प्रगती पुस्तक फक्त वर्तमानाशी निगडीत असतं. आणि माझ वर्तमान मान वर करण्यासारखं कधीही नव्हत. आणि नाही.

पत्रिकेत भविष्याचा वेध असेलही. पण प्रगती पुस्तकावरून घरी काय परिस्थिती निर्माण होईल याचे लागलेले वेध लगेच लक्षात यायचे. आपली पत्रिका प्रत्येकाला समजेलच अस नाही. ती समजण्यासाठी अभ्यास करावा लागतो. पण प्रगती पुस्तकाच तस नाही. ती आमचा अभ्यास दाखवात होती. आणि इतरांना अभ्यास न करताही तो लक्षात यायचा.

प्रगती पुस्तक हे शाळेचच असत अस नाही. ते नंतर तुम्ही काय, कसं, किती कमवलं, किंवा जमवलं, आणि गमवलं याचही असत. फक्त शाळेतल्या प्रगती पुस्तकावर ते आकड्यांनी दाखवतात, तर आयुष्यात केलेल्या गोष्टी या बोलून दाखवतात. पण त्यावरुन निकाल लक्षात येतोच.

माझी पत्रिका आणि माझं प्रगती पुस्तक यावर मी बोलण्यापेक्षा इतरांनाच बोलण्यासाठी भरपूर वाव मिळाला. माझ्या पत्रिकेत भविष्यात काय आहे हे कोणी अभ्यास करून सांगण्यापेक्षा, माझं प्रगती पुस्तक पाहून माझं भविष्य अभ्यास न करताही सांगणारे बरेच भेटले.

पण माझ्या पत्रिकेत सांगितलेल्या काहि गोष्टी बर्‍याच अंशी तशाच घडल्या. काही गोष्टी अशा…

मी मोठा होईन… खरंच मी पाहता पाहता साठीला आलो.

मी स्वत:च्या पायावर ऊभा राहिल… खरंच आजही मी काठीच्या आधाराशिवाय माझ्या पायांवर ऊभा आहे.

आत्ता बरीच बडबड करत असला, कोणाच विशेष ऐकत नसला तरी पंचविशी नंतर परिस्थितीत अमुलाग्र बदल घडून यायची शक्यता… अठ्ठावीसाव्या वर्षी माझं लग्न झाल आणि… बडबडतर कमी झालीच, आणि ऐकालाही लागलो. आता कोणाच ऐकतो हा भाग निराळा… पण त्यामुळेच आता आईच बोलणंसुध्दा ऐकाव लागतं. काही वेळा तर मुलंही बोलतात… बोलणं ऐकणं आणि ऐकाव लागणं यातला असलेला वरवरचा फरक खोलपणाने समजला.

धनराशीचा एखादा आकडा किंवा रकाना पत्रिकेत असतो का याची कल्पना नाही. पण इतर सगळ्या राशींनी रकाने पूर्ण भरल्याने कोणत्याही राशीने या बाबतीत माझ्यावर तेवढा विश्वास दाखवलाच नाही. किंवा विनाकारण त्या धनराशीने माझ्या पत्रिकेत घुसखोरी केलेली नाही.

माझ्या पत्रिकेतल्या काही आकड्यांवरुन स्थैर्य आणि सकारात्मक व्रुत्ती आहे अस लिहिलं होत. ते स्थैर्य म्हणजे नक्की काय हे मला बर्‍याच विषयात बरीच वर्ष पस्तीस किंवा छत्तीस गुण मिळाल्यामुळे, आणि पुढे पगारातही कमीतकमी मिळणार्‍या वाढीमुळे समजलं. फक्त त्या पस्तीस आणि छत्तीस या आकड्यांमुळे एकाच वर्गात राहण्याच स्थैर्य मात्र टळलं होत. कदाचित या बाबतीत माझा गुरु आणि माझे गुरु प्रभावशाली होते. किंवा दोघांचा शनि कमजोर होता. याच बाबतीत आमचे छत्तीस गुण जुळले असतील, आणि मला परिक्षेत छत्तीस गुण मिळाल्याने गुरूंचा मान राहिला असेल. त्या स्थैर्याचा अर्थ वाढणार नाही, असा न घेता कमी होणार नाही असाच मी सकारात्मक घेतला.

माझ्या पत्रिकेत असणाऱ्या आणखीन दोन गोष्टी म्हणजे इतरांनी केलेल्या कामामुळे याला अपेक्षित यश मिळाल नाही तरी आशावाद, आणि धैर्य सोडणार नाही… खरच माझ्या भविष्या बाबतीत मी म्युच्युअल फंडा सारखाच आशावादी आहे. तर धैर्य दाखवतांना गडगडलेला शेअर बाजार मला तेेवढा विचलित करत नाही.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परतीचा क्षण… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ परतीचा क्षण…  ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

परतीचा क्षण मनुष्याला नकोसा असाच वाटतो, नाही का?

प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात परतीचा प्रसंग कधीकधी रोज किंवा आयुष्यात एकदा तरी नक्कीच येतो…

आयुष्यात उपभोगलेले सुखदुःखाचे क्षण सोडून परतीचा प्रवास सुरू करणे, प्रत्येकाला जमतेच असे नाही…

काही लोकं जाण्याआधीच आपल्या परतीच्या प्रवासाची भौतिक आणि मानसिक तयारी करून ठेवतात…

त्यामुळे त्यांना यातून बाहेर पडणे सोपे जाते…

या सर्वाचे एका वाक्यात सार पुढील एका वाक्यात सांगता येईल…

बॅग भरून तयारी असावी…

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३३ आणि ३४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३३ आणि ३४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ३३ – – – – 

वसे मेरूमांदार हे सृष्टिलीळा|

शशी सूर्य तारांगणे मेघमाला|

चिरंजीव केले जनी दास दोन्ही |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३३|अर्थ : ही सृष्टी म्हणजे भगवंताची लीला आहे. त्यासृष्टीत मेरूमांदार आदी पर्वत आहेत. चंद्र, सूर्य आणि तारांगणे आहेत. मेघमाला आहेत. ही सृष्टी आहे तोपर्यंत हनुमान आणि बिभीषण दोन्ही चिरंजीव आहेत. प्रभू रामचंद्रांनी आपल्या या दोन्ही दासांना चिरंजीव केले आहे. दासाभिमानी असलेला भगवंत आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.

(मेरू – स्वर्ग, मत्यू, पाताळ यांना आधारभूत असलेला सोन्याचा पर्वत. मांदार – समुद्रमंथनाचे वेळी या पर्वताचा रवी म्हणून वापर केला गेला)

विवेचन : समर्थांनी आपल्याला मागील श्लोकात भगवंताच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करून सांगितले आहे या श्लोकात ते आपल्याला सांगतात की आपल्याला ही जी सृष्टी दिसते आहे ती म्हणजे केवळ भगवंताची लीला मात्र आहे. मेरू आणि मांदार हे दोन्ही पर्वत, चंद्र, सूर्य, अगणित तारे आणि तारका, असंख्य अशा आकाशमाला, बरसणारे ढग या सगळ्या गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत.

मेरू पर्वत, ज्याला सुमेरू असेही म्हटले जाते, एक पौराणिक पर्वत असून हिमालयात स्थित आहे असे मानले जाते. हा पर्वत म्हणजे हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मांचे एक पवित्र स्थान समजले जाते. त्याचप्रमाणे हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर स्थित असून पृथ्वीची नाभी समजला जातो. हा पर्वत सुवर्णप्रमाणे चमकतो.

मांदार पर्वताचा उल्लेख देखील पौराणिक कथांमध्ये येतो. हा पर्वत बिहारच्या बांका जिल्ह्यात असून त्याची उंची सुमारे ७०० फूट आहे. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनादरम्यान देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी वासुकी नागासह या पर्वताला रवीसारखे वापरले होते। हे हिंदू आणि जैन धर्मातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. या अद्भुत पर्वतांसारख्या अनेक अद्भुत आणि आश्चर्यकारक गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत.

थोडक्यात सांगायचे तर आपल्याला दिसणाऱ्या या अवघ्या विश्वाचा निर्माता भगवंत आहे. या सृष्टीमध्ये सजीवांसाठी आवश्यक असलेल्या हवा, पाणी, अन्न यासारख्या गोष्टी त्यानेच निर्माण केल्या आहेत. त्याची निर्मिती असलेले चंद्र आणि सूर्य आपल्याला प्रकाश देतात. नद्या आपली तहान भागवतात. मेघातून बरसणारा पाऊस आपल्यासाठी अन्न निर्माण करतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या परमेश्वराचीच निर्मिती आहेत.

जोपर्यंत ही सृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत तारे, चंद्र, सूर्य आपल्याला प्रकाश देत राहतील. मेघ जलाचा वर्षाव करत राहतील ही भूमाता आपल्यासाठी अन्न निर्मिती करील. शतकानुशतके युगानुयुगे या गोष्टी होत आल्या आहेत आणि होत राहतील. परंतु या सृष्टीवर मानवासहित जे सर्व सजीव प्राणी, वनस्पती जन्माला आले आहेत ते सर्व मर्त्य आहेत. त्यांना मृत्यू अटळ आहे.

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात

दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत

या गीतरामायणातील ओळी मानवी जन्म आणि मृत्यू हे कसे एकमेकांशी निगडित आहेत हे सांगतात.

या जगात जो जन्माला आला त्याला एक दिवस मृत्यू आहेच हे निश्चित पण असे असले तरी भगवंताने आपल्या दोन दासांना चिरंजीवित्व प्राप्त करून दिले. या जगामध्ये सात व्यक्ती चिरंजीव आहेत असे मानले जाते.

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणः।

कृपाः परशुरामश्च सप्तैते चिरंजिविनः॥

अश्वत्थामा, बळीराजा, वेद व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे ते सप्त चिरंजीव. यातील हनुमान आणि बिभीषण हे दोघे निस्सीम श्रीरामांचे भक्त आहेत. हनुमंताचा जन्म वानर कुळातील तर बिभीषण राक्षस कुळात जन्मलेला. हनुमंत श्रीरामांचा निष्ठावान सेवक आहे हे आपण जाणतो. बिभीषणाची गोष्ट मात्र जरा वेगळी आहे. त्याचा जन्म राक्षस कुळात झालेला आणि महापराक्रमी रावणाचा तो सख्खा भाऊ. अन्यायी अशा रावणाची साथ सोडून श्रीरामांच्या पक्षात येणे ही गोष्ट त्याच्यासाठी एवढी सोपी नव्हती. परंतु तरी देखील त्याची रामावर असणारी श्रद्धा एवढी प्रचंड होती की तो हा सगळा विरोध सहन करून श्रीरामांना शरण आला. रामाने रावणाचा वध केल्यानंतर श्रीरामांनी लंकेचा राजा व्हावे अशीही इच्छा बिभीषणाने व्यक्त केली होती. एवढा तो रामभक्त होता.

हनुमंत आणि बिभीषण या दोघांचेही स्वभाव आणि कर्म वेगवेगळे होते. परंतु या दोघांमध्ये एक गोष्ट मात्र समान होती. ती म्हणजे ते दोघेही श्रीरामांचे परमभक्त होते. त्यांच्या अपार भक्तीमुळे श्रीरामांनी त्यांना चिरंजीव केले. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्यांची सुटका केली. या मृत्यू लोकात जन्म घेऊनही ते अमर झाले ही फक्त श्रीरामंचीच कृपा!

खरी निष्ठा आणि भक्ती कशी असते आणि अशा भक्तांवर प्रभू श्रीराम कशी कृपा करतात हे या उदाहरणातून समर्थांनी आपल्या निदर्शनास आणून दिली आहे. आणि म्हणून ते पुन्हा आपल्याला सांगत आहेत की श्रीराम हे दासाभिमानी आहेत. आपल्या भक्ताची ते कधीही उपेक्षा करीत नाहीत.

स्वसंवाद : 

१) हनुमान आणि बिभीषण यांच्या इतकी भगवंताची भक्ती कदाचित मला जमणार नाही. परंतु किमान त्या मार्गावर चालावे असे तरी मला वाटते का?

२) ही सृष्टी भगवंताची लीला आहे असे मी मानतो का?

३) निसर्गाच्या विशालतेकडे पाहताना माझ्या मनात परमेश्वराप्रती कृतज्ञता येते का की मी ते गृहीत धरतो?

४) चिरंजीव होणे म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती. माझ्या भक्तीचे ध्येय केवळ सांसारिक सुखापुरते आहे की मोक्षापर्यंत पोहोचण्याची माझी खरी इच्छा आहे?

– – – –

श्लोक क्र. ३४ – – – 

उपेक्षा कदा रामरुपी असेना|

जिवा मानवां निश्चयो तो वसेना|

शिरी भार वाहेन बोले पुराणी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३४|

अर्थ : आतापर्यंतच्या उदाहरणांवरून समर्थांनी आपल्याला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे की) भगवंत आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही. परंतु (आपण असे दुर्दैवी जीव आहोत की) त्याची भक्ती करण्याचा आपला निश्चयच होत नाही. भक्तांची सारी काळजी मी वाहतो असे पुराणात त्याने वचन दिले आहे. दासाभिमानी असलेला श्रीराम आपल्या दासांची म्हणजेच भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.

(रामरुपी – भगवंताजवळ, जिवां मानवां – जीवरूपी म्हणजेच सामान्य माणसाला)

विवेचन : आपल्या भक्ताची भगवंत कधीच उपेक्षा करीत नाही. त्याचा संपूर्ण भार तो वाहतो. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. परंतु त्याच्या पित्याला त्याची विष्णूभक्ती मान्य नव्हती. तो देवांना आपले शत्रू मानत असे. विष्णू भक्ती करू नये म्हणून सुरुवातीला त्याने प्रल्हादाला समजावून पाहिले. परंतु तो जेव्हा ऐकत नाही असे दिसले तेव्हा त्याने विविध प्रकारे प्रल्हादाला ठार मारण्याचे प्रयत्न केले. परंतु सर्व प्रसंगांमध्ये भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण केले. शेवटी नरसिंह रूपात प्रकट होऊन श्रीविष्णूंनी अत्याचारी अशा हिरण्यकश्यपूचा वध केला आणि अशा रीतीने आपल्या भक्ताचे संरक्षण केले.

आपल्या प्रजेला परमेश्वराचे नाव घेण्यास आणि ऋषीमुनींना यज्ञ करण्यास कंसाने बंदी घातली होती. त्याने ईश्वर भक्तांचा अनन्वित छळ केला. परंतु भगवंताने श्रीकृष्ण अवतारात या अन्यायी आणि दुराचारी कंसाचा वध करून प्रजेला त्याच्या छळातून मुक्त केले.

अशा विविध प्रकारे भगवंत आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतो. त्यांचा भार किंवा काळजी तो आपल्या शिरावर घेतो अशी अनेक उदाहरणे पुराणांमध्ये आहेत.

परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥

असे वचन त्याने गीतेत आपल्याला दिले आहेच. असे असले तरी आपल्यासारख्या सामान्य माणसाला भगवंत आपल्याला सहाय्य करीलच याची खात्री वाटत नाही. याची दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे परमेश्वर अस्तित्वात आहे आणि तो सदैव आपल्याजवळ आहे याची खात्री आपल्याला असत नाही. आपल्या हाकेला तो धावून येईलच याबद्दलही आपण साशंक असतो. त्याच्यावर भार टाकून निर्धास्त राहण्याइतकी निष्ठा किंवा समर्पण आपले नसते.

आपली अशी अपेक्षा असते की भगवंताने आपल्याला प्रपंचात येणाऱ्या अडचणींमध्ये आणि दुःखामध्ये मदत करावी. अशा गोष्टींसाठी आपण भगवंताला गृहीत धरतो. तो प्रसन्न व्हावा म्हणून निरनिराळ्या प्रकारचे नवस करतो, प्रार्थना करतो. भगवंताला निरनिराळ्या प्रकारे लाच देण्याचा प्रयत्न करतो. कधी त्याला कोणी भक्त मोठी देणगी देतो तर कधी कोणी सोन्याचा मुकुट अर्पण करतो. परंतु या गोष्टींची भगवंताला अपेक्षा नसते. त्याला अपेक्षा असते ती शुद्ध आणि निरपेक्ष भक्तीची!

आपण परमेश्वराची भक्ती करायला सुरुवात केली की आपली अशी अपेक्षा असते की त्याने आपल्यावर कृपा करावी. आपल्या संकटात धावून यावे. परंतु जेव्हा आपल्याला तसे होताना दिसत नाही तेव्हा आपला त्याच्यावरील विश्वास डळमळीत होताना दिसू लागतो. परंतु ही परमेश्वराने पाहिलेली आपली परीक्षा असते असे म्हणावे लागेल.

जो भगवंत आनंदनिधान आहे, कल्पतरू आहे अशा भगवंताकडे भक्ती, मुक्ती आणि मोक्ष मागण्या ऐवजी त्याच्याकडून आपण पैसा, व्यवहारातील यश, सुखाचा प्रपंच यासारख्या क्षुल्लक गोष्टींची अपेक्षा करत असतो. व्यवहारातील यश, पैसा, सुखसमृद्धी या गोष्टींनाच सामान्य माणसे परमेश्वराची आपल्यावर कृपा आहे असे समजतात. परंतु सदाचार आणि सद्बुद्धी ज्याच्याकडे आहे त्याच्यावर परमेश्वराची कृपा आहे असे समजावे.

भगवंताने गीतेमध्ये म्हटले आहे की “योगक्षेमं वहम्याहं. ” भगवंत आपला भार घेतो. त्याला आपली काळजी आहे. या त्याच्या वचनाचा अर्थ आपण असा घेता कामा नये की आपण आपले जे कर्तव्य आहे ते सोडून केवळ त्याच्यावर भार टाकून निवांत बसावे. अर्जुनाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठीच तर त्याने गीता सांगितली. आपल्या पूर्ण क्षमतेने आपले कर्तव्य करावे, स्वधर्म पार पाडावा. परंतु असे करताना त्याचे विस्मरण होऊ देऊ नये. संत जनाबाई म्हणतात 

दळीता कांडीता तुज गाईन अनंता |

न विसंबे क्षणभरी | तुझे नाम गा मुरारी

– असेच आपणही आपले कर्तव्य करत असताना त्याच्या नामात मग्न राहावे.

स्वसंवाद : 

१) मी भगवंताची भक्ती करतो तेव्हा माझ्या मनात काय असते – निरपेक्ष प्रेम की एखादी अपेक्षा?

२) परमेश्वराप्रती असलेली माझी भक्ती खरोखर निरपेक्ष असून ती “लाच” तर नाही ना?

३) संकटात भगवंताची कृपा दिसली नाही तेव्हा माझी श्रद्धा डळमळीत होते का?

४) “योगक्षेमं वहाम्यहं” हे वचन मला माहीत आहे – परंतु माझे कर्तव्य करताना मी खरोखर त्याच्यावर भार सोपवतो का की प्रपंचाची काळजी मीच वाहत राहतो?

– क्रमशः श्लोक ३३ आणि ३४.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘बलोच मराठा!’ – लेखक : श्री सचिन जवळकोटे ☆ प्रस्तुती – सुलू साबणे जोशी ☆

सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘बलोच मराठा!’ – लेखक : श्री सचिन जवळकोटे ☆ प्रस्तुती – सुलू साबणे जोशी ☆

पाकिस्तानात हळदीचा कार्यक्रम अन् पुरणपोळीचा बेत..

‘धुरंधर’मुळं ‘बलुचिस्तान’ जगाच्या नजरेत आलेलं. ‘बलोच’ शब्दाचं सर्चिंग शतपटीनं सोशल मीडियावर वाढलेलं. मात्र, हेच बलुचिस्तानी गेल्या अडीचशे वर्षांपासून शोध घेताहेत आपल्याच मावळ प्रांताचा.. कारण तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या समूहाला पाकिस्तानात ओळखलं जातं ‘बलोच मराठा’ म्हणून. होय. अनोख्या इतिहासाची ही विचित्र वाटचाल डोळे विस्फारून टाकणारी.

‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाचा ‘रहमान डकैत’ मूळ बलुचिस्तानातला दाखवलेला. कारच्या बॉम्बस्फोटात मरण्यापूर्वी संजय दत्तचा ‘एसपी अस्लम चौधरी’ फोनवर ‘ए बलोचऽऽ’ म्हणून दम देताना दिसलेला. यामुळं भारतीयांमध्ये पाकिस्तानच्या बलुचिस्तानबद्दल उत्सुकता वाढलेली. त्याचवेळी त्या प्रांतातल्या हजारो नागरिकांनीही या चित्रपटाच्या छोट्या -मोठ्या रिल्सवर कौतुकानं कॉमेंट देण्यास सुरुवात केलेली. यात सर्वाधिक संख्या ‘बलोच मराठा’ नावाची असलेली, कारण त्या मंडळींना ‘बॉलिवूड’बद्दल प्रचंड आकर्षण असलेलं. यातूनच आपल्या पूर्वजांचा शोध घेण्याची धडपड स्पष्टपणे दिसून आलेली. या साऱ्याचं मूळ तब्बल दोनशे पासष्ट वर्षांपूर्वीच्या कहाणीत असल्याचं लक्षात आलेलं.

सन १७६१ साली ‘पानिपत’च्या युद्धानंतर ‘अब्दाली’ खजिन्याविनाच रिकाम्या हाती अफगाण प्रांतात परतला. त्याला युद्धात सैनिकांची मदत करणाऱ्या मीर नासीरखानला मोबदल्यापोटी त्यानं ‘बंदी दुश्मन’ सैनिकांना बलुचिस्तानात सोडलं. तेव्हा ती संख्या होती जवळपास वीस हजार. तेव्हापासून ते तिथंच राहिले. यातले बहुतांश मूळचे मावळ प्रांतातले. सुपीक-सधन मातीतले. त्यामुळं तिथं ओसाड वाळवंटात जगण्यासाठी त्यांना निसर्गाशी लढावं लागलं. आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी तिथल्या राज्यकर्त्यांशीही संघर्ष करावा लागला. काळाच्या ओघात त्यांची ‘भाषा’ बदलली. ‘वेश अन् देश’ बदलला. ‘संस्कृती’ही बदलली. परंतु, आपल्या मूळच्या ‘चालीरिती’ मात्र त्यांनी हरवू नाही दिल्या. ‘बुगती’ अन् ‘मरारी’ जमातीचा भाग असलेले हे लोक आजही स्वत:ला ‘बलोच मराठा’ म्हणवून घेतात. सातारा राजधानीचे छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या नावानं ‘साहू मराठा’ अशी उपाधी हे ‘बुगती मराठे’ लावतात. पेशव्यांच्या संदर्भातूनही बरेच ‘पेशवानी‘ नावानं ओळखले जातात.

इराण, पाकिस्तान अन् अफगाणिस्तान सीमेवर आता त्यांची दहावी-अकरावी पिढी जन्माला आलेली. तरीही यांच्यात लग्नावेळी ‘हळदीचा कार्यक्रम’ रंगतो. आजही ‘तांदळाचं माप’ ओलांडूनच वधू-वराचा घरात प्रवेश होतो. अधून-मधून पुरणपोळीही करतात. सैन्यदलात नोकरी, शेती अन् व्यापार हे पोट भरण्याचं माध्यम. यातील बरेच उच्चशिक्षित आता पाकिस्तानच्या सरकारी अधिकारीपदीही कार्यरत. सोशल मीडियावर ‘मराठा ट्राईब’ नावाचा यांचा मोठा ग्रुप सक्रिय. यातील अनेक बलोच सदस्यांनी स्वत:च्या नावापुढं मोठ्या अभिमानानं ‘मराठा’ शब्द मिरवलेला. हा ग्रुप तयार करताना त्यांनी सुरुवातीला ‘मराठा’ शब्द टाईप केलेला. नंतर ‘मरहट्टा’ असा बदल केलेला. पुन्हा मूळ ‘मराठा’ शब्द वापरलेला. त्यामुळं ‘आपण मूळचे कोण आहोत’, हे त्यांना पिढ्यानपिढ्या माहीत असलं तरी ‘आपली नेमकी ओळख काय? ’ या गूढ प्रश्नाचा गुंता त्यांच्यासाठी अद्याप न सुटलेला.

तोंडात बलुची.. कानात मराठी – – – 

बलुचिस्तानातल्या ‘मराठा’ समुहाचा आजपावेतो कैक संदर्भग्रंथात उल्लेख आलेला. कैक कादंबऱ्यांची पानंही रंगलेली. यावर ‘बलोच’ नावाचा मराठी चित्रपटही निघालेला. याचे पटकथा-दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी जेव्हा या नावाची घोषणा केली, तेव्हा सर्वाधिक तिकडच्याच मंडळींनी सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद दिलेला. मात्र, त्यांना मराठी समजत नसल्यानं गोंधळ उडालेला. एका ‘बलुची’नं ‘यूट्यूब’वर विचारलेलं, ‘इस मुव्ही का नाम क्या? ’ तेव्हा महाराष्ट्रातल्या एकानं त्याची खिल्ली उडविली, ‘वाचल्याशिवाय कॉमेंट करतोय.. बेटे मौज कर दी. ‘ परंतु या बिच्चाऱ्याला काय माहीत की, विचारणारा उर्दू भाषिक. थेट इराण-अफगाणिस्तान बाँड्रीवरचा. तरीही पाकिस्तानातल्या त्या लोकांनी मोबाईलवर हा चित्रपट आवडीनं पाहिला. तोंडातली भाषा बलुची असली तरीही कानावर पडलेली मराठी कदाचित आपलीशी वाटलेली. योगायोगाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या नायिका स्मिता गोंदकर यांची कुलदेवताही थेट तिकडचीच. बलुचिस्तानातली हिंगलाज माता.

हिंगलाज देवी ते गडहिंग्लज!

पाकिस्तानातील ‘हिंगलाज देवी’चा इतिहास दोन हजार वर्षांपूर्वीचा. एकीकडे अरबी समुद्र, तर दुसरीकडे बलुचिस्तानातल्या हिंगोल नदीचं खोरं. किर्थर पर्वतरांगेतील दुर्गम गुहेत पुरातन मंदिर वसलेलं. इथंच स्थायिक झालेला ‘मराठा’ समुदाय दरवर्षी ‘नानी’ यात्रेत मोठ्या श्रद्धेनं सामील होत असलेला. याच हिंगलाज देवीच्या अनेक उपशाखा महाराष्ट्रात. अमरावतीत मोठं मंदिर. सोलापुरातही हिंगलाबिका नावानं सुप्रसिद्ध. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज गावाचं नावही तिच्यामुळेच पडलेलं. तिकडून आलेल्या बलुची हिंग व्यापाऱ्यांनी इथं पूर्वी देवीची प्रतिष्ठापना केल्याचं मानलं गेलेलं. लगतचा सामानगड किल्ला अन् हिंगलाज मंदिर यावरून ‘गडहिंग्लज’ नाव पडल्याची आख्यायिका.

थेट साताऱ्याशी नाळ..

‘धुरंधर’मध्ये रणवीरसिंगने रंगवलेला ‘हमजा’ पाहून अनेकांना कुलभूषण जाधव यांची प्रकर्षानं आठवण झालेली. त्यांना २०१६ साली भारतीय एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्ताननं अटक केलेली. यातही दोन गोष्टी किती नवलाच्या बघा. पहिली म्हणजे जाधव हे मूळचे साताऱ्याचे. आनेवाडीत त्यांचं जुनं घर. दुसरी म्हणजे त्यांना पाकिस्तानी पोलिसांनी पकडलं बलुचिस्तानातच. तिथल्या तरुणांना भडकवल्याचा आरोप त्यांच्यावर. म्हणजे २६५ वर्षांनंतरही मराठा माणूस अन् बलुचिस्तान यांचा संबंध काही तुटता तुटेनासा झालेला. विशेष म्हणजे ‘बलाेच’ चित्रपटाचे दिग्दर्शक पवार हेही साताऱ्यातील कुडाळचेच. राहता राहिला विषय शौर्याचा. ‘धुरंधर’मध्ये ‘एसपी चौधरी’ला उडविणाऱ्या बलुची तरुणाचा प्लॅन अत्यंत चक्रावून टाकणारा.

– – – आलं का लक्षात? स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी बलुचिस्तानातल्या या समूहाला आजही पाकिस्तान सरकार का टरकून असतं ते. होय. हाच तो डीएनए. ‘स्वराज्य’साठी लढणाऱ्या ‘गनिमी कावा’चा. लगाव बत्ती..

लेखक : सचिन जवळकोटे

कोल्हापूर.

प्रस्तुती : सुलू साबणे जोशी 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “लागणे” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “लागणे” – लेखक : पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मराठीत “लागण्याची” गंमत बघा:

बाजूच्या गावात एक चित्रपट *लागला*होता.

तो बघून परत येतांना वाटेत मित्राचा बंगला “लागला”.

त्याचा मुलगा माझ्या ऑफीस मध्ये नुकताच “लागला” होता.

बंगल्यात शिरतांना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला “लागला”.

घरचे जेवायचा आग्रह करू “लागले”. मला जेवणात गोड “लागतं” हे माहिती असल्याने गोड केलं होतं.

भात थोडा “लागला” होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली ती नेमकी मला “लागली”. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार “लागली”.

निघताना बस फलाटाला “लागली”*च  होती, ती *”लागली”च पकडली.

पण भरल्या पोटी आडवळणांनी ती मला बस “लागली”. मग काय …

घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी “लागली” कारण आल्या आल्या घाईची *”लागली”.

थोडक्यात माझी अगदी वाट “लागली”..

घरची मंडळी हसायला “लागली”.

लेखक : पु. ल. देशपांडे

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंद ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ आनंद ☆ शालिनी जोशी

 बालकवी म्हणतात,

आनंदी आनंद गडे

 जिकडे तिकडे चोहीकडे

 सगळीकडे आनंदच भरलेला आहे. येथे आहे. तेथे आहे. घरात आहे. बाहेर आहे. पण तो आपल्याला बोलवायला येत नाही. तर आपण त्याला शोधावा लागतो. शोधा म्हणजे सापडेल हेच आनंदाचे तत्व. मग तो झाडा, फुलात सापडतो. कधी पशु, पक्षांत सापडतो. आकाशातही असतो. जमिनीवरही असतो. फक्त बघायचे दृष्टी हवी. ज्याला जे आवडते, मन स्थिर होते तो त्याच्यासाठी आनंदाचा ठेवाच होतो.

 एखादा चित्रकार असेल, निसर्गाचे चित्र काढण्यात जेवढा तल्लीन होतो तेवढाच मांजराबरोबर खेळणाऱ्या पिल्लाचे चित्र काढण्यात किंवा एखाद्या भिकाऱ्याचे चित्र काढण्यात होतो. समोर जे आहे ते हुबेहूब कागदावर उतरवणे म्हणजे त्याच्यासाठी प्रतिसृष्टी निर्माण करणेच असते. त्यात तो तासनतास रमतो. त्याच्यासाठी तो आनंदाचा ठेवाच असतो. दुसरा एखादा वाद्य वाजवण्यात, तर कोणी नृत्यात असाच रमून जातो. तोच त्याचा आनंद ठरतो. तर कोणी ऑफिसच्या कामात जीव लावलो. कोणी कथा लिहितो तर कोणी घर नीटनेटके ठेवतो. प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या विषयात, वेगवेगळ्या ठिकाणी पण आनंद तोच. मिळवण्याची पद्धत वेगळी असते. पोटापाण्यासाठी काहीवेळा मिळेल ते काम करावे लागते पण तेच तत्परतेने केले तर आनंद. दिरंगाई केली, कशाला उद्या पाहू, अशी उडवा उडवी कधी समाधान देत नाही. काही लोक नोकरी सांभाळून संध्याकाळी अंध लोकांना, गरजूंना मदत करण्याचे, सेवाभावे वृद्धसेवा करण्याचे, रुग्णसेवेचे काम तसेच मंदिर सेवा मनापासून करतात. तेव्हा दोघांनाही सारखाच आनंद होतो, करणारा आणि ज्याची करतो त्याला म्हणजे आनंद द्विगुणीत होतो.

 जेथे माणूस स्वतःचे अस्तित्व विसरून रमतो. देहाचे दुःख, सुख विसरतो तोच आनंदी होऊ शकतो. आनंद म्हणजे पूर्ण समाधान, तृप्ती. तो पैशाने विकत घेता येत नाही. वाटता मात्र येतो. तेव्हा भूतकाळाचा शोक आणि भविष्याची चिंता विसरून वर्तमानाचा आनंद लूटावा. समर्थ रामदास म्हणतात,

 संत आनंदाचे स्थळ l संत सुखची केवळ l नाना संतोषाचे मूळ l ते हे संत ll

 (दा. १/५/१६)

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – २ ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – २ ☆ उज्ज्वला केळकर

(त्यावेळी जरी मी घराबाहेर पडण्याची संधी एवढ्याच दृष्टीने बी. एड्. कडे पाहिलं असलं, तरी पुढच्या आयुष्यात मला त्याचा खूप फायदा झाला आणि ते करायला सुचवलं होतं माझ्या सहचराने.)

इथून पुढे – – 

मला पुढे १९०० साली, सांगलीला डी. एड्. कॉलेजमध्ये नोकरी लागली. त्यानंतर मी एम. ए. झाले. याच सुमाराला आम्ही आमचं स्वतंत्र छोटंसं घरकुल माधवनगरलाच मांडलं होतं. आमच्या लग्नाला दहा वर्षं झाली. आणि प्रकृतीने ‘अमोल’ ठेवा आमच्या पदरात टाकला. आता प्रश्न होता, नोकरी सोडायची की काय? पाळणाघर, किंवा मुलाला सांभाळायला बाई, ही मानसिकता घरात, समाजात तितकीशी रुजलेली नव्हती. प्रश्न होता, त्यावेळी नोकरी सोडली, तर चारसहा वर्षांनी, मुलाची सातत्याने देखभालीची गरज संपल्यावर, पुन्हा खात्रीपूर्वक नोकरी मिळेलच, याचा काय भरवसा? माझ्या शेजारणीने माझ्या नोकरीच्या वेळात मुलाला सांभाळायचे कबूल केले, आणि माझ्या सासुबाईंनी आणि यांनी दोघांनीही मुलाकडे लक्ष देण्याची जबाबदारी स्वीकारली आणि माझी नोकरी अखंडितपणे चालू राहिली. नोकरीच्या वेळा बांधील असतात. धंद्याचं तसं नसतं. यांचा यंत्रमागावर कापड काढून देण्याचा व्यवसाय होता. तो माधवनगरातच होता. त्यामुळे गरजेप्रमाणे ते वेळ काढू शकत होते आणि तसा त्यांनी काढलाही. मुलाला वाढवताना आम्ही दोघांनी बरोबरीने जबाबदारी उचलली. यांनी कांकणभर जास्तच उचलली.

नोकरी, घरकाम, छोट्याचं संगोपन या सा-यात दिवस कधीच संपत असे. माधवनगरात तेव्हा पाण्याची खूप टंचाई होती. आजही आहेच. त्या वेळी चार-पाच दिवसातून एकदा पाणी यायचं. ते थोडंच असायचं. पिण्यापुरतं यायचं. बाकी वापराला विहिरीचं पाणी असे. पाणी ओढण्याचं काम यांनी स्वखुषीने स्वीकारलं होतं. बाजारहाटही ते करत. त्यामुळेच स्वयंपाक-पाणी, धुणं-बिणं सगळं उरकून मला नोकरीसाठी वेळेवर जाणं शक्य होत होतं. नोकरी म्हटली की तिथल्या जबाबदा-या, कर्तव्यं आलीच. अमोल दहा महिन्याचा असताना त्याला घरी ठेवून मला प्रशिक्षणासाठी दहा दिवस सातारला जावं लागलं होतं. पण यांनी सासूबाईंच्या मदतीने कोणताही गाजावाजा, गवगवा न करता मुलाला सांभाळलं. जाऊबाई, पुतणे-पुतण्या ही मंडळी पण होतीच!

मुलगा चार वर्षाचा झाला आणि आम्ही त्याच्या शिक्षणासाठी म्हणून सांगलीला बि-हाड केलं. तिथे त्याच्याबरोबर माझंही अनुभवक्षेत्र वाढत – विस्तारत गेलं. आवडी-निवडी जपायला, जोपासायला संधी मिळाली. कार्यक्रमातला सहभाग वाढला. श्रोता-प्रेक्षक म्हणून जाताना मुलाला बरोबर घेऊन जाणं, निदान पहिली काही वर्षं तरी अपरिहार्य होतं. जमेल तेवढं ऐकायचं. पाह्यचं. कविसंमेलन, व्याख्यानं, कथाकथन इ. मध्ये माझा प्रत्यक्ष सहभाग असे, तेव्हा मुलगा लहान असताना यांनी बघितलं. एक बरं होतं. या सा-या कार्यक्रमांत माझा सहभाग असावा, याबद्दल आमचं एकमत झालं. दुमत असतं तर… जाऊ दे. तो विचारच नको.

सांगलीला आल्यावर मला मिळणारा अवकाश वाढला असला तरी मला सुचतंय म्हणून आज बाकीची कामं बाजूला राहू देत. मी लिहीत बसते. एवढा आवाका मला कधीच लाभला नाही. घर, स्वयंपाक-पाणी, नोकरी-चाकरी संभाळून जमेल तसं आणि तेवढंच माझं लेखन झालं. मी वलयांकित लेखिका नव्हते, हेही त्यामागचं कारण असू शकेल. माझ्या घरकामात नाही, तरी मुलाच्या संगोपनात यांचं सहाय्य नक्कीच होतं.

आता घरकामात नाही असं म्हणतानाही बाजारहाट तेच करायचे हे मला कबूल करायलाच हवं. सगळ्यांत महत्त्वाचं काम म्हणजे सकाळी उठल्यावरचा पहिला चहा हेच करायचे आणि आल्या-गेल्यांना अगदी आवर्जून सांगायचेसुध्दा! मग मी म्हणायची, ‘सकाळी गाडीत एकदा पेट्रोल भरलं की गाडी दिवसभर न कुरकुरता चालू राहते… ’

नोकरीच्या काळातही एक आठवण आवर्जून नोंदवाविशी वाटते. मिरज तालुक्यातील प्रौढ साक्षरांचं मूल्यमापन करण्यासाठी एक समिती नेमली होती. तिच्यात माझा समावेश होता. हे काम रात्री प्रौढ शिक्षण वर्ग सुरू झाल्यावर तालुक्याच्या वेगवेगळ्या गावी जाऊन करायचं असे. सुमारे महिना-दीडमहिना हे काम चाललं. घरी यायला कधी कधी बारा वाजून जात. मलाच कानकोंडं होई. पण या मुद्यावरून यांनी कधी खळखळ केली नाही.

आता हे सगळं वाचताना कुणालाही वाटेल तुम्ही तुमच्याबद्दल खूप लिहिलंत. त्यांच्याबद्दल काय? तर ते त्यांच्या आवडी-निवडीप्रमाणे, त्यांना हवं तसं जगत होतेच! हवं ते करत होते. पुरुष असल्यामुळे त्यांना त्यांचा अवकाश जन्मत: प्राप्त झाला होता. मलाही त्यांनी काही प्रमाणात तो प्राप्त करून दिला. ही आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट.

सांगली आकाशवाणीवरून ‘प्रतिबिंब’ ही श्रुतिकामाला सुमारे दहा-बारा वर्षं प्रसारित होत होती. त्यातील शंभर तरी श्रुतिका मी लिहिल्या असतील. श्रोत्यांनाही त्या पसंत पडत असल्याचं कळत होतं. ते संवाद, त्यातील वाद-विवाद आमच्या घरातल्या संवाद-विवादातून लिहिलेले असत. त्याला थोडी झिलई, चकचकीतपणा मी माझ्या लेखनातून दिलेला असे, एवढंच!

माझ्या लेखनाचा महत्त्वाचा स्त्रोत यांच्या वाणीतूनही अनेकदा उगम पावलेला आहे, तो असा! श्रुतिका ऐकल्यावर माझी एक मैत्रीण मुग्धा आपटे मला म्हणाली होती, ‘आमच्या घरात आम्ही जे बोलतो, ते तुला कसं कळतं? ’ मी म्हटलं, ‘घरोघरी गॅसच्या शेगड्या… दुसरं काय? ’

याचा अर्थ माझी वाटचाल अगदी मऊ मखमलीवरून झाली, असं मुळीच नाही. रेशमी काटे अनेकदा टोचले. अधून मधून बाभळीच्या काट्यांनीही रक्तबंबाळ केलं. भांड्याला भांडं अनेकदा लागलं. नुसता नाद नव्हे, खणखणाटही झाला.

लोकगीतातील ग्रामीण स्त्री आपल्या नव-याच्या रागाला इंगळ्या इस्तुवाची उपमा द्यायची आणि आपण गोड बोलून चतुराईनं कसं ‘विसावण’ घालतो, याचं वर्णन करायची. मला असं विसावण घालणं कधी जमलं नाही. पण यांना जितक्या लवकार राग यायचा, तितक्याच लवकर तो निवायचाही. मग उगीचच काही तरी बोलून, हसवून ते वातावरणातला ताण दूर करतात. इच्छा नसतानाही मग मला फस्सकन हसू येतं. ‘तुझं नि माझं जमेना… ’ असं अनेकदा म्हणता म्हणताच, ‘परि तुझ्यावाचूनि करमेना… ’ याही सार्वकालिक सत्याचा प्रत्यय येतो.

– समाप्त – 

©  उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares