मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अनावधानाचे ध्यान – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

अनावधानाचे ध्यान – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

दररोज रात्री झोपण्यापूर्वी तन मन धन आपल्या आराध्याला अर्पून डोळे मिटून त्याला समर्पण करावं.

रात्रीची झोप आणि सकाळी जागं होणं…ही फक्त रोज घडणारी शारीरिक क्रिया नाहीये, त्यात एक गूढ अध्यात्म दडलं आहे.

दिवसभर “मी”, “माझं”, “माझ्या इच्छा”, “माझी धडपड” यात गुरफटलेला मनुष्य जेव्हा रात्री झोपतो, तेव्हा नकळत सगळं सोडून देतो.

पद, पैसा, चिंता, यश, अपयश, नाती, अहंकार — काहीच हातात राहत नाही. झोप म्हणजे एका अर्थाने दररोज अनुभवलेलं छोटंसं ‘ध्यानच’ असते. ध्यानात जसं मन बाहेरच्या जगापासून बाजूला होऊन निरामय शांततेत उतरतं, तसं झोपेतही घडतं. फरक एवढाच की ध्यानात आपण जाणीवपूर्वक शांततेकडे जातो आणि झोपेत निसर्ग आपल्याला त्या शांततेत अलगद घेऊन जातो.

कदाचित म्हणूनच गाढ झोप ही इतकी सुखद वाटते, कारण त्या क्षणी मनुष्य अहंकारातून पूर्णतः पण थोडावेळच बाहेर आलेला असतो.

ना कालची खंत असते, ना उद्याची भीती…फक्त एक शांत अस्तित्व.

मग पहाटे जेव्हा जाग येते आणि आपले डोळे उघडतात, श्वास सुरू असतोच, सूर्य पुन्हा खिडकीतून डोकावणार असतो, तेव्हा आपल्या संस्कारित मनाला जाणवतं ही फक्त जाग नाही, ही कृपा आहे. आपण रात्री स्वतःला पूर्णपणे अज्ञाताच्या स्वाधीन करतो आणि सकाळी पुन्हा जागे होतो यापेक्षा मोठा विश्वास आणि यापेक्षा मोठं आश्चर्य दुसरं कोणतं? खरं म्हणजे हीच ती ईश्वरी कृपा आहे, असते, असेल.

अध्यात्म कदाचित ह्याच एका जाणिवेपासून सुरू होत असावं की जीवनावर आपला ताबा नाही, फक्त सहभाग आहे. आपण मालक नाही, निमित्त आहोत.

प्रत्येक सकाळ ही केवळ नवीन दिवसाची सुरुवात नसते; ती अस्तित्वाने दिलेली एक हळूवार आठवण असते

“ अजून तुझं कार्य संपलेलं नाही.”

जो मनुष्य रात्री झोपताना समर्पण आणि सकाळी उठताना कृतज्ञता अनुभवतो, त्याच्यासाठी प्रत्येक दिवस साधनेसारखा होतो. त्याला उमगू लागतं – झोप ही केवळ विश्रांती नाही, आणि उठून बसणं ही केवळ दिनचर्या नाही…तो दररोज घडणारा एक अदृश्य आध्यात्मिक चमत्कार आहे.

ह्याची जाण ज्याला आली तो अध्यात्म तरला असेच म्हणावे लागेल.

*

लेखक:अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “भावनांचे पोषण करते नातेसंबंधांचे रक्षण” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “भावनांचे पोषण करते नातेसंबंधांचे रक्षण☆ श्री जगदीश काबरे ☆

मानवी नातेसंबंधांचा पाया हा केवळ करार, जबाबदाऱ्या किंवा एकत्र राहण्याच्या व्यवस्थेवर उभा नसतो; तर तो अनेकदा न दिसणाऱ्या पण सतत अनुभवता येणाऱ्या भावनिक प्रवाहांवर आधारलेला असतो. नात्यांमधील ऊब, जिव्हाळा आणि आपुलकी या गोष्टी प्रत्यक्षात भावनांच्या सातत्यपूर्ण देवाणघेवाणीमुळे निर्माण होतात. परंतु आधुनिक सामाजिक संरचनेत, विशेषतः बदलत्या विवाह आणि कुटुंब व्यवस्थेत, या भावनांची जागा हळूहळू व्यवहारिकता आणि व्यक्तिकेंद्रित जीवनशैली घेताना दिसते आहे. परिणामी, नाती ‘राहतात’ पण ‘जगली’ जात नाहीत. म्हणून आधुनिक समाजात नातेसंबंधांचा बाह्य आविष्कार जरी पूर्वीइतकाच टिकून असल्याचे दिसत असले, तरी त्यांच्या अंतर्गत आशयात खूप मोठे बदल घडत आहेत. विवाह, कुटुंब आणि सामाजिक नाती या सर्वांचा पाया भावनांवर उभा असतो. ही एक मूलभूत सामाजिक गरज आहे. मात्र आजच्या बदलत्या जीवनशैलीत, वेगवान शहरीकरणात आणि भौतिक प्रगतीच्या अतिरेकात या भावना हळूहळू क्षीण होत चालल्याचे स्पष्टपणे दिसतेय. ‘कुपोषण’ ही संकल्पना आपण सहसा शरीराशी, अन्नाशी जोडतो; परंतु भावनांचेही कुपोषण होऊ शकते, ही जाणीव अद्याप सामाजात चर्चेत फारशी ठळकपणे आलेली नाही. जसे शरीराच्या पोषणासाठी योग्य अन्न, योग्य वेळ आणि संतुलीत आहार आवश्यक असतो, तसेच नात्यांना टिकवण्यासाठी भावनांचे पोषण होणे आवश्यक असते. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनपद्धतीत या भावनिक पोषणाचा अभाव प्रकर्षाने जाणवायला लागलाय.

यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे चंगळवादाचा वाढता प्रभाव. आर्थिक प्रगती, उपभोगवादी संस्कृती आणि ‘सर्व काही पैशाने मिळू शकते’ हा दृष्टिकोन समाजात खोलवर रुजत चालला आहे. यामुळे आनंदाची व्याख्या बदलली आहे. पूर्वी नात्यातून मिळणारा आनंद, सान्निध्य, आपुलकी आणि परस्पर आधार यांना जे महत्त्व होते, त्यांची जागा आता वस्तू, सुविधा आणि वैयक्तिक यश यांनी घेतली आहे. परिणामी, माणूस नात्यांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी भौतिक साधनांमध्ये गुंतवणूक करू लागला आहे. ही गुंतवणूक तात्पुरता आनंद देऊ शकते, पण ती नात्यांमधील उब निर्माण करू शकत नाही. म्हणूनच नात्यांमध्ये ‘भावनिक कुपोषण’ निर्माण झाले तरी नात्याचे बाह्य स्वरूप वरवर टिकून राहिलेले दिसते. अंतर्गत ऊब आणि जिव्हाळा मात्र हरवलेला असतो. वाणी, कृती आणि स्पर्श या मानवी संवादाच्या मूलभूत माध्यमांमधून भावना व्यक्त होत असतात. माया, ममता, आस्था, सहसंवेदना, ओढ, क्षमा, संयम, आदर आणि कौतुक या केवळ शब्दरूप भावना नाहीत, तर ते नात्यांना पोसणारे घटक आहेत. परंतु आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. डिजिटल माध्यमांमधून होणारा संवाद हा माहितीपुरता मर्यादित असतो; त्यात भावनिक सूक्ष्मता कमी असते. ‘इमोजी’ आणि ‘मेसेज’ यांच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या भावना प्रत्यक्ष स्पर्श, आवाजातील ऊब किंवा नजरेतील आपुलकी यांची जागा घेऊ शकत नाहीत. परिणामी, नात्यांमध्ये भावनिक अंतर वाढते. हे अंतर हळूहळू तुटकपणात परिवर्तित होत जाते. अशाप्रकारे डिजिटल युगातील संवादाच्या बदलत्या स्वरूपानेही या प्रक्रियेला वेग दिला आहे. सोशल मीडियावरचे आभासी संबंध, तत्काळ प्रतिसादाची सवय आणि सततच्या व्यस्ततेमुळे प्रत्यक्ष संवादाची गुणवत्ता कमी होत चालली आहे. ‘कनेक्टेड’ असण्याचा भास असला, तरी ‘कनेक्शन’ची खोली कमी होत आहे. भावनांची अभिव्यक्ती शब्दांपलीकडे असते… ती आवाजाच्या टोनमध्ये, नजरेत, स्पर्शात आणि उपस्थितीत दिसते. परंतु जेव्हा संवाद प्रामुख्याने डिजिटल माध्यमातून होतो, तेव्हा या सूक्ष्म अभिव्यक्ती हरवतात. परिणामी, नात्यांमध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण होते, जी अनेकदा व्यक्तींना स्वतःलाही स्पष्टपणे जाणवत नाही, पण ती त्यांच्या वर्तनात आणि भावनिक स्थितीत प्रतिबिंबित होते.

विवाहसंस्था ही दोन स्वतंत्र व्यक्तींच्या भावनिक आणि सामाजिक करारावर आधारलेली असते. या कराराचा गाभा ‘भावबंध’ हा असतो. दोन व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याला धक्का न लावता, परस्पर समजूत, सहानुभूती आणि जिव्हाळा यावर नातं उभं राहतं. परंतु जेव्हा या भावनांमध्ये अभाव निर्माण होतो, तेव्हा नातं केवळ औपचारिक उरतं. ‘बंध’ टिकवण्यासाठी ‘भाव’ आवश्यक असतात; अन्यथा ते नातं केवळ सामाजिक बंधन बनून राहते. अशा परिस्थितीत संघर्ष, गैरसमज आणि तणाव वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण भावनिक आधार नसताना कोणतेही नाते दीर्घकाळ टिकू शकत नाही. कौटुंबिक नात्यांमध्येही हाच बदल दिसून येतो आहे. एकत्र कुटुंबपद्धतीपासून लहान कुटुंबपद्धतीकडे झालेल्या संक्रमणामुळे व्यक्तींचे स्वातंत्र्य वाढले असले, तरी त्याचबरोबर भावनिक आधार कमी झाला आहे. पूर्वी कुटुंबातील विविध सदस्यांमधील संवाद, सण-उत्सव, एकत्रित वेळ घालवणे यामधून भावनिक बंध दृढ होत होते. आता मात्र प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जगात व्यस्त आहे. कामाचा ताण, वेळेची कमतरता आणि वैयक्तिक प्राधान्ये यामुळे नात्यांना वेळ देणे दुय्यम ठरते आहे. परिणामी, नात्यांमध्ये औपचारिकता वाढतेय आणि जिव्हाळा कमी होतोय. या बदलांचा समाजातही व्यापक परिणाम दिसून येतोय. जेव्हा व्यक्तीला जवळच्या नात्यांमध्येच भावनिक समाधान मिळत नाही, तेव्हा त्याचा परिणाम समाजातील एकात्मतेवर होतो. सहसंवेदना, परस्पर मदत, सामाजिक जबाबदारी या मूल्यांचा ऱ्हास होतो. माणूस अधिक आत्मकेंद्रित बनतो. ही प्रवृत्ती समाजात तणाव, असुरक्षितता आणि एकटेपणा वाढवते. म्हणूनच भावनिक कुपोषण हा केवळ वैयक्तिक किंवा कौटुंबिक प्रश्न नसून तो एक व्यापक सामाजिक प्रश्न आहे. कारण कुटुंब हे समाजाचे मूलभूत एकक आहे, आणि कुटुंबातील नात्यांची गुणवत्ता समाजाच्या आरोग्यावर थेट परिणाम करते. जेव्हा कुटुंबातील सदस्य भावनिकदृष्ट्या तुटक होतात, तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्या सामाजिक वर्तनावर, कामाच्या ठिकाणी असलेल्या संबंधांवर आणि व्यापक सामाजिक संवादावर होतो. सहसंवेदनेचा अभाव, असहिष्णुता, आणि वाढती एकाकीपणाची भावना हे सर्व या भावनिक कुपोषणाचेच परिणाम आहेत.

या पार्श्वभूमीवर, भावनांचे ‘अन्नग्रहण’ कसे करावे, याचा विचार करणे आवश्यक ठरते. जसे शरीराला संतुलित आहाराची गरज असते, तसेच नात्यांना नियमित आणि जाणीवपूर्वक भावनिक गुंतवणुकीची गरज असते. संवादासाठी वेळ देणे, एकमेकांचे ऐकून घेणे, कौतुक करणे, चुका स्वीकारून क्षमा मागणे आणि देणे, स्पर्शातून आपुलकी व्यक्त करणे, या सर्व गोष्टी भावनिक पोषणाचा भाग आहेत. या कृती कृत्रिम किंवा औपचारिक नसून नैसर्गिक आणि मनापासून असल्या पाहिजेत. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण नात्यांची खरी ताकद ही त्यांच्या भावनिक गाभ्यात असते. बाह्य यश, संपत्ती किंवा सामाजिक प्रतिष्ठा या गोष्टी नात्यांना टिकवू शकत नाहीत. त्या केवळ पूरक असू शकतात. नात्यांचा पाया मजबूत ठेवायचा असेल, तर त्यात भावनांचे पोषण आवश्यक आहे. ‘भाव’ आणि ‘बंध’ यांचा परस्परसंबंध लक्षात घेतला, तरच बदलत्या काळातही नात्यांची उब टिकवता येईल. अन्यथा, नाती केवळ अस्तित्वात राहतील, पण त्यात जिवंतपणा नसेल, आणि हेच भावनिक कुपोषणाचे सर्वात मोठे लक्षण ठरेल. त्यामुळे भावनांचे पोषण ही केवळ वैयक्तिक गरज नसून, सामाजिक आरोग्य टिकवण्यासाठीची एक अत्यावश्यक अट आहे.

 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ जगणं जेव्हा ‘नाम’ बनतं… – ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ जगणं जेव्हा ‘नाम’ बनतं… – ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

कधी कधी आयुष्याच्या वाटेवर अशी काही माणसं भेटतात की, त्यांच्या साधेपणातच एक विलक्षण तेज दडलेलं असतं. ते तेज शब्दांत मावणारं नसतं. ते अनुभवावं लागतं. अशा व्यक्तींना भेटल्यानंतर आपला खुजेपणा आपल्याला जाणवायला लागतो. अशाच एका अद्भुत व्यक्तिमत्त्वाशी काही दिवसांपूर्वी भेट झाली… माँ कोंडाळकर आजी!

वय वर्ष ८५…सडसडीत बांधा पण शरीरात विलक्षण चैतन्य, चेहऱ्यावर प्रसन्न शांतता आणि डोळ्यांत अपार श्रद्धेचा उजेड. स्मृती आणि श्रवणशक्ती अत्यंत उत्तम. भूक लागणे हा निसर्गनियम आहे. परंतु या निसर्ग नियमावर मात करून त्याच्या विरुद्ध जगणारी काही उदाहरणे मी माझ्या आकाशझुला पुस्तकात एका लेखात दिली होती. त्यापैकी एक होत्या पश्चिम बंगालमधील प्यारी बाई आणि दुसरे उदाहरण होते गुजरातमधील एका बाबांचे. ज्यांना लोक चुडीवाले माताजी म्हणून ओळखत असत. आता ते दोन्हीही हयात नाहीत. परंतु त्या दोघांनी अन्नपाण्याशिवाय कित्येक दिवस काढले ही गोष्ट खरोखरच अद्भुत आणि आश्चर्यचकित करणारी होती. युरोपातील देखील एक संत महिला अशाच प्रकारची होती.

परंतु अशा व्यक्तींचे उदाहरण मला प्रत्यक्ष पाहायला मिळेल आणि त्यांच्याशी भेट होऊ शकेल असे कधी वाटले नव्हते. परंतु माँ कोंडाळकर यांना भेटलो आणि खरोखरच खूप धन्यता वाटली. त्यांचं नाव ताराराणी. पण सगळे त्यांना माँ म्हणून हाक मारतात. त्यांच्या आहाराबद्दल ऐकलं आणि आश्चर्यचकितच झालो. आठ वर्षांपासून त्या फक्त दोन केळी आणि थोडं दूध यावर जगत आहेत. हे ऐकताना प्रथमदर्शनी अविश्वसनीय वाटतं. वारीत तर खाद्यपदार्थांची रेलचेल असते. तरी देखील दुपारी फक्त दोन केळी त्या घेतात. त्या व्यतिरिक्त इतर कोणताही आहार त्या घेत नाहीत. पण त्यांच्यासमोर बसल्यावर जाणवतं की, शरीराच्या गरजा मर्यादित केल्या की आत्म्याची शक्ती किती व्यापक होते! शरीरात ऊर्जा केवळ अन्नामुळे येते असा आपला समज असतो. परंतु तो या माउलींनी खोटा ठरवला आहे श्रद्धेचे बळच त्यांना जगण्याची ऊर्जा देते. केवळ दोन केळी आणि दूध एवढाच आहार त्यांना या वयात देखील संपूर्ण वारी पायी करण्याएवढी ऊर्जा प्रदान करतो हे केवढे आश्चर्य!

त्यांच्याशी भेटायची उत्सुकता मला आधीपासूनच होती. माझ्या मुलीच्या सासूबाईंमार्फत त्यांच्याबद्दल ऐकलं आणि मग एक दिवस मी, माझी पत्नी श्रद्धा आणि मुलीचे सासू-सासरे असे आम्ही चौघं त्यांना भेटायला गेलो. पुण्यातील महात्मा सोसायटीत त्या राहतात. त्यांची भेट झाली आणि मी अक्षरशः भारावून गेलो.

त्यांचं आयुष्य म्हणजे एक अखंड वारी आहे. त्यांना कळायला लागल्यापासून त्या वारी करीत आहेत. आजपर्यंत एकही वर्ष त्यांनी पंढरपूरची वारी चुकवलेली नाही. वारीला जाण्याआधी त्या आळंदीला जातात, तिथून वारीसोबत पंढरपूर, आणि परत येतानाही जेव्हा इतर लोक वाहनाने येतात, तेव्हा त्या मात्र पायीच परत येतात. पुन्हा आळंदीला जाऊन दर्शन घेऊनच वारीची सांगता! सदानंद महाराज आळंदीकर हे त्यांचे गुरु! गुरूंनी अनुग्रह दिला आणि गुरूकडून घेतलेले नाम त्यांनी आयुष्यभर जपले आणि जपत आहेत.

त्या सांगत होत्या, ” वारी म्हणजे साधी गोष्ट नाही. त्यात खूप शिस्त असते. कोणी शिस्त मोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला वारीतून काढून टाकतात. परंतु तिथे खूप मजा सुद्धा असते. तिथं कोणी कोणाला काही म्हणत नाही. सगळे एकमेकांना ‘माऊली’ म्हणतात. ‘माऊली चला… माऊली या…’ असं म्हणताना सगळा अहंकार गळून पडतो. ” वारीत अभंग, भजन किंवा गवळणी म्हणताना आजही या वयात त्या एखाद्या लहान मुलीसारख्या रममाण होऊन नाचतात. नाचताना सगळं काही विसरून जातात.

खरंच… ‘माऊली’ या एका शब्दातच समतेचा आणि प्रेमाचा एक विलक्षण सुगंध दडलेला आहे! आपल्या वागण्याबोलण्यामुळे वारीत त्या सगळ्यांच्या माऊलीच झाल्या आहेत. वारीत, आळंदीला आणि पंढरपूरला सगळेजण त्यांना माँ या नावानेच संबोधतात.

त्यांची दिनचर्या ऐकली की आपण थक्क होतो. रात्री सात-साडेसातला निजणं… आणि पहाटे तीनला उठणं! त्या स्वतः सांगतात, “रात्री नामस्मरण करताना केव्हा झोप लागते ते कळतही नाही. ” पहाटे उठल्यावर पुन्हा नामस्मरण, भजन-कीर्तन… सकाळी सहाला राजाराम पुलाजवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन भजनपूजन… साडेआठला परत… दुपारी ज्ञानेश्वरी, गीता, तुकाराम गाथा, विष्णू सहस्त्रनाम यांचे वाचन… आणि दिवसभर नामात रममाण!

घरात दोन मुलं, सुना, नातवंडं—सगळा संसार आहे; पण त्या त्यात कणभरही हस्तक्षेप करत नाहीत. संसारात असूनही त्या अलिप्त आहेत. संसारात राहून अलिप्तपणे जगणारी आणि आपल्या साधनेत गढून गेलेली ही योगिनी आहे. त्या स्वयंपाकघरात चुकूनही डोकावत नाहीत. समोर काहीही अगदी त्यांचा आवडता पदार्थ ठेवला तरी त्या घेत नाहीत. मंदिरात प्रसादाचा पेढा मिळाला तरी तो स्वतः न खाता दुसऱ्याला देतात!

त्यांच्या आयुष्यात दानधर्मालाही तेवढंच महत्त्व आहे. वारीत त्या एक दिवस सर्व वारकऱ्यांना आपल्या वतीने भोजन देतात. “दानधर्म केला पाहिजे, ” हे त्यांचं ठाम मत आहे.

त्यांच्या बोलण्यात एक सहज विनोदही आहे. त्यांनी सांगितलेला एक प्रसंग तर अतिशय गमतीदार होता. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी त्या कोथरूडला राहत होत्या. बहुधा थंडीचे दिवस असावेत. पहाटेच्या अंधुक प्रकाशात पांढरे केस, पांढरे कपडे घालून त्या बाहेर पडल्या होत्या. एका टेम्पोवाल्याने त्यांना पाहिलं आणि त्याला वाटलं भूतच आहे! तो एवढा घाबरला की त्याने गाडी एका बाजूला घेऊन थांबवली. आजी त्याला समजवायला पुढे गेल्या, तर तो आणखीच घाबरला! मग थोडे उजाडेपर्यंत त्यात तशाच थांबल्या. शेवटी उजाडल्यावर त्यांनी खिडकीवर टकटक करून सांगितलं, “बाळा, घाबरू नकोस… मी आजी आहे! ” पण भीतीमुळे तो माणूस अक्षरशः ओलाचिंब झाला होता.

ही गोष्ट सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य मनात घर करून राहत होतं.

त्यांच्या श्रद्धेची खोलीही तितकीच विलक्षण आहे. मीराबाई, जनाबाई यांची उदाहरणं देताना त्या म्हणाल्या, “श्रद्धा अशी असावी! नाम हीच इस्टेट आहे. आपण ती वापरली, तर देवाला आपली काळजी घ्यावीच लागते! ”

त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा बाणेरला राहतो आणि धाकटा त्यांच्याजवळच महात्मा सोसायटीत असतो. त्यांचे नाव सतीश. या सतीशदादांना आम्ही भेटलो. सतीशदादा म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्व! त्यांच्याशी थोड्या गप्पाही झाल्या. आपल्या आईबद्दल बोलताना ते म्हणाले की आठ वर्षांपासून ती काहीही खात नाही. आमच्या घरात सर्वजण माळकरी आणि शाकाहारी आहेत. सकाळी आपल्या आईला विठ्ठल मंदिरात घेऊन जाण्याचे आणि परत आणण्याचे काम सतीशदादा आनंदाने करतात.

माँ यांनी आपल्याजवळील सर्व पैसे, दागदागिने मुलांमध्ये वाटून टाकले. तुकाराम महाराज म्हणतात, ” सोने आणि रूपे आम्हा मृत्तिकेसमान. सोन्याची, धनाची, पैशाची कोणतीही आसक्ती त्यांनी ठेवली नाही. ” बोले तैसा चाले “या उक्तीप्रमाणे वागणाऱ्या त्या आहेत. देह सुटल्यानंतरही कोणाला आपला त्रास नको म्हणून मुलांना त्यांनी स्पष्ट सांगून ठेवलं की, तिरडी, लाकूड काही नको… थेट विद्युत दाहिनीमध्ये माझे अंत्यसंस्कार करा! देहाबद्दलचे प्रेम आणि देहाची आसक्ती भल्याभल्यांना सुटत नाही. पण इथे त्यांची विरक्ती स्पष्टपणे दिसून येते.

ही विचारांची स्पष्टता… ही अलिप्तता… आणि तरीही सगळ्यांवर असलेलं प्रेम! मला वाटतं हेच खऱ्या अध्यात्माचं लक्षण असावं.

निघताना माँ ना सहज विचारलं. परमेश्वराचा एखादा साक्षात्कार आपल्या अनुभवास आला आहे का? तेव्हा त्या म्हणाल्या मी ८५ वर्षाची आहे. फक्त दोन केळी आणि थोडे दूध एवढाच आहार आहे. या देहाला तो भगवंत दरवर्षी वारीला घेऊन जातो आणि सुखरूप परत घेऊन येतो हा मोठा चमत्कार नाही का? खरंच आहे. हे तर माझ्या लक्षात आलंच नव्हतं. मी निघताना पुन्हा एकदा त्या माउलीच्या पायावर नतमस्तक झालो.

त्यांच्याकडून निघताना एक वेगळीच शांतता मनात उतरली होती. जणू काही आतल्या गोंधळावर कोणीतरी अलगद हात फिरवला होता…”रामकृष्ण हरी “हा जयघोष मनात सुरु होता.

 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ टपरीवरचा चहा… भाग – १ ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ टपरीवरचा चहा… भाग – १ ☆ राधिका भांडारकर ☆

जरा विमनस्क अवस्थेतच होते. एकाएकी रुटीनचा कंटाळा आला. जीवनात नव्याने काही करण्यासारखे उरलेच नाही असंच वाटायला लागलं. तोचतोचपणामुळे एक प्रकारची निरसता मनाला व्यापून राहिली. प्रत्येकाची एक वेगळी चौकट ही असतेच. चौकटीच्या बाहेर काहीतरी करणे यात नक्कीच थ्रिलिंग असावं किंवा मौज असावी. अशा काहीशा विनाकारणच्या भग्नावस्थेत असतानाच वंदनाचा फोन आला. वंदनाला मी “गडगडाटी”च म्हणते. साध्या साध्या गोष्टीतही तिचा उत्साह प्रचंड ओसंडत असतो. खरं म्हणजे आमची दोघांची व्यक्तीमत्त्वे भिन्न असली तरी आमची मैत्री मात्र घट्ट आहे.

पलिकडून म्हणाली, “काय करतेस आज? थांब! काहीच करू नकोस. माझ्याकडे आज मस्त प्लॅन आहे. “प्रार्थना” मध्ये नवा स्टॉक आलाय, सेल पण आहे आणि हो हो तुझा आवडता चहा. तिथे जवळच माऊली अमृततुल्य चहाची टपरी आहे. मला माहीत आहे, तुला टपरीवर चहा प्यायला आवडत नाही. आरोग्यव्यवस्था वगैरे वगैरे पण एकदा पिऊन तर बघ. “होश उड जायेंगे तेरे” आणि तुझ्या त्या साऱ्या सोफिस्टिकेटेड चौकटी मोडून टाक बरं का एक दिवस तरी आणि काय आश्चर्य? मी पण तिला हो म्हणूनच टाकले. ”चालेल. जाऊया. कुठे भेटूया वगैरे आमचे फोनवरच ठरले.

वंदनाचं एक वैशिष्ट्य आहे ती कधीही ब्रँडेड दुकानात अथवा शोरूम वगैरे सारख्या ठिकाणी खरेदी करणारच नाही. “प्रार्थना” सारख्याच भर गर्दीतली टपरी वजा दुकानातच ती खरेदी करते.

“अगं! अशा ठिकाणी ओव्हरहेड खर्च नसतात म्हणून. तू जो ड्रेस मॉलमध्ये घेतेस ना तो इथे निम्म्या किमतीत मिळतो अगदी त्याच क्वालिटीचा. ” असेच ती नेहमी म्हणत असते आणि ते खरे ही असल्याचे मला जाणवलेले आहे. वास्तविक ही एका प्रथितयश उद्योगपतीची बायको आहे बरंका? पण विनाकारण जास्तीचे पैसे का खर्च करायचे हे तिचे तत्त्व!

टपरीवरच्या चहाबाबतीतही तेच. “अगं एकदा तरी सोड ना तुझी किटली, शृंगारिक कपबशी वगैरे. कंटेनर पेक्षा आतला पदार्थ महत्त्वाचा नाही का! काय भारी असतो गं माऊलीचा चहा! सुगंधी खऱ्या अर्थाने उत्तेजित करणारा! अहाहा! तुझ्या ताज संस्कृतीची ऐशी की तैशी! ”

तर असा हा चहा.

चहा नावाचं हे उत्कट पेय ज्याने शोधून काढलं त्याचे मी पहिले आभार मानते. त्यामागचा इतिहास काही असेल. ब्रिटिशांच्या काळात एका इंग्रज माणसानेच चीन मधून चहाचे रोप भारतात आणले आणि हळूहळू भारतात चहाचे मळे फुलले.

तशी चहाची परंपरा अश्मयुगापासून आहे म्हणतात. एकदा जंगलात फिरणाऱ्या माणसाने गरम पाण्यात एक वनस्पती टाकली. पाण्याचा रंग बदलला, सुगंध दरवळला आणि न राहवून तो ते पेय प्राशन करता झाला. हे अनोळखी पेय पिताच त्याला विलक्षण ऊर्जा जाणवू लागली आणि त्याने सारी वस्ती जमा करून हे पेय सर्वांना प्यायला लावले. तोच हा चहा.

माझ्या आयुष्यात तसा फार उशिरा आला. खात्रीशीर गवळ्याने आणून दिलेलं नुकतंच काढलेलं, पांढरं शुभ्र, फेसाळ दूध गरम करून रोज सकाळी ग्लासभर पिण्यातच माझं बालपण गेलं पण मोठी माणसं पितात त्या चहापासून मी वंचितच राहिले. बुद्धी, मेंदू स्मरणशक्तीस धोकादायक म्हणून चहा वर्ज्य पण जीवनाच्या पुढच्या पर्वात सायनस, मायग्रेन, पचनसंस्था असहकार, थकवा, मानसिक ताण यामुळे चहा जवळ आला आणि तो आयुष्यभर मस्त एक सवंगडी बनवून व्यापून राहिला. मात्र या चहापानासोबत माझे काही नखरे आहेत बरं का? एक तर मला कान तुटलेली, जराशीही फुटकी कपबशी अजिबात चालत नाही. चहा कसा मस्त हलकीशी डिझाईन असलेल्या शक्यतो सफेदच सोनेरी कड असलेल्या कपात आणि साजेशा बशीसोबत असला की चहा पिण्याची लज्जत वाढते. शिवाय मला थेट कपात डळमळत आणलेला, बशीत सांडलेला चहा प्यायला अजिबात आवडत नाही. त्यासाठी मला देखणी किटलीही लागतेच. तर असे सगळे नखरे सांभाळतच मी चहाचा खरा आनंद (माझ्या दृष्टीने) अनुभवात असते. मी ४० वर्षे नोकरी केली पण त्या दरम्यानही मी माझा चहा कपबशीसह थर्मास मध्ये नेत असे. टपरीपेक्षा थर्मास बरा म्हणून आणि त्या कारणाने सह कर्मचाऱ्यांकडून माझी भरपूर थट्टा ही झालेली आहे. त्यावेळी “लोगों का काम है कहना… छोडो बेकार की बातों को.. ” अशा झोनमध्येच मी स्वतःला ठेवायचे.

तर सांगायची गोष्ट अशी की आज वंदना बरोबर एक मस्त उनाड दिवस जरासा चौकटी बाहेरचा घालवायचाच असे मी ठरवले.

लक्ष्मी रोडवर भर गर्दीत एका गल्लीतल्या मारुती मंदीरा जवळ आम्ही भेटलो. वंदना नेहमीप्रमाणेच अतिशय उत्साही आणि खळखळणारीच. दिवस आषाढ महिन्यातले असूनही अगदी काही कोसळणारा पाऊस त्या दिवशी नव्हता. पावसाची फक्त भुरभुर होती. हवा छान थंडगार होती आणि सारं मजेदार वाटत होतं. गजबजलेले रस्ते, माणसं, वाहनं, फेरीवाले, रस्त्याच्या दुतर्फा छोटी मोठी दुकाने, हॉटेल्स सगळं काही. मी फारशी कधी या भागात येत नाही पण आज वंदना बरोबर गप्पा करत, गर्दीतून वाट काढत, मनसोक्त शॉपिंग करत, लहान लहान, फूटपाथवर पसरलेल्या दुकानापाशी थांबत, चालण्यात मला खरोखरच खूप मजा वाटत होती. या वैविध्यात, गर्दीत एक चैतन्य होतं. एक जीवन होतं. धक्काबुक्की, आवाज, गोंधळ पावसामुळे रस्त्यावर आणि रस्त्याच्या कडेला साठलेले जलाशय चिखल सारंच मजेशीर वाटत होतं मला एकदम “रोमन हॉलिडे” चित्रपटातली ती बागडणारी “अॉड्री हेपबर्न” आठवली. भटकण्यात वेळ कसा गेला ते कळलेच नाही. शिणलो होतो. थकलो होतो. चहाची एक मस्त तल्लफही जाणवत होती. तेवढ्यात वातावरणात खमंग कांदा भजीचा वासही दरवळला आणि त्यासोबत चहाचा सुगंधही. चहा, पाऊस आणि कांदा भजी यांचं काय नातं असेल ते असो पण त्यात ब्रह्मानंद आहे नक्की. आम्ही “माऊली अमृततुल्य” चहाच्या टपरीजवळच आलो होतो. वंदना अगदी उत्साहात होती. “चल! चल! आता मस्त चहा पिउया.”

– क्रमशः भाग पहिला 

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २७ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २७ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

नाटककार रविंद्रनाथ – २ 

वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजेच १८८१ साली त्यांनी ‘वाल्मिकी प्रतिभा’ हे गीत नाट्य लिहिले. त्या काळात प्रसिद्ध असलेल्या बिहारीलाल रचित ‘शारदा मंगल’ या दीर्घ काव्यावर हे नाटक बेतलेले होतं. त्याच वर्षी २५ फेब्रुवारीला या नाटकाचा पहिला प्रयोग ठाकूर कुटुंबाच्या जोराशांको वाड्याच्या गच्चीवर झाला. टागोरांच्या विशाल कुटुंबातील लोक, मित्रपरिवार व बंकिमचंद्रांसारखे अनेक सुजाण रसिक आमंत्रित होते. या नाटकातील सर्व गाणी रविंद्रनाथांनी संगीतबद्ध केली होती. कांही गाणी रागदारी वर आधारित होती तर काही चक्क इंग्रजी बॅन्ड च्या चालीवर बांधली होती. या नाटकामुळे टागोर कुटुंबीय काळाच्या पुढे एक पाऊल असल्याचं सिद्ध झालं. कारण या नाटकात स्वतः रविंद्रनाथांनी वाल्मिकीची तर त्यांची पुतणी प्रतिभा हिने सरस्वतीची भूमिका केली होती. एकोणिसाव्या शतकात कुलीन घरच्या मुलींनी रंगमंचावर पाऊल टाकणे ही गोष्ट क्रांती पेक्षा कमी नव्हती. यावर वर्तमानपत्रांतून टागोर कुटुंबावर टीका देखील झाली.

आपल्या अन्य नाटकातून देखिल त्यांनी समाजसुधारणेचा एल्गार केला होता. ‘रथयात्रा’ मध्ये चातुर्वर्ण्य पद्धतीवर टीका आहे तर ‘रक्तकरबी’ मध्ये स्वातंत्र्याच्या कल्पनेविरोधातली राजसत्ता दाखवली आहे. ‘राजा’ नाटकात सामान्य जनतेचा सत्तेत सहभाग असण्या विषयीचा आग्रह आहे. ‘विसर्जन’ मध्ये देवीला बळीचे रक्त वाहण्याच्या प्रवृत्ती विरुद्ध संघर्ष आहे. ‘अचलायतन’ मध्ये पोपटपंचीलाच ज्ञान म्हणणाऱ्या शिक्षण पद्धतीवर भाष्य आहे. ‘डाकघर’ मध्ये नियतीचे कठोर दर्शन आहे. ‘फाल्गुनी’ नाटकातल्या कवीच्या तोंडी एक वाक्य आहे, “काव्यरचनेचं रसग्रहण करण्यापेक्षा तिच्या निर्मितीतला आनंद साजरा केला पाहिजे. ” ‘जत्रा’ नाटकात संस्कृत नाटकातल्या सूत्रधारासारखं एक सर्वगामी पात्र आहे.

‘राजा’ नाटकात प्रजासत्ताकाची कल्पना मांडल्यामुळे, हा इंग्रजांविरोधातला राजद्रोह आहे अशी हाकाटी तथाकथित राजनिष्ठांनी मारली होती. गीतनाटक, नृत्यनाटक याबरोबरच त्यांनी रोचक विनोदी शैलीत नाटकं लिहून आपल्या सर्वांगीण मुक्तीच्या विषयाचा पुरस्कारही केला आहे. ‘वैकुंठेर खाता’, ‘छात्रेर परिक्षा’, ‘सूक्ष्म विचार’, ‘अन्त्येष्टी संस्कार’

अशी उपहासात्मक विनोदी नाटके लिहून त्यांनी प्रचलित सामाजिक रूढींवर प्रहार केला आहे. ‘ताशेरे देश’, ‘शोध बोध’, ‘चिर कुमार प्रभा’ ही देखील अशीच सामाजिक रूढींवर, अंधानुकरणावर विनोदी अंगाने प्रहार करणारी नाटके आहेत.

चित्रांगदा हे नृत्यनाट्य त्यांनी वयाच्या ७५व्या वर्षी लिहिलं, ते सुद्धा अवघ्या सात दिवसांत! ‘प्रकृतीर परिशोध’ या नाटकात, मुक्तीच्या शोधात संसारातून पळून जाणं म्हणजे भ्याडपणा असल्याचं प्रतिपादन आहे. नाट्यक्षेत्रात एवढी मोलाची भर घालणाऱ्या रविंद्रनाथांना; नटश्रेष्ठ शिशिर भादुरी व श्रेष्ठ नाट्यदिग्दर्शक शंभू मित्रा यांचा अपवाद वगळता, व्यावसायिक बंगाली रंगभूमीने मात्र साथ दिली नाही.

(संदर्भ- रविंद्रनाथ तीन व्याख्याने ले. पु ल देशपांडे)

—– 

☆ गीत : ७९ ☆

IF it is not my portion to meet thee in this my life then let me ever feel that I have missed thy sight ⎯ let me not forget for a moment, let me carry the pangs of this sorrow in my 

dreams and in my wakeful hours.

As my days pass in the crowded market of this world and my hands grow full with the 

daily profits, let me ever feel that I have gained nothing ⎯ let me not forget for a moment, let me carry the pangs of this sorrow in my dreams and in my wakeful hours.

When I sit by the roadside, tired and panting, when I spread my bed low in the dust, let me ever feel that the long journey is still before me ⎯ let me not forget for a moment, let me carry the pangs of this sorrow in my dreams and in my wakeful hours.

When my rooms have been decked out and the flutes sound and the laughter there is 

loud, let me ever feel that I have not invited thee to my house ⎯ let me not forget for a 

moment, let me carry the pangs of this sorrow in my dreams and in my wakeful hours.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ७९ ☆

तुला ना पाहीन,

जर हेच प्राक्तन,

सुनेसुनेच जीवन,

डोळे असुनि, आंधळा गा॥

*

इथल्या बाजारी,

नफ्यात कारभारी,

दर्शनाची उधारी,

ठेउनि व्यर्थ जन्म हा॥

*

दमुनि सांजेला,

टेकुनि माथ्याला,

येईल ध्यानाला,

अजुनि प्रवास लांबचा हा॥

*

घर माझे सजेल,

सूर सनई वाजेल,

मधु हास्यही फुलेल,

तुझ्याविना सर्व व्यर्थ बा॥

*

दर्शनास मी मुकावे,

वैषम्य मज न साहवे,

दुःख हे सतत वहावे,

स्वप्नी वा जागृतीत म्या॥

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—– 

☆ गीत : ८० ☆

I AM like a remnant of a cloud of autumn uselessly roaming in the sky, O my sun everglorious! Thy touch has not yet melted my vapour, making me one with thy light, and 

thus I count months and years separated from thee.

If this be thy wish and if this be thy play, then take this fleeting emptiness of mine, paint it with colours, gild it with gold, float it on the wanton wind and spread it in varied wonders.

And again when it shall be thy wish to end this play at night, I shall melt and vanish away 

in the dark, or it may be in a smile of the white morning, in a coolness of purity transparent.

—–  

☆ मराठी भावानुवाद : गीत : ८० ☆

हे दिनमणी!

हेमंती मेघावशेष फिरे नभी मी अनासक्त

जल माझे विरू दे, होऊ दे मला रिक्त

*

तव प्रकाशी लुप्त होऊ दे।

धवल रूप ते तुझे घेऊ दे।

दोघांमधले अंतर ढळू दे।

*

अशक्य जर हे!

पोकळी जाणवे अंतरात मज

विविध रंगी तव रंगू दे तिज

*

सुवर्ण मुलामा त्यावरी देई।

सोडून उनाड वार्‍यावर देई।

दिशा दिशांना पसरत जाई।

*

या नाट्याचा अंक अंतिम!

होईन निशेच्या मी तमात लुप्त

अथवा दिवसाच्या प्रकाशी लिप्त

*

अस्तित्वहीन मज रूप मिळू दे।

पारदर्शी अन् पवित्र बनू दे।

समर्पणातच लीन होऊ दे।

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—– 

☆ गीत : ८१ ☆

ON many an idle day have I grieved over lost time. But it is never lost, my lord. Thou hast taken every moment of my life in thine own hands.

Hidden in the heart of things thou art nourishing seeds into sprouts, buds into blossoms, and ripening flowers into fruitfulness.

I was tired and sleeping on my idle bed and imagined all work had ceased. In the morning I woke up and found my garden full with wonders of flowers.

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत :८१ ☆

पळे वाया जावी।

खंत का करावी।

त्याच्या हाती द्यावी।

सारी सत्ता॥

*

अंकुर बियांचे।

फूल कळीयांचे।

फळ हो फुलांचे।

त्याच्या हाता॥

*

दमुनि झोपतो।

स्वप्नात बघतो।

काजा संपवितो।

विठू माझा॥

*

– क्रमशः भाग २७

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भुताटकीची सायकल आणि बरंच काही – – – ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ भुताटकीची सायकल आणि बरंच काही  – –  ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

सुरत, गुजरात. गल्ली क्रिकेट रंगात आलेलं. पण अचानक मुलांनी क्रिकेट खेळणे थांबवले. समोर रस्त्यावरून एक सायकल येत होती. पण त्या सायकलवर कोणीही स्वार नव्हता. फक्त बाहुल्यांचे पोकळ पाय स्वतःच पॅडल मारत होते आणि सायकल चालत होती.

सुरतमध्ये ही भुताटकीची सायकल आता सगळीकडे दिसू लागली होती.

आणि या भुताटकीच्या सायकलीचा जनक होता शिवम मौर्य.

या सगळ्याची सुरुवात झाली ती शिवमच्या इलेक्ट्रिक सायकलने. तो १५ वर्षांचा असताना शाळेत सायकलने जाताना त्याला एक चढाव चढावा लागायचा, त्यात त्याची चांगलीच दमछाक व्हायची. त्यावर उत्तर म्हणून या शाळकरी मुलाने नववीत असताना, महिनोन्महिने आपले पॉकेटमनीचे पैसे वाचवले आणि आपल्या गच्चीवर त्या सायकलीला इलेक्ट्रिक सायकल बनवली.

आता चढ चढण्यासाठी, जोर लाऊन पायडल मारायची गरज नव्हती.

आता शिवमला हा छंदच जडला. त्याचे आई-वडील “शिक्षणावर लक्ष केंद्रित कर” असे म्हणत असताना, शिवम यूट्यूबवरून स्वतःच इंजिनिअरिंग शिकत होता. आपल्या प्रयोगाचे व्हिडिओ यूट्यूबवर टाकत होता. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून पुढचे प्रयोग करत होता.

शिवमने इंजिनियरिंग डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर भगवान महावीर विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक. केले. वयाच्या २४ व्या वर्षी, शिवमचे “क्रिएटिव्ह सायन्स” नावाचे यूट्यूब चॅनल होते आणि तेव्हापान, त्यावर तो आपली एकाहून एक भन्नाट संशोधने सादर करत असतो.

मित्र गुरप्रीत अरोरा आणि गणेश पाटील यांच्यासोबत, त्याने एक वर्ष आणि १.८ लाख रुपये खर्च करून “गरुडा” तयार केली. ही भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरणारी चालकविरहित सुपरबाईक होती. बॅटमॅनच्या मोटारसायकलसारखी (बॅटपॉड) हबलेस चाके. या मोटारसायकलचे निम्म्याहून अधिक भाग अक्षरशः भंगारातून घेतले होते, ही बाईक रिमोटने, तोंडी आदेशानुसार (व्हॉइस कमांड्स) आणि अगदी चालकाशिवायसुद्धा चालू शकते. तिच्यातील वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाने ती सेल्फ-बॅलन्सिंग आहे, स्टँडशिवाय सुद्धा ती न पडता उभी राहू शकते.

आज तक चॅनेलने या बाईकला “मेक इन इंडिया इनोव्हेशनचे प्रतीक” म्हटले.

याच्यानंतर आली ती भुताटकीची सायकल. फक्त ३५,००० रुपये खर्चात ३ महिन्यांत शिवमने ही तयार केली.

एका तिचाकीच्या (ट्राय-सायकल) पुढच्या चाकाला मोटर त्याने लावली आणि पॅडलला रोबोटिक मॅनक्विनचे पाय जोडले. जेव्हा मोटर पुढचे चाक फिरवत असे, तेव्हा मागची चाके चेन फिरवत. चेन पॅडल हलवत असे. पॅडल पाय हलवत. आणि यामुळे, डोके आणि धड नसलेला एक स्वार सुरतमधून पॅडल मारत जात होता असं दिसत होतं.

ही तिचाकीसुद्धा रिमोटने किंवा मोबाईल ॲपने नियंत्रित करता येते किंवा एका विशिष्ट मार्गावर, विशिष्ट स्थळी पोचण्यासाठी चालण्यासाठी तिला प्रोग्रामसुद्धा करता येते. मुले त्याच्या मागे धावत असत.

त्याने रिक्षा खेचणारा यंत्रमानव बनवला, एक चाकाची स्कूटर बनवली, एका चाकाची मोटारसायकल बनवली, इलेक्ट्रिक कॅपसुल कार बनवली, केळ्याच्या आकाराची “बनाना कार” बनवली.

आणि या सगळ्या भन्नाट उत्पादनांचे वैशिष्ट्य हे आहे की शिवमने याचे तंत्रज्ञान ना गुपित ठेवले ना त्याचे पेटंट केले. आपली ही उत्पादने कशी बनवायची याची अथपासून इतिपर्यंतची माहिती तो त्याच्या “क्रिएटिव्ह सायन्स” या यूट्यूब पेजवर शेअर करत असतो.

त्याच्या या अनोख्या पेजला तब्बल २० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

डॉलर्स कमावण्यासाठी परदेशात जाऊन स्थायिक होणं म्हणजेच यशस्वी होणं या सरधोपट मान्यतेला शिवमने धोबीपछाड दिली आहे, आणि भारतातच राहून आपले तंत्रज्ञान सर्वांना देऊ करून आत्मनिर्भर “मेक इन इंडिया” ला भरघोस आणि सक्रीय पाठिंबा दिला आहे.

शिवमचे अभिनंदन आणि त्याला हार्दिक शुभेच्छा!!

 

श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सहज विचार… – लेखक : अज्ञात – संग्राहिका : उषा सोमण  ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सहज विचार… – लेखक : अज्ञात – संग्राहिका : उषा सोमण  ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

सहज-विचार (random thoughts)

जेव्हा मी सत्तरीत पाऊल ठेवलं, तेव्हा मी माझ्या जुन्या आरामखुर्चीवर शांतपणे बसले होते. पार केलेल्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना मी स्वतःशीच पुटपुटले,
“बरं… तर हे कदाचित आयुष्याचं शेवटचं प्रकरण असावं.”

पण मी जितका विचार केला, तितकी मला एक आश्चर्यकारक गोष्ट जाणवली: आयुष्य संपत नव्हतं, तर ते फक्त सत्याचा उलगडा करत होतं.

ज्या गोष्टींवर मी कधीकाळी मनापासून विश्वास ठेवला होता, त्यातील अनेक गोष्टी केवळ आभास निघाल्या.

मुले? ती मोठी होतात आणि स्वतःचं वेगळं जग निर्माण करतात.

आरोग्य? ते तुमच्या कल्पनेपेक्षाही वेगाने अदृश्य होऊ शकतं.

सरकार? ते बहुधा फक्त हेडलाईन्स, आश्वासने आणि कागदावरचे आकडे असतात.

आणि वृद्धत्व… वृद्धत्व क्रूर असू शकतं. ते आधी तुमच्या शरीरावर नाही, तर तुमच्या आशेवर हल्ला करतं.

म्हणून मी काही कडू सत्यांशी, प्रामाणिक सत्यांशी तडजोड केली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याच सत्यांनी मला वाचवलं.

° मुलं तुम्हाला एकटेपणापासून वाचवू शकत नाहीत.

वर्षानुवर्षे आपण स्वतःला सांगतो,

“जेव्हा माझी मुलं मोठी होतील, तेव्हा मी कधीच एकटी नसेन. ती मला भेटायला येतील, माझी काळजी घेतील, माझ्या जवळ राहतील.”

हे एक सुंदर स्वप्न आहे.

पण वास्तवाचे बेत वेगळे असतात. मुलांकडे नोकऱ्या, बिलं, जोडीदार, जबाबदाऱ्या आणि त्यांची स्वतःची मुलं असतात. त्यांचे दिवस कामांनी भरलेले असतात आणि तुम्ही फक्त त्यांच्या जबाबदाऱ्यांच्या मधली एक छोटी आठवण बनून राहता.

कधीकधी तुम्ही एखाद्या सणासारखी त्यांच्या फोनची वाट पाहता.

दिवस जातात.

आठवडे उलटतात.

आणि शेवटी एक मेसेज येतो:

“हाय मॅाम, आशा आहे की तू ठीक असशील.”

त्यांना आपली आठवण राहिली, या विचाराने तुम्ही हसता.

पण खोलीतला तो शांत एकटेपणा तसाच राहतो.

तेव्हा मला समजलं: मुलं हे एक वरदान आहेत, पण ती एकटेपणाविरुद्धचं संरक्षण कवच नाहीत.

° आरोग्य हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे.

एक दिवस असा येतो, जेव्हा पायऱ्या चढणं म्हणजे एखादा डोंगर चढल्यासारखं वाटतं. जेव्हा तुमचे गुडघे तुमच्या विचारांपेक्षा जास्त जोरात ‘बोलू’ लागतात. ज्या ठिकाणी तुम्ही एकेकाळी धावत जायचात, तिथे जाणं तुम्ही टाळता.

तेव्हा तुम्हाला समजतं: आरोग्य हे अनंत काळ टिकणारं नाहीये.

तीच तुमची खरी संपत्ती आहे.

आरोग्याशिवाय पैशाला काही अर्थ उरत नाही. ताकदीशिवाय स्वातंत्र्याची चमक कमी होते. जोपर्यंत तुमचं शरीर तुमचं ऐकतंय, तोपर्यंत त्याची काळजी घ्या.

° पेन्शन आणि पैसा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत

पेन्शन तुम्हाला जिवंत ठेवू शकतं, पण ते तुम्हाला ‘जगू’ देईलच असं नाही.

वर्षानुवर्षे माझा असा विश्वास होता की ही व्यवस्था आपली काळजी घेईल. दशकांच्या कामानंतर कोणीतरी म्हणेल, “आता विश्रांती घे. आम्ही आहोत ना.”

पण आयुष्य असं चालत नाही.

बिलं येतातच. औषधांचा खर्च वाढतो. महागाई वाढते. आणि अचानक तुम्हाला जाणवतं की जगणं महाग झालं आहे.

म्हणून मी एक निर्णय घेतला: आश्वासनांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. जेवढं शक्य आहे तेवढी बचत करा. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत कमवा. आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी छोटीशी बचतही मोलाची ठरते.

°मी पाळत असलेले ५ नियम:°

°नियम १: पैसा हा अनेकदा मुलांपेक्षा जास्त भरवशाचा असतो.

हे ऐकायला कदाचित कठोर वाटेल, पण सत्य असंच असतं. मुलं म्हणजे प्रेम आहेत, आनंद आहेत, पण ती तुमचा ‘रिटायरमेंट प्लॅन’ नाहीत. स्वतःसाठी बचत करा. ती बचत तुम्हाला स्वातंत्र्य देते आणि स्वातंत्र्य तुम्हाला शांतता देतं.

°नियम २: तुमचं आरोग्य हेच आता तुमचं ‘फुल-टाईम’ काम आहे.°

तुमचा रोजचा पहिला विजय म्हणजे अंथरुणातून कोणत्याही वेदनेशिवाय उठणे. चाला, व्यायाम करा, साखर-मीठ कमी खा. आजार तुम्ही कोण आहात हे पाहत नाही, पण खबरदारी सर्व काही बदलू शकते.

°नियम ३: स्वतःच्या सहवासाचा आनंद घ्यायला शिका.°

कुणाची तरी वाट पाहणं दुःख निर्माण करतं. फोनची, भेटीची किंवा कोणीतरी आपल्याला आनंद देईल, याची वाट पाहू नका. स्वतःचा आनंद स्वतः निर्माण करा. आवडता पदार्थ बनवा, एखादं चांगलं पुस्तक वाचा, जुनी गाणी ऐका. जिथे अपेक्षा संपतात, तिथे शांतता सुरू होते.

°नियम ४: वृद्धत्व म्हणजे ‘कमकुवत’ होण्याचा परवाना नाही.°

मी माझ्या वयाची अशी अनेक लोकं पाहते जी दिवसभर तक्रार करतात— “सगळं दुखतंय,” “कोणालाच काळजी नाही,” “जग खूप वाईट आहे.” मग हळूहळू लोक त्यांना भेटायला येणं बंद करतात. प्रेमाचा अभाव नसतो, पण सततची नकारात्मकता थकवणारी असते. तुमची जिद्दच आदर मिळवून देते. आयुष्य कितीही दुखत असलं, तरी ताठ मानेने जगा.

° नियम ५: भूतकाळ सोडून द्या.°

वृद्धत्वातील सर्वात धोकादायक शब्द म्हणजे “पूर्वी.” पूर्वी आयुष्य सोपं होतं, पूर्वी मुलं ऐकायची, पूर्वी जग चांगलं होतं. पण तो “पूर्वी” आता निघून गेला आहे. फक्त “आज” अस्तित्वात आहे. जर तुम्ही कालच्या आठवणीत जगलात, तर आज जे काही शिल्लक आहे तेही तुम्ही गमावून बसाल.
मी आता जगायला शिकतेय. आठवणीत नाही, पश्चात्तापात नाही, तर या क्षणात.

वृद्धत्व ही एक परीक्षा आहे. ती तुमच्यासाठी दुसरं कोणीही देऊ शकत नाही. तुम्ही खुर्चीत बसून मदतीची वाट पाहत तक्रार करू शकता… किंवा दीर्घ श्वास घेऊन जे काही उरलं आहे, त्यातून पुन्हा आपलं आयुष्य उभारू शकता.

आणि जर तुम्ही तसं केलंत, तर तुम्हाला एक सुंदर गोष्ट सापडेल:

सत्तरीनंतरचं आयुष्य संपलेलं नसतं. त्यात अजूनही हास्य असू शकतं, शांतता असू शकते आणि एक अर्थ असू शकतो.

आणि हो…

ते अजूनही एक अतिशय सुंदर आयुष्य असू शकतं.

लेखक:अज्ञात
संग्राहिका : उषा सोमण
प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ परकाया प्रवेश ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ परकाया प्रवेश ☆ शालिनी जोशी

‘परकायाप्रवेश’ हा शब्द आपल्या नेहमीच्या वापरात अजिबात नाही. पुराणकथात, गोष्टीत कधीतरी ऐकलेला, वाचलेला. अलीकडेच नीना कुलकर्णी यांचे ‘अंतरंग’ वाचत होते. ‘अंतरंग’ हा लोकसत्तेतील अंतरंग या सदरात त्यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. त्यामध्ये एका लेखात नाटकातील काम हा परकाया प्रवेश असतो असे वाचले. आणि माझे मनात विचारांचे काहूर उठले.

स्वतःचा देह बाजूला ठेवून आत्मरूपाने दुसऱ्याच्या देहात केलेला प्रवेश म्हणजे परकाया प्रवेश. हा काही काळापुरता असतो. पण प्रवेश केलेल्या व्यक्ती सारखे वागणे, बोलणे साधावे लागते. परकायाप्रवेश ही एक सिद्धि आहे. खरंच नट तरी वेगळे काय करतो? जी भूमिका त्याला वटवायची असते तिला योग्य कपडे तो धारण करतो. त्याला योग्य चेहरा रंगवून घेतो. त्या भूमिकेचे वागणे, बोलणे, हालचाली आत्मसात करतो. तिचे जीवनच तो आपल्या पुढे उभे करतो. त्या पात्राच्या भावना हालचालीतून, चेहऱ्यावरील भावातून व्यक्त करण्यासाठी तो नट आपला मूळचा व्यवसाय, गुण, रूप, घरदार, वागणूक काही काळा पुरते का होईना विसरतो. असे त्या नाटकातील भूमिकेशी एकरूप होणे म्हणजेच पर काया प्रवेशच नाही का? काही काळापुरता, नाटकाच्या तीन तासा पुरता. असे साधले तरच लोक भूमिका चांगली वठली म्हणून कौतुक करतात. येथे तरुणाचा म्हाताऱ्यात, राजाचा भिकाऱ्यात किंवा तरुणाचा तरुणीत परकायाप्रवेश होत असतो.

सिनेमा, सिरीयल ची गोष्ट थोडी वेगळी असते. तिथे अभिनय साधला नाही तरी रीटेक असतो व समोर प्रेक्षक नसतात. पण नाटक म्हणजे प्रेक्षकांसमोर केलेला जिवंत पर कायाप्रवेश.

आणखी विचार करता, असे लक्षात आलं एखाद्या व्यक्तीविषयी लिहिताना त्या व्यक्तीशी एकरूप व्हावं लागतं. स्वतःला बाजूला ठेवून, त्या व्यक्तीचे विचार, बोली, मते यांचा विचार करावा लागतो. त्या भूमिकेत शिरलं तरच ते शब्दचित्र रंगवता येत. हीच गोष्ट काव्य निर्मितीचे बाबतीत असते. कवी जेव्हा आपल्या सर्व कथा- व्यथा बाजूला ठेवतो, तेव्हाच रसदार, सत्य, काव्य निर्माण होतं. असा हा परकाया प्रवेशाचा अर्थ मी लावला. तो सोपा नसतो. कवी, लेखकांना तो साधतो. दुसऱ्याच्या अंतरंगात त्यासाठी प्रवेश करावा लागतो. मग पक्षी, वारा, झाडे यांच्या मनातले कळते.

एखाद्या व्यक्तीच्या आत्म्याचा दुसऱ्याच्या शरीराच्या प्रवेश ही सिध्दी श्री शंकराचार्य याना साध्य होती. म्हणूनच मंडण मिश्र यांच्या पत्नीने शंकराचार्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी परकाया प्रवेश केला होता. अशा आणखीही गोष्टी सांगतात.

आपण एवढे समजू शकतो की वर्णन करावयाच्या वस्तूचे, व्यक्तीचे गुणदोष, सुख, दुःख व्यक्त करण्यासाठी त्याच्याशी एकरूप व्हावे लागते. स्वतःला काही काळ विसरावे लागते. हाच परकायाप्रवेश. लेखकांच्या कवींच्या मध्ये सहजच हा गुण असतो. म्हणून त्यांचे लिखाण, हावभाव हृदयाला भिडतात, मनाला भावतात.

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जांभूळ आख्यान… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ जांभूळ आख्यान☆ शीला पतकी 

जांभूळ आख्यान नावाच नाटक खूप वर्षापूर्वी पाहिलं होतं. त्याची कथा थोडक्यात अशी आहे… की एकदा पांडव वनविहाराला गेले असताना कर्ण द्रौपदीच्या दृष्टीला पडतो. आणि क्षणभर तिला त्याचा मोह होतो. आणि वाटतं की हा जर सहावा पांडव असता तर… हा विचार अगदी क्षणभरच येतो… कृष्णाला तिच्या मनातला हा भाव कळतो. द्रौपदी खरंतर तो विचार क्षणात झटकून टाकते… तरी तिला असा विचार आपल्या मनात कसा आला असं वाटतच राहतं… पण ते किती स्वाभाविक होतं ना कारण तो खरंच पहिला पांडव होताच ना… त्या सगळ्यांना खूप भूक लागते म्हणून फळे आणण्यासाठी त्यातील एक पांडव जातो… कुठेही फळं मिळत नाहीत केवळ. एका झाडाला एक जांभूळ लागलेल असत ते तो काढतो. तेव्हा तिथे तपश्चर्याला बसलेल्या ऋषींनी बारा वर्षाच्या कठोर तपश्चर्यानंतर खाण्यासाठी ते जांभूळ राखून ठेवलेले असत हे जेव्हा त्या पांडवाला कळतं तेव्हा तो घाबरतो. ते ऋषी आपल्याला शाप देतील ही भीती वाटते. तो श्रीकृष्णाला ही गोष्ट सांगतो. कृष्ण तेव्हा सांगतो की पतिव्रता स्त्रीने ते झाडाला जर चिकटवलं तर ते पुन्हा लागून जाईल. मग आता द्रौपदी सारखी दुसरी पतिव्रता नाही… सगळे म्हणतात, जा बाई तू हे कर… ती मनोमन जाणून असते हे खरं नाहीये… आपल्या मनात क्षणभर का होईना पर पुरुषाचा विचार आला होता… आणि ती मनोमन श्रीकृष्णाचा धावा करते की, आता मला या पेचातून सोडव. आणि त्याच्या प्रतिमेला नमस्कार करून ती झाडाला जांभूळ चिकटवते. ते चिकटत पण ते उलट चिकटतं… असं का घडलं? … याचे उत्तर श्रीकृष्ण तिला सांगतो की, परपुरुषाचा विचार मनात आणल्यामुळे तुझ्यातून चूक झालेली आहे. त्या चुकीची जाणीव तुला सतत व्हावी म्हणून तुझ्या हातून चिकटवलेले ते जांभूळ उलट लागलं तुला सदैव याची खंत वाटली पाहिजे…

 इथे आख्यान संपत. बायकांच्या मनात पर पुरूषा विषयी कधीही लोभ निर्माण होता कामा नये… अगदी मनांत सुद्धा! …

आता याकडे थोडे वेगळ्या दृष्टीने पाहूयात… एखाद्या पुरुषाला हे जांभूळ चिकटवण्याचा सांगितले असते तर… तर मला वाटतं सगळी जांभळं झाडाला उलटी चिकटली असती किंबहुना जांभळाचे झाडच उलटे झाल असत.

त्या कथेत शेवट सांगताना असं सांगितलं जातं की… म्हणून जांभळ खाल्लं तर आपली जीभ जांभळट होते… म्हणजे जांभूळ खाल्ल्याचे लपून राहत नाही जसे की पाप लपून राहत नाही… म्हणजे एखाद्या स्त्रीच्या कल्पनेत असलेला क्षणभर तिने कल्पना केलेला पुरुष तिच्या मनात आला तर तिच्या पातीव्रत्याचा भंग…! तिच्या हातून मोठे पाप घडले…! आणि पुरुषांच्या दिवसातनं दहा वेळा दहा बायकांबद्दल विचार येतात ते मात्र धुतल्या तांदळासारखे स्वच्छ…!

अगदी श्रीकृष्णांन सुद्धा बायकांवर अन्याय केला आहे… हे माझं मत तुम्हाला काय वाटतं…?

– – मी आत्ताच जांभळं आणली.. ते घेताना माझ्या डोक्यात हिच कथा होती. काहीतरी कारण सांगतात. खरंतर जांभळाला पूजेमध्ये ठेवू शकत नाही. पण द्राक्षाला ठेवतात का? किंवा ज्या फळांचे घोस असतात त्यांना तरी ठेवतात का? एक तर जांभूळ पिकल्यानंतर ते लगेच फुटतं. ते जास्त टिकत नाही. त्यामुळे कदाचित पूजेमध्ये त्याला ठेवता येत नसेल.. पण त्याच्या मागे ही कारण देणे चुकीचेच आहे.. कोणत्याही कारणांच्या मागे स्त्रियांना नीतिमत्ता शिकवणं ही एकेकाळची परंपराच होती. स्त्रियांना सगळे नियम आणि बंधन.. अर्थात याला अनेक कारणं आहेत.. कारण स्त्रियांवर अन्याय अत्याचार झाला तर त्यात तीच सफर होते.. पुरुष नामानिराळे राहतात. म्हणून स्त्रियांचे चारित्र्य जपण्यासाठी अशा अनेक कथा निर्माण झाल्या असाव्यात..

आणि स्त्रियांना शिक्षण नसल्यामुळे त्या जास्त श्रद्धाळू म्हणा किंवा अंधश्रद्धाळू होत्या म्हणजे बाईने पुस्तक वाचलं तर नवरा मरतो अशा सगळ्या भयावह गोष्टी तिच्या माथी मारल्या आणि नवरा मेल्यावर बाईची अवस्था त्याकाळी खूप वाईट होती अगदी घरात कामाला मोलकरीण. बायकोचं बाळंतपण करायला घरात हक्काची बाई म्हणून दिर ठेवून घ्यायचे आणि छळायचे. शिक्षणाने खूप परिवर्तन झाले, समाजाला ते स्वीकारावेच लागले. काल माझ्या शेजारी एका मुलीची आई गेली ती डॉक्टर आहे आणि तिची बहीण प्राध्यापिका डॉक्टर असलेल्या मुलीने सर्व क्रिया कर्म मुलाप्रमाणे केले. आणि आपल्या नेहमीच्या बोलण्यातील चार माणसं काय म्हणतील बाई ती चार बोलणारे नेहमीचे माणसे कोणीही बोलले नाहीत म्हणजे समाजामध्ये परिवर्तन घडवून आले हे नक्की! आणि ते नेमके शिक्षणानेच घडले यात वादच नाही. पण अशा भंपक गोष्टींमुळे मुली थोड्या अधिकच धीट झाल्या आणि कुटुंब व्यवस्था विस्कळीत व्हायला लागली आहे. आता संस्कार काहीतरी टिकून ठेवेल अन्यथा अवघड आहे…!

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”  ARE YOU DEAD?..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “ARE YOU DEAD? ☆ संध्या बेडेकर ☆

काही लोक असे आहेत, जे सकाळी मोबाईल हातात घेतल्यावर आपल्या गृप्स मध्ये पहिला मेसेज Good morning चा टाकतात.

बरोबर एखाद गुलाबाचे फूल पण पोस्ट करतात.

खरतर हा एक अभिवादन करायचा प्रकार आहे.

मी कधी कोणाला Good morning चा मेसेज पाठवत नाही. गुलदस्ता पाठवत नाही. आणि कोणी मेसेज पाठवला तर मी उत्तरही देत नाही. मला हे उगीचच, waste of time, काय गरज आहे या सगळ्याची? अस वाटत. बहुतेक यात माझा उद्धटपणा दिसतो.

काहीच रिसपोन्स मिळत नसल्यामुळेच, पूढे असे मेसेज मला येत नाहीत. कदाचित फारच शिष्ठ आहेत या असा शिक्का पण माझ्या नावावर मारला जात असावा.

वर्तमानपत्रात एक लेख वाचल्यावर या Good Morning msg कडे बघायचा माझा दृष्टिकोन बदलला. आता हा असा मेसेज किती महत्वाचा असू शकतो. हे लक्षात आल.

दृष्टिकोन बदलला की विचार बदलतात.

हे खरय.

आता एका वेगळ्या अर्थाने Good morning msg पटला.

Are you dead? हा लेख वाचला.

चीन मध्ये हा app वापरणारे बरेच लोक आहेत. आजकाल फॅमिलीच्या नावाखाली जास्तीत जास्त 3 जणांची संख्या असते. त्यातील मुलगा/ मुलगी शिक्षणासाठी, लग्न झाल्यावर दूर गेले की फॅमिलीत फक्त 2 जण उरतात. जसजस वय वाढत तस ज्येष्ठांच्या समस्यांना तोंड देत, एक वेळ अशीही येते की दोघांपैकी फॅमिलीत एकच उरतो.

आधीच्या काळात एका मुलाला वाढवायला आजूबाजूचे अनेक लोक असायचे. घरातच कमित कमि आठ दहा जण असायचे. आता तर हम दो हमारे दो हा हिशोब पण गेलाय, आता एकच.. किंवा मुल नकोच. आता DINK चा जमाना आहे (double income no kids), मग एकटे राहणार्यांचा नंबर वाढणारच. त्यात 996 कल्चर.

9 to9 job, मग इतक काम केल्यावर दोन दिवस आराम, भटकंतीत. 6 days busy. त्यामुळे आजूबाजूला राहणार्या लोकांशी संबंध नाही, भेटीगाठी नाही, बोलण नाही. शेजारी कोण. राहतय? हे सुद्धा खूपदा माहित नसत. social life as such नाहीच.

अशा वेळेस त्यांच्या घरात काय घडलय/ काय घडतय? हे कळायला मार्ग नाही. त्यात privacy च्या नावाने वागण्या बोलण्यात मोकळीक नाही. विदेशी राहणार्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय, तेही एक मोठ कारण आहेच.

आज single/ एकटे राहणार्यांची संख्या वाढतेय. त्याला कारण अनेक आहेत.

नोकरीमुळे दुसर्या शहरात जाणे, डायव्होर्स झाल्यावर, लग्न करायचे नाही, अशा विचारांचे पण बरेच आहेत. ऑफिस मधून घरी आल्यावर ही conference calls. Work culture अस झालय की आई-वडीलां बरोबरही बोलायला वेळ मिळत नाही. त्यामुळे

एकटेपणा ही समस्या फक्त जेष्ठांचीच आहे अस राहिलेल नाहिये.

 एका समृद्ध घरात एकटी राहणार्या वृद्ध स्री चे प्राण गेले, हे कळल केंव्हा? तर आठवड्याभरानंतर. या दरम्यान कधी कोणी फोन केला, रिंग गेली, फोन उचलला नाही… अस कदाचित झाल असेल. तर बाहेर गेल्या असतील अशी आपली समजूत करून, या बाबतीत कदाचित लक्ष दिल गेल नसेल.. काय नक्की झाल असाव? माहित नाही. पण कळल मात्र आठ दिवसांनी. हे बरोबर आहे का?

Are you dead?

 या app ला CHINA मध्ये छान response मिळाला/ मिळतोय.

एकटे राहणार्यांनी फक्त रोज तेथे एक बटन दाबायचे असते. आणि 

मी आहे

 I am there , I am in

 ही सूचना द्यायची. जर लगातार दोन दिवस हे बटन operate झाल नाही, तर काही problem असावा.

अस लक्षात येईल. त्या app वर registration करताना, काही महत्वाचे, तुमच्या नातेवाईकांचे फोन. नंबर नक्की घेतले असतीलच. त्यानुसार पूढचे काम करण सोप होईल.

मधून मधून वर्तमान पत्रात, TV वर या संदर्भात काही भयानक बातम्या ऐकायला वाचायला मिळतात.

भारतात या app ची गरज आहे का?

आज भारतात 5% लोक एकटे राहतात.

ही संख्या वाढतच चाललीय.

आज तरी या प्रकारचा App भारतात नाही.

या प्रश्नावर काही उपाय आहे का?

मला वाटत

 जर आपला एक गृप असला, मग तो मित्र/मैत्रीणींचा, आपल्या आजूबाजूला राहणार्या लोकांचा, ऑफिस मधला, समवयस्क मैत्रीणींचा, कोणताही असू शकतो.

त्या गृपवर फक्त

Good Morning msg रोज टाकायचाच असा नियम ठरवला तरी हा प्रश्न सूटू शकतो. नाही का?

आज खासकरून जेष्ठांसाठी अनेक संस्था काम करतायेत.

UP मध्ये 112 वर फोन केला तर लगेच मदद मिळते. तर केरल मध्ये एकटेपणा घालवायला Listener parlours 

 Manglore मध्ये sathi Shifts आहेत.

एकटे राहणार्यांच्या मनात… मला काही झाल तर लोकांना कळेल का? केंव्हा कळेल? हा प्रश्न भेडसावतोच.

काळजी कमी करण्याच एक रहस्य समजून घ्याव. उगीच कल्पनेत काळजी करत बसण्यापेक्षा काही तरी निर्णय घ्यावा. व्यक्त व्हाव.

जस शरीरात वेदना झाल्या की आपण डोॅक्टरकडे जातो, तसेच मनात काळजी / शंका / भीती असेल तर ती वेळेवर समजून व्यक्त होण आवश्यक आहे.

वेळेवर घेतलेल्या correct decision मुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो.

No need to worries.

म्हणून रोज good morning चा मेसेज गृपमध्ये पाठवणे हा सरळ साधा सोपा उपाय चांगला आहे. सहज करण्यासारखाही आहे.

आयुष्यातील चुका जरी खोडता येत

नसल्या तरी दुरूस्त नक्किच करता येतात.

मी माझी चूक सुधारणार…

आजपासून मी good morning लिहिणार आणि अशा मेसेज ला उत्तरही नक्की देणार.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares