मराठी साहित्य – विविधा ☆ वस्तू वस्तू जपून ठेव – १ – डब्यातील डबे- – -☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वस्तू वस्तू जपून ठेव – १ डब्यातील डबे — ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी

आज सकाळी मसाल्याचा डबा घासायला काढला आणि त्याकडे बघतच राहिले.कारण आपली महिलांची सवय! डब्यावरचे नाव वाचले, विशेष म्हणजे बाहेरच्या डब्यावर व आतील छोट्या डबीवर नाव वेगळे.मग डब्याकडेच बघत बसले आणि हळूच आठवणीची एक पुडी सुटली.बाहेरचा डबा मैत्रिणीने दिलेला तर आतील छोटे डबे माझ्या जुन्या डब्यातील होते, जो डबा पूर्वी चिरल्यामुळे मोडीत काढला होता.मग लक्षात आले महिलांचा जीव कुठे कुठे अडकलेला असतो.

अगदी आजचे उदाहरण बघायचे झाले तर डबे घरात बघितले तर किती विविध प्रकारचे डबे सांभाळून ठेवलेले असतात.आई कडे असतो तो पर्यंत याचे महत्व लक्षात येत नाही. पण एकदा स्वतः च्या संसाराला सुरुवात झाली की या डब्यात जीव अडकणे सुरु होते.लग्नात आहेरात आलेले डबे अगदी कायमची सोबत करतात.विविध आकाराचे डबे अगदी व्यवस्थित लावून ठेवणे, दर महिन्याला घासून चकचकित ठेवणे.घासून मगच त्यात सामान भरणे.व्यवस्थित साहित्य सापडावे म्हणून त्यावर छान स्टिकर्स लावणे.अशी उत्तम गृहिणीची कामे सुरु होतात.आणि त्या कामाचे सर्वांकडून कौतुक पण होते.अर्थात लेबल असलेल्या डब्यात तोच पदार्थ असेल याची मात्र खात्री नसते.आणि कोणी शेंगदाणे कुठे आहेत? याच्या उत्तरा दाखल “आहेत ना तिथेच, रवा लिहिलेल्या डब्यात.” हे वाक्य ऐकू येते.काय करणार, तात्पुरती सोय केलेली असते.पण कोणाला समजणार?

काही मैत्रिणी तर डब्यांच्या समोर मुद्दाम सेल्फी काढून आपले वैभव दाखवत असतात.पूर्वी तर किचन मधील एक भिंत म्हणजे डब्यांची मांडणी असायची.आणि त्यात चढत्या किंवा उतरत्या डब्यांच्या उंचीच्या क्रमाने डबे लावलेले असायचे.जणू किचनचे वैभवच!

हळूहळू हळदीकुंकू, मिळालेले आहेर, भेटवस्तू अशा प्रसंगातून छोट्या, मोठ्या, विविध आकाराच्या, रंगाच्या डब्यांची बहीण, भावंडे घरात येतात आणि ऐटीत जुन्या डब्यांच्या समोर किंवा डोक्यावर जाऊन बसतात.त्यात अगदी सध्याच्या पार्सल मध्ये येणारे डबे पण अपवाद नसतात.अगदी टाकून द्यावेसे वाटले तरी “असू दे, वेळेला उपयोगी पडतील.” असे म्हणून ठेवले जातात.इतके डबे असून एखादा डबा आला नाही तर जीव हळहळतो.आणि दुकाना समोरून जाताना एखादा नवीन फॅशनचा डबा भुरळ घालतोच!

आणि हो आपला जीव अडकलेले डबे घरातल्यांच्या मात्र डोळ्यात खुपत असतात.मग मी एक युक्तीच केली आहे.एक बॉक्स घेऊन त्यात हे डबे छान ठेवले आहेत.काही दिवसांनी मात्र हे डबे त्यात मावत नाहीत.मग मी डबे एकात एक असे घालून जपून ठेवते.आणि छोट्या छोट्या डब्या मोठ्या डब्यांच्या पोटात लपून बसतात. अगदी कोणाची दृष्ट नको लागायला या तत्वाने! अजून एक गंमत सांगू का? हे झाले निवडक डब्यांचे अजून आठवणींचे डबे उघडलेच नाहीत.म्हणजे लहानपणीचे, आज्जीचे, कड्या कुलुपे असणारे, विविध घाटांचे ( आकार ).

आणि हो या डब्यांच्या मध्ये यांच्या बहिणी बरण्या राहूनच गेल्या आहेत.बरण्यांची गोष्ट पुन्हा केव्हातरी!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “महिलांचे मायक्रो फायनान्स…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “महिलांचे मायक्रो फायनान्स…” ☆ सुश्री शीला पतकी 

महिलांचे मायक्रो फायनान्स

 – – हिंग डबी ते बचत गट महिलांचे मायक्रो फायनान्स……..

सुधा मूर्तींच्या मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या त्या म्हणाल्या “नारायण मूर्ती ने जेव्हा नविन कंपनी काढायचे ठरवले तेव्हा काही रक्कम कमी पडत होती मग ती माझ्याकडे आहे का? अशी विचारणा झाली. माझ्या तांदळाच्या डब्यातून साडेसातशे रुपये मी त्यांना दिले आणि सांगितले की ही रक्कम मला परत करावयाची आहे “…. हा किस्सा ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आले की बायका अशा तऱ्हेने घरात बचत करून पैसे जमा करीत असत आणि घरच्या कर्त्या माणसाला संकटकाळी त्या पैशाचा खूप उपयोग होई आणि मला आठवण झाली आमच्या घरच्या हिंगाच्या डबीची…..! साठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे…. त्याकाळी नागछाप हिंगाच्या पत्र्याच्या डब्या असत. त्या डब्या रिकाम्या झाल्यावर त्या व्यवस्थित धुवून पुसून उन्हात वाळवून त्यांचा वापर इतर कामासाठी होत असे. त्याच्या झाकणाचा उपयोग साल काढण्यासाठी म्हणजे बटाट्याचे साल दोडक्याचे साल…. तोपर्यंत अजून साल काढण्याची ते छोटे यंत्र आले नव्हते. म्हणजे हिंगाची डबी नंतर साल काढण्याचे यंत्र होई आणि त्यानंतर नवऱ्यापासून एकेक पैसा वाचवून तो गोळा करून जतन करावयाचा ती तिजोरी म्हणजे हिंगाची डबी…! . हिंगाच्या डबीत सगळी चिल्लर असायची. पैसा, दोन पैसे, आणा… 16 आणे जमले की त्याचा बंदा रुपया व्हायचा! … मग हा रुपया त्यापेक्षा मोठ्या बँकेत जायचा तो म्हणजे फिरकीच्या तांब्याचा पेला…! फिरकीच्या ताब्यात आत मध्ये एक छोटा पेला असायचा. रुपया रुपया साठवून बायका वाड्यातल्या वाड्यात चाळीत भिशी करत असत. भिशी असायची शंभर रुपयाची.. त्या काळात शंभर रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. दहा बायका भिशीमध्ये असत. जमा झालेले दहा, दहा रुपये एकत्र करून मग त्याची ज्या बाईला भिशी लागायची ती बाई त्या शंभर रुपयात घरासाठी कधी कॉट खरेदी करायची कपाट घ्यायची अशा संसार उपयोगी वस्तूची खरेदी होत असे किंवा घरात अडीअडचणीला धान्य भरण्याला त्याचा वापर व्हायचा असा बचतीतून संसाराला हातभार लावणे हे काम ह्या हिंगाच्या डबीने खूप केले.

मला वाटतं हेच मायक्रो फायनान्सचे तत्व बंगाल मधल्या नंतर येणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यानी वापरले असावे, जे पुढे एका अर्थतज्ज्ञाच्या प्रयोगात सामील झाले आणि त्याला नोबेल पारितोषिकही मिळाले (असे म्हणतात मला नक्की माहिती नाही हे ऐकीव माहितीवर मी लिहिते आहे यापुढील माहिती मात्र सत्य आहे) यामध्ये कलकत्त्यामधील समुद्रकिनाऱ्यावरच्या लोकांना शंभर रुपये या कंपन्या सकाळी देत असत दहा रुपये कट करून 90 रुपये हाती ठेवायचे म्हणजे त्या माणसाला शंभर रुपयाचे कर्ज दिले जायचे. तो माणूस त्यातून मासे खरेदी करायचा, खोबरे घ्यायचा कोथिंबीर आले हे सगळे तुकडे माशासकट विक्रीला एका साध्या पुठ्ठ्यावर किंवा कापडावर ठेवले जायचे. तेच त्याचे दुकान! संध्याकाळपर्यंत दीडशे रुपये त्याच्या हाती लागायचे तो फायनान्स कंपन्यांमध्ये 100 रुपये भरून उरलेला नफा घरी घेऊन जात असे असा मायक्रो फायनान्स च्या शंभर रुपयांच्या कर्जावर व्यवसाय चालत असे. कर्ज घेणारे हजारो लोक होते त्या कंपन्यांनाही चांगला फायदा मिळत असे. लोकांना चांगला रोजगार उपलब्ध झाला…. म्हणजे रोजगाराला कर्ज मिळाले छोट्या छोट्या हातांना काम मिळाले मायक्रो फायनान्स ची ताकद अनेकांनी ओळखली होती… आता तो काळ पैशाना किंमत असण्याचा होता. तिथंपासून आज तागायत बायका बचत करीत आहेतच. बायका त्या काळात घरात असायच्या. नवऱ्याने दिलेले रुपये दोन रुपये त्यातून आणा दोन आणि वाचवून केलेली हिंगाचे डब्यातली ती बचत तुम्हाला कल्पना येणार नाही इतकी मोठी ठरली. त्याचा एक उदाहरण देते…. माझी आई अशा बचतीमधून अर्धा तोळे सोने घेत असे. कारण तिला वाटायचं आपल्याला चार मुली आहेत, नवऱ्याला नोकरी नाही, काहीतरी तरतूद करायला हवी ना? बरं सगळे शिकणारे… त्या पद्धतीने तिने 25 तोळे सोने जमा केले होते तेव्हा सोन्याचा भाव १५० ते १६० दरम्यान होता कोणत्याही मुलीला सोने द्यावे लागले नाही त्यामुळे पुढे साधारण75 ते 80 स*** त्याची किंमत वाढत गेली ती आठशे रुपये पर्यंत गेली…. ती घर बांधताना खूप मोठी ठरली. हिंगाच्या डबीतील ही बचत संसाराला अनेक वेळा उपयोगी तर ठरलीच. त्याशिवाय कुणी आजारी पडलं, कुणाची फी भरावी लागली, घरात एखादी वस्तू घ्यावी लागली, वर्षभरासाठी धान्य भरावं लागलं तर या रकमेचा आधार पुरुष माणसांना खूप मिळत असे. कोणतेही आधार कार्ड नाही कुठेही बँक खाते नाही कुठलेही पासबुक नाही त्यावरचे कर्ज नाही जामीनदार नाही पण या हिंगाच्या डबीतील आणि फिरक्याच्या तांब्यातील, तांदळाच्या डब्यातील, बचत बँकेने त्या काळाच्या मध्यमवर्गीय माणसाला त्याच्या अडचणीच्या काळात तसेच त्याच्या काही प्रापंचिक गरजा पुरवण्यात किंवा थोडीशी वस्तुरूपी हौसमौज करण्यात खूप मोठा वाटा उचलला आहे. बायका कदाचित बाहेर मिळवायला गेल्या नाहीत पण आपला संसार उत्तम सांभाळून मुलांवर संस्कार करून सासू- सासऱ्याचा सांभाळ करून काटकसरीने पैसा दोन पैसे वाचूनत्यानी हिंगाच्या डबीत पतपेढी उभी केली, बचत गट उभे केले, भिशीगट उभे केले, मायक्रो फायनान्स कंपन्या उभ्या केल्या आणि बँका सुद्धा उभ्या केल्या…! मला त्या काळाच्या या चतुर बायकांच खूप कौतुक वाटतं. आज परिस्थिती अशी आहे घरातल्या चार बायका असतील तर सहा हजार रुपये सरकार मदत द्यायला लागले. घरातल्या महिला कामाला जात असल्यामुळे त्याच्या मदतनीस म्हणून अव्वाच्या सव्वा पगार घेऊन बायका काम करतायेत प्रसंगी अडवणूक करतायेत. चार पोळ्या लाटायचा पगार हजार रुपये मागतात. कारण त्यात व्हिजिट फी

असते. पण त्यांच्या बचत गटाने मात्र आता मोठे मोठे उद्योग आणि बँका उभारल्या आहेत. मध्यमवर्गीयाला घरामध्ये दोन खुर्च्या एखाद टेबल एखादा टेबल फॅन एखादी कॉट दही दुधाचे कपाट, हळदी कुंकवाला घालण्यासाठी एखादा गालीच्या ही स्वप्न पुरी करायला ती हिंगाची डबी नक्कीच कारणीभूत ठरली आहे. मी बरेच दिवस अशी हिंगाची डबी जपून ठेवली होती कारण त्यात तत्कालीन महिलांनी आपली स्वप्न साठवली होती आणि पूर्ण केली होती खूप शोधली पण ती हिंगाची डबी आता हरवली ती हिंगाची डबी नव्हती तर मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबातल्या बाईंच्या स्वप्नाची जादुई डबी होती. ति डबी हरवली आणि हिंगाच्या डबीत बचत करणारी आणि पैशाचं मोल असणारी ती माणसंही काळाच्या ओघात हरवून गेली…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “बाबा आमटे आणि ‘ आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार” – भाग २ – लेखक : श्री विकास आमटे ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “बाबा आमटे आणि ‘ आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार” – भाग २ – लेखक : श्री विकास आमटे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

बाबा आमटें ना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कारादरम्यान घडलेला किस्सा…

स्थळ : राष्ट्रपती भवन. दरबार हॉल.

(२०१३ च्या जूनमध्ये मी आणि माझा मुलगा कौस्तुभ एका कामासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भेटायला दिल्लीला गेलो होतो. महाराष्ट्र भवनातून आम्ही दोघं ऑटोरिक्षा घेऊन ७, रेस कोर्स रोडला पोहोचलो. आता ऑटोरिक्षामधनं ७, रेस कोर्स रोडला येणारी माणसं कदाचित विरळाच असतील. कारण गेटवरच्या सुरक्षारक्षकांच्या चेहऱ्यावर तरी तेच भाव होते!

‘‘क्या है? ’’ असं विचारताच मी माझं व्हिजिटिंग कार्ड दिलं. कार्ड आत काय गेलं, मिनिटभरातच सगळे पहारे खटाखट बाजूला झाले आणि काय चाललंय याचा थांगपत्ता लागण्याआधीच आम्ही पंतप्रधानांच्या ‘Special Protection Group’चे प्रमुख चतुर्वेदी यांच्या कार्यालयात पोहोचलोसुद्धा!)

इथून पुढे – – 

चतुर्वेदी मला विनंतीवजा शब्दांत म्हणाले, ‘‘विकासजी, आपको यदी कोई परेशानी ना हो तो क्या आप मुझसे दस मिनिट बात कर सकते है? ’’

मला झेपलंच नाही. मी म्हणालो, ‘‘जी हाँ, क्यूं नहीं? ’’

गप्पा सुरू झाल्या. चतुर्वेदी म्हणाले, ‘‘बाबांचं ‘भारत जोडो अभियान’ सुरू असताना मी विद्यार्थीदशेत होतो. अभियानादरम्यान बिहारमध्ये बाबांचं भाषण मी ऐकलं होतं. त्याच्या नोंदी आजही माझ्या डायरीत आहेत. बाबांच्या ‘ज्वाला और फूल’ (‘ज्वाला आणि फुले’चा हिंदी अनुवाद) या काव्यसंग्रहातल्या कविता मला तोंडपाठ आहेत! ’’

हे ऐकून आम्ही चाटच पडलो. पहारे का बाजूला झाले याचं उत्तर मिळालं. अर्थात आम्हाला बसणारे धक्के अजून संपले नव्हते. काही मिनिटांनी चतुर्वेदींच्या कार्यालयातून आम्ही प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे गेलो. वाटलं, आता तपासतील, मग तपासतील. पण कुणीच आमची झडती वगैरे घेतली नाही. पाच मिनिटं एका रूममध्ये बसलो.

एवढ्यात बाजूच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि आवाज आला, ‘‘आईये. ’’ *दरवाजा खुद्द पंतप्रधानांनी उघडला होता! *

आम्ही आत गेलो. सुमारे अर्धा तास मनमोहन सिंगजींशी विविध विषयांवर चर्चा झाली. मी त्यांना आनंदवन भेटीचं निमंत्रण दिलं आणि उभा राहून त्यांच्या पाया पडणार एवढयात ते खाली वाकत चक्क माझ्याच पाया पडले!

मी गडबडून गेलो. ओशाळत त्यांना म्हणालो, ‘‘ये आपने क्या किया? ’’

मला जवळ घेत ते म्हणाले, *‘‘ये बाबा के लिये है, उनको पहुँचा देना! ’’*

मी सद्गदित झालो. आम्ही परत निघतानाही खोलीचं दार पुन्हा त्यांनी स्वत:च उघडलं होतं!

‘पंजाब केसरी’ दैनिकाचे मुख्य संपादक *विजयकुमार चोपडम* पंजाबातल्या घुमान येथे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनात बाबांचा गौरवपूर्ण उल्लेख करताना म्हणतात,

*‘‘संत नामदेवांनंतर पंजाबशी उत्कटतेने जुळलेली बाबा आमटे ही एकमेव मराठी व्यक्ती आहे! ’’*

गाडीवर आनंदवनाचं नाव वाचून वाहतूक पोलीस कधी कधी आनंदवनाची गाडी अडवत. (आजही अडवतात.) आणि ‘का अडवली? , ’ असं विचारलं की म्हणत,

*‘‘बाबांना, साधनाताईंना कधी पाहू किंवा भेटू शकलो नाही, निदान आनंदवनातील माणसांना भेटून ती अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्याचं समाधान लाभावं म्हणून थांबवली गाडी!’’*

यावर आपण काय बोलणार?

बाबांच्या भूमिकेशी फारकत घेणारेही अनेक होते, पण बाबांनी आपल्या भूमिकेशी तडजोड केली नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे टीकाकारांचा त्यांनी कधीही दु:स्वास केला नाही. त्यामुळे बाबांपासून दूर गेलेली माणसंही पुन्हा त्यांच्याशी जोडली गेली.

इंदिराजींचा आणि बाबांचा परिचय साठीच्या दशकापासूनचा. बाबांनी आणीबाणीविरोधात व काही शासकीय धोरणांविरोधात भूमिका घेतल्याने यात तणाव निर्माण झाला असला तरी इंदिराजींच्या मनातला बाबांविषयीचा आदर कमी झाला नव्हता. १९८३ साली त्यांनी आनंदवनाला भेट दिली होती. काही मिनिटांची ही प्रस्तावित भेट चक्क एक तास लांबली!

बाबा म्हणत,

*‘‘Great heroes of history are nothing to me. The ‘Uncommon determination’ in the ‘Common man’ is my ideal. I do not want to be a great leader. I want to be a man who goes around with an oil-can, offering help wherever needed. To me, the man who does this is greater than any holy man in a saffron robe. The mechanic with the oil-can is my ideal in life… ’’*

याच तत्त्वाने बाबा आयुष्य जगले. त्यामुळे जी सगळी माणसं त्यांच्याशी जोडली गेली त्याचं हेच कारण होतं, की बाबा आमटे हा *‘साधा’* माणूस होता, सर्वासाठी ‘Accessible’ आणि ‘Approachable’ होता. प्रत्येकाला आपलासा वाटणारा होता. सामान्य माणसांतल्या असामान्यत्वाचं मूल्य जाणणारा आणि जपणारा होता. बिघडलेल्या यंत्रास तेलपाणी करून ठीक करत पुढे वाटचाल करणारा ‘मेकॅनिक’ बाबांसाठी आदर्श होता.

न्याय्य हक्कांसाठी लढत अंधाराकडून उजेडाकडे प्रवास करणाऱ्यांबद्दल आपण नेहमी भाष्य करत असतो. पण *‘बाबांचा प्रवास हा उजेडाकडून अंधाराकडे जाणारा आहे, ’* असं कुणीतरी म्हटलं होतं. मलासुद्धा ही मीमांसा चपखल वाटते, याचं कारण समाजाने नाकारलेल्या कुष्ठरुग्ण बांधवांना बाबांनी अंध:कारातून प्रकाशाकडे आणलं आणि पुन्हा पुन्हा नवे अंधारे कोपरे धुंडाळून सामाजिक न्यायाची प्रकाशवाट उजळ करण्यासाठी ते सतत कार्यमग्न राहिले.

देवाविषयी त्यांच्या मनात विलक्षण करुणा! ते म्हणत, *‘‘ईश्वर माझा पेशंट आहे. तो आजारी आहे. कारण तो चालत नाही, बोलत नाही, दीनदुबळ्यांचं त्याला ऐकू येत नाही. उपचारांची गरज त्याला आहे! शिवाय तो प्रचंड बिझी आहे. अंतरिक्षात एवढया सूर्यमालिका आहेत. त्यांची जबाबदारी त्याच्यावर आहे. तेव्हा त्याचं काम त्याला करू द्यावं, आपलं आपण करावं. ’’*

एकूणात काय, तर ‘देव’ या व्यवस्थेकडे सगळं सुपूर्द करून आपली जबाबदारी झटकत निष्क्रिय आयुष्य जगणं त्यांना अमान्य होतं.

बाबा आमटे हा ‘घाईतला’ माणूस होता. त्यांना टेबल, ऑफिस असं काहीच नव्हतं. त्यांनी कधी जांभई दिल्याचं माझ्याच काय, कुणाच्याच स्मरणात नाही! तसंच पुनर्जन्म वगैरे गोष्टींवर बाबांचा विश्वास नव्हता.

‘‘मी एका आयुष्यात अनेक आयुष्यं जगलो. I am affluent in affection which society has showered on me. जगाचा निरोप घेताना मी पूर्णपणे समाधानी आहे, ’’ असं ते म्हणत.

बाबांना *‘अफाट नैतिक शक्तीचं धगधगणारं बलाढ्य इंजिन’* असं संबोधणाऱ्या *कवी कुसुमाग्रजांनी* बाबांवर *‘संत’* नावाची कविता केली होती. त्यातला काही अंश..

 

सोमनाथच्या सूर्यद्रोही जंगलात…

भूमीच्या गर्भात पाय खोचणाऱ्या

विराट वृक्षावर

अपराजित कुऱ्हाड मारणारा तू –

 

वणव्याच्या समोर

घनघोर पाऊस होणारा

दु:खाच्या समोर

फक्त निर्भेळ माणूस होणारा

 

दुबळ्या दयेच्या चिखलातून

माणुसकीला बाहेर काढणारा तू –

 

अरे आम्ही आहोत असे करंटे

 

की आमच्या पेठेत लागतात पताका

फक्त मंत्री आले तर

 

सोनेरी अंबारीचे ऐरावत

जेव्हा रस्त्याने झुलू लागतात

 

तेव्हा आमचे हिशेबी हात

जुळून येतात छातीवर

 

आणि तुझ्यासारखे संत

 

ऐहिकाच्या प्रपंचातील

ईश्वरी अंशाचे रखवालदार

निघून जातात

गस्त घालीत अंधारात

 

उद्ध्वस्त मनांच्या मोहल्ल्यातून

आसवांच्या दलदलीतून

दु:खानं उसवलेल्या दुनियेवर

अमृताचं सिंचन करीत…

 

हे यात्रिका,

विस्कटलेल्या शरीरांचा

चुरगळलेल्या आत्म्यांचा जत्था घेऊन

तू तुझ्या मार्गानं जा

 

मागे वळून पाहू नकोस

 

जो हिशेब कधी केला नव्हतास

तो यापुढेही करू नकोस

 

तुला साथसोबत आम्ही करणार नाही

 

आमच्या दिवाणखानी दिव्यांचा प्रकाश

तुझ्या रात्रीवर पडणार नाही

 

तुझ्या अलौकिक वेदनेसाठी

आम्ही रडणार नाही

 

आमच्या जयघोषांच्या जमावातही

तू राहणार आहेस एकटा

 

दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा

अगदी एकटा

 

पण असेच एकाकीपण

लाभले होते ख्रिस्ताला

 

ज्याच्या हाताचा ठसा

मला दिसतो आहे तुझ्या हातावर

 

असेच एकाकीपण

लाभले होते बुद्धाला

 

ज्याच्या प्रज्ञेचे किरण

मला दिसताहेत तुझ्या पथावर

 

हीच तुझी सोबत

आणि हेच तुझे संरक्षण…

 

‘जेथे जाशी तेथे..

तो तुझा सांगाती

चालवील हाती- धरोनिया.. ’

– समाप्त – 

लेखक : श्री विकास आमटे

प्रस्तुती : सुनील देशपांडे

ईमेल : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फक्त दोन पैसे?? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ फक्त दोन पैसे?? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

फक्त दोन पैसे????

जे काम करोडोंच्या जाहिराती करू शकत नाहीत, ते काम दोन पैशांची श्रद्धा_आणि_परंपरा करून दाखवते.

कुंभमेळ्याचं ‘२ पैशांचं’ मार्केटिंग सिक्रेट; जेव्हा मालवीयजींनी इंग्रज व्हाईसरॉयलाच बुचकळ्यात टाकलं!

मंडळी, आजच्या काळात एखादा इव्हेंट गाजवायचा असेल, तर काय लागतं? तगडा ‘मार्केटिंग बजेट’, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, गुगल ॲड्स आणि बरंच काही. पण तुम्हाला माहितीये का, जगातील सर्वात मोठ्या मानवी समूहाला एकत्र आणण्यासाठी फक्त ‘दोन पैसे’ पुरेसे होते? हो, तुम्ही बरोबर ऐकलंत, फक्त दोन पैसे!

ही गोष्ट आहे १९४२ सालची. जग दुसऱ्या महायुद्धाच्या आगीत होरपळत होतं. तिकडे ब्रिटनने भारतीयांना त्यांच्या संमतीशिवाय युद्धात ढकललं होतं, ज्यामुळे देशात संतापाची लाट होती. याच काळात अलाहाबादमध्ये (आताचं प्रयागराज) कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. इंग्रजांना कुंभमेळ्यात प्रचंड रस होता, पण तो श्रद्धेपोटी नाही, तर त्यातून मिळणाऱ्या ‘करा’मुळे (Tax). त्यांनी कुंभला एक ‘महान जत्रा’ म्हटलं होतं आणि तिथून मोठ्या प्रमाणावर पैसे कमावण्याचा त्यांचा प्लॅन होता.

अशातच भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो कुंभमेळ्याला भेट देण्यासाठी आले. त्यांच्यासोबत होते महामना पंडित मदन मोहन मालवीय. मालवीयजींचं प्रयागवर आणि कुंभवर अतोनात प्रेम होतं. कुंभमध्ये जमलेली ती अथांग गर्दी, लोकांची अढळ श्रद्धा आणि शिस्त पाहून व्हाईसरॉय पार थक्क झाले. त्यांच्या डोक्यात एकच विचार चक्रावत होता — एवढ्या लोकांना इथे कसं काय आणलं गेलं?

व्हाईसरॉयनी आश्चर्याने मालवीयजींना विचारलं, “पंडितजी, या जत्रेसाठी तुम्ही किती मार्केटिंग केलं? एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमवण्यासाठी प्रसिद्धीवर नक्की किती पैसा खर्च झाला असेल? ” मालवीयजींनी शांतपणे उत्तर दिलं, “फक्त दोन पैसे! “

लिनलिथगो यांना वाटलं मालवीयजी थट्टा करतायत. त्यांनी पुन्हा विचारलं, “काय म्हणालात? फक्त दोन पैसे? हे कसं शक्य आहे? ” तेव्हा मालवीयजींनी आपल्या खिशातून एक छोटं ‘पंचांग’ काढलं आणि व्हाईसरॉयच्या हातात ठेवलं. ते म्हणाले, “हे पंचांग फक्त दोन पैशांना मिळतं, जे प्रत्येक भारतीयाच्या घरात असतं. यात कोणत्या वर्षी, कोणत्या तारखेला कुंभ होईल आणि कोणत्या मुहूर्तावर स्नान असेल, हे स्पष्ट लिहिलं असतं. लोक ही तारीख पाहतात आणि आपोआप घराबाहेर पडतात. त्यांना बोलावण्यासाठी कोणत्याही जाहिरातीची किंवा सरकारी निमंत्रणाची गरज नसते. “

खरं सांगायचं तर, हे उत्तर ऐकून व्हाईसरॉय निरुत्तर झाले. ज्या काळात दळणवळणाची साधनं कमी होती, रेडिओ-टीव्हीचा पत्ता नव्हता, त्या काळात एका छोट्या पंचांगाने कोट्यवधी लोकांना एका ठिकाणी आणलं होतं. हाच तो ‘सांस्कृतिक अल्गोरिदम’ आहे, जो आजही जगाला बुचकळ्यात टाकतो.

आज २०२६ मध्ये आपण जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा परिस्थिती किती बदलली आहे, नाही का? नुकताच २०२५-२६ चा महाकुंभ पार पडला, जिथे ६६ कोटींहून अधिक लोकांनी श्रद्धापूर्वक डुबकी लावली. आजही तिथे डिजिटल तंत्रज्ञान, AI चॅटबॉट्स आणि हाय-टेक सुरक्षा आहे, पण मूळ आधार मात्र तेच ‘पंचांग’ आणि तीच ‘श्रद्धा’ आहे. अगदी अलीकडे, फेब्रुवारी २०२६ मध्ये केरळच्या ‘कुंभ’वरून (महामघम उत्सव) वाद सुरू झाला, तिथल्या पुलाच्या बांधकामावर बंदी आली, पण भाविकांची ओढ मात्र तसूभरही कमी झाली नाही.

मंडळी, मदन मोहन मालवीयजींची ही गोष्ट आपल्याला एक खूप मोठा धडा शिकवते. जेव्हा तुमची संस्कृती आणि परंपरा लोकांच्या मनाशी जोडलेली असते, तेव्हा तुम्हाला महागड्या ‘ब्रँडिंग’ची गरज उरत नाही. इंग्रजांनी कुंभवर कर लावून पैसे कमावण्याचा प्रयत्न केला, पण भारतीयांनी मात्र पंचांगाच्या बळावर आपली परंपरा जिवंत ठेवली.

आजच्या ‘व्हायरल’ जगात आपण अनेकदा मूळ गोष्टी विसरतो. पण लक्षात ठेवा, जे काम करोडोंच्या जाहिराती करू शकत नाहीत, ते काम दोन पैशांची श्रद्धा आणि परंपरा करून दाखवते.

तुम्हाला काय वाटतं? आजच्या हाय-टेक युगातही आपली ही पंचांग आणि मुहूर्ताची परंपरा तितकीच प्रभावी आहे ना?

लेखक : अज्ञात  

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ऋणानुबंध… – लेखक : अज्ञात ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📖 वाचताना वेचलेले 📖

ऋणानुबंध… – लेखक : अज्ञात ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

नात्यापेक्षाही मैत्रीत खूप दम असतो.

जेव्हा मित्रमैत्रिणी खूप वर्षांनी एकत्रित पुन्हा भेटतात ना, तेव्हा खूप आनंद होतो.

तारुण्यातील मैत्री व साठीतली मैत्री यात बराच फरक असतो.

तारुण्यातल्या मैत्रीत खूप मजा असते, आपण तारुण्यात कोणाची कदर करत नसतो. कारण तेव्हा मैत्रीचा खरा अर्थच कळलेला नसतो…

मैत्री टिकली तर टिकली, नाहीतर उडत गेली. कधी आपण पुढचा विचार करत नाही व पाठीमागे वळून पण पाहात नाही. आपण आपल्या विश्वात खूप रमून जातो आणि आपलं विश्व त्या बेडकाच्या डबक्यासारखे असतं. डबकं सोडून कधी विशाल सागराचा विचारच केलेला नसतो आपण. पण जेव्हां साठीला पोहोचतो, तेव्हां कधी डबकं सोडून सागराला मिळालेलो असतो, ते कळत सुध्दा नाही…

जेव्हा साठीच्या सागरात मित्र मैत्रिणी भेटतात, तेव्हा सगळ्या नात्यात ते मैत्रीचे नाते इतकं आपलंसं वाटत असतं की, ती मैत्री खूप खूप हवी हवीशी वाटत असते.

नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटत असतो. मैत्रीत खूप मोकळेपणा असतो, त्यात भेद अजिबात नसतो. आपली विचारांची तार जर जुळत असेल, तर सर्व गोष्टी पडद्याआड न ठेवता आपण मनसोक्त गप्पा – गोष्टी करतो. आपलं कोणी ऐकून घेतं किंवा आपल्यासाठी वेळ काढतं. आपल्याला समजावून घेतो, सुखादु:खात सहभागी होतं व चुकलं तर बोलतं व माफही करतं. असे मिळालेले मित्र म्हणजे ‘नवरत्ना’तल्या रत्नातले कोहिनूर हिरेच म्हटलं तर वावगे ठरणार नाही.

आपण कोणाचे कोणीच नसतो, पण आपले मात्र काहीतरी ऋणानुबंध असतात. म्हणूनच आपली भेट कोणत्या ना कोणत्या रूपात ही नक्कीच होते.

आत्ता आयुष्याची साठी ओलांडल्यावर पुढचे आयुष्य हे बोनस आयुष्य आहे, तेव्हा या वळणावर जेवढे मित्र मैत्रिणी भेटतात, त्यांना भेटूया….

कोणाला काय माहीत की आपला प्रवास हा कुठपर्यंत आहे? प्रत्येकाचे स्टेशन वेगळे आहे…

ते स्टेशन आलं की उतरावंच लागते…

म्हणून जोपर्यंत आपला प्रवास चालू आहे, तोपर्यंत त्या प्रवासात मनातल्या तक्रारींना बाजूला काढून टाकू या.

माहीत नाही, परत आपण कधी, कुठे आणि कसे भेटू?

म्हणून मैत्रीची ही साथ खूप आधाराची व समाधानाची वाटते हे मात्र नक्की!

पण अशी मैत्री समजून घेणारे फार कमी असतात.

ज्यांना खरे निःस्वार्थी मित्र लाभले ना, ते खरेखुरे भाग्यवानच!  

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संकल्प… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ संकल्प☆ सौ शालिनी जोशी

‘संकल्प’ हा संस्कृत शब्द सम् अधिक कल्प. सम् म्हणजे चांगला आणि कल्प म्हणजे इच्छा, प्रतिज्ञा किंवा निश्चय म्हणून कोणताही चांगला म्हणजे हितकारक निश्चय हा संकल्प असतो.

परमात्मा एकटाच सर्व विश्वाला व्यापून होता. तेव्हा ‘एकोsहं बहुस्याम’ ‘एकटाच आहे बहु व्हावे ‘असे स्फुरण त्याला झाले. हाच पहिला संकल्प. याला ‘हरी संकल्प’ म्हणतात. यातूनच पुढे सृष्टीची रचना झाली. म्हणजे संकल्पाचे मूळ परमात्म्याकडे जाते. सहजच ते आपल्यापर्यंत आले. म्हणूनच कोणत्याही धार्मिक विधी पूर्वी संकल्प करून त्या देवतेला कार्यपुर्तीसाठी प्रार्थना केली जाते म्हणजे तो सिद्धीला जातो इच्छापूर्ती होते.

परमात्म्याचा संकल्प तत्काळ सिद्धीला गेला. आपल्यासाठी मात्र संकल्प आणि सिद्धी यामध्ये जमीन आसमानाचे अंतर. म्हणजे बराच काळ, कष्ट, प्रतीक्षा, संयम आणि सातत्याची गरज. समर्थ मनोबोधात सांगतात ‘सत्य संकल्प जीवी धरावा’ ‘ पाप संकल्प सोडून द्यावा’ म्हणजे संकल्पचे दोन प्रकार. परिणाम चांगला घडवणारा सत्य संकल्प. जसा ध्रुवाने अढळपद प्राप्तीचा केला. बालपणी तपश्चर्या आणि बराच काळ चांगले राज्य केल्यावर त्याला अढळपद प्राप्त झाले. एकलव्याने द्रोणाचार्यांच्या प्रतिमेला पुढे ठेवून श्रेष्ठ धनुर्धर बनण्याचा संकल्प केला. मोठ्या कष्टाने त्याने आपले ध्येय साधले. संकल्प सिद्धीला पोहोचला. हे सत्य संकल्प. पण दुर्योधनाने ‘सुईच्या टोकावर राहील एवढीही जमीन पांडवाना देणार नाही’ असा संकल्प केला आणि तो युद्धाला कारण झाला. कौरवांचा नाश झाला हा पाप संकल्प. चाणक्य, शिवाजी महाराज यांचे संकल्प देशोध्दाराला कारण झाले. आर्य चाणक्याने नंदाच्या सभेत ‘तुझे भ्रष्टाचाराने बरबटलेले राज्य नाश करून समर्थ असा राजा सिंहासनावर बसवेपर्यंत शेंडीला गाठ मारणार नाही’ अशी प्रतिज्ञा केली ‘ती पूर्ण करून दाखवली. अडीच तपाचा कालावधीमध्ये गेला. पण संकल्प पूर्ण झाला. तसेच शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा पूर्ण केली. हे सत्य संकल्प. अशा प्रकारे संकल्प करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.

गीतेत संकल्प हा शब्द बरेच वेळा आला आहे

१) न ह्यसन्न्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन।(गी६/२)

२) सर्व संकल्पसंन्यासी योगारुढस्तदोच्यते। (गी६/४)

येथे संकल्प म्हणजे कामनायुक्त इच्छा असा अर्थ आहे त्यांचा त्याग येथे सांगितला आहे.

पूर्वी स्त्रिया चातुर्मासाच्या निमित्ताने काही व्रते करीत ते संकल्पच. संकल्पच यशाला कारण होतो. आताही कोणी एव्हरेस्ट चढण्याचा, कोणी खाडी पार करण्याचा, कोणी समाज सुधारण्याचा, कोणी अनाथांना सांभाळण्याचा, तर कोणी प्राण्यांची काळजी घेण्याचा संकल्प करतात. अशा प्रकारे संकल्पाना मर्यादा नाही. ज्याला जो आवडेल, झेपेल, पचेल, रुचेल पण दुसऱ्याला त्रासदायक होणार नाही. तो त्याने अवश्य करावा. रोज काही वाचण्याचा, लिहिण्याचा, पाठांतराचा, व्यायाम करण्याचा, काही नियम करून त्याप्रमाणे वागण्याचा संकल्प नेहमी चांगलाच असतो. त्यामुळे शिस्त लागते. शरीराला म्हणाला वळण लागते. मनाची चंचलता कमी होते. अशा प्रकारे संकल्प करावा. सिद्धीचा आनंद भोगाव व सुखी व्हावे.

सध्या भ्रष्टाचार मुक्त भारत हा मोठा संकल्प आपल्या देशापुढे आहे.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “म्हैस…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “म्हैस…” ☆ श्री सुधीर करंदीकर

मी राहतो पुण्याला कर्वेनगर या भागात. आम्ही रोजच दुपारी बावधन या भागात मुलीकडे जातो. नातवंडं दुपारी शाळेतून घरी येतात. त्यावेळेला आम्ही घरी असल्यामुळे त्यांचे दुपारचे खाणे – पिणे, अभ्यास, क्लास ला सोडणे / आणणे वगैरे, याची काळजी रहात नाही. संध्याकाळी मुलगी किंवा जावई ऑफिस मधून घरी आले, की, थोड्या गप्पा मारून, आम्ही साधारण ६ – ६. ३० ला तिथून निघून कर्वे नगरला, आमच्या घरी येतो. आमचे जाणे येणे स्कुटरनी असते. कधी कधी बायको बावधनहून स्कुटर घेऊन आधी निघून जाते, अशावेळेस, मी घरापर्यंत कधी पायी जातो, कधी अर्धे अंतर बसनी व पुढचे पायी जातो.

एक दिवस बायको स्कूटर घेऊन लवकर घरी गेली म्हणून त्या दिवशी संध्याकाळी मला बसनी घराकडे जायचं होतं.

मुलीकडून ६. ३० ला निघालो. साधारण ५ – ७ मिनिटे चालत गेलो, की मेन रोड लागतो. रस्ता ओलांडला, की, समोरच बसचा थांबा आहे. ट्रॅफिकच्या पीक- आवर्स मध्ये पुण्यात कुठलाही रस्ता ओलांडणे हे एक दिव्यच असते. मी जाऊन रस्त्याच्या अलीकडे उभा राहिलो व ट्रॅफिक मध्ये गॅप पडण्याची वाट बघत थांबलो. त्या दिवशी ट्रॅफिक जरा जास्तच होता. या रोडची खासियत अशी आहे, की, पुणे विद्यापीठ ते व्हाया पाषाण रोड – व्हाया चांदणी चौक – पौड डेपोपर्यंत, म्हणजे साधारण ५ – ६ किमी अंतरामध्ये कुठेही सिग्नल नाही. त्यामुळे सगळ्याच गाड्या, म्हणजे कार/ स्कुटर/ मोटर सायकल/ बसेस आणि ऑटो, रस्त्याच्या दोन्हीकडून सुसाट स्पीडनी धावत असतात. बहुदा, ४-५ मिनिटे गेली, की, छोटीशी गॅप मिळते व त्यामध्ये जीव मुठीत धरून रस्ता क्रॉस करता येतो. आज काय प्रकार होता माहित नाही, मधे गॅपच येत नव्हती. बाजूला बघितलं, तर काही तरुण मंडळी गॅप नसतांना पण, धावून रस्ता क्रॉस करत होती. तेवढ्यात एक अंध व्यक्ती समोरून आरामात रस्ता ओलांडून आली. अज्ञानात सुख असतं, असं म्हणतात, ते असं!

मी बऱ्याच वेळेला ४ – ५ पावले पुढे जायचो आणि वेड्यावाकड्या येणाऱ्या गाड्यांना घाबरून परत मागे यायचो. पण पुढे जायची हिम्मत होत नव्हती. वाट बघता बघता १० मिनिटे झाली, पण ‘नो चान्स’. अशा वेळेस वाटतं, की, काहीतरी घडून ट्रॅफिक जॅम व्हावा, त्यामुळे आपोआपच क्रॉस करणाऱ्यांची सोय होते. पण तसही आज काही घडत नव्हतं. १५ मिनिटे झाली, तरी मी होतो त्याच ठिकाणी होतो.

तेवढ्यात माझी नजर मागे गेली. मागे एक तगडी म्हैस उभी होती व तिच्या गळ्यातली दोरी धरून मुलगा उभा होता. म्हशीकडे बघताच मी मनातल्या मनात ‘युरेका’, ‘युरेका’ (म्हणजे ‘सापडले’, ‘सापडले’) असे ओरडलो. मी लगेच त्या मुलाकडे गेलो.

मी : दादा, म्हैस घेऊन पलीकडे चलणार का?

मुलगा : कशाकरता? काय करायचं आहे?

मी : करायचं काहीच नाही. फक्त पलीकडे माझ्याबरोबर चलायचं आणि लगेच परत यायचं. ५ रुपये देईन.

(मुलाला काहीच अर्थबोध झाला नसावा. पण ५ रु मिळणार आणि करायचं काहीच नाही, हे त्याला समजलं 

मुलगा : काका, चला 

मुलगा म्हैस घेऊन निघाला. मी म्हशीची ढाल करून, तिच्या उजव्या बाजूनी रस्ता क्रॉस करायला सुरुवात केली. इतका धुव्वाधार ट्रॅफिक असूनही मी मजेत रस्ता ओलांडत होतो. काही वाहन चालकांनी म्हशीकरता कर्कश्य हॉर्न वाजवले, काहींनी म्हशीला मनात शिव्या दिल्या असतील. आम्ही थाटात पलीकडे पोहोचलो. मी मुलाला ५ रु दिले आणि आभार मानले. पलीकडे ४ वयस्कर रस्ता क्रॉस करायला उभेच होते. मला इतक्या आरामात रस्ता ओलांडतांना बघून, सगळेच मुलाला म्हणाले – अरे आम्हाला पण पलीकडे सोड. आम्ही २ – २ रु देऊ. लगेच मुलानी म्हैस मागे वळवली आणि सगळे म्हशीच्या आडोश्यानी पलीकडे निघाले. मला हे बघतांना मजा वाटली. मी जवळच्या बस थांब्यावर जाऊन बस ची वाट बघत बसलो.

रस्त्यावरचा ट्रॅफिक मगाशी होता, तसाच टॉप गिअर मधे होता. सहजंच माझं लक्ष पलीकडून येणाऱ्या म्हशीकडे गेलं. २ वयस्कर म्हशीच्या आडोशाने रस्ता क्रॉस करत होते. म्हशीच्या फेऱ्या सुरु झालेल्या बघून मला मजा वाटली आणि लक्षात आलं, की, म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करणं, या सारखा सुरक्षित पर्याय नक्कीच नाही. तेवढ्यात त्या मुलाचं लक्ष माझ्याकडे गेलं व त्यानी आनंदानी हात हलवला. बहुदा मनामध्ये मला थँक्स म्हटले असेल. मी पण हात हलवून त्याच्याशी संवाद साधला. तेवढ्यात माझी बस आली आणि मी आत चढलो.

नंतर साधारण महिनाभर माझी जा- ये स्कुटरनीच सुरु होती. स्कुटर असली, की, माझा जाण्यायेण्याचा रस्ता थोडा बदलतो.

आज बायको स्कुटर घेऊन बावधनहून लवकर घरी गेली, त्यामुळे मला बसनी जायचे होते. मुलीकडून निघालो आणि चालत मेनरोडला पोहोचलो. साडेसात ची वेळ असल्यामुळे रस्त्याच्या दोन्हीबाजूनी सुसाट गाड्या धावत होत्या, सगळीकडून हेडलाईट डोळ्यावर येत होते, कर्कश्य हॉर्न वाजत होते. काही टू व्हीलरवाले उलटीकडून येत होते. काही फुटपाथवरून येत होते. थोडक्यात म्हणजे, पुण्यातल्या कुठल्याही हमरस्त्याचं चित्र समोर होतं. चित्रातला एक रंग मिसिंग आहे, हे पटकन लक्षात आलं. जीव मुठीत घेऊन रस्ता क्रॉस करतांना कुणीच दिसत नव्हते. मी मनात म्हटलं, हे गेले कुठे? तेवढ्यात माझं लक्ष थोडं पलीकडे उभ्या असलेल्या म्हशीकडे गेलं आणि म्हशीबरोबरच्या मुलाचं माझ्याकडे गेलं. मला बघताच मुलांनी हात उंचावला आणि ओरडला, ‘काका, चला पलीकडे सोडतो. फ्री मध्ये, पैसे द्यायचे नाही’.

माझ्या डोक्यात महिन्यापूर्वीच्या घटनेची ट्यूब पेटली, आपण याला म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करण्याचे ५ रु दिले होते.

मुलगा मला थांबा म्हणाला आणि धावत जवळच्या फुलवाल्याकडून एक फुलांचा सुंदर गुच्छ घेऊन आला. मला गुच्छ देऊन त्यानी खाली वाकून मला नमस्कार केला व म्हणाला, काका चला.

आम्ही म्हशीच्या आडोशाने रस्त्यावर उतरलो आणि चालायला लागलो. महिन्यापूर्वी गेलो होतो, तेव्हा म्हैस थोडी बिचकत होती. आज ती एकदमच कंफर्टेबल वाटत होती. आपल्याकडे सिग्नल तोडणारे, उलटे येणारे, फुटपाथवर गाड्या घालणारे जेवढे कंफर्टेबल असतात तेवढीच.

चालता चालता —

मी : अरे म्हशीला घेऊन इकडे काय करत होतास? आणि मला हा गुच्छ कशाकरता?

मुलगा : काका, गेल्या वेळेला आपण भेटलो होतो, त्या दिवसापासून मी रोजच इथे असतो. आणि रोजचं तुमची वाट बघत होतो.

मी : कशाकरता?

मुलगा : तुम्हीच मला हा मार्ग दाखवला. संध्याकाळी रोज म्हशीला घेऊन इथे येतो आणि रस्ता क्रॉस करणाऱ्यांची मदत करतो, मला पण छान पैसे मिळतात. गेल्या १० दिवसांपासून ह्याच रोडवर आता ८ म्हशी सोडल्या आहेत. घरचे सगळेच म्हशींबरोबर इथे निरनिराळ्या चौकात येतात, व २- ३ तास थांबतात. रोजचे म्हशीमागे ८० – १०० रु मिळतात. ह्या वेळेला म्हशींना काहीच काम नसते. त्यांची खाण्यानंतरची शतपावली होते. रात्री त्यांना झोप पण छान लागत असेल. त्यामुळे दूध पण वाढले आहे.

मी : ट्रॅफिक कमी असेल तर ट्रिपा मिळत नसतील!

मुलगा : काका, क्रॉस करणारी पब्लिक कायमच असते. आणि ट्रॅफिक कमी असतांना गाड्यांवाले जास्तच स्पीडनी आणि वेड्यावाकड्या गाड्या मारतात. त्यामुळे माझ्या ट्रिपांना मरण नाही. अगदीच दुपारी किंवा रात्री ९ नंतर मीच येत नाही.

मी : वा, क्या बात है!

तेवढ्यात आम्ही पलीकडे पोहोचलो. तिथे ५- ६ वयस्कर स्त्री – पुरुष उभे होतेच. मुलानी लगेच त्यांना माझी ओळख करून दिली – ह्या काकांनीच मला ही म्हशीची कल्पना दिली. वगैरे.

मी मनातून आनंदलो व देवाचे आभार मानले.

सगळ्यांनीच मला थँक्स दिले. त्यातल्या तिघा जणांनी मला बाजूला घेतले व मुलाला सांगितले, ‘आम्ही पुढच्या ट्रिप ला येतो. तू जा पुढे’.

एक जण (मला) : तुम्ही आमचा व आमच्या घरच्यांचा फार मोठा प्रॉब्लेम सोडवला आहे. आता घरून बाहेर पडतांना बायको बजावते, ‘म्हैस असेल तरच रस्ता क्रॉस करा. २ -५ रु जाऊ देत’.

दुसरी व्यक्ती : पूर्वी रोज रस्ता ओलांडताना समोर म्हशीवर बसलेले यमराज दिसायचे. आता त्यांची म्हैसच बरोबर असते, त्यामुळे एकदम ‘बी – न – धा – स’.

तिसरी व्यक्ती : आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढच्या मीटिंगला आम्ही तुम्हाला बोलावू. आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. तुम्हाला नक्की यायचे आहे. तुमची म्हशींची कल्पना म्हणजे – तोड नाही. फोन नंबर ची देवाण घेवाण झाली.

त्यांना बाय करून मी बस स्टॉप वर पोहोचलो. तिथे बसायला नवीनच बाक केले आहेत. बाकावर बसलो आणि कल्पनेच्या दुनियेत पोहोचलो ⤳ ⤳ ⤳ ⤳ ⤳ ⤳

पुढच्या काही दिवसांनंतरची वर्तमानपत्रे मला दिसायला लागली ⤳ ⤳ ⤳ ⤳ ⤳ ⤳

# ‘सिनियर सिटिझन्सच्या मदतीला म्हशी सरसावल्या’

पुण्यातल्या रस्त्यांवर चालणे ‘मौत का कुंवा’ मधे गाडी चालवण्याइतके धोकादायक होते. तुम्हाला कोण आणि केंव्हा उडवेल, ही चालणाऱ्यांच्या मनात सतत धास्ती असायची. म्हशीचा आडोसा घेऊन चालतांना लोकांची ही धास्ती आता संपली आहे. खाली निरनिराळ्या चौकातले वयस्कर मंडळींना घेऊन रस्ता क्रॉस करणाऱ्या म्हशींचे फोटो होते.

 # ‘रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकर्स ना रामराम’

बहुतेक रस्त्यांवरचे स्पीड ब्रेकर्स हद्दपार झाले आहेत. रस्त्यांवर ठराविक अंतरांवर म्हशींची जा – ये सुरु असल्यामुळे वाहनांच्या वेगावर आपोआपच वचक बसला आहे. ‘वाहने सावकाश चालवा, पुढे स्पीड ब्रेकर आहे’ ह्या पाट्या जाऊन, ‘म्हशी पुढे आहेत’ अशा पाट्या आल्या आहेत.

# ‘आर्थोपेडीक क्लिनिक मधली गर्दी ओसरली’

रस्त्यांवरचे स्पीड ब्रेकर्स काढल्यामुळे वाहन चालकांचे पाठीचे व कंबरेचे दुखणे यात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे.

# ‘शाळा चालकांची म्हशीला पसंती’

शाळा सुटल्यानंतर लहान मुले रस्ता ओलांडताना वाहनांची नेहेमीच दशहत असायची. शाळेनी शाळा सुटतांना शाळेसमोर २ म्हशी तैनात कराव्या, अशी पालकांनी शाळा चालकांकडे मागणी केली आहे. बहुतेक शाळा चालकांनी याला मंजुरी दिली आहे.

# ‘म्हशींना सर्वच शहरांमध्ये डिमांड’

सर्वच मोठ्या शहरांमध्ये पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेकरता म्हशींची मदत घेणार. पाहणी पथके पुण्यात दाखल.

# वर्षातली सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना म्हणून लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!

मीडिया संशोधकाच्या शोधात!!!

काहीतरी गोड आवाजामुळे माझी तंद्री मोडली. शेजारी बसलेली मुलगी सांगत होती, बस येतेय, चला. लांब बस दिसत होती. मी उठून पुढे आलो. बाजूला म्हशीच्या ट्रिप सुरु होत्याच. तेवढ्यात बस आली. मी म्हशीकडे बघून तिला बाय केलं आणि बसमध्ये चढलो.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३ आणि ४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३ आणि ४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

– – श्लोक ३.

प्रभाते मनी राम चिंतीत जावा |

पुढे वैखरी राम आधी वदावा |

सदाचार हा थोर सांडू नये तो |

जगी तोचि तो मानवी धन्य होतो ||३||

अर्थ : पहाटेच्या वेळी मनात श्रीरामाचे चिंतन करावे. त्यानंतर वाणीने त्याचे नाम उच्चारावे. जगात सदाचाराला अत्यंत महत्त्व आहे; तो कधीही सोडू नये. सदाचाराने वागणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने धन्य ठरतो.

पहाटेची वेळ किती रम्य आणि शांत असते! आपल्या संस्कृतीत तर या वेळेला “रामप्रहर” असे सुंदर नाव आहे. रात्रीच्या विश्रांतीनंतर पहाटे मन स्वच्छ, प्रसन्न आणि स्थिर असते—जणू एखाद्या शांत डोहातील निर्मळ पाणी. म्हणूनच दिवसाची सुरुवात भगवंताच्या चिंतनाने करावी, असे समर्थ सांगतात. चिंतन म्हणजे एखाद्या गोष्टीचा विचार.

प्रभाती मनात रामाचे स्मरण केले, त्याचे नाम घेतले, तर त्या नामाचा संस्कार दिवसभर मनावर राहतो. सकाळी ऐकलेले एखादे गाणे जसे दिवसभर ओठांवर रेंगाळते, तसेच पहाटे घेतलेले भगवन्नाम मनात गुंजत राहते. जसे एखादा रुग्ण सकाळी घेतलेल्या औषधामुळे दिवसभर सुदृढ राहतो, तसेच प्रभातीचे नामस्मरण मनाला अंतर्गत बळ देते.

समर्थ पुढे सांगतात—“पुढे वैखरी राम आधी वदावा”—म्हणजे कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी मुखाने, वाणीने रामनाम उच्चारावे. पूर्वी घराघरांत सकाळी स्तोत्रपठण, भजन, आरती यांची परंपरा होती. आजच्या वेगवान जीवनात ती कमी होत चालली आहे. अनेकदा प्रश्न विचारले जातात—याचा काय उपयोग? परंतु प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर मोजता येत नाही; तरीही ती निरर्थक ठरत नाही.

प्रभातीचे चिंतन मनावर सुसंस्कार घडवते. दिवसाची सुरुवात मोबाईलच्या पडद्याने नव्हे, तर भगवंताच्या नामाने झाली, तर एकाग्रता, सकारात्मकता आणि संयम यांची वाढ होते. वाईट विचारांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती मिळते.

“प्रभाते” या शब्दाचा आणखी एक अर्थ लावता येतो—जीवनाची पहाट, म्हणजेच बालपण. लहान वयातच चांगल्या विचारांचे, सद्गुणांचे सिंचन झाले, तर ती शिदोरी आयुष्यभर साथ देते. म्हणूनच बालसंस्कारांचे महत्त्व अधोरेखित होते.

समर्थ पुढे म्हणतात—“सदाचार हा थोर सांडू नये तो. ”

सदाचार म्हणजे शुद्ध, पवित्र आणि सुसंगत आचरण. सत्ता, संपत्ती किंवा पद यामुळे कोणी थोर होत नाही; तर ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता आहे, तो खरा थोर. तुकाराम महाराज म्हणतात—“बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. ” संतांचे आचरणच त्यांची खरी ओळख असते. अशा सदाचरणाचा अंगीकार करणारा मनुष्यच जगात खऱ्या अर्थाने धन्य ठरतो.

नामस्मरण, शुद्ध विचार आणि सदाचार—या त्रिसूत्रीने दिवसाची आणि जीवनाची पहाट उजळून निघते.

स्वसंवाद

  • मी माझ्या दिवसाची सुरुवात भगवंताच्या चिंतनाने करतो का?
  • मी करीत असलेले नामस्मरण ही केवळ सवय आहे की अंतर्मनाला बळ देणारी जाणीवपूर्वक कृती?
  • माझ्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता राखण्याचा मी प्रयत्न करतो का? (क्रमशः)

– – – – – 

– – श्लोक ४.

मना वासना दुष्ट कामा नये रे |

मना सर्वथा पापबुद्धि नको रे |

मना धर्मता नीती सोडू नको हो |

मना अंतरी सार विचार राहो ||४||

अर्थ : हे मना, दुष्ट वासना, अहितकारक इच्छा मनात येऊ देऊ नकोस. पापबुद्धीला स्थान देऊ नकोस. धर्म आणि नीती कधीही सोडू नकोस. अंतर्यामी जे खरे, श्रेष्ठ आणि शाश्वत आहे त्याचाच विचार नांदू दे.

मनाच्या श्लोकांची एक साखळी आहे. मागील श्लोकात समर्थांनी सांगितले—“सदाचार हा थोर सांडू नये तो. ”या श्लोकात ते त्या सदाचाराची अंतर्गत पायाभरणी स्पष्ट करतात. सदाचार बाह्य वर्तनातून दिसतो खरा; पण त्याची सुरुवात मनातून होते. आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात, “गमू पंथ अनंत या राघवाचा. ” एक वेळ भ्रष्टाचार, अनितीने वागणे हे लौकिक व्यवहारात खपून जाईलही पण राघवाच्या पंथावर चालायचे तर मनामध्ये वाईट विचार आणि अनितीची वागणूक कशी बरं चालेल?

मन अत्यंत चंचल आहे. तेच आपले मित्र आणि तेच आपले शत्रू. म्हणूनच आपण म्हणतो “मन चिंती ते वैरी न चिंती. ” कधी कधी मनात येणारे विचार इतके तीव्र, भयंकर आणि नकारात्मक असतात की आपण स्वतःच दचकतो. पण असे विचार येणे ही मानवी प्रवृत्ती आहे; त्या विचारांना आपण पोषक खाद्य पुरवायचे की ते सोडून चांगले विचार जाणीवपूर्वक जोपासायचे हे आपल्या हातात आहे.

वाईट विचार मनात येण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. ते सहज येतात. दूरदर्शनवरील धारावाहिक, हिंसाचार आणि भडक प्रणयदृश्ये असलेले चित्रपट, समाजमाध्यमे अशा विचारांना हातभारच लावतात. परंतु चांगले, उन्नत, हितकारक विचार जाणीवपूर्वक जोपासावे लागतात. हीच साधना आहे. पूर्वी मोठी माणसे सांगत, “चांगले बोला. आपल्या भोवती देवतांचा वास असतो त्या देवता तथास्तु म्हणत असतात. ” दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर शब्दांनाही शक्ती असते. आपले विचार, शब्द आणि कृती यांचा परस्पर संबंध असतो. आपण जे वारंवार चिंततो, तेच आपण बोलतो; आणि जे बोलतो, ते आचरणात उतरते. म्हणूनच सद्विचारांचा जागर करणे ही सदाचाराची पहिली पायरी आहे.

आपल्यासमोर दोन वाटा असतात. त्या म्हणजे श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे दीर्घकालीन हित आणि मूल्याधिष्ठित निवड असे म्हणता येईल. तर प्रेयस म्हणजे तात्कालिक सुख, आकर्षक वाटणारे पण शेवटी अहितकारक ठरणारी निवड.

तात्पुरत्या लाभासाठी अनैतिक मार्ग स्वीकारणे, सहजसोप्या सुखासाठी मूल्यांचा त्याग करणे ही प्रेयसाची उदाहरणे. पण कठीण असले तरी योग्य मार्ग स्वीकारणे, इतरांच्या आनंदात आनंद मानणे, मदतीचा हात पुढे करणे हे श्रेयसाचे लक्षण.

समर्थ म्हणतात, “मना धर्मता नीती सोडू नको हो. ” धर्मता म्हणजे धर्माचरण. पण धर्माचरण म्हणजे केवळ धार्मिक आचार नव्हे; तर न्याय, प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि संवेदनशीलता. नैतिकेने वागण्याची जबाबदारी. परस्त्रीला मातेसमान किंवा बहिणीसमान मानले पाहिजे असं काही कायदा सांगत नाही. परंतु भारतीय संस्कृतीने सांगितलेली नीतीमूल्ये आचरणात आणायची ठरवली तर आपल्याला सुरुवात तिथूनच करावी लागेल. असे झाले तर अनेक अनर्थ टळतील.

नीती म्हणजे आचरणातील सुसंगती. सज्जनांनी घालून दिलेल्या मार्गावर वाटचाल करणे. आजच्या काळात प्रसारमाध्यमे, सामाजिक वातावरण, स्पर्धेची धडपड या सर्वांचा परिणाम मनावर होत असतो. कधी कधी अनैतिक मार्गाने यश मिळताना दिसते. मग मन म्हणते, “ मीच कशाला चांगले वागू? माझ्यामुळे असा काय फरक पडणार आहे? ” पण समाजाचा पाया हा प्रत्येकाच्या व्यक्तिगत नीतीवर उभा असतो. आपला छोटा तडजोडीचा निर्णयही मोठ्या अध:पतनाची सुरुवात ठरू शकतो.

या श्लोकात समर्थ पुढे म्हणतात, “मना अंतरी सार विचार राहो. ” सार म्हणजे जे खरे, टिकाऊ, मूल्याधिष्ठित आहे ते.

.. क्षणिक लाभ, राग, द्वेष, मत्सर—हे असार.

.. प्रेम, करुणा, प्रामाणिकपणा, संयम—हे सार.

आपली वाटचाल प्रेयसकडून श्रेयसकडे व्हावी, हीच समर्थांची अपेक्षा आहे. मोठ्या प्रतिज्ञेपेक्षा छोटा पण सातत्यपूर्ण प्रयत्न अधिक प्रभावी असतो. मनावर कठोर बंधने लादण्यापेक्षा छोट्या, पाळता येतील अशा नियमांनी सुरुवात केली तर संस्कार हळूहळू दृढ होतात. श्रेयसाचा मार्ग हा टप्प्याटप्प्याने चालायचा असतो. मन जसे घडवू, तसे जीवन घडते. म्हणूनच समर्थांचे हे आवाहन केवळ उपदेश नाही; ती अंतःकरण शुद्धीची दिशा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःशी थोडा संवाद साधू या.

स्वसंवाद

  • माझ्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना मी ओळखून त्यांच्यावर संयम ठेवतो का?
  • तात्कालिक फायद्यासाठी मी कधी माझ्या मूल्यांशी तडजोड करतो का?
  • माझ्या निर्णयांत श्रेयस अधिक आहे की प्रेयस?
  • ‘सार विचार’ मनात टिकून राहावेत यासाठी मी रोज काय करतो?

– – क्रमशः श्लोक ३ आणि ४. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “घर म्हणजे काय?” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “घर म्हणजे काय?” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

जे घर हौसेने बांधलेले असते

त्याला.. HOUSE.. म्हणतात.

*

ज्या घरात होम हवन चालतात

त्याला.. HOME.. म्हणतात.

*

ज्या घरात हवा खेळती असते

त्याला.. HAVELI.. म्हणतात.

*

ज्या घरात भिंतीला कान असतात

त्याला.. MAKAN.. म्हणतात.

*

ज्या घरात माणसांचे हाल होतात

त्याला.. MAHAL.. म्हणतात.

*

ज्या घरात झोप चांगली येते

त्याला.. ZOPADI.. म्हणतात.

आणि

ज्या घराचे हप्ते

फेडून – फेडून

लोक आडवे होतात

त्याला.. FLAT.. म्हणतात.

* * * *

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आपण असे का वागतो?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “आपण असे का वागतो?☆ श्री जगदीश काबरे ☆

माणसाचे सामाजिक वर्तन हे त्याच्या संस्कारांचे, परंपरांचे, भीतीच्या आणि स्वीकाराच्या अपेक्षांचे मिश्रण असते. अनेकदा आपण अनुभवतो की आपल्या आसपास असे मित्र, सहकारी किंवा नातेवाईक असतात की जे स्पष्ट बोलायला घाबरतात. त्यांना एखादे काम सांगितले असता ते आवर्जून “हो बघतो”, “हो करतो”, “नक्की करतो”, असे शब्द उच्चारतात; पण प्रत्यक्षात ते काम करतच नाहीत. ही घटना अनेकांच्या जीवनात इतकी वारंवार घडते की ती एक सामान्य ’सामाजिक पॅटर्न’ बनली आहे. या पॅटर्नचा अभ्यास केला तर त्यामागे केवळ व्यक्तीगत स्वभाव नसून खोल सांस्कृतिक आणि मानसिक संरचना दिसते. “सत्यम् ब्रूयात् प्रियं ब्रूयात्” या संस्कारांनी हीच मानसिकता बळकट केली आहे. सत्य बोला, पण तेही प्रिय असले पाहिजे, ही अपेक्षा चांगली असली तरी तिचा अनपेक्षित परिणाम असा होतो की माणूस अप्रिय सत्य टाळायला लागतो आणि अखेरीस बोटचेपणा किंवा लोकांना न दुखावण्याच्या वर्तनाची एक प्रमुख खूण बनते.

भारतीय संस्कृतीत सहिष्णुता, नम्रता, इतरांना न दुखावणे, सुसंवाद राखणे यांना प्रचंड महत्त्व दिले गेले आहे. हे मूल्य समाज टिकवण्यासाठी नक्कीच आवश्यक असले तरी त्यांचा अतिरेक झाल्यास माणूस स्वतःची भूमिका, मत किंवा नकार व्यक्त करताना त्याला असुरक्षित वाटायला लागते. “नाही” म्हणणे म्हणजे उद्धटपणा, रूक्षपणा, अनादर किंवा असामाजिकता, अशी एक समजूत पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात बसवली गेली आहे. त्यामुळे लोक “नाही” म्हणण्यापेक्षा “हो” म्हणतात आणि नंतर दुर्लक्ष करतात. हा प्रकार केवळ व्यक्तीगत संबंधांमध्येच नाही, तर कार्यालयीन कामकाजात, सार्वजनिक ठिकाणी, प्रशासनात आणि राजकीय जीवनातही दिसतो. वरवर पाहता सौम्य वाटणारी ही मानसिकता प्रत्यक्षात मोठ्या सामाजिक समस्यांना जन्म देते. जे करायचे नाही, तेही “हो” म्हणणे म्हणजे गैरसमज, चुकीची अपेक्षा वाढवणे आणि परस्पर अविश्वास निर्माण करणे. हीच परिस्थिती पुढे नात्यातील ताण, मित्रांमधील नाराजी किंवा कार्यक्षेत्रातील काम प्रभावीपणे न करण्यात परिवर्तित होते.

बोटचेपणा म्हणजे व्यक्तीचे स्वतःचे मत, निर्णय किंवा स्वभाव लपवत, फक्त समोरच्याला भावेल असेच बोलणे. यातून खरी संवाद प्रक्रिया अगदी बिघडण्याचा सांभाव असतो. समाजशास्त्र सांगते की संवाद जितका अस्पष्ट तितका गैरसमज निर्माण होण्याची शक्यता अधिक. आपण एखाद्याला काम सांगतो तेव्हा आपल्याला हवे असते उत्तर –ते काम शक्य आहे की नाही. परंतु समोरचा माणूस स्पष्टपणे नकार देत नाही, कारण त्याच्या मते नकार देणे म्हणजे संबंध बिघडवणे. म्हणून तो “करतो”, “बघतो”, “थोडा वेळ दे” असे शब्द वापरून दुसऱ्याच्या अपेक्षा जिवंत ठेवतो. हे उत्तर ऐकणाऱ्याला सुखकारक वाटले तरी नंतर काम न केल्यामुळे गैरसमज वाढण्याची शक्यता असते. परिणामी, काम न झाल्यावर निराशा आणि नाराजी वाढते आणि त्या व्यक्तीला पुन्हा काम न सांगण्याचा सांगण्याचा निर्णय घेतला जातो. विश्वास तुटणे हे बोटचेपणाच्या सर्वात गंभीर परिणामांपैकी एक आहे.

या मानसिकतेच्या सामाजिक मूळांचा अभ्यास केला तर सर्वप्रथम लक्ष जाते ते संस्कारांकडे. भारतात घरात, शाळेत आणि समाजात ज्या प्रकारे मुलांचे संस्कार होतात त्यात “नकार देणे चुकीचे आहे” असा भाव अगदी खोल रुजवला जातो. मुलांनी मोठ्यांना “हो” म्हटले पाहिजे, शिक्षकांनी सांगितले तसे वागले पाहिजे, घरी पालकांच्या निर्णयांवर प्रश्न विचारू नये, नम्रता दाखवावी, रागावू नये, गैरसोय होईल असे काही बोलू नये, अशा अनेक सूक्ष्म अपेक्षा त्यामागे असतात. या प्रक्रियेतून वाढणारे मूल आत्मविश्वासाने “हे मला जमत नाही”, “हे मी करू शकत नाही”, किंवा “हे मला मान्य नाही” असे बोलण्याची हिम्मत दाखवूच शकत नाही. भीडस्त स्वभाव वाढल्यामुळे मोठेपणी एखाद्या कामाला नकार द्यायचा असेल तरी त्याला ते कठीण जाते. तो विषम परिस्थितीला सामोरे जाण्यापेक्षा बोटचेपणा स्वीकारतो, कारण त्याच्या मते ते अधिक सुरक्षित असते.

समाजशास्त्रात ’संघर्ष टाळण्याची संस्कृती’ अशी एक संकल्पना आहे. भारतीय सामूहिक जीवन हा या संस्कृतीचा एक प्रमुख नमुना म्हणायला हवा. कारण आपल्यात उघड संघर्ष टाळण्याची प्रवृत्ती इतकी प्रबळ आहे की लोक सत्य बोलण्यापेक्षा शांत राहणे किंवा आनंददायी प्रतिसाद देणे पसंत करतात. एखाद्याने सांगितलेले काम नक्कीच नकोसे असू शकते, वेळ नसेल, कौशल्य कमी असेल, किंवा मनात इच्छा नसेल पण या सगळ्यांपेक्षा संघर्ष नको हा भाव जास्त महत्त्वाचा ठरतो. मैत्री, नातेसंबंध किंवा सहकार्यातील सौहार्द टिकवण्याची भीती वाटणाऱ्या व्यक्तीचा खोटे आश्वासन देण्याकडे कल वाढतो. परंतु या संस्कृतीचे दुष्परिणाम बहुआयामी आहेत. सर्वप्रथम, व्यक्ती स्वतःच्या मर्यादा मान्य करण्याची सवय गमावते. ती स्वतःच्या क्षमता, वेळ, प्राधान्ये किंवा आवडीनिवडींचा विचार न करता प्रत्येक गोष्टीला “हो” म्हणते. त्यामुळे तिच्यावर अनावश्यक भार वाढतो. ती दिलेल्या शब्दांवर ती ठाम राहू शकत नाही, कारण सुरुवातीपासूनच ते शब्द वास्तविकतेवर आधारलेले नसतात. दुसरे म्हणजे, इतरांच्या दृष्टीने तिची प्रतिमा हळूहळू अविश्वसनीय, ढिसाळ, किंवा दुटप्पी बनते. जेव्हा एखादा माणूस वारंवार “हो” सांगून काम करत नाही तेव्हा लोक त्याला गंभीरपणे घेत नाहीत. त्याचे वचन, आश्वासन किंवा बोलणे यांचे मूल्य कमी होते. कार्यक्षेत्रात ही मानसिकता अधिक गंभीर बनते. भारतीय कार्यालयीन संस्कृतीत सांगितलेली कामे स्वीकारण्याचा दबाव असतो. येथेही सरळ “हे माझ्याकडून होणार नाही” असे सांगितले जात नाही. कारण करिअर वर डाग लागण्याची भीती असते. म्हणून कोणीही नकार देत नाही, पण कार्याची गती मंदावते, जबाबदाऱ्या ढकलल्या जातात, शेवटच्या क्षणी सबबी दिल्या जातात. यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो. व्यवस्थित संवादाअभावी प्रकल्प अर्धवट राहतात आणि संस्थेत इतरांना दोष देण्याची प्रवृत्ती वाढते. सामूहिक कामकाजासाठी स्पष्ट संवाद ही पहिली अट असते; बोटचेपणा हा संवादाचा सर्वात मोठा शत्रू असतो.

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर “नाही” म्हणू न शकणाऱ्या लोकांमध्ये अपराधगंड प्रबळ असतो. नकार दिल्यास समोरचा दुखावेल, रागावेल किंवा आपल्याबद्दल नकारात्मक विचार करेल अशी भीती वाटते. ही भीती त्यांना स्वतःच्या प्रतिमेबद्दल अतिसंवेदनशील बनवते. ते “चांगले व्यक्ती” दिसण्याची इच्छा ठेवतात. त्यांच्या मते जे लोक स्पष्टपणे नकार देतात ते उद्धट, हट्टी किंवा कठोर असतात. त्यामुळे ते कोणत्याही नात्यात स्वतःची जागा स्पष्टपणे व्यक्त करत नाहीत. परंतु दीर्घकाळात हीच प्रवृत्ती मानसिक ताण वाढवते. सतत लोकांशी गोड बोलत राहणे म्हणजे स्वतःची इच्छा, वेळ आणि ऊर्जेचा अपव्य करणे होय. त्यामुळे अशा लोकांत चिंता, निराशा निर्माण होताना दिसते.

सामाजिक पातळीवर बघितले तर “अप्रिय सत्य” बोलण्याची भीती आपल्याला आपली संस्कृती व्यक्तीगत स्वातंत्र्याला प्रोत्साहन देते की दडपते, या प्रश्नाचे द्वंद्व आपल्या मनात उभे करते. स्पष्टपणा, प्रामाणिक संवाद, आणि नकार देण्याची क्षमता या गोष्टी कोणत्याही निरोगी समाजासाठी अत्यावश्यक असतात. परंतु जिथे कधीही नकार देऊ नये, तडजोड करावीच, सौहार्द राखणेच महत्वाचे अशी मानसिकता असते तिथे समाज बाहेरून शांत वाटला तरी आतून अस्वस्थ असतो. असा समाज दुटप्पी, दाम्भीक बनतो. संबंधांमध्ये आंतरिक प्रामाणिकता नसते. लोक एकमेकांना खरेपणे ओळखू शकत नाहीत, कारण ते मुखवटे धारण करून खऱ्या भावना लपवून ठेवत असतात. परिणामी, संबंध वरवरचेच राहतात. जर आपल्याला सामाजिकदृष्ट्या प्रामाणिकपणा वाढवायचा असेल तर प्रथम “नाही” म्हणण्याच्या संस्कृतीला स्वीकारले पाहिजे. “नकार देणे म्हणजे नातं तोडणे नाही”, हे लोकांच्या मनात ठसवले पाहिजे. नकार देणारी व्यक्ती प्रामाणिक असते, कारण ती आपली क्षमता आणि मर्यादा स्पष्टपणे सांगते. यामुळे त्याचे शब्द विश्वासार्ह असतात. उलट, सतत “हो” म्हणणारी व्यक्तीच अविश्वसनीय ठरते. म्हणूनच, सामाजिक विश्वास टिकवण्यासाठी “नाही” हा शब्द आपल्याला अपमानित करणारा वाटता कामा नये. कारण “हो” आणि “नाही” या दोन शब्दांमध्येच संवादाची मूलभूत रचना असते. दोन्ही शब्द आवश्यक.

म्हणून “सत्यम् ब्रूयात् प्रियं ब्रूयात्” या वाक्याचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. सत्य प्रिय असावे—होय. पण “प्रिय नसल्यास सत्य बोलू नये” हा अर्थ काढणे चुकीचे आहे. सत्याने प्रिय होणे म्हणजे सत्य सांगण्याची पद्धत विनम्र असावी. म्हणजेच सत्य लपवू नका, पण ते अप्रिय असले तरीही सत्य सांगायला कचरू नका. समाजात सत्य बोलण्याला प्रोत्साहन देताना त्याची पद्धत सौम्य ठेवणे हा मूळ उद्देश आहेच, परंतु याचा अर्थ असा नाही की अप्रिय सत्य सांगूच नये. पण संस्कृतीने प्रिय सत्यच सांगा असाच संस्कार रुजवला आणि व्यक्तीला सामाजिक दबाव सहन करावा लागला. म्हणून भारतीय समाजात “नकार” हा शब्द सामाजिक भीतीचा केंद्रबिंदू झाला आहे. कुणाला दुखावण्याची, कुणाकडून अवहेलना होण्याची, कुणीकडून नाते तुटण्याची किंवा स्वतःला वाईट ठरवले जाण्याची भीती लोकांना “हो” म्हटण्यास भाग पाडते. ही मानसिकता बदलायची असेल तर शैक्षणिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर आणि सामाजात संवाद कौशल्याची नव्याने मांडणी करणे गरजेचे आहे. मुलांना “हो” आणि “नाही” दोन्ही शब्द योग्य ठिकाणी कसे वापरायचे हे शिकवणे आवश्यक आहे. “नाही” म्हणणाऱ्या व्यक्तीला समाजाने दोष देणे बंद केले पाहिजे. उलट, त्याच्या प्रामाणिकतेचा सन्मान करायला हवा. याशिवाय, काम स्वीकारताना लोकांनी स्वतःच्या क्षमतांचा आणि वेळेचा तर्कसंगत विचार करणे आवश्यक आहे. नकार देणे कठीण वाटले तरी त्याचे दीर्घकालीन फायदे अधिक असतात. सामाजिक प्रामाणिकता वाढते, काम व्यवस्थित विभागले जाते, आणि अपेक्षा स्पष्ट राहतात. अशा संवादामुळे गैरसमज कमी होतात आणि नात्यांमध्ये पारदर्शकता वाढते.

शेवटी, “नाही” म्हणण्याची क्षमता असणे ही सामाज प्रगल्भ झाल्याची खूण आहे. जिथे लोक एकमेकांशी स्पष्टपणे व्यक्त होतात आणि तसे वागतात तिथे संबंध टिकाऊ बनतात, कामकाज अधिक परिणामकारक होते आणि व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो. बोटचेपणा माणसाला वरवर चांगला वाटतो, पण वास्तवात तो स्वतःलाही आणि इतरांनाही हानीकारक असतो. एखाद्या कामाला नकार देणे हे चुकीचे नाही तर ते प्रामाणिकपणाचे धैर्य आहे. सत्य सांगणे आणि नको असलेले टाळणे यात संतुलन साधल्याशिवाय समाज निरोगी बनू शकत नाही. “प्रिय सत्य” ही संकल्पना योग्य आहे, पण “अप्रिय सत्य” टाळणे ही सामाजिक चूक आहे. म्हणूनच, स्पष्टपणे “नाही” म्हणणे ही परस्परातील संबंध पारदर्शक ठेवण्यासाठी आवश्यक असणारी कृती आहे.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares