मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १९ आणि २० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १९ आणि २० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. १९ – – – 

मना सर्वथा सत्य सांडू नको रे|

मना सर्वदा मिथ्य मांडू नको रे|

मना सत्य ते सत्य वाचे वदावे|

मना मिथ्य ते मिथ्य सोडुनि द्यावे |१९|

अर्थ: हे मना, या जगात केवळ भगवंतच एकमेव सत्य आहे. म्हणून त्याला कधी सोडू नकोस. दृश्य जगत मिथ्या आहे, भासमान आहे. त्याचा पसारा मांडू नकोस. नेहमी बोलताना भगवंताबद्दलच बोल आणि मायेच्या प्रभावाने सत्य वाटणाऱ्या (पण मिथ्या असलेल्या)या भासमान जगाकडे दुर्लक्ष कर.

विवेचन : या जगात सत्य आणि मिथ्य अशा दोनच गोष्टी आहेत. या ठिकाणी सत्य आणि मिथ्य या दोन्ही शब्दांचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. साधारणपणे व्यवहारात बोलताना आपण मिथ्य म्हणजे खोटे या अर्थाने तो शब्द वापरतो. परंतु आपण जेव्हा अध्यात्माच्या संदर्भात काही बोलत असतो तेव्हा जे खरे नसून खऱ्यासारखे भासते त्या गोष्टीला मिथ्या म्हटले जाते. थोडक्यात म्हणजे त्या गोष्टी भासमान असतात. वाळवंटात भर उन्हात प्रवास करणाऱ्याला जेव्हा तहान लागते तेव्हा त्याला समोर पाणी असल्याचा भास होतो. वाळवंट हे सत्य परंतु पाणी हे भासमान! ते मृगजळ म्हणजेच भास! हे जगही असेच भासमान आहे. परंतु आपण कायमच या जगात वावरत असल्यामुळे आपल्याला हे दृश्य जग सत्य आहे असेच वाटत असते. त्याचे मिथ्यत्व जाणवत नाही. म्हणूनच ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या असे शंकराचार्य म्हणतात. समर्थ दासबोधत म्हणतात, “प्रकट ते जाणावे असार, अप्रकट ते जाणावे सार. ” हा देह जो प्रकट दिसतो तो असार, अशाश्वत आहे पण त्याच्यामध्ये जे चैतन्य आहे, ते सत्य आहे त्याचा शोध घेतला पाहिजे.

आता सत्य या शब्दाचा अर्थ समजावून घेऊया. सत्य हे चिरंतन असते. ते शाश्वत आणि अपरिवर्तनशील असते. सत्य या शब्दाचा दुसरा अर्थ असाही घेता येईल की ज्यामुळे व्यक्तीचे किंवा समाजाचे हीत किंवा कल्याण होते ती गोष्ट म्हणजे सत्य.

सध्याचे वर सांगितलेले दोन्ही अर्थ परमेश्वराला लागू होतात. परमेश्वर शाश्वत आहे, चिरंतन आहे आणि अपरिवर्तनशील आहे. परमेश्वराची आराधना केल्यामुळे मानवाचे कल्याण होते म्हणूनच समर्थ आपल्याला ‘सत्य सांडू नको रे’ असे सांगतात.

आपण या भौतिक जगात वावरत असल्यामुळे तेच आपल्याला खरे वाटते आणि म्हणून त्याचाच पसारा आपण मांडत असतो. मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे असे जे समर्थ सांगतात त्याचा अर्थ हाच आहे. पण आपण आयुष्यभर मिथ्याचाच पसारा मांडण्यात धन्यता मानत असतो. शिक्षण, नोकरी, मुलेबाळे, संसार यातच आपण आयुष्याची इतिकर्तव्यता मानतो. आजच्या सोशल मीडियाच्या युगात तर आपण त्याच्या भ्रमजालात एवढे अडकलो आहोत की लाईक्स, व्ह्यूज, सबस्क्राईबर्स, प्रसिद्धी म्हणजेच सगळे काही असे आपल्याला वाटते. आपल्याला कोणी भगवंताची उपासना करण्यास सांगितले तर आपण म्हणतो की अजून मला वेळ आहे. आत्ताच तर कुठे शिक्षण पूर्ण होत आहे. मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी, नंतर लग्न, नंतर मुलेबाळे, संसार… त्यानंतर आपण परमेश्वराकडे लक्ष देऊ असे माणूस मनाशी म्हणत असतो. परंतु असे करता करता संपूर्ण आयुष्य निघून जाते. मिथ्याचा मांडलेला हा पसारा सोडून एक दिवस जावे लागते. लहान मुलगी खेळण्यातली भांडी, चूल बोळकी घेऊन संसाराचा खेळ मांडते. परंतु मोठी झाल्यावर अचानक तो खेळ सोडून तिला जावे लागते तसेच आपलेही होते.

चूल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ गं

लुटूपुटीच्या संसाराची संपत आली वेळ गं

रेशिम धागे ओढीती मागे, व्याकुळ जीव हा झाला.. ||

या गीतात म्हटल्याप्रमाणेच आपली अवस्था होते. लुटुपुटीच्या संसाराची वेळ संपत येते. पण पाय निघत नाही. मायेचे, मोहाचे रेशीम धागे आपल्याला मागे ओढत असतात.

सत्य आणि असत्याची दुसरी एक बाजू आपण या ठिकाणी समजावून घेऊ या. सत्य बोलणे हा आपला धर्म आहे. लहान मुलांना सुद्धा आपण नेहमी खरे बोलावे असे सांगत असतो. महाभारतातील युधिष्ठिर खरे बोलण्यासाठी प्रसिद्ध होता म्हणूनच त्याला धर्मराज असेही म्हटले जात होते. सत्य केवळ बोलायचे नसते तर सत्यस्वरूप व्हायचे असते याचे तो मूर्तिमंत उदाहरण होता. परंतु आता सत्याची दुसरी एक बाजू समजावून घेऊ. एखादी गोष्ट बोलण्यामागे आपला उद्देश कोणता आहे यावरही त्या गोष्टीचे सत्य असत्य किंवा धर्म – अधर्म या गोष्टी ठरतात. दुसऱ्याचे कल्याण व्हावे या हेतूने बोललेले असत्य देखील हितकारक असते. येथे ते पाप न ठरता पुण्य ठरते. दुसऱ्याला दुखावण्याचा, त्रास देण्याचा किंवा त्याच्या वाईटाचा हेतू मनात ठेवून बोललेले सत्य हे देखील पापास कारणीभूत ठरते. महाभारतात श्रीकृष्णाला युक्तीने वागताना काही वेळा असत्याचा आधार घ्यावा लागला आहे. परंतु असे करण्यामागील त्याचा उद्देश अनितीचे आणि अन्यायाचे राज्य संपून न्यायाचे राज्य यावे, नीतीने वागणाऱ्या पांडवांना न्याय मिळावा हा होता.

संत तुकाराम महाराज म्हणतात, “तुम्ही सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियाले नाही बहुमता… ” केवळ लोक म्हणतात म्हणून एखादी गोष्ट सत्य आहे किंवा असत्य आहे असे मानण्यापेक्षा त्यांनी आपल्या मनाने दिलेला कौल प्रमाण मानला. मनाचा हा कौल म्हणजेच विवेक. या विवेकाच्या सहाय्यानेच संसार किंवा हे दृश्य जग भासमान आहे हे समजून घ्यावे आणि एकमेव सत्य असलेल्या त्या परमेश्वराची कास धरावी असेच समर्थ आपल्याला सांगत आहेत.

स्वसंवाद : 

  • माझ्या जीवनात मी खरेच काय सत्य मानतो, परमेश्वर की भौतिक यश?
  • संसारातील गोष्टींमध्ये गुंतताना त्यांचे क्षणभंगुर स्वरूप मला जाणवते का?
  • मी बोलताना सत्य बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो का?
  • माझ्या बोलण्यामागील हेतू दुसऱ्याच्या कल्याणाचा असतो का?
  • माझ्या आतील विवेकाचा आवाज मी ऐकतो का?

– – – – 

श्लोक क्र. २० – – – 

बहू हिंपुटी होईजे मायपोटी। 

नको रे मना यातना तेचि मोठी॥ 

निरोधें पचे कोंडिले गर्भवासी। 

अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं॥२०॥

अर्थ: आईच्या पोटात असताना बालकाला अतिशय कष्ट भोगावे लागतात. त्या मोठ्या वेदनादायी यातना (हे जीवा)तुला भोगणे नको. मातेच्या गर्भात असताना बालक अधोमूख म्हणजे खाली तोंड करून असते. ते सर्व बाजूंनी कोंडले जाते. गर्भातील उष्णतेमुळे ते उकडून निघते. ही अवस्था अत्यंत वेदनादायी असते.

(हिंपुटी – कष्ट/यातना, मायपोटी – आईच्या उदरात असताना, निरोध प्रतिबंध/अडथळा, पचे – शिजणे/उकडून निघणे, अधोमुख – खाली तोंड करून)

विवेचन :

या श्लोकात समर्थ जीव जन्माला येण्याआधीच्या अवस्थेचे वर्णन करतात. ही अवस्था किती कष्टप्रद असते त्याची जाणीव हा श्लोक वाचला म्हणजे होते. समर्थ स्वतः संसाराच्या बंधनात अडकले नव्हते. परंतु मनुष्य कसा जन्माला येतो? त्यावेळी त्याची अवस्था कशी असते, आणि त्याला किती यातना होतात याची पुरेपूर कल्पना त्यांना होती. आजचे आधुनिक विज्ञान आणि मोठमोठे डॉक्टर्स सुद्धा ही गोष्ट मान्य करतात की गर्भामध्ये असताना आणि जन्माला येताना (मातेबरोबरच) बालकाला सुद्धा यातना सोसाव्या लागतात.

एकदा का या मृत्यू लोकात जन्म घेतला की शैशव, तारुण्य, नाना प्रकारचे आजार, वृद्धत्व आणि शेवटी मृत्यू या गोष्टी अपरिहार्य आहेत. जन्माला येताना तर किती यातना जीवाला सोसाव्या लागतात. आईच्या गर्भामध्ये हा जीव कोंडलेला असतो. त्या वातावरणातील उष्णता त्याला सहन करावी लागते. उष्णतेमुळे त्याची वाढ होते हे जरी खरे असले तरी त्यामुळे तो उकडून निघतो हेही तेवढेच खरे. नऊ महिने तो जीव एवढ्याशा जागेत कोंडलेला असतो. आपण त्याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. जन्माला येताना बालक अधोमुख असते. त्या अत्यंत अरुंद मार्गातून बाहेर पडताना मातेला आणि बालकाला दोघांनाही भयंकर वेदना सहन कराव्या लागतात.

दिवस जाणे, गर्भारावस्था, बाळंतपण आणि त्यात होणाऱ्या वेदना या सगळ्या अपरिहार्य गोष्टी आहेत म्हणून या अवस्थांमधून जायचेच नाही का? या नैसर्गिक गोष्टी आहेत. या होणारच. यांचा त्रास नको म्हणून कसे चालेल असे आजचे काही विज्ञानवादी विचारवंत म्हणतात. व्यवहाराच्या दृष्टीने पाहिले तर हे सगळे बरोबर वाटते परंतु जो मुमुक्षु आहे, म्हणजेच साधक आहे, मोक्ष मार्गावर वाटचाल करणारा आहे, त्याला या गोष्टी लक्षात घ्याव्याच लागतील तरच त्याची पुढील वाटचाल सुकर होईल. म्हणूनच समर्थ या गोष्टींची जाणीव आपल्याला करून देतात.

केवळ जन्मच नव्हे तर संपूर्ण मानवी जीवन हे दुःखाने भरलेले आहे. काही लोक याला निराशावादी विचार म्हणतील. परंतु संतांचा ही जाणीव करून देण्याचा उद्देश वेगळा असतो. संत हे अध्यात्म मार्गावरील दीपस्तंभ असतात. त्यांचे अनुसरण करूनच पुढे जायचे असते. म्हणूनच ते आपल्याला ही जाणीव करून देतात. वारंवार जन्माला येणे, यातना सोसणे आणि मृत्यू पावणे या चक्रात सामान्य माणूस अडकत राहतो आणि हे चक्र सुरू राहते. पण कुठेतरी हे चक्र थांबावे असे वाटत असेल तर पुन्हा जन्म नको. जन्म नसला तर या सगळ्या गोष्टी आपोआप टळतील. म्हणूनच समर्थ जन्माला येताना होणाऱ्या कष्टांची जाणीव आपल्याला करून देतात.

हा देह नाशिवंत आहे. मलमूत्र इ. घाणीने भरलेला आहे. आयुष्यात दुःख आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताएवढे असे तुकाराम महाराज सांगतात. या सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव नसते असे नाही. परंतु तरी देखील माणसाला आपल्या देहाचा आणि स्वतःचा केवढा गर्व असतो!

पण एक दिवस हा देह सोडून आपल्याला जायचे आहे. “नाशिवंत देह जाणार सकळ “असे तुकाराम महाराज म्हणतात. पण असे असले तरी हा देह ईश्वर प्राप्तीचे साधन आहे. त्याचा वापर करूनच आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचायचे आहे. आपल्या देहाबद्दल बोलताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मळमुत्राचा बांधा ।

वरी चर्म घातलें रे कर्म कीटकाचा सांदा ॥

रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा ।

स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा ॥

– — असा हा आपल्याला लाभलेला मानवी देह आहे. पण म्हणून त्याचा तिरस्कार करता कामा नये. घेता येईल तेवढी त्याची काळजी आपण घेतले पाहिजे कारण हा नरदेह ईश्वरप्राप्तीचे साधन आहे. त्याच्या माध्यमातूनच आपल्याला उत्तम कर्म करून राघवची प्राप्ती करून घ्यायची आहे. मानवी जीवनातील दुःख नको असेल आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर भगवंताला शरण जाण्या वाचून पर्याय नाही.

स्वसंवाद : 

  • हे जीवन, हा संसार दुःखमय आहे याची जाणीव मी ठेवतो का?
  • जीवनातील दुःखांकडे मी तक्रारीने पाहतो की त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न करतो?
  • जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटावे असे मला मनापासून वाटते का?
  • त्यातून सुटण्यासाठी संतांनी सांगितलेल्या मार्गावर मी वाटचाल करतो का?

– क्रमशः श्लोक १९ आणि २०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉ. कांतिलाल टाटिया… – माहिती संग्राहक / लेखक : श्री मिलिंद हिरे ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

सौ. मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ डॉ. कांतिलाल टाटिया… – माहिती संग्राहक / लेखक : श्री मिलिंद हिरे ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

डॉ. कांतिलाल टाटिया 

डॉ. टाटिया शहाद्याचे. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील गरीब, वंचित आदिवासी बांधवांच्या सेवेत स्वत:ला पूर्ण वेळ झोवूâन दिले. जिल्ह्याच्या काना-कोपNयातील आदिवासीगावे, पाडे, अतिदुर्गम भागातील हान लहान वस्त्या इथे ते जायचे. रस्त्यांची, विहिरींची कामे, एकशिक्षकी का होईना शाळा, वनखाते, तलाठी, पोलीस या ठिकाणांची असंख्य कामे, पाण्याचे टँकर्स, आवश्यक असलेली बी-बियाणे, रोजगार, रुग्णांना, गर्भवतींना धुळ्यापर्यंत आणून उपचाराची व्यवस्था करणं अशा रचनात्मक कामांमध्ये ते बुडालेले असायचे.

जगापासून तुटलेल्या वनवासी जीवांना ते मनापासून आणि जमेल तेवढी मदत करत. आपल्या जुनाट मोटरसायकलवरून उन्हातान्हाची, पाऊसपाण्याची, थंडी-वाऱ्याची पर्वा न करता ते फिरत. घराघराशी संपर्क ठेवत. त्यांच्या लग्नकार्य, सणा-वारात, उत्सव-समारंभात सामील होत.

एकदा त्यांच्या वाहनाने दगा दिला. त्यांना गंभीर अपघात झालाा. पायाचे हाड मोडल्याने प्रदीर्घ काळ दवाखान्यात बेडवर पडून राहणे भाग पडले. ही बातमी खेडोपाडी पोचली आणि डॉ. टाटियांच्या समाचाराला येणाऱ्या वनवासी लोकांची रीघ लागली.

त्यात उघडेवाघडे पुरुष, ठिपक्या ठिपक्यांच्या तांबड्या फडक्या डोक्यावर घेतलेल्या डॉक्टरांच्या शेकडो लेकुरवाळ्या बहिणी होत्या. म्हातारे-म्हाताऱ्या, तरुण मुलं, मजूर, झाडून सगळे भेटायला येऊन जात होते. आठवड्याकाठी एखादी दहा रुपयाची एखादी नोट कशीबशी पाहायला मिळणारी, ३-४ रुपये रोजावर कंबरतोड मेहेनत करणारी ही शापित माणसं… भेटीनंतर त्या दवाखान्याच्या आवारातच ठिय्या मारून मिरच्या भााकरी बांधलेली कळकट फडकी सोडून पोटात भरत आणि डोळ्यातलं पाणी पुसत घरी जात. उसने-पासने घेतलेले पैसे बस भाड्यासााठी खर्च करून आणि तेही शक्य नसेल, तर मैलोनमैल रस्ता अनवाणी पायंनी तुडवत, रस्ता विचारत विचारत ही माणसे डॉक्टरांना बघायला रांगेने येत होती.

– – भेटणं कसं? एक एक जण घाबरत घाबरत बेडजवळ जाई. शिस्तीत आवाज न करता डॉ. टाटियांचा हात हातात घेई. आया-बाया त्यांची बला घेत. म्हातारी-कोतारी माणसं त्यांच्या डोक्यावरून, कपाळावरून, गालांवरून मायेने हात फिरवीत आणि गहिवरलेल्या अहिराणीत आशीर्वाद देत… पण हा व्हिजिटर एक गोष्ट न चुकता करीत होता. निरोपाचा रामराम झाला, की डॉक्टरांच्या उशीखाली त्यांचा हात जाऊन बाहेर येई. टाटिया कुटुंबातील कुणालाच कळेना, हे काय आहे? एकाला विचारल्यावर उत्तर मिळालं, `काही नाही भाऊ, आहेर करना पडस, आजारी मानुसले. ‘

– – हे ऐकताक्षणी डॉ. टाटियांनी चटकन उशी बाजूला करून पाहीलं आणि बघणारे सगळे थक्क झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी तरारलं. काही क्षणातच त्या पाण्याचं अश्रूधारा आणि हुंदक्यात रुपांतर झालं.. उशीखाली एक रुपया, दोन रुपये, पाच रुपयांच्या बारीक घड्या घातलेल्या असंख्य मळक्या नोटा, चार आणे, आठ आणे, अगदी दहा-वीस पैशांचीसुद्धा काही नाणी होती.

– – आजारी माणसाला उपचारांचा न झेपणारा खर्च असतो आणि त्याचे मित्र, सगेसंबंधी, जातभाई, रक्ताची माणसे यांनी त्यात जमेल तेवढा खारीचा वाटा उचलणं, हे त्यातल्या प्रत्येकाचं कर्तव्य असतं, या धारणेतून निर्माण झालेली `आजारपणाच्या आहेरा’ची पिढ्यान पिढ्या सुरू असलेली परंपरा ही माणसं डॉ. टाटियांच्या बाबतीतही इमानाने पालत होती.

खरं तर हॉस्पिटलचं बील बरंच होणार होतं. आणि टाटिया परिवारही काही फार श्रीमंत नव्हता. ही `आहेराची’ सगळी रक्कम मोजली, तरीही दवाखान्याच्या एका दिवसाच्या खर्चाहून अधिक होणार नव्हती. पण एक रुपया, दोन रुपये यांची किंमत काय असते, हे धुळे जिल्ह्यातल्या त्या निष्कांचन, आदिवासी भागात गेल्याशिवाय कुणाला कळणार नाही.

हे आदिवासी जिथे या जगात आले, वाढले आणि जिथे त्यांचा जन्मभरचा रहिवास असणार होता, त्या जंगलातच उगवून वाढलेल्या झाडांइतकीच नैसर्गिक आणि तेवढीच उंची असलेली अशी ही `सहजीवनश्रद्धा’ आहे, नाही का?

अशी `मेडिकल इन्शुअरन्स स्कीम’ त्यांच्या अक्षरशत्रू पूर्वजांना शेकडो वर्षापूर्वी सुचली आणि तिचं एका गुप्त व अखंड चालणाऱ्या परंपरेत रुपांतर झालं असणार.

(धुळ्याचे कार्यकर्ते व मार्गदर्शक धरमचंद चोरडिया यांनी पक्षकार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितलेला किस्सा)

माहिती संग्राहक / लेखक : श्री मिलिंद हिरे

प्रस्तुती: सौ. मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पहारा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पहारा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

कोल्हापूर ते पणजी या मार्गावर आंबोली घाटातून जाणारी लाल रंगाची ‘एसटी बस’ सर्वांनाच परिचयाची होती. या बसचे जुने ड्रायव्हर होते, ‘माधवराव’. गेली तीस वर्षे त्यांनी हा अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा घाट निर्धोकपणे पार केला होता. माधवराव अतिशय शांत आणि मितभाषी होते.

पण माधवरावांची एक विचित्र सवय होती, जिचा प्रवाशांना भयंकर कंटाळा यायचा. घाटाच्या अगदी मध्यभागी ‘काळभैरव वळण’ नावाचे एक अत्यंत धोकादायक आणि अंधारे वळण होते. तिथे आजूबाजूला काहीही नव्हते, फक्त शेकडो फूट खोल दरी होती. माधवराव रोज न चुकता स्वतःची एसटी बस त्या वळणावर ‘दोन मिनिटांसाठी’ थांबवायचे. ते एसटीतून खाली उतरायचे, दरीच्या कठड्याजवळ जाऊन त्या खोल अंधाऱ्या दरीत काहीतरी निरखून पाहायचे, आणि मग परत येऊन गाडी सुरू करायचे.

एके दिवशी या बसमधून रोहन नावाचा एक तरुण प्रवास करत होता. रोहनला स्वतःच्या सोशल मीडिया पेजवर ‘व्हायरल’ व्हिडिओ टाकण्याचे भयंकर व्यसन होते. त्याला पुण्यात एका महत्त्वाच्या मीटिंगला जायचे होते आणि बस आधीच लेट होती.

जेव्हा माधवरावांनी नेहमीप्रमाणे त्या निर्जन दरीजवळ गाडी थांबवली आणि ते खाली उतरले, तेव्हा रोहनच्या रागाचा स्फोट झाला. त्याने स्वतःचा मोबाईल काढला आणि माधवरावांचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली.

“बघा मित्रांनो, हा म्हातारा ड्रायव्हर रोज या निर्जन दरीजवळ गाडी थांबवून प्रवाशांचा वेळ वाया घालवतोय. नक्कीच हा इथे काहीतरी जादूटोणा किंवा अंधश्रद्धेचे प्रकार करत असावा. अशा बेजबाबदार माणसांमुळेच एसटीचा बोजवारा उडालाय, ” असा स्वतःचा आवाज टाकून रोहनने तो व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करून टाकला.

व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला. लोकांच्या संतापजनक कमेंट्स आल्या. एसटी महामंडळावर दबाव आला आणि अधिकाऱ्यांनी माधवरावांना बोलावून त्यांच्यावर ‘कामात हलगर्जीपणा’ केल्याचा ठपका ठेवून त्यांना नोकरीवरून निलंबित (Suspend) केले. त्यांचे पेन्शनही रोखण्यात आले. माधवरावांनी कुणाकडेही कोणतीही तक्रार केली नाही, ते फक्त मान खाली घालून एसटी स्टँडवरून कायमचे निघून गेले. रोहनला मात्र स्वतःच्या ‘व्हायरल’ ताकदीचा भयंकर अहंकार आला होता.

या घटनेला दोन महिने उलटले. मुसळधार पावसाळ्याचे दिवस होते. रोहन स्वतःच्या नवीन कारने रात्री दोन वाजता त्याच आंबोली घाटातून एकटाच पुण्याच्या दिशेने निघाला होता.

पावसाचा जोर भयंकर होता आणि समोरचे काहीच दिसत नव्हते. त्याच ‘काळभैरव वळणावर’ रोहनच्या गाडीचा ब्रेक स्लिप झाला. गाडीने कठडा तोडला आणि ती कार सपकन त्या शेकडो फूट खोल, अंधाऱ्या दरीत कोसळली.

गाडी झाडांमध्ये अडकून उलटी पडली होती. रोहन रक्ताच्या थारोळ्यात अडकला होता. त्याच्या छातीत स्टिअरिंग घुसलं होतं. रात्रीचे अडीच वाजले होते, मुसळधार पाऊस सुरू होता आणि मुख्य रस्त्यावरून त्याची गाडी दरीत पडलेली कुणालाही दिसण्याची सुतराम शक्यता नव्हती. “आपण आता मरणार, आपल्याला कुणीच वाचवू शकत नाही, ” या भीतीने रोहनच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. त्याचा श्वास कोंडत होता.

तेवढ्यात… त्या घनदाट अंधारात आणि पावसात दरीच्या वरून एका बॅटरीचा (Torch) प्रकाश त्याच्या गाडीवर पडला. कुणीतरी भिजत, चिखलातून घसरत एका जाड दोरीच्या साहाय्याने खाली दरीत उतरत होते.

तो माणूस गाडीजवळ आला. त्याने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, रक्ताने माखलेल्या रोहनला गाडीतून अत्यंत कष्टाने बाहेर ओढले. त्या म्हाताऱ्याने रोहनला स्वतःच्या पाठीवर घेतले आणि चिखलातून, दगडांमधून रक्ताळलेल्या अवस्थेत त्याला खेचत वर रस्त्यावर आणले. रोहन बेशुद्ध पडला.

दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये रोहनला शुद्ध आली. त्याच्या बेडशेजारी एक पोलीस इन्स्पेक्टर उभे होते.

“नशीबवान आहेस तू मित्रा. जर काल रात्री ‘माधवरावां’नी तुला दरीतून बाहेर काढलं नसतं, तर आज तुझा मृतदेहच सडला असता तिथे, ” इन्स्पेक्टर म्हणाले.

‘माधवराव? ‘ हे नाव ऐकताच रोहनच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने थरथरत्या आवाजात विचारले, “मा… माधवराव? ते एसटी ड्रायव्हर? पण ते रात्री अडीच वाजता त्या दरीजवळ काय करत होते? “

इन्स्पेक्टरने एक दीर्घ श्वास घेतला आणि जे सत्य सांगितले, ते ऐकून रोहनच्या पायाखालची जमीनच फाटली.

“तुला माहितीये, ते म्हातारे माधवराव रोज एसटी थांबवून त्या दरीत काय बघायचे? पंधरा वर्षांपूर्वी, माधवरावांची गरोदर मुलगी आणि जावई त्याच काळभैरव वळणावरून रात्री दरीत कोसळले होते. ते दोघेही सलग सहा तास त्या दरीत जिवंत होते, मदतीसाठी ओरडत होते… पण रस्त्यावरून जाणाऱ्या एकाही गाडीने खाली दरीत डोकावून पाहिलं नाही. ते तडफडून तिथेच मेले. त्या दिवसापासून माधवरावांनी एक शपथ घेतली होती… की त्यांची एसटी जेव्हाही त्या वळणावरून जाईल, तेव्हा ते दोन मिनिटे थांबून दरीत नक्की डोकावून पाहतील, जेणेकरून आणखी कुणाचं बाळ तिथे तडफडून मरु नये. ते प्रवाशांचा वेळ वाया घालवत नव्हते रोहन… ते त्या दरीचा पहारा देत होते! “

रोहनच्या डोक्याला भयंकर मुंग्या येऊ लागल्या. त्याला श्वास घेता येईना.

“तू व्हिडिओ व्हायरल करून त्यांची नोकरी खाल्लीस. त्यांची एसटीची ड्युटी गेली… पण त्या म्हाताऱ्याचा नियम मोडला नाही. नोकरी गेल्यापासून गेल्या दोन महिन्यांत ते म्हातारे रोज रात्री पावसात, स्वतःच्या गावातून पाच किलोमीटर अनवाणी चालत त्या दरीजवळ येतात आणि हातात बॅटरी घेऊन कुणी पडलंय का ते चेक करतात. काल रात्री ते तिथेच उभे होते, म्हणून तू वाचलास. तुला वाचवताना त्यांच्या डोक्याला मार लागलाय आणि ते बाहेरच्या वॉर्डमध्ये बेशुद्ध आहेत.”

रोहनच्या हातातील सलाईनची नळी निसटली. तो बेडवरून खाली फरशीवर गुडघ्यावर कोसळला.

ज्या म्हाताऱ्याला त्याने स्वतःच्या एका ‘व्हायरल’ व्हिडिओसाठी आणि अहंकारासाठी नोकरीवरून काढले होते, ज्याची त्याने संपूर्ण जगासमोर बदनामी केली होती… त्या देवासमान म्हाताऱ्याने स्वतःच्या मुलीचे दुःख विसरून, नोकरी गेल्यानंतरही भर पावसात दरीचा पहारा दिला होता, आणि त्याच म्हाताऱ्याने रोहनला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले होते! खोट्या प्रसिद्धीचा आणि सोशल मीडियाचा तो सगळा अहंकार आज त्या म्हाताऱ्याच्या रक्ताळलेल्या पायांसमोर कायमचा राख झाला होता. रोहन वेड्यासारखा दोन्ही हातांनी स्वतःचे तोंड दाबून ओक्साबोक्शी रडत होता. स्वतःच्याच नीचपणाची आणि माधवरावांच्या त्या हिमालयाएवढ्या निस्वार्थ त्यागाची जाणीव इतकी भयंकर होती की, तो तिथेच एका जिवंत प्रेतासारखा थिजून गेला.

आपल्याला जे सत्य ‘स्क्रीनवर’ दिसते, ते नेहमीच खरे नसते. एखाद्याच्या वागण्यामागची नेमकी वेदना समजून घेतल्याशिवाय त्याला जगासमोर गुन्हेगार ठरवू नका. खऱ्या आयुष्यात ‘व्हायरल’ होण्यापेक्षा ‘माणूस’ होणे जास्त गरजेचे असते, कारण जेव्हा सत्याची चपराक बसते, तेव्हा पश्चात्ताप करायला शब्दही अपुरे पडतात.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :  प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # आता कोठे धावे मन… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # आता कोठे धावे मन… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

#… आता कोठे धावे मन… तुझे चरण चूकलेची आज… #

मघा पर्यंत आम्ही साथ दिली तू विकत घेतलेल्या त्या दोन वर्षापासून… किती झिजलो दिवसरात्री झाली कातड्याची कि रे चाळण… परी तुझ्या चरणांची झीज नाही होऊ दिली… आजवरी अखंडीत केला कि रे त्यांचा सांभाळ… मग आज अचानक काय झाले तुझे वदन ते हिरमुसले… नाही पटली का आमची तुला ही चरणसेवा… अश्या एकांत जागी तू आम्हाला असा तोडूनी सोडून जावा… का नाही पाहशी मागे वळूनी एकवार प्रेमाने… ती तुझी दृष्टीची आस मनी आमच्या खुळ्या आशेने अंकुरते… कोण येईल नि कधी, कसा येईल या निर्जन ठिकाणी आणि आम्हाला असे बेवारस पडलेले पाहून द्रवेल का त्याच्या अंतकरणी आपुलकीचे पाणी… अहाहा अहाहा किती सुंदर छान मुलायम कातडी जोडे.. हे या आडवाटेला कसे बरे येऊन पडले… का त्या चरणांना यांचा विसरच पडला आणि या जोड्यांना त्याचा कायमचा विरहच घडला… पाहूया येतात का मम चरणांना… बसले ठिकठाक तर नेऊ सोबत नाही तर ठेवू इथेच जसे होते तैसेच…

ते बिचारे जोडे आजही बरेच दिवस झाले आहेत त्यांच्या साईजचा चरणद्वयाच्या प्रतिक्षेत बसले आहेत… ते पाय इकडे येतील नि आपला हा वनवास संपेल… पण हळूहळू ती आशा आता मावळत गेलीय… निरर्थक आशेकडे डोळे लावून बसले खरे त्या जोड्यांना आता काळवंडलेपणाने चांगलेच घेरलेय… धुळ मातीची पुटं चढून कातडं आता निबर झालयं.. सुरकुत्यांच्या रेघाने कातड्याला भेगा पडल्यात… तळव्याला भोकं पडलीत… कसरीने भूगा पाडून देहपतन होत गेलाय… नवलाई तर कधीच उडून गेली..

आठवतात कधी तरी त्या जुन्या मोजक्या आठवणी… मालकाने दुकानातून आपल्याला खरेदी केलेला तो क्षण.. सुंदर नक्षी, मऊ मुलायम कातड्याचा आरामदायी चरणांना होणारा स्पर्श पाहून मालक वेडावून गेला आणि त्या आनंदाच्या भरात त्याने आपल्याला विकत घेऊन घराकडे गेला… एका समारंभाला जाण्यासाठी त्याने हा नवा घेतलेला जोड्यांत पाय सरकवले पण पण तो जोडा त्या पायांच्या नंबराचा नव्हताच मुळी… आंधळ्या प्रेमाची किंमत मात्र त्याला मोजावी लागली… तरीही दाबून त्याने पायात ते जोडे घालण्याचा अट्टाहास केला.. पाय आकसला नि कातड्याने पायाला चावा घेतला… दुकानी बदलून घेण्यासाठी त्याने प्रयत्न केला पण मुळच्या हवा तश्या डिझाइन मध्ये पुढचे नंबरचे जोडे नव्हते… आणि एकदा विकलेला माल कुठल्याही सबबीवर परत घेतला जाणार नाही अथवा बदलून दिला जाणार नाही या सुचनेच्या फलकाकडे दुकानदाराने बोट काय दाखवले मालकाचे बोलणेच खुंटले.. करतो काय बिच्चारा घेऊन जावे लागले त्याला ह्या जोड्याला मग ते घरी घेऊन आला… मालकाच्या डोक्यात सुपिक आयडिया निघाली आणि अनायसे नवा जोडा बदलून मिळतात अश्या सार्वजनिक ठिकाणी जिथे जोडे बाहेर काढावे लागतात अश्या ठिकाणी मालकाने मला कैक वेळा सोडून बदल्यात दुसरे जोडे न्यायचा प्रयत्नही करून पाहीला.. पण प्रत्येक खेपेला तो डाव अयशस्वी झाला… मालकाला खूप राग आला स्वता बरोबर माझाही… पण उकिरड्यावर टाकणे त्याला जीवावर येत होते… आणि आज अचानक त्याने या निर्जन ठिकाणी सोडून आपण अनवाणीपणे जाणे पसंत केले… एकवेळ तू चरणसेवा नाही दिलीस तरी चालेल पण तूझा हा चरणचावा मात्र आधी थांबव… असं सारखं सांगून सांगून मालक थकून तो गेला पण माझ्यात काही बदल न झाला… रागाच्या भरात तडकाफडकी निर्णय त्याने घेतला आणि आता तुम्ही पाहतायना हे असं निर्जनस्थळी एकांती आम्हासी सोडून गेला…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १४ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १४ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

परमेश्वराशी तादात्म्यता-१

मागील भागात स्वतः तुकाराम महाराज निःसंग होऊन लोकांनाही भवभया पासून मुक्त होण्यासाठी कसे सावध करीत होते हे आपण पाहिले. एकदा जीवनात निःसंगता आली की द्वैतभाव नष्ट होऊन परमेश्वराशी तादात्म्यता कशी येते याविषयी गाथेतील काही अभंग घेऊन आपण या भागात विवेचन करूया.

शरणागत भक्तांना तुकाराम महाराज काय सांगत आहेत?

ब्रह्मादीक जया लाभासी ठेंगणे/

बाळीये आम्ही भले शरणागत//१//

ते भक्तांविषयी आणि स्वतः विषयी बोलत आहेत. ब्रह्मादीकांना सुद्धा जो लाभ होऊ शकत नाही, ते त्यासाठी ठेंगणे, तोकडे पडतात तो लाभ देवाला शरण आलेल्या आम्हा भक्तांना अगदी सहज होतो. त्याचे कारण काय? तर

 कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ/

 झाला पद्मनाभ सेवाऋणी//२//

आम्ही कामना, वासनांचा त्याग केल्यामुळे आम्हाला भजनाचा लाभ झाला आहे आणि आमच्याकडून होणाऱ्या या सेवेसाठी प्रत्यक्ष विष्णू सुद्धा आमचा ऋणी झाला आहे.

परमेश्वराला प्रसन्न करण्याचे भजन हे फार प्रभावी साधन आहे.

 कामधेनुच्या क्षीरा पार नाही/

 इच्छितचिये वाही वरुसावे//३//

या ठिकाणी महाराजांनी कामधेनूचे रूपक वापरले आहे. कामधेनूचे दूध कधीही न आट णारे असते. या सर्व संत मंडळींची हरी म्हणजे कामधेनू आहे. जेवढ्या आमच्या हरिभक्तीचा जोर मोठा तेवढा या धेनूचा पान्हा सकस आणि सरस!

 हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी/

 नारायण अंगी विसावला//४//

आम्हाला बसल्या जागी परिपूर्णत्व आले आहे. आता आमच्या ठिकाणी ध्याता, ध्यान, आणि ध्येय असा भेद राहिला नाही. नारायण आमच्या अंगी विसावला आहे अर्थात आम्ही अद्वितीय ब्रह्मरूप झालो आहोत.

 शेवटी याच अभंगात महाराज सांगतात,

 तुका करी जागा/ नको वासपू वाउगा/

 आहेस तू अंगा/ अंगी डोळे उघडी//५//

प्रत्यक्ष भगवंत हृदयात स्थिर झाल्यामुळे, नारायणमय झाल्यामुळे आम्ही भक्तजन अत्या- नंदाच्या भोजनाचा आस्वाद घेत आहोत. वासनाक्षयामुळे आम्हाला पुनर्जन्म नाही. नारायण स्वरूपाशी तादात्म्यभाव हे या अवस्थेचे रूप आहे.

निजरूप विसरून तुकाराम महाराज झोपी गेलेल्याला जागे करतात. त्याला सांगतात की तू भिऊ नकोस. अद्वैतरूपी हरी तुला सापडेल कारण तू स्वतःच अंगाने तो आहेस, परमात्मा रूप आहेस. जेव्हा तू तुझी आत्मिकदृष्टी उघडून पाहशील तेव्हा तुला त्याचे ज्ञान होईल.

एकात्मतेचे दुसरे उदाहरण या अभंगातून पहा.

 माया तेची ब्रह्म ब्रह्मतेची माया/

 अंग आणि छाया जया परी//

आपले शरीर आणि सावली ही जशी वेगळी नसतात, त्याचप्रमाणे माया आणि ब्रह्म या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. जरी या दोन वेगळ्या गोष्टी भासल्या तरी तत्वतः त्या एकच आहेत. छाया कोणत्याही शस्त्राने तुटत नाही. हाताने तिला दूर सारता येत नाही. जमिनीवर लोटांगण घातले तरी ती वेगळी न होता आपल्या अंगाखाली दिसेनाशी होते. आपण उंच झालो तर ती उंच होते, वाकलो तर ती आपल्याबरोबर लवते.

*

आता केशी राजा हेची विनवणी/

 मस्तक चरणी ठेवीतसे//१//

*

देह असो माझा भलतीये ठाई/

 चित्त तुझ्या पायी असो द्यावे//२//

*

काळाचे खंडण घडावे चिंतन/

 तन मन धन विन्मुखता//३//

*

कफ वात पित्त देह अवसाने

 ठेवावी वारुनी दुहिते ही//४//

*

सावध तो माझी इंद्रिय सकळ/

 दिली एक वेळ हाक आधी//५//

*

तुका म्हणे तू या सकळाचा जनिता/

 येथे ऐक्यता सकळांसी//६//

*

इथे परमेश्वराला उद्देशून महाराज म्हणतात,

“हे केशवा, तुझ्या पायांवर मस्तक ठेवून मी तुला विनंती करतो की, माझा देह कुठेही असो, पण चित्त मात्र तुझ्या ठिकाणीच असावे. देह, मन, द्रव्य याचा मोह नष्ट होऊन अखंड तुझ्याच चिंतनात माझा सर्व वेळ खर्च व्हावा. कफ, वात, पित्त या त्रिदोषांचे माझ्या अंतकाळी निवारण व्हावे. जोपर्यंत माझी सर्व इंद्रिये सावध आहेत तोपर्यंत मी तुम्हाला साद घालून वर्तमान परिस्थिती निवेदन करीत आहे. “

सामान्य जन मूढ आहेत, त्यांना परब्रम्ह स्वरूपात द्वैतभावना नाही हेच मुळी समजत नाही. त्यांना तारण्यासाठी भक्तीचे महात्म्य पटवून देणे आवश्यक आहे. तुकाराम महाराज त्यांच्या मनातील हे विचार खालील अभंगात सांगत आहेत.

 याजसाठी भक्ती/ जशी रुढवावया ख्याती/

 नाही तरी कोठे दुजे/ आहे बोलावया सहजे/

 गौरवावयासाठी/ स्वामी सेवेची कसोटी/

 तुका म्हणे अळंकारा/ देवभक्त लोकी खरा//

लोकांमध्ये भक्तीचा गौरव होण्यासाठी स्वामी, सेवक आणि सेवेची कसोटी या गोष्टी येतात. लोकांमध्ये देव आणि भक्त यांचे वरवरचे द्वैत हे भूषण आहे, अलंकाराप्रमाणे आहे. या सगूण भावातूनच हळुहळू जनसामान्यात एकरूपता येते.

ईश्वराशी महाराजांची संपूर्ण तादात्म्य पावलेली अवस्था या अभंगात ते वर्णितात.

 काहीच मी नव्हे कोणीये गावीचा/

मी कोणीच नाही. मला ना नाव ना गाव. जागच्या जागी असणारे जे एकमेव ब्रह्म आहे तेच मी आहे.

*नाही जात कोठे येत फिरोनिया/ मी कोठे जात नाही की मी परत येत नाही.

 नाही मज कोणी आपले दुसरे/

 कोणाचा मी खरे काही नव्हे//

 मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही, माझ्यात आप-परभाव नाही.

 नाही आम्हा जावे मरावे लागतं/

 अहो अखंडित जैसे तैसे//

आम्ही जगत नाही की मरत नाही, कायम जसेच्या तसे राहतो.

 तुका म्हणे नामरूप नाही आम्हा/

 वेगळा या कर्मा-अकर्मासी//

आम्हाला रूप नाही, नाव नाही, कर्म-अकर्म यापासून आम्ही वेगळे आहोत.

 परमेश्वराशी एकरुपता म्हणजे काय हे आपल्याला तुकारामांच्या या अवस्थेतून स्पष्ट होते.

क्रमशः… १४ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”Missing Tile Syndrome…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “Missing Tile Syndrome…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“काही लोक ‘ Missing Tile Syndrome’ या आजाराने ग्रस्त असतात. “

काल आम्ही सर्व मैत्रिणी नेहाकडे गेलो होतो. तिने नवीन घर बांधलेम्हणजे अगदी छान टुमदार बंगलाच बांधला. काल बाप्पाचे दर्शन, हळदीकुंकू व तिचे नवीन घर बघणे असा कार्यक्रम झाला.

सर्व मैत्रिणींनी छान गुलाबी रंगाच्या साड्या नेसायचे ठरविले होते व नेहा करिता छान gift पण घेतले होते.

नेहा कडे तिचे मिस्टर, जे इतक्यातच रिटायर्ड झाले आहेत. व तिचा मुलगा निशांत.

जो सध्या अमेरिकेत उच्च शिक्षण घेत आहे. म्हणजे एकुण मध्यम वर्गीय एक चांगला परिवार म्हणता येईल.

आम्ही वेळेवर पोचलो. नेहाने उत्साहाने आपला थ्री बेडरुम बंगला दाखवायला सुरुवात केली. किचन, ड्राय बाल्कनीहॉल मागची पूढची जागाछोटासा बगीचा वगैरे वगैरे. सर्वजण उत्साहाने बघत होतो. जो तो आपापल्या परीने कौतुक ही करत होते. घरातील wood workकिचन मधील डिझाईन colour combinations, भिंती चे रंग. प्रत्त्येक सहा महिन्यांत फॅशन बदलते. त्यामुळे हे नवीन घर बघायला सर्वांना मजा येत होती. नवीन घरात एक वेगळाच सुगंध दरवळत असतो.

सर्वच सारखे असतातअसं नाही ना. आमची पण एक मैत्रिण थोडी वेगळीच आहे. मी विचारच करत होतेअजून मॅडमने काही शेरा कसा मारला नाही?? expert comments कसे दिले नाहीत.???

तेवढ्यात सुरू झालेच. “अग! शहरापासून किती दूर आहे.  बंगला म्हंटला तर security चा प्रश्न येतोच.  या वयात फ्लॅटच बरा.  एवढ मोठं घर बांधले तर आहे. पण तुझी सतत तक्रार असतेच. कंबर दुखते ना. मग maintain कसं काय करणार?? “

” आमच बघ कस सुटसुटीत. एक समोर चा दरवाजा बंद केला, की काळजी नाही.  अगदी शहरात. खाली उतरलं की सर्व मिळत. रंग थोडे डार्क च वापरले आहेस तू. अंधार पडत असणार. दिवसा पण लाईट लावावे लागत असतील. “

विषय बदलावा म्हणून मी म्हंटल अग निशांत काय म्हणतो? शिक्षण पूर्ण होण्यातच असेल नाही का?? नेहा उत्तर देणार, तेंव्हाच “अग, आजकाल H1 B visa चा खूप. Problem चालू आहे.  नोकऱ्यांचा तर प्रश्न आहेच आहे. आमच्या अजय ची काळजी नाही आम्हाला. ‘citizenship’ मिळाली आहे ना त्याला. “बोलल्याच मॅडम. “

नेहा चे मिस्टर तर आधीच सटकले होते. नेहा हुं हां करत ऐकत होती. बाकी सर्व बैचेन झाल्या होत्या.

अग!! नेहा चल हळदीकुंकू दे. निघायला हवं आम्हाला. मी म्हंटल.

नेहाने हळदीकुंकू दिले. वाण दिले. व मस्त गरम गरम बटाटे वडे व गाजर हलवा ही होता. खरं तर सर्व व्यवस्थित झाले होते. एवढा पाहुणचार भरपूर होता. पण काय करणार?? बटाटे वड्यात आलं लसूण थोडे कमीच झाले होते ना. ‘वडे’ अजून थोडे तळायला हवे होते. असा मॅडमचा ‘expert comment’ आलाच.  बटाटे वडा करताना बेसन मधे थोडी तांदूळाची पीठी घातली की वरचा पापुद्रा कसा छान क्रिस्पी होतो. एक सूचना पण मिळाली.

आम्ही परत यायला निघालोनेहाने मला जवळ येऊन विचारले काय ग! घर कसे वाटले? बरे आहे ना.

मी म्हंटलेअग!! अगदी मस्त. फारच सुंदर. बटाटे वडे पण छान. , मस्तच.

नेहाचा चेहरा खुलला.

घरी येताना मी हाच विचार करत होतेकी मॅडमने जेवढ्या comments केल्या. त्यातील‌ एका तरी comment ची गरज होती का? ती वेळ बरोबर होती का? तुम्ही किती पण expert असाल. पण प्रत्त्येकाची आवड असतेइच्छा असतेपैशाचा ही विचार करायचा असतो. मुख्य म्हणजे तो त्यांचा विचार आहे. आपल्याला तेथे रहायचे ही नाही. व तुम्हाला कोणी विचारले ही नाही. आता नेहाने आपल्या तीस वर्षांच्या संसारात आधीही बटाटे वडे केलेच असतील ना.  पाहुण्यांनी पाहुण्यांसारखे रहावे. हा साधा सरळ सोपा नियम आहे.

आणि जर चूका काढायचे ठरविले तर स्वतः पासून सुरुवात करावी.  

खूप लोकांना दुसर्यांच्या आनंद साजरा करता येत नाही. कौतुक करणे तर सोडाच.

” जिभेचं वजन खूप कमी असते, म्हणून तिचा तोल सांभाळणं कठीण काम असते. ” प्रत्येकाला जमतेच असं नाही. .

असे लोक वेळ बघत नाही, मौका बघत नाही, बोलतात. आपली तुतारी सतत प्रत्येक क्षेत्रात वाजवत राहतात. IMeMyself याच्या बाहेर ते निघतच नाही. विषयवेळ, काळ कोणताही असो ‘I am the best ‘ I know everything. हेच दाखवायचा प्रयत्न असतो. व लक्ष नेहमी दुसऱ्यांच्या रिकाम्या अर्ध्या ग्लास वरच असतं. कमजोर मनाचा व्यक्ती जर यांच्या बरोबर सतत राहिला तर तो तर डिप्रेशन मध्ये जाईल.

अरे!! देवा तू मला काहीच गुण दिले नाहीअशी तक्रार तो देवाजवळ करेल.

स्वतःचा ‘ EGO ‘ सांभाळतानाते किती लोकांना दुखवतातहे त्यांना कळत नाही. समोरचा माणूस उत्तर देत नाही. याचा अर्थ तो बोलू शकत नाही. असा होत नाही. प्रत्येकाला डोळेकानतोंड असतंच की. बुद्धी पण देवाने दिलीच आहे. तो वादविवाद टाळतो. वातावरण खराब होऊ नये. याचा प्रयत्न करतो म्हणून बोलत नाही. परंतु कधी कधी ठोकावच. त्याशिवाय ते सुधारणार नाही. हे पण नक्की. अस माझं मत आहे.

उद्या मॅडम कडे मुलांचे लग्न होणारसून येणार तेंव्हा काय होईल? आज हळद जास्त झाली. उद्या मीठच कमी झाल. गॅस किती मोठा ठेवलाय? वगैरे वगैरे. हे असच मॅडम करणार का??

काही जण “missing tile syndrome” या आजाराने ग्रस्त असतात. चूका (त्यांच्या दृष्टीने) शोधणे व‌ दाखविणे आपला जन्मसिद्ध अधिकार समजतात. स्वतः बद्दलही विचार करावा थोडासा. नेहा पण सहज उत्तर देऊ शकली असती.

मी म्हणेन तेच बरोबर. तेच झालं पाहिजे. ते दुसऱ्यांना गृहित धरतात. म्हणजे अगदी साधी गोष्ट आपण कुठे बुधवारी जाऊ म्हंटल तर त्या म्हणतील नाहीआपण शुक्रवारी जाऊ या.

गृप मधे सर्व सारखेच ना. असं ‘self style commander ‘ बनायची गरज नसते. मैत्रित ‘सर्वानुमते’ हा शब्द खूप महत्त्वाचा असतो.

एकदा असा स्वभाव कळला तर हळूहळू लोक दूर जातात. किंवा नाइलाजाने ऐकतात.

असा स्वभाव घरचे सहन करतील. बाहेरच नाही. घरचे ही हळूहळू विरोध करतातच.

आता मात्र मी ठरवलंय मॅडम बरोबर बाहेर जायचे नाही. समोरचा बदलत नाही, तर आपणच बदलावे.

काही गोष्टी वयामानाप्रमाणे शिकायच्या असतात. काही सवयी ठरवून बदलायच्या असतात. काही नाही आवडलं तरी सहन करायचं असत. आपल्या बॉडी लॅंगवेजवर expressions वर लक्ष द्यायचं असत. माझ्या दोन गोष्टी तुम्हाला आवडतं नाही, ठीक आहे. अगदी मान्य आहे. माझ्यात दोन नाही, दहा गोष्टी तुम्हाला न आवडणाऱ्या असतील. तसंच तुमच्या ही चार गोष्टी मला आवडत नाहीत. हे पण तेवढंच खरं आहे. हेही लक्षात असू दयाव. तुमचाही अर्धा ग्लास रिकामा आहेच.

अशा प्रसंगांना कसे handle करायचे हे प्रत्येकाला ठरवायचे असते. दुर्लक्ष करायचे, मनाला लावून घ्यायचेकी सडेतोड उत्तर द्यायचे. न बोलता आपली नाराजी दर्शविली तरी चालेल.

खरंतर इतरांच्या नजरेत आपण कोण आहोत? याने काही ही फरक पडता कामा नये.

*I must learn to value myself. * 

लोकांच्या बोलण्यामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा आपली मानसिक शांती जास्त महत्वाची हेही खरंय.

“मी अशीच आहे “. म्हणून चालत नाही. वय कोणतेही असो ‌गृपचे manners व attiquets वेगळेच असतात. टीम चा मेंबर रहायचे असैल तर ते पाळणे गरजेचे असते.

अस नाही की हे असे लोक पॉझिटिव्ह कमेंट / कौतुक करतच नाहीत. करतात पणफक्त काही लोकांचेजेथे फायदा असेल तेथे कौतुक करतात आणि तेथे चमचेगिरी करायला पण लाजत नाहीत..

म्हणतात ना,

“Be generous while giving compliments.

Your words can change their world. “

“Comments do wonders. “

*कौतुक शब्द जरी छोटा असला तरी ते करायला मन मात्र मोठं लागत. * 

 

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कानाला खडा…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “कानाला खडा…” ☆ श्री सुधीर करंदीकर

 “कानाला खडा

 – – “ माझा व्हॅलेंटाईन डे “

सगळेच जण आपापल्या आवडींप्रमाणे व्हॅलेंटाईन डे हा दिवस साजरा करत असतात. माझा या वर्षी हा दिवस असा होता…

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात जवळची मैत्रिण, म्हणजे बायको, तिला ‘हॅपी व्हॅलेंटाईन डे’ केले. मी रोजच सकाळी कारण शोधून बायकोला शुभेच्छा देत असतो. अगदीच काही कारण नसेल, तर, हॅपी सोमवार वगैरे, असे पण विश करतो. बायको खुश असेल तर दिवस छान जातो, हा माझा आजवरचा अनुभव!

सकाळचे खाणे आटोपले आणि घराच्या बाहेरच्या बागेत झाडांना पाणी घालायला बायको बाहेर गेली. मी काहीतरी किरकोळ काम करत होतो. तेवढ्यात बायकोचा बाहेरुन आवाज़ आला –

अहो, ग्लासभर गरम पाणी प्यायला देता का?

चला, बायकोला खुश करायला अजुन एक चान्स मिळाला, असा विचार करून मी लगेच गॅसवर दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवले. तेवढ्यात हॉलमधून मोबाईलची रिंग वाजली. धावत हॉल मधे गेलो. कॉलेज मैत्रीण छायाचा फोन होता.

मी : छायाजी नमस्ते, आज एकदम सकाळी सकाळी फोन!

छाया : अरे आज १४ फेब्रुवारी. हॅपी वैलेंटाईन डे.

मी : ‘हॅपी व्हॅलेंटाईन डे’. शुभेच्छांची देवाण-घेवाण झाली. भरपूर जुन्या-नव्या गप्पा झाल्या. आता पुढचा फोन मी करायचा असे ठरले. बाय, हॅपी व्हॅलेंटाईन डे करून फोन संपला. किती वेळ गेला हे समजलेच नाही. फोन टेबलवर ठेवला आणि गॅसवर पाणी आहे, ही डोक्यात टयुब पेटली. धावत आत गेलो. गॅसवरचे दोन ग्लास पाणी आटून पाव कप पाणी झाले होते. तेवढ्यात बायकोचा बाहेरून आवाज आला,

‘अहो, आज गरम पाणी मिळणार आहे कां?

मी : सॉरी, पाणी गॅसवर लगेच ठेवलं होतं, पण माझ्या गोंधळात, गॅस ऑन करायलाच विसरलो होतो. आता लगेच देतो. असे म्हणून, मायक्रोवेव्ह मधे 30 सेकंदात पाणी गरम केले आणि खिडकीतून बाहेर बायकोला ‘हॅपी व्हॅलेंटाईन डे’ म्हणत पाणी दिले. बायको पुन: खुष.

११ च्या सुमाराला माझी फर्माईष म्हणून बायकोकडून मला गरमा-गरम चहा मिळाला. बायकोला म्हटलं, चला, आज वॉशिंग मशीन मी लावतो. आमच्या घरात वाशिंग मशीन वरच्या मजल्यावर आहे. कपड्यांची बादली घेऊन वर गेलो. तेवढयात मित्राचा फोन आला. फोनवर बोलत-बोलत वर गच्चीत गेलो. ‘हॅपी व्हॅलेंटाईन डे’ ची देवाण -घेवाण झाली. ३-४ मिनिटात फोन संपला. मशीनकडे गेलो. साबण पावडर टाकली. अ‍ॅक्टीव्ह सोक – वॉश – रिंझ – स्पिन अशी सायकल सिलेक्ट केली. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. रिंग वाजली की आपण हातातले काम सोडून का पळतो, हे अजुनहि मला समजत नाही. मशीनचे झाकण घाई-घाईत लावले आणि गच्ची मध्ये रेंज छान असते म्हणून फोन घ्यायला गच्चीत गेलो. व्हेरी व्हेरी ‘हॅपी व्हॅलेंटाईन डे’ अशी तिकडून सुरूवात झाली. अननोन नंबर – लेडीज आवाज – कोण आहे, हे ओळखण्याकरता तिकडून अनेक क्लू -जसे नावातली / आडनावातली अक्षरे वगैरे, असे सुरू झाले. माझी टयुब पेटत नव्हती. मी म्हटलं, तुमचं लग्नाच्या आधीचं नाव आणि आडनाव यातली काही अक्षरं सांगा, लगेच ओळखतो. तिकडून २ – ३ अक्षरं आली आणि मी एकदम ओरडलो, अरे, ‘X X X’ तू —-!

काय पत्ता आहे? कुठे होतीस???? अशा अनेक प्रश्नांची मी सरबत्तीच सुरू केली. अहो -जाहो वरून अरे – तुरे वर केव्हा आलो आणि दोघेहि भूतकाळात कधी गेलो हे समजलेच नाही. आता कुठे भेटायचे / कसे भेटायचे हे ठरले, आता पुढचा फोन मी करायचा असे पण ठरले. बाय, हॅपी व्हॅलेंटाईन डे करून फोन संपला. गच्चीचं दार लावलं आणि आत आलो. तेवढयात बायकोचा खालून आवाज आला –

‘अहो, मशीन झालेलं दिसतयं, ‘बीप – बीप’ आवाज येतोय’.

मशीनची सायकल नुकतीच संपली होती आणि ‘बीप – बीप’ आवाज येत होता. मेनस्वीच बंद केला, झाकण उघडलं आणि गोंधळ लक्षात आला. सगळे कपडे बाहेर बादलीतच होते. मशीन मोकळीच होती. म्हणजे मशीनमधे पाणी घेणे, साबणाचा फेस होणे, पाणी फेकणे, पुन: पाणी घेणे, असे सगळे सोपस्कार बिन कपडयांचेच झाले होते. तेवढयात बायकोचा खालून आवाज आला —

बायको : कपडयांची बादली जिन्यात आणून ठेवा, मी वाळत घालीन.

मी : अग, जरा गोंधळ झाला. मशीन झाली आहे, पण मी मशीनमधे साबण टाकायला विसरलो होतो. आता साबण टाकून पुन: मशीन लावली आहे.

बायकोचा विश्वास बसला की नाही, हे कळायला मार्ग नव्हता.

खाली आलो आणि बागेत गेलो. एक खडा घेऊन कानाला खडा लावला – की, पुढच्या व्हॅलेंटाईन-डे ला – 

बायकोनी गरम पाणी प्यायला मागितले तर पाणी गॅस वर गरम न करता, मायक्रो वेव्ह मधे गरम करायचे.

वॉशिंग मशीन लावायचे असेल तर, मशीनमधे आधी कपडे टाकायचे, मग पुढचे सोपस्कार करायचे… ,

कारण व्हॅलेंटाईन डे म्हणजे मैत्रिणींचे फोन हे येणारच…

सगळ्यांना पुढच्या व्हॅलेंटाईन डे करता शुभेच्छा…

 © श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ६१, ६२, ६३. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ६१, ६२, ६३. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।।

नारद भक्ति सूत्रे : ६१

लोकहानौ चिन्ता न कार्या निवेदितात्मलोकवेदत्वात् ||६१||

अर्थ : भक्ताने आपला स्व आणि लौकिक व वैदिक कर्मे भगवंताला अर्पण केलेली असतात. म्हणून लोक व्यवहारात हानी झाली तरी त्याने चिंता करू नये.

विवेचन : *श्वास घ्यायला शिकवावे लागतं नाही, तसे भक्ति करायला शिकवावे लागू नये…! (नारद मुनींची इतकी सूत्रे अभ्यासल्यावर तर अजिबातच नाही…)* तर मनुष्याला श्वास घ्यायला शिकवावे लागतं नाही…! भक्तिमार्गात जाणे किंवा भक्तीमार्ग लाभणे हे कदाचित दैवाधिन असू शकेल. मागे आपण एक विचार केला की अनुदिनी अनुतापें… अशी स्थिती आल्यावर जर मनुष्य भक्तिमार्गाकडे अग्रेसर झाला तर त्याने तो मार्ग स्वतःहून सोडू नये…

*भक्तीमार्ग अनुसरणे हा एक प्रवास आहे. प्रवासात स्थिर असलेली झाडं आपल्याला पळताना दिसतात… , अर्थात याचे बालपणी जितके नवल अथवा आकर्षण असते, तितके आकर्षण मोठेपणी राहता नाही, कारण आपले वाहन पुढे जात असते, याचे पूर्ण ज्ञान मनुष्याला झालेले असते… *

मनुष्याच्या आयुष्यात येणारी सुखदुःख ही त्या पळणाऱ्या झाडांप्रमाणे खोटी असतात, किंवा आपल्या मनाने तयार केलेली असतात, हे मान्य करण्याचे सामर्थ्य आपल्याला भक्तीच देत असते. परमेश्वर आपल्याला जीवनाचा सारथी आहे. तोच आपला जीवनरथ हाकत आहे आणि आपण त्याच्यावर भार टाकून निर्धास्त झाले पाहिजे ही जाणीव आता साधकाला होऊ लागते. मग तो अधिकाधिक निश्चिंत होऊ लागतो…

भक्तिमार्गात वाटचाल करताना साधक असो व सिद्ध असो सुखदुःख त्याच्या वाट्याला येतातच येतात. कारण त्यामागे त्याचे प्रारब्ध असते. त्याचे त्याला ते भोगून संपवावे लागते. इथे भक्त आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही भगवंताची इच्छा आहे असे मानून त्यातून अलिप्त होत जातो आणि कर्मबंधांतून मुक्त होत जातो.

एका साधूकडे एक मनुष्य गेला. साधूला म्हणाला की माझ्यामागे भूत लागले आहे. ते मला सोडत नाही. साधूने आपल्या सामर्थ्याने भुताला बोलावले आणि त्याला सांगितले की या मनुष्याला सोडून दे. त्यावर ते भूत म्हणाले की मी आता सोडायला तयार आहे. पण हा मनुष्यच मला सोडत नाही…! सामान्य मनुष्य आपल्या मनाने अशी भीतीची अनेक भुते निर्माण करतो आणि स्वतःच त्यांना धरून ठेवतो, त्यांना चिकटून बसतो आणि आयुष्यभर दुःखी राहतो… 

साधकाने कसे वागावे किंवा साधनेच्या विशिष्ठ टप्प्यावर साधकांची मनोवृती कशी असते किंवा असावी याचे वर्णन माउली पुढील ओवीत करतात…

करणें कां न करणें । हें आघवें तोचि जाणे । विश्व चळतसे जेणें । परमात्मेनि ॥

(ज्ञानेश्वरी १२. ११८)

जय जय रघुवीर समर्थ

 – – – – 

नारद भक्ति सूत्रे ६२

न तदसिद्धौर लोकव्यवहारो हेयः किन्तु फलत्यागस्तत् साधनं च कार्यमेव ॥ ६२ ॥

अर्थ : जोपर्यंत चिंता न करणे साधले नाही तोपर्यंत साधकाने लौकिक कर्माचा त्याग करू नयेज त्यांना सोडू नये. कर्मफळाचा त्याग मात्र प्रयत्नपूर्वक निष्ठेने करीत रहावे.

विवेचन : काळाच्या पुढे धावती ती काळजी. मनुष्य सर्व काही सोडतो पण तो काळजी सोडत नाही. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणायचे की मनुष्याने मनुष्याने नामस्मरणभक्तीच्या सहाय्यानं

काळाच्या छाताडावर नाचावे. पण प्रत्यक्षात मात्र याच्या उलट होताना दिसते…

संताच्या दारी जाऊन आले की मनुष्याला आपण चिंतामुक्त झाल्यासारखे वाटते. पण त्याची काळजी, चिंता घरी पोचण्याआधीच त्याच्या छाताडावर नाचू लागतात.

साधनेत प्रगती होऊ लागली की साधक खऱ्या निश्चिंत होऊ लागतो, पण ती स्थिती कायम राहते असे म्हणणे धाडसाचे ठरते. ज्याप्रमाणे सायकल चालवायला शिकणारा मुलगा सायकल शिकत असतो, तेव्हा तो थोडा थोडा तोल सांभाळू लागतो. त्याला वाटतं आपण सायकल पूर्णपणे चालवायला शिकलो. पण प्रत्यक्षात मात्र तसं होतंच असं नाही… , मनुष्य अनेक वेळा पडतो आणि सायकल चालवायला शिकतो… पण जोपर्यंत त्याच्यात निपुणता येत नाही, तोपर्यंत त्याचे सायकल चालवताना पडणे अगदीच स्वाभाविक असते आणि जोपर्यंत तो निपुण होत नाही, तोपर्यंत त्याने सायकल चालवण्याचा सराव करणे सोडून चालत नाही…

साधकाने असेच करावे असे नारद मुनी आपल्याला सांगत असावेत. साधनेचे विविध टप्पे असतात…! जोपर्यंत नदी सागराला जाऊन मिळत नाही, तोपर्यंत तिची कधी खळखळ, तर कधी शांत प्रवाह असे चालूच राहते. फक्त नदीने वाहणे थांबवून चालत नाही…!

साधकाचे असेच होते असे सर्व संत सांगतात. साधनेच्या काळात देखील थोडीफार भरती ओहोटी असतेच..! घालमेल चालू असतेच…! थोडक्यात साधकाने आपली विहित कर्मे टाकून चालत नाही. जोपर्यंत साधनेत पूर्णत्व येत नाही, तोपर्यंत त्याने आपली विहित कर्म टाकू नयेत. फक्त त्याचे फळ मात्र भगवंताला अर्पण करावे. संत तुकाराम महाराज यांचा पुढील अभंग या सूत्रांचे विवेचन करणारा आहे असे म्हणता येईल.

“नको सांडूं अन्न नको सेवूं वन । चिंतीं नारायण सर्व भोगीं ॥१॥ मातेचिये खांदीं बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥२॥ नको गुंफो भोगीं नको पडों त्यागीं । लावुनि सरें अंगीं देवाचिया ॥३॥ तुका म्हणे नको पुसों वेळोवेळां । उपदेश वेगळा उरला नाहीं ॥४॥”

(अभंग क्रमांक 870, सार्थ तुकाराम गाथा. धार्मिक प्रकाशन संस्था)

जय जय रघुवीर समर्थ

– – – 

नारद भक्ति सूत्रे ६३

“स्त्रीधन नास्तिकवैरीचरित्रं न श्रवणीयम्‌ ||६३||”

अर्थ : स्त्रिया, धन, संपत्ती, ऐश्वर्य, नास्तिक लोक आणि शत्रू यांचे वर्णन ऐकू नये.

विवेचन : आपल्याकडे सहा विकार प्रमुख सांगितले आहेत. आता विकारांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही…!

दूरदर्शन, दूरचित्रवाणी, चोवीस तास चालणाऱ्या बातम्या, सामाजिक माध्यमे, त्यात भर म्हणून झटपट पैसा देणार अनेक खेळ सध्या मोबाईल वर उपलब्ध आहेत, तसेच आधुनिक जीवनशैली मनुष्याला निसर्गापासून दूर नेत आहे आणि नवनवीन मानसिक, शारीरिक, भावनिक आजारांना आमंत्रण देत आहे. इतक्या व्यवधानातून लक्ष काढून ते *आत*मध्ये वळवणे किती अवघड…!

नारद मुनींच्या काळात फक्त सहा विकार होते. त्यात सुद्धा काम आणि क्रोध हे जास्त महत्वाचे आहेत. या सूत्राच्या सुरवातीला स्त्रीचा उल्लेख झाला आहे. जवळजवळ सर्व साहित्यात पुरुषांना स्त्रीपासून सावधान राहायला सांगितले आहे. थोडा सखोल विचार केला तर मनुष्य स्खलनशील प्राणी आहे. यात स्त्रीपुरूष असा विषय असण्याचे कारण नाही. पण सर्व संतांना हा विश्वास होता की स्त्रिया वाईट मार्गाला जाऊ शकणार नाहीत, पण पुरुषांबद्दल तितका विश्वास त्यांना वाटतं नसावा. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणायचे की आजपर्यंत धर्म टिकला तो स्त्रियांमुळेच..!

असो, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्त्रीच्या मोहात पडून अनेक लोक पथभ्रष्ट झाल्याचे आपल्याला आढळेल. गीतेत भगवंत म्हणतात,

“अधर्म माजतो तेंव्हा भ्रष्ट होती कुल-स्त्रिया|

स्त्रिया बिघडता कृष्णा घडतो वर्ण-संकर||”

(गीताई ०१. ४१)

इथे स्त्री वाईट नाहीच आहे, पण पुरुषांना परस्त्रीबद्दल आसक्ती वाटते ती वाईट आहे आणि यातून त्यांचे पतन होत जाते. आपल्याकडे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यात पहिला आहे धर्म. दुसरा आहे काम, तिसरा आहे अर्थ आणि चौथा आहे मोक्ष.

धर्मावर आधारित आचार, विचार आणि व्यवहार. धर्मावर आधारित काम इथे अपेक्षित आहे. धर्मावर आधारित आचरण, त्यावर आधारित काम आणि त्यावर आधारित अर्थाची प्राप्ती झाली तर मोक्ष नक्कीच दूर नाही.

संत तुकाराम महाराज आपल्या साधनेच्या प्रारंभिक टप्प्यात त्यांचे जे अनुभव आहेत ते अभगांच्या द्वारे लिहिले आहेत. ते म्हणतात,

स्त्रियांचा तो संग नको नारायणा ।

काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥

*

नाठवे हा देव न घडे भजन ।

लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु. ॥

*

दृष्टिमुखें मरण इंद्रियाच्या द्वारें ।

लावण्य तें खरें दुःखमूळ ॥२॥

*

तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु ।

परी पावे बाधूं संघष्टणें ॥३॥

*
(अभंग क्रमांक 239 सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

साधकाच्या मनातून स्त्री आणि पुरुष हा भेद जाईपर्यंत काळजी घ्यावीच लागते. एकदा का साधक पक्का झाला की मग त्याच्यावर या कामक्रोधाचा प्रभाव पडत नाही. मला इथे स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील एक घटना आठवते. परदेशात असताना त्यांना एक तरुणी भेटायला आली. तिने त्यांच्याकडे मागणी केली की मला तुमच्यासारखा पुत्र हवा आहे. सामान्य

साधक असता तर त्याने काय केले असते हे सांगणे अवघड आहे, पण स्वामी विवेकानंद तिला म्हणाले की माझ्या सारखा मुलगा कशाला हवा आहे, मातोश्री मलाच आपला मुलगा माना, मी आपल्याला माझी आई मानतो.

गीतेत भगवंत म्हणतात,

“काम क्रोध तसा लोभ आत्म-नाशास कारण|”

“तीन हीं नरक द्वारें टाळावीं चि म्हणूनियां||”

(गीताई १६. २१)

– – धन मिळवणे हा आपल्याकडं पुरुषार्थ मानला गेला गेला आहे. विहीत मार्गाने धन मिळवणे हा पुरुषार्थ आहे. चोरी करून धन मिळवणे यात कसला आलाय पुरुषार्थ?

संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात धनाबद्दल आपले मत सांगतात.

“जोडोनिया धन उत्तम वेव्हारे।

उदास विचारें वेंच करी।।”

(अभंग क्र. 2864, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

साधना करणे म्हणजे स्वतःला अधिकाधिक नव्हें, तर पूर्ण शुद्ध करणे. त्यासाठी निर्विकार होणे. विकार भगवंताने निर्माण केलें आहेत तर वाईट नसणारच, पण ज्याप्रमाणे औषधाची ठराविक मात्रा असते, तसे विकार त्या मात्रेत घेतले तर ते पूरक ठरू शकतात, अन्यथा विकारांची मालिका चक्रवाढ पद्धतीने वाढू शकते.

भक्तिमार्गात अग्रेसर होत असताना साधकाची दृष्टि आणि मनोवृत्ती अशी होते की त्याला सगळीकडे भगवतांचे अस्तित्व जाणवू लागते. श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणायचे की मला प्रत्येक गोष्टीत राम दिसतो.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– नारद भक्तीसूत्रे : ६१, ६२, ६३.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नसानसात फौज!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “नसानसात फौज!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

Once a solider…. always a soldier! असं म्हणतात त्याचा प्रत्यय प्रत्येक सेवानिवृत्त सैनिकांच्या जीवनात येतोच येतो! दुस-या कोणत्याही पेशापेक्षा सैनिकी पेशा अर्थात सैनिकी जीवन माणसाला विविधांगी अनुभवांनी समृद्ध करत असते.

भारतीय सैनिक तर याबाबतीत खूपच सुदैवी म्हणायला पाहिजेत. त्यांना त्यांच्या सेवाकाळात देशाच्या विविध सीमांवर, राज्यांत कर्तव्यावर जावे लागते. प्रचंड उष्ण वाळवंट ते अतिथंड सियाचीन असा सैनिकांचा प्रवास होतो. वर्षातील सुमारे नऊ महिने सैनिक त्यांच्या तुकडीत (युनिट)मध्ये वास्तव्य करीत असल्याने ती तुकडी हेच त्यांचे कुटुंब बनून जाते. त्यांच्या रेजिमेंटची सन्मानचिन्हे, बोधचिन्हे, बोधवाक्ये, ब्रीदवाक्ये आणि युद्धघोषणा या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात… जणू शरीराचा एखादा अवयवच. याच सोबत सैनिकी जीवनातील शिस्तीलाही, भाषेलाही सैनिक सरावलेले असतात. त्यामुळे सेवानिवृत्त होऊन नागरी जीवनात (सिविलीयन) वावरताना त्यांना मोठे समायोजन करावे लागते!

बारीक केस राखणे, गुळगुळीत दाढी करणे, वेळ पाळणे, व्यायाम करणे, कपडे, बूट इत्यादी टापटीप ठेवणे इत्यादी ठळक वैशिष्ट्ये असतात सेवानिवृत्त सैनिकांची. सेवानिवृत्त सैनिक ही सुद्धा देशाचे एक बलस्थान असते. असो.

मागील दोन लेखांत मी भारतीय सैन्यातील 21, Special Forces चे सन्मानचिन्हाबद्द्ल अर्थात ‘वाघनख’ बाबत लिहिले होते. आणि त्यानंतर मेजर दीपेंद्रसिंह सेंगर (सेवानिवृत्त) साहेबांच्या एका मोहिमेबाबत लिहिले होते. त्यात आपल्या महाराष्ट्राचे शूर सैनिक आणि अहिल्यानगरचे रहिवासी सुभेदार मेजर श्री. बाळासाहेब मोहारे (सेवानिवृत्त) साहेब यांचा उल्लेख होता. मोहारे साहेबांशी झालेल्या मोबाईल संभाषणात त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण घराबाबत समजले.

मोहारे साहेबांनी त्यांच्या दुमजली घराला नाव दिले आहे… ’वाघनख’! कारण मोहारे साहेब 21, Special Forces मध्ये Commando म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या बंगल्याला नाव दिले आहे… Commando House!

जेंव्हा त्यांनी व्यावसायिक इमारत उभारली तेंव्हा त्या इमारतीवर राष्ट्ध्वज फडकत राहील, अशी व्यवस्था तर केलीच परंतू त्यांच्या 21, Special Forces दलाचे जे चिन्ह आहे, त्या चिन्हाचे नाव या इमारतीवर ठळक अक्षरांत लिहिले… वाघनख! या नावाबाबत बरेच लोक अनभिज्ञ असतील. काही लोकांनी मोहारे साहेबांना विचारलेही… तुमचे आडनाव तर मोहारे आहे… ते बदलून तुम्ही ‘वाघनख’ केले आहे का?

भारतीय सैन्य, सैन्याच्या परंपरा, त्यांची बोधचिन्हे, सन्मानचिन्ह यांबाबत हल्ली हल्ली जागरूकता वाढलेली दिसते. परंतू अजूनही सविस्तर अशी माहिती खूप कमी लोकांपर्यंत पोहोचते.

 वर्ष १९८५. भारतीय सैन्यात मराठा लाईट इन्फंट्रीची २१वी बटालियन उभारण्यात आली… भारतीय सैन्यातील विविध रेजिमेंटस, बटालियन्सचा विचार करता ही बटालियन तशी ‘तरुण’ किंवा नवी कोरी म्हणावी अशी होती. सीमापारचे शत्रू तर आहेतच, परंतू देशांतर्गत शत्रू सुद्धा काही कमी नाहीत. उत्तर-पूर्वेकडे देशाला विशिष्ट असा शेजार लाभलेला आहे. विघटनवादी शक्ती या देशांच्या सीमावर्ती भागांत तसेच त्यांच्या सीमांत लपून भारताविरोधात सशस्त्र कारवाया करीत असतात. या भागातील विशिष्ट भौगोलिक रचना लक्षात घेऊन अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्यास सक्षम ठरेल असे PARA SPECIAL FORCES ची एक स्वतंत्र तुकडी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि २१, मराठा लाईट इन्फंट्री चे रुपांतर PARA SPECIAL FORCE मध्ये केले गेले. २१ मराठाचे स्पेशल फोर्सेस दलात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी रत्नागिरीतल्या मोरावणे गावात जन्मलेल्या कर्नल विश्वासराव भास्करराव शिंदे साहेबांच्या समर्थ खांद्यांवर देण्यात आली. शिंदे साहेबांनीच या दलाचे नाव, हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी क्रूरकर्मा अफजल खान याच्या वधासाठी वापलेले ‘वाघनख’ हे शस्त्र असावे, यासाठी खूप आणि यशस्वी प्रयत्न केले!

मोहारे साहेबांनी इमारतीला ‘वाघनख’ नाव देण्यासोबतच घराचे दरवाजे सुद्धा विशेष बनवून घेतलेले आहेत. त्यावर ‘INDIAN ARMY’, ‘SPECIAL FORCES’ ‘वाघनख’ ही अक्षरे अंकित केलेली असून बलिदान BADGE कोरलेला आहे. आणि 21 आकड्यातील 1 च्या जागी वाघनखाचे चित्र अंकित करण्याची कल्पकताही दाखवली आहे. ही दृश्य प्रतिके लोकांना माहिती तर देतातच परंतू प्रेरणाही देतात!

सैनिक कल्याण कार्यात हिरीरीने सहभागी असलेले सुभेदार मेजर बाळासाहेब ऊर्फ बाळू मोहारे (सेवानिवृत्त) यांनी आपल्या कृतीतून देशभक्तीचे उदाहरण घालून दिलेले आहे. इंग्लंडमधून ‘वाघनख’ महाराष्ट्रात दर्शनार्थ आणले होते. त्या वाघनखाच्या प्रदर्शनाच्या उपक्रमातही मोहारे साहेबांनी हातभार लावला होता. त्यांच्या नसा-नसांत भिनलेली देशभक्ती, भारतीय सैन्याबद्दलचा अभिमान कौतुकास्पद आणि अभिनंदनीय असाच आहे. धन्यवाद, मोहारे साहेब! जयहिंद!

(पंजाबातले लोक त्यांच्या घरांवर असलेल्या पाण्याच्या टाक्यांना विविध आकार देतात… विमान, रणगाडा, पक्षी, प्राणी वगैरे..)

– – – या लेखासाठी मोहारे साहेबांनी छायाचित्रे उपलब्ध करून दिलेली आहेत. सैनिकांसाठी कार्य करणा-या ज्योतीताई गोखले-पेंडसे यांच्या सहका-यामुळे मोहारे साहेबांचा संपर्क क्रमांक उपलब्ध होऊ शकला. धन्यवाद!)

 

लेखक : संभाजी बबन गायके.

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ निवांत एकांत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆

स्वाती मंत्री

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ निवांत एकांत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

मंदिराच्या पायऱ्या चढताना हातातील फुलांच्या हारापेक्षाही मनातील मागण्यांचे ओझे जास्त जड असते..

प्रत्येक पाऊल एका अपेक्षेने पडत असते आणि प्रत्येक नमस्कारात काहीतरी पदरात पाडून घेण्याची धडपड असते..

आपण देवाकडे जातो ते बहुधा स्वतःला अपूर्ण समजूनच..

कुणाला धन हवे असते, कुणाला यश, तर कुणाला केवळ मनाची शांती..

पण या मागणारे आणि देणारे यांच्या गर्दीत एक निराळाच प्रवाह वाहत असतो.

तो म्हणजे त्या जिवांचा, ज्यांनी मागणे सोडून दिले आहे..

ज्यांच्या डोळ्यांत आता आसवांची जागा एका संथ शांततेने घेतली आहे..

​माणूस जेव्हा स्वतःच्याच अंतर्मनाच्या गाभाऱ्यात डोकावतो, तेव्हा त्याला उमजते की खरी श्रीमंती बाहेरून काही मिळवण्यात नसून आत जे आहे त्यात तृप्त राहण्यात आहे.

हे जगणे सोपे नसते..

या तृप्तीला एक सूक्ष्म दुःखाची किनार असते. हे दुःख एखाद्या जुन्या जखमेसारखे नसते, तर ते एका अशा जाणीवेचे असते की आता आपल्याला जगाकडून काहीही नको आहे..

ज्याला काही नको असते, तोच खऱ्या अर्थाने ‘सुखी आत्मा’ असतो..

पण या वैराग्यात एक प्रकारची एकाकीपणाची सावली असते..

जग जेव्हा धावत असते, ओरडत असते, तेव्हा हा माणूस आपल्याच हृदयाच्या कोपऱ्यात शांत बसून स्वतःच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करतो..

ही तृप्ती आनंदापेक्षाही जास्त गंभीर आणि मौनापेक्षाही जास्त सखोल असते..

अशा वेळी बाहेरच्या मूर्तीसमोर हात जोडण्याचं भानही उरत नाही, कारण साऱ्या जगाला व्यापणारा तो विधाता स्वतःच्याच निवांत एकांतात सामावलेला असतो..

हे एक नितांत सुंदर सत्य आहे..

*

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares