मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ परिक्षा – पालकांची ‘चिंता’ आणि विद्यार्थ्यांची ‘चिता’… ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे ☆

सुश्री अर्चना दादासाहेब मुळे

 ? इंद्रधनुष्य  ?

☆ परिक्षा – पालकांची ‘चिंता’ आणि विद्यार्थ्यांची ‘चिता’…  ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे☆

नवीन वर्षाचा पहिला महिना उत्साहात संपतो. लगेच दुसर्‍याच म्हणजे फेब्रुवारी महिन्यात दहावी बारावीतील मुलांच्या उत्साहाला परीक्षेचं ग्रहण लागतं. सूर्य – चंद्र ग्रहणाप्रमाणं विद्यार्थ्याच्या मनात काही काळ मानसिक अंधार दाटून येतो. अफवा आणि भीती पसरवली जाते. पालक आणि शिक्षकांच्या अपेक्षांची सावली मुलांच्या गुणात्मक तसेच वास्तव क्षमतेला झाकोळून टाकते. परीक्षेचं हे ग्रहण केवळ मुलांच्या गुणांवर परिणाम करत नाही तर त्यांचं मानसिक आरोग्य धोक्यात आणतं.

दहावी बारावीच्या परीक्षा म्हणजे केवळ विद्यार्थ्याचं शैक्षणिक मुल्यांकन नाही तर त्या कौटुंबिक मानसिक सहनशक्तीचं आव्हान ठरलं आहे. परीक्षेत ९० % पेक्षा कमी गुण म्हणजे अपयश आणि अपयश म्हणजे कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेचा लोप होय. असा सर्वसाधारण चुकीचा समज आहे. अशा कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक वृत्तीमुळे परीक्षा काळात काही विद्यार्थी सोडले, तर इतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत प्रचंड गोंधळ असतो.

 विद्यार्थ्यांची मानसिकता –

परफाॅर्मन्स एन्झायटी – चिंता 

पालकांना अपेक्षित असलेले गुण मिळतील की नाही. प्रश्नपत्रिका आपण केलेल्या अभ्यासावर असेल की नाही. वेळ पुरेल की नाही. किती गुण पडतील. मनात अनावश्यक विचारांची गर्दी होते. अनेक चिंता मुलांचा मेंदू पोखरून काढतात. एकाग्रता कमी होते. परीक्षेची भीती वाढते. परीक्षेला जायलाच नको असंही वाटायला लागतं. त्या ताणामुळं धाप लागणं, घाम फुटणं, शरीर थरथरणं, प्रचंड रडायला येणं असे शारीरिक परिणाम दिसतात.

तुलनात्मकता – वर्गमित्र, शेजारचा मुलगा, नातेवाईकांमधला एखादा मुलगा याच्याशी पालक सतत तुलना करत असतील तर मुलांमधला आत्मविश्वास कमी होतो. त्यांची चिडचिड होते. झोप – भूक कमी होते. वेदनादायक आजार बळावू शकतात. ‘शेजारच्या मुलाला पाहा’ हे वाक्य म्हणजे फक्त इतरांशी केलेली तुलना नाही तर सामाजिक प्रतिस्पर्धेचं लक्षण आहे. शेजारी, नातेवाईक अशा स्पर्धेत हिरीरीने पुढाकार घ्यायला भाग पाडतात.

हरणं जिंकणं शिकणं – हरणं जिंकणं याबरोबरच बरंच काही शिकायला मिळणं हे ही महत्त्वाचंच आहे. ठेचकाळून पडलं म्हणून कुणी पडूनच राहत नाही तसं परीक्षेत गुण कमी पडले म्हणून विद्यार्थ्यांनी पुढे पुन्हा परीक्षाच न देण्याची मानसिकता करण्याची गरज नाही. आधुनिक मानसशास्त्र अडचणींतून परत उभे राहण्याची क्षमता निर्माण करण्यावर भर देतं. पण सध्या पालकांच्या कडक भूमिका मुलांमधे असहाय्यतेची भावना निर्माण करतात. ‘मी कितीही प्रयत्न केला तरी चांगले गुण मिळणार नाहीत’. असा मुलं सतत नकारात्मक विचार करायला लागतात. हरण्यातूनही जे शिकायला मिळतं त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल.

गुण = मूल्य – परीक्षेतील गुण हेच विद्यार्थ्याचं मूल्यमापन करतात. परीक्षेतील गुणांशिवाय इतर कितीतरी कौशल्य त्याच्याकडे असतात. पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. जितके गुण जास्त तितका तो हुशार असा सार्वत्रिक गैरसमज आहे. परीक्षेतील अपयश हे केवळ शैक्षणिक अपयश आहे असं मानलं जात नाही. तर त्या विद्यार्थ्याला कुचकामी, निरुपयोगी ठरवलं जातं. त्यामुळं त्याचा आत्मविश्वास कमी होतो. त्याच्या यशाची रेषा त्याच्यापासून लांब होत जाते.

पुन्हा पुन्हा असमानता – बर्‍याचवेळा विद्यार्थ्याचं अपयश त्याच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतं. बौद्धीक क्षमता असूनही त्याला आवश्यक ती शैक्षणिक साधनं उपलब्ध होत नाहीत. त्यामुळं समाजात अपयशी ठरतो. त्याच्या मनात श्रीमंतीविरूद्ध द्वेष निर्माण होण्याची शक्यता बळावते. गरीब श्रीमंत विद्यार्थी भेद नसावा पण सरकारी शाळा आणि खासगी शाळा नियमितपणे हा भेद आणि पक्षपातीपणा रुजवण्याचंच काम करतात. दहावीच्या निकालानंतर ही तुलना मोठ्या प्रमाणात होते. सामाजिक विषमता पुन्हा पुन्हा निर्माण करण्यास मदत करते.

पालक असे कसे…?

पालक स्वत:ची अपूर्ण स्वप्नं मुलांकडून पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतात.

घरातील टी व्ही बंद होतो.

पालकांचं स्वत:चं सामाजिक जीवन थांबतं.

घरी नेहमी असणारी माणसांची वर्दळ बंद होते.

मुलाचे खेळ, त्याचे छंद सगळं बंद होतं.

त्याला मित्रांमधे जाणं, गप्पा मारणं करू दिलं जात नाही.

मुलानी अभ्यासाव्यतिरिक्त काहीही करू दिलं जात नाही.

विद्यार्थी जगतातलं वास्तव –

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात १, ४२६ विद्यार्थ्यांवर केलेल्या २०२३ मधील अभ्यासानुसार, ७४% विद्यार्थ्यांना तीव्र शैक्षणिक ताण आहे. यावरून संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अंदाज येतो.

 हिमाचल प्रदेशातील शिमला मधील २०२२ मध्ये झालेल्या अभ्यासानुसार, ८३% विद्यार्थ्यांना मध्यम ताण आहे.

कोलकात्यात २०१५ मधे केलेल्या अभ्यासानुसार, ६३. ५% विद्यार्थी शैक्षणिक दबावामुळे तणावग्रस्त होते, तर ८१. ६% विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधी चिंता व्यक्त केली.

तमिळनाडूमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, मुलांमध्ये मुलींपेक्षा आणि बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांपेक्षा चिंतेचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त होते.

कर्नाटकातील एक अभ्यास असंही सांगतो की, मुलांमध्ये अभ्यासाचा दबाव, गुणाची चिंता आणि स्वतःची अपेक्षा यांमुळे ताण जास्त असतो.

कोलकात्यातील एक अभ्यास असं सांगतो की, ६६% विद्यार्थ्यांवर त्यांच्या पालकांकडून चांगल्या शैक्षणिक कामगिरीबद्दलचा दबाव आहे.

अनेक अभ्यास आणि NCRB च्या अहवालांनी भारतातील तरुण वयातील आत्महत्या आणि परीक्षचा ताण याचा संबंध जोडला आहे.

उपाय – 

पालकानी बुद्धिमत्तेची व्याख्या नीट समजून घ्यावी. परीक्षेतील गुणांवर बुद्धीमत्ता ठरवू नये. मानसशास्त्रज्ञ हॉवर्ड गार्डनर ‘बहुबुद्धिमत्ता सिद्धांत’ सांगतात. ते म्हणतात, “परीक्षा केवळ तार्किक-गणितीय आणि भाषिक बुद्धिमत्तेचे मूल्यमापन करतात. मुलाची सर्जनशीलता, सामाजिक कौशल्ये, भावनिक समज अशा इतर महत्त्वाच्या बुद्धिमत्ता परीक्षांमधून कळत नाहीत. “

सर्व शाळांमधे समुपदेशक, मानसतज्ज्ञ यांची नेमणूक करायला हवी. शहरी-ग्रामीण, सरकारी – खासगी, श्रीमंत-गरीब शाळांमधील मूलभूत सुविधा आणि दर्जा यात समानता आणायला हवी.

पाठ्यपुस्तकी ज्ञानाबरोबरच भावनिक साक्षरता, ताण व्यवस्थापन, लवचिकता यांसारख्या कौशल्य आधारीत शिक्षणाची गरज आहे.

दहावी बारावीची अंतिम परीक्षा म्हणजेच यशस्वी भविष्य हा गैरसमज आहे हे लक्षात घ्यायला हवं.

डॉक्टर-इंजिनियर शिवाय करिअरचे अनेक पर्याय आहेत याची समाजात, पालकांमध्ये आणि मुलांमध्ये जागरूकता निर्माण करायला हवी.

सकारात्मक प्रेरणा द्याव्यात. त्यामुळं मुलांचं अंतर्गत कुतूहल आणि शिकण्यातील आनंद टिकवून ठेवतात.

परीक्षापूर्व, परीक्षाकाळ, परीक्षेनंतरचा काळ आणि सगळ्यात महत्त्वाचा निकाल या सर्व कालावधीत मुलांच्या वेदना समजून घ्याव्यात. वेदनेचं मुळ शोधावं. त्यानुसार मुलांशी संवाद साधावा.

आम्ही तुझ्यासोबत आहोत. परीक्षेचा निकाल काहीही लागला तरी चालेल. आपण तो साजरा करू हा विश्वास मुलांना द्यावा.

शालेय व्यवस्थापनाने १००% निकालाचा हट्ट सोडायला हवा कारण त्याचाही ताण मुलांवर असतो.

ग्रहण म्हणजे तात्पुरता अंधार. अगदी तसंच परीक्षेचं असतं. दुर्बिणीतून ग्रहण बघणं सुरक्षित असतं. तसंच परीक्षेकडे चाचणीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर भीती कमी होण्याची शक्यता वाढते. जसं ग्रहणामुळं सूर्याचं अस्तित्त्व संपत नाही तसं परीक्षेमुळं विद्यार्थ्याचंही अस्तित्त्व, त्याचं कर्तृत्त्व कधीच संपत नाही. ग्रहणात विशेष करून डोळ्यांची काळजी घेतली जाते. परीक्षाकाळात मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागते. ग्रहनानंतर सूर्य तसाच चमकतो जसा तो होता. परीक्षेनंतर मुलंही अधिक चमकतात हे लक्षात घेतलं तर मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत. पालकांच्या चिंता विद्यार्थी चितेच्या चरम सीमेपर्यंत पोहोचणार नाहीत.  

– – फेब्रुवारी महिन्यात दहावी बारावीची परीक्षा देणार्‍या सर्व विद्यार्थ्याना हार्दिक शुभेच्छा!!!

 

© सुश्री अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : archanamulay5@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकाच या जन्मी जणू… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ एकाच या जन्मी जणू… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

*एकाच या जन्मी जणु फिरुनी नवी जन्मेन मी*… “

आयुष्य म्हटलं कि कष्ट आले, त्रास आला,

मनस्ताप आला, भोग आले आणि जीव जाईपर्यंत काम आलं… मग ते घरचं असो नाहीतर दारचं…

*बायकांना तर म्हातारपणा पर्यंत कष्ट करावे लागतात… *

75 वर्षाच्या म्हातारीने पण *भाजी तरी चिरुन द्यावी* अशी घरातल्यांची अपेक्षा असते…

हि सत्य परिस्थिती आहे…

*आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत* हे रहाणारच…

त्यामुळे *हि जी चार भांडीकुंडी आपण आज निटनिटकी करतो*… ती मरेपर्यंत करावी लागणार…

ज्या किराणाचा हिशोब आपण आज करतो तोच *आपल्या सत्तरीतही* करावा लागणार…

” *मी म्हातारी झाल्यावर, माझी मुलं खुप शिकल्यावर त्याच्या कडे खुप पैसे येतील मग माझे कष्ट कमी होतील” *हि *खोटी स्वप्न आहेत*…

मुलं, मुली कितीही श्रीमंत झाले तरी..

” *आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव पण जेवण तु बनव*.. “

असं म्हटलं कि *झालं*…

*पुन्हा सगळं चक्र चालु*..

आणि त्या चक्रव्युहात आपण सगळ्या

अभिमन्यी… ,

 

पण.. पण.. जर हे असंच रहाणार असेल..

*जर परिस्थिती बदलु शकत नसेल तर मग काय रडत बसायचं का*??

तर नाही…

*परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं. *…

 

मी हे स्वीकारलंय… *खुप अंतरंगातून* आणि आनंदाने…

 

*माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते*… खुप उर्जा आणि उर्मी नी भरलेली…

 

*सकाळी सात वाजता जरी कुणी मला भेटलं* तरी मी तेवढ्याच उर्जेनी बोलु शकते *आणि रात्री दहा वाजता* ही…

आदल्या दिवशी *कितीही कष्ट झालेले असु देत*… दुसरा दिवस हा *नवाच* असतो…

 

*काहीच नाही लागत* हो…

हे सगळं करायला…

*रोज नवा जन्म मिळाल्या सारखं उठा*…

छान आपल्या *छोट्याश्या टेरेस वर डोकावुन थंड हवा* घ्या.. आपणच प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा…

*आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या*..

इतकं भारी वाटतं ना…

अहाहा…

सकाळी उठल की ब्रश करायच्या आधीच रेडिओ लागतो माझा…

*अभंग एकत एकत मस्त डोळे बंद करून* ब्रश केला… ग्लास भरुन पाणी पिलं आणि मस्त… आल्याचा चहा पित… *खिडकी बाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना* 

*कि भारी वाटतंं*…

 

*रोज मस्त तयार व्हा*…

आलटुन पालटुन स्वतःवर *वेगवेगळे प्रयोग करत* रहा…

कधी हे कानातले.. कधी ते गळ्यातले…

कधी ड्रेस… *कधी साडी*…

कधी केस मोकळे… *कधी बांधलेले*…

*कधी हि* टिकली तर कधी ती…

*सगळं ट्राय करत रहा… नवं नवं नवं नवं*…

रोज नवं…

*रोज आपण स्वतःला नविन दिसलो पाहिजे*…

 

स्वतःला बदललं कि… आजुबाजुला *आपोआपच सकारात्मक उर्जा पसरत जाईल*… तुमच्याही नकळत…

आणि *तुम्हीच तुम्हाला हव्या हव्याश्या* वाटु लागाल…

 

मी *तर याच्याही पार पुढची पायरी* गाठलेली आहे…

*माझ्या बद्दल नकारात्मक कुणी बोलायला लागलं कि माझे कान आपोआप बंद होतात*… काय माहित काय झालंय त्या कानांना…

 

*आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी* असते…

मनातल्या मनात मस्त टुणटुण उड्या मारत असते…

 

*जे जसं आहे… ते तसं स्विकारते आणि पुढे चालत रहाते*…

कुणी आलाच समोर कि.. ” *आलास का बाबा*.. बरं झालं.. म्हणायचं… *पुढे चालायचं*…

अजगरा सारखी… *सगळी परिस्थिती* गिळंकृत करायची…

 

*माहीत आहे मला*…

*सोपं नाहीये*…

 

*पण मी तर स्विकारले आहे*…

*आणि एकदम खुश आहे*…

आणि म्हणुनच रोज म्हणते…

 

” *एकाच या जन्मी जणु*…

*फिरुनी नवी जन्मेन मी*…

*हरवेन मी हरपेन मी*..

*तरीही मला लाभेन मी*… “

कवी:अज्ञात

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘हे, ही, हाय, हॅलो, नमस्ते, रामराम! अभिवादन – प्रतिअभिवादनाचे शिष्टाचार’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘हे, ही, हाय, हॅलो, नमस्ते, रामराम! अभिवादन – प्रतिअभिवादनाचे शिष्टाचार’ ☆ श्री दिवाकर बुरसे

🌼

प्रस्तावना:

दिवसभरात प्रथम भेटल्यावर परस्परांना अभिवादन – प्रति अभिवादन करण्याची पद्धत जगभरच्या सर्व देशात, धर्मात, मानवी समूहात, संस्कृतीत गेल्या सहस्रावधी वर्षांपासून पाळली जाते. देश- काल-धर्म – संस्कृतीपरत्वे अभिवादनाच्या रीति -प्रथा – पद्धती- संकेत भिन भिन्न असले तरी त्यामागीत मानवी भावना, शिष्टाचाराच्या संकल्पना सारख्याच आहेत.

अभिवादन म्हणजे आदर, सन्मान, स्नेह व सौहार्द्र व्यक्त करण्याची एक सुंदर पद्धत होय. मानव हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळे इतरांशी संपर्क साधताना नम्रतेने आणि आदराने वागणे आवश्यक असते. अभिवादन ही सौजन्याची पहिली पायरी आहे.  

अभिवादनाचे प्रकार विविध आहेत. काही लोक शब्दांनी अभिवादन करतात जसे, “नमस्ते”, “नमस्कार”, “ सुप्रभात”, “जय हिंद”, “रामराम” इत्यादी. काही लोक कृतीने अभिवादन करतात, जसे हात जोडणे, वाकून नमस्कार करणे, चरणस्पर्ष करणे, हस्तांदोलन करणे, आलिंगन देणे इ.

विविध धर्मांनुसारही अभिवादनाच्या पद्धती बदलतात, जसे, “सत् श्री अकाल”, “अस्सलामुअलैकुम”, “गॉड ब्लेस यू” इत्यादी. अलिकडे पाश्चात्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे तरुण मंडळी “हे”, ” ही”, “हाय”, “हॅलो” अशा ‘ह’काराने एकमेकांना अभिवादन करताना दिसतात. तरीही भारतात ” नमस्ते” किंवा ” रामराम” हे सुटसुटीत अभिवादन अधिक लोकमान्य आहे.

अभिवादनाचे अनेक लाभ आहेत. यामुळे समाजात सौहार्द्र, प्रेम आणि आदर वाढतो. योग्य अभिवादनाने संभाषणाचा आरंभ चांगला होतो. त्यातून परस्परांतील स्नेहसंबंध दृढ होतात. यामुळे सामाजिक शिस्त राखली जाते, प्रसन्न आनंददायी वातावरण निर्माण होऊन पुढील संवाद ‘सुसंवाद’ होण्यास सहाय्य होते.

म्हणूनच, अभिवादन हा केवळ एक शिष्टाचार नसून, तो आपल्या संस्कृतीचा आणि सभ्यतेचा अभिन्न भाग आहे. प्रत्येकाने इतरांना भेटताना आदरपूर्वक अभिवादन करावे, हीच खरी सामाजिक सौजन्याची खूण आहे.

आपली प्राचिन भारतीय संस्कृती विनय, नम्रता आणि अनुशासन यांवर आधारलेली आहे. या संस्कृतीत अभिवादन म्हणजे केवळ एक सौजन्याचा संकेत नसून ते एक धार्मिक आणि नैतिक कर्तव्य मानले जाते. मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, रामायण, महाभारत यासारख्या धर्मशास्त्रग्रंथात अभिवादन कसे करावे, कोणाला करावे त्याचे प्रत्युत्तर कसे द्यावे, याचे सविस्तर मार्गदर्शन शास्त्रकारांनी केलेले आहे.

अगदी बालपणापासून घरात, गुरुकुलात ते मुलांना शिकविले जाई. सार्वजनिक जीवनात त्याचे काटेकोर पालन केले जाई. अशा प्रकारे अभिवादन आणि त्याला दिले जाणारे प्रत्युत्तर ही दोन्ही आचरणे भारतीय संस्कृतीत धर्माचे अविभाज्य घटक आहेत.

अभिवादनाचे महत्त्व – विनयातून धर्म

अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः।

चत्वारि तस्य वर्धन्ते – आयुर्विद्या यशो बलम्॥

(मनुस्मृती २. १२१)

या श्लोकात मनुमहाराज सांगतात की, विनम्र अभिवादन करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य, विद्या, कीर्ती आणि बळ (सतत) वाढत रहाते. केवळ वयानेच नव्हे, तर विद्या, शील, आणि आचरणाने श्रेष्ठ असलेल्या व्यक्तींना अभिवादन करणे हे धर्माचे पालन आहे.  

कोणाला, कसे अभिवादन करावे?

जात्या वृद्धं गुरुं विद्या-वयो-शील-सम्भवम्।

अभिवादयितव्यं स्यात् पञ्चत्यागं न वै द्विजः॥

(मनुस्मृती २. १२२)

यात पाच प्रकार सांगितले आहेत. जन्म, वय, विद्या, शील, आणि गुरुस्थान. या पाचही गोष्टींचा विचार करून पात्र व्यक्तींना अभिवादन केले पाहिजे. केवळ वय हा एकमेव निकष नाही, तर आचार, विचार व ज्ञान देखील तितकेच महत्त्वाचे आहेत.

प्रतिअभिवादन करण्याचे शिष्टाचार

अभिवादन हे एक द्विपक्षीय सामाजिक धर्मकर्म आहे. ज्याप्रमाणे विनम्रपणे अभिवादन करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे त्याला योग्य, प्रेमपूर्वक आणि योग्य पद्धतीने उत्तर देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

प्रत्युत्थानं अभिवादनं सत्क्रियां चानुवर्त्तनम्।

एतान्येवाश्रमाणां स्यात् कृत्यं शुद्धिं च सर्वतः॥

(मनुस्मृती २. १२७)

यामध्ये चार आचरणे सांगितली आहेत:-

१) प्रत्युत्थानम्– उठून प्रतिसाद देणे

२) अभिवादनम् – शब्दांतून नम्र प्रतिसाद

३) सत्क्रिया – सन्मानपूर्वक प्रतिसाद

४) अनुवर्तनम् – आदराने त्या व्यक्तीच्या इच्छेप्रमाणे वागणे 

प्रति अभिवादन करताना योजायचे वाक्यप्रयोग

प्रकार उत्तर

१) ब्रह्मचारी/शिष्य:- “आयुष्मान भव”, “दीर्घायुषी भव”

२) विद्यार्जन करणारा:-     “यशस्वी भव”, “विद्यावान भव”

३) कनिष्ठ/स्नेही:- “शुभं भवतु”, “मंगलं भवतु”, “शिवं कुरु”

४) सामान्य प्रसंग:- प्रसन्न हास्य, सूक्ष्म संकेत, डोळ्यांनी स्नेह प्रकट करणे.  

प्रत्युत्तर देताना वाणी मधुर, प्रसन्न आणि प्रेमळ असावी. अभिवादन – प्रतिअभिवादन हा केवळ शिष्टाचार नाही तर मानवी संबंध सुधारण्याचे ते आद्य आणि अत्यंत महत्वाचे माध्यम आहे.

प्रत्युत्तर न देणे हा दोष

जर कोणी अभिवादन केले आणि त्याला उत्तर दिले गेले नाही, तर ते अहंकाराचे लक्षण मानले जाते. स्मृती सांगतात की तुम्ही केलेल्या अभिवादनाचा स्विकार न करणाऱ्या आणि प्रतिअभिवादन न करणाऱ्या व्यक्तीला, ती व्यक्ती आशिष्ट आहे असे समजून, तिला भविष्यात कधीही अभिवादन करू नये. त्याचे असे आशिष्ट वर्तन नीति व धर्मशास्त्रविरुद्ध आहे. असे वर्तन नातेसंबंधांमध्ये ताण उत्पन्न करू शकते. मनुस्मृतीनुसार, अभिवादनाला प्रतिसाद न देणे हा शिष्टाचारभंग आहे.

विशेष परिस्थितीतील आचरण

जर कोणी ध्यान, पूजा, जप इ. करीत असेल, कोणी रुग्णशय्येवर असेल तर तो प्रतुतर देण्यास असमर्थ असतो. अशावेळी संकेताने किंवा मौनाने प्रतिसाद दिल्यास, तेही योग्य मानले जाते. उत्तर देण्यासाठी स्वच्छता, मानसिक प्रसन्नता आणि नम्रता आवश्यक आहे.  

उपसंहार

अभिवादन आणि त्याला दिले जाणारे उत्तर हे केवळ सामाजिक सौजन्य नसून धार्मिक, नैतिक व आध्यात्मिक उन्नतीचे साधन मानले आहे. या परंपरेतून आपल्याला संस्कार, विनय आणि नम्रता यांचे बाळकडू मिळते.

आजच्या तंत्रज्ञानयुगात जरी नमस्काराच्या, अभिवादनाच्या पद्धती बदलल्या असल्या, तरी त्यामागची भावना, आदर, आणि मानवतेचा गाभा सदासर्वकाळ तसाच जपणे हे आपले कर्तव्य आहे.

वरील विवेचनाच्या पार्श्वभूमीवर आपण घरात, समाजात, सोसायटीत, ऑफीसात, कार्यालयात, उत्सवात, स्नेहसंम्मेलनात कसे वागतो याचा प्रत्येकाने विचार करावा, आत्मपरीक्षण करावे 

शास्त्राने सांगितलेले शिष्टाचार, अभिवादन – प्रति अभिवादनाचे संकेत दुर्लक्षिणे, टाळणे, त्याविषयी निष्काळजीपणा दाखवणे अशा कळत न कळत घडणाऱ्या कृतीतून समाजासमोर आपली कशी प्रतिमा उभी ठाकते याचे आत्मनिरीक्षण प्रत्येकाने अवश्य करावे.

समाजाने आपल्याला ‘एक चांगली, सभ्य, सुसंस्कृत, सज्जन व्यक्ती’ म्हणून ओळखावे अशी अपेक्षा बाळगणाराने वरील अभिवादन – प्रतिअभिवादचे संकेत व शिष्टाचार अवश्य पाळावेत.

अंती येवढेच म्हणता येईल की,

नम्रता हीच खरी विद्वत्तेची ओळख आणि योग्य साद – प्रतिसाद हीच सज्जनता समजावी!

 🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आपलं मूल : चतुर की रॅन्चो? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ आपलं मूल : चतुर की रॅन्चो? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

“सर, अभ्यासाला बसायलाच नको वाटतं. त्यातलं मला काही येतच नाही. आता तर परिक्षा तोंडावर आहे. काय करु, काही समजत नाही. ” बारावी कॉमर्स मध्ये शिकणारा मुलगा असं सांगताना अक्षरशः धाय मोकलून रडत होता. पालक अतिशय सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या उच्च मध्यमवर्गीय. पण मुलाच्या करिअर आणि अभ्यासाच्या बाबतीत गणित कुठंतरी चुकत होतं.

“कॉमर्स मध्ये प्रवेश घेण्याआधी कुणाचा सल्ला घेतला होता का? ” मी विचारलं.

“खास सल्ला असा काही कुणाचा घेतला नाही. पण कॉमर्स घेऊन सीए होणं हा चांगला ऑप्शन आहे, म्हणून कॉमर्स घ्यायला लावलं. ” मुलाचे वडील म्हणाले.

“घ्यायला लावलं? म्हणजे? “

“तो सीए करायला नकोच म्हणत होता. आम्हीच करायला लावलं. ” वडील.

“मला अभ्यास जमतच नाही. पाच पाच तास क्लासेस करायचे आणि अजून वरून अभ्यास करायचा, हे मला जमणारच नाही. मी आधीपासूनच सांगत होतो. पण तरीही मला जबरदस्तीनं क्लास लावला ह्यांनी.. ” मुलगा रडत म्हणाला.

“ह्याचं सगळं आईवडिलांनी ऐकायचं, तर मग एवढी एक गोष्ट आईवडिलांची ऐकली तर बिघडलं कुठं? आणि एवढं काय मोठं मागतोय मी? फक्त सीए हो एवढंच म्हणतोय ना? ” वडील म्हणाले.

“पण सीए होणं सोपं नाहीये. ” मी म्हटलं.

“बरोबर आहे ना. पण मला सांगा, तुम्ही महागडं हॉटेलिंग करता, ब्रँडेड कपडे घालता, दोनशे रुपयांच्या खाली पेन वापरत नाही, वरून पुन्हा आठवड्याला दीड हजार रुपये पॉकेटमनी घेता. ते काय सगळं फुकट येतं का? ही सगळी छानछोकी बाप देतोय ना, ती देण्याची ऐपत कमावणंसुद्धा सोपी गोष्ट नाहीय. ” वडील म्हणाले आणि मग प्रकरण अजूनच ताणलं गेलं. वाद अगदी टिपेला गेला. त्यावेळी दोघांना शांत करून मी पाठवून दिलं आणि दोन दिवसांनी फक्त वडिलांनाच बोलावलं.

“सीए होण्याचं सोडा, आधी बारावी मध्ये पास व्हायचं बघावं लागेल. ” मी म्हटलं.

“असं कसं? आम्ही त्याला क्लासेस तर सगळे लावले आहेत. ” वडील म्हणाले.

“मान्य. पण क्लासेस लावून हा प्रश्न सुटत नाही. त्याचा बेसिक प्रॉब्लेम निराळाच आहे. “

“काहीही प्रॉब्लेम नाहीये त्याला. फक्त निवांत बसून खायचंय आयुष्यभर. बाप कमावतोय ना? मग जगा त्याच्या जीवावर आणि मजा मारा.. ” वडील वैतागून म्हणाले.

“तसं माझं मत नाही. सतत अभ्यास कर म्हणून सांगणं आणि अभ्यास कुठल्या पद्धतीनं, कुठल्या तंत्रानं कर याविषयी शिकवणं ह्या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. तासनतास अभ्यास केला म्हणजे सगळंच आलबेल असतं, असं नसतं. ” मी त्यांना म्हटलं.

आम्ही बरीच चर्चा केली. त्यातून त्यांना त्याचं गांभीर्य लक्षात आलं असावं. त्यांनी मुलाला आमच्या “साधना” शिबिराला पाठवायचं ठरवलं. पण एकाचवेळी संताप, मनस्ताप आणि मुलाचं पुढचं सगळं भवितव्य अधांतरी दिसत असल्यानं अत्यंत अस्वस्थ झालेलं एका बापाचं मन मी त्यांच्या चेहऱ्यावर पाहत होतो.

त्यांचंही चूक नाही म्हणा. सतरा-अठरा वयाच्या मुलाचं शिक्षण किमान बारा वर्षं तरी झालेलंच असतं. बारा वर्षं हा काही कमी काळ नाही. एवढ्या मोठ्या काळात, चांगल्या शाळेत घालून, चांगल्या ट्युशन्स लावूनसुद्धा मुलाची अभ्यास करण्याची पद्धतच अजून म्हणावी तितकी चांगली नाही म्हणजे काय? पालकांना असं वाटणं अगदी स्वाभाविक असतं. कित्येकांना तर अभ्यास कौशल्य आणि परीक्षा कौशल्य हे तर फॅड वाटतं.

पण तसं नाही. हे फॅड नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रातली माणसं बघा, त्या क्षेत्रात चांगलं, वेगवान, अचूक काम करण्यासाठीची त्यांची स्किल्स वेगवेगळी असतात. मग ते एखाद्या भेळवाल्याचं कांदा कापण्याचं स्किल असो, माडावरून नारळ उतरवणं असो, एखाद्या महागड्या सिल्क साडीला इस्त्री करणं असो किंवा तंदूर भट्टीवर काम करणं असो.. कौशल्य तर आहेच.

आपण बऱ्याचवेळा कौशल्य या संकल्पनेचा चुकीचा अर्थ लावतो आणि तिथंच फसतो. कौशल्य म्हणजे कमीतकमी वेळात जास्तीत जास्त काम करणं, असं आपल्याला वाटतं. पण तसं नाही. कौशल्य म्हणजे एखादं काम इतरांपेक्षा अत्यंत उत्तम आणि अचूक करण्यासाठीचं स्वतःची अशी खास शैली विकसित करणं. त्यासाठी गती हवी, शक्ती हवी, बुद्धिमत्ता हवी, योग्य मार्गदर्शन हवं, शिस्त हवी, सातत्य हवं आणि निरंतर सराव हवा. गती, शक्ती, बुद्धी, मार्गदर्शन, शिस्त, सातत्य आणि सराव या सातही गोष्टींचा एकत्र समन्वय साधल्याशिवाय कुठलंच कौशल्य कोणत्याही माणसात विकसित होऊच शकत नाही. जेव्हा या सातही गोष्टी एकत्र साधल्या जातात तेव्हा त्या कृतीमध्ये एक निराळं चैतन्य येतं, ती गोष्ट इतरांपेक्षा अत्यंत उत्तम होते, इतरांपेक्षा तिची गुणवत्ता वाढते आणि अर्थातच त्या व्यक्तीचा आत्मविश्र्वासही वाढतोच. आपल्याला असं वाटत असतं की, अशी कुशल माणसं त्यांच्या गोष्टी किती सहजपणे आणि बिनकष्टात करतात, पण तसं नसतं. कष्ट तर करावेच लागतात. पण कष्टांचे डोंगर उपसणं आणि योग्य दिशेनं कष्ट करणं यामध्ये खूप फरक असतो.

आता नेमकं इथंच आपल्या मुलांचं अभ्यास प्रकरण फसतं. केवळ शाळा, कॉलेज, क्लासेसना गेलं म्हणजे अभ्यास होतोच, असं कुणाला वाटत असेल तर तो मोठा गैरसमज आहे. जोपर्यंत अत्यंत शिस्तबद्ध आणि योग्य पद्धत वापरुन सराव होत नाही, तोपर्यंत चांगला अभ्यास होऊच शकत नाही.

केवळ शिकलेलं लक्षात राहणं म्हणजे अभ्यास असं अनेकांना वाटतं. पण तोसुद्धा असाच मोठा गैरसमजच आहे. मला चित्र कसं काढायचं हे माहिती असलं म्हणजे उत्कृष्ट चित्र काढता येईलच असं नाही. एखादी रेसिपी तोंडपाठ केली म्हणजे तो पदार्थ अत्यंत उत्तम जमेलच, असं नाही. वर्षानुवर्षं आपल्या घरात तयार होत असूनही आपल्याला एखाद्याच्या हातचीच चकली आवडते, एखाद्याच्या हातचेच गुलाबजाम आवडतात. साधी भेळ खाण्यासाठीसुद्धा आपण ठराविक भेळवाल्याकडेच जातो. कपडे शिवायला टाकण्यासाठीचा आपला टेलर ठरलेला असतो. घरच्या कार्यक्रमांमध्ये फोटो काढणारा फोटोग्राफर ठरलेला असतो इथपासून ते मेंदी कुणाकडून काढून घ्यायची हेही ठरलेलं असतं.

या सगळ्या व्यक्तींमध्ये एक समान धागा असतो. तो म्हणजे त्यांच्या त्यांच्या कामातलं त्यांनी प्राप्त केलेलं गुणवान कौशल्य. “मी आठ दिवस सँडविच च्या स्टॉलवर उभा राहिलो ना, तर मी ह्याच्यापेक्षा सुद्धा भारी करुन दाखवीन” हे म्हणणं सोपं असतं. पण ते जमणं कठीण असतं. झाकीरभाई जगात भारी तबला वाजवतात यात शंकाच नाही. पण त्यांच्या वादनाला शोभेल असा तबला तयार करणं, हेही सोपं काम नसतं. चार चार रिबाँड स्ट्रोक्स अगदी लिलया बसतील असा कॅरमबोर्ड तयार करणं प्रत्येकालाच जमत नाही.

आता काळानुसार शैक्षणिक अभ्यासक्रम बदलले आहेत, बहुतांश अभ्यासक्रमांसाठी निरनिराळ्या प्रवेशपरीक्षा आल्या आहेत, त्यांचेही अभ्यासक्रम आहेत आणि वेगळ्या परीक्षापद्धती आहेत. त्यात यश मिळवणं गरजेचंच आहे. नुसत्या पाठांतरावर, वाचनावर किंवा लिखाणावर ते शक्यच नाही. मग एकाचवेळी नियमित अभ्यास आणि प्रवेशपरीक्षेचा अभ्यास हा तोल सांभाळायचा कसा? त्यासाठीच हवं अभ्यास कौशल्य आणि परीक्षा कौशल्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण..

मानसतज्ज्ञ मयुरेश डंके आणि पूर्वा डंके यांचं “साधना” हे कौशल्य शिबिर गेली २० वर्षं झाली, शेकडो विद्यार्थ्यांना अभ्यास आणि परीक्षा कौशल्यांचं प्रशिक्षण देतंय. विशेष म्हणजे, साधना शिबिरातलं एकही अभ्यास कौशल्य किंवा परीक्षा कौशल्य अन्यत्र कुठंही सापडतही नाही आणि शिकवलंही जात नाही. कारण, यातलं प्रत्येक कौशल्य त्यांनी स्वतः संशोधन करुन विकसित केलेलं आहे. प्रत्येक विषयच नव्हे तर, प्रत्येक धड्याच्यानुसारसुद्धा अभ्यासाची तंत्रं त्यांनी आखली आहेत. त्यांची कुठलीच अभ्यास पद्धत गूगलवर सुद्धा सापडत नाही. त्यामुळं, हे खऱ्या अर्थाने अत्यंत वेगळं आणि आपल्या मुलांसाठीचं मूलभूत आवश्यक प्रशिक्षण आहे.

दरवर्षी हे शिबिर २७ ते ३१ डिसेंबर या काळात पुण्यात सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी होतं. हे पूर्णवेळ निवासी शिबिर असतं. सगळ्या मुलांची राहण्याची आणि भोजनाची उत्तम सोय असते. चार दिवसांच्या या प्रशिक्षणात मुलांसाठी एकूण २३ सेशन्स असतात, सरावाची सत्रे वेगळी असतात. पालकांसाठी स्वतंत्र सेशन असते. यावर्षी पालकांसाठी एकूण चार सेशन्स असणार आहेत. शिबिरासाठी विद्यार्थीसंख्या खूपच कमी असते. केवळ २५ विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येतो.

दोन महिन्यांवर बोर्डाची परिक्षा आलेली असताना शून्य अभ्यास झालेला हा मुलगा जून महिन्यात मात्र आनंदानं नाचत पेढे घेऊन आला. ज्या परीक्षेत नापास होण्याची त्याला पूर्ण खात्री होती, त्याच परीक्षेत त्यानं ८३% गुण मिळवले होते. सगळा “साधना” शिबिराचा परिणाम..! आपल्या देशातली शिक्षणव्यवस्थाच अशी आहे की, मुलांना स्वतःला एकाचवेळी विद्यार्थी आणि मार्कार्थी असं दोन्हीही घडवावं लागतं. आणि “साधना” मध्ये ते काम अगदी परफेक्ट होतं..!

यशाची कथा आपोआप लिहिली जात नाही, त्यासाठी कौशल्य लागतं, हे मात्र खरं..!

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘वंदे मातरम्’ या गीताची रचना – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘वंदे मातरम्’ या गीताची रचना – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

श्री. बंकिमचंद्र चटर्जी 

वंदे मातरम्” या गीताची रचना – – 

आपल्यापैकी अनेकांना कदाचित हे माहीत नसेल की, एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर झालेल्या भांडणामुळेच “वंदे मातरम्” या गीताची रचना झाली? सुमारे १५० वर्षांपूर्वी, पश्चिम बंगालमधील बहरामपूर येथील बॅरॅक स्क्वेअर (आताचे स्क्वेअर फील्ड) मैदानावर एक वाद निर्माण झाला, ज्याने बंकिमचंद्र चटर्जी यांना हे देशभक्तिपर गीत लिहिण्याची प्रेरणा दिली. जर त्या क्रिकेट सामन्यादरम्यान ब्रिटिश कर्नल डफिनने बंकिम बाबूंवर हल्ला केला नसता, तर कदाचित ‘वंदे मातरम्’ हे गीत कधीच लिहिले गेले नसते.

हा वाद १८७३ मध्ये बहरामपूर छावणीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल डफिन यांच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या एका क्रिकेट सामन्यापासून सुरू झाला. १५ डिसेंबरच्या संध्याकाळी, मुर्शिदाबाद जिल्ह्याचे तत्कालीन डेप्युटी कलेक्टर बंकिमचंद्र चटर्जी आपल्या पालखीतून घरी परत येत होते. त्यांच्या नकळत, पालखी वाहकांनी क्रिकेटच्या मैदानावरून एक शॉर्टकट घेतला, ज्यामुळे खेळात व्यत्यय आला. रागाच्या भरात कर्नल डफिनने पालखी थांबवली, बंकिम बाबूंना बाहेर ओढले आणि त्यांना चार-पाच वेळा ठोसे मारले.

ही घटना प्रिन्सिपल रॉबर्ट हँड, रेव्हरेंड बार्लो, न्यायाधीश बेनब्रिज, लालगोलाचे राजा जोगेंद्र नारायण रे, दुर्गाचरण भट्टाचार्य आणि इतर अनेक ब्रिटिश व भारतीय प्रतिष्ठित व्यक्तींसमोर घडली.

बंकिम बाबूंनी या अपमानाबद्दल न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात खटला दाखल केला. १६ डिसेंबर १८७३ रोजी, त्यांनी मुर्शिदाबाद येथील जिल्हा दंडाधिकारी श्री. विंटर यांच्या न्यायालयात कर्नल डफिन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. साक्षीदारांना बोलावण्यात आले, परंतु बहुतेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ही घटना नाकारली. तथापि, प्रिन्सिपल रॉबर्ट हँड, राजा जोगेंद्र नारायण रे आणि दुर्गाचरण भट्टाचार्य यांनी बंकिम बाबूंच्या बाजूने साक्ष दिली.

पुढील सुनावणी १२ जानेवारी १८७४ रोजी होणार होती. त्या सकाळी हजारो भारतीय आणि युरोपीय प्रेक्षक न्यायालयात जमले होते. सुनावणीदरम्यान, न्यायाधीश बेनब्रिज यांनी दंडाधिकाऱ्यांना आपल्या दालनात बोलावले आणि बंकिम बाबूंना खटला मागे घेण्याची विनंती केली. सुरुवातीला त्यांनी नकार दिला, परंतु नंतर कर्नल डफिन यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी या अटीवर ते सहमत झाले. अखेरीस, कर्नल डफिनने न्यायालयात हात जोडून माफी मागितली.

भारतीय तरुणांनी टाळ्या, हशा आणि “हो-हो” च्या घोषणांनी जल्लोष केला. न्यायालयाच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बंकिम बाबूंना ठार मारण्याचा गुप्तपणे कट रचला. हे कळल्यावर, राजा जोगेंद्र नारायण राय यांनी बंकिम बाबूंना लालगोला येथे आमंत्रित केले, जिथे ते जानेवारी १८७४ मध्ये स्थलांतरित झाले.

लालगोला येथे, बंकिम बाबूंनी जगद्धात्री, दुर्गा आणि काली मंदिरांना भेट दिली. तिथे त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारताला एकाच ‘मंत्रा’ने कसे एकत्र आणावे याचा विचार केला. अखेरीस, ३१ जानेवारी १८७४ रोजी, माघी पौर्णिमेच्या रात्री, त्यांनी १२ अक्षरी ‘वंदे मातरम’ची रचना केली, ज्यामुळे भारतीयांमध्ये देशभक्तीची ज्योत पेटली आणि ब्रिटिशांच्या मनात भीती निर्माण झाली.

नंतर, त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीचे काही भाग १८८१ मध्ये बंगदर्शन मासिकात (खंड ७) प्रकाशित झाले आणि संपूर्ण पुस्तक १८८२ मध्ये प्रसिद्ध झाले. ब्रिटिशांनी बंकिम बाबूंवर कादंबरीतील मजकूर बदलण्यासाठी दबाव आणला, ज्यामुळे त्यांनी १८८५-८६ मध्ये सरकारी सेवेतून स्वेच्छेने निवृत्ती घेतली.

१४५ वर्षांनंतरही, ‘वंदे मातरम’ आपल्या मनात देशभक्तीची भावना जागृत करत आहे! ही घटना सिद्ध करते की अपमान, न्यायासाठीचा लढा आणि स्वातंत्र्याच्या इच्छेतून ‘वंदे मातरम’चा जन्म झाला. आजही हे गीत आपल्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करते. वंदे मातरम!

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सेवामूर्ती ठक्कर बाप्पा…” ☆ सौ शोभा जोशी ☆

सौ शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “सेवामूर्ती ठक्कर बाप्पा…” ☆ सौ शोभा जोशी

ठक्कर बाप्पा ज्यांनी आपले जीवनदलित आणि जनजातींच्या सेवेत खर्ची घातले त्यांच्याबद्दल स्व. डाॅ. राजेंद्र प्रसाद म्हणाले होते की, “जेव्हा जेव्हा निःस्वार्थ समाजसेवकांची आठवण येईल तेव्हा तेव्हा ठक्कर बाप्पांची मूर्तीच डोळ्यांसमोर उभी राहिल. “

ठक्कर बाप्पांचा जन्म गुजरात मधील भावनगर मध्ये २९ नोव्हेंबर १८६९ मध्ये झाला होता. त्यांचे मूळ नाव अमृतलाल ठक्कर होते. त्यांचे वडिल विठ्ठलदास लालजी ठक्कर यांची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण होती तरी समाजातील सर्व मुलांच्या शिक्षणाकडे त्यांचे विशेष लक्ष होते. आणि वडिलांमधील हीच सेवावृत्ती ठक्कर बाप्पांच्यात आली होती. त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून पुण्यामधून इंजिनिअरींगची पदवी मिळवली होती.

त्यावेळी जातीभेदाचे भयंकर भूत समाजाच्या मानगुटी बसले होते त्यामुळे ठक्कर बाप्पा व्यथित झाले होते.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सोलापूर आणि भावनगर येथे रेल्वेत नोकरी केली पण इतर अधिकार्‍यांच्या प्रमाणे त्यांनी लाच घेणे नाकारले म्हणून त्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागले.

त्यानंतर त्यांनी वढवण, पोरबंदर राज्यात काम केले. आफ्रीकेमध्ये तसेच सांगलीमध्ये सुध्दा काही काळ काम केले. मुंबई नगरपालिकेत संपूर्ण शहराचा कचरा गोळा करणार्‍या रेल्वेत काम केले. त्यावेळी कचरा गोळा करणार्‍या हरिजन कामगारांना वरिष्ठांना लाच द्यावी लागत होती. त्यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था निर्माण झाली आणि त्यांनी याविरूध्द आवाज उठवला. २३ वर्षं त्यांनी ही नोकरी केली.

त्यांनी लोकांमध्ये स्वाभिमान जागवण्याचे काम केले तसेच खादीचाही प्रचार केला. गुजरात मध्ये झालोद -दा होच या वनवासी क्षेत्रातील भील लोकांसाठी ‘ भील सेवा मंडळा’ची स्थापना करून त्यांना शिक्षण देण्याचे काम सुरू केले ते आजही सुरू आहे.

मध्य प्रदेशात जनजातींचे धर्मांतरण करण्याचे, ख्रिश्र्चनांचे काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्याला आळा घालण्यासाठी त्यावेळचे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री रवी शंकर शुक्ल यांना ठक्कर बाप्पांनी सल्ला दिला की, लोकांमध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र विभाग सुरू करावा. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सरकारने ‘ जनजाती कल्याण विभाग ‘ सुरू केला. हे काम व्यवस्थित चालावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बाळासाहेब देशपांडे यांना नागपूरहून बोलावून घेतले. त्यांच्याकडे हे काम सोपवले गेले. बाळासाहेबांनी, जनजातीच्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्षात १०० शाळा सुरू करण्याची योजना आखली. ठक्कर बाप्पांना हे अशक्य वाटत होते. त्यांनी बाळासाहेबांना सांगितले ही योजना सफल झाली तर मी स्वतः या शाळांना भेटी देईन. या शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्यावर त्यांनी वृध्दावस्थेतही या शाळांना भेटी देऊन बाळासाहेबांचे कौतुक केले आणि त्यांना २५०/- रू. बक्षिस दिले. त्या काळात २५०/- रू. ही छोटी रक्कम नव्हती.

वनवासी कल्याण आश्रमाच्या स्थापनेमागे गोळवलकर गुरूंजीप्रमाणेच ठक्कर बाप्पांचीही प्रेरणा होती.

भारतातील एखादाच प्रांत असा असेल जिथे त्यांनी सेवाकार्य केले नाही.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर ते संसदेचे सदस्य झाले. या पदाचा उपयोग सुध्दा त्यांनी दलित आणि जनजातींच्या सेवेसाठीच केला आणि अमृत ठक्कर सर्वांचे ठक्कर बाप्पा झाले.

‘जीवन त्यांना कळले हो।मी पण ज्यांचे पक्वफळापरी सहजपणाने गळले हो।।

जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळाले हो।चराचराचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो।। ‘

कवी बा. भ. बोरकरांच्या या ओळी ठक्कर बाप्पांना तंतोतंत लागू पडतात.

२० जानेवारी १९५१ रोजी ठक्कर बाप्पांना देवाज्ञा झाली. जीवनभर सेवाकार्य करणार्‍या या सेवाव्रतीला त्यांच्या स्मृतीदिनी भावपूर्ण श्रध्दांजली.

©  सौ शोभा जोशी.

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जेव्हा स्वयंपाकघर शांत झालं…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “जेव्हा स्वयंपाकघर शांत झालं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

★★★ 

 – अमेरिकेची खरी कहाणी.

 कधी विचार केला आहे का…

की एका शांत झालेल्या स्वयंपाकघराने संपूर्ण देशाचं भविष्य बदलू शकतं?

 

अमेरिकेत तसं घडलं.

1970 च्या दशकात बहुतेक घरांत आई-वडील, मुलं, आजी-आजोबा एकत्र राहायचे. संध्याकाळी सगळे डायनिंग टेबलावर बसायचे. घरातली पोळी, ब्रेड, सूप, पाय (pie) फक्त पोट भरत नव्हते, तर त्यांच्यातील नातीही घट्ट करत होते.

 

पण 1980 नंतर हळूहळू दृश्य बदललं.

फास्ट-फूड, टेक_अवे, रेस्टॉरंट यांनी त्यांच्या स्वयंपाकघरावर ताबा मिळवला. आई-वडील कामात व्यस्त झाले, मुलं पिझ्झा-बर्गरमध्ये रमली, आणि आजोबांचा आवाज कमी झाला.

 

त्याच वेळी काही तज्ज्ञांनी चेतावणी दिली होती –

“जर तुमच्या घरातील जेवणाचं नियंत्रण कंपन्यांकडे गेलं, आणि मुलं-वृद्धांची जबाबदारी सरकारवर टाकली, तर कुटुंबे उद्ध्वस्त होतील. ”

 

लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि 

खरंच तसंच झालं.

1971 मध्ये अमेरिकेत 71% कुटुंबं “पारंपरिक” होती – आई, वडील आणि मुलं एकत्र. आज ती संख्या फक्त 20% आहे.

 

उरलेलं काय? – वृद्धाश्रमात गेलेले आजोबा-आजी, भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये एकटं जगणारे तरुण, तुटलेली लग्नं, एकाकी पडलेली मुलं. घटस्फोटाचं प्रमाण पहिल्या लग्नात 50%, दुसऱ्यात 67% आणि तिसऱ्यात तब्बल 74%!

 

अमेरिकेतील हा अपघात नाही. ही किंमत आहे – शांत झालेल्या स्वयंपाकघराची आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या समाजाची!!

 

कारण घरचं जेवण हे फक्त अन्न नाही.

ते ऊब आहे.

ते आईच्या हाताचा स्पर्श आहे.

ते दादांच्या गप्पा आहेत.

ते आजीच्या गोष्टी आहेत.

ते घराला “कुटुंब” बनवणारी जादू आहे.

 

पण आज जेवण स्विगी, झोमॅटो वरून येतं, आणि घर हळूहळू “गेस्टहाऊस” बनतं.

 

याचं दुसरं भयंकर रूप म्हणजे बिघडणारे आरोग्य!

फास्ट-फूडच्या व्यसनामुळे अमेरिकेत स्थूलता, मधुमेह, हृदयरोग एवढ्या वेगाने वाढले की आज संपूर्ण आरोग्य उद्योग “आजारी पिढ्या”वर नफा कमावतो.

 

 पण अजून वेळ गेलेली नाही.

स्वयंपाकघर पुन्हा पेटवायला हवं.

 

जगातल्या अनेक संस्कृतींनी हे सिद्ध केलंय.

जपानी अजूनही एकत्र स्वयंपाक करतात, जेवतात, म्हणून ते दीर्घायुषी आहेत.

भूमध्य समुद्रातील लोक जेवणाला पवित्र मानतात, म्हणून त्यांची नाती मजबूत आहेत.

 

 *अमेरिकेची ही कहाणी आपल्याला सावध करण्यासाठी आहे!! *

आज भारतातही बाहेरचं खाणं, फूड-डिलिव्हरी, व्यस्त जीवन — सगळं तसंच सुरू आहे.

उद्या आपल्या घरातही स्वयंपाकघर शांत होऊ नये, म्हणून…

 

चूल पुन्हा पेटवा. जेवण बनवा. कुटुंबाला टेबलावर आणा; कारण शयनकक्ष घर देतो, पण स्वयंपाकघर कुटुंब घडवतं.

*आपल्या घराला कुटुंब बनवायचे आहे की, गेस्ट हाऊस हे ठरवा!! *

 *अमेरिकेस ठेच लागली आहे, भारतीय कधी शहाणे होतील?? *

 ★★★

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मकरसंक्रांतीची खगोलीय गुणवैशिष्ट्ये…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “मकरसंक्रांतीची खगोलीय गुणवैशिष्ट्ये…☆ श्री जगदीश काबरे ☆

मकरसंक्रांत हा भारतीय उपखंडातील सर्वांत महत्त्वाचा खगोलशास्त्रीय आणि सांस्कृतिक सण मानला जातो. तो धार्मिक सण म्हणून जरी ओळखला जात असला तरी त्याच्या मुळाशी पृथ्वी-सूर्य यांच्या गतीशी निगडित असलेली एक अत्यंत निश्चित आणि मोजता येण्यासारखी खगोलीय घटना दडलेली आहे. मकरसंक्रांतीचा गाभा “मकरसंक्रामण” या संकल्पनेत आहे. मकरसंक्रामण म्हणजे सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश. भारतीय सौर पंचांगानुसार सूर्य जेव्हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, त्या क्षणास मकरसंक्रामण घडते आणि त्यादिवशी  मकरसंक्रांत साजरी केली जाते. ही घटना पूर्णपणे सूर्याच्या भासमान गतीवर आधारित असल्याने ती चंद्राच्या कलांवर अवलंबून नसते, म्हणूनच बहुतेक हिंदू सणांप्रमाणे मकरसंक्रांतीची तारीख फारशी बदलत नाही आणि ती साधारणपणे १४ किंवा १५ जानेवारीस येते.

मकरसंक्रामण समजून घेण्यासाठी सर्वप्रथम पृथ्वी-सूर्य यांच्यातील भौगोलिक आणि खगोलीय नाते समजून घेणे आवश्यक ठरते. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करते. या परिभ्रमणास सुमारे ३६५.२४२२ दिवस लागतात. पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेच्या पातळीशी साधारणपणे २३.५ अंशांनी कललेला आहे. या अक्षीय कलनामुळे पृथ्वीवर ऋतू निर्माण होतात. जर पृथ्वीचा अक्ष सरळ असता तर पृथ्वीवरील सर्व भागांवर वर्षभर सूर्यकिरण समान कोनात पडले असते आणि ऋतूंचा प्रश्नच निर्माण झाला नसता. पण पृथ्वीच्या अक्षीय कलनामुळे काही काळ उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो तर काही काळ दक्षिण गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो. याच भौगोलिक रचनेतून उत्तरायण आणि दक्षिणायन या संकल्पना निर्माण झालेल्या आहेत.

सूर्य प्रत्यक्षात स्थिर असून पृथ्वी त्याच्याभोवती फिरते, परंतु पृथ्वीवरून पाहताना सूर्य आपल्याला आकाशात एका ठराविक मार्गाने फिरताना दिसतो. या मार्गाला क्रांतीवृत्त म्हणतात. क्रांतीवृत्ताच्या मार्गावर सूर्य ज्या १२ प्रमुख तारकासमूहांतून जातो, त्यांना राशी म्हणतात. या राशी खगोलशास्त्रीय दृष्टीने स्थिर तारकासमूहांशी निगडित आहेत. भारतीय ज्योतिषशास्त्रात वापरली जाणारी राशीपद्धती ही सायन नसून निरायन म्हणजेच तारकासापेक्ष आहे. त्यामुळे भारतीय पंचांगातील सूर्याचे राशीस्थान प्रत्यक्ष तारकासमूहांशी साधर्म्य राखते. सूर्य जेव्हा मकर राशीतील तारकासमूहाच्या समोर येतो, त्या क्षणास मकरसंक्रामण घडते असे मानले जाते.

भौगोलिक दृष्टिकोनातून मकरसंक्रामणाचे महत्त्व अधिक व्यापक आहे. सूर्याचा भासमान दक्षिणेकडील प्रवास थांबून उत्तरेकडे सुरू होतो, हा कालखंड म्हणजे उत्तरायणाची सुरुवात. साधारण २१ किंवा २२ डिसेंबरला हिवाळी अयनांत होतो, त्या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धात सर्वाधिक दक्षिणेला असतो. त्या नंतर सूर्याची भासमान स्थिती उत्तरेकडे सरकू लागते. भारतीय परंपरेत मात्र उत्तरायणाची गणना मकरसंक्रामणापासून केली जाते. याचे कारण म्हणजे पारंपरिक भारतीय पंचांगातील निरायन गणितीय पद्धत आणि अयनचलन यातील फरक. अयनचलन म्हणजे पृथ्वीच्या अक्षाचे अत्यंत संथ गतीने होणारे दोलन. या दोलनामुळे सुमारे दर ७२ वर्षांनी विषुवबिंदू एक अंश मागे सरकतो. त्यामुळे सुमारे २००० वर्षांत ऋतू आणि राशी यांच्यात लक्षणीय फरक निर्माण झालेला आहे.

मकरसंक्रामणाच्या वेळी सूर्य मकरवृत्ताच्या जवळ असतो. मकरवृत्त म्हणजे पृथ्वीवरील २३.५ अंश दक्षिण अक्षांशावरील काल्पनिक रेषा. सूर्य जेव्हा या रेषेवर लंबवत किरण टाकतो, त्या क्षणास दक्षिण गोलार्धात उन्हाळा आणि उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. मकरसंक्रांतीच्या सुमारास सूर्य हळूहळू उत्तरेकडे सरकत असल्याने उत्तर गोलार्धात दिवसांची लांबी वाढू लागते. या बदलाचा प्रत्यक्ष अनुभव शेतकरी समाजाने हजारो वर्षांपूर्वी घेतलेला होता. दिवस मोठे होऊ लागणे, सूर्यकिरणांची तीव्रता वाढणे आणि तापमानात हळूहळू वाढ होणे या सर्व गोष्टी कृषी प्रक्रियेसाठी अनुकूल ठरतात. त्यामुळे मकरसंक्रांत हा सण केवळ धार्मिक नसून कृषी जीवनाशी घट्ट जोडलेला आहे.

खरे पहाता, दरवर्षी सूर्य कर्कवृत्तावर (म्हणजे उत्तर अयनबिंदूवर) येण्याची तारीख थोडीफार बदलत राहते, पण हा बदल मोठा नसून साधारणपणे एक दिवसाच्या आत मर्यादित असतो. खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर सूर्य कर्कवृत्तावर असणे ही घटना म्हणजे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात ग्रीष्म अयनांत प्रामुख्याने २० जून, २१ जून किंवा क्वचित २२ जून या तारखांना घडते. या तारखेतील बदलाचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी हा नेमका ३६५ दिवसांचा नसून सुमारे ३६५.२४२२ दिवसांचा असतो. आपले दिनदर्शिकेतील सामान्य वर्ष मात्र ३६५ दिवसांचे असल्याने दरवर्षी सुमारे पाव दिवसाचा फरक साचत जातो. हा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक चार वर्षांनी एक अधिवर्ष (लीप इयर) घालण्यात येते. तरीसुद्धा हे समायोजन पूर्णपणे अचूक नसल्यामुळे अयनांत आणि विषुव यांच्या तारखा थोड्याफार पुढे-मागे सरकत राहतात. याशिवाय पृथ्वीच्या अक्षाच्या कलामध्ये (सुमारे २३.५ अंश) अतिशय सूक्ष्म पण दीर्घकालीन बदल आणि पृथ्वीची कक्षा पूर्णपणे वर्तुळाकार नसणे, तसेच ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे होणारे सूक्ष्म व्यत्यय यांचाही परिणाम या तारखेवर होतो. त्यामुळे सूर्य “कर्कवृत्तावर” येण्याचा नेमका क्षण (तास-मिनिटांपर्यंत) दरवर्षी बदलतो आणि त्यानुसार दिनदर्शिकेतील तारीखही बदलताना दिसते.

 

भारतीय पारंपरिक पंचांगात मात्र सूर्याचा कर्कसंक्रांतीत प्रवेश साधारणतः १६ किंवा १७ जुलै असा दाखवला जातो. याचे कारण म्हणजे पंचांगात वापरली जाणारी निरयन (स्थिर ताऱ्यांशी निगडित) गणना आणि आधुनिक खगोलशास्त्रातील सायनात्मक (ट्रॉपिकल) गणना यांमधील अयनचलनाचा फरक. त्यामुळे “सूर्य कर्कवृत्तावर” ही संकल्पना खगोलशास्त्रीयदृष्ट्या जूनमध्ये येते, तर धार्मिक-पंचांग परंपरेत ती जुलैमध्ये दिसते.

या विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की, मकरसंक्रांत ही एक अत्यंत नियमित आणि गणितीय अचूकतेने ठरवता येणारी घटना आहे. आधुनिक खगोलशास्त्र सूर्याचे स्थान सेकंदाच्या अंशापर्यंत मोजू शकते. आज पंचांगकार संगणकीय गणिताच्या साहाय्याने मकरसंक्रामणाचा अचूक क्षण निश्चित करतात. पूर्वी मात्र निरीक्षणावर आधारित साधने वापरली जात होती. सावलीची लांबी, सूर्याच्या उंचीतील बदल, दिवसाच्या कालावधीतील वाढ या घटकांच्या आधारे ऋतूंचे आणि संक्रांतींचे ज्ञान मिळवले जात असे. हे ज्ञान केवळ धार्मिक विधींसाठी नव्हे तर शेती, पाणी व्यवस्थापन आणि समाजजीवनाच्या नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरले होते. मकरसंक्रांतीच्या वेळी सूर्याचे पृथ्वीवरील विविध अक्षांशांवरील परिणाम वेगवेगळे दिसून येतात. विषुववृत्ताजवळ सूर्यकिरण वर्षभर जवळजवळ लंबवत पडतात, त्यामुळे तेथे ऋतूंचा फारसा फरक जाणवत नाही. पण उत्तर गोलार्धातील मध्यम अक्षांशांवर, जसे की भारत, येथे मकरसंक्रांतीनंतर सूर्यकिरण अधिक थेट पडू लागतात. त्यामुळे थंडीची तीव्रता हळूहळू कमी होत जाते. हिमालयीन प्रदेशात बर्फ वितळण्याची प्रक्रिया सुरू होते, नद्यांमध्ये पाण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते आणि शेतीसाठी आवश्यक ओलावा उपलब्ध होतो. या सर्व भौगोलिक बदलांचा मानवाच्या जीवनावर खोलवर परिणाम झालेला आहे.

एकूणच पाहता मकरसंक्रांत हा सण म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून तो पृथ्वीच्या गतीशी, सूर्याच्या भासमान हालचालींशी, अक्षीय कलनाशी, अयनचलनाशी आणि ऋतू परिवर्तनाशी थेट संबंधित आहे. मकरसंक्रामण ही एक खगोलीय घटना असून तिचे परिणाम भौगोलिक, पर्यावरणीय, कृषी आणि मानवी जीवनाच्या विविध पैलूंवर पडलेले आहेत. आधुनिक विज्ञानाने या घटनेचे गणितीय स्पष्टीकरण दिले असले तरी प्राचीन भारतीयांनी निरीक्षण, अनुभव आणि परंपरेच्या माध्यमातून या बदलांचे भान ठेवले होते हे नाकारता येत नाही. त्यामुळे मकरसंक्रांतीकडे अंधश्रद्धेच्या चौकटीतून नव्हे तर निसर्गातील नियमित, समजून घेण्यासारख्या आणि मानवजीवनाशी जोडलेल्या एका वैज्ञानिक घटनेच्या रूपात पाहणे अधिक योग्य ठरते.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मधुमालती…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “मधुमालती…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

रस्त्याने जाता जाता मधुमालतीची वेल दिसली… आणि थबकून उभीच राहिले.. पूर्ण कंपाउंड भर तो वेल पसरला होता. लांब नाजूकशी दांडी… मंद लाल… गुलाबी रंग… मध्येच पांढऱ्या रंगाची थोडी पखरण… पाच पाकळ्यांचे हे नाजूक फुल…

खाली वाकलेलं…

अशा मधुमालतीचे अक्षरशः घोसच्या घोस वेलीला लागलेले होते.

पानं मधून डोकावत होती. त्यांच्या हिरव्या रंगाजवळ ही फुलं अजूनच गोड दिसत होती.

निसर्गाने त्याच्या सौंदर्याची मुक्त उधळण केली होती.

हलकेच फुलांवरून अलगद हात फिरवला. तिथून निघावं…

असं वाटतच नव्हतं.

कितीतरी वेळ मी फुलांजवळ उभी होते.

 

निसर्गात किती विविध फुले आहेत.. थोडं शांतपणे थांबून त्यांच्याकडे बघत उभ राहावं… त्यांचं वैभव न्याहाळत त्याचा आस्वाद घ्यावा…

त्याच्याशी समरस व्हावं…

 

हे असं सौंदर्य आपल्याला तो दाखवत आहे… त्याच्याबद्दल त्या क्षणी आपल्या मनात कृतज्ञता दाटून येते. तेवढा काळ तरी आपल्याला इतर गोष्टींचा विसर पडतो.

 

डोळे दृष्टीसुख घेत असतात..

त्याचे मनोहारी तरंग अंगभर लहरत राहतात… तो प्रेमभाव घेऊन घरी यावं..

तो दिवस बघा… कसा समाधानात जातो…

आपणच आपल्यावर खुश होतो.. उत्साहीत होतो.. असं सहज जाता जाता पहात राहावं..

आनंद घेत राहावा.. मुख्य म्हणजे यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही…

 

बाहेर पडायचं डोळस दृष्टीने बघत राहायचं… मग अनुपम्य असं काहीतरी दिसतच.. त्याची नंतर होणारी आठवणही सुखद असते.

काय बघायचं याची” नजर “आता आलेली आहे…

” येईन रे तुला परत बघायला “

असं म्हणून त्याचा निरोप घेऊन चालायला लागले..

 

तिथून जरा पुढे गेले तर…

एका झाडावर तजेलदार पिवळ्या रंगांच्या फुलांचे गुच्छ लागलेले…

नाजूक अलवार कोमल फुलं…

कितीदा त्यांच्याकडे पाहू…

असं वाटत होतं.. मन भरतच नव्हतं..

दिमाखात झाडावरती.. वाऱ्यावर डोलत होती. अगणित फुलचं फुलं दिसत होती… खाली पिवळ्या फुलांचा सडा पडला होता…

 

इतक्या उंच असल्याने मान वर करून त्यांच्याकडे कोणी बघतही नव्हतं… ती बिचारी ऊमलतात फुलतात… त्यांची दखल घेतलीच जातं नाही…

मला त्याचं वाईट वाटलं…

माझ्या मनात विचार आला…

त्या फुलांना काय बरं वाटत असेल…

 

इतक्यात दोन छोट्या मुली तिथे आल्या. जवळ रहात असाव्या.

त्यांनी खाली पडलेली फुलं गोळा करायला सुरुवात केली. नंतर एकत्र करून आपल्या हातात पकडली. मला त्यांच कौतुक वाटल.

मी त्यांना विचारलं,

” या फुलांचं तुम्ही काय करणार ग? “

 

” आमच्या सोसायटीच्या दारातच छोटासा गणपती बाप्पा आहे. त्याच्यासाठी आम्ही ही रोज घेऊन जातो. “

निरागसपणे ती म्हणाली…

 

मगाशी मला ज्या फुलांची दया आली होती…

ती फुलं प्रत्यक्ष परमेश्वराच्या चरणी अर्पण होणार होती.

किती थोर त्यांचं भाग्य होतं…

 

लहान लेकरं निष्पापपणे असं वागतात… बोलतात…

त्यांच ऐकून मग मी थोडी शहाणी होते.

 

वर झाडाकडे मायेनं बघितलं…

खाली पडलेली फुलं मी पण उचलून घेतली…

घरी आणली..

माझ्या बाप्पासाठी…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अध्यात्म आणि विस्मरण झालेल्या लोकांचे काळजीवाहू पाल्य – भाग २ – लेखिका : डॉ. पुष्पा घळसासी ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

 

? इंद्रधनुष्य ?

☆ अध्यात्म आणि विस्मरण झालेल्या लोकांचे काळजीवाहू पाल्य – भाग २ – लेखिका : डॉ. पुष्पा घळसासी ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

 (माणसाला आपला घरात अजूनही उपयोग होतो आहे ही भावना सुखावह असते.) – 

इथून पुढे – – 

त्यांच्याबरोबर पत्ते खेळावे. फार वेळ खेळावे लागत नाही. कारण अशा माणसांना पेशंस खूप कमी असतो. ते एकच गोष्ट करण्यास लगेच कंटाळतात. पत्त्यांमध्येही आधी क्रमवार चित्र लावून घ्यावीत. म्हणजे राजा राणी गुलाम l यांचा क्रम जो आहे तो आपण आधी त्यांच्यापुढे काढून दाखवावा आणि सतत त्यांच्याकडून करून घ्यावा. असे केल्याने तो सिक्वेन्स जो आहे तो लक्षात येईल. त्यांच्यासमोर बसून आपणही पत्त्यातली चित्र क्रमवार सतत लावावीत. त्यामुळे ती चित्रे डोळ्यात बसतील.

त्यानंतर अगदी लहान लहान सिक्वेन्स करायला भाग पाडावी. आठ दहा दिवस एवढेच घ्यावे. फार घेऊ नये. त्यानंतर मोठे सिक्वेन्स लावणे. म्हणजे प्रथम १२३४हे पहिले आठ दहा दिवस करायचं. आणि नंतर एक ते दहा अंक नंतरच्या आठवड्यात करावे. असे मोठे सिक्वेन्स लावण एक एक पायरी चढायला शिकवण. नंतर लहान मुलांची खेळतो ते भिकार सावकार किंवा एकच रंगाचे पत्ते वेगळे करणे, एकाच आकारचे पत्ते वेगळे करणे, जेणेकरून त्यांना बदाम, इस्पिक, चौकट, किलवर हे पत्ते वेगवेगळे ओळखता येऊ लागतील. रंग समजतील.

काही तोंडी गणिती खेळ घेणे म्हणजे एक ते दहा अंक. एक ते वीस, तीस ते चाळीस असे वाढवत रोज म्हणायचे. हे जमायला लागल्यावर दोन ते पाच पर्यंतचे पाढे घ्यायचे. विशिष्ट अंक काढून एक ते 20 अंक मोजायला शिकवायचं. उदाहरणार्थ तीन अंक गाळला म्हणून एक दोन चार पाच सात आठ दहा अकरा. यात खरं म्हणजे सहा आणि नऊ हे सुद्धा अंक येतात पण त्या सहा आणि नऊ हे अंक तीन गुणिले दोन आणि तीन गुणिले तीन हे कदाचित त्यांच्या लक्षात येणार नाही म्हणून इथे तो वापरू नये. भाषिक खेळ, शब्दकोडी सोडवणे, अंताक्षरी घेणे, गावाच्या भेंड्या लावणे यावरून स्मरणशक्ती वाढते. अर्थात आपल्या मुलांबरोबरही लहानपणी हे खेळ खेळले तर त्यांची स्मरणशक्ती वाढते हे प्रयोगाने सिद्ध झालेले आहे. त्यांच्याबरोबर कविता म्हणणे असे अनेक विविध खेळ आपण घेऊ शकतो. शब्दांमधील अक्षरांची उलटा पालट करून योग्य ते शब्द म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार करणे. पहिला आणि शेवटचा अक्षर एकच असलं शब्द कसा उलटा सुलता वाचला तरी तोच होतो. अशा प्रकारचे खेळ. म्हणजे उदाहरणार्थ समास, नवीन कसाही वाचला तरी तो तोच शब्द राहील. असे छोटे छोटे खेळ खेळतात त्यांच्या चांगला फायदा होतो 

ओंकार आणि गायत्री मंत्राने मेंदूच्या पेशी उद्दीपित होतात त्यांना काही प्रमाणात तरी आठवण्यासाठी हा पण एक प्रयत्न करता येतो. तसंच श्वास जो आहे तो श्वास मोजून वाढवून आणि सोडून. या प्रकारची क्रिया केली म्हणजे मोठ्या माणसांमध्ये आपण पाच, सात, पाच असं करतो. म्हणजे पाच सेकंद श्वास घेणे, सात सेकंद तो साठवणे छातीमध्ये आणि पुढचे पाच सेकंद उछवास करणे. याला आपण मोठी माणसं सहज करू शकतो. पण या वयाला आणि त्यांच्या स्थितीला हे शक्य होत नाही म्हणून श्वास घेण्याची क्रिया 3 सेकंद, श्वास रोखण्याची क्रिया 3 सेकंद, आणि श्वास सोडण्याची क्रिया तीन सेकंद याप्रमाणे करून घ्यावे त्याचा चांगला उपयोग होतो. त्यांच्याबरोबर आपण फिरायला जाऊ शकता. मग फिरायला कुठे लांब जायचं असं नाही. पार्किंग मध्ये, जवळच्या बागेत थोडावेळ त्यांना फिरवून आणले. त्यांच्या मित्रांना, आपल्या मित्रांना मुद्दाम त्यांच्याशी गप्पा मारायला बोलावणे. म्हणजे त्यांनाही सोशल लाइफ अनुभवता येते. तसंच आपल्या मुलांच्या मित्रांना घरी बोलवावं त्या मित्रांना पूर्ण कल्पना त्यांच्या आजाराची पूर्ण कल्पना द्यावी आणि ती मुलं जर त्या आजोबांना घेऊन किंवा आजीला घेऊन काही खेळ खेळले तर ते त्या वेळापुरते आनंदी राहतात कारण त्यांनाही नातवंडांची आवड असते. आणि मग तीही मुलं एक अर्धा तास रोज खेळली तरी त्या वेळेची ते वाट बघतात. कदाचित त्यांना वेळ समजणार नाही. किती वाजलेत ते पण कळणार नाही. पण मुले घरी येऊन बसली आहेत हे मेंदूला त्यांची तेवढी तरी जाणीव होईल. अशी आशा वाटते.

आता प्रश्न असा येतो की पेशंट समजा व्हायलेंट झाला तर पेशंटला शांत कसं करायचं? आपल्या मनावरील नियंत्रण, योगाचा उपयोग समजूत घालण्यासाठी लागणारा आपला पेशंस, आणि सहानुभूती, समजूतदारपणा या गोष्टी जर आपण आपल्या अंगी baanaavalya, वाढवल्या तर हे शक्य होईल. म्हणजे इथे पुन्हा अध्यात्म आलं. हे अध्यात्माच्या साह्याने आपण आपल्यामध्ये तयार केलं तर त्यांच्या मनाप्रमाणे त्यावेळी गोष्टी करता येतील. ते लगेच विसरणार. पण पेशंट व्हायोलंत झाल्यास मग अवघड जातं. आपल्या मुलांवरही नियंत्रण ठेवायला हवे. मुलांना त्यांची मानसिक स्थिती आपण स्वतः शांतपणे समजावून सांगावी. पेशंटकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये. आजोबा आजीशी पूर्वीप्रमाणेच प्रेमाचे वागणे ठेवण्यास सांगावे. त्यांच्याशी गोड बोलायला सांगा. वर्गातील गमती जमती त्यांना सांगाव्यात. जेणेकरून त्यांना घरात महत्त्व मिळत आहे हे त्यावेलेपुरते तरी समजते व त्यांची चिडचिड कमी होते. असं पहा “परिस्थिती बदलता येत नसेल तर आपली मन:स्थिती बदलावी लागते” 

याबरोबरच त्यांची औषधा वेळेवर द्यायला हवी. त्यांच्या जवळच्या खिशात किंवा पर्समध्ये किंवा आपण जो फ्रेंडशिप बँड बांधतो त्या बँडवर त्यांचं नाव, आपला नंबर मोबाईल नंबर, आणि घरचा पत्ता हा त्यांच्याजवळ सतत ठेवावा. जेणेकरून ते एकटेच जर बाहेर पडले आणि हरवले, रस्ता सापडत नसेल तर कोणीतरी माणूस तो त्यांना पत्ता सांगून घरापर्यंत आणून सोडेल. त्यांचा आजार यांची माहिती पण त्यात द्यायला विसरू नये. इथे परिस्थिती बदलता येत नाही म्हणून आपल्यावरच बंधने येतात. म्हणून आपण स्थित:प्रज्ञ राहणं हेच अध्यात्म आहे. ज्याची आपल्यावर जबाबदारी आहे तो एखाद्या लहान मुलासारखा होतो. म्हणून त्यांचे हट्ट पुरवावे लागतात. पण ते सर्व क्षणिक आहेत. दुसऱ्या मिनिटाला ते सर्व विसरतात. म्हणून स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायला हवे. कारण तुम्ही करताय त्या सेवेची कदाचित त्यांना जाणीव होणार नाही, पण त्यांच्या आत्म्याचे आशीर्वाद आपल्याला मिळतात ते महत्त्वाचे आहेत, माझी आजी म्हणायची की “कोणी एखाद्या माणसाने आपल्याला बोलून काही आशीर्वाद दिले नाहीत तरी त्याच्या आत्म्याचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतात”. बोलीभाषा मन शांत करण्यासाठी, (स्वतःचे आणि पेशंटचे सुद्धा)

त्यांची चित्तवृत्ती जागृत करण्यासाठी सावकाश पण लयबद्ध स्वरात. आवाजातील चढ-उतार ऐकून मानसिक तृप्ती करणारी. त्याच वेळी चेहऱ्यावरील भाव महत्त्वाचे आहेत. त्यांना आनंददायी वाटले पाहिजे आणि इतर लोक काय करतील, म्हणतील याची परवा न करता स्वतः वागायचे आणि आपल्या मुलांना सुद्धा तशीच शिकवण द्यायची आहे.

आता प्रश्न असा की अध्यात्म कुठे आलं? आपण सुरुवातीलाच अध्यात्माचा अर्थ समजून घेतलाय. स्वतःला ओळखणे मी कसा आहे याचे उत्तर शोधताना आपल्याला आजूबाजूच्या सर्वांनी चांगला माणूस म्हणून ओळखावे अशी सर्वांची सूpt इच्छा असते. त्यासाठी आत्मशोध घ्यावा लागतो. “उधारेत आत्मन्:आत्मनं “आपणच आपला फक्त उद्धार करायचा नाही तर एक कुटुंब वचन म्हणून” मी “हे याचे उत्तर शोधायचे. मी मुलगा, मुलगी, भाऊ-बहीण, बहिणीनं मुले, नातेवाईक यांच्याशी जोडला गेलेलो आहे. आपणच आपला उद्धार करायचा असेल तर कुटुंबातील सर्व नाती मला समजूतदारपणे गोडीने शांततेने आपलीशी करावी लागतील. आई बाबा पण त्यातच असतील. सर्वांना सुखी, आनंदी ठेवायचे असेल तर आपल्या अंगी अध्यात्म रुजवण्याशिवाय पर्याय नाही. सर्वेशु sukhina संतु lसर्वे संतू निरामय:llअसं आपल्याकडे म्हणलं जातं. सगळ्यांना सुखी करायचे सगळ्यांनाच निरामय आयुष्य द्यायचे ही आपली सुप्त इच्छा मनापासूनची इच्छा आहे. अशा आई-वडिलांचे संगोपन मनापासून करायचे म्हणजे सुद्धा ती एक ईश्वरी सेवा आहे.. मग अध्यात्म त्यापासून काय वेगळे आहे हो?

प्रस्तुती : शुभदा भा. कुलकर्णी — भाग दुसरा  

💦🌨️

लेखिका : डॉ. सौ. पुष्पा घळसासी

प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड -पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares