सुमारे ४० वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या सावळाराम अधिकारी या गुरुजींनी आपल्या साकुर्ली गावाच्या जवळील ओसाड माळरानाला हिरवेगार करण्याचे स्वप्न पाहिले आणि आजचे मोहरान अस्तित्वात आले. मोहरान (Mohraan) हे ठाणे जिल्ह्यातील शहापूरपासून ३५ किमी अतंरावर असलेले एक नैसर्गिक कृषी-पर्यटन केंद्र व फार्मस्टे / फूड फॉरेस्टचा अनुभव देणारे नयनरम्य स्थळ आहे. सात एकर परिसरात वसलेले हे मोहरान म्हणजे एक नैसर्गिक बेट आहे. वरून वाहत आलेल्या ओढ्याचे येथे दोन भाग होतात. हे दोन्ही भाग मोहरानाला अर्धवर्तुळाकार वळसा घालून पुन्हा एकत्र येतात आणि ओढा पुढे वाहू लागतो. अशा प्रकारे हे एक बेट तयार झालेले आहे. जणू काही एखाद्या किल्ल्याच्या भोवतीचा संरक्षक खंदकच! इथे पर्यटक निसर्ग, शेती आणि शहरी जीवनशैली यांचा अनोखा एकत्रित अनुभव घेऊ शकतात. हे केंद्र परंपरागत शेती आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा आदर्श वास्तुपाठ आहे. हे फ़ूड फ़ॉरेस्ट म्हणून ओळखले जाते. येथे वनासारखी विविध प्रकारची झाडे-झुडूपे रुजलेली असल्यामुळे जमिनीत जैविक साखळी आणि पर्यावरणाची समृद्धी दिसून येते. हा मोहरानचा परिसर सोडला तर पलीकडचा विस्तीर्ण प्रदेश हा तसा ओसाडच आहे. मध्येच एवढे एकच बेट वाळवंटातील ओएसिससारखे हिरवागार दिसते आणि नजरेचा सुखावते. ही किमया साधली आहे पर्यावरण प्रेमी असलेल्या कष्टाळू अधिकारी कुटुंबाने!
अर्थात ही समृद्धी येण्यासाठी अधिकारी गुरुजींबरोबरच त्यांची जुळी दोन मुले समीर आणि सचिन यांचेही तेवढेच कष्ट आहेत. या दोघांनाही परिपूर्ण साथ दिली आहे ती त्यांच्या सहचारणी तनुजा आणि श्रद्धा या दोघींनी. समीर आणि सचिन दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. त्यांचा हा व्यवसाय ते मोहरान इथूनच हाताळतात. त्यामुळे त्यांना 24 तास मोहरानमध्ये वेळ देता येतो. समीर हा तर जातिवंत शेतकरी असल्यासारखा आहे. त्याचा वृक्ष व वनस्पतींच्या संबंधीचा अभ्यास एवढा गाढा आहे की वनस्पतींचे वेगवेगळे औषधी उपयोग, ती वनस्पती खाण्यायोग्य आहे की नाही, तिच्यामुळे पर्यावरण कसे राखले जाते, अशा अनेक गोष्टींची तो रसाळ माहिती देत असतो. संपूर्ण परिसर नैसर्गिक पर्यावरण समृद्ध असल्यामुळे ते लागवडीचे वन असले तरी नैसर्गिक जंगल वाटते.
मोहरानची नैसर्गिक संपदा अत्यंत समृद्ध आणि जैवविविधतेने परिपूर्ण आहे. येथे शेकडो प्रकारच्या वनस्पती, फुले, वृक्ष, जिवाणू, कीटक, पक्षी, प्राणी, फुलपाखरे आणि किटकांसारखे अनेक सूक्ष्मजीव एकत्र राहतात. या फूड फॉरेस्टमध्ये रासायनिक खत किंवा कीटकनाशकांचा वापर नसल्याने जमीन निरोगी आणि सकस आहे. त्यामुळे जीवसृष्टीचे सजीव चक्र कायम राहते. पर्यटकांना या परिसरात फेरफटका मारताना विविध वनस्पती आणि त्यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करण्याची संधी मिळते, तसेच नैसर्गिक शेती आणि पर्माकल्चरबद्दल तसेच पर्यावरणपूरक शेतीच्या पद्धतींबद्दल येथे माहिती दिली जाते. पर्माकल्चर (Permaculture) म्हणजे निसर्गाशी सुसंगत, स्वयंपूर्ण आणि शाश्वत शेती तसेच जीवनशैली होय. ‘Permanent Agriculture’ (कायमस्वरूपी शेती) आणि ‘Permanent Culture’ (कायमस्वरूपी संस्कृती) या शब्दासमुहाचा एक शब्द ‘पर्माकल्चर’ असा तयार झाला आहे. यात नैसर्गिक परिसंस्थेचे अनुकरण करून पीक विविधता, मातीचे आरोग्य आणि जैवविविधता टिकवून कमी खर्चात शाश्वत उत्पादन घेण्यावर भर दिला जातो. असो.
मोहरान केंद्राला सांभाळणाऱ्या लोकांचे कष्ट आणि त्यांचा अनुभव अतिशय प्रेरणादायी आहे. या मोहरान फार्ममुळे अधिकारी कुटुंबाने स्थानिकांना रोजगारही मिळवून दिलेला आहे. त्यांचे या फार्मचा विकास आणि निगा राखण्यामागील प्रयत्न अनेक दशकांचे आहेत. सुमारे चार दशकांच्या मेहनतीने हे केंद्र आजच्या स्वरूपात आलं आहे. येथे काम करणारे स्थानिक शेतकरी आणि तंत्रज्ञ पारंपरिक ज्ञान, पर्यावरणीय तत्त्वे आणि नव-उद्यमशीलता यांचा संगम साधून येथे विविध पिके लावतात, निसर्गसंवर्धनाची काळजी घेतात आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पादनांचा उपयोग ताज्या, नैसर्गिक आहारासाठी करतात. पाहुण्यांना फक्त पाहणेच नव्हे तर शेतात सहभागी होणे, पिके लावणे, काढणे आणि व्यवस्थापनाची पद्धत समजून घेणे यांसारख्या अनुभवात्मक कामांमध्ये समाविष्ट करण्यात येते.
येथे येणाऱ्या लोकांना विविध प्राकृत अनुभव घेता यावा म्हणून केवळ शेती व बागकामच नाही, तर वन्यजीवन, पक्षी निरीक्षण, ट्रेकिंग, सायकलिंग, नदीत पोहणे, कायकिंग करणे असे आनंददायी अनुभवही घेता येतात. हे अनुभव झाडे, फुले, फळॆ प्राणी आणि पक्षांचे जीवन असे निसर्गाशी निगडित असल्यामुळे हे केंद्र फक्त पर्यटन स्थळ रहात नसून, निसर्गाशी आपल्याला मनापासून तादात्म्य पावण्यासाठी निर्मिलेली जागा आहे, असे वाटल्याशिवाय राहत नाही. या केंद्रात शेतीतून मिळणारी नैसर्गिक अन्नधान्ये, विविध फळे, भाज्या व श्रम-आधारित पदार्थ वापरले जातात आणि पर्यटकांना अन्नाची खरी परंपरा आणि जीवनातील ताजेपणा यांचा अनुभव येथे दिला जातो. मोहरान ही एक अशी जागा आहे जिथे मानवी कष्ट, निसर्गाची संपदा आणि पर्यावरणपूरक कृषि संदेश हे सगळे एका आत्मीय अनुभवात मिसळलेले आहेत, आणि पर्यटकांना तो अनुभव त्यांच्या आयुष्यात खोलवर जाणवतो. या फार्ममध्ये मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याचे ‘मोहरान’ हे नाव सार्थ ठरते. त्यामुळेच नेहमीच्या धावपळीच्या जीवनातून चार क्षण विश्रांती मिळावी म्हणून येथे पर्यटकांना पुन:पुन्हा यावेसे वाटते. येथील निसर्गात राममाण होत शुद्ध हवेचा श्वास घेत पुन्हा तावेतवाने होऊन पर्यटक परत जातात. यातच मोहरानचे यश सामावलेले आहे.
येथे पर्यटकांसाठी कॅम्पिंग तंबू आहेत तसेच आरामदायी कॉटेजेस सुद्धा. शहरी पर्यटकांना सुखावणाऱ्या पंचतारांकित व्यवस्था या दोन्ही ठिकाणी त्यांना उपलब्ध आहेत. येथील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गंमत म्हणजे रानातील दगडांना स्वच्छ करून त्यावर विविध प्रकारची चित्रे काढून ती चित्रेशिल्पे पूर्ण परिसरभर विखरून ठेवलेली आहेत. त्यामुळे परिसराला एक वेगळीच शोभा आलेली आहे. मला किचनच्या बाहेरील बागेत सकाळची न्याहारी करताना असेच एक चित्रशिल्प नजरेस पडले आणि आवाक झालो. काय होते ते सांगून तुम्हाला आश्चर्य वाटेल. किचनच्या भिंतीतून काळ्या रंगाचा इलेक्ट्रिक केबल असलेला पाईप बाहेर पडलेला होता. त्याच्या तळाशी एक झाडाची कुंडी होती, त्यामुळे तळाकडचा पाईप दिसत नव्हता. पण तरी वरचा भाग उघडाच होता. मग तो जिथून भिंतीतून बाहेर पडलाय तिथे सापाच्या तोंडाचे चित्र काढले. त्यामुळे एक काळा साप तिथे फणा काढून उभा आहे असे दिसू लागले. (छायाचित्र पहा) किती प्रत्ययकारी सौंदर्यदृष्टी आहे ही!
असे म्हणतात, माणसाला आनंदी ठेवायचा मार्ग त्याच्या पोटातून जातो, ते मोहरानमध्ये अक्षरशः खरे ठरते. कारण शाकाहारी असो वा मांसाहारी, जेवणाची अस्सल गावरान चव अनुभवावी तर इथेच. पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या अन्नधान्याचा वापर या जेवणात केलेला असतो. थोडक्यात, समृद्ध पर्यावरणाशी नाते जोडायचे असेल तर मोहरानसारखे दुसरे उत्तम ठिकाण नाही. ज्यांना शरीर आणि मनाला ताजा तंदुरुस्त करणारा अनुभव घ्यावयाचा असेल त्यांनी Mohraan Farmstay – Near Mumbai, Nashik and Pune https://share. google/BIo2XYFnVX0mzWXGK या वेबसाईटवर त्यांच्याशी संपर्क साधावा.
☆ ‘तंत्रज्ञानाचा असाही उपयोग…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
☆
अक्षय हा एक आयटी इंजिनिअर. पुण्याच्या हिंजवडी भागात राहायचा. त्याचा स्वभाव असा होता की, कुठेही अन्याय झाला की त्याला राग यायचा.
अक्षयच्या ऑफिसच्या खाली एक म्हातारी आजी, ‘सकुबाई’, भाजी विकायला बसायच्या. त्यांचं वय ७० च्या घरात होतं, पण तरीही त्या ताजी भाजी विकायच्या.
अक्षय नेहमी त्यांच्याकडून भाजी घ्यायचा. पण त्याला एक गोष्ट खटकायची.
जेव्हा कधी अक्षय पेमेंट करायला फोन काढायचा, तेव्हा आजी गळ्यात लटकवलेला एक ‘QR Code’ पुढे करायच्या.
अक्षयने स्कॅन केल्यावर त्यावर नाव यायचं – “जीवन हॉस्पिटल ट्रस्ट”.
अक्षयला शंका यायची. ‘एखाद्या भाजीवालीच्या खात्याचं नाव हॉस्पिटलच्या नावाने कसं असू शकतं? ‘
त्याला वाटलं, नक्कीच एखादा दलाल किंवा एजंट या आजीला फसवतोय. तिच्या कमाईचे पैसे परस्पर हॉस्पिटल किंवा ट्रस्टच्या नावाखाली लाटतोय आणि या अडाणी म्हातारीला काहीच समजत नाहीये.
एका संध्याकाळी अक्षयला राहवलं नाही. त्याने भाजी घेतली आणि स्कॅन करताना पुन्हा तेच नाव आलं.
अक्षय चिडला. तो आजींना म्हणाला, “आजी, तुम्हाला समजतं का? हा कोड तुमचा नाहीये. तुमचे पैसे कोणा दुसऱ्यालाच जातायत. कोण आहे हा एजंट? का त्याला पैसे देताय? “
सकुबाई घाबरल्या. त्या म्हणाल्या, “नाही बाळा… एजंट नाहीये कोणी. तू पेमेंट कर ना बाबा. “
अक्षय म्हणाला, “नाही, मी करणार नाही. जोपर्यंत तुम्ही मला खरं सांगत नाही, की हा ‘घोटाळा’ काय आहे, तोपर्यंत मी तुम्हाला एक रुपया देणार नाही. आणि उद्या पोलिसात तक्रार करेन की एक म्हातारी फसवली जातेय. “
‘पोलीस’ शब्द ऐकताच सकुबाईंच्या हातातली भाजी खाली पडली. त्या रडू लागल्या.
त्या म्हणाल्या, “नको रे बाबा… पोलिसात नको जाऊस. सांगते तुला खरं. “
सकुबाईंनी पदराने डोळे पुसले आणि म्हणाल्या,
“बाळा, हा कोड माझा नाही, आणि पैसे मला मिळतही नाहीत. हा कोड समोरच्या ‘जीवन हॉस्पिटल’ च्या अकाउंटचा आहे. “
अक्षय गोंधळला. “पण का? तुम्ही दिवसभर उन्हात बसून कष्ट करता, आणि पैसे हॉस्पिटलला का? “
सकुबाई म्हणाल्या, “माझा ६ वर्षांचा नातू आहे, ‘मनू’. त्याचे आई-बाप कोरोनात वारले. तेव्हापासून तो माझ्याच जवळ आहे.
सहा महिन्यांपूर्वी त्याचे दोन्ही किडनी निकामी (Kidney Fail) झाल्या. त्याला आठवड्यातून दोनदा डायलिसिस करावं लागतं.
माझ्याकडे पैसे नाहीत रे बाळा. मी डॉक्टरांच्या पाया पडले.
तेव्हा तिथल्या एका चांगल्या डॉक्टरने सांगितलं की, ‘आजी, उपचाराचा खर्च ट्रस्ट करेल, पण औषधांचा खर्च तुला करावा लागेल. ‘
त्यांनीच मला हा बोर्ड बनवून दिला. मी गिऱ्हाईकाला सांगते की यावर पैसे टाका. जेवढे पैसे या कोडवर जमा होतात, ते थेट हॉस्पिटलला जातात आणि त्यातून माझ्या नातवाची औषधं येतात.
माझं काय रे? मी दिवसभर एक वडापाव खाऊन जगू शकते. पण जर मी रोख पैसे घेतले, तर कदाचित मला भुकेचा मोह होईल आणि मी ते पैसे खाण्यावर खर्च करेन. म्हणून मी ठरवलंय… हातात पैसा घ्यायचाच नाही. जे येईल ते थेट नातवाच्या जिवासाठी जाईल. “
हे ऐकून अक्षय सुन्न झाला.
त्याला वाटत होतं की आजी फसवल्या जात आहेत, पण इथे तर त्या एखाद्या ‘योद्ध्यासारख्या’ लढत होत्या. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन, पैशाला स्पर्शही न करता त्या फक्त एका QR कोडच्या भरवशावर नातवाचा जीव वाचवत होत्या.
अक्षयने शांतपणे आपला फोन खिशात ठेवला.
त्याने आजींना विचारलं, “आजी, नातवाचं पूर्ण ऑपरेशन करायला किती खर्च येईल? “
आजी म्हणाल्या, “डॉक्टर म्हणालेत ५ लाख लागतील. आतापर्यंत १० हजार जमा झालेत. मरेपर्यंत जमवेन, पण नातवाला वाचवेन. “
अक्षयने त्याच क्षणी आपल्या ऑफिसच्या ग्रुपवर आणि मित्रांना हा प्रसंग मेसेज केला. आजींचा फोटो आणि तो QR कोड व्हायरल केला.
पुढच्या २४ तासांत, त्या QR कोडवर ५ लाख नाही, तर १५ लाख रुपये जमा झाले.
दुसऱ्या दिवशी अक्षय जेव्हा भाजी घ्यायला गेला, तेव्हा आजी तिथे नव्हत्या.
त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. मनूच्या ऑपरेशनची तयारी चालू होती. अक्षय तिथे गेला. त्याला बघताच सकुबाईंनी त्याचे पाय धरले.
“बाळा, तू देवदूत बनून आलास. आज माझ्या नातवाला नवीन आयुष्य मिळालं. “
अक्षयने आजींना उठवलं आणि म्हणाला, “आजी, देवदूत मी नाही, तुम्ही आहात. ज्यांनी शिकवलं की, तंत्रज्ञान (Technology) फक्त चॅटिंगसाठी नाही, तर कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी सुद्धा वापरता येतं. “
आपण अनेकदा समोरच्या गोष्टी बघून चुकीचे अंदाज (Judge) लावतो. पण त्यामागे एक मोठं सत्य असू शकतं. तंत्रज्ञानाचा वापर जर चांगल्या मनाने केला, तर एका क्लिकवर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. मदत करायला खिसा नाही, मन श्रीमंत असावं लागतं.
*
लेखक: अज्ञात
प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
भारतीयांची पवित्र नदी गंगा. अलकनंदा आणि मंदाकिनी गंगेच्या उपनद्या आहेत. दोन्हींच्या संगमानंतर गंगा म्हणून पुढे वाहते. अलकनंदा आणि मंदाकिनी या बहिणी बहिणी. पृथ्वीवरच्या उत्तरांचलच्या देवभूमीतून वाहणाऱ्या. आता यांच्या नावाना आपल्या आकाशगंगेत स्थान मिळाले आहे. ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सध्या आपण जी आकाशगंगा पाहतो तिला ‘मंदाकिनी’ म्हणतात. आता शास्त्रज्ञांनी नवीन आकाशगंगेचा शोध लावला. तिला ‘अलकनंदा’ नाव दिले आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे हा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावला. आकाशगंगेच्या रचनेवर संशोधन करणारी पीएचडीची विद्यार्थ्यांनी राशी जैन हिने तिचे वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्राध्यापक योगेश वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले. दोन डिसेंबर २५ ला हे प्रसारित झाले.
२७००आकाशगंगा म्हणजेच दीर्घिकांचा अभ्यास करून ही पूर्ण विकसित दीर्घिका शोधली. वैशिष्ट्य म्हणजे विश्वाचे वय फक्त दीड अब्ज कोटी वर्षे असताना ही पूर्ण विकसित झाली होती. ती आपल्यापासून १२. २ अब्ज प्रकाश वर्षे अंतरावर आहे. सर्पिलाकार भुजा आहेत. खरंतर दीर्घिका पूर्ण विकसित होण्यासाठी दीर्घ कालावधी लागत असताना विश्वाचे वय दहा टक्के असतानाच ही विकसित झाली. ही इतक्या कमी कालावधीत तयार कशी झाली, हेच आश्चर्य. त्यात तारे निर्माण झाले आहेत. ही एक प्रभावी वैश्विक केंद्र आहे. तर यांचे वस्तुमान आपल्या सूर्यमालेच्या दहा अब्ज पट आहे. मध्यभाग फुगीर असून व्यास ३०००प्रकाश वर्षे आहे.
आता याचा अभ्यास हे शास्त्रज्ञाना आव्हान आहे. याची रचना मंदाकिनी सारखीच असल्यामुळे शास्त्रज्ञांनी अलकनंदा नाव दिले. विश्वाच्या बाल्यावस्थेतील हा एक अज्ञात पैलू जगासमोर आला. वैशिष्ट्यपूर्ण अशी ही सर्वात दूरवरची आकाशगंगा, राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र, टाटा मूलभूत केंद्र, पुणे येथे हे संशोधन चालू आहे.
भारतीय शास्त्रज्ञांनी खगोल शास्त्रातील या महत्त्वाच्या शोधातून भारतीय बुद्धिमत्ता आणि कौशल्याचे दर्शन जगाला घडवले. प्राचीन काळातील खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट, वराहमिहीर यांची परंपरा पुढे चालू ठेवली.
पुणे येथील ‘ गाणे मनामनांचे ‘ या संस्थेकडून आजी आजोबांसाठी प्रेमपत्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामधून पाच सर्वोत्तम पत्राची निवड केली जाणार होती. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी माझ्या एका मैत्रिणी च्या भाच्याने मला आग्रह केला आणि माहिती पाठवली. मग मी या स्पर्धेसंबंधी विचार करायला लागले…. प्रेम पत्र तर आजपर्यंत कोणाला लिहिले नाही… त्याचा विचारही केला नाही… विषय अवघड… लेखणी थांबली…! आता काही अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा म्हणून एका गटातील मैत्रीणीला फोन केला… ती म्हणाली, “नाही हो शीला ताई असलं काय नसतंय बघा मी तर कधी लिहिलं नाही” आता अनुभवी लोकांकडून पहिला नकार आला. माझ्या एका मैत्रिणीला… तिचा प्रेम विवाह होता…. तिला विचारलं…. एकाच गावात असल्यामुळे आम्ही कधी पत्र लिहिले नाही… तिने उत्तर दिले. विषय असा होता की ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे अशा कुणालाही तुम्ही पत्र लिहा भावाला बहिणीला आईला देशाला मैत्रिणीला.. प्रेम पत्र म्हणले की प्रेम पत्र हे प्रियकरालाच लिहिले पाहिजे अशी माझी तरी धारणा…. मग मी विचार करून प्रेम पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला… कलावंताला जशा सगळ्या भूमिका निभावता आल्या पाहिजेत तशा लेखकाला कोणत्याही विषयावर लिहिता आले पाहिजे. असे मनाला बजावले आणि प्रेम पत्र लिहायला सुरुवात केली जरा संकोच वाटत होता. ज्याचा कधी तरुण वयात विचार केला नाही ते आता म्हातारपणी विचार करायची वेळ आली…. पण शेवटी स्पर्धा होती त्यातून पाच सर्वोत्तम पत्राची निवड केली जाणार होती..! पारितोषिक हा भाग आता महत्त्वाचा राहिला नाही आता एक्सेप्ट द चॅलेंज हा भाग महत्त्वाचा आहे, किंबहुना आता या विषयापुरता तरी तो वाटला आणि मग लिहायला बसले. पत्रलेखन पूर्ण झाल्यावर अनुभवी माणसांचा थोडा सल्ला घेतला… बरे झाले आहे का? असे विचारले.. काही चुकत तर नाही ना याबद्दल खात्री केली आणि ते स्पर्धेला धाडले……… आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पाच सर्वोत्तम पत्रामध्ये माझ्या पत्राची निवड झाली असा एक मेसेजही फेसबुक वर आला मला आनंद यासाठी झाला की अनुभवातून लिहिणारी मी किंवा अनुभवामुळे लेखन करणारी मी पण या विषयात मात्र प्रचंड कल्पनाशक्तीचा वापर करून मी हे लेखन केले आहे आपल्या ग्रुप वर ते पत्र टाकते आहे वाचा आनंद घ्या त्रुटी असतील तर कळवा म्हणजे पुढे काही स्पर्धा असतील तर सुधारणा करता येतील माझ्या लेखनाला आपले सर्वांचे प्रोत्साहन नेहमीच लाभले आहे त्यातूनच ही प्रगती….!
धन्यवाद! – ते पुरस्कारप्राप्त पत्र असे– – –
प्रिय वसुधा,
लग्नाला 40 वर्षे झाली पण तुला प्रेम पत्र काय साध कार्डही लिहणे जमलं नाही. वसु आपल्यामध्ये व्यक्त होण्याची पद्धतच नाही पण आज मात्र मी ठरवलंय माझ्या मनातलं सगळं तुला सांगायचं… ऐकतेस ना..?
वसु मी पहिल्यांदा तुला पाहायला आलो ना माझ्यासमोर एक वीस वर्षाची लांब सडक केसांची किंचित सावळी टपोऱ्या डोळ्यांची एक गोड मुलगी हातात ट्रे घेऊन आली.. खरं सांगू मी त्याच वेळेला खलास…. मनाने ताबडतोब सांगितलं… “अरे हीच माझी वहिदा” मन गुणगुणायला लागलं… चौधविका चांद हो या आफताब हो.. हृदयात वाजे समथिंग… डोक्यात घंटा वाजायला लागल्या.. मंजुळ सुरेख… माझी पसंती तेव्हाच झाली.
माझ्या तीन खोल्यांच्या घरात निशिकांतची बायको म्हणून तू प्रवेश केलास.. घरात कसला प्रत्येकाच्या मनात प्रवेश केलास. तीन खोल्याचं छोटसं घर सगळं तू आपलं केलं. आईच्या मार्गदर्शनाखाली तू सगळं उत्तम निभावून नेलं. वसु त्या तीन खोल्यात आपल्याला म्हणावा तसा एकांत मिळत नव्हता. मग काय नजरेचे खेळ! जेवायला बसल्यावर मी चटणीचे बोट जिभेवर ठेवून टक् टक् करायचं आणि ओठावर बोट ठेवायचं आई ओरडायची… काय रे आवाज करत जेवतोस… पण तो आपला एक वेगळाच इशारा होता. तू पटकन तोंड लपवून पाठमोरी होऊन हसायचीस. आणि हातावर सुपारी ठेवताना हळूच चिमटा काढायची… मी आई गss असं ओरडायचं.. आई म्हणायची काय रे…? काही नाही ऑफिसला चाललोय… किती रोमँटिक दिवस होते ना!
ऑफिसातून येताना मी तुझ्यासाठी गजरा आणायचो ते कोणाला कळू नये म्हणून देवासाठी मोगरा असलेली फुलपुडी आणायची. मग ते आठ बाय आठच्या खोलीत… खोलीभर तो मोगरा दरवळायचा मग काय…
मी मोगरा माळवतो तुला.. आणि शब्द ओठात घोळतो
शब्द रेंगाळतो जिभेवर.. मौन संवाद साधतो //
प्रेमाचा संवादच आगळा.. देह सारा बोलतो..
शब्दांचे मुके पण तिथे जरी.. भाव संवाद साधतो//
अशी मुक्या संवादाची सुरुवात व्हायची शब्दाच्याही पलीकडची भाषा समजण्याचे आपले प्रेम.. कधी बोलावच लागलं नाही. पण या मोगऱ्या पलीकडे मी तुझी कोणतीच हौस करू शकलो नाही ना?
वसु पण खरं सांगतो माझ्या आयुष्यात तू आलीसआणि तू माझी प्रेरणा झालीस कुणासाठीकाही करून दाखवावं अशी तू एकटी होतीस तुझ्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला पुढे पुढे जात राहिलो आणि मागे तू धावत राहिलीस बिनतक्रार.!
गाण्यातली विशारद तू गाण्याचे क्लास घरी घेताना तुझा रियाज व्हायचं तेवढाच खूप वाटायचा तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपाव तू एखादी सुंदर चीज माझ्यासाठी गात रहावी पण असं आपल्याला हे जमलं नाही ना. कधी चार माणसाच्या घरात असं प्रेम करता येत नाही म्हणतात, खरं आहे ते! मी तुला काही देऊ शकलो नाही पण प्रेम मात्र भरभरून दिल. जागेचा अभाव आणि माणसांची रेलचेल असलेले छोट्या घरात आपले प्रेम मात्र अभावातल्या ऐश्वर्या सारखे वर्धिष्णू झाले मग त्या प्रेमात थोडी असूया आलीच… तुझा मामेभाऊ सुभाष जेव्हा आला आणि तुझ्याशी सुधी सुधी म्हणून बोलायला लागला तेव्हा माझा संताप झाला होता, पण एक दिवसासाठी आला म्हणून गप्प बसलो. तुला आठवतंय त्यावेळेला माझा राजकपूर झाला होता. मी एक गाणं गुणगुणत होतो.. तूम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही तुम किसी गैर को चाहोगी तो मुश्किल होगी…. तो पोपट्या तुझा भाऊ असल्यामुळे तुझा हात धर धरून बसवत होता आणि बोलत होता.. सुधी असं सुधी तसं माझा जरा तोल गेलाच. मी म्हणलं.. “अरे वसुधा नाव आहे तिचं “तो म्हणाला, “चालते हो भाऊजी मी हिला नेहमीच सुधी म्हणायचो” तो गेला तेव्हा मी खूप रागावलो होतो तुझ्यावर आणि तू हसत होतीस. म्हणालीस, ” आज काहीतरी जळलं बाई घरात “तो रुसवा फुगवा दोन दिवस चालला होता आणि मग तू माझ्यासाठी खास विणलेला स्वेटर मला सरप्राईज भेट दिलास त्या स्वेटर पेक्षा तुझ्या प्रेमाची उब होती. प्रेमात मी पुन्हा एकदा न्हाऊन निघालो… सगळा रुसवा गळून गेला फक्त उब शिल्लक. वसु तु मला एक नाव ठेवलं होतं फक्त आपण दोघं असतानाच तू मला हाक मारायची… *निक* निशिकांतचा निक झालो…! आपण पुढे आपल्या मुलांच्या जबाबदाऱ्या आईच आजारपण यात सगळं हरवून गेलो नाही? मग तू मला बाबा म्हणायला लागलीस कारण आता मुलांचा बाबा झालो होतो ना मी…! दिवस भराभर सरले केसातली चांदी गडद झाली. वसु तुला आठवतं आई गेली त्या रात्री मी पार कोलमडलो होतो तिचं सगळं झाल्यानंतर मी एके रात्री तुझ्या मांडीवर डोकं ठेवून हमसून हमसून रडलो होतो तेव्हा तू माझी पत्नी नव्हतीस तर आई झाली होतीस तेव्हा हे वाक्य मला जास्त पटलं की” स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता असते”… अगं किती भूमिका निभवल्यास बायको आई बहीण आणि छान मैत्रीण पण मी मात्र तुला प्रेमाचे दोन शब्द काही मोकळेपणाने बोलू शकलो नव्हतो… पण तुला माझ्या डोळ्यात, स्पर्शात हे बहुदा दिसत असावं म्हणूनच इतक्या समाधानांन माझा संसार मार्गी लावलास… आता तुझे चांदण्याचे हात सखे माझ्या गळा हे असेच निरंतर ठेवशील ना? आता आपण दोघेच… अभी ना जाओ छोडके के दिल अभी भरा नही… आता एकमेकांपासून दूर होणे नाही आता देवानंद नाही आता फक्त तुझा निकी आता इतकंच खरं आहे की हमे तुमसे प्यार कितना हम नही जानते मगर जी नही सकते तुम्हारी बिना हेच खर. खरं तर आपलं प्रेम शब्दात मांडण्याच्या पलीकडे पण जमतील तेवढे शब्द जमवून लिहिले आहेत. वसु खाली माझ्या ओठाचा एक ठसा उमटवलाय त्याच्यावर तुझे ओठ टेकव उरलेलं सगळं माझ्या मनातला आपोआप तुझ्या हृदयात उतरेल करशील ना एवढं….?
☆ “दोनशे साठ रुपयांचे कर्ज…” ☆ डॉ. धनंजय देशपांडे☆
– – जे आजही माझ्या डोक्यावर आहे.
पुण्यात आल्यावर आधी भाड्याच्या घरात होतो, नंतर स्वतःचा फ्लॅट झाला.
ऑफिस देखील आधी भाड्याचे व नंतर स्वतःचे झाले. दोन्ही मालमत्ता अर्थातच कर्ज काढून घेतलेल्या मात्र घराचे हप्ते वेळेवर अन ऑफिसचे तर वेळेपूर्वीच संपवले.
पण तरी मी स्वतःला आजही कर्जमुक्त मानत नाही. त्याचे एक कारण आहे आजही मी आज ही मी दोन माणसांचे मिळून दोनशे साठ रुपये देणे बाकी आहे. त्याचीच हि चित्तरकथा.
घटना आहे १९८८ सालाची. अभिनव चित्रकला महाविद्यालया ची शेवटच्या वर्षाची परीक्षा त्या काळात मुंबईच्या जे. जे. मध्ये व्हायची.
दहा दिवस मुंबईत राहावं लागायच. परीक्षेची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच अशी असली तरी त्यावेळेत तिथं असलंच पाहिजे असं नसायचं.
एकूण दहा दिवसात चार पेपर तुमच्या सोयीने सोडवायचे. त्यामुळे कधी कुणी लेट यायच तर कुणी लवकर संध्याकाळी लवकर जायचे.
दहा दिवसासाठी एकूण खर्च म्हणून अडीचशे रुपये घेऊन पुण्यातून मी मुंबईत गेलेलो. माझ्या मोठ्या भावाचे एक मित्र सायन इथं राहायचे. त्यांच्या घरी माझी सोय त्याने करून दिलेली. तिथून जे. जे. ला रोज जाणे येणे करायचो.
पहिल्या दिवशी लोकल ट्रेनने तिकीट वगैरे काढून व्यवस्थित निघालो. जे. जे. कॉलेजच्या स्टेशन वर उतरलो.
हाताशी थोडा वेळ होता, तर लिंबूसरबत घ्यावे म्हणून तिथल्या गाडीवर गेलो. त्यावेळी काहीतरी तीन रुपयात शरबत मिळायचे. तर पैसे काढून देण्यासाठी खिशात हात घातला अन शॉक बसला. कारण माझा खिसा ट्रेनमध्ये मारला गेला होता.
माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. हातापायात लटलट सुरु झाली. कारण आता पुढचे दहा दिवस जगायचं कस? आता वर्ष वाया जाणार की काय पुन्हा? कोण देणार या मुंबईत मला पैसे? असं सगळं आठवून डोळ्यात पाणीच आलं. काहीच सुचेना.
माझी हि अवस्था त्या सरबतवाल्या भय्याला कळली. त्याने मायेने विचारलं,
‘क्या हुआ बेटा? ’
मला मग अजूनच रडायला येऊ लागलं. भय्याने मग तिथल्या स्टूलवर बसवलं.
आधी साधं पाणी दिलं. मी घटाघटा प्यायलो. त्याला सांगितलं की, ‘ मेरी जेब किसीने काटी है. ’
मी मुंबईत नवीन असल्याचे त्याने ओळखून त्याने इतर चौकशी केली की, कुठून आलास, मुंबईत काय काम काढलं वगैरे.
मी ते सगळं सांगितलं अन आता माझ्या परीक्षेचे काय? हि काळजी बोलून दाखवली.
त्याने विचारलं, ‘ बम्बईमे और कोनो नाही का पहचान में? ‘
मी म्हंटल, ‘ एक मावस भाऊ आहे. गोरेगावला राहतो अन दादरला महाराष्ट्र बँकेत आहे. पण त्याचा डिटेल पत्ता माहित नाही. ‘
यावर भय्याने काय करावं?
आधी मला शरबत प्यायला दिलं. ‘ पीओ बेटा, पैसे नाही लुंगा. ’
अन नंतर त्याने त्याच्या खिशातून दहा रुपये काढून मला दिले व म्हणाला, ‘ दादर को जावं ट्रेन पकडकर, वहा किसी पुलिस से बँकका पता पूछो. भाई मिल जायेगा. आनेजाने का भाडा दिया है. अगर उहा काम नही हुआ तो यहा फिर आ जाना. कुछ करेंगे ‘
माणसात देव असतो, हे मी नेहमी मानत आलो ते याच कारणासाठी. अन त्या भय्याने सांगितल्यानुसार दादरला गेलो. पोलिसाने नीट पत्ता समजावून सांगितल्यावर मी बँकेत गेलो. आत जाताच समोरच भाऊ दिसला.
तोही चकित, मी अचानक आलेलं पाहून. त्याच्या समोर जाऊन बसलो अन थोडक्यात परीक्षेसाठी आलोय. सायंनला सोय झालीय राहण्याची वगैरे सांगताना परत एकदा डोळ्यात पाणी आलं.
त्याला बहुतेक अंदाज आला असावा. कारण त्याने थेट विचारलं की, ‘ पाकीट मारलं गेलंय कां? ‘ मी मानेनेच हो म्हणून सांगितलं.
त्याने फक्त इतकंच विचारलं, किती होते खिशात, मी सांगितलं अडीचशे. भावाने काहीही न बोलता त्याच्या खिशातून अडीचशे काढून मला दिले.
मी म्हटलं, ‘ पुण्यात गेलो की लगेच मनीऑर्डरने पाठवतो. ’
तो म्हणाला, ‘ असू दे. ते नंतर पाहू. तू आता शांतपणे परीक्षेला जा. मन शांत कर. अन अजून काही लागलं तर फोन करून कळव. ’
– असं म्हणून त्याने बँकेचे त्याचे कार्ड मला दिले. ते घेऊन मी निघालो. जीव भांड्यात पडला होता.
पटकन ट्रेन पकडून पुन्हा जे. जे. ला आलो. तरी या घोळात माझे दोन अडीच तास गेले होते. मात्र वेळेचं बंधन असं नसल्याने ती काळजी नव्हती.
त्या दिवशीचा पेपर सोडवणे सुरु केले. म्हणजे पोस्टर करण्याचा तो विषय होता. अन संध्याकाळी बाहेर पडल्यावर आधी त्या सरबतवाल्या भय्याकडे गेलो. खिशातून अडीचशे मधले दहा रुपये काढून त्याला दिले.
मनाची तयारी केलेली की, आता २४० रुपयांत भागवायच आहे. ते जमवू म्हटलं. अन भय्यापुढे दहाची नोट काही न बोलता धरली.
सकाळचा मीच तो मुलगा, त्याने ओळखलं. प्रसन्न हसून म्हणाला, ‘ काम हुई गवा न? ‘ मी हो म्हटलं अन त्याला सांगितलं की, ‘ ये आपके दस रुपये. ’
तो म्हणाला. ‘ बेटा, रहने दो, फिर कभी किसी को जरुरत पडे तो उसे तुम काम आ जाना. बास, मेरे पैसे उसी दिन मुझे मिल जायेंगे. ’
मी थक्क झालो. एक उच्चपदस्थ व उच्च शिक्षित मोठा बँकेतील माणूस अन एक फुटपाथवरचा अशिक्षित भय्या पण दोन्ही त्यावेळी मला देवाची रूपे दिसली.
नंतर पुण्यात आलो. नोकरीला लागलो. त्याच काळात तो मुंबईचा भाऊ एकदा माझ्याकडे पुण्यात आला तेव्हा आवर्जून त्याला ते अडीचशे परत देत होतो तर तो म्हणाला,
‘मोठे झाले आता बाळासाहेब तुम्ही. असू द्या पैसे तुमच्याकडे. नंतर कधी कुणाला तरी अशीच मदत कर. बास. ’
अगदी हीच सेम भावना त्या भय्या’ने मला बोलून दाखवलेलं आठवलं अन मी नतमस्तक झालो.
– – तर, हेच ते माझ्यावर अजून असलेले अडीचशे प्लस दहा असे दोनशे साठ रुपयाचे कर्ज. जे अद्याप फेडू शकलो नाहीये.
…… काही काही ऋण अशीच असावीत आयुष्यात जी फेडण्यापेक्षा मिरवण्यात आनंद वाटावा असे हे माझे कर्ज
(रवि १५ फेब्रु. २०२६ रोजी महाशिवरात्र आहे. त्यानिमित्त)
☆
प्रस्तावना
महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेत काही रचना अशा आहेत की त्या केवळ ऐकल्या किंवा म्हटल्या जात नाहीत, तर साक्षात जगल्या जातात. समर्थ रामदासस्वामी विरचित “लवथवती विक्राळा” ही शंकरांची आरती त्यापैकीच एक. घराघरांत नित्यनेमानं उच्चारली जाणारी ही आरती वरवर साधी वाटली, तरी तिच्या गर्भात शिवतत्त्वाचं अत्यंत गहन, विश्वात्म आणि अद्वैतदर्शी चिंतन सामावलेलं आहे. ही आरती म्हणजे केवळ स्तुतीगीत नसून, शिव या तत्त्वाची अनुभूती देणारं भव्यदिव्य तत्त्वकाव्य आहे.
विक्राळतेचं तत्त्वज्ञान
आरतीचा आरंभ —
“लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा”
या ओळीनं होतो. इथे समर्थ शंकरांचं सौम्य रूप पुढे न आणता त्यांची विक्राळता उभी करतात. मात्र ही विक्राळता हिंसक नसून अज्ञानाला हादरवणाऱ्या सत्याची आहे. “ब्रह्मांडी माळा” या एका शब्दातून संपूर्ण विश्व शंकरांच्या कंठाभोवती गुंफलं जातं. शिव इथे एखाद्या विशिष्ट स्थानी विराजमान असलेले देव न राहता, संपूर्ण विश्व व्यापून उरणारं चैतन्य ठरतात—विश्वात असूनही विश्वापलीकडचे.
*विष, करुणा आणि साक्षीभाव*
“वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा”
या ओळीत समुद्रमंथनाची पुराणकथा येते. देव-दैत्यांच्या संघर्षातून निघालेलं हळाहळ विष शंकरांनी प्राशन केलं; मात्र ते कंठातच रोधून धरलं. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला.
या कृतीचा तात्त्विक अर्थ अत्यंत सूक्ष्म आहे. शिव दुःख नष्ट करत नाहीत. ते दुःख स्वतःमध्ये सामावून घेतात; पण त्याचा प्रसार इतरत्र होऊ देत नाहीत. “त्रिनेत्रातील ज्वाळा” म्हणजे संहाराची आग नव्हे, तर भूत–वर्तमान–भविष्य या तिन्ही काळांचं जागृत ज्ञान. शिव म्हणजे संहारक नाही, तर सजग साक्षीपुरुष.
रौद्रता आणि सौम्यतेचा अद्वैत संगम
हे विक्राळ रूप पुढच्याच ओळीत सौंदर्यात विलीन होतं —
“लावण्यसुंदर मस्तकीं बाळा”
शंकर लावण्यवान आहेत. त्यांच्या मस्तकावर ‘बाळा’ म्हणजे गंगा आहे. स्वर्गातून प्रचंड वेगानं येणाऱ्या गंगेला आपल्या जटाभारात सामावून, तिचा वेग रोखून पृथ्वीवर केवळ कल्याणकारी सौम्य धार सोडली—म्हणून समर्थ गंगेला ‘बाळा’ म्हणतात.
शिवाच्या मस्तकावरला चंद्र शीतलतेचं आणि संतुलनाचं प्रतीक आहे. रौद्रता आणि सौम्यता, भय आणि करुणा — या विरोधी भासणाऱ्या गुणांचा अद्वैत संगम म्हणजे शिवतत्त्व. जिथं चंद्र आहे, तिथं अंधार असला तरी शीतल प्रकाश असतो.
चैतन्याचा प्रवाह
“तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां”
या ओळीत गंगेचं अवतरण दिसतं. शंकरांच्या जटांमधून वाहणारी गंगा केवळ पौराणिक नदी नाही, तर साक्षात चैतन्याचा, करुणेचा आणि पवित्रतेचा अखंड प्रवाह आहे. संहारक मानला जाणारा शिवच जीवन टिकवून ठेवतो—ही विसंगती नसून हे पूर्णत्व आहे.
कर्पूरगौर शिव : अहंकारशून्य तेज
धृवपदातील “कर्पूरगौरा” या शब्दातून शिव अत्यंत गोरे असल्याचं सांगितलं आहे. कापूर जसा जळून पूर्णपणे नाहीसा होतो, तसा शिव अहंकारशून्य आहे. भोळेपणा म्हणजे दुर्बलता नाही, तर निर्मळ भावावर प्रसन्न होणारी सहज दैवी वृत्ती आहे. विशाल नेत्र म्हणजे सर्वांना सामावून घेणारं अपरंपार वात्सल्य, कारुण्य.
अर्धनारीनटेश्वर : अद्वैताचा कळस
“अर्धांगीं पार्वती”
या ओळीत अर्धनारीनटेश्वर तत्त्व प्रकट होतं. शिव आणि शक्ती वेगळे नाहीत — चेतना आणि क्रिया, पुरुष आणि प्रकृती यांचं द्वैत इथं विरघळतं. त्यामुळे शिवतत्त्व हे केवळ वैराग्याचं प्रतीक न राहता, संतुलित, समन्वयी आणि समग्र जीवनदृष्टीचं प्रतीक ठरतं.
भस्म : वैराग्याची जागृती
“विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा”
विभूती म्हणजे भस्म. शिव सर्वांगावर चिताभस्म धारण करतात. भक्त शिवावर चिताभस्माची उधळण करतात. भस्म ही मृत्यूची आठवण आहे; पण निराशेची नाही—ती वैराग्याची जागृती आहे.
समुद्रमंथनाच्या कथेत अमृताआधी विष येतं. हा निव्वळ पौराणिक तपशील नसून मानवी जीवनाचा शाश्वत नियम आहे. साधना असो वा संसार—संघर्षाविना अमृत मिळत नाही. शिव विष पितात, पण ते गिळून टाकत नाहीत—हेच शिवतत्त्वाचं जीवनसूत्र आहे.
योगी शिव
आरतीच्या अखेरच्या कडव्यात शिव योगी रूपात प्रकट होतात—
“व्याघ्रांबर, फणिवरधर, सुंदर मदनारी”
भय, काळ आणि वासना यांवर विजय मिळवलेला शिव इंथ योगी आहे.
_“पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी”
शिव पंचमुखी आहेत. ईशान, तत्पुरुष, अघोर, वामदेव, सद्योजात—किंवा पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिये आणि सृष्टीची पाच कार्यं यांची प्रतीकात्मक अभिव्यक्ती म्हणजे पंचानन शिव.
“शतकोटीचें बीज वाचे उच्चारी”
ॐ या एकाक्षरी प्रणवात संपूर्ण सृष्टी सामावलेली आहे. स्वयं शिव या नादात सदा मग्न आहेत.
राम–शिव अद्वैत
“रामदासा अंतरीं”
या उल्लेखातून समर्थ स्वतःला रामभक्त म्हणवतात. ते म्हणतात की, रघुकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष श्रीराम माझ्या हृदयी विराजमान आहे. रामाच्या अंतःकरणात शिव वास करतो; म्हणजेच रामदासाच्याही अंतःकरणात शिवच वास करतो. राम आणि शंकर वेगळे राहत नाहीत—इथं भक्तीतलं अद्वैत अतिशय सूक्ष्मपणे समर्थांनी उलगडलंय.
काव्यमीमांसा
या तात्त्विक गहनतेला न्याय देणारं समर्थांचं काव्यप्रभुत्व तितकंच विलक्षण आहे. विषयाला साजेसं ठेकेदार, गंभीर वृत्त, ओघवती लय आणि अर्थघन शब्दयोजना यांमुळे आरती उच्चारताना ती केवळ ऐकू येत नाही, तर अनुभवली जाते.
‘लवथव’, ‘विक्राळ’, ‘ब्रह्मांडमाळा’, ‘मदनारी’, ‘फणिवरधर’ हे शब्द अलंकार म्हणून नाही, तर तत्त्वसूचक चिन्हं म्हणून येतात. प्रथम कडव्यातील ‘ल’ आणि ‘ळ’ वर्णांचा अनुप्रास श्रुतिमधुर वाटतो.
*विरोधाभासातून परिणाम साधणारी कलाकृती*— विक्राळ पण लावण्यसुंदर, संहारक पण करुणाकर — असं शिवरूप भक्ताच्या मनात खोलवर स्थिरावतं.
समारोप
अशा प्रकारे _“लवथवती विक्राळा”_ ही आरती शिवाची स्तुती न राहता शिव होण्याची दिशा दाखवणारं तत्त्वकाव्य ठरतं. म्हणूनच ती शतकानुशतकं टिकून आहे. ती देवाला माणसाजवळ आणत नाही; उलट माणसाला अधिक विशाल, अधिक सजग आणि अधिक शिवमय बनवते. हेच या आरतीचं खरं यश आहे.
‘१४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे’ हे एक समीकरणच झालं आहे. सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे.
काही वर्षांपूर्वी हा शब्द पण आपल्याला माहीत नव्हता आणि आता तरुणाईकरता, तो अगदी महत्वाचा सण किंवा उत्सुकतेने वाट बघण्याचा दिवस झाला आहे. काही जण असा पण विचार मांडतात, की, हा परदेशी सण आहे. आपण का म्हणून साजरा करायचा?
आता हा सण किंवा दिवस, आपण साजरा करावा, की, नाही, याकरता हे माहिती करणे जरुरी आहे, की, व्हॅलेंटाईन चा काय अर्थ आहे, आणि व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय?
व्हॅलेंटाईन डे या उत्सवाचं मूळ ठिकाण, म्हणजे जन्म स्थान आहे, इटली मधले रोम. व्हॅलेंटाईन हे माणसाचे नाव आहे, हे रोम मध्ये राहणारे एक पाद्री (प्रिस्ट) होते. त्यावेळेस तिथे क्लोडियस या सम्राटाचे राज्य होते. त्याला आपले साम्राज्य खूप वाढवायचे होते. त्याची अशी समज होती, की, सैन्यामधल्या लोकांनी जर लग्न केलं, तर ते मन लावून लढू शकत नाहीत. म्हणून सम्राटानी असा हुकूम काढला, की, सैनिकांना लग्न करण्याची परवानगी नाही. व्हॅलेंटाईन आणि कुणालाच हे पसंत नव्हते. पण – आलीया भोगासी. लोक लपून छपून व्हॅलेंटाईनच्या मदतीने लग्न करायला लागले. राजापासून अशी गोष्ट किती दिवस लपून राहणार! राजाला हे समजताच, व्हॅलेंटाईनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि व्हॅलेंटाईनची रवानगी तुरुंगात झाली.
. रोम च्या लोकांचा असा समज आणि अनुभव होता, की, व्हॅलेंटाईनकडे दिव्य शक्ती आहे आणि त्यामुळे तो कुठलेही व्यंग / आजार दूर करू शकतो. तुरुंगाच्या जेलरची मुलगी जन्मापासून अंध होती. जेलरच्या विनंतीवरून व्हॅलेंटाईन नी आपल्या दिव्य शक्तींनी त्या मुलीला दृष्टी मिळवून दिली. मुलगी रोज व्हॅलेंटाईन ला भेटायला तुरुंगामध्ये यायला लागली, आणि दोघांमध्ये मैत्रीभाव निर्माण झाला आणि त्याचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. फाशीचा दिवस उजाडला.
व्हॅलेंटाईन नी जेलर कडून कागद आणि पेन मागून घेतला, आणि त्याच्या मुलीला चिठ्ठी लिहिली आणि खाली लिहिले – “तुझा व्हॅलेंटाईन”.
हा दिवस होता १४ फेब्रुवारी ४९६.
तेव्हापासून व्हॅलेंटाईन आणि त्या मुलीच्या प्रेमाची स्मृती म्हणून, जगभरातले प्रेमी – प्रेमिका हा दिवस वैलेंटाइन डे म्हणून साजरा करायला लागले. आपले प्रेम व्यक्त करण्याकरता फुलं, भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड आणि चॉकलेट एकमेकांना देण्याची प्रथा पण सुरु झाली. हळूहळू याची व्याप्ती वाढत गेली आणि नवरा- बायको, मित्र – मैत्रिणी, नातेवाईक, पाळीव प्राणी, असे सगळेच या परिघात आले. ज्याच्या विषयी आपल्या मनात प्रेमभावना आहे, त्यांना जगभरातले लोक, या दिवशी शुभेच्छा देतात आणि हा सण साजरा करतात.
. दोन तीन दशकांपूर्वी आपल्याकडे जागतिकीकरणाचे (ग्लोबलायझेशन) चे वातावरण तयार झाले आणि देश विदेशातील इतर गोष्टींबरोबर संस्कृतीची पण देवाणघेवाण सुरु झाली. आधी मंद गतीने सुरु झाली आणि आतातर झपाट्याने सुरु आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा याचाच भाग आहे, असे म्हणता येईल.
आपल्या देशाला सणांचा देश असे म्हटल्या जाते. इथल्या इतके सण इतर कुठेही साजरे होत नाहीत. दीवाळी, राखी, होळी, पोळा, ईद, ख्रिसमस, असे अनेक सण, उत्सव आपण आनंदानी, उत्साहानी आणि एकोप्याने साजरे करतो. आमचा – तुमचा असा भेदभाव, आपण भारतीय कधीच करत नाही.
सगळ्या सणांमागची कल्पना एकच असते, आणि ती म्हणजे, आपले प्रेम व्यक्त करणे. मग नवरा – बायको करता असो, प्रियकर – प्रेयसी करता असो, नातेसंबंधांकरता असो, मित्र परिवाराकरता असो, , प्राणिमात्रांकरता असो, किंवा निसर्गा करता असो. मनापासून कुणावरही प्रेम व्यक्त केलं, तर आपलं मन प्रसन्न होतं, आनंदी होतं.
पण आजच्या धकाधकीच्या जीवनात, आजच्या पळापळीच्या जीवनात, आपण सर्व जण, मनानी आणि शरीराने सारखे पळत आहोत. त्यामुळे वेळ आपल्या हातातून कायम निसटून जात आहे. आता आपल्याकडे म्हणजे कुणाकडे वेळच नाही, त्यामुळे कुणावरही मनापासून प्रेम तरी कधी करणार! जीवनात प्रेम नाही, म्हणून आनंद नाही, आणि आनंद नाही म्हणून उत्साह नाही. या दुष्ट चक्रात आपण सगळेच अडकलो आहोत. भविष्यकाळात हे सगळे असे घडणार आहे, हे ओळखून, आपल्या पूर्वजांनी निरनिराळ्या सणांची मुहूर्तमेढ रचली असावी. हेतू हाच, की, थोड्या थोड्या दिवसांनी असे सण येत जातील आणि त्या त्या दिवशी सगळे आनंदात राहतील. कुठलाही सण आला, की, आपण आधीपासून प्लॅनिंग करतो, वेळ काढतो आणि आपले प्रेम व्यक्त करत, सण आणि तो दिवस आनंदानी साजरा करतो.
असं म्हणतात – Love and happiness go hand in hand. The happiness you feel is in direct proportion with the love you give.
कुणाही बरोबर आपलं प्रेम व्यक्त करण्याकरता काळ / वेळ / आपली प्रथा / परदेशी प्रथा, यांचं बंधन असण्याचं खरंतर काहीच कारण नाही. कारण –
True love knows no reason
आणि
Love has no boundaries.
सगळ्यांविषयी आपलं प्रेम व्यक्त करायला, आजचा व्हॅलेंटाईन डे हा पण एक छान दिवस आहे.
पूर्वी सगळे नोकरदार एक तारखेला खुश असायचे –
“खूष है जमाना, आज पहिली तारीख है”.
आता सगळे प्रेम व्यक्त करणारे १४ फेब्रुवारीला खुश असतात – “खूष है जमाना, आज व्हॅलेंटाईन डे है”.
नुकतेच KBC Junior 2025 संपले. आजकालच्या मुलांचे सर्व विषयांवरील व्यापक ज्ञान पाहून आपण थक्क होतोच; पण ज्ञानापेक्षा अधिक भावून जातो तो त्यांचा confidence, बिनधास्त बोलणे, खदखदून हसणे आणि तो निरागस innocence. सरळसोट, कुठलाही आडपडदा नाही… खूप छान वाटतं.
अशाच एका भागात एक दहा- बारा वर्षांची चिमुरडी आली होती. काही प्रश्नांनंतर गप्पा मारताना अमिताभ बच्चन तिच्यावर खूश झाले आणि त्यांनी प्रेमाने आशीर्वाद दिला, “चिरंजीवी भव. ”
ती चिमुरडी आधी नम्रपणे “Thank you, sir” म्हणाली. पण मग… कथेमध्ये ट्विस्ट आला.
ती अगदी बिनधास्तपणे म्हणाली,
“Thank you, sir! लेकिन मैं चिरंजीवी नहीं बनना चाहती. म्हातारपणी हात-पाय दुखतात, कंबर दुखते, नीट चालता येत नाही, काठी लागते. काही लोक bedridden होतात, तर काहींना कायम मदतनीस लागतो. त्यापेक्षा मला वेळेवर exit घ्यायला आवडेल. आज नाही तर उद्या exit घ्यायचंच आहे, तो मुझे time पे exit लेना हैं”. अमिताभ बच्चन पण ह्या उत्तराने थक्क झाले.
इतक्यावरच ती थांबली नाही. पुढे ती अमिताभ बच्चन यांना म्हणाली,
“आप हो जाओ चिरंजीव. आपके पास इलाज करने के लिये पैसा है. आप चिरंजीव हो गये, तो भी ठीक. ”
क्षणभर सगळेच स्तब्ध झाले. कदाचित तिने कुणाचंतरी आजारपण अगदी जवळून पाहिलं असेल. आजारपणातली हतबलता बघितली असेल – आजारी व्यक्तीची अणि कुटुंबाचीसुद्धा.
पण तरीही… ही Gen Alpha काहीतरी वेगळीच आहे, हे नक्की.
तिच्या या बोलण्याने मला ‘इच्छा मरण’ या संकल्पनेची आठवण झाली. नाव ऐकतानादेखील आपल्याला ती संकल्पना अजूनही विचित्र, अस्वस्थ करणारी वाटते. पण प्रत्यक्षात काही देशांमध्ये euthanasia कायदेशीर आहे—ठरावीक नियम आणि अटींसह. नेदरलॅंड, बेल्जियम, लक्झेम्बर्ग, कॅनडा, कोलंबिया स्पेन, न्यूझीलंड, पोर्तुगाल तसेच ऑस्ट्रेलिया आणि यूएसमधील काही states मध्ये terminal illness असलेल्या रुग्णांसाठी हा पर्याय उपलब्ध आहे. आपल्या देशात अरुणा शानबागच्या वेळी हा मुद्दा उठला होता. आयुष्यातली बेचाळीस वर्ष… बेचाळीस वर्ष ……
पण आज ह्या चिमुरडीच्या बोलण्याने मनात एक विचार आला. किमान इतकं तरी करता आलं पाहिजे की आपण स्वतःच आधीच जाहीर करू शकू—
एका ठरावीक वयानंतर किंवा ठरावीक परिस्थितीत मला ventilator वर ठेवू नका किंवा कृत्रिमरीत्या जगवू नका.
असं एखादं will किंवा living directive असणं किती दिलासादायक ठरेल!
यामुळे आपल्या पुढच्या पिढीला निर्णय घ्यायला सोपं जाईल…
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे—
त्यांच्या मनावर कधीही guiltचं ओझं राहणार नाही.
आपण नेहमी “आई-वडिलांसाठी काहीही करायला तयार आहोत, ” असं म्हणतो. पण कधी कधी काहीही न करणे हाच सर्वात मोठा करुणेचा निर्णय असू शकतो, हे स्वीकारायला आपल्याला अजून वेळ लागेल. आज वैद्यकीय प्रगतीमुळे आयुष्य वाढवता येतंय, पण प्रश्न असा आहे की—फक्त श्वास चालू ठेवणं म्हणजे जगणं का?
जगणं म्हणजे आठवणी, संवाद, स्वाभिमान, स्वतःच्या शरीरावर आणि निर्णयांवरचा अधिकार. ते सगळं हरवल्यावर फक्त मशीनवर अवलंबून असलेलं अस्तित्व आपण “जीवन” म्हणू शकतो का? कदाचित हीच पिढी हा प्रश्न निर्भीडपणे विचारेल.
त्या चिमुरडीने ‘इच्छा मरण’ हा शब्द वापरला नाही. तिने फक्त वेळेवर exit घ्यायची इच्छा व्यक्त केली. किती साधं, किती स्पष्ट आणि तरीही किती खोल! मृत्यूची भीती नसून, वेदनांची आणि परावलंबित्वाची भीती तिने मांडली होती.
उद्या हीच पिढी policy बनवेल, कायदे ठरवेल, आणि “जगण्याचा अर्थ” नव्याने define करेल. तेव्हा कदाचित ‘इच्छा मरण’ ही संकल्पना भीतीदायक न वाटता, करुणेची, समजुतीची आणि सन्मानाची भाषा वाटेल.
आणि तेव्हा कदाचित ह्या वाक्याचा खरा अर्थ आपण लावू…
“बाबू मोशाय! ज़िंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं! ”
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈